लेखांक १०५ : भालोदचे मोक्षनाथ मंदिर, गायत्री मंदिर , रामेश्वर मंदिर व दत्त मंदिर
गौतम ऋषींची तपोभूमी असलेल्या या मंदिराची ४० ते ५० फूट जागा नर्मदा मातेने गेल्या ३५ वर्षात खाल्ली होती असे साधूने मला सांगितले .महापुरामध्ये प्रचंड ताकतीचा पाण्याचा लोंढा इथल्या भुसभुशीत मातीच्या भिंती कापत जातो .
गौतमेश्वर महादेवाच्या देवळात मूळ जबलपूरच्या असणाऱ्या साधू महाराजांनी चहा पाजेपर्यंत अजून दोन माताराम माझ्यासाठी चहा घेऊन आल्या ! त्यामुळे चहाच चहा मिळाला ! तिथे दर्शनासाठी आलेल्या अजून एक दोन लोकांना आम्ही त्यातला चहा पाजला . इथे भालोद शहरामध्ये आता बरीच मंदिरे होती . ती सर्व पहावीत असे मी ठरवले . मुख्य म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी या गावाला घाट बांधला आहे असे मला कळाले होते परंतु प्रत्यक्षात जाऊन पाहिल्यावर लक्षात आले की या घाटाचे सिमेंट काँक्रीट वापरून अतिशय विद्रुपीकरण स्थानिक लोकांनी केलेले आहे .मूळ दगडी घाट दिसतच नाही असे केले आहे . हे पाहून वाईट वाटले .
रुंढ गाव , भालोद मधील एक घाट
गावामध्ये रामेश्वराचे एक मंदिर आहे . इथे आजही रोज रात्री पूजा करण्यासाठी अश्वत्थामा स्वतः येतो अशी वदंता आहे .त्यामुळे रात्री या परिसरात कोणीही थांबत नाही . रामेश्वर ,विश्वेश्वर ,आदित्येश्वर , मोक्षनाथ महादेव , यज्ञेश्वर , गायत्री मंदिर ,दत्त मंदिर , देवीचे मंदिर , राम मंदिर , मारुती मंदिर अशी अनेक मंदिरे आहेत .परिक्रमेमध्ये जी चूक करायची नसते ती चूक मी या ठिकाणी केली . ती म्हणजे आपण कुठे मुक्काम करायचा हे मी स्वतः मनोमन ठरवून टाकले ! परिक्रमेमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण कुठे मुक्काम करायचा आहे आपण ठरवू नये .ते नर्मदा माईने आधीच ठरवून ठेवलेले असते ! अलीकडे भेटलेल्या विविध साधूंशी बोलल्यावर मला असे लक्षात आले होते की गायत्री मंदिर ही अतिशय तप:पूत जागा आहे .एका महान संन्याशी महाराजांनी इथे गायत्री मंत्राची तब्बल तीन पुरश्चरणे केलेली आहेत आणि त्यानंतर ही मूर्ती स्थापन केलेली आहे ! या संन्यासी महाराजांचे दर्शन व्हावे अशी तीव्र इच्छा मनामध्ये होती . परंतु यतीवर्य अज्ञातस्थळी तपाचरणासाठी गेलेले आहेत असे कळाले . मात्र पुढे उत्तर तटावर ध्यानीमनी नसताना मैयाने माझी ती इच्छा पूर्ण केली ! इथे समोर मोकळ्या मैदानामध्ये ऊस तोडणी कामगारांची पाले पडलेली होती . आश्रमाची जागा अडीच एकर होती आणि चांगल्या बागा वगैरे लावलेल्या होत्या . ऊस तोडणी कामगारांची मुले या बागेमध्ये खेळायची .
मला बघताच त्यांनी एकच गलका केला आणि मला गराडा घातला ! बाबा मला गोळी द्या ! बाबा मला बी द्या ! बाबा मला आधी द्या ! असे त्यांचे मराठी ऐकले आणि अंतःकरण भरून आले ! परिक्रमेत मराठी फार कमी ऐकायला मिळते ! म्हणजे परिक्रमावासी जास्त करून मराठीतच बोलतात परंतु आजूबाजूचे लोक मराठी कमी आहेत . नेमक्या शूल पाणी मध्ये माझ्या सगळ्या गोळ्या संपल्या होत्या . तरी देखील काही आहे का पहावे म्हणून मी झोळी उतरवली आणि आत हात घातल्याबरोबर वाटताना खाली तळाशी पडलेल्या काही गोळ्या माझ्या हाताला लागल्या ! त्या सर्व मी वाटून टाकल्या ! आश्चर्य म्हणजे जितकी मुले होती बरोबर तितक्याच गोळ्या निघाल्या ! नर्मदा मैया ने एकाही बालकाला निराश केले नाही ! किती आश्चर्य आहे ! रोज तीच झोळी वापरत असून मला या गोळ्या कधी दिसल्या नव्हत्या. सगळी मुले आनंदाने उड्या मारत आपापल्या घरी निघून गेली ! सर्वांचे प्लास्टिक मी काढून घेतलेले होतेच ते परत झोळीत कोंबून टाकले . शक्यतो आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये ऊस तोडणी कामगार हे उत्तर प्रदेश , बिहार ,कर्नाटक ,झारखंड अशा महाराष्ट्रा पेक्षा गरीब राज्यांतून येतात . परंतु गुजरात हे राज्य आता महाराष्ट्राच्या पेक्षाही श्रीमंत झालेले असल्यामुळे इथले ऊस तोडणी कामगार हे महाराष्ट्रातल्या शिरपूर , साक्री , धुळे ,नंदुरबार या भागातून येतात .मराठी आणि अहिराणी भाषा बोलतात. या मुलांनी विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची छान उत्तरे दिली . गावांची नावे सांगितली .
श्री गायत्री मंदिर भालोद
श्री गायत्री मंदिर आश्रम परिसर
या परिसरामध्ये भरपूर मोर आहेत
गायत्री आश्रमाच्या आवारातच नृत्य करणारा मोर
मंदिरातील गायत्री मातेची सुंदर मूर्ती
मंदिरामध्ये एक साधू बाबा आहे असे त्या मुलांनी सांगितले म्हणून मी आत गेलो . जटा न राखलेला शिंदे नावाचा एक सेवेकरी इथे सेवा देत होता . त्याने गेल्या गेल्या मला विचारले , "माल है ना ? " माझ्या लक्षात आले की हा मनुष्य गांजा बद्दल विचारत आहे . मी त्याला विचारले , "आप कौन से माल की बात कर रहे है ? मै तो स्वयम यहा माल लूटने आया हूँ । गायत्री मंत्र से बडा माल और क्या हो सकता है ! एक भी माला करी तो काफी है नशा ! " मला वाटले सेवेकरी खुश होईल . परंतु तो माझ्यावर भडकला . आणि त्याने मला सांगितले की इथे राहण्याची सोय होणार नाही . गावामध्ये प्रतापे महाराजांचे दत्त मंदिर आहे . तिथे सर्व मराठी परिक्रमा वासी उतरतात . तिथे मी जावे . परंतु हे सर्व तो मला हिंदीमध्ये सांगत होता . मला वाईट वाटले आणि गायत्री मातेचे दर्शन घेऊन मी तिथून निघालो . मध्ये थोडीशी यावनी वस्ती आहे . त्यांना दत्त मंदिराचा पत्ता विचारल्यावर कोणीही सांगेना . रस्त्याने अजून थोडा पुढे चालत आलो . एक छोटासा दीड दोन वर्षाचा मुलगा जो नुकताच चालायला लागला होता तो रस्त्याच्या मधोमध चालत होता !याचे नाव व्योम होते ! शेजारीच याच्या वडिलांचे किराणा मालाचे दुकान होते . त्याचे आजी आजोबा आई त्याला फिरायला घेऊन आले होते . रस्त्याच्या मधून तो चालतो आहे त्याला बाजूला घ्यावे म्हणून मी त्याच्या जवळ गेलो . त्याने मान वर करून कोण आले आहे ते पाहिले . आणि चक्क माझा हात धरून चालायला लागला ! मागे वळून आजी-आजोबा आईला त्याने टाटा केला ! मी पण त्यांना खूण केली की थांबा ! त्याला ताब्यात घेऊ नका !किती लांब चालतो ते पाहुयात ! कसले काय आणि कसले काय ! हा पठ्ठा माझ्याबरोबर मी जाईल तिकडे निघाला की ! सगळेजण हसायला लागले ! मी सांगितले की याला जपून ठेवा बरं का ! एखाद्या साधू बरोबर जायचा निघून ! पूर्वी असेच साधू गावामध्ये यायचे आणि चुणचुणीत मुले सापडली की त्यांना शिष्य बनवून घेऊन जायचे ! आई-वडीलही फारसे वाईट वाटून घ्यायचे नाहीत कारण घरामध्ये भरपूर मुले असायची ! एखादे गेल्याने त्यांना फार काही फरक पडायचा नाही . म्हणून तर लहान मुलांना भीती घालण्यासाठी "बुवाजी येईल !" असे म्हणायची पद्धत आपल्या येथे पडली ! आज मीच बुवाजी झालो होतो ! पण लहान मुलांना ,साधू लोक मुळातच कमी विचार करत असल्यामुळे साधूंच्या फ्रिक्वेन्सी आवडतात हे मी जागोजागी पाहिले . व्योमला त्याच्या आईच्या ताब्यात दिले . आई बाळाशी मराठी मध्ये बोलते आहे हे पाहून मला अजून आश्चर्य वाटले ! ही माताराम जळगावची होती ! आणि गुजराती कुटुंबामध्ये लग्न करून आली होती ! ऑर्कुट आणि फेसबुकने भारतात बऱ्याच सोयरीकी जुळवल्या त्यातलीच ही एक ! सध्या मात्र इंस्टाग्राम ,व्हाट्सअप ,स्नॅपचॅट वरून सोयरिकी जुळण्याऐवजी वर्षानुवर्षे जुन्या सोयरिकी तुटत आहेत असे कानावर पडते आहे ! कालाय तस्मै नमः ! बाबाजी फोन का वापरत नाही याचे एक तरी कारण तुम्हाला आता थोडेफार लक्षात आले असेल ! असो !
चालताना मी या गावातील दुमजली घरे पाहत होतो . अतिशय सुंदर सुंदर घरे होती . छोटीशीच परंतु टुमदार आणि नक्षीकाम केलेली घरे होती ! बडोदा संस्थानिकांचे हे आवडते गाव होते . त्यामुळे या गावावर त्यांची मेहर नजर कायम असायची . या गावात पूर्वी पूर्ण गुजराती ब्राह्मण समाजाची वस्ती होती . सध्या प्रत्येक घरातील माणसे नोकरी निमित्ताने अहमदाबाद बडोदा किंवा पुण्या मुंबईला गेलेली असून बरेचसे तरुण परदेशी सुद्धा स्थिरावले आहेत . त्यामुळे बहुतांश घरे रिकामी पडली आहेत किंवा म्हातारा म्हातारी दोघेच राहत आहेत . गावातील यवनांची लोकसंख्या वाढून आता सुमारे ४० टक्के झालेली आहे .पूर्वी मंदिरांचे गाव म्हणून ओळख असलेल्या या शहरामध्ये आता अनेक छोट्या-मोठ्या मशिदी नव्याने बांधल्या जात आहेत . एकाच वेळी त्या सर्वांची बांग चालू होते . अनेक घरांना कुलपे आहेत . मोठमोठ्या कंपन्यांचे संस्थापक या गावांमध्ये राहतात . मला लोकांनी या कंपन्यांची नावे सांगितली होती परंतु मी आता विसरून गेलो . थोडक्यात या मातीतला गुण असा आहे की या गावातील तरुण हे मोठे उद्योजक म्हणून नावा रूपाला येतात . असे असते हे मी स्वतः सांगली जिल्ह्या वरून किंवा सातारच्या माण तालुक्यावरून पाहिलेले आहे . अगदी किमान संसाधनांची उपलब्धता आणि बहुतांश संसाधनांचे दुर्भिक्ष्य असलेले गाव असले की त्यातील मुले ती किमान संसाधने वापरून थोडीफार प्रगती करतात आणि त्याच्या बळावर मोठी झेप घेऊन पुढे मोठी मजल मारतात असे ते साधे सोपे गणित आहे . याउलट सर्व सुख सोयी सुविधा असल्या की त्या मुलांना झेप मारायची इच्छाच राहत नाही . किंवा अजिबात सुविधा नसला तरी ती मुले काही करू शकत नाहीत . भालोद च्या बाबतीत तो समतोल बरोबर साधला गेला आहे . म्हटलं तर सर्व आहे . म्हटलं तर काहीच नाही ! मला या गावाच्या फ्रिक्वेन्सी या गावाची स्पंदने फारच आवडली ! व्योमच्या दुकानापाशी आलो तिथे काही लोक रस्त्यावर गप्पा मारत उभे होते .परिक्रमे मध्ये एकदा पुढे गेले की मागे यायचे नसते परंतु शिंदे सेवादारामुळे मला थोडेसे उलटे यावे लागले होते . इथे पुन्हा एकदा मी अजून एक चूक केली ! आता तरी या माणसांचे ऐकावे त्यापेक्षा मी त्यांना दत्त मंदिर कुठे आहे विचारू लागलो ! ते म्हणाले आम्ही मोक्षनाथ मंदिराचे कार्यकर्ते आहोत आणि आमच्या मंदिरामध्ये आपण मुक्काम करावा अशी आमची इच्छा आहे ! त्यांचा आग्रह मला मोडवेना म्हणून मी असा विचार केला की सामान इथे ठेवावे आणि दत्त मंदिराची व्यवस्था पाहून यावी आणि नंतर तिथेच मुक्काम करावा ! त्याप्रमाणे मी मोक्षनाथ मंदिरामध्ये गेलो आणि माझे सामान ठेवण्यासाठी जागा शोधू लागलो . मंदिराचा नुकताच जीर्णोद्धार झाल्यामुळे अतिशय सुंदर आणि भव्य असे बांधकाम केलेले होते परंतु मंदिरामध्ये एवढी अस्वच्छता आणि एवढी घाण होती की झोळी ठेवायला सुद्धा मला जागा सापडेना ! कोणीतरी आधीच एक आसन लावलेले दिसले . त्याच्या शेजारी मी सामान ठेवले आणि मोक्षनाथाचे दर्शन घेतले .
श्री मोक्षनाथ मंदिर भालोद
जय बाबा मोक्षनाथ !
मनात क्षणभर विचार तरळून गेला की सर्वांना मोक्ष देणारा हा परमेश्वर याच्या आजूबाजूला पसरलेल्या कचऱ्याला मोक्ष का बरे देत नसेल ? इतक्यात फाड करून मुस्काटात बसावी तसा कानामध्ये आवाज आला , " त्याचसाठी तुला इथे बोलावले आहे ! " मी चटकन जणू काही ऐकूच आले नाही असे दाखवले आणि बाहेर पळालो ! थेट दत्त मंदिर गाठले ! काठाकाठाने चालून खूप दमलो होतो ! आज तरी जरा विश्रांती घ्यावी असा विचार होता ! पुन्हा पुन्हा त्याच चुका मी करत होतो ! दत्त मंदिरात गेलो तर मंदिर बंद होते . डावीकडे उजवीकडे दोन्हीकडे मंदिराच्याच वास्तू आहेत .
पू . प्रतापे महाराज स्थापित श्री एकमुखी दत्त मंदिर भालोद
मंदिराची वास्तू
समोरची प्रसादगृहाची वास्तू
इकडून कोणीतरी आले आणि मंदिर उघडून दिले . दर्शन घेतले . दत्ताची अतिशय सुंदर काळ्या पाषाणाची मूर्ती होती .या मूर्तीच्या छाती आणि पोटाचा आकार गोमुखासारखा आहे .
भालोद येथील दत्त मूर्ती
प्रतापे महाराज दत्त मूर्तीची पूजा करताना
सालंकृत दत्तमूर्ती अशी दिसते
आत मध्ये एका वेगळ्या सभागृहात टेंबे स्वामींची मूर्ती स्थापित करण्यात आलेली होती . श्रीपाद श्रीवल्लभ , श्री नृसिंह सरस्वती आणि श्री नृसिंह भान अथवा अक्कलकोट स्वामी महाराज यांच्या प्रतिमा सुद्धा होत्या .
श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज आणि अन्य प्रतिमा
आता हे स्थळ अधिक सुशोभित केलेले दिसते आहे .
मंदिराच्या आत मध्येच उगवलेले आणि स्लॅबमध्ये बसवलेले औदुंबरा चे झाड होते . याला शेंदूर फासला होता .
श्री दत्तप्रभूंचे स्थान आणि औदुंबराचा वृक्ष हे एक अतूट नाते आहे
श्री औदुंबर तरुतळी साजिरी ती मूर्ती सावळी
माहितीपूर्ण पाट्या सर्वत्र लावलेल्या होत्या . परंतु या मंदिराचे प्रमुख श्री प्रतापे महाराज मात्र इथे नव्हते तर ते गरुडेश्वरला काही कार्यक्रमासाठी गेले आहेत असे कळाले . समोर भोजनप्रसाद आणि चहापाण्याची व्यवस्था होती .तिथे मला चहा पिण्यासाठी त्यांनी नेले . बाहेरगावावरून आलेले काही सेवक लोक इथे सेवा देतात . एक दांपत्य होते . मैया च्या बाजूला निवासाची वेगळी सोय केलेली होती .
परिक्रमावासींच्या निवासासाठी केलेली वेगळी सोय
काकू म्हणाल्या सोय आहे आणि काका म्हणाले इथे सोय होणार नाही . त्यामुळे मी त्यांना सांगितले की हरकत नाही मी मोक्षनाथ मंदिरामध्ये उतरलेलो आहे .
हा दत्त मंदिर आश्रम अगदी नर्मदा मातेच्या काठावर वसलेला आहे इथून मैयाचे खूप छान दर्शन होते .
या हॉलमध्ये अतिशय माहितीपूर्ण पाट्या मराठी भाषेमध्ये सर्वत्र लावलेल्या होत्या . चालण्याचे फायदे , व्यायामाचे फायदे वगैरे सर्व सामान्य भाषेमध्ये कळतील अशा रीतीने प्रताप हे महाराजांनी लावलेले होते .
हा दत्त मंदिर आश्रम अगदी नर्मदा मातेच्या काठावर वसलेला आहे इथून मैयाचे खूप छान दर्शन होते .
प्रतापे महाराज एका वृत्तपत्राचे संपादक होते त्यामुळे सर्वत्र लिखाणच लिखाण होते.
परंतु केवळ चालण्यामुळे शरीरातले ५०% स्नायू वापरले जात नाहीत हे देखील आपण लक्षात घ्यावे त्यासाठी पायावर ताण येईल अशा पद्धतीने वजने उचलून उठावे बसावे लागते म्हणजे पायातील स्नायूंची पूर्ण क्षमता वापरली जाते . चालण्यामध्ये फार कमी स्नायू संपूर्ण ताण घेतात .म्हणून तर आपण परिक्रमेमध्ये इतके चालू शकतो . चालताना पाय फक्त आपल्या कोष्ठा चा उचलतात आणि कोष्ठाला प्रत्येक पावलागणिक पुढे पुढे सरकवायचे काम करतात .
अशा आधुनिक वैद्यकशास्त्रातल्या पाट्या बघून तर मी उडालोच! परिक्रमेमुळे काय काय होते पाहूयात ! ब्लड प्रेशर अर्थात रक्तदाब बऱ्यापैकी नियंत्रित राहतो .कारण चालण्यामुळे तुमचे कष्ट वाढतात आणि रक्ताचा पुरवठा मागणी दोन्ही वाढते . आय व्हिजन म्हणजे दृष्टी सुधारते कारण तुम्ही सतत जवळ लांब पाहत राहता त्यामुळे डोळ्याच्या स्नायूंना चांगलेच काम मिळते .सतत विविध प्रकारच्या भाज्या आणि नानाविध कडधान्ये व धान्याचे तसेच भरड धान्याचे पदार्थ खाल्ल्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिन अथवा लोह अतिशय उत्तम प्रमाणात राहते . कोलेस्टेरॉल तर जळून खाक होते ! सर्व अनावश्यक चरबी जळून जाते . क्रिएटिनींनची पातळी देखील चांगली मर्यादेत राहते . कोवळ्या सूर्यप्रकाशातून भरपूर विटामिन डी मिळते . मध्ये येऊन मिळणाऱ्या नद्या व विविध प्रकारचे अन्न खाऊन सर्व जीवनसत्वे शरीराला मिळतात . B १२ ची सुद्धा कमतरता जाणवत नाही . भरपूर चालल्यामुळे बोनडेन्सिटी अर्थात अस्थींची घनता मात्र थोडीशी कमी होते . अर्थात हे सर्व आधुनिक वैद्यकशास्त्रानुसार पाहिले जाणारे घटक आहेत परंतु वैद्यकशास्त्रानुसार किंवा आयुर्वेदानुसार पाहायला गेले तर आपले वात पित्त कफ हे दोष आणि शरीरातील सर्वही धातू परिक्रमेदरम्यान अत्यंत संतुलित राहतात त्यामुळे कुठल्याही प्रकारचा कुठलाही रोग चटकन होत नाही .शारीरिक रोगांना व्याधी म्हणतात आणि मानसिक रोगांना आधी म्हणतात . परिक्रमे दरम्यान सतत नर्मदा मातेचे स्मरण केल्यामुळे आणि विविध तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेतल्यामुळे तसेच साधुसंतांचे सत्संग घडल्यामुळे मानसिक रोग देखील बरे होऊन जातात आणि मनुष्य अधिव्याधी मुक्त होऊन जातो .एक वेळ आधी व्याधी परवडल्या परंतु उपाधी हा अतिशय बेकार रोग आहे तो देखील नर्मदा मैया दूर करते ! उपाधी म्हणजे मी कोणीतरी आहे याची अहंकार युक्त जाणीव . उदाहरणार्थ मी शिक्षक आहे , मी डॉक्टर आहे ,मी वकील आहे , मी सरकारी अधिकारी आहे ,मी पैसेवाला आहे ,मी इंजिनियर आहे , मी सुशिक्षित आहे ,मी विवाहित आहे किंवा अगदी मी साधू आहे ,मी संन्यासी आहे आणि शेवटचे म्हणजे मी एक परिक्रमावासी आहे या सर्व उपाधीच होत ! रंगावधूत महाराज यांच्या दत्तबावनी या स्तोत्रामध्ये ते हेच सांगतात . आधी व्याधी उपाधी सर्व । टळे स्मरण मात्रथी सर्व ।
गुरुचरित्रातील ५२ अध्यायांचे सार म्हणून रंगावधूत महाराजांनी ही दत्त बावनी सांगितली . मला हे स्तोत्र फार आवडते आणि मी दत्ताचे मंदिर आले की तिथे हे स्तोत्र आवर्जून म्हणायचो . माझ्याकडे असलेल्या पुस्तकांमध्ये सर्वच देवांची स्तोत्रे होती त्यामुळे ज्या कुठल्या देवाच्या मंदिरामध्ये जायचो त्या त्या देवापुढे त्या त्या देवाचे स्तोत्र , स्तवन म्हणायचो आणि त्यात खूप आनंद मिळायचा . असो .
ते सर्व भित्तीफलक वाचले आणि चहा पिऊन मंदिराकडे निघालो . वाटेत सुदर अशी टुमदार दुमजली घरे होती त्यावरील अप्रतीम नक्षीकाम पहात चालू लागलो .
गावात एक विठ्ठल मंदिर देखील आहे त्याचे दर्शन करून आलो आणि पुन्हा मोक्षनाथ मंदिराकडे निघालो . मनात विचार करू लागलो आपल्याला आज चार चहा नर्मदा मातेने पाजलेले आहेत . तरी देखील जर मी मंदिर स्वच्छ केले नाही तर माझ्यासारख्या नतद्रष्ट मीच ! आणि म्हणून मी ठरवून मंदिराच्या स्वच्छतेला लागलो ! एक २२ - २३ वर्षाचा तरुण कानडी संन्यासी तिथे उतरलेला होता .गेले चार महिने तो याच ठिकाणी राहत होता असे मला कळाले . मंदिराच्या समोर मोकळे पटांगण होते . तिथे एका काठेवाडी दाम्पत्याने भांडीकुंडी विकण्याचे उघडे दुकान लावले होते . बाकी तो प्लॉट मोकळा होता . एक प्रचंड वटवृक्ष तिथे होता . त्याच्या तळाशी दिवसभर बसून हा साधू साधना करायचा . आणि मुक्कामाला मंदिरात यायचा . मी तोडके मोडके कानडी बोलल्यावर हा खुश झाला ! तो राहतो आहे तेवढी चार फूट बाय सहा फूट जागा सोडली तर संपूर्ण मंदिर धुळीने आणि कचऱ्याने माखलेले होते . मी आधी मंदिर परिसराची पाहणी करून आलो . मंदिराच्या वर पाच हजार लिटर क्षमतेची मोठी सिंटेक्स ची काळी टाकी होती . तिच्यातले पाणी कधीच न काढल्यामुळे खराब व्हायला सुरुवात झाली होती . नळामध्ये सुद्धा शेवाळे अडकून बसले होते . परंतु टाकी सुदैवाने भरलेली असल्यामुळे तिच्या दाबामुळे सर्व नळ स्वच्छ झाले . आणि मी मोठी नळी जोडून संपूर्ण मंदिर स्वच्छ धुऊन घ्यायला सुरुवात केली .
मोक्षनाथ मंदिराच्या कळसाच्या मागे दिसणारी हीच ती पाण्याची काळी टाकी .
आधी सर्व कचरा झाडून बाहेर गोळा केला .मंदिराच्या परिसरामध्ये देखील प्रचंड कचरा साठला होता . या कचऱ्याचे इतके मोठे ढीग झाले की ते मी पेटवून दिल्यावर रात्री बारा वाजेपर्यंत जळत होते ! मंदिराच्या समोर प्रचंड दगड माती राडा रोडा पडलेला होता . तो उपसल्यावर त्यातून स्टीलची ताटे वाट्या चमचे इत्यादी निघाले ! ती सर्व भांडी घासून पुसून स्वच्छ करून मी ठेवून दिली . मंदिराचा संपूर्ण परिसर बाहेरून आणि आतून चकाचक करून टाकला ! मला एक वेगळीच ऊर्जा प्राप्त झाली आहे असे मला जाणवले ! तो तरुण साधू बसल्या बसल्या मला शाबासकी देत होता ! मला त्याचा मनापासून राग आला परंतु मी काही बोललो नाही . इतके सळसळते तरुण रक्त असताना इतक्या घाणी मध्ये चार महिने राहायची इच्छाच कशी होते ! जो व्यक्ती त्याच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवू शकत नाही तो त्याचे मन षडविकारांपासून स्वच्छ कसे काय ठेवणार !
हे मोक्षनाथ मंदिराच्या आतल्या बाजूचे चित्र आहे जिथे पांढरे आसन लावलेले आहे तिथे संन्यासी बसलेला होता आणि त्याच्या पलीकडे मी माझे आसन लावले . तत्पूर्वी सर्व फरशी धुवून घेतली . पलीकडच्या दोन खिडक्या ज्या आहेत तिथे इतका कचरा पडला होता की उभं . रहायला सुद्धा जागा नव्हती .
इतक्यात दिल्ली आणि धुळे येथील दोन परिक्रमा वासी आले . त्यांना वाटले मी इथला सेवेकरी आहे . म्हणून त्यांनी मला विचारले की इथे आमची राहण्याची सोय होऊ शकेल काय ? मी त्याला सांगितले की आज माझा स्वच्छतेचा दिवस आहे . त्यामुळे तुम्ही जरी राहिलात तरी तुम्हाला निवांत आरामात बसता येणार नाही . त्यापेक्षा शेजारी दत्त मंदिर आहे तिथे चौकशी करून घ्या . त्याप्रमाणे ते दत्त मंदिरात गेले आणि तिथेच उतरले . परंतु थोड्याच वेळात धुळ्याचा मुलगा माझ्या मदतीसाठी परत आला ! आणि त्याने मला इतकी मदत केली की विचारू नका ! मदतीला अजून दोन हात आल्यावर माझे बळ चौपट झाले ! मंदिरातील सर्व अनावश्यक वस्तू मी बाहेर टाकून दिल्या . एक मोठी ताडपत्री जमिनीतून निघाली ! ती धुवून त्याची घडी करून ठेवून दिली . बाहेरचा परिसर समतल करून घेतला . नळी लावून सर्व मंदिर चकाचक धुतले . बाहेर देखील सडा घातला . माझा हा सर्व कार्यक्रम सुरू असताना गावातील अनेक माणसे गुपचूप येऊन बघून गेली . मी कोणालाही काहीही बोललो नाही . एका माणसाने येऊन सांगितले की उद्या सकाळी पाणी येणार आहे त्यामुळे आता टाकीतले पाणी संपले की बास करा . एवढ्यात पाणी संपलेच ! पाणी बाहेर जाण्याचा मार्ग देखील मी स्वच्छ केला . पाणी झाडांना मिळेल अशी व्यवस्था केली . एकंदरीत सर्व परिसर एकदम छान दिसायला लागला ! इतक्यात तरुण संन्यासी काहीतरी ज्ञान शिकवू लागला . माझा कडे लोट झाला आणि मी त्याला चांगला झापला ! मी त्याला म्हणालो अरे तू कोणीही अस परंतु समोर एखादा मनुष्य कष्ट करत आहे तर त्याला निदान हातभार तरी लावू शकतोस की नाही ? इतके धडधाकट शरीर काय कामाचे ? तो म्हणाला , " परंतु मी तर संन्यासी आहे . " मला याला सांगावे की न सांगावे असा प्रश्न पडला होता . परंतु त्याच द्विधा मनस्थितीत मी महादेवांना नमस्कार करायला गेलो आणि त्यांनी उजवा कौल दिला ! मग त्याला समोर बसवले आणि चांगले तासभर व्याख्यान दिले . संन्यास म्हणजे काय ? संन्यस्त वृत्ती म्हणजे काय ? निवृत्ती म्हणजे काय ? विरक्ती म्हणजे काय ? याबाबतीत त्याच्या मनात असलेले सर्व संभ्रम मी नर्मदा मातेचे स्मरण करीत जे काही सुचलं ते सांगत दूर केले . दुर्दैवाने संन्यास घेतल्यापासून त्याला चार गोष्टी सांगणारे कोणी भेटलेच नव्हते . त्यामुळे याला वाटेल तसे हा जगत होता . याला असे वाटत होते की आजूबाजूला असलेल्या दृश्यामध्ये आपण अडकले नाही पाहिजे . परंतु मी पोट तिडकीने सांगितलेले त्याला पटले आहे असे मला जाणवले . त्यामुळे मी विषय बदलला . हा भोजनासाठी दत्त मंदिरात जात असे . मंदिर स्वच्छता अभियान सुमारे अडीच तास चालले . आज पुन्हा एकदा मैयाची आरती कचऱ्याच्या ज्योती पेटवून झाली ! म्हणजे मी रितसर आरती केली परंतु संपूर्ण आरती होईपर्यंत कचरा जळतच होता .अगदी रात्री बारा वाजेपर्यंत तो जळत राहिला . माझे हे सर्व कष्ट गावातील काही महिला एकत्र येऊन पाहत होत्या . आता दत्त मंदिरात जाऊन भिक्षा मागावी असा माझा विचार चालू होता .इतक्यात एक माताराम माझ्याजवळ आल्या आणि मला म्हणाल्या महाराज तुम्ही पावभाजी खाता का ? "पावभाजी ? " मी विचारात पडलो . ती म्हणाली काळजी करू नका हा गुजरात आहे आम्ही कांदा लसुण घालत नाही . मी म्हणालो असा माझा काही नियम नाही . परंतु दत्त मंदिरामध्ये जेवण मिळते असे मला कळाले . इतक्यात एक एक करत सात आठ जणी आल्या . त्या सर्वजण गुजराती मध्ये बोलत होत्या परंतु मला कळत होते . एक जण म्हणाली, अगं विचारतेस काय त्यांना बोलाव आपल्याबरोबर पावभाजी खायला . एक जण म्हणाली तसं नको त्यांच्या नियमात बसत नसेल तर कशाला आग्रह करायचा ! एक जण म्हणाली अगं तो खूप थकला असेल .आल्यापासून अखंड कामात आहे . एक हुशार म्हातारी म्हणाली काय तो निर्णय लवकर घ्या नाहीतर तो संन्यासी बाबा येईल याच्या मागे शेपटासारखा ! आणि खरोखरच तो संन्यासी आलाच ! मला म्हणाला चला की भोजन प्रसाद घ्यायला दत्त मंदिरात जाऊ ! मी म्हणालो अहो मी आज इथे भोजन प्रसाद घेणार आहे . तो म्हणाला बर ठीक आहे मी पण तुमच्या सोबतच घेतो ! तो संन्यासी त्या स्त्रियांना अजिबात आवडत नव्हता हे त्यांच्या तोंडावरून मला लगेच लक्षात आले . तशी सूचना मला देणाऱ्या अनेक घटना पुढे घडल्या .नाईलाजाने त्या महिलांनी त्याला सुद्धा माझ्या शेजारी पावभाजी खायला बसवले . हा या गावातील महिलांचा भिशीचा गट होता . आणि दर महिन्याला एका कोणाच्यातरी घरी एखादा पदार्थ करून खायचा असा त्यांचा कार्यक्रम असायचा . आता गंमत पहा बर का ! परवाच पोईचा येथील स्वामीनारायण मंदिरामध्ये मी जे भोजनाचे स्टॉल पाहिले होते तिथे गरम गरम पावभाजी पाहून मला पावभाजी खायची तीव्र इच्छा झाली होती ! अगदी मनापासून इच्छा झाली होती . परंतु कढी खिचडीचे कुपन मिळाल्यामुळे गपचूप कढी खिचडी खाऊन झोपलो होतो . आज नर्मदा माईने ती इच्छा पूर्ण केली ! सन्याशाने चारच पाव खाल्ले आणि उठून निघून गेला ! आता माझी पंचाईत झाली ! केवळ चालून थकलेला असताना मी पाच-सहा टिक्कड आरामात खायचो ! हे पाव म्हणजे अगदी फुसकांडे होते ! चार पाव म्हणजे एका टिक्कडाचा ऐवज होता .त्यामुळे किमान १०-२० तरी पाव खावेत असे माझ्या डोक्यात होते किंबहुना तेवढी भूक मला कष्ट करून लागलेली होतीच .आणि तेवढ्यात हा बाबा उठून गेला ! सर्व माता-भगिनींच्या हे लक्षात आले आणि त्यांनी मला सांगितले की तुम्ही त्याच्याकडे बघू नका ! तुम्हाला हवे तेवढे खावा ! अतिशय सुंदर अशी पावभाजी ! माझ्यासमोर चुलीवर रटाराटा शिजत होती ! त्यावर चमचा चमचा अस्सल गावरान लोणी घातले जात होते ! पाव देखील लोण्यामध्ये आंघोळ करून बाहेर पडत होते ! खाताना अक्षरशः हातावरून लोण्याचे ओघळ जात होते ! मोक्ष मोक्ष म्हणतात तो हाच की काय असे मला झाले ! गमतीचा भाग सोडून द्या परंतु अतिशय पोटभर पावभाजी खाल्ली ! मस्त ढेकर आल्याबरोबर सर्व मातांनी टाळ्या वाजवल्या ! त्यातल्या प्रत्येक स्त्रीला आपल्याच उपाशी मुलाला जेवू खाऊ घातल्याचे समाधान मिळत होते , हे मी स्वतः त्यांच्या डोळ्यात पाहिले ! त्यांनी मला सांगितले की रात्री भूक लागली तर इथे शेजारी घर आहे त्यांचे दर वाजवा .तिथे थोडीशी पावभाजी तुमच्यासाठी काढून ठेवतो ! आणि हो त्या संन्याशाला सोबत आणू नका बर का ! मला फार वाईट वाटले . त्याच्या आचरणामध्ये बाकी काहीही चूक नव्हती . फक्त काही किरकोळ गोष्टी तो करत नसल्यामुळे गावाला नकोसा झाला होता . संन्यासी लोकांचे आचारधर्म तो व्यवस्थित पाळत होता .फक्त ग्रामस्थांमध्ये मिळून मिसळून राहत नव्हता आणि दुसरे म्हणजे त्याला संन्यासी म्हणजे कोणीतरी वेगळा आणि श्रेष्ठ असा एक सुप्त भाव मनामध्ये जागृत झालेला होता .त्यामुळे इतरांशी तो थोडासा फटकून वागायचा .त्यामुळे समाजानेही त्याला त्याच्या पायरीनुसारच ठेवलेले होते . मला आतून आवाज येऊ लागला की आज याची शाळा घे ! मला मूर्ती कलेची आवड आहे . महाविद्यालयीन जीवनात विविध गुणदर्शन स्पर्धा असतात त्यामध्ये मी मूर्तिकला वगैरे करायचो . तिथे ती आवड निर्माण झाली . घरच्या पूजेसाठी मी हनुमंताची एक मूर्ती घडवलेली आहे . ही मूर्ती दगडावर बनवलेली असून त्यामध्ये तारा आणि एमसील चा वापर करून ते वाळण्याच्या आत म्हणजे पंधरा मिनिटात मूर्ती बनवलेली आहे .
पंचधातूपासून अतिशय सुंदर अशा देवतांच्या मूर्ती करणारे भारतातील एकमेव प्रसिद्ध गाव म्हणजे स्वामी मलै म्हणून दक्षिण भारतात आहे .तिथे जाऊन मी ते सर्व शास्त्र पाहून एकलव्य पद्धतीने शिकून आलेलो आहे . आणि माझा एक मित्र आहे त्याला देखील याची आवड असल्यामुळे त्याने ब्राँझ पासून मूर्ती करण्याचा कारखाना नुकताच थाटलेला आहे . तिथे जाऊन त्याला मूर्ती बनवण्यासाठी मदत करायला मला आवडते . त्याला घेऊन देखील मी स्वामी मलै ची यात्रा केलेली आहे . असो .सांगायचे तात्पर्य असे की मूर्ती बनवण्याचे दोन प्रकार असतात . मऊ मातीचा गोळा घेतला तर त्याला हाताने आकार देत मूर्ति घडवता येते . हे फार सोपे असते . कारण गोळ्याला कुठलाच आकार नसतो . आणि मूर्ती घडविण्याच्या प्रक्रियेला गोळ्या कडून विरोध सुद्धा होत नाही . दुसरा प्रकार मात्र कठीण असतो . कठोर लाकूड किंवा दगडाची मूर्ती घडवताना मात्र तुम्हाला आकार देता येणे शक्य नसते तर कठोर तीव्र टोकदार टोचणारे आघात करून नको असलेला भाग तुम्हाला उडवून टाकावा लागतो म्हणजे हवा असलेला भाग शिल्लक राहतो ज्याला आपण मूर्ती म्हणतो ! लहान मुलांना घडविणे किंवा त्यांच्यावर संस्कार करणे हे मातीच्या गोळ्यापासून मूर्ती बनवण्या सारखे असते परंतु मोठ्या माणसांना काही शिकवायचे म्हटले तर मात्र कठोर भाषा आणि टोचून बोलणे याशिवाय ते साध्य होणे अशक्य असते ! आता मला या पाषाणाला टाके मारण्याची आज्ञा झालेली होती ! त्यामुळे गोड गोड बोलून त्याला घेऊन बसलो . आधी त्याच्याकडून चार गोष्टी शिकायचा प्रयत्न केला . परंतु तो फारच कच्चा होता . त्याने कच्चा असणे किंवा अज्ञानी असणे याला माझा विरोध नव्हता . परंतु आपण महाज्ञानी आहोत असा आव तो आणत होता हे फार घातक होते ! आता मी छिन्नी हातोडी चे काम चालू केले !रात्री बऱ्याच उशीर पर्यंत मी त्याला कधी झापत राहिलो तर कधी गोडी गुलाबी ने चार चांगल्या गोष्टी सांगत राहिलो . अजून हा संन्यासी वयाने लहान होता त्यामुळे आताच जर त्याने त्याच्या चुका सुधारल्या असत्या तर त्याला पुढे अनेक दशके उत्तम संन्यासी जीवन जगण्याची संधी प्राप्त झाली असती ! मी प्राध्यापकाच्या भूमिकेत शिरल्यावर तो देखील लगेच विद्यार्थी झाला आणि मला गावकऱ्यांच्या वगैरे तक्रारी सांगू लागला ! त्याचे म्हणणे असे होते की गावकरी त्याला सहकार्य करत नाहीत . मला मात्र याच ग्रामस्थांनी उत्तम अशी मदत केली होती . मघाशी कचरा पेटवताना सुद्धा समोर उघड्यावर दुकान लावलेले जे दाम्पत्य होते त्यातील तरुण महिला माझ्या मदतीला आपण होऊन आली होती .तिची पण एक गंमतच झाली ! तिची उंची सहा फुटाच्या वर होती . तब्येत मजबूत , प्रकृती अतिशय धडधाकट आणि उत्तम होती . मी तिला सहज म्हणून गेलो की तुझ्यासारखी व्यक्ती खरं म्हणजे लष्करामध्ये किंवा पोलीस दलामध्ये पाहिजे होती . यावर तिने तिची देखील अशीच इच्छा होती परंतु पतीमुळे सर्व अर्धवट राहिले असे सांगून तिच्या पती बद्दलच्या तक्रारींचा पाढा वाचायला सुरुवात केली . मी ताबडतोब तिला तिथेच थांबवले आणि सांगितले की काहीही झाले तरी देखील कोण्या अनोळखी व्यक्तीच्या समोर तू आपल्या पतीबद्दल असे विपरीत मत व्यक्त करणे हे योग्य नाही आणि धर्माला धरून नाही . तो कसाही असला आणि काहीही करत असला किंवा करत नसला तरी देखील दिवसभर उन्हातान्हा मध्ये बसून हे जे दुकान तो चालवत आहे ते तो स्वतःसाठी न चालवता तुझ्या संसारासाठी च चालवतो आहे ना ? त्यामुळे एक गृहिणी म्हणून किंवा पतिव्रता म्हणून तिचे हे वागणे चुकीचे आहे . संसार दोघांचा असतो त्यामुळे त्यातील प्रश्न दोघांनी सोडवायचे असतात त्यामध्ये तिसरा घुसला की सगळा विचका होऊन जातो हे तिला मी सांगितले आणि तिला देखील ते पटले . तिने मनापासून माझी क्षमा मागितली . आणि गेल्यावरती पतीशी खूप प्रेमाने वागते आहे असे मला लगेचच दिसून आले . आता हीच तरुणी त्याला साधनेला बसल्यावर त्रास द्यायची असे त्याचे म्हणणे होते .आता याने जर तिकडे लक्ष दिले नाही तर याला कसे काय कळणार आहे की ती काय करते आहे ? त्यामुळे याचीच एकाग्रता कमी पडते आहे असे माझ्या लक्षात आले .तिने मला थोड्या वेळापूर्वी कशी मदत केली किंवा गावातील अन्य सदस्यांनी कसे सहकार्य केले वगैरे या तरुण संन्याशाला अशी अनेक उदाहरणे देऊन मी सांगितले की ग्रामस्थ चुकीचे नसतात तर आपली त्यांच्याबद्दल असलेली धारणा चुकीची असू शकते . आज मला काय झाले होते माहिती नाही ! आज माझ्यासमोर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला काहीतरी उपदेश माझ्या माध्यमातून दिला जावा अशी योजना नर्मदा मातेने करून ठेवली होती ! व्योमचे वडील मला भेटायला आले . त्यांनी बाहेर नेऊन मला त्यांच्या गावातील सर्व तरुणांची ओळख करून दिली . रात्री जेवण झाल्यावर सर्वजण चौकामध्ये बसून दोन तीन तास गप्पा मारायचे आणि मगच झोपी जायचे . गावामध्ये ज्या काही समस्या मला स्पष्टपणे दिसत होत्या आणि जे काही धोके जाणवत होते त्या विषयावर त्यांच्याशी सुमारे दोन-तीन तास मी चर्चा केली . त्यांना माहिती नव्हती अशी बरीच माहिती त्यांना मिळाली आणि माझ्या ही ज्ञानामध्ये त्या तरुणांमुळे भरपूर भर पडली . गावातील अनेक मुली गायब झालेल्या असल्यामुळे हळूहळू ग्रामस्थ गाव सोडून परगावी राहण्यास प्राधान्य देऊ लागले होते . अनेक गंभीर विषयांवर आमच्या चर्चा झाल्या . महाराष्ट्रातील तरुण मुले जशी नैसर्गिक रित्या संघटनशील असतात तशी गुजराती मुले नसतात असे मला जाणवले .अर्थात त्यात त्यांचा दोष नाही कारण महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबाच्या रक्तामध्ये शिवछत्रपतींच्या संस्काराचे रक्त वाहते आहे त्यामुळे आपसूकच आपला समाज संघटित होतो . तसे गुजरात मध्ये फारसे कोणी संघटनेचे आदर्श व्यक्तिमत्व इतिहासात तरी झालेले नाही आणि सध्या जे कुशल गुजराती संघटक प्रसिद्धी पावलेले आहेत ते देखील शिवछत्रपतींनाच त्यांचा आदर्श मानतात हे उल्लेखनीय आहे. असो . या गावांमध्ये अजून एक मोठा त्रास होता . मगरींचा उपद्रव ! याच वर्षी दोन अभद्र घटना घडल्या होत्या एका घटनेमध्ये एका एन आर आय अर्थात अनिवासी भारतीयाला मगरीने पाण्यामध्ये खेचून नेत भारताची परमनंट रेसिडेन्सी अर्थात कायम नागरिकत्व दिले होते . तर दुसऱ्या घटनेमध्ये सकाळी धुणे धुण्यासाठी गेलेल्या एका मातारामला मगरीने जलसमाधी दिली होती .ही ज्या मुलाची आई होती तो देखील तिथेच उपस्थित होता त्यामुळे त्याच्याकडून मी संपूर्ण घटनाक्रम समजून घेतला . मगरीने धुणे आपटणाऱ्या त्या महिलेला केवळ पाण्यामध्ये खेचून सोडून दिले होते . परंतु पाणी खोल असल्यामुळे आणि पोहता येत नसल्यामुळे त्यांचा दुर्दैवी अंत झाला .
मगरीने माणसे ओढून नेल्याच्या घटना येथे नित्याच्या झालेल्या होत्या . अशाच एका महिलेला भालोदच्या मगरीने मारल्याची वर्तमानपत्रात आलेली बातमी .
मगरींच्या दहशतीमुळे गावातील कोणीही स्नानासाठी खाली घाटावर जात नसे . केवळ समोर असलेल्या मोटी कोरल गावामध्ये जाणारी लाँच सेवा तेवढी चालू असायची . इकडे आड तिकडे विहीर अशी या गावाची अवस्था झालेली होती .
इथले सर्वच प्रवासी आणि नावाडी मगरीच्या बाबतीत अत्यंत सावध असतात .
नावेतून प्रवास करताना कोणी चुकूनही पाण्यामध्ये हात घालत नाही इथे दूरवर दिसणारे मोठे विजेचे मनोरे जे आहेत ते तोटीदरा गावाजवळ आहेत .
पुढे हीच वीज भरूच मार्गे अंकलेश्वरला जाते .
अखेरीस रात्री बारा वाजता सर्वांचा निरोप घेतला . कचऱ्याचे ढीग पूर्ण विझले आहेत याची खात्री केली . आणि खाली उकाडा होत असल्यामुळे मंदिराच्या गच्ची मध्ये जाऊन झोपी गेलो . निरभ्र आकाशाकडे पाहात कधी डोळा लागला कळालेच नाही . भल्या पहाटे पक्ष्यांच्या किलबिलिटामुळे जाग आली . दत्त मंदिरा शेजारी राहणारे एक दाम्पत्य होते . यांची कालच मला भोजन प्रसादी देण्याची इच्छा होती . परंतु त्यांना शक्य झाले नाही त्यामुळे सकाळी लवकर उठून त्या काका काकूंनी मला चहा आणि बालभोग दिला . मोक्षनाथ मंदिराच्या शेजारीच एका वयोवृद्ध म्हाताऱ्या साध्वीने एक खोली बांधून ठेवली होती आणि त्याला जोडून संडास बाथरूम बांधलेले होते . काल ज्यांच्या घरी माझी पावभाजी ठेवलेली होती त्या माताजींनी मला पहाटे गुपचूप त्या संडास बाथरूमची किल्ली देऊन ठेवली आणि सांगितले संन्याशाला सांगू नकोस . मी तिथेच स्नान वगैरे आटोपले आणि बाहेर आल्यावर त्यांनी मला विचारले की आता किती दिवस मी मंदिरात राहणार आहे ? "किती दिवस ? अहो आई मी तर आता काही मिनिटात इथून निघतो आहे " मी त्यांना सांगितले . त्यांचा चेहरा प्रश्नार्थक झाला . त्या मला म्हणाल्या तुला जर इथे राहायचे नव्हते तर मग एवढी साफसफाई कशासाठी केलीस ? आम्हाला सर्वांना वाटले की तू आता इथे चातुर्मासासाठी राहणार आहेस ! परंतु माझा तसा काही इरादा नाही हे पाहिल्यावर त्यांना आश्चर्य वाटू लागले . मी त्यांना सांगितले की प्रश्न किती दिवस राहणार याचा नाही प्रश्न असा आहे की देवाला आपण किती दिवस असे घाणी मध्ये ठेवायचे! त्यांना माझे म्हणणे पटले आणि त्यांनी मला मनापासून आशीर्वाद दिला . आता मी सर्वसामान गोळा करून निघणार इतक्यात तरुण संन्यासी स्नान वगैरे आटोपून आला आणि मला म्हणाला ," एक दोनच मिनिटे येता का ? तुम्हाला माझी साधनेची जागा दाखवतो . " मला देखील कौतुक वाटले आणि आनंदाने मी त्याच्या मागे गेलो . समोरच्या मोकळ्या प्लॉटमध्ये एक पडके बांधकाम होते आणि प्रचंड वटवृक्ष होता .त्याच्या खाली एका दगडावर हा दिवसभर बसायचा . परंतु सगळीकडे मला कचरा आणि पालापाचोळाच दिसायला लागला . मी त्याला म्हणालो की अहो स्वामीजी इथे तर सर्व केअर कचराच पडलेला आहे . मग तुम्ही साधनेला कसे काय बसता?
संन्यासी मला म्हणाला की बाबाजी तीच तर अडचण आहे . मला इथे साधनेसाठी योग्य असे वातावरण निर्माण होत नाही . त्यामुळे तुम्ही जाण्यापूर्वी हा सर्व परिसर झाडून स्वच्छ करून जावे . हे वाक्य ऐकले मात्र माझी अवस्था काय झाली असेल हे आता वाचकांना वेगळे सांगायची गरज नाही ! एका क्षणात माझा पारा सटकला आणि मी त्याला चांगलेच फैलावर घेतले । गाढवापुढे वाचली गीता आणि कालचा गोंधळ बरा होता असे या तरुणाचे काम होते . मी स्पष्ट शब्दात सगळे वर्म सांगितले की रे तुला ! काल डोकेफोड करून मी जे काही सांगितले त्यातून तू हेच शिकलास का? अरे गधड्या स्वतःची साधना करण्यासाठी तरी किमान स्वतः स्वच्छता कर ! त्याचा चेहरा हिरमुसला झाला . मी त्याला सांगितले की तू जर तुझ्या स्वतःच्या हातांनी आजच्या आज हा संपूर्ण परिसर स्वच्छ केला नाहीस तर मी मैया ला सांगेन की या आळशी आणि कामचुकार मुलाला इथे राहू देऊ नकोस . आणि क्षणात तिथून काढता पाय घेतला . रात्रभर कष्ट करून एखादी सुंदर मूर्ती घडवावी आणि सकाळी उठल्यावर त्या मूर्तीचा हात अचानक गळून पडावा तसे मला या संन्याशाचे वागणे पाहून झाले . तिथून मी थेट मुख्य घाट उतरून खाली गेलो . आणि मैयाचे दर्शन घेऊन जलप्रशन करून अतिशय कठीण आणि बेकार रस्त्याने काठाकाठाने पुढे निघालो . थोडे अंतर गेल्यावर हा रस्ता संपला आणि उजव्या हाताला मैयाचे पाणी अक्षरशः इतके जवळ होते की कुठल्याही क्षणी मगरीने येऊन माझा पाय धरून मला खाली ओढले असते . नावांमध्ये बसलेल्या केवटांनी आरडाओरडा सुरू केला . आणि तसेही पुढे रस्ता नव्हता त्यामुळे मी चटकन पुढच्या एका छोट्याशा घाटाने चढून वर गेलो आणि मशीदी वरून चालत गायत्री मंदिरापाशी आलो . इथे ऊस तोडणी कामगारांच्या झोपड्यांमधून मला पाहून एक तरुण धावतच माझ्या दिशेला आला . हा तरुण अतिशय चांगल्या कपड्यांमध्ये होता आणि दिसायला एकदम हिरो होता . मला असे वाटले की हा या ऊस तोडणी कामगारांचा ठेकेदार आहे की काय . तो तरुण आला आणि त्याने अचानक मराठी भाषेत बोलायला सुरुवात केली . त्याने मला सांगितले की त्याला कालच मला भेटायचे होते कारण मुलांनी जाऊन त्याला सांगितले की मराठी बोलणारा परिक्रमावासी इथे आलेला आहे परंतु आमची काल चुकामुक झाली त्यामुळे सकाळपासून तो माझी वाट पाहत होता . मी गायत्री मंदिरावरून सरळ चाललो होतो त्या रस्त्याने कोणीच जात नाही त्यामुळे मी सुद्धा जाऊ नये तर डावीकडे वळून सडक मार्गाने थेट अंकलेश्वर गाठावे असे त्याने मला सांगितले . त्याने हे देखील सांगितले की पुढे काहीच नाही त्यामुळे तुम्ही तिकडे जाऊ नका . परंतु मैयाचे शेवटचे आणि अतिशय सुंदर असे वळण येथे आहे , हे मी त्याला सांगितल्यावर तो मला म्हणाला की ते सर्व बरोबर आहे दादा .परंतु इथून पुढे जे गाव आहे त्या गावांमध्ये शंभर टक्के अहिंदूंची वस्ती आहे त्यामुळे तुम्ही तिथे जाऊ नका . परंतु माझा संकल्प काठाकाठाने चालण्याचा असल्यामुळे मी याचे ऐकणार नव्हतो एकंदरीत या मुलाचे वागणे बोलणे मला थोडेसे आधुनिक वाटले म्हणून मी त्याला विचारले की तू कोण आहेस आणि इथे काय करतो आहेस ? त्याने सांगितले की तो शिरपूरचा रहिवासी असून शिक्षणाने इंजिनियर आहे आणि इथे ऊस तोडणी कामगार म्हणून कामाला आलेला आहे ! हे सांगताना त्याच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले . मी त्याच्या दोन्ही खांद्यांवर हात ठेवत त्याला धीर दिला आणि सांगितले की तुला असे कोणी सांगितले की ऊस तोडणी कामगाराचे काम हे कमी दर्जाचे आहे? तो तरुण त्याची कर्म कहाणी मला सांगू लागला . तो म्हणाला तसे नाही बाबाजी परंतु आपल्या महाराष्ट्रातला ऊस कसा स्वच्छ आणि लांबीला छोटा असतो .तसा इथला ऊस नसतो .तो अतिशय लांबलचक आणि वेडावाकडा वाढलेला असतो . तसेच उसाचे वजन कमी व्हावे म्हणून इथे उसाचे शेत पेटवले जाते आणि वाळलेली पाने जळून संपली व सर्व आग विझली की मग उरलेला ऊस तोडावा लागतो त्यामुळे संपूर्ण अंग आणि शरीर काळे होऊन जाते . शिवाय कधी कष्टाची सवय नसल्यामुळे अंगावर खूप ओरखडे उठतात . परंतु पर्याय नसल्यामुळे हे काम करावे लागते . तशी एक चांगली नोकरी धुळ्यात लागलेली होती . .परंतु लॉकडाऊन मुळे नोकरी गेली .आणि नुकतेच नवीन लग्न झालेले असल्यामुळे बायकोला काय खाऊ घालायचे असा प्रश्न होता. त्यामुळे विचारात पडलेलो असतानाच बायकोनेच कल्पना दिली की ती पूर्वी ऊस तोडायला जायची तसेच याने देखील तिच्याबरोबर ऊस तोडायला जावे . पर्याय नसल्यामुळे याने होकार दिला आणि चांगले उत्पन्न मिळू लागले . ऊस तोडणाऱ्या पुरुषांना दिवसाला साडेसातशे रुपये मिळायचे आणि महिलांना दिवसाला पाचशे रुपये मिळायचे . दोघांचे मिळून महिनाअखेरीस ४० हजार रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न साठायचे . बाकीचे कामगार देखील याचे शिक्षण बघून आणि क्षमता बघून याला कमी काम लावायचे किंवा जड काम फारसे करू नाही द्यायचे . हे सर्व करून याला थोडेसे नैराश्य आलेले होते . मी सर्वप्रथम त्याला जवळीक वाटावी म्हणून सांगितले की हे पहा दादा मी सुद्धा एक इंजिनियर आहे .आणि त्यामुळे तुला अतिशय मनापासून सल्ला देतो तू कृपा करून या कामाला कमी दर्जाचे न समजता तुझे अभियांत्रिकीचे डोके लावून या कामांमध्ये अजून काय काय सुधारणा करता येतील किंवा काय करून या कामाची गती वाढवता येईल किंवा काय तंत्र वापरून या कामासाठी लागणारे कष्ट कमी करता येतील यावर तुझे डोके लाव . मी नुकताच उसाच्या शेतामध्ये बेकार अडकलेला असल्यामुळे मला त्या प्रकारच्या उसाचा अनुभव होता . त्यामुळे मला योग्य वाटले असे काही सल्ले त्याला दिले . विशेषतः याची भाषा चांगली असल्यामुळे आणि याच्याकडे चांगल्यापैकी स्मार्टफोन देखील असल्यामुळे मी याला सुचवले की ऊस तोडणी कामगारांचे आयुष्य कसे असते यावर छोटे छोटे व्हिडिओ बनवून जर त्याने युट्युब वर टाकायला सुरुवात केली तर लोकांचा चांगला प्रतिसाद मिळेल आणि लोक आपले काम पाहत आहेत किंवा आपल्या कामाला शाबासकी देत आहेत हे पाहिल्यावर काम करणाऱ्या माणसाला देखील हुरुप येईल . त्याला ही कल्पना खूप आवडली . त्याचबरोबर मी त्याला अभियांत्रिकीचे डोके लावून संख्याशास्त्र अर्थात स्टॅटिस्टिक्स चा वापर करून देखील एफिशियन्सी म्हणजेच कार्यक्षमता वाढविण्यासाठी काही युक्ती सांगितल्या . कोयत्या चा वापर करून उसाचे एक समान आकाराचे तुकडे करण्याचे यंत्र कसे बनवायचे याचे आरेखन अर्थात डिझाईन त्याला मातीत काठीने काढून दाखवले . नैराश्याने ग्रासलेल्या त्याच्या आयुष्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींमुळे उत्साह संचारला . तोपर्यंत त्याच्या पत्नीने कोरा चहा बनवलेला होताच तो घेऊन ती आली . मी चहा घेतला आणि निघणार इतक्या दोघे माझ्या पाया पडले . मी देखील त्या लक्ष्मीनारायणाच्या पाया पडलो . विशेषतः त्या मुलीचे मी खूप मनापासून कौतुक केले . नवऱ्याची नोकरी गेलेली असताना हताश किंवा निराश न होता तिने मोठ्या खंबीरपणे परिस्थितीला तोंड दिले आणि पडेल ते काम करण्याची आपल्या नवऱ्याची मानसिक तयारी तिने करून घेतली त्यामुळेच हा इंजिनियर असून देखील ऊस तोडणी कामगारांचे काम करण्यासाठी तयार झाला . कुठलेही काम हलके नसते हेच या दोघांनी सिद्ध करून दाखवले .त्या दोघांचा निरोप घेतला आणि संपूर्ण शेतातून जाणाऱ्या रस्त्याने मैयाचा किनारा पकडला . पुढे जे गाव येणार होते तिथे माझ्यासाठी काय वाढून ठेवले होते याची मला आत्ता अजिबात कल्पना नव्हती हे एकादृष्टीने बरेच झाले असे म्हणायची पाळी माझ्यावर आली !इतके ते सर्व भयानक होते . नर्मदा खंडामध्ये असेही काही असू शकते यावर विश्वासच बसत नाही .
लेखांक एकशे पाच समाप्त (क्रमशः )
नर्मदे हर🙏🙏🙏🙏🙏
उत्तर द्याहटवाkora chahache kay special aahe? karan bahutek thikani aapan korach chaha ghet hota.
उत्तर द्याहटवाशहरामध्ये पाश्चरायझेशन फॅट रिमुव्हल वगैरे प्रक्रिया केलेले दूध सर्वत्र मिळते . ते मिळतानाच गार केलेले असते व घरी आणल्याबरोबर आपण फ्रीजमध्ये ठेवून देतो . चहा करण्यापुरते बाहेर काढून वापरतो व पुन्हा तापवून आत ठेवून देतो . खेड्यापाड्यांमध्ये असे चालत नाही . तिथे ताजे ताजे धारोष्ण दूध काढले की वापरावे लागते . गाई म्हशी सतत दूध देत नाहीत सकाळी लवकर व संध्याकाळी फक्त दोन वेळाच दूध मिळते .नेमके याच वेळी तुम्ही गेलात तर तुम्हाला दुधाचा चहा मिळतो एरवी कोरा चहा पिला जातो . कोरा चहा करायला सोपा व कुठेही करता येतो त्यासाठी फार काही साहित्य लागत नाही
हटवा