लेखांक १०४ : गुप्त गोदावरी,शाश्वत मारुती धाम , मणिनागेश्वर आणि गौतमेश्वर
सरसाड गावामध्ये गुप्त गोदावरी माते चे मंदिर आहे . मी आत्ता जी मोठी नदी ओलांडली तिला ही गुप्त गोदावरी माई जाऊन मिळते . त्यामुळे या मोठ्या नदीला सुद्धा गुप्त गोदावरी मैय्या असेच म्हणतात . इथे त्र्यंबकेश्वराचे सुद्धा मंदिर आहे . एक गोमुख आहे .आणि एक व्याघ्रमुख आहे . या स्थानाचे महात्म्य नर्मदा पुराणा मध्ये सांगितलेले आहे . खरे सांगायचे तर नर्मदा मातेचा इथून पुढचा काही किलोमीटरचा किनारा हा अक्षरशः तप्त तपोभूमी आहे ! इथे प्रत्येक पावलाला एवढी जबरदस्त स्पंदने जाणवतात की विचारू नका ! जणूकाही प्रत्येक फुटावर कोणी ना कोणी साधनेला कधी न कधी बसले असावे अशी अवस्था या किनाऱ्याची आहे . अतिशय जबरदस्त असा हा टप्पा आहे . त्यामुळे नर्मदा पुराणा मध्ये या भागातील तीर्थक्षेत्रांचे आलेले वर्णन सांगत बसलो तर हा एक भाग पुरायचा नाही त्याचे दहा भाग होतील . त्यामुळे मी असे ठरविले आहे की सर्व लिखाण पूर्ण झाल्यावर नर्मदा पुराणात आलेली तीर्थवर्णने या विषयावर वेगळे लिखाण शेवटच्या काही भागांमध्ये करावे . तसेही नर्मदा पुराणाचे वाचन मी परिक्रमा संपल्यावरच केले होते . त्यामुळे आत्ता परिक्रमेमध्ये मला नर्मदा पुरणातील काहीही माहिती नव्हते .तर माझा वैयक्तिक अनुभव हाच माझ्यासाठी गुरु होता . आणि आश्चर्याचा धक्का मला तेव्हा बसला जेव्हा नर्मदा पुराणामध्ये देखील मला जी स्थाने अप्रतिम वाटली होती त्यांचे भरपूर वर्णन करण्यात आलेले आहे असे मला दिसले ! या भागाचे सध्या आपण दर्शन करूया .
अर्थात
याचा उल्लेख नर्मदा पुराणात आहे.
गुप्त गोदावरी स्थानाची थोडक्यात माहिती गुजराती भाषेमध्ये . (आज-काल गुगल ट्रान्सलेट वापरून कुठल्याही प्रतिमेचे अनुवाद करून वाचन करता येते . परंतु गुजराती वाचायचा प्रयत्न केला तरी आपल्याला कळेल )
मला सुरुवातीला असे वाटले होते की यावनी आक्रमणाच्या भीतीने आपल्या पूर्वजांनी मंदिरे बांधताना घुमटाकार बांधली असावीत . परंतु मुसलमानांच्या धर्माची स्थापना होण्याच्या पूर्वीची देखील काही मंदिरे जेव्हा याच आकारांमध्ये दिसली तेव्हा माझ्या असे लक्षात आले की आपण त्यांच्या धर्मस्थळाप्रमाणे मंदिरांचे कळस बांधलेले नसून त्यांनी भारतातील मंदिरांच्या कळसाचे डिझाईन अथवा आकृतीबंध चोरलेला आहे . कारण भारतावर ७११ साली मोहम्मद बिन कासिम च्या रूपाने पहिले इस्लामी आक्रमण झाले त्या काळामध्ये अरबस्थानातील लोक टोळ्यांमध्ये राहत असून उंटाच्या कातड्याचे तंबू करून राहायचे .त्यामुळे मोठे बांधकाम करून त्यावर घुमट वगैरे चढवण्याची कला त्यांच्याकडे असण्याची शक्यताच नव्हती . भारतात मात्र हजारो वर्षांपूर्वीच स्थापत्य कला विशेषत्वाने प्रगत झालेले असल्यामुळे त्यांनी अशा प्रकारचे घुमट इकडून उचलले आणि त्यांच्या बांधकामांवर तसेच घुमट बांधायला सुरुवात केली ,असे म्हणण्यास पुरेसा वाव आहे . अनेक स्थानिक साधुसंतांशी मी या विषयावर चर्चा केली असता त्यांनी देखील हा मुद्दा योग्य असल्याचे मला सांगितले . त्यामुळे इथून पुढे कधी घुमटाकार कळस असलेले मंदिर दिसले तर त्याला यावनी आक्रमणाच्या भीतीने केलेले बांधकाम समजू नये , तर ती आपली मूळ बांधकाम शैली आहे हे लक्षात ठेवावे .
इंद्रेश्वर ,बालुकेश्वर , कुबेरेश्वर , देवेश्वर , शक्रेश्वर अशा महादेवांची दर्शने ओळीने घेत इथपर्यंत आलो होतो . इथे अतिशय दाट झाडी असलेला उभा कडा पार करताना डावीकडे वरती काहीतरी आहे असे जाणवले . थोडेसे पुढे गेल्यावर लोखंडाचा जिना सापडला . परंतु हा जिना महापुरामध्ये वाहून तिरका तारका झाला होता . त्यामुळे वर चढण्यासाठी तो अतिशय धोकादायक झाला होता . त्यावरून अक्षरशः जीवघेणा स्टंट करत वरती चढलो आणि शाश्वत मारुती धाम आणि रुद्रेश्वर मंदिर गाठले . एक भव्य ध्यानस्थ मारुतीची मूर्ती इथे अलीकडे स्थापित केलेली आहे . अतिशय प्रचंड असे मंदिर येथे बांधलेले आहे . भोजनाची वगैरे खूप छान व्यवस्था केलेली आहे . इथे मुंबई बीएसएनएल मध्ये नोकरी करणारा साळवी नावाचा एक तरुण मला भेटला . त्याने नोकरीतून सुट्टी घेत परिक्रमा उचलली होती . त्याची नवीनच परिक्रमा असल्यामुळे थोडा वेळ त्याच्यासाठी मोहन साधू बनलो . आणि त्याच्या सगळ्या शंकांना यथामती उत्तरे दिली . शाश्वत मारुती धाम मधल्या सेविकाऱ्यांनी बालभोग आणि चहा दिला . संपूर्ण परिसर हिंडून अनिमिष नेत्रांनी पाहिला ! अश्विनी कुमार त्रिपाठी नावाच्या हनुमान भक्तांनी हा आश्रम फारच भव्यदिव्य बांधलेला आहे . वर खाली पसरलेला उत्तम झाडांनी युक्त हा आश्रम भव्यदिव्य वास्तूंमुळे शोभायामान झालेला आहे .
परम पूज्य श्री अश्विन कुमार पाठक यांचा जय श्रीराम सुंदर कांड परिवार नावाचा शिष्य परिवार आहे . त्यांच्यामार्फत आश्रम चालवला जातो
जिन्याची अवस्था पाहिल्यावर वर इतके भव्य दिव्य काहीतरी असेल असे वाटले नव्हते हे प्रामाणिकपणे नमूद करतो .
आश्रमाचा परिसर इतका मोठा आहे की आधी कुठल्या दिशेला जावे तेच कळत नाही ! इथे कामगार वर्ग भरपूर आहे त्यांनी योग्य ते मार्गदर्शन केले .
मारुतीचे मुख्य मंदिर अतिशय भव्य दिव्य आहे .त्याचा कळस खूप लांबून दिसतो . विशेषतः समोरच्या किनाऱ्यावरून फार छान दिसतो .
मैयाकाठी दाट झाडी असल्यामुळे इथे वनचरे भरपूर आहेत .
भव्य सभा मंडपाच्या मधोमध घुमटाच्या खाली बसून ओंकार केल्यावर अद्भुत तरंग लहरी उत्पन्न होत होत्या !त्यांचा येथे आनंद घेतला . कारण इथे मारुतीराया , नर्मदा मैया आणि माझ्याशिवाय कोणीच नव्हते ! हे स्थान मला फार आवडले !
प्रत्येक आश्रमामध्ये असतेच त्याप्रमाणे याही आश्रमामध्ये सुंदर अशी छोटीशी गोशाळा होती . गायींना उत्तम पद्धतीने ठेवण्यात आले होते .
हरी ओम शांती चॅरिटेबल ट्रस्ट संचलित
शाश्वत मारुती धाम
परमपूज्य गुरु श्री अश्विन कुमार पाठक
(मॅनेजिंग ट्रस्टी श्री )
मुक्काम कृष्णपुरी तालुका झगडिया जिल्हा भरूच
इथे मी २८ मार्च २०२२ रोजी आलो होतो .
इथून खाली उतरण्यासाठी रस्ताच नव्हता . परंतु गोशाळेतील सेवकाने सांगितले की असेच थोडेसे पुढे चालत गेल्यावर पुराणप्रसिद्ध मणीनागेश्वर तीर्थ आहे ! आणि अक्षरशः शेजारीच हे पवित्र तीर्थस्थान होते ! या आश्रमामध्ये केवळ साधुसंतांना राहण्याची व्यवस्था केली जाते असे मला कळाले . आश्रमाचे व्यवस्थापक साधू हे मूळचे कर्नाटकातील होते व अतिशय कठोर शिस्तीचे होते . मी काठाकाठाने चालत आलेलो आहे हे शक्यतो आश्रमात पोहोचल्याबरोबर सर्वांच्या लक्षात यायचेच . कारण या सर्व आश्रमांची मुख्यद्वारे दूर रस्त्यावरती होती आणि तिथून मनुष्य येताना लगेच दिसायचा . अचानक उलट्या दिशेने कोणी उगवला की लक्षात यायचे की हा काठाने आलेला मनुष्य आहे . स्वामीजी कानडी आहे ते मला माहिती नव्हते परंतु मी गेल्या गेल्या त्यांच्या पाया पडलो तेव्हा त्यांच्या हिंदी बोलण्याच्या हेलावरून मला ते दक्षिण भारतीय असल्याचे लक्षात आले . मी तमिळ मध्ये बोलल्यावर ते मला तमिळ तेरीयाद म्हणजे तमिळ येत नाही असे म्हणाले . आंध्र प्रदेश आणि केरळ मध्ये साधू होण्याचे प्रमाण फार कमी आहेत . याला दोन कारणे आहेत . आंध्र प्रदेश हा तसा संपन्न भाग आहे त्यामुळे सर्व सुख सुविधा सोडून साधू होण्याचे प्रमाण कमी असते .शिवाय निजामाच्या राजवटीखाली राहिल्यामुळे समाजामध्ये धर्माविषयी आकर्षण थोडेसे कमीच झालेले आपल्याला दिसते .आणि केरळची अवस्था तर काय विचारूच नका ! इथे मोठ्या प्रमाणात परधर्मीय वाढल्यामुळे हिंदू धर्मातील लोक अतिशय भीती मध्ये राहत असतात . आहे त्याच ब्रह्मचर्य आणि गृहस्थ आश्रमाचे पालन करणे त्यांना कठीण झालेले आहे त्यामुळे तिथून संन्यासी मिळणे फारच दुरापास्त आहे !त्यामुळे मी कानडी मध्ये बोलायला सुरुवात केली आणि तो नेम बरोबर बसला ! माझे तोडकेमोडके कानडी ऐकून स्वामी खुश झाले आणि त्यांनी मला एक स्वतंत्र खोली राहायला दिली ! मी त्यांना सांगितले की मी मुक्काम करू शकत नाही कारण मला नावा बंद होण्याच्या आत विमलेश्वर गाठायचे आहे . आणि त्यांनी देखील ती विनंती मान्य केली . परंतु तोपर्यंत सामान ठेवण्यासाठी आणि क्षणभर विश्रांती घेण्यासाठी ही खोली तुझ्याकडे राहू दे असे म्हणून त्यांनी नर्मदा मातेच्या अगदी काठाकडे तोंड करून असलेली अतिशय सुंदर साधू कुटी मला दिली!
इथे माझ्या आधीच एक तरुण बंगाली साधू येऊन राहिलेला होता .हा परिक्रमेमध्ये नव्हता तर याचे परिभ्रमण सुरू होते आणि काही दिवस तो मुक्कामा करता म्हणून इथे राहिला होता .
त्याने मला सांगितले की आधी मणीनागेश्वराचे दर्शन घेऊन ये मग आपण गप्पा मारत बसुया .
हा संपूर्ण आश्रम वर खाली जाणाऱ्या खोल्यांनी आणि जिन्यांनी बांधलेला आहे त्यामुळे आपण कुठून कुठे चाललो आहे ते नवीन माणसाला पटकन लक्षात येत नाही . मंदिर अतिशय सुंदर आहे . आणि सर्व साधू लोकच व्यवस्था पाहत असल्यामुळे देवांची व्यवस्था चोख आहे . इथे अजून एक तरुण साधू होता . त्याची माझी चांगली गट्टी जमली . त्याच्यासोबत मी महादेवांची आरती केली आणि घाट उतरून खाली जाऊन मैयाला नैवेद्य देखील दाखवला . नर्मदा मातेला एक एक घास हा हाताने भरवत होता आणि त्याबरोबर हजारो मासे त्या स्वच्छ पाण्यामध्ये उड्या मारत मारत प्रसाद भक्षण करत होते . या भागामध्ये सुद्धा एक सोन्याची नथ असलेला मासा आहे असे मला कळाले . सोन्याची नथ असलेला मासा हा कुठलाही चमत्कार नसून कोळी लोकांची ती पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे . एखाद्या माणसाच्या हव्यासापोटी त्या भागातील एका जातीचे सर्वच मासे नष्ट होऊ नयेत म्हणून पूर्वजांनी एक नर आणि एक मादी मासा पकडून त्यांच्या नाकामध्ये (ओठाजवळ ) सोन्याची नथ घातलेली असते . हा मासा कोणाला जरी सापडला तरी त्याने तो पुन्हा पाण्यामध्ये सोडायचा असतो . त्यामुळे ही जोडी कायम जिवंत राहते आणि नवीन मासे उत्पन्न करत राहते . अनेक वर्ष जगल्यामुळे या माशांचा आकार देखील खूप मोठा झालेला असतो . या भागातील पाणी अक्षरशः काचेसारखे शुद्ध होते . इथे मगरमच्छ सुद्धा विश्रांतीसाठी येऊन पडलेली असते असे मला साधूने सांगितले . या भागातील पाण्याला किंचित खारटसर चव होती . समुद्र जवळ आल्याचे ते लक्षण होते . हाच तो मैया कडे घेऊन जाणारा छोटासा जिना . हे चित्र महापुरातील असल्यामुळे पाणी गढूळ दिसते आहे .
इथेच डाव्या हाताला मला खोली मिळाली होती . आणि उजवीकडे खाली गेल्यावर नर्मदा मातेला नैवेद्य दाखवता येत होता . इथून पुढे मी जिन्यावरून उडी मारूनच किनारा पकडला होता .
इथले नर्मदा जळ अतिशय म्हणजे अतिशय शुद्ध होते परंतु शेवटच्या पायरीवर प्रचंड शेवाळे असल्यामुळे पुढे जाणे धोक्याचे होते . कारण इथे मैया खूप खोल आहे व पाण्यामध्ये मगरी खूप आहेत .
नुकतेच एक परिक्रमावासी भेटले ज्यांना या महाराजांनी सांगितले की , छानछौकीचे आयुष्य जगत असताना एकदा चित्रपटगृहामध्ये चित्रपट पाहताना वैराग्याचा तीव्र आवेग आल्यामुळे हे तरुण साधू बनले आणि कायमचे घरा बाहेर पडले ! परंतु हे अतिशय चांगल्या दर्जाचे साधू होते हे त्यांच्याबरोबर थोडा काळ घालवल्यावरच मला लगेच जाणवले . साधूची परीक्षा कशी करायची ? खूप सोपे गणित आहे ! जो कधीही आत्मबोधाशिवाय बाकीच्या कुठल्या विषयांवर अधिक काळ गप्पा मारत नाही आणि इतर विषय चालू झाले तरी पुन्हा फिरवून गाडी मूळ पदावर आणतो तोच खरा साधू ! अजून भोजन प्रसाद सुरू व्हायला वेळ होती तोपर्यंत दुसरा तरुण बंगाली साधू होता त्याच्याशी गप्पा मारत बसलो . असे तारून साधू भेटले की मला खूप भारी वाटायचे ! योग्य वयामध्ये योग्य निर्णय घेतल्यामुळे त्यांचे साधुत्व सहज सुंदर असायचे . अशा प्रत्येक तरुण साधूला मी त्यांचा अंदाज बघून एक प्रश्न आवर्जून विचारायचो की तुम्हाला साधू व्हावेसे कुठल्या क्षणी वाटले किंवा कशामुळे वाटले ? प्रत्येकाची एक वेगळी कथा असायची . परंतु या सर्वांमध्ये एक समान सूत्र मला असे जाणवले की या प्रत्येकाला कधी ना कधी या नश्वर संसाराचा प्रचंड वीट आलेला असायचा . आणि प्रत्येकाकडे उत्तम निर्णय क्षमता असायची .नाहीतर आपल्याला सुद्धा संसाराचा वीट अधून मधून येत असतोच की ! परंतु आपण काही लगेच साधू होत नाही ! या बंगालीसाधूशी याच विषयावर आमचे चिंतन सत्र सुरू झाले .
माझी आजी सतत एक गाणं म्हणायची .
संसार दिग्भास हा भासणारा । नाना विकारे विकल्पेविणारा ॥
संतापदाते कुठे क्रोधकाम ।देही हा राम । हा राम घ्या राम । विश्राम । श्री राम जय राम सीता राम ! देही हा राम !
सर्वच संतांनी एकमुखाने या संसाराचे असारत्व सांगितलेले आहे . याला कितीही उगाळले तरी काळेच असणाऱ्या कोळशाची उपमा दिलेली आहे . या जगामध्ये पूर्णवेळ संसार करून पूर्णवेळ सुखी झालेला एकही मनुष्य अस्तित्वात नाही असे अनुभवी सांगतात !मी कधी फारसा टीव्ही बघत नाही परंतु नुकतेच एके ठिकाणी गेलो होतो तिथे टीव्हीवर एक बातमी लागली होती ! पत्रकारांच्या पुढे आपल्या मुलाच्या विवाहाप्रीत्यर्थ फोटो काढण्यासाठी मुकेश अंबानी आणि नीता अंबानी हे भारतातील सर्वात श्रीमंत दाम्पत्य उभे होते . फोटो काढण्यासाठी मुकेश अंबानी याने आपल्या पत्नीच्या कमरेवर स्वाभाविक सुलभतेने हात ठेवल्याबरोबर तिने जोरात फटका मारून त्याचा हात झटकला ! नेमका हाच क्षण सर्व पापाराझी लोकांनी टिपला आणि दिवसभर बातम्या चालवल्या ! मी विचारात पडलो की या मुकेश अंबानी ने आपल्या पत्नीला काय कमी केले असेल हो ? तिचे स्वतःचे चार्टर विमान आहे . तिच्या नावाने अनेक व्यवसाय आहेत . अब्जावधी रुपयांचे दागिने करोडो रुपयांचे कपडे दरमहा तिला मिळत आहेत ! तरी देखील ती बिचारी सुखी नाही! असा प्रसंग पाहून आपण ओळखावे की आपण किती जरी केले तरी ते कमीच पडणार आहे ! असा फटका आपल्यालाही खावा लागू शकतो ! त्यापेक्षा पोटभर जेवणाची व्यवस्था आणि ऊन वारा पावसापासून संरक्षण देणारे घर दिले की आपण तुकोबा राय म्हणतात त्याप्रमाणे "कोणी निंदा अथवा वंदा । अमुचा स्वहिताचा धंदा । "करायला सुरुवात करावी हे उत्तम ! याच्यामध्ये स्वार्थ कमी आणि परमार्थ जास्त आहे . साधुसंत हे देखील समाजाचेच अंग असल्यामुळे ते जितके परिपूर्ण असतील तितका तो समाज अधिक सकस प्रगल्भ आणि उन्नत होतो असा इतिहास आहे . जेव्हा जेव्हा या देशांमध्ये साधुसंत महंत तडी तापसी संन्यासी यांचे अधःपतन झाले आहे तेव्हा तेव्हा देश आपल्या मूळ पदावरून ढळला आहे .आणि जेव्हा जेव्हा याच साधू संतांनी मनावर घेतले आहे तेव्हा तेव्हा आपल्या देशाचे पुनरुत्थान झालेले आहे . आमचे अजून बरेच गहन चिंतन झाले परंतु ते इथे मांडावे असे वाटत नाही . या वाचनाचा कोणाच्या मनावर परिणाम व्हावा असे न होवो म्हणून लिहीत नाही . इत्यलम् ।
'भोजन की हरिहर ' झालीच ! भोजनाची तयारी पूर्ण झाली की साधू समाजाच्या भाषेमध्ये त्याला भोजनप्रसादी की हरिहर असे म्हणतात . अशीच चाय की हरिहर सुद्धा असते ! कुठल्याही रूपामध्ये बोलताना आपल्या मुखातून भगवंताचेच नाव यावे अशी साधूंची भाषा असते . उत्तम असा भोजन प्रसाद घेतला . काही काळ बंगालीसाधूशी पुन्हा एकदा चर्चा केली आणि काठाने पुढे निघालो . जिना उतरून खाली गेलो आणि गवतामध्ये उडी मारली . इथून आजवर एकही परिक्रमा वासी गेला नव्हता कारण पायवाटच नव्हती . परंतु मयाला शेजारी ठेवून गवत तुडवत चालत राहिलो . रस्ता आपोआप तयार झाला . मार्गाकडे माझे लक्षच नसायचे . माझ्याकडे पहात मनात काहीतरी चिंतन चालू असायचे किंवा नामस्मरण तरी चालू असायचे . हे करताना पायाखालचा रस्ता कधी कुठे कसा सरला लक्षात सुद्धा यायचे नाही! आता सुद्धा काठाने असे चालत असताना अचानक कोणीतरी मला नावाने हाक मारल्यामुळे मी भानावर आलो! पाहतो तर एका उपसा कुपाच्या सावलीमध्ये केवटा सोबत आपला चेतराम भगत गांजा पीत बसला होता . गांजेकस लोकांना एकदा गांजा मिळाला की जेवण नसले तरी चालते . साधू लोकांची गोष्ट थोडीशी वेगळी आहे . ते गांजाला गांजा न म्हणता भोले बाबा की प्रशादी असे म्हणतात . परंतु गृहस्थी मात्र गांजाच ओढतात .त्याला बरे वाटावे म्हणून दोन मिनिट त्याच्यासोबत बसलो . आणि पुढे निघालो .
हीच ती जॅकवेल किंवा उपसा कूप जिथे चंदन बसला होता . गुजरात औद्योगिक विकास महामंडळ उद्योगधंद्यांना पुरवण्यासाठी इथून पाणी उचलते .
याचे एकच मला आवडले होते ते म्हणजे हा किनारा सोडत नव्हता !हा निर्धार सुद्धा खूप कठीण होता आणि याला जमला होता ! तिचे रुंडगाव नावाचे गाव पुन्हा एकदा लागते . रस्ता कठीण होत चालला होता . परंतु तिथूनच जायचा निर्धार मी केला होता . अचानक मला वरती काहीतरी आहे असे वाटू लागले . म्हणून वर गेलो . अगदी ढासळू लागलेल्या कड्यावर गौतमेश्वर महादेवाचे मंदिर होते . गौतम ऋषींनी इथे तपस्या केली आहे असे तिथे बसलेल्या साधूने मला सांगितले . माझे गोत्र गौतम आहे ! याचा अर्थ आमच्या मूळ पुरुषांची तपोभूमी मी आज पाहत होतो ! साधूने कोरा चहा करून पाजला . मंदिरामध्ये ग्रामस्थ दर्शनासाठी येत होते .
या रुंढ गावापासून भालोद सुरूच झाले असे समजायचे . आणि भालोद गावामध्ये खूप मंदिरे आहेत असे मी ऐकले होते . चेतराम सुद्धा माझ्या मागोमाग इथे आला आणि साधूंकडे त्याला भोले बाबा की प्रसादी मिळाल्यामुळे इथेच थांबायचा निर्णय त्याने घेतला .मला मात्र गावातील पुढची सर्व मंदिरे पहावयाची होती . म्हणून मी पुढे मार्गस्थ झालो . या गावात की मंदिर आहेत की बघण्यासाठी दिवस पुरणार नाही . परंतु असे असून देखील या गावातील काही गोष्टींनी मन कायमचे विचलित करून टाकले आहे . कसे होणार या देशाचे ?
लेखांक एकशे चार समाप्त ( क्रमशः )
नर्मदे हर🙏🙏🙏🙏🙏
उत्तर द्याहटवानर्मदे हर...
हटवाअसा प्रसंग पाहून आपण ओळखावे की आपण किती जरी केले तरी ते कमीच पडणार आहे ! असा फटका आपल्यालाही खावा लागू शकतो ! त्यापेक्षा पोटभर जेवणाची व्यवस्था आणि ऊन वारा पावसापासून संरक्षण देणारे घर दिले की आपण तुकोबा राय म्हणतात त्याप्रमाणे "कोणी निंदा अथवा वंदा । अमुचा स्वहिताचा धंदा । "करायला सुरुवात करावी हे उत्तम
उत्तर द्याहटवाडोळे उघडणार वाक्य अहे आहे हे. आपल्या लेखात असे खूप छान quotes आहेत. ह्या लेख माले बद्दल आपले शतशः आभार
Narmade Har !!!!!
उत्तर द्याहटवावढवाण्याचा शक्रेश्वर महादेव काल नर्मदा अर्पण झाला. Narmada puranat ullekh asleli, ashi mandiR, vegaane naahise hot aahet.