लेखांक १०३ : मोटा वासना येथील श्री कृष्णेश्वर , इंदोरचा इंद्रेश्वर आणि वेलूगांवचे गिरनारी अन्नक्षेत्र

गिरनारी गुफा सोडल्यावर भयानक कठीण किनारा होता . तो झाडीतून वाट काढत तर कधी शेतातून बांधावरून चालतअसा पार करत अखेरीस वाळूच्या किनाऱ्यावर पोहोचलो . नर्मदा मातेच्या काठावर जेवढे म्हणून वाळूचे किनारे आहेत त्यातील सर्वात मोठ्या किनाऱ्यांपैकी हा एक आहे . कारण हे नर्मदा मातेचे सर्वात मोठे वळण आहे . इथे इतक्या प्रचंड प्रमाणात वाळू आहे की आपण कल्पना देखील करू शकत नाही . कितीही खोल खणले तरी वाळूच सापडते . इथे अधून मधून खणून वाळू काढलेली दिसते . संपूर्ण परिसर निर्मनुष्य असल्यामुळे जलजीवन समृद्ध आहे . जल जीवन समृद्ध असण्याचे अजून एक महत्त्वाचे कारण आहे . इथून समुद्र जवळच असल्यामुळे खारेपाणी हळूहळू वाढू लागते . गोड्या पाण्यातील मासे खाऱ्या पाण्यात जगत नसल्यामुळे नर्मदा मातेतून वाहून आलेले सर्व मासे या भागात गर्दी करतात . माशांची संख्या वाढल्यामुळे त्यांना खाणाऱ्या पक्षांची संख्या देखील वाढते . परिसर निर्मनुष्य असल्यामुळे वन्य श्वापदांची संख्या देखील चांगली आहे . त्यांच्या अस्तित्वाच्या खुणा अधून मधून दिसत होत्या . वर डोळा मासे देखील मोठ्या प्रमाणात दिसू लागले होते . वाळूतून साप गेल्याच्या खुणा दिसत होत्या . मनुष्यप्राणी नसला की एकंदरीतच सृष्टी खूप आनंदाने जगत असते असे परिक्रमेमध्ये तुमच्या लक्षात येते . माणूस जिथे जाईल तिथे वाटच लावून टाकतो ! ही कुठली मानसिकता आहे माहिती नाही परंतु सार्वत्रिक सत्य आहे . जिथे कुठे मनुष्यप्राणी जाईल तिथले राज्य त्याला हवे असते . निसर्गाशी समरस होऊन जगता आले नाही तर मनुष्य प्राण्याचे कठीण आहे . कारण निसर्ग ज्या वाटाघाटी करतो त्या आपल्याला परवडणाऱ्या नसतात .  
या भागातून वाहणारी नर्मदा मातेची एक शाखा . समुद्र जवळ आल्यामुळे नर्मदा मातेचे पात्र इथे प्रचंड विस्तृत आहे . 
इथे समोरच्या तटावर एक दर्गा आहे . त्याच्या शेजारी असलेला वाळूचा किनारा त्या लोकांनी एका खाजगी बीच मध्ये बदलून टाकला आहे . अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी करून लोक तिथे नर्मदा मैया मध्ये घाण प्लास्टिक वगैरे पसरवितात . ती गर्दी या ताटावरून सुद्धा दिसत होती एवढे लोक तिथे होते .
दर्ग्या समोरच्या खाजगी बीच मध्ये अगदी नर्मदा मातेच्या पाण्यामध्येच सिंगल युज प्लास्टिक वापरलेल्या पाच पाच रुपयाच्या पुड्या विकल्या जातात ज्या खाऊन लोक मैयामध्येच प्लास्टिक फेकून देतात . हे घोर महापातक आहे .
त्या तुलनेने इकडचा किनारा अतिशय निर्मनुष्य असून साधनेसाठी उत्तम आहे .
नर्मदा मातेचे हे गोलाकार किंवा शिवलिंगाकार वळण कसे आहे हे आपल्याला कळावे म्हणून एक नकाशाचा फोटो देतो आहे . .
या वळणाच्या अगदी टोकावर मोटा वासना गाव असून त्याच्यानंतर इंदोर नावाचे गाव आहे . वाळूमध्ये दोन किनारे असतात एक शेता जवळचा किनारा आणि दुसरा मैय्या जवळचा किनारा . त्यातील मी मैया जवळचा किनारा पकडून चालल्यामुळे मला खूप अधिक चालावे लागले . हे तुम्हाला नकाशा पाहिल्यावर सहज लक्षात येईल .
हा संपूर्ण परिसर अतिशय सुंदर होता .इथे पावला पावलावर मला शिवलिंगे सापडू लागली . इतक्या मोठ्या प्रमाणात शिवलिंगाकार दगड मला आतापर्यंत कधी सापडले नव्हते . अखेरीस मी मन कठोर करत एक निर्णय घेतला की आज मी सापडलेले एकही शिवलिंग उचलणार नाही . कारण जरा चार-पाच पावले गेलो नाही की शिवलिंग सापडू लागले ! साधारण १०० शिवलिंगाच्या आकाराचे दगड सापडले की त्यातील एखादा अतिशय जबरदस्त आणि अप्रतिम असा असायचा ! अशी अप्रतिम शिवलिंगे देखील साधारण ४०० ते ५०० मला सापडली आणि मी नाईलाजाने जागेवर सोडून दिली ! कारण प्रत्येक शिवलिंग दिसल्यावर त्याच्यापर्यंत जाऊन खाली वाकून ते उचलून पाहून परत खाली ठेवायला जो वेळ लागायचा त्यामुळे माझे चालण्याचे अंतर कमी होऊ लागले आणि वेळ मात्र वाढू लागला . एकदा त्या मायेमध्ये अडकायचे नाही असे ठरविल्यावर मात्र अतिशय वेगाने मी वाळूचा तो तप्त किनारा चालू लागलो .
असे खडकाळ किनारे लागले की शिवलिंग सापडायची

गेल्या लाखो करोडो वर्षांमध्ये निसर्गाने रांजणखळग्यांमध्ये दगड गोटे फिरवून तयार केलेली ही शिवलिंगे असल्यामुळे ती अतिशय सुंदर मजबूत टिकाऊ आणि आकर्षक अशी असायची . परंतु निश्चय केलेला असल्यामुळे या भागातील एकही शिवलिंग उचलले नाही .
अखेर मोटा वासना गावातील श्रीकृष्णश्वराचे मंदिर आलेच .
मंदिर छोटेसेच होते परंतु जागृत होते .
कृष्णेश्वराच्या मंदिराशेजारी दोन खोल्या बांधून एक बंगाली संन्यासी महाराज राहत होते . यांनी मला सांगितले की या महिन्यात इथे आलेला तू पहिला परिक्रमावासी आहेस . या वाक्यामुळे मला आनंद व्हायच्या ऐवजी दुःख झाले . नर्मदा मातेचा इतका सुंदर किनारा असताना तो पहायचा सोडून रस्त्याने चालून लोकांना काय मिळत असेल ?  केवळ अंतर कमी पडते आहे किंवा वेळ वाचतो आहे म्हणून जर रस्त्याने चालायचे असेल तर त्यापेक्षा युट्युब वर किंवा गुगल नकाशावर जाऊन कल्पनेने नर्मदा परिक्रमा केलेली काय वाईट आहे ? त्याला सर्वात कमी वेळ लागू शकतो ! माझ्या बोलण्याचा कदाचित काही लोकांना राग येऊ शकतो परंतु मी हे पोट तिडकीने बोलतो आहे . माझा या बोलण्यामागचा भावार्थ कृपया सर्वांनी समजून घ्यावा . परिक्रमेमध्ये बरेच वेळा माझ्या असे लक्षात आले की रस्त्याने जाण्याची इच्छा नसताना सुद्धा सोबत घेतलेला माणूस घाईगडबड करत आहे म्हणून काही सात्विक परिक्रमावासींना रस्त्याने जावे लागते . याच करता सोबत कोणाला घेऊच नये . एकट्याने परिक्रमा करावी हे उत्तम . कुठल्याही प्रकारची घाई गडबड गोंधळ नर्मदा खंडामध्ये आल्यावर करू नये .कारण आपल्याला पुन्हा हा जन्म मिळेल आणि पुन्हा इतका वेळ मिळेल आणि पुन्हा आपण इतके धडधाकट असू याची कुठलीही शाश्वती आपण देऊ शकत नाही ! संधी मिळाल्यासरशी तिचे सोने करून घ्यावे हेच उत्तम ! माझ्या असे लक्षात आले की जे जे लोक वळण घ्यायचे टाळून रस्त्याने चालत जाऊन पुढे गेले ते सर्व मला वाटेतील कुठल्या ना कुठल्या आश्रमामध्ये पुन्हा भेटत गेले याचा अर्थ त्यांना आणि मला समान वेळ लागत होता . किंबहुना बऱ्याच लोकांना मागे टाकून मीच पुढे जातो आहे असे माझ्या लक्षात आले . याचा अर्थ किनार्‍याने चालल्यामुळे वेळ वाढतो किंवा चालण्याचे अंतर वाढते हे सर्व गैरसमज आहेत ! आणि मी म्हणतो वाढले अंतर तर वाढू देत आणि गेला लागला वेळ अधिक तरी लागू दे .परंतु नर्मदा मातेचे दर्शन ,नर्मदा मातेच्या सुशीतळ जळाचा स्पर्श , नर्मदा मातेचे थंडगार पाणी पिण्याची संधी किमान परिक्रमे मध्ये असताना तरी दवडू नये ! कोणालाही मार्ग विचारण्याच्या भानगडीमध्ये पडूच नये कारण नर्मदा खंडातील बहुतांश ग्रामस्थ तुम्हाला रस्त्याने चालण्याचे मार्ग सुचवितात .किनाऱ्याने रस्ता अजिबात नाही असेच तुम्हाला सांगितले जाते . विचारायचे झाले तर इतकेच विचारावे की नर्मदा मातेचे पात्र कुठल्या दिशेला आहे आणि तिथे जायचा रस्ता कुठला आहे . एकदा काठावर पोहोचलात की तिला उजव्या हाताला ठेवून सरळ चालत राहायचे . रस्ता तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणारच ! कारण तुमच्याशिवाय शेकडो लोक या रस्त्यांचा वापर दररोज करत असतात . धुणी धुणाऱ्या बायका , गुरांना पाणी चारणारे गुराखी , नावा चालविणारे केवट ,मासे पकडणारे कोळी या सर्वांना रोज नर्मदे काठी भरपूर चालावे लागते . त्या सर्वांनी निर्माण केलेल्या हजारो वाटा इथे गेल्या अनेक वर्षांपासून तयार झालेल्या आहेत . इथून रस्ता नाही असे जेव्हा ग्रामस्थ सांगतात तेव्हा त्यांना तुमची काळजी वाटत असते की तुम्हाला कठीण मार्गाने चालावे लागू नये . म्हणून तुम्हाला ते सरधोपट मार्ग सुचवीत असतात . परंतु त्या मार्गावरती चालण्यात कुठलाही आनंद नाही , हे त्यांना कसे बरे ठाऊक असणार ? ते ज्याचे त्यालाच कळते . आताच्या भाषेत समजून सांगायचे झाले तर परिक्रमा ना मिलेगी दोबारा !त्यामुळे करू नये पोबारा ! निवांत चालत तिचा किनारा धरा ! हाच उद्धारक परिक्रमा मार्ग खरा ! आता हेच पहा ना .
रामेश्वर सर्वांना माहिती आहे परंतु आपल्या देशामध्ये कृष्णेश्वर सुद्धा आहे हे इथे आल्यावर मला कळाले ! या गावांमध्ये नुकतेच एक नवीन राम मंदिर झाले आहे असे गुगल नकाशा पाहिल्यावर माझ्या लक्षात आले . संन्यासी महाराजांची चर्चा झाली तेव्हा त्यामध्ये याचा पुसटसा उल्लेख त्यांनी केला होता . मी जेव्हा त्यांना समोर दिसत असलेल्या गर्दी विषयी विचारले तेव्हा त्यांनी दर्ग्याची माहिती मला सांगितली होती . आणि या संपूर्ण भागामध्ये मोठ्या प्रमाणात अन्य धर्मीयांची वस्ती वाढत असल्याचे देखील सांगितले होते . विशेषतः उमल्ला बमल्ला अशी काही गावे आहेत जिथे त्यांची वस्ती अधिक आहे असे ऐकण्यात आले .
ज्या ज्या भागातून किंवा गावातून परिक्रमावासी अधिक संख्येने जातात त्या त्या भागातील धर्मनिष्ठ लोकांना आपोआप एक बळ मिळते किंवा एक प्रकारची निश्चिंती लाभते हे सदैव आपण लक्षात ठेवावे .  इथून पुढे वाळूचा किनारा होता मात्र वाळू उत्खनन करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले . नर्मदा मातेमध्ये आडवे आडवे नळे टाकून त्याच्यावर वाळू ओतून तिच्या मध्यापर्यंत जाणारा मार्ग तयार केला जायचा आणि त्यावरून जाऊन डंपर आणि जेसीबी च्या साह्याने वाळू गोळा केली जायची . हे सर्व अवैध उत्खनन असल्यामुळे दिवस-रात्र हे काम चालायचे . या एकाच भागामध्ये वाळू उपसण्याच्या अनेक विध तऱ्हा मी पाहिल्या . कोणी पूल बांधून वाळू उपसत होते तर कोणी काठावरची वाळू उपसून तिथे तलाव तयार करत होते . तर कोणी एकाच जागी खोल जाऊन जुनी वाळू बाहेर काढत होते . या वाळूचे मोठे मोठे ढिगारे जागोजागी लावलेले होते . कधी कधी हे पन्नास-साठ फूट उंचीचे देखील असायचे . याच्यावरून खाली उतरायला फार मजा यायची . असा एखादा तीव्र उताराचा वाळूचा कडा आला की मी कमीत कमी पावलांमध्ये तो उतरायचा प्रयत्न करायचो . जितके मोठे पाऊल टाकू तितके तुम्ही वेगाने खाली येता . एक एक पाऊल १०-१२ फुटाचे पडायचे ! कारण आपण प्रत्येक पावलाला  उतारावरून घसरत खाली येत असतो! आणि पडले तरी लागण्याची भीती नसते कारण सगळी वाळूच असते ! आमच्या कृष्णा नदीतील वाळू नावाप्रमाणे काळी कुळकुळीत असायची . परंतु नर्मदा मातेची वाळू मात्र अतिशय शुभ्र आणि सुंदर आहे . तिचा स्पर्श सुखावह असतो . 
वाळू बसण्यासाठी नर्मदा मातेच्या मुख्य पात्रामध्ये अशा रितीने मोठे मोठे सिमेंटचे नळे किंवा पाईप टाकून त्यावर वाळू टाकून तात्पुरता रस्ता तयार केला जातो आणि त्यावरून मोठे मोठे ट्रक वाळूची ने आण करतात . समुद्राजवळ जसजसे पोहोचू लागलो तसतसे ट्रकचे आकार देखील मोठे मोठे होऊ लागले . छोटे डंपर दिसायचे आता बंद झाले तर दहा ते बारा चाकांचे डंपर सर्वत्र दिसू लागले .
वाळू उपसणाऱ्या जेसीबी यंत्रांचे आकार आणि जबड्याचे आकार देखील वाढू लागले . 
काही ठिकाणी अशा रीतीने काठावर साचलेली वाळू उपसण्याचे काम चालू होते . त्यातून मोठी मोठी सरोवरे तयार होत होती . यातही बदके मासेमारी करत होती ! यात सापडलेले मासे त्यांना सहज मिळायचे कारण त्यांना पळून जायला जागा कमी होती . 
वाळू उपसण्याची ही अजून एक पद्धत आहे . याच्यामध्ये ड्रम च्या साह्याने तरंगणारे नळे लावले जातात . आणि एक भूमिगत यंत्र खालून वाळू मिश्रित पाणी उपसत राहते आणि त्याचा फवारा काठावर टाकला जातो . यातील जलांश आपोआप खाली निघून जातो आणि वाळूचा ढिग मात्र शिल्लक राहतो . ही सर्व चित्रे याच भागातील आहेत . गुगल नकाशा वरून साभार .
उपसण्या योग्य वाळू मिळणारा हा शेवटचा थोडासा परिसर आहे . याच्यानंतर समुद्राचे पाणी उलटे शिरायला सुरुवात होते . त्यामुळे वाळूचा कस कमी होतो . याही भागामध्ये मगरी आहेत . परंतु वाळू उपसणारी यंत्रे प्रचंड आवाज करत असल्यामुळे त्या ठराविक भागांमध्ये केंद्रित झालेल्या आहेत . या भागातील वाळू उपसणारे कंत्राटदार गाड्यांचे मालक जेसीबी यंत्रांचे मालक आणि कामगार हे सर्व अहिंदू होते हे पाहताक्षणी लक्षात येत होते . त्यामुळे त्यांचा नर्मदा मातेकडे पाहण्याचा भाव अतिशय तुच्छ होता . नर्मदा मातेमध्ये घाण करताना थुंकताना वगैरे त्यांना जराही वैषम्य वाटत नव्हते . आपण जसे नर्मदा माता ,नर्मदा माई , नर्मदा मैया , नर्मदाम्मा असे विविध शब्द वापरतो त्या पद्धतीने हिला नर्मदा अम्मी  किंवा मदर नर्मदा म्हणणारा एकही मनुष्य मला भेटला नाही या परते ते दुर्दैव ते काय ! इथे इंदोर नावाचे गाव आहे . म्हणजे मोठे इंदूर शहर ते वेगळे आणि हे वेगळे . या गावांमध्ये इंद्रेश्वर महादेवाचे मंदिर आहे . हे तीर्थक्षेत्र आहे अर्थात नर्मदा पुराणा मध्ये उल्लेख असलेले स्थान आहे . आपल्याकडे एक म्हण आहे पुरणाची वांगी पुराणात . त्यातला वांगी हा शब्द चुकीचा असून वानगी असा तो शब्द आहे . वानगी दाखल तुम्हाला एक दाखला सांगतो , असे आपण म्हणतो पहा ,त्यातला हा वानगी शब्द आहे .आणि त्याचा अर्थ 'उदाहरण' असा होतो .  आपल्याकडे भारतीय शास्त्रांचे विद्वान म्हणून काही परदेशी माणसांना फार मोठे केले गेले आणि त्यांनी आपल्याला पुराणे ही कपोलकल्पित असल्याचे सांगितले आणि आपणही ते खरे मानले . नर्मदा पुराणाचेच उदाहरण घेतले तर आपल्या लक्षात येते की त्यात वर्णन केलेले प्रत्येक तीर्थस्थान त्या त्या ठिकाणी आजही आढळून येते याचा अर्थ ते केवळ पुराण नसून तो एक इतिहास ग्रंथ आहे . आपल्याकडे इतिहास लिहिण्याची पद्धत तशी होती . भारतीयांना नेहमी त्यांच्या समृद्ध वारशाबद्दल अज्ञान रहावे किंवा संभ्रम राहावा अशी यंत्रणाच मॅक्समुल्लर सारख्या विद्वानांच्या सहाय्याने तत्कालीन राज्यकर्त्यांनी उभी केली होती . त्याचीच ही विषारी फळे आहेत ज्यामुळे आपलीच मुले आपल्याला सांगतात की पुरणातले काही सांगू नका . या देशाने जर पुराणांवरील निष्ठा सोडली तर हा देश पुन्हा एकदा कुराणनिष्ठ व्हायला वेळ लागणार नाही . 
इंदोर गावामध्ये एक मोठा दर्गा आहे . इंद्रेश्वर महादेवाचे मंदिर आणि निळकंठेश्वर महादेवाचे मंदिर आहे . 
गावात वाराही मातेचे एक मंदिर आहे
 इंद्रेश्वर महादेव
नाना वासना नावाचे गाव याच्यापुढे लागते .नाना म्हणजे गुजराती भाषेत छोटा . या भागातील एका छोट्या दुकानदाराने मला संपूर्ण परिसरातील सामाजिक परिस्थितीची जाणीव करून दिली . तो म्हणाला हे मी तुम्हाला सांगतो आहे कारण इथून कोणीच परिक्रमा वाशी जात नाही . आज तुम्ही चालला आहात तर निदान बाकीच्या लोकांना सांगाल आमच्या गावाची काय अवस्था होती आणि काय अवस्था झाली आहे . त्याच्या दोन्ही मुलींना त्याने शिकायला अंकलेश्वरला ठेवले होते . कारण गावातील मुलींसाठी गाव सुरक्षित राहिले नव्हते असे थोड्याफार फरकाने या भागातील सर्वच लोक सांगत होते . मुळात संख्येने अधिक जन्माला घालण्यात  आलेली मुले एकदा तरुण झाली आणि त्यात ती संस्कार विहीन राहिली किंवा विपरीत संस्कारांनी ग्रासली की सामाजिक प्रश्न बनण्याचा पुरेपूर ऐवज ती बाळगून असतात . तेच या भागामध्ये होत होते . अगदी पन्नास वर्षांपूर्वी शून्य लोकसंख्या असलेला समाज आता इथे बहुसंख्य होऊ पाहत आहे . फक्त हाच समुद्रकिनारा नव्हे तर भारताचा संपूर्ण पश्चिम किनारा या समस्येने ग्रासलेला आहे . जे लोक कोकणात जातात किंवा कोकणचे आहेत त्यांना मी काय म्हणतो आहे ते लगेच लक्षात येईल . नर्मदेच्या या समुद्रसंगमापासून ते थेट कन्याकुमारी पर्यंत ही समस्या सर्व जागी थोड्याफार फरकाने गंभीर होत चाललेली आहे . या भागातील सर्व तरुण मुलींना बाहेर पाठवले जाते . गावात राहिलेली तरुण मुलगी कुठल्या क्षणी पळवली जाईल आणि बाटवली जाईल याचा नेम नसतो . द केरला स्टोरी आता हळूहळू द वासना स्टोरी बनू पाहत होती . हे सर्व मी अत्यंत जबाबदारीने लिहितो आहे . याचे गांभीर्य सर्वांनी लक्षात घ्यावे . जे आज सुपात आहेत ते उद्या जात्यात असणार आहेत . वेळीच सावध होणे कधीही श्रेयस्कर !
याच्यापुढे पर्वत नावाचे गाव आहे . अर्थात ही गावे आत मध्ये आहेत .किनाऱ्यावर फक्त झाडी आहे . या गावाच्या समोर नारेश्वर आहे . रंगावधूत महाराज यांची समाधी येथे आहे . इथे दुचाकी गाड्यांना घेऊन जाणारा एक तरंगता पुल आहे . म्हणजे हे इथल्या लोकांनी दिलेले नाव आहे . प्रत्यक्षात ती एक नौकाच आहे .
या किनाऱ्यावरून त्या किनाऱ्यावर गाड्या घेऊन जाणे लोकांना सोयीचे व्हावे म्हणून ही नौका आहे .
पर्वत गावानंतर वेळूगाम गाव लागते . म्हणजे गावाची हद्द लागते . इथे एक दोन जंगलातले ओढे पार करावे लागले . चिखलाने माखलो . तसाही वाळूमध्ये चालून चांगला भाजून निघालो होतो . त्यामुळे कधी एकदा मैया मध्ये स्नान करतो असे झाले होते . त्यामुळे मगरी आहेत हे माहिती असून देखील पाण्यामध्ये शिरलो . उथळ नर्मदा जल होते . त्यात उताणे झोपून राहिलो . इथे देखील काही अंतरावर वाळू काढायचं काम चालले होते . त्यामुळे मगरी इथे येणार नाहीत असा माझा अंदाज होता . परंतु दोनच दिवसापूर्वी इथे वाळू उपसणाऱ्या एका माणसाला मगर घेऊन गेली असे मला कोणीतरी सांगितले . याचा अर्थ मगरी कुठेही येऊ शकतात . त्यामुळे थोडेसेच स्नान करून तसाच ओला बाहेर आलो . गावातून गुरांना पाणी पाजण्यासाठी घेऊन येणारा एक गुराखी मला पाहून माझ्याकडे आला . आणि त्याने सांगितले की इथे वरती झाड दिसते आहे तिथे एक आश्रम आहे . नवीन आश्रमाचे बांधकाम सुरू आहे .परंतु सेवा सुरू आहे त्यामुळे तुम्ही जाऊन राहू शकता . मला अतिशय आनंद झाला ! ओली वस्त्रे बदलण्याची देखील तसदी न घेता मी तसाच वरती गेलो ! थोडासा मातीचा चढ चढल्यावर डाव्या हाताला एक छोटासा आश्रम बांधून झाला होता . एका मंदिराचे बांधकाम सुरू होते . आश्रमात सगळीकडे पायाला टोचेल अशी खडी पसरवण्यात आली होती . त्यामुळे चालताना त्रास होत होता . एका काठेवाडी साधूंचा हा आश्रम होता . कालिया पारा असे या पाड्याचे नाव होते .हद्द वेळूगामचीच होती . धनजीभाई महाराज असे या साधूंचे नाव होते . यांच्या स्वतःच्या तीन परिक्रमा झाल्या होत्या .त्यानंतर त्यांनी ठरवून जागा घेऊन इथे आश्रम बांधला होता . अंबाजी मातेचे मंदिर बांधण्यात येत होते . मी गेलो तेव्हा मंदिराचे बांधकाम सुरूच होते . मी देखील त्यांना विटा उचलून द्यायला मदत केली त्याबरोबर सर्वांनी मला सांगितले की तुम्ही सेवा करायची नाही .परिक्रमावासींना कोणीही शक्यतो जड काम करू देत नाहीत . मी आश्रमाच्या मागे जाऊन टाकीवर चिखलाने भरलेले कपडे धुतले आणि कोरडे कपडे घातले . शेंगदाणे जसे सुंदर पैकी भाजून निघतात तसे माझे पाय वाळूतून चालल्यामुळे भाजून निघाले होते . फोलकटे निघावीत तशी पायाची सालपटे निघत होती . थोडे दिवस चालून झाल्यावर पायांची संवेदना जवळपास मरते .आणि ते एका दृष्टीने चांगले देखील असते . मेंदूला सतत एकाच अवयवाकडून वेदनेचे सिग्नल येत असल्यामुळे तो ते सिग्नल ऐकायचे बंद करून टाकतो .आणि आपल्याला वाटते की पाय बधिर झाले . इथे एक गंमतच झाली ! पूर्वी वडफळी येथील कुलदीप कुलकर्णी यांच्या प्रकरणामध्ये मी आपल्याला सांगितले होते पहा की देव नदीच्या समोर दुसरा एक आश्रम आहे . डुमखल नावाच्या गावातील हा गिरनारी आश्रम अगदी देव गंगेच्या किनारीच आहे . माझे असे ठरले होते की कुलदीप कडे भोजन घेतले की देव गंगा पार करायची आणि या आश्रमामध्ये भेट द्यायची . परंतु गावगुंड थुंकल्याचे प्रकरण झाले आणि मी ठरवून महाराष्ट्राच्या हद्दीतून चालत राहिलो . त्यामुळे या आश्रमातील युवकांची भेट घ्यायची राहून गेली होती . योगायोग असा होता की आता जे बांधकाम करणारे युवक होते ते सर्व हाच आश्रम चालवणारे युवक होते आणि तो बंद करून ते इकडे बाबांच्या मदतीसाठी आले होते !ही सर्व मुले देखील काठीयावाड प्रांतातलीच होती .आणि परिक्रमेदरम्यान त्यांची बाबांशी ओळख झाली होती ! अशा रीतीने त्या मुलांना भेटण्याची माझी इच्छा मैय्याने पूर्ण केली !ती संपूर्ण रात्र या तरुणांशी मी भरपूर गप्पा मारल्या . त्यांच्या विभागातील तसेच या विभागातील सामाजिक घडामोडी आणि समाजविघातक शक्तींच्या नियोजनातून आढळणारे संभाव्य धोके या विषयावर आमची विस्तृत चर्चा झाली .इथे सेवा देखील हेच युवक करत असल्यामुळे त्यांना देखील माझी सेवा घडली आणि मला त्यांची भेट घडली ! मैयाचे नियोजन अचूक असते ! इथे अजून एक परिक्रमावासी मला भेटले . हे सागर या गावातील होते आणि यांची जलहरी परिक्रमा चालली होती त्यामुळे ते समुद्रकिनाऱ्यापर्यंत जाऊन परत अमरकंटक कडे निघाले होते . जलहरीक्रमेमध्ये जाताना सुटलेली तीर्थस्थाने येताना बरोबर सापडतात असे त्यांनी मला सांगितले . नर्मदा खंडामध्ये इतकी तीर्थस्थाने आहेत आणि इतकी मंदिरे आहेत व इतके मठ आहेत ,इतके आश्रम आहेत की कोणीही असा दावा करू शकत नाही की मी संपूर्ण नर्मदाखंड पाहिलेला आहे ! मग भले त्याच्या कितीही परिक्रमा होवोत !हे तुम्ही कुठल्याही परिक्रमा केलेल्या माणसाला विचारून पहा ! सर्वानुमते एकच उत्तर मिळेल ! प्रत्येक वेळेस काहीतरी नवीन सापडतेच असा सर्वांचा अनुभव आहे . नर्मदा माता नित्य नूतन आहे ! 
समर्थ रामदास स्वामी सांगतात 
नित्य नूतन धुंडावे । धुंडावे भक्त प्रेमळ ॥
नर्मदा मातेच्या अगदी काठावर हा आश्रम आहे .गिरनारी आश्रमातून होणारे मैयाचे दर्शन .
याच अंबाजी माता मंदिराचे बांधकाम मुले करत होती .
तत्पूर्वी त्यांनी हा आश्रम बाबांना विक्रमी वेळेमध्ये बांधून दिला होता . इथे शक्यतो सर्व बांधकामही लोक स्वतः करतात .
पावसाळ्यामध्ये वाहून जाणाऱ्या पाण्यामुळे किनाऱ्यावरची जमीन अशा प्रकारे खचत असते . आश्रमाची जमीन देखील अशीच खचत होती .किंबहुना अशा खचणाऱ्या  जमिनीच काही हुशार शेतकरी आश्रमाला कमी किमतीला विकत देतात किंवा दान करून टाकतात .
आश्रमामध्ये मस्तपैकी पार होता
बसण्याची ही व्यवस्था नवीन झालेली दिसत आहे . तेव्हा नव्हती .
बाबांनी आता या आश्रमामध्ये छान वृक्षारोपण करून त्याचे सौंदर्य वाढवले आहे
तीन नर्मदा परिक्रमा पूर्ण झालेले धनजीभाई महाराज काठीयावाडवाले .
याच व्हरांड्या मध्ये मी आसन लावले , भोजन घेतले आणि तरुणांशी गप्पा देखील मारल्या .

ती रात्र त्या उत्साही तरुणांच्या सोबत गप्पा मारत खूप छान गेली . कुलदीप ला माझा नमस्कार सांगा असा त्यांच्याजवळ मी निरोप दिला आणि भल्या पहाटे स्नान पूजा आटोपून निघालो . उजेड पडला होता . आणि पायाखालचा रस्ता दिसत होता . बाकी सकाळी लवकर वाळूचा उपसा थांबलेला असल्यामुळे अतिशय शांत वातावरण होते ! 
या भागातील नर्मद माई
अतिशय कठीण असा रस्ता आता सुरू झाला आणि वाळूचा काठ संपला . भावपूर्ण गावामध्ये विजय कृष्ण मंदिर आहे . इथे कठीण किनारा सुरू होतो . पाय सटकले की पाण्यामध्ये पडण्याची भीती असते .
भावपुरा गावातील महंत
इथे किनाऱ्याचा मार्ग असा उताराचा असल्यामुळे आणि पाऊल ठेवण्या पुरतीच जागा असल्यामुळे जपून चालावे लागते .
पाण्यामध्ये मगरी असल्यामुळे असे बाहेर स्नान करणे सोयीचे पडते .इथपासून नर्मदा मातेच्या पाण्याची चव थोडीशी खारट लागायला सुरुवात होते . मी स्वतः चाखून पाहिले .
भावपुरा हे गाव ओलांडून सरसाड या गावाच्या हद्दीमध्ये आलो . एक मोठी नदी आडवी आली .इथे समोरच्या ताटावर असलेला एक मनुष्य मला थांबा म्हणाला आणि दूरवरून नदीपार करून माझ्याकडे आला . मला शरीर भिजले तरी चालणार आहे हे कळल्यावर त्याने एका मार्गाने मला नदी पार करवली . या नदीला सुदैवाने कमी पाणी होते . परंतु चिखल खूप होता . अर्थात कमी म्हटले तरी साधारण छाती एवढे पाणी होते . मी त्या माणसाला विचारले की समोरूनच तू मला मार्ग का नाही दाखवलास ? त्याने सांगितले की रत्नसागराच्या भरतीचे पाणी या नदीमध्ये आत खोल वर शिरते . त्या काळात मगरींना खारे पाणी आवडत नसल्यामुळे त्या या नदीमध्ये शिरतात . आता सुद्धा या नदीमध्ये भरपूर मगरी आहेत . म्हणून मी तुमच्यासोबत आलो . नाहीतर एकटा मनुष्य बघितल्यावर मगरी लगेच हल्ला करतात ! मी त्या माणसाचे पाय धरले आणि मनापासून आभार मानले ! माझे भिजणे स्वाभाविक होते परंतु तो केवळ माझ्याकरता भिजत नदी पार करून इकडे आला . तेही जीवावर उदार होऊन ! कल्पना करून पहा की चुकून मगरीने त्याचा पाय पकडला असता तर ते त्याला केवढ्यात पडले असते ! परंतु त्याने असा कुठलाही स्वार्थी विचार न करता माझ्यासाठी आपला जीव धोक्यात घातला ! हा आहे नर्मदा खंड ! इथून पुढे किनाऱ्याने मार्ग नाही असे त्याने मला सांगितले .परंतु जेव्हा मी त्याला माझा निर्धार सांगितला तेव्हा त्याने मला 'बिनधास्त जा ! माणसापुरता रस्ता कुठेही मिळू शकतो "असे आश्वासन दिले ! त्याला नर्मदे हर करून मी पुढे निघालो . मी चालता चालता विचार करू लागलो की जर मी त्या माणसाच्या जागी असतो आणि मला माहिती असते की या पाण्यामध्ये भरपूर मगरी आहेत तर मी पलीकडे जाऊन त्या व्यक्तीला छाती एवढया पाण्यातून इकडे यायला मदत केली असती का ? विचार करून पहा ! नर्मदे हर !





लेखांक एकशे तीन समाप्त (क्रमशः )

टिप्पण्या

  1. aapan pls modiji hyanchya email id vr or twitter jithe yogya reply millel asha thikani message karun, hya dharmandh lok ani dargah masjid hyanch vaadhnara praman hya vr tyanch laksh vedhun ghyava. Devi Narmada aplyala yash deil. velich apan laksh nahi dile tr awghad ahe

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

जे आवडते सर्वांना ...

अनुक्रमणिका

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

लेखांक १ : नर्मदे हर !

लेखांक २ : भोपाळ जवळच्या जंगलातील अपघात

लेखांक ४ : झुठा कही का ! सबकुछ तो लाए हो !

लेखांक ३ : चोराची धन

लेखांक ५ : ग्वारीघाट जबलपुर मध्यप्रदेश

लेखांक ८३ : महाराष्ट्रात प्रवेश आणि भाबरीचे भेदक भिल्ल-महात्मा फोदला गारद्या पावरा

लेखांक ७४ : लेपा बांध , वेदा संगम , कठोरा अन् मांडव्य गुंफा

लेखांक ९० : गुजरात मधील कणजी चे सान्सुभाई तडवी आणि अरण्यव्याप्त माथासर