लेखांक १०२ : दगडूमहाराज प्रेरित अखंड रामनाम धून असणारे 'असा '
झाडीतून पाहताना नर्मदा माई मध्ये एका पुलाचे काम चालू असलेले दिसले . मोठे मोठे खांब उभे करण्यासाठी मातीचे भराव टाकण्यात आले होते . अर्धा प्रवाह अडवला होता त्यामुळे उरलेल्या जागेतून वेगाने पाणी वाहून चालले होते .अनैसर्गिकपणे गतिमानतेने वाहणाऱ्या पाण्यामुळे काठाने चालणे थोडेसे धोकादायक होते परंतु कठीण नव्हते . पूल नवीन असल्यामुळे डावीकडे कुठलाही रस्ताच नव्हता . भविष्यात तो तयार झाला असता . विजेचे मोठाले टॉवर्स इथे होते आणि वीज नर्मदा मैया च्या या काठावरून त्या काठावर पोहोचविण्यात आली होती. यानंतर मात्र फारच घनदाट झाडी सुरू झाली . या झाडीमध्ये मुख्यत्वे करून काटेरी वनस्पती होत्या . चालताना हाताला डोळ्यांना काटे टोचू पाहत होते . प्रत्येक पाऊल सावधपणे टाकत राम नामाचा आपोआप सुरू झालेला जप करत पुढे पुढे जात राहिलो .
दगडू महाराज रामनाम धून आश्रमापूर्वी प्रचंड झाडी होती . आपल्याला बांधकाम सुरू असलेला पूल आणि विजेचा टॉवर दिसत असेल .पाण्यात दिसणाऱ्या नावेच्या आकारावरून साधारण परिसराची कल्पना यावी .
वाटेत आलेला एक ओढा पार केल्यावर आश्रमाचे द्वार लागले . एखाद्या पौराणिक काळातील ऋषींचा आश्रम असावा अशी शांतता आणि असे वातावरण या आश्रमामध्ये होते ! भरपूर झाडी होती . कुठल्याही आश्रमामध्ये गेल्यावर सर्वप्रथम तिथल्या आराध्य दैवताचे दर्शन घ्यायचा प्रघात मी ठेवला होता . ते घेतल्या खेरीज निवासाची , भोजनाप्रसादाची वगैरे चौकशी सुद्धा मी करायचो नाही . आपला मुख्य हेतू दर्शन घेणे हाच आहे हे सदैव लक्षात ठेवावे . हा त्यानंतर तुम्हाला राहण्यासाठी कोणी विनंती केली तर सोन्याहून पिवळे . परंतु आधी राहण्याची चौकशी करणे आणि राहायला मिळाले तरच दर्शन घेणे हे काही योग्य नाही ! आपण परिक्रमेमध्ये आहोत हे प्रत्येक श्वासाला लक्षात ठेवावे ! आपले नेहमीचे स्वभाव , नेहमीचे वर्तन ,नेहमीच्या सवयी , नेहमीची कार्यपद्धती , नेहमीचा रुबाब ,नेहमीचा थाटमाट किंवा नेहमीच्या चुका इथे बाजूला ठेवून द्याव्यात . नर्मदा खंडातील नियम , नर्मदा खंडातील परंपरा , नर्मदा खंडातील चालीरीती ,नर्मदा खंडातील पद्धती यानेच चालावे हे उत्तम ! कधी कधी काही लोकांचे हे भान सुटत असल्याचे मला जाणवले म्हणून मुद्दाम हे नमूद करून ठेवले इतकेच .म्हणजे यात माझा देखील समावेश आहे बर का ! वेळोवेळी सावध करणारी माणसे मैया पाठवते म्हणून बरे आहे ! आश्रमाच्या मधोमध सुंदर असे शिवलिंगाकार मंदिर आहे आणि चौरस चौरस सभागृह असलेले नामस्मरण मंदिर आहे .थंडगार संगमरवराच्या फरशा सर्वत्र अंथरलेल्या असल्यामुळे मंदिर गार आहे . आत मध्ये चांगला औरस चौरस आडवा गाभारा आहे . मधोमध माईक लावून नामस्मरणासाठी बसण्याची सोय केलेली आहे . तुम्हाला नको असेल तर माईक शिवाय सुद्धा नाम घेता येते .माईक वर घेण्याचा फायदा इतकाच की परिसरातील लोकांचे देखील नाम चालू राहते . जो मुळातच 'मायीक ' आहे त्याचा याहून चांगला वापर तो काय असणार ! जे नाही ते आहे असे वाटणे म्हणजे माया . या मा सा माया । अशी तिची व्याख्या आहे . या म्हणजे जी , मा म्हणजे नाही ,सा म्हणजे ती , तीच खरी माया . माईक मुळे तुम्हाला अतिशय लहान असलेला आवाज कितीतरी पटीने मोठा आहे असा भास निर्माण होतो म्हणून तो माईक मायीक आहे ! अगदी तुमच्या हातातल्या स्मार्टफोन इतका नसला तरी आहे खरा !सध्याच्या युगामध्ये प्रत्येकाच्या हातामध्ये असलेला स्मार्टफोन हा खरा मायेचा बाजार आहे बघा ! जे तुमच्यासमोर नाही ते तुमच्यासमोर आहे असा आभास तो उभा करू शकतो ! जी व्यक्ती तुमच्या परिसरातच नाही तिच्याशी तुम्ही बोलू शकता भावना व्यक्त करू शकता !समोरच्या व्यक्तीचा अन्नमय कोश सोडला तर अन्य प्रत्येक कोशावर काम करू शकता ! म्हणून त्याचा वापर कसा करायचा हे आपल्या हातात आहे . हे दुधारी शस्त्र आहे . याच्यावर आपण आपल्या षडरिपूंना चाळविणारे काम देखील करू शकता . किंवा मानस परिक्रमा देखील ! The ball is in your court !
मंदिर परिसराचे दर्शन घेऊयात !
हेच ते संत शिरोमणी श्री दगडू महाराज यांनी १९९३ साली सुरत येथे देह ठेवला आणि याच ठिकाणी त्यांना जलसमाधी देण्यात आली .
माणसाने आयुष्यामध्ये जाईल तिथे झाडे लावावीत . जिथे झाडे अधिक आहेत तो परिसर जास्त रम्य वाटतो . जिथे झाडे अजिबात नाहीत तिथे एक क्षणभर देखील थांबावेस वाटत नाही या स्वतःच्या अनुभवावरून आपण शिकावे ! आपल्या शहरांमध्ये देखील पहा . जिथे झाडे अधिक आहेत अशा भागातील घरांचे दर जास्त असतात .
परिसरामध्ये सुंदर असा संत निवास बांधलेला आहे ! अनेक संत चातुर्मासासाठी इथे येऊन राहतात . त्यांची अतिशय उत्तम अशी सोय ठेवली जाते .
गोशाळेच्या वरती पत्रे टाकलेली जी इंग्रजी एल आकाराची खोली आहे तिथे परिक्रमा वासी उतरतात . यांची देखील चांगली सोय ठेवलेली आहे .अलीकडे एका खांबावर उभे असलेले जे बांधकाम दिसत आहे तिथे पक्षांना आणि वानरांना खायला घातले जाते !
अतिशय सुंदर अशा त्या आश्रमामध्ये मी गोशाळेच्या वर आसन लावले . इथे आधीच पाच-सहा परिक्रमावासी आलेले होते . माझ्या उपजत आवडीनुसार मी कुठल्याही नवीन ठिकाणी गेलो की सर्वप्रथम आजूबाजूला जमलेल्या लोकांच्या ओळखी करून घेत असे . वाणी ही माणसाला मिळालेली एक अद्भुत देणगी आहे . या विश्वातील अन्य प्राणी एकमेकांशी चटकन ओळख करून घेऊ शकत नाहीत . त्यांना त्यासाठी काही दिवस एकत्र राहावे लागते . मग निरीक्षणातून ते समोरचा प्राणी कसा आहे ते ठरवितात आणि त्यानंतर ओळख वाढवितात . माणसाचे मात्र तसे नसून आपण संवादातून समोरची व्यक्ती कशी आहे ते कमीत कमी वेळामध्ये ताडू शकतो . आपला स्वतःचा अनुभव हा आपल्या वया इतका असतो परंतु आपण जितक्या अधिक लोकांशी संवाद साधू तितका आपला अनुभव व्यापक होत जातो . कारण प्रत्येकाला आलेला अनुभव आपल्याला माहिती होत जातो . उदाहरणार्थ एखाद्या माणसाने एखाद्या ठिकाणी असलेला धोका अनुभवला असेल तर तुम्हाला पुन्हा तुमच्या आयुष्यात तिथे जाऊन तो धोका अनुभवण्याची गरज उरत . केवळ त्या माणसाची ओळख झाल्यामुळे तुमचा तो धोका टाळलेला असतो . म्हणूनच बहुश्रुत असणे याला आपल्या शास्त्रांमध्ये खूप महत्त्व दिलेले आहे . श्रुत या शब्दांमध्ये श्रव धातू आहे . म्हणजे ऐकणे . अनेकांशी बोलणारा मनुष्य असा इथे अर्थ अभिप्रेत नसून अनेकांचे ऐकणारा असा अर्थ अभिप्रेत आहे . अनेकांशी बोलणारा बोल घेवडा म्हणून ओळखला जातो . परंतु अनेकांचे ऐकणारा बहुश्रुत ठरतो . अशा अर्थाने नर्मदा परिक्रमा तुम्हाला फारच समृद्ध करते . या पाच सहा परिक्रमावासींचे अनुभव ऐकल्यानंतर मी माझा मोर्चा संत निवासाकडे वळवला . इथे ओळीने संत मंडळी आपापल्या उपासनेमध्ये किंवा नित्यक्रमामध्ये गढलेली मला दिसली . संत मंडळी कदाचित सर्वसामान्य माणसांना फारसा भाव देतही नसतील परंतु एखादा परिक्रमावासी आला तर मात्र अतिशय प्रेमाने आणि कौतुकाने ते बोलतात असा माझा सरसकट अनुभव आहे . बहुतेकांनी त्यांच्या आयुष्यात कधीतरी परिक्रमा केलेली असते . आणि परिक्रमेमध्ये मिळणाऱ्या संत समागमाचे महात्म्य त्यांना माहिती असते . त्यामुळे अशी संत मंडळी आपल्याला आवर्जून काही ना काही उपदेश करतातच ! असे संत आपल्याला भेटले की आपल्या कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल किंवा आपल्या व्यवसायाबद्दल किंवा आपल्या परिक्रमा सोडून असलेल्या आयुष्याबद्दल एकही वाक्य बोलू नये . त्याचा फायदा काहीच होत नसतो . खरा साधू तुम्हाला पाहता क्षणी तुमची पात्रता ओळखत असतो . आपण आपल्या सोबत आपल्या स्वतःचा एक 'ऑरा ' अर्थात तेजोवलय घेऊन चालत असतो . ते प्रत्येक व्यक्तीला त्याच्या त्याच्या योग्यतेनुसार विविध प्रकारे जाणवते . काहींना केवळ त्याचे अस्तित्व जाणवते . काहींना ते डोळ्याने दिसते . काहींना त्याचे विविध प्रकारचे वास येतात . काहींना ते स्पर्शाने जाणवते . मी महाविद्यालयात शिकत असताना डॉक्टर शुक्ला नावाचे एक शास्त्रज्ञ माझ्या गुरुदेवांकडे आले होते . त्यांनी माणसाचे तेजोवलय पकडू शकेल असा एक कॅमेरा अमेरिकेतून आणला होता . त्या काळात त्याची किंमत १४ लाख रुपये होती . पुण्यामध्ये असलेल्या एमआयटी या संस्थेमध्ये त्यांनी हा कॅमेरा ठेवला होता आणि त्याच्या प्रारंभिक चाचण्या सुरू होत्या . त्यांना स्वामींच्या तेजोवलयाचा फोटो काढायचा होता . त्यासाठी ते आले होते . बहुचक स्वभावामुळे ते बाहेर पडल्यावर मी त्यांना गाठले आणि माझा पण फोटो काढाल का असे त्यांना विचारले होते ! त्यांनी देखील कौतुकाने मला फोटो काढण्यासाठी बोलावले . त्यावेळी माझ्या तेजवालयाचा फोटो मी आयुष्यात पहिल्यांदा पाहिला होता ! अर्थात असे काहीतरी तेजोवलय आपल्या भोवती असते हे शास्त्राने देखील आता मान्य केलेले आहे . जे मोठे मोठे लोक असतात त्यांचे तेजोवलय कित्येक किलोमीटर पर्यंत पसरणारे असते . मी स्वतः अनुभवलेले काही असे लोक सांगतो की ज्यांचे वलय तुम्हाला लगेच जाणवते . भिडे गुरुजी , डॉक्टर अब्दुल कलाम , डॉक्टर स्वामीनाथन , नरेंद्र मोदी , बाळासाहेब ठाकरे , राज ठाकरे , लता मंगेशकर , सचिन तेंडुलकर , पु ल देशपांडे , पंडित भीमसेन जोशी ,श्री श्री रविशंकर , जनरल मनोज नरवणे ,मोहन भागवत जी . . .यादी खूप वाढत जाईल . परंतु हे असे लोक आहेत जे जवळ आल्याबरोबर काहीतरी वेगळे ऊर्जावलय मला जाणवले आहे . असे लोक सभेमध्ये जेव्हा प्रवेश करतात तेव्हा ऊर्जा जाणवल्यामुळे लोक अचानक ओरडू लागतात पहा! तुम्ही या व्यक्तींचे समर्थक असाल किंवा विरोधक असाल परंतु दोघांनाही ते वलय जाणवते . सांगायचे तात्पर्य इतकेच की आपल्याला देखील असे वलय जाणवत असते परंतु आपण त्याकडे बारकाईने लक्ष देत नाही . साधुसंतांना देखील तुम्ही काहीही न बोलता तुमचे वलय दिसत असते . त्यानुसार तुम्हाला ते मार्गदर्शन करत असतात . राज ठाकरे हे उत्तम उदाहरण आहे पहा . लोक यांना फारशी मते देत नाहीत परंतु त्यांच्याकडे जन्मजात वलय असल्यामुळे सभेला मात्र हटकून गर्दी करतात . मी वरील यादीमध्ये संतांची नावे फारशी घेतलेली नाहीत कारण प्रत्येकच संताच्या भोवती असे वलय मला अनुभवता आलेले आहे . कुठल्याही साधू संन्यासी तपस्वी च्या जवळ गेल्यावर सर्वांनाच हा अनुभव येतो . त्यांनी आपल्या साधनेने आपली ऊर्जा आणि वलयाचे विस्तार क्षेत्र वाढवत नेलेले असते . इथे देखील अखंड नामस्मरण चालू असल्यामुळे एक जबरदस्त नाममय वातावरण निर्माण झाले होते ज्यामुळे संध्याकाळी येताना माझे आपोआप नाम सुरू झाले ! मी इथले मुख्य व्यवस्थापक व्ही व्ही कापडी काका यांच्याशी देखील खूप गप्पा मारल्या . हे मूळचे बडोद्याचे होते आणि निवृत्तीनंतर आश्रम सांभाळण्याकरता इथे आले होते . इथे त्यांच्याबरोबर चर्चा करताना एका गंभीर विषयाचे चिंतन घडले . आपल्यासोबत ते बोलावे असे मला फार वाटते . कारण हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे . विषय असा आहे की निवृत्त कधी व्हायचे आणि निवृत्तीनंतर काय करायचे ! आपल्या वाचकांची एकूण जी संख्या आहे त्यातील किती वाचक कुठल्या वयोगटातील आहेत हे दाखवण्याची सोय गुगलमध्ये आहे . हे वाचन करणारे बहुतांश लोक ३५ ते ७५ या वयोगटातील आहेत . साधारण ३५ ते ४५ या वयोगटातील लोक सर्वाधिक क्रियाशील असतात . दिवस रात्र मेहनत करून कष्ट करून पैसे कमविणे आणि आपला संसार चालविणे हे यांचे मुख्य काम सुरू असते . हे करण्याच्या नादात कदाचित त्यांना मनापासून करायच्या काही गोष्टी करावयाच्या राहूनच जातात आणि हे त्यांनी स्वीकारलेले असते . कारण आपल्या कर्तव्याला अधिक प्राधान्य ते देत असतात . यापुढील वयोगट म्हणजे ४५ ते ५५ हा तर प्रमाणाबाहेर काबाडकष्ट करत असतो . कारण मुले मोठी झालेली असतात .त्यांच्या शिक्षणाचे वगैरे खर्च वाढलेले असतात आणि सर्वच बाबतीत तरुणपणी मिळणारा आनंद कमी झालेला असतो . त्यामुळे कामात रमणे हे त्यांना श्रेयस्कर वाटत असते . ५५ ते ६५ या वयोगटामध्ये भारतामध्ये सरासरी सर्व लोक निवृत्त होतात . ज्या मुलांसाठी सर्व केलेले असते ती एकतर बाहेर गावी गेलेली असतात किंवा परदेशामध्ये गेलेली असतात किंवा आपापल्या संसारामध्ये मश्गुल झालेली असतात त्यामुळे अचानक काम थांबल्यावर आता करायचे काय असा प्रश्न यांच्यापुढे आ वासून उभा असतो . अशाच काळात नवीन ठिकाणी राहायला गेल्यामुळे झालेल्या नवीन ओळखी मग वाढू लागतात आणि त्यातून वेळ घालवण्याची नवीन नवीन साधने अशी मंडळी शोधू लागतात . हे सर्व मी सरासरी निरीक्षण नोंदवतो आहे . प्रत्येकाचे आयुष्य असे असेलच असे नाही .परंतु थोड्याफार फरकाने सर्वसामान्य मनुष्याचे आयुष्य असे असते असे पाहायला मिळाले आहे . ६५ ते ७५ या काळात मात्र आयुष्यभर व्यायामाला फाटा दिल्यामुळे एक एक करून व्याधी मनुष्याला गाठू लागतात आणि मग हा सर्व कालावधी आजारपणातच बव्हंशी व्यतीत होतो . आयुष्यभर साधनेची सवय नसल्यामुळे अचानक या काळामध्ये नामजपाला बसणे किंवा ध्यानाला बसणे किंवा अन्य काही उपासना करणे शक्य होत नाही . हे चार वेगवेगळे टप्पे आपण केलेले असले तरी प्रत्येक टप्प्यातील मनुष्य कधी ना कधी पुढच्या टप्प्यामधून जाणार आहे हे सुनिश्चित आहे . परंतु आधीच्या टप्प्यावर असताना त्याला असे अजिबात वाटत नाही की आपण देखील कधीतरी पुढच्या टप्प्यामध्ये आलेले असू ! जसे मृत्यू हे सर्वात शाश्वत सत्य असताना जगातील प्रत्येकाला असे वाटत असते की मी कधीच मरणार नाही ! तसेच हे असते . मग जर आपले देखील आयुष्य याच टप्प्यांमधून आणि थोड्याफार फरकाने असेच व्यतीत होणार असेल तर आपण पुढच्या काळाची तयारी थोडीशी आधीच करून ठेवली तर काय हरकत आहे ! म्हातारपण सुकर व्हावे म्हणून आतापासूनच थोडासा व्यायाम केला तर काय फरक पडतो ! वृद्धापकाळी जपा ला बसण्यासाठी आसन जय व्हावा म्हणून आतापासूनच दिवसाला दहा-पंधरा मिनिटे किंवा एखादी माळ जप केला तर काय फरक पडतो ! मुले बाळे आज ना उद्या त्यांच्या त्यांच्या आयुष्यामध्ये रममाण होणार आहेत हे गृहीत धरून आतापासूनच जर थोडीशी भावनिक गुंतागुंत कमी करून ठेवली तर त्याने असे कोणते मोठे आभार कोसळणार आहे ! आज ना उद्या आपली विश्वासू म्हणून वाढविलेली मुलेबाळे आपल्याला एकटे सोडून जाणार असतील तर आतापासूनच एखाद्या सुंदर अशा आश्रमामध्ये जाऊन सेवा करून तिथे मिळणारा निर्व्याज सेवेचा आनंद उपभोगायला काय हरकत आहे ! म्हातारपणी अशा आश्रमामध्ये तुम्ही दाखल झालात की तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला असतो .परंतु तरुणपणापासून तुम्ही जर अशा एखाद्या आश्रमाशी , संस्थेशी बांधले गेलेले असाल तर मात्र तुमच्याकडे अतिशय आदराने आणि विश्वासाने पाहिले जाते , हे स्वाभाविक आहे . अजूनही वेळ गेलेली नाही . वार्धक्य हे प्रत्येकाला आज ना उद्या येणारच आहे . जे तरुण आहेत त्यांनी आपण म्हातारपणी कुठे व कसे असू अशी कल्पना करून पहा . जे मुळात वृद्ध आहेत त्यांनी आपण तरुणपणी कधी असा विचार करत होतो का हे आठवून पहा ! वृद्धांनी त्यांच्या आयुष्यातील अनुभवाचा वापर करून तरुणांना योग्य तो सल्ला दिलाच पाहिजे !तरुणांनी त्यांच्या क्रयशक्तीचा आणि देह शक्तीचा वापर करून वयोवृद्ध लोकांना आधार दिलाच पाहिजे . कारण सर्वांवर हीच वेळ येणार आहे हे शाश्वत सत्य आहे ! त्यावेळी अचानक काहीतरी करावे लागणे त्रासदायक होऊ नये म्हणून आतापासूनच थोडे थोडे साधन करण्याची सवय लावणे इष्ट आहे . रिकामा वेळ म्हाताऱ्या मनुष्याला खायला उठतो . आयुष्यभरातील स्मृती त्रास देऊ लागतात . अशावेळी त्या सर्वांवर एकमेव सोपा आणि जालीम उपाय म्हणजे अखंड नामस्मरण होय ! काही लोक नामाची उपेक्षा करतात .त्यांचे असे म्हणणे असते की नुसते एखाद्या गोष्टीचे नाव घेऊन काय होणार आहे . परंतु नाम हा केवळ शब्द नसून तो मंत्र आहे हे लक्षात ठेवावे . विशिष्ट स्वराच्या आणि व्यंजनाच्या उच्चारामुळे शरीराच्या विविध भागांवर होणारे परिणाम आता विज्ञानाने देखील मान्य केलेले आहेत . एक साधा प्रयोग सांगतो . हे वाचता वाचताच आपल्या डोक्यावर हात ठेवा . आता प फ ब भ म्हणा . हाताला किती स्पंदने जाणवतात ते पहा . आणि आता डोक्यावर हात ठेवूनच र चा उच्चार करा . किंवा चक्क अर्रर्रर्र म्हणा . काही वेगळे जाणवते का ? आता हृदयावर हात ठेवा . आणि ह चा उच्चार करून बघा . हृदयामध्ये स्पंदने जाणवतात ना ? प्रत्येक स्वराचे व्यंजनाचे उत्पत्ती स्थान आहे . ते ठरलेले आहे . कंठ्य , तालव्य , ओष्ठ्य , दंत्य ,दंतोष्ठ्य ,मूर्ध्न्य ,असे विविध उत्पत्ती स्थान असलेले हे सर्व वर्ण आहेत . त्यानुसार प्रत्येक अक्षराचा परिणाम शरीराच्या विविध भागांवर होतो . विठ्ठल विठ्ठल म्हटल्यामुळे हृदयांत येणारी स्पंदने आपण सर्वांनी छातीवर हात ठेवून अनुभवली असतील . टाळ्या वाजवण्यामुळे हातातील विविध बिंदू उद्दीपित झाल्याचे आपण सहज अनुभवू शकतो . त्यामुळे नामाकडे केवळ एक शब्द म्हणून न पाहता मंत्र म्हणून पहावे . एखाद्या पाणक्याने सांगितले की शंभर फुटावर पाणी लागणार आहे , आणि दहा जणांनी एका एका बाजूला जाऊन दहा दहा फूट खोल खड्डे काढले तर पाणी लागेल काय ? त्यासाठी सर्वांनी मिळून एकाच ठिकाणी शंभर फूट खाणे आवश्यक आहे . अगदी त्याच पद्धतीने अनेक दिवशी अनेक देवांची नावे घेऊन साक्षात्कार का होत नाही असा विचार करण्यापेक्षा एकाच ठिकाणी बसून एकाच दिवशी अखंड नामस्मरण करावे ! अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही ! याच भावनेतून दगडू महाराजांनी हे अखंड नाम धून स्थळ चालू केले . याला संगीताची जोड असल्यामुळे मला खूप आनंद मिळाला ! एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा केल्यामुळे होणारा परिणाम हा अधिक खोल असतो . थेंबे थेंबे तळे साचे . तरुणपणापासून अशाप्रकारे नाम घेण्याची किंवा काही साधन करण्याची आवड निर्माण झाली की म्हातारपणी त्याचा कमीत कमी त्रास होतो . तरी आपण अजून पंचाहत्तरी च्या पुढच्या लोकांची चर्चा च केलेली नाही ! फार क्वचित एखादा अपवाद असतो की जो अगदी शंभरीच्या घरात गेला तरी देखील आपले जीवनमान टिकवून ठेवू शकतो . माझ्या वडिलांचे आते भाऊ आहेत ज्यांचे वय आता ९५ वर्षे आहे . आपल्या यूट्यूब चैनल वर जे ऑडिओ मी टाकत आहे ते खरे तर यांना ऐकवण्यासाठी मी रेकॉर्ड करत होतो .अतिशय प्रथित यश असे ते चित्रकार आहेत . काही कारणामुळे उतार वयात दृष्टी हरपली असली तरी देखील अजूनही ते केवळ अंदाजाने चित्र काढतात ! त्यांच्या जीवनशैलीमध्ये गेली अनेक वर्षे जरासाही फरक पडलेला नाही हे मी स्वतः अनुभवलेले आहे . त्यांना आयुष्याचे वर्म उमगलेले आहे . इस जिंदगी मे अपना कुछ भी नही । जो कुछ है सब उसी का है । हे तत्त्वज्ञान मानणाऱ्या काकांनी त्यांच्या घराचे नावच 'उसीका ' ठेवलेले आहे ! परंतु असे सुदृढ दीर्घायुष्य प्रत्येकाला मिळेलच याची काही खात्री देता येत नाही . उसीका आणि मेरा यात फरक तर राहणारच ना ! म्हणून आपण आपले आतापासूनच भविष्याची तयारी करून ठेवावी ! लोक जसे भविष्यामध्ये कामाला येईल म्हणून दरमहा काही रक्कम बाजूला काढून ठेवतात तसे आपण भविष्यामध्ये भरपूर वेळ बसता यावे म्हणून आतापासून थोडे थोडे बसायची सवय लावावी हे श्रेयस्कर ! मी इथल्या मुक्कामामध्ये नामानंदाचा पुरेपूर आनंद लुटला ! अखंड नामस्मरण चालते अशा ठिकाणी बरेचदा तुम्हाला तीच तीच माणसे नाम घेताना दिसतात . मी गंमत म्हणून तिथे लिहिलेल्या वह्या चाळायचो तेव्हा लक्षात यायचे की ठराविक माणसेच सर्व नामस्मरण ओढून नेत आहेत . त्यामुळे अशाप्रसंगी कोणी बाहेरचा नामधारक आला तर सर्वांना हायसे वाटते ! आमच्या घरी देखील वर्षातून एकदा २४ तास अखंड स्वामी समर्थ नामस्मरण आणि चैतन्य जप संकुल या उपक्रमातील २५ तास अखंड रामनाम जप असे उपक्रम होत असतात . त्यावेळी मी जे निरीक्षण केले तेच इथे परिक्रमेतील रामनामाच्या ठिकाणी देखील लागू होत होते . नामस्मरण भक्तीचे महत्त्व कळण्यासाठी दासबोधातील नामस्मरण भक्ती समास प्रत्येकाने आवर्जून वाचावा . खूप सुंदर आहे . घरी दासबोध नसेल तर www.dasbodh.com या संकेतस्थळावर तो वाचता येईल .नामे होय उत्तम गती । अंतकाळी ॥ हे या समासाचे सार आहे .
या आश्रमामध्ये उत्तम भोजन प्रसादी मिळाली . ताटवाट्या देखील इथूनच घ्यायचे होते . अशी व्यवस्था थोड्या आश्रमांमध्ये असते . व्यवस्थापक कापडी काका अतिशय शिस्तबद्ध होते . त्यांनी वहीमध्ये सही करून तारीख टाकून दिली .
हा माझा मुक्कामाचा ८६ वा दिवस होता . दिनांक होता २८ .मार्च २०२२ . हा जगडीया नावाचा तालुका होता आणि भरूच जिल्हा आता सुरू झाला होता .
रात्री पुन्हा एकदा चंदन आणि अन्य परिक्रमा वासी यांच्याशी गप्पा मारत पाठ टेकली . इथे माझ्याकडून एक घोर चूक झाली . संगतीचा परिणामच तो . मला एक चार-पाच परिक्रमावासींचा गट भेटला होता त्यांनी सांगितले की ते दररोज भल्या पहाटे चालायला सुरुवात करतात आणि अंधार पडला तरी थोडेसे चालतात . त्यामुळे त्यांचे अंतर खूप चालून होते आणि परिक्रमेला चांगली गती येते . मला उगाचच असे वाटले की आपणही यांच्याप्रमाणे एक दिवस करून पहावे ! कारण तसेही मी समुद्र किनाऱ्यावर पोहोचेपर्यंत नावा बंद होतील अशी भीती मला सतत वाटेतील लोक घालत होते . हे सर्व लोक भल्या पहाटे उठले आणि चार वाजताच निघून गेले . माझी तळमळ तळमळ होत होती . जावे की न जावे काय करावे अशा विवंचनेमध्ये मी पडलो होतो . अखेरीस पहाटे पाचच्या सुमाराला माझा निश्चय पक्का झाला आणि मी देखील झोळी उचलली ! अंधारातूनच पुढचा मार्ग धरला . इतक्या अंधारामध्ये मैयाच्या काठावरून चालता येणे अशक्य असते हे मला माहिती होते . त्यामुळे थोडेसे गावातून बाहेर पडावे असा विचार मी केला . पुढे काय वाढून ठेवले आहे याची मला पुसटशी देखील कल्पना नव्हती . प्रथमच मी परिक्रमेचा नियम तोडून असे अंधारात निघालो होतो . म्हणजे यापूर्वी एकदा मंडला जिल्ह्यामध्ये मी हा प्रताप केला होता . परंतु तेव्हा थोडे तरी दिसत होते . आज पूर्ण अंधार होता . आश्रमाच्या बाहेर मी पडलो आणि साधारण शंभर पावले चाललो असेन . समोर गावातील घरे वस्ती दिसत होती . तिथे थोडेफार दिवे होते . बाकी सगळा अंधार होता . मी असा विचार करत होतो की असेच अंधारात पुढे चालावे की परत फिरून आश्रमात थांबावे ?आणि उजाडल्यावर पुढे जावे ? असा विचार करत मी एका जागी थांबलो आणि अचानक मला माझ्या चहुबाजूने हालचाल जाणवू लागली . माझ्या पोटरीला काहीतरी ओले लागत आहे असे वाटले . म्हणून पाहिले तर एक गावठी कुत्रे माझ्या पायाचा चावा घ्यायचा प्रयत्न करत होते ! मी जोरात पाय झटकला ! त्याबरोबर माझ्या आजूबाजूला जमलेल्या सुमारे १२ ते १५ कुत्र्यांनी अचानक माझ्यावर भुंकायला सुरुवात केली ! अंधारामध्ये मला फक्त त्यांचे चमकणारे दात दिसत होते ! कुत्र्यांची संख्या इतकी होती की मला परत मागे फिरता येणे शक्य नव्हते ! मी हतबुद्ध झालो ! आता ही कुत्री आपल्याला फाडून खाणार असे मला वाटू लागले ! त्यांचा आवेश इतका जबरदस्त होता आणि ती सर्वजण माझ्या अंगावर येऊन चावण्याचा इतका प्रयत्न करत होती की विचारू नका ! सुदैवाने दंड हातात असल्यामुळे मी जवळ आलेल्या कुत्र्याच्या दिशेने दंड दाखवत होतो . परंतु यांची संख्या भरपूर असल्यामुळे आता ही मला फाडणार हे निश्चित झाले होते ! अंधुक उजेड पडू लागला होता . मला फक्त एवढेच कळत होते की भरपूर कुत्री सर्व दिशेने मला चावायला धाव घेत आहेत ! मी आरडाओरडा चालू केला परंतु कुत्र्यांच्या आवाजात तो विरून जात होता . अखेरीस सिलंबम मधील विच करायला मी सुरुवात केली . अर्थात अतिशय वेगाने काठी गोल फिरवायला सुरुवात केली . परंतु माझ्या गती पेक्षा कुत्र्यांची जवळ येण्याची गती अधिक होती . काठी ज्या दिशेला गेली आहे त्याच्या विरुद्ध दिशेचे कुत्रे माझ्या पायाला चावायला बघायचे ! आजूबाजूला खड्डे आहेत का रस्ता आहे मला काहीही दिसत नव्हते त्यामुळे चुकून माकून मी पडलो तर यांनी माझ्या नरडीचा घोट निश्चितपणे घेतला असता ! मी हळूहळू गावाच्या दिशेने चालू लागलो आणि कुत्री हाकलत राहिलो . परंतु काठी फिरवून मला दम लागायला सुरुवात झाली . एक क्षण निश्चितपणे असा येणार होता की ज्या क्षणी मी काठी फिरवायचा थांबणार होतो इतका थकवा मला येणार होता आणि त्या क्षणी ही सर्व कुत्री माझा फडशा पाडणार होती . केवळ माझ्या हद्दीतून बाहेर जा म्हणून भुंकणारी कुत्री वेगळी असतात . परंतु नर्मदे काठी शिकार करून खाणाऱ्या कुत्र्यांच्या अशा टोळ्या फिरतात . त्यातली ही एक मोठी टोळी होती . त्यामुळे ते माझ्याकडे सावज म्हणूनच पाहत होते . मला अक्षरशः घाम फुटला . आता या प्रसंगातून बाहेर कसे यावे तेच कळेना ! अखेरीस एका घराच्या जवळ मी आलो . कुत्री सर्व दिशांनी माझ्यावर हल्ला करत होती . मी असा विचार केला की आपण जर भिंतीला खेटलो तर किमान अर्धी बाजू तरी सुरक्षित राहील आणि केवळ १८० कोनामध्येच मध्येच कुत्र्यांना हाकलावे लागेल . परंतु झाले उलटेच !सगळी कुत्री माझ्यासमोर आल्यामुळे त्यांची शक्ती कैकपटीने वाढली आणि मागे भिंत असल्यामुळे मला काठी फिरविण्यावर मर्यादा येऊ लागल्या ! मला वाटले की आता खेळ संपला ! मी फक्त हात वर करायचा अवकाश होता आणि या कुत्र्यांनी चावून चावून माझा जीव घेतला असता . सुदैवाने अजून तरी एकही कुत्रे मला चावू शकले नव्हते . केवळ माझ्या पायाला त्यांची ओली नाके घासत होती . त्यांचा जोर आता वाढू लागला . एक क्षणही मला श्वास घ्यायला ते उसंत देत नव्हते . मी हतबुद्ध झालो . हतबल झालो . आणि बेंबीच्या देठापासून ओरडलो "नर्मदे ह sss र ! " .इतक्यात एक मोठा लोखंडी नळावरून माझ्यासमोर पडला . तो चार-पाच कुत्र्यांना लागला सुद्धा . आणि जोरात केकाटक सर्व कुत्री लांब पळाली . एक घरगुती गाऊन घातलेली महिला माझ्या आणि कुत्र्यांच्या मध्ये येऊन उभी राहिली . तिने खाली वाकून दगड उचलून फेकले त्याबरोबर कुत्री पळून गेली . शेजारी तिचा पती आणि तिची मुलगी असे दोघे देखील दगड उगारून उभे असलेले मला दिसले ! मी अक्षरशः त्या तिघांचे पाय धरले ! त्यांनी मला पटकन त्यांच्या घरात घेऊन दरवाजा बंद केला . आणि पिण्यासाठी पाणी आणून दिले . चहा टाकला .त्या मातारामने मला विचारले इतक्या अंधारात कुठे निघाला होतात बाबाजी ? मी लहान मुलासारखा रडू लागलो . आणि सांगितले की मैया माझी चूक झाली . पुन्हा असा आगाऊपणा मी करणार नाही . परिक्रमेच्या नियमानुसार सूर्योदय झाल्याशिवाय आश्रम सोडायचा नसतो . परंतु माझ्या आधी गेलेल्या परिक्रमावासींच्या नादाला लागून मी आज लवकर बाहेर पडलो आणि हा प्रसंग ओढावला . त्या बाईने मला सांगितले की ही कुत्री रोजच कोणा ना कोणावर हल्ला करतात . गावातली दुसरी कुत्री ,डुकरे ,शेळ्या हे त्यांचे भक्ष्य असते .त्यामुळे यांच्या भुंकण्याकडे कोणी लक्ष देत नाही . परंतु त्या भुंकण्यामध्ये 'नर्मदे हर ' असा आवाज आल्यामुळे हे तिघेही धावतच बाहेर आले ! त्यांच्या लक्षात आले की कुठलातरी परिक्रमा वासी संकटात आहे ! नर्मदे हर म्हटल्याबरोबर या मातेच्या रूपाने येऊन नर्मदा मातेने माझे संकट हरण केले . जोपर्यंत आपण परमेश्वराचा धावा करत नाही तोपर्यंत परमेश्वर आपल्याला वाचवायला येत नाही हे नर्मदा परिक्रमा आपल्याला शिकवते . दिवस-रात्र नामस्मरण करून सुद्धा पहाटे उठल्यावर मला तिची आठवण राहिली नव्हती इतकी तर आपली स्मृती हलकी असते ! माझ्यामध्ये आणि त्या चवताळलेल्या कुत्र्यांच्या मध्ये भिंत बनून उभी असलेली ती रणरागिणी मला साक्षात नर्मदा मैयाच वाटली नसती तरच नवल ! या प्रकारामुळे मला तीव्र श्वास लागला . आणि हृदयाची धडधड काही केल्या कमीच होईना . मी विचारले की इथे आसपास कुठे मेडिकल आहे का ? त्यांनी मला सांगितले की राजपिपला हे तालुक्याचे ठिकाण आणि राजबर्डी नावाचे मोठे गाव वगळता या संपूर्ण पंचक्रोशी मध्ये एकही मेडिकल स्टोअर नाही ! किती भाग्यवान गावे आहेत पहा ! इथे कोणी आजारीच पडत नाही ! काही काळ शांत बसून राहणे हा एकमेव उपाय माझ्याकडे होता . परंतु परिक्रमेमध्ये असे कोणाच्या घरामध्ये थांबणे योग्य नसते . म्हणून मी उजाडल्यावर त्यांचा निरोप घेतला आणि पुढे चालू लागलो . पुढे पानेथा नावाचे एक गाव लागते . तिथपर्यंत मी रस्त्याने चालत गेलो . कारण काठावरून जाताना या कुत्र्यांच्या टोळक्याने मला पुन्हा गाठले असते अशी भीती मला वाटत होती . माझ्या मागे पुढे कोणीच परिक्रमा वासी नव्हते .गावात आल्यावर एका बस थांब्यावर मी शांत पडून राहिलो . लागलेला दम बरा करणे आवश्यक होते . बराच वेळ झाल्यावर हळूहळू माझा श्वास मूळ पदावर आला . अशाप्रसंगी आपल्याला जोराने श्वास घेता यावा म्हणून शरीर जोरदार रक्तपुरवठा फुफुसांच्या दिशेने करते . अचानक आलेल्या या रक्तामुळे फुफुसाच्या श्वास नलिकांना सूज येते आणि त्यामुळे श्वासनलिकांचा अंतर्गत व्यास कमी होऊन श्वास लागतो . साधारण दोन-तीन तास गेल्यावर मी शांत झालो . आणि पुन्हा एकदा मैयाचा किनारा पकडायचा असा निर्धार केला . ग्रामस्थांनी मला सांगितले की इथे गिरनार गुफा आश्रम आहे तिथे मी जावे . हा आश्रम अगदी नर्मदा मातेच्या काठावरच आहे . थोड्याच वेळात आश्रमामध्ये पोहोचलो . अतिशय रम्य वातावरण ! शून्य मानवी वावर ! काल मी दगडू महाराज प्रणित निर्लोभी आखाड्याच्या ज्या आश्रमात राहिलो त्याहीपेक्षा हा आश्रम मला अधिक आवडला ! इथे तळघरामध्ये ध्यानाला बसण्याची जागा होती . गिरनारी बापू नावाचे संत इथे तप करायचे . आश्रमाला पांढरा रंग दिला होता . आणि काचांचा भरपूर वापर केला होता . राहण्यासाठी काही खोल्या होत्या . आणि मोठी मोठी झाडे मोठ्या प्रमाणात होती . आश्रमा पर्यंत पक्की डांबरी सडक होती . आणि आश्रमातून मैया पर्यंत जाण्यासाठी छोटासा जिना केलेला होता . खरे तर पाणेथा गावातून सरळ गेले की तीन किलोमीटरवर वेळू गाव नावाच्या गावात मातेचा किनारा पुन्हा लागायचा . परंतु नर्मदा मातेच्या एकूण लांबी मधील सर्वात मोठा वाळूचा वळसा येथे आहे तो मला घ्यायचा होता त्यामुळे मी दोन किलोमीटर उलटा चालत या आश्रमामध्ये आलो होतो .
पाणेथा गावातून वेळूगामला गेले की मैयाचा किनारा लागतो . परंतु त्यामुळे मैयाचे सर्वात मोठे वळण चुकते .
त्यामुळे मी पाणेथा वरून उलटे दोन किलोमीटर चालत गिरनारी बापू गुंफा आश्रम गाठला आणि इथून किनाऱ्याने चालत ते संपूर्ण वळण घेतले .
इथे सुरत चे एक काका आणि राजबर्डीचा एक अर्ध अंध विश्वकर्मा युवक सेवा देत होते . हा मठ आणि कालचा निर्मोही मठ या दोन्ही संस्था एकाच संस्थेद्वारे चालविल्या जात होत्या . खाली जाऊन गुफा पाहण्याची परवानगी त्यांनी मला दिली .
गिरनारी बापूंची मूर्ती आणि पादुका येथे होत्या
गुजराती मध्ये बापू हा शब्द संत अशा अर्थाने वापरतात .
सापाची कात गुंडाळून ठेवलेले महादेव आणि व्याघ्र चर्मावर बसलेले गिरनारी बापू
श्री गिरनारी बापू
जवळच गिरणारेश्वर महादेवाचे मंदिर होते
महादेवाच्या प्रत्येक मंदिरामध्ये गणपती मारुती पार्वती इत्यादी देवता असतातच
एका भव्य झाडाखाली मंदिर होते
मंदिराला अशा जाळ्या दिसल्या की ओळखायचे की इथे वन्य श्वापदांचा किंवा माकडांचा वावर आहे .
शेंदूर पासून गायब केलेली मूळ मूर्ती !
इथून खाली नर्मदास्नानाला जायला पायऱ्या होत्या
मी सुरतच्या काकांसोबत खाली जाऊन मैयाला नैवेद्य दाखवून आलो
इथून डावीकडे मार्ग जवळपास नव्हताच . प्रचंड झाडी आणि उभा कडा होता . मी खरं म्हणजे पाहणी करायला सुद्धा खाली आलो होतो .
वरती गेल्यावर एका झाडाखाली बसून भोजन प्रसादी घेतली . माझा खालून जायचा निर्धार ऐकल्यावर दोघांनी तीव्र विरोध केला . त्यामुळे त्यांना दाखविण्यापुरते मी थोडेसे पुढे गेलो आणि पुन्हा एका शेतातून किनाऱ्याकडे शिरलो . त्यांचे म्हणणे बरोबर होते इथे खरंच खूप दाट झाडी होती . परंतु असा उभा कडा लागला की लवकरच तो संपतो आणि वाळूचा किनारा लागतो असा माझा अनुभव असल्यामुळे मी खाली उतरत राहिलो .आणि त्याप्रमाणे खरोखरच अतिशय सुंदर असा वाळूचा किनारा लागला ! तेव्हा मला हे माहिती नव्हते की नर्मदा मातेच्या शेवटच्या एक दोन वळणांवर मी आता पोहोचलेलो आहे . इथून पुढे तिचा त्रिभुज प्रदेश चालू होणार होता . त्रिभुज प्रदेश म्हणजे एका नदीच्या अनेक शाखा होतात आणि ती समुद्रार्पण होते . मी शांतपणे तापलेली वाळू तुडवत मैया चा किनारा पकडला . ती शेजारी असली की जीवनात दुसरे काही नको ! तिचा हात धरायचा आणि एक एक पाऊल चालत राहायचे ! प्रत्येक पावलाला तिचे नाम घोकायचे . नर्मदे हर ! नर्मदे हर !
लेखांक एकशे दोन समाप्त (क्रमशः )
नर्मदे हर🙏🙏🙏🙏🙏
उत्तर द्याहटवापरिक्रमा घडून देखील हे सर्व वाचणे आनंद दाई आहे. ऑक्टोबर 2022 च्या आसपास ही माहीती नव्हती. तरी पं माई कृपेनें आता तरी वाचायला मिळाली हे मदभाग्य.
उत्तर द्याहटवामैय्या सर्वकाळ रक्षण करते. मैय्याच ती. नर्मदे हर।।
उत्तर द्याहटवा