लेखांक १०१ : कांदरोज चे कार्तिकस्वामी स्थापित तीर्थ स्कंदेश्वर आणि चोरिया डेडा चा भग्न ब्रह्मेश्वर

हा नर्मदा मातेचा अखेरचा टप्पा सुरू झालेला होता . अर्थात समुद्र हळूहळू जवळ येत होता . त्यामुळे नर्मदा मातेच्या पात्राची रुंदी प्रचंड प्रमाणात वाढली होती . अतिशय भव्य दिव्य पात्र दिसायचे . काठावरची झाडी आणि चिखलगाळ सुद्धा वाढत चालला होता . गाळाचे प्रमाण हळूहळू अधिक होत चाललं होतं . केली करोडो वर्षे नर्मदा मातेने वाहून आणलेला हा गाळ आहे . मी किनाऱ्याने चालावे किंवा वरून चालावे अशा विचारात पडलो इतकी कठीण वाट होती . वाट होती म्हणणे धाडसाचे ठरेल . वाट नव्हतीच . हातातल्या काठीने समोरची झाडे झुडपे झोपवत वाकवत वाट करावी लागायची . मला असे फार वाटत होते की आपल्याजवळ एक कोयता पाहिजे होता . म्हणजे वाटेत येणारी झाडेझुडपे छाटत मार्ग निर्माण करता आला असता . हळूहळू गवताचे प्रमाण वाढू लागले . दहा फूट बारा फूट उंचीची गवताची एक प्रजाती इथे होती . तिचा देठ बांबू च्या जातीचा होता . त्यामुळे तो सहजासहजी तुटायचा नाही . अशा गवताच्या एका टापूने मला अक्षरशः रडवले ! या गवतातून पुढे कसे जावे तेच मला कळेना . खाली दीड फूट गाळ होता . त्यात गवताच्या मुळांमध्ये माझे पाय अडकत होते . गवताचा देठ अतिशय मजबूत होता . ते तोडून तोडून माझे हात दुखायला लागले . एवढ्यात माझ्या डोक्यात एक युक्ती आली ! मी त्या गवतावर चक्क झोपलो ! त्याबरोबर बारा फुटाचे गवत आडवे होऊन दहा फुटाचा रस्ता माझ्यासमोर तयार झाला ! त्याच्यावरून पळत गेलो आणि पुन्हा आडवा झोपलो ! पुढचा रस्ता तयार झाला ! थोडक्यात या गवताच्या फांद्यांवर पाय ठेवतच मी चालू लागलो ! पाय ठेवला की माझ्या वजनाने गवत आडवे व्हायचे आणि त्याचा दाब पडून पुढचे गवत तिरके व्हायचे ! ही युक्ती फारच सोपी निघाली ! ही युक्ती इथून पुढे प्रत्येक झाडीच्या ठिकाणी मी वापरू लागलो ! आपले वजन झोकून द्यायचे ! मार्ग निर्माण होतो !
हे याच भागातील गवत आहे . अशा गवताचे चांगले १०० - २०० मीटर रुंदीचे पट्टे नर्मदेकाठी आहेत .
 काठाने चालत चालत कोटेश्वर मंदिरापाशी आलो . कोटेश्वर महादेव नावाची अनेक मंदिरे नर्मदे खंडात आहेत . मार्कंडेश्वर महादेव देखील खूप आहेत .
श्री कोटेश्वर महादेव मंदिर ओरी - वराछा
या परिसरात छोटी मोठी अनेक मंदिरे होते त्या सर्वांचे दर्शन घेतले . तिथे एक पुजारी होता त्याने मला सांगितले की थोडेसे पुढे गेल्यावर नर्मदा मातेची नवीन मूर्ती स्थापन केली आहे तिची अवश्य दर्शन घ्या . मी त्या मूर्तीच्या ठिकाणी पोहोचलो . इथे कुमार नावाचा एक तमिळ साधू सेवा करत होता . मला भेटल्यावर त्याला खूप आनंद झाला . त्याच्याशी तमिळमध्ये गप्पा मारल्यावर त्याला जरा बरे वाटले . त्याला मी तमिळमध्ये लिहून दाखवल्यावर तर तो अत्यंत खुश झाला आणि त्याच्या खोलीमध्ये आम्हाला घेऊन गेला ! होय आम्हाला म्हणायचं कारण असं की मी गवतावर तयार केलेल्या राजमार्गावरून आमचे चेतरामजी धावत येऊन त्यांनी मला गाठलेच ! दोघांनी मस्तपैकी चहा घेतला . नर्मदा मातेची मूर्ती नुकतीच बसवली होती . खूप मोठी मूर्ती आहे . ती बनविणे इथे आणणे ,बसवणे हे सगळेच कठीण काम होते . या मूर्तीवर एका छत्रीचे बांधकाम सुरू होते . आता ते पूर्ण झाले आहे . तमिळ साधू भोजनाचा आग्रह करणार हे ओळखून आधीच मी त्याला सांगितले की पुढे चालायला सुरुवात करणे मला क्रमप्राप्त आहे नाहीतर नावा बंद होतील . त्याने देखील जड अंतकरणाने निरोप दिला . सुंदर असा जिना आपल्याला मैयाच्या पात्रामध्ये आणून सोडतो . तिकडून जाऊ लागल्यावर त्याने ओरडून सांगितले की तिथून मार्ग नाही . परंतु मी त्याला पुन्हा एकदा तमिळ भाषेत समजावून सांगितले की माझा हाच मार्ग आहे . मग मात्र त्याने शुभेच्छा दिल्या आणि मार्गस्थ झालो . हा साधू कसा दिसत होता हे देखील आता मला स्पष्ट आठवणार नाही . त्याला देखील अमुक अमुक दिवशी मी अशा एका माणसाला भेटलो होतो हे कदाचित स्मरणार नाही . कदाचित या आयुष्यात पुन्हा आमची भेट कधीच होणार नाही ! तरीदेखील आमच्या त्या क्षणिक भेटीमध्ये जे काही प्रेम ,जो काही स्नेह , जो काही आदर आम्ही एकमेकांना दिला त्यामुळे ती भेट संस्मरणीय ठरली ! अशा हजारो भेटी , हृद्य भेटी रेवाकाठी आपल्या आपसूकच घडतात . काही मिनिटांच्या भेटीचा इतका मोठा ठसा आपल्या मनावर पडत असेल तर ज्यांच्या सोबत आयुष्य घालवतो त्याच्यातून निर्माण होणाऱ्या स्मृती किती खोलवर घुसत असतील विचार करून पहा . म्हणूनच साधकाने सदैव कमळाच्या पानावर पडलेल्या पाण्यासारखे अलिप्त रहावे . भगवत गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण हेच सांगतात .
ब्रह्मण्याधाय कर्माणि सङ्गं त्यक्त्वा करोति यः।
लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवाम्भसा।। ५ .१० ॥
एकदा आपली सर्व कर्मे कर्तृत्वाचा अभिमान न घेता करण्याची सवय आपल्याला लागली की आपोआप हे घडते . 
आम्ही गेलो तेव्हा नर्मदा मैया अशी सुद्धा नव्हती केवळ एका कट्ट्यावर स्थापित केली होती .
मगरीच्या वाहनावर आणि कमळाच्या आसनावर बसलेली नर्मदा मैया अतिशय सुंदर आहे !तिच्याभोवती पाणी भरण्यात आलेले आहे .
अलीकडेच एक सुंदर छत्री तिच्या डोक्यावर बांधण्यात आलेली आहे .
या जिन्यावरून धावतच खाली उतरू लागलो . मी प्रत्येक जिना धावत उतरतो हे आता वाचकांना सुद्धा माहिती झाले असेल , परंतु चंदन ला पुन्हा एकदा वाटले की मी त्याच्याशी स्पर्धा करतो आहे ! 
तो बिचारा अनवाणी होता त्यामुळे तो मला म्हणाला की जर माझ्या पायात चप्पल असती तर याहून वेगात मी उतरलो असतो !
माझ्या लक्षात आले की याला वेळीच सावध करणे आवश्यक आहे . खाली मैयाच्या काठावर गेल्यावर मी त्याला एका दगडावर बसवले आणि सांगितले की हे पहा चेतराम माझी कोणाशीच स्पर्धा नाही . जन्माला आल्यापासून मी कधीही कोणाशीही स्पर्धा केलेली नाही ! मला आठवते मी ज्या पूर्व प्राथमिक शाळेत शिकायचो त्याच शाळेमध्ये माझी आई शिक्षिका होती . वर्गामध्ये प्रथम क्रमांक आलाच पाहिजे यासाठी आईचा माझ्यावर प्रचंड दबाव असायचा ! त्यामुळे तो मला आणावाच लागायचा . चौथ्या इयत्तेमध्ये शिकत असताना एक नवीन गुजराथी मुलगा आमच्या वर्गात आला आणि त्याची माझी चांगली गट्टी जमली . तो खूप हुशार होता . वार्षिक परीक्षेमध्ये माझ्या पुढेच तो बसायचा . परीक्षेतल्या कुठल्यातरी एका प्रश्नाचे उत्तर त्याला येत नव्हते आणि मला सर्व उत्तर येत होती . त्याला जे उत्तर येत नव्हते ते मी त्याला सांगितले त्यामुळे दोघांचे गुण सारखे झाले . परंतु त्याचे हस्ताक्षर अतिशय सुंदर मोत्यासारखे असल्यामुळे अक्षरांच्या बळावर त्याला पहिला क्रमांक देण्यात आला ! या एका गोष्टीवरून मी त्यावेळी आईचा प्रचंड ओरडा खाल्ला होता ! त्या क्षणी देखील मी कुठल्याही स्पर्धेमध्ये नव्हतो आणि त्याच दिवशी मी असा निश्चय केला की आयुष्यात कुठेही गेलो तरी कोणाशीही स्पर्धा कधी करणार नाही ! मुळात या विश्वाच्या पसारामध्ये आपले अस्तित्व किती कफल्लक आहे याची जाणीव ज्याला झाली आहे तो कधी कोणाशी स्पर्धा करायला जाणारच नाही ! स्पर्धा करायचीच असेल तर स्वतःशी करावी ! प्रत्येक दुसऱ्या दिवशी आपण पहिल्यापेक्षा अधिक ज्ञानी झालो आहोत का? अधिक नम्र झालो आहोत का ? अधिक सहिष्णू झालो आहोत का? अधिक सहनशील झालो आहोत का? अधिक शक्तिमान झालो आहोत का ? अधिक शांत झालो आहोत का ? याची स्वतःच स्वतःशी स्पर्धा अवश्य करावी .काय वाईट आहे ! परंतु जगाशी स्पर्धा करणे यासारखा मूर्खपणा नाही . प्रत्येक जण आपापले प्रारब्ध घेऊन जन्माला आलेला असतो . आपल्याला फक्त त्या व्यक्तीचा या जन्मातला पसारा दिसत असतो आणि या जन्मातले कर्तृत्व दिसत असते . परंतु गेल्या अनेक जन्मामध्ये त्या व्यक्तीने काय पाप पुण्य केलेले आहे याची आपल्याला पुसटशी देखील कल्पना नसते .त्यामुळे त्याच्या आयुष्यात असे का घडते आहे हे तुम्हाला कधी कधी कळत नाही , परंतु त्यामुळे जे घडायचे तेच घडते . ते टळत नाही . सिताराम भगत काही काळ गोवा सांगली या भागात राहिला होता . त्याला वेल्डिंगचे उत्तम ज्ञान होते . जहाजांवर ठेवण्यात येणारे कंटेनर बनवतात त्याचे वेल्डिंग करणे ही सगळ्यात कठीण कला मानली जाते . कारण यात एक पत्रा जाड असतो आणि एक पत्र पातळ असतो शिवाय सलग कित्येक मीटर न थांबता झिक्झॅग अर्थात आत बाहेर वेल्डिंग करत चालावे लागते . याच्या मधला तो तज्ञ होता . तसेच गोल पाईप जोडणे हे देखील वेल्डरचे कौशल्य असते . त्यातही त्याला महारथ प्राप्त होते . या दोन्ही गोष्टींसाठी मी त्याचे कौतुक केल्यावर त्याला जरा बरे वाटले . परंतु पुन्हा त्याला प्रश्न पडला की मला गॅस वेल्डिंग आर्च वेल्डिंग सी ओ टू वेल्डिंग वगैरे कसे काय माहिती आहे ? मी त्याला सांगितले की माझ्या घरातील वेल्डिंगची कामे मी स्वतः घरी करत असतो . आमच्या सांगली भागामध्ये वेल्डिंगला खूप छान प्रतिशब्द आहे . झाळणे असा तो शब्द आहे . मी जरा माझी सायकल झाळून आणतो असे सांगून सायकलला वेल्डिंग करून घ्यायला माझे वडील जात आहेत असे चित्र अजूनही मला आठवते ! गंमत म्हणजे त्याला देखील हा शब्द माहिती होता ! त्याच्या मनोरचनेचा अभ्यास केल्यावर माझ्या असे लक्षात आले की याच्या मनामध्ये असुरक्षिततेची तीव्र भावना होती . प्रत्येक गोष्टीमध्ये सर्वजण त्याच्याशी स्पर्धा करत आहेत असा भास त्याला व्हायचा . त्याला पाच मुले होती . परंतु पत्नी सतत बाहेरच्या लोकांशी संपर्क ठेवून असल्यामुळे याचे तिच्याशी पटत नव्हते . आजकाल बहुतांश संसार दुःखी असण्याचे कारण हेच आहे . जी गोष्ट सोडून पुढे जायला पाहिजे त्यावर आपण एक पाय ठेवला की पुढचा पाय टाकणे अवघड होतेच . त्यात मोबाईल नावाचा एक असा विचित्र प्रकार सध्या जन्माला आलेला आहे जो मूर्तिमंत माया आहे ! म्हणजे मोबाईलवर तुम्ही ज्या व्यक्तीशी संपर्क साधत असता ती प्रत्यक्षामध्ये तुमच्यासमोर किंवा आजूबाजूला कुठेच नसते परंतु तरी देखील त्या व्यक्तीच्या भावना विश्वामध्ये शिरण्याची संधी तुम्हाला मोबाईल देत असतो . आता या संधीचा वापर कसा करावा हे ज्याचे त्याने ठरवायचे असते . जी व्यक्ती आपल्यासमोर नाही किंवा जी व्यक्ती आता या क्षणी येऊन आपल्याला प्रत्यक्ष मदत करू शकत नाही त्या व्यक्तीच्या किती आहारी जावे याचे भान सुटले की मग वादावादीला सुरुवात होते . आणि त्यात जोडीदार स्पर्धात्मक वृत्तीचा असेल तर मग अजूनच कठीण होऊन जाते . मी बघितले की प्रत्येक माणसाला आयुष्याच्या एका टप्प्यावर शहाणपण येते . परंतु तो टप्पा आपल्या आयुष्यात जितक्या लवकर येईल तितके सुज्ञ पणे आयुष्य जगण्याचा अधिक कालावधी आपल्याला मिळतो .जितक्या उशिरा तुम्हाला जाग येईल तेवढे पाणी पुलाखालून वाहून गेलेले असते . म्हातारपणी शहाणपणाने एकत्र संसार करणे हे अगत्याचे असले तरी फार काही कौतुकाचे नक्कीच नाही ! कारण दोघांनाही कळलेले असते की ती एक गरज आहे ! तारुण्याच्या मस्ती मध्ये असताना तुम्ही जर समोरच्या व्यक्तीला समजून घेऊन सामंजस्याने , समरसतेने आणि प्रेमभावाने संसार करू शकलात तर ते खरे कौशल्य असते . या विषयावर चंदनशी विस्तृत चर्चा केली आणि माझ्या परीने लहान तोंडी मोठा घास घेत चार सल्ले त्याला लहान भाऊ या नात्याने दिले . तसंही हे जीवन फार काही गांभीर्याने घेण्याची गरज नसते असे माझे स्पष्ट मत आहे . समर्थ रामदास स्वामी म्हणतात 
जीवन दो दिसांची वसती । कोठे तरी करावी ।
आम्ही दोघे चक्क शिव्या घालत एकमेकांशी भांडायचो आणि क्षणात एक व्हायचो ! लहान मुलांसारखी मनाची निर्मळ अवस्था नर्मदा परिक्रमेमुळे सर्वांनाच प्राप्त झालेली असते हे अशा क्षणी लक्षात येते ! आमच्यातील या मुक्त संवादामुळे त्याचे गैरसमज लवकरच दूर झाले . आणि मला एकट्याला चालायचे आहे हे त्याला स्पष्टपणे सांगता आले त्यामुळे आम्ही पुढेमागे चालायला सुरुवात केली .
इथून पुढे मैया एक अतिशय मोठे वळण घेते . नर्मदा मातेचा नकाशा जर आपण नीट पाहिला तर तिच्या शेवटच्या चार वळणांना अपरंपार महत्त्व आहे . दुर्दैवाने अधिक चालावे लागते म्हणून लोक केवडिया कॉलनी पासून राजपिपला मार्गे थेट झगडिया मढी गाठतात . इथे नर्मदा मैया तुमच्या उजव्या हाताला राहते परंतु तो परिक्रमेचा योग्य मार्ग नाही . नकाशा पाहिल्यावर आपल्याला साधारण कल्पना येऊ शकेल . (मी खूप जास्ती नकाशे टाकत आहे त्याबद्दल सर्वांचे क्षमा मागतो परंतु माझे स्वतःचे असे मत आहे की नकाशाचा चांगला अभ्यास करायची एकदा सवय लागली की प्रवास करणे सोपे होऊन जाते आणि कमीत कमी शब्दांमध्ये त्या भूभागाचे आकलन तुम्हाला होऊ शकते . ज्यांना नकाशा वाचनाची फारशी आवड नाही त्यांनी नकाशा सोडून पुढे जायला हरकत नाही . परंतु ज्यांना भविष्यामध्ये परिक्रमा करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी हे नकाशे खूप मार्गदर्शक ठरू शकतात)
भारताच्या व्यापक नकाशावर जर पाहायला गेले तर आपण साधारण इथे आलेलो आहोत .
नर्मदा मातेची हीच ती मोठी चार-पाच वळणे आहेत
त्यातही ही चार वळणे फार महत्त्वाची आहेत .
आपण सध्या ही दोन वळणे पार करत आहोत .
पुढची दोन वळणे ही सर्वात मोठी वळणे असून ती पार करायला सर्वात जास्त वेळ लागतो . काठाने चालताना उगमाजवळ एका तासात चार आठ वळणे पार केली जायची . इथे मात्र एक वळण पार करायला एक दिवस जातो इतकी ती मोठी आहेत . इथेच चालण्याचे अंतर वाढते परंतु नर्मदा मातीचा सहवास देखील तितकाच वाढतो त्यामुळे ते आनंद दायकच आहे !
आतल्या वळणावर प्रचंड गाळ माती , झाडी , गवत आणि लांबच्या वळणावर प्रचंड वाळू असे एकंदर किनाऱ्याचे स्वरूप इथे होते . 
वाळूचा एक अतिशय लांब आणि प्रचंड असा गोल गरगरीत किनारा ऐन उन्हात झपाझप चालत पार करून मी ते वळण संपविले . पाण पक्षांचा आकार हळूहळू मोठा होत होता . संख्या देखील प्रचंड वाढली होती . माशांचा आकार आणि संख्या देखील वाढलेली होती . काठावरील लोकसंख्या आणि समृद्धी देखील वाढलेलीच होती . मंडला भागातील शेतांचे आकार आणि इथल्या शेतांचे आकार पाहिल्यावर त्यामध्ये जमीन आसमानाचा फरक जाणवत होता .
वाळूचे हेच ते प्रचंड डावे वळण जे मैया च्या काठाने चालत पार झाले .
या भागातील काठ असा होता .नर्मदा नदीचे इतर नद्यांपेक्षा एक वेगळे वैशिष्ट्य असे आहे की हीचे पाणी अतिशय म्हणजे अतिशय शुद्ध आहे ! आता आपण जवळपास समुद्राच्या जवळ आलेलो आहोत तरी देखील हजारो किलोमीटर वाहून आलेल्या या पाण्याची शुद्धता किती जबरदस्त आहे पहा !अशी अन्य कुठलीही नदी नाही !
वाटेमध्ये सिसोदरा नावाच्या गावापूर्वी मुक्तेश्वर महादेवाचे पुरातन मंदिर आहे . त्याचे दर्शन घेतले आणि क्षणभर तिथे बसून पुढे निघालो.
श्री मुक्तेश्वर महादेव सिसोदरा
मंदिराचा गाभारा
गुजरात राज्यामध्ये देखील प्रचंड गोवंश आहे . जसजसे आपण समुद्राच्या जवळ जातो तसं तसे गायींच्या शिंगांचे आकार मोठे मोठे होत जातात . या भागात गीरसोबतच कांकरेज जातीच्या गायी खूप दिसल्या . आपल्याकडे नंदीबैलवाले येतात पहा त्या जातीच्या गाई . यांची शिंगे खूप मोठी मोठी असतात . 
 सवत्स धेनूमाय
देशी गाईला इतके पूज्य का मानतात हे आपण खरोखर समजून घेतले पाहिजे . देशी गाईचा प्रत्येक अवयव आणि गाईपासून निर्माण होणारा प्रत्येक पदार्थ हा उपयुक्त असतो . सांगली जिल्ह्यात विटा नावाच्या गावाजवळ अभय भंडारी म्हणून व्यावसायिक आहेत . यांनी खाजगी जमिनीवर वन उभे केलेले आहे . त्यांनी मला सांगितले की देशी गाईच्या गोमूत्रामध्ये एखादे सडलेले फळ उदाहरणार्थ पेरू केळ सफरचंद किंवा अन्य कुठलेही फळ आठवडाभर टाकले की सुरुवातीला काही काळ किण्वन प्रक्रिया होऊन अर्थात फर्मेंटेशन होऊन अल्कोहोल सारखा वास येऊ लागतो परंतु आठवड्याभरातच सर्व वास निघून जातात आणि त्या द्रावणाला प्रचंड सुगंध येऊ लागतो ! त्यातील चमचाभर गोमूत्र एक लिटर पाण्यात कालवले आणि सर्वत्र शिंपडले तरी 'रूम फ्रेशनर ' चे काम ते करते इतका सुगंध त्यात असतो . अशा अनेक गोष्टी गाईपासून बनविता येतात . जीवामृत तर सर्वांना माहितीच आहे . तसेच कोल्हापूरच्या काडसिद्धेश्वर महाराज मठाने मृत गोमातेचे शरीर एका विशिष्ट पद्धतीने कुजवून त्यापासून खत तयार करण्याची पद्धती निर्माण केलेली आहे . यात गाईची हाडे सुद्धा विरघळतात फक्त शिंगे शिल्लक राहतात . त्या शिंगांमध्ये देखील देशी गाईचे शेण भरून ती विशिष्ट पद्धतीने बांधून मातीमध्ये गाडून ठेवली की त्यापासून जबरदस्त जिवाणू खत तयार होते .मी पूर्वी एकदा पुण्याहून सज्जनगडला पायी जाताना महाबळेश्वर येथे काडसिद्धेश्वर मठात मुक्काम केला होता तिथल्या स्वामींनी मला हे सर्व समजावून सांगितले होते .याबाबत अधिक माहिती कोणाला हवी असेल तर कोल्हापूर येथील श्री काडसिद्धेश्वर मठाशी संपर्क साधायला हरकत नाही .
वाळूतून चालताना शेकडो गाईंचा कळप आपल्या सोबत चालत आहे हे दृश्य फार आनंददायी असायचे . त्यांच्या गळ्यातील घंटांचा मधुर आवाज आजही पडल्या पडल्या आठवतो ! एका गायीमध्ये ३३ कोटी देवांचा वास आहे असे आपण म्हणतो अशा हजारो गाई जर आपल्या आजूबाजूला चालत असतील , आणि त्याही नर्मदा माते सोबत तर आपल्याला किती पवित्र आणि शुद्ध स्पंदने जाणवत असतील याची फक्त कल्पना करून पहा !
अखेर कार्तिक स्वामींची तपोभूमी असलेल्या कांदरोज या गावी मी पोहोचलो . इथे कार्तिक स्वामी स्थापित श्री स्कंदेश्वर महादेव मंदिर आहे . स्कंद कुमार हे कार्तिक स्वामींचेच नाव आहे . प्रज्ञाविवर्धन स्तोत्र नावाचे एक स्तोत्र आहे ज्यात कार्तिक स्वामी ची सर्व नावे आलेली आहेत . त्यातही स्कंद नाव आहे . मुळात स्कंद पुराण म्हणजे कार्तिक स्वामीने आई-वडिलांना प्रदक्षिणा न घालता विश्व प्रदक्षिणा केली होती त्याचा लेखी अहवालच आहे . आणि त्यातील अवनी खंडातील उपखंड म्हणजे रेवाखंड आहे ज्याला आपण नर्मदा पुराण म्हणतो .  हे प्रज्ञाविवर्धन स्तोत्र लहान मुलांनी दररोज म्हटले तर त्यांची बुद्धी तीव्र होते असा अनुभव आहे . आपल्या मुलांकडून हे स्तोत्र रोज म्हणून घ्या . तुम्हाला निश्चितपणे त्यांच्या बौद्धिक प्रगतीमध्ये फरक जाणवेल . बुद्धीचे तीन महत्त्वाचे भाग आहेत . प्रज्ञा मेधा आणि प्रतिभा . प्रज्ञा म्हणजे ग्रहण शक्ती. मेधा म्हणजे धारण शक्ती आणि प्रतिभा म्हणजे व्यक्त करण्याची क्षमता .त्यातील हे स्तोत्र प्रज्ञा अर्थात ग्रहण शक्तीवर काम करते . स्तोत्र खालील प्रमाणे आहे .

अस्य श्रीप्रज्ञाविवर्धन-स्तोत्र-मंत्रस्य सनत्कुमारऋषि:।
स्वामी कार्तिकेयो देवता। अनुष्टुप् छंद:।
मम सकल विद्यासिद्ध्यर्थं जपे विनियोग:।
श्रीस्कंद उवाच।।

 योगीश्वरो महासेन: कार्तिकेयोSग्निनन्दन:।
स्कंद:कुमार: सेनानी: स्वामिशंकरसंभव: ।।१।।

 गांगेयस्ताम्रचूडश्च ब्रह्मचारी शिखिध्वज:।
तारकारिरुमापुत्र: क्रौंचारिश्च षडानन: ।।२।।

 शब्दब्रह्मसमुद्रश्च सिद्ध:सारस्वतो गुह:।
सनत्कुमारो भगवान् भोगमोक्षफलप्रद: ।।३।।

 शरजन्मा गणाधीशपूर्वजो मुक्तिमार्गकृत।
 सर्वागमप्रणेताच वांछितार्थप्रदर्शन: ।।४।।

 अष्टाविंशति नामानि मदीयानीति य: पठेत्।
 प्रत्यूषं श्रद्धयायुक्तो मूको वाचस्पतिर्भवेत् ।।५।।

 महामंत्रमयानीति मम नामानुकीर्तनम्।
 महाप्रज्ञामवाप्नोति नात्र कार्या विचारणा ।।६।।

|| इति श्री प्रज्ञाविवर्धन स्तोत्रं संपूर्णम् ||


कार्तिकेश्वर अथवा स्कंदेश्वर महादेवांच्या पुढे बसून मी हे स्तोत्र म्हटले . शिवलिंग मोठे आणि गुळगुळीत काळे आहे . मंदिर छोटेच आहे . परंतु आश्रम अतिशय मोठा असून साधून साठी खूप रमणीय असे हे ठिकाण आहे .
 कर्तिकेश्वर महादेव
शिवलिंगाचा आकार कसा आहे आपल्याला इथे लक्षात येईल
सालंकृत शिवपिंडी
ही मौनी बापूंची तपोभूमी होती . इथे असलेले विद्यमान महंत खुर्ची मध्ये बसले होते . अतिशय तेजस्वी असे त्यांचे रूप आहे . थोडेसे स्थूल आहेत . 
या आश्रमाचे एक वैशिष्ट्य होते ते म्हणजे इथे असलेले सर्व सेवेकरी वृद्ध असले तरी देखील अतिशय क्रियाशील होते . सर्वांना एक सारखा गणवेश देण्यात आला होता . गणवेश म्हणजे सर्वांच्या कमरेला एकाच रंगाचे तांबडे पंचे गुंडाळलेले होते तसेच सर्वांच्या अंगावर एकसारखे स्वच्छ पांढरे गंजीफ्रॉक घातलेले होते त्यामुळे बघायला खूप छान वाटायचे . सर्वांच्या बोलण्यामध्ये नम्रता आणि वर्तनामध्ये शिस्त दिसत होती . 
कांदरोज कार्तिक स्वामी आश्रमातील सेवादारांचा गणवेश आणि भोजन कक्ष
परिक्रमावासींची उतरण्यासाठी एका बाजूला मोठ्या हॉलमध्ये सोय केलेली होती . त्या सभागृहामध्ये मी गेलो तेव्हा आधीच चाळीस पन्नास परिक्रमावासी उतरले होते . मी देखील तिथे एका बाजूला सामान ठेवले आणि एकादशीचा फराळ घेण्यासाठी आश्रमामध्ये गेलो . आज सकाळपासून मला काहीच खायला मिळाले नव्हते तेव्हाच मला अंदाज आला होता की आज बहुतेक एकादशी असणार आहे . परिक्रमेतील ही माझी आठवी एकादशी होती . इथे भोजनप्रसादी देखील सुरू होती . त्यामध्ये चार-पाच पदार्थ होते . परंतु एकादशीच्या फराळाच्या ताटामध्ये मात्र तब्बल तेरा पदार्थ वाढण्यात आले होते ! इथले महंत खाण्यापिण्याचे शौकीन असणार त्याशिवाय इतके पदार्थ बनवण्यात येणार नाहीत ! आणि गंमत म्हणजे कुठला पदार्थ दुसऱ्या पदार्थापेक्षा चांगला झाला आहे हे सांगता येणे कठीण होते इतके सर्व पदार्थ अत्यंत बनविण्यात आलेले होते !  मोठ्या आनंदाने त्या दिवशी फराळ केला ! 
हाच कांदरोजचा कार्तिक स्वामी आश्रम आहे . डावीकडे फराळाची व्यवस्था करण्यात आली होती .
या आश्रमामध्ये साधू संतांची अतिशय उत्तम बडदास्त ठेवण्यात येते असे मला जाणवले . याचा अर्थ असा नव्हे की गृहस्थी परिक्रमा वासीनता वासीयांना सेवा मिळत नाही . परंतु साधू असल्यास मात्र त्या कडे विशेष लक्ष पुरविले जाते हे निश्चितपणे जाणवले . चातुर्मासासाठी अतिशय रमणीय ठिकाण आहे .
इथे जमलेल्या परिक्रमावासींशी काही काळ गप्पा मारल्या . दुपारच्या निवांत क्षणी अशा रीतीने होणारी ज्ञानाची देवाणघेवाण मोठी मजेशीर आणि बरेचदा फायदेशीर असते . पूर्वी परिक्रमा करून आलेली काही माणसे आपल्याला पुढील धोक्यांची कल्पना आधीच देऊन ठेवत असतात . किंवा आपल्याला माहिती नसलेला एखादा नवीन मार्ग आपल्याला सुचवितात . किंबहुना एखादे अनवट ठिकाणी असलेले ठिकाण सांगून तिथे जाण्याचा आग्रह आपल्याला करतात .गप्पा मारता मारता चंदनचा डोळा लागला होता . भरपूर फराळ झालेला असल्यामुळे इथे अधिक काळ बसले तर आपण आडवे पडणार आणि आपला डोळा लागणार हे लक्षात आल्यामुळे मी माझी जो झोळी उचलली आणि पुढे चालायला लागलो . थोडे अंतर गेलो असेन नसेल इतक्यात मागून धावतच चंदन आलाच ! मला म्हणाला की तू कितीही प्रयत्न केलास तरी मी तुझ्या पिच्छा सोडणार नाही ! चंदन माझ्या प्रमाणेच संपूर्ण मार्गक्रमणा काठाने करत होता हा त्याच्यामध्ये असलेला एक फार मोठा चांगला भाग होता परंतु या चंदनचा अजून एक मोठा दुर्गुण होता तो म्हणजे त्याला सिनेमाची गाणी गायची आवड होती . मोठ्या मोठ्या आवाजात तो हिंदी चित्रपट गीते गात चालायचा .त्यामुळे माझे नामस्मरण खंडित होत होते कारण मला देखील गाण्यांची आवड आहेच ! त्याला मी एकदा दोनदा सांगून पाहिले परंतु तो गाणी गातच राहिला .बर तो माझ्या मागे पुढे चालत असल्यामुळे आणि मोठ्या आवाजात गाणी गात असल्यामुळे मला ते स्पष्ट ऐकू येतच होते .त्याला खूप वेळा सांगून देखील तो ऐकत नव्हता हे पाहून अखेरीस मी एक सोपा उपाय केला तो म्हणजे असा , की तो जे कुठले गाणे गात आहे , ते गाणे नर्मदा मैया ला लागू करायचे ! आणि आपणही तेच गाणे मैय्यासाठी गुणगुणत पुढे चालायचे !हे फार सोपे होऊन गेले ! आता प्रत्येक ओळीला नर्मदा मातेचे गुणगान घडू लागले ! 
तू जहा जहा चलेगा । मेरा साया साथ होगा । असे जणू नर्मदा मैया मला सांगत आहे असा भाव जागू लागला !
मेरा जीना मेरा मरना इन्ही पलको के तले । हे नर्मदा मातेला उद्देशूनच मी म्हणतो आहे असा माझा भाव झाला ! मुसाफिर हू यारो ,ना घर है ना आशियाना । मुझे चलते जाना है । बस चलते जाना ! असे मीच मैय्याला सांगू लागलो ! आपणही दररोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये हा प्रयोग कधीतरी करून पहावा . चित्रपटाचे गाणे ऐकायची वेळ आलीच तर आपले जे कुठले उपास्यदैवत आहे किंवा आराध्य दैवत आहे त्याला उद्देशून चित्रपटातले ते गाणे म्हणावे किंवा  ऐकावे. त्यात कुठल्या ना कुठल्या रूपाने ते लागू होतेच आहे असे तुमच्या लक्षात येईल ! आणि चित्रपट संगीताकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच कायमचा बदलून जातो ! परंतु मी परिक्रमे मध्ये होतो आणि  हे सर्व लवकरच थांबावे असे मला मनोमन वाटत होते . कारण आज पर्यंत परिक्रमेत मैय्याच्या कृपेने मी केवळ भजनानंदामध्येच चालत राहिलो होतो . हा असला श्रृंगाररस प्रधान चित्रपट संगीताचा विटाळ माझ्या वाणीला होऊ नये अशी माझी मनापासून इच्छा होती . ती इच्छा मैय्याने लवकरच पूर्ण केली ! आणि त्याची फार मोठी किंमत आम्हाला चुकवावी लागली . मी चंदन ला म्हणालो सुद्धा की आपण चित्रपटाची गाणी म्हणत आहोत हे चुकीचे आहे आणि त्याची शिक्षा आपल्याला मिळू शकते . थोडेसे पुढे गेल्यावर एक उसाचे शेत लागले . आपल्या महाराष्ट्रातला ऊस साधारण आठ दहा फूट ते बारा फूट उंचीचा असतो . इथे मात्र उसाची अशी जात होती जी सरळ न वाढता वेलाप्रमाणे आडवी तिडवी वाढायची . कमीत कमी वीस पंचवीस फूट आणि कधीकधी ३०-३५ फूट लांबीचा ऊस इथे वाढताना मी पाहिला ! यातील शेवटचे आठ दहा फूट आपल्या उसासारखेच उभे राहिलेले असायचे परंतु आधीचे खोड कुठून तरी लांबून आलेले असायचे . या उसाच्या शेतामध्ये चंदनाचे ऐकून घुसलो आणि माझी अक्षरशः वाट लागली . माझे पाय उसामध्ये अडकू लागले . मी कमरेला नाडी बांधून त्या कप्प्यामध्ये सापडलेली शिवलिंगं , कोणी वाटेत दिलेली दक्षिणा , किंवा मार्गावर सापडलेले प्लास्टिकचे कपडे वगैरे ठेवायचो . परंतु ह्या घनदाट उसामध्ये शिरल्यावर माझी नाडी कधी सुटली आणि ठेवलेल्या सगळ्या वस्तू कधी पडून गेल्या माझे मलाच कळाले नाही .  संपूर्ण अंग उसाच्या करवती सारख्या धारदार पात्यांनी कापले गेले . माझे सर्व मामा उसाची शेती करतात आणि सांगली कोल्हापूर परिसर देखील उसाचाच पट्टा असल्यामुळे उसाच्या शेतातून चालण्याचा अनुभव मला आहे . आणि अंगाला कमीत कमी पाती कापली जातील अशा पद्धतीने चालण्याची युक्ती देखील मला माहिती आहे . परंतु इथली उसाची जातच वेगळी होती आणि त्याचा विस्तार देखील वेडावाकडा असल्यामुळे माझ्या तळ पायापासून मस्तकापर्यंत सगळीकडे त्या उसाने अनेक वार केले . 
त्या शेतातून कसाबसा बाहेर आलो तेव्हा संपूर्ण अंगावरती रक्तरंजित ओरखडे उठले होते ! आता इथून पुढे पुन्हा एकदा एक जंगल पार करायचे होते ! चंदन वेगाने त्या झाडीमध्ये घुसला आणि त्याच्या जाण्यामुळे तयार झालेल्या मार्गाचा लाभ घेत मी देखील घुसलो . दोघेही जणू काही त्या जंगलाशी वैर घेत चालल्याप्रमाणे आत शिरलो आणि साधारण तीनशे चारशे मीटर लांबीचे ते जंगल पार करत बाहेर पडलो . बाहेर पडलो मात्र मला कळायचेच बंद झाले ! त्याची देखील तीच अवस्था झाली ! दोघांनी आपापल्या झोळ्या फेकून दिल्या काठ्या फेकून दिल्या आणि थयथय नाचायला लागलो ! अहो ते सर्व खाज खुजली चे जंगल होते ! खाज खुजली ही वनस्पती इतकी बेकार आहे की तिच्या पानाला असलेले अतिसूक्ष्म काटे आपल्याला डोळ्यांना दिसत नाहीत .परंतु अंगामध्ये जागोजागी घुसतात आणि ते इतके बेकार टोचतात की आपण खाजवायला जातो . खाजवल्याबरोबर ते आपल्या शरीरामध्ये अजूनच खोल घुसतात आणि संपूर्ण शरीर प्रचंड खाजू लागते !आधीच ओरखड्यांनी भरलेले शरीर आता त्या शेकडो अतिसूक्ष्म काट्यांना बळी पडले !
खाज खुजली या वनस्पतीच्या छोट्यात छोट्या पानाला देखील असे काटे असतात .
खोडा वरची लव सुद्धा अतिशय काटेरी असते
या काट्याचे दोन भाग असतात . एक भाग वनस्पतीला चिकटून राहतो तर दुसरा भाग आपल्या शरीरामध्ये घुसतो जो विषारी असतो . 
वनस्पतीला स्वसंरक्षणासाठी निसर्गाने दिलेली ही यंत्रणा आहे .
लहानपणी मी बहुतेक इजा बिजा तीजा नावाचा लक्ष्मीकांत बेर्डे यांचा एक चित्रपट पाहिला होता . त्याच्यामध्ये तो दोघांच्या अंगावर खाज खुजली टाकतो आणि ते दोन लोक वेड्यासारखे अंग खाजवत लोळत सुटतात . तेव्हा ते दृश्य पाहून आम्ही लहान मुले फार हसलो होतो .परंतु आज अगदी तशीच अवस्था आमची झालेली मी स्वतः अनुभवली ! दोन्ही हातांनी आम्ही अंग खाजवत सुटलो . काही केल्या दहा कमी होई ना . मला असे वाटले की मैया मध्ये उतरल्यावर बरे वाटेल परंतु तिथे इतका बेकार भूप्रदेश होता की मैयामध्ये उतरताच येत नव्हते . चंदन म्हणाला आपण चिखल अंगाला लावूया म्हणजे बरे वाटेल . आम्ही मैयाच्या काठावरचा चिखल अंगाला लावायला सुरुवात केली परंतु तरीदेखील दाह कमी होईना . शेवटी चिखलामध्ये गडाबडा लोळायला सुरुवात केली . तरी देखील खाज वाढू लागली ! आता काही खरे नाही असा विचार करून आम्ही पुढे धावत सुटलो . नशिबाने एक आश्रम लागला . दास बापूंचा हा आश्रम होता . परमहंस योगानंद आश्रम असे त्याचे नाव होते .
हाच तो आश्रम
आश्रमाचे बांधकाम सुरू होते .आताही ते सुरू असलेले दिसते आहे .
या आश्रमामध्ये नवीन बांधकाम सुरू होते आणि आजूबाजूला कोणीच नव्हते . मैयाने आमची लाज राखली ! इथे गोशाळा होती आणि गाईंचे भरपूर शेण बाजूला काढून ठेवलेले होते . मी कुठलाही विचार न करता गोठ्या मध्ये गेलो आणि संपूर्ण अंगाला शेण फासले . गाईचे शेण फासल्याबरोबर सर्वांगाचा दाह हळूहळू शांत होऊ लागला . मी असा विचार केला की आपण शेण पासून उन्हात बसावे . म्हणजे वाळलेल्या शेणाबरोबर काटे बाहेर निघून येतील . आणि ती युक्ती यशस्वी ठरली . शेणासोबत सर्व काटे एक एक करून बाहेर पडले . आणि दाह थोडासा कमी झाला . त्यानंतर एका टाकीच्या  पाण्याखाली बसून मी स्नान केले . 
याच गोशाळेमध्ये जाऊन शरीर अक्षरशः शेणाने माखून घेतले
आम्ही हे सर्व करत असताना अतिशय मोठा आश्रम असूनही तिथे कोणीही नव्हते हे मला फार आश्चर्यकारक वाटले . इथे खरोखरच खूप बरे वाटू लागले . इथून पुढे कोणावरती असा प्रसंग आला तर त्यासाठी आधीच सांगून ठेवतो ही अंगाला खाज खुजली वनस्पती लागली आहे हे लक्षात आल्यावर अजिबात खाजवायला जाऊ नये तुम्ही जितके खाजवाल तेवढे ते काटे अजून आत शिरतात आणि खाज अधिक प्रमाणात वाढते . मला अक्षरशः असे वाटले होते की आता अंगावरचे कातडे फाडून काढावे इतक्या भयानक प्रमाणात खाज सुटली होती ! संपूर्ण शरीर लाल भडक पडले होते . चंदन तर रंगाने गोरापान असल्यामुळे टोमॅटो सारखा लाल झाला होता ! आम्ही सर्व खाज खुजली लागलेली वस्त्रे देखील तिथेच धुवून टाकली ! त्या आश्रमामध्ये आम्ही जेव्हा चिखल फासून आलो होतो तेव्हा जर कोणी पाहिले असते तर आम्हाला बाहेरच काढले असते ! इतका भयानक आमचा अवतार झालेला होता !झालेला प्रकार पाहून आम्ही दोघे हसत सुटलो ! अंग खाजवताना देखील स्वतःचे अंग खाजवताना होणाऱ्या वेदनेमुळे रडू येत होते .तर समोरच्या माणसाची झालेली अवस्था पाहून हसू येत होते .असे दोघांचेही झालेले होते ! चित्रपटातली गाणी म्हणण्याची आमची खुमखुमी मैयाने अशा रीतीने  आम्हाला खाज खुजलीच्या जंगलातून पार करून भागवली ! चित्रपटांमध्ये दोघांच्या अंगाला सुटलेली खाज पाहून लक्ष्मीकांत बेर्डे हसतो आणि जोरात म्हणतो , "आता कसं वाटतंय ! देखा मेरे खाज खुजली का कमाल ! " अगदी तोच डायलॉग आमच्या दोघांकडे बघून आज नर्मदा मैया मारते आहे असा मला भास झाला ! मैय्या मला म्हणत होती , " काठाने चालताना सुद्धा तुला सोबती हवा काय ! आणि तोही असला ? चित्रपटातली गाणी गाणारा ? अरे ज्याला अल्पकाळापुरत्या उचललेल्या परिक्रमेमध्ये सुद्धा इंद्रिय निग्रह करता येत नाही ,त्याची संगती तुला हवी कशाला ? भागली का चित्रपटातली गाणी गाण्याची खुमखुमी ? देखा मेरे खाज खुजली का कमाल ! " नर्मदा मातेला तिथूनच साष्टांग नमस्कार घातला आणि मनोमन तिला सांगितले की पुन्हा असा अपराध घडणार नाही. यानंतर मात्र शरीर एकदम थंड पडले जणू काही झालेच नव्हते अशी शांतता त्वचेच्या थराला जाणवू लागली . शरीरावर बाह्य आक्रमण झालेले असल्यामुळे तिथे मारामारी करण्यासाठी आलेल्या रक्ताच्या तांबड्या  पेशींनी आपले काम चोखपणे बजावले आणि मी पुढचा मार्ग धरला . 
या भागातील मैयाच्या किनाऱ्यावरील एक छायाचित्र . असंच काठाकाठाने चालत जायचं . तुम्हाला पाय ठेवायला मिळेल एवढी जागा मैया आपोआप तयार करते .

नर्मदा परिक्रमा करताना तुम्हाला अशा पद्धतीने उजव्या हाताला आश्रम आहे अशी पाटी दिसली की १००% ओळखून चालायचे की तुम्ही लांबचा मार्ग पत्करलेला आहे . काठावरून चालताना तुम्हाला आश्रमाच्या नावाच्या पाट्याच दिसत नाहीत . किंवा फार क्वचित दिसतात .
आणि जर पाट्या दिसल्याच तर उजव्या हाताला नर्मदा मैया असते आणि डावीकडे आश्रम आहे अशी पाटी दिसते . याच्यावरून आपल्याला कळते की आश्रम  मैय्याच्या काठापासून थोडासा आत मध्ये आहे .
वर उल्लेख केलेला खाज खुजलीचा प्रसंग घडण्यापूर्वी कांदरोज गावातून कार्तिक स्वामी आश्रम सोडल्या सोडल्या मला काही धार्मिक स्थाने आहेत असे आश्रमातील साधूने सांगितले होते .त्यामुळे ती पाहत पाहात मी पुढे गेलो . सर्वप्रथम एका डोंगरावर चढून गेल्यावर मार्कंडेश्वर महादेवाचे छोटेसे मंदिर होते . इथे मंदिरासमोरच दुमजली घर बांधून एक साधू राहत होता . परंतु साधू ने दाढी मिशा वगैरे काढलेले असल्यामुळे तो दिसायला सर्वसामान्य गृहस्था सारखा दिसायचा . राहतही तसेच होता . इथे मार्कंडेय ऋषींनी स्थापन केलेले शिवलिंग होते तसेच पाचही पांडवांनी स्थापन केलेली पाच वेगवेगळ्या आकाराची आणि वेगवेगळ्या प्रकारची शिवलिंग तिथे होती .
श्री मार्कंडेश्वर महादेव मंदिर कांदरोज गुजरात
श्री मार्कंडेश्वर महादेव
इथे साधूने आम्हाला मस्तपैकी लिंबू सरबत करून पाजले . माझ्यासोबत चंदन देखील इथे पोहोचला होता म्हणून आम्हाला म्हणालो . चंदनाने नुकतीच परिक्रमा चालू केलेली असली तरी देखील त्याची पूर्वीपासून वाढलेली दाढी त्याने तशीच ठेवली होती . त्यामुळे लोकांना बघताक्षणी तो साधू आहे असे वाटायचे . परंतु तो बोलायला लागला की जाणकारांना लक्षात यायचे की हा गृहस्थी आहे . या उलट आम्ही आज ज्याच्याकडे सरबत प्यायलो तो दिसायला गृहस्थ होता परंतु बोलल्या क्षणी कळायचं की हा साधू आहे ! सगळी गंमतच आहे !
इथून खाली आल्यावर एक माणूस भेटला . मी त्याला विचारले की इथे अजून बघण्यासारखे काय आहे .त्याने मला गावातच असलेल्या एका देवीचे नाव आणि एका टेकडीवर असलेल्या चोरिया डेडा अशा ठिकाणाचे नाव सांगितले . सिकोतर माता नावाची ही स्थान देवता होती .
शक्यतो स्थानिक देवदेवतांच्या मूर्ती थोड्याशा ओबडधोबड आणि भयावह असतात परंतु या देवीची मूर्ती फारच सुंदर होती . तिला अतिशय सुंदर असा साजशृंगार केलेला होता . देवीला सजविण्याची ही पद्धत मला आवडली आणि लक्षात राहिली . आपल्यालाही कधी एखाद्या देवीच्या मूर्तीला सजावट करण्याची संधी मिळाली तर आपणही अशीच सजावट करूया असे मी डोक्यात ठेवले .गुगलवर या देवीचे चित्र मला मिळाले .
देवीच्या आजूबाजूला भरपूर शस्त्रे दिसत होती . ती का ते लवकरच कळाले .
शिकोदरी माता
इथून पुढे तो मनुष्य स्वतः माझ्यासोबत आला आणि त्याने मला उजव्या हाताला एका टेकडावर असलेले ब्रम्हेश्वर महादेवाचे मंदिर दाखवले ! जसा हरिगिरी चा आश्रम होता तसे हे मंदिर होते !म्हणजे एक शिवलिंग सोडले आणि तोडफोड करून इतस्ततः फेकून दिलेल्या काही मूर्ती सोडल्या तर तिथे मंदिर नावाचा पदार्थ शिल्लक राहिलेला नव्हता ! अधिक खोदून चौकशी केल्यावर मला सांगण्यात आले की या भागातील मंदिर असलेली जमीन काही परधर्मीय लोकांनी विकत घेतली आणि हळूहळू मंदिर नष्ट केले आता फक्त शिवलिंग उरले आहे जे डोंगरावर फेकून दिलेले आहे . साक्षात महादेवांची कन्याशेजारी वाहत असताना महादेवांची ही अशी अवस्था झालेली पाहणारा समाज आपल्या देशामध्ये आहे हेच आपल्या वर्षानुवर्षांच्या पुनःपुन्हा गुलामगिरीत जाण्याचे मूळ कारण आहे . महादेवांची येथील अवस्था आपल्याला दाखविली तर आपल्याला देखील राग येईल ! हे नर्मदा पुराणा मध्ये उल्लेख असलेले तीर्थक्षेत्र आहे याची कृपया नोंद घ्यावी!
मंदिराचा भग्न चबुतरा अथवा जोते आणि भग्नमूर्ती
श्री ब्रह्मेश्वर महादेव तीर्थक्षेत्र (?)
 भयानक तोडफोडीतून वाचलेल्या आणि किरकोळ तोडफोड झालेल्या काही शिल्लक मूर्ती .
मूर्तींच्या आकारावरून आणि प्रकारावरून मंदिर साधारण किती समृद्ध असेल याचा अंदाज येतो आहे आता सध्या मात्र तिथे भग्न अवशेषांचे साम्राज्य आहे .
जाता येता एखादा केवट दोन-चार रानफुले तोडून वाहतो आणि नमस्कार करतो बास .तेवढेच काय ते सुरू आहे .
आपल्या अंतर्यामी असलेल्या मायेचा समूळ विनाश करून ब्रह्म काय असते ते दाखवणारे ब्रह्मेश्वर महादेव .
आपल्या पाचवीला पुजलेल्या मायेचा समूळ विनाश करून ब्रह्म स्वरूपाचा साक्षात्कार घडविणारे ब्रह्मेश्वर महादेव जर अशा अवस्थेमध्ये असतील तर उर्वरीत समाजाची अवस्था  काय विचारता !
या भागाला चोरीया डेडा असे म्हणतात असे मला ग्रामस्थांनी सांगितले .मी विचारात पडलो . हजारो लाखो परिक्रमावासी जात असून महादेवांना साधे चारच खांब आणि छप्पर  का मिळू नये ? असा कोणता जघन्य अपराध त्यांनी केला आहे ? नर्मदा खंडामध्ये गेल्या लाखो वर्षांमध्ये अक्षरशः लाखो मंदिरे उभी राहिली आहेत व आजही प्रतिवर्षी नवनवीन मंदिरे बांधली जात आहेतच . परंतु गेल्या काही शतकांपासून मंदिरे पाडणाऱ्या लोकांचे प्रमाण देखील वाढलेले आहे .सर्व धर्मांमध्ये जर समभाव असेल आणि समरसता असेल तर इतर धर्माची मंदिरे अशी पाडण्याचा अधिकार कोणीही कुणाला देऊच शकणार  . परंतु दुर्दैवाने असे घडताना दिसते आहे हे सखेद नमूद करावेसे वाटते .
केवळ एखादी गोष्ट मला मान्य नाही म्हणून दुसऱ्याला मी ती न करू देणे हा खेळ आपल्या देशामध्ये फार वर्षे सुरु आहे तो आता तरी बंद व्हायला हवा . समोरच्या व्यक्तीच्या मतांचा आदर करता येत नसेल तर किमान अनादर तरी करू नये . ब्रह्मेश्वर महादेवाचे ते खितपत पडलेले शिवलिंग काही केल्या माझ्या डोळ्यासमोरून जाईचना . इथल्या प्रशासनाने त्या जागेवर कोणाची मालकी आहे याचा अभ्यास करून किमान पाच फूट बाय पाच फूट आकाराचा चौथरा आणि छोटेसे मंदिर बांधून द्यावे अशी माझी मागणी आहे . आणि ती माझ्या मते अवास्तव नसून रास्त आहे . असो . 
असा सर्व घडामोडींनी भरलेला दिवस जसा जसा मावळू लागला तस तशी पावलांची गती वाढू लागली . आता पुढे कुठला पडाव येणार माहिती नव्हते . माझ्या पुढे निघून गेलेला चंदन एका केवटा सोबत गांजा ओढीत मस्तपैकी काठावर बसला होता .त्याला मी ब्रह्मेश्वर महादेवाची हकीकत सांगायचा प्रयत्न केला .परंतु त्यांना ऐकण्यात रस नाही असे मला जाणवले . हे आपल्या देशातील जनतेच्या विचारसरणीचे  प्रातिनिधिक चित्र मी पाहत होतो . जिथे मी जात नाही किंवा जे ठिकाण मला माहिती नाही तिथे एखादी चुकीची गोष्ट घडत असेल तर मी त्याला विरोध का करावा आणि कशासाठी करावा असे ठरलेले उत्तर बहुतांश लोक अशा प्रसंगी देत असतात . याचे उत्तर खरोखरीच व्यापक दृष्टिकोन प्राप्त झाल्याशिवाय देता येणार नाही हे उघड आहे .त्यामुळे मूळ प्रश्न आहे तो व्यापक जाणीवांचा . प्रत्येकाला आपल्या श्रद्धास्थानांचे पूजन अर्चन करण्याचा अधिकार निश्चितपणे असलाच पाहिजे. परंतु माझी उपासना पद्धती हीच सर्वश्रेष्ठ आणि तीच एकमेव असा दुराग्रह जर कोणी धरत असेल तर तो विषय गंभीर आहे . आणि त्यात देखील मी करतो आहे ते योग्य आणि बरोबर आहे आणि तुम्ही करत आहात ते अत्यंत पापकारक असल्यामुळे मी ते खपवून घेणार नाही अशी जर मानसिकता कोणी बाळगली असेल तर ती अजून जास्ती भयानक आहे . आपल्या देशात सध्या हाच मुख्य प्रश्न आहे . प्रत्येकाला आपापल्या उपासना पद्धतीच्या पालनाचा अधिकार आहे हे जरी बरोबर असले तरी बहुसंख्य लोकांना दुसरे काय करत आहेत याच्याशी काही देणे घेणे राहिलेले नाही . काही अल्पसंख्यांक मात्र बहुसंख्य लोक चुकीचे वागत आहेत असा भाव डोक्यात ठेवून त्यांची मते त्यांचे विचार यांच्यावर लादण्याचा प्रयत्न करत आहेत . मूर्तिपूजा तुमच्या धर्मामध्ये हराम असेल अर्थात निषिद्ध असेल याचा अर्थ मी ती करू नये असे तुम्ही मला सांगितले नाही पाहिजे . या भारत देशामध्ये जितकी परपंथ सहिष्णुता आहे तितकी जगातील अन्य कुठल्याही देशात नाही .तरीदेखील जर मूर्तीभंजन अथवा मंदिर भंजनासारखे अप प्रकार खुलेआम घडत असतील तर त्यावर कठोरातील कठोर कार्यवाही करण्याची खरोखरच नितांत आवश्यकता आहे . चालताना दोन गोष्टी माझ्या मेंदूवर घणाघण आघात करत होत्या . एका बाजूने छिन्नी हातोडा घेऊन एक मूर्तिकार अत्यंत एकाग्रतेने एक सुंदर मूर्ती घडवताना दिसत होता ! दुसऱ्या बाजूने एक नराधम त्या नाजूक मूर्तीवर तलवारीचा घाव टाकून तिचे तुकडे करत होता . यातील पहिला घाव अंतराचा ठाव घेणार होता तर दुसरा घाव रक्त रंजित होता . कुणीतरी पूर्वी इथे पुन्हा एकदा मंदिर बांधायचा प्रयत्न केला होता म्हणे . तो धेड समाजाचा होता . परंतु त्याला त्या प्रयत्नात यश आले नाही . त्यामुळे गावाने त्याला चोर ठरविले ! म्हणून या टेकड्याचे नाव चोरीया डेडा पडले ! 
भेटो कोणी येक नर । धेड महार चांभार ।
 त्याचे राखावे अंतर । या नाव भजन ॥
असे भजनाचे साधे सोपे सूत्र सांगणाऱ्या समर्थ रामदासांच्या विनंतीशी अत्यंत विसंगत असे हे वर्तन आहे . आहे की नाही गंमत ? आपला समाज पुरेसा दांभिक बनलेला आहे ! जे कार्य कोणीच करू शकत नाहीत ते कोणी करायला गेला तर त्याला चक्क वेडा ठरविला जातो किंवा चोर म्हणून हिणवले जाते . त्या डेडाला  अर्थात धेडाला जर थोडीशी जरी मदत गावातील कुणी केली असती तरी इथे पुन्हा मंदिर उभे राहिले असते ! परंतु त्यालाच चोर म्हणून शेवटपर्यंत जगावे लागले . हे सर्व काय गणित आहे याचा उलगडा करायचा प्रयत्न करत मी चालू लागलो . एकावेळी एकच पाऊल टाकत चालण्याचा लाभ असा होतो की मन वर्तमान काळात येते . आताही मी पुन्हा एकदा वर्तमान काळात आलो आणि एका एका पावलाला नाम घेत चालू लागलो . मैया कडे पाहू लागलो . मैया मला जणू सांगत होती अरे असे कित्येक "भ्रमेश्वर " आले आणि गेले , परंतु ब्रह्मेश्वर महादेवाची पिंड एक इंच सुद्धा कोणाला हलवता आलेली नाही ! योग्य वेळ आली की तिचाही उद्धार होईल ! जसा अयोध्या नगरीचा झाला ! जसा द्वारकेचा झाला ! जसा काशी विश्वेश्वराचा झाला ! वाराणसी ही तर साक्षात मोक्ष नगरी आहे ! परंतु तिला देखील हे सर्व सोसावे लागले ! भोगावे लागले ! शिवछत्रपतींच्या शिकवणीनुसार आणि त्यांच्या शेवटच्या इच्छेला अनुसरून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी तिचा जीर्णोद्धार केला नसता तर आज तिची अवस्था देखील ब्रम्हेश्वरासारखीच नसती काय? आजही वाराणसी क्षेत्र मुक्ती क्षेत्र म्हणूनच प्रसिद्ध आहे . परंतु यामागचे रहस्य काय आहे माहिती आहे का तुला ? अरे स्वतः देवाधिदेव महादेव सांगतात रे ! की त्या रामाचे नाव सतत घेतल्यामुळेच काशी नगरी मुक्ती क्षेत्र झाली !
नामाचा महिमा जाणे शंकर । जना उपदेशी विश्वेश्वर । वाराणसी मुक्ती क्षेत्र । रामनामे करुनी ॥
तस्मात बाकी सर्व सोडून दे आणि केवळ रामाचे नाव घे . आणि खरोखर प्रत्येक पावलाला माझा राम नामाचा जप सुरू झाला . हळूहळू तो वैखरी मध्ये आला . भान हरपल्यासारखे नामस्मरण आपोआप सुरू झाले . चुंबकाच्या जवळ आल्यावर लोखंड जसे आपोआप खेचले जाऊ लागते तसे काहीतरी आतून होऊ लागले .मी साक्षी भावाने सर्व पाहत होतो . अनुभवत होतो .
माझे तिथे असणे अनुभवत होतो .गावाचे नाव ही मला तेच सुचवत होते .  "असा " जिथे कुठे असाल तिथे फक्त "असा ". नाम घेत  "असा " . श्रीराम जय राम जय जय राम । श्रीराम जय राम जय जय राम ।सीताराम सीताराम ।सिताराम सिताराम । नर्मदे हर नर्मदे हर !





लेखांक एकशे एक समाप्त (क्रमशः )
 

टिप्पण्या

  1. नर्मदे हर🙏🙏🙏🙏🙏 प्रतिक्षेतच होती कधी समोरील भाग येईल असेच वाटत होते. आपल्या व्यस्त दिनचर्येत वेळ काढून आपण करता म्हणून कधी येईल विच्यारायला संकोच वाटत होता. नर्मदे हर🙏🙏🙏🙏🙏

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. ज्या लेखाच्या सुरुवातीला आणि शेवटी अपूर्ण असे लिहिलेले आहे तो कृपया संपूर्ण झाल्याशिवाय वाचू नये नाहीतर अर्धवट वाचणे होईल

      हटवा
  2. नर्मदे हर🙏🙏🙏🙏🙏

    उत्तर द्याहटवा
  3. धन्यवाद दादा नर्मदे हर🙏🙏🙏🙏🙏

    उत्तर द्याहटवा
  4. मी लेखाची आतुरतेने वाट पाहत असतो एखाद्या दिवशी नवीन लेख आला नाही तर चुकल्या सारखे वाटते

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

जे आवडते सर्वांना ...

अनुक्रमणिका

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

लेखांक १ : नर्मदे हर !

लेखांक २ : भोपाळ जवळच्या जंगलातील अपघात

लेखांक ३ : चोराची धन

लेखांक ४ : झुठा कही का ! सबकुछ तो लाए हो !

लेखांक ५ : ग्वारीघाट जबलपुर मध्यप्रदेश

लेखांक ८३ : महाराष्ट्रात प्रवेश आणि भाबरीचे भेदक भिल्ल-महात्मा फोदला गारद्या पावरा

लेखांक ७४ : लेपा बांध , वेदा संगम , कठोरा अन् मांडव्य गुंफा

लेखांक ९० : गुजरात मधील कणजी चे सान्सुभाई तडवी आणि अरण्यव्याप्त माथासर