लेखांक १०० : ओरी येथील अखिलेश्वर महादेव गुरुधाम आश्रम आणि वल्लभ दादा विष्णुदास

वाळूचा एवढा भव्य दिव्य किनारा क्वचित पहायला मिळतो .जिकडे पहावे तिकडे वाळूच वाळू ! इथली वाळू थोडीशी काळसर रंगाची होती . काळ्या रंगाची वाळू अधिक भुसभुशीत असते असे निरीक्षण मी केले . काळा रंग बहुतेक वाळूमध्ये मिसळलेल्या मातीमुळे येत असावा . त्यामुळे अशी वाळू ओली झाली की त्यात पाय पटकन घुसून जातो . विशेषतः नर्मदा मातेच्या प्रवाहाला भूमिगत पद्धतीने येऊन मिळणारे काही ओढे नाले आहेत तिथे तुम्हाला काळा पट्टा स्पष्ट दिसतो . इथे वाळूचा मोठा किनारा असल्यामुळे प्रचंड प्रमाणात लोकांनी आपापले रस्ते तयार केले होते . समोर चाणोद नावाचे गाव दिसते . तिथे त्रिवेणी संगम असल्यामुळे भरपूर गर्दी दिसत होती . 
नीलकंठ धाम स्वामीनारायण मंदिरापासून नर्मदा मातेच्या प्रवाहापर्यंत जाण्यासाठी वाळूतून असे असंख्य रस्ते तयार केलेले दिसतात . इथे अखंड गाड्या नावे पर्यंत सोडण्यासाठी पळत असतात . 
नर्मदा मातेच्या काठाने चालताना अनेक प्रकारचे देवदेवता आपल्याला दिसतात . स्थानिक आदिवासी लोकांचे काही देव नर्मदे काठी स्थापन केलेले दिसतात . 
अशाच एका महिषासुर किंवा भेसासुराचे दर्शन घेऊन पुढे निघालो . 
 भेसूरसा भासणारा भीतिदायक भव्य भेसासुर भगवान ! 
इथून पुढे मैयाचे वळण पूर्ण होते आणि त्यामुळे पुन्हा एकदा उभा किनारा लागतो . इथे श्रीरंग सेतू नावाचा एक पुल लागला . या भागात मैयाचे पात्र खूप विस्तृत झालेले आहे . सर्वत्र भरपूर वाळू असल्यामुळे एका बाजूने मैया वाहते . या पुलाखाली क्षणभर बसलो .
श्रीरंग सेतू पुलावरून होणारे मैया च्या पात्राचे भव्य दिव्य दर्शन ! जिकडे पाहावे तिकडे वाळूच वाळू आहे .
पाण्याची पातळी कितीही वाढली तरी वाळू मात्र असतेच ! 
मैया च्या पात्रामध्ये जेवढी वाळू आहे तेवढीच काठावर दाट झाडी आहे . त्यामुळे मधूनच एका पावलाची वाट शोधून चालावे लागते . 
या पुलाच्या पुढे साधारण इतक्याच अंतरावर मी आलो असेन . इथे एक केवट माझ्याशी गप्पा मारू लागला . 
या भागातील नवा साधारण अशा आहेत . नर्मदा मातेच्या काठावर प्रत्येक टप्प्यामध्ये वेगळ्यावेगळ्या आकाराच्या आणि प्रकाराच्या नावा दिसतात .
इथे नळेश्वर महादेवाचे मंदिर आहे . मी क्षणभर डावीकडे असलेल्या मातीच्या भिंतीला टेकून बसलो होतो . इतक्यात पिवळ्या रंगाची लुंगी नेसलेला टक्कल पडलेला आणि दाढी नेसलेला एक साधू माझ्याकडे पाहत हसत हसत येत आहे असे मला दिसले . चेहरा ओळखीचा वाटत होता ! परवा श्री स्वामी रामानंद संत आश्रम गुवार येथे स्नान करताना मला जे परिक्रमा वासी भेटले होते त्यांच्यामध्ये हा देखील होता ! हा होता चंदन अथवा चेतराम मेहरा भगत ! जबलपूरच्या दक्षिण तटावर भिकमपूर मध्ये ११६ वर्षे जुन्या धर्म शाळेमध्ये मी मुक्काम केला होता तिथे याची माझी गाठ पडली होती !तुम्हाला आठवत असेल तर रात्री गांजा पिऊन भजन करी मंडळी आली होती आणि त्यांनी हसून हसून माझी पुरेवाट केली होती पहा , त्यांच्यामध्ये शुद्धीवर असलेले आम्ही दोघेच जण होतो ! चेतराम भगत आणि मी ! त्याचे ते सुहास्य वदन माझ्या चांगले लक्षात राहिले होते ! त्यावेळीच चेतराम अथवा चंदन याने माझ्याकडून परिक्रमे विषयी काही माहिती जाणून घेतली होती . मी त्याला आवर्जून सांगितले होते की काठाने चालण्यात आनंद आहे . त्याप्रमाणे हा नंतर परिक्रमेला निघाला तो अगदी काठाकाठाने चालला . हा इतका जबरदस्त होता की संपूर्ण शूल पाण्याची झाडी हा काठाने आला ! तिथे रस्तेच नाहीत , घरे नाहीत ,माणसे नाहीत , नावा नाहीत , सेवा नाही , काहीही नाही अशा भयंकर परिस्थितीमध्ये त्या तीव्र उताराच्या डोंगरकड्यांवरून हा कसा काय आला असेल हे फक्त त्याला आणि मैयालाच माहिती ! दोन-तीन वेळा तो मरता मरता वाचला . एकदा एका डोंगराच्या कड्यावरून तो वेगाने चालला होता . उजव्या बाजूला तीव्र उतार आणि खोल दरी होती . इथे आपण पाहिले की एकही झाड उरलेले नाही त्यामुळे उघडा बोडखा डोंगर आणि पायाखाली बारीक मुरूम होता . अचानक याचा पाय उजव्या बाजूला सटकला आणि हा दरीमध्ये पडू लागला . आता हा दरीमध्ये पडून जागेवर गतप्राण झालाच असतात इतक्यात याने नर्मदे हर असा पुकारा केला . दरीतून अतिशय वेगाने एक वाऱ्याचा झोत आला आणि हा पुन्हा जागेवर आला ! असे अजून दोन-तीन भयंकर अनुभव याला आले ! हा अनवाणी चालत होता हे विशेष ! ज्याने अतिशय सुयोग्य पद्धतीने आणि मार्गाने परिक्रमा पकडली होती ! गोरापान वर्ण ,पिंगट घारे डोळे , सोनेरी झाक असलेले केस , किडकिडीत शरीरयष्टी , कोणालाही लक्षात राहील असे अत्यंत मनापासून विलसत असलेले स्मितहास्य , कपाळावर आणि डोळ्यांच्या बाजूला पडलेल्या सुरकुत्या , आणि मुखाने सतत नर्मदा मातेचे गुणगान ! चेतराम भगत कायमचा लक्षात राहिला ! याला गप्पा मारायची खूप हौस होती ! त्यामुळे मी त्याला सतत पुढे किंवा मागे ठेवायचो . याने आयुष्यात बरेच उद्योग केले होते . काही वर्षं गोव्याला देखील राहिला होता . घरी पत्नी मुलेबाळे सर्व होते . परंतु ते सर्व सोडून हा भीकमपूर येथे आश्रमात सेवा करत असे . अचानक लहर फिरली आणि याने परिक्रमा उचलली ! परंतु तो ज्या मार्गाने आला होता तो मार्ग अतिशय कठीण आणि दुर्लंघ्य होता . 
मध्ये एक श्री गांडी आश्वर माता मंदिर आहे . गांडी म्हणजे गुजराती भाषेत वेडी .
जय माता दी!
उजव्या हाताला नर्मदा मातेचे पात्र लहान लहान होताना दिसू लागले आणि प्रचंड वाळूचा साठा दिसू लागला .हे व्यास बेट नावाचे एक पुरातन बेट आहे .
 मोलेथा गावाच्या हद्दीमध्ये येणारे व्यास बेट
बेटावर थोडीफार झाडी आहे आणि महादेवाचे मंदिर आहे
श्री व्यासेश्वर महादेव मंदिर . दुर्दैवाने हे बेट नर्मदा मातेच्या प्रवाहामध्ये असल्यामुळे परिक्रमा येथे जाता येत नाही .
ओम श्री व्यासेश्वराय नमः ! वाचकांना दर्शन व्हावे म्हणून फोटो टाकले . आपल्या सोबत माझेही दर्शन घडले !
अजून थोडेसे अंतर पुढे गेल्यावर कर्जन नावाची नदी आडवी आली . नदीचे पात्र चांगलेच मोठे होते . आणि भरपूर पाणी ही नदी मैया मध्ये आणून सोडत होती . 
हे रुंड नावाचे गाव होते आणि इथे जलाराम महाराजांचा आश्रम होता . परंतु मी पुढे जाण्याचा निर्णय घेतला आणि चंदन देखील माझ्यासोबत पुढे आला .
हा परिसर मोठा सुंदर होता . उजव्या हाताने नर्मदा माई वाहात येत होती . 
डाव्या हाताने कर्ज नदी वाहत येत होती .
दोघींच्या संगमांच्या पार्श्वभूमीवर व्यास बेट मोठे सुंदर दिसत होते .  नर्मदा मातेला येऊन मिळणाऱ्या नद्या शक्यतो तिच्यामध्ये लगेच विलीन होऊन जातात . परंतु आपण वरील चित्र नीट पाहिले तर आपल्या लक्षात येईल की कर्जन नदीचे पाणी नर्मदा मातेच्या पात्रामध्ये आतपर्यंत घुसले असून नर्मदा मातेचे पाणी एका कडेने वाहत आहे !
याचाच अर्थ ही नदी प्रचंड खोल आहे हे आपण ओळखून घ्यायचे ! त्यामुळे ही नदी चालत पार करण्याचा विचार मी सोडून दिला . सुदैवाने एक केवट आम्हाला बघून तिथे आला आणि त्याने आम्हाला पार करविले . खूप आग्रह करूनही त्याने आमच्याकडून काहीही घेतले नाही . फक्त माझ्या मुलाबाळांवर आशीर्वाद असू द्या असे मागणे मागितले ! विचार करून पहा किती मोठी कमाई करत असेल हा ! कारण येणारा प्रत्येक परिक्रमावासी याच्या मुलाबाळांना आणि याला आशीर्वाद देऊनच पुढे जातो !
करजण नदी पार करण्यासाठी नावे मध्ये बसणारे परिक्रमावासी
नदीच्या पाण्यावर प्रदूषित तवंग दिसतो आहे . एका नावेत बरेच परिक्रमावासी बसवून नेले जातात .नाव उलटणे वगैरे दुर्घटना सुदैवाने परिक्रमावासींच्या बाबतीत होत नाहीत ही नर्मदा मातेची कृपाच आहे .
थोडे अंतर चालल्यावर डावीकडे वर जाणारा जिना आणि मंदिर दिसले . वरती गेल्यावर कळाले की हे शुकदेव मंदिर आहे .  सुंदर अशी जुन्या प्रकारची तटबंदी मंदिराला होती . पुरामुळे थोडी पडझड झालेली दिसत होती . परंतु मंदिर छान होते . आत खूप शांतता होती .
 शुकदेव मंदिराचे महाद्वार ,तटबंदी आणि घाट
मंदिर छान आहे
मंदिरातील कासव खूप सुंदर आहे . मंदिरात एक नजारा आहे आणि ध्यानस्थ योग्यांच्या मूर्ती भिंतीवर लावलेल्या आहेत .
येथील महादेवाचे दर्शन घ्यावे . जलहरी सुंदर नक्षीकाम केलेली आहे . आपल्या डोक्यामध्ये शिवलिंग म्हटले की गोल गरगरीत शिवलिंगाचे चित्र असते . परंतु नर्मदा खंडामध्ये विविध आकाराची वेडीवाकडी शिवलिंगे सुद्धा आढळतात .
मध्येच एक अविचल आश्रम नावाची कुटी आहे जिथे उडणाऱ्या हनुमंताची अतिशय सुंदर मूर्ती आहे ! दास मारुती पाहिला , वीर मारुती पाहिला , अगदी झोपलेला मारुती सुद्धा प्रसिद्ध आहे . परंतु उडणाऱ्या हनुमंताची  मूर्ती दुर्मिळ आहे !
इथे हळूहळू पायाखालची जागा कमी होऊ लागली .
काठाने चालताना मध्ये भयानक झाडी लागली . अशी झाडी लागली की मी त्यामध्ये बिनधास्त घुसायचो . झाडे काही पक्की नसतात . त्यांच्या फांद्या आजूबाजूला हलू शकतात . आपल्या शरीराच्या वजनाने किंवा हाताने त्या बाजूला करून पुढे पुढे जात राहिले की मार्ग निघतो . प्रश्न काटेरी झाडांचा येतो . त्यातही आपण जर त्या झाडाला काहीही न करता सरळ जात असून तर झाडाचे काटे आपल्याला त्रास देत नाहीत :उदाहरणार्थ बाभळीचे काटे सरळ असतात . ते फक्त अंगावर ओरखडे ओढतात परंतु घुसत नाहीत . जाणाऱ्या माणसाला अडविणारी वनस्पती एकच आहे ती म्हणजे बोरीची वनस्पती .बोराचे झाड अतिशय बेकार ! त्याचे काटे उलटे असतात . त्यामुळे ते आपल्या अंगामध्ये घुसतातच घुसतात . गुजरात मध्ये तर अशी बोराची झाडे मी पाहिली ज्याला दोन काटे उलटे आणि एक काटा सुलटा आलेला आहे ! म्हणजे तुम्ही काहीही करा तुम्हाला ते घुसणारच ! बोरीच्या झाडापासून लांब जाऊ नये त्याच्या जवळ गेले की काटे निघतात . पायाला सराटे त्रास देतात . ते काही ठराविक अंतरावर थांबून झटकून टाकावेत . ही खरे तर बीज प्रसार करण्याचीच त्यांची युक्ती असते . त्यामुळे मी खडक आला की बिया झटकायचो म्हणजे त्या लवकर उगवत नाहीत .
असे सरळ काटे असणारी वनस्पती दिसली की बिंधास्त निघून जावे . कारण ती तिच्याजवळ जाताना टोचते परंतु दूर जाताना आपल्याला काहीच करत नाही .
बाभळीचे काटे चिकटवून घर तयार करणारी एक पतंगाची अळी आहे . ही देखील तिथे दिसली . 
सुबाभूळ एका विशिष्ट आकारापेक्षा मोठी झाली की तिचे काटे कमी होतात . लहान झाडांनाच संरक्षणासाठी मोठे मोठे काटे येतात . 
बोरीचा काटा मात्र उलटा असतो . ही बोरीची अशी जात आहे जिचा एक काटा उलटा आणि एक काटा सरळ आहे . गुजरात मध्ये अशा बोरी खूप पाहिल्या . 
मध्ये एक मणीनागेश्वर महादेवांचे मंदिर लागले . छोटेसेच मंदिर होते आणि निर्मनुष्य परिसर होता .
एक अतिशय चिखलाने भरलेला ओढा ओलांडत पाटणा नावाच्या गावामध्ये आलो . पुन्हा जंगल सुरू झाले .
मध्ये प्रचंड दाट झाडी होती आणि तिथून कधी कोणी गेले नव्हते . मग आम्ही हातातील दंडाचा वापर करून थोडीशी वाट करायचो .
अशा रीतीने झाडी बाजूला करत आम्ही दोघांनी बरीच मार्गक्रमणा केली . एक ठिकाणी तर इतके भयंकर पाण गवत उगवले होते की विचारू नका . आम्ही त्याच्या मधून रस्ता काढला आणि एक भुयार आम्हाला सापडले . गवतामध्येच कोरलेल्या त्या भुयारातून गेल्यावर आम्ही पाण्याच्या मोटर्स पाशी आलो . पाण्याच्या मोटर चोरीला जाऊ नयेत म्हणून अशा विविध युक्त्या शेतकरी करतात ! तिथून बाहेर पडल्यावर बऱ्यापैकी कठीण मार्गाने चालत आम्ही पुढे जात होतो . इतका डावीकडे मला वरती जाणाऱ्या पायऱ्यांचा घाट दिसला . म्हणून मी अर्धे अंतर वर गेलो . त्यानंतर लक्षात आले की अर्धा घाट तुटून खाली पडला आहे . आणि साधारण सात आठ फुटावर पुन्हा सुरू झाला आहे . मला काय झाले माहिती नाही , मी मागे सरकलो आणि धावत येत अतिशय जोरात उडी मारून पलीकडचा घाट पकडला आणि वर चढलो ! वरती एक आश्रम होता . परंतु बराच आवाज दिला तरी कोणी ओ न दिल्यामुळे मी पुन्हा खाली आलो . आता मात्र उतरताना भीती वाटू लागली . कारण तोल गेला असता तर गडगडत जाऊन थेट मैया मध्ये पडलो असतो . परंतु हिम्मत करून मी उडी मारली आणि पार झालो . मी पुन्हा एकदा विचार करतो की आता जर मी तिकडे गेलो तर मला अशी एवढी कठीण उडी मारता येईल का ? त्याचे उत्तर नाही असेच आहे ! माहिती नाही परिक्रमेमध्ये असतानाच काय शक्ती आपल्या अंगात संचारते ! चेतराम वैतागून पुढे निघून गेला होता . 
हाच तो वर जाणारा जिना . मध्ये पायऱ्या तुटल्या होत्या . 
नंतर कळाले की हा स्वर्ग आश्रम नावाचा एक आश्रम होता . तिथल्या साधूंचे संग्रहित छायाचित्र .
समोरची झाडी दिसत आहे तिथून आम्ही काठाकाठाने चालत आलो .
मार्गात एकतर झाडी होती नाहीतर प्रचंड चिखल होता . परंतु पार झालो हे निश्चित ! अशा चिखलापासून सावध राहावे . पाय एकदा रुतला की लवकर निघत नाही . सरदार सरोवर धरणातून पाणी सोडले की इथली पातळी लक्षणीयरीत्या वाढते आणि वाहून गेले की कमी होते . त्यामुळे असा चिखलाचा पट्टा तयार होतो . 
इथे मैया खूप शांत व सुंदर आहे . 
तिच्या सौंदर्याचा आनंद घेत पुढे पुढे जात असताना अचानक उजवीकडे नर्मदा मातेच्या प्रवाहामध्ये काहीतरी दिसले म्हणून मी उजवीकडे गेलो . तर इथे कोणीतरी मझार किंवा कबर बांधण्याचा प्रयत्न प्रवाहाच्या मध्येच केलेला आहे . 
नर्मदा पात्रामध्ये बांधलेली मजार . 
मी चालत गेलो तेव्हा इथे थोडेसे कमी पाणी होते . नकाशामध्ये थोडे अधिक पाणी दिसत आहे .
मुळात कबर बांधण्यासाठी शव पुरलेले असणे आवश्यक आहे . आणि नर्मदेला माता न मानणाऱ्या व्यक्तीचे शव पात्रामध्ये पुरता येणे शक्यच नाही . मग अशा प्रकारचे भूसंपादन कशाच्या बळावर केले गेले आहे याची कृपया गुजरात सरकारने चौकशी करावी . हळूहळू इथे एखादे मोठे प्रार्थना स्थळ बांधले जाऊ शकते . त्याचा परिक्रमा वासीना त्रास होणार हे निश्चित आहे . इथून थोडेसे पुढे गेल्यावर डाव्या हाताला प्रचंड मोठ्या कॉंक्रीटच्या भिंती बांधलेल्या दिसल्या . आणि त्या महापुरामुळे ढासळल्या होत्या हे देखील लक्षात आले . इथून वर जाणारा एक घाट होता . त्याच्या देखील पायऱ्या सटकल्या होत्या . कसा बसा तो पार करत वरती गेलो . डाव्या हाताला पिण्याच्या पाण्याची सोय होती . दुपारची वेळ झाली होती आणि कडकडून भूक लागली होती . वरती आश्रम आहे असे एका गावकऱ्यांनी सांगितले . वरती गेलो आणि पाहिले तर अतिशय सुंदर असा आश्रम येथे होता ! श्री अखिलेश्वर महादेव नावाचे मंदिर होते . आश्रमातून नर्मदा मातेचे पात्र अतिशय सुंदर आणि भव्य दिव्य दिसत होते . नर्मदे हर चा पुकारा केल्यावर एक वयस्कर साधू बाहेर आले . यांचे नाव वल्लभ दादा . खणखणीत आवाज स्पष्ट शब्द उच्चार आणि रोखठोक भाषा ! वरवर पाहता स्वभावाने कडक आणि रुक्ष वाटणारा हा मनुष्य आतून फणसासारखा मधुर आणि हळुवार होता ! त्याने आम्हाला दोघांना भोजन करणार का असे विचारले . नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता ! परंतु इथे फारसे परिक्रमावासी येत नसल्यामुळे भोजन तयार करून ठेवले जात नसे . त्यांनी लगेचच एका मातारामला हाक मारली आणि तिने लगबगीने स्वयंपाकाला सुरुवात केली . या आश्रमात जे गुरुजी प्रेमानंद स्वामीजी  संस्थापक म्हणून होते ते यात्रेला गेले होते . त्यांची शिष्या असलेल्या एक साध्वी देखील त्यांच्यासोबत गेल्या होत्या .त्यांच्या अपरोक्ष वल्लभ दादा हा आश्रम चालवीत होते .
आधी वल्लभ दादा थोडेसे शिष्ठपणे वागले . परंतु थोड्याच वेळात आमच्या गप्पा सुरू झाल्यावर त्यांना आम्ही दोघे इतके आवडलो की त्यांनी आम्हाला एक स्पेशल खोली करून तिथे दोघांची राहण्याची व्यवस्था करून दिली ! आणि आज इथून जायचे नाही तर इथेच मुक्काम करायचा अशी प्रेमळ तंबी देखील दिली !
आश्रमातील प्रेमानंद स्वामीजींचे निवासस्थान .
या गोल पायऱ्यांवर उभे राहिले की समोर महादेवाचे मंदिर दिसते .
गोल पायरीवर उभे राहिल्यावर दिसणारे अखिलेश्वर महादेवाचे मंदिर जे  भुयारामध्ये आहे .
श्री अखिलेश्वर महादेवाची अतिशय सुंदर अशी पूजा वल्लभ दादा रोज करायचे .
या एकाच मंदिरामध्ये अनेक देवतांची उपमंदिरे होती आणि सर्वच देवदेवता अतिशय सुंदर होत्या . तसेच मंदिरातील स्वच्छता देखील नजरेत भरण्या सारखी होती . 
मंदिरापाशी उभे राहिले की खाली घाट दिसायचा .
पावसाळ्यामध्ये नर्मदा मातेचे पात्र संपूर्ण भरून वाहते . जिथे आपण उभे आहोत तिथपर्यंत पाणी आलेले असते . 
इथूनच आपण चालत आलो . 
हा घाट लागेपर्यंत काठाने चाललो आणि मग वरती आलो .
आपण जसजसे समुद्राच्या जवळ जातो तसतसा हळूहळू नौकांचा आकार मोठा होत जातो .
ओरी घाटावरील नौका .
हे पाटणा गावाचेच जुळे गाव ओरी नावाचे गाव होते .
इथे गावामध्ये एक छोटेसे स्वामीनारायण मंदिर देखील आहे . ते देखील मी पाहून आलो .
हे जगातील सर्वात छोटे स्वामीनारायण मंदिर असावे !
खालून वरपर्यंत लाखो रुपये खर्च करून उभी केलेली काँक्रीटची ' रिटेन्शन वॉल ' किंवा धारण करणारी भिंत महापुरात वाहून गेल्यामुळे हा भाग धोकादायक झाला असून इथे लोकांनी जाऊ नये म्हणून तात्पुरत्या तारा बांधण्यात आलेल्या आहेत . मी गेलो तेव्हा या तारा नव्हत्या सर्व मोकळे होते .
हा अन्नदानाचा हॉल असून इथे दर पौर्णिमा अमावस्येला कन्याभोजन चालते . परिसरातील झाडून सर्व मुली इथे त्या काळात जेवायला येतात .
आश्रमात सुंदर बागबगीचे केलेले असून या झाडांच्या मागीलपलेली जी खोली आहे तिथेच आमची मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली होती .
स्वामीजींच्या हॉल मधून परिसर सुंदर दिसायचा . इथे आत मध्ये कोणालाच प्रवेश नव्हता परंतु वल्लभ दादा यांनी अतिशय उदारपणे आणि प्रेमळपणे आम्हाला सर्व आश्रम फिरवून दाखवला . 
आम्हाला चक्क इथे देखील जाण्याची परवानगी मिळावी ! स्वच्छ भारत अभियान की जय हो !
तसे पाहायला गेले तर परिक्रमावासी इथे उतरतात .
वल्लभ दादांनी मोठ्या प्रेमाने आम्हाला पोटभर जेवू घातले !भरपूर साजूक तूप तसेच तांब्या तांब्या मही अर्थात ताक दोघांना पाजले ! या ताकाला अक्षरशः अमृताची गोडी होती ! सर्वच पदार्थ अप्रतिम झाले होते ! आता दुपारी चालायचे नव्हते त्यामुळे आम्ही अंमळ जास्तच जेवलो ! वल्लभ दादा देखील प्रचंड आग्रह करून वाढत होते ! परिक्रमावासींची सेवा करण्यामध्ये त्यांना अतिशय आनंद मिळत होता असे माझ्या लक्षात आले ! प्रत्येक तरुण मुलाला ते मेरा बेटा असे म्हणायचे ! त्यामुळे वाढताना , "मेरा बेटा आज खाना क्यू नही खा रहा ?" किंवा ," मेरा बेटा आज इतना कम क्यू खा रहा है ? " असं सारखं म्हणायचे ! स्वयंपाक करणाऱ्या मातारामना देखील आम्ही खूप खूप धन्यवाद दिले . यांचे कुटुंब इथे केवळ स्वयंपाक करण्यासाठीच ठेवले होते . त्यांना आम्ही राहत होतो त्याच्या मागच्या बाजूला एक स्वतंत्र घर बांधून देण्यात आले होते . असा मोठा आश्रम आला की कपडे धुण्याचा महत्त्वाचा कार्यक्रम करून घ्यावा लागायचा ! सुदैवाने कपडे वाळणे हा नर्मदा खंडामध्ये अतिशय सहज सोपा विषय आहे . 
दुपारी जेवण झाल्यावर खोलीमध्ये झोपण्याच्या ऐवजी हे दृश्य जिथून दिसते आहे अशा एका झाडाखाली आम्ही वल्लभ दादांच्या सूचनेनुसार आधी सडा घालून ती जागा गार करून मग वामकुक्षी केली . तो अनुभव अविस्मरणीय असा होता ! नर्मदा मातेचे अतिशय सुंदर दर्शन इथून होते !

वल्लभ दादा बराच वेळ इथे आमच्याशी गप्पा मारत बसले . या साधूला माणसांची अतिशय आवड होती असे माझ्या लक्षात आले . बरेच दिवस काठाने कोणीच न गेल्यामुळे इथे कोणी राहायला आले नव्हते असे त्यांनी आम्हाला सांगितले . अर्थात त्याचे कारण आम्हाला माहिती होते . कारण आम्हाला जे मध्ये बेकार असे जंगल लागले होते ते शक्यतो कोणीही पार करणे अवघडच होते .शुद्ध मराठी भाषेत सांगायचे झाले तर आमच्या आगाऊपणामुळे आणि मैयाची इच्छा असल्यामुळेच आम्हाला ते पार करता आले होते . ह्या वल्लभ दादांचा गिरनार पर्वतावर एक आश्रम आहे . तिथल्या गमती जमती ते आम्हाला सांगू लागले . इथे यांच्या आश्रमामध्ये सिंह येऊन निवांत बसलेले असतात . त्यांनी मला अनेक व्हिडिओ दाखवले जे स्वतः त्यांनी त्यांच्या मोबाईलवर घेतले होते . त्या आश्रमाच्या आजूबाजूला व्हरांडया मध्ये वगैरे सिंह अतिशय निर्भयपणे फिरत असतात . रात्री दारात कुत्रा बसून राखण करतो तशा पद्धतीने सिंह बसून राखण करताना यांनी अनेक वेळा पाहिलेले आहे . आणि त्याचे व्हिडिओ देखील त्यांनी आम्हाला दाखवले . संध्याकाळी आम्ही मस्तपैकी मंदिरातील सर्व देवांच्या आरत्या केल्या . वल्लभ दादांना सगळं पूजेची चांगली आवड होती त्यामुळे आश्रमातच फुललेल्या विविध फुलांच्या मदतीने ते सर्व देवांची सुंदर अशी पूजा मांडायचे . इथे मी पूजेच्या आधीच शंख वाजवल्यामुळे ते माझ्यावरती चिडले . इथे शंख हा अतिशय गांभीर्यपूर्वक केवळ तीन वेळा आणि तोही आरतीच्या आधीच वाजवला जातो . नंतर त्यांनाच वाईट वाटले आणि ते मला म्हणाले की पूजा सुरू व्हायच्या आधी तुला शंख वाजायला देतो . त्याप्रमाणे योग्य वेळी त्यांनी मला शंख दिला आणि तो मी भरपूर वेळ वाजवल्यामुळे त्यांना खूप आनंद झाला ! रात्री पुन्हा एकदा सुग्रास  प्रसादीचा आनंद आम्ही घेतला .  वल्लभ दादा अतिशय प्रेमळ स्वभावाचे होते .परिक्रमे नंतरही कधी त्यांच्याशी फोनवर बोलले तरी ते अविरत आनंदाश्रू ढाळत ! व्हिडिओ कॉल करून संपूर्ण आश्रमाचा परिसर , त्यांनी केलेली पूजा आणि मैया चे दर्शन घडवत ! गिरनारला असताना फोन लागला तर सिंह दाखवत !
आपणही कधी सहज त्यांना फोन करून चौकशी करावी त्यांना खूप बरे वाटेल ! तो मनुष्य प्रेमाचा भुकेला आहे ! माणसांची आवड असलेला आहे . त्यांचा क्रमांक खालील प्रमाणे आहे . (त्यांच्या दोन्ही आश्रमामध्ये म्हणजे गिरनार आणि ओरीचे गुरुधाम इथे अन्नदान चालते . ते दुकानदाराचा जी पे नंबर देतात . आपण हवे ते पदार्थ त्यांना घेऊन देऊ शकतो . )
वल्लभ दादा विष्णुदास . (जुनागड व गुरुतीर्थ आश्रम गुजरात ओरी ) +91 85500 50027
या मुक्कामामध्ये चंदन च्या आणि माझ्या भरपूर गप्पा झाल्या आणि एक माणूस म्हणून त्याचा खूप अभ्यास करायची संधी मला मिळाली . हा खरं म्हणजे पूर्णवेळ साधू बनायचा परंतु चुकून संसारात पडला होता .याच्याकडे सगळे भांडवल होते ज्याच्या सहाय्याने कोणालाही साधू बनता येईल , फक्त काही किरकोळ भावनिक स्वभाव दोषांमुळे तो मागे खेचला जात होता .अति चिंतन करणे किंवा अति माया लावणे हे देखील अध्यात्मिक प्रगतीच्या वाटेत अडथळा निर्माण करू शकणारे दुर्गुणच आहेत. गोव्याला राहताना हा अगदी टकाटक राहायचा . दाढी वगैरे काढल्यावर तो एकदम एखाद्य हिरो सारखा दिसायचा . त्याच्याकडचे त्याचे जुने फोटो त्याने मला दाखवले . परिक्रमेमध्ये बिचारा बायको आणि मुलांचे फोटो घेऊन आला होता आणि त्यांची आठवण आली की पाहत बसायचा . परंतु नर्मदा मैया च्या साक्षीने सांगतो की माझ्यावर अशी वेळ कधीच आली नाही ! तिच्या कृपेने मला तिचे सोडून कुटुंबातील अन्य कोणाचेही स्मरण एकदाही झाले नाही ! हा नर्मदा माईचा एक मोठा आशीर्वादच मानला पाहिजे . वल्लभ दादा यांनी आमच्याशी रात्री उशिरापर्यंत गप्पा मारल्या .माणसे निघून गेल्यामुळे त्यांचे मन या आश्रमामध्ये फारसे लागत नव्हते असे मला जाणवले . त्यांना गिरनारचा आश्रम अधिक आवडायचा . वल्लभ दादा स्वतः धिप्पाड शरीरयष्टीचे आणि स्वभावाने सिंहासारखेच असल्यामुळे त्यांना गीरचे जंगल जवळचे वाटायचे ! त्यांचा आवाजही सिंहाच्या डरकाळी सारखा मोठा होता . हे सर्व मी त्यांना देखील ऐकवले आणि त्यांना खूप हसू सुद्धा आले ! विशेषतः त्यांच्यापुढे आमचा चंदन फारच छोटेखानी दिसायचा . त्याला देखील त्यांनी अनुभवजन्य चार सल्ले संसाराच्या दृष्टीने दिले जे योग्यच होते . मी दिले नाहीत कारण लहान तोंडी मोठा घास मला घ्यायचा नव्हता आणि परिक्रमेच्या नियमात देखील ते बसणारे नव्हते . इथे कोणीही कोणालाही शक्यतो खाजगी विषयातील सल्ले देऊ नयेत आणि मार्गदर्शन करू नये . ज्याचा त्याचा प्रश्न आहे जो तो त्याच्या त्याच्या संचितानुसार आणि प्रारब्धानुसार तसेच नर्मदा मातेच्या कृपाप्रसादानुसार सोडवेल ! रात्री छान झोप लागली . पहाटे लवकर उठलो आणि अखिलेश्वर महादेवाची सुंदर अशी पूजा वल्लभ दादांच्या मदतीने केली . आदल्या दिवशी मी महादेवाची स्तुती पर कवने , स्तोत्रे , गाणी म्हटली होती .ती सर्व वल्लभ दादांनी मला पुन्हा एकदा म्हणायला लावली आणि त्यांच्या मोबाईलवर रेकॉर्ड सुद्धा केली . त्यांच्या भक्तमंडळींच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये त्यांनी ते व्हिडिओ पाठवले आणि सर्वांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या त्या देखील मला त्यांनी दाखवल्या !  जिथे स्तुती सुरू झाली तिथून साधकाने शीघ्र अति शीघ्र गतीने सटकावे असे माझे आजवरचे आकलन आहे , त्याला अनुसरून मी सिद्धच ठेवलेली झोळी उचलली आणि क्षणात किनाऱ्यावरून दिसेनासा झालो ! चेतराम भगत माझ्यापेक्षा वेगाने चालायचा . त्यामुळे तो हसत हसत मला म्हणाला की तू कितीही स्पर्धा कर मी तुला गाठणारच ! त्याच्या या विधानामुळे माझी हसून हसून पुरेवाट झाली ! कारण माझे कोणाशीच स्पर्धा नव्हती !कुणीतरी त्रयस्थ व्यक्तीने केलेल्या माझ्या स्तुतीमुळे माझ्या शुद्ध आत्मतत्त्वाला ग्रासू पाहणाऱ्या अहंकाराशी माझी स्वतःची स्पर्धा चालू होती !  त्या अहंकाराने मला गाठण्यापूर्वी मला पुढे मार्गस्थ होणे अत्यावश्यक होते ! ज्ञानेश्वर माऊली म्हणतात ,
नवल अहंकाराची गोटी । विशेषे न लगे अज्ञाना पाठी ॥
सज्ञानाचे झोंबे कंठी । नाना संकटी नाचवी ॥
गोटी म्हणजे गोष्ट . ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की या अहंकाराची गोष्ट मोठी मजेशीर आहे ! हा कधीच अज्ञानी माणसाच्या मागे लागत नाही . परंतु सज्ञानी माणसाचं नरडं असं काही धरतो , की तो बिचारा वेगवेगळ्या संकटांत नाचू लागतो ! माझी स्पर्धा या भयानक व्याघ्राशी होती ! त्याने माझ्या नरडीचा घोट घेण्यापूर्वी मला पुढे जाणे आवश्यक होते !  चेतराम ला ती त्याच्याशी केलेली स्पर्धा वाटली याला माझा निरुपाय होता . बहुतेक त्याची नरडी व्याघ्राला सापडली असावी ! मी मात्र जीव मुठीत धरून पळत सुटलो !  माझ्यासोबत समुद्राला भेटण्यासाठी अतिशय वेगाने धावणारी नर्मदा मैया माझ्यासोबत होती ! लहान मुले जसे हातात हात घालून उड्या मारत पळत पळत जातात तसे आम्ही दोघे जण समुद्राकडे निघालो ! आता ही माझी गाणी सुरूच होती ! पण आता कोणी स्तुती पाठक नव्हते .तर आता मात्र माझे गाणे ऐकणारी देखील माझ्यासोबत गात होती ! खळाळणारा तिचा आवाज मला अखंड साथ देत होता ! आम्ही दोघे मिळून शिवस्तुती करत होतो ! ओम नमः पार्वती पतये हर हर महादेव ! 





लेखांक शंभर समाप्त ( क्रमशः )


टिप्पण्या

  1. नर्मदे हर🙏🙏🙏🙏🙏

    उत्तर द्याहटवा
  2. नर्मदे हर🙏🙏🙏🙏🙏

    उत्तर द्याहटवा
  3. नर्मदे हर! पुढील लेखांक ची लिंक जोडली गेली नाहीये, वेळ मिळेल तेव्हा जोडावी. धन्यवाद. 😊

    उत्तर द्याहटवा
  4. लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद ! दुवा जोडलेला आहे . कृपया पाहणे . नर्मदे हर !

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

जे आवडते सर्वांना ...

अनुक्रमणिका

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

लेखांक १ : नर्मदे हर !

लेखांक २ : भोपाळ जवळच्या जंगलातील अपघात

लेखांक ४ : झुठा कही का ! सबकुछ तो लाए हो !

लेखांक ३ : चोराची धन

लेखांक ५ : ग्वारीघाट जबलपुर मध्यप्रदेश

लेखांक ८३ : महाराष्ट्रात प्रवेश आणि भाबरीचे भेदक भिल्ल-महात्मा फोदला गारद्या पावरा

लेखांक ७४ : लेपा बांध , वेदा संगम , कठोरा अन् मांडव्य गुंफा

लेखांक ९० : गुजरात मधील कणजी चे सान्सुभाई तडवी आणि अरण्यव्याप्त माथासर