लेखांक ९९ : पोईचा येथील स्वामीनारायण मंदिर अर्थात नीलकंठ धाम आणि सहजानंद विश्व

अभ्यास घेतल्यामुळे मुले खुश झाली आणि मुलांनी जाताना मला सांगितले की पुढे एक मोठे स्वामीनारायण मंदिर आहे ते नक्की बघा .स्वामीनारायण मंदिर आणि भव्य दिव्य हे समानार्थी शब्द आहेत ! हा संप्रदायच इतका भव्यता प्रिय आहे की यांच्याकडून किरकोळ कामे होतच नाहीत ! पोईचा नावाच्या गावाचा शोध घेत निघालो . थोडे अंतर चालल्यावर पुन्हा एकदा विठ्ठल महाराज पठाडे मला भेटले . यांनी मला विनंती केली की मी त्यांच्यासोबत चालावे . परंतु त्यांना आषाढी वारी गाठायची असल्यामुळे मी त्यांना वेळेचे महत्व पटवून दिले आणि लवकरात लवकर समुद्र पार होण्यास सुचविले . अक्षय तृतीया झाल्या नंतर नावा पूर्णपणे बंद होतात . तुम्ही निरीक्षण करून पहा . अक्षय तृतीया झाली रे झाली की आपल्या भारतामध्ये मोठी वादळे येतात  आणि एक दोन तरी तुफान पाऊस पडतात . हे दरवर्षी याच काळात होते . त्यामुळे समुद्र प्रचंड खवळलेला असतो . अशा काळात नावा बाहेर पडत नाहीत . त्यामुळे नाईलाजाने मला विठ्ठल महाराज पठाडे यांना निरोप द्यावा लागला . त्यांनीही अतिशय प्रेमाने मला मिठी मारली . दोनच दिवसांचा आमचा सहवास होता . परंतु जन्मानोजन्मीचे ऋणानुबंध असल्यासारखे आमचे सूत जुळले होते ! ही काय भानगड आहे कळतच नाही बुवा ! आयुष्यभर ज्यांच्या सोबत राहिले अशा व्यक्ती देखील कधी कधी अपरिचित वाटतात ! आणि नर्मदे काठी यांच्यासोबत अतिशय अल्पकाळ घालवला ती माणसे सुद्धा हक्काची , खात्रीची आणि प्रेमाची वाटतात ! इथे एकच घटक आहे जो इतर माणसांपेक्षा वेगळा आहे . आणि तो घटक म्हणजे नर्मदा मातेचे सान्निध्य . तिची साथ . तिचा सहवास . तिचा कृपाशीर्वाद . तिच्या दर्शनाने कधी काय मिळेल सांगता येत नाही !

 तिच्या प्रत्येक वळणावर ती काही ना काही आपल्याला शिकवत असते . मी नर्मदा मातेच्या काठावर बसून तिचा प्रवाह तासन्तास पहात बसायचो ! ती जणू काही मला आयुष्य कसे जगायचे तेच शिकवायची ! 
अतिशय अल्प साठा जन्माला घेऊन आलेला आपला जीव असतो . शारीरिक बळ अल्प असते , बुद्धी अल्प असते , सारेच कमी असते . नर्मदा मातेचा उगमही असाच करंगळी भर जाडीच्या धारेतून होतो . 
हळूहळू वाटेत येणाऱ्या ओढ्यांना नाल्यांना नद्यांना ती समाविष्ट करून घेत घेत पुढे वाहत राहते . आपणही आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या सर्वच बऱ्या वाईट लोकांचा स्वीकार करत आयुष्य जगायचे असते . उगमाजवळ तिचे रूप अवखळ असते . आपलेही ही बालपण असेच निर्मळ , अवखळ व सुंदर असावे ! आपले बालपण तसे गेले नसेल कदाचित ,तरी किमान आपल्या सहवासातील लहान मुलांचे बालपण आपण हिरावून घेतले नाही पाहिजे ! बाल नर्मदा मातेसारखे ते निखळ आनंदी आणि उत्साही राहील याची काळजी आपण घेतली पाहिजे . 
जसजसा नर्मदा मातेचा प्रवाह मोठा होत जातो तस तशी ती शांत धीर गंभीर आणि स्थिर होत जाते . आपणही जाणिवा जागृत झाल्यावर आपले आयुष्य असेच शांत , धीरोदात्तपणे जगायला शिकले पाहिजे . 
नदीच्या वाटेमध्ये चढ-उतार येत राहतात . त्यांना न घाबरता किंवा मध्ये आडव्या येणाऱ्या अडथळ्यांना न बिचकता ती प्रवाह बदलून वाहत राहते . आपणही आयुष्यामध्ये आलेल्या संकटांच्या पहाडांना न घाबरता त्यामुळे न डगमगता योग्य मार्ग काढून आयुष्याची वाटचाल चालू ठेवली पाहिजे . 
कधी कधी अचानक जमिनीची पातळी खालावते . इतकी खालावते की नर्मदा मातेला त्वेषाने खाली झेप घ्यावी लागते . इथे तिचे रूप इतके भयंकर असते की समोरच्या पहाडांनादेखील ती उभी चिरून टाकते ! आपल्या आयुष्यात आपल्या शांततेचा भंग करणारा असा एखादा नीच प्रसंग आला तर शांतता सोडून देऊन अतिशय त्वेषाने त्या संकटावर तुटून पडायला नर्मदा मैया आपल्याला शिकवते ! यावेळी आपल्याला प्राप्त झालेली गती इतकी भयानक असते की समोरचे संकट क्षणात घाबरून पळून जाते . संकटांचे पहाड देखील चक्काचूर होतात . त्यानंतर मात्र जणू काही झालेच नव्हते अशा पद्धतीने नर्मदामाता शांत होते परंतु तिथेच न थांबता अतिशय गतीने पुढे प्रवाहित होते . आपणही आपली पातळी सोडून खाली आल्यावर फार काळ तिथेच न थांबता वेगाने पुढील मार्गक्रमणा करावी हे श्रेयस्कर असते . 
थोडे अंतर गेल्यावर आपल्याला असा प्रश्न पडतो की हीच का ती नर्मदा मैया जी थोड्या वेळापूर्वी इतकी खवळलेली होती ? आपले वर्तनही इतके शांत आणि उदात्त असावे की लोकांना प्रश्न पडला पाहिजे की मगाशी प्रचंड खवळलेला मनुष्य हाच होता का ? कारण ते आपले मूळ स्वरूप आहे ! चिडणे , रागावणे ,चवताळणे ही पातळी सोडून वागणाऱ्यांसाठी दिलेली एक क्षणिक प्रतिक्रिया असू शकते . तो आपला स्थायी भाव नाही . 
मध्येच कोणीतरी नर्मदा मातेला बांध घालून अडवते . ती त्याला विरोध करत नाही . तर ती आपले कार्य अधिक जोमाने आजूबाजूला सुरू करते ! आपला साठा वाढवते ! आपली क्षमता वाढवते ! आपली उपयुक्तता वाढवते ! आपला प्रत्येक थेंब अधिकाधिक लांब कसा पोहोचेल याची काळजी घेऊ लागते ! तिची खोली अधिकच वाढत जाते !  तिच्यातील गाळ शांत होत जातो आणि पाणी अधिक शुद्ध होते . आणि मग अडविणाऱ्यांना लक्षात येते की आता हिला अधिक काळ अडवून चालणार नाही ! त्यामुळे तिच्यातील परम शुद्ध झालेला जलसाठा पुढे सोडला जातो . पुन्हा ती आपल्या मूळ स्वरूपात येते ! आपणही आयुष्यामध्ये अडवणूक करणाऱ्या माणसांना अशीच प्रतिक्रिया दिली पाहिजे ! कोणी आपली अडवणूक केली म्हणून दुःखी न होता आपले कार्य चालू ठेवले पाहिजे . उलट अधिक जोमाने ,अधिक ताकतीने , अधिक खोलीने कार्य केले पाहिजे . एका जागी बसून राहण्याची वेळ आली तर हताश , निराश न होता आपल्या ज्ञानाची खोली अधिकाधिक कशी वाढेल यावरती काम केले पाहिजे .आपली शक्ती वाढवली पाहिजे . युक्ती वाढवली पाहिजे . एकदा आपले सामर्थ्य वाढले की फार काळ कोणीही आपल्याला अडवू शकत नाही . उलट या अडवणुकी मुळे आपले सामर्थ्य अधिक वाढलेले असते आणि आपली उपयुक्तता देखील प्रचंड प्रमाणात वाढलेली असते . 
नर्मदा माता वळणे घेत वाहते तेव्हा तिला दोन किनारे असतात . एक किनारा तो असतो जो तिच्या प्रवाहाला कधीच विरोध करत नाही . आणि एक किनारा तो असतो जो तिच्यापुढे भिंत म्हणून आडवीत उभा असतो ! तिला विरोध न करणाऱ्या किनाऱ्याला ती भरभरून दान देते ! उथळ पाणी ! प्रचंड वाळू ! सुंदर सुंदर रत्ने , शिवलिंगे ! सारं काही भरभरून देते ! परंतु अडवणूक करणाऱ्या किनाऱ्याला मात्र अशी काही खाऊन टाकते की दरवर्षी तो मागे मागे मागे सरकत राहतो ! अशा किनाऱ्यांची कित्येक फूट माती मैया दरवर्षी तिच्या सोबत वाहून नेते .
आयुष्यामध्ये जे लोक आपल्याला सहकार्य करतात त्यांना आपण असेच सहाय्यभूत झाले पाहिजे . परंतु जे लोक सतत आणि विनाकारण तुमच्या सरळ आणि सज्जन वागण्याला विरोध करतात त्यांना आपल्या सामर्थ्याने मागे मागे सरकायला भाग पाडले पाहिजे . त्यांचे नुकसान होत असेल तर फारशी पर्वा केली नाही पाहिजे . कारण तसेही ते तुमच्या शांततेचा भंग करण्यासाठी खोडा घालत असतात . असे लोक भले प्रवाह पतीत झाले तरी फारशी चिंता केली नाही पाहिजे . कधीतरी अचानक नर्मदा मातेचा प्रवाह इतका खोल होतो इतका शांत होतो की असे वाटते की हा थांबलेला आहे . आयुष्यामध्ये असेच खोल ज्ञान प्राप्त झाल्यावर पूर्णपणे स्थिर राहत आले पाहिजे . उथळ पाण्याला खळखळाट फार . परंतु खोलीचे गांभीर्य वेगळे आहे . नर्मदा मातेच्या मधोमध खोल प्रवाह वाहतो तो अक्षरशः पृष्ठभागावर देखील दिसतो . त्या भागातले पाणी सदैव शांत असते . आपलेही ज्ञान प्राप्त झाल्यानंतरचे स्वरूप असेच शांत आणि धीरोदात्त असले पाहिजे .
नर्मदा मातेच्या पोटामध्ये असणारा खोल आणि शांत असा मुख्य प्रवाह . आजूबाजूच्या उथळ प्रवाहाला खळखळाट आहे .
नर्मदा माता तिच्या पोटामध्ये अनेक जलचरांना सांभाळते अनेक प्राणी पक्षी तिच्या पाण्यावर जगतात अनेक झाडे पिके तिच्या सिंचनावर आयुष्य वाचवितात वाढवितात आणि इतरांना भरभरून दान देतात . आपलेही आयुष्य असेच असावे ! आपल्यामुळे अनेक लोकांचे कल्याण व्हावे . आपल्या सहवासात येणाऱ्या प्रत्येक छोट्या मोठ्या जीवाला काही ना काही नक्की मिळावे . कोणीही आपल्या सहवासातून विन्मुख जाऊ नये . 
नर्मदा मातेचे कालवे खूप लांबपर्यंत जातात आणि पाणी पोहोचवतात .आपल्या नित्य मार्गापेक्षा दूरवर जाऊन आपले कार्य पोहोचविता आलेच पाहिजे . आपल्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा उपयोग फक्त आपल्या आजूबाजूच्या लोकांना न होता आपल्यापेक्षा अतिशय लांब असलेल्या आणि कधीही न पाहिलेला लोकांना देखील तो व्हावा ! नर्मदे किनारी असे काही भाग आहेत की जिथे कोणीही जाऊ शकत नाही ! कधीही जाऊ शकत नाही ! आपल्याही आयुष्यातील काही भाग असा असावा की जो फक्त आपल्याला माहिती आहे ! आपले ते स्वरूप , आपली ती धारणा फक्त आणि फक्त आपली असावी ! तिथे अन्य कोणालाही प्रवेशच नसावा ! 
नर्मदा मातेवर अनेक जलविद्युत प्रकल्प आहेत . आपल्याही ज्ञानाचा उपयोग विविध प्रकारे आणि विविध माध्यमातून समाजासाठी करण्याचे सामर्थ्य आपल्यामध्ये असावे . जिथे प्रत्यक्ष पाणी जात नाही तिथे नर्मदा जला पासून तयार झालेली वीज मात्र जाते . पाण्यापासून वीज तयार होते आणि ती वीज जिथे कुठे जाईल तिथे पुन्हा पाणी उपसायला मदत करते . तसेच जिथे आपण प्रत्यक्ष पोहोचू शकत नाही तिथे आपले विचार मिळेल त्या माध्यमातून पोहोचवायला काय हरकत आहे !आणि त्यासाठी विजे सारखे साधन नाही मित्रांनो ! जिथे जिथे वीज आहे अर्थात चेतना आहे तिथे तिथे ज्ञान आहे ! मोबाईल असो , लॅपटॉप असो ,आयपॅड असो , आयफोन असो किंवा कॉम्प्युटर असो . त्याची चेतना बॅटरी मध्ये साठलेल्या विजे मुळेच आहे . जेव्हा आपण काहीतरी वाचत असतो तेव्हा मूळ लिखाणाचे ते विद्युत रुपांतर केलेले असते . आणि आपल्यापर्यंत प्रवाहित होऊन पुन्हा एकदा त्याचे रूपांतर लिखाणामध्ये केले जाते आणि आपण वाचतो ! नर्मदा माता अनेक नद्यांना सामावून घेते . आणि अशा संगमांना अपरंपार महत्त्व आहे . आपल्या आयुष्यात कोणीतरी सामर्थ्यवान व्यक्ती येऊन मिळाली तर ती मैत्री फार महत्त्वाची मानली पाहिजे ! कारण त्यामुळे आपली शक्ती वाढत असते ! आपली बुद्धी वाढत असते ! आपली ओळख अधिक मोठी होत असते ! नर्मदामाईच्या काठी अनेक तीर्थक्षेत्र आहेत . त्या सर्वांनी दिलेल्या प्रेमाचा स्वीकार करत ती वाहते . आपल्याही आयुष्यात असे अनेक पडाव येतात . त्या सर्वांच्या प्रति कृतज्ञ राहत आपण आपली वाटचाल सुरू ठेवली पाहिजे . नर्मदा मातेमध्ये कोणी फुले सोडतात , कोणी दिवे तर कोणी मेलेली जनावरे . परंतु ती मात्र सर्वांना सारखेच शुद्ध जल प्रदान करते . आपल्या आयुष्यात काही माणसे आपल्याला मदत करतात .काही माणसे आपल्याला चांगले काहीतरी देतात . तर काही माणसे अतिशय वाईट अशा गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये निर्माण करतात .परंतु तरी देखील आपण या सर्वांना आपले शुद्ध ज्ञान तितकेच दिले पाहिजे .आपल्या जवळ असलेल्या प्रत्येक गोष्टीचा उपयोग प्रत्येकाला झाला पाहिजे ,असेच आपले वर्तन असले पाहिजे . त्यामध्ये भेदभाव करण्याची गरजच नाही . नर्मदा मातेवर कुठल्याही प्रकारचे हातपाय न मारता जो पडून राहतो त्याला ती तारते बुडवत नाही . किंवा जो प्रचंड हातपाय मारतो त्याला देखील तारते बुडू देत नाही . अगदी त्याच पद्धतीने आपल्या आयुष्यामध्ये आपल्याशी अनन्य पणे वागणारे जे कोणी असतील त्यांना आपण सांभाळले पाहिजे . ज्यांना हात पाय देखील आपल्या इच्छेने हलवता येत नाहीत अशा लहान थोर व्यक्तींना आपला आधार कायम राहिला पाहिजे . या उलट जे सतत प्रयत्नशील आहेत कष्टाळू आहेत अशांना देखील आपण योग्य ते मार्गदर्शन केले पाहिजे . अशी माणसे आपल्यामुळे बुडणार नाहीत ही आपली जबाबदारी आहे . महापुरामध्ये नर्मदेच्या काठावर ती काहीही शिल्लक ठेवत नाही ! आपलेही रौद्र रूप असेच असले पाहिजे ! त्याची भयानकता आणि दाहकता बघून आपल्या शांत रूपाचा अतिशय गौरव सर्वांनीच कायमच केला पाहिजे , इतके ते रौद्र रूप महाप्रचंड , महाविक्राळ , महाभयानक असावे ! अशी सर्व मार्गक्रमणा केल्यावर अतिप्रचंड ,अतिविस्तीर्ण पात्र धारण करून नर्मदा मैया शांतपणे समुद्राच्या पोटामध्ये लुप्त होऊन जाते . अशी लुप्त होते की पुन्हा तिच्या थेंबाचा एक कणही सापडत नाही . आपल्या आयुष्याची इतिकर्तव्यता देखील अशीच असावी ! अतिशय विस्तृत स्वरूपात भव्य दिव्य कार्य उभे राहिल्यावर जणूकाही माझे अस्तित्व शून्यच आहे याची जाणीव अंतर्यामी बाळगत आपण हळूच एक दिवस या जगाचा रामराम घ्यावा ! आपण जन्माला आलो तेव्हा जी स्थिती होती अगदी त्याच निष्कपट , निष्पाप स्थितीमध्ये पुन्हा एकदा आपले सर्वस्व जावे . आणि पुन्हा आपले अस्तित्व कोठेही दिसणार नाही अशा रीतीने शांतपणे या जगाच्या पसऱ्यातून हळूच लुप्त व्हावे . पुन्हा नव्याने उगम पावण्यासाठी ! कारण नर्मदा मैय्या काय आणि आत्मस्वरूप काय , अनादि , अनंत आहे . लक्ष देऊन पहिल्याशिवाय अनाकलनीय आहे . समर्थ रामदास स्वामी म्हणतात अलक्ष्यासी लक्षी असा कोण आहे ? ते अलक्ष्य आत्मतत्व लक्ष्य अर्थात आपल्या साठी सहजसाध्य , सहजगम्य , सहजप्राप्य करणारी नर्मदा माता आहे . जे लक्षात येत नाही ते लक्षात आणून देतो तो गुरु . आणि जे लक्ष्य नाही त्याचा वेध घ्यायला शिकवतो तो सद्गुरु !  आपल्या कळत नकळत नर्मदा मैया आपल्यावरती खूप काम करते . आपल्याला घडवते . ते आईचे काळीज आहे . पालथं पडलेल्याला उताणं व्हायला शिकवते . उताणं पडलेल्याला कुस बदलायला शिकवते . कूस बदलणे जमलेल्या बालकाला रांगायला शिकवते . राहणाऱ्या बालकाला स्वतःच्या पायावर उभे करते . स्वतःच्या पायावर उभे राहू शकणाऱ्या बालकाला पहिले पाऊल टाकायला शिकवते . एक पाऊल टाकू शकेल अशा बालकाला चालायला शिकवते . चालणाऱ्या बालकाला धावायला शिकवते . आणि धावणाऱ्या बालकाला थांबायला शिकवते ! तिचे कुठले बालक कुठल्या इयत्तेमध्ये आहे हे तिला चांगले ठाऊक असते . त्यामुळे इथे कोणीही कुणाला आपले गुण सांगू नयेत ! इथे प्रत्येकाची परीक्षा वेगळी आहे आणि त्याला मिळणारे गुण देखील वेगळे आहेत ! इथल्या परीक्षेमध्ये कोणीच नापास नाही ! इथला अभ्यासक्रमच वेगळा आहे ! सगळेच पास ! काठावर पास ! कारण परीक्षा देणारा तिच्या काठावर उभा असतो !  आणि परीक्षा देणारे पुरवण्यावर पुरवण्या जोडत असतात ! कारण तुम्हाला जे हवे ते इथे पुरविले जाते ! पुरविणारे हात असंख्य असतात! इथल्या प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यानुसार बदलतात . जया मनी जैसा भाव ,तया तैसा अनुभव ! तिला काही फरक पडत नाही कारण ती करोडो वर्षे वाहतेच आहे ! आणि वाहत राहणार आहे . तिने फक्त वहायचे , आपण फक्त पाहायचे ! यातून आपले जे व्हायचे तेच व्हायचे ! नर्मदे हर ! हर हर नर्मदे !
चालता चालता मी स्वामीनारायण मंदिराच्या दारात कधी पोहोचलो मलाच कळले नाही . याला दार म्हणायचे कारण इथे कमान होती . परंतु या कमानीपासून खाजगी रस्त्याने सुमारे दोन किलोमीटर अंतर चालल्यावर मंदिर परिसराचे मुख्य दार येत होते ! इतका हा परिसर अवाढव्य आहे . स्वामीनारायण हे गुजरात मध्ये होऊन गेलेले एक प्रसिद्ध संत होते . १७८१ मध्ये त्यांचा जन्म झाला आणि १८३० मध्ये त्यांनी देह ठेवला . समर्थ रामदास स्वामींचे प्रमाणे त्यांनी बालवयातच अखंड भारत भ्रमण करून अनेक तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेतले आणि अनेक सिद्धी प्राप्त केल्या . स्वामीनारायण संप्रदायातील १९ पुस्तके गुजरातीतून मराठी मध्ये नुकतीच अनुवादित झाली . या पुस्तकांचे प्रूफ रीडिंग अर्थात मुद्रित शोधन करण्याची सेवा करण्याचे भाग्य मला लाभले . त्यानिमित्ताने या संप्रदायातील सर्व साधुंशी आणि आराध्य दैवतांशी माझा चांगला परिचय झाला . स्वामीनारायण यांनी त्यांच्या हयातीमध्ये मंदिर उभे करण्यासाठी एक जागा निवडली होती परंतु ती ज्या भावांची होती त्यांच्यातील अंतर्गत वादामुळे हे मंदिर उभे राहू शकले नाही .  पुढे त्यांच्या शिष्य श्री योगीजी महाराज यांनी हे मंदिर उभे केले . त्यांचे शिष्य शास्त्रीजी महाराज यांनी मंदिरे उभे करण्याचे एक तंत्र विकसित केले . त्यानंतर आलेले प्रमुख स्वामी महाराज यांना फक्त कच्छी व गुजराती भाषा येत असूनही त्यांनी संपूर्ण जगभर या संप्रदायाचा प्रचार प्रसार केला . यांच्या हयातीपर्यंत सुमारे १३०० मंदिरे जगभर उभी राहिली .या मंदिरांचा आकार अतिशय अजस्त्र असतो . पुण्यामध्ये नुकतेच उभे राहिलेले स्वामीनारायण मंदिर ३७ एकर परिसरात उभे आहे . अमेरिकेतील सर्वात मोठे स्वामीनारायण मंदिर नुकतेच उभे करण्यात आले . याचा विस्तार ३०० एकर आहे .सध्या श्री महंत स्वामी या संप्रदायाची धुरा सांभाळत आहेत . आता मी ही जी परंपरा सांगितली ती स्वामीनारायण संप्रदायातील बीएपीएस अर्थात बोचासनवासी अक्षर पुरुषोत्तम श्री स्वामीनारायण संस्थान यांची परंपरा आहे . याच स्वामीनारायण संप्रदायामध्ये अनेक संस्था वेगवेगळ्या राहून कार्य करत आहेत . श्री स्वामीनारायण गादी संस्थान नावाची एक संस्था आहे . यांची देखील जगभर मंदिर आहेत . यांची गुरु परंपरा थोडीशी वेगळी आहे . स्वामी गोपाळानंद , स्वामी निर्गुणदास ,जीवनप्राण अब्जी बापश्री ,ईश्वरचरणी दाजी आणि मुक्तजीवनदासजी बापाश्री अशी यांची गुरु परंपरा आहे . 
श्री स्वामीनारायण गुरुकुल राजकोट नावाची तिसरी एक संस्था या संप्रदायामध्ये आहे . यांची देखील संपूर्ण जगभरात स्वामीनारायण मंदिरे आहेत . यांच्या परंपरेला ते गुणातीत गुरु परंपरा असे म्हणतात . सद्गुरु श्री गुणातीतानन्द स्वामी ,सद्गुरु श्री बालमुकुंददासजी स्वामी ,सद्गुरु श्री धर्मस्वरूपदासजी स्वामी ,सद्गुरु श्री गोपीनाथदासजी स्वामी , सद्गुरु शास्त्रीजी महाराज श्री धर्मजीवनदासजी स्वामी ,सद्गुरुवर्य श्री देवकृष्णदासजी स्वामी अशी यांची गुरुपरंपरा आहे . मी आता ज्या आश्रमात आलो होतो तो या तिसऱ्या परंपरेचा होता . पहिल्या परंपरेशी माझा निकटचा संबंध असल्यामुळे या दोन्ही परंपरांबद्दल मला माहिती होती . आपल्याकडे दुर्दैवाने प्रत्येक मोठ्या संतांच्या अशा अनेक गुरुपरंपरा तयार झालेल्या दिसतात . यामध्ये हेतू काहीही असो परंतु अनेकत्वाकडून एकत्वा कडे जाणाऱ्या संप्रदायांचे उलट्या दिशेने अधःपतन नक्कीच होते . त्याने आराध्य दैवतेच्या कार्याचा  विस्तार अधिक जोमाने आणि स्पर्धापूर्वक होतो हे देखील खरे आहे . परंतु असे करताना आपापसात वैरभाव बाळगण्याची मात्र गरज नाही . सर्वांचे मूळ एकच आहे हा भाव सतत मनात राहिला पाहिजे . तो प्रत्येक संस्थेतील साधकांमध्ये राहतोच असे नाही . असो .
या संस्थेचे नाव नीलकंठ धाम असे होते . भगवान स्वामीनारायण यांचे पूर्वाश्रमीचे नाव नीलकंठ होते . इथे एक अतिशय मोठी गोशाळा होती . अडीचशे तीनशे गायी होत्या . सर्व गायी अतिशय सुरेख रीतीने सांभाळल्या होत्या आणि त्यांची व्यवस्थित निगा राखली जात होती . इथे येणाऱ्या भक्तांकडून गोसेवा केली जायची . या गोशाळेपासून परत अक्षरशः एक दीड किलोमीटर अंतर चालल्यावर मंदिर लागले . हे अंतर तेवढे होते का नाही माहिती नाही .  परंतु मी थकलेला असल्यामुळे हे अंतर लवकर संपतच नव्हते इतके नक्की माझ्या लक्षात आहे . मंदिरात गेल्या गेल्या डाव्या हाताला मोठे पार्किंग होते . तिथेच पत्र्याच्या मोठ्या मोठ्या शेड करून परिक्रमावस्यांची उतरायची सोय केली होती . प्रचंड गर्दी होते . हे प्रसिद्ध क्षेत्र असल्यामुळे येथे खूप लोक , पर्यटक येतात . इथे नीलकंठ धाम नावाचे एक थीम पार्क असून तिथे भगवान स्वामीनारायण यांच्या जीवनाविषयी आणि एकंदर वैदिक तत्त्वज्ञानाविषयी माहिती देणारी अतिशय सुंदर शिल्पे बागबगीचे तलाव आणि नौका नयन सुद्धा आहे ! 
मी आधी परिक्रमावासी उतरले आहेत तिथे माझे आसन लावले . पत्रे भयंकर तापले होते आणि आत मध्ये प्रचंड गर्दी होती . गाडीने परिक्रमा करणारे वगैरे भरपूर लोक इथे आधीच येऊन थांबले होते . उकाड्याने मनुष्य हैराण होत होता .  येथून आत मध्ये जाऊन मी मुख्य मंदिराचे दर्शन घेतले . हा परिसर अतिशय भव्य दिव्य असून इथे मनुष्य हरवण्याची सहज शक्यता आहे . मंदिर फारच सुंदर असून त्याच्या चारी बाजूंनी पाणी आहे व त्यात देखील काही जलमंदिरे उभी केलेली आहेत . मंदिरामध्ये भरपूर गर्दी होती . सर्व पर्यटक होते आणि मी एकटाच परिक्रमा वासी दिसत होतो . इथे येणाऱ्या लोकांना नर्मदा परिक्रमे विषयी फारसे काही माहिती नसावे असे त्यांच्याकडे पाहिल्यावर वाटत होते . कारण परिक्रमावासी दिसला की नर्मदे हर म्हणणे ही एक स्वाभाविक प्रक्रिया नर्मदा खंडामध्ये आढळते . या संपूर्ण मंदिर परिसरात मला कोणीही नर्मदे हर म्हणाले नाही . एक सुंदर सुभाषित आहे त्याची अनुभूती मी येथे घेतली . 
भो दारिद्र्य ! नमस्तुभ्यं सिद्धोऽहं  त्वत्प्रसादतः | पश्यामहं जगत्सर्वं न मां पश्यति कश्चन ||
 अर्थात हे दारिद्र्या तुला नमस्कार असो ! तुझ्यामुळे मला एक सिद्धी प्राप्त झाली आहे . ती म्हणजे अशी की मी सर्वां कडे पाहू शकतो परंतु माझ्याकडे कोणीही पाहत नाही . त्याचीच अनुभूती मी या गर्दीमध्ये घेत होतो . अर्थात या गर्दीशी मला काहीच देणे घेणे नव्हते . परंतु ही तीच गर्दी होती जी माझ्या देशाचा कारभार कोणाच्या हातात जावा ते ठरविण्याचा अधिकार बाळगून होती . त्यामुळे जर या गर्दीचे मत कोणीही विपरीत बनविले तर माझ्या जीवनशैलीवर आघात करणारे निर्णय घेऊ शकतील अशा माणसांना माझ्या डोक्यावर आणून बसवण्याचे सामर्थ्य या गर्दीमध्ये होते ! मंदिरातील स्वामीजींशी बोलून मी भंडारी स्वामींचा पत्ता विचारून घेतला . या सांप्रदायामध्ये भंडारी स्वामींना अतिशय महत्त्व असते व तेच संपूर्ण आश्रम चालवतात . राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्यामध्ये जसे पंतप्रधान सर्व कारभार बघतात तसेच हे आहे . प्रमुख स्वामी फक्त नामधारी असतात . भंडारी स्वामींची मी भेट घेतली आणि मुद्दाम त्यांना सांगितले की पुण्यामध्ये तुमचे मंदिर आहे तिथे मी सेवेला जातो . आता हे वेगळ्या संस्थेचे मंदिर आहे हे स्वामींना देखील माहिती होते आणि मला देखील माहिती होते . परंतु दोघांनी एकमेकांना तसे काही कळू दिले नाही ! त्या भंडारी स्वामींनी मला एकदाही सांगितले नाही की ते लोक वेगळे आहेत आणि आम्ही वेगळ्या संस्थेचे संन्यासी आहोत . मला हेच तर तपासून पाहायचे होते की यांच्या अंतरंगामध्ये असलेले भेद बाहेर प्रकट होतात का ! सुदैवाने त्याचे उत्तर नाही असे आहे ! मला त्यांनी जरा देखील कळू दिले नाही की यांची संस्था आणि ती संस्था यांच्यात प्रचंड मतभेद आहेत. त्यांनी अतिशय प्रेमाने माझी चौकशी केली . आणि मला नीलकंठ धाम बघण्याचा १६० रुपयाचा पास स्वाक्षरी करून दिला . संध्याकाळची वेळ झाली होती आणि शेवटचा शो होता . त्यामुळे लगेच जाऊन तो कार्यक्रम बघण्याची विनंती त्यांनी मला केली . त्याप्रमाणे मी ते थीम पार्क बघायला गेलो . ते संपूर्ण चालत पाहण्यासाठी दोन तास देखील पुरत नाहीत . परंतु परिक्रमेमुळे माझ्या पायांना चांगली गती प्राप्त झाल्यामुळे मी ते वेळेत पाहू शकलो . डोळ्यांचे पारणे फेडणारे थीम पार्क आहे . अक्षरशः करोडो रुपयांचा खर्च केलेला आहे . या संप्रदायामध्ये प्रचंड पैसा खर्च केला जातो . समोरच्या माणसाचे डोळे दिपले पाहिजेत असे वैभव सर्वत्र उभे केले जाते . पुण्यातील माझे मित्र श्री वाल्हेकर यांनी बांधलेल्या श्री योग विहार शिव मंदिरामध्ये देखील आम्ही स्वामीनारायण यांची मूर्ती आणि त्यांच्या गुरुपरंपरेचा फोटो लावलेला आहे . तिथले साधू योगविहार मध्ये मुक्कामाला येतात .
श्री योगविहार शिव मंदिर पुणे येथील भगवान श्री स्वामीनारायण यांची नीलकंठ वर्णी रूपातील मूर्ती
हा त्यांच्या गुरुपरंपरेचा फोटो आहे .
या मंदिरातील अनेक साधुसंतांचा सहवास दैवयोगाने मला लाभत असे व आजही लाभतो .
नीलकंठ धाम येथील त्या चित्र शाळेचे नाव सहजानंद युनिव्हर्स असे होते . स्वामीनारायण यांचे संन्यासी जीवनातील नाव सहजानंद असे होते . 
भंडारी स्वामी यांनी मला स्वाक्षरी करून दिलेला सहजानंद युनिव्हर्सचा पास माझ्याकडे अजूनही मी जपून ठेवला आहे . त्याचे चित्र
हे चित्र प्रदर्शन प्रत्येकाने एकदा तरी पाहावे असे आहे . हे पाहताना प्रचंड चालावे लागते हे देखील खरे आहे . इथे अतिशय टोकदार खडी जिकडे  तिकडे पसरलेली आहे . मी माझी पादत्राणे मुक्कामाच्या पत्र्याच्या शेडमध्ये ठेवलेली असल्यामुळे अनवाणी चाललो आणि त्याचा मला भयंकर त्रास झाला . परंतु डोळ्यासमोर असणाऱ्या मूर्ती , चित्रे , बागबगीचे ,फुले , झाडे , पूल ,बाकडी , झोपाळे , रस्ते , कृत्रिम नद्या , नाले , ओढे , तलाव ,पक्षी , कारंजी हे सर्व इतके सुंदर होते की या सगळ्याचा विसर पडायचा ! दिल्ली येथील अक्षरधाम मंदिर ज्यांनी पाहिले आहे त्यांना थोडीशी कल्पना येईल . इथे त्याहीपेक्षा अधिक मोठे थीम पार्क होते शिवाय तिथे दाखवतात तसाच एक भव्य दिव्य चित्रपट इथे देखील दाखवत होते . लहान मुलांना अतिशय माहिती देऊ शकणारा हा प्रकार आहे .  मोठ्या माणसांना देखील आपल्याला असलेली माहिती तपासून पाहता येण्याची संधी देणारे हे युनिव्हर्स अर्थात विश्व आहे . सहजानंद विश्व असे नाव न देता सहजानंद युनिव्हर्स हे नाव देण्यामागे कोणती प्रेरणा आहे हे मात्र मी अजून देखील शोधतो आहे . थोडे तरी इंग्रजांचे खरकटे खाल्ल्याशिवाय आपल्या समाजाला बरेच वाटत नाही हे दुर्दैवी आणि कटु सत्य आहे . असो. हे सर्व 'विश्व ' पाहिल्यावर मनुष्य शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या थकून जातो इतक्या गोष्टी तो कमीत कमी वेळात पाहतो . विशेषतः यम पुरी ,मृत्यूलोक वगैरे इथे दाखवले आहेत ते फारच भयानक आहेत . याशिवाय मत्स्यालय , पक्षी घर , शास्त्र विभाग विविध पौराणिक प्रसंग आणि स्वामीनारायण यांच्या आयुष्यातील प्रसंग चितारलेले आहेत .अक्षरशः हजारो शिल्पे इथे आहेत .अगदी नर्मदा मातेच्या काठावर हे मंदिर आहे . अर्थात मध्ये वाळूचा विस्तीर्ण किनारा आहे . देव करो असे न होवो परंतु  महापुरामध्ये हे सर्व जर बुडाले तर करोडो रुपयांचे नुकसान सुनिश्चित आहे . हे सर्व उभे करण्यासाठी राबवलेल्या सर्व हातांना मी मनोमन नमस्कार केला . इतके मोठे कार्य उभे करणे सोपे नाही . निर्विवादपणे नर्मदे काठी असलेल्या मोठ्या आश्रमांपैकी हे एक मंदिर आहे . फक्त यांचा मुख्य हेतू परिक्रमावासीयांची सेवा करणे हा नसून तोही या मंदिराचा एक हेतू आहे इतकेच . परिक्रमावासींची निवासव्यवस्था अजून थोडी चांगली करता येणे शक्य आहे असे मला वाटले . कारण बाकीचे वैभव बघता ती पत्र्याची तापलेली धुळीने भरलेली खोली फारच कष्टदायक वाटते . अर्थात परिक्रमावासींना त्यांने फार काही फरक पडत नाही .परंतु भगवान स्वामीनारायण यांना नक्की फरक पडू शकतो ! ते त्यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये अखंड परिक्रमा करत राहिले होते . असो . इथे परिक्रमावासींना मोफत भोजनाचा पास दिला जातो . परंतु इथे खाण्यापिण्याचे इतके स्टॉल आहेत इतके विविध पदार्थ आहेत की बघणारा खवय्या मनुष्य वेडा होऊन जातो आणि त्यांचे दर देखील माफक आहेत . परंतु मी दिलेला पास वापरून मिळालेले भोजन पदरात पाडून घेतले . इथे अंजरुद या ओंकारेश्वर जवळील गावातून आलेली तीन परिक्रमावासी जोडपी होती . रात्री दीड वाजेपर्यंत यांच्याशी सत्संग घडला .  आणि मग त्या पत्र्याच्या तापलेल्या शेडमध्ये असलेल्या प्रचंड डासांना रक्तदान करत झोपी गेलो . पडल्या पडल्या डोळ्यासमोर संपूर्ण स्वामीनारायण मंदिराचा परिसर तरळू लागला . काहीतरी भव्य दिव्य उभे करण्यासाठी लागणारी इच्छाशक्ती देखील तशीच हवी ! ही संप्रदायाकडे आहे हे निश्चितपणे जाणवते . (टीप : इथून पुढे या भव्य दिव्य प्रकल्पाचे अनेक फोटो मी टाकलेले आहेत तरी ज्यांना पाहावयाचे नसतील त्यांनी पुढच्या लेखावर जायला हरकत नाही )
वरील गुगल नकाशा मध्ये नर्मदा मातेने घेतलेले तीव्र झोकदार वळण दिसते आहे . वरच्या बाजूला उजवीकडे गोलामध्ये स्वामीनारायण मंदिर दिसते आहे . समोर चाणोद येथील त्रिवेणी संगम आणि कुबेर भंडारी घाट दिसत आहेत . वाळूचा प्रचंड मोठा साठा या भागात कसा आहे ते उपग्रहातून पाहिल्यावर सहज लक्षात येईल .
निळकंठ धाम मंदिर परिसर किती भव्यदिव्य आहे हे या नकाशात आपल्या लक्षात येईल आणि त्याच्याही पेक्षा मोठी वाळू नर्मदा मया मध्ये कशी साठलेली आहे ते देखील पाहण्यासारखे आहे . समोर कुबेर भंडारी दिसत आहे
आश्रमाचे महाद्वार आणि गोशाळा या चित्रात दिसत आहे . दूरवर दिसणारे मंदिर आणि त्यामागे वाहणारी नर्मदा मैया पहावी !
मोठी स्वागत कमान पार करून आत आले की गोशाळेचे भव्य दिव्य प्रवेशद्वार दिसते . 
या गोशाळेचे नुकतेच उद्घाटन झालेले असून इथे अतिशय सुंदर पद्धतीने गाईंची सेवा केली जाते
मंदिरातील स्वामी स्वतः गाईंना भरवण्यासाठी इथे येतात
गाईंना चरण्यासाठी बाहेर सोडले जाते
प्रामुख्याने गीर जातीच्या गाईच इथे दिसल्या
गोशाळेतील मंदिर
मुख्य मंदिर समूह अतिशय भव्य दिव्य आणि सुंदर आहे
इथे लावलेली कारंजी आणि सभोवती साठविलेले पाणी खूप सुखद वातावरण निर्माण करते . सर्व नर्मदा मातेचेच जल आहे .
रात्री हे दृश्य अजूनच सुंदर दिसते
मंदिर परिसरात सुंदर सुंदर शिल्पे आहेत . 
इथे संध्याकाळी एक मिरवणूक काढली जाते . त्याचे आकर्षण असलेली रणगडाची आग ओकणारी खरी खुरी तोफ ! नीट पाहिल्यावर तुम्हाला आगीचा गोळा उडताना दिसेल ! मागे खरा हत्ती आहे ! ही मिरवणूक बघण्यासाठी खूप गर्दी होते ! देवाच्या छबिन्याची ही मिरवणूक असते .
जय स्वामीनारायण ! 
प्रचंड वाळूचा किनारा ओलांड्यावर समोर दिसणारा कुबेर भंडारी
इथे जाण्यासाठी लोकांची व नौकांची कायमच गर्दी असते .
डाव्या हाताला झाडांची रांग आहे तिथे दिसणाऱ्या पत्र्याच्या शेड म्हणजे परिक्रमावस्यांची निवारा व्यवस्था आहे . उजवीकडे भव्यदिव्य मंदिर परिसर दिसतो आहे . 
यात्रेकरूंची निवास व्यवस्था अप्रतिम आहे
अन्य यात्रेकरांसाठी पंचतारांकित निवासव्यवस्था करण्यात आलेली आहे
 

यात्रेकरूंच्या जाण्या येण्याच्या मार्गातही संगमरवरी फरशी टाकण्यात आलेली आहे . परिक्रमावासी निवाऱ्यामध्ये मात्र थेट जमिनीवर आसन लावून झोपावे लागले . अर्थात परिक्रमावासी कुठल्या सुख सुविधा उपभोगण्यासाठी निघालेला नसतो परंतु सर्वांना ज्या सुविधा देता येणे शक्य आहे त्याच्या किमान जवळपास जाणारी सुविधा परिक्रमाशीला दिली तर त्याला एखादी रात्र आरामदायक जाऊ शकते .
शेजारीच असलेल्या नीलकंठ प्रसादम् नावाच्या भव्य दिव्य वास्तूमध्ये अक्षरशः सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ स्वस्तात उपलब्ध आहेत . परिक्रमावासींना वीस रुपये किमतीची कढी खिचडी मोफत दिली जाते .
इच्छुकांसाठी दरपत्रक ! :D
यांचा भगवत प्रसादम् नावाचा ब्रँड देखील असून आपण येथील प्रसाद आंतरराष्ट्रीय दर्जाच्या वेष्टना मध्ये बांधून  घरी नेऊ शकता .
स्वामीनारायण संप्रदाय म्हणजे एकंदरीतच खाण्यापिण्याची रेलचेल असते असे आपल्याला सर्वत्र दिसते ! प्रचंड प्रमाणात साजूक तुपाचा वापर करून इथे सर्व पदार्थ बनवून देवाला भोग दाखविले जातात व प्रसाद म्हणून भक्तगण त्यावर ताव मारतात !
बस ने परिक्रमा करणारे जवळपास सर्व परिक्रमावासी या ठिकाणी येतात व त्यांच्या भोजनाची सोय या पत्र्याच्या शेडमध्ये केलेली असते .
स्वतः स्वयंपाक करून खाणारे यात्रे करू
आता थोडेसे मंदिरात फिरून येऊ . मंदिराच्या भोवती साठविलेले पाणी अतिशय सुंदर आणि रम्य दिसते . इथे कडेने एक पूल केलेला असून त्यावरून सर्व मंदिरांची दर्शने घेत फिरता येते . 
या पाण्यामध्ये सुंदर अशा रचना केलेल्या आहेत .अखंड जलाभिषेक सुरू असणारे महादेव .
मंदिराची एकंदरीत रचना अशी आहे . 
सहजानंद युनिव्हर्स किंवा सहजानंद विश्व येथील शिल्पे अतिशय सुंदर आणि खरोखरीच आपल्यासमोर त्या त्या घटना घडत आहेत की काय असे वाटायला लावणारी असतात .
खऱ्याखुऱ्या वनवासामध्ये राम लक्ष्मण आणि सीतामाई ! 
 धेनुकासुराचा वध करणारे कृष्ण बलराम
देवाधिदेव महादेव आणि गंगावतरण !
श्री स्वामीनारायण यांचा दरबार
अत्यंत सुंदर कोरीव काम असलेली दगडी महाद्वारे आणि कमानी तसेच देव देवतांच्या मूर्ती या संपूर्ण परिसराच्या सौंदर्यामध्ये प्रचंड भर घालतात .
राजस्थान मधल्या जयपुर इथला हा दगड आहे . या दगडावर कोरीव काम करणाऱ्या लोकांच्या टोळ्याच स्वामीनारायण मंदिराकडे कायमच्या बांधलेल्या असतात .
ही भक्तनिवासाची आहे आणि साधूनिवासाची वास्तू याच्यामागे असून  तिथेच मी भंडारी स्वामींना भेटायला गेलो होतो .
अजूनही काही भव्य दिव्य शिल्पे आपल्याला अचंबित करतात
विष्णूचे विश्वरूप दर्शन
समुद्रमंथन
मोठ्या मूर्ती जितक्या सुंदर आहेत तितकीच सुंदर म्युरल आणि लघुशिल्पे देखील इथे संग्रहालयामध्ये ठेवलेली आहेत जी अतिशय जिवंत वाटतात .
स्वामीनारायण यांची एक अति भव्य मूर्ती इथे बसविलेली आहे . मागे दिसणारी निळी रेषा म्हणजे नर्मदा मैया आहे .मंदिर येथून किती लांब आहे आपण पाहू शकता .
मोठी अत्यंत भव्य दिव्य आणि सुंदर आहे
इथल्या सर्वच मूर्तींची  आणि अन्य कलाकुसर पाहण्यासारखी आहे
मूर्ती दरवर्षी रंगविल्या जातात
विविध प्रकारचे नक्षीकाम असलेली अनेक महाद्वारे येथे आहेत . खोटे हत्ती जसे दिसतात ,
तसेच खरा हत्ती देखील वेळोवेळी दर्शन देतो
संध्याकाळी निघणाऱ्या छबिन्यासाठी हा हत्ती स्वामीनारायण भगवानांना घेऊन निघाला आहे पहा .
सुंदर अशा सुवर्ण रथातून स्वामीनारायण यांची मिरवणूक संध्याकाळी निघत असते .समोर काठी , मोरचल , पताका , ध्वजा , दिवे आदि सर्व शुभचिन्हे असतात .

रात्री हाच परिसर अद्भुत अशा रोषणाईने उजळून निघतो
डोळ्यांचे पारणे फेडणारी विद्युत रोषणाई सर्वच परिसरावर केलेली आहे .
इथले बगीचे हा एक अजून एक वेगळा विषय आहे !
असो . या मंदिर परिसराचे जितके वर्णन करू तेवढे कमीच आहे . जणू काही एक प्रतिसृष्टीच इथे निर्माण केली आहे असे भासते .परंतु हे सर्व पाहून जितका आनंद आपल्याला मिळत नाही तितका आनंद एका भिंतीपाशी गेल्यावर क्षणात मिळतो !
हीच ती मंदिराची सीमा भिंत जिथे गेल्यावर नर्मदा मातेचे अतिशय सुंदर असे दर्शन होते आणि डोळ्यांचे पारणे फिटते !
रात्री उशिरा झोपलो तरी पहाटे लवकर जाग आली . सर्व आन्हिके आटोपून मैया चा किनारा पकडला. मंदिरापासून वाळूचा किनारा पार करून मैय्याच्या पाण्यापर्यंत पोहोचायला अक्षरशः दहा-पंधरा मिनिटे चालावे लागते इतके मोठे अंतर आहे ! इथे पोहोचलो आणि तिचा स्पर्श झाला मात्र अत्यानंदाची अनुभूती घेतली ! दृश्य असार आहे आणि प्रत्यक्ष नर्मदा माता हेच सर्व सार आहे , हाच इथे राहून माझ्या मनाने केलेला निर्धार ठरला ! अतिशय शांत चित्ताने एका बाजूला थंडगार वाळू आणि एका बाजूला नर्मदा माई यांना ठेवून सरळ रेषेमध्ये चालू लागलो . वाळूमध्ये रुतणाऱ्या पायांचा आवाज आणि नर्मदा मैया च्या शांत जळामध्ये माझी काठी टेकल्यामुळे येणारा रम्य असा रेवा रव ऐकत पुढे मार्गस्थ झालो . . .





लेखांक नव्व्याण्णव समाप्त ( क्रमशः )

टिप्पण्या

  1. नर्मदे हर🙏🙏🙏🙏🙏

    उत्तर द्याहटवा
  2. आपल्या माईंच्या प्रतिक्षेत

    उत्तर द्याहटवा
  3. नर्मदे हर🙏🙏🙏🙏🙏

    उत्तर द्याहटवा
  4. Canada मध्ये पण Toronto ईथे स्वामी नारायण मंदिर आहे. तिथे पण दगडावर सुंदर नक्षीकाम आहे. खाद्य पदार्थाचे स्टॉल बरेच आहेत आणि मराठी पुस्तके अर्थात अध्यात्माची विकण्यासाठी आहेत.
    नर्मदे हर
    डॉ वीणा देव

    उत्तर द्याहटवा
  5. नर्मदे हर🙏🙏🙏🙏🙏

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

जे आवडते सर्वांना ...

अनुक्रमणिका

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

लेखांक १ : नर्मदे हर !

लेखांक २ : भोपाळ जवळच्या जंगलातील अपघात

लेखांक ४ : झुठा कही का ! सबकुछ तो लाए हो !

लेखांक ३ : चोराची धन

लेखांक ५ : ग्वारीघाट जबलपुर मध्यप्रदेश

लेखांक ८३ : महाराष्ट्रात प्रवेश आणि भाबरीचे भेदक भिल्ल-महात्मा फोदला गारद्या पावरा

लेखांक ७४ : लेपा बांध , वेदा संगम , कठोरा अन् मांडव्य गुंफा

लेखांक ९० : गुजरात मधील कणजी चे सान्सुभाई तडवी आणि अरण्यव्याप्त माथासर