लेखांक ९८ : अक्कलकोट स्वामींच्या पादुका आणि नानी पनौती मोटी पनौती

सेहराव सोडून काठाकाठाने चालू लागलो . सुंदर असे वळण घेत नर्मदा मैया इथे डावीकडे वळते . त्यामुळे वाळूचा मोठा किनारा लाभतो . परंतु त्यापूर्वी काही पुरातन मंदिरा लागली त्यांचे दर्शन करत करत पुढे गेलो .
एक सुंदर मूर्ती असलेले राम जानकी मंदिर होते
मंदिराचा परिसर विस्तीर्ण आणि चांगल्या पद्धतीने लिपाई पुताई करून ठेवलेला आहे . शेणाने सारविण्याचे काम चालू असतानाचे संग्रहित छायाचित्र .
या भागातील जलजीवन खूप सुंदर होते . मगरींची संख्या प्रचंड असल्यामुळे इथे मानवी हस्तक्षेप कमीत कमी होता . त्यामुळे माशांची संख्या चांगली होती . आणि मासे खाऊन जगणाऱ्या पक्षांची संख्या देखील चांगली होती . ज्याप्रमाणे एक वाघ आल्यावर जंगलाचे आरोग्य सुधारते अगदी त्याचप्रमाणे एक मगर पाण्यात आली तरी संपूर्ण जलजीवन सुरळीत होऊन जाते . रात्री मगरींच्या डरकाळ्या ऐकल्या होत्या . म्हशीचे रेकणे आणि डुकराचे  डुरकणे याच्या मधला तो आवाज होता .
तो आवाज पक्का कानात बसला . डावीकडे चांगली झाडी होती आणि उजवीकडे समोर वाळूचा किनारा होता . 
इथून थोडेसे पुढे गेल्यावरती एक केवट भेटला . असे कोणीही स्थानिक ग्रामस्थ भेटले की जवळपास कुठले ऐतिहासिक पौराणिक स्थान आहे का हे त्यांना विचारावे . कारण बरेचदा अगदी आपल्या शेजारी असलेले मंदिर देखील आपण नदीपात्रातून चालत असल्यामुळे आपल्याला दिसत नसते . ह्या केवटाने मला सांगितले की इथे मंदिर नाही परंतु एका पडक्या वास्तूमध्ये थडगी उभी करून एक दर्गा उभा करण्याचा प्रयत्न चालू आहे . गुगल नकाशावर मला तो दर्गा सापडला .
अशा रीतीने गेलेल्या कुठल्याही माणसाचे थडगे उभे करून तिथे तो मनुष्य प्रत्यक्ष गाडलेला नसताना सुद्धा त्याला दर्ग्याची मान्यता दिली जाते . आणि अंगभूत सहिष्णू स्वभावामुळे त्याला स्थानिक हिंदूंचा अजिबात विरोध होत नाही . भविष्यात अशी जागा धार्मिक क्षेत्र म्हणून मोठ्या प्रमाणात वाढवली जाते . आणि त्या भागातील 'डेमोग्राफिक्स' हळूहळू बदलते .इथेही त्याचीच सुरुवात झालेली होती . मुळात अशा दर्ग्यांची पूजा करणे म्हणजे मूर्ती पूजा करण्यासारखेच आहे व मूर्तिपूजा इस्लाम मध्ये हराम आहे. परंतु जागा ताब्यात येत असल्यामुळे त्याला मान्यता दिली जाते .
याच्यानंतर एक अतिशय सुंदर चंद्राकृती वळण नर्मदा मैय्या घेते . हे वळण इतके झोकदार आहे की विचारू नका ! चालताना एका सरळ रेषेत वाळू लागू लागते . नदी वळते आहे हे चालताना फारसे लक्षात येत नाही .परंतु अवकाशातून पाहिल्यावर मात्र नदीचे गरगरीत गोल वळण स्पष्ट दिसते . इथे मी पूर्णवेळ माझी काठी नर्मदा मैयाच्या पाण्यामध्ये बुडवत चाललो .
कुठलाही वाळूचा किनारा सुरू होण्यापूर्वी एक धोकादायक टापू येत असतो . इथे काठावरून चालण्यासाठी अतिशय मर्यादित जागा असते किंवा जागाच नसते . प्रत्येक झोकदार वळणाच्या वेळी असा एक तरी टापू आलाच . अशावेळी घाबरून उलटे परत न फिरता तिथूनच मार्ग काढावा काही ना काही प्रकारे मार्ग निघतो .
 या भागातील असा टापू जो होता त्याचे गुगल नकाशा चित्र .
हेच ते अर्धगोलाकृती वळण . रावणाला मारल्यानंतर वानरांनी इथे तपश्चर्या केली म्हणून या गावाचे नाव वांदरिया आहे . बऱ्याच वेळेला चालून थकलेले परिक्रमावासी असे वळण टाळून सरळ जायचा प्रयत्न करतात . परंतु मी खूप वेळा हे अनुभवले आहे की सरळ गेले काय किंवा वळून गेले काय तेवढाच वेळ लागतो .वळण घेत चालल्याने मात्र नर्मदा मैया चा अलौकिक असा सहवास लाभतो .
नर्मदा परिक्रमा करू इच्छिणाऱ्या सर्व भाविकांना माझी विनंती आहे . कृपा करून चालण्याचे अंतर वाढते म्हणून नर्मदा मातेचे गोलाकार वळण चुकवू नका . कारण अशा ठिकाणी तिचे वेगळे सौंदर्य पाहायला मिळते . समोरचा किनारा अधिक मोठा दिसतो . अशा भागात पक्षी जीवन  देखील चांगले असते . मुख्य म्हणजे असे वळणाचे भाग नेहमीच निर्मनुष्य असल्याचे मला आढळले . त्यामुळे नर्मदा मातेचा एकांत पूर्ण सहवास आणि कृपाशीर्वाद तुम्हाला नक्की लाभतो . आपण नर्मदा परिक्रमा करायला आलेलो आहोत हे नेहमी स्मरणात ठेवावे . आपण नर्मदा खंड परिभ्रमण करत नाही आहोत . अर्थात परिक्रमेमध्ये ते आपोआप साध्य होते परंतु परिभ्रमणामध्ये परिक्रमा होईलच असे नाही . असो .
इथे बरोबर त्या गोलाकाराच्या मध्यभागी वैद्यनाथ , बैद्यनाथ , वेदनाथ , बेधनाथ किंवा बेदनाथ महादेवाचे मंदिर आहे . मी ही चार पाच नावे लिहिली कारण या पाचही नावांनी या मंदिराचा उल्लेख करताना लोकांना मी ऐकले . हे पौराणिक मंदीर असून अतिशय सुंदर स्थान आहे . इथे कोणीही फिरकत नाही . समोर वशिष्ठ आश्रम आहे . मंदिर छोटेसेच आहे . महापुरामध्ये येथे प्रचंड पाणी येते . आपणही वैद्यनाथाचे दर्शन घ्यावे .

श्री वेदनाथ मंदिर , वांदरिया
मंदिराची जुनी भिंत पाडून आता जिर्णोद्धार केलेला दिसतो आहे . पुरातन मंदिरांचे अवशेष जपून ठेवले पाहिजेत . या चित्रात जुनी भिंत दिसते आहे .मी गेलो तेव्हा ही भिंत होती .
श्री वैद्य नाथाय नमः शिवाय । 
इथून पुढे तुम्हाला प्रत्येक आश्रमामध्ये मंदिरामध्ये आणि घाटावरती अशा प्रकारच्या मगरींपासून सावध करणाऱ्या पाट्या लावलेल्या दिसतात .
वेदनाथ महादेवाची थोडक्यात माहिती व महती
जुन्या मंदिरातला देवनागरी लिपीतला शिलालेख आपल्याला पाहायला मिळतो . 
समोरच असलेल्या वशिष्ठ मंदिराचा बगीचा खूप सुंदर आहे . चातुर्मास करण्यासाठी ही एक आदर्श जागा आहे .
ज्यांनी आर्किटेक्चर मध्ये शिक्षण घेतलेले आहे व काहीतरी भरीव सामाजिक कार्य करायची ज्यांना इच्छा आहे अशा लोकांनी एकत्र येऊन पुरातन मंदिरांचे पुनर्नर्माण करताना त्यामध्ये भारतीय मंदिर निर्माण शास्त्राचा आणि त्यातील तत्त्वांचा अधिकाधिक वापर कसा करता येईल तसेच शास्त्रीय पद्धतीने मंदिर कसे उतरवता येईल व पुन्हा निर्माण करता येईल याचा अभ्यास करून स्थानिक लोकांना सेवा म्हणून मार्गदर्शन केले पाहिजे असे वाटते . सध्या नर्मदा खंडामध्ये सरसकट जुनी दगडी मंदिरे पाडून नवीन आरसीसी मंदिरे बांधण्याचे सत्र सुरू झालेले दिसते . नवीन मंदिर बांधणे स्वागतार्ह च आहे परंतु ते बांधताना अधिक चांगल्या व शास्त्रीय पद्धतीने बांधले तर ते टिकाऊ होऊ शकते आणि त्यातील स्पंदनांचा अधिक चांगला लाभ भक्तांना मिळू शकतो . सिमेंट काँक्रीटच्या मंदिरामध्ये तुम्हाला थंडावा व शांतता  लाभत नाही जी तुम्हाला दगडी मंदिरामध्ये लाभते . सिमेंट काँक्रीटचे आयुष्य देखील सत्तर ते ऐंशी वर्षाचे असते . दगडाचे आयुर्मान त्यापेक्षा अनेक पटीने अधिक असते .यावर तज्ञांनी अवश्य विचार करून पहावा . प्रत्येक प्रसिद्ध आर्किटेक्ट ने जर असे ठरवले की १०० घरे / प्रकल्प डिझाईन करून झाली की मी सेवा म्हणून एक तरी छोटे मोठे मंदिर रीडिझाईन करून देईन तर भारतातील मंदिरे पुन्हा वैभवशाली होण्यासाठी जरा देखील वेळ लागणार नाही !  पुण्यातील पिंपरी चिंचवड भागामध्ये राहणारे श्री किरण कलमदानी व सौ अंजली कलमदानी हे दांपत्य अशा रीतीने शास्त्रोक्त पद्धतीने मंदिर पुनर्निर्माण या विषयामध्ये तज्ञ असलेले वास्तु विशारद आहेत . त्यांनी इंग्लंड या देशांमध्ये जाऊन एम . आर्च .  केलेले आहे ,परंतु सर्व पाश्चात्य आर्थिक संधी नाकारून भारतामध्ये येऊन इथल्या मंदिरांचे पुनर्निर्माण करणे असे ध्येय ठेवून ते कार्य करत आहेत.असे अनेक ' टेम्पल रेस्टोरेशन एक्सपर्ट ' , ' एन्शंट आर्किटेक्चर कंजर्वेशन एक्सपर्ट '  तयार होणे आवश्यक आहे .विद्यार्थ्यांनी जरूर विचार करावा . मुद्दाम इंग्रजी शब्द वापरले म्हणजे तरुणांना चटकन कळेल . कारण अशास्त्रीय पद्धतीने पुनर्निनिर्माण केले गेलेले मंदिर पाहून मनाला वेदना होतात . मंदिरांच्या बाबतीत जुने तेच सोने हेच लक्षात ठेवावे . असो .
पुन्हा एकदा सरळ रेषेत जाऊन मैयाला स्पर्श केला आणि वाळूचा किनारा पकडून चालायला सुरुवात केली . लहान मूल जसे कितीही गर्दी असू दे किंवा कोणीही नसू दे आपल्या आईचा हात सोडत नाही तसेच मी करायचो . काही केल्या नर्मदा मातेचा हात सोडायचो नाही . 
रे बंधू !
जब तक मैया थामे है तुम्हारा हाथ ...
जब तक मैया की मिल रही है साथ ...
तब तक तुम्हे डरने की क्या बात !
तब तक कोई ना कर पावे तुम्हारा घात !
अगर आये यमराज भी लेकर यमदूत . . .
तो उस काल को भी तुम दे दोगे मात . . .
पिता है उसके श्री महाकाल रे बंधू,
जो स्वयं है अनाथोंके भी नाथ ! 
जय बेदनाथ !
वानरांनी तपस्या केल्यामुळे पवित्र झालेल्या या भूमीमध्ये त्यांनी स्थापन केलेली अनेक शिवलिंगे सापडतात .
थोडेसे पुढे गेल्यावर डाव्या हाताला जंगलामध्ये वानरेश्वर महादेवाचे छोटेसे मंदिर होते . छोटेसे मंदिर असले तरी आत मध्ये सर्व देव होते . गणपती मारुती नर्मदा मैया महादेव सर्वांची स्थापना केलेली आहे .
श्री वानरेश्वर महादेव मंदिर
मंदिर दुर्लक्षित अवस्थेत आहे . 
श्री वानरेश्वर महादेव
अशा रीतीने स्थापन केलेली अक्षरशः कोट्यावधी शिवलिंगे नर्मदे काठी तुम्हाला आढळतात .
इथे एक मजेशीर प्रकार घडला . एका झाडाखाली एक अतिशय गरीब म्हातारा बसला होता . त्याने मला जवळ बोलावले आणि मला म्हणाला की तुझ्या जवळचे एखादे वस्त्र मला दे . माझ्याजवळ अगदी मोजके कपडे असल्यामुळे त्याला देण्यासारखे काही नव्हते .परंतु इतक्यात मला आठवले की थंडीच्या काळामध्ये मी अंगात जे घालायचो ते थर्मल वेअर चे अपर खूप दिवसांपासून पडून आहे . ते काढून मी आजोबांना दिले . हे मी स्वच्छ धुऊन वाळवून घडी करून ठेवलेले होते . आजोबांना ते वस्त्र आवडले व त्यांनी लगेच अंगात धारण केले . ही घटना घडेपर्यंत मला पुढे लगेचच येणाऱ्या घाटाचे महात्म्य माहिती नव्हते .
थोडेसे पुढे गेल्यावर एक घाट दिसला ज्याच्यावर खूप गर्दी होती . लोक आपल्या अंगातील जुनी वस्त्रे काढून तिथे टाकत होते आणि स्नान करून नवीन वस्त्रे परिधान करत होते . असे केल्याने आपल्याला लागलेली पनोती निघून जाते अशी इथल्या लोकांची मान्यता आहे . अशा रीतीने अंगातल्या काढून टाकलेल्या कपड्यांचा इथे अक्षरशः खच पडला होता . हे सर्व कपडे कालांतराने नर्मदा मातेच्या प्रवाहाबरोबर वाहून जातात . आणि गाळामध्ये कुठेतरी रुतून बसतात . शेवाळे वगैरे वनस्पती त्याच्यावर वाढल्या की हळूहळू नष्ट होऊन जातात . परंतु प्लास्टिक पेक्षा कमी घातक असले तरी देखील हे एक प्रकारचे प्रदूषणच आहे असे मला वाटले . कारण इतस्ततः पडलेले रंगीबेरंगी कपडे नर्मदा मातेच्या सौंदर्यामध्ये बाधा आणत होते . 
अगदी उपग्रहातून पाहिले तरी सुद्धा या कुंभेश्वर घाटावर लोकांनी केलेले "वस्त्र प्रदूषण " दिसते . यावरून त्याचे गंभीर्य लक्षात घ्यावे .
घाटाच्या वरून घेतलेल्या या चित्रामध्ये सुद्धा डावीकडे पडलेला कपड्यांचा ढीग दिसतो आहे पहा ! इथे कपडे वाहण्याची पुरातन प्रथा जर असेल तर किमान ग्रामपंचायत स्तरावर दररोज ते कपडे उचलण्याची व्यवस्था करायला काय हरकत आहे !
परंतु अगदी हाच घाट येण्यापूर्वी माझ्याही एका वस्त्राचा त्याग माझ्या हातून घडावा हा काही सर्वसाधारण योगायोग असेल असे मला वाटत नाही . या सर्व प्रकारांच्या मागे कुठलीतरी वैश्विक योजना कार्यरत असते असे तुम्हाला पदोपदी जाणवते . असो . 
समोर वरवाडा नावाचे गाव आहे . उत्तर तटावर आपण इथल्या गमती पाहूच . दक्षिण तटावर चालताना मला उत्तर तटाबद्दल काहीही माहिती नव्हते परंतु उत्तर तटावर गेल्यावर मात्र दक्षिण तटावरील एकेक ठिकाणं आठवत होती त्यामुळे दुहेरी परिक्रमा घडत होती !  इथे नर्मदा माता किनारा कापत चालते . त्यामुळे मंदिरे व गाव उंचावर आहे . खडा चढ असलेल्या पायऱ्यांचा घाट होता . तो धावतच चढून वर गेलो . वर गेल्या गेल्या लक्षात आले की इथे मंदिरेच मंदिरे आहेत ! छोट्या छोट्या अनेक प्रसिद्ध पौराणिक व ऐतिहासिक मंदिरांची दाटी या घाटावर आहे ! आपणही एक एक करून दर्शन घ्यायला सुरुवात करूया ! खूप संस्मरणीय असा हा घाट आहे ! 
सडक मार्गाने जे लोक येतात त्यांना जिओर आणि पाटी नावाची दोन गावे लागतात . इथूनच सर्व देवांना जाण्याचा रस्ता आहे . त्यामुळे बस परिक्रमा वासी सुद्धा इथे मोठ्या संख्येने येतात .
आपण मात्र काठाने चालत आहोत त्यामुळे आपल्याला दरवर्षी नर्मदामाता तिच्या महापुरामध्ये थोडे थोडे नुकसान करत असलेला असा हा पुरातन घाट दिसतो .
भरपूर पायऱ्या चढून गेल्यावर वरती मंदिर परिसर सुरू होतो . या पायऱ्या चढायला फार मजा आली . थकवणाऱ्या पायऱ्या आहेत . परंतु न थांबता वेगाने चढल्या की पायामध्ये रक्ताचा अक्षरशः महापूर येतो आणि त्यामुळे थोड्याच वेळात पायांना खूप बरे वाटू लागते .
हे आहे जगातील एकमेव श्री यंत्राचे मंदिर !
मंदिराच्या आत डावीकडे काळ्या रंगाची खुर्ची ठेवली आहे पहा तिथेच गेल्या गेल्या मी खाली आसन लावले आणि सुंदर वाऱ्याचा आनंद घेत बसून राहिलो . इथे समोर एका गुजराती पंडितजींचे अनुष्ठान चालले होते . जाता जाता ते मला हातावर प्रसाद देऊन गेले . 
याच मंदिरामध्ये विठ्ठल महाराज पठाडे पुन्हा एकदा भेटले . मोठा वळसा मारून देखील साधारण एकाच वेळी आम्ही पोहोचलो . हीच तर नर्मदा मातेची गंमत आहे . काठा काठा ने कितीही लांबचे अंतर चालले तरी तुम्ही इतरांपेक्षा पुढेच असता .आत मध्ये जाऊन दर्शन केले . मोठे श्रीयंत्र ठेवलेले आहे . नर्मदा मातेची पण मूर्ती आहे .
श्री यंत्राचे हे भारतातील एकमेव मंदिर आहे असे इथे सांगण्यात येते .
नर्मदा मैया ! लोक हिला लक्ष्मी माता समजतात परंतु खाली मगर दिसते आहे पहा ! एकदा नर्मदा मैय्या प्रसन्न झाली की लक्ष्मीची काय गरज !
इथे खाली अनेक लक्ष्मी यंत्र किंवा श्रीयंत्र ठेवलेली दिसतात तसेच नर्मदा मातेच्या दोन्ही बाजूला रामकृष्ण परमहंस आणि श्री शारदा माता यांचे फोटो लावलेले दिसतात .
हे मंदिर किती सुंदर ठिकाणी आहे ते तुम्हाला या फोटोमध्ये लक्षात येईल
तापलेल्या वाळूच्या किनाऱ्यावरून चालल्यामुळे थकलेल्या देहाला या कोपऱ्यात बसल्यावर लागणारे नर्मदा मातेवरचे थंडगार वारे सुखावह वाटत होते .परंतु पोटात कावळे देखील ओरडू लागले होते . मला प्रसाद देणाऱ्या ब्राह्मणांनी सांगितले की इथे शेजारी एक जण परिक्रमा वासींना भोजन प्रसादी देतो त्याला जाऊन आधी भेटावे आणि सांगावे की तुम्ही दोघे या मंदिरामध्ये बसलेले आहात . सामान इथेच ठेवायला हरकत नाही . भोजन प्रसादी कुठे मिळते याचा शोध घेत पुढे गेलो आणि समोरच एक छोटीशी इमारत दिसली . सहज आत मध्ये गेलो आणि समोर जे काही दिसले ते पाहून साष्टांग नमस्कार घातला ! इथे चक्क अक्कलकोटच्या स्वामींच्या पादुका ठेवलेल्या होत्या ! 
अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय ! 
चंदुलाल सोमण नावाचे एक थोर स्वामीभक्त येथे राहत असत . त्यांनी या पादुका स्थापन केलेल्या होत्या .राहूचे देखील मंदिर येथे आहे . सध्या  त्यांच्या पश्चात त्यांचे चिरंजीव आश्रमाची व्यवस्था पाहत आहेत . हा तरुण देखील अतिशय तेजस्वी आणि सज्जन सात्विक होता . त्याने मला मागे नेऊन त्याचे घर व संपूर्ण परिसर दाखविला . गेली २०० वर्षे हे कुटुंब येथेच राहत असून त्यांच्या घराण्यामध्ये परिक्रमा वासींची सेवा करण्याची परंपराच आहे . स्वामींचा या घराण्यावर विशेष कृपाशीर्वाद राहिलेला आहे . अक्कलकोट स्वामी हे एक अजब रसायन आहे ! ते कधी कोणावर कशी कृपा करतील याचा काही नेम नाही ! म्हणजे त्यांची भक्ती केली तरच ते पावतील असे ते अजिबात नाहीत ! त्यांना जसे हवे तसे वर्तन करणारा कोणीही मनुष्य त्यांच्या कृपेला सहज प्राप्त होऊन जातो ! स्वामींना खोट्याचा खूप तिटकरा आहे . खरे बोलणारा सरळ मार्गाने चालणारा आणि त्यांची भक्ती अजिबात न करणारा एखादा मनुष्य सुद्धा त्यांच्या कृपेला प्राप्त होऊन जातो . या उलट दिवस रात्र स्वामी स्वामी करणारा परंतु फसवा फसवी करणारा मनुष्य त्यांची लाथ खाल्ल्याशिवाय राहत नाही ! मला माझ्या आयुष्यामध्ये अक्कलकोट स्वामी वयाच्या तिसऱ्या वर्षी भेटले . पुण्यामध्ये सदाशिव पेठेमध्ये माडीवाले कॉलनी नावाची एक वस्ती आहे . इथे भिकारदास मारुतीच्या जवळ एका कोपऱ्यामध्ये एक उकिरडा होता . परिसरात राहणारे नागरिक जाता येता इथे कचरा टाकायचे . या भागामध्ये काकासाहेब गोवंडे नावाचे एक पोलीस इन्स्पेक्टर राहत होते . त्यांच्या स्वप्नामध्ये एक दिवस दत्तप्रभू आले आणि त्यांना म्हणू लागले की मला या कचरापेटीतून बाहेर काढ . यांनी माणसे बोलवून कचरापेटी साफ केली असता आत मध्ये औदुंबराची दोन रूपे उगवलेली त्यांना दिसली . तिथे साफसफाई करून त्यांनी छोटासा पार बांधला . कुणीतरी तिथे ,राजा रविवर्मा यांनी काढलेले दत्ताचे चित्र आहे त्याचा फोटो आणून ठेवला . समोर राहणारे जयश्री पावभाजी चे मालक श्री भाऊ भोसले तिथे रोज एखादे फळ ठेवू लागले . एक दिवस तिथे अचानक सुग्रास भोजनाचा सुवास सुटला . परिसरातील सर्वच नागरिकांना तो वास येऊ लागला . या औदुंबराच्या समोरच नाईक नावाचे केटरर राहायचे त्यांनी मग रोज संपूर्ण भोजनाचा नैवेद्य तिथे ठेवायला सुरुवात केली . हळूहळू लोकांना त्या क्षेत्राची अनुभूती येऊ लागली . आणि पाहता पाहता त्या उकिरड्याचे रूपांतर एका सुंदर अशा मठामध्ये झाले . गंमत म्हणजे कागदोपत्री ही त्रिकोणी आकाराची जागा कोणाच्याच मालकीची नव्हती त्यामुळे महापालिकेने मठाला दान करून टाकली . इथे अक्कलकोट स्वामींची एक सुंदर अशी मूर्ती स्थापन करण्यात आली . नंतर महान चित्रकार अरुण फडणीस यांनी काढलेले सुंदर असे स्वामींचे तैलचित्र मठात लावण्यात आले .
अक्कलकोट स्वामींचा माडीवाले कॉलनी , सदाशिव पेठ पुणे येथील मठ
 मी अगदी लहान असताना हे सर्व माझ्यासमोर घडत होते . माझ्या दोन मावश्या , दोन काका , दोन आत्या याच गल्लीमध्ये राहायच्या . त्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्टीत मी माडीवाले कॉलनी मध्ये पडीक असायचो . नंतरही महाविद्यालयीन जीवनामध्ये नारद मंदिर या संस्थेच्या श्री व्यास गुरुकुलमध्ये मी राहायचो त्यामुळे मठात सारखे येणे जाणे असायचे . मला हेही आठवते आहे की स्वामींचे चित्र काढणारे चित्रकार काका म्हणून मी एकदा अरुण फडणीस यांना नमस्कार करायला गेलो असताना त्यांनी मला एका छोट्याशा चीठोऱ्यावर स्वामींचे एक स्केच पटकन काढून दिले होते ! ते मी अजूनही जपून ठेवलेले आहे .  तर सांगायचे तात्पर्य म्हणजे अक्कलकोट स्वामी कोणाला म्हणतात हे ज्या मूर्तीकडे पाहून वयाच्या तिसऱ्या वर्षी मला सर्वप्रथम कळाले ती मूर्ती या मठामध्ये प्राणप्रतिष्ठित केलेली होती . पुढे स्वामींची संगमरवरी मूर्ती बसवण्याचा निर्णय झाला . आणि काहीही ध्यानीमनी नसताना स्वामींची ही मूळ मूर्ती आमच्या घरी आणून देण्यात आली ! मठाच्या ट्रस्टींनी सर्वानुमते हा निर्णय घेतला . अर्थात यात माझा वाटा काहीच नाही . माझ्या दोन्ही मावश्या , माझी आजी व मोठ्या मावशीचे यजमान व मुले वगैरे यांची अनेक वर्षे अहोरात्र सेवा या मठामध्ये घडली होती त्याचे ते फळ होते . मी फक्त लाभार्थी ! सत्संगाचा हा फायदा असतो ! 'स्कीम ' कुठलीही असली तरी लाभार्थी तुम्हीच असता ! 
माझी मावशी आजन्म स्वामी सेवेमध्ये राहिलेली आहे . तिच्या आईची सेवा आणि स्वामींची सेवा तिने अतिशय मनोभावे केली . माझे गुरु श्री जनार्दन स्वामी जेव्हा शेवटचे आमच्या घरी आले होते तेव्हा माझी वयोवृद्ध आजी त्यांना म्हणाली की तुम्ही पुन्हा घरी या स्वामी . तेव्हा ते म्हणाले होते की आता मी नाही आता अक्कलकोट स्वामी घरी येतील . याचा अर्थ तेव्हा आम्हाला कोणाला कळला नाही . परंतु लवकरच एक असा प्रसंग घडला की ज्यामुळे या वचनाची सत्यता स्वामींनी पडताळून दिली . पुण्यामध्ये कात्रज भागात राहणारे मराठे म्हणून एक अतिशय सात्विक आणि भाविक दांपत्य आहे . आपल्या नव्या घरातील हॉलमध्ये लावण्यासाठी म्हणून त्यांनी स्वामींचे नवीन पेंटिंग त्यांचे नातेवाईक असलेल्या एका महान चित्रकारांकडून करून घेतले . या दांपत्याचे गुरु असलेल्या एक साध्वी अक्कलकोट मध्ये राहायच्या . त्यांच्या स्वप्नात जाऊन स्वामींनी दृष्टांत दिला की माझा फोटो सदाशिव पेटीतील भटांच्या मठात नेऊन दे . तिथे माझी वाट पाहत आहेत . त्यांनी तो निरोप मराठे दांपत्याला सांगितला . परंतु स्वामींचा फोटो घराच्या बाहेर जाऊ नये या हेतूने त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले . एक दिवस मात्र अतिशय क्रुद्ध चेहरा असलेले स्वामी त्यांच्या गुरुंना दिसले . मग मात्र त्यांनी स्वामींचा फोटो भटांच्या मठात आणला . इथला मूळ फोटो या फोटो पेक्षा लहान असल्यामुळे त्यांनी ठेवून घेण्यास नकार दिला . कारण तिथे जागाच नव्हती . माझ्या वयोवृद्ध आजीची सेवा करत असल्यामुळे शेवटची काही वर्षे मावशी घराबाहेर पडलीच नव्हती . नुकतेच आजीचे देहावसान झाल्यामुळे मावशी प्रथमच त्या मठामध्ये गेली होती . तिने फोटोची चौकशी केली व म्हणाली माझे घर खूप लहान आहे नाहीतर मीच घरी नेले असते स्वामींना . इकडे भटांनी फोटो घेतला नाही असे सांगत मराठी दांपत्य पुन्हा घरी आले . या संपूर्ण प्रक्रियेमध्ये त्यांना किती वेदना होत असतील याचा विचार करून पहा . पुन्हा एकदा स्वामींचा आदेश आला की मठामध्ये माझी चौकशी ज्या व्यक्तीने केली तिला फोटो नेऊन द्या . त्याप्रमाणे आमचे घर शोधत शोधत मराठे कुटुंबीय घरी आले आणि स्वामींचा फोटो साश्रू नयनांनी त्यांनी आमच्याकडे सोपवला . आजीची २४ तास सेवा करणाऱ्या मावशीला आजी गेल्यावर आता पुढे काय असा प्रश्न पडलाच होता ती जागा स्वामींनी भरून काढली . आता माझी मावशी पहाटेच्या काकड आरती पासून सकाळची पूजा आरती दुपारचा नैवेद्य आरती संध्याकाळची उपासना आरती व रात्रीची शेजारती असे सर्व कार्यक्रम अतिशय नित्यनेमाने स्वामींच्या पुढे करत आहे . अशा रीतीने माझी इच्छा असो किंवा नसो परंतु अक्कलकोट स्वामी २४ तास माझ्या सोबतच असतात ! मी प्रेमाने त्यांना म्हातारा म्हणतो . म्हातारा काही पिच्छा सोडत नाही ! मला असे वाटले होते की नर्मदा परिक्रमेमध्ये तरी म्हातारा मोकळे सोडेल ! पण कुठले काय आणि कुठले काय ! जाईल तिकडे आजोबा आहेतच ! स्वामींच्या वर वर्णन केलेल्या मूर्तींचे आणि चित्राचे फोटो आपल्या दर्शनासाठी  आणि अवलोकनासाठी खाली जोडत आहे . 
सदाशिव पेठेतील मठामध्ये लावलेली हीच ती मूळ अक्षरे ! ती सध्या आपल्या घरी आहेत ! 
सदाशिव पेठेतल्या अक्कलकोट स्वामी मठातील मूळ मूर्ती जी सध्या आपल्या घरी आहे .
ही मूळ मूर्ती अतिशय सुंदर असून तिचा मूळ रंग अजूनही तसाच आहे .
मूर्तीच्या चेहऱ्यावरील भाव अतिशय बोलके आहेत .
माझ्या डोळ्यासमोर मूळ मूर्ती जशी होती तशीच रहावी म्हणून तिचा जुना  रंग मुद्दाम तसाच ठेवलेला आहे . काही ठिकाणी अत्तर लावून थोडेसे काळवंडलेले वगैरे आहे परंतु ते बदलण्याच्या भानगडीत  पडलेलो नाही .
 श्री मराठे यांनी आणून दिलेले हेच ते स्वामींचे मूळ चित्र .
स्वामीं ची मुद्रा अप्रतिम आहे
ज्येष्ठ चित्रकार अरुण फडणीस यांनी प्रस्तुत लेखकाला बालपणी काही क्षणात रेखाटून दिलेले अक्कलकोट स्वामींचे रेखाचित्र . मी मूर्खासारखे ते गिरवले आहे . परंतु त्यांच्या डोक्यात स्वामींची प्रतिमा किती पक्की बसलेली होती हे या मोजक्या रेषांमधून लक्षात येते .
एक महत्त्वाचे प्रकटीकरण येथे करून ठेवतो . केवळ स्वामींचा विषय निघाला आहे आणि स्वामींचे प्रस्तुत  लेखकाच्या जीवनातील महत्त्व काय आहे हे लक्षात यावे म्हणून वरील प्रतिमा जोडल्या आहेत . स्वामींच्या समोर चालणारी आमच्या घरातील विशेषतः मावशीची सर्व उपासना ही पूर्णपणे व्यक्तिगत स्वरूपाची असून हे संपूर्णपणे खाजगी भक्ती प्रकरण आहे . हे सार्वजनिक मठ किंवा मंदिर असे ठिकाण नसून येथे कोणीही आणून दिलेली एक रुपया सुद्धा देणगी किंवा वस्तुरूप देणगी वगैरे स्वीकारली जातच नाही . सर्व काही मावशी तिच्या स्वकष्टार्जित कमाई वर आणि पुण्याईवर चालविते आहे . इथे फोटो टाकण्यामागचा लेखकाचा हेतू सर्वांनाच सुस्पष्ट असावा म्हणून हे सांगितले . कृपया गैरसमज नसावा ही विनंती . असो .
स्वामींचे दर्शन घेऊन पुढे असलेल्या शनी मंदिरामध्ये गेलो . इथला शनि देवाचा मुखवटा फारच भीतीदायक आणि मोठा आहे .तसेच हे अतिशय जागृत स्थान आहे हे लगेच जाणवते .
 ॐ शं शनैश्चराय नमः ।
इथून माझा मोर्चा मी समोर असलेल्या मंदिर समूहाकडे वळवला . अनेक मंदिरे कमीत कमी जागेमध्ये जवळजवळ बांधून एक मजेशीर आकृतीबंध तयार झाला होता ! इथे श्री कुंभेश्वर महादेवाचे तीर्थक्षेत्र तसेच नानी पनौती आणि मोटी पनौती  अर्थात छोटी पनवती आणि मोठी पनवती यांची वरखाली मंदिर होती .
पनोती हा शब्द आपण बोलीभाषेत ऐकतो परंतु ही खरोखर मूर्ती स्वरूपात समोर प्रकट होऊ शकते हे आयुष्यात पहिल्यांदाच पाहिले ! हे आपल्या धर्माचे वैशिष्ट्य आहे ! आपण कुठल्याही तत्वाला सगुण साकार स्वरूपामध्ये पाहू शकतो ! या उलट काही लोकांना सगुण साकार परब्रम्ह समोर असूनही त्यातील निराकार परमेश्वर दिसत नाही किंवा त्याच्या अस्तित्वाची जाणीवच होत नाही . घोर दुर्दैव ! दुसरे काय !
 नानीमोटी पनौती मंदिर समूह
मागे कुंभेश्वराचे मंदिर दिसते आहे तर चौरसाकृती मंदिरे अनुक्रमे नानी व मोटी पनवती यांची आहेत .
 नानी मोटी पनौती मंदिर
जय श्री मोटा पनोती माता !
इथूनच एका अतिशय अरुंदजीन्याने वर चढून गेल्यावर नानी पनौती माता आहे . दक्षिणेमध्ये महादेवाची काही अशी मंदिरे आहेत ज्याचे शिवलिंग इतकी उंच आहे की जलहरी खालच्या मजल्यावर आणि शिवलिंगाचे टोक वरच्या मजल्यावर जाऊन पाहावे लागते . तशाच या एकाच अखंड दगडामध्ये घडविलेल्या वेगवेगळ्या दोन देवी असाव्यात असे मला वाटले .
यांच्या दर्शनाने तुम्हाला लागलेली पनोती जाते अशी श्रद्धा लोकांच्या मनात आहे . कुंभेश्वर महादेवाचे मंदिर देखील अतिशय पुरातन आणि खूप सुंदर आहे . 
श्री कुंभेश्वर महादेव . या शिवलिंगाची जलहरी षटकोनी आकाराची आहे .
विषय निघालाच आहे म्हणून सांगतो की अलीकडे काही धर्मद्रोही लोकांकडून शिवलिंग म्हणजे पार्वतीची योनी आणि त्यातून बाहेर आलेले भगवान महादेवाचे लिंग आहे असा अपप्रचार केला जातो . मुळात लिंग या शब्दाचा अर्थ आहे प्रगटीकरण . आत्मलिंग म्हणजे मी कोण आहे याचा साक्षात्कार ! तुम्ही तुमच्या सारखाच एक जीव प्रकट करू शकता म्हणून तुमच्या विशिष्ट अवयवाला लिंग हे नाव देण्यात आलेले आहे . परंतु शिवलिंग असे म्हणताना शिवतत्त्वाचे प्रगटीकरण जिथे पाहून तुमच्या अंतर्यामी होते ती जागा असा त्याचा अर्थ आहे . त्यामुळे नर्मदे काठी अनेक शिवलिंगे पाहिली तर ती विविध आकारांची , विविध प्रकारांची आहेत . शिवाय जलहरींचे आकार देखील त्रिकोणी ,चौकोनी , षटकोनी , गोलाकार , निराकार असे सर्व प्रकारचे आहेत . त्याचा  योनीशी काडीमात्र संबंध नाही . हे सर्वांनी पक्के ध्यानात घ्यावे . असो . 
चंदुलाल सोमण यांच्या चिरंजीवांनी गरम गरम भोजनप्रसाद मंदिरामध्ये आणून आम्हाला वाढला .
इथे येणाऱ्या परिक्रमावासींना फार मोठ्या प्रमाणात ते अन्नदान करतात .
चंदुलाल सोमण यांच्या घरी चालू असलेले अन्नदान
.
उजवीकडे दिसणाऱ्या छोट्याशा दारातून आत गेल्यावर सोमण यांच्या घराची मागची बाजू येते . इथे भरपूर परिक्रमा वासी भोजन प्रसाद घेऊन पुढे जातात .
चंदुलाल सोमण यांच्या चिरंजीवांनी माझ्या वहीमध्ये मारलेला आश्रमाचा शिक्का आणि तारखेसह त्यांची स्वाक्षरी .
परमपूज्य संत श्री चंदुलाल जी महाराज 
दत्तावतार स्वामी समर्थ 
पादुका स्थान 
नर्मदा जी सेवा आश्रम 
नर्मदेश्वर लक्ष्मी यंत्र मंदिर 
कुंभेश्वर पनोती तीर्थ 
तहसील जिल्हा नर्मदा राजपिपला
 गुजरात पिन तीन नऊ तीन एक पाच शून्य
स्वाक्षरी

इथून पुढे काठावर अनेक पुरातन मंदिरे आहेत . त्या सर्वांची दर्शने घेत जावे असे मनात आले . इथून जवळच रामेश्वर लक्ष्मणेश्वर महादेवाचे छोटेसे परंतु पुरातन मंदिर होते . या ठिकाणी राहून रामचंद्रांनी रावणाला मारल्याचे प्रायश्चित्त घेतले असे मानले जाते .
 मैय्याकडून रामेश्वराकडे घेऊन जाणारा रस्ता .
श्री रामेश्वर लक्ष्मणेश्वर मंदिर
नर्मदा मैया च्या महापुरामध्ये बुडत असल्यामुळे काठावरील सर्वच मंदिरांची दरवर्षी रंगरंगोटी करावी लागते .
श्री रामेश्वर भगवान की जय
हे शिवलिंग अन्य शिवलिंगां पेक्षा थोडेसे वेगळे आहे
 श्री रामेश्वर लक्ष्मणेश्वर महादेव
महादेवाची अतिशय सुंदर पूजा येथे करतात
इथून नर्मदा मातेचे पुढचे वळण खूप सुंदर दिसते .
नर्मदा मैया या परिसरात बऱ्यापैकी उथळ आहे .
सगळी वाळू सरदार सरोवर धरणामध्ये अडवली गेल्यामुळे इथे फक्त असे खडक सापडतात . याद रखना मैया का हर कंकर शंकर होता है !
इथून थोडेसे पुढे गेल्यावर मेघनाथ महादेव तीर्थ होते
श्री मेघनाथ महादेव दर्शन
इथे एक मजेशीर घटना घडली .माझा नित्यक्रम असा असायचा की मी सर्व देवांची दर्शने घेतली की आपोआप नर्मदा मातेकडे जायचो ,तिचे दर्शन घ्यायचो आणि पुढे काठाने चालू लागायचो . त्याप्रमाणे मी खाली आलो आणि नर्मदा मातेचे दर्शन घेतले . दर्शन घेतले म्हणजे स्पर्श दर्शन घेतले .
नर्मदा मातेला भजण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे . कोणी तिला कित्येक शेर दूधच पाजतात .
कोणी काठावर बसून ध्यानधारणा करतात
कोणी जलचरांना मुरमुरे वगैरे खाऊ घालतात
कोणी स्नानाचा आनंद घेतात
मला तसा तिचा अखंड स्पर्श हवा असायचा . सतत ती माझ्या शेजारी हवी असा माझा भाव असायचा . परंतु आज मात्र विपरीतच घडले . मला आतून असे वाटू लागले की किनारा सोडावा आणि वरील रस्त्यावरून चालावे . अर्थात इथून पुढे उजवीकडे वळण असल्यामुळे काठावरून चालण्यासारखा मार्ग उरलेलाच नाही हे मला स्पष्टपणे दिसत होते .परंतु असे दिसले तरी मी दरवेळी तिथे घुसायचो आणि काही ना काही करून मार्ग निघायचा . परंतु आज मात्र मला तसे घुसण्याची इच्छाच होईना आणि परत माघारी फिरावे असे वाटू लागले .
नर्मदा मातेची काय इच्छा आहे तेच मला कळेना .मी शांतपणे परत फिरलो आणि वरती चढून आलो आणि गावातील रस्त्याने चालू लागलो . थोडे अंतर गेल्यावर डाव्या हाताला एका मोठ्या झाडाच्या सावलीमध्ये एक लोखंडाची टपरी असलेली मला दिसली . त्या टपरी मध्ये एक सहावी सातवीतला मुलगा आणि एक नव्या इयत्तेमध्ये शिकणारी मुलगी असे दोघेजण अतिशय गंभीरपणे अभ्यास करत बसलेले होते . मला पाहताच त्या मुलीने नर्मदेहर असा पुकारा केला आणि पिण्यासाठी पाणी हवे का असे मला विचारले . उन्हा मधून चालल्यामुळे तिथे क्षणभर विसावा घ्यावा असे मला वाटले म्हणून मी झाडाच्या सावलीमध्ये उभा राहिलो . दोघे मुले पुन्हा अभ्यासाला लागली . मी उपजत चौकस बुद्धीने त्यांची चौकशी चालू केली की त्यांचे नाव काय कितवी मध्ये शिकतात वगैरे वगैरे . आता खरी गंमत इथून पुढे चालू होते ! त्या मुलांचे आई-वडील मोलमजुरी करून पोट भरत होते . आपल्या आई-वडिलांना आपणही थोडासा हातभार लावावा म्हणून दोघे मुले हे दुकान चालवायचे . सकाळ संध्याकाळी त्यांचा वडील दुकान सांभाळायचा . उद्या या मुलीची परीक्षा होती . संस्कृत हा १०० मार्काचा विषय तिने घेतला होता .या मुलीला संस्कृत या विषयांमध्ये भरपूर शंका होत्या आणि अशा सुमारे शंका तिने लिहून काढल्या होत्या . या शंकांची उत्तरे मिळाली नसती तर कदाचित तिच्या गुणांवर खूप मोठा परिणाम झाला असता . शेतातील कामे करायला जावे लागत असल्यामुळे तिची शाळा काही दिवस बुडायची त्या काळात शिकवलेले तिला काहीच कळलेले नव्हते . मुलगी गुणवत्ते मधील होती आणि शिकवलेली  प्रत्येक गोष्ट आपल्याला आलीच पाहिजे असा अट्टाहास असणारी होती .बाकी सर्व पेपर तिला चांगले गेले होते परंतु संस्कृत मध्ये आपले गुण कमी होणार हे दुःख तिला सतावत होते आणि त्यामुळे सकाळपासून ती नर्मदा मातेची करुणा भाकत होती की काही करून मला संस्कृत शिकव ! माझ्या शंका दूर कर ! नर्मदे(माझ्याशंका ) हर !  आणि इकडे मला नर्मदा मातेने तत्काळ बुद्धी दिली की मी उलटे वरती फिरावे आणि वरूनच चालावे !आहे की नाही गंमतच !
मी तिला पुस्तक मागितले आणि पहिल्या धड्यापासून शेवटच्या धड्यापर्यंत प्रत्येक धड्याचा अर्थ तिला फटाफट समजावून सांगितला . तिला अडलेली अनेक सुभाषिते मी तिला संधीविग्रहपूर्वक शिकविली आणि संधी कसे करतात , व्याकरणाचे नियम , शब्द कसा चालवायचा , क्रियापद कसे चालवायचे विविध काळ हे सर्व शिकविले . तिच्याकडे इंटरनेट असलेला एक स्मार्टफोन होता जो तिच्या वडिलांकडून तिने अभ्यासासाठी ठेवून घेतला होता . त्याच्यावर तिला मी संस्कृत शब्द धातू रुपावली पुस्तकाची पीडीएफ डाऊनलोड करून दिली . त्याशिवाय सर्व शब्द कसे चालवायचे हे तिच्या लक्षात राहावे म्हणून व्हॉइस रेकॉर्डर वर सर्व प्रकारचा एक एक शब्द आणि एक एक क्रियापद चालवून ते तिला पुन्हा पुन्हा ऐकायला सांगितले . तिने देखील अतिशय मोकळ्या मनाने आणि कुठलीही भीडभाड न बाळगता तिच्या मनातील सर्व शंका मला विचारून घेतल्या आणि मी माझ्या अल्पमतीप्रमाणे तिच्या सर्व शंकांना उत्तरे देण्याचा आटोकाट प्रयत्न केला . इयत्ता पाचवी ते बारावी मी आवडीने संस्कृत हा विषय घेतलेला होता त्या शिक्षणाचा अशा रीतीने कुठेतरी मला थेट फायदा झाला ! साधारण तासभर आमचा हा शिकवणीचा कार्यक्रम चालू होता . त्या मुलीला तिच्या सर्व शंका दूर झाल्यामुळे एक वेगळाच आत्मविश्वास प्राप्त झालेला मला स्पष्टपणे जाणवला . हा संपूर्ण काळ तिचा भाऊ देखील मान मोडून अभ्यास करत राहिला याचे मला खरोखरच खूप आश्चर्य वाटले . कारण हे दोघे नुसते गांभीर्यपूर्वक अभ्यासच करत नव्हते तर आपल्या आई वडिलांची परिस्थिती लक्षात घेऊन त्यांना आपल्या परीने होईल तेवढी मदत करून आर्थिक हातभार लावायचा देखील प्रयत्न करत होते . आमची शिकवणी चालू असताना एक दोन ग्राहक येऊन काहीतरी किरकोळ खरेदी करून गेले ते व्यवहार तिने चुटकीसरशी पार पाडले यावरून मला तिच्या बुद्धीची चुणूक पुन्हा एकदा जाणवली . विशेषतः तिला विभक्ती प्रत्यय कसे वापरतात आणि त्यांचे प्रयोजन काय हेच माहिती नव्हते . ते मी तिला सांगितल्यावर आणि तिला ते समजल्यावर तिच्या डोळ्यांमध्ये जी काही चमक मी पाहिली ती केवळ अलौकिक अशी होती ! नर्मदा खंडातील मुली अतिशय हुशार , अतिशय चाणाक्ष , अतीशय तेजस्वी आणि अतिशय तेज तर्रार आहेत असा माझा एकही अपवाद नसलेला अनुभव आहे ! या हुशार मुलीने आणि तिच्या ज्ञानपीपासेने माझ्या मनात कायमचे घर केलेले आहे .अशी ज्ञान मिळविण्याची तहान प्रत्येक भारतीय लहान  मुलाच्या अंतकरणात उत्पन्न झाली तर भारताला पुन्हा एकदा विश्वगुरू होण्यासाठी जरासाही वेळ लागणार नाही ! त्या मुलीकडे काय काय गुण होते ? परिस्थितीची जाणीव होती . भावंडांची काळजी घेण्याची वृत्ती होती . आई-वडिलांचे कष्ट समजण्याची वैचारिक कुवत होती . आपला उद्धार कशामुळे होणार आहे याची जाणीव होती . आपल्या परीने आपण आपल्या कुटुंबीयांना कशी मदत करू शकू ते करण्यासाठी लागणारी कृतीशीलता होती . तल्लख बुद्धिमत्ता होती . अफाट स्मरणशक्ती होती . उत्तम ग्रहण क्षमता होती .कष्टांची तयारी होती . शिस्तबद्ध जीवनशैली होती . अतीथ अभ्यागतांची विचारपूस करण्याची सहृदयता होती . सांगितलेले ऐकण्याची वृत्ती होती . नम्रता होती . शालीनता होती . आणि या सर्वांवर कडी करणारा एक जबरदस्त गुण तिस्मरणच्या ठाई होता .  त्या मुलीची नर्मदा मातेवर अपरंपार श्रद्धा होती .तिला प्रचंड विश्वास होता की मैय्याला  हाक मारली की मैया मदत करते ! आपले संकट दूर हरते !
स्मरण करिता नर्मदा प्रगट होते ।
दुःख संकट दारिद्र्य हरुनि नेते ॥
जरी शंका अज्ञान दुःख दाटे।
म्हणा सारे हर हर श्री नर्मदे ते ॥






लेखांक अठ्ठयाण्णव समाप्त ( क्रमशः)

टिप्पण्या

  1. नर्मदे हर🙏🙏🙏🙏🙏

    उत्तर द्याहटवा
  2. नर्मदे हर🙏🙏🙏🙏🙏

    उत्तर द्याहटवा
  3. नर्मदे हर🙏🙏🙏🙏🙏 माईच्या प्रतिक्षेत

    उत्तर द्याहटवा
  4. नर्मदे हर🙏🙏🙏🙏🙏 माईच्या प्रतिक्षेत

    उत्तर द्याहटवा
  5. Meghanad cha mrutyu lanke madhe zala hota na? tyachi samadhi Narmade kathi kashi kay?

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. समाधी नसावी परंतु स्मृतिस्थळ असावे . मेघनाथा ने नर्मदे काठी तपश्चर्य केलेली होती . त्याची तप स्थळी उत्तर तटावर आहे . रामरायांनी रावणाच्या मृत्यूचे प्रायश्चित्त या घाटावर घेतलेले असल्यामुळे इथे मेघनाथाच्या नावाने तर्पण वगैरे केलेले असू शकते . एक नम्र विनंती शब्दात पकडू नये . गर्भित अर्थ लक्षात घ्यावा ही प्रार्थना

      हटवा

टिप्पणी पोस्ट करा

जे आवडते सर्वांना ...

अनुक्रमणिका

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

लेखांक १ : नर्मदे हर !

लेखांक २ : भोपाळ जवळच्या जंगलातील अपघात

लेखांक ४ : झुठा कही का ! सबकुछ तो लाए हो !

लेखांक ३ : चोराची धन

लेखांक ५ : ग्वारीघाट जबलपुर मध्यप्रदेश

लेखांक ८३ : महाराष्ट्रात प्रवेश आणि भाबरीचे भेदक भिल्ल-महात्मा फोदला गारद्या पावरा

लेखांक ७४ : लेपा बांध , वेदा संगम , कठोरा अन् मांडव्य गुंफा

लेखांक ९० : गुजरात मधील कणजी चे सान्सुभाई तडवी आणि अरण्यव्याप्त माथासर