लेखांक ११० : नीलकंठेश्वराचे बुलबुला कुंड आणि हंसेश्वराचे पवित्र सूर्यकुंड

अंकलेश्वर येथील रामकुंड सोडले आणि महामार्गाने चालत निघालो . वाटेमध्ये गावांची वस्ती विरळ होत चालली होती . समुद्राच्या सानिध्यामुळे जमिनीची सुपीकता कमी झालेली होती . त्यामुळे कदाचित असे असावे . बरेच अंतर कडक उन्हामध्ये चाललो . प्रचंड उष्मा होता . शरीर पूर्ण भाजून निघायचे . इतके दिवस मैयाच्या काठावरून चालताना सुखद गारवा जाणवायचा . तसे इथे होत नव्हते . उजव्या बाजूला नर्मदा मातेचा त्रिभुज प्रदेश जवळ असल्यामुळे आणि समोर सगळा समुद्रच असल्यामुळे हवेतील आर्द्रता प्रचंड वाढलेली होती . त्यामुळे घामाघूम व्हायला व्हायचे . अशा कठीण परिस्थितीमध्ये एकमेव दिलासा म्हणजे माझी नर्मदा मैया होती ! तिच्याकडे पाहत चालत राहायचो ! अखेरीस बरेच अंतर चालल्यावर मूळ रस्त्यापासून एका बाजूला असलेले बलबला कुंड किंवा बुलबुला कुंड येथे जाण्याचा मार्ग लागला . बरेचसे परिक्रमावासी एका बाजूला असलेल्या या स्थानावर न जाता पुढे निघून जातात . परंतु मला हे कुंड पाहायचे होते . ही कश्यप ऋषींची तपोभूमी म्हणून प्रसिद्ध आहे . त्यामुळे मी इथे वळलो .
नकाशामध्ये पाहिल्यावर आपल्याला लक्षात येईल की अंकलेश्वर ते हांसोट हा नर्मदा मातेला समांतर सरळसोट रस्ता असून बलबला कुंड डावीकडे बरेचसे आत आहे . उजवीकडे नर्मदा मातेचा त्रिभुज प्रदेश दिसतो आहे .
 आश्रमामध्ये प्रवेश केल्याबरोबर डाव्या हाताला बलबला कुंडाचे दर्शन झाले . बलबले किंवा बुलबुले म्हणजे आपल्या मराठीतील बुडबुडे . या कुंडाच्या तळातून सतत बुडबुडे वर येतात . आणि पाणी उकळत आहे असा भास होतो . म्हणून याला बलबला कुंड असे म्हणतात . हा पूर्णपणे नैसर्गिक चमत्कार आहे ! जमिनीखाली निर्माण होणारे विविध प्रकारचे वायू या कुंडातून मुक्त होतात म्हणून हे बलबला कुंड आहे . अगदी असेच एक कुंड आपल्या महाराष्ट्रामध्ये मालवण तालुक्यामध्ये मठ बुद्रुक या गावात बोंबाडेश्वर म्हणून आहे . या कुंडात देखील भ बोंबेश्वर बोंबाडेश्वर म्हटले की पाण्यातून बुडबुडे येऊ लागतात ! बलबला कुंडामध्ये नर्मदे हर असा आवाज दिला की बुडबुडे येऊ लागतात ! आपल्या आवाजाला वारंवारिता अथवा "फ्रिक्वेन्सी " असते याचेच हे "प्रूफ " होय !  ध्वनी लहरी पाण्याच्या पृष्ठभागावर आदळतात . व तळापर्यंत पोहोचतात . तिथे मुक्त होण्यासाठी अडकून राहिलेले बडबुडे मग बाहेर पडतात . त्यांना कमी पडणारी थोडीशी ताकद आपल्या आवाजातून प्राप्त होते . मी इथे गेलो तेव्हा दुसरे कोणीच नव्हते . त्यामुळे मी भरपूर बुडबुडे काढले ! समोर कोणी असते तर कदाचित मी आरडाओरडा करण्यासाठी संकोच केला असता ! परंतु कमी आवाज जास्ती आवाज मध्यम आवाज असे विविध प्रयोग मी करून पाहिले ! अर्थातच पाण्यातून बाहेर येणाऱ्या बुडबुड्यांचे प्रमाण हे ध्वनीच्या आवाजाबरोबर अर्थात वॉल्यूम किंवा amplitude शी समप्रमाणात होते !
या कुंडातले पाणी गरम नाही परंतु उष्णतेमुळे कोमट लागत होते . तसेच इथे कधी मैया प्रकट होते तर कधी रत्नसागर प्रकट होतो . त्यामुळे याची चव कधी गोडसर असते तर कधी खारट लागते . थोडक्यात आपण जी जी कुंडे पाहत आहोत तो सर्व परिसर नर्मदा मातेच्या जलानेच संपृक्त होता . नदी म्हणजे काय असे जर कोणाला विचारले तर आपल्या डोळ्यासमोर एक चित्र असते . ते चित्र असते दोन्हीकडे उताराची भूमी असलेल्या मधून वाहणाऱ्या गतिमान पाण्याचे . परंतु केवळ ते वाहणारे पाणी म्हणजे नदी नसून तो त्या नदी नावाच्या व्यवस्थेचा केवळ एक भाग असतो . प्रत्यक्षामध्ये नदी म्हणजे नदीतील पाणी हे वरती दिसणाऱ्या पृष्ठभागा पुढील प्रवाहापेक्षा खूप मोठ्या प्रमाणात खालून आणि आजूबाजूला देखील वाहत असते . वाहत असे म्हणण्यापेक्षा साचलेले असते . आणि त्यातील जास्तीचे पाणी जे वर उघड्यावर येते ते वाहू लागते ज्याला आपण नदीचा प्रवाह असे म्हणतो . त्यामुळे एखादी नदी किंवा नदीचा प्रवाह जेव्हा आपल्याला दिसतो तेव्हा त्याच्या आजूबाजूला कित्येक मीटर किंवा कधीकधी कित्येक किलोमीटर तिचे अस्तित्व असू शकते . वाळू किंवा माती असेल तर विस्तार अधिक असतो . खडकांमध्ये विस्तारावर मर्यादा येतात . या कुंडामध्ये देखील पाणी भरती किंवा ओहोटीनुसार बदलले जाते याचाच अर्थ आपण समजून घेतला पाहिजे की इथे नर्मदा मातेचे अस्तित्व आहेच ! त्यामुळेच धरण बांधताना केवळ वाहणाऱ्या प्रवाहावर ते बांधले जात नाही तर खूप खोल आणि आजूबाजूला खणत जाऊन ते बांधावे लागते .
नदीच्या प्रवाहाचे पाणी आपल्याला दिसते त्यापेक्षा अधिक प्रमाणात खाली साचलेले असते . त्याला येऊन मिळणाऱ्या पाण्याचे ही तसेच आहे . कधी वरवर ओढे नाले वाहताना दिसतात तर कधी आतून प्रवाह असतात . परंतु समुद्रापाशी आल्यावर हे सर्व समान पातळीला येते . 
त्यामुळेच नर्मदा मातेच्या रत्नसागराच्या भेटीच्या पूर्वी अनेक कुंडे निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळतात . बलबला कुंडाची व्यवस्था पाहणाऱ्या एक माताजी होत्या .  गृहस्थाश्रमीच असाव्यात . मी महादेवाचे दर्शन करून आलो :मला त्यांनी एका बाजूला टाकलेल्या स्लॅब मध्ये बसायला सांगितले . तोपर्यंत त्यांनी स्वयंपाक केला . तिथे प्रचंड माशा होत्या . त्या वारत वारत पडून राहिलो . नंतर अंगणातच बसून भोजन केले . भोजनावर देखील प्रचंड माशा होत्या . त्या इतक्या अधिक होत्या की एक सेकंद सुद्धा इकडे पाहावे आणि तोंडात माशी जावी असे होत होते . अखंड सावधान राहुन भोजन केले . (कोणाला माशा मारण्याचे यंत्र दान करायचे असेल तर ही अगदी योग्य जागा आहे ! परंतु जीव हत्या करणारे यंत्र साधू लोक स्वीकारत नाहीत .सारेच कठीण आहे . ) प्रचंड उन्हाचा तडाखा असल्यामुळे काही वेळ पुन्हा त्या स्लॅब खाली विश्रांती घेतली . इथे दोन पंखे होते . त्याच्या मध्ये झोपले की माशा त्रास देऊ शकत नव्हत्या. तसे तासभर पडलो आणि पुढे निघालो . एकंदरीत हे बलबला कुंड पौराणिक असले तरी तिथले पावित्र्य हरपल्यासारखे झाले होते . अर्थात हे इथे बसून बोलणे सोपे आहे . तिथे राहून उन्हातानात त्याची व्यवस्था लावणे तितके सोपे काम नाही . त्यासाठी आपल्यासारख्या भक्त भाविक स्वयंसेवकांची मोठी आवश्यकता आहे . आश्रमातील परिसराचे दर्शन घेऊयात . 
हेच ते प्रसिद्ध बलबला कुंड आणि त्यातील बुडबुडे . जोरात ओरडले की मध्यभागी खूप मोठे बुडबुडे येतात . 
त्यामुळेच आजूबाजूला गर्दी वाढली की बुडबुडे वाढलेले आपल्याला दिसतात
कुंडामध्ये समुद्राचे पाणी आले की रंग बदलतो
कुंड मोठे असून फारसे चांगले ठेवलेले नाही
आजूबाजूला दलदल युक्त झाडी आणि मोठे तलाव आहेत
हे तलाव सूर्य विकासी कमोदिनी पुष्पांनी कायम बहरलेले असतात
त्यामुळे निळकंठेश्वराची पूजा बांधताना फुलांचा मुक्त वापर होतो .
मग ती परिसरात येणारी गोकर्णाची आणि शंकासुराची फुले असोत
किंवा कमलपुष्पे असोत ! अर्थात हे कमळ नाही कमोदिनी नावाचे फुल आहे . कमळाच्या पाकळ्या खूप मोठ्या आणि गोलाकार असतात . परंतु कमल वर्गीय वनस्पती आहे म्हणून कमळ . (देवाच्या पूजेचे सामान नेताना तरी प्लास्टिक वापरू नका भाविकांनो ! )
हे नीलकंठेश्वराचे मंदिर आहे .
मी गेलो तेव्हा त्याचा असा रंग होता . लाल रंग नव्हता .
या झाडाच्या सावलीत खाली बसून मी भोजन प्रसाद घेतला .
याच स्लॅब मध्ये मी काही काळ विश्रांती घेतली .
इथे एक मध्य प्रदेश मधील दांपत्य परिक्रमावासी येऊन बसले होते . इतक्यात गाडीने परिक्रमा करणारे मध्य प्रदेश मध्ये कुटुंबीय आले आणि त्यांनी एका कोपऱ्यात स्वयंपाक करायला सुरुवात केली . आश्रमाची व्यवस्था बघणाऱ्या माताराम अतिशय खंबीर आणि कडक स्वभावाच्या होत्या. स्लॅब मध्ये ठेवलेल्या खुर्चीवर त्या बसायच्या . माझ्याशी थोडावेळ गप्पा त्यांनी मारल्या आणि त्यानंतर मी तिथून निघालो . उन्हातून चालत वाटेत येणारी सर्व तीर्थक्षेत्रे पाहत पाहत निघालो . सजोद गावामध्ये सिद्ध रुद्रेश्वराचे मंदिर आहे . वालीनाथ महादेवाचे मंदिर आहे तसेच वैद्यनाथ मंदिर देखील आहे  .विशेषतः रुद्र कुंड हे अतिशय सुंदर पद्धतीने सांभाळले गेले आहे . यातील पाणी अतिशय स्वच्छ ठेवले जाते . शिवाय परिसराची स्वच्छता आणि रंगरंगोटी खूप चांगली ठेवलेली आहे . एखादे देवस्थान कसे सांभाळावे याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे रुद्र कुंड होते . 
स्वच्छ सुंदर रुद्र कुंड
कुंडामध्ये स्नान करण्यासाठी भाविकांची गर्दी असते
हा संपूर्ण परिसर अतिशय स्वच्छ आणि नीटनेटका ठेवलेला आहे . येथील सिद्धनाथ महादेवाचे मंदिर पौराणिक आहे . याला सिद्धरुद्रेश्वर देखील म्हणतात .
मंदिर अतिशय सुंदर असून गुजराती पद्धतीचा घुमटाकार कळस आहे .
मंदिर परिसर स्वच्छ पवित्र आणि नीटनेटका आहे .
मंदिरात स्वच्छता राखण्याविषयीच्या पाट्या सर्वत्र लावण्यात आलेल्या आहेत . स्वच्छतेविषयीचा मंदिर व्यवस्थापनाचा आग्रह सर्वत्र प्रकर्षाने जाणवला .
गर्भगृह देखील अतिशय स्वच्छ असून सिद्धरुद्रेश्वर महादेवांचे दर्शन आनंदपूर्वक घेता येते .
श्री सिद्धरुद्रेश्वर महादेव
इथेच नर्मदा मातेचे देखील मंदिर आहे
प्रचंड ऊन पडलेले असल्यामुळे तिथे केलेल्या सावलीमध्ये क्षणभर बसलो .
जाळीच्या बाजूने नर्मदा मातेकडून येणारा थंडगार वारा सुखद वाटत होता . रेवा गंध घेऊन येणारा तो वारा मनाला भावुक करत होता .
इथून बाहेर पडल्यावर गावात अजूनही काही मंदिरांचे दर्शन घेतले . श्री राजराजेश्वरी माताजी मंदिर .

भाथीजी , बलियादेव , खेरापती , खेरामाई , मसान मेलडी , खोडीयार माता , सिंधवाई माता अशा काही स्थानिक देवी देवतांची मंदिरे देखील इथे गावोगावी आढळतात . 
मसाण मेलडी माता (स्मशान )
 सजोद गावाच्या एका बाजूला दुर्लक्षित असे श्री लक्ष्मीनारायणाचे मंदिर देखील आहे . त्याचे सुद्धा दर्शन मी घेऊन आलो . तिथली मूर्ती खूप सुंदर आहे .
 सजोद गावातीलच एका स्थान देवतेचा फुलांनी केलेला शृंगार ! गुजरातेत देवतार्चनामध्ये फुलांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो
 शेरा गावातील नर्मदेश्वर महादेव आणि त्यांची पेढ्यांनी बांधलेली पूजा
गुगल नकाशावर हे चित्र पाहिले परंतु नक्की कशाची पूजा आहे ते लक्षात येत नव्हते . परंतु अचानक खवा पेढा असा मिश्र वास येऊ लागला त्यावरून असा अंदाज बांधला की ही खव्याची किंवा पेढ्याची पूजा असावी . अशा विविध प्रकारच्या पूजा बांधण्याची पद्धत नर्मदा खंडामध्ये सर्वत्र आढळते .
त्यानंतर महामार्गावर चालत हांसोट गाव गाठले . हंसेश्वर महादेवा वरून हे नाव पडलेले आहे . इथे शहरामध्ये प्रवेश केल्यावर मोदी आडनावाच्या एका दुकानदाराने बोलावून घेतले . मी तुमची काय सेवा करू असे तो मला विचारू लागला . मैया चा शृंगार करण्यासाठी मला फेविक्विक किंवा तत्सम अढेजिव्ह हवे होते . ते मागितल्याबरोबर त्यांनी मला adhesive तर दिलेच वर दक्षिणा देऊन बिस्कीट चे पुडे दिले . नको म्हणायचा प्रश्नच नसतो . परिक्रमेमध्ये नाही म्हटले की मैय्या चांगला धडा शिकवते ! इतक्यात याच दुकानदाराकडे विविध उत्पादनांचे रतीब आणून घालणारा अर्थात डिलिव्हरी करणारा दत्तू पटेल नावाचा वितरक अथवा डिस्ट्रीब्यूटर युवक भेटला . याने मला अजून काही बिस्किटचे पुडे , टॅंग नावाचे सरबताचे पाकीट आणि ताकाचे पाकीट इत्यादी मोठ्या प्रेमाने दिले .मैया आज कधी नव्हे ते इतक्या सार्‍या गोष्टी का देते आहे हे मला लक्षात येत नव्हते . ते त्या रात्री मुक्कामी लक्षात आले ! 
वाटेमध्ये नर्मदापुराणात उल्लेख असलेली महादेवाची तीन तीर्थक्षेत्र होती . त्यांची दर्शने करत आलो . आपणही करा . 
 हांसोट हे नाव या गावाला ज्याच्यामुळे पडले ते हंसेश्वर महादेव . हंसपूर असे या गावाचे पौराणिक नाव आहे .
श्री हंसेश्वर महादेव
हे श्री तिलेश्वर महादेवाचे मंदिर आहे
श्री तिलेश्वर / तिल्लेश्वर महादेव 
श्री तिलेश्वर महादेव 
श्री रत्नेश्वर महादेव आणि त्यांची वैशिष्ट्यपूर्ण अष्टकोनी जलहरी
यानंतर मी सूर्यकुंड या पवित्र तीर्थक्षेत्राकडे आपला मोर्चा वळवला . या संपूर्ण गावामध्ये हिंदूंची वस्ती खूप कमी आहे .त्यामुळे मंदिरांची देखील बऱ्यापैकी दुरावस्था झालेली जाणवते . याही तीर्थस्थानाची व्यवस्था पाहणारा कोणीही महंत तिथे नव्हता .जाणारे येणारे भाविकच स्वेच्छेने सगळा कारभार पाहत होते . 
सूर्यकुंड गावापासून थोडेसे एका बाजूला बाहेर आहे . डावीकडे लाल कोण दिसते आहे तिथे परिक्रमावासींची उतरण्याची सोय केलेली धर्मशाळा आहे . शेजारीच फार मोठा दर्गा आहे .
मी ज्या ठिकाणी आलो तेव्हा या म्हणणारे देखील कोणी नव्हते . अंदाजेच मी धर्म शाळेचे दार उघडले आणि आत मध्ये गेलो . छोटेसे मोकळे मैदान होते . एक पाण्याची टाकी भरून ठेवली होती . समोर छोटे मंदिर होते . एका बाजूला दोन खणांची उघडी धर्मशाळा होती . म्हणजे छप्पर होते परंतु एका बाजूला भिंत नव्हती . इथे मी आसन लावले . आणि सूर्यकुंडाचे तसेच हनुमान मंदिर आणि महादेवांचे दर्शन घेऊन आलो . 
सूर्यकुंडाचा परिसर आणि मागे दिसणारा दर्गा
सूर्यकुंड अतिशय पवित्र आणि शुद्ध जला ने युक्त आहे . कुंडाचे छोटेसे पांढरेदार कायम बंद असते . डावीकडे हनुमान मंदिर आणि समोर शिवालय आहे .
सूर्यकुंडाचे पवित्र शीतल जल
कुंडाचे पाणी स्वच्छ असल्यामुळे तळ दिसतो . मध्यभागी कुंड प्रचंड खोल आहे .
अन्य धर्मीयांचा उपद्रव वाढल्यामुळे अशी पाटी इथे लावावी लागली आहे
समोरच असलेल्या धर्म शाळेचे दार
हीच ती बिनभिंतीची धर्मशाळा ! इथला मुक्काम संस्मरणीय ठरला !
मी या भागातील परिसराची स्वच्छता करून लावलेल्या झाडांना आळी वगैरे करून ठेवली . झाडून पुसून सर्व परिसर चकाचक करून टाकला .

तोपर्यंत तिथे अजून एक परिक्रमावासी आले होते . यांचे नाव होते लक्ष्मीनारायण ! हे माझे अतिशय आवडते परिक्रमा वासी होते ! यापूर्वी दोन-तीन मुक्कामांवर माझी यांची भेट झाली होती . यांचे वय ८४ होते . गोरा पान वर्ण ! पाठीला आलेला बाक . अनवाणी चालणार ! सतत तोंडामध्ये नर्मदा मातेचे नामस्मरण ! आणि रोज दिवसातून एकदा तरी नर्मदा मैया ला सुंदर कांड ऐकवल्याशिवाय अन्नग्रहण करत नसत ! फारच मोठे तपस्वी होते . स्वतःबद्दल स्वतःच्या गावाबद्दल एक अक्षर बोलत नसत . बोलायला गेले की फक्त नर्मदा मातेचे गुण गान करायचे ! परिक्रमेमध्ये अन्य विषयांवर चर्चा करणारा परिक्रमावासी दिसला की त्याला मोठ्या शिताफीने ते मूळ पदावर आणून सोडायचे .मला हे खूप आवडायचे आणि यांना देखील मी खूप आवडलो होतो . मला तसेही म्हातारे लोक खूप आवडतात . कारण त्यांच्याजवळ अनुभवांचा मोठा खजिना असतो !आणि आयुष्यभराच्या अनुभवातून त्यांची द्वेष भावना संपलेली असते ,त्यामुळे निर्मळ निष्पाप हास्य तेवढे शिल्लक राहिलेले असते .  लहान मुले पण आवडतात ! कारण ती इतकी निरागस निष्पाप असतात की साक्षात परमेश्वराचे स्वरूपच जणु !  अधले मधले माझ्यासारखेच उचापती असतात त्यामुळे त्यावर अधिक न बोललेलेच उत्तम ! 
लक्ष्मीनारायण यांनी माझ्या शेजारी आसन लावले आणि बाहेर टाकीवर स्नान करून क्षणाचाही विलंब न लावता सुंदर कांड वाचायला बसले . मी देखील माझी उपासना पूजा आटोपून घेतली . आणि गावात चक्कर मारायचे ठरवले . परिक्रमेतील प्रत्येक मुक्कामावर कुठे ना कुठे भोजन प्रसाद किंवा किमान सदाव्रत तरी मिळते .परंतु इथे कशाचाच मागमूस नव्हता . कुणी मंदिराकडे फिरकतच नव्हते . त्यामुळे आज उपवास घडणार हे निश्चित होते . माझ्यासोबत माझी मैय्या होतीच .
गावातील इमारती खूपच सुंदर होत्या . छोटी छोटी घरे एकमेकांना खेटून बांधण्यात आली होती . परंतु प्रत्येक घर दोन दोन तीन तीन मजली होते . आणि अतिशय सुंदर अशी कलाकुसर समोरच्या बाजूने करून घरे आकर्षक बनविण्यात आली होती .गावातील एका छोट्याशा डेअरीमध्ये एक माताराम आणि त्यांची तरुण मुलगी उभ्या आहेत असे मला दिसले . दोघींनी मला आवाज दिला आणि मला स्वतः बनविलेले श्रीखंड आणि दही दिले ! जलाराम डेअरी असे या डेअरीचे नाव होते . मी त्यांच्याकडून गावाची माहिती घेऊ लागलो .
हीच ती जलाराम डेअरी
 आसपासची काही मंडळी देखील आली . आणि त्यांनी मला गावातून चक्क एक छोटी चक्कर मारून आणली ! या गावातील घरे फारच सुंदर होती . परंतु या संपूर्ण वास्तु सौंदर्याला एका शोकांतिकेची किनार होती . गोधरा कांड झाले तेव्हा या गावात मोठा नरसंहार उसळला होता . त्यामुळे साध्या आणि सरळ मार्गी लोकांचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या या गावातील बहुतांश लोक राहती घरे वाऱ्यावर सोडून निघून गेले .आता या गावामध्ये साधारण नव्वद टक्के परधर्मीयांची वस्ती आहे . या गावातील लोक मोठे उद्योजक म्हणून प्रसिद्ध आहेत .त्या सर्वांची घरे मला गावकऱ्यांनी दाखवली . विशेषतः कॅडीला या औषध कंपनीचे मालक श्री इंद्रवदन मोदी
याच गावचे . सध्या त्यांचे चिरंजीव डॉक्टर राजीव मोदी कंपनी चालवत आहेत .त्यांचेही सुंदर असे टुमदार घर इथे अजूनही आहे . आता त्यांची घरे जगभरातील अनेक देशात आहेत परंतु या मूळ घरी अजूनही ते येतात .
 हांसोट मधील सुंदर दुमजली घरे . विजेच्या तारांचा आणि खांबांचा वापर करून परिसराचे विद्रुपीकरण करण्यात भारतीयांचा हात कोणी धरू शकत नाही !
प्रत्येक घरावर सुंदर नक्षीकाम केलेले आढळते
नक्षीदार लाकडी पट्ट्या आणि सुंदर खिडक्या लक्ष वेधून घेतात .
कॅडीला या भारतातील सर्वात मोठ्या औषध निर्मिती कंपन्यांपैकी एक असलेल्या कंपनीचे प्रवर्तक श्री इंद्रवदन मोदी याच गावचे .
त्यांच्यामुळे इंदिरा गांधी या गावात आल्या असे ग्रामस्थांनी सांगितले . 
नेते आले की त्यांचे मतदाराही पाठोपाठ येतात ! अक्षरशः बाहेरून कुटुंबे आणून या गावांमध्ये वसविली गेली . ग्रामस्थांनी सुद्धा अतिशय सहिष्णुता दाखवत सर्वांना गावात सामावून घेतले . परंतु हळूहळू लोकसंख्येचा विस्फोट होऊ लागला . नवीन पिढी आमचे ऐकत नाही असे टिपिकल उत्तर जुन्या पिढीतील लोक देऊ लागले .सध्या गावातील हिंदूंच्या घरांची अवस्था कशी आहे हे आपण स्वतः गुगल नकाशावर जाऊन पाहू शकता .
मोदींच्या परिसरातील घरांची अवस्था ! अक्षरशः राहती घरे सोडून लोक निघून गेलेले आहेत . सगळीकडे कब्जा पार्टी जोरात आहे . अर्थात ज्याचा ताबा त्याचे घर अशा अवस्था सुरू झालेली आहे . 
हे केवळ हांसोट या एका गावाचे चित्र नसून भविष्यामध्ये आपल्या देशामध्ये काय वाढवून ठेवले आहे याची ती नांदी आहे . नर्मदा परिक्रमा तुम्हाला अनेक गोष्टी शिकविते दाखविते त्यातील हा देखील एक धडा आहे . ज्यांना प्रत्यक्ष नर्मदा परिक्रमा करणे शक्य नाही त्यांना कदाचित हा धडा कधीच कळणार नाही परंतु किमान आपल्या वाचकांना तो धडा माहिती असावा म्हणून मुद्दाम सविस्तर सांगितले आहे . जलाराम डेअरीतील काकूंना त्यांच्या मुलींची खूप काळजी वाटायची . आणि ते स्वाभाविक होते . मुली तरुण होत्या . घर चालवायचे तर व्यवसाय सांभाळला पाहिजे . दुकानांमध्ये ग्राहक म्हणून कोण येईल याचा काही नेम नसतो .  बाहेर कुठे जावे तर त्यासाठी लागणारा पैसा सोबत नाही . इथे घर विकायचे म्हटले तर अतिशय पडेल किमतीला इतर धर्मातील लोकच घरं मागतात . मिळेल त्या किमतीला घर विकून मोकळे होणे किंवा आहे त्या परिस्थितीमध्ये अपमानपूर्वक जगणे जगत राहणे इतकेच इथल्या हिंदूंच्या हातात राहिलेले आहे . लोक आजही म्हणतात बरे झाले असते जर मोदी साहेबांनी इंदिरा गांधीला आमच्या गावात आणले नसते . परंतु आता बोलून काही उपयोग नाही . गावाचे व्हायचे तितके नुकसान झालेले आहे . आपल्या समाजाचे एक वैशिष्ट्य आहे . आपण उदाहरणातून शिकत नसतो . एखाद्या ठिकाणी एखादी गोष्ट घडली की त्यापासून सावध होऊन पुढच्या वेळी काळजी घेण्याची प्रवृत्ती ज्या समाजामध्ये नसते तोच खरा हिंदू समाज . मी उद्विग्न मनाने परत धर्म शाळेमध्ये आलो तेव्हा लक्ष्मीनारायण आजोबा अजूनही रामायण वाचत बसले होते . आज भोजन मिळणार नाही हे लक्षात आल्यावर मी बिस्किटे अधिक टँग अधिक श्रीखंड अधिक दही असे खायला सुरुवात केली . लक्ष्मीनारायण यांचा चैत्र नवरात्रीचा उपवास सुरू होता . मी खूप आग्रह करून देखील ते काहीच घेईनात . शेवटी मला अचानक आठवले की दत्तू पटेल ने दिलेले ताक तसेच ठेवलेले आहे . ते मी त्यांना दिल्याबरोबर आजोबा ढसाढसा रडायला लागले . मला म्हणाले मी रामायण वाचत बसलेलो असताना नर्मदा माईला मघाशीच म्हणालो होतो की माई ताक मिळाले असते तर बरे झाले असते ! त्यांनी प्रत्येक घोटाला अश्रू ढळत ते ताक ग्रहण केले ! मी लक्ष्मीनारायण यांच्याकडे पाहत असे . प्रत्येक मुक्कामात मी त्यांचे निरीक्षण केले होते . तो एक आदर्श वृद्ध गृहस्थ होता . आपल्या सर्व मर्यादा त्यांनी ओळखल्या होत्या आणि स्वीकारल्या होत्या . विशेषतः अलीकडच्या काळामध्ये वार्धक्य जवळ येऊ लागल्यावर आम्ही कसे तरुण आहोत हे दाखविण्याची जी चढाओढ लोकांमध्ये लागलेली दिसते त्यापासून ते पूर्णपणे बाहेर होते . असे स्वतःला तरुण समजणारे वृद्ध मग काठी घेण्याचे टाळतात . केस काळे करतात . चित्रविचित्र , आयुष्यात कधीही न घातलेले कपडे घालायचा प्रयत्न करतात . कुठे नाच कर कुठे काहीतरी वेडे चाळे कर असे प्रकार सुरू करतात . जरा हा एक रोग आहे हे सर्वप्रथम आपण लक्षात घ्यावे . आयुर्वेद "जरा " ही एक व्याधी आहे असे मानतो आणि त्यावर औषधोपचार देखील आहेत . तरुणपणी सतत क्रियाशील राहिल्यामुळे जरा येण्याचे लांबते परंतु टळत मात्र नाही .लक्ष्मीनारायण आपल्या म्हातारपणाचा योग्य सदुपयोग करत होते . घरी आपली गरज नाही आणि आपल्याला मुलांची गरज नाही अशा अवस्थेमध्ये आल्यावर त्यांनी सुंदर अशी परिक्रमा सुरू केली होती . रोज थोडे थोडेच अंतर ते चालायचे . अधिक काळ मुक्काम करायचे आणि साधनेचा आनंद घ्यायचे . सतत " जय हो माई की चिंता काही की !" असे म्हणायचे ! जरा काही झाले की म्हणायचे माई मारे ! म्हणजे आई मारेल ! मी त्यांना म्हणालो की थोडेसे श्रीखंड खाता का ? लक्ष्मीनारायण म्हणत , "उपवासामध्ये श्रीखंड खाऊ ? माई मारे ! " मी त्यांना विचारले परंतु आई प्रेमळ असते ना ? ती आपल्या मुलाला कशाला मारेल ? ते मला म्हणाले , " ज्या मुलाकडनं आईला जास्त अपेक्षा असतात त्याला आईचा चांगला मार पडतो ! वाया गेलेला मुलगा असेल तर आई पण त्याच्या नादाला लागत नाही . पण चांगले वर्तन असलेला मुलगा जरा वाईट वागला तर मात्र आई त्याला चांगली बदलून काढते ! तसेच आपले पण आहे ! " त्यांचा अनुभव अधिकार आणि साधना सर्वच माझ्यापेक्षा श्रेष्ठ असल्यामुळे मी मतांतर व्यक्त करण्याचा प्रश्नच नव्हता . मी त्यांना म्हणालो ,"तुमचे इतके वय झाले आहे . तुम्ही चप्पल का घालत नाही ? " " जूते पहन के परकम्मा ? माई मारे ! " त्यांची आणि माझी चांगली नाळ जुळली ! रात्री उशिरापर्यंत आम्ही गप्पा मारत बसलो ! ते स्वतःच्या जीवनाबद्दल जरा देखील सांगत नव्हते . परंतु मी जेव्हा त्यांना खूप खोदून खोदून विचारले आणि त्यांना सांगितले की मी स्वतःला तुमच्या जागी ठेवून पाहत आहे आणि विचार करत आहे की तुमच्या वयाचा झाल्यावर मी काय करत असेन ? किंवा काय केले पाहिजे ! म्हणून तरी मला मार्गदर्शन करा !
मग मात्र त्यांनी त्यांची संपूर्ण जीवन कहाणी मला सांगितली . त्यांनी एका आयुष्यात करता येतील अशा सर्व गोष्टी करून पाहिलेल्या होत्या . उत्तम नोकरी , मोठा धंदा ,भरपूर मुलेबाळे , प्रचंड प्रॉपर्टी , मान मरातब , राजकारण , समाजकारण , अर्थकारण सर्व पोटभर करून झाले होते . समाजातील लोक तुमच्यापर्यंत त्याच काळात पोहोचतात ज्या काळात तुम्ही त्यांना काहीतरी देत असता . ज्या क्षणी तुमचे देणे बंद होते त्या क्षणी लोक तुम्हाला विसरतात . हा मनुष्य स्वभाव आहे .याला पर्याय नाही . एखादा सन्माननीय अपवाद वगळला तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये हा अनुभव येऊन गेलेला असतो . आपल्या आजूबाजूलाही आपण अशी असंख्य उदाहरणे पाहत असतो . मला नेहमी एकच उदाहरण आठवते ! श्री शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकाला याच वर्षी साडेतीनशे वर्षे पूर्ण झाली ! साडेतीनशे वर्षांपूर्वी दुर्गराज रायगडावरील वातावरण कसे असेल आणि आता कसे आहे तुलना करून पहा ! ज्यांनी स्वतःच्या कुटुंबाची राख रांगोळी करून संपूर्ण समाजाकरता जीवन समर्पित केले त्या शिवछत्रपतींसारख्या महान पुण्यपुरुषाच्या संपत्तीची अशी अवस्था केवळ साडेतीनशे वर्षात होणार असेल तर तुमच्या आमच्या कमाईचे काय होणार विचार करून पहा ! लक्ष्मीनारायण आजोबांनी योग्य वेळी हा विचार करून सर्व सोडून दिले आणि सुंदर अशा परिक्रमेला ते निघाले . त्यांनी मला सांगितले की एक लक्षात ठेव बाळा ! या जगामध्ये कोणीही तुला फुकट खायला घालत नाही ! तू काहीही करत नाहीस आणि तुला खायला मिळते आहे असे कधीच होणार नाही . ते प्रेम फक्त नर्मदा माईच आपल्यावर करू शकते . तू परिक्रमेमध्ये काहीही करू नकोस तरी तुला मैया खायला घालणार ! मी आयुष्यामध्ये बऱ्याच लोकांना खायला घातले ,म्हणजे असा भ्रम मी पाळला . परंतु जेव्हा माझी पाळी आली तेव्हा मात्र मला कोणीही खायला घालणार नाही हे माझ्या लक्षात आले . मी स्वाभिमानी असल्यामुळे कोणाचे उपकार घ्यायचे नाहीत असे ठरवले आणि नर्मदामाईचा जयजयकार करत घराबाहेर पडलो ! माई तेरी जय हो ! माई एकदा मला म्हणाली की मला सुंदर कांड ऐकव ना ! तेव्हापासून तिला रोज सुंदर कांड ऐकवल्याशिवाय पुढे जात नाही ! सुंदर कांड खरंच खूप सुंदर आहे रे !आयुष्यात वेळ मिळाला तर नक्की वाच !
आणि हे खरेच आहे . समर्थ रामदास स्वामींनी रामायणातील सात कांडांपैकी फक्त सुंदर कांडाचाच मराठी मध्ये अनुवाद केलेला आहे . हनुमंत आणि प्रभू रामचंद्र यांच्यातला सर्वाधिक संवाद या सुंदरकांडातच येतो . त्यामुळे हे मुळातूनच सुंदर आहे . भक्ताने कसे असावे ,कसे वागावे ,काय करावे ,काय करू नये हे सुंदर रीतीने आपल्याला शिकवते ते सुंदर कांड ! सुंदर कांडा मध्ये हनुमंताची भक्ती शक्ती युक्ती आणि जीवन मुक्ती या सर्वांचेच फार सुंदर वर्णन येते . त्याची युद्धनीतिनिपुणता , साहस , शौर्य , पराक्रम , धैर्य , धाडस ,हिकमत , हिम्मत या सगळ्यांचा परिचय आपल्याला सुंदर कांड च करून देते . माईचे हे सर्वाधिक आवडते कांड आहे असे लक्ष्मीनारायण सांगायचे . त्या रात्री उपाशीपोटी झोपूनही खूप चांगली झोप लागली . सकाळी एक चमत्कार अनुभवायला मिळणार होता ! मला लक्ष्मीनारायण यांचा सत्संग संपूच नये असे वाटत होते !त्यामुळे सकाळी लवकर उठून जायची गडबड मी केली नाही . निवांत आवरले आणि सूर्यकुंडामध्ये दर्शनासाठी गेलो . इथे एक तरुण ग्रामस्थ आला होता . तो इथला कार्यकर्ताच होता . त्याने मला सांगितले की या सूर्यकुंडा मध्ये दीडशे ते दोनशे कासवे आहेत . आणि लहान-मोठी कासवे दिसतही होती . परंतु यामध्ये एक भुरे , पांढरे किंवा गुलाबी रंगाचे कासव आहे जे कधीच कुणाला दिसत नाही . याच्या पाठीवर नैसर्गिक च त्रिशूल काढलेला आहे . मला हे ऐकून आश्चर्य वाटले आणि मनात इच्छा उत्पन्न झाली की आपणही या कासवाचे दर्शन घ्यावे ! प्रार्थना केल्याबरोबर तसेच एक कासव दिसल्यासारखे मला झाले . परंतु व्यवस्थित समाधान पूर्वक दर्शन झाले नाही . 
मी त्याला विचारले की ते कासव कधी बाहेर येते ? तो म्हणाला ते कासव इतके दुर्मिळ आहे की आमच्या गावातील देखील सर्वांनी अजून पाहिलेले नाही . मी सुद्धा रोज इथे येतो परंतु दोन वेळा च त्याला पाहिलेले आहे . ते वर्ष सहा महिन्यातून एकदा कधीतरी बाहेर येते . आणि लगेच पाण्यात निघून जाते . परंतु बाहेर कधी येते ? मी विचारले .तो म्हणाला की जेव्हा कुणी साधुसंत इथे सूर्यकुंडाच्या दर्शनासाठी येतात तेव्हा त्या संतांचे दर्शन घेण्यासाठी कासव वर येते ! असे तो म्हणाल्याबरोबर माझी ट्यूब पेटली ! मी त्याला लक्ष्मीनारायण आजोबांविषयी सांगितले ! ते खरोखरीच फार मोठे संत होते अशी माझी व्यक्तीशः खात्री पटलेली होती ! खरे म्हणजे या कुंडामध्ये स्नान करायला परवानगी नव्हती . परंतु त्या कार्यकर्त्याला देखील कासव पुन्हा पहायचे होते म्हणून त्याने त्याच्याजवळ असलेल्या किल्लीने सूर्यकुंडाचा रस्त्यावरून येणारा दरवाजा उघडला आणि आम्ही दोघांनी लक्ष्मीनारायण आजोबांना सांगितले की सूर्यकुंड स्नान करण्यासाठी उघडलेले आहे . आम्ही दोघे पटकन मारुतीच्या मंदिरामध्ये येऊन कासवाची वाट पाहत उभे राहिलो . लक्ष्मीनारायण आजोबा शांतपणे सूर्यकुंडामध्ये आले . मांडी घालून खाली बसले . त्यांनी कुंडाला नमस्कार केला आणि डोक्यावर पहिला तांब्या घेतला . त्याबरोबर तलावाच्या मधोमध मोठी हालचाल झाली आणि एक प्रचंड कासव वरती आले ! त्याच्या पाठीवर चक्क काळ्या रंगाचा त्रिशूल कोरलेला स्पष्टपणे दिसत होता ! कासवाचा रंग फिकट बदामी होता ! आम्ही दोघांनी त्याला नमस्कार केला आणि जयजयकार केला ! काही काळ स्थिर राहत त्याने आजोबांचे दर्शन घेतले आणि आमचा आवाज ऐकताच एका क्षणात ते खाली निघून गेले ! मघाशी देखील हेच कासव वर आले होते परंतु ते अक्षरशः एका क्षणात खाली निघून गेले होते .त्यामुळे नीट पाहता आले नव्हते .आता मात्र त्याचे छान दर्शन झाले ! आजोबांना काहीच कळाले नाही ! परंतु आम्ही नालायकांनी त्या संतांचा वापर करून स्वतःचा कार्यभाग साधून घेतला होता ! त्या कार्यकर्त्याने त्यानंतर तिथेच काही फोटो काढले . आणि माझ्या मित्राच्या क्रमांकावर पाठवून दिले . आपणही सूर्यकुंडाचे दर्शन घ्यावे ! 
सूर्यकुंडापाशी कासवाचे दर्शन झाल्यानंतर उभा असलेला प्रस्तुत लेखक आणि मागे स्नान करणारे लक्ष्मीनारायण आजोबा ! सूर्यकुंडाच्या भिंतीच्या बाहेर एकदम मागे पाण्याची टाकी दिसत आहे तिथे खरे तर स्नानासाठी सगळेजण जातात . परंतु कासवाचे दर्शन घेण्यासाठी आम्ही आजोबांना त्यांच्या मागे दिसणारे छोटेसे दार उघडून आत मध्येच स्नाना साठी बसविले !
आजोबांचे स्नान बराच वेळ सुरू होते . आणि आमचा आनंद गगनात मावत नव्हता ! कासव फोटोत कैद झाले नाही परंतु आजोबा नक्की आले !
या प्रकारामुळे अनेक गोष्टी सिद्ध झाल्या ! एक तर त्रिशूलधारी कासवाचे अस्तित्व सिद्ध झाले ! दुसरे म्हणजे लक्ष्मीनारायण आजोबांचे संतत्व सिद्ध झाले ! आणि तिसरे म्हणजे नर्मदा मातेची आमच्यावर कृपा आहे हे देखील सिद्ध झाले कारण मनात आलेली इच्छा तिने लगेच पूर्ण केली ! फक्त तत्पूर्वी उपवास घडवला ! 
चांगले दहा-साडेदहा वाजेपर्यंत मी आजोबांसोबत सत्संग करीत राहिलो .निघण्याच्या वेळी जलाराम डेअरी येथील काकू आणि ताई मला भेटायला आल्या आणि त्यांनी मला माझ्या नर्मदा मैया साठी सुंदर अशी चुनरी आणि दागिने टिकल्या वगैरे दिले ! हा साज शृंगार चढवल्यावर मैया अजूनच सुंदर दिसू लागली ! दोघींचे आभार मानले आणि आजोबांना साष्टांग नमस्कार केला .
नर्मदा मातेची माझ्यावर असीम कृपा असल्यामुळेच या आजोबांचे दर्शन मला घडले ! सत्संग घडला ! हे लक्ष्मीनारायण आजोबा माझ्या कायम लक्षात राहतील ! मी चुकून माकून थोडा जास्त टिकलो आणि म्हातारा झालोच तर नक्कीच या लक्ष्मीनारायण आजोबांसारखे जीवन जगेन ! आणि त्यामुळे जरा काही चुकीचे वागू लागलो की स्वतःलाच सांगेन ,"माई मारे ! "
आणि मनात भविष्याची चिंता वाटू लागली की म्हणेन , " माई की जय हो !  जय हो माई की , जय हो माई की , चिंता काहे की ! " 





लेखांक एकशे दहा समाप्त (क्रमशः )

टिप्पण्या

  1. अद्भुत, अलौकिक . नर्मदे हर हर

    उत्तर द्याहटवा
  2. नर्मदे हर🙏🙏🙏🙏🙏

    उत्तर द्याहटवा
  3. नर्मदे हर.
    माझ्या "आठवणींचा झिम्मा " या पुस्तकाचे प्रकाशन 15 जून ला आहे. जेष्ठ लेखिका आशा bahe

    उत्तर द्याहटवा
  4. बगे अध्यक्ष आहेत. मी Canada ला असल्याने कार्यक्रम ऑनलाइन घेते आहे. तुम्हाला लिंक कशी pathvta येईल. डॉक्टर सर्वेश जवळ माझा नंबर आहे.
    नर्मदे हर
    वीणा देव

    उत्तर द्याहटवा
  5. तुमच्याबरोबर प्रवास सुरू केलेले तुकाराम बुवा या भागात सोबत होते की नव्हते?
    मागचे तीन भाग युट्यूबवर आले नाहीत का? मला दिसले नाहीत.
    युट्यूबवर तुमचा आवाज आता आमच्या मुलांच्याही परिचयाचा झालाय.
    समोर बसून कुणीतरी आपला अनुभव साॅगतोय असं वाटतं. अजिबातच ड्रामाटायजेशन, म्युझिक आणि गडबड गोंधळ नसल्याने ऐकायला छान वाटतं.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. मगरी असलेल्या खाडीतून फसवून त्यांना आणल्यामुळे तुकाराम बुवा माझ्यावरती चिडून पुढे निघून गेले होते ! त्यांनी माझ्या एक दिवस आधी समुद्र पार केला . परंतु पुढे पुढच्या तटावर ते मला बरेच वेळा भेटले . माझी परिक्रमा संपल्यावर त्यांनी देखील परक्रमा अर्ध्यावर सोडून दिली . आणि गेल्यावर्षी पुन्हा परिक्रमा केली . सध्या ते सायकलवर बारा ज्योतिर्लिंग फिरत आहेत . आज काशी मध्ये मुक्काम आहे त्यांचा .

      हटवा

टिप्पणी पोस्ट करा

जे आवडते सर्वांना ...

अनुक्रमणिका

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

लेखांक १ : नर्मदे हर !

लेखांक २ : भोपाळ जवळच्या जंगलातील अपघात

लेखांक ४ : झुठा कही का ! सबकुछ तो लाए हो !

लेखांक ३ : चोराची धन

लेखांक ५ : ग्वारीघाट जबलपुर मध्यप्रदेश

लेखांक ८३ : महाराष्ट्रात प्रवेश आणि भाबरीचे भेदक भिल्ल-महात्मा फोदला गारद्या पावरा

लेखांक ७४ : लेपा बांध , वेदा संगम , कठोरा अन् मांडव्य गुंफा

लेखांक ९० : गुजरात मधील कणजी चे सान्सुभाई तडवी आणि अरण्यव्याप्त माथासर