मुख्य सामग्रीवर वगळा

लेखांक १११ : हनुमानटेकरी , कोटेश्वर तीर्थ , कठपोर मार्गे विमलेश्वरी रत्नसमुद्र-रेवा संगम दर्शन


 हांसोट गाव सोडले आणि शेतातील रस्ता पकडला . वाटेतील बहुतांश सर्व शेती यवनाक्रांत होती . त्यामुळे चालताना फार विचारपूर्वक चालावे लागे . चुकून एखाद्या झाडावर पाय वगैरे पडला तर ती संधी मानून काही होऊ शकले असते . हा माझा अंदाज नसून ग्रामस्थांनी निघताना मला दिलेली सूचना होती . अशा खूप घटना इथे पूर्वी घडलेल्या आहेत . मुळात समोरची व्यक्ती आणि तिचे उपास्य दैवत तुम्हाला मान्य नसेल आणि त्यात तुम्ही विपरीत बुद्धीनेच चालण्याची शपथ घेतलेली असेल तर याहून वेगळे काही अपेक्षित नाही . असो . वाटेत शेतामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक माणसाने मला इथून जाऊ नका असेच सांगितले . यापूर्वी शेतकरी परिक्रमा वासींना किती प्रेम देतात ते मी प्रत्यक्ष अनुभवले होते . त्या पार्श्वभूमीवर इथलं नकारात्मक वातावरण मला प्रकर्षाने जाणवले . मध्ये एक यवन शेतकरी भेटला ज्याच्याकडे अतिशय सुंदर अशी बैलजोडी होती . विशेष म्हणजे हे खिलारी बैल होते . मी खिलार बैल म्हटल्याबरोबर तो चकित होऊन माझ्याकडे पाहू लागला .कारण या भागात कोणालाच ही जात माहिती नाही . इथे कांकरेज आणि गीर बैल जास्त असतात . मी त्या शेतकऱ्याशी गप्पा मारू लागलो . बैल जोडीवर त्याचे फार प्रेम होते असे माझ्या लक्षात आले . त्याने हे बैल खास महाराष्ट्रातून मागवले होते .फेसबुक वरच्या कुठल्या तरी कम्युनिटी वरून त्याला हे बैल सापडले होते ! बैलांविषयी त्याचे प्रेम आधी मी व्यक्त होऊ दिले . आणि मग अचानक गोमांस खाण्याचा विषय काढला . आता त्याला थेट प्रश्न विचारायला सुरुवात केली . तो आधी टाळाटाळ करू लागला आणि शेवटी न राहवून मला म्हणाला की जग काय करते याच्याशी मला देणे घेणे नाही .परंतु मी स्वतः गोमांस खाण्याचा निषेध करतो . मग या विषयावर प्रगट बोलत का नाही असे विचारल्यावर मात्र त्याने जे उत्तर दिले ते फार विचार करायला लावणारे आहेत . तो म्हणाला की आमच्या समाजामध्ये जन्मापासून काही ठराविक समज डोक्यामध्ये हातोडीने खिळा ठोकावा असे ठोकले जातात . एकदा हे ठोकताळे पक्के झाले की त्या विरोधात आयुष्यभर बोलायचे नसते . जो बोलेल त्याला समाजबाह्य केले जाते . पाप पुण्याच्या भ्रामक ,विपरीत , व विकृत कल्पनांमध्ये रुतलेला हा पंथ आहे हे सर्वांनाच माहिती असून देखील कोणीच त्याच्या विरोधात चकार शब्द मात्र काढू शकत नाही . कारण विरोधी मत प्रदर्शन करणाऱ्यास मृत्युदंड हीच किमान शिक्षा सांगितलेली आहे .  ही लादलेली मते इतकी प्रभावीपणे डोक्यात व बिम्बवलेली असतात की कधीकधी मनुष्य स्वतःची प्रामाणिक अनुभूती देखील नाकारतो आणि त्याच असत्याला कवटाळतो . याच्या अगदी उलट आपली संस्कृती मात्र अशी राहिलेली आहे की जी प्रत्येक क्षणाला प्रश्न विचारण्यास उद्युक्त करते .आणि नुसते प्रश्न विचारून शांत न बसता त्याचे प्रत्येकाला आपापले उत्तर शोधावयास सांगते . आणि प्रत्येकाला सापडलेले सत्य त्या त्या व्यक्तीच्या सापेक्ष योग्यच आहे असे देखील मानते . एकम् सत् विप्रा: बहुधा वदन्ति ।
अर्थात एकच सत्य प्रत्येक जण आपापल्या परीने वेगळ्या वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतो , अनुभवतो आणि मांडतो . हेच अधिक नैसर्गिक आहे . आपल्या एका हाताची पाचही बोटे सुद्धा सारखी नाहीत . जगातील एक इंचाहून कमी जागेत मावणारा प्रत्येकाच्या बोटाचा ठसा देखील एकसारखा नाही ! मग आठ अब्ज लोकांसाठी सरसकट एकच देव , एकच पुस्तक , एकच अवतार कसा काय स्वीकार्य असू शकतो ? ही संकल्पनाच मुळात बालिश आहे . परंतु एकदा बहुसंख्य लोकांनी असत्याचा स्वीकार केला की एखादा सत्यवादी त्यामध्ये दबून जातो तसेच बहुतांश लोकांचे झालेले आपल्याला आढळते . बैलवाला शेतकरी जाता जाता मला जे काही बोलला ते डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे आहे . तो म्हणाला की आम्हाला आपल्या जुन्या घरी परतण्याची खूप इच्छा आहे .परंतु तिथे आमचा स्वीकार होईल का याची खात्री देता येत नाही . कारण मुळात तुमचा धर्म मांडणारे , धर्मासाठी लढणारे जे प्रभावी लोक आहेत त्यांना तुमचाच समाज शिव्या घालताना दिसतो त्यामुळे आम्ही सावध होतो ! इथे निदान पुरुष म्हणून जगतानाचे लाभ तरी आम्हाला उठवता येतात . त्याचे हे बोलणे ऐकले आणि त्या तीन बैलांचा निरोप घेत पुढे निघालो . आहार , निद्रा , भय आणि मैथुन या चार गोष्टींवर ज्याचे आयुष्य चालते तो पशुच मानला जातो . 
पुढे एक रस्ता लागला . समोरून दोन परिक्रमावासी उलटे चालत येत आहेत असे मला दिसले . जवळ आल्याबरोबर कळाले की हे तर प्रजापती पिता-पुत्र होते !मी आधीच सांगितले त्याप्रमाणे यांची जलहरी परिक्रमा होती . त्यामुळे समुद्रापर्यंत जाऊन समुद्र पार न करता ते परत उलटे अमरकंटकच्या दिशेने निघाले होते ! मला पाहताच दोघांना खूप आनंद झाला ! आम्ही तिघेही रस्त्याच्या कडेला एका झाडाखाली बसलो . तनयला खूप भूक लागली होती . हांसोट सोडताना जलाराम डेअरी वाल्या काकूंनी मला सोबत बराच खाऊ दिला होता . तो सर्व मी काढला आणि प्रजापती पिता-पुत्रांसमवेत आनंदाने बालभोग घेतला . दरम्यानच्या काळात त्यांना काय काय अनुभव आले वगैरे गप्पा आमच्या सुरू झाल्या . तनय आता अजूनच बारीक झाला होता . दोघांच्या चेहऱ्यावरचे तेज देखील वाढले होते ! सोबतचे साधू सुटले होते आणि दोघेच चालत होते .मी तसा सल्ला राजेशला खूप वेळा दिला होता .सोबत असलेले साधू यांच्या फारसे काही कामाचे नव्हते . कारण हे दोघे बुद्धीवादी होते आणि साधू अतिशय कर्मकांडी होते . त्या साधूं शी चर्चा केल्यामुळे यांच्या मनामध्ये कर्मकांडाविषयी घृणाच उत्पन्न होते आहे असे मला जाणवले होते . राजेश प्रजापती याला मी माझी सजवलेली मैया दाखवली ! दोघांनाही ती खूप आवडली आणि त्याने तिथे एक फोटो काढला ! नुकताच पुन्हा संपर्क झाल्यावर त्याने मला तो फोटो पाठवला ! आपल्याकरता तो फोटो सोबत जोडत आहे .
मागून जाणारा हासोट विमलेश्वर मार्ग . आणि राजेश प्रजापती यांनी टिपलेली मैया ची प्रसन्न हास्यमुद्रा !
प्रजापती पिता-पत्रांसोबत काही काळ गप्पा मारून पुढे निघालो . आम्हाला तिघांना माहिती होते की ही आमची परिक्रमेतील शेवटची भेट असणार आहे . हे दोघे जलहरी परिक्रमा करीत असल्यामुळे एकदा तरी आपल्याला उलटे चालताना भेटणार अशी माझी अटकळ होती , तसेच झाले . आता पुन्हा भेट कधी होईल माहिती नाही  हे जाणून तिघांनी एकमेकांची गळाभेट घेतली ! माझे आणि राजेशचे डोळे पाणावले ! परंतु क्षणभरच . जसा मी पुढे निघालो तसा पुन्हा वर्तमानात आलो . किंबहुना राजेश प्रजापती याला शेवटचे भेटताना डोळ्यात आलेले अश्रू देखील वर्तमानात असल्याचेच लक्षण होते . त्या क्षणापुरती मनाची ती तरलता व्यक्त झाली होती . आणि तो क्षण गेल्यावर ती भावना सुद्धा लोप पावली . आपल्या दुःखाची मुख्य कारणे स्मृती व चिंता हीच आहेत . कारण स्मृति आपल्याला विनाकारण भूतकाळात नेतात . आणि चिंता आपल्याला भविष्यकाळात घेऊन जातात !  त्यामुळे आपण वर्तमान जगायचे विसरून जातो ! आणि वर्तमान काळ हलकेच हातचा सुटून निघून जातो ! 

मध्ये वासनोली नावाच्या गावामध्ये वासवेश्वर महादेवाचे तीर्थक्षेत्र आहे त्याचे देखील दर्शन घेतले .
श्री वासवेश्वर महादेव
श्री वासवेश्वर महादेवांचे मंदिर .
इथे टळटळीत उन्हात चालत हनुमान टेकरी गाठायची होती . मला असे वाटले की हे एखादी टेकडी असावी . परंतु समतल जमिनीवर असलेला हा एक आश्रम होता . मध्ये काहीही नाही . गाव नाही वस्ती नाही . फक्त कडकडीत ऊन आणि प्रचंड दमटपणा . चालत हनुमान टेकडी आश्रमात गेलो . डावीकडे एक मोठी यज्ञशाळा होती . त्यानंतर काळया कुळकुळीत पाषाणात बांधलेले शनि देवाचे आणि नवग्रहाचे मंदिर होते . हे मंदिर काचेने बंद केले होते . त्यामुळे त्याचे दर्शन घ्यायला गेलो तेव्हा अक्षरशः भाजून निघालो ! खाली तापलेली काळी फरशी ! आणि आत मध्ये गरम हवा अडकलेली ! त्या मंदिरात कोणीही एक मिनिट सुद्धा बसू शकले नसते इतके ते गरम होते ! आतल्या काळ्या रंगांच्या मूर्तींची मला दया आली ! असेच एक हनुमंताचे मंदिर देखील होते . आश्रमामध्ये एक जोडपे सेवा देत होते . त्यांनी भोजन प्रसाद दिला . भोजन प्रसाद ग्रहण करून यज्ञ शाळेमध्ये येऊन पडलो . इथे जरा तरी हवा लागत होती . संपूर्ण शरीर अक्षरशः लाहीलाही झालेले होते . उकडलेल्या बटाट्यासारखी शरीराची अवस्था झाली आहे असे वाटू लागले . एका उष्मा आजपर्यंत कधी जाणवला नव्हता . डोळा लागणे शक्यच नव्हते . इतकी उन्हाची तीव्रता सगळीकडे वाढलेली होती . अखेरीस मी पुढे चालू लागण्याचा निर्णय घेतला . चालताना माझ्या स्वतःच्या गतीमुळे थोडीफार हवा तरी लागत होती . निघण्यापूर्वी आश्रमाचे दर्शन घेऊयात .
दंतराय नावाच्या गावामध्ये येणारा हनुमान टेकडी आश्रम . इथे अंजनी मातेचे मंदिर आहे .
आश्रमातील देवता
हेच ते काच बंद काळे कुळकुळीत "प्रेशर कुकर " शनी मंदिर !
प्रचंड तापणारी शनीदेवाची काळ्यापाषाणातली मूर्ती
शेजारीच असलेले नवग्रह मंदिर
हनुमान टेकरी येथील हनुमंत मंदिर !
सर्वत्र काचेचा वापर केल्यामुळे उष्णता साठून राहते . सगुण भक्ती करताना आपल्या देवतेला कमीत कमी त्रास होईल अशी योजना अवश्य करावी .
या यज्ञशाळेत काही काळ विश्रांती घेतली आणि मी पुढचा मार्ग पकडला . समुद्र तसेच त्रिभुज प्रदेश जवळ असल्यामुळे या भागातील उष्णता फारच दाहक वाटत होती . 
कोटेश्वर तीर्थापर्यंत जाण्यासाठी पुन्हा एकदा सडकेचा वापर करावा लागणार होता . इथे शेताच्या बांधावरून चालण्याचा निर्णय मी घेतला . कारण त्यामुळे उष्मा थोडासा कमी होत होता . बांधा बांधावरून चालत एका ओढ्याच्या काठावरून मी कोटेश्वराचे मंदिर गाठले .


या नकाशामध्ये आपल्याला वासनोली गाव त्यानंतर हनुमान टेकडी कोटेश्वर महादेवाचे मंदिर कटपोर आणि विमलेश्वर हे कसे एका सरळ रेषेत नाहीत ते पाहायला मिळेल ! तसेच नर्मदा मैया चे मूळ पात्र वरच्या बाजूला किती दूरवर आहे ते दिसेल . परंतु कोटेश्वर पासून तिथपर्यंत संपूर्णपणे दलदल आहे त्यामुळे चालता येत नाही . कोटेश्वर तीर्था शेजारी मिठागारे आहेत .

कोटेश्वर महादेव मंदिराशेजारील मिठागारे . आजूबाजूला सर्वत्र मिठाचे पाणी असून देखील तीर्थाचे पाणी मात्र बरेच गोडे आहे . 
कोटेश्वर महादेवाच्या मंदिरामध्ये नूतनीकरणाचे काम चालू होते . फरशी घालण्याचे वगैरे काम सुरू होते . तीर्थापर्यंत जाण्याचा मार्ग बंद होता . परंतु इथल्या नळाला तीर्थाचेच पाणी असल्यामुळे तेच प्राशन केले . इथे एक जटाधारी साधू होते . उंची सहा फूट असावी . शिडशिडीत बांधा होता . त्यांनी चहा पाजला . आणि अंधार होईपर्यंत विमलेश्वरला पोहोचशील असे सांगितले . त्यामुळे महाराजांना दंडवत करून पुढे निघालो .
 श्री कोटेश्वर महादेव
श्री कोटेश्वर महादेव मंदिराचे प्रवेशद्वार
श्री कोटेश्वर महादेव मंदिर
मी गेलो तेव्हा हीच फरशी टाकण्याचे काम सुरू होते .
मागे अथांग नर्मदा माई दिसते आहे
श्री कोटेश्वर महादेव
श्री कोटेश्वर महादेव तीर्थ ! समुद्रकिनारा जवळ असल्यामुळे नारळाची झाडे चांगली उगवली आहेत !
मंदिराच्या मागे दिसणारा नर्मदा मातेचा त्रिभुज प्रदेश आणि मिठागारे
 विमलेश्वर म्हणजे नर्मदा परिक्रमेच्या दक्षिण तटावरचे शेवटचे ठिकाण ! इथे पोहोचले की तुमचे चालणे संपते ! त्यामुळे अतिशय उत्साहाने आणि वेगाने पुढचे अंतर तोडले ! चालता चालता कधी अंधार पडला आणि कधी विमलेश्वरी येऊन पोहोचलो ते लक्षातच आले नाही ! इथे आल्यावर मात्र दुचाकी चार चाकी बस इत्यादींची प्रचंड गर्दी दिसू लागली ! नावा बंद होण्याचा दिवस जवळ येत चालला होता ! त्यामुळे सर्वच प्रकारे परिक्रमा करणाऱ्या परिक्रमावासींची प्रचंड गर्दी इथे उडाली होती ! गावाला जत्रेचे स्वरूप आले होते ! मी थेट मंदिर गाठले . मी मंदिरापाशी पोहोचायला आणि पुजारी कुलूप लावून बाहेर यायला एकच वेळ आली ! मी धावतच जाऊन त्यांच्या पाया पडलो आणि विनंती केली की कृपा करून मला दर्शन घेऊ द्या ! पुजारी म्हणाला आता दरवाजे बंद झाले आता उद्या सकाळी उघडतील ! परंतु मी खूपच विनवणी केल्यावर त्यांनी माझ्या एकट्यासाठी मंदिर उघडले ! धावतच तळघरामध्ये जाऊन मी वमलेश्वर किंवा विमलेश्वर महादेवांचे दर्शन घेतले ! इथे तीन चार शिवलिंगे आहेत . सोमेश्वर , विमलेश्वर , रत्नेश्वर , पुलत्स्येश्वर , गोकर्णेश्वर अशी महादेवाची शिवलिंगे आहेत . शिवाय मंदिराच्या भिंतीलगत बाटा ज्योतिर्लिंगे स्थापित केलेली आहेत . मुख्य शिवलिंगाला एक छिद्र असून त्याच्यामध्ये वेळोवेळी समुद्राचे जल प्रकट होते ! आनंदाने बाहेर आलो ! पुजारी बुवांचे आभार मानले . आणि परिक्रमावाश्यांसाठी केलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये आसन लावले . इथे मात्र बरेच ओळखीचे लोक भेटू लागले ! आधीच सुमारे दोनशे अडिचशे परिक्रमावासी इथे उतरलेले होते ! एवढे लोक चालत कुठून होते हेच मला कळाले नाही ! कारण मला याच्यातील वाटेत कोणीच भेटले नव्हते ! अर्थात तुकाराम सुरवसे आणि अजून काही ओळखीचे परिक्रमा वासी दिसले खरे ! पण तेही मुक्कामावर भेटलेलेच असायचे . बस किंवा गाडीने परिक्रमा करणाऱ्या लोकांना वाहन येथे आणून सोडते आणि इथून तुमचे वाहन पलीकडच्या ताटावर नेऊन सोडणारे चालक (ड्रायव्हर ) तुम्हाला मिळतात . दुचाकी किंवा सायकल असेल तर तिला नावेतून पलीकडे नेता येते . किंवा दुचाकी रस्त्या मार्गे न्यायची असेल तर तिला नेऊन सोडणारे चालक देखील मिळतात . इथे आश्रम खूप मोठा आहे परंतु मोठ्या प्रमाणात परिक्रमावासी येत असल्यामुळे थोडीशी अव्यवस्था झालेली जाणवते . परंतु प्रत्येक जण परिक्रमेचा एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण होत असल्यामुळे एका वेगळ्या भावावस्थेत असतो . त्यामुळे सर्व गैरसोय खपून जाते ! आज चैत्र शुद्ध तृतीया होती . वैशाख शुद्ध तृतीया म्हणजे अक्षय तृतीया . या दिवशी नावा शंभर टक्के बंद होतात . परंतु कधीकधी पंधरा-वीस दिवस अलीकडे सुद्धा नावा बंद झाल्याचे इतिहासात घडलेले आहे . त्यामुळे वाटेत भेटलेल्या सर्व साधुसंतांनी मला महिनाभर आधी तिथे पोहोचण्यास सांगितले होते . त्याप्रमाणे बरोबर अक्षय तृतीयेच्या एक महिना आधी मी समुद्रकिनारी पोहोचलो हे मैयाचेच नियोजन नाही तर काय ! आणि त्यावर्षी झाले देखील तसेच . नावा आधीच बंद होऊन गेल्या . बरे इथे असलेल्या सर्व नौकांचे मालक आणि चालवणारे लोक बहुतांश करून ख्रिस्ती धर्माचे आहेत . त्यामुळे त्यांना परिक्रमा या उपक्रमाविषयी फारशी आस्था असते अशातला भाग नाही तर केवळ अर्थकारणामुळे ते नावा चालवितात . बस , गाडी , दुचाकी वगैरे ने परिक्रमा करणाऱ्या माणसांना साडेतीनशे रुपये आकारले जायचे . आणि पायी परिक्रमावसीना दीडशे रुपये आकारले जायचे . एखाद्याने अगदीच पैसे नाहीत असे सांगितले तर मात्र त्याला मोफत नेले जायचे . परंतु मैया च्या कृपेने विमलेश्वरला पोहोचेपर्यंत कोणी ना कोणी दीडशे रुपये देऊन ठेवायचे !  वमलेश्वर अथवा विमलेश्वराच्या आश्रमामध्ये सर्व परिक्रमावाशींना एकत्र थांबविले जाते . त्यानंतर नावाडी संघटनेचा एक मनुष्य येऊन तुमचे नाव लिहून घेतो आणि पैसे घेऊन जातो . याचा अर्थ तुमचे नावेचे बुकिंग पक्के झाले असे होत नाही . त्यासाठी अनेक घटक कारणीभूत असतात . मुळात विमलेश्वर समुद्राच्या काठावर नसून बरेच आत आहे . समुद्राला जाऊन मिळणारा एक ओढा आहे . त्याचे पाणी भरती आल्यावर तुडुंब भरून जाते . त्याचवेळी नाव त्या ओढ्यातून सोडली जाते . आणि तरच समुद्रामध्ये शिरता येते . चुकूनही ओहोटीमध्ये नाव टाकायचा प्रयत्न केला तर नाव मध्येच अडकून बसते . त्यामुळे एकदा तुमची नाव नोंदणी झाली की नावाडी संघटनेचा पुढचा आदेश येईपर्यंत आपल्याला इथेच बसून राहावे लागते . सांगताना ते असे सांगतात की पैदल परिक्रमावासीयांना नावेत बसविताना प्राधान्य दिले जाते . परंतु प्रत्यक्षामध्ये अधिक पैसे देणारे बसवाले यात्रेकरू पटापटा भरले जातात असे मला जाणवले . नावेची कागदोपत्री क्षमता १५ ते १६ ची असते . परंतु ज्याप्रमाणे आपल्या इथे रिक्षामध्ये १०-१२ लोक कोंबतात अगदी त्याच पद्धतीने इथे एका नावे मध्ये ५० ते १०० जणांना सामानासकट बसविले जाते ! लाईफ जॅकेट किंवा जीवरक्षक ट्यूब वगैरे काहीही नावेवर नसते . आपला संपूर्ण जीव नर्मदा मैयाच्या भरोसे सोडून द्यायचा असतो ! बऱ्याच लोकांना मैयाची प्रकर्षाने आठवण येते ती याच ठिकाणी ! समुद्र कधी शांत असतो तर कधी इतका खवळलेला असतो की नावेतील प्रत्येक मनुष्य भिजून गेलेला असतो ! हे व असे अनेक अनुभव , अनुभवी परिक्रमावासी सांगत होते आणि मी ऐकत बसलो होतो ! आपण जरा परिसराचे दर्शन घेऊयात .

त्रिभुज प्रदेशात सर्वत्र असा चिखल असतो
त्याचा पृष्ठभाग वाळला असेल तर थोडेफार चालता येते अन्यथा चिखलात पाय फसतात
या भागात यशस्वीपणे चालू शकणारा एकमेव प्राणी म्हणजे उंट हाच आहे त्यामुळे इथून पुढे उंट दिसू लागतात
वाटेत एक वरुडी खोडियार मातेचे मंदिर आहे
याच्यामागे एक भव्य गोरख चिंच पाहायला मिळते


स्थानिक लोक या झाडाला चोर आंबली म्हणतात
वृक्ष खूप सुंदर आणि पाहण्यासारखा आहे . याच्या मुळया नक्कीच नर्मदा मातेपर्यंत पोहोचलेल्या आहेत
विमलेश्वर परिसरामध्ये हे चित्र विचित्र आकाराचे मंदिर आपले स्वागत करते
याच्या कळसाच्या जागी भव्य त्रिशूल शिवलिंग नागदेवता आणि समोर शंख ठेवलेला आहे
विमलेश्वराचे हेच मंदिर बंद झाले होते परंतु मी विनंती केल्यामुळे पुन्हा उघडले गेले
आत मध्ये भरपूर देवता आहेत
श्री विमलेश्वर महादेव . मंदिर परिसर अतिशय स्वच्छ आहे
भिंतीच्या बाजूने बारा ज्योतिर्लिंगे स्थापन केलेली आहेत
श्री पुलस्त्येश्वर महादेव
मंदिराच्या समोर अशी पत्र्याची शेड केलेले आहे जिथे परिक्रमा वासी उतरतात
या आश्रमात कायमच प्रचंड गर्दी राहते . बरेच परिक्रमावासी समुद्र पार केल्यावर घरी निघून जातात . 
अशा रीतीने तुडुंब भरलेल्या खाडीतून नावे मध्ये बसून नर्मदा मैया आणि रत्न समुद्र संगम पार करावा लागतो .
बऱ्याचश्या नावा उघड्या असतात . त्यात बसले की भिजणे क्रमप्राप्त असते
अशा रीतीने नावे मध्ये ठासून परिक्रमावासी कोंबलेले असतात !
परंतु नावेत चढण्यासाठी कित्येक तास वाट बघावी लागते . मला मिळालेली नाव अशा प्रकारची बंदिस्त नाव होती .
ओहोटी आली की नावा जमिनीला टेकतात .
प्रचंड गाळ असलेल्या या खाडीमध्ये आपण उतरू शकत नाही . आणि भरती आल्याशिवाय नाव एक इंच सुद्धा हलत नाही
शक्यतो दिवसा येथे ओहोटी असते
त्यामुळे नावा जमिनीवर टेकलेल्या दिसतात
तासंतास वाट बघितल्याशिवाय हा प्रवास सुरू होतच नाही
भरती येण्याची वाट पाहत बसलेला एक परिक्रमावासी
हा परिसर अतिशय दुर्गम आहे आणि नावे मध्ये चढताना मोठी कसरत करावी लागते . सर्वत्र प्रचंड चिखल आहे
सूर्यास्त होऊ लागतो तसतसे पाणी हळूहळू भरू लागते
हा सर्व प्रकार नक्की कुठे चालला आहे ते आपण नकाशावरून समजून घेऊयात . इथून पुढच्या प्रत्येक नकाशामध्ये लाल मार्करकडे लक्ष ठेवा
गुजरात आणि महाराष्ट्राच्या दरम्यान खंबाताचे आखात आहे इथे बडोद्यावरून वाहत येणारी विश्वामित्री नदी आणि नर्मदा मैया रत्नसागराला मिळतात .
हा नर्मदा मातेचा त्रिभुज प्रदेश आहे . वरती तेज नावाचे जे बंदर दिसते आहे तिथे आपल्याला उत्तर तट लागणार आहे .
महात्मा गांधींनी केलेली जगप्रसिद्ध दांडी यात्रा ज्या दांडी गावात संपली ते गाव विमलेश्वरच्या अगदी जवळ आहे . लाल खूण दिसते आहे त्या ओढ्यामध्ये किंवा खाडीमध्ये आपण नावे मध्ये चढतो .
वमलेश्वरापासून नौकारोहणबिंदू बराच लांब आहे व तिथे चालतच जावे लागते .
खाली वमलेश्वराचे मंदिर दिसत आहे व तिथून सरळ रेषेमध्ये जाणारा अत्यंत ओसाड उजाड असा दलदलीचा टापू दिसतो आहे ज्यातून चालत आपण नौकारोहण करतो .
नौकारोहण करण्याचे दोन तीन महत्त्वाचे बिंदू आहेत त्यातील हा सर्वात पहिला बिंदू लागतो . भरती खूप जास्त असेल तर इथून नावेत बसता येते
नौकारोहणाचा हा दुसरा बिंदू असून मध्यम भरती असेल तर इथून नावे मध्ये चढता येते
नौकारोहणाचा सर्वात प्रसिद्ध आणि अखेरचा असा हा बिंदू असून बहुतांश परिक्रमावासी इथूनच नावे मध्ये चढतात .
नौकावतरणाचे अर्थात नावेतून उतरण्याचे देखील अनेक बिंदू आहेत .
हिंदाल्को बिर्ला अदानी रिलायन्स इत्यादी सर्वांचे स्वतंत्र धक्के इथे आपल्याला दिसतात . गरज पडल्यास इथे देखील नौका उतरवली जाते . परिक्रमावासींसाठी सर्वत्र मुक्त प्रवेश आहे !
परंतु शक्यतो सर्व नौका याच माल धक्क्यावर उतरवल्या जातात
त्यानंतर लगेचच हा आश्रम लागतो . 
याच मार्गावरून चालत परिक्रमावासी उत्तर तटावर येतात
नौकेतून जिथे आपण उतरतो तिथे प्रचंड प्रमाणात दलदल असल्यामुळे समुद्र स्नान करता येत नाही
या मालधक्क्यावर जो जीना दिसतो आहे तिथे आमची नाव उतरवली गेली . आणि मी जिना समुद्रात गेलेला आहे हे पाहून पटकन पाच पायऱ्या खाली जाऊन स्नान करून घेतले !
संपूर्ण प्रवासामध्ये आणि परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सीगल पक्षी आढळतात
भली मोठी जहाजे दहेज बंदरावरती उतरण्याची वाट पाहत थांबलेली दिसतात
दहेज हे एक फार मोठे बंदर असून जागेश्वर या ठिकाणी रिलायन्सची प्रचंड मोठी बंदर प्रणाली आहे . मिठीतलाई आश्रमापासून हे बंदर खूप जवळ आहे . हा संपूर्ण औद्योगिक परिसर असून येथे मोठ्या प्रमाणात औद्योगीकरण झालेले दिसते .

आता ही सर्व पार्श्वभूमी माहिती झाल्यावर आपण माझी यात्रा कशी झाली ते पाहुयात . विमलेश्वराला जरी मी पोहोचलो असलो तरी त्या रात्री नावा सोडल्याच नाहीत . समुद्र खवळलेला असल्यामुळे नावा सोडलेल्या नाहीत असे आम्हाला सांगण्यात आले . इथे आजूबाजूला पाहण्यासारखे फारसे काही नसल्यामुळे शांतपणे एक झाडाच्या पारावर पडून विश्रांती घेणे मी पसंत केले . इथे खूप नवनवीन परिक्रमावासींची ओळख झाली . एक उंच सडसडीत नागा साधू होते . यांना मी खरे नागा साधू असे नाव ठेवले होते . कारण अजून एक मुंबईचा सहा फूट उंचीचा तरुण मुलगा होता . त्याचे राहणीमान पायातील स्लीपर्स अंगातील कपडे आणि केश संभार पाहता सर्व ब्रॅण्डेड वापरणाऱ्या टिपिकल शहरी कळपातला तरुण तो होता . परंतु त्याला विचारले नाही तरी आपण होऊन आपल्या जवळ येऊन तो "मै नागा हु " " मै नागा हू " असे सारखे सांगत राहायचा . खरा नागा साधू शांत एका कोपऱ्यात जाऊन पडलेला असायचा . इथे अजून एक केरळचे संन्यासी होते . ते देखील अतिशय शीघ्र कोपी स्वभावाचे होते . खोटा नागा साधू आणि हे संन्यासी एकत्र चालत होते . हा खोटा नागा इतका चंचल होता की विचारू नका . अतिशय अस्थिर मनोवस्थेमध्ये त्याने परिक्रमा उचलली होती हे स्पष्टपणे दिसत होते . तो सतत भांडण काढायला पाहत असे . माझ्याशी देखील त्याने भांडायचा प्रयत्न केला . परंतु भांडण हे कधीच एका माणसाला करता येत नाही हे नेहमी लक्षात ठेवावे ! माझी आजी मला हे सूत्र शिकवून गेली ! की एखाद्या माणसामध्ये भांडणाची खुमखुमी असेल तर ती जिरवण्याचा फार सोपा उपाय म्हणजे आपण शांत राहणे ! जर आपण प्रत्युत्तर दिलेच नाही तर समोरची व्यक्ती भांडण वाढवूच शकत नाही !  तसेच मी इथे केले . त्याने कितीही राग येणारी वक्तव्यं केली तर मी उत्तरच दिले नाही . जी व्यक्ती खरी असते तिला ओरडून जाहिरात करावी लागत नाही . सूर्याला ब्रेकिंग न्यूज देऊन उगवावे लागत नाही ! फुल उमलले की भुंग्यांना , मधमाशांना ,फुलपाखरांना पुकारा करून बोलवावे लागत नाही ! पावसाला सांगावे लागत नाही की मी आलो आहे ! तसेच साधुत्व हे सहज प्रकट होत असते . त्याची जाहिरात करावी लागत नाही . परंतु या तरुणाला त्याची जाणीव नव्हती . त्याला नागा साधू बनण्याची इच्छा निश्चितपणे असणार आहे हे कळत होते . ज्याप्रमाणे लष्कर भरती होण्याची इच्छा असलेले आणि त्यासाठी अनेक वर्ष प्रयत्न करूनही अपयश आलेले काही तरुण शेवटी आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी तोतया लष्करी अधिकारी म्हणून फिरत राहतात तशातला हा तोतया नागा साधू असावा असा माझा अंदाज होता ! परंतु त्याची मनोवस्था मला थोडीशी रंजक वाटल्यामुळे मी त्याच्या जवळपास थांबायचो आणि त्याची बडबड ऐकून तो आता कुठल्या अवस्थेत असेल याचे विश्लेषण करत बसायचो ! तसेही नाव सुटेपर्यंत मला फारसे काही महत्त्वाचे काम नव्हतेच ! नर्मदा मातेचे प्रत्यक्ष दर्शन होणे यासाठी आवश्यक असते पहा ! ती समोर असली की असले नाही ते विचार किंवा नाही त्या गोष्टी आपण करत नाही . ती दिसत असल्यामुळे बसल्या बसल्या असले धंदे सुचत होते . तो मुलगा एका अतिशय श्रीमंत घरातला वाटत होता . त्याला साधू तर बनायचे होते परंतु लक्झरी जीवनाचा त्याग करायचा नव्हता अशा कात्रीत तो सापडला होता . हाच तरुण मला रामकुंडाला देखील भेटला होता . तिथे देखील त्याने रात्री आम्ही मांडवामध्ये झोपलो तेव्हा मै नागा हू । म्हणत दंगा घातला होता ! खऱ्या नागा साधूंना आता आखाड्याने ओळखपत्रे दिलेली आहेत ! हे त्याला अजून माहितीच नव्हते ! त्यामुळे त्याचा हा बालिश दंगा सर्व आश्रम वासी गमतीने सहन करायचे . अगदी ओळखपत्र दाखवता नाही आले तरी आपली परात्पर गुरुपरंपरा ताबडतोब सांगता आली पाहिजे यावरून तुमची परीक्षा लगेच होते ! परंतु या तरुणाकडे यातले काहीच नव्हते . पांढरी शुभ्र वस्त्रे घालण्याचा याला नाद होता . नजर अजून मेलेली नव्हती . सगळाच आनंद होता . खरा नागा साधू कधीही मी नागा आहे हे तुम्हाला सांगत नाही हे कायम लक्षात ठेवावे .
विमलेश्वर आश्रमामध्ये मुक्कामाची मोठी व्यवस्था केलेली होती कारण  इथे परिक्रमावासी साठवले जायचे . आणि साधारण दोन नावा भरतील इतके लोक झाले की नाव सोडली जायची . त्या रात्री अचानक एक बस आली आणि त्यांच्याकरता मात्र स्पेशल नाव सोडण्यात आली . याचा अर्थ समुद्र खवळलेला नव्हता ! परंतु परावलंबी जीवित्व असल्यामुळे आपण शांतपणे सर्व पाहत राहायचे अशीच एकंदर इथली व्यवस्था आहे . 
तिथे जमलेल्या अनेक परिक्रमावाशींशी मी गप्पा मारल्या . भरपूर नवीन ओळखी झाल्या . तिथे आत मध्ये अर्थात पत्र्याच्या शेडमध्ये मी आसन लावून बसलेलो असताना पूजा करताना माझी नर्मदा मैया काही लोकांनी पाहिली आणि त्यांना ती इतकी आवडली की त्यांनी तिथे माझे .फोटो काढले ! नंतर माझ्या मित्राच्या क्रमांकावर त्यांनी ते पाठवून दिले .
दोन-तीन दिवस प्रचंड उन्हामध्ये चालल्यामुळे शरीर चांगले भाजून निघाले होते ! या चित्रामध्ये तुम्हाला ते जाणवेल ! नर्मदा मैया मात्र चांगली मजेत होती ! तिच्या चेहऱ्यावरून तिची अवस्था लगेच कळायची !तिला जरा कधी उन्हात ठेवले तर चेहरा वैतागायचा !
आश्रमातल्या फरश्या उखडलेल्या होत्या . चालताना बऱ्याच लोकांना त्या पायाला लागायच्या . परंतु इथे पोहोचलेला मनुष्य हा देह बुद्धीच्या पलीकडे गेलेला असतो . त्यामुळे नर्मदा मैया चे कौतुक करणे या पलीकडे तो दुसरे काहीही करत नाही । मी देखील माझ्या रेवा माईकडे कौतुकाने पाहत होतो ! डाव्या हातात मी दंड देखील पकडलेला आहे .
परिक्रमेच्या दक्षिण तटावर काढलेली ही शेवटची छायाचित्रं ठरली . परिक्रमेच्या मध्यावर परिक्रमावासी कुठल्या अवस्थेमध्ये असतो हे तुम्हाला लक्षात आणून देणारे हे चित्र आहे .देह बुद्धी जवळपास संपून गेलेली असते . वेदना यातना वगैरे तुमच्या सहचारिणी झालेल्या असतात ! वाटेत कुठेही आरसा नावाचा पदार्थ नसल्यामुळे आपण कसे दिसतो आहोत हे एकदाही पहावे लागत नाही ! आज फिरून जेव्हा हे सर्व पाहतो तेव्हा मौज वाटते ! 
होय ! हा तोच मनुष्य आहे ! नर्मदा माता परिक्रमेदरम्यान तुम्हाला आमुलाग्र बदलून टाकते !
परिक्रमेच्या आधी असा दिसणारा मनुष्य परिक्रमेच्या अर्ध्या मध्ये पोहोचला की वर दाखविल्याप्रमाणे दिसतो !
नर्मदा माई तुमच्या गरजा कमी करून टाकते ! कमीत कमी साधनांमध्ये सुद्धा अतिशय उदात्त जीवन जगता येते हे आपल्याला शिकवते ! तुमच्याजवळ असलेल्या वस्तूंचा आणि तुम्हाला मिळणाऱ्या सन्मानाचा काहीही संबंध नाही हे देखील शिकवते . भौतिक साधने नसताना सुद्धा आपण किती मोठी मजल मारू शकतो हे दाखवून आपली आत्मशक्ती किती आहे ते अधोरेखित करते ! आपल्याला आपल्या मर्यादा नव्याने आखून देते ! आपल्या मध्येच वास करणाऱ्या परंतु आपल्याला अपरिचित असणाऱ्या आपल्याच एका नव्या रूपाची ओळख मैय्या करून देते ! आणि हे रूपांतर नसते तर तुमचे जुने रूप तसेच राहून एक नवीन रूप तुम्हाला प्राप्त होऊन जाते ! एकावर एक फ्री ! 
रात्री माझे नाव लिहून घेणारा केवट मुस्लिम समाजाचा होता . त्याला मी माझ्याकडे पैसे नाहीत असे सांगितल्यावर तो म्हणाला हरकत नाही तुम्हाला तसेच नेतो ! मग मात्र मी पैसे आहेत असे सांगून लगेच त्याला देऊन टाकले . मला फक्त तपासून पाहायचे होते की खरोखरीच परिक्रमावासींना फुकट नेले जाते का ! आणि त्याचे उत्तर होय असे आहे ! जय हो माई की !चिंता काही की ! आता आज रात्री नाव निघणार असा त्याचा अर्थ होता ! ४ एप्रिल २०२२ रोजी मी इथे पोहोचलो होतो .आणि आज पाच एप्रिल ची रात्र होती . आता बहुतेक नावा सुटणार हे कळल्यावर माझी झोपच उडाली ! भरती मध्यरात्री येते असे ऐकले होते . त्यामुळे रात्री कधीही आपल्याला जावे लागेल हे लक्षात आले ! प्रचंड उत्सुकता सर्वांच्या चेहऱ्यावर दिसू लागली ! ज्यांनी पूर्वी नावेने प्रवास केला आहे ते हा प्रवास किती भयंकर असतो त्याची रसभरीत वर्णने सांगू लागले ! समुद्र खवळला की नाव अक्षरशः कित्येक फूट वर खाली होत राहते ! मोठमोठ्या लाटा नावेवर येऊन फुटतात आणि आतल्या माणसांना भिजवतात ! एक ना अनेक किस्से !काही लोकांनी तर कित्येक नावा बुडून आजवर हजारो लोक जलसमाधी घेते झाले आहेत अशी लोणकढी थाप देखील ठोकून दिली ! परंतु नर्मदा मातेच्या कृपेने असा प्रसंग कधी घडलेला नाही . फार फार तर असे झालेले आहे की नाव मध्ये असताना नावेचे इंजिन खराब झाले किंवा डिझेल संपले .परंतु याच अनुभवातून शहाणे होत आता प्रत्येक नावे वर दोन इंजिने असतात . तसेच जास्तीचे तेल सोबत ठेवलेले असते . आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे एक नाव सोडतच नाहीत . दोन नावा नेहमी एकत्र सोडल्या जातात . त्यामुळे मागेपुढे प्रवास करत एकमेकांना सावरत या नावा काठ गाठतात .  मी ज्या काळात प्रवास केला त्या काळामध्ये लाईफ जॅकेट अनिवार्य नव्हते किंबहुना लाईफ जॅकेट दिसतच नव्हते . परंतु अलीकडच्या काळातील काही व्हिडिओ पाहिल्यावर माझ्या असे लक्षात आले की आता लाईफ जॅकेट अनिवार्य केलेले दिसते आहे . माझी झोप उडाल्यामुळे मी परिसरामध्ये फिरत राहिलो . रात्री दोन वाजताच मी आंघोळ आटोपून घेतली . इथले पाणी खारेच असल्यामुळे ते एक प्रकारे समुद्र स्नानच होते . माझ्याजवळ असलेल्या पुस्तकामध्ये आत्म कृष्ण महाराजांनी विमलेश्वर मध्ये नावेत बसण्यापूर्वी समुद्र स्नान करताना म्हणायचा मंत्र दिलेला आहे .तो मी म्हटला आणि स्नान करून घेतले .
विमलेश्वर मध्ये नावेत बसण्यापूर्वी हा मंत्र म्हणावा आणि स्नान करावे असे नर्मदापुराणामध्ये सांगितले आहे .
मी वहीमध्ये शिक्का देखील मारून घेतला . 
श्री रेवा संगम तीर्थ धाम वमलेश्वर विकास मंडल
मुक्काम पोस्ट वमलेश्वर तालुका हांसोट जिल्हा भरूच गुजरात
रात्री दीड वाजता सर्वांना उठवायला एक केवट आला . मी जागाच होतो . उठल्यावर सर्वांची एकच लगबग उडाली . कुणी डोलडाल साठी कोणी स्नानासाठी पळू लागले . पुढे जाण्याचा रस्ता कोणीच सांगत नव्हते . मी त्या केवटाला विचारले परंतु तो म्हणाला की तुम्ही पुढे जाऊ नका तीन वेगळे वेगळे मार्ग आहेत . प्रत्यक्षात एकच मार्ग होता परंतु तीन वेगळे वेगळे थांबे होते . मी सामान उचलले आणि हळूहळू एकटाच चालू लागलो . पूर्णपणे अंधार होता . चहुबाजूला केवळ दलदल आहे हे दिवसा पाहून घेतले होते . त्यामुळे पायाखालचा रस्ता सोडायचा नाही इतकेच डोक्यात धरले होते . थोड्या वेळाने माझ्या असे लक्षात आले की माझ्यासोबत अनेक कुत्री चालत आहेत . ती जणू काही मला रस्ता दाखवत होती . परिक्रमा वासीं सोबत दक्षिण तटावरून कुठल्या ना कुठल्या ठिकाणावरून ,सतत खायला मिळते आहे म्हणून कुत्री सोबत चालत येतात . परंतु इथून पुढे नावे मध्ये त्यांना प्रवेश दिला जात नाही :त्यामुळे ह्याच तटावर त्यांना थांबावे लागते . अशी सुमारे अडीचशे ते तीनशे कुत्री या भागामध्ये भटकताना दिसतात . सर्वांनाच आपला भाईबंध कशा पद्धतीने इथे आलेला आहे हे माहिती असल्यामुळे ते आपापसामध्ये भांडत नाहीत हे विशेष कौतुकास्पद आहे ! काही केवटांनी तर मला सांगितले की ज्यांची नर्मदा परिक्रमा करण्याची इच्छा गेल्या जन्मी अपूर्ण राहते ते पुढच्या जन्मी अशा पद्धतीने श्वान बनून नर्मदा परिक्रमा चालतात ! मला फार बरे वाटले की मी मनुष्य देहात असतानाच नर्मदा परिक्रमा चालत होतो ! यांना नावे मध्ये घेतले जात नसले तरी काही चलाख कुत्री नाव निघता निघता त्यात उडी मारून चढलेली आहेत व त्यांनी परिक्रमा पूर्ण केलेली आहे असे देखील केवटाने मला सांगितले .  एकंदरीत हा शेवटचा टप्पा खूपच लांबला असे वाटत होते . कारण कधी एकदा समुद्र पार करतो असे मला झाले होते ! कारण तो एक फार मोठा टप्पा नर्मदा परिक्रमेमध्ये मानला जातो ! समुद्राच्या अवस्थेवर हा टप्पा पूर्णपणे अवलंबून असल्यामुळे तो शांत असताना पार होणे कधीही उत्तम ! मी शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचलो . तिथे एक दोन केवट आधीच पोहोचलेले होते . दोन नावा त्यांनी हळूहळू आणून नांगरल्या . परंतु अजून पुरेसे पाणी चढलेले नव्हते त्यामुळे नावे मध्ये वजन देता येणार नव्हते . इथे अजून एक प्रथा आहे . आपल्या पायातील पादत्राणे याच तटावर फेकून द्यायची असतात . अशा पादत्राणांचा अक्षरशः ढीग इथे लागलेला आहे . माझ्या पायात असलेले केशरी बूट अजून चांगल्या स्थितीमध्ये होते . शूलपाणीची झाडी सुरू होण्यापूर्वी मला ते मिळाले होते . परंतु प्रथेनुसार ते मी इथे सोडून दिले . केवटाकडून खात्री करून घेतली की दर काही दिवसांनी ही सर्व पादत्राणे   गोळा करून ग्रामपंचायतीचे लोक त्याची विल्हेवाट लावतात . तसे नसते तर मी अजिबात पादत्राणे फेकून दिली नसती . आपल्या परंपरेचा त्रास नर्मदा मातेला कशाला ! नावेमध्ये अनवाणी जावे आणि समुद्राला तसेच मैयाला पादत्राणांचा स्पर्श होऊ नये असा भाव त्यामध्ये आहे . जो अतिशय उदात्त आहे . 
नावेत चढण्यापूर्वी अशा प्रकारे पादत्राणांचा खच पडलेला आपल्याला दिसतो .
पहाटे तीन वाजता सर्वांना नावे मध्ये बसविण्यास सुरुवात झाली . बांबूचे एक अति धोकादायक मचाण केलेले होते ज्यावर सर्वांच्या पायाच्या चिखल लागून ते प्रचंड घसरडे झाले होते . चढताना प्रत्येक मनुष्य घसरत होता . त्याला धरण्यासाठी दोन्ही बाजूला काहीही नव्हते . त्यामुळे अतिशय जीव मुठीत धरून नावे मध्ये चढावे लागत होते . मी तुलनेने तरुण असल्यामुळे एक पाय नावेत आणि एक पाय मचाणावर ठेवून लोकांना घेण्यासाठी मदत करू लागलो . एक केवट आहे मग आत मध्ये गेला आणि नावे मध्ये सामान लावायला त्याने सुरुवात केली . सर्व नाव भरून झाल्यावर मी आत मध्ये गेलो . मला बसायला जागा शिल्लक राहिली नव्हती . आमची नाव बंदिस्त प्रकारची होती . केशरी रंगाचे फायबरचे हूड तिच्यावर होते . त्यामुळे पुढच्या बाजूला असलेल्या खिडकीत जाऊन मी उभा राहिलो . केरळी साधू माझ्यावर प्रचंड चिडला . त्याच्यामते खिडकीतून हवा येत नव्हती . परंतु मी त्याचे काही ऐकले नाही आणि तिथेच उभा राहिलो . मी रोज रोज थोडी रेवा सागर संगम पाहायला येणार होतो ! अजूनही अंधार होता व बाहेरचे काही दिसत नव्हते . इतक्यात एकच जयजयकार झाला आणि नाव सुरू झाली ! नर्मदे हर मातुगंगे हर ! जटाशंकरी हर ! ओम नमः पार्वती पते हर हर महादेव ! दोन्ही नावा निघाल्या . बरोबर तीन वाजता निघाल्या . प्रचंड अंधार असला तरी आजूबाजूचे सर्व दिसू लागले होते . फक्त नावेचा आवाज सोडून दुसरे काही ऐकू येत नव्हते . मोठा आवाज करत नावा तो कालवा ओलांडू लागल्या . कालवा बंदिस्त असल्यामुळे दोन्ही बाजूने नावेचा आवाज परत ऐकू येत होता . सुमारे अर्धा पाऊण तास गेल्यावर नावा मुख्य समुद्रात प्रवेश करत्या झाल्या . आता मात्र उजाडले होते . म्हणजे अजून सूर्य उगवला नव्हता परंतु सर्वत्र स्पष्ट दिसू लागले होते . अत्यंत गढूळ मातकट असे समुद्राचे पाणी होते . लोकांना नावे मध्ये चढविण्यास मदत केल्यामुळे केवळ माझ्या ओळखीचा झाला होता . एक केवट टपावर बसलेला होता आणि एक नाव चालवत होता . केरळी संन्यासी माझ्याशी संपूर्ण नावे मध्ये सतत भांडत होते . त्यांचे म्हणणे असे होते की मी खाली बसावे . आणि मी काही खाली बसत नव्हतो . इतक्यात खरा नागा साधू उठला आणि नावेच्या खिडकीतून बाहेर गेला ! मी देखील त्याच्याबरोबर खिडकीतून नावे बाहेर गेलो . केवट जोरात ओरडला की आत मध्ये जा ! परंतु नागा काही त्याचे ऐकणार नव्हता ! आणि बाहेर आलेला व्यक्ती मी आहे पाहिल्यावर केवट देखील मला काही बोलला नाही . आम्ही दोघे मस्तपैकी नावेच्या टपावर जाऊन बसलो ! हे अतिशय धोकादायक आहे मित्रांनो ! कोणीही असला प्रयोग परिक्रमामध्ये कृपया करू नये ! कारण त्या टपावर पकडण्यासाठी काहीही नव्हते . आमच्या सुदैवाने समुद्र त्यादिवशी अतिशय शांत होता त्यामुळे निवांत बसता आले . मदन नावाचे सायकलवर परिक्रमा करणारे एक परिक्रमावासी आमच्या सोबत बोटीत होते . त्यांच्या सह अजून एक सायकल परिक्रमा वाशीची सायकल देखील बोटीच्या टपावर टाकण्यात आली होती.


मदन नावाचे सायकलवर परिक्रमा करणारे एक परिक्रमावासी

मोठ्या प्रमाणात सीगल पक्षी आजूबाजूला उडत होते . परिक्रमावासी त्यांना बिस्किटे वगैरे खाऊ टाकत होते . हे पक्षी खूप निर्भय असतात आणि आपल्या जवळ येतात . समुद्रातले मासे खाऊन सर्वांच्या तब्येती अतिशय उत्तम होत्या . मी टपावर येऊन बसण्याचे एक कारण होते . मला अनेक साधुंनी सांगितले होते की नर्मदा माता समुद्राला जाऊन मिळत नाही तर ती समुद्राच्या खाली अदृश्य होते आणि मध्ये एका ठिकाणी पुन्हा प्रकट होते . त्या ठिकाणी नाव पोहोचली की आपल्याला चारी बाजूला नर्मदा मातेचे जल स्पष्टपणे दिसू लागते . आणि मला नेमकी हीच जागा पहायची होती . याच ठिकाणी तुमच्या जवळच्या बाटलीतले अर्धे जल टाकून अर्धे समुद्राचे जल भरले जाते . अर्थात ते समुद्राचे जल नसून नर्मदा जलच असते ! आणि थोड्याच वेळात ती जागा आलीच ! साधारण एक दीड किलोमीटरचा मोठा वर्तुळाकार परिसर हिरव्या निळ्या नर्मदा जलाने भरलेला दिसू लागला ! 
नकाशातही हा भाग आपल्याला दिसतो ! 
केवटाने नाव थांबवली आणि बादलीने पाणी उपसून घेतले . मी माझी मैया ची झोळी गळ्यातच लटकवलेली होती . लगेचच मी तिचे जल भरून घेतले ! सर्वांना जल भरण्यासाठी मदत केली . अर्धे जल समुद्रार्पण केले ! मोठाच आनंद सोहळा होता तो ! इथे मैया ची आरती करावी वगैरे परंपरेनुसार सांगितलेले आहे .नावेमध्ये गर्दी असल्यामुळे हे सर्व करणे शक्य नव्हते . परंतु मी मनोमन दीप प्रज्वलित करत मैयाची सुंदर आरती केली ! आरती सुरू करता च सूर्योदय झाला ! त्यामुळे मला हवी तशी ज्योत मला मिळालीच ! नैवेद्य समुद्राला अर्पण केला . आणि शांतचित्ताने नर्मदा माता आणि रत्नसागर यांचा तो अद्भुत संगम अनिमिष नेत्रांनी पहात राहिलो . 
परंपरेनुसार मैयाला नारळ वस्त्र वगैरे अर्पण केले . हे सर्व विमलेश्वरला मिळतेच . 

(ता. क. : आपल्या तट परिवर्तन समुद्र प्रवासाचे काहीच आठवण देणारे चित्रीकरण आपल्याकडे नाही असे शल्य मला हा लेख लिहिताना जाणवत होते. परंतु आपल्याच एक वाचक आहेत ज्यांनी मला एका युट्युब वरचे व्हिडिओची लिंक पाठवली आणि त्यात मी नावेत बसलेला दिसत आहे असे मला कळवले! व्हिडिओ पाहिल्यावर मला आठवले की माझ्यासोबत नावे मध्ये एक तरुण मुलगा होता जो ऍक्टिवा गाडीवर परिक्रमेला निघाला होता आणि तो त्याच्या गोप्रो कॅमेरा वर सुंदर असे व्हिडिओ घेत  होता.  मी समोर खिडकीत उभा राहिलेला असल्यामुळे त्याच्या विनंतीवरून त्याच्यासाठी मी सुंदर असे एक दोन व्हिडिओ देखील घेतले होते नेमके तेच त्याने त्याच्या चॅनलवर टाकलेले मला सापडले आणि त्याचा पुन्हा एकदा संपर्क झाला!  त्याने ते सर्व व्हिडिओ आपल्या वाचकांकरता उपलब्ध करून दिलेले आहेत ते आपल्याकरता सोबत जोडत आहे. रोहन उपाध्याय असे त्या मुलाचे नाव होते आणि रोहन विल ट्रॅव्हल नावाचे यूट्यूब चैनल  तो चालवतो.)




समुद्राच्या मध्यभागी आल्यावर उजव्या हाताला दिसणाऱ्या भव्य दिव्य नर्मदा मातेला नावेवरच साष्टांग नमस्कार घातला ! अमरकंटक इथे करंगळी एवढी धार असणारी नर्मदा माता इथे ६५ किलोमीटर रुंदीचे अजस्त्र रूप धारण करून विराट दर्शन देत होती ! सांगत होती काही काळजी करू नकोस ! मी आहे ना ! तुझे प्रत्येक संकट हरणारी मीच आहे ! तुझे दुःख दैन्य दारिद्र्य हरणारी मीच आहे ! तुझे षड्रिपु समस्त विकार हरणारी मीच आहे !  तुझे ममत्व हरणारी मीच आहे ! मीच आहे जिला तू सांगू शकतोस , अगदी हक्काने सांगू शकतोस !  नर्मदे हर ! हर हर नर्मदे ! नर्मदे हर !





लेखांक एकशे अकरा समाप्त (क्रमशः )

नर्मदा परिक्रमा दक्षिण तट समाप्त !

टिप्पण्या

  1. नर्मदे हर🙏🙏🙏🙏🙏 आपल्याला सर्व च बाबींचे सखोल ज्ञान आहे. बैल, शेती, झाडे, समोरील व्यक्ती स आपले करण्याची हातोटी. . ..

    उत्तर द्याहटवा
  2. Ataa life jacket compulsory kele asaave. Uttar vahini parikramela compulsory hote. There was an incident in this Jan in Baroda where 14+ students died in an boat accident.

    उत्तर द्याहटवा
  3. नर्मदा Puran वाचायच असेल तर त्याचे काही नियम किंवा बंधन आहेत का.
    नर्मदे हर
    डॉ वीणा देव

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. नर्मदा पुरणाची मूळ संहिता संस्कृत मध्ये आहे . ती वाचता आली तर अति उत्तम . हिंदी किंवा मराठी अर्थांतर सुद्धा मिळते . परंतु ते दोषयुक्त आहे असे माझे निरीक्षण आहे . भल्या पहाटे शुचिर्भूत होऊन वाचायला बसले तर पंधरा दिवसांमध्ये आरामात संपूर्ण वाचन पूर्ण होते असा अनुभव आहे .

      हटवा
    2. वाचन पूर्ण झाल्यावर एकदा कन्या पूजन करावे

      हटवा
  4. > नर्मदा पुरणाची मूळ संहिता संस्कृत .......
    Publisher kon aahe? Sampaadit koni Keli aahe?

    उत्तर द्याहटवा
  5. छान. एक महत्त्वाचा टप्पा पार पडला.
    सगळ्याच परिक्रमावासियांच्या अनुभवात या टप्प्यातल्या गोंधळाचे वर्णन असतेच. काहितरी सुनियोजित व्यवस्था केली पाहिजे शासनाकडून या टप्प्याची. बाकी भरसमुद्रात नर्मदामय्याचे सगुण दर्शन होते म्हणतात हमखास. खरेच होते की लोकांना अत्यानंदामुळे असा भास होतो?

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. सांगितले ना ! गोल आकारामध्ये मैयाचे जल दिसते !तेही भर समुद्रामध्ये

      हटवा
  6. नर्मदे हर 🙏🏻
    तुमच्या मुळे आमच्या मानस परिक्रमेमधला महत्वाचा टप्पा पार पडला. तुमचे आभार मानावे तेवढे कमी. मैयाची तुमच्यावर अखंड कृपा राहो.
    नर्मदे हर 🙏🏻

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

जे आवडते सर्वांना ...

अनुक्रमणिका

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

लेखांक १ : नर्मदे हर !

लेखांक २ : भोपाळ जवळच्या जंगलातील अपघात

लेखांक ४ : झुठा कही का ! सबकुछ तो लाए हो !

लेखांक ३ : चोराची धन

लेखांक ५ : ग्वारीघाट जबलपुर मध्यप्रदेश

लेखांक ८३ : महाराष्ट्रात प्रवेश आणि भाबरीचे भेदक भिल्ल-महात्मा फोदला गारद्या पावरा

लेखांक ७४ : लेपा बांध , वेदा संगम , कठोरा अन् मांडव्य गुंफा

लेखांक ९० : गुजरात मधील कणजी चे सान्सुभाई तडवी आणि अरण्यव्याप्त माथासर