लेखांक ११२ : मिठीतलाई ची मिठाई आणि परिक्रमेचा उत्तर तट आरंभ

 रत्नसागर ! समुद्रदेवता ! त्याचे वर्णन काय करावे ! 
अथांग जलधी ! अमूर्त रत्नाकर! असीम उदधी  ! अमित अब्धी ! प्रशांत सिंधु !  विराट अर्णव ! विशाल सरित्पती ! दुर्लंघ्य सरस्वान ! अचाट अकूपार ! प्रचंड पारावार ! रत्नांचा सागर ! रत्नसागर !  अरबी समुद्र ? छे छे ! असले गलिच्छ नाव उच्चारताना , शुद्ध रक्ताचे असू तर आपली जीभ कचरलीच पाहिजे ! कोण अरब ? कुठले अरब ? त्यांचा रत्न सागराशी काय संबंध ? युगानुयुगे , कल्पानुकल्पे , शतकानुशतके हा आमचा रत्नसागर ! हा आमचा सिंधूसागर ! हा आमचा रेवा सागर ! उद्या कोणीही आले आणि माझ्या बापाचे नाव बदलले तर मी ते स्वीकारावे काय ? बापच आहे तो आपला ! १००% बाप ! मी ज्या मातेच्या कुशीत खेळतो , बागडतो ,विश्रांती घेतो ती माझी आई अनन्यपणे ज्याच्या कुशीत विसावते तो बाप नाहीतर कोण ? बापच ! पिताच ! आणि त्याचे नाव बदलण्याचा मला अधिकार नाही ! देवाने त्याला दिलेले नाव आहे ! करोडो तपस्वींनी त्याला दिलेले नाव आहे ! थोर ऋषीमुनींनी त्याला दिलेले नाव आहे ! कार्तिक स्वामींनी , मार्कंडेय महामुनींनी त्याला दिलेले नाव आहे . रामाने देखील  याच नावाने त्याला संबोधित केले . रामाने सेतू याच्यावरच बांधला . कृष्णाने देखील त्याला याच नावाने संबोधित केले . कृष्णाची द्वारका देखील याच सागरात लुप्त झाली . त्या नावाला विटाळ करण्याचे महापातक आपण करायचं नाही . मरेपर्यंत त्या समुद्राचा उल्लेख रत्नसागर म्हणूनच करायचा . 
जगात कुठेही न मिळणाऱ्या रत्नांची अद्भुत खाणी म्हणून तो रत्नसागर . . . 
भारताची परमपवित्र सिंधू नदी त्याला जाऊन मिळते म्हणून तो सिंधूसागर . . . 
माझी आई रेवामाई त्याच्या कुशीत विसवते म्हणून तो रेवासागर . . . तिसरे नाव आम्हाला ठाऊक नाही . सदैव लक्षात ठेवावे .
आज त्या सागराला देखील साष्टांग नमस्कार घातला . तो सागर किती भाग्यवान ! करोडो तीर्थांचे जल नर्मदा मैया त्याच्याच चरणी अर्पण करते ! त्याच्यामध्ये कायमची विसावते ! गुगलचा नकाशा उघडून पहा . खंबातच्या आखातातील पाणीच वेगळे आहे ! जगभरातील समुद्राचा रंग वेगळा आहे आणि या भागातील पाण्याचा रंग वेगळा आहे ! कारण या परिसरातले पाणीच वेगळे आहे ! ते आहे रेवाजल ! ते आहे नर्मदा जल ! ते आहे मेकलसुता जीवन ! आपल्या पूर्वजांनी किती सुंदर नावे ठेवलेली आहेत पहा ना !  प्रत्येक नावाला काहीतरी अर्थ आहे ! प्रत्येक नावातून काहीतरी बोध आहे . प्रत्येक नावातून कशाची तरी उभारणी आहे . प्रत्येक नावातून कशाची तरी मांडणी आहे . प्रत्येक नावातून कशाची तरी स्तुती आहे . प्रत्येक नावातून कशाची तरी भक्ती आहे . अशी उदात्त परंपरा सोडून जेव्हा आपलेच लोक आपल्याच लेकरांना बंटी ,पिंकी ,पप्पू , स्वीटी ,हनी ,बबली , विक्की वगैरे नावांनी बोलवतात तेव्हा त्यांची दया येते . अशा चुका आपण करू नयेत . कोणी करत असेल तर त्याला सावरावे . सांगावे . की आपली परंपरा उदात्त आहे . आपल्या परंपरेला अर्थ आहे . निरर्थक गोष्टींमध्ये रमणारी आपली परंपरा नाही. जी आपण जपतो तीच खरी परंपरा . जी लोप पावते ती परंपरा राहत नाही . आपण नव्याचा ध्यास जरूर घ्यावा . परंतु त्यासाठी जुन्या परंपरांना फाटा देण्याची गरज नाही . कारण या परंपरा लाखो वर्षांच्या अनुभवातून आणि मंथनातून उत्पन्न झालेल्या आहेत . आपण त्यांचा अर्थ पुन्हा नव्याने शोधायला जाणे म्हणजे वेळेचा आणि कष्टाचा अपव्यय आहे . मी पूर्वी चळवळीमध्ये काम करत असताना तिथले लोक मला विचारायचे की हे असे का ? असा प्रश्न नेहमी स्वतःला विचारत जा . परंतु मला अनेक वर्षे असे केल्यावर लक्षात आले की हे असे का ? कारण मला माझ्या आई-बाबांनी तसेच सांगितले आहे , या कारण परंपरेमध्ये पुरेसा दम आहे ! कुठलेही आईबाप आपल्या मुलाला चुकीचे ज्ञान , चुकीची माहिती , चुकीच्या परंपरा कधीच देणार नाहीत .  जे लाखो वर्षांच्या काळाच्या कसोटीवर तावून-सुलाखून टिकलेले आहे उजळलेले आहे बहरलेले आहे ते त्याज्य किंवा चुकीचे कसे काय असू शकेल ! तेच सनातन आहे ! तेच पारंपारिक ज्ञान आहे ! तीच आपली महान संस्कृती आहे ! तीच आपली खरी ओळख आहे ! आमचे एक गुरुजी होते . म्हणजे अजूनही आहेत . परंतु आता त्यांच्या पत्नी राहिलेल्या नाहीत . त्यांचे नाव उत्तम जोशी . हे मुंबईचा क्रिकेटपटू आगरकरच्या घरी पूजा सांगायचे .  आगरकरने त्यांना एकदा दक्षिण आफ्रिकेमध्ये झालेल्या विश्वचषकाची तिकिटे दिली . गुरुजींनी आयुष्यात कधीच परदेशात प्रवास केलेला नव्हता . आणि धोतर उपरणे सोडून काही घातले नव्हते . अशा मध्ये दक्षिण आफ्रिकेसारख्या देशात जाऊन राहायचे म्हटल्यावर कपडे काय घालावे असा प्रश्न त्यांना पडला . परंतु त्यांनी असा निश्चय केला की आपल्याला जे माहिती नाही ते आपण काही करायला जायचं नाही . जी आपली संस्कृती आहे जी आपली परंपरा आहे जो आपला पेहराव आहे तोच कायम ठेवायचा ! आणि दोघेही मस्तपैकी धोतर उपरणे पुणेरी पगडी आणि काकू नऊवारी मध्ये दक्षिण आफ्रिकेला क्रिकेटची मॅच बघायला गेले ! तिथे हजारो भारतीय होते ज्यांनी पाश्चात्य पेहराव केलेला होता . परंतु या दोघांचे तिथे विशेष स्वागत झाले ! टीव्हीवर देखील त्यांना सतत दाखवले गेले . हे कशामुळे शक्य झाले ? तर त्यांनी जपलेल्या परंपरेमुळे ! नर्मदा परिक्रमेची देखील एक परंपरा आहे . आपण परिक्रमा वासी असताना आपल्या वर्तनामुळे तिच्यामध्ये काही नकारात्मक बदल घडू नयेत एवढी काळजी प्रत्येकाने घ्यायची , इतके सोपे गणित आहे . असो . 
विमलेश्वर च्या बाजूचा समुद्रकिनारा जितका साधा आहे तितकाच जागेश्वर किंवा दहेज बंदराच्या बाजूचा किनारा भव्य दिव्य आणि महाकाय आहे ! रिलायन्स  अदानी अंबानी बिर्ला मित्तल वगैरे लोकांच्या मालकीची खाजगी बंदरे इकडे आपल्याला दिसतात . त्यावरून मालवाहतूक करणाऱ्या प्रचंड नौका किंवा जहाजे खंबातच्या या आखातामध्ये नांगरलेली आपल्याला आढळतात . मोठमोठे मालधक्के दिसतात . फक्त हे मुंबईसारखे खोल बंदर नसून उथळ किनाऱ्याचे बंदर आहे . त्यामुळे काठावर दलदल असलेला प्रचंड मोठा किनारा आहे . आम्हाला आश्चर्यकारक रित्या अतिशय शांत समुद्र लागल्यामुळे आमच्या नावे मध्ये शांतता होती . परंतु समुद्रातील वातावरण बिघडलेले असेल तर मात्र नावेतील परिक्रमा वासी मोठ्या मोठ्याने नर्मदा मातेचा धावा आणि जयजयकार करतात असे मला नावाड्याने सांगितले ! आणि ते स्वाभाविकच आहे . आमची नाव माल धक्क्याला लागली आणि मी उतरलो . एका इंग्रजी एल आकाराच्या धक्क्याला आतल्या बाजूने नाव लावण्यात आली होती . एक तिरका जिना वर जात होता . पुस्तकामध्ये असे लिहिले होते की चढताना आणि उतरताना समुद्रस्नान करावे . इथे तर सर्वत्र गाळ भरलेला होता . त्यामुळे आपल्याला समुद्र स्नान करण्याची एकमेव जागा शिल्लक आहे आणि ती म्हणजे हा जिना जो पाण्याच्या आत मध्ये देखील उतरलेला आहे हे माझ्या लक्षात आले . परंतु हे मला पटकन करायचे होते . नाहीतर माझे पाहून सर्वचजण पाण्यात उतरले असते आणि ते अत्यंत धोकादायक होते . त्यामुळे कुणाला काही कळायच्या आत मी झोळी खाली ठेवली आणि पाच पायऱ्या खाली उतरून तीन डुबक्या मारल्या आणि तसाच ओलेत्याने वर आलो . समुद्र स्नानाचा मंत्र म्हणून घेतला . वरती साधारण दोनशे तीनशे मीटर चालल्यावर डाव्या हाताला एक गोलाकार पत्र्याची शेड बांधलेली होती . तिथे जयेंद्रभाई नावाचे एक सेवाधारी आपल्या मित्रांसह आधीच येऊन थांबलेले होते . उत्तम असा चहा आणि भडंग परिक्रमा वासींना ते मोठ्या प्रेमाने देत होते . परंतु एवढ्यावरच न थांबत
 प्रत्येकाला एक धोतर आणि एक बसण्याचे आसन ते देत होते . सोबतचे ओझे वाढवायचे नव्हते परंतु त्यांचे प्रेम पाहून मी एक आसन आणि एक धोतर घेतले . त्या आसनाने पुढे मला खूप चांगली साथ दिली . भडंग आणि चहाचा आस्वाद घेत पुढील मार्गक्रमणेचा अंदाज मी घेऊ लागलो . इथून जवळच मिठीतलाई चा आश्रम होता . खरे म्हणजे नर्मदा मातेची पंचक्रोशी परिक्रमा करण्याची जी परंपरा आहे त्यातील सर्वात अखेरची समुद्र पंचक्रोशी नावाची परिक्रमा आहे ती इथून आरंभ होते . याच तटावरील काही मंदिरे वर्तुळाकार मार्गाने फिरली की समुद्र पंचक्रोशी होते . परंतु मुख्य नर्मदा परिक्रमामध्ये ती मंदिरे घ्यावीतच असा कुठे उल्लेख नाही . परंतु काही लोक ही परिक्रमा करतात हे मात्र नक्की . उत्तर वाहिनी परिक्रमेप्रमाणे किंवा मंडला पंचक्रोशी प्रमाणे केवळ समुद्र पंचकोशी करणारे लोक देखील आहेत . 

समुद्र पंचकोशी किंवा पंचक्रोशी परिक्रमेचा इंटरनेटवर मिळालेला नकाशा जिज्ञासूंच्या संदर्भासाठी देत आहे


मी चालत मिठी तलाईच्या दिशेने निघालो .  अप्रतिम दर्जाचे रस्ते आणि प्रचंड औद्योगिक आस्थापने पाहून डोळे दीपत होते ! इतका प्रचंड विकास पाहून हा आपला भारत देश आहे की आपण परदेशात आलो आहोत असे वाटत होते ! महाराष्ट्रामध्ये इतके मोठे बंदर कुठेच नाही ! मुंबईची गोदी किंवा नेव्हल डॉकयार्ड मी आतून पाहिलेले आहेत . माझा सख्खा मामा लष्करामध्ये मोठा अधिकारी असल्यामुळे त्याने मला हा सर्व परिसर आतून फिरवून दाखवलेला होता . त्याच्यापेक्षा या भागाचा विस्तार खूप अधिक होता . कारण मुंबईमध्ये विस्ताराला मर्यादा आहेत . इथे तसे काही नव्हते . ऐसपैस पसरलेला तो परिसर होता . मोठ्या मोठ्या सीमा भिंती होत्या . इतके दिवस कुंपणावरून उड्या मारून जाणारा मी त्या मोठ्या भिंती पाहून हबकलोच ! आता बहुतेक मला रोडही रोड चालावे लागणार की काय असे मला वाटू लागले ! थोडे अंतर चालल्यावर मिठी तलाई चा आश्रम लागलाच .
अतिशय विस्तीर्ण औरससौरस परिसर ! आत मध्ये एक भव्य झाडाचा पार ! त्याच्यामागे परिक्रमा वासींच्या  खोल्या . समोर मोठी विहीर . त्यावेळीला जमिनीच्या पातळीपर्यंत पाणी ! इतकी तुडुंब भरलेली गोड्या पाण्याची विहीर तीही समुद्रकिनारी ! किती मोठा चमत्कार ! हीच ती गोड्या पाण्याची मिठीतलाई !  काही लोक समजतात की उत्तर तट सुरू होणार म्हणून गोड गोड तळणाचे पदार्थ परिक्रमावासीयांना खायला येथे मिळतात म्हणून ही मिठी तलाई आहे . संपूर्ण मैदान वजा परिसराच्या मधोमध दोन मोठी मंदिरे . एक नर्मदा मातेचे मंदिर आहे . आणि एक आखाड्याचा आश्रम आहे . आश्रमाच्या शेजारी मोठी पत्र्याची शेड . जिथे भोजन प्रसाद बनविणे आणि वाढणे अशा सेवा चालतात .रघु बरी नावाचा जळगाव येथील एक वारकरी सांप्रदायिक युवक हा आश्रम अतिशय उत्तम रीतीने सांभाळत होता ! त्यांच्या मदतीसाठी जळगाव परिसरातूनच फक्त मराठी भाषा बोलता येणाऱ्या काही माताराम सेवेसाठी येऊन राहिलेल्या होत्या ! त्यांना मराठी बोलणारे परिक्रमावासी भेटले की खूप आनंद व्हायचा ! इथे दिवसभर विश्रांती घ्यावी आणि उद्या निघावे असे ठरवले . परिसर खूपच सुंदर आणि भव्य दिव्य होता . मंदिरांची दर्शने केली . या भागात प्रचंड डास होते . परंतु माझ्याकडे एका माणसाची मच्छरदाणी असल्यामुळे माझे काम सोपे झाले होते . इथे आखाड्याचा जो आश्रम आहे तिथले महाराज परिक्रमावासींसाठी फक्त निधी गोळा करून देण्याचे काम करतात . बाकी प्रत्यक्ष दिवसभराच्या कामकाजामध्ये त्यांचा फारसा सहभाग नसतो . नर्मदा मातेच्या मंदिराची आरती पूजा वगैरे फक्त ते सांभाळतात . मी त्यांना भेटून त्यांचे दर्शन घेऊन आलो . रघू च्या मदतीला आजूबाजूला असणाऱ्या विविध कंपन्यातील काही कामगार मदतीला म्हणून यायचे . स्वयंपाकाला वाढायला वगैरे मदत करून नंतर तिथेच भोजन करून ते परत कामाला निघून जायचे . इथे असलेल्या विहिरीवर स्नान करण्याला विशेष महत्त्व आहे . त्यामुळे मी स्नान करायला सुरुवात केली . अक्षरशः हाताने पाणी उपसता येते अशी विहीर पहिल्यांदाच पाहिली ! माझ्या मामाच्या विहिरीमध्ये इतके पाणी कधी कधी लागते ! परंतु ते क्वचित प्रसंगी असते . इथे वर्षाचे बाराही महिने असे पाणी असते ! त्यामुळे ते आश्चर्यकारक मानले पाहिजे . मी इथे स्नान करताना तोतया नागा बाबाने माझे डोके खाल्ले . कारण नसताना भांडण उकरून काढत त्याने मला तीन वेळा " मै नागा हूँ "  हे वाक्य ऐकवलेच ! अखेरीस तो गेल्यावर मी पुन्हा एकदा निवांत बसून स्नान केले . परिसर अगदी स्वच्छ आणि निवांत होता . एखादे फार मोठे बस स्थानक असावे असा आश्रमाचा विस्तार होता . बस ने परिक्रमा करणाऱ्या लोकांच्या बस गाड्या इथेच आणून लावल्या जातात . आश्रमामध्ये भोजनासाठी दररोज गोडधोड असते !आणि त्यातही मुख्य म्हणजे गुलाबजाम असतात ! कालच मला दक्षिण तटावर असताना सजोद गावामध्ये गुलाबजाम खाण्याची इच्छा झाली होती . आज मैयाने ती पूर्ण केली ! किती गुलाबजाम खावेत ? मला सांगताना सुद्धा थोडासा संकोच होत आहे ! मी मुळात कितीही गोड खाऊ शकणारा मनुष्य आहे ! आणि त्यात चालून कष्ट केलेले असले की मग तर विचारूच नका ! त्यादिवशी मी अक्षरशः किलोच्या मापात गुलाबजाम खाल्ले ! रघु महाराज सुद्धा अतिशय प्रेमाने वाढत होते ! मला गुलाबजाम आवडत आहेत हे पाहिल्यावर त्यांनी अक्षरशः ताट भरून गुलाबजाम मला वाढले !  आणि ते मी प्रेमपूर्वक संपवतो आहे हे पाहिल्यावर मदतीला आलेल्या नोकरदार युवकांनी सुद्धा तीच प्रक्रिया पुन्हा पुन्हा करून दाखवली ! अखेरीस पोट भरले परंतु मन काही भरले नाही ! मी माझ्या उभ्या आयुष्यात इतके गुलाबजाम एकाच वेळी कधीच खाल्ले नाहीत ! आणि पुन्हा खाऊ शकेन असे वाटतही नाही ! मला असे वाटले की आज गुलाबजाम केलेले आहेत . परंतु रघु महाराजांनी सांगितले की त्यांनी सतत गुलाबजाम करण्याचे व्रत घेतलेले आहे ! त्यामुळे पाकाचे भांडे कधी धुवायला जातच नाही ! त्यात सतत नवीन गुलाबजामांची भर पडत राहते ! त्यामुळे तुम्हाला मिळालेला गुलाबजाम जर प्रचंड मुरलेला असेल तर तो आधीच्या घाण्यातला असू शकतो ! खव्याचा आणि तेला तुपाचा मुक्त वापर महाराज करतात ! इतके सुंदर गुलाबजाम आयुष्यात कधीच कुठे खाल्लेले नाहीत . नर्मदा मैयाचा पुरेपूर आशीर्वाद असल्यामुळे गुलाबजामांना ती चव प्राप्त होते . दिवसभर थोडीशी विश्रांती घेतली . साधू महाराजांशी थोडा सत्संग केला . जळगावच्या मराठी मातारामां सोबत गप्पा मारल्या आणि त्यांना आवरा वरील मदत केली . रघु महाराज स्वयंपाकाचे सामान खरेदी करण्याकरता निघून गेले . त्यामुळे त्यांचा सत्संग लाभला नाही . परिक्रमावासींची सेवा करणारे केंद्र चालवणे हे सोपे काम नाही मित्रांनो ! आणि त्यात काही ठराविक आश्रम आहेत की जिथे प्रत्येक माणूस येतोच येतो . कुठल्याही मार्गाने चालणारा परिक्रमा वासी समुद्र पार करण्यासाठी एकाच जागी येतो . आणि एकाच बंदरावर उतरतो . त्यामुळे प्रत्येकाला या आश्रमात यावेच लागते . त्यामुळे सेवेचा प्रचंड ताण या आश्रमावर पडतो तरी देखील अत्यंत हसतमुख राहून रघु महाराज कशी काय सेवा करत होते हे पाहून मला फार आश्चर्य वाटले ! आणि त्यांचे खूप कौतुक आणि आदर वाटला ! 
रघु महाराजांचा फोन पे किंवा जी पे नंबर खालील प्रमाणे आहे . ९७ ३०४ ६२ १५६
 97304 62156 . फक्त त्यांना मदत पाठवण्यापूर्वी एकदा फोन करून कशाची गरज आहे ते विचारून घ्यावे . कारण इथे एकाच वेळी २००० परिक्रमावासी ज्याप्रमाणे येतात त्याप्रमाणे मदत देखील एकदम १०० डबे तेल ,एक ट्रक धान्य अशा प्रकारची येत असते . हे इतके निस्पृह आहेत की ज्या आश्रमात एखाद्या गोष्टीची गरज असेल तिकडे मदत पाठवा असे आपल्याला कळवतात .उदाहरणार्थ घोंगसा आश्रमात त्यांनी चार लाखाची शेड बांधून दिली . मंडला जवळच्या हनुमान घाटाचे नूतनीकरण सध्या ते करत आहेत . दर वर्षी न चुकता वारीला देखील जातात . आपल्या वाचकांना एक विनंती आहे की कुठल्याही आश्रमात मदत पाठवली तर कृपया कळवावे ज्यामुळे आपल्या ब्लॉग वरील यादीमध्ये ते अपडेट करता येते व त्याचा फायदा इतरांना होतो .
असो . थोडेसे परिसराचे दर्शन घेऊयात .
मिठीतलाई आश्रमातील नर्मदा माता मंदिर
या परिसरामध्ये मध्यम आकाराची जहाजे ये जा करताना दिसतात
सीगल या पक्ष्याच्या धिटाईचे मला नेहमीच कौतुक वाटते
आश्रमा मध्ये असलेला आखाड्याचा भाग
भरती आणि ओहोटीच्या खुणा तुम्हाला खांबावर दिसतील
मिठीतलाई आश्रमातील हीच ती तुडुंब पाण्याने भरलेली गोड्या पाण्याची विहीर . मागे परिक्रमावासींची निवासव्यवस्था दिसते आहे .
आश्रमाचा विस्तीर्ण परिसर आणि परिक्रमा वासी
भोजनाच्या अखंडपंक्ती सुरू असणारे भांडारगृह ! 
आश्रमाच्या दारातच निंबनाथ महादेवाचे हे मंदिर आहे
आश्रमातील नर्मदा मैया
आखाड्याच्या भिंतीवर असे सुंदर चित्र रेखाटलेले आहे .

रात्री डासांनी सर्व परिक्रमावासींना अक्षरशः फोडून काढले . मी शांतचित्ताने झाडाच्या पाराखाली माझे आसन लावले . आणि मच्छरदाणी उघडून शांत झोपून गेलो . समुद्राचा थंडगार वारा सुखावत होता . इथे देखील अनेक नवीन परिक्रमावासीयांशी ओळख झाली .
चित्रकूट मधील एक बुटकासा परंतु अतिशय सज्जन सात्विक आणि मवाळ मौनी साधू होता .त्याची माझी चांगली गट्टी जमली. गडी मौना मध्ये सुद्धा गप्पा मारायचा ! आणि त्याला काय म्हणायचे आहे ते मला समजायचे हे विशेष ! त्याच्याशी बोलताना माझ्या असे लक्षात आले की भाषा ही केवळ वर ऐकू येणारी प्रणाली आहे . प्रत्यक्षात हृदयातल्या हृदयात सुद्धा संवाद साधता येतो . ज्याप्रमाणे नदी ही केवळ एका मोठ्या व्यवस्थेचा वरवर दिसणारा भाग असते त्याप्रमाणे वाचा ही त्या नदीच्या प्रवाहासारखी आहे . शब्द किंवा स्फुरण हे आतूनच स्फुरत असते .  सकाळी लवकर उठून विहिरीवर स्नान केले . आणि पुढचा मार्ग पकडला . तुकाराम बुवा सुरवसे येथे थांबलेले होतेच . ते देखील माझ्या मागेपुढेच निघाले . इथे काठावर जाण्यासाठी रस्ताच नव्हता . सर्वत्र कंपन्याच कंपन्या होत्या . 
मिठीतलाई आश्रम आणि जागेश्वराचे मंदिर इथून मैयाच्या काठाने चालण्यासाठी रस्ता नसून संपूर्ण दल दल कशी आहे हे दाखवणारे उपग्रह छायाचित्र
या भागात किती कंपन्या आहेत आणि या भागाचे औद्योगीकरण कसे जोमाने झालेले आहे हे आपल्याला कळावे म्हणून काही नकाशा चित्रे सोबत जोडत आहे .
या भागात मोठ मोठ्या पेट्रोल रिफायनरीज असून इथून पेट्रोल जहाजाने थेट बाहेर पाठवले जाते .
मोठमोठ्या कंपन्या आणि
त्यांच्या मोठमोठ्या इमारती ,यंत्रणा आणि चिमण्या वगैरे पहात चालू लागलो . कंपन्यांची एक गंमत असते . भिंतीच्या आत मध्ये स्वर्ग उभा करतात . आणि सीमा भिंतीच्या बाहेर नर्क तयार होईल तरी त्यांना काही फरक पडत नाही ! असेच काहीसे वातावरण इकडे जाणवले . इथे एका टपरीवर स्लीपर वाटणारा एक माणूस होता . परंतु मला स्लीपर नको होती . ती पायाला फारशी सुखावह असतेच असे नाही . जवळजवळ चालायला ठीक आहे . परंतु मोठा टप्पा चालताना पायात बुटा सारखेच काहीतरी हवे असे मला वाटायचं . त्यामुळे मी अनवाणीच निघालो .तुकाराम बुवांनी मात्र एक जोडी स्लीपर घेतली . मला एकट्याला चालायची फार इच्छा होती . त्यामुळे थोडेसे पुढे गेल्यावर मला एका ओढ्याच्या मार्गाने काठावर जाण्याचा मार्ग सापडला ! तिथून सुंदर असा वाळूचा किनारा चालत मी पुढे जाऊ लागलो . हा भाग फारच विस्तीर्ण होता . ही नर्मदा माताच माझ्या उजव्या हाताला होती परंतु त्यात ९०% समुद्र होता ! आणि गाळ वाळू मिश्रित किनारा होता . चालण्यासाठी अतिशय कठीण असा हा परिसर होता . परंतु आता डावीकडे कंपन्यांच्या सीमा भिंती असल्यामुळे आणि उजवीकडे रेवासागर असल्यामुळे चालत राहणे मला भाग होते . असे बरेच अंतर चाललो . सुंदर अशी ती चाल होती . अमेठा अथवा अंभेठा , सुवा अशी गावे ओलांडत कोलीयाद नावाच्या गावामध्ये पोहोचलो . गाव आले की लोक भेटायचे . एरव्ही किनारा एके किनारा ! वाटेमध्ये गावात आले की अनेक लोक चपला देऊ करत होते . परंतु मी त्या नाकारत होतो . कोलीयात गावाच्या आसपास मात्र पायाला प्रचंड काटे टोचू लागले . सर्वत्र काटेच काटे आहेत असे लक्षात आले . मग मात्र एकांनी देऊ केलेल्या चप्पल मी शांतपणे स्वीकारल्या . काही काळ रस्त्याने चालावे लागले . इथे उजव्या हाताला एक मोठे धरण असावे असा पाणीसाठा लागला . प्रत्यक्षात हा आर ओ पाण्याचा प्रकल्प होता . अर्थात एका अतिप्रचंड तलावामध्ये पाणी घेऊन त्याचा रिव्हर्स ऑसमॉसिस करून ते पाणी विकले जात होते . इथे आत मध्ये एक हनुमान मंदिर आहे असे कोणीतरी सांगितले . तोपर्यंत तुकाराम बुवा सुद्धा मला भेटले होते . दोघे त्या मंदिरामध्ये गेलो .  एक महिला साध्वी हा आश्रम चालवीत होत्या . श्री दास जी महाराज असे त्यांचे नाव होते . त्यांचे गुरु सुरतला राहायचे . आणि नुकताच त्यांनी हा हनुमान मंदिर असलेला आश्रम चालवायला घेतला होता . त्या इतक्या नवीन होत्या की हे कुठले हनुमान मंदिर आहे पण त्यांना सांगता आले नाही ! एक-दोन दिवसच झालेले असावेत ! मी माझ्या मावशीकडे राहून शिक्षण घेतले . ह्या साध्वी कडे पाहिल्यावर मला माझ्या मावशीची आठवण यायची ! दोघींचे दिसणे च
चालणे बोलणे हसणे चिडणे सर्व काही एकसारखे होते ! तशा या साध्वी थोड्याशा तापट स्वभावाच्या होत्या . आणि साधारण पन्नाशीच्या असल्यामुळे सर्वांशी अंमळ फटकूनच वागायच्या . परंतु मला माझ्या मावशीला हाताळण्याचा खूप चांगला अनुभव असल्यामुळे मी जणू काही माझी मावशीच आहे असे डोक्यात ठेवून यांच्याशी वागलो . आणि त्यामुळे त्यांची माझी चांगली गट्टी जमली ! माझी मावशी पुढे काय करणार ते मला माहिती असायचे ! या साध्वी देखील बरोबर तसेच काहीतरी करायच्या ! परमेश्वराची लीला किती अगाध आहे पहा ! अगदी एकसारखी दोन माणसे पृथ्वीवर दोन वेगवेगळ्या ठिकाणी जन्माला घालतो ! हा आश्रम नवीनच असल्यामुळे त्याची व्यवस्था लावण्याचे काम सुरू होते . इथे दुपारचे भोजन घेऊन पुढे निघून जावे असा आमचा बेत होता . परंतु सुरत वरून या साध्वींचे गुरुबंधू हा आश्रम कसा चालवीत आहेत ते पाहण्यासाठी आज येणार होते असे मला साध्वीने सांगितले . हे सर्व या साध्वीला 'सीनियर ' असणारे साधू होते . परंतु गुरुदेवांची लाडकी शिष्या असल्यामुळे हिच्यावर सर्वजण थोडेसे जळत असत . म्हणूनच त्यांनी काहीतरी कुटाणे करून सुरत आश्रमातून हिला बाहेर काढले होते !साध्वी मनाची खंबीर होती ! तिनेही मोठे हिकमतीने हा आश्रम एकटीने चालवायला घेतला होता ! परंतु आज अचानक ते येणार आणि काहीतरी गैरव्यवस्था झाली की जाऊन गुरुदेवांना सांगणार म्हणून तिला थोडेसे टेन्शन आले होते ! माझा स्वभाव साध्वी मावशीला आवडला आणि तिने मला विनंती केली की कृपा करून आजचा दिवस मी तिथे राहून तिला मदत करावी . मी अनुमोदन दिले आणि कामाला लागलो ! आपला हातखंडा असलेला स्वच्छ भारत अभियानाचा उपक्रम राबवून परिसर चमकवला . या आश्रमाचे अस्तित्व दाखवणारी पाटी कुठे नव्हती . आणि इथे एक रंगाची डबी सापडली . त्यामुळे मी एका पांढऱ्या उपरण्यावर आकडीया हनुमान मंदिर अशी पाटी तयार केली . ही पाटी रंगवताना माझ्या डोक्यात एक कल्पना आली . आश्रमाच्या दारात एक मोठा सिमेंटचा नळा किंवा पाईप पडलेला होता . त्यावर उपरणे ठेवून अक्षरे रंगवायची होती. मी ते उपरणे तुकाराम बुवांना आणि चित्रकूटच्या साधूला अशा रीतीने पकडायला लावले की अक्षरे उपरण्यावर सुद्धा उठली आणि मागे नळ्यावर सुद्धा उठली ! त्यामुळे एका फटकार्‍यात दोन पाट्या तयार झाल्या ! तरी देखील रंग उरल्यावर मी आजूबाजूला असलेल्या मंदिरावर अक्षरे रंगवली ! दरवाजावर सर्व भारतीय भाषांमध्ये राम राम लिहिले ! गुजराती मराठी तमिळ इत्यादी भाषांमध्ये राम हा शब्द रंगवला ! या आश्रमात आधीच काही लोक येऊन राहिलेले होते . एक हिरो सारखी केशरचना असलेले गुजराती साधू होते . ते बहुतेक शिकलेले असावेत . परंतु स्वभावाने खूप चांगले होते . एक मंडला भागातील आदिवासी साधू होता . इथे सेवा देण्यासाठी म्हणून आसपासच्या गावातील काही लोक यायचे . त्यातील एकांनी आमचे सर्वांचे भरपूर फोटो काढले . आणि माझ्या मित्राच्या क्रमांकावर पाठवून दिले .त्यातील काही चित्रं आपण पाहूयात .
डावीकडून गुजराती साधू , मंडलाचे साधू ,तुकाराम बुवा सुरवसे , प्रस्तुत लेखक ,नर्मदा मैया , श्री दासजी महाराज साध्वी , सेवाधारी आणि चित्रकूटचे मौनी साधू .
हनुमंताच्या मंदिरावर प्रस्तुत लेखकाने रंगवलेली पाटी आणि सोबत साध्वी माताजी आणि तुकाराम बुवा पैलवान ! समुद्र पार केल्यावर मिळालेली नवीन वस्त्रे परिधान केलेली आहेत !
हे छायाचित्र मी काढलेले आहे . माझ्या जागी उभा असलेला सेवाधारी चित्रात यावा म्हणून मी फोटो काढले .
गुरुबंधू तपासणीसाठी येणार असल्याचा किंचित तणाव साध्वी माताजींच्या चेहऱ्यावर जाणवत आहे 
आश्रमाच्या दारावर मी विविध लिपींमध्ये लिहिलेला राम शब्द  .
श्री दासजी साध्वी मावशी ,प्रस्तुत लेखक , चित्रकूट वाले तिवारी बाबा आणि तुकाराम बुवा ! साध्वीने स्वतःच्या हाताने सर्वांना सुंदर असे गंध लावले होते .
रंगवलेल्या पाटीसोबत प्रस्तुत लेखक . शेजारी मला मिळालेले नवे सॅंडल आणि माझा गमछा वाळतो आहे !
तुकाराम बुवा सुरवसे यांच्यासोबत प्रस्तुत लेखक
आम्ही तिघांनी फार धमाल केली ! बरेचदा मुक्कामावर आम्ही भेटलो की मजा मजा करायचो !
सर्व आश्रम परिसर मी झाडून पुसून घेतलेला होता . त्यामुळे फरशी स्वच्छ दिसते आहे पहा .
आपल्या गुरूंच्या नावाने अन्नक्षेत्राचे नाव असावे असे साध्वी मावशीने सांगितल्यामुळे त्यांच्या नावाची हीच ती पाटी मी रंगवली . पाटी अशी रंगवली की एक पाठी उपरण्यावर तयार झाली आणि दुसरी पाटी या नळ्यावर उमटली !
महंत संतदासजी महाराज हे साध्वीचे गुरु !
मागे दिसणारी झाडी ओलांडली की लगेच नर्मदा मैया आहे . 


श्री आंकडिया अनुमान
आश्रमाचा हा संपूर्ण परिसर मी चकाचक केला होता
मी रंगवलेले हेच ते दार . आता सर्व पाट्या वगैरे लावलेल्या दिसत आहेत .
आतूनही आश्रम स्वच्छ धुऊन पुसून घेतला होता
सुरत इथून जवळ आहे . नर्मदा माता रत्नसागराला जाऊन मिळाली तरी तिचा वेगळा रंग बराच काळ राखून आहे हे आपल्या लक्षात येते . समुद्राच्या जलामध्ये तिचे जल लवकर मिसळत नाही . असो .

खरे म्हणजे दुपारचे भोजन करून पुढे जायचे असा आग्रह तुकाराम महाराजांनी धरला होता . परंतु कुठल्याही क्षणी आश्रमाची तपासणी करणारे पथक येणार होते . आणि आम्ही थांबलो ते एका दृष्टीने बरेच झाले . नाहीतर या आश्रमात कोणीच नाही त्यामुळे हिला कशाला निधी द्यायचा असे काहीतरी निरोप पुढे गेले असते ! परंतु आम्ही सहा जण थांबलेलो होतो . आणि रात्री अचानक आठ गुरुबंधूंचे पथक दोन जीप मधून दाखल झाले ! त्याने वाटेत लावलेल्या पाट्या वगैरे पाहिल्या आणि आत वळले . मी साध्वीला स्वयंपाकाला सुद्धा मदत केली होती . मी एकट्याने ३५ पोळ्या लाटल्या . तिने भाजी भात वगैरे केला . तिच्या जवळपास सुद्धा ती कोणाला फिरकू देत नसे . परंतु मला खरोखरच माझी मावशीच तिच्या जागी दिसत होती त्यामुळे तिचे 'मूड स्विंग्स ' कसे सांभाळायचे हे मला बरोबर कळले होते ! आजही या साध्वीचा फोटो माझ्या कुठल्याही मित्राला दाखवला की सगळे म्हणतात अरे ही तर आपली मीना मावशी आहे ! मी मदत केल्यामुळे तिचे काम थोडेसे हलके झाले . आलेल्या पथकाला काय काय सांगायचे हे मी परिक्रमावासी मित्रांना आधीच सांगून ठेवले होते . आम्ही सहा जण ,ती साध्वी आणि दोन सेवक असे आठ जण विरुद्ध त्या पथकातील आठ साधू असे दोन गट तयार झाले होते ! जसे पथक दाखल झाले तसे आम्ही सर्वांनी साध्वी माताजी ने आमची किती सुंदर बडदास्त ठेवली आहे हे सांगायला सुरुवात केली ! आमच्या वतीने सर्वात जास्त चित्रकूटचे मौनी बाबा बोलले ! त्यांचे हातवारे पाहून साधू लोकांचे छान मनोरंजन झाले ! मी देखील पथकातील साधूंशी भरपूर गप्पा मारल्या . कार्पोरेट क्षेत्रामध्ये किंवा अन्य खाजगी क्षेत्रामध्ये सोबत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये जशी एक सूप्त चढाओढ आढळते तशी याही क्षेत्रात आहे हे पाहून मला मौज वाटली . भरलेला आश्रम पाहून आणि आश्रमातील चोख व्यवस्था पाहून पथकातील सर्व साधू अतिशय संतुष्ट झाले ! सर्वांना मुक्काम करण्याची प्रार्थना मी केली परंतु ते सुरतला निघून गेले . मध्यरात्री सर्व पथक गेले आणि साध्वीने सुटकेचा निश्वास सोडला !
साध्वी मला म्हणाली की तू देवासारखा माझ्या मदतीला धावून आलास ! मी तिला सांगितले की माझी कुठलीच कृती सध्या माझ्या हातात नाही . माझ्या नियंत्रणात काहीच नाही . जे जे समोर घडते आहे ते ते फक्त मी पाहतो आहे . त्यामुळे हे सर्व नर्मदा मातेचे कौतुक आहे .
आणि तुझ्या अपार गुरुनिष्ठेचे फळ आहे !  रात्री आम्ही सर्वजण अंगणातच झोपलो . मच्छरदाणीने मला तारले , बाकीच्यांनी किमान हजार हजार मच्छर तरी मारले ! अपरात्री अचानक दहेज पोलिसांची गस्त घालणारी गाडी तिथे आली . मी जागाच होतो त्यामुळे पोलिसांना भेटायला गेलो . आणि सुमारे दोन तास पोलिसांशी गप्पा मारल्या ! त्यांच्याकडून या भागातले अर्थकारण समाजकारण राजकारण अशा बऱ्याच गोष्टी कळाल्या . पोलिसांना मस्त चहा करून पाजला . त्यामुळे ते खुश झाले ! साध्वीच्या स्वयंपाक घरामध्ये तिच्या परवानगीशिवाय असा प्रवेश ती कोणाला करू देईल असा तिचा स्वभावच नव्हता ! परंतु तिने अगदी मनापासून मला मुक्तहस्त दिला होता . त्यामुळे मला पोलिसांना चहा करून पाजता आला . सकाळी सर्वजण उठल्यावर बाल भोग काय करायचा असा प्रश्न होता . रात्रीच्या बऱ्याच पोळ्या उरल्या आहेत असे माझ्या लक्षात आले . मग मी सर्वांना सुंदर असा कुस्करा करून खायला घातला . हा पदार्थ सर्वांनाच खूप आवडला ! साध्वीला हा पदार्थ माहिती नव्हता ! तिने इथून पुढे असाच बालभोग करून सर्वांना खायला घालेन असे मला सांगितले .  सर्व आटोपून साध्वी मातेचा निरोप घेतला . अतिशय खंबीर पुरुषासाठी वावरणारी ती कठोर अंत:करणाची स्त्री आम्ही सर्वजण निघताना मात्र अचानक भावुक झाली . आणि डोळ्या वाटे तिने आम्हाला आर्द्र निरोप दिला . सर्वांचेच डोळे पाणवले . काल आम्ही आलो तेव्हा अतिशय अपरिचित वाटणारा हा आश्रम आता मात्र आपलाच आहे असा भाव मनामध्ये होता . एखादी गोष्ट आपलीच आहे असा भाव आपण जेव्हा मनामध्ये उत्पन्न करतो ना तेव्हा आपण केलेल्या कामाची गतीच काही न्यारी होऊन जाते ! ते काम एका वेगळ्या उंचीवर जाऊन पोहोचते . सर्वांनी सडक मार्ग पकडला . मी गुपचूप किनारा गाठला ! मला एकट्याने नर्मदा माते सोबत चालायचे होते . त्यामुळे प्रचंड चिखल असलेला किनारा पकडून चालत राहिलो . 
नर्मदा मातेचे स्मरण ,दर्शन आणि स्पर्शन पुन्हा एकदा सुरू झाले !





 लेखांक एकशे बारा  समाप्त (क्रमशः )

टिप्पण्या

  1. अद्भूत आहे हे सारे !
    आई नर्मदे हर बाबाजी 🙏

    उत्तर द्याहटवा
  2. नर्मदे हर🙏🙏🙏🙏🙏 अलौकिक अद्भभुत.

    उत्तर द्याहटवा
  3. नर्मदे हर! मागील लेखांक चा दुवा वेळ मिळाला की जोडावा. धन्यवाद. नर्मदे हर!

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद वैशाली जी ! दुवा टाकलेला आहे . नर्मदे हर !

      हटवा
  4. नर्मदे हर…
    पुढील लेखाची वाट बघत आहे

    उत्तर द्याहटवा
  5. लेखांक 113 लवकर पूर्ण करून आमची मानसिक नर्मदा परिक्रमा सुरू करावी ही विनंती.
    डॉक्टर वीणा देव [ Canada]

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

जे आवडते सर्वांना ...

अनुक्रमणिका

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

लेखांक १ : नर्मदे हर !

लेखांक २ : भोपाळ जवळच्या जंगलातील अपघात

लेखांक ४ : झुठा कही का ! सबकुछ तो लाए हो !

लेखांक ३ : चोराची धन

लेखांक ५ : ग्वारीघाट जबलपुर मध्यप्रदेश

लेखांक ८३ : महाराष्ट्रात प्रवेश आणि भाबरीचे भेदक भिल्ल-महात्मा फोदला गारद्या पावरा

लेखांक ७४ : लेपा बांध , वेदा संगम , कठोरा अन् मांडव्य गुंफा

लेखांक ९० : गुजरात मधील कणजी चे सान्सुभाई तडवी आणि अरण्यव्याप्त माथासर