लेखांक ९६ : गुजरातमधील उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमेच्या दक्षिण तटावरील मार्गक्रमणा

 श्रीराम नामक त्या तरुण आचाऱ्याच्या हातचा महाप्रसाद घेऊन रामपुरा सोडले . पुन्हा एकदा किनारा पकडला . इथून काठाने चालण्याचा रस्ता जवळपास अशक्य या कोटीतला आहे . त्याचे महत्त्वाचे कारण असे की इथे फक्त माती किंवा फक्त दगड नसून मातीत कालवलेले दगड आहेत ! गेली लाखो वर्षे नर्मदा मातेने वाहून आणलेल्या गाळाच्या मातीमध्ये नर्मदेचीच जाडसर वाळू कालवून तयार झालेले कठीण वालुकाश्म युक्त खडक येथे आहेत . यातील एकेक खडा एकेक इंचाचा आहे . त्यामुळे याच्यावरून चालताना पायांची कसरत होते . बर हे वाळूचे टिले सरळ नसून मध्ये येऊन मिळणाऱ्या असंख्य ओढ्यांमुळे कधी दहा फूट ,कधी पंधरा फूट , तर कधी तीस फुटापर्यंत खोल गेलेले आहेत . इथे घाटावरती मला एक परिक्रमा असे भेटले . महाराष्ट्रातील नगरच्या पाथर्डी या गावचे हे परिक्रमावासी वारकरी सांप्रदायिक होते . विठ्ठल महाराज पठाडे असे त्यांचे नाव . त्यांच्या चेहऱ्यावर मला चिंता दिसले म्हणून मी विचारले की बाबाजी काय झाले ? ते मला म्हणाले की त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये परिक्रमा देखील पूर्ण करायची आहे आणि आषाढी वारी देखील गाठायची आहे . तरी कसे करावे याचा प्रश्न त्यांना पडला आहे . मी त्यांना सांगितलं की जर ते किनाऱ्याने चालले तर त्यांची परिक्रमा लवकर पूर्ण होईल . परंतु आजपर्यंत ते धोपट मार्गाने चालल्यामुळे त्यांना थोडीशी शंका होती की नक्की कुठला मार्ग पकडावा . मी त्यांना सांगितले की तुम्ही एक दिवस माझ्यासोबत किनाऱ्याने चालून पहा . जर तुम्हाला बरे वाटले तर तसेच पुढे जा अन्यथा सडक मार्ग आहेच . त्यांनाही युक्ती पटली आणि ते माझ्यासोबत चालू लागले . चालताना चे नियम मी त्यांना समजावून सांगितले की दोघांनी अंतर ठेवून चालायचे आणि गप्पा मारायच्या नाहीत . तसेच इथे किनाऱ्यावर मगरी असणार आहेत हे देखील मी त्यांना सांगितले . त्यामुळे जरी मगर दिसली तरी आरडाओरडा न करता शांतपणे तिचे दर्शन घ्यायचे असे आम्ही दोघांनी ठरवले . थोडे अंतर चाललो असू नसू इतक्यात एका भव्य मगरीने दर्शन दिलेच ! ती मगर इतकी मोठी होती की एखाद्या म्हशीला सहज पाण्यात खेचेल ! संथपणे चाललेला तिचा जलविहार पाहून मन तृप्त झाले ! अतिशय संथ लयी मध्ये तिची शेपटी सर्पाकार हलत होती . त्यातून तयार होणाऱ्या लाटा एखादी नाव गेल्यावर मागे कसे नक्षीकाम होते तसे नक्षीकाम पाण्यामध्ये तयार करत होत्या . परंतु मध्येच मगरीने ठरवले की ती अशी पुढे सरकायची की जणूकाही पाण्यात कुठली हालचालच दिसणार नाही ! या दोन्ही प्रकारे तिला पोहता येत होते ! विठ्ठल महाराजांना चष्मा असल्यामुळे त्यांना मगर दिसत नव्हती . ते म्हणाले नर्मदा मैया मला आंधळे केलेले आहेस तुझी मगर मला जवळ आल्याशिवाय दिसणार नाही . असे म्हटल्याबरोबर मगरीने डावीकडे वळण घेतले आणि वेगाने ती आमच्या दिशेला पोहत येऊ लागली ! तिची ती गती तिचे डोळे आणि तिचे दात चांगलेच लक्षात राहिले ! आम्ही दोघे मूर्ती सारखे हतबुद्ध होऊन थांबलो होतो ! तिचे ते सौंदर्य आणि पोहण्यातले लालित्य केवळ अविस्मरणीय होते !  विठ्ठल महाराजांना अचानक असे वाटले की तिचा व्हिडिओ घ्यावा म्हणून त्यांनी त्यांचा छोटा जिओ फोन काढण्यासाठी झोळी खाली ठेवली . ती हालचाल पाहिली आणि त्या क्षणी ती मगर अक्षरशः अदृश्य झाली ! एका क्षणात ती पाण्यामध्ये शिरली . आणि खालूनच पोहत कुठेतरी निघून गेली . मी बराच वेळ ती कुठून बाहेर येते का पाहायचा प्रयत्न केला परंतु ती बाहेरच आली नाही ! विठ्ठल महाराजांना मी पुन्हा एकदा वन्य जीवन पाहण्याचे नियम सोप्या शब्दात समजावून सांगितले . मध्ये येणारे ओढे नाले पाहून विठ्ठल महाराज थांबायचे आणि सांगायचे इथून रस्ता नाही . मला काही दिवसांपूर्वी मोहन साधू ला हेच वाक्य ऐकणारा मी आठवायचो ! मी असेच त्याला सांगायचो की इथून पुढे रस्ता नाही . आणि मग तो रस्ता काढून दाखवायचा ! आज फक्त त्याची जागा मी घेतली होती . आणि माझ्या जागी विठ्ठल महाराज पठाडे होते ! विठ्ठल महाराजांचे कौतुक आहे . कारण फार खोल आणि फार कठीण ओढेनाले माझ्या नादाने कधी वेलींना पकडत ,कधी झाडांच्या लटकणाऱ्या मुळांना पकडत ,तर कधी उड्या मारत ते उतरले आणि चढले सुद्धा . हा परिसर नक्की कसा होता याचा आपल्याला अंदाज यावा म्हणून काही गुगल नकाशे आणि चित्र आपल्या साठी सोबत जोडत आहे .
इथे नर्मदा जळ अशा आकाराच्या सुंदर रंगीबेरंगी खडकांनी भरलेले आहे .
काठावरून चालताना अशा प्रकारची जमीन आहे . थकलेल्या पायांना अशा गुळगुळीत गोट्यांवरून चालताना खूप आराम मिळतो . पायाची 'ॲक्युप्रेशर थेरपी ' होते . फक्त मध्येच कुठे ॲक्युपंक्चर होणार नाही याची देखील काळजी घ्यावी लागते ! कारण काटे खूप असतात . चालण्याची गती अर्थातच मंदावते .
 मैयाच्या काठाजवळ मोठे मोठे दगड आहेत . यांच्या वरून चालताना देखील फार सावधपणे चालावे लागते . कधी कुठला दगड फिरेल आणि तोंडावर आपटवेल याचा नेम नसतो .
 शूलपाणीचे डोंगर मागे सोडून आपण आता बऱ्यापैकी पुढे आलेला आहोत हे तुम्हाला हे चित्र पाहिल्यावर लक्षात येईल .
नदीजवळ मोठे खडक असले तरी आपल्या चालण्याच्या वाटेमध्ये अशा प्रकारचे वाळू आणि गाळ याच्यापासून तयार झालेले मोठाले टिले किंवा मोठ्या मोठ्या भिंती आढळतात . याच्यामध्ये खूप सुंदर सुंदर शिवलिंगे सापडतात . फक्त ती काढणे खूप त्रासाचे असते . कारण ती चुनखडक आणि गाळाच्या मदतीने पक्की बसलेली असतात . 
अधून मधून अशा मगरी दर्शन देतात .
हे चित्र खूप वरून काढलेले आहे . प्रत्यक्षा मध्ये आम्ही अगदी पाण्याजवळून चालत होतो . त्यामुळे मगर खूप मोठी दिसायची . माणसाची जराशी चाहूल लागली तरी मगर क्षणात अदृश्य होते !
रामपुरा गावापासून तिलकवाडा पर्यंत नर्मदा मैया उत्तर दिशेला वाहते म्हणून या भागाला उत्तरवाहिनी नर्मदा असे नाव आहे आणि एवढ्याच भागाची परिक्रमा करणे म्हणजे उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा करणे होय . आज मला या उत्तर वाहिनी परिक्रमेचा दक्षिण तट पार करायचा होता . 

वाळूचे ओढे नाले यांच्यामुळे कातरले गेलेले किनारे कसे आहेत हे लक्षात येण्यासाठी रामपुरानंतरचा किनाऱ्याचा हा भाग पहावा म्हणजे तुम्हाला मी काय म्हणतो आहे ते लक्षात येईल . हा भूभाग पार करण्यासाठी अतिशय कठीण असा आहे त्यामुळे परिक्रमावासी या भागातून जात नाहीत . परंतु वैयक्तिक संकल्पा मुळे मी इथून गेलो आणि नर्मदा मैयाने देखील अतिशय सुंदर पद्धतीने हा संपूर्ण टापू पार करविला .
अजून थोडे जवळ जाऊन पाहिल्यावर लक्षात येईल की हे ओढे किती खोल आणि कठीण आहेत .
परंतु इथला प्रवास अतिशय संस्मरणीय असा ठरला ! इथे मानवी वावर शून्य असल्यामुळे मगरींचा चांगला सुळसुळाट होता .
इथे नर्मदा मातेचे पाणी शांत खोल आणि अतिशय धीर गंभीर भासते . त्यामुळेच मगरींसाठी ही जागा एक नंदनवन आहे . शिवाय आम्ही ज्या बाजूने चालत होतो ती बाजू मैयाने उभी कातरलेली आहे . त्यामुळे या उभ्या भिंतीमध्ये काही खोल गुहा बनवून तिथे अंडी घालणे मगरींना सोपे जाते . 
या भागातील उभा किनारा पहा . असा वालुकाष्माचा उभा किनारा असल्यामुळे त्याच्यामध्ये पाण्याच्या सतत आपटल्यामुळे तयार झालेल्या भगदाडात मगर अंडी घालते .
मला काही केवट लोकांनी पूर्वीच सावध केले होते की किनाऱ्याने चालायचे तर अवश्य चाला फक्त मगरीची अंडी ज्या भागात असतात तिथे तिच्या फार जवळ जाऊ नका . कारण तुम्हाला अंडी दिसत नसतात ती तुमच्या खाली कुठेतरी गुहेमध्ये घातलेली असतात . परंतु मगरीला मात्र त्या अंड्यांची काळजी असल्यामुळे ती अंड्यांच्या संरक्षणासाठी तुमच्यावरती हल्ला करू शकते . मगरीच्या जबड्याची ताकद ही पृथ्वीवरील कुठल्याही जीवाच्या चावण्यापेक्षा किती तरी पटींना जास्त आहे हे आता सिद्ध झालेले आहे .शिवाय भक्ष्य पकडल्यावर त्याला मगर जो एक 'डेथ रोल ' देते तो सहन करण्याची शक्ती मानवी शरीरामध्ये अजिबातच नाही . त्यामुळे तिच्या जबड्यात आपण जाण्यापेक्षा शांतपणे पुढे निघून गेलेले कधीही चांगले . इथे पांडुरंग पठाडे थकले होते म्हणून काही काळ एका झाडाच्या सावलीत जाऊन बसले . मी मैयाच्या काठावर उन्हामध्येच एका वालुकाश्माच्या टोकावर येऊन बसलो . नर्मदा मातेचे रुपडे अनिमीष नेत्रांनी मी पाहत होतो . इतक्यात मला नर्मदा मातेमध्ये काहीतरी आश्चर्यकारक दिसले .माझा माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता म्हणून डोळे चोळून चोळून मी पुन्हा ते दृश्य पहायचा प्रयत्न केला . परंतु मला जे दिसत होते ते बरोबर होते ! 
मगर शक्यतो पाण्यामध्ये जेव्हा पोहते तेव्हा पुढे सरकण्यासाठी शेपटीचा वापर करते .
 तिच्या एकूण शरीरामध्ये शेपटीची लांबी खूप जास्त असते . आणि शेपटीच्या टोकापर्यंत तिचे चांगले नियंत्रण असल्यामुळे अतिशय सुंदर अशी सर्पिलाकृती हालचाल करत ती मंदपणे पुढे सरकत असते . त्यामुळे तिला एक विशिष्ट लय आणि गती प्राप्त झालेली असते . इथे मात्र मला एक अतिशय प्रचंड धूड असलेली मगर दिसली जिची अर्धीच शेपटी होती ! अर्ध्याहून अधिक शेपटी तुटलेली असल्यामुळे हिला शेपटी हलवत पोहता येत नव्हते . त्यामुळे ती वेगाने शेपटीचे उरलेले टोक हलवत पुढे चालली होती . 
  (प्रतिनिधीक चित्र )
शेपूट नसल्यामुळे हिला पुढे जाण्यासाठी अधिक कष्ट करावे लागत होते . तसेच तिच्या शरीराचा एकंदरीत तोल ढळल्या सारखा वाटत होता . मला सुरुवातीला वाटला की मला भास होत आहे परंतु नंतर ती मगर माझ्या इतकी जवळ आली की मला स्पष्टपणे दिसले की तिला अर्धी शेपूट नाही . मगर माझ्या जवळ येऊ शकली कारण तिला मी बसलो आहे हेच माहिती नव्हते . तिला जर मी दिसलो असतो तर ती जवळ आली नसती . शेपूट तुटलेल्या पाली आपण पाहिल्या असतील . अगदी तशीच ही मगर होती . फक्त आकार फार मोठा एखाद्या म्हशीसारखा होता .  आश्चर्यकारक असे ते दृश्य हृदयामध्ये साठवत  पुढे निघालो . पठाडे महाराजांना मी हा अनुभव सांगितला तर त्यांना तो माझा भ्रम आहे असे वाटले . पुढे मांगरोल गावाच्या घाटावर काही केवट लोक गप्पा मारत बसले होते . त्यांना भेटून मी मला दिसलेल्या मगरी विषयी सांगितले . ते सर्वजण एकमेकांची तोंडे पाहू लागले ! कारण इथे अशी मगर आहे हे या केवट लोकांना माहिती होते परंतु त्यांच्यातीलच एकाला हे खोटे वाटायचे कारण त्याला आज वर ती मगर कधीच दिसली नव्हती ! मी त्यांच्याशी कुठलाही संबंध नसताना आलेला अनोळखी व्यक्ती असल्यामुळे मी सांगितल्यावर त्याचा विश्वास बसला . केवट मला सांगू लागले की त्या मगरीची कथा फार भयानक आहे ! आम्हाला दगडावर बसवून त्यांनी तीन दगडांची चूल मांडून चहा करायला सुरुवात केली . चहाचे सामान सर्वच नावाडी आपल्या नावे मध्ये ठेवत असतात . चहा करता करता एक केवट त्या मगरीची कथा सांगू लागला . आणि आम्ही सर्वजण कानात प्राण आणून ऐकू लागलो ! 
" वह पूँछकटा मगरमच्छ बडा खतरनाक है बाप्पू ! उसके कारनामे आप नही जानते । सबसे बडा शैतान है वह । पूरी की पूरी गाय , पूरी की पूरी भैंसिया खींच के ले जावे वह पाणी मे ! बछडा देखेगा भी नही । उसको सिर्फ बडा जानवर चाहिये । " काळ्या चहाचे झुरके घेत आम्ही ऐकू लागलो . "उसकी और एक गंदी आदत थी दादाजी । यहा हर गाव का शमशान मैया किनारे होता है ।अब यह क्या करेगा जब भी कोई चिता जल रही हो तो वहां पानी में घात लगा कर बैठेगा । और जैसे ही सारे आदमी चले जाए , जोरदार झपट्टा मारकर किनारे पर आ जाएगा । उसकी पुछ में बहुत बड़ी ताकत होती है । पूछ के एक ही झटके से पूरी चिता गिरा देगा । और शव लेकर पानी में चला जाएगा ! और ठंडा करके फिर आराम से बैठकर खाएगा । " 
 नर्मदामाई किनारी जळणारी चिता (प्रातिनिधिक चित्र )
हा प्रकार माझ्यासाठी नवीनच होता ! यापूर्वी सातारा शहरातल्या माहुली शहरांमध्ये असलेल्या स्मशानामध्ये कुत्री असे करताना मी स्वतः पाहिले होते . कृष्णा नदीमध्ये शरीर ओले करून ही कुत्री वेगाने पळत यायची आणि चितेमध्ये घुसायची . जळणाऱ्या प्रेताचा जो कुठला भाग तोंडाला लागेल तो तोडून पुन्हा पळून जायची . हे मी स्वतः माझ्या डोळ्यांनी घडताना पाहिलेले आहे . त्यांच्या अशा पद्धतीने घुसण्यामुळे चिता कशी ढासळते हे देखील मी अनुभवलेले आहे . परंतु मगर देखील असे करते हे मला माहिती नव्हते . "लेकिन पूँछ का क्या हुआ फिर ? " मी विचारले . "बताते हैं बताते हैं दद्दा । सब कुछ बताते हैं । "विडी चा एक झुरका घेत नर्मदा मातेच्या किनाऱ्याकडे एका विशिष्ट जागेकडे बोट करत तो केवट सांगू लागला . "वह दूर आपको शमशान दिख रहा है ? बस वही शमशान था । एक बड़ी सी चिता जल रही थी । और अपना यह मगरमच्छ वहां चला गया ।लोग मगरमच्छ के डर से छुप जाते थे । यहां बहुत लोगों की जान मगरमच्छ ले चुके हैं । आज भी मगरमच्छ हर साल दो चार लोग आराम से खींच कर ले जाता है । छुपे हुए हमारे गांव के लोगों ने जो देखा वह बता रहे हैं । अपना यह बड़ा सा मगरमच्छ आया और मस्त स्टाइल में पूछ घूमाकर के चिता पर फटकार डाला । चीता धड़ाधड़ गिर गई । अब हुआ यह है कि यह मगरमच्छ वहां से भाग नहीं पाया । क्योंकि सारी चिता उसके पूछ पर ही गिर गई । और उसमें बड़े से एक दो लकडे थे । यह बेचारा उसके नीचे दब गया । उसकी पुछ बुरी तरह से जल गई । यह जितना हिलने की कोशिश करता उतनी और लकडियाँ उस पर गिर जाती । इस हादसे में बेचारे की आधी पूछ कट गई । और कैसे भी करके जान बचाकर , कटी हुई आदि पूछ वहीं पर छोड़कर बेचारा पानी में भाग गया । तब से ऐसे ही अधकटा पूछ लेकर घूम रहा है । " नुसता प्रसंग ऐकूनच अंगावर काटा येत होता . प्रत्यक्षामध्ये ते पाहणारे लोक किती घाबरले असतील पहा ! " अब छिपकली की पूछ कटती है उसको नयी आती है । पर मगरमच्छ को नही आती ।तब से यह बेचारा ऐसे ही घूम रहा है । अब पूछ कटने से इसका तैरने का गति कम हो गया है ।  इसीलिए यह जब भी हमला करता है तो बहुत जोर से करता है । पहले से ज्यादा खूंखार ,पहले से ज्यादा खतरनाक हो गया है । " स्वाभाविक होते . नैसर्गरित्या शिकारीसाठी लागणारे अवयवच नष्ट झाल्यामुळे या मगरीला शिकार मिळविण्यासाठी थोडेसे अधिक कष्ट करावे लागणे स्वाभाविक होते . त्यामुळे तिच्यामध्ये एक स्वाभाविक आक्रमकपणा वाढला होता . निसर्गाचा हा चमत्कार पाहून मौज वाटली . आद्य शंकराचार्य म्हणतात त्याप्रमाणे मगरींचे देखील नर्मदा मैया कल्याण करते . आम्ही पुढे निघालो परंतु ही पूँछकटी मगर मात्र लक्षात राहिली . इथे काठावर ओळीने अनेक महादेवाची पुरातन मंदिरे आहेत . त्या सर्वांचे दर्शन करत मार्गक्रमणा केली . धनेश्वर , मंगलेश्वर ,कामनाथेश्वर , धनदेश्वर , लुंकेश्वर अशा महादेवांची दर्शने घेतली . आपण ही दर्शन घ्यावे . 
 श्री धनेश्वर महादेव महादेवाचे
धनेश्वर महादेव मंदिर परिसर
महंत जानकी दास बापू इथली व्यवस्था बघतात
शेजारीच श्री जटेश्वर महादेव मंदिर आहे
या यानंतर लागणाऱ्या गावाला मांगरोल नाव ज्याच्यावरून पडले ते मंगळेश्वर महादेवाचे मंदिर मैय्याकाठी आहे .
 त्यानंतर नानी मांगरोल गावातील कामनाथाचे मंदिर डावीकडे वरती दिसू लागले . सर्व मनोकामना पूर्ण करणारा म्हणून हा कामनाथेश्वर आहे .
 श्री कामनाथेश्वर महादेव
हे सुंदर मंदिर खूप दुरून दिसते समोरच्या तटावरून पण छान दिसते .
समोरच्या तटावरून मंदिर असे दिसते
(ता.क. : आपल्या एका वाचकांनी खाली कमेंट मध्ये कळविल्याप्रमाणे गेल्या वर्षी आलेल्या महापुरामध्ये कामनाथेश्वराचे मंदिर पूर्णपणे वाहून गेलेले आहे . ग्रामस्थांनी खूप शोध घेऊनही ते शिवलिंग त्याचा नंदी आणि अन्य कुठलाही भाग पुन्हा सापडलेला नाही . मला या शिवलिंगाचे दर्शन लाभले ही नर्मदेची कृपाच )
आम्ही चाललो तो वाळूचा किनारा पहा
हीच ती स्मशानभूमी जिथे मगरीने आपली शेपूट जाळून घेतली
काठावरून चालण्याचा मार्ग किती वालुकामय आहे हे आपल्या लक्षात येईल
आम्ही चाललेला वालुकाश्म असलेला किनारा समोरून असा दिसतो .आता तुम्हाला इथे काठावरून चालण्याची काठीण्य पातळी लक्षात येईल .
उत्तरवाहिनी परिक्रमा करणाऱ्या लोकांसाठी मात्र गावातून वेगळा मार्ग केलेला आहे . अगदी थोड्या काळासाठी ते काठावरून चालतात . त्या मार्गावरती प्रचंड प्रमाणात कचरा केला जातो . हे थांबले पाहिजे . म्हणजे आपण परिक्रमा अवश्य करावी परंतु कचरा कशासाठी करावा ? आपल्या जवळची एकही वस्तू नर्मदे काठी पडू नये याची काळजी प्रत्येकाने घेतली तर ही वेळ येणार नाही .
आजकाल उत्तरवाहिनी परिक्रमेला एखाद्या जत्रेचे स्वरूप आलेले असून कधी कधी दिवसाला एक लाख लोक परिक्रमा करतात .  चहाचे कप , प्लास्टिकच्या पत्रावळ्या , द्रोण , बिस्कीटचे पुडे, चॉकलेटची वेष्टने , उदबत्तीच्या पिशव्या इत्यादी प्लास्टिकचा कचरा मोठ्या प्रमाणात नर्मदा मैया काठी टाकला जातो .हे दृश्य हृदय हेलावणारे असते . तरी आजकाल अनेक स्वयंसेवी संस्था उत्तरवाहिनी परिक्रमा झाल्यावर किंवा परिक्रमेच्या दरम्यान कचरा गोळा करण्याचे महत्त्वाचे काम करताना दिसतात . परंतु कचरा टाकणारे हातच नसतील तर कचरा गोळा करणाऱ्या हातांची सुद्धा गरज लागणार नाही हे साधे गणित आपल्या लक्षात आले पाहिजे .
उत्तर वाहिनी परिक्रमा झाल्यावर जमावाने केलेला कचरा गोळा करताना स्वयंसेवक
हा कचरा इतक्या मोठ्या प्रमाणात गोळा करावा लागतो की आपण त्याची कल्पना सुद्धा करू शकणार नाही . अशा प्रकारची कृती केल्याने नर्मदा मैया कधीच प्रसन्न होणार नाही हे भक्तांनी कायम लक्षात ठेवावे .
कचरा प्रमाणाबाहेर गेला की अखेरीस तो जाळून नष्ट करावा लागतो . हे अजूनच घातक आहे .
उत्तर वाहिनी परिक्रमा या विषयावर थोडेसे मनापासून बोलावेसे वाटत आहे . 
परिक्रमा म्हणजे " च्या भोवती फिरणे . " उत्तरवाहिनी नर्मदा मातेच्या भोवती फिरणे म्हणजे उत्तर वाहिनी परिक्रमा . या मार्गावर फिरताना एकट्याने , संकल्प पूर्वक , शक्यतोवर अनवाणी पायांनी , परिसरातील सर्व मंदिरांची दर्शने घेत , तिथे आपली वैयक्तिक उपासना साधना करीत , अयाचित वृत्तीने नर्मदा मातेचे नामस्मरण ,चिंतन , दर्शन करीत काठाने पायी चालणे म्हणजे उत्तर वाहिनी परिक्रमा करणे . जरी ही परंपरा अतिशय पुरातन असली तरी देखील स्थानिक लोकांशी बोलल्यावर असे लक्षात आले की या परिक्रमेचा प्रचार प्रसार गेल्या दहा वर्षात मोठ्या प्रमाणात झालेला आहे . तत्पूर्वी केवळ इथे पंचक्रोशी मध्ये अर्थात आसपास राहणाऱ्या गावातील लोकच ही परिक्रमा करायचे . माझी आजी सांगायची ही मंदिरामध्ये नेहमी तीन प्रकारचे लोक येतात . हौशे , नवशे आणि गवसे . हवशे म्हणजे ज्यांना देवदर्शनाची हौस आहे असे लोक . दुसरा प्रकार आहे नवस सायास बोलून तो फेडण्यासाठी येणारे भक्त लोक . आणि तिसरा प्रकार आहे तो अशा लोकांचा जे तिथे आपल्याला काही गवसते का अर्थात काही सापडते का काही मिळते का ह्या लोभा पायी आलेले स्वार्थी लोक असतात . उदाहरणार्थ चप्पल चोर . नर्मदा खंडामध्ये देखील असे तिन्ही प्रकारचे लोक आपल्याला आढळतात . मनोभावे नर्मदा मातेची अनुभूती यावी आणि स्वतःचा शोध घ्यावा या कारणासाठी परिक्रमा करणारे काही परिक्रमावासी असतात . काही लोकांनी एखादे व्रत स्वीकारलेले असते किंवा काहीतरी नवस बोललेला असतो तो फेडण्यासाठी ते परिक्रमा करत असतात . तर तिसरा आणि अत्यंत बेकार प्रकार अशा लोकांचा आहे ज्यांना परिक्रमेशी काही देणे घेणे नसते परंतु परिक्रमेपासून मिळणारे लाभ मात्र हवे असतात . असे लोक संपूर्ण परिक्रमा करण्याच्या भानगडीत न पडता त्यांना सापडलेला अतिशय सोपा आणि सुलभ उपाय म्हणजे उत्तर वाहिनी परिक्रमा हा आहे . अर्थात हे सरसकट विधान नसून मी मुख्यत्वे करून स्थानिक लोकांबद्दल बोलत आहे जे ही परिक्रमा मोठ्या संख्येने आजकाल करताना दिसतात . अशाच लोकांपैकी काही हुशार लोकांनी मग याचा धंदा करण्याची युक्ती शोधून काढली आणि उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा असे ब्रॅण्डिंग करून लोकांना भुलविणाऱ्या जाहिराती प्रसृत करायला सुरुवात केली आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात हा व्यवसाय या भागात फोफावला आहे असे सर्वच स्थानिक साधुसंतांनी सांगितले . तुम्हाला उत्तर वाहिनी परिक्रमा करवून आणतो असे सांगणारे अध्यात्मिक एजंट इथे हळूहळू तयार होत आहेत . ह्या लोकांचे टारगेट शहरातील श्रीमंत परिक्रमा वासी असतात . मी बोलतो आहे हे वाचून काही लोकांना खूप राग येणार आहे याची मला जाणीव आहे परंतु सत्य मांडणे हे मी एक नर्मदा भक्त म्हणून माझे कर्तव्य समजतो . अव्वाच्या सव्वा शुल्क आकारून लोकांना ही २१ किलोमीटरची सफर घडविली जाते आणि नर्मदा परिक्रमेचे पुण्य आता तुम्हाला मिळाले असे सांगितले जाते .मी पूर्वी देखील वेळोवेळी अनेक लेखांमध्ये त्या त्या भागातील प्रसिद्ध पंचकोशी परिक्रमांविषयी माहिती लिहिलेली आहे तशीच ही देखील एक पंचकोशी परिक्रमा आहे . परंतु गेल्या काही वर्षात तिचे ज्या पद्धतीने बाजारीकरण झालेले आहे व होत आहे ते पाहता भविष्यामध्ये स्थानिक ग्रामस्थ मिळून या परिक्रमेवर काही निर्बंध आणतात की काय अशी अवस्था निर्माण होणार आहे असे माझे स्पष्ट मत झालेले आहे .जसे गिरनार परिक्रमेचे गेल्या काही वर्षात बाजारीकरण झाले आहे तसेच याही परिक्रमेचे आता होते आहे. मी २०२२ सालीच गिरनर परिक्रमा केली होती तेव्हा दिवसाला नऊ लाख लोक चालत होते ! कल्पना करा याचा त्या वनक्षेत्रावर किती ताण येत असेल ! तसेच इथेही आता झालेले आहे . या परिक्रमेला जाणाऱ्या अनभिज्ञ लोकांविषयी माझा काहीही आक्षेप नाही . माझे म्हणणे इतकेच आहे की अशा पद्धतीने लोकांना उत्तर वाहिनी परिक्रमा करण्यासाठी आणणारे जे लोक आहेत त्यांनी सुरुवातीलाच जर सर्वांना या परिक्रमे दरम्यान काय करावे आणि काय करू नये याचे पुरेसे डोस पाजले तर त्यांच्याकडून होणारे उन्माद कमी प्रमाणात होतील आणि नर्मदा मातेची कृपा मिळण्याची शक्यता वाढत जाईल .
उत्तर वाहिनी परिक्रमा करविणारे आणि १५ ते २० दिवसांमध्ये गाडीने परिक्रमा करविणारे परिक्रमावीर यांची संख्या सध्या मोठ्या प्रमाणात वाढलेली असून नर्मदा भक्तांनी अतिशय सावधपणे निर्णय घेऊन मगच यांच्यासोबत यात्रा करावी . आपल्या यात्रेतील पावित्र्य , भावभक्ती कुठेही हरपणार नाही याची काळजी घेतली तरच मजा आहे . अशा लोकांची थांबण्याची ठिकाणे ठरलेली असतात आणि त्या आश्रमाबरोबर शक्यतो यांचे टाय अप किंवा साटेलोटे झालेले असते . तुम्हाला उत्तर वाहिनी परिक्रमा करायची इच्छाच असेल तर कोणाचीही मदत न घेता सरळ रामपुरा गाव गाठावे आणि तिथून नर्मदा मैया सुचवेल त्याप्रमाणे परिक्रमा पूर्ण करावी हे सर्वात सोपे आणि हिताचे आहे . एक साधे उदाहरण सांगतो . तिलकवाडा या गावांमध्ये समर्थ रामदास स्वामी यांनी स्थापन केलेला एक अतिशय जागृत मारुती आहे .
परंतु हा किंचित म्हणजे साधारण दोनशे तीनशे मीटर बाजूला असल्यामुळे परिक्रमा काढणारे लोक भाविकांना या मारुतीच्या दर्शनासाठी नेत नाहीत . आज या ही परिक्रमेला सर्वात जास्त संख्या महाराष्ट्रीयन लोकांचीच असते . त्यांना जर समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेला मारुती गुजरात मध्ये आहे हे लक्षात आले तर त्यांना किती आनंद होणार आहे ! परंतु या आनंदाला ते मुकतात कारण त्यांनी परिक्रमा एजंटची बुकिंग घेतलेली असते आणि त्याला जास्तीत जास्त लोकांना परिक्रमा करविण्यात रस असतो . त्यांना सर्वकाही दाखवण्यात फारसा रस नसतो . अर्थात याला काही सन्माननीय अपवाद देखील असणार आहेत परंतु नियमाला असलेले अपवाद नियम सिद्ध करू शकत नाहीत हे देखील तितकेच कटु सत्य आहे . असो . बुद्धी दे रघुनायका !
नदीचा खोल डोह हळूहळू उथळ होत गेला आणि आता ते पाणी इतके उथळ झाले की या काठावरून त्या काठावर चालत जाता येईल ! उथळ पाण्यामध्ये मगरीचा धोका थोडा कमी असतो . परंतु पूर्णपणे संपलेला नसतो . नुकतेच काही उत्तर वाहिनी परिक्रमा करून आलेले लोक मला भेटले ज्यांनी ती नदी पाण्यातून पार केली असे मला सांगितले . हे धोकादायक आहे . आता तिथे तात्पुरता पूल उभा करण्यात आला आहे असे फोटो पाहिल्यावर माझ्या लक्षात आले . यापूर्वी मात्र नाविक लोकांना पैसे दिल्याशिवाय तुम्हाला पलीकडे जाता येत नसे . उत्तर वाहिनी परिक्रमेच्या रूपाने या पंचक्रोशी मध्ये नवे नवे व्यवसाय उभे राहताहेत हे मात्र अगदी निश्चित आहे . इथे ग्रामस्थांमध्ये दोनच प्रकारचे लोक दिसतात . एक या परिक्रमेला वैतागलेले गावकरी आणि एक या परिक्रमेमुळे अत्यंत आनंदित झालेले लाभार्थी ! 
त्यामुळे केवळ या परिक्रमेत लोक तुमच्याशी कसे वागतात यावरून नर्मदा खंडातील समग्र लोकांविषयी आपण आपले मत बनविणे थोडेसे चुकीचे ठरेल असे वाटते . नुकतेच काही बसने परिक्रमा केलेले लोक मला भेटले ज्यांनी नर्मदा खंडातील लोक अतिशय उद्दाम आणि उर्मट आहेत असे मत व्यक्त केले .हे वागणे तुम्हाला कोण घेऊन गेले आहे यावर बऱ्यापैकी अवलंबून असते याचे ज्ञान आपल्याला शक्यतो नसते. म्हणून असे सरसकट मत न करून घेणे श्रेयस्कर .असो .
इथे मध्ये तपोवन नावाचा एक अतिशय सुंदर आश्रम लागला . या आश्रमाचा सुंदर असा घाट पाहून वर जायची इच्छा झाली . घाटाने वरती गेल्यावर अतिशय भव्यदिव्य आश्रमाने स्वागत केले . आश्रमामध्ये सुंदर असा बाग बगीचा आणि शेती केलेली होती . आश्रमामध्ये एक तरुण साधू सर्व व्यवस्था पाहत होते . इथले मुख्य स्वामी महाराज वरच्या एका खोलीमध्ये समाधी लावून बसलेले होते . कोरोना काळापासून त्यांनी लोकांना प्रत्यक्ष दर्शन देणे बंद केले होते . फक्त काही विशिष्ट दिवशी ते बाहेर दर्शनासाठी काही काळ बसायचे परंतु आमच्या नशिबात ते दर्शन नव्हते . सतत मौनामध्ये राहणाऱ्या या महाराजांना रोज सकाळी जेवणाची थाळी फक्त दरवाज्यातून सरकवली जायची इतके ते एकांतप्रिय होते . या आश्रमाची व्यवस्था पाहण्यासाठी परळी वैजनाथ येथून आलेले वडगावकर नावाचे सुविद्य व सत्वशील दांपत्य नेमले होते .हे दोघेही स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून निवृत्त झाले होते . यांच्याशी काही गप्पा मारल्या . तिथे एक तमिळ साधू राहिला आहे असे मला त्यांनी सांगितल्यामुळे मी माझा मोर्चा त्या साधूकडे वळवला . या साधूचे नाव बाळ नंदू असे होते . त्याला तमिळ मध्ये बोलणारा मनुष्य मिळाल्यामुळे खूप आनंद झाला . याला देखील इथे राहून आश्रम चालविणाऱ्या महाराजांचे अजून दर्शन झालेले नव्हते . मला या प्रकारची मोठी गंमतच वाटली ! काही भाग्यवान परिक्रमा वासींना मात्र यांचे दर्शन होते असे ऐकण्यात आले .
तपोवन आश्रमाचे सदगुरू श्री पूर्णानंद सरस्वती स्वामी
इथली व्यवस्था पाहणारा तरुण साधू मात्र अतिशय सात्विक , हुशार ,तेजस्वी आणि कुशल होता . त्यामुळे शिष्यावरून गुरुचा अंदाज लावता येऊ शकतो ! 
तपोवन आश्रमाकडे घेऊन जाणारा खाजगी घाट
या घाटाच्या दुतर्फा सुंदर बागबगीचे आणि शेती केलेली आहे
आश्रमाची भव्य दिव्य वास्तू आपले स्वागत करते !
स्वामी महाराज वरती राहतात तर भक्तांच्या खोल्या खालील मजल्यावर आहेत .इथे अनेक गावातील भक्त दर्शनासाठी येत असतात .
याच व्हरांड्यातील याच कट्ट्यावर बसून आम्ही तरुण साधू सोबत चहाचा आस्वाद आणि सत्संग घेतला .
इथून थोडेसे पुढे गेल्यावर एका घाटावर काही परिक्रमा वासी स्नान करताना दिसले . यांनी हाका मारून आम्हाला बोलावून घेतले . यातील प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या मुक्कामी मला भेटला होता परंतु एक हसरा चेहरा मात्र मला फारच ओळखीचा वाटू लागला ! मी त्या दाढीवाल्या साधूला विचारले देखील की आपण आधी कुठे भेटलो आहोत बरे ? त्याने मला आठवण करून दिली भिकमपूर येथे चालू असलेल्या नर्मदा पुराण कथेमध्ये मी तिथल्या धर्म शाळेमध्ये मुक्कामी राहिलो होतो .तिथल्या सेवेमध्ये आणि तिथे रात्री आलेल्या भजनकऱ्यांमध्ये देखील हा चंदन नावाचा मनुष्य होता !
मला पाहताच त्याला आतोनात आनंद झाला ! आमची काही वेळ परिक्रमा या विषयावर चर्चा झाली होती आणि आता याने खरोखरच स्वतः नर्मदा परिक्रमा उचलली होती ! हा मला आश्रमामध्ये राहण्यासाठी आग्रह करू लागला परंतु अजून थोडासा दिवस शिल्लक असल्यामुळे पुढे चालायचे मी ठरविले होते तसेही हे आंघोळ करणारे सर्व परिक्रमावासी इथे मुक्कामी होते म्हणजे सगळा सावळा गोंधळ असणार होता ! परंतु हा आश्रम खूप चांगला आहे असे नंतर मला कळाले . इथे पाऱ्याचे शिवलिंग सुद्धा होते . 
हाच तो स्नानाचा घाट जिथे सर्व परिक्रमावासी स्नान करत होते
स्नान घाटाकडून आश्रमाकडे घेऊन जाणारी सुंदर पायवाट
स्वामी रामानंद संत आश्रम गोवार
इथून पुढे सगळा असाच किनारा होता . प्रत्यक्षात इथली पाणी पातळी नैसर्गिक रित्या कमी झालेली नसून सरदार सरोवर धरणामुळे इथला जलस्तर एकदम खाली गेलेला आहे . तिथे पाणी अडवले नसते तर इथे पाणी पातळी याहून किमान दहा-वीस फूट अधिक राहिली असती . 
त्यामुळेच इथे सुंदर अशी शिवलिंगे सापडतात फक्त तुमची नजर शोधक हवी आणि ... 

 शिवलिंग शोधतानाच नर्मदा मैया च्या वाहनाकडे देखील आपले लक्ष हवे .
अशा रीतीने काठावर विसावलेल्या अजून तीन मगरी त्याच दिवशी आम्ही पाहिल्या .
आज फक्त गरुडेश्वरापासून खाली समुद्रापर्यंत आढळणाऱ्या या मगरी पूर्वी संपूर्ण नर्मदा नदीमध्ये आढळायच्या त्यामुळे परिक्रमा वासींना पाण्यात उतरून स्नान करायला परवानगी नसावी . काठावर बसून स्नान करण्याचा हेतू हा ही एक असावा असे वाटते . तरी देखील पर्यटक कुठलाही विचार न करता नर्मदा मैया मध्ये खोलपर्यंत आत जातात हे चुकीचे आहे असे वाटते . 
ज्याप्रमाणे पुणे जिल्ह्यामध्ये अलीकडे बिबट्या आणि मानव यांच्यातील संघर्ष नित्याचा झालेला आहे अगदी त्याच पद्धतीने या परिसरात मगर आणि मनुष्य यांच्यातला संघर्ष सर्वज्ञात आहे , सर्वव्यापी आहे आणि जुना आहे .
 समोर दिसणारे तिलकवाडा नगर पहात या उत्तर वाहिनी किनाऱ्याचा निरोप घेतला आणि मैय्या सह डावीकडे वळलो . पठाडे महाराज वाळूचा किनारा आला की अतिशय डावीकडून चालायचे जेणेकरून वाळूला स्पर्श होऊ नये . कोणीतरी त्यांना सांगितले होते की वाळूच्या खाली देखील नर्मदा मैय्या असते . हे विधान बरोबरच आहे . परंतु केवळ वाळूच्या खाली नव्हे तर नदीच्या आसपास कित्येक मीटर आतपर्यंत आणि कित्येक मीटर खोल तिचा पाण्याचा प्रवाह कायमस्वरूपी वाहत असतो हे देखील आपण लक्षात घेतले पाहिजे . 
त्यामुळे मी काही नर्मदा मैया चा स्पर्श करून देणारा किनारा सोडला नाही . मला थोडा लांबचा वळसा पडायचा परंतु तो अधिक आनंददायी असायचा . मगरींचे अस्तित्व काही ठिकाणी जाणवायचे . एकदा तर एक मगर माझ्या डाव्या हाताला होती . आणि उजव्या हाताला नर्मदा माता ठेवून आपण चालत असतो . मला पाहताच ती अतिशय वेगाने सरपटत मैयामध्ये शिरली . हे सारे इतके अचानक घडले की जर मी तिला पाहिले नसते आणि जागेवर उभा राहिलो नसतो तर आमची दोघांची नक्की धडक झाली असती ! ती सरकत जाताना आणि पाण्यात शिरताना जो काही आवाज झाला तो अजूनही माझ्या कानात पक्का बसलेला आहे ! या एका प्रसंगावरून मला कळाले की मगरीला माझ्यामध्ये काहीही रस नाही . उलट ती शक्य तेवढे मनुष्य प्राण्यापासून लांबच पळायला पाहते . निसर्गाचे नियम ठरलेले असतात .प्रत्येक हिंस्र प्राणी आपली हद्द आखून बसलेला असतो . त्याच्यामध्ये आलेल्या कुठल्याही प्राण्याला तो सोडत नाही . परंतु तो जर त्या हद्दीच्या बाहेर गेला असेल तर तो आपण होऊन कोणावरही हल्ला करत नाही तर पळून जायला प्राधान्य देतो . परिक्रमावासी देखील नर्मदा मातेचा काठ ही त्याला नर्मदा मैयाने आखून दिलेली हद्द जोवर पार करत नाही तोवर त्याच्यावर फारशी संकटं येत नाहीत . आणि कसे काय कोणास ठाऊक परंतु मगरींना ज्ञात असते की परिक्रमावासी आला की तो त्याच्या हद्दीतूनच चाललेला आहे . त्यामुळे ती कधीच हल्ला करणार नाही . याउलट धुणे धुणाऱ्या बायका किंवा कोळी , केवट यांच्यावर मात्र हल्ले केल्याचे प्रसंग ऐकायला मिळतात . नर्मदा परिक्रमा तुम्हाला अशा रितीने तुमच्या मर्यादा शिकविते . एका मर्यादेमध्ये चालता चालता , मर्यादेमध्ये राहताना , एका मर्यादित भूगोलाची परिक्रमा करताना , अतिशय अमर्याद अशा आत्मस्वरूपाला गवसणी घालण्याची कला तुम्हाला रेवामाई अलगद देऊन जाते . तुम्हाला साधुत्वाच्या सज्जनत्वाच्या मर्यादेमध्ये राहून अमरत्वाचे अमर्यादत्व प्राप्त करून देते . 

काठ सोडताच तिचा । बाधतील आपदा ।
मार्गी चालता सवे । गवसताति संपदा ।
रम्य मार्ग चालता । तिच्या जळासवे सदा ।
बंधमुक्त मोक्षदायी । अमर्याद नर्मदा ॥





लेखांक शहाण्णव समाप्त ( क्रमशः )

टिप्पण्या

  1. Durdaivaane Kamnath mandir linga sakata gelya varshi chyaa puraat maiyya gheun geli. Gavaatil lokani khoop shodh ghetla, milale naahi. Nandi pan gela, tasa to narmada patraat bandhalaa hota.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. बापरे ! कळविल्याबद्दल धन्यवाद तसा बदल लेखामध्ये केलेला आहे .

      हटवा
  2. नर्मदे हर🙏🙏🙏🙏🙏

    उत्तर द्याहटवा
  3. नर्मदे हर🙏🙏🙏🙏🙏

    उत्तर द्याहटवा
  4. eak suchana, Magarichya half cut pransngat, ladkiya ase lihile gele aahe. Tethe lakdiya ase have aahe.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

जे आवडते सर्वांना ...

अनुक्रमणिका

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

लेखांक १ : नर्मदे हर !

लेखांक २ : भोपाळ जवळच्या जंगलातील अपघात

लेखांक ४ : झुठा कही का ! सबकुछ तो लाए हो !

लेखांक ३ : चोराची धन

लेखांक ५ : ग्वारीघाट जबलपुर मध्यप्रदेश

लेखांक ८३ : महाराष्ट्रात प्रवेश आणि भाबरीचे भेदक भिल्ल-महात्मा फोदला गारद्या पावरा

लेखांक ७४ : लेपा बांध , वेदा संगम , कठोरा अन् मांडव्य गुंफा

लेखांक ९० : गुजरात मधील कणजी चे सान्सुभाई तडवी आणि अरण्यव्याप्त माथासर