लेखांक ९५ : थोर दंडी संन्यासी स्वामी अद्वितीयानंद सरस्वती महाराजांची महासमाधी आणि नर्मदार्पणाच्या स्मृती

नर्मदा मातेच्या काठाने चालताना तिच्याकडे पाहत चालले की आजूबाजूला काय चालू आहे त्या सर्वाचा विसर पडतो . फक्त तिचे अस्तित्व उरते . आपल्या स्वतःच्या अस्तित्वाचा देखील त्यात विलय होतो . पाण्यामध्ये टाकलेली साखर जशी बघता बघता विरघळून जाते तसे बघता बघता परिक्रमावासी नर्मदामय होऊन जात असतो . आज ओळीने देवदर्शन करत आल्यामुळे काहीशी तशीच अवस्था झाली होती . एका वेगळ्याच भावावस्थे मध्ये पोहोचलो होतो . अचानक समोर एक मोठी नदी आडवी आली . ही नदी कधी कमरे एवढ्या तर कधी छाती एवढ्या पाण्यातून पार करावी लागणार होती . पार करताना मगरींचा धोका होता . त्यामुळे माझे सर्व लक्ष नदीपार करण्यावर केंद्रित झाले . अतिशय एकाग्रतेने आणि वेगाने मला ही नदी पार करावी लागणार होती . या नदीचे नाव अनदवाही किंवा किडीमकोडी असे होते . नावाप्रमाणेच नदीचे पाणी थोडेसे दूषित वाटत होते . परंतु तरी देखील नियमाप्रमाणे मी आचमन केले . आणि वेगाने नदीतून बाहेर पडलो . बाहेर पडल्या पडल्या समोर जे काही दृश्य दिसले त्यामुळे मी एकदम हतबुद्ध झालो . मी अगदी याच ठिकाणी पूर्वी आलो आहे असे मला जाणवू लागले . समोर दिसणारा वाळूचा किनारा आणि थोडे पुढे गेल्यावर समोरच दिसणारा दाट झाडीचा किनारा ओळखीचा वाटू लागला . घाट ओळखीचा वाटू लागला . नव्हे नव्हे अगदी घाटावर नांगरलेली भगवी नाव सुद्धा ओळखीची वाटू लागली ! धावतच मी त्या घाटावरून वर चढत गेलो आणि सराईतासारखा उजव्या हाताला असलेल्या आश्रमात शिरलो . हा आश्रम सुद्धा माझ्या माहितीचा होता ! तळघरामध्ये महादेवाचे मंदिर होते तिथे जाऊन दर्शन घेतले . मागच्या बाजूला संडास बाथरूम होते तिथे जाऊन चिखलाने भरलेले पाय धुतले . आणि माताजींच्या खोलीपाशी आलो . खोलीमध्ये माताजी विश्रांती घेत होत्या . त्यांनी खूप वाजवले तरी दार उघडले नाही . मी निराश झालो आणि शेजारीच टांगलेल्या झोपाळ्यावर बसलो . झोपाळा जसा झुलू लागला तसा माझ्या आठवणींचा हिंदोळा देखील हलू लागला . अगदी याच ठिकाणी याच आश्रमा मध्ये मी बरोबर चार वर्षांपूर्वी आलो होतो . हीच ती जागा होती जिथे मी आयुष्यात प्रथम नर्मदा मातेला स्पर्श केला ! तेव्हा मला स्वप्नातही असे वाटले नव्हते की मी पुन्हा इथे येईन आणि तो देखील परिक्रमावासी म्हणून येईन ! तो प्रसंग जसा आहे तसा माझ्या डोळ्यासमोरून तरळू लागला . . . (थोडेसे विषयांतर होणार आहे परंतु वाचकांनी कृपया सहकार्य करावे ही नम्र विनंती . या स्थानाचे महत्त्व माझ्यासाठी किती मोठे आहे हे कळण्यासाठी हा लेखन प्रपंच )
परमहंस परिव्राजकाचार्य श्री अद्वितीयानंद सरस्वती  स्वामी महाराज हे तसे पाहायला गेले तर माझ्या मित्राचे सद्गुरु . राहुल गायधनी नावाचा नाशिकचा मूळचा राहणारा माझा एक मित्र आहे . मी याला प्रेमाने आप्पा म्हणतो . याच्या घराण्यामध्ये नाना महाराज तराणेकर यांची उपासना आहे . परंतु स्वामी अद्वितीयानंद सरस्वती महाराज हे त्याचे दीक्षा गुरु .
परमहंस परिव्राजकाचार्य स्वामी अद्वितीयानंद सरस्वती
ब्रह्मलीन श्री प. प.  अद्वितीयानंद सरस्वती स्वामी महाराज यांचे विषयी थोडक्यात सांगायचे झाले तर त्यांचा जन्म  २४/०८/१९२४  श्रावण कृष्ण दशमी चा . तरुणपणी त्यांनी स्वतःला संघ कार्यात वाहून घेतले.
श्री विद्येची दीक्षा त्यांनी प. पू. आळवणी शास्त्री यांचे कडून घेतली.
शक्ती-पात दीक्षा पुण्यामध्ये प. पू. योगीराज वामनराव गुळवणी महाराज यांचे कडून घेतली.
रामदासी दीक्षा  प. पू. प्रल्हाद महाराज साखरखेर्डा यांचे कडून घेतली. श्रीक्षेत्र गोंदवले येथे अनेक वर्ष सेवा केली .
परमहंस परिव्राजकाचार्य स्वामी अद्वितीयानंद सरस्वती महाराज
अध्ययन : ऋग्वेद, अथर्ववेद राम लला ची अयोध्येला स्थापना करणारे गणेश्वर शास्त्री द्रविड यांचे पिताजी प. पू. राजेश्वर शास्त्री द्राविड यांच्या सांगवेद पाठशाळेत काशी, तथा यज्ञेश्वरशास्त्री कस्तुरे सावरगाव येथील वेद शाळेत झाले.
दंड दीक्षा : श्री प. प. माधवनंद सरस्वती दत्तात्रेयामठ नारदघाट काशी यांचे कडून घेतल्या नंतर स्वामीजींचे ३८ चातुर्मास झाले .
२०१५ च्या गुरुप्रतिपदेला निर्गुण पादुकांची प्राप्ती त्यांना गाणगापूर येथे झाली.
गाणगापूर येथील दत्तप्रभूंच्या निर्गुण पादुका
 माझे स्वामींचे दर्शन सर्वप्रथम आप्पाच्या घरीच झाले . स्वामींचे वय खूप होते . माझी भेट झाली तेव्हा ते ८० च्या पुढे गेले होते . परंतु तरीदेखील तब्येत अत्यंत खणखणीत होती . यांचा वेदांचा आणि उपनिषदांचा प्रचंड अभ्यास होता . परंतु त्यांनी कधीही त्याचा गर्व केला नाही . हसत खेळत रोजच्या जीवनातली उदाहरणे देत ते वेदांत समजून सांगायचे . मला साधुसंतांचे दर्शन घेण्याची आवड पहिल्यापासून आहे . किंवा फार तर असं म्हणा की परीक्षा घ्यायची आवड आहे . आणि त्या माझ्या मूर्खपणाने घेतलेल्या परीक्षेमध्ये पास झालेल्या साधुसंतांच्या दर्शनाला मात्र मी आवर्जून जायचो .
आप्पाच्या घरी स्वामी नेहमी येत . 
स्वामीजींच्या चरणाशी बसलेला सद्भक्त सन्मित्र राहुल गायधनी (आप्पा)
अद्वितीयानंद स्वामींचे वैशिष्ट्य असे होते की त्यांना कधी खोटे आवडत नसे . एखाद्या व्यक्तीला शिव्या घालाव्याशा वाटला तर तोंडावर शिव्या घालत . मनात एक बाहेर एक असा त्यांचा विवेक नव्हता . मी मात्र महाविद्यालयीन जीवनापासून अत्यंत द्वाड असलो तरी देखील त्यांच्या आवडीचा होतो . मुलांशी बोलताना ते मुलांच्या भाषेत बोलायचे .त्यामुळे मुलांना आवडायचे !  मला ते चौरंगी चिरा म्हणायचे . मी आलो की त्यांचे ठरलेले वाक्य . आप्पा तुझा चौरंगी चीरा आला बघ ! स्वामींचा अजून एक आवडता शिष्य होता . त्याचे नाव हेमंत राजोपाध्ये . हे अक्कलकोटच्या राजाचे उपाध्ये . म्हणून राजोपाध्ये . खोपोली मध्ये यांचा अक्कलकोट स्वामींचा मोठा मठ आहे . हेमंत संस्कृतचा पंडित असून जर्मनी मध्ये जाऊन  दत्त संप्रदाय या विषयावर पीएचडी करून आलेला आहे .अतिप्रचंड बुद्धिमान असल्यामुळे आणि अनेक वर्ष जर्मनीमधील कम्युनिस्ट वातावरणात राहिल्यामुळे त्याचा थोडासा वैचारिक हवापालट झालेला होता . परंतु स्वामीजींवरील निष्ठा मात्र अक्षुण्ण होती . त्याच्याच शब्दात सांगायचे तर त्याचे राजकीय-सामाजिक-सांस्कृतिक विषयांबाबतीतले विचार परखड व  काहीसे बंडखोर स्वरूपाचे आहेत. त्यामुळे त्याच्या मनात निर्माण होणारा संभ्रम  स्वामीजींसमोर तो नेहमी प्रतिपादित करत असे. 
स्वामीजींच्या चरणाशी बसलेले हेमंत शास्त्री राजोपाध्ये
 मी चित्रपट पाहत नाही .परंतु सिंघम नावाच्या चित्रपटातील संस्कृत गाणी यांनी लिहिलेली आहेत . किंवा विश्वविनायक या अल्बम मधील संस्कृत गाणी याचीच आहेत . अगदी पुण्यातल्या धायरी मधील मधुकोष या अपार्टमेंट समूहाचे नाव देखील यानेच बिल्डरला सुचवीलेले आहे ! अशा रीतीने आपल्या भाषा प्रभुत्वाचा वापर तो अनेक ठिकाणी करताना दिसत असतो . स्वामीजी बऱ्याच वेळेला मला त्यांच्यासोबत चालक व सेवादार म्हणून घेऊन जायचे . त्यांना अभक्ष्य भक्षण आणि अपेय पान करणारे ड्रायव्हर आवडत नसत .त्यामुळे साहजिकच माझा क्रमांक लगेच लागायचा . मला देखील त्यांच्यासोबत गप्पा मारत फिरायला आवडायचे . बरेचदा आप्पा आणि हेमंता स्वामींच्या सोबत असायचे .ते दोघे स्वामींशी गुरु असल्यामुळे अतिशय आदराने वागायचे . मी मात्र मुळातच उडाणटप्पू असल्यामुळे त्यांना काय वाटेल ते प्रश्न विचारायचो आणि वाटेल तसे बोलायचो . स्वामी इतर लोकांशी फार कठोर वागायचे . परंतु मला मात्र भरभरून प्रेम द्यायचे . ते का याचे उत्तर अजूनही मिळालेले नाही . 
एकदा पुण्यातील एका शिष्याने त्यांना राहण्यासाठी फ्लॅट दिला . परंतु या फ्लॅटच्या खिडकीला सेफ्टी ग्रील नव्हते . ते करण्यासाठी माणूस शोध असे मला आणि आप्पाला स्वामींनी सांगितले . परंतु माणूस काही मिळेना . अखेरीस मी एक वेल्डिंग मशीन विकत आणले आणि आप्पाला मदतीला घेऊन स्वतः जाळी करून रातोरात त्या फ्लॅटला ठोकून दिली . असले काहीतरी विचित्र कारभार करत असल्यामुळे स्वामींना मी आवडायचो !
त्यांना तंबाखू खाण्याची सवय होती . मी एकदा त्यांना विचारले की संन्यासी माणसाने सर्व गोष्टींचा त्याग केलेला असतो . मग तुम्हाला तंबाखू कशाला पाहिजे ? ते सांगायचे की लोक तंबाखू वर्तमान काळ विसरण्यासाठी खातात . आम्ही तंबाखू खाल्ल्यामुळे वर्तमान काळात राहतो . ती खाली नाही तर आमची समाधी लवकर लागेल . परंतु मला काही त्यावेळेस हे उत्तर फारसे पटले नाही .म्हणून मी म्हणालो ही पळवाट आहे . ज्याला सोडायची तो कुठल्याही क्षणी सोडू शकतो . ते म्हणाले त्यात काय अवघड आहे , तू म्हणालास आत्ता सोड तर आता सुद्धा सोडीन . मी म्हणालो आत्ताच्या आत्ता सोडा तंबाखू . असे म्हटल्याबरोबर त्यांनी तंबाखूची पुडी घेतली आणि गाडीच्या बाहेर फेकून दिली . आणि म्हणाले आज पासून तंबाखू बंद . आणि खरोखरीच पुढे त्यांनी कधीच तंबाखू खाल्ली नाही .इतके ते मुक्त अवस्थेमध्ये पोहोचलेले होते . एकदा नाही म्हणजे नाहीच ! बर त्यांना हे सांगणारा मी कोणी अधिकारी सत्पुरुष वगैरे नव्हतो .एक किरकोळ महाविद्यालयीन पोरगा सांगतो आहे म्हणून त्यांना माझे बोलणे फाट्यावर मारत आले असते . परंतु त्यांनी तसे केले नाही . बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले . 
मुळात त्यांना तंबाखूचे व्यसन नव्हते . व्यसन असते तर सुटलेच नसते . सतत भानावर राहण्यासाठी आणि देहाच्या व्यवहारांना न्याय देता यावा यासाठी देह बुद्धी जागृत करण्याकरता त्यांना हे करावे लागत होते . पुढे हे कळल्यावर मला फार वाईट वाटले . परंतु त्यांनी मात्र परत कधी तंबाखूला स्पर्श केला नाही . स्वामीं सोबत फिरताना मी अनेक अलौकिक अनुभव घेतले होते .
एकदा असेच झाले . मी आणि माझा मित्र चंद्रशेखर माळोदे गाणगापूरला जायला निघालो . शेखर नेहमी गाणगापूरला जायचा परंतु माझी पहिलीच वेळ होती . त्यामुळे मला खूप उत्कंठा होती ! गाणगापूर बद्दल खूप ऐकून होतो . शेखर सांगेल त्याप्रमाणे करायचे इतकेच माझ्या डोक्यात होते .तो भल्या पहाटे साडेतीन वाजता मला भीमा अमरजा संगमावर स्नानासाठी घेऊन गेला . प्रचंड थंडीमध्ये त्या थंडगार पाण्यामध्ये आम्ही स्नान केले आणि ओलेत्याने दर्शनासाठी कुडकुडत मंदिरामध्ये आलो . त्या दिवशी काहीतरी विशेष असल्यामुळे खूप गर्दी होती . मला वाटले होते की गाणगापूरचे दर्शन इतर मंदिरांसारखे मोठ्या दरवाजातून होते . परंतु इथे तर छोटासा झरोका होता . त्यातून देवाच्या पादुका पाहाव्या लागतात हे मला माहिती नव्हते . मला त्याच झरोक्यातून पाहायची संधीच मिळाली नाही तोपर्यंत पुजाऱ्याने पुढे ढकलले . तिथे चौघेजण ढकलाढकली करण्यासाठी उभे होते . दर्शन न होताच मला बाहेर काढण्यात आले . मला या घटनेचा अतिशय राग आला . बाहेर येऊन मी दत्तप्रभूंना सांगितले की इथून पुढे तुमच्या दर्शनाला कधीही येणार नाही . पहिल्यांदा तुमच्या दर्शनाला आलो आणि तुम्ही असे ढकलून बाहेर काढले . आता फक्त माझी वाटच बघा . आणि ताडताड निघून गेलो . शेखरची कुचंबणा झाली . माझ्यामुळे त्याचेही दर्शन व्यवस्थित झाले नाहीच परंतु भिक्षा मागून भोजन प्रसाद घेऊन परत जायचे असे त्याचे नियोजन माझ्या रागामुळे फिस्कटले . अखेरीस आम्ही दोघे तसेच गाणगापूरहून परत आलो . 
हा झाला एक प्रसंग . आता दुसरा प्रसंग अजूनच गंमतशीर आहे . एक दिवस अचानक मला अद्वितीयानंद स्वामींचा फोन आला . तुला माझ्यासोबत चालक म्हणून यायचे आहे . कुठे जाणार आहे विचारू नकोस . मी ठीक आहे म्हणालो आणि माझी पिशवी घेऊन त्यांच्या दारात हजर झालो . सोबत अप्पा आणि हेमंत सुद्धा होते .स्वामी सांगतील त्या दिशेला मी त्यांची गाडी हाणू लागलो . लवकरच माझ्या लक्षात आले की आम्ही गाणगापूरला चाललो आहोत . त्याचे असे झाले होते की गाणगापूरचे मुख्य पुजारी भीम भट म्हणून होते . त्यांच्या स्वप्नामध्ये येऊन दत्तगुरु प्रतिवर्षी एका यती अर्थात संन्यासी महाशयांचे नाव सुचवत आणि त्यांचा सत्कार किंवा यतीपूजन पादुकांसमोर करावे अशी प्रथा गाणगापूरला आहे . गेली २१ वर्षे असा दृष्टांत त्यांना झालाच नव्हता . परंतु यावर्षी अचानक तो दृष्टांत झाला आणि अद्वितीयानंद सरस्वती स्वामींचे नाव दत्तात्रेयांनी त्यांना सुचविले . त्यामुळे त्या यतिपूजना करता आम्ही निघालो होतो . आता माझा तर संकल्प असा होता की मी दत्ताचे तोंड सुद्धा पुन्हा पाहणार नाही . त्यामुळे मी असे ठरवले की आपण गाणगापुरात जाऊया परंतु मंदिरात काही जायचं नाही . त्याप्रमाणे स्वामींना सोडून मी गाडी घेऊन बाहेर थांबलो . त्यांनी मला आत मध्ये बोलावले आणि भीम भटांच्या समोर बसवले . गाणगापूर इथले सोवळे ओवळे अतिशय कडक आहे .यती पूजनापूर्वी स्वामीजींना गाभाऱ्यामध्ये जाऊन दत्तप्रभूंच्या पादुकांचे दर्शन घ्यायला मिळणार होते . स्वामींचे नुकतेच हृदयाचे ऑपरेशन झाले होते . ओपन हार्ट सर्जरी झाल्यामुळे त्यांना मदतनिसाची गरज लागणार होती .त्यामुळे त्यांनी भीमभटांना विनंती केली की मला एका मदतनिसाची योजना करावी . भीम भट म्हणाले गाणगापूरच्या नियमानुसार ज्या पुजाऱ्याची पूजेची पाळी आहे तोच फक्त गाभाऱ्यामध्ये जाऊ शकतो . अगदी त्याचा मुलगा किंवा भाऊ सुद्धा जाऊ शकत नाही . त्यामुळे आमच्यापैकी कोणी मदतीला येऊ शकत नाही . तुमच्या शिष्यांपैकी एखाद्या शिष्याला तुम्ही घेऊ शकता .
आप्पा आणि हेमंता खुश झाले ! परंतु अचानक स्वामींनी माझ्याकडे बोट केले आणि सांगितले याला माझ्यासोबत पाठवा . मला दत्तगुरूंचे दर्शन घ्यायचेच नव्हते त्यामुळे मी सांगितले की माझ्याकडे सोवळे नाही . भीम भट म्हणाले तसेही तुमचे सोवळे इथे चालणार नाही . माझेच सोवळे नेसून तुम्हाला जावे लागणार आहे . झाले . पटापट मला सोवळे नेसविण्यात आले . दोन पुजाऱ्यांनी माझ्या डोक्यावर चार बादल्या थंडगार पाणी ओतले .
स्वामीजींना देखील स्नान घालण्यात आले . आणि आम्ही दोघे गाभाऱ्याकडे निघालो . गाणगापूरचा गाभारा म्हणजे पाच फूट बायपास फूट ची छोटीशी खोली आहे आणि आत जायला दार नसून दीड फूट बाय दीड फूट आकाराचे छोटेसे भगदाड आहे त्यातून रांगत आत जावे लागते . स्वामीजींना त्या दारातून आज जाता येईना . तिथले पुजारी आत मध्ये होते त्यांना स्वामींना पकडता येईना . स्वामी त्या पुजाऱ्याला म्हणाले याला आत पाठवा . हा मला बरोबर आत घेईल . आता आली का पंचायत ! जिथून मला अपमानपूर्वक हाकलले होते त्याच गाभाऱ्या मध्ये जायची पाळी माझ्यावर आली ! अजूनही माझा पीळ जळाला नव्हता . मी असे ठरवले की आत गेले तरी पादुकांच्या दिशेला बघायचेच नाही .त्याप्रमाणे मी आत मध्ये गेलो आणि स्वामीजींना हळूहळू आत घेतले . त्यांच्या मागोमाग पुजारी पण आत आले . आता मी बाहेर पडू लागलो . एवढ्यात ते पुजारी माझ्याकडे पाहून मला म्हणाले तू कोण आहेस मला माहिती नाही . तुझी काय पुण्याई आहे ते पण मला माहिती नाही . परंतु या गाभाऱ्यामध्ये एक मी सोडले तर अन्य कोणालाही येता येत नाही . अगदी माझ्या घरातली माणसे सुद्धा येऊ शकत नाहीत . स्वामींची गोष्ट निराळी आहे कारण त्यांचे यतिपूजनच आहे . त्यांचा दर्शनाचा मान आहे . परंतु तू असा पहिला व्यक्ती आहेस ज्याचा काही संबंध नसताना या गाभाऱ्यामध्ये आलेला आहेस . याचा अर्थ दत्तप्रभूंची तुला दर्शन देण्याची इच्छा आहे . जा आणि पादुकांचे दर्शन घे ! आता मात्र माझ्या अश्रूंचा बांध फुटला . कारण मी दत्तप्रभूंना मनापासून शिव्या घातल्या होत्या ! ते माझे बोलणे इतके मनावर घेतील असे मला वाटले नव्हते ! मी चटकन जाऊन पादुकांचे स्पर्श दर्शन घेतले !साश्रु नयनांनी मी दत्तप्रभूंना म्हणालो तुम्ही इतके काय हो माझे बोलणे मनावर घेतलेत ! तुम्हाला पहिलेच दर्शन स्पर्श दर्शन द्यायचे होते तर तसे सांगायचे ना !  मी काही म्हणालो नसतो . माझे डोके साक्षात निर्गुण पादुकांवर टेकलेले होते . होय गाणगापूरच्या त्याच निर्गुण पादुका ! या निर्गुण पादुका म्हणजे प्रत्यक्षात काय आहे सांगतो . निर्गुण आहेत याचा अर्थ तेथे काहीच नाही . केवळ पादुकांच्या आकाराच्या दोन चांदीच्या डब्या आहेत . त्यावर पादुका आहेत अशी कल्पना करून कस्तुरी चंदनाचा लेप लावला जातो . आपल्याला जो गोलवा दिसतो तो लेप आहे . मी त्या लेपा वरती हात ठेवून नमस्कार केला . मला चक्क पायातील स्पंदने जाणवली . ती अनुभूती अलौकिक होती . मला क्षणभर सर्व जगाचा विसर पडला . त्या दर्शनामध्ये इतकी जबरदस्त ताकद होती की माझा आतला श्वास आत आणि बाहेरचा श्वास बाहेर झाला . मी कसाबसा बाहेर आलो आणि मुर्च्छित पडलो . आप्पा आणि हेमंत यांनी अक्षरशः मला उचलून तिथून बाहेर नेले . मी थोडासा शुद्धीवर येऊन त्यांना सांगत होतो मला इथेच मरू द्या . बाहेर नेऊ नका . माझा आवाज अतिशय क्षीण पडत होता .परंतु तिथे हजारोंचा जनसमुदाय जमलेला होता . मुळात प्राणवायू कमी झाला होता . त्यामुळे त्यांनी ताबडतोब एका टांग्यामध्ये भरून मला दवाखान्यात नेले आणि डॉक्टरांनी इंजेक्शन दिल्यावर थोड्यावेळाने मी बरा झालो ! अशा रीतीने स्वामीजींमुळे मला त्यादिवशी गाणगापूरच्या दत्तप्रभूंचे प्रत्यक्ष दर्शन मिळाले ! इतके प्रेम स्वामीजींनी मला दिले होते ! 
सोबतच माझ्या हेही लक्षात आणून दिले की प्रत्यक्ष दर्शन घेण्याची माझी योग्यता सुद्धा नाही ! अक्षरशः मृत्यूच्या दारातून त्या दिवशी मी परत आलो . डॉक्टरांनी सांगितले की तुझ्या श्वासनलिका पूर्णपणे बंद झाल्या होत्या . आकुंचन पावल्या होत्या . इंजेक्शन , नेब्युलायझर ,इन्हेलेशन वगैरे दिल्यावर मी बरा झालो होतो असे डॉक्टरांचे म्हणणे होते .प्रत्यक्षामध्ये अद्वितीयानंद स्वामीजींनी माझे प्राण वाचवले होते . देवाचे प्रत्यक्ष दर्शन सोपे नाही हेच खरे ...
गाणगापूर येथे स्वामीजींचे यतिपूजन चालू असताना मागे उभा असलेला डावीकडून पहिला हेमंत राजोपाध्ये व डावीकडून तिसरा राहुल गायधनी आप्पा . (प्रस्तुत लेखक या क्षणी दवाखान्यात होता !)
गाणगापूर येथील त्यावर्षीचे मुख्य पुजारी स्वामीं सोबत
स्वामीं सोबत अशा अनेक यात्रा केल्या . नरसोबाची वाडी , औदुंबर , अक्कलकोट तर कित्येक वेळा झाले . पंढरपूर देखील बरेच वेळा केले . स्वामीजींना सर्व संत महंत ओळखायचे . त्यांना प्रचंड मान मिळायचा . गाड्या बरोबर नळ्याची यात्रा या न्यायाने आमचे सुद्धा दर्शन होऊन जायचे . अतिशय योग्य वयात स्वामीजींसारखा मार्गदर्शक लाभला हे आमचे थोर भाग्यच !
 श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे स्वामीजींचे प्रस्तुत लेखकाने काढलेले छायाचित्र
एका प्रसन्न क्षणी उपजत स्वभावानुसार हास्यविनोदात रममाण झालेले स्वामीजी
स्वामीजी जरी संन्यासी असले तरी टेक्नॉलॉजी चे त्यांना वावडे नव्हते . एकदा असेच मदुराई मध्ये असताना अचानक त्यांचा व्हिडिओ कॉल मला आला . आज पर्यंत त्यांनी मला एकदाही व्हिडिओ कॉल केलेला नव्हता त्यामुळे मला आश्चर्य वाटले . मला म्हणाले तुमची सर्वांची तोंडे पाहायला फोन केला आहे . माझ्याशी पत्नीशी आणि मुलाशी फोनवर ते बराच वेळ बोलले . त्यानंतर ते मला म्हणाले की तू आता इकडे यायला निघ . मी फोन ठेवतो . मी लगेचच पुण्याला जायची तयारी केली . स्वामीजी तेंव्हा नगरला किंवा नाशिकला मुक्कामी असत . नगरकर म्हणून त्यांचे एक शिष्य होते ज्यांच्या बंगल्यामध्ये स्वामींची एक वेगळी कुटी त्यांनी बाहेरच्या बाजूला बांधली होती . मी पुण्यामध्ये आलो आणि स्वामींचा निरोप विसरून गेलो . परत तमिळनाडू ला जायचे म्हणून तिकीट काढायला मी प्रयत्न सुरू केले . काही केल्या फ्लाईट बुक होईना . मग मी रेल्वेचे तिकीट काढायचा प्रयत्न केला . तो ही फसू लागला . मग मी ठरवले की एजंट कडे जाऊन तिकीट काढावे . परंतु त्यातही अपयश येऊ लागले . म्हणून मी बँकेत जाऊन चौकशी केली . परंतु बँकेची व्यवस्था व्यवस्थित सुरू होती . तिकीट का निघत नाही याचे कोडे मला उलगडेना . इतक्यात आप्पाचा फोन आला की परमपूज्य स्वामी महाराजांनी देह ठेवला आहे . मग मात्र माझ्या पायाखालची जमीन सरकली ! आणि लक्षात आले की तिकीट का निघत नव्हते . मी नाशिकचे तिकीट काढल्याबरोबर लगेच निघाले . तिथून तसाच मी नाशिकला गेलो . स्वामीजींनी हेमंत च्या खांद्यावर मान ठेवून आपला देह ठेवला होता . नाशिकला स्वामीजी ज्या घरात राहत होते तिथे प्रचंड गर्दी जमली होती . स्वामीजींचा पद्मासनस्थ देह हॉलमध्ये ठेवला होता . बघून त्यांचे प्राणोत्क्रमण झाले आहे असे वाटत नव्हते इतके तेज चेहऱ्यावर विलसत होते . स्वामीजींच्या इच्छेप्रमाणे त्यांचा देह नर्मदे मध्ये अर्पण करायचा असे ठरले होते . मला यापूर्वी देखील काही संन्यासी लोकांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्याचे सद्भाग्य लाभले आहे . कांची कामकोटी पिठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती स्वामी महाराज यांनी देह ठेवला तेव्हा देखील मी त्या खोलीमध्ये उपस्थित होतो , जिथे त्यांचा देह भूमीला अर्पण करण्यात आला .तिथे रात्रभर जागून हातात माइक घेऊन मी " राम रामेति रामेति . . . " या मंत्राचा जप केला होता . त्यामुळे तसा अर्थाअर्थी काहीही संबंध नसताना अखेरच्या क्षणी मला खोलीमध्ये प्रवेश मिळाला होता .  संन्यासी लोकांचा देह त्यांच्या इच्छेनुसार भूमी , जल किंवा अग्नी तत्वाला अर्पण केला जातो . पूर्वाश्रमीचे डॉक्टर अनंतराव आठवले अर्थात स्वामी वरदानंद भारती यांनी उत्तरकाशी इथे देह ठेवला तेव्हा देखील तो जलार्पण करण्यात आला होता . त्याची संपूर्ण कहाणी तिथे उपस्थित असलेल्या डॉक्टर कल्याणी ताई नामजोशी यांच्या मुखातून मी ऐकलेली आहे . तसेच जलार्पण आता आम्हाला नर्मदा मातेमध्ये करायचे होते . स्वामींच्या पार्थिवा सोबत अनेक गाड्या निघाल्या . आणि आम्ही थेट रामपुरा गाव गाठले . त्या गावाचे नाव रामपुरा आहे हे मला माहिती नव्हते . इथे मी ज्या झोपाळ्यावर बसलो आहे त्याच्या समोरच स्वामीजींचा देह ठेवण्यात आला . एखादा संन्यासी जेव्हा देहत्याग करतो तेव्हा दुसरा एक संन्यासी तिथे आपोआप येतो आणि संपूर्ण अंत्यविधीचा सोपस्कार पार पाडतो . तसे एक महाराज तिथे उपस्थित झाले . सर्व पूजा विधी आटोपल्यावर स्वामींचे पार्थिव घेऊन आम्ही सर्वजण खाली गेलो . आम्ही दोघा तिघांनी आलेल्या संन्यासी महाराजांच्या आज्ञेनुसार स्वामींच्या पद्मासनस्थ पार्थिवाला दंड कमंडलू हार वस्त्रे इत्यादी गुंडाळून घट्ट बांधून त्याच्यावर मोठा दगड बांधला .आणि वाजत गाजत पार्थिव नावेमध्ये नेऊन ठेवले . हजारोंचा जनसमुदाय तिथे जमला होता . दोन नावांमध्ये शेकडो लोक उभे होते . आता त्या संन्यासी स्वामींनी सर्वांना खाली उतरण्याचा आदेश दिला . नावे मध्ये फक्त स्वामींचे पार्थिव , नावाडी आणि स्वामीजी असे तिघेच उरले . ते स्वामी कोणालाच ओळखत नव्हते . त्यांनी त्या संपूर्ण गर्दी मधून दोन लोकांना नावे मध्ये बोलावले . एक होता आप्पा आणि दुसरा होतो मी . बाकीच्या लोकांना दुसऱ्या नावांमध्ये चढायला सांगितले . केवटाने नाव डोहाच्या मधोमध नेली . संन्यासी लोकांचा देह कुठे नर्मदार्पण करतात ती जागा ठरलेली आहे . तिथे गेल्याबरोबर त्याने नाव थांबवली . शंखच्छेदन केले आणि आम्हाला सांगितले की स्वामीजींचे पार्थिव नर्मदार्पण करावे . आम्ही तसे केल्याबरोबर एका क्षणात ते पार्थिव पाण्यामध्ये अदृश्य झाले आणि एक सेकंद पूर्ण होण्याच्या आत त्यांचा दंड ,कमंडलू ,वस्त्र , हार सर्वकाही वरती येऊन तरंगू लागले ! जणू काही त्यांचा देह पाण्यात विलीनच झाला ! माझ्या हाताला कमंडलू लागला . आफ्रिकन फळापासून बनविलेला हा कमंडलू माझ्याकडूनच स्वामीजींनी रंगवून घेतला होता . त्यावर मी त्यांचे नाव टाकले होते . त्यामुळे तो प्रसाद म्हणून मी ठेवू लागलो परंतु संन्यासी महाराज चिडले आणि मला तो कमंडलू टाकून द्यायला सांगितला . त्याप्रमाणे नाईलाजाने मी तो नर्मदार्पण केला . त्याप्रसंगी नर्मदा मातेचा प्रथम स्पर्श माझ्या आयुष्याला झाला ! तो स्पर्श अद्वितीय होता ! मी एका वेगळ्या भावविश्वामध्ये होतो . अनिमीष नेत्रांनी नर्मदेचे रुपडे पाहत होतो . तो प्रसंग आणि ती जागा माझ्या डोक्यात पक्की घर करून राहिली .तो दिवस होता ३ एप्रिल २०१८. आणि आज २६ मार्च २०२२ रोजी मी पुन्हा तिथे आलो होतो . आज सकाळी किडी मकोडी नदी ओलांडताना देखील मला नेमकी तीच जागा सापडली जिथून मी नावेत चढलो ! आणि तो प्रसंग पुन्हा एकदा डोळ्यासमोर उभा राहिला !
नर्मदा माते ने त्यादिवशी मला जो स्पर्श केला होता तो दिव्य स्पर्श होता . त्या स्पर्शाने मला तिचे वेगळेपण लक्षात आले होते . तिच्या दिव्यत्वाची प्रचिती आली होती . ते गाव कुठले आहे तो आश्रम कुठला आहे मला काहीही माहिती नव्हते . परंतु नर्मदा मातेचे प्रथमच दर्शन असल्यामुळे माझ्या अंतरंगामध्ये ते चित्र पक्के कोरले गेलेले होते . त्यामुळे तिथे आल्याबरोबर मी ती जागा लगेच ओळखली ! पुन्हा एकदा मी माताजीना जागे करायचा प्रयत्न केला . त्या चिडून माझ्यावरती ओरडल्या , " मी दार उघडणार नाही ! संध्याकाळी भेटायला या . " स्वामी महाराज गेले त्या दिवशी या माताजींनी आम्हाला खूप मदत केली होती एवढे माझ्या लक्षात होते . परंतु आता मात्र मी एक परिक्रमावासी म्हणून दर वाजवत होतो . त्यामुळे मी त्याच दिवशी आम्ही ज्या आश्रमामध्ये भोजन केले त्या आश्रमामध्ये जाण्याचे ठरवले . मध्ये एक छोटेसे पुरातन राम मंदिर आहे . त्याची अवस्था खूप वाईट आहे . तिथे एक सिताराम बाबा सेवा देत होता . त्या रामाचे दर्शन घेतले . सिताराम बाबा जेवण्यासाठी थांबण्याचा आग्रह करू लागला . परंतु मी त्याला चार वर्षांपूर्वी मी भोजन प्रसाद घेतला होता त्या आश्रमाचे दर्शन घेण्याची आणि भोजन प्रसाद घेण्याची इच्छा असल्याचे सांगितल्यावर त्याने आनंदाने जायला सांगितले .
 पौराणिक रामजी मढी (मंदिर ) रामपुरा
येथील राममूर्ती देखील सुंदर आहेत .
हे पांडवकालीन राम मंदिर असून इथे अनुक्रमे धर्मराज आणि भीम स्थापित धर्मेश्वर आणि भीमेश्वर महादेवाची देखील शिवलिंगे आहेत .
या मंदिरामुळेच गावाला रामपुरा नाव पडले असावे . इथे नर्मदा मातेचा अतिशय खोड डोह आहे . व त्यात शब्दशः मगरींचा सुळसुळाट आहे . 
गरुडेश्वर कडे जाणारा पूल व लघु बंधारा मागे दिसतो आहे आणि पाण्यात दिसणारी काळी रेषा म्हणजे दुसरे तिसरे काही नसून साक्षात नर्मदा मातेचे वाहन असलेली मगर आहे !
याच कीडीमकोडी घाटावरून आम्ही नावे मध्ये चढलो होतो .उजव्या हाताला वरती माताजींचा आश्रम दिसतो आहे .
नर्मदा मातेचा इथला डोह भयंकर खोल आहे .
पाणी खोल आहे व किनाऱ्यावर खूप दगड कुठे आहेत . इथे अशा आकाराच्या भरपूर नावा आहेत .
अशाच किंवा याच भगव्या नावेतून स्वामीजींचे पार्थिव आम्ही मधोमध नेले होते . 
श्रीकृष्णाचे रणछोडराय रूपातील एक मंदिर येथे प्रसिद्ध आहे .
श्री दशावतार रणछोड राय मंदिर रामपुरा
काळ्या पाषाणातील भगवान श्रीकृष्णाची मूर्ती अतिशय सुंदर असून तिच्यावरील कोरीव काम पाहण्यासारखे आहे .
 कीडीमकोडी घाटावरील महादेवाचे त्रिनेत्र धारी शिवलिंग !
माताजींच्या आश्रमानंतर एक मोकळे मैदान होते . त्याच्या पुढे डाव्या हाताला दंडी स्वामी योगानंद आश्रम होता . स्वामीजींच्या समाधीप्रसंगी याच आश्रमामध्ये आम्ही सर्वांनी भोजन प्रसाद घेतला होता . त्यामुळे मी पुन्हा एकदा त्या आश्रमामध्ये गेलो . आत मध्ये स्वयंपाक घराची मोठीच लगबग चालू होती . आश्रमाचे सर्व व्यवस्थापक तिथे आलेले होते . एक उत्तर भारतीय साधू आधीपासून तिथे मुक्कामाला होते . यांनी दाढी व जटा ठेवल्या नव्हत्या परंतु साधूच होते . असेही साधू असतात हे मला कळाले . त्यांच्यासोबत खूप चांगला सत्संग झाला . उत्तर वाहिनी परिक्रमा इथूनच चालू होते असे मला सांगण्यात आले . मुळात उत्तर वाहिनी परिक्रमा काय असते हेच मला माहिती नव्हते . कारण नर्मदा परिक्रमेविषयी जरा देखील संशोधन न करता मी परिक्रमेला निघालो होतो . इथे आल्यावर मला कळाले की बहुतांश परिक्रमा वासी त्यांची उत्तर वाहिनी परिक्रमा याच गावातून चालू करतात . मुळात नर्मदा पुराणा मध्ये या परिक्रमेचा उल्लेख नाही आहे परंतु लोक मात्र अलीकडे उत्तर वाहिनी परिक्रमा मोठ्या प्रमाणावर करत आहेत असे मला त्या साधूने सांगितले . उत्तर वाहिनी परिक्रमा म्हणजे काय ते थोडक्यात सांगतो . नर्मदा नदी मध्य भारतातून उगम पावून पश्चिम दिशेला वाहते आहे . तिचा प्रवाह सरळ सरळ पूर्व पश्चिम आहे परंतु काही मोजक्या ठिकाणी उदाहरणार्थ मंडला जिल्ह्यात एके ठिकाणी आणि रामपुरा ते तिलकवाडा या गुजरात मधील भागामध्ये ती उत्तर दिशेला वाहते . त्या भागाची परिक्रमा करायची म्हणून त्याला उत्तर वाहिनी परिक्रमा असे म्हटले जाते . ही परिक्रमा २१ किलोमीटरची आहे . आणि एका दिवसात होते . त्यामुळे हिचे प्रस्थ वाढत चालले आहे . संपूर्ण परिक्रमा करण्यासाठी वेळ काढणे लोकांना शक्य होत नाही परंतु या परिक्रमेमुळे नर्मदा परिक्रमा केल्याचा छोटासा अनुभव मिळतो तो घेण्यासाठी लोक मोठ्या संख्येने चैत्र महिन्यामध्ये इथे येतात . यावर्षी तर दिवसाला लाख सव्वा लाख लोक परिक्रमा उचलीत होते असे ऐकण्यात आले . या सर्वाचा प्रचंड ताण वाटेतील मठ मंदिरे आश्रम यांच्या व्यवस्थेवर निश्चितपणे होतो . तसेच सर्वच परिक्रमावासी जबाबदार वृत्तीचे नसल्यामुळे त्यांनी फेकलेला कचरा प्लास्टिक पत्रावळ्या द्रोण इत्यादीचा प्रचंड कचरा नर्मदे काठी आपल्याला आढळतो . सुदैवाने अजून चैत्र महिना सुरू झालेला नसल्यामुळे मला ही गर्दी पहावी लागली नाही .परंतु या भागातील सर्वच मठ मंदिरे संचालक एकंदरीत या मोठ्या संख्येने येणाऱ्या टोळधाड सदृश्य परिक्रमेला कंटाळलेले आहेत असे मला जाणवले . याच्यामध्ये परिक्रमावासींना घेऊन येणाऱ्या "टूर ऑपरेटर्सचे " मार्केटिंग देखील तितकेच कारणीभूत आहे . केवळ उत्तर वाहिनी परिक्रमा म्हणून या परिक्रमेचे वर्णन केले तर ते योग्य आहे परंतु संपूर्ण नर्मदा परिक्रमेला पर्याय म्हणून ही परिक्रमा आहे अशा रीतीने तिचे जे मार्केटिंग सुरू आहे त्यामुळे लोक भुलत आहेत . चिमूटभर चटणी संपूर्ण पंचपक्वान्नांच्या भोजनाला पर्याय कशी काय बरे ठरू शकेल ! अर्थात याचा अर्थ प्रस्तुत लेखकाचे मत या उत्तरवाहिनी परिक्रमेच्या विरोधातील आहे असा गैरसमज कृपया कोणीही करून घेऊ नये . माझे म्हणणे फक्त इतकेच आहे की ही परिक्रमा केल्यावर तुम्हाला मोठी परिक्रमा करण्याचे वेध लागावेत . आता आम्हाला मोठ्या परिक्रमेचे देखील पुण्य मिळाले असा भाव बाळगू नये इतकेच ! असो . 
या दंडी स्वामी आश्रमामध्ये एक स्वयंपाकी होता . तसा वयाने तरुण होता आणि हुशार होता . परंतु याचे म्हणणे असे होते की परिक्रमा करण्याची गरज नाही . त्यामध्ये परिक्रमा करणारे स्वतः काही उत्पन्न मिळवत नाहीत आणि इतर लोक जे परिक्रमा वासींना दानधर्म करतात त्यांचे उत्पन्न देखील विनाकारण खर्च होते . मी त्याला विचारले की तो स्वतः काही दानधर्म करतो का ? तो म्हणाला ," शक्यच नाही ! कारण मला ही व्यवस्थाच पटलेली नाही ! " मी त्याला विचारले की तो आश्रमामध्ये सेवा करतो आहे की नोकरी ? तो पगारी नोकर आहे असे त्याने प्रामाणिकपणे सांगितले . मग जर परिक्रमा वासीच आले नसते तर त्याला ही नोकरी मिळाली असती काय ? या प्रश्नावर त्याच्याकडे उत्तर नव्हते . एक प्रकारे परिक्रमावासी आश्रमामध्ये येत होते त्यामुळे त्याला चार पैसे मिळत होते . मी त्याला योग्य वयात दानधर्म करण्याचे फायदे समजावून सांगितले . बराच काथ्याकूट केला . त्याला माझे म्हणणे पटणे खूप अवघड होते परंतु किमान नर्मदा परिक्रमा या गोष्टीबाबत तरी त्याचे असलेले भ्रम दूर करण्यात काही अंशी मला यश आले असे मला वाटले . अखेरीस कोणाला काही शिकवायला जाऊ नये ही एका साधूची शिकवण मला आठवली आणि मी शांत झालो . त्याने मला उत्तम पैकी भोजनप्रसाद वाढला . त्याच्या मदतीला एक तरुण माताराम होत्या . हा स्वतः असमाधानी आणि चिडचिडा असल्यामुळे सर्वच वातावरण बिघडवीत होता . ती माताराम वैतागून मला म्हणाली की जाता जाता याला काहीतरी शिकवा .मग न राहवून अखेरीस जेव्हा मी त्याला केलेले विविध व्यवसाय सांगितले आणि त्यात मिळवलेला नफा आणि त्याचे गणित सांगितले तेव्हा तो थोडासा शांत झाला .मी कोणी कफल्लक व्यक्ती नाही असे त्याला त्या नफ्या तोट्याच्या गोष्टी ऐकून वाटू लागले .त्याला नफा-तोट्याची भाषा चांगली कळत होती . मग त्याच भाषेत त्याला आयुष्याचा ताळेबंद मांडून दिला . आणि ऐन तारुण्यात त्याच्याकडे असलेल्या 'असेटस् ' ची जाणीव त्याला करून दिली . हे गणित त्याला लवकर समजले . आणि त्याने जाता जाता का होईना परंतु माझे आभार मानले . तो केवळ एक प्रतिनिधी होता . त्याच्या वयाच्या आजकालच्या बहुतांश तरुणांची अवस्था अशीच आहे . 'मिड लाईफ क्रायसिस ' मध्ये अडकलेले हे लोक थोड्याफार फरकाने त्याच्यासारखाच विचार करतात . अधिक काही बोलत नाही .फक्त इतकेच सांगतो की तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तुम्हाला नर्मदा खंडामध्ये मिळते . नव्हे नव्हे मिळतेच मिळते ! अगदी हटकून मिळते . एकदा येऊन तर पहा ! म्हणजे तुम्हाला कळेल की नर्मदा मैया काय चीज आहे ! 

साधती साधू समाधीस सत्वरी ।।
येती यतीवर योजूनी या तीरी ॥
देव दैत्य दमती दुरिते दुरी॥
मोक्षदायी माता रेवा खरी॥





लेखांक पंचाण्णव समाप्त ( क्रमशः )


टिप्पण्या

  1. नर्मदे हर🙏🙏🙏🙏🙏

    उत्तर द्याहटवा
  2. खूपच अद्भूत व अगम्य आहेत आपले अनुभव. "मना त्वाचि रे पुर्वसंचित केले। घडे भोगणे सर्वही प्राप्त झाले।..." भाग्यवान आहात. नमस्कारम्। जय जय रघुवीर समर्थ।।

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

जे आवडते सर्वांना ...

अनुक्रमणिका

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

लेखांक १ : नर्मदे हर !

लेखांक २ : भोपाळ जवळच्या जंगलातील अपघात

लेखांक ४ : झुठा कही का ! सबकुछ तो लाए हो !

लेखांक ३ : चोराची धन

लेखांक ५ : ग्वारीघाट जबलपुर मध्यप्रदेश

लेखांक ८३ : महाराष्ट्रात प्रवेश आणि भाबरीचे भेदक भिल्ल-महात्मा फोदला गारद्या पावरा

लेखांक ७४ : लेपा बांध , वेदा संगम , कठोरा अन् मांडव्य गुंफा

लेखांक ९० : गुजरात मधील कणजी चे सान्सुभाई तडवी आणि अरण्यव्याप्त माथासर