लेखांक ९४ : इंद्रेश्वर , वरुणेश्वर , विश्वेश्वर , व्यासेश्वर , वैद्यनाथेश्वर , आनंदेश्वर महादेवांची दर्शने

वाल्मिकी आश्रम सोडला आणि पुन्हा एकदा सरळ रेषेमध्ये नर्मदा मैयाच्या दिशेने निघालो . इंद्रवरणा गाव पार केले . या गावातून जाताना उगाचच मनामध्ये दक्षिण भारतातील स्मृती जागृत झाल्या. दक्षिणेकडील गावामध्ये प्रत्येक घराबाहेर रांगोळी काढलीच जाते . त्याला कोलम असे म्हणतात . रांगोळीची पूड असते तिला कोलापुडी म्हणतात . एखाद दिवशी घराबाहेर रांगोळी नाही काढली तर शेजारच्या पाजारच्या बायका घरी येऊन मंडळींकडे चौकशी करायच्या , की काय झाले ? कोणी गेले की काय ? त्यामुळे न चुकता रांगोळी काढावी लागायची ! इथे देखील सकाळ सकाळी तसेच वातावरण पाहिले आणि मन दक्षिणेत रममाण झाले .
 गावातील मंदिरांचे दर्शन घेत नर्मदा मातेच्या काठावरील इंद्रेश्वर आणि वरुणेश्वर महादेव तीर्थावर आलो . इथे नर्मदा मातेच्या काठावर एक मोठे धरण बांधलेले आहे . परंतु शेजारीच सरदार सरोवर धरणासारखे अति भव्य धरण असल्यामुळे हे धरण लघुबंधारा म्हणून ओळखले जाते . याला इंग्रजीमध्ये चेक डॅम असे म्हणतात .
 गरुडेश्वर लघुबंधारा

समोरच्या तटावर जिथे भिंत संपते तिथे वरूणेश्वर महादेवाचे मंदिर आहे . भिंतीच्या खाली दरवाजे आहेत तिथून पाणी सोडले जाते . पाणीपातळी वाढल्यावर सांडव्यावरून पाणी वाहते .

 या बंधार्‍यामुळे साठलेल्या पाण्यामध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी अर्थात ऐक्यमूर्तीपाशी येणाऱ्या पर्यटकांचे जल पर्यटन चालते . हा साधारण बारा किलोमीटरचा पट्टा आहे . इथे एकता क्रूज नावाने " क्रूज सर्विस " अर्थात नौकानयन सेवा चालवली जाते .पर्यटकांमध्ये ही नौसेवा चांगली प्रसिद्ध आहे .
 एकता क्रूज
विशेषतः रात्री ही क्रूज बाहेरून बघणाऱ्यांना खूप छान दिसते !
काल याच स्टॅच्यू ऑफ युनिटी अक्षरांच्या मागून मी चालत गेलो होतो . तिथून जाणारी एकता नौसेवा

बंधाऱ्याची एक भिंत वरूणेश्वराला स्पर्श करते तर दुसरी भिंत गरुडेश्वराला . वरुणेश्वर नर्मदा जिल्ह्यामध्ये आहे तर गरुडेश्वर बडोदा जिल्ह्यामध्ये आहे . नर्मदा हा भारतातील बहुदा एकमेव असा जिल्हा आहे जिथे नर्मदा नावाचे कुठले गावच नाही आहे तर केवळ नदी आहे .
आपण खालच्या तटावर आहोत .वरचा तट अर्थात गरुडेश्वर हे गाव बडोदा जिल्ह्यात आहे .इथून आपण आता डावीकडे किनारा पकडून चालणार आहोत .
इंद्रेश्वर आणि वरुणेश्वर महादेवाच्या मंदिरामध्ये पोहोचलो . 
इंद्र वरणा गावातील इंद्रेश्वर वरूणेश्वर महादेव मंदिर .
मंदिराच्या मागे दिसणारी धरणाची भिंत
श्री वरुणेश्वर महादेव
दक्षिणेकडील साधू असल्यामुळे अतिशय उत्तम पूजा केली जाते
 वरूणेश्वर महादेव आश्रमातील मैया ची मूर्ती
इथे रामकृष्णदास नावाचे एक साधू महाराज बसलेले होते . यांना परिक्रमावासींचे फारसे काही अगत्य आहे असे त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून वाटत नव्हते . त्यांनी मला त्रासिक चेहऱ्याने विचारले की चहा घेणार की कॉफी घेणार . परिक्रमेमध्ये प्रथमच हा प्रश्न कोणीतरी विचारला होता . रोज चहा चालूच होता त्यामुळे मी अर्थातच कॉफी असे उत्तर दिले . महाराजांनी आतून कॉफी बनवून आणली . मी ती कॉफी प्यायलो आणि एक क्षणात माझ्या मेंदूतील गतस्मृती जागृत झाल्या ! तीच चव ! तोच स्वाद !तोच अनुभव ! आणि मी क्षणात महाराजांना म्हणालो "ये नरसु की कॉफी है क्या ? " महाराज उडालेच ! ही नरसु कॉफी आहे हे या परिक्रमावशीला कसे काय कळाले ? महाराज म्हणाले , " आपको कैसे पता चला ? " मी महाराजांना सांगितले की ही तीच चव आहे . महाराज माझ्यावर भलतेच खुश झाले . ते म्हणाले , " तू असा पहिला माणूस भेटला आहेस ज्याने पहिला घोटात कुठली कॉफी आहे ते ओळखले .परंतु तुला नरसू कॉफी कशी काय माहिती ?" 
मदुरै गावातील नरसू कॉफीचा घाणा
मी महाराजांना सांगितले की काही काळ मी दक्षिण भारतात वास्तव्य केलेले आहे . आणि तिथल्या नरसूच्या दुकानात जाऊन बिया भाजून , भरडून , दळून ताजी ताजी कॉफी ग्राहकांच्या समोर तयार केली जाते ती बरेचदा विकत आणलेली आहे . महाराजांना मी उलटा प्रश्न विचारला मदुराई मध्ये मिळणारी कॉफी तुमच्याकडे कशी काय बरे आली ?  महाराज म्हणाले मी संन्यास घेतला आहे परंतु मूळचा मदुराईचा आहे ! झाले ! मी इथून पुढचा सर्व संवाद तमिळ भाषेतच साधला ! त्या साधू महाराजांना इतका आनंद झाला की मला कुठे ठेवू आणि कुठे नाही असे त्यांना झाले ! त्यांनी ताबडतोब मला झोळी खाली ठेवायला सांगितली आणि एका कट्ट्यावर बसवले . 
ह्याच कट्ट्यावर मला रामकृष्णदास साधूनी बसविले
महाराज त्यांच्या खोलीमध्ये गेले आणि एका मोठ्या ताटलीमध्ये भरपूर इडल्या आणि खोबऱ्याची चटणी तसेच टोमॅटोची चटणी व एका मोठ्या वाटीमध्ये सांबार घेऊन आले ! मला म्हणाले हे सर्व खाल्ल्याशिवाय तू जायचं नाहीस ! मी म्हणालो अहो महाराज परंतु हे जर तुमच्यासाठी तुम्ही बनवले आहे . मग मी कशाला खाऊ ! तुम्हाला कमी पडणार . महाराज म्हणाले नर्मदा मातेची कृपा आहे . त्यामुळे आज सकाळी इडल्या करताना मैयाने प्रेरणा दिली आणि मी दुप्पट इडल्या केलेल्या आहेत ! पोटभर खा ! मग काय विचारता ! मला तसेही दक्षिणात्य पदार्थ आवडतातच ! आणि त्यात हे रामकृष्णदास महाराज मूळचे मदुराईचे असल्यामुळे अतिशय अप्रतिम अशी मूळ दाक्षिणात्य चव मला चाखायला मिळाली ! मी खरोखरीच त्यादिवशी पोटाला तडस लागेपर्यंत इडली चटणी सांबार खाल्ला ! सकाळीच मला दक्षिण भारताची आठवण का येत होती त्याचे उत्तर मैयाने अशा रीतीने दिले ! 
आश्रमाचा निवांत परिसर . 
मी महाराजांना तमिळनाडूमध्ये लावलेली ताडाची झाडे आणि बीज गोळे प्रकल्प याची माहिती दिल्यावर त्यांना खूप आनंद वाटला . जालीकट्टूच्या बैलांना आंघोळ घालायला मी शिकलो आहे कळल्यावर त्यांनी मला मिठीच मारली ! काही वेळापूर्वी त्रासिक चेहरा केलेले ते महाराज आपल्या मूळ स्थानाला ओळखणारा मनुष्य आला आहे हे कळल्यावर इतके आनंदित झाले की विचारू नका !त्यात मी त्यांना तमिळमध्ये लिहून दाखवल्यावर मग तर त्यांचा आनंद गगनात मावेना !भाषा शिकण्याचे सामर्थ्य किती मोठे आहे हे अशा प्रसंगी लक्षात येते . त्यांनी मला मुक्काम कर म्हणून गळ घालायला सुरुवात केली . मला दाक्षिणात्य पदार्थांची लालूच ते दाखवू लागले ! ते म्हणाले तुला जे आवडते ते बनवून खायला घालतो ! डोसा बनवू , उत्तप्पा बनवू , पुट्टु बनवू , इडियाप्पम बनवू , पनियारम बनवु , तईर सादं बनवू , पोंगल बनवू , पुळीयोदरै बनवू , पण तू इथेच थांब . या मोहमायेमध्ये अडकणे म्हणजे कठीण कार्यक्रम होता . त्यामुळे मी महाराजांना नम्रपणे परंतु ठामपणे सांगितले की मला पुढे जाणे आवश्यक आहे नाहीतर नावा बंद होण्याच्या आत समुद्र तटावर मी पोहोचू शकणार नाही . महाराजांनी पुन्हा एकदा मला कॉफी पाजली आणि मोठ्या प्रेमाने निरोप दिला . 


श्री रामकृष्ण दास स्वामीजी

आश्रमातून बाहेर पडताच समोर पांढऱ्या रंगाचा दिसणारा गरुडेश्वर चा घाट दिसू लागला . इथे कच्च्या मातीच्या रस्त्याने खाली गेलो . आणि मार्गस्थ झालो .
इथे मी अगदी काठावर गेलो आणि नर्मदा मातेचे स्पर्श दर्शन घेतले . इतक्यात दोन नावाडी तिथे आले आणि त्यांनी मला सांगितले की इथून पुढे समुद्रापर्यंत नर्मदा मातेच्या उदरामध्ये असंख्य मगरी आहेत . तरी असे अचानक काठावर जाऊन पाण्याला स्पर्श करू नये ! आता मात्र पंचाईतच झाली ! मी त्या दोघांकडून मगरी बद्दलची सगळी माहिती काढून घेतली . कुठल्या टाकू मध्ये जास्त मगरी आहेत , त्या दिवसभर कुठे असतात , रात्री कुठे असतात , त्यांचा स्वभाव कसा असतो , त्या हल्ला कधी करतात , त्यांच्यापासून स्वतःचा बचाव कसा करायचा असे अनेक प्रश्न विचारून मी त्या दोघांना भंडावून सोडले आणि त्या दोन्ही केवट राजांनी कुठलीही भीडभाड न बाळगता माझ्या सगळ्या प्रश्नांची व्यवस्थित व सविस्तर उत्तरे मला दिली . सरदार सरोवर धरणामध्ये सर्वात जास्त मगरींचा वावर आहे कारण तिथं मानवी वावर शून्य आहे . त्या धरण परिसरामध्ये मासेमारी करायला देखील बंदी असल्यामुळे पाण्यामध्ये भरपूर मासे आहेत . मुख्यत्वे करून हे मासे खाऊन मगरी जगतात . पावसाच्या पुरामध्ये धरणाच्या सांडव्यावरून काही मगरी खाली वाहत येतात . अशा मगरी पुन्हा मागे जाऊ शकत नाहीत त्यामुळे त्या इथेच राहतात . त्यामुळे दरवर्षी मगरींची संख्या वाढत चालली आहे . मगर हे नर्मदा मातेचे वाहन आहे . त्यामुळे मगरीचे दर्शन परिक्रमेदरम्यान होणे म्हणजे साक्षात नर्मदा मैया ची कृपा समजली जाते . त्यामुळे मला आता मगरींच्या दर्शनाचे वेध लागले . इथून पुढे पुन्हा गरुडेश्वर ला येईपर्यंत अखंड माझे लक्ष नर्मदा मातेच्या पात्रामध्ये कुठे मगरी दिसतात का याकडे लागलेले असायचे . आणि त्याचा पुरेपूर फायदा देखील मला झाला . 
इथे चालताना एक जोड पूल लागला . तो पार केल्यावर फुलवाडी नावाचे गाव आहे . इथे मिरजेजवळ समाधी असलेल्या ओम मालती आई नामक ध्यानसाधनेची दीक्षा देणाऱ्या थोर विभूतींच्या नावे त्यांच्या कोणी शिष्याने आश्रम काढलेला आहे . मिरजेच्या तपोवनामध्ये मी संपर्क केल्यावर हा तपोवनांतर्गत आश्रम नाही असे मला सांगण्यात आले . सुदैवाने माझ्या महाविद्यालयीन जीवनामध्ये मला या थोर विभूतीचे दर्शन झाले होते . आमच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील एक प्राध्यापक दांपत्य या माताजींचे शिष्य होते . त्यांच्यासोबत मी दोन-तीन वेळा या मालती आईंचे दर्शन घेतले होते . विशेषतः त्यांना सर्वजण दुरून नमस्कार करायचे . परंतु त्यांनी आपण होऊन मला पायावर डोकं ठेवून नमस्कार करायला परवानगी दिली होती . आणि माझ्याकडून चरण सेवा देखील करून घेतली होती . त्याचे त्यावेळी तपोवनातील सर्व सेवकांना अप्रूप वाटले होते ,इतके मला स्मरते . मालती आईंनी मला त्यांच्या आश्रमातील एक कोपरा दाखवून इथे मी समाधी घेणार आहे असे देखील सांगितले होते . 
परमपूज्य ओम मालती आई मिरज
तरुण वयापासून त्या ध्यानाची दीक्षा देत असत
हाच तो मध्ये लागलेला जोड पूल
फुलवाडी गावातील मालती आई आश्रमातील पूजा . मालती आई रामदास स्वामींना खूप मानायच्या .
लघु बंधाऱ्यापासून मी ज्या मार्गाने चालत आलो होतो तो मार्ग समोर दिसतो आहे . हे चित्र पुलावरून काढलेले संग्रहित चित्र आहे .
इथे विश्वेश्वर महादेव तीर्थ आहे त्याचे दर्शन घेतले .
याच गावामध्ये रामकिशनदास नावाच्या अजून एका त्यागी साधूंचा आश्रम आहे . मगाशी आपण पहिले ते रामकृष्णदास वेगळे . 
इथे गावामध्ये अश्विनी कुमाराची तपस्थळी आहे . ते मंदिर देखील पाहण्यासारखे आहे . गोलाकार घुमट मजेशीर दिसतात . 
आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्याप्रमाणे गावांची नावे बुद्रुक आणि खुर्द अशी असतात तशी गुजरात मध्ये मोटी आणि नानी अशा नावाची गावे असतात . बुद्रुक हा बुजुर्ग शब्दाचा अपभ्रंश आहे याचा अर्थ मोठी वस्ती . त्या आर्थिक गुजरातमध्ये मोटी हा शब्द वापरतात . 
खुर्द हा खुर्दा या फारसी शब्दाचा अपभ्रंश आहे , ज्याचा अर्थ आहे किरकोळ अथवा छोटी वस्ती . याला गुजराती मध्ये नानी असे म्हणतात . इथे देखील मोटी रावल आणि नानी रावल नावाची गावी होती . पैकी नानी रावल या गावांमध्ये व्यासेश्वर आणि वैद्यनाथेश्वर महादेवाची प्राचीन तीर्थक्षेत्र आहेत . त्याचे दर्शन घेऊन त्या परिसरामध्ये काही काळ थांबलो आणि शांतता अनुभवली . वैद्यनाथ अष्टक थोडेफार पाठ होते ते म्हणून घेतले . 
श्री व्यासेश्वर महादेव मंदिर
श्री व्यासेश्वर महादेव दर्शन
श्री वैद्यनाथ महादेव मंदिर
श्री वैद्यनाथ महादेव दर्शन . 
श्री वैद्यनाथाय नमः शिवाय ।
या भागात अनेक शिवलिंगे आहेत . प्रत्येकाचे दर्शन घ्यावे आणि त्यातील ऊर्जा अनुभवावी असे करीत करीत पुढे जायचो . 
इथे पूर्वी खूप भव्य दिव्य मंदिरे असणार असे तिथे आजूबाजूला इत:स्ततः विसरून पडलेल्या अवशेषांवरून लगेच लक्षात येत होते .
मूर्ती भंजकांनी येथील एकही मूर्ती शिल्लक ठेवलेली नव्हती . त्यांच्या भीतीमुळे मंदिराचे कळस देखील घुमटकार होते . 
स्थानिक लोकांनी खांबावरील तुटक्या फुटक्या मूर्ती घेऊन त्याची मंदिरे उभी केली होती .
इथे पूर्वी अजूनही अनेक मंदिरे असणार आहेत याचे पुरावे सर्वत्र विखुरले होते . या भागातील मंदिरांची दाटी बघता सरदार सरोवरामध्ये किती मंदिरे जलमग्न झाली असेल याची केवळ कल्पना आपण करू शकतो . एकाच ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साठवण्यापेक्षा विविध जलस्रोतांमध्ये ते सतत फिरते ठेवले तरी देखील सिंचनाचे मोठे काम होऊ शकते . परंतु यावर भारतीय जलतज्ञांनी फारसे संशोधन केलेले दिसत नाही . दक्षिण भारतामध्ये चोल व चालुक्य राजांनी नद्यांना पूर आल्यावर त्यातील वाहून समुद्राकडे जाणारे जास्तीचे पाणी मानवनिर्मित तलावांमध्ये साठवून ठेवण्याचे तंत्र विकसित केले होते . तसे काहीही न करता आपल्या देशामध्ये भूजल उपसा करून तेच वापरणे अधिक सोयीचे मानले गेले आहे . भूजलाचा साठा संपृक्त होण्यासाठी अक्षरशः हजारो वर्षे गेलेली असतात . बोरवेल मधून मिळणाऱ्या पाण्याचा जो थेंब तुम्ही वापरता तो शेकडो हजारो वर्षांपूर्वी जमिनीखाली गेलेला असतो . त्या प्रमाणामध्ये जल पुनर्भरण आपल्याकडे जवळपास होतच नाही . नद्यांचे पाणी जितक्या अधिक प्रमाणात रिकाम्या पडलेल्या ओढ्यांमध्ये नाल्यांमध्ये उपसा पद्धतीने नेले जाईल तितके धरणांचे महत्त्व आणि गरज कमी होत जाईल . यासाठी विजेची गरज नसून उताराचा वापर करून ही योजना आखता येऊ शकते . कारण सर्व नद्या उतारा कडेच वाहत असतात . याबाबतीत जलतज्ञांनी अधिक विचार करावा अशी विनंती आहे . इथे देखील गरुडेश्वर बांधाने पाणी अडवल्यामुळे पाणी पातळी अतिशय कमी असून नर्मदा मैया चे पात्र पूर्णपणे खडकांनी भरलेले दिसते . 
मध्ये असंख्य ओढे नाले नर्मदा मातेला येऊन मिळतात ते कधी उडी मारून पार केले तर कधी पाण्यात उतरून पार केले आणि चालत राहिलो . एक नजर सतत कोठे मगर तर दिसत नाही ना याकडे होती . पुढे आनंदेश्वर महादेवाचे मंदिर आहे तिथे एका त्यागी बाबांचा आश्रम लागला .
श्री आनंदेश्वर महादेव मंदिर
मंदिराच्या मागे नर्मदा माता दिसते आहे . समोर थोडेसे मोकळे पटांगण आणि यज्ञशाळा केलेली आहे . 
 महादेवाचे दर्शन घेतले आणि पुढे निघालो . वाचकांना असा प्रश्न पडू शकतो की इतकी सारी मंदिरे एका मागोमाग एक आल्यावर दर्शन घेऊन कंटाळा येत नाही का ?  वास्तविक पाहता रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये अशा पद्धतीची ओळीने मंदिरे आली तर कंटाळा येऊ शकतो . परंतु इथे नर्मदा खंडामध्ये आपण परिक्रमेसाठी जेव्हा येतो तेव्हा मुख्य हेतू हाच आहे की वाटेमध्ये ज्या ज्या लोकांनी ज्या ज्या ठिकाणी तपश्चर्या केलेली आहे त्या त्या ठिकाणाचे दर्शन घेणे आणि तिथल्या स्पंदनांची अनुभूती घेणे . अशी ठिकाणे कधी किती किलोमीटर दिसतच नाहीत तर कधी फुटा फुटावर दिसतात . नर्मदा खंडामध्ये तप करणाऱ्या लोकांचे कमंडलू एकमेकांना टेकून लागलेले आहेत असे जे नर्मदा खंडामध्ये म्हटले जाते ते काही खोटे नाही . केवळ अशा एकमेकांना खेटलेल्या कमंडलूंनी नर्मदा मातेची परिक्रमा पूर्ण होऊ शकते इतक्या लोकांनी इथे आजवर तपाचरण केलेले आहे .  अशा ठिकाणी साधकाने निर्विचार मनाने जाऊन जर तिथली स्पंदने अनुभवली तर निश्चितपणे एक वेगळी अनुभूती आल्याशिवाय राहत नाही . या मंदिरांकडे केवळ एक मंदिर म्हणून न पाहता कुठल्यातरी थोर विभूतीमत्त्वाची तपस्थळी म्हणून पहावे लागेल तेव्हा त्याचे महात्म्य अधिक चांगले लक्षात येते . बहुतांश वेळा अशा तपोमुर्तीचे नाव आपल्याला ठाऊक नसणार असते परंतु त्यांच्या तपाचरणामुळे तिथे निर्माण झालेले वलय तुम्हाला जाणवू शकते . विशेषतः भारत वर्षामध्ये करोडो तीर्थक्षेत्रे असली तरी देखील तपस्थळी म्हणून केवळ नर्मदा मातेचाच गौरव सर्व साधुसंतांनी आणि देवादिकांनी एकमुखाने केलेला आहे . असा एकही साधू संत किंवा संन्यासी नसेल ज्याने कधी नर्मदा खंडावर भ्रमण केलेले नसेल . कुठल्या ना कुठल्या निमित्ताने प्रत्येक सदपुरुषाला नर्मदे काठी यावेसे च वाटते . आपणही आयुष्यात कधी नर्मदा खंड अनुभवला नसेल तर तुम्हाला जवळ पडणाऱ्या कुठल्याही नर्मदा किनाऱ्यावर जावे आणि तिच्या दर्शनाचा आणि त्या दर्शनामुळे होणाऱ्या आनंदाचा अनुभव घ्यावा ! इथे निश्चितपणे काहीतरी वेगळे आहे हे तुम्हाला जाणवते . आपण आयुष्यामध्ये हजारो नद्या पाहिलेल्या असतात परंतु नर्मदा मातेची गोष्टच न्यारी आहे हे तुम्हाला पाहता क्षणी लक्षात येते . तिचे वाहणे , तिचे दिसणे ,तिचा आवाज , तिची वळणे , तिचे थांबणे सर्वच इतरांपेक्षा निराळे आहे . म्हणूनच आज पर्यंत तिने प्रत्येक सात्विक जीवाला साद घातलेली आहे . राजसिक लोकांसाठी तर नर्मदाखंड हा नंदनवनच आहे . परंतु अगदी रावण मेघनाथासारख्या तामसी लोकांना देखील नर्मदा खंडाने आकर्षित केलेले आहे . इथे कितीही मंदिरे ओळीने लागली तरी दर्शन घेताना आपल्याला कंटाळा येत नाही . मुळात देवाचे दर्शन घेऊन त्याला काहीतरी मागायला गेले की आपली ऊर्जा खर्च होते आणि त्यामुळे थकल्यासारखे वाटते . परंतु केवळ दोन हस्तक तिसरे मस्तक जोडून देवाकडे पाहत राहिले की त्याला आपल्याला जे काही द्यायचे आहे ते आपल्याला मिळून जाते . रामदास स्वामी दासबोधा मध्ये जागोजागी सांगतात की खरा देव कोण आहे ते ओळखायला शिका . अशा असंख्य देव देवतांच्या मंदिरातून फिरताना तुम्हाला तो खरा देव त्याच्या अस्तित्वाची जाणीव वेळोवेळी करून देतो . आणि एकदा त्या खऱ्या देवाचा पत्ता सापडला की माणसाला पुन्हा आयुष्यभर वणवण भटकायची गरज राहत नाही . नर्मदा माता सतत तुमच्याशी संवाद साधू इच्छित असते . आपण आपले मन शांत ठेवून ती काय बोलते आहे ते ऐकायचा प्रयत्न केला तर तुम्हाला तिचे मनोगत ऐकू येऊ शकते . जन्माला आलेले तहाने बाळ जसे कुठलीही भाषा येत नसताना त्याला काय हवे नको ते सर्व आपल्या आईला सांगू शकते व आपल्या आईला काय म्हणायचे आहे ते सर्व त्याला लगेच कळते तसाच हा संवाद असतो . गर्भाचे आवडी मातेचा डोहळा असे तुकाराम महाराज म्हणतात . अगदी तीच अनुभूती नर्मदा माई आपल्याला देते . तुम्ही जे काही चिंतन कराल ते तुमच्या समोर ती उभी करते . कारण अनेक दिवस तिच्या काठावर अनन्यपणे चालल्यामुळे तुम्हाला लक्षात आलेले असते की आता आपल्याला नर्मदा माते शिवाय दुसरा कोणीही आधार नाही . १९६० साली हृदयनाथ मंगेशकर यांनी अंतरीचा दिवा या चित्रपटासाठी  "कोण दुजा आधार तुजविण कोण दुजा आधार "  नावाचे एक अतिशय कठीण गाणे संगीतबद्ध केलेले होते . लता मंगेशकर यांनी ते गाणे तेवढ्याच ताकतीने गायलेले आहे . या गाण्याची प्रत्येक ओळ सार्थ ठरवणारी नर्मदा परिक्रमा आहे . प्रत्येक पावलाला आपल्याला लक्षात येते की आपल्याला नर्मदा माते शिवाय दुसरा कोणीही आधार नाही . दुसरा कोणी आधार देणारा भेटला तरी तो सांगत असतो की त्याला नर्मदा माते शिवाय त्यास अन्य कोणाचा आधार नाही . आणि हे केवळ तोंडाने बोलले जात नाही तर मनापासून सर्वांचा हा भाव असतो हे तुम्हाला लगेच जाणवते . या मताशी सहमत नसलेले लोक परिक्रमेतून आपोआप बाहेर फेकले जातात . काही ना काही कारणाने त्यांना नर्मदाखंड सोडून जावे लागते असा अनुभव सर्वांनाच येतो . नर्मदा माता अतिशय जागृत आहे . विशेषतः ज्या भागामध्ये खडकाळ प्रदेश आहे तिथून ती वेगाने पुढे वाहून जाते , आणि महापुरामध्ये देखील फार काळ पाणी साठवून राहत नाही त्यामुळे अशा ठिकाणी मंदिरांची संख्या अधिक दिसते . तपोभूमी अधिक दिसतात . तिथे तिचे अस्तित्व देखील प्रकर्षाने जाणवते . आज सकाळपासून मी अशाच परिसरातून मार्गक्रमण करत होतो . केवळ नर्मदा खंडातीलच नव्हे तर अखंड भारत वर्षातील एक अतिशय प्रसिद्ध व तपस्वी संन्यासी श्री वासुदेवानंद सरस्वती उपाख्य श्री टेंब्ये स्वामी महाराज यांची समाधी देखील समोरच होती . संन्यासी लोकांना नर्मदा मातेचे प्रचंड आकर्षण आहे . देहामध्ये प्राण असताना ते नर्मदा खंडामध्ये चातुर्मास तर आवर्जून करतातच . परंतु आपला नश्वर देह विसर्जित करण्यासाठी देखील नर्मदा मातेचीच निवड ते करतात . नर्मदा मातेमध्ये असा कुठेही संन्यासी महाराजांचा देह विसर्जित केला जात नाही तर त्यासाठी ठराविक ठिकाणे ठरलेली आहेत . ठराविक डोह आरक्षित आहेत . मला माहिती नव्हते परंतु अजाणतेपणे मी अशाच एका ठिकाणाच्या जवळ निघालो होतो . लवकरच मला पुन्हा एकदा ती जागा दिसणार होती ! ती घटना डोळ्यासमोर येणार होती , जिने माझ्या आयुष्याला कायमची कलाटणी दिलेली आहे . मी प्रत्येक पावलाला नर्मदा मातेचे स्मरण करत चाललो होतो आणि नर्मदा मैया मात्र गालातल्या गालात हसत होती . 





 लेखांक चौऱ्याण्णव समाप्त (क्रमशः )

टिप्पण्या

  1. नर्मदे हर🙏🙏🙏🙏🙏

    उत्तर द्याहटवा
  2. श्री वासुदेवानंद सरस्वती [ टेंभे स्वामी ]महाराजांच्या समाधीच वर्णन वाचायला आवडेल. तिथला परिसर कसा आहे ह्याची उत्सुकता आहे. तुमच्या लेखा सोबत वाचकाची पण मानस परिक्रमा सुरू आहे म्हणून. शक्य असल्यास विवेचन करा.
    नर्मदे हर
    डॉ वीणा देव

    उत्तर द्याहटवा
  3. समोरच्या तटावर पोहोचले की आपण या स्थानाचे महात्म्य पाहणार आहोत .

    उत्तर द्याहटवा
  4. परमपूज्य ओम मालती आईंचा उल्लेख आणी फोटो बघून आश्चर्याचा सुखद धक्का बसला. हरी ओम.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. मालती आई या खूप उच्च कोटीच्या संत आपल्या महाराष्ट्रात होऊन गेल्या ! त्यांच्या चेहऱ्यावरील हास्यच त्यांची अवस्था सांगायचे ! मला त्यांचा कृपा स्पर्श लाभला हे माझे भाग्य आहे .

      हटवा

टिप्पणी पोस्ट करा

जे आवडते सर्वांना ...

अनुक्रमणिका

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

लेखांक १ : नर्मदे हर !

लेखांक २ : भोपाळ जवळच्या जंगलातील अपघात

लेखांक ४ : झुठा कही का ! सबकुछ तो लाए हो !

लेखांक ३ : चोराची धन

लेखांक ५ : ग्वारीघाट जबलपुर मध्यप्रदेश

लेखांक ८३ : महाराष्ट्रात प्रवेश आणि भाबरीचे भेदक भिल्ल-महात्मा फोदला गारद्या पावरा

लेखांक ७४ : लेपा बांध , वेदा संगम , कठोरा अन् मांडव्य गुंफा

लेखांक ९० : गुजरात मधील कणजी चे सान्सुभाई तडवी आणि अरण्यव्याप्त माथासर