लेखांक ९७ : सेहराव मधील शंखचूडेश्वर , शूलपाणी गुंफा व हरी गिरी साधू

 पुढे निघाल्यावर लक्षात येऊ लागले की आता झाडी सुरू झाली आहे . अंधार ही हळूहळू वाढू लागला . पुढे कुठलेच गाव किंवा घाट असल्याचे चिन्ह दिसेना . आता मात्र संकटात सापडतो की काय असे वाटू लागले . एकतर पुन्हा खोल पाणी सुरू झाल्यामुळे मगरींचा वावर वाढला होता . त्यात अंधार पडायला सुरुवात झाली होती . त्यात दोन-तीन भयंकर ओढे नाले आडवे आले .
एक तर फार खोल होता . तो पार करून पुढे जाण्याशिवाय गत्यंतर नव्हते . मी एका झाडाच्या मुळाला लटकून कसाबसा खाली उतरलो . परंतु माझ्यासोबत विठ्ठल महाराज पठाडे होते . त्यांना थोडे कठीण जाऊ लागले . मी झोळी खाली ठेवून पुन्हा वर गेलो . त्यांचे सामान घेऊन खाली आलो . मग पुन्हा वर गेलो आणि त्यांना घेऊन खाली आलो ! हे करताना माझ्या लक्षात आले की तो ओढा सुरुवातीला जितका कठीण वाटत होता तितका पुढच्या वेळी वाटला नाही ! आयुष्याचे असेच आहे ! एखादी गोष्ट नवी-नवी करताना कठीण वाटू शकते . एकदा सरावाची झाली की सोपी वाटू लागते . नर्मदा परिक्रमेतील कठीण मार्गांचे गणित असेच आहे . प्रथमच सर करताना तुम्हाला कदाचित ते कठीण वाटतील . परंतु सरावाने तुम्हाला माहिती होते की हे वाटते तेवढे कठीण नाही . सहज साध्य आहे . 
हा ओढा पार केल्यावर मात्र अंधार चांगलाच दाटू लागला . आता आपले काही खरे नाही असे वाटून पठाडे बुवा मला म्हणाले की आपण मगाशी मागे सोडली ती धर्मशाळा चांगली होती . मी विठ्ठल महाराजांना म्हणालो , " महाराज काळजी कशाला करायची ! मैया बरोबर सोय करते " " अहो पण आता अंधार पडला ना ! आता मैय्या कुठून सोय करणार ?" त्यांचा हा प्रश्न स्वाभाविक होता कारण त्यांना काठाने चालण्याची तितकीशी सवय नव्हती . आणि माझ्या आग्रहाखातर ते काठावरून आले होते . तसे मी त्यांना सोबत घेतले नसते परंतु हा मनुष्य अत्यंत धार्मिक ,सात्विक आणि खरा वारकरी होता . पावला पावलाला माऊलींचे , तुकोबारायांचे अभंग त्यांना आठवायचे . आम्ही मध्ये मस्त भजने गात आलो होतो . मी त्यांना आठवण करून दिली , " महाराज , जैशी स्थिती आहे तैशा परी राहे । कौतुक ते पाहे संचिताचे ॥ "
" रामकृष्ण हरी ! " विठ्ठल महाराज आनंदाने गरजले ! राम कृष्ण हरी चा गजर करत , दोघे पुन्हा नव्या उमेदीने झपाझप पावले टाकू लागलो ! काठावरती दोन मगरी दिसल्या . मी महाराजांना सावध केले . आम्ही हळूहळू पुढे निघून गेलो . तिथे काही नावा नांगरल्या होत्या . नांगरलेल्या नौका दिसल्या की शेजारी गाव असते . मी विठ्ठल महाराजांना सांगितले की बघा कुठलेतरी गाव आले आहे . महाराज म्हणाले चला आपण आता गावात घुसूया . मी त्यांना सांगितले की काठाने चालताना शक्यतो गावामध्ये शिरूच नये . संध्याकाळची वेळ असते . प्रत्येक जण आपापल्या कुटुंबासोबत ,गुराढोरांसोबत , नित्यनैमित्तिक कर्म करण्यात व्यग्र असतो . अशावेळी अचानक कोणी अतिथी आला तर त्याला विन्मुख पाठवणे त्यांच्या जीवावर येते . आणि मग पर्याय नसल्यामुळे दयाभावातून सेवा दिली जाते . अशी सेवा शक्यतो घेऊ नये . स्वयंपूर्ण होऊन कोणी आग्रहपूर्वक भक्ती भावे सेवा देत असेल तरच तिचा स्वीकार करावा . तुकोबारायांचा या विषयावर एक खूप सुंदर अभंग आहे . 

भिक्षा पात्र अवलंबणें । जळो जिणें लाजिरवाणें । ऐसियासी नारायणें । उपेक्षीजे सर्वथा ॥१॥
देवा पायीं नाहीं भाव । भक्ती वरी वरी वाव । समर्पीला जीव । नाहीं तो हा व्यभिचार ॥ध्रु.॥
जगा घालावें सांकडें । दीन होऊनि बापुडें । हेचि अभाग्य रोकडें । मूळ आणि अविश्वास ॥२॥
काय न करी विश्वंभर । सत्य करितां निर्धार । तुका म्हणे सार । दृढ पाय धरावे ॥३॥

तुकाराम महाराज म्हणतात की देवाच्या भक्तीचे अवडंबर माजवून दीनवाणे होऊन जगाला तुमचे कोड पुरविण्याचे साकडे घालणे यासारखे अभाग्याचे लक्षण नाही . ज्याचा परमेश्वरावर पक्का विश्वास आहे त्याने नेहमी विश्वास ठेवावा की देव सहाय्य करतो . फक्त त्याचे पाय घट्ट धरावेत . सोडू नयेत .
विठ्ठल महाराजांना माझे म्हणणे पटले . परंतु पुढे काय हे अनुत्तरीतच होते . इतक्यात डावीकडून एक साधू पळत आला . तरुण होता . चांगला उंचापुरा होता . काळा सावळा वर्ण , सहा फूट उंची , कमरेला पंचा गुंडाळलेला . त्याने दोघांना साष्टांग नमस्कार घातला . आणि दोघांचे पाय घट्ट धरून बसला . त्याच्या डोळ्यातून अश्रू धारा वहात होत्या . म्हणाला , " तुझी सेवा स्वीकार करतो म्हणा . आज गरिबाच्या झोपडी मध्ये राहा . कृपा करून पुढे जाऊ नका ! " आम्ही याच तर क्षणाची वाट पाहत होतो !
परंतु झोपडी तर कुठे दिसत नव्हती ! आम्ही देखील त्याच्या पाया पडलो . एकमेका लागतील पायी रे ! साधू झपाझपा पुढे चालू लागला . आम्ही त्याच्या मागे पळू लागलो . १०० मीटर अंतरावर एका दहा फूट बाय दहा फूट मापाच्या सपाट जागेवर तो आम्हाला घेऊन आला . "आली आपली झोपडी ! " साधू म्हणाला .  मी आजूबाजूला पाहू लागलो . इथे ज्याला झोपडी म्हणता येईल असे काहीच नव्हते ! चार खांब रोवलेले होते . तेही खांब म्हणण्याच्या योग्यतेचे नव्हते . तर चार जंगली झाडे किंवा त्यांचे वेडे वाकडे बुंधे जमिनीत खोचलेले होते . वरती दोन आडवे बांबू टाकले होते . बास ! खाली जमीन वर आकाश , चार दिशांच्या भिंती !  "हा माझा परिक्रमावासी आश्रम आहे ! " साधू अतिशय उत्साहाने सांगू लागला ! "म्हणजे अजून तसा पूर्ण झालेला नाही . परंतु आज नाहीतर उद्या नक्की होईल ! मैय्याची इच्छा असेल तर पूर्ण नक्की होईल !" आम्हाला देखील आनंद झाला ! त्या साधूने आश्रम असे म्हटल्याबरोबर ती जागा खरोखरच सुरक्षित अशा आश्रमासारखी भासू लागली ! मी कल्पनेनेच तिथे एक आश्रम बांधून पाहिला ! आणि लक्षात आले की ती जागा किती सुंदर आहे ! कारण मुख्य म्हणजे समोरच नर्मदा मैया वाहत होती ! आम्ही नर्मदा माते पासून फक्त दहा फूट उंचावर होतो . आम्ही दोघांनी आसन लावले . साधूला आमच्यासाठी काय करू आणि काय नाही असे झाले होते ! या तरुण साधूचे नाव होते हरी गिरी . हा मूळचा हरदा जिल्हया चा होता .याचे गुरु सोमगिरी महाराज हे धडगाव तालुक्यातील होते . आदिवासी असल्यामुळे याला मराठी भाषा तेवढी येत नव्हती . परंतु हिंदी चांगले बोलायचा . याने २०१६ ते २०२१ दरम्यान सलग सहा नर्मदा परिक्रमा पूर्ण केल्या होत्या . त्याच वेळी त्याला ही जागा आवडली होती . त्यामुळे परिक्रमा झाल्यावर सर्वसंगपरित्याग करून तो इथे आला होता . ही जागा गावच्या मालकीची होती . मागे सेहराव नावाचे गाव होते . या गावात बहुतांश केवट लोक आहेत . त्यांच्या नावा येथे लावलेल्या असतात . नावांना चांगला राखणदार होईल म्हणून त्यांनी साधूला ही जागा दिली . आजच त्याने खांब रोवले होते .अजून छपरासाठी लागणारी लाकडे तोडून आणायची होती . त्याने मैय्याला विचारले होते , की माझा परिक्रमावासी सेवा आश्रम बांधण्याचा हा निर्णय योग्य आहे का ? कारण मोठ्या प्रमाणात परिक्रमावासी आले तर त्यांना मी काय खायला देऊ ? माझा निर्णय योग्य आहे का नाही हे तूच मला सांग . माझा निर्णय योग्य असेल तर आजच परिक्रमावासी इथे राहायला येतील ! असे साकडे त्याने नर्मदा मातेला घातले आणि थोड्याच वेळात आम्ही तिथे आलो . आम्ही आलो असे तरी कसे म्हणायचे ? मागच्या आश्रमामध्ये राहावे अशी इच्छा दोघांनाही झाली होती . परंतु माझा आतला आवाज नाही म्हणाल्यामुळे मी पुढे निघालो होतो . तो आतला आवाज म्हणजेच या साधूचाही आतला आवाज आणि तोच नर्मदा मातेचा आवाज ! आपल्या सर्वांचे आतले आवाज एकमेकांशी जुळलेले असतात ! कारण या आतल्या आवाजांचे एक 'ग्लोबल नेटवर्क ' आहे ! 'युनिव्हर्सल नेटवर्क' म्हणा फार तर ! त्याच्याशी एकदा जुळले गेले की मग आपल्याला कॉलिंग व्हाट्सअप फेसबुक इंस्टाग्राम ची गरज लागत नाही . हा आतला आवाजच आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करतो . योग्य तो मार्ग दाखवतो . बरोबर काय चूक काय याचा निवाडा करतो . एखादी गोष्ट करावी की न करावी हे देखील सांगतो . समोरची व्यक्ती कशी आहे हे देखील सांगतो . माझा आतला आवाज सांगत होता की हरी गिरी अत्यंत पुण्यात्मा आहे ! तो इतका सत्वशील होता की काय सांगू ! त्याला काडीचेही व्यसन नव्हते . सतत मैया मैया करायचा . आम्ही मुक्काम केला खरा परंतु या आश्रमात चूलच नव्हती ! मग आम्हीच चार दगड आणून चूल तयार केली ! ती लिंपली . साधू म्हणाला तुम्ही स्नान संध्या आटोपून घ्या .तोपर्यंत मी गावातून भिक्षा मागून आणतो .  आम्हीच स्नानाला निघणार तेवढ्यात तो पुन्हा माघारी आला . त्याने समोर पोहणारी एक अजस्र मगर दाखवली . आणि सांगितले की मगरींपासून सावध राहून काठावर बसून स्नान करा . जास्ती आत जाऊ नका . आम्ही स्नानासाठी गेलो . पाठाडे बुवा काठावर बसले . परंतु मला असे वाटले की केवळ मगर आपल्याला खाईल या क्षूद्र भीतीने आपण नर्मदा मातेच्या स्नानाला आणि स्पर्शाला मुकले नाही पाहिजे . खाल्ले तर खाल्ले ! नर्मदा मातेच्या उदरामध्ये मरण येण्यासारखे भाग्य ते काय ! आणि मी रीतसर आत मध्ये जाऊन डुबक्या मारून स्नान केले . अर्घ्य प्रदान केले . आणि शांतपणे बाहेर आलो . हरी गिरीने दाखवलेली मगर अजूनही त्याच भागात दिसत होती . या मगरी रात्री शिकार करतात . रात्री माशांच्या हालचाली संथ झालेल्या असतात . एखाद्या दगडाच्या कपारीमध्ये किंवा कोपऱ्यामध्ये सर्व मासे एकत्र शांतपणे उभे असतात . अशा ठिकाणी अचानक हल्ला करून मगर जबड्यात मावतील तेवढे मासे खाते . यावेळी मोठी खळबळ माजते . त्याचा आवाज आपल्याला ऐकू येतो . मगरीचा ओरडण्याचा आवाज देखील मी पहिल्यांदाच ऐकला ! म्हशी किंवा रेडे जसे रेकतात अगदी तसाच आवाज मगर काढते . फक्त तिचा जबडा मोठा असल्यामुळे तो आवाज थोडा अधिक मोठा आणि घुमणारा असतो . मगरींचे आपापसामध्ये मेटिंग कॉल सुरू असतात . ते देखील आम्ही ऐकले . या भागात मगरींचा अक्षरशः सुळसुळाट होता . रात्री आश्रमापाशी मगर तर येणार नाही ना असे मी भीक्षा घेऊन आलेल्या हरीगिरीला विचारले . त्याने सांगितले की रात्री त्या समोरच्या तटावर जातात . सकाळी लवकर उठल्यावर तुम्हाला समोरच्या ताटावर आडव्या-तिडव्या पडलेल्या मगरी सापडतील . इकडे गाव असल्यामुळे त्या इकडे येत नाहीत . हरी गिरीने पीठ आणले होते . आणि कुठलीतरी पाने घेऊन आला होता . एका पुडीत तिखट मीठ घेऊन आला होता . एक चांगला दगड पाहून त्याने स्वच्छ केला . त्यावर कणिक मळली . त्याच्याकडे एकच तवा होता . त्यावर आधी परतून भाजी केली . मग टिक्कड बडवले . इकडे आम्ही संध्याकाळची पूजा वगैरे तोपर्यंत आटोपून घेतले . खरोखरच असे वाटत होते की आम्ही एका आश्रमामध्ये बसलेलो आहोत ! आजूबाजूला काहीच नव्हते तरीदेखील चहूबाजूने भिंत आहे असे वाटत होते ! गावाच्या बाजूला मातीचा उतार होताच . तीच काय ती एक सीमा होती . परंतु बाकी तीनही बाजू मोकळ्या होत्या . गंमत म्हणजे आम्ही तिघेही आत येण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी एकाच जागेचा वापर करत होतो .तेच दार आहे अशी कल्पना आम्ही करून घेतली होती .बाकीच्या ठिकाणी आमच्या कल्पनेतल्या भिंती असल्यामुळे आम्ही जात नव्हतो ! मला या आश्रमाची खूप मजा वाटली ! जगण्यासाठी खरंच काही लागत नाही ! आपल्या कल्पनेतून आपण स्वर्ग उभा करू शकतो ! ते सामर्थ्य , ती शक्ती देवाने फक्त मनुष्य प्राण्याला दिलेली आहे !
मनी चिंतीले ते होते । विघ्न अवघेची नासते ।
कृपा केलीया रघुनाथे ।प्रचित येते ॥
एखाद्या पंचतारांकित आश्रमापेक्षाही अधिक सुख या मुक्कामामध्ये लाभले ! कारण इथे कुठलाच बडे जाव किंवा अवडंबर नव्हते ! हा एक महत्त्वाची गोष्ट मात्र इथे होती . एका कोपऱ्यामध्ये दगडाचा पाट आणि कोनाडा करून त्यावर हरीगिरीने त्याला नर्मदा मातेमध्ये सापडलेले अतिशय सुंदर असे शिवलिंग स्थापन केले होते . स्थापन केले होते म्हणजे नुसता बाण ठेवला होता . आणि रानातली फुले वाहून पूजा केली होती . शेजारी एक त्रिशूल आणि चिमटा मात्र ठेवला होता . त्या एका अधिष्ठानामुळे त्या संपूर्ण जागेला एका आश्रमाची अवस्था प्राप्त झाली होती . हरी गिरी ने भोजन बनवून ठेवून दिले . वरती काही पुरातन मंदिर होती . त्यांचे दर्शन घेऊन यावे असा माझा मानस होता . हरी गिरीने सगळ्या मंदिरांची माहिती दिली आणि मी दर्शनासाठी वर गेलो . विठ्ठल बुवा हरिपाठ करत बसले . शंकरचूडेश्वर महादेवाचे मंदिर वरती होते . सिद्धेश्वराचे मंदिर होते . आणि शूल पाणी ची गुफा म्हणून एक गुहांवरती देखील वरती होती . या गुहेमध्ये बसून बऱ्याच साधुसंतांनी तपश्चर्या केलेली आहे असे तिथे राहणाऱ्या साधूने मला सांगितले . तिथे देखील एक साधू राहत होता परंतु परिक्रमावासी येथे उतरत नसत . किंबहुना या किनाऱ्याने फारसे कोणी परिक्रमा वासी जातच नाहीत असे देखील मला या साधूने सांगितले . संपूर्ण परिसर अतिशय ऊर्जेने भारलेला होता . गावामध्ये खेरामाई मातेचे मंदिर होते .या भागात तिला खोडीयाल माता किंवा खोडियार माता म्हटले जाई . तिचे देखील दर्शन घेतले . घराबाहेर गप्पा मारत बसलेल्या काही ग्रामस्थांनी माझी चौकशी केली . मी खाली हरीगिरीच्या कुटीमध्ये उतरल्याचे सांगितले . गावकऱ्यांना प्रश्न पडला की कुठली कुटी ! मग माझे मलाच हसू आले ! कारण आम्हाला जी कुटी किंवा जो आश्रम स्पष्टपणे जाणवत होता तो इतरांसाठी तिथे नव्हताच ना ! सर्व दर्शने आटोपून आश्रमामध्ये गेलो . 
 हीच ती साधू कुटी जिची पायाभरणी आम्ही राहायला गेलो त्याच दिवशी झाली होती ! 
समोर नांगरलेल्या नावा दिसत आहेत . उत्तर तटावरील वाळूमध्ये सकाळी मगरी ऊन खात पडलेल्या दिसतात .
वरील मंदिरातून समोरचा किनारा असा दिसतो !
 श्री शूलपाणेश्वर महादेव . हे मंदिर अतिशय सुंदर आणि प्राचीन होते . दगडी खांब आणि दगडी बांधकाम होते . पांढऱ्या रंगाच्या चुन्याचा रंग सगळीकडे मारला होता .
श्री सिद्धेश्वर महादेव
श्री सिद्धेश्वर महादेव
तुटलेल्या मंदिराचे भग्नावशेष
सिद्धेश्वर मारुती मंदिर
श्री शंखचूडेश्वर महादेव
 श्री शंखचूडेश्वराय नमः
आम्हाला मैया अशी दिसत होती . हा त्याच घाटावरचा फोटो आहे . 
वरती गावात लावलेली पाटी
खोडियार मातेचे मंदिर .
ग्रामीण भागात स्थान देवतांना किंवा ग्रामदेवतांना खूप मानतात
खोडियार मातेचे दर्शन घ्या .
हे मंदिर सुंदर होते आणि गावाच्या ऐन चौकात होते . सहराव गाव छोटे आहे .मंदिर परिसरामध्ये जुन्या देवदेवतांच्या मूर्ती आढळतात . 
आम्ही तिघांनी एकत्र बसून भोजन घेतले . पहिलेच परिक्रमावासी मुक्कामी राहिले आहेत त्यांना गोड काहीतरी खाऊ घालावे म्हणून हरीगिरी साधने कुठून तरी लोटा भर दूध आणले आणि त्यात खडीसाखर कालवून आम्हाला बासुंदी किंवा खीर म्हणून दिले ! त्या दिवशीच्या भोजनाची लज्जतच काही न्यारी होती ! नर्मदा मैया चा जयजयकार करत आम्ही तिघांनी भोजन प्रसाद घेतला . हरीगिरीचे परिक्रमेतील अनुभव ऐकत त्या चंद्रमौळी झोपडी मध्ये पडून राहिलो ! आकाशातील प्रत्येक चांदणी स्पष्ट दिसत होती ! जमिनीवर पडून आकाशाकडे पाहायला मला फार आवडते ! तुम्हाला तुम्ही किती शुल्लक आहात याची जाणीव करून देणारे हे दृश्य असते ! हजारो लाखो तारे तारका आकाशगंगा पाहिल्यावर लक्षात येते की आपण या विश्वाच्या पसाऱ्यामध्ये अतिशय कफल्लक आहोत . क:पदार्थ आहोत . मी हरीगिरीला आकाशातून धावणारे उपग्रह दाखवले . त्याला हा "धावणारा तारा" म्हणजे अपशकुन वाटायचा . परंतु जेव्हा मी त्याला त्या मागचे शास्त्र समजावून सांगितले तेव्हा त्या दोघांनाही आश्चर्य वाटू लागले . मानवनिर्मित उपग्रह अवकाशामध्ये सोडलेले असतात . त्याचे सोलर पॅनल सूर्याचा प्रकाश जेव्हा परावर्तित करतात तेव्हा आपल्याला ते एखाद्या ताऱ्याप्रमाणे चमकताना दिसतात . त्यामुळे असे उपग्रह केवळ सूर्योदय आणि सूर्यास्त यांच्या आसपासच दिसतात . कारण एरव्ही सूर्याचा उजेड त्यांच्यावर पडत नाही . त्यांच्या दिशा वेगवेगळ्या असतात .गती वेगवेगळ्या असतात . मी कुठल्याही संध्याकाळी आकाशाकडे पाहत बसलो की असे किमान २५ ते ३० उपग्रह नक्की पाहतो ! त्यासाठी एक वेगळी नजर लागते , मला ती सवयीने प्राप्त झालेली आहे . कोणालाही होऊ शकते . सगळा सरावाचा खेळ आहे . असो . 
मला असे वाटले की रात्र झाल्यावर हा किनारा शांत होईल . परंतु झाले उलटेच ! गावातून एक एक दांपत्य येऊ लागले आणि आपापल्या नावा काढू लागले . जाताना सर्वजण आमच्या इथे थांबून हरी गिरी शी चार शब्द बोलून मग पुढे जायचे . गावातील बहुतेक लोकांनी त्याला इथे आश्रम बांधणे वेडेपणाचे आहे असे सांगितले होते . त्यामुळे " हे पहा ! माझ्या इथे आज दोन परिक्रमावासी मुक्कामासाठी थांबलेले आहेत ! "  असे दाखवताना त्याला अतिशय अभिमान वाटत होता ! लोकांनाही आश्चर्य वाटत होते की आम्ही असे कसे काय थांबलो आहोत . त्या लोकांशी गप्पा मारून मी रात्री ते काय काय करतात ते समजून घेतले . रात्री पाण्यामध्ये नावा घालून हे लोक जाळी पसरवून ठेवतात . दिवसा ऊन खूप असते आणि मगरींचा त्रासही असतो . रात्री मगर शक्यतो हल्ला करत नाही असे त्यांनी सांगितले . रात्रभर जाळी पसरण्याचे काम चालते . त्यासाठी नाव पाच सात किलोमीटर बाजूला न्यावी लागते . प्रत्येकाचे परिसर ठरलेले आहेत . तिथेच ते जाळी लावतात . सोबत भोजन घेतलेले असते . जोडीने जाण्याचे अनेक फायदे असतात . एक म्हणजे नाव वल्हवायला मदत होते . कारण जाळे सोडत असताना प्रवाहाबरोबर नाव वाहत राहते . तिला थांबवावी लागते . तसेच सोबत गप्पांना कोणी असले म्हणजे कंटाळा येत नाही . झोप येत नाही . भीती देखील वाटत नाही .  रात्रभर काम करून अडीच तीनच्या सुमाराला एक एक नावाडी जोडपे परत आले . यांच्याकडे अतिशय प्रखर असे कृषक टॉर्च होते . मला रात्री मगरी बघायच्या होत्या . हरी गिरीने सांगितले की नावेतून टॉर्चचा प्रकाश झोत कुठे किनाऱ्यावर पडला की तिथे बघायचे .मगर दिसेल . आणि तसेच झाले !मगर दिसल्याबरोबर एका नवाड्याने बाकीच्या नावाड्यांना इशाऱ्याने मगर कुठे आहे ते दाखवून दिले . हे एकमेकांच्या नावेवर मात्र कधीच टॉर्च मारत नाहीत . सर्वच जण एकमेकांची " प्रायव्हसी" जपतात ! सारे आपल्या तर्काच्या पलीकडचे विश्व आहे !
पहाटे एक एक करत सर्व जोडपी परत आली . सर्वजण जाताना आणि येताना हरीगिरीला सांगून जात होते . ही खेड्यातली पद्धत आहे . इथे प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट माहिती असली पाहिजे याची काळजी समाज घेत असतो . उद्या काही दुर्घटना घडलीच तर हरीगिरीला नक्की माहिती असते की रात्री कोण कोण परत आले होते आणि कोण आलेच नव्हते . हे करताना समोरच्याला आपण त्रास देतो आहे असा भाव कोणाच्याही मनात नसतो . उलट हे एकमेकांना सर्व माहिती सांगणे अपेक्षित असते आणि गृहीत धरलेले असते . शहरामध्ये अशा पद्धतीच्या संपर्क यंत्रणेचा अभाव आढळतो . किंबहुना मुळात अशा प्रकारची संपर्क यंत्रणा नको असलेले लोकच शहरांमध्ये येऊन स्थिरावतात ! ज्यांना फारशी बंधने नको असतात ते लोक पूर्वी खेड्यातून शहराकडे यायचे . आता शहरात देखील खेड्यासारखे वातावरण निर्माण होऊ लागले आहे . त्यामुळे ज्यांना समाजाची बंधने नको असतात आणि यादृच्छिक पद्धतीने आयुष्य जगायचे असते ते लोक आजकाल अमेरिकेला किंवा अन्य कुठल्यातरी परक्या देशात स्थिरस्थावर होतात !  इथे समाजामध्ये हे नवीन असल्यामुळे समाजाची फारशी बंधने त्यांच्यावर बंधनकारकरित्या लादलेली नसतात ! हे वेगळ्या संस्कृतीतून आलेले आहेत असे डोक्यात ठेवून स्थानिक समाज त्यांना जसे आहे तसे स्वीकारतो . अर्थात हे सरसकट सर्वांनाच लागू होणारे विधान नाही . परंतु हे माझे अनुमान नाही तर अनुभूती आहे हे देखील सांगतो ! असे स्वतंत्र जगणे आवडणारी मुले वाटेल तेवढे कष्ट विद्यार्थी दशेतच घेऊन अमेरिकेत शिकण्यासाठी जातात . कारण अशा अनेक मुलांचा मी भाऊ , मित्र वगैरे आहे !  त्यामुळे माहिती पक्की आहे ! परंतु असे करून तुमची सांस्कृतिक सुटका होत नसते ! आणि याबाबतीतही माझे लोकांपेक्षा उलटे मत आहे ! अमेरिकेत जाऊन तुम्ही भारतात अमेरिका आणत नाही तर अमेरिकेत भारत नेता ! जे अतिशय स्वागतार्हच आहे ! जिकडे तिकडे स्वदेश भरला असे ! खेडोपाडी मात्र अजूनही प्रत्येकाला प्रत्येकाच्या घरात काय चालू आहे ते माहिती असते . सामाजिक दबाव म्हणजे काय असते हे अनुभवायचं असेल तर खेड्यात राहायला या ! आता देखील सर्व केवट लोकांनी हरी गिरी साधूचा त्यांच्या गावाचा अविभाज्य भाग म्हणून स्वीकार केलेला दिसत होता . तोही डोळ्यात तेल घालून त्यांच्या नावांची राखण करायचा . विशेषतः नावांची इंजिन चोरीला जाण्याचे प्रमाण येथे खूप आहे . अर्थात इथल्या नावा साध्याच होत्या . परंतु येन केन प्रकारेण नावेला नुकसान करता येणे सहज शक्य असते , त्यावर हरी गिरी साधू लक्ष ठेवून राहत असे . व दिवसभर आपल्या भजनामध्ये तल्लीन राहत असे . परिक्रमावासींची सेवा कशी करावी याचा आदर्श वस्तू पाठ म्हणजे हरीगिरी साधू चा आश्रम होता . पहाटे लवकरच आम्हाला जाग आली . नर्मदा मैया चा काठ असल्यामुळे भरपूर दव पडले होते . आन्हिके आटोपली आणि पुन्हा एकदा मैयामध्ये उतरूनच स्नान केले . मैय्याची पूजा केली . खरे म्हणजे नर्मदा मातेची जी शिशी अथवा बाटली आपण सोबत बाळगत असतो तिचे प्रयोजन असे आहे की समजा तुम्हाला समोर नर्मदा मैया काही कारणामुळे दिसू शकली नाही तर तिचे अस्तित्व जाणवावे म्हणून ती बाटली सोबत ठेवायची असते . सध्या मात्र त्या बाटलीचीच दोन्ही वेळ पूजा करावी लागते अशा ठिकाणी सर्व आश्रम असतात . मला मात्र जेव्हा जेव्हा अशी मैया समोर दिसली तेव्हा बाटलीतील किंवा कुपीतील मैया आणि प्रत्यक्ष मैय्या या दोघींची आरती मी करायचो . आजही तशीच आरती केली आणि सूर्योदय समयी झोळी उचलली . हरी गिरीच्या डोळ्यात पाणी आले . प्रथमच त्याच्या चंद्रमौळी झोपडी मध्ये कोणी परिक्रमा वासी राहून गेले . त्याच्या पाया पडल्यावर त्याने कडकडून मिठी मारली . आणि म्हणाला माझा आश्रम व्यवस्थित चालू दे आणि माझ्या हातून खूप परिक्रमावासींची सेवा होऊ दे असा आशीर्वाद देऊन जा ! मी त्याला म्हणालो एका साधूला आशीर्वाद देण्याएवढी या पामराची योग्यता कुठल्या जन्मात होईल असे वाटत नाही ! सध्या तरी तुझे हे साकडे नर्मदा मैया समोर बसूनच ऐकते आहे ! त्यामुळे ती ते नक्की पूर्ण करेल ! आणि त्याला नर्मदे हर केले ! विठ्ठलराव पठाडे यांना अतिशय गतीने पुढे निघून जाणे फार आवश्यक होते . नाहीतर त्यांना वारी सापडली नसती . त्यामुळे मी त्यांना विनंती केली की इथून पुढे त्यांनी माझ्यासोबत न चालता वेगाने पुढे निघून जावे . त्यांची फार इच्छा होती की मी त्यांच्यासोबत चालावे . परंतु त्यांना मी माझ्या एकटे चालण्याच्या संकल्पा बद्दल फारसे न सांगता त्यांना सध्या गतीने चालणे कसे आवश्यक आहे हे पटवून दिले आणि पुढे जाऊ दिले . तशी संधी देखील लगेचच आली . कारण पुढे पोईचा नावाच्या गावामध्ये स्वामीनारायण मंदिर होते . तिथे मला थांबायचे होते . त्यामुळे विठ्ठल महाराज पठाडे पुढे निघून गेले . यांचा पुन्हा काही संपर्क झाला नाही . परंतु जो काही हृद्य प्रवास आम्ही मैय्या सोबत केला व जो काही अल्पकाळ एकत्र व्यतीत केला तो अतिशय भक्ती भावपूर्ण आणि आनंदाचा होता एवढे निश्चित ! विठ्ठल महाराज जिथे कुठे असतील तिथे त्यांना या पामराचा राम कृष्ण हरी ! 
चालता चालता मी हरी गिरी साधूचा विचार करू लागलो . हा मुलगा आदिवासी समाजातला होता . तरुण होता . हुशार होता . सहृदय होता . त्याचे एकंदर चालणे वागणे बोलणे पाहिल्यावर असे वाटत होते की एखाद्या खाऊन पिऊन सुखी असलेल्या घरातील तो असावा . असे असताना देखील शेती उद्योग धंदा काहीतरी करून चार बोळक्यांचा संसार थाटून आपल्या गावातल राहून सुखी आयुष्य जगण्यापेक्षा त्याला असे काहीतरी वेगळे करावे असे का वाटले असेल ? ही कुठली प्रेरणा आहे ? ही कुठली विद्या आहे ? जी तुम्हाला सहज उपलब्ध भौतिक सुखांचा त्याग करून रानावनामध्ये , उन्हातान्हा मध्ये , थंडी - वारा - पावसामध्ये भटकायला भाग पाडते ? उपाशी तापाशी भटकत ठेवते ? कुठेही उघड्यावर आश्रय घ्यायला भाग पाडते ?  कोणापुढेही भिक्षेची झोळी पसरायला लावते ? आणि तरीदेखील परमोच्च सुखाचा आनंद देते ! गणित फार साधे आहे ! अगदी उलट पद्धतीने नकारात्मक विचार करून बघू . जर साधू जीवन हे आनंद देणारे नसते तर दरमहा एक लाख रुपये देऊन सुद्धा कोणी साधू झाले नसते !  त्या जीवनामध्ये काहीतरी मजा नक्की आहे . काहीतरी नशा अवश्य आहे . ज्यामुळे अनेक चांगले चांगले लोक आपल्या हातचे सर्व सोडून या पळत्याच्या पाठीमागे लागतात ! ते काय आहे हेच शोधायला आपण नर्मदा परिक्रमा करत असतो ! नर्मदा परिक्रमा तुम्हाला काय देते ? तर हाच चिरंतन सुखाचा ठेवा कुठे ठेवला आहे त्या कपाटाची किल्ली देते
.चंदनाचे खोड एका जागी पडून राहिले तर ते हळूहळू कुजू लागते . आणि एक दिवस त्याची काळी माती होऊन जाते . परंतु तेच खोड जर सहाणेवर घासत राहिले तर मात्र थोडेसे कष्ट त्या खोडाला होतात परंतु त्याचे मूळ स्वरूप प्रकट होते ! जे सुगंधरूप आहे ! चंदनाचे लाकूड सुगंधी आहे हे घासल्याशिवाय लक्षात येत नाही !  किंवा हे लाकूड चंदनाचे आहे की बाभळीचे आहे याची परीक्षा सुद्धा सहाणेवर घासल्यावरच होते ! त्यामुळे परिक्रमेत होणारे कष्ट हे एक प्रकारे सहाणेवर घासले जाणे आहे ! साधूंचे जीवन देखील असेच असते . बरोबर पाहता सोने आणि पितळे या दोन्ही धातूंचे दागिने तेवढेच चमकत असतात ! भले भले तज्ञ सुद्धा नुसत्या डोळ्यांनी परीक्षा करून सांगू शकत नाहीत की यातले खरे सोने कुठले आणि खोटे सोने कुठले आहे . परंतु त्याच सोन्याला प्रचंड उष्णता असलेल्या भट्टीमध्ये टाकले आणि चांगले तावून-सुलाखून घेतले की मात्र ते झळाळून उठते ! आणि पितळ मात्र अशा परीक्षेमध्ये संपूर्णपणे काळवंडून जाते . साधू जीवन ही अशीच भट्टी आहे . इथे खरे सोने उजळते ! खोटे सोने आपोआप बाहेर फेकले जाते . ही परीक्षा सुरू आहे हे खऱ्या साधूला माहिती असते . त्यामुळे तो निर्विकार पणे निश्चलपणे आणि प्रतिकार न करता प्राप्त परिस्थितीला सामोरा जात असतो . हरी गिरी साधूचा क्रमांक कोणीतरी मागितला त्यामुळे तो कुठून तरी मिळवला आणि पुन्हा एकदा त्यांच्याशी संपर्क झाला . त्यांनी सांगितले की सेहराव गावातील त्यांचा संपूर्ण आश्रम मैय्या पुरामध्ये तिच्या घरी घेऊन गेली !फक्त शिवलिंग त्रिशूळ आणि चिमटा तेवढे वाचले ! आता ते हरदा जिल्ह्यामध्येच खिरकिया गावाजवळ सारंगपूर येथे एक नवीन आश्रम उभा करण्याचे ठरवत आहेत. तसेच कोणाला महादेवाचे मंदिर स्थापन करून सेवा करण्याची इच्छा असेल तर त्यांच्या जवळचे शिवलिंग ते द्यायला तयार आहेत असे त्यांनी मला सांगितले . त्यांचे संपर्क क्रमांक खालील प्रमाणे आहेत . श्रीहरी गिरी सोमगिरी महाराज ८३२०१३ ७७९३ आणि ९६४४४५५३९६ .दोन्ही क्रमांक साधे असून त्यावर व्हाट्सअप किंवा जीपे नाही परंतु आपण संपर्क करू शकता . सध्या आश्रम वाहून गेल्यामुळे परिक्रमावासियांची सेवा ते करू शकत नाहीत परंतु लवकरच पुन्हा नवीन आश्रम उभा करण्याची त्यांची मनापासून तळमळ आहे .साधू जीवन म्हणजे दररोज नवीन परीक्षा असते . नर्मदा परिक्रमे मध्ये आपल्याला अगदी हेच करायचे असते . आपली पदोपदी परीक्षा घेणारी एक शक्ती आपल्या सोबत चालत असते . ती प्रत्येक क्षणी आपल्याला दोन मार्ग देते . एक सोपा परंतु चुकीचा आणि एक कठीण परंतु कल्याणकारक मार्ग ! आपण योग्य मार्ग निवडतो की नाही यावर आपली पुढची वाटचाल अवलंबून असते ! सतत त्या शक्तीचे स्मरण करत राहिले की मात्र आपल्याला देखील मार्ग निवडायची गरज पडत नाही . मार्ग दाखविणे देखील त्या शक्तीचेच काम होऊन जाते . त्यामुळेच परिक्रमा म्हटले तर सोपी आहे , म्हटले तर खूप अवघड आहे . स्वतःचे डोके लावायचे ठरवले तर परिक्रमा खूप अवघड आहे . परंतु मैयाच्या इच्छेने चालले तर मात्र परिक्रमेसारखे सोपे काहीही नाही ! खरोखरीच काहीही नाही ! 
हेच शाश्वत सत्य हृदयाशी बाळगून पुढे पावले टाकायला सुरुवात केली . प्रत्येक पावलाला फक्त एकच एक गोष्ट घडत होती . तिचे नामस्मरण . तिचे चिंतन . तिचे दर्शन . आणि तिचेच स्पर्शन सुद्धा . . . कारण हा सगळा किनारी मार्ग आता वाळूचा होता !  





लेखांक सत्याण्णव समाप्त ( क्रमशः )

टिप्पण्या

  1. Narmade har !!!!! HariGiri sadhu la madat karaya chi aslyaas kashi karaavi ? Magchyaa varshi chyaa puraat nuksaan zaale asnaar.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. हरी गिरी साधूचा फोन क्रमांक माझ्याकडे नाही . आम्ही भेटलो तेव्हा त्यांच्याकडे फोन नव्हता . आता चौकशी करून पाहतो त्यांचा क्रमांक मिळाला की लेखात अपडेट करतो .

      हटवा
    2. देवदये ने त्यांचा क्रमांक मिळाला आहे . श्रीहरी गिरी सोमगिरी महाराज ८३२०१३ ७७९३ आणि ९६४४४५५३९६ . या क्रमांकावर व्हाट्सअप किंवा जी पे वगैरे नाही आहे . परंतु आपण सहज गप्पा मारण्यासाठी महाराजांना फोन आवश्य करू शकता . सहा परिक्रमा म्हणजे मोठा अनुभवांचा साठा आहे ! नर्मदे हर !

      हटवा
    3. आपण म्हणालात ते बरोबर आहे .महापुरामध्ये आश्रम संपूर्ण वाहून गेला .तशी सुधारणा वरील लेखात केलेली आहे .

      हटवा

टिप्पणी पोस्ट करा

जे आवडते सर्वांना ...

अनुक्रमणिका

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

लेखांक १ : नर्मदे हर !

लेखांक २ : भोपाळ जवळच्या जंगलातील अपघात

लेखांक ४ : झुठा कही का ! सबकुछ तो लाए हो !

लेखांक ३ : चोराची धन

लेखांक ५ : ग्वारीघाट जबलपुर मध्यप्रदेश

लेखांक ८३ : महाराष्ट्रात प्रवेश आणि भाबरीचे भेदक भिल्ल-महात्मा फोदला गारद्या पावरा

लेखांक ७४ : लेपा बांध , वेदा संगम , कठोरा अन् मांडव्य गुंफा

लेखांक ९० : गुजरात मधील कणजी चे सान्सुभाई तडवी आणि अरण्यव्याप्त माथासर