लेखांक ८१ : भिल्ल राजाची बोरखेडी , कुलीची साधुकुटी व घोंगसा येथील श्री संत लखनगिरी आश्रम

शूलपाणीची झाडी म्हणजे काय रे भाऊ ?
नर्मदा परिक्रमेविषयी उत्कंठा असलेल्या प्रत्येकाने शूलपाणीची झाडी हे नाव ऐकलेले असते .मी देखील हे नाव ऐकल्यावर एका विशिष्ट भूभागाची कल्पना केली होती . परंतु प्रत्यक्षात तो भूभाग काहीसा वेगळा निघाला . त्यामुळे सर्वांना शूलपाणीची झाडी नक्की कशी आहे हे कळावे म्हणून थोडेसे सविस्तर वर्णन करतो . 
नर्मदा माता पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते . इथे देखील तिचा प्रवाह बऱ्यापैकी पूर्व पश्चिमच वाहतो आहे . फक्त इथे सातपुडा विंध्य आणि सह्याद्री चे पर्वत भेदत ती वाहत आहे . पूर्वी इथे वाहणाऱ्या नर्मदा मातेचे स्वरूप खोल दरीतून वाहणाऱ्या एका नदीचे होते . परंतु आता प्रचंड उंचीचा सरदार सरोवर प्रकल्प झाल्यामुळे त्या भिंती इतक्या उंचीचे पाणी सर्वत्र साठले आहे . या भागात मुळातच वस्ती अतिशय विरळ आहे . वीस पंचवीस किलोमीटर अंतरावर गावे आहेत . ती देखील अत्यंत विरळ लोकवस्तीची आहेत . गावे आहेत म्हणण्यापेक्षा वस्ती आहेत असे म्हटले पाहिजे . तुम्हाला नकाशे पाहिल्यावर हे स्पष्ट होईलच . बडवानी हे शहर आहे . ते सोडल्यापासून पुढे छोटी छोटी गावे आहेत . इथून पुढे हळूहळू वस्ती विरळ होत जाते . जसजसे आपण उंचच उंच डोंगर चढू लागतो तसतशी मानवी वसाहत नगण्य होत जाते .
साधारण १०० ते १२० किलोमीटरचा हा पट्टा आहे . पूर्ण परिसर डोंगराळ आहे . डोंगर माथ्यावर जिथे सपाटी मिळेल तिथे घरे वस्ती आहेत . बाकी डोंगर उतारावर उगवणारी धान्यं पिकवून वर्षभर लोक अत्यंत गरिबीमध्ये जगतात . प्रत्येकाकडे थोडीफार गुरेढोरे असतात . पूर्वी इथे फक्त कमरेचे वस्त्र वापरले जायचे . स्त्रिया पुरुष दोघेही उघडेच असायचे . अलीकडे परिक्रमावासींची संख्या वाढल्यापासून स्त्रिया पूर्ण वस्त्र घालत आहेत . पुरुष अजूनही बहुतांश उघडेच दिसतात . खाली केवळ एक लंगोटी असते . नवीन तरुण आजकाल आधुनिक कपडे घालताना दिसतात . जुने म्हातारे मात्र फक्त लंगोटी मध्ये दिसतात . जेवढे म्हणून आवश्यक आहे तितकेच निसर्गाकडून घ्यायचे अशी वृत्ती या वनवासी लोकांमध्ये दिसते . मला हवे आहे म्हणून ओरबाडून घे अशी वृत्ती इथे अजिबात आढळत नाही . घरे म्हणजे छोट्या छोट्या झोपड्या असतात . डोंगराच्या पायथ्याशी पक्की घरे दिसतात . प्रत्येक घराच्या बाहेर एका उंच मचाणावर पिण्याच्या पाण्याचा माठ मातीमध्ये गाडून ठेवलेला असतो . त्यातील पाणी केवळ पिण्यासाठी जपून वापरणे अपेक्षित असते . करण कित्येक मैल पायपीट करत हे पाणी डोक्यावर वाहून आणलेले असते . या संपूर्ण परिसराचे पुनर्वनीकरण करणे शक्य आहे . परंतु त्याला स्थानिक आदिवासींची साथ मिळणे आवश्यक आहे . लाकडासाठी व अन्य कामासाठी इथली सर्व झाडे तोडण्यात आलेली आहेत . साठ व सत्तरच्या दशकामध्ये परिक्रमा केलेल्या लोकांनी इथे घनदाट जंगलातून चालल्याचे अनुभव सांगितले आहेत . आता मात्र दूर दूर पर्यंत मोठे झाड दिसतच नाही . या भागाचे काही नकाशे खालील प्रमाणे . 
शूलपाणीची संपूर्ण १०० -१२० किलोमीटर रुंदीची झाडी एका नजरेत अशी दिसते . इथे दोन राष्ट्रीय अभयारण्य आहेत . वन्यजीवन समृद्ध आहे . मानवी वावरासाठी हा सुखावह परिसर नाही . 
बडवाणी हे अगदी गजबजलेले शहर आहे . सर्व आदिवासी महत्त्वाच्या वस्तू घेण्यासाठी इथेच येतात .
राजघाट पासून पुढे भिल्लांची गावे सुरू होतात . भिलखेडा हे त्यातले पहिले गाव आपण मानू शकतो . इथले भिल्ल तुलनेने संपन्न आहेत .
इथून पुढे खऱ्या अर्थाने डोंगरदऱ्या चालू होतात आणि बिजासन गावात पोहोचेपर्यंत आपण शुलपाणीच्या झाडीचा आरंभ केलेला असतो .

बिजासन ते घोंगसा याच मार्गात बोरखेडी नजीक लूटमार केली जायची . आता ते सर्व थांबलेले आहे . परंतु इथे डोंगराच्या किती घड्या आहेत हे आपण पाहू शकता ! हा संपूर्ण परिसर अतिशय थकवणारा आहे . पाण्याचा थेंब मिळत नाही . अखंड चालावे लागते . दूरवर नर्मदा मैया दिसत राहते . 

 घोंगसा येथील लखनगिरी बाबांचा आश्रम सोडल्यावर मात्र तुम्हाला भादल या महाराष्ट्र ,मध्य प्रदेश सीमेवर असलेल्या गावापर्यंत येण्यासाठी प्रचंड कष्ट सोसावे लागतात . वाटेमध्ये अनेक डोंगर दऱ्या लागतात . इथे नर्मदा मैया उत्तरेकडे वळते . वरील सर्व नकाशे दिशा फिरवून लावलेले आहेत याची कृपया नोंद घ्यावी . नर्मदा माई आपल्या उजव्या हाताला राहावी अशा दृष्टीने नकाशा फिरवलेला आहे . प्रत्यक्षात आपण पश्चिमेकडे चालत आहोत हे लक्षात ठेवावे . 
आता इथली गावे कशी आहेत ते पाहूया . त्यासाठी सर्वाधिक लोकवस्ती असलेले भादल गाव निवडले आहे . हे अर्धे मध्य प्रदेश आणि अर्धे महाराष्ट्रात आहे . या गावातील दाट लोकवस्ती पहा ! इतकी विरळ घरे दिसतात . आणि ही घरे सोडली की आजूबाजूला सर्व जंगल आहे . जंगल म्हणजे घनदाट झाडीचे जंगल नव्हे , तर ओसाड माळरानाचे जंगल
हा सर्व असा परिसर आहे . समोर नर्मदा माता दर्शन देत राहते .
या झाडीचा सर्वात उंच टप्पा आता लागतो . भादलच्या खोल दरीतून तोरणमाळ या थंड हवेच्या महाराष्ट्रातील ठिकाणाच्या उंचीचे खप्परमाळ पार करून आपल्याला बिलगाव ला जावे लागते . हा सर्वात कठीण मानला जाणारा टप्पा आहे . बरेच परिक्रमावासी इथून नर्मदा परिक्रमा सोडण्याचा निश्चय करतात . परंतु नर्मदा मातेच्या कृपेने तुम्ही हा टप्पा पार झालात की मग पुढे इतके कठीण मार्ग कुठेच लागत नाहीत . इथे नकाशा मावविण्याच्या दृष्टीने अजून थोडा तिरका केला आहे याची कृपया नोंद घ्यावी . 
बिलगाव ते धडगाव प्रचंड डोंगरांचे उतार आहेत . जपून उतरावे लागते . नाहीतर गुडघ्यांची वाट लागते . इथे निर्मनुष्य वन प्रदेश चालू होतो . या भागात वन्यजीवन समृद्ध आहे . डोंगरांची उंची वाढते व वस्ती कमी होत जाते . त्यामुळे आपण नर्मदेपासून थोडा लांबचा मार्ग निवडतो . वरील नकाशामध्ये दिसणारा उंच गडद डोंगर हे एक अभयारण्य आहे .
खुंटामोडीच्या पुढे शूलपाणेश्वर अभयारण्य लागेपर्यंत थोडीफार मानवी वस्ती लागते . परंतु तरीदेखील हे सर्व आदिवासी क्षेत्रच आहे .
काठी गावातली भारतातील सर्वात मोठी होळी पाहून पुढे गुजरात राज्यामध्ये आपण प्रवेश करतो .
पांढर माती माथासर मार्गे आपण सरदार सरोवराच्या धरणापाशी पोहोचतो .इथे मात्र चांगली झाडी आहे .
इथे देखील धरणाच्या भिंतीपासून गोरा कॉलोनी या नवीन वसाहतीतील नूतन शूलपाणेश्वर मंदिरामध्ये तुम्ही पोहोचलात की मगच शूलपाणीची झाडी संपली असे मानले जाते! आता आपल्याला साधारण कल्पना आली असेल की शूल पाणीची झाडी म्हणजे नक्की काय प्रकार आहे !
वरील सर्व नकाशे आपण एकदा बारकाईने नीट तपासलेत आणि अभ्यासलेत की आपल्याला इथून पुढचे सर्व लिखाण कळणे सोपे आणि सोयीस्कर जाणार आहे . मुळात या शूलपाणीच्या झाडीचा इतका धसका परिक्रमावासी का घेतात हे तुम्हाला हा मार्ग पाहिल्यावर लक्षात आले असेलच . हा वन मार्ग नको असेल तर सडक मार्ग खूपच लांबचा आहे तो खालील प्रमाणे आहे .
बडवाणी प्रकाशा शहादा अक्कलकुवा मार्गे  गोरा कॉलनी ला जाणारा हा रस्ता देखील संपूर्ण डांबरी असल्यामुळे तितकाच दमवणारा आहे . त्यामुळे इथून देखील परिक्रमा सोडणारे खूप लोक आहेत . विशेषतः महाराष्ट्रातील परिक्रमावासी शहाद्यापासून सरळ आपले गाव गाठतात . परंतु असे करू नये . थोडासा संयम बाळगला तर हा टापू तितकासा कठीण नाही . नर्मदा मातेवर विश्वास ठेवून चालत राहावे . 
मला ही झाडी पार करण्यासाठी नऊ ते दहा दिवस लागले . अतिशय सावकाश आणि निवांत पणे झाडी पार करायची असेल तरी पंधरा दिवस खूप झाले . काही लोक विक्रमी चार ते पाच दिवसांमध्ये झाडी पार करतात . हलक्या फुलक्या निराहारी अथवा अल्प आहारी ब्रह्मचारी लोकांना हे सहज शक्य आहे . असो .
             मी पहाटे लवकर उठलो आणि स्नान पूजा वगैरे आटोपून झोळी उचलली . थोडे अंतर चालत गेल्यावर मला एक टेकडी दिसली . हे मोरकट्टा नावाचे गाव होते . मोरटक्का वेगळा आणि मोरकट्टा वेगळा . पूर्वी इथूनच लूटालूट चालू व्हायची . या गावात एक टेकडी होती . टेकडीच्या टोकाला छोटीशी साधू कुटी होती . तिथून एका साधूने मला हात केला . त्यामुळे मी टेकडीचा गोलाकार घाट चढून वरती गेलो .वरती बरेच साधू बसलेले होते . अनेक परिक्रमा वासी देखील थांबले होते .  प्रजापती पिता पुत्र आणि त्यांच्या सोबतचे दोन साधू देखील येथे थांबले होते . या साधूंची नावे मी आज विचारून घेतली . ती अमर गिरी आणि राधे गिरी अशी होती . मागे एका प्रकरणांमध्ये तनय प्रजापती याला रामायण शिकवणारा तरुण साधू असा उल्लेख मी ज्याचा केला तो अमर गिरी होता . आणि जनरल व्ही पी सिंग यांचा तथाकथित भाऊ म्हणजे राधे गिरी . त्यांच्यासोबत चा एक माणूस हरवला होता आणि दोन नवीन माणसे त्यांना मिळाली होती . हे गटागटाने परिक्रमा करणाऱ्या लोकांसाठी नित्याचे आहे . सर्वांचे गांजा पान सुरू होते . मला साधूने काळा चहा दिला . तो घेऊन मी पुढे निघालो . 
हीच ती टेकडीवरची साधू कुटी
टेकडी चढण्यासाठी मजेशीर गोलाकार मार्ग तयार करण्यात आला होता . त्यामुळे टेकडीच्या चहुबाजूने चालावे लागायचे .
मोर कट्टा गावचे सरपंच आणि ग्रामसचिव यांचे संपर्क क्रमांक आपल्या माहिती करता . (कृपया केवळ चौकशीसाठी संपर्क करावा . दानधर्म या क्रमांकावर करू नये )
इथून पुढे गेल्यावर थोडे अंतर पार झाले आणि जिल्हा परिषदेची एक शाळा लागली . या शाळेतील पाण्याची टाकी भरून वाहत होती . आणि शाळेला कुलूप होते . पाणी वाया चालले होते . म्हणून मी माझे कपडे इथे धुण्याचा निर्णय घेतला ! आणि उंचावरून पडणाऱ्या त्या पाण्यामध्ये कपडे धुऊन अखेरीस स्नान देखील आटोपले .  प्रजापती पिता पुत्र यांनी जाताना मला आंघोळ करताना पाहिले आणि त्यांना खूप मौज वाटू लागली ! वेगळे काही दिसले की अचानक निर्णय घेण्याची माझी प्रवृत्ती आहे . त्याचे नेमस्तपणे चालणाऱ्या लोकांना फार आश्चर्य वाटायचे . परंतु व्यक्ती तितक्या प्रकृती हेच खरे . असो . बरेच अंतर चालल्यावर छोटे ओढे नाले ओलांडल्यावर पुन्हा मोठाले डोंगर दिसू लागले . हे सर्व कच्चे मातीचे रस्ते होते . आणि एका एका जीप वर ४० ४० लोक भरून लोक भंगुरैची जत्रा बघायला चालले होते . जीप चालक अतिशय बेदरकारपणे गाड्या चालवत होते . सर्वच प्रकार एकंदरीत भयावह वाटणारा होता . जीपच्या बॉनेटवर , टपावर आणि चारही बाजूने लोक लटकलेले होते . आत मध्ये तर किती लोक भरले होते हे मोजता येणे कठीणच . गंमत म्हणजे लोक हा प्रवास आनंदाने करत होते ! नर्मदे हरचा पुकारा मात्र शक्यतो कोणी करत नव्हते . मोटरसायकलवर देखील चार चार पाच पाच लोक बसून प्रवास करत होते . इथले रस्ते अतिशय घसरडे मुरमाड आणि धोकादायक आहेत . तरी देखील एकाही चालकाचे वेगावर नियंत्रण नव्हते . हे धोकादायक वाहन चालन चांगलेच लक्षात राहील असे होते . 
संग्रहित छायाचित्र
परिक्रमावासी ओंकार आपटे यांच्या युट्युब पेजवरून साभार

इथे उजव्या हाताला नर्मदा माता अधून मधून दर्शन देत राहते . एके ठिकाणी नर्मदा मातेला जाऊन मिळणारा ओढा अशा प्रकारे मिळतो की आपल्याला पाहताना अखंडित भारताचा नकाशा दिसतो .  या भागाचा गूगल नकाशा खाली जोडत आहे . 
हे बऱ्यापैकी तिरके करून काढलेले उपग्रह चित्र आहे त्यामुळे नकाशा लंबाकृती दिसतो आहे . परंतु डोंगरावरून चालताना मात्र अगदी भारत दिसतो .
अनेक परिक्रमावाशी या दृश्याचे प्रकाशचित्र काढतात .
पुढे बोरखेडी नावाचे गाव लागते . सर्वात जास्त लूटमारीच्या घटना याच गावात घडायच्या . इथे हिरालाल रावत नावाचा गावातील एक प्रमुख आदिवासी परिक्रमावाशांची सेवा करतो . हाच पूर्वी लूटमार करण्यामध्ये अग्रेसर असायचा असे सांगण्यात येते . परंतु युट्युब वर त्यांचे व्हिडिओ पाहिल्यावर ते असे सांगतात की मी स्वतः कधी लुटमार केली नाही परंतु लुटणाऱ्या लोकांना मी मतपरिवर्तित करून थांबविले . हे मात्र योग्य आहे . त्यांना नक्की लुटालुट कोण करतो आहे हे सर्व माहिती असायचे . त्यामुळे हिरा मामा ने सांगितले आहे या भीतीमुळे लुटमार थांबली . साधारण २०१० च्या नंतर लूटमारीच्या घटना पूर्णपणे थांबल्या . हीरामामा याला स्थानिक आदिवासी त्यांचा राजा मानायचे . त्यामुळे यांचे दर्शन घ्यावे अशी इच्छा होती . परंतु काल मी ज्या बिजासन गावामध्ये थांबलो होतो तिथली भंगुरै बघायला भिल्लराज गेले होते . रस्त्याच्या डाव्या हाताला एक मैदान आणि शेजारी त्याचे घर आहे . इथेच परिक्रमा वासी शक्यतो मुक्काम करतात . 
 बोरखेडी येथील आदिवासींचा म्होरक्या हिरालाल रावत उर्फ सर्व परिक्रमावासींचा लाडका हिरा मामा
आज परिक्रमावासियांची सेवा कशी करायची याचा एक आदर्श वस्तू पाठ हिरा मामा ने घालून दिलेला आहे
मोर कट्टा बोरखेडी कुली घोंगसा या सर्वच गावातील आदिवासी लोक परिक्रमावस्यांना लुटत असत . परंतु नंतर हिरा मामांनी गावोगावी जाऊन ग्रामसभा घेतल्या आणि परिक्रमावासींना लुटणाऱ्या माणसांवर बहिष्कार टाकण्याची पद्धत सुरू केली . ही प्रेरणा त्यांना नर्मदा मातेनेच दिली असे ते आदरपूर्वक नमूद करतात . लुटमार वाढल्यामुळे या मार्गाने जाणाऱ्या परिक्रमावासींची संख्या खूप कमी झाली होती . परंतु हिरा मामा सारख्या चाणाक्ष माणसाला हे लक्षात आले की इथून जितके अधिक परिक्रमावासी जातील तितकीच अधीक लक्ष्मी या प्रांतामध्ये येणार आहे . त्यामुळे हे सर्व प्रकार आता पूर्णपणे थांबले आहेत . आणि खरोखरच आता परिक्रमावासी इथल्या लोकांना खूप काही देत देत पुढे जातात . आता त्यांनी येऊन लुटण्याची परंपरा थांबली असून परिक्रमावासीच आपल्या जवळचे सामान लुटत लुटत पुढे जातो . इथे बहुतांश परिक्रमा वासी मुक्काम करतात .
परंतु अजून दिवस शिल्लक असल्यामुळे चालत राहण्याचे मी ठरवले . अनेक चढ उतार पार केल्यावर कुली नावाचे गाव लागते . ही सर्व गावे नर्मदा मैयाच्या काठावरच आहेत .  समोर एक नदी आडवी आली व तिच्यावरचा मोठा पूल होता .तत्पूर्वी डाव्या हाताला टेकाडावर एक झोपडी दिसली . कडकडून भूक लागलेली होतीच . ही एका साधूची कुटी होती आणि तो भंगुरै बघायला निघाला होता . माझ्या आधीच इथे अमर गिरी राधेगिरी प्रजापती पिता पुत्र आणि अजून चार-पाच परिक्रमावासी पोहोचले होते . त्या साधूने आम्हाला इथे पाहिजे तितका वेळ राहण्याची आणि हवे ते बनवून खाण्याची मुभा दिली आणि नर्मदे हर केले .  सर्वांनी मिळून उत्कृष्ट अशी खिचडी केली . ती भक्षण करून क्षणभर विसावा घेतला . 
 कूली येथील हीच ती साधूकुटी जिथे आम्ही स्वयंपाक केला .
साधू कुटीमध्ये चालू असलेल्या कन्या भोजनाचे संग्रहित चित्र . आम्ही देखील याच अंगणामध्ये भोजन प्रसाद घेतला .
 कुली च्या साधू कुटीमध्ये कन्या भोजन करणाऱ्या आदिवासी कन्या
पडल्या पडल्या आमच्या हास्यविनोद इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू झाल्या . मी भेटलेल्या साधूं कडून भारतातील अन्य यात्रांची माहिती घ्यायचो . मुळात साधू कधी निवांत सापडत नाहीत . तसे ते सापडले की त्यांना सोडू नये ! नर्मदा परिक्रमा सोडून भारतामध्ये अजून किमान १००० पेक्षा अधिक विविध क्षेत्रांच्या परिक्रमा पुराण प्रसिद्ध आहेत ! साधू लोक अखंड या सर्व यात्रा करत असतात . दक्षिण भारतात याच प्रकाराला गिरीवळम असे म्हणतात . गिरीला वळसा घालणे . अर्थात परिक्रमाच . इथून निघालो . भंगुरई बघायला जाणाऱ्या लोकांची संख्या फार वाढली होती . रंगीबिरंगी गॉगल घालून नटले थटलेले तरुण-तरुणी जाताना दिसत होते . जणू काही वर्षभर याच क्षणाची हे सर्वजण वाट पाहत होते असे त्यांचे वर्तन होते ! याच कारणासाठी योग्य वयामध्ये चतुर्भुज व्हावे हे उत्तम आणि तसे इथे हे लोकं होतात हे देखील महत्त्वाचे !  
 भंगुराईसाठी जमलेले तरुण तरुणी . आदिवासी तरुणांची अंगकाठी शिडशिडीत असली तरी देखील त्यांची नजर मात्र फारच भेदक असते . ( प्रातिनिधिक चित्र )
इथून पुढे मी पुन्हा एकदा जंगलातून जाणारा शॉर्टकट निवडला . जंगल याचा अर्थ निर्मनुष्य प्रदेश . झाडी वगैरे नावाला सुद्धा नाही .ही डोंगरावरची एक पायवाट होती . अतिशय मुरमाड आणि निसरडी होती . चालताना फार लक्षपूर्वक चालावे लागत होते . कारण डाव्या हाताला तीव्र उतार होता . आणि शेकडो फूट खोल दरी होती . इतक्यात मी पाहिले की एक तरुण अत्यंत वेगाने या पायवाटेवरून मोटरसायकलने मागून आला . त्याला मी जागा करून दिली . पुढे एका खिंडीमध्ये जाऊन तो थांबला . याचे नाव सुनील होते . तो त्याच्या सासुरवाडीला निघाला होता . सेम्लेट गावातली भंगुरई प्रसिद्ध आहे . ती बघण्यासाठी हा चालला होता . याने मला डोंगरावर चालताना पाहिले होते . त्यामुळे मला जमेल असा अजून एक कठीण शॉर्टकट त्याने मला दाखवला . तो म्हणाला या मार्गाने जर तुम्ही गेलात तर थेट लखनगिरी आश्रमातच पोहोचाल . लखनगिरी आश्रम संगमावरती आहे . आणि जेव्हा जेव्हा नर्मदेची पाणी पातळी वाढते तेव्हा संगमांमध्ये खोल आतपर्यंत पाणी शिरते . आता सुदैवाने ती नदी कोरडी पडलेली होती . त्यामुळे त्या नदीच्या पात्रातून जाणारा हा शॉर्टकट त्याने मला दाखवला . ही नदी कोरडी पडली आहे हे फक्त नेहमी या भागातून जाणाऱ्या माणसालाच माहिती असते .फार क्वचित ही नदी कोरडी असते .बाकीचे लोक मात्र या नदीला मोठा वळसा मारून पुन्हा उलटी फिरून आश्रमाकडे येतात . या सोप्या मार्गाने मी काही काळातच लखनगिरी आश्रमामध्ये पोहोचलो . नर्मदा मातेचे अतिशय विहंगम दर्शन या आश्रमातून होते ! डोंगरांच्या रांगांमध्ये साठलेले तिचे भव्य जल आपण किती कःपदार्थ आहोत याची आपल्याला जाणीव करून देते . पाण्याची पातळी चढ-उतार होत असल्यामुळे तेवढ्या भागात एकही वनस्पती उगवत नाही . फक्त गवत तेवढे दिसते . जिथं काहीच नाही उगवत , तिथं सुद्धा उगवतं तेच गवत ! आश्रमामध्ये छोट्या-मोठ्या कुटी बांधलेल्या होत्या . हा आश्रम चालवणारे नर्मदा गिरीजी महाराज म्हणून आहेत तेच नेमके मला सामोरे आले . मी महाराजांना साष्टांग दंडवत केला . महाराजांनी एक मोठे दगडी शिवलिंग स्थापन केले आहे त्याच्या शेजारी आसन लावण्याची मला सूचना केली . आत्ता थोडा गडबडीत आहे नंतर निवांत भेटू असे मला सांगायला विसरले नाहीत . केवळ माझ्या नजरेतून माझा भाव त्यांनी कसा काय ओळखला असेल ! माझ्या मनात अगदी आले होते की या महात्म्याचा सत्संग घडला तर बरे होईल ! उजवीकडे एका मोकळ्या जागेवर पत्राची शेड टाकून तिथे मोठ्या शिळेला शिवलिंग म्हणून पुजले होते . इथेच लखनगिरी बाबांची मूर्ती देखील होती . लखनगिरी बाबा इथे येऊन राहिले आणि त्यांनीच इथल्या आदिवासींचे मतपरिवर्तन केले असे सर्वजण मानतात . नर्मदा मातेचे भाऊ म्हणून भिल्ल लोकांना मामा म्हणतात . या मामा लोकांचे प्रबोधन करून परिक्रमा वासींना लुटण्याऐवजी परिक्रमा वाशींची सेवा करण्याची वृत्ती त्यांच्यामध्ये जागवणारे हेच ते लखनगिरी महाराज . अर्थात ही लूटमार बंद कशी काय झाली याच्या अनेक सुरस कथा नर्मदा खंडात सांगितल्या जातात . एका आदिवासीने मला सांगितले की पूर्वी एक पोलीस कमिशनर नर्मदा परिक्रमेला आले होते . त्यांची लुटालूट झाली . त्यांनी शांतपणे सर्वांची नावे वगैरे लक्षात ठेवली . चेहरे लक्षात ठेवले . आणि परिक्रमा संपल्यावर मोठा फौज फाटा घेऊन ते आले आणि लुटमार करणाऱ्या भिल्लांना बेदम मारहाण केली . तेव्हापासून हा प्रकार बंद पडला . परंतु ही कथा मला फारशी व्यावहारिक वाटली नाही . कारण मारहाण करून कोणी लूटमार करण्याचे सहजासहजी सोडणार नाही . मन परिवर्तन आणि मतपरिवर्तन झाल्यासच ते शक्य आहे . इथे नर्मदा मातेमध्ये स्नान करणे शक्य आहे असे मला एका सेवेकरी साधने सांगितल्यामुळे मी किनाऱ्याकडे गेलो . 
घोंगसा येथील लखनगिरी महाराजांचा आश्रम . या चित्रामध्ये दिसणारी नदी नर्मदा मैया नसून तिला येऊन मिळणारी एक नदी आहे . डावीकडे दिसणारा डोंगर उतरून मी थेट आश्रमामध्ये आलो . पाण्याची पातळी किती वाढते हे तुम्हाला टेकडीवर पडलेल्या पाण्याच्या खुणा पाहिल्यावर लक्षात येईल.
समोरच्या काठावरून आश्रम असा दिसतो .
हा आश्रम श्री पंचदशनाम आखाडयांपैकी जुना आखाडा या आखाड्याचा आहे . पंच दश म्हणजे पंधरा . जुना आखाडा ,उदासीन आखाडा इत्यादी पंधरा आखाडे आहेत . आश्रमाचा क्रमांक इथे दिलेला आहे . ९७५४४८६९६१
आश्रम अतिशय सुंदर होता. इथून हलूच नये असे वाटे . आश्रमाच्या विविध कुटींमध्ये आधीपासूनच काही साधू राहत होते . परिसरातील छोटी मुले इथे मदती करता येऊन राहिली होती . त्यांच्यावरती लहानपणापासून हा संस्कार होत होता . शिवलिंग भव्य आणि गोंडस होते . त्याच्या शेजारीच मी आसन लावले . स्नानासाठी म्हणून मी मैया कडे गेलो तर एक तरुण मुलगा मैय्याकडे तोंड करून ध्यानस्थ बसलेला दिसला . जवळ जाऊन पाहिले तर तो आपला विशाल जवंजाळ होता ! माझ्या येण्याची चाहूल लागल्यामुळे त्याचे ध्यान भंग पावले आणि आम्ही दोघांनी एकमेकांना कडकडून मिठी मारली ! वेव्हलेंग्थ जुळणे नावाचा प्रकार आमच्या बाबतीत सहज घडलेला होता . याचे स्नान झाले होते . मीच नाना करता खाली उतरलो . प्रचंड खडक असलेला किनारा होता . नर्मदा मातेचे यापूर्वीचे किनारे वेगळे होते . आणि हा किनारा वेगळा होता हे मला थोड्याच वेळात कळले . हा किनारा नसून एका डोंगराचा टोकाचा भाग होता . ज्याच्या दरीमध्ये नर्मदा जल साठले होते . परिक्रमेमध्ये पोहण्याला परवानगी नाही कारण नर्मदा मातेला लाथ लागते . म्हणून मी नेहमीप्रमाणे पद्मासन घालून पाण्यावर झोपून राहिलो . नर्मदा जलाचा तो प्रेमळ स्पर्श अतिशय हवाहवासा होता ! परवा राजघाटवर स्नान केल्यावर पुन्हा हा स्पर्श मिळेल किंवा नाही याची शाश्वती नव्हती . बराच काळ मी असा पडून होतो . इथे दगडाचे काही सुळके अधून मधून वर आले होते ते फार धोकादायक होते . इतक्यात माझ्या असे लक्षात आले की माझा पद्मासन घातलेला उजवा पाय माझ्याच लंगोटी मध्ये फसला आहे . आणि तो सोडवायच्या नादात पाय पूर्णच अडकला . पाय झाडायचे नाहीत त्यामुळे मी पाय स्थिर ठेवले होते . पाय सोडविताना अतिरिक्त शक्ती लावल्यामुळे आणि पाणी थंडगार असल्यामुळे उजव्या पायाला गोळा आला किंवा वांब आला . या गडबडीत माझ्या तोंडातून श्वास बाहेर पडला (जो तरंगण्यासाठी तुम्हाला आवश्यक असतो ) आणि मी हळूहळू खाली बुडू लागलो .चांगले पोहता येत असल्यामुळे बुडण्याची भीती मला नव्हती .  परंतु हातपाय न मारणे हा नियम असल्यामुळे शांतपणे काय काय होते आहे ते पाहत होतो .नवीन ठिकाणी गेल्यावर शांतपणे खाली जाऊन पाण्याची खोली अनुभवणे हा माझा आवडीचा कार्यक्रम असतो. मला असे लक्षात आले की हे पाणी फारच खोल आहे ! मी बराच खाली गेलो होतो ! तळ काही लागतच नव्हता . अखेरीस नर्मदा मातेची करुणा भाकली आणि लंगोटीतून पाय सुटला . केवळ हात मारत वरती आलो . सुमारे वीस पंचवीस फूट सहज खाली गेलो होतो . तरी मला तळ लागला नव्हता . तेव्हा मला लक्षात आले की मी किती भयानक पाण्यामध्ये उतरलो होतो . हे पाणी उतरले असते तर तो पर्वताचा एक उभा दगडी कडाच होता ! आणि मी खाली गेलो होतो ती दरी होती ! नशीब तिथल्या एखाद्या वाळलेल्या झाडामध्ये वगैरे लंगोटी फसली नाही ! पाण्याच्या स्तंभाचा दाब माझ्या कानावर भयंकर जाणवत होता . वरती आल्याबरोबर मी बाहेर पडलो . माझे पाहून स्नाना साठी अजून काही लोक जमले . यातील बऱ्याच जणांना पोहायला येत नव्हते . सर्वांना मी विनंती केली की कृपया काठावर बसून स्नान करावे . नंतर मला कळाले की इथे मगरी सुद्धा असतात ! मोठ्याच प्रसंगातून नर्मदा मातेने वाचवले होते ! इथून पुढे मी पाण्यात उतरण्यापूर्वी लंगोटी घट्ट करून मगच उतरायचो . मी बाहेर आल्याबरोबर विशाल म्हणाला की तुझे डोळे खूप लाल झाले आहेत !हे स्वाभाविक होते . वीस पंचवीस फूट पाण्याच्या खाली गेल्यावर तेवढ्या वजनाच्या पाण्याच्या स्तंभाचे वजन अथवा दबाव तुमच्या देहावर पडलेला असतो . त्याला प्रतिरोध करण्यासाठी रक्तदाब वाढतो . अजून थोडे खाली गेले आणि तोंड बंद करून कानातून हवेचा आतील दबाव वाढवला नाही तर कान फुटू शकतात . या प्रक्रियेला स्कुबा डायविंग करताना शिकवले जाते . इक्विलायझिंग असे याला म्हणतात . मी याचे रितसर प्रशिक्षण घेतले होते . माझ्याकडे स्वतःचा स्नॉर्केलिंग चा सेट सुद्धा आहे तो घेऊन विविध नैसर्गिक जलसाठ्यांच्या तळाशी असलेले जल जीवन पाहणे मोठे आनंददायक असते . ही इक्विलायझिंग ची प्रक्रिया केल्यामुळे डोळे लाल झाले होते . आश्रमामध्ये गेल्याबरोबर नर्मदा गिरी स्वामी म्हणालेच , "परिक्रमेला आला आहेस की पोहायला आला आहेस ? " मी त्यांना सांगितले की मी पाण्यावर पद्मासून घालून झोपलो होतो . परंतु त्यांना ते पटले नाही . स्वाभाविक होते . हे आसन स्थिर पाण्यावर करणे तितकेसे सोपे नाही . त्यात एखाद्या शहरी बाबूला तर अशक्य असणारी अशीच ही गोष्ट आहे ,असे कोणालाही वाटणे स्वाभाविक आहे . मी स्वामीजींना सांगितले की मला स्वयंपाकामध्ये वगैरे मदत करायची आहे . त्यांनी सांगितले , "सिर्फ आनंद लेते रहो । परिक्रमावासी हो । आप की सेवा यहा नही ली जायेगी । परिक्रमा पूर्ण हो जाये तब यहाँ आकर रुकना । और जितनी मर्जी हो उतनी सेवा करना । "  विशाल आणि मी पूजनाला बसलो . इथे कृष्णा अष्टेकर नावाचे एक परिक्रमा वासी आले होते . पुण्यामध्ये कर्वे रस्त्यावर वासुदेव निवास आहे येथील ते अनुगृहीत होते . अतिशय सात्विक गृहस्थ होता . परंतु प्रचंड भावनाशील होते . यांनी त्यांची नर्मदा मैया अतिशय सुंदर अशा बाहुलीच्या रूपात नटवली होती ! तो प्रकार मला चांगलाच आवडला ! आणि मनोमन असे वाटले की आपली मजा सुद्धा अशीच करता आली तर किती छान होईल ! पुढे माझी ती सूप्त इच्छा मैय्याने पूर्ण केली . तो प्रसंग योग्य वेळी सांगेनच . 
या बाहुलीला काजळ लिपस्टिक वगैरे लावल्यामुळे आणि तसे काही करण्याचा कृष्णा अष्टेकर यांचा अनुभव नसल्यामुळे ती फारच मजेशीर आणि भयानक दिसत होती !  प्रजापती पिता पुत्र आणि राधे गिरी अमर गिरी हे उशिरा मुक्कामी पोहोचले . त्यांनी नेहमीचा मार्ग निवडला होता . सर्वजण चालून खूप थकलेले दिसले . मी विशाल सोबत गप्पा मारत बसलो . कृष्णा अष्टेकर देखील वासुदेव निवास मध्ये माझे जाणे असते हे कळल्यावर खूप खुश झाले . यांची पुढे जाण्याची हिंमत होत नव्हती . मी त्यांना त्यांची गुरुपरंपरा आहे तिथे स्मरण करून देत धीर दिला आणि सांगितले की तुमची परिक्रमा नक्की पूर्ण होणार आहे . सद्गुरूंच्या चरणावर आणि मैयावर संपूर्ण विश्वास ठेवून एका वेळी एकच पाऊल टाकत राहा . हे बराच दिवस इथे राहिले होते . या आश्रमाची काही चित्रे गुगल नकाशावर सापडली ती आपल्यासाठी देत आहे .
लखनगिरी आश्रमाचे प्रवेशद्वार . मागे विस्तीर्ण पसरलेली मैया . 
आश्रम मधील शिवलिंगआश्रम मधील शिवलिंग . आणि लखनगिरी बाबांची मूर्ती . अलीकडे या शिवलिंगाला जलहरी बनवून समोर नंदी स्थापन केला आहे असे फोटो वरून कळाले . मी अगदी याच ठिकाणी आसन लावले होते .
आश्रमाला कोणीतरी घेऊन दिलेली ही भगव्या रंगाची कॅप्सूलच्या आकाराची नाव माझ्या लक्षात राहिली . या संपूर्ण परिसरात कोणी संकटात असेल तर या नावेद्वारे मदत पोहोचवली जाते . काही परिक्रमावासी इथून नावेने गोरा कॉलनी पर्यंत देखील जातात असे ऐकण्यात आले . नावेत बसलेल्या माणसांच्या आकारावरून नावेच्या आकाराची कल्पना यावी . आश्रमासाठी लागणारे सर्व साहित्य या नावेद्वारे समोर काठावर असलेल्या डही गावाच्या बाजारातून आणले जाते .
आश्रमातील विविध कुटी
आश्रमामध्ये मदतीसाठी थांबलेला आदिवासी मुलगा . त्यांची नावे आपल्याला मोठी मजेशीर वाटतात . 
आश्रमातील शिवलिंग आणि आजूबाजूला बसलेले परिक्रमा वासी
आश्रमासमोरील नर्मदा मैया . इथेच मी खोलीचा अनुभव घेऊन वर आलो . समोरच्या तटावर पाण्याची वाढलेली पातळी किती जाऊ शकते त्याच्या खुणा दिसत आहेत . इथे मोकळ्या जागेवर अजून एक बांधकाम सुरू करण्याचा मानस आहे असे स्वामींनी मला सांगितले .
या घाटावर नावेतून नर्मदा मातेला साडी नेसवतानाचे दृश्य !
हे काम करणारा आदिवासी तरुण . अर्धी नाव साडी ने भरलेली आहे इतकी मोठी साडी आहे .
नर्मदा माते ला नेसवली गेलेली साडी
या आश्रमाच्या पुढे नर्मदा माता उजवीकडे वळण घेते अर्थात उत्तरवाहिनी होते आणि पुन्हा पश्चिमेकडे वळून दक्षिण वळण घेत पुन्हा सरळ पश्चिमेला वाहू लागते . 
वरील नकाशात डही नावाच्या गावाजवळ नर्मदा माता उत्तर वाहिनी झालेली दिसते आहे पहा . त्याच वळणाचे हे वरील छायाचित्र आहे . आश्रम बरोबर या वळणावरच आहे . 
यानंतर नर्मदा गिरी महाराजांचा खूप चांगला सत्संग लाभला . महाराज अतिशय स्पष्ट वक्ते होते . त्यांच्याशी बोलण्यासाठी परिक्रमेतील एक साधू महाराज आले आणि सांगू लागले की यापूर्वीची परिक्रमा त्यांनी १९८४ साली केली होती
. तेव्हा लखनगिरी महाराजांनी  त्यांना ठेवून घेतले होते आणि भाकरी खाऊ घातली होती . त्यांना क्षणात उडवून लावत नर्मदा गिरी महाराज म्हणाले की हे शक्यच नाही . कारण मुळात लखनगिरी महाराज या स्थानावर २००० सालानंतर आले ! तो साधू खजिल होऊन तोंड बारीक करून निघून गेला . नर्मदा गिरी महाराज मला सांगू लागले , " मला खोट्याची फार चिड आहे . एक वेळ तुम्ही चुकीचे बोला , चालेल . परंतु खोटे बोलू नका . मुळात परिक्रमेमध्ये काही बोलूच नका ! तेवढा आपला अधिकार असता तर परिक्रमा करावी लागली असती काय ? शहरी परिक्रमावासींचा मला याच कारणासाठी राग येतो . इथे येऊन मला आश्रमामध्ये काय काय सुधारणा केल्या पाहिजेत ते सुचवतात . इथे प्रत्येक गोष्ट करायला मी एकटाच असतो . ५० सुविधा उभ्या केल्यावर त्या जपणार आणि सांभाळणार कोण आहे ? तुम्ही परिक्रमा वासी लोक आधीच एवढे दमून येता . तुम्हाला काम लावणे बरोबर आहे काय ? इथे आधीच माणसे मिळत नाहीत कुठल्याही कामाला . पूर्वी तर फार विषम परिस्थिती होती . गुरुजींच्या कृपेमुळे आता परिक्रमा वासी निर्धोकपणे या प्रांतातून प्रवास तरी करू शकतात .  नाहीतर पूर्वी चक्क नागडे करून सोडायचे हे लोक . अजूनही ते काही फार बदलले आहेत असे नाही . फक्त आता ते थोडेसे सावध असतात इतकेच . " नर्मदा गिरी महाराज अत्यंत पोट तिडकीने बोलत होते . त्यांचे म्हणणे आणि अतिशय बरोबर होते . मुळात ज्या सुविधा आपण शहरांमध्ये उपभोगतो त्या तशाच्या तशा जंगलामध्ये उभे करण्याचा अट्टाहास हाच मुळी मूर्खपणाचा आहे . उदाहरणार्थ बांधलेला संडास शहरांमध्ये चालतो कारण इथे मलनि:सारण व्यवस्था आधीच उभी केलेली असते . जंगलामध्ये असा संडास उभा करण्याची गरज काय ? आणि प्रयोजन तरी काय ? मला महाराजांचा रोखठोक स्वभाव खूप आवडला . असे साधू फार कमी आढळतात . यांना माणसांची फार चांगली पारख होती . जोपर्यंत मी त्या आश्रमामध्ये होतो तोपर्यंत शेपटासारखा त्यांच्यासोबत फिरत होतो . या साधू कडून किती शिकावे असे मला झाले होते !त्यांनी देखील सुरुवातीला पुणे शहरातून आला आहे म्हणून माझ्यावर धरलेला डूख नंतर सोडून दिला . विशेषतः काठाने चालण्याचा माझा आग्रह त्यांना सांगितल्यावर त्यांनी इथून पुढचा झाडीतला मार्ग मात्र कृपा करून ठरलेल्या प्रमाणेच पार करण्याचा मौलिक सल्ला दिला . तसे न ऐकणाऱ्या परिक्रमावासींचे काय हाल झाले आहेत याचे किस्से त्यांनी मला सांगितले . अजूनही काही दूर दरासची खेडी आहेत जिथे अक्षरशः अन्नान्न दशा आहे . इथे काहीही होऊ शकते . त्यातील बऱ्याच लोकांना परिक्रमा काय आहे ते देखील माहिती नसते कारण गेली अनेक दशके इथून कोणीच गेलेले नाही . 
महाराजांचे हे सर्व सांगणे मी काळजीपूर्वक ऐकत होतो . त्यांच्या रूपाने साक्षात नर्मदामाताच मला सावध करत आहे असे मला वाटले . रात्री इथे खूप सुंदर आकाश दिसते . प्रकाश प्रदूषण जवळपास शून्य आहे . त्यामुळे कधीही देखील न दिसणारे तारे इथून दिसतात . मी तनय आणि आश्रमात राहिलेल्या तीन मुलांना संपूर्ण आकाश दाखवले . आणि आकाशावरून दिशा कशी ओळखायची ते शिकवले . या मुलांची नावे मोठी मजेशीर होती . गुमान , सदानंद आणि मच्छर अशी त्यांची नावे होती . आदिवासींमध्ये नावे आपल्यापेक्षा वेगळी असतात . गारद्या ,फोदला , मनीया , हमाल्या , भिला अशी नावे असतात . रात्री खूप छान झोप लागली . सकाळी उठून आन्हिके आटोपली . थंडगार नर्मदा जलाने काठावर बसून स्नान केले . 
आश्रमाचा माझ्या वहीमध्ये मिळालेला शिक्का
माँ नर्मदा दत्त आश्रम
ब्रह्मलीन स्वामी लखनगिरी जी महाराज
संचालक प्रबंधक संत नर्मदा गिरीजी महाराज
ग्राम घोंगसा जिल्हा बडवानी मध्य प्रदेश
 मोबाईल 09754486961
विशाल ला माझ्यासोबत चालायची इच्छा होती . परंतु त्याला मी आधीच गतिमान चालण्याचे महत्त्व आणि गरज पटवून सांगितली होती . नाहीतर त्याची परिक्रमा पूर्ण झाली नसती . त्यामुळे मी त्याला अतिशय वेगाने पुढे निघून जायला सांगितले . मी थोडेसे काठाने चालून पाहणार होतो . आणि मग मूळ मार्ग पकडणार होतो . त्यामुळे मी झोळी उचलली आणि हळूच काठावरचा मार्ग पकडला . नर्मदा गिरी स्वामींचे माझ्यावर बारीक लक्ष होते . मी का ठा कडे दूरवर पोहोचलो होतो . त्यांनी जोरात आवाज देऊन मला सरळ रस्त्याने जायची तंबी दिली . पुन्हा एकदा हा नर्मदा मातेचा आदेश आहे असे मानून मी उलटा फिरलो आणि धोपट मार्ग पत्करला . लवकरच आपला महाराष्ट्र सामोरा येणार होता !





लेखांक एक्क्याऐंशी समाप्त (क्रमशः )

टिप्पण्या

  1. नर्मदे हर। प्रत्येक लेखारंभी परिक्रमा दिन क्रमांक; तिथी वार मास व शक संवत्सर तसेच इंग्रजी तारीख टाकल्यास ऐतिहासीक कालखंड कळतो. आरंभी कंसात हा उल्लेख योग्य वाटल्यास करावा.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. सूचना स्वीकारारर्ह आहे . सुरुवातीला काही लेखात असे केले देखील होते . परंतु एका लेखांमध्ये अनेक दिवस उलटतात असे देखील होते आहे . त्यामुळे हे टाळले . तरी देखील शक्य होईल तिथे वेळोवेळी तिथीचा व दिनांकाचा उल्लेख करत आहे . आपला पाठिंबा अतिशय ऊर्जादायक आहे ! जय जय रघुवीर समर्थ !

      हटवा
  2. दादा आपल्याशी सम्पर्क कसा होईल आपला मेल आयडी द्याल का, nimishpatrudkar@gmail.com हा माझा मेल आयडी आहे, मला आपल्याशी बोलायचे आहे

    उत्तर द्याहटवा
  3. संत लखनगिरी आश्रमासारखे अनेक आश्रम आहेत ज्यांच्या शिवाय परिक्रमा शक्य नाही. या पैकी कोणत्या आश्रमांना सध्या मदतीची आवश्यकता आहे आणि ही मदत कश्या स्वरूपात केली तर योग्य राहील यावर एक लेख लिहावा ही नम्र विनंती.

    उदा. कदाचित येथे उंदरांचा प्रादुर्भाव असेल तर धान्य आणि स्टीलच्या अन्न धान्य साठव्णूकीच्या सोयी केल्या तर त्याचा उपयोग होणार असेल.
    तसेच औषधाच्या सोयी काही ठिकाणी कदाचित आवश्यक असतील. काही आश्रमात मुले शिकावयास येत असतील तर त्यांना वह्या पुस्तके आवश्यक अशी शिक्षणाची साधने हवी असतील . कदाचित सायकली उपयोगी असतील. कदाचित पैसेच देणे महत्त्वाचे असेल. यावर एक लेख तर यायलाच हवा अशी आग्रहाची नम्र विनंती.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. अतिशय स्वागतार्ह सूचना आहे . प्रत्येक आश्रमाची माहिती देताना मी थोडक्यात तिथे काय काम चालते हे लिहितो आहेच . परंतु सर्व आश्रमांना मुख्यत्वे करून आश्रम चालवण्यासाठी लागणारा खर्च हीच थोडीशी दुर्लभ बाब असते . परिसरातील शेतकरी धान्य वगैरे आणून देत असतात . प्रमाणाबाहेर धान्य झाले तर ते साठवण्याचा देखील मोठा प्रश्न उभा राहतो . सर्वात सोपे म्हणजे आश्रम चालकांना भाष करून त्यांना या क्षणी काय हवे ते विचारून तशी मदत करणे . उदाहरणार्थ इथे शहरात गहू घेऊन तिथे वाहून नेऊन त्यांना देताना वाहतुकीचा व अन्य खर्च अधिक आहे . त्यापेक्षा त्यांना जी पे करून त्यांनी गावातून गहू विकत घेतला तर अधिक गहू येतो .

      हटवा

टिप्पणी पोस्ट करा

जे आवडते सर्वांना ...

अनुक्रमणिका

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

लेखांक १ : नर्मदे हर !

लेखांक २ : भोपाळ जवळच्या जंगलातील अपघात

लेखांक ४ : झुठा कही का ! सबकुछ तो लाए हो !

लेखांक ३ : चोराची धन

लेखांक ५ : ग्वारीघाट जबलपुर मध्यप्रदेश

लेखांक ८३ : महाराष्ट्रात प्रवेश आणि भाबरीचे भेदक भिल्ल-महात्मा फोदला गारद्या पावरा

लेखांक ७४ : लेपा बांध , वेदा संगम , कठोरा अन् मांडव्य गुंफा

लेखांक ९० : गुजरात मधील कणजी चे सान्सुभाई तडवी आणि अरण्यव्याप्त माथासर