लेखांक ८० : बडवानीचे सिद्धेश्वर मंदिर आणि बीजासन पासून शूलपाणी च्या झाडी चा प्रारंभ

आता राजघाट सोडून मैय्याकडे चक्क पाठ करून सरळ चार किलोमीटर जायचे होते . कारण इथून पुढे नर्मदा मातेच्या काठावर मनुष्यवस्ती जवळपास 0 आहे . त्यामुळे परिक्रमावासींची सेवा फारशी होत नाही . शिवाय सरदार सरोवर धरणाचे हे सर्व धारणाक्षेत्र असल्यामुळे प्रचंड प्रमाणात पाणी आडवे-तिडवे घुसलेले आहे . सर्व डोंगराळ परिसर आहे . आणि पायवाटा जवळपास नाहीतच . त्यामुळे नाईलाजाने मार्ग सोडावा लागला . वाटेमध्ये प्रचंड वीट भट्ट्या होत्या . एका वीट भट्टीमध्ये जाऊन त्यांची सर्व प्रक्रिया समजून घेतली . इथे ग्रामीण भागामध्ये अशी पद्धत आहे की लोक आपल्या घरासाठी लागणाऱ्या विटा स्वतः भाजतात .
त्यासाठी लागणारी माती आणणे ,ती गाळणे ,चाळणे , कालवणे , मळणे , घडवणे , विटा थापणे , त्या रचणे , खणखणीत भाजणे , भट्टी लावणे इत्यादी सर्व कामे घरातील सर्व लोक वाटून घेऊन करतात . यातील उष्णता किती ठेवायची आणि दगडी कोळसा व अन्य जळणाचे प्रमाण किती पाहिजे याचे ज्ञान ज्याला आहे त्याच्या विटा उत्तम होतात . समर्थ रामदास स्वामी यांनी वीट प्रकरण नावाचे एक अतिशय सुंदर प्रकरण लिहिलेले आहे . त्यात त्यांनी वीट भट्टी टाकण्यासाठी लागणारा कच्चामाल कुठला ,हत्यारे कुठली , त्याची सोय कशी लावावी , कामगार कसे पाहून ठेवावेत , त्यांना किती काम द्यावे ,किती सुट्टी द्यावी ,विटेचा दर्जा कसा तपासावा व खणखणीत वीट कशी भाजावी वगैरे सर्व गोष्टी विस्तारपूर्वक दिलेल्या आहेत . गंमत म्हणजे बालकामगार ठेवू नयेत हे देखील त्यांनी सांगितले आहे . हे प्रकरण ज्याने विस्तारपूर्वक अभ्यासले आहे त्याला या वीट भट्टीमध्ये आल्यावर नवीन काही पाहतो आहे असे वाटतच नाही . समर्थ नक्की अशा एखाद्या भट्टीमध्ये सर्व काही शिकले असतील आणि मग त्यांनी स्वभावानुसार ते लिखित स्वरूपात नोंदवून ठेवले . तुकाराम सुरवसे देखील मागून चालत येत माझ्यासोबत चालू लागले . इथून साधारण तीन किलोमीटर अंतरावर एका मंगल कार्यालयामध्ये आम्हाला भेटलेल्या बस मधल्या परिक्रमावासींचा भोजन प्रसाद चालू होता . तिथून पुढे जावे असा विचार करत असतानाच आतील लोकांनी आम्हाला पाहिले आणि आवाज दिला . कार्यालय मध्ये जाऊन सर्वांसोबत भोजन प्रसाद घेतला . या सर्वांचा परिक्रमेचा पहिलाच दिवस असल्यामुळे ते सर्वजण मोठ्या उत्कंठेने मला परिक्रमे विषयी माहिती विचारत होते . मी देखील त्यांना जमेल तितकी माहिती पुरवत होतो . भोजन प्रसाद झाल्यावर पुन्हा एकदा सर्वांनी माझ्यावर नमस्काराचा आणि दक्षिणेचा हल्ला केला .प्रचंड सेल्फी काढले गेले . आयुष्यात पहिल्यांदाच मला सेलिब्रिटी झाल्यासारखे भासत होते !  परंतु मी स्वतःला समजावून सांगत होतो . तू चालक आहेस . ती मालक आहे ! ती एक आहे तोवर तुला मूल्य आहे . ती नसली की तू शून्य आहेस ! पुन्हा एकदा भरपूर दक्षिणा जमा झाली . ती सर्व शूलपाणीच्या झाडीतच संपविण्याचा संकल्प मनोमन करून पाऊल उचलले . थोडेसे अंतर चालल्यावर दाट वस्तीचे शहर लागले . या रस्त्यावरच सिद्धेश्वराचे मंदिर आणि परिक्रमा वासी आश्रम होता . हे शहर संपले की तुम्ही शूल पाणीच्या झाडीच्या दिशेने मार्गस्थ होता . साधारण शूलपाणीश्वराची झाडी म्हणजे काय आहे याचा तुम्हाला अंदाज यावा म्हणून एक नकाशा सोबत जोडत आहे . 
पुढील नकाशा मध्ये बारकाईने खालील गोष्टी पहा .
उजवीकडे वरच्या कोपऱ्यात बडवानी शहर दिसत आहे . त्याच्यावरून निळसर रंगाची नर्मदा माता रेषेप्रमाणे वाहत आहे . इथून तोरणमाळ अभयारण्य चालू होते . हे सर्व डोंगर आहेत . तोरणमाळ वनाच्या उजवीकडे जी पांढरी रेषा दिसते आहे ती आपल्या महाराष्ट्राची सीमारेषा आहे . डावीकडे शूलपाणेश्वर अभयारण्य आहे . त्याच्या मधून पांढरी रेखा जाते तो देखील महाराष्ट्र आहे . या दोन उभ्या रेखा आणि वरती आडवी नर्मदा माता ही महाराष्ट्राची सीमा आहे . आपल्या महाराष्ट्राच्या नकाशामध्ये भारताचे डोके जम्मू-काश्मीर जसे दिसते तसे महाराष्ट्राचे जे डोके दिसते तोच हा प्रदेश आहे . खाली शहादा गाव दिसते आहे ते धुळे आणि नंदुरबार च्या सीमेवर आहे . वरचा चौकोन म्हणजे नंदुरबार जिल्हा आहे खाली धुळे आहे . डावीकडे सरदार वल्लभभाई पटेल यांची स्टॅच्यू ऑफ युनिटी दिसते आहे तिथेच सरदार सरोवर धरणाची भिंत आहे .या संपूर्ण भागामध्ये अतिशय खोल दरीमध्ये नर्मदेचा प्रचंड जलसाठा आहे .नकाशात खालच्या बाजूला दिसणारा पाणीसाठा तापी नदीचा आहे .
महाराष्ट्राच्या डोक्यावर जणू नर्मदा मातेने आशीर्वादाचा हातच ठेवलेला आहे . महाराष्ट्र शासनाने अधिकृत महाराष्ट्र गीत म्हणून ज्या गीताची नुकतीच निवड केली आहे त्यातील नद्यांचे वर्णन करणाऱ्या ओळीमध्ये त्यामुळे पहिले नाव नर्मदा मातेचे येते .
 रेवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी । एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी । 
जरी नर्मदा थेट संपर्कात नसली तरीदेखील तापीच्या किनाऱ्यावरील संस्कृती आणि नर्मदा किनार ची संस्कृती एकसारखीच आहे . नर्मदेच्या खालून तिला समांतर वाहणारी तापी नदी एकेकाळी नर्मदा नदीमध्ये मिसळत होती असे भूगोल तज्ञ मानतात नदीमध्ये मिसळत होती असे भूगोल तज्ञ मानतात . काही भूपृष्ठीय हालचालीमुळे या नद्यांचे प्रवाह विलग झाले . परंतु तरीदेखील या भारतातील दोन सर्वात जुन्या नद्या आहेत हे सर्व मान्य आहे . त्यामुळे नंदुरबार धुळे जळगाव भुसावळ अकोला अमरावती नागपूर या भागातील संस्कृती नर्मदा खंडातील संस्कृतीच्या जवळपास जाणारी आहे . सिद्धेश्वराचे मंदिर अतिशय प्रशस्त होते . एका बाजूला पत्राची शर्ट टाकून तिथे परिक्रमा वासी उतरतील अशी सोय केली होती . मी पोहोचण्यापूर्वी बरेच परिक्रमावासी तिथे येऊन थांबले होते . सायकलवरून परिक्रमा करणारे काही लोक आले होते . विशाल प्रकाश जवंजाळ नावाचा एक तेजस्वी तरुण मुलगा देखील आमच्या आधीच तिथे येऊन थांबला होता .  बडवानी शहरातील नोकरदार आणि व्यापारी लोक तिथे येऊन अतिशय प्रेमाने आस्थेने प्रत्येक परिक्रमावासीची चौकशी करत अत्युत्कृष्ट सेवा तिथे देत होते . प्रत्येक परिक्रमा वाशीला तुम्हाला काय हवे हे वेळोवेळी विचारले जात होते . परिसरामध्ये अनेक मंदिरे होती त्या सर्वांचे दर्शन करून विश्रांती घेण्यासाठी येऊन बसलो . आता प्रचंड उकाडा जाणवू लागला होता . त्यामुळे उघडाच बसलो होतो . इतक्यात सायकल वरचे परिक्रमावासी निघाले आणि जाता जाता त्यांनी आमच्या सोबत एक फोटो काढला . मी त्यांना मित्राचा क्रमांक देऊन तिथे तो पाठविण्याची विनंती केली .
कट्ट्यावर बसले आहेत ते सायकल वरचे परिक्रमा वासी आहेत . नव्या कोऱ्या हरकुलीस सायकल परिक्रमेसाठी या सर्वांनी विकत घेतल्या होत्या . प्रस्तुत परिक्रमावासी त्याची झोळी आणि तुकाराम बुवा सुरवसे व त्यांच्यासोबतचा मध्य प्रदेश परिक्रमावासी (दुखी राम ) लाल पायऱ्या चढून गेलात की मंदिरात जाता येते .
मागे असलेल्या गोदामा मध्ये परिक्रमावासीना देण्यासाठी नवनवीन वस्तू आणून ठेवल्या होत्या तसेच फोमच्या गाद्यांची चवड लावली होती . हे परिक्रमा वासी खूप हुशार आणि विद्वान होते . यांच्याशी अल्पकाळच भेट झाली तरी चांगली गट्टी जमली होती . हे जाताना मी पूजन करत बसलो आहे हे तुमच्या लक्षात येईल . माझा पूजासाहित्याचा पिवळा डबा ठेवलेला आहे . 
मंदिराचे प्रवेशद्वार . इथे स्पष्टपणे लिहिले आहे की बस मधल्या परिक्रमावाशींची सेवा येथे केली जात नाही . फक्त आणि फक्त पैदल परिक्रमावासीयांची सेवा केली जाते . 
त्याचे कारण स्वाभाविक आहे . ओंकारेश्वर मधून परिक्रमेला निघालेली प्रत्येक बस या मार्गे जाते .एका बस मध्ये ४० ते ६० लोक असतात .अचानक दोन-तीन बस आल्या तर इतक्या लोकांना सामावून घेण्याची या मंदिराची क्षमताच नाही .
हनुमान मंदिर . उजवीकडे दोन पांढरे खांब आहेत तिथे आत आम्ही मुक्काम केला होता . 
सिद्धेश्वर मंदिराचे सभागृह
श्री सिद्धेश्वर महादेव
हनुमान जी मंदिर
श्री सिद्धेश्वर हनुमानजी
परिक्रमावासींच्या मुक्कामाची सोय
आम्ही इथेच उतरलो होतो
मंदिरामध्ये मजेशीर पद्धतीने वाचवलेले झाड
आश्रमाचा माझ्या वहीमध्ये घेतलेला शिक्का
अन्नक्षेत्र ,सिद्धेश्वर नर्मदा सेवा संस्थान ,राजघाट रोड , बडवानी ?६९३९४५०२३ । ९५८९८५४००८

इथे भेटलेल्या विशाल प्रकाश जवंजाळ या तरुणाशी माझा विशेष स्नेह जुळला . बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीच्या सरस्वती नगर मध्ये राहणारा हा तरुण अतिशय हुशार विद्वान नम्र आणि ध्येयवेडा होता . नीटनेटका स्वच्छ राहणारा विशाल आपले मन देखील तितकेच नीटनेटके आणि स्वच्छ राहील याची परिपूर्ण काळजी घेत असे .
विशाल प्रकाश जवंजाळ चिखली , बुलढाणा
या परिसरातील छोट्या छोट्या गावांमध्ये माझ्या एका मित्रामुळे माझे फिरणे झालेले आहे .  धोतरा भणगोजी नावाच्या गावामध्ये राहणारा किशोर भांदुर्गे हा माथाडी कामगार माझा खूप चांगला मित्र . हे गाव चिखलीच्या शेजारीच आहे . विशालचे हस्ताक्षर खूप सुंदर होते . तसेच त्याचे बोलणे चालणे सर्व पद्धतशीर होते . 
परिक्रमेची समाप्ती करताना विशाल जवंजाळ
सोबतचा मोबाईल न वापरता मौनामध्ये परिक्रमा करणारा एक आदर्श परिक्रमावासी विशाल जवंजाळ
विशालने अत्यंत कमी वेळामध्ये अतिशय आदर्श पद्धतीने नर्मदा परिक्रमा पूर्ण केली . केवळ साधू संतांची संवाद साधणे आणि बाकी जगाशी मौन राहणे हा त्याचा नियम मला फारच आवडला .
नर्मदा परिक्रमे ने मला जे अनेक मित्र दिले त्यातील विशालचे स्थान अतिशय आढळ आहे ! अगदी या वडासारखे ! 
सध्या विशाल अरुणाचल प्रदेश सरकारच्या एका प्रकल्पासाठी तिथे राहून काम करतो आहे . परंतु परिक्रमेला जेव्हा तो आला किंवा वकिलीचे शिक्षण नुकतेच आटोपलेले होते . याने देखील माझ्याप्रमाणेच कुठलेही नियोजन न करता अचानक परिक्रमा उचलली होती . माझ्या गाठीशी आता बऱ्यापैकी अनुभव असल्यामुळे मी त्याला समोर बसवून परिक्रमा किती दिवसांमध्ये पूर्ण करता येईल याचा अंदाज बांधून दिला . नवीन चालताना सुरुवातीला काही दिवस कमी चालण्याची प्रवृत्ती असते . तसे जर याने चुकून माकून केले असते तर याची परिक्रमा पूर्ण होण्यापूर्वीच चातुर्मास लागला असता . आम्ही अक्षरशः कागद पेन घेऊन बसलो . आणि दररोज किती किलोमीटर चालल्यावर त्याची परिक्रमा पूर्ण होऊ शकते याचा गणितीय अंदाज काढला . एकही दिवस कोठेही मुक्काम वाढवायचा नाही अशी अट त्याला मी सांगितली तरच ध्येय गाठणे शक्य होते . अक्षरशः अटीतटीच्या वेळी याची परिक्रमा सुरू झाली होती ! तुकाराम सुरवसे वगैरे मंडळी चातुर्मास करणार होती त्यामुळे त्यांचा प्रश्न नव्हता . परंतु विशालला मात्र फार गतीने चालणे अत्यावश्यक होते आणि त्यासाठी लागेल ते करण्याची तयारी असल्याचे विशाल ने सांगितले . त्याने देखील सोबत फोन आणलेला नव्हता . म्हणजे फोन सोबत होता परंतु तो बंद करून ठेवला होता . याने खरोखरीच शूलपाणी च्या झाडीनंतर वेगवान वाटचाल केली आणि त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी अर्थात तीस मार्चला बरोबर त्याने समुद्र पार केला ! पलीकडच्या तटावर गेल्यावर त्याने दिवसभराचे मौन धारण केले . फक्त रात्री अंधार पडल्यावर किंवा साधुसंतांनी विचारल्यावर तो बोलायचा . बाकी शंभर टक्के मौन . हा नियम पाळल्यामुळे त्याची परिक्रमा अतिशय सुंदर रीतीने वेळेत पूर्ण झाली ! चातुर्मास लागण्याच्या आदल्या दिवशी याची परिक्रमा संपली ! याचे देखील सुमारे २० किलो वजन कमी झाले होते ! आताच्या काळातील आदर्श तरुण कसा असावा ? विशाल जवंजाळ सारखा असावा ! गंमत म्हणजे त्याच्या मौनाचे समापन झाले आणि त्याला त्याचा मित्र राम सातपुते याचा पहिला फोन आला ! राम सातपुते याला विशाल म्हणाला की तू माझ्या मौनाचे सारे पुण्य मिळवलेस मित्रा ! ( गंमत पहा ! २०२४ च्या निवडणुकीला नरेंद्र मोदी यांनी सोलापूर मतदार संघातून खासदारकीसाठी याच राम सातपुते यांना प्रणिती शिंदे यांच्या विरोधात उभे केले आहे ! )
तर असा हा आमचा विशाल ! मी त्याला गमतीने कायम म्हणतो की मी तुझ्याशी प्रचंड गप्पा मारल्यामुळेच तू उत्तर ताटावर गेल्यावर मौन धारण केलेस ! न जाणो पुन्हा माझ्यासारखा एखादा गप्पाडदास भेटायचा ! परंतु याच्या आणि माझ्या गप्पा अतिशय सकारात्मक विचारांवरच व्हायच्या . आजही होतात !  आम्ही सर्वांनी मिळून नंतर मंदिरातील आरती वगैरे एकत्रपणे केली . इथे अथर्व योगी नावाचा एक चुणचुणीत मुलगा होता त्याच्याशी चांगली गट्टी जमली . पुजाऱ्यांचा मुलगा होता हा . मंदिरातील सर्व कामांमध्ये सर्वांना मदत करत होता . प्रत्येक गोष्ट पुढाकार घेऊन स्वतः करत असे. इथे सुदाम कुलकर्णी नावाचे एक मराठी काका भेटले . यांनी सुंदर अशी गावांची यादी आणि शिवमहिम्नाचे पुस्तक मला भेट दिले .  हे काका दररोज येऊन गेली अनेक वर्षे सर्व परिक्रमावासींना गावांची यादी पुरवीत आहेत . ओंकारेश्वर पासून तसे हे स्थान जवळ असल्यामुळे या यादीचा उपयोग बहुतेक परिक्रमावाशींना होत असतो . हे सर्व कार्य ते स्वखर्चाने करतात .यांनी दिलेली पत्रके खालील प्रमाणे . 
श्री सुदाम कुलकर्णी काका यांनी बडवाणी येथे दिलेली उपयुक्त पत्रके
काकांशी थोडावेळ गप्पा मारून विश्रांती घेण्याकरता जागेवर गेलो  . इथे एक स्वयंघोषित डॉक्टर परिक्रमावासी उगाच सर्वांचे पाय तपासत फिरत होते . माझे तळपाय मुळात कडक आहेत . मी मध्यंतरी दोन अडीच वर्ष चप्पल सोडलेली होती . त्या काळात तळपायाची त्वचा राठ आणि जाड झाली ती पुन्हा पातळ झालीच नाही ! त्यामुळे काटे बीटे मोडण्याचे प्रमाण फार कमी ! परंतु यांनी माझा पाय तपासून पायात एक काटा आहे असे जाहीर केले . मला जरा देखील दुखत नव्हते किंवा वेदना सुद्धा नव्हती . परंतु यांनी ब्लेडने काटा काढण्याचे निमित्ताने माझ्या पायाची भरपूर कातडी कापून काढली आणि पायातून भळाभळ रक्त वाहू लागले . मग त्यांची पळता भुई थोडी झाली . अखेर मी देवळात जाऊन चिमुटभर हळद जखमेत कोंबली . आता संपूर्ण झाडीमध्ये ही जखम त्रास देणार होती . इतक्यात स्थानिक सेवेकरी आले आणि त्यांनी मला विचारले की मी पायात काय घालतो आहे ? मी साधी चप्पल घालतो आहे हे पाहिल्यावर ते मला आतल्या खोलीत घेऊन गेले आणि कपाट उघडले . तिथे विविध आकाराचे विविध प्रकारचे बूट चप्पल सॅंडल वगैरे होते . पायाला आरामदायक ठरेल असा एक बूट यांनी मला त्यांच्या मंडळातर्फे दिला ! अशा रीतीने परिक्रमेतील आठवे पादत्राण मला बडवानी मध्ये ७० - ७१ व्या मुक्कामी मिळाले . चप्पल देखील चांगलीच होती . ती मी मागे ठेवणार होतो परंतु यांनी मला सांगितलं की सोबत घेऊन जा आणि शुलपाणीच्या झाडीमध्ये कोणाला तरी देऊन टाक . ही कल्पना मला आवडली आणि मी चप्पल स्वच्छ धुऊन प्लास्टिकच्या पिशवीत घालून ठेवली . विशालच्या फोनवरून एक फोटो मित्राला पाठवल्या बरोबर त्याचा फोन आला . इथे मी माझे मित्र बाळासाहेब वाल्हेकर आणि घनश्याम ढाणे यांच्याशी फोनवर बोलून घेतले . विशेषतः रावेरखेडी इथे मला शामराव ढाणे ची खूप आठवण आली होती . बाजीराव हा त्याचा आवडीचा विषय . शिवछत्रपती आग्र्यावरून सुटून कसे आले असतील याचा अभ्यास करण्याकरता आग्रा ते राजगड पायी चाललेला हा मनुष्य . दिवंगत थोर इतिहासकार निनादराव बेडेकर यांचा हा जणु मानसपुत्रच . यांना मला भेटायला येण्याची इच्छा होती . आता इथून पुढे मी शूलपाणी च्या झाडीमध्ये शिरणार असल्यामुळे रेंज वगैरे मिळण्याचा प्रश्नच नव्हता . बरे हे अंतर पार करायला किती दिवस लागतात याचे नेमके उत्तर कोणीच देत नव्हते . कोणी सांगायचे दहा दिवस लागतात . कोणाला पंधरा दिवस लागले . तर कोणी चारच दिवसात पार होते असे देखील सांगितले . त्यामुळे नक्की किती दिवस लागतील याचा काही अंदाज येत नव्हता . शिवाय इथे देखील चालण्याचे अनेक मार्ग आहेत . ९० टक्के परिक्रमावासी सडक मार्गाने महाराष्ट्रातील प्रकाशा शहादा वगैरे बाजूने जातात .हे अंतर खूप लांब पडते . आणि इथे झाडी लागतच नाही . विषय निघाला आहे म्हणून एक संकल्पना स्पष्ट करून घेतो . शूलपाणेश्वराची झाडी असे आपण जेव्हा म्हणतो तेव्हा तुमच्या डोळ्यासमोर घनदाट अरण्य येत असेल .परंतु वास्तवात तसे काही नसून प्रत्यक्ष बघायला गेले तर इथल्या डोंगरांवर एक देखील झाड आढळत नाही . उघडे बोडखे डोंगर माथे आणि दूरवर पसरलेली त्यांची रांग या खेरीज इथे काहीही दिसत नाही . मी असे ऐकले आहे की पूर्वी इथे खूप घनदाट झाडी होती . परंतु माणसाच्या हव्यासापोटी ती सर्व नष्ट झाली . आता हे एक वैराण वाळवंट असल्यासारखे आहे . मध्ये कुठेही पाणी प्यायला मिळत नाही . गाव म्हणजे तीन-चार घरे असतात . आणि ती देखील कित्येक किलोमीटर लांब असतात . त्यामुळे या क्षेत्रामध्ये प्रवेश करण्यापूर्वी पुरेशी तयारी करून प्रवेश करावा लागतो . परंतु तरीदेखील पूर्वी इथे आदिवासी मामा लोक नर्मदा मातेच्या आदेशाने जी लुटालुट करायचे ती आता थांबलेली आहे . उलट या सर्व लुटारूंचा म्होरक्या असलेला मनुष्य आता येथे परिक्रमावासीं ना अन्नक्षेत्र व निवासाची सेवा देतो ! 
या मार्गाची माहिती अनेक पुस्तकांमध्ये विविध प्रकारे दिलेले आहे . माझ्याकडे असलेल्या पुस्तकामध्ये काय माहिती दिली होती ते आपण पाहूया .
बहुतेक पुस्तकामध्ये झाडीच्या मार्गाने जाऊ नका असे सुचवले जाते . परंतु जर सावकाश गतीने नर्मदा मातेवर विश्वास ठेवून चालले तर झाडी सारखा सोपा आणि सुकर मार्ग नाही असे माझे स्पष्ट मत आहे . सडक मार्गाने जाताना खूप लांबचा वळसा मारावा लागतो . अंतरही वाढते आणि मनुष्य थकून जातो कारण मैया देखील दिसत नाही .
आता इथून पुढे जाण्याचे चार मार्ग आहेत असे लक्षात घ्यावे . जिथे धरणाची भिंत आहे तिथून पुढचे गाव गोरा कॉलनी म्हणून आहे . तिथपर्यंत पोहोचण्याचे आहे असे गृहीतक ध्यानात ठेवून हे चार मार्ग आखले आहेत . पैकी पहिला मार्ग अशक्यप्राय आहे . किंबहुना हा मार्ग नाहीच आहे . राजघाट वरून बडवानी कडे न येता मैयाच्या किनाऱ्याने सरळ चालत राहायचे . इथे तुम्हाला कुठेही वाटेत काहीही मिळत नाही असे सांगण्यात येते . इथे पूर्वी जी गावे होती ती आता उठली आहेत आणि पुनर्वसित झाली आहेत . नर्मदेच्या मूळ काठावरील अनेक  तीर्थक्षेत्रे , मंदिरे ,गावे सर्व जलमग्न झालेली आहेत . आपण चालतो ते प्रत्यक्षात डोंगर माथ्यावरून चालतो . आणि उजव्या बाजूची दरी म्हणजे सरदार सरोवर चा धरण साठा आहे .  या मार्गाने गेलेला एकच मनुष्य मला भेटला आणि त्याने मला सांगितले की पुन्हा एक लक्ष रुपये दिले तरी मी त्या मार्गाने जाणार नाही इतका तो भयंकर आहे . वाटेमध्ये तीन ते चार वेळा त्याचा प्राण जाता जाता मैयाने वाचवले . अतीव धाडसाची आवड असून देखील मी सुद्धा या मार्गाने गेलो नाही . अर्थात सिद्धेश्वर मंदिरात पायाला झालेली मानवनिर्मित जखम हे एक महत्त्वाचे कारण होते . परंतु नर्मदा मातेच्या कृपेने ही जखम एक-दोन दिवसात बरी सुद्धा झाली . त्यामुळे हा मार्ग स्वीकार्य नाही , कारण मागा साधू देखील या मार्गाने जात नाहीत . मुळात हा मार्गच नाही . इथून आपण चालणे म्हणजे नर्मदा मातेच्या डोक्याला त्रास देणे आहे . इथे वन्यशापदांचे भय आहे . आणि तुमचा तोल गेल्यास पकडण्यासाठी एक सुद्धा झाड नाही. पायाखालचा डोंगर अत्यंत निसरडा आणि मुरबाड आहे . त्यामुळे आपण त्याला मार्ग क्रमांक शून्य म्हणू . आता पहिला मार्ग खालील प्रमाणे आहे .
 शूल पाणीच्या झाडीतून जाणारे जे दहा टक्के परिक्रमा वासी आहेत त्यातील सात आठ टक्के या मार्गाने जातात .
दुसरा मार्ग म्हणजे सर्वांचा लाडका सडक मार्ग . हा खालील प्रमाणे आहे .
तीन राज्यातून जाणारा हा निव्वळ सडक मार्ग अतिशय लांबचा तापदायक आणि कंटाळवाणा आहे .
मी अशा एखाद्या मार्गाच्या शोधात होतो ज्याने मी मैयाच्या जवळ देखील राहीन आणि तिचे दर्शन किंवा वेळप्रसंगी स्पर्श देखील मला घडेल . परंतु अति धोकादायक असे काही त्या मार्गात असणार नाही . वेळप्रसंगी भोजन प्रसादी नाही मिळाली तरी चालणार होते . आठवडाभर उपाशीपोटी चालण्याची तयारी मी ठेवली होती . 

       शूलपाणेश्वराची नक्की कथा काय आहे याची उत्कंठा तुमच्याप्रमाणेच मला देखील होती . त्यामुळे अगदी थोडक्यात ती कथा सांगतो .ब्रह्मदेवाचे पुत्र कश्यप ऋषींची पत्नी दिती . तिच्या मुलांना दैत्य म्हणत . अंधक नावाचा तिचा पुत्र असुरांचा राजा होता . याने ४००० वर्षे तप करून महादेवांना प्रसन्न करून घेतले आणि पार्वती मातेच्या आग्रहाखातर महादेवांकडून असा वर मिळविला की याला भगवान विष्णू शिवाय कोणीही मारू शकणार नाही . यानंतर त्याने त्रैलोक्यावर विजय मिळवला आणि पुढे हा महादेवांवरच उलटला आणि त्यामुळे चिडलेल्या महादेवांनी त्याच्या गळ्यात शूल अर्थात भाला खूपसला . त्याचे चिकट रक्त काही केल्या भाल्यावरून निघेना . महादेवांनी पृथ्वीवरील सर्व तीर्थांवर त्यांचा शूल धुवून पाहिला . परंतु त्याच्या रक्ताचे चिकट डाग काही जाईनात . अखेरीस मोठ्या रागाने या भागात येऊन त्यांनी आपल्या हाताने तो शूल पर्वतामध्ये खूपसला . हाताला संस्कृत मध्ये पाणि म्हणतात . शूलपाणि याचा अर्थ हातामध्ये भाला घेतलेला अर्थात महादेव . इथे मात्र हा भाला दोन पर्वतांमधून वाहणाऱ्या नर्मदा जलामुळे स्वच्छ झाला . त्यामुळे या तीर्थाचे नाव शूलपाणेश्वर असे पडले . आणि जिथे हा शूल घुसला तिथे एक कुंड तयार झाले आहे त्याला चक्र तीर्थ म्हणतात . इथे ब्रह्मदेवाने स्थापन केलेले ब्रह्मेश्वर नावाचे लिंग आहे आणि त्याच्या दक्षिणेला शेषशायी भगवान विष्णूंचे मंदिर आहे .  तिथे १०८ क्षेत्रपाल नित्यनिवास करतात  अशी मान्यता आहे .
इथून जवळच रुद्र कुंड , मार्कंडेय मुनींची गुहा , रणछोडजीचे मंदिर इत्यादी तीर्थक्षेत्रे आहेत . ज्याला शूलपाणीश्वराची पंचकोशी मानले जाते . जाते नव्हे जात असे कारण आता वर वर्णन केलेले सर्व जलमग्न झालेले आहे . परंतु आजही नर्मदा जला मध्ये हे सर्व जागृतपणे शिल्लक आहे . महादेवाला त्रिशूलधारी मानण्याची पद्धत आहे . परंतु नर्मदा पुराणांमध्ये देखील त्याच्या हातामध्ये शूल अर्थात भाला आहे इतकाच उल्लेख आहे . असो .
सकाळी स्नान पूजा वगैरे आटोपून निघालो . खरे तर राजघाट ते घोंगसा मैय्याकाठचा मार्ग होता . पण मला कोणीच तो सांगितला नाही . अर्थात घोंगसा इथून पुढे मात्र खरोखरीच मार्ग नाही .त्यामुळे मी आपला डांबरी रस्ता पकडून शूल पाणीच्या झाडीच्या दिशेने प्रस्थान ठेवले . अर्थात ते एका दृष्टीने बरे झाले कारण मला वाटेमध्ये झाडीतल्या मुलांना वाटण्यासाठी चांगल्या दर्जाची गोळ्या बिस्किटे आणि लेखनासाठी वही पेन वगैरे विकत घेता आले . इथे अतिशय स्वस्तातल्या गोळ्या मिळतात ज्या पन्नास रुपये शेकडा वगैरे असतात . परंतु त्यातील साखर अतिशय हलक्या दर्जाची असते व रसायने हीन प्रकारची असतात .क्वचित साखरेच्या ऐवजी सॅकरीन देखील वापरलेले असते. चव देखील विचित्र असते . त्यामुळे मी चांगल्या ब्रँडच्या गोळ्या विकत घेतल्या . त्याने माझ्या पाठीवरील भार चांगलाच वाढला ! मैया ने भरभरून दान दिलेले असल्यामुळे खर्चाची फिकीर नव्हती . दुकानदार मला सुचवत होता की असले महागडे चॉकलेट घेण्यापेक्षा साधे घ्या . स्वस्त पडतील . परंतु मी त्याला चांगल्या दर्जाचे चॉकलेटच केवळ द्यायला सांगितले . पूर्वी सांगितल्याप्रमाणे इक्लेअर्स , रावळगाव टॉफी ,मेलडी ,किस मी ,मँगो बाईट , ॲल्पेन्लीबे अशा सर्व गोळ्यांची पाकिटे विकत घेतली . सोबत एक मोठी वही आणि काही पेन घेतली . कारण माझी डायरी संपत आली होती .  कल्याणपुरा पिछौडी मार्गे एका गायत्री आश्रमात आलो . आज एकादशीचा उपवास होता .एका फळ वाल्याने सकाळीच मला सहा संत्री दिली होती . वही पेन वगैरे घेताना गुळ आणि दाणे देखील मी घेऊन ठेवले होते .  गायत्री आश्रमात दुपारी एकच्या सुमाराला मी पोहोचलो आणि अंगणामध्ये मला बसायला सांगण्यात आले . इथल्या माताराम माझ्यासाठी मोरसाळीच्या लाह्यांचा फराळ घेऊन आल्या . हा पदार्थ अतिशय चविष्ट होता . दोन मोठे पेले ताक प्यालो . 
आश्रमाकडे जाण्याचा मार्ग
सुंदर से मंदिर
आश्रमाचे प्रवेशद्वार
इथेच अंगणामध्ये घातलेल्या मांडवामध्ये मला डोळा लागला .
नर्मदा मातेचे झोकदार वळण , पिछोडी गाव आणि गायत्री शक्तीपीठ आश्रम दाखवणारा नकाशा .इतका सुद्धा मैया चा किनारा सोडायला जीवावर यायचे .
इथपर्यंत येताना वाटेत देखील एका नर्मदा भक्ताने मला दोन पेले मही अर्थात ताक पाजले होते . याने त्याच्या शेतामध्ये पाच-सहा ताडाची झाडे लावली होती . त्याची माहिती मी त्याला दिली होती. 
गायत्री आश्रमामध्ये एक ॲक्युपंक्चर चे शिबिर आणि त्या निमित्ताने प्रवचन चालले होते ते ऐकत बसल्या बसल्या मला डोळा लागला . थेट साडेतीन वाजता जाग आली . तोपर्यंत इथे बरीच भक्त मंडळी जमली होती . इथल्या माता मला राहण्यासाठी आग्रह करू लागल्या . परंतु मी पुढे जायचे ठरविले . इथे एक बीए पास झालेला परंतु सरकारी डॉक्टर आहे म्हणून सांगणारा ॲक्युपंक्चर करणारा डॉक्टर आला होता त्याला व त्याच्या निमित्ताने जमलेल्या सर्वांनाच परिक्रमेचा अर्थ माझ्या परीने समजावून सांगितला व त्यांच्या काही शंकांना उत्तरे देऊन पुढे निघालो . योगायोगाने गुगल नकाशावर या आश्रमाचे फोटो शोधताना याच शिबिराचा फलक आणि त्या 'डॉक्टरचा ' फोटो देखील सापडला !  इथे मी १५ मार्च २२ रोजी होतो आणि शिबिर १४ मार्चला चालू झाले होते . 
शिबिराचा माहिती फलक . डी ए टी याचा अर्थ डिप्लोमा इन थेरपी असा असावा . परंतु थेरपीस्टचा रुबाब डॉक्टरांच्या वर होता !
हेच ते डॉक्टर महोदय ज्यांना परिक्रमे विषयी खूप शंका होत्या .
भवती गाव ओलांडून बिजासन या गावात आलो . या सर्व गावांची नावे आता आपण लक्षात ठेवावीत . कारण ही सर्व शंभर टक्के वनवासी / आदिवासी बांधवांची वस्ती असलेली गावे आहेत . या गावामध्ये अतिशय मोठी होळी असते . या संपूर्ण परिसरामध्ये होळीचा सण हा वर्षातील सर्वात मोठा सण म्हणून साजरा केला जातो . त्याला इथं भगुराई अथवा भंगुरी असे म्हणतात . या गावांमध्ये दिल्लीवाल्या बाबांचा आश्रम एका उंच टेकडीवर होता . परंतु तिथे न जाता गावातच असलेल्या राधाकृष्ण मंदिरामध्ये थांबण्याचा निर्णय घेतला .गावामध्ये आदिवासी अर्थात मामा लोकांच्या सणाची जोरदार तयारी चालली होती .मोठीच जत्रा येथे भरते . त्याची लावा लावी सर्वत्र सुरू होती .मोठे मोठे मांडव टाकले जात होते .दुकाने बांधली जात होती . सर्वत्र धावपळ सुरू होती . बाजार ज्या मैदानात भरतो त्या मैदानातच राधाकृष्ण मंदिर होते . इथे प्रत्येक गावामध्ये कधी जत्रा असते व कधी होळी होणार ते ठरलेले असते .त्या नियोजनानुसार बिजासन गावामध्ये उद्या अर्थात १५ मार्च २२ रोजी होळी होती . परवा असाच १६ दिनांकाला सेमलेट गावामध्ये होळी होती .आणि नंतर १७ मार्च रोजी डही नावाच्या गावामध्ये ,उत्तर तटावर होळीचा सण साजरा होऊन भंगुराई संपणार होती . या यात्रा बघण्यासारख्या असतात ! गावोगावचे आदिवासी तरुण-तरुणी जमेल तितका नट्टापट्टा करून या यात्रेमध्ये येतात . मुले सुद्धा कानात गळ्यात अलंकार घालतात . टिकल्या ,गंध , लाली (rouge) , लिपस्टिक वगैरे सर्व लावतात ! रंगीबेरंगी गॉगल अडकवतात ! शक्यतो सर्व मित्र आणि सर्व मैत्रिणी एकसारखे कपडे शिवून घेतात . 
हे शक्यतो सॅटीनच्या चमकदार वस्त्राचे कपडे असतात .
 सणासाठी नटून नाचणारे आदिवासी पुरुष
 सणासाठी नटलेली एक आदिवासी स्त्री
हे सर्वच प्रेमळ अत्यंत विनोदी दिसतात ! पूर्वी तर या सणाचे स्वरूप फारच वेगळे आणि विचित्र होते . अजूनही काही ठिकाणी हे प्रकार चालू आहेत असे कळले . त्याचे काय असते . ऐका तर मग .जत्रा सुरू झाली की तरुण-तरुणींचे जथे जत्रेतून फिरू लागतात . इथे त्यांची नवीन वयात आलेल्या मुलींवर नजर असते . एखाद्या तरुणाला एखादी मुलगी जोडीदार म्हणून आवडली की तो त्याच्या मित्रांच्या सहाय्याने योजना बनवून तिला चक्क पळवून नेतो . सर्वांच्या समोर हा प्रकार घडतो . गावातील तरुण त्याला अडवू शकले तर तो तरुण काही कामाचा नाही हे सिद्ध होते . परंतु याची इच्छाशक्ती प्रबळ असेल तर तो तिला त्याच्या गावी पळवून नेतो . अशाप्रसंगी मुली देखील प्रतिकार करत नाहीत . त्यानंतर मुलीच्या बापाकडून किमान ३०,००० ते जास्तीत जास्त एक लाख रुपये उकळले जातात आणि मगच त्या मुलीची सुटका केली जाते . परंतु मुलीच्या बापाने पैसे देण्यास असमर्थता दर्शविली तर ती मुलगी कायमची त्या तरुणासोबत राहू लागते . जोपर्यंत बाप पैसे आणून देत नाही तोपर्यंत त्या मुलीवर या तरुणाचा संपूर्ण अधिकार राहतो . हा खेळ सर्व संमतीने गेली हजारो वर्षे चालू असल्यामुळे याची पोलिसात तक्रार वगैरे अजिबात केली जात नाही . सर्वांना मान्य असलेला हा प्रकार आहे . परंतु अलीकडे काही वर्षापासून हा खेळ जवळपास बंद पडल्यात जमा आहे . एकंदरीत समाजाचा कस कमी झाल्याचे हे लक्षण आहे असे जुने जाणते आदिवासी सांगतात . त्यांच्या काळात त्यांनी कशा मुली पळवून आणल्या याचे किसे ऐकताना हसून हसून माझी पुरेवाट झाली ! स्वयंवर म्हणतात ते यालाच ! इथल्या मुली देखील इतक्या चपळ असतात की त्यांनी ठरवले की एखाद्या तरुणाच्या हातात सापडायचे नाही तर त्या अजिबात सापडू शकत नाहीत ! परंतु त्यांनाच तो तरुण आवडला असेल तर मात्र त्या आपली गती कमी करून त्याच्या तावडीत सापडतात ! सगळाच अगम्य खेळ आहे ! परंतु या प्रकारामध्ये झालेली लग्न चिरकाल टिकतात असे देखील अनुभवी लोकांनी सांगितले . हा नुसता खेळ नसून 'सर्वायवल ऑफ द फिटेस्ट ' चा 'गेम ' आहे . या सणात सर्वच लोकांचा तमोगुण चरमबिंदूला पोहोचलेला असतो . कारण सर्वजण प्रचंड मोहाची दारू पितात आणि भरपेट चिकन मटण खातात . परंतु तरीदेखील धनुष्यबाण घेऊन फिरणारे काही मामा आजूबाजूला दिसतात . त्यांच्या दहशतीमुळे सर्वत्र एक प्रकारची शिस्त जाणवते .
 सोबत पैसे असल्यामुळे गरज पडल्यास असू द्यावे म्हणून एक औषध मला घ्यायचे होते . ते बिजासन मध्ये नसल्यामुळे मेडिकल वाला गाडीवर बडवानी ला गेला आणि दोन तासात औषध घेऊन आला . मला त्याने मंदिरात औषध आणून दिले . खरे तर त्याने एवढे कष्ट घेण्याची गरज नव्हती . परंतु परिक्रमावासींचा शब्द इथले लोक पडू देत नाहीत याचे हे ज्वलंत उदाहरण मी अनुभवले . इथे शेजारी एका मारवाड्याचे दुकान होते . दुकानांमध्ये मारवाडीण होती . मला आश्रमामध्ये मिळालेले बूट फारसे काही कामाचे नव्हते . कारण ते साधे चालण्याचे बूट होते . सुदैवाने मी अजून ते फारसे घातले नव्हते . काही काळ ते घातल्यावर पायाला चावत आहेत म्हणून काल धुवून ठेवलेल्या चपलाच घालून इथवर आलो होतो . या मारवाड्या कडे स्पोर्ट शूज आहेत असे मला दिसले . खरे तर मी याच्याकडे गोळ्या बिस्किटे कुठली आहे ते पाहायला गेलो होतो . सकाळी दुकानदाराने मला अतिशय भंगार चवीच्या पायनॅपल वगैरे एक-दोन फ्लेवरच्या गोळ्या खपवल्या होत्या . त्याची पाकिटे विना मोबदला विना तक्रार मारवाडीणीने मला बदलून दिली . मी बुटांची चौकशी केली आहे हे लक्षात ठेवून तिचा पती आल्यावर तिने त्याला मंदिरात पाठवले . तो मला बूट हवेत का विचारू लागला .नव्हे नव्हे एक बूट माझ्याकडून घ्याच म्हणून मागे लागला .मी त्याला सांगितले की मला कालच हे नवीन बूट मिळाले आहेत . तो मला म्हणाला ते नवीन बूट मला द्या आणि माझ्याकडचे तुम्हाला घ्या . त्याच्या आग्रहाखातर पुन्हा दुकानात गेलो . त्याने लावलेले दुकान उघडले . भगव्या रंगाचे नायकीचा लोगो असलेले ट्रू कॉपी बूट त्याने मला दिले . आणि मला मिळालेले बूट काढून घेतले . तो म्हणाला हे बूट इथे खूप चालतात . कोणीही शंभर दोनशे रुपयाला विकत घेईल .मी त्याला सुचविले की हा बूट मला फुकट मिळालेला असल्यामुळे तू देखील विकू नकोस . एखाद्या परिक्रमा वासी लाच दे . मी फार आग्रह केला तरी तो पैसे घेत नव्हता . अखेरीस कसे बसे दोनशे रुपये त्याच्या खिशात कोंबून मी बाहेर पडलो . बूट खूपच चांगल्या दर्जाचा होता . अशा रीतीने परिक्रमेतील नववे पादत्राण माझ्या चरणापाशी विसावले .  रात्री मंदिरामध्ये शांत झोप लागली . उद्या भल्या पहाटे उठून मोठे अंतर कापायचे होते . 
 श्री राधाकृष्ण मंदिर बिजासन
ह्याच उघड्या मंदिरामध्ये उजव्या बाजूला मी आसन लावले होते
मंदिरातील राधाकृष्ण देवता विग्रह
या भागातील लोक असे रंगीबेरंगी कपडे घालतात
शूलपाणीश्वराच्या नुसत्या नावातच झाडी आहे . प्रत्यक्षात सर्व डोंगर उघडे-बोडखे आहेत .
एकाही डोंगरावर तुम्हाला एखादे मोठे झाड दिसत नाही . इथले वन्य जीवन मात्र समृद्ध आहे .
बिजासन गावचे सरपंच आणि ग्रामसचिव यांच्या क्रमांक वरील प्रमाणे . रस्त्याबाबत किंवा निवासा बाबत काही शंका असल्यास आपण संपर्क करू शकता . ( कृपया वरील क्रमांकावर मदत पाठवू नये . केवळ चौकशी करता )

आज मी पार केलेली गावे खालील प्रमाणे होती . बरवानी , बरवानी खुर्द , भीलखेडा ,कल्याणपुर ,नांदगाव , बोम्या , पिछौडी , सिरसानी , कटोरा , नैनपुरा , सोंदल , भमाटा , अवलदा , भवती , अमलाली आणि बिजासन . 
ही गावे तर नर्मदा मातेच्या काठावर होती परंतु मार्ग मात्र गावागावातून होता . कारण पाण्याची पातळी वाढली की गावाचा निम्म्याहून अधिक भाग जलमग्न होतो . त्यामुळे या भागातील रस्ते नष्ट झाले आहेत . आता उद्या खूपच मोठा टप्पा पार करायचा होता . आणि हा तोच भाग होता जिथे पूर्वी परिक्रमावासींना ना लुटले जायचे ! आणि त्याची पूर्वतयारी म्हणून बिजासन गावात मुक्कामाला राहिलेल्या माणसांची गप्पा मारायला काही लोक यायचे ! आज तर मी इथे बऱ्याच लोकांशी गप्पा मारल्या होत्या ! आता उद्या काय होते ते उद्या पाहू असा विचार करून नर्मदा मातेचे स्मरण करत पाठ टेकली . उद्या काय होणार याचा विचार करून मेंदूतून स्त्रवणारे ॲड्रेनलीन चे स्त्राव प्रचंड चालून थकल्यामुळे क्षणात पाझरलेल्या मेलॅटोनिन अर्थात स्लिप हार्मोन पुढे तोकडे पडले आणि मी घोरू लागलो !





लेखांक ऐंशी समाप्त ( क्रमशः )

टिप्पण्या

  1. नर्मदे हर। छान माहीतीपुर्ण परिक्रमा वर्णन. आदिवासी प्रथा तसेच नर्मदेकाठचा परिसर वर्णन रोचक व उत्कंठावर्धक.

    उत्तर द्याहटवा

  2. छान सुरु आहे लेखमाला . बिजासन गाव आणि बिजासनी घाटाचा काही संबंध आहे का?
    कारण मध्य प्रदेशला जाताना बिजासनी घाट लागतो आणि तिथे बिजासनी मातेचे शक्तीपीठ आहे.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. बिजासनी माता हे साडेबावन्न शक्तिपीठांपैकी एक शक्ती पीठ आहे . उत्तर ताटावर आपण तिचे दर्शन घेणारच आहोत . परंतु बिजासन या गावाचा या देवीशी तसा काही संबंध नाही . दोन आसने असा या नावाचा अर्थ आहे . पूर्वी उद्भवलेल्या कुठल्यातरी राजकीय परिस्थितीचे हे वर्णन असणार आहे असा एक अंदाज .

      हटवा

टिप्पणी पोस्ट करा

जे आवडते सर्वांना ...

अनुक्रमणिका

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

लेखांक १ : नर्मदे हर !

लेखांक २ : भोपाळ जवळच्या जंगलातील अपघात

लेखांक ४ : झुठा कही का ! सबकुछ तो लाए हो !

लेखांक ३ : चोराची धन

लेखांक ५ : ग्वारीघाट जबलपुर मध्यप्रदेश

लेखांक ८३ : महाराष्ट्रात प्रवेश आणि भाबरीचे भेदक भिल्ल-महात्मा फोदला गारद्या पावरा

लेखांक ७४ : लेपा बांध , वेदा संगम , कठोरा अन् मांडव्य गुंफा

लेखांक ९० : गुजरात मधील कणजी चे सान्सुभाई तडवी आणि अरण्यव्याप्त माथासर