लेखांक ७९ : दहीबेहड्याचा नाखूनवाले दादा आश्रम आणि राजघाटावरचा 'पैशाचा पाऊस'
आता मात्र काठाने चालताना अभूतपूर्व असा चिखल दिसू लागला . चिखल तुडवून जाण्याशिवाय पर्याय शिल्लक नव्हता . त्यात माझ्या पायामध्ये अडकवून घालण्याची साधी चप्पल असल्यामुळे ती सतत चिखलामध्ये रुतून बसायची . सरदार सरोवर धरणाचे हे फुगवटा क्षेत्र असल्यामुळे पाण्याची पातळी उतरली की असा चिखल काही काळ दिसायचा . लवकरच त्याच्यावरती प्रचंड प्रमाणात गवत उगवायचे . परंतु या अतिरिक्त पाण्यामुळे मोठमोठी झाडे मात्र वठून जायची . हळूहळू अशा वठलेल्या महावृक्षांची संख्या वाढत गेली . पांढरी फट पडलेली त्यांची खोडे पाहून वाईट वाटायचे . केवळ मुळांचा खोलवर पसारा गेलेला असल्यामुळे ही झाडे अजूनही जागेवर ताठ उभी होती .
दतवाडा , गोलाता , छोटा बडदा , सनदेवा , आवली , सेगवा इतकीच गावे आज पार करता येणे शक्य होणार होते .इथे चिखलातून चालताना एक केवट राम भेटला आणि त्याने माझा फोटो काढला .
छोटा बडदा टप्प्यामध्ये एक कठीण ओढा नावेने पार करून दिल्यावर एका केवटाने काढलेले प्रस्तुत लेखकाचे छायाचित्र . मागे पाण्यामध्ये तरंगणारी मोटर दिसते आहे . एका मोठ्या बॅरलला बांधून या मोटर्स लटकत सोडतात .
आज-काल इतक्या काठाने खूपच कमी परिक्रमावासी जात असल्यामुळे काठावरील निवासी लोक कुतूहलाने फोटो काढायचे . बरेचदा गावातील तरुणांच्या व्हाट्सअप समूहावर वगैरे हे फोटो फॉरवर्ड होत असावेत असा माझा अंदाज आहे . आज हमने मैया किनारे एक परकम्मा वासी देखा वगैरे वगैरे !
गावातील लोक त्यांच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांच्या बाबतीत अतिशय सजग असतात हे नेहमी लक्षात ठेवावे ! तुमच्या नजरेमध्ये कोणीही नसले तरी तुमच्यावरती अनेक नजरा असतात याचे भान सतत बाळगावे . विशेषतः एक अशी 'मेहेरनजर' तुमचा पाठलाग करत असते जी तुमचा जीवनाकडे बघण्याचा 'नजरिया'च बदलून टाकण्याचे सामर्थ्य बाळगते ! आणि ती असते नर्मदा मातेची कृपादृष्टी ! ती तुम्हाला कुठेही पाहू शकते कारण ती सर्व साक्षीणी आहे . परंतु तरीदेखील ती आपल्याकडे पाहते आहे असे आपल्या मूढ मतीला वाटावे म्हणून आपले किनाऱ्या किनाऱ्याने चालायचे इतकेच !
चंगा बाबा आश्रमाच्या पुढे काठाने चालताना जी बेटे तुम्हाला दिसत आहेत ती मी चालताना पाणी उतरल्यामुळे संपूर्ण चिखलाचा पट्टा बनलेली होती . हे उपग्रह चित्र पाणी पातळी बऱ्यापैकी वाढलेली असताना काढलेले आहे . मी काठाने चालताना बहुतांश चिखलच होता .
मैयाकाठी अनेक माणसे भेटायची .नर्मदे हर करायची . प्रत्येक भेटणारा माणूस काठाने रस्ता नाही हेच सांगायचा . परंतु त्यात त्याचा दोष नसायचा . रस्ता नाही असे सांगताना "रस्ता " या प्रकाराची एक संकल्पना त्या व्यक्तीच्या डोक्यामध्ये असायची . परिक्रमा वासी ला सुखाने चालता यावे , सावली मिळावी , विसावा मिळावा , घरे दिसावीतघरे दिसावीत ,खायला प्यायला मिळावे ,दुकाने सापडावीत ,अधून मधून झालेच तर नर्मदा मातेचे दर्शन देखील व्हावे असा रस्ता म्हणजे परिक्रमेचा रस्ता असे काहीसे गणित बहुतांश नर्मदा तटवासी लोकांच्या डोक्यात पक्के बसलेले आहे . आणि ते तसे बसण्यास बऱ्याच अंशी बहुसंख्य परिक्रमावासी कारणीभूत आहेत . मी मात्र हट्टाने म्हणा किंवा दुराग्रहाने म्हणा परंतु काठाकाठानेच चालायचा प्रयत्न करायचो . पदोपदी मला मोहन साधूने दिलेले सल्ले आठवायचे . समोर प्रचंड माजलेला चिखल दिसला की मला मोहन साधू आठवायचा . तो सांगत असायचा , " देख बेटा , रास्ते मे तुझे बहुत लोग मिलेंगे । बतावेंगे की बाबाजी आगे रास्ता नही है। उनके पाव छूने का और पूछने का , प्रभू आप लोग चल सकते हो ऐसा रास्ता है क्या ? वे बोलेंगे हम तो आराम से चल लेते है । बात खतम ! झोली कमंडल उठाने का और चल पडने का ! " मी अगदी असेच करायचो . एकदाच शांतपणे आणि नम्रपणे समोरच्या माणसाला तुमचा काठाकाठाने चालण्याचा शुद्ध हेतू सांगितला की सर्वच लोक खूप सहकार्य करायचे असा माझा स्वानुभव आहे . शिवाय या मार्गाने जाणारे कोणीतरी खूप दिवसांनी , किंवा खूप महिन्यांनी , किंवा खूप वर्षांनी भेटले , असे देखील आवर्जून सांगायचे . त्यामुळे हुरुप अजून वाढायचा ! नर्मदा खंडामध्ये या प्रकारच्या चालण्याला तटैतटै चलना असे म्हणतात . रस्त्यावरून चालत परिक्रमा करण्याच्या प्रकाराला इकडे रोड-ई-रोड चलना असे म्हणतात .त्यामुळे कोणी अडवलेच तर मी लगेच सांगून टाकायचो . "नर्मदे हर भगवन् । हम रोडीरोड नही चलते । तटैटटै चलते है । " म्हणजे आपल्या मराठीमध्ये काठाकाठाने अथवा तटातटाने .हे ऐकल्याबरोबर तुमचे अर्धे काम होऊन जायचे . पुढे फारच धोकादायक काही असेल तर लोक सांगायचेच . आता सुद्धा वरती आपण जी छायाचित्रे पाहिली ती ज्या केवटाने काढली त्याने मला अतिशय खोल आणि धोकादायक असा एक ओढा त्याच्या छोट्याशा नावेतून पार करून दिल्यावर काढलेली आहेत . मला ओढा ओलांडून दिल्यावर तो घरी निघून गेला . मी त्याला मला मोहीपुरा गावात मिळालेल्या शेंगा देऊन टाकल्या . दिवसातून एकदा तरी नर्मदे काठी चक्कर मारल्याशिवाय ग्रामस्थांना चैन पडत नाही . ती आहेच तशी ! लाघवी ! मनस्वी ! तेजस्वी ! ओजस्वी ! तपस्वी ! प्रत्येक पावलाला तिचे स्मरण करावे आणि तीने क्षणोक्षणी आपल्याला पावावे ! अशीच ती पतीत पावना आहे ! पंत महाराज बाळेकुंद्रीकर या कर्नाटक प्रांतात होऊन गेलेल्या महान संतांचे एक पद मला पदोपदी आठवायचे !
क्षणोक्षणी विसरतो तुजला ।
परी राखीसी निशीदिनी मजला।
सेवा स्मरण काही न करिता ।
योगक्षेम वाहतोसी भला ।
आजूबाजूला रम्य काही दिसले की क्षणात तिचा विसर पडून जायचा . आपला मूळ मानवी स्वभावच असा आहे . त्यात या परिसरामध्ये प्रचंड चिखल असल्यामुळे पक्षी जीवन चांगले समृद्ध होते . दोनशे दोनशे चक्रवाक पक्षांचे थवे दिसायचे . इतक्या मोठ्या संख्येने विहार करणारे चक्रवाक पाहिल्यावर भान हरपून जायचे ! सर्वात प्रथम जेव्हा मी नर्मदाष्टक म्हटले तेव्हा मला कळाले नव्हते की इतक्या पक्षांचा आणि प्राण्यांचा उल्लेख शंकराचार्यांनी कशासाठी केला आहे ? परंतु जेव्हा प्रत्यक्ष हे सर्व प्राणी पक्षी दिसतात तेव्हा खरोखरीच आनंदाची अनुभूती मिळते ! चक्रवाक शर्मदे देवी नर्मदे ! तुझा जयजयकार असो ! छोटे मोठे भुरे बगळे तर मोजायलाच नकोत . छोटी आणि मोठे पाणकावळे , पाणकोंबड्या , पाकोळ्या , चित्रबलाक , करकोचे , आयबीस सर्वच पक्षी शेकड्याच्या संख्येने दिसत होते ! अगदी कोतवाल पक्षी सुद्धा ५० च्या गटाने उडताना मी प्रथमच पाहिले ! हा अतिशय तापट पक्षी असतो . आणि कितीही मोठा शिकारी पक्षी आला तरी त्याच्या अंगावर तुटून पडतो त्यामुळे कोतवालाचे घरटे ज्या झाडावर असेल त्या झाडावर तुम्हाला अनेक पक्षांची घरटी सापडतात . बघा नुसता पक्ष्यांचा विषय निघाला तरी मैया चा विसर पडला ! असेच काठावर चालताना देखील व्हायचे ! पक्षी बघत चालताना आपण कुठे आहोत काय करतो आहोत या साऱ्याचे भान विसरून जायचो . मग ती हळूच एखादी टपली मारायची ! गुडघ्यावर आपटायचो , किंवा घसरून पडायचो , किंवा तोल जायचा , किंवा पाय मुरगळायचा आणि मग क्षणात भानावर यायचो ! नर्मदा मातेचा जयजयकार करून पुन्हा चालायला लागायचो . मी अशी कल्पना करायचो साडीच्या पदरावर जशी पशु पक्षांची चित्रे ओळीने काढलेली असतात तशा या जिवंत पक्षी मालिका नर्मदा मातेने ल्यालेल्या आहेत ! या सर्वांवर कडी करायचे ते वरडोळा नावाचे मासे ! हे मासे दोन डोळे वरती काढून अतिशय गमतीशीर प्रकारे समूहाने पोहताना दिसत . हिरवट पोपटी रंगाचे हे मासे दुरून पाहिल्यावर एखाद्या सापासारखे वाटायचे . पण त्यांचे डोळे पाहिले की हसून हसून पुरेवाट व्हायची ! इतक्या मजा मजा ते पोहताना करायचे ! आद्य शंकराचार्य म्हणतात त्वदम्बुलीनदीनमीन दिव्यसंप्रदायकम् ! अर्थात तुझ्या पाण्यामध्ये रमामाण झालेल्या गरीब बिचाऱ्या माशांना दिव्यत्व प्रदान करणारी अशी तू आहेस ! विषय निघालाच आहे म्हणून या वरडोळा माशा विषयी थोडेसे संशोधन घडले ते सांगतो . ॲनाब्लेप्स किंवा फोर आईड फिश अर्थात चार डोळ्याचा मासा असे या माशाचे नाव आहे . हा प्रामुख्याने दक्षिण अमेरिकेत आढळतो .
दक्षिण अमेरिकेच्या फ्रेंच गुयाना , सूर्यनाम अथवा सूरीनाम , गुयाना या देशांमध्ये हा मासा आढळतो . गमतीचा भाग म्हणजे या भागामध्ये फार मोठ्या प्रमाणात हिंदू लोकसंख्या गेली हजारो वर्षे आहे . आपण गयाना असा उल्लेख करतो परंतु प्रत्यक्षात ते गुयाना आहे . इथल्या सत्ताधारी पक्षाची वेबसाईट करण्याचे काम एका मित्रासोबत मी करून दिले होते त्यामुळे मला हे माहिती आहे . इथे अनेक वर्षे निरंकुश सत्ता गाजवणारा रामअवतार नावाचा हिंदू राजकारणी होता . आजही त्या भागात फार मोठ्या प्रमाणात हिंदू लोक आहेत . आणि हे आत्ता गेलेले नसून हजारो वर्षांपूर्वी तिथेच स्थलांतरित झालेले आहेत . कॅरिबियन बेटे गौतमालय अथवा ग्वाटेमाला तसेच गुयाना खंडातील देश इथे प्रामुख्याने तमिळ वंशीय लोक आढळतात . कारण नौकानयनाचा प्रगत अभ्यास जगात सर्वप्रथम तमिळ दर्यावर्दींनी हे आता सर्वमान्य आहे .अलीकडच्या काळात या लोकांनी धर्म बदलले असले तरी आपली मूळ भारतीय नावे तशीच ठेवली आहेत . या काळामध्ये मी ७२ राजकारणी लोकांचे कार्टून कॅरिकेचर बनवून दिले होते . बहुतांश लोक भारतीय होते ! आता संशोधकांना मला इतकेच सांगायचे आहे की नर्मदा खंडातून हा मासा तिकडे गेला की तिकडून नर्मदा खंडामध्ये आला याचे कृपया संशोधन करावे ! हा मासा पाण्याच्या वर आणि पाण्याच्या खाली एकाच वेळी बघू शकतो ! त्याचे डोळे त्यासाठी बनलेले आहेत .
वर डोळा मासा किंवा चार डोळ्याचा मासा ( ॲनाब्लेप्स )
त्याचे हे हसरे तोंड मी खूप वेळा पाहिले आहे ! या माशांना काठावर काय चालू आहे याची प्रचंड उत्कंठा असते !
विशेषतः तुम्ही जोपर्यंत जात नाही तोपर्यंत ते तुम्हाला अजिबात पाठ दाखवत नाहीत ! सतत ते डोळे तुमचा वेध घेत असतात ! नर्मदा परिक्रमा ज्यांनी काठाने केलेली आहे त्यांना हा मासा दिसला नाही असे होऊच शकत नाही इतक्या बहुसंख्येने हे नर्मदेमध्ये आहेत .
मी काठावर शांतपणे बसून बगळे मासे कसे पकडतात ते पाहायचो . विशेषतः काठाने मनुष्य चालला की वर डोळा मासा मला शोधायला वर येणार हे माहिती असल्यामुळे हे बगळे माझ्यासोबत उडायचे ! या सर्व मजा मजा तुम्हाला नर्मदा परिक्रमेमध्ये पदोपदी अनुभवायला मिळतात ! फक्त आपले चहुकडे चौकस लक्ष पाहिजे . आजूबाजूला खूप मजेशीर घटना घडत असतात ! या माशाचे अजून एक वैशिष्ट्य आहे . यातील नर आणि मादी यांचे जननेंद्रिय एका कुठल्यातरी बाजूला असते . डाव्या किंवा उजव्या . त्यामुळे यांची जोडी फार मुश्किलीने बनते . उजव्या हाताचा नर आणि डाव्या हाताची मादी असेल तरच त्यांची जोडी बनू शकते . तसेच डावा वर आणि उजवी मादी एकत्र नांदतात . असे जोडीने एकत्र पोहणारे ॲनाब्लेप्स मासे देखील मी खूप पाहिले .
उडता उडता पाणी पिणारा कोतवाल पक्षी (सर्व छायाचित्रे संग्रहित आहेत )
काठाने चालत येणारा एखादा परिक्रमा वासी दिसला की लगेच चक्रवापक्षी आवाज द्यायचा "आला आला ! " चक्क आला असा शब्द आपल्याला ऐकू येतो !
हे पक्षी किती भाग्यवान आहेत ! दिवस-रात्र नर्मदा मातेमध्ये संचार करतात ! म्हणून तर ती त्यांचे कल्याण करते ! चक्रवाक शर्मदे ! शर्म म्हणजे कल्याण , शर्मदा म्हणजे कल्याण करणारी नर्मदा !
चालताना वाटेत काही घाट लागले . परंतु फारशी मनुष्य वस्ती नव्हती . आज दुपारी निघाल्यामुळे अंतर निम्मेच चालणार होतो .
अशा रीतीने कित्येक वर्षे जुनी झाडे वठलेली पाहणे वेदनादायक होते . खाली देखील वठलेल्या झाडांचे ओंडके पडलेले आपण पाहू शकता .
घाटावरील देवळ्या
श्री अग्नेश्वर महादेवाचे मंदिर . नर्मदा पुराणा मध्ये ज्या ज्या मंदिरांचा उल्लेख आलेला आहे त्या सर्व मंदिरांना तीर्थ म्हणण्याची पद्धत नर्मदा खंडामध्ये आहे . हे मंदिर देखील तीर्थक्षेत्र असून त्याची अवस्था किती साधारण आहे पहा .
श्री अग्नेश्वर महादेव
इथून पुढे चिखलातूनच मार्गक्रमण करत राहिलो . पाणी नुकतेच उतरल्यामुळे हा चिखल झालेला होता . कदाचित दोन-तीन दिवसांनी वरचा पृष्ठभाग वाळला असता . संदेवा आणि आवलीया गावांच्या मध्ये खेडापती हनुमंताचे एक छोटेसे मंदिर , एका भव्य वटवृक्षापाशी होते . त्याचे दर्शन घेऊन पुढे चालत राहिलो .
इथून पुढे चिखलातूनच मार्गक्रमण करत राहिलो . पाणी नुकतेच उतरल्यामुळे हा चिखल झालेला होता . कदाचित दोन-तीन दिवसांनी वरचा पृष्ठभाग वाळला असता . संदेवा आणि आवलीया गावांच्या मध्ये खेडापती हनुमंताचे एक छोटेसे मंदिर , एका भव्य वटवृक्षापाशी होते . त्याचे दर्शन घेऊन पुढे चालत राहिलो .
श्री खेडापती हनुमान मंदिर
मंदिर परिसरातील भव्य वटवृक्ष
पुढे चालत राहिलो . हळूहळू एक टेकडी वजा टापू डाव्या हाताला दिसू लागला . सूर्य मावळतीकडे झुकला होता . इथे राहण्याची काही सोय झाली तर पहावी असा विचार करेपर्यंत नाव वल्हवत घरी निघालेल्या एका केवटाने इशारा केला की टेकडीवर जावे . त्याप्रमाणे मी वरती चढू लागलो . मुरमाड जमीन होती . झाडी देखील कमी होती . त्यामुळे पाय सटकत होते . खाली सर्वत्र केळी , वांगे अशी शेती होती . केळीच्या झाडांना ठिबक सिंचनाद्वारे एकत्र औषध घालण्याची एक सुंदर सिस्टीम इथे लावलेली मी पाहिली . आणि शेतकऱ्याकडून ती कशी चालते वगैरे समजावून घेतले . गुजरात मध्ये हे संयंत्र बनत होते . वापरण्यासाठी अतिशय सोपे होते . औषधाचा अपव्यय टाळणारी यंत्रणा होती . डोंगरावर एके ठिकाणी मला जेसीबी ट्रॅक्टर वगैरे दिसू लागले . वरती गेल्यावर एक छोटा मुलगा धावतच स्वागतासाठी आला . हा दही बेहडा नावाच्या गावातील नाखूनवाल्या बाबांचा आश्रम होता .
नाखून वाले बाबांचा आश्रम येण्यापूर्वी नर्मदा मैया चा किनारा असा आहे . सर्वत्र चिखल पाणी दलदल यांचे साम्राज्य पसरलेले आहे .
टेकडीच्या सर्वोच्च बिंदू वरून काढलेले आश्रमाचे चित्र . उजवीकडे भगवा कळस दिसतो आहे ते हनुमान मंदिर आहे . त्याला लागूनच परिक्रमावासींची खोली आहे . डावीकडे मोठी गोशाळा आहे . मधोमध दिसणाऱ्या झाडाखाली साधुकुटी आहे .
समोर दिसणाऱ्या निळ्या भिंतीच्या खोलीमध्ये मी मुक्काम केला . हिरवे कापड लावले आहे तिथे चूल आहे . अंगणामध्ये बसूनच भोजन केले होते .
महाराजांना परिसराची रंगरंगोटी करण्याचा छंद आहे असे जाणवते . प्रत्येक छायाचित्रांमध्ये वेगळ्या रंगाच्या भिंती दिसत आहेत .सर्व चित्रे गूगल नकाशावरून साभार .
या परिसरामध्ये लांडग्यांचा मुक्त वावर आहे . त्यामुळे छोट्या जनावरांची काळजी घ्यावी लागते . आश्रमाचे वर जोडलेले एक व्यापक चित्र टेकडीच्या ज्या बिंदू वरून काढले आहे त्या बिंदूवर उभा असलेला लांडगा .
पूर्वी इथे नखे न कापण्याचा संकल्प केलेले एक संत राहत असावेत .इथे असलेल्या महंतांच्या समोर जाऊन मी नमस्कार केला . परंतु ते माझ्याशी एकही शब्द बोलले नाहीत . मी त्यांना नाखून वाले दादा यांच्या बद्दल विचारले तरी देखील त्यांनी काही उत्तर दिले नाही . पुढे जावे किंवा काय करावे अशा विचारांमध्ये असतानाच या छोट्या मुलाने एक खोली उघडून दिली आणि मला आत मध्ये मुक्काम करण्याची सूचना केली . ही खोली मैयाच्या बाजूला असल्यामुळे मग याचे सुंदर दर्शन होत होते . खोली अत्यंत अंधारी होती . दोन-तीन छोट्या खिडक्या होत्या . अंधारामुळे आत मध्ये प्रचंड डास होते . एका कोपऱ्यामध्ये मी आसन लावले .पूजा अर्चा वगैरे आटोपून घेतले . आश्रमामध्ये एक गोशाळा होती . ती पाहिली . हनुमंताचे सुंदर देवालय होते . तिथे बसून मारुतीची स्तोत्रे वगैरे म्हणू लागलो . इतक्यात साधु महाराज आले आणि मारुतीची आरती झाली . तेव्हा देखील ते एकही शब्द माझ्याशी बोलले नाहीत . त्यानंतर थोडावेळ मंदिरामध्ये बसून मी शांतपणे झोपी गेलो . उपाशीपोटीच झोपलो . खरे म्हणजे साधूंना मी विचारू शकत होतो की भोजन प्रसाद ची काय सोय होऊ शकते . परंतु परिक्रमेच्या नियमामध्ये हे बसत नाही . अशा पद्धतीने नर्मदा मैया तुमच्याकडून तितीक्षा या गुणाचा अभ्यास करून घेत असते. अगदीच भूक लागली तर कमंडलू मध्ये नर्मदा जल असतेच ते प्यायचं .मनात जर असा संकल्प केला की मैय्या मला भूक लागली आहे , तुझ्या जलाने माझे पोट भरू दे ,तर तुमची भूक शांत होते ,हे मी स्वतः अनुभवले आहे . तसेच करून शांतपणे पडलो . परंतु त्या खोलीमध्ये इतके डास होते की त्यांनी मला फोडून काढले . मी मनोमन विचार केला की बरे झाले चला ! किमान डास तरी उपाशी झोपणार नाहीत ! थोड्या वेळातच मला डोळा लागला . चिखलातून चालणे दमवणारे असते . पायाची शक्ती निघून जाते . कारण प्रत्येक पाऊल उचलायला तुम्हाला दुप्पट शक्ती लावावी लागत असते . रात्रीचे साडेदहा अकरा वाजले असतील . तीन-चार छोटी मुले मला उठवायला आली . खोलीमध्ये पूर्ण अंधार होता . मला एक क्षणभर कळेना काय चालू आहे . मुलांनी मला जागे केले आणि म्हणाली , "बाबाजी चलो भोजन करते है । " मी त्यांना विचारले , "तुम्ही कोण आहात ? " त्यांनी मला सांगितले की ती आसपास राहणारीच मुले होती व संध्याकाळी आश्रमामध्ये खेळण्यासाठी व गोसेवा करण्यासाठी येत असत . त्या सर्वांनी गोठा झाडून साफ केला होता . गाईंच्या धारा काढल्या होत्या . त्यांना व्यवस्थित चारापाणी केले होते . आणि इथेच परिक्रमावासींसाठी ठेवलेल्या शिध्यापासून सुंदर अशी भाजी आणि टिक्कड बनवले होते . "म्हणजे इथे परिक्रमावासींना सदाव्रत मिळते का ! " "होय तर शंभर टक्के मिळते " त्यांच्यातला सर्वात मोठा मुलगा उत्तरला . त्याचे वय अंदाजे दहा-बारा वर्षे असावे . बाकीची मुले सहा सात आठ वर्षाची होती . इतक्या लहान वयात इतकी समज येते कुठून असे शहरी मनुष्यास वाटू शकते . परंतु खेडोपाडी राहणाऱ्या मुलांमध्ये समज लवकर येत असते हे आपल्यापैकी बहुतेकांना अनुभवाला आलेले असेलच . त्यातच अजून थोडी अधिकची समज नर्मदा खंडातल्या मुलांना असते हे मी अनुभवले . अनेक वेळा अनुभवले . त्यातलाच हा एक प्रसंग होता . मी जेवायला बसलो तेव्हा स्वयंपाक ज्याने केला होता तो मुलगा मला सांगू लागला . हा साधू स्वभावाने थोडासा अलिप्त आणि विक्षिप्त होता . इंग्रजीमध्ये त्याला मूडी असे म्हणतात . म्हणजे यांचा मूड असेल तर ते पंचपक्वान्नांचा स्वयंपाक करून खाऊ घालायचे . आणि नसला की ही अशी तऱ्हा होती . त्यामुळे ही मुले गोसेवा करून खरे तर घरी गेली होती . पण या ११ - १२ वर्षाच्या मुलाला असे वाटले की आज बहुतेक स्वामीजी रागाच्या भरात आहेत . तरी एकदा परिक्रमावासी जेवला का ते बघून यावे . चूल थंड पडलेली पाहिल्यावर त्याने ओळखले की परिक्रमावासी उपवासी झोपी गेलेला आहे .मग त्याने लगेच निर्णय घेतला मी स्वयंपाक करून याला खाऊ घालावे आणि मगच घरी जावे . त्यानंतर त्याने मित्रमंडळी गोळा करून आणली . कुणी भाजी चिरली , कुणी कणिक मळली तर कोणी पोळ्या भाजल्या . ही मुले कोण मला माहिती नाही . या मुलांची माझी आयुष्यात पुन्हा भेट होईल का? ते देखील माहिती नाही . जरी भेट झाली तरी मी त्यांना ओळखेन का ? तर ही देखील शक्यता कमीच आहे . मग त्यांनी माझ्यासाठी इतके का करावे ? हेच नर्मदे काठी राहणाऱ्या लेकरा बाळांना देखील उमगलेले अध्यात्म आहे . जो त्रास मला होऊ शकतो तो समोरच्याला देखील होऊ शकतो याची जाणीव प्रत्येकाला असली पाहिजे . जे केल्यावर मला बरे वाटेल ते केल्यावर समोरचा देखील सुखावेल याचा अंदाज असला पाहिजे . जो परमात्मा माझ्या शरीरात वास करत आहे ,तोच परमात्मा समोरच्या देहाला देखील हलवीत आहे , याची प्रचिती आल्याखेरीज अशी कृती घडणे शक्य आहे काय !? नेमाडी भाषेमध्ये या मुलांच्या गप्पा चालू होत्या . आपण फार मोठे काहीतरी पुण्य कर्म केले आहे असा अविर्भाव त्यांच्या कुठल्याच कृतीमध्ये किंवा वाणीमध्ये अजिबात झळकत नव्हता . उलट आपण केले ते आपले कर्तव्यच आहे असाच भाव मला त्यांच्या वागण्यातून जाणवत होता . विशेषतः त्यातील एका सात आठ वर्षाच्या मुलाने बोललेले वाक्य माझ्या काळजाला स्पर्श करून गेले .तो नेमाडी भाषेत बोलला परंतु मला त्याचा आशय नेमका कळाला . तो म्हणाला , "आम्ही उपस्थित असताना एखादा परिक्रमावासी गावातून उपाशी निघून गेला हे मैया ला जर कळाले तर ती आम्हाला क्षमा करेल काय बाबाजी ? " मैयाच्या प्रती लोकांचे किती प्रेम आहे हे असे पदोपदी जाणवते . आबालवृद्ध सर्वचजण सतत तिचे ऋणाईत असतात . मुलांना आवरा-आवरीला मदत करून झोपायला निघून गेलो . चौघांना प्रेमभराने मिठ्या मारल्या . त्यांना देण्यासाठी माझ्याकडे अजून होते तरी काय ! प्रेम द्यावे प्रेम घ्यावे ! प्रेमे प्रेमची वाढवावे ! मुले देखील आनंदाने परतली . सकाळी आम्ही आल्याशिवाय जाऊ नका असे सांगायला विसरली नाहीत ! मला भरपूर चावून घेतल्यामुळे डासांचे देखील पोट भरले होते . त्यामुळे उत्तर रात्री शांत झोप लागली . सकाळी लवकर उठून आन्हीके आटोपून घेतली . थोडीशी गोसेवा केली . इतक्यात एक मुलगा आलाच . त्याने सुंदर असा चहा बनवून दिला . माझ्या खोली समोरच एका रंगीबेरंगी खोलीमध्ये साधु महाराज मुक्कामाला होते . छोटीशीच खोली असली तरी वर एक मजला चढवला होता . मुलाने मला कोरा चहा करून आणून दिला . आणि म्हणाला चला आता मी गाई चारायला घेऊन जातो आहे आपण एकत्रच जाऊया . मी सामान उचलेपर्यंत हा गुरे घेऊन आला सुद्धा . महाराजांची इच्छा दिसत नाही असे पाहून त्यांची परवानगी न घेताच मी नर्मदे हर असा जोरात पुकारा करून पाऊल उचलले . टेकडी मुलाच्या गतीने वेगाने उतरलो . याला काहीतरी द्यावे असे मला फार वाटत होते . इतक्यात मला आठवले की बंगाली परिक्रमावासेने मला दिलेली हॅट पद्धतीची टोपी मी कधीच वापरणार नव्हतो . ती टोपी मी त्या मुलाला दिल्यावर त्याचा आनंद गगनात मावेना ! टोपी घालून तो त्याच्या लाडक्या वासरा समोर गेला आणि त्याला टोपी दाखवली ! मी पावलांना गती दिली होती परंतु जाता जाता त्याच्या बाललीला पाहत होतो . नंतर त्याने ती टोपी त्या वासराला घातली ! पुन्हा स्वतः घातली ! ते निरागस बालपण पाहून फार आनंद वाटला ! छोट्या छोट्या गोष्टींमधून सुद्धा आनंद घेता आला पाहिजे ! आनंद समोरच्या वस्तूमध्ये नसतोच ! तर तो आपल्याला आपल्या अंतर्यामी उत्पन्न करावा लागतो . लहान मुले निष्कपट निष्पाप असल्यामुळे त्यांना हे सहज साध्य होते . मी अतिशय वेगाने किनारा पकडला . हा बडवानी जिल्हा होता . लवकरच शुलपाणीच्या झाडीमध्ये प्रवेश करावा लागणार होता . इथून जवळच असलेल्या राजघाटापर्यंत गेल्यावर किनारा सोडावा लागणार होता . कारण इथून पुढे भयानक डूबक्षेत्र चालू होते . हे डूब क्षेत्र किती भयंकर आहे याचे काही ड्रोन व्हिडिओ युट्युब वर उपलब्ध आहेत ते आपण अवश्य पहावेत . आता किनारा सोडावा लागणार या कल्पनेने व्यथित झालो आणि गती एकदम कमी करून टाकली . इथले नर्मदा जल अतिशय शांत आहे . पाण्याला प्रचंड खोली आहे . उथळ पाण्याला खळखळाट फार ही म्हण काही उगाच नाही आली . जितके पाणी खोल तितके खरोखरच अतिशय शांत भासते . चिखलाचे प्रमाण वाढतच होते . त्यासोबतच पक्षी जीवन देखील समृद्ध होत चालले होते . मानवी वावर जवळपास 0 होता . कोणी पूर्वी चालत गेल्याच्या खाणाखुणा देखील दिसत नव्हत्या. नाही म्हणायला त्या परिसरामध्ये एक अतिशय विचित्र वास भरून राहिला होता . हा वास खरंतर दुर्वास अथवा दुर्गंध मला ओळखीचा वाटत होता . इतक्यात त्या वासाचे उगमस्थान सापडलेच ! सांगलीला कृष्णामाईच्या माई घाटावर किंवा सरकारी घाटावर किंवा कधीतरी विष्णू काठावर पोहायला जायचो . मगरींचा वावर कुठल्या भागात आहे त्यानुसार घाट बदलायचा . तेव्हा मी काठावर चाललेल्या दारूच्या हातभट्ट्या पाहिल्या होत्या . हो वास पक्का नाकात बसला होता . इथे देखील तोच वास येत होता . इथून पुढे खूप साऱ्या हातभट्ट्या मी पाहिल्या . हातभट्टीची दारू बनविताना त्याचा माल मसाला सतत उकळावा लागतो व एका नळीतून वाफ गोळा करून ती तत्काळ थंड करावी लागते . आता हे सर्व प्रकरण थंड करण्यासाठी वाहते पाणी आवश्यक असते . त्यामुळे नर्मदा मातेतील वाहत्या पाण्याचा वापर करून दारू थंड केली जाते . ज्याला दारूचे व्यसन नाही असा मनुष्य जवळ देखील जाऊ शकणार नाही इतका हा घाण वास असतो . ज्या मडक्यामध्ये दारू भरलेली आहे अशी मडकी मातीमध्ये खड्डा करून लपवून ठेवलेली असतात . हातभट्टी वाले तुम्ही विचारलेल्या सर्व प्रश्नांची दिलखुलास उत्तरे देतात . हा धंदा अवैध आहे हे माहिती असल्यामुळे परिक्रमावासींना मान देऊन थोडेफार पुण्य कमविण्याचा हा केविलवाणा प्रयत्न असतो . तुम्ही या भट्टी विषयी बाहेर वाच्यता न करणे अपेक्षित असते . काही भट्टी वाल्यांनी तर मला असे देखील सांगितले की त्यांना हे सर्व करण्याची लाज वाटते परंतु दुसरा कुठला धंदा पुरेसे उत्पन्न देत असल्यामुळे दुर्दैवाने हे करावे लागते . बरेच भट्टी लावणारे स्वतः ती दारू पीत नाहीत . अनेकदा गावठी दारू पिल्यामुळे बऱ्याच लोकांचा मृत्यू झाला अशी बातमी आपण वाचतो ती दारू अशाच ठिकाणी अतिशय बेकार पद्धतीने बनविलेली असते . दारू हा आपला विषय नाही परंतु तरीदेखील त्याचे एवढे रसभरीत वर्णन मी का करतो आहे असा प्रश्न तुम्हाला पडणे स्वाभाविक आहे . हेतू इतकाच आहे की मुळात नर्मदे काठी काय काय प्रकार निर्विघ्नपणे आणि तिच्याच कृपेने सुरू असतात याची आपल्याला कल्पना यावी . भट्टी लावण्यापूर्वी मैयाची रीतसर पूजा केली जाते ! इतकंच नव्हे तर दारू तयार झाल्यावर पहिला घोट मैयालाच पाजला जातो . नर्मदा माता कळणे किती कठीण आहे विचार करून पहा ! तिने काहीही स्वीकारावे म्हणजे नक्की काय काय स्वीकारावे याचे हे एक उदाहरण ! सारेच अगम्य आहे . नर्मदा माता कुठल्याही याचकाला निराश करीत नाही हेच याचे सार आहे . इथे खूप सारे ओढे आडवे आले होते . ते इतके खोल आणि गाळाने भरलेले होते की ते ओलांडण्यासाठी बरेचदा अर्धा एक किलोमीटर आत मध्ये जावे लागायचे तरीदेखील गुडघाभर चिखलातून चालल्यावरच पैलतीर सापडायचा .
उजव्या हाताला नर्मदा माता वाहते आहे . तिच्या काठाने चालत जाताना डावीकडून येऊन मिळालेला ओढा लक्षात येत नाही . मग पुन्हा उलटे फिरावे लागते आणि जिथे ओढा पार करता येणे शक्य आहे अशा ठिकाणावरून तो पार करावा लागतो . दही बेहड्यानंतर आडवा आलेला हा पहिलाच ओढा .
बऱ्याच अंतरापासून मला एक पूल दिसत होता . हा बडवानी आणि धार यांना जोडणारा ३० मोर्यांचा तीन किलोमीटर लांबीचा पूल होता . परंतु कितीही चालले तरी हा पूल जवळच येत नव्हता ! इथे देखील मोठ्या प्रमाणात पाणी उपसणाऱ्या मोटर्सच जाळे होते .अचानक महापूर आला की या सर्व मोटर पाईप सकट वाहून जात आणि बडवाणीच्या पुलाला जाऊन अडकत . हे मला एका शेतकऱ्यानेच सांगितले . इथे अडकलेल्या मोटर्सच्या जंजाळातून मग लोक आपापली मोटर ओळखून परत आणायचे . आता वाटेमध्ये कसरावद घाट लागला . यालाच छोटी कसरावद असे सुद्धा म्हणतात .इथे दक्ष प्रजापतीने सहस्र यज्ञ केले होते . या घाटावर तीन छोटीशीच परंतु अतिशय पुरातन व नितांत सुंदर अशी शिवमंदिरे होती . वीट काम होते आणि प्लास्टरवर सुंदर असे कोरीव काम व नक्षीकाम केलेले होते . या मंदिरांचे सौंदर्य खरोखरीच लक्षात राहण्यासारखे होते .
छोटी कसरावद घाटावरील तीन सुंदर शिवमंदिरे . शेजारी हनुमंताचे देवालय .
या ठिकाणी नर्मदा मातेचे पात्र अति भव्य आहे . मंदिरांच्या मागे कसरावदचा पूल दिसतो आहे . धरणाचे पाणी वाढल्यावर ही मंदिरे डुबक्षेत्रात जातात . तरी देखील त्यांचे बांधकाम टिकून आहे .
डूब मध्ये गेलेली मंदिरे मागे दिसत आहे पहा
कसरावद भागामध्ये पूर आल्यावर नर्मदा मैया अशी वाहते ! कुसुमाग्रजांची 'कणा' कविता आठवून देणारे हे दृश्य आहे !
इथे शेजारी अजून एक मारुतीचे मंदिर होते .दर्शनासाठी आलेले एक नवविवाहित नवरा बायको भेटले . हे दोघे केवट होते . रात्रभर नावे मध्ये बसून मासे पकडायचे . कल्पना करा इतक्या भयाण रात्री नदीच्या मधोमध नावे मध्ये बसून मासे पकडणे तेही संपूर्ण अंधारात , किती कठीण आणि धाडसाचे काम आहे ! त्या माताराम चे मला कौतुक वाटले . आज काल सुशिक्षित शहरी मुली शक्यतो आपल्या पतीला त्याच्या व्यवसायामध्ये एका मर्यादेच्या बाहेर जाऊन साथ देण्यास स्पष्ट नकार देतात .आणि इथे तर तीन किलोमीटर रुंदीच्या नर्मदा पात्रामध्ये रात्र काढायची आहे ! नुसते बसून राहायचं नाही जाळे पसरायला मदत करायची आहे , नाव वल्हवायला मदत करायची आहे .मासे गोळा करायचे आहेत .
हीच ती तीन मंदिरे आणि खाली नांगरलेल्या नावा . परंतु या चित्रावरून नर्मदेचे पात्र किती मोठे आहे याचा अंदाज येत नाही . म्हणून अजून एक नकाशा खाली जोडतो आहे .
आता या चित्रामध्ये पुन्हा त्याच नाव आणि तीच मंदिरे खालच्या बाजूला दिसत आहेत पहा . यावरून तुम्हाला कळेल की रात्री मासेमारीसाठी किती मोठ्या पात्रामध्ये राहावे लागते .
छोटी कसरावद चा पूल आणि डोहकूप
किनाऱ्याने चालण्याचा मार्ग हा असा आहे .
पात्राच्या भव्यतेचा अंदाज यावा म्हणून पुलावरून काढलेले संग्रहित छायाचित्र सोबत जोडत आहे .
रात्रभर असे नावेत बसून राहायला कंटाळा येत नाही का असे विचारल्यावर दोघेही लाजले आणि निघून गेले ! नर्मदा मातेला बिचारीला कोणाकोणाचे काय काय चोजले पुरवावे लागतात हे तिचे तिलाच ठाऊक .
रेवा आणि नावा यांचे अतूट नाते आहे
मध्ये नरसिंहाचे एक मंदिर लागले .
शेजारीच हनुमंताचे मंदिर देखील होते .
इथून थोडेसे पुढे चालत गेल्यावर अखेरीस तो पूल आला . पुलाला लागूनच एक डोह कूप होते .
छोटी कसरावद येथील पूल आणि डोहकूप . मध्ये अशा काही जलमग्न समाधी लागतात . अनेक समाधी महापुरामध्ये वाहून जातात . अनेक समाधी वाहून येतात . चालताना सर्वत्र असा चिखल पार करावा लागतो . इथे समोर नाव दिसते आहे तो आडवा आलेला ओढा आहे . हा पार करण्याकरता बरेच आत जावे लागले .
हाच तो ओढा आणि त्याच्या काठावरील समाधी . बरेच आत गेल्यावर हा ओलांडता आला .
थोडेसे पुढे आल्यावर सप्तमातृका मंदिर आहे . परिसरातील सर्व महावृक्ष अति पाण्यामुळे वठलेले दिसत आहेत पहा .
चित्रात काय काय पाहाल ? सप्त मातृका मंदिर , महापुरामुळे खचलेला घाट , पाण्याच्या मोटर्सचे पाईप , वठलेले महावृक्ष , नर्मदेकाठ चा चिखल व त्यावर माजलेले गवत .
इथून पुढे गेल्यावर राजघाटचा सुबक , ठेंगणा , बसका , दगडी पूल लागतो .
इथे अंगात आलेल्या स्त्रियांचे भूत उतरवण्याचे काम चालू होते . एक भगत अशा स्त्रियांना मोकळ्या सोडलेल्या केसांना पकडून फरफटत नर्मदेमध्ये न्यायचा आणि जोरात ओरडून सांगायचा , " हिच्या अंगामध्ये शिरलेल्या हे भुता ! जोपर्यंत तू बाहेर जात नाहीस तोपर्यंत हिला मी पाण्याबाहेर काढणार नाही ! " आणि तिचे नाक तोंड पाण्यामध्ये बुडवायचा . क्षणात भूत निघून जायचे आणि महिला हात हलवून वाचवायची खूण करायची . बऱ्याच वेळा भूतबाधा वगैरे मानसिक व्याधी असतात .गाव देहात मध्ये प्रचंड कष्टाची कामे पडतात . घरातील कामाचा अति ताण सहन न झाल्यामुळे स्त्रिया असे काहीतरी बाधा वगैरे झाल्याचे नाटक बरेचदा करतात . परंतु नाका तोंडात पाणी गेल्यावर मरण्यापेक्षा भूत गेलेले चांगले असा विचार कुठलीही सूज्ञ व्यक्ती करेल . मी थोडा काळ तिथे थांबून हा सर्व भूत उतरवण्याचा खेळ पाहिला . त्यानंतर पुन्हा मोटारींचे जंजाळ ओलांडात चिखल तुडवत अखेरीस राजघाट गाठला . अतिशय सुंदर दगडामध्ये बांधलेला हा घाट आहे . इथे पूर्वी अन्नदान केले जायचे . परंतु सध्या हे संपूर्ण क्षेत्र डूब मध्ये जात असल्यामुळे इथे अन्नदान बंद आहे . परंतु तरीदेखील छोटासा मांडव घालून एका संस्थेची मंडळी अन्नदान करता देणगी गोळा करत होती . व सर्वांना मोफत चहा वाटला जात होता . चहा हे पेय भारतामध्ये कसे पसरवले गेले याचा इतिहास मोठा रंजक आहे . माझी आजी म्हणजे आईची आई मूळ पुण्यातली . घोरपडी पेठेत तिचा वाडा होता . आणि मंडई मध्ये वडिलांचे दुकान होते . त्यामुळे झाशीची राणी शाळा क्रमांक तीन मधून घरी जाताना ती काही काळ वडिलांच्या दुकानात थांबून मग घरी जायची . हिचा जन्म १९१२ सालचा . तिने टिळकांना पाहिले होते . पंचम जॉर्ज राजा जेव्हा मंडईमध्ये आला होता तेव्हा त्याच्यासमोर 'आनंदकंद ऐसा ,हा हिंद देश माझा' हे गाणे आम्ही पाच मुलींनी ठसक्यात गायले होते असे ती अभिमानाने सांगते ! पंचम जॉर्ज राजाच्या हातून त्यांना विक्टोरिया राणीचे चांदीचे पदक व एक एक बिस्किट मिळाले होते ते घेतल्यावर मात्र त्याच्या पाया मी कशी पडले नाही याचा तिला सार्थ अभिमान होता ! याच काळामध्ये मंडईमध्ये काही इंग्रज लोक एक टेबल लावून बसायचे . आणि येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना सांगायचे की हा आम्ही बनवलेला काढा आहे . प्रकृतीला अतिशय उत्तम आहे . एकदा पिऊन तरी पहा ! हाच तो चहा ! तोपर्यंत लोकांना चहा नावाचे पेय माहिती सुद्धा नव्हते . ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला जेव्हा शोध लागला की भारतातील ईशान्य भागामध्ये चहाचे उत्पादन चांगले होते आहे ,तेव्हा त्यातून आर्थिक लाभ मिळावा यासाठी त्यांनी चहाचे असे मार्केटिंग संपूर्ण भारतभर सुरू केले . हे सर्व माझ्या आजीने स्वतः पाहिलेले आहे . सुरुवातीला चहाची पाने विकली जायची . डस्ट स्वरूपामध्ये चहा अलीकडे मिळू लागला . एकंदरीत या चहाने सध्या भारतातील जवळपास प्रत्येक घर व्यापलेले आहे . हे पेय सध्या जणूकाही भारताचे राष्ट्रीय पेय झालेले आहे की काय असे म्हणावयास पुरेसा वाव आहे . गेली दहा वर्षे तर देशाचा कारभार देखील 'चाय वाला ' चालवीत आहे ! याहून अधिक महती या पेयाची ती काय वर्णावी !
मी असा विचार केला की आता शूल पाणीच्या झाडीमध्ये प्रवेश करावा लागणार आहे . पुन्हा नर्मदा मातेचे दर्शन लवकर होणार नाही . त्यामुळे आता इथे मनसोक्त स्नान करावे . आणि मगच पुढे मार्गस्थ व्हावे . इतक्यात तुकाराम बुवा सुरवसे देखील रस्ता मार्गाने चालत तिथपर्यंत आले . त्यांना देखील माझी ही कल्पना मी सांगितली . त्यांनी देखील होकार दिला आणि आम्ही दोघे स्नानाची तयारी करू लागलो . झोळीतील सामान तपासताना माझ्या असे लक्षात आले की माझ्याकडे शेवटचे २० रुपये राहिलेले आहेत . शूल पाणीच्या झाडीमध्ये माझ्या या साध्या चपला चालणार नव्हत्या. तिथे मजबूत बुटांची आवश्यकता होती . तसेच शुलपाणेश्वराच्या झाडीमध्ये छोटी छोटी वनवासी मुले धावतच येतात आणि आपल्याला चॉकलेट गोळ्या मागतात हे देखील मला अनेकांनी सांगून ठेवले होते . त्यांना नाराज न करता काहीतरी खाऊ द्यावाच लागतो असे मला अनेक वेळा अनेक ठिकाणी सांगण्यात आले . अशा गोळ्या घेण्यासाठी देखील मला पैशांची गरज होती . परंतु खिशामध्ये वीसच रुपये मात्र उरलेले असल्यामुळे सारा विषयच संपला होता . मी मैयाला ती वीस रुपयांची नोट दाखवली आणि झोळीमध्ये टाकून दिली . मी आणि तुकाराम बुवा सुरवसे स्नानासाठी नर्मदा मातेमध्ये उतरलो . पाणी अतिशय धीर गंभीर परंतु खोल होते . सुमारे तासभर मनसोक्त स्नान केले . स्नान म्हणजे फक्त डुबक्या मारणे . अंग चोळणे ,अंग घासणे ,साबण लावणे , अंगाचा मळ काढणे वगैरे नर्मदा मातेमध्ये अजिबात करायचे नसते . संपूर्ण घाटावर आम्ही दोघेच स्नान करत होतो . ओंकारेश्वर मार्गे गाडीने परिक्रमा उचलणारे जे लोक असतात ते तिथून निघाल्यावर थेट राजघाटवर येतात . अशा पद्धतीने नर्मदा परिक्रमा उचललेल्या दोन मोठ्या बस तिथे राजघाटावर दाखल झाल्या . आणि दोन्ही बसमधून ६० - ६० परिक्रमावासी बाहेर पडले . त्यांचा टूर गाईड त्यांना घाटाची माहिती सांगू लागला . आता हे १२० लोक पाण्यामध्ये शिरणार त्यापूर्वीच आपण बाहेर पडावे असा विचार मी केला . इतक्यात त्यांच्या गाईडने त्यांना आमच्या दोघांकडे बोट करून दाखविले हे पहा हे आहेत खरे परिक्रमावासी ! हे पायी परिक्रमा करत आहेत . त्याने असे म्हटल्याबरोबर सर्वजण आमच्या दिशेला धावले ! मी कमरे एवढ्या पाण्यात उभा होतो . माझ्या अंगाला छाटी गुंडाळलेली होती . एका मातारामने मला नमस्कार करून हातात दहा रुपयाची नोट ठेवली . दुसरी आली , तिसरी आली असे करता करता तिथे एक रांग लागली . कोणी दहा वीस रुपये ,कुणी पन्नास रुपये , कुणी शंभर रुपये , कोणी ५०० रुपये असे माझ्या हातात ठेवायला सुरुवात केली . माझे अंग देखील अजून ओले होते . पैसे ठेवण्यासाठी मला माझी ओंजळ पुरेना . मी सर्वांना सांगत होतो की थांबा मला बाहेर येऊ द्या . परंतु कोणीही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते . तुकाराम बुवा माझ्या शेजारी उभे होते . परंतु त्यांच्या हातात कोणी एक रुपया सुद्धा दिला नाही . माझ्या हातातील काही नोटा पाण्यात पडायला लागल्या त्या उचलून तुकाराम बुवांनी परत मला दिल्या . अखेरीस मी बाहेर आलो आणि ते सर्व पैसे जमिनीवर टाकले . अंग पुसले .कपडे बदलले . आणि तसेच सर्व पैसे झोळीमध्ये कोंबले आणि पुढे चालायला लागलो . पुढच्या मुक्कामी जाऊन ते मोजले . एक रुपयाच्या नाण्यापासून पाचशे रुपयांच्या नोटेपर्यंत ते सर्व मिळून तब्बल तेराशे रुपये होते !शिवाय हे सर्व लोक पुढे चार किलोमीटर अंतरावर भोजन प्रसाद करणार होते तिथे देखील मला भोजनासाठी येण्याचे आमंत्रण यांनी केले .तिथे पुन्हा काही दक्षिणा मिळाली . तुकाराम बुवांना देखील आश्चर्य वाटले की फक्त मलाच इतके पैसे कसे काय मिळाले ? मी त्यांना वीस रुपयांची नोट मैयाला दाखविली तो किस्सा सांगितला . आणि मग दोघांनी देखील मैयाचा जयजयकार केला ! तुकाराम सुरवसे यांनी थोड्याच वेळापूर्वी रस्त्यावरून येताना पैसे काढले होते . त्यामुळे त्यांना एक रुपया सुद्धा नर्मदा मातेने दिला नाही . तसे पाहायला गेले तर आम्ही दोघे शेजारी शेजारी उभे होतो आणि तुकाराम सुरवसे माझ्यापेक्षा वयस्कर दिसतात त्यामुळे त्यांना देखील कोणीतरी दक्षिणा देणे अपेक्षित होते परंतु तसे घडले नाही .त्यांनी देखील त्या क्षणी संकल्प केला की इथून पुढे नर्मदा परिक्रमे मध्ये पैशाचा विचार करणार नाही . माझ्यावर मैय्याने अशा रीतीने त्या दिवशी राजघाटावर पैशांचा पाऊस पाडला ! पुढे देखील दक्षिणा मिळत गेली परंतु एकाच वेळी इतकी दक्षिणा कोठेच मिळाली नाही . पुन्हा एकदा तिने हे सिद्ध करून दाखवले की परिक्रमा वासीने पैशाची चिंता करू नये . फक्त पुढील पावलाचा विचार करत नर्मदा मातेचे नामस्मरण करत मार्गक्रमण करीत रहावे . समर्थ रामदास स्वामी म्हणतात ,
साधक भावे लोटांगण घाली ।
त्याची चिंता साधूस लागली ।
सुगमपणे नेऊन घाली ।
जेथील तेथे ॥
तसेच मैय्याचे आहे. मैयाने योग्य वेळी पाडलेल्या पैशाच्या या पावसामुळे मी शूल पाण्याच्या झाडीतील लेकरा बाळांना चांगल्या दर्जाचे गोळ्या चॉकलेट देऊ शकलो . अन्यथा इथे अतिशय स्वस्तातले बेचव चॉकलेट वाटण्याची प्रथा पडलेली आहे परंतु मी मात्र एक इक्लेअर्स , किस मी , मेलडी , रावळगाव टॉफी , पारले मँग बाईटस् , आलपेनलिबे असे चांगले चॉकलेट वाटू शकलो . आता या मुलांना गोळ्या चॉकलेट द्याव्यात की नाही द्याव्यात या विषयाचा सविस्तर उहापोह त्या प्रकरणात करूच . पण तूर्तास मैयाने माझी लाज राखली हे खरे ! मैया है वह । सब जानती है ! नर्मदे हर !
लेखांक एकोणऐंशी समाप्त (क्रमशः )
आता तुमच्या नजरेतून शूलपाणी!नर्मदे हर!!!
उत्तर द्याहटवानर्मदे हर🙏🙏🙏🙏🙏 सर्वच खूपच अलौकिक डोळ्यांसमोर प्रत्यक्ष चित्र उभे राहते. आपल्याला भेटायची इच्छा आहे.
उत्तर द्याहटवा