लेखांक ६८ : श्री क्षेत्र ओंकारेश्वर , श्री क्षेत्र अमलेश्वर , ओंकारमांधात पर्वत
ओंकारेश्वर . . . नर्मदा परिक्रमा हा विषय निघाला की ओघाने सर्वांच्या मुखात येणारे पहिले नाव म्हणजे ओंकारेश्वर ! काय आहे या स्थानात ?का एवढा जयजयकार ओंकारेश्वराचा ? हे खरं म्हणजे तिथे प्रत्यक्ष येऊनच अनुभवायला पाहिजे . मी ओंकारेश्वर क्षेत्राचे प्रथम दर्शन नर्मदा परिक्रमेदरम्यानच घेतले . त्यापूर्वी हा सुयोग कधी आला नव्हता . परंतु परिक्रमे नंतर मात्र पुन्हा पुन्हा ओंकारेश्वर बोलावून घेतो ! आपल्या पश्चिम महाराष्ट्रातून तुलनेने सर्वात जवळचे व गाडी लोहमार्ग सर्वचप्रकारे सोयीचे ,पवित्र तीर्थक्षेत्र म्हणजे ओंकारेश्वरच आहे .
या ओंकारेश्वराचा महिमा अपरंपार आहे .प्रत्येक परिक्रमावासी त्याच्या परिक्रमेदरम्यान दररोज ज्या नर्मदा जलाच्या शिशीची पूजा करतो त्यातील सर्व नर्मदा जल हे परिक्रमा संपल्यावर ओंकारेश्वराच्या पिंडीवर अर्पण करावयाचे असते ! थोडक्यात काय तर ओंकारेश्वराला चढविण्यासाठी तीर्थ यात्रा करून त्या जलाची तीर्थ शुद्धी करण्याची प्रक्रिया म्हणजे नर्मदा परिक्रमा आहे . इतके या स्थानाचे महात्म्य आहे . ओंकारेश्वर या स्थानाच्या महात्म्याबद्दल यापूर्वी देखील अनेकांनी अनेक ठिकाणी लिहिलेले आहे . त्यामुळे त्याची पुनरावृत्ती करण्यापेक्षा मी माझ्या डोळ्यांना हे तीर्थक्षेत्र कसे भासले ते तुम्हाला सांगणार आहे . त्या खिंडीमध्ये उभा राहून जेव्हा मी ओंकारेश्वर तीर्थक्षेत्राकडे पाहिले तेव्हा मला अक्षरशः मी भूलोकीचे वैकुंठ पाहत आहे असा भास झाला ! इतकी सकारात्मक स्पंदने यापूर्वी मी कुठेच अनुभवली नव्हती ! आणि केवळ एका मंदिरातून किंवा एका ठिकाणावरून ही स्पंदने येत नव्हती तर या तीर्थक्षेत्राच्या कणाकणातून ती स्पंदने पाझरत होती ! एका जबरदस्त ऊर्जेने आणि आध्यात्मिक शक्तीने हा परिसर भारलेला आहे हे लगेच लक्षात येत होते . इथे पाऊल ठेवताना प्रत्येक पावलाला अंगामध्ये शहारे उमटत होते . मनाची अवस्था उन्मनी झाली होती . आनंदातिशयाच्या लहरींनी शरीर भारीत झाले होते ! डोळ्यातून अखंड आनंदाश्रू वाहत होते ! तीर्थ महात्म्य , स्थान महात्म्य ते याहून वेगळे काय असू शकते ! मी सकाळपासून केलेले सर्व कष्ट क्षणात विसरून गेलो होतो . नर्मदा नदी केवळ तिच्या दर्शनाने सर्व पापांचा नाश करते असे म्हणतात त्याची याची देही याची डोळा अनुभूती मी तिथे घेतली .
मुळात ओंकारेश्वर तीर्थ कसे आहे याचे थोडक्यात वर्णन करून तुम्हाला सांगतो . नर्मदा नदी कधी माती कापत वाहते तर कधी दगड चिरत वाहते . ओंकारेश्वर च्या संपूर्ण परिसरामध्ये मोठे मोठे पहाड आहेत . उत्तर तटावर विंध्यगिरी आहे तर दक्षिण तटावर सातपुडा पर्वत आहे . या दोन्ही पर्वतांची भेट ज्या खचदरीमध्ये होते त्या खचदरी मधून नर्मदा वाहत आहे . या ठिकाणी ओंकारेश्वर नावाचेच धरण बांधण्यात आले असल्यामुळे नर्मदेतील अनेक पवित्र तीर्थस्थाने बुडाली आहेत .
यातील सर्वात पवित्र असे धावडीकुंड किंवा धाराजी आता जलमग्न झाले असून ओंकारेश्वर धरणाच्या खाली शंभर दोनशे फुटावर आता ते आहे . पूर्वी याच ठिकाणी अप्रतिम अशी शिवलिंगे निर्माण आणि प्राप्त व्हायची . धरणातून पाण्याचा प्रवाह नियंत्रित केलेला असल्यामुळे ओंकारेश्वर तीर्थक्षेत्राच्या आजूबाजूला असलेले पाणी कमी जास्त होत राहते . धरण संपल्या संपल्या लगेचच चार पाचशे मीटर अंतरावर नर्मदेच्या दोन शाखा होतात . या दोन्ही शाखा एका पर्वताला वळसा मारून पुढे पुन्हा एकत्र येतात .
हा पर्वत म्हणजेच ओंकार मांधात पर्वत . आणि या पर्वतावरील जे महादेवाचे ज्योतिर्लिंग आहे तेच ओंकारेश्वराचे ज्योतिर्लिंग आहे .
या डोंगरावर परिक्रमा सुरू असलेले परिक्रमावासी जाऊ शकत नाहीत . परंतु शेवटी ओंकारेश्वरालाच जल चढवायचे असल्यामुळे सध्याच्या काळामध्ये ९०% परिक्रमावासी ओंकारेश्वर क्षेत्रावरूनच परिक्रमा उचलतात . अशी परिक्रमा सुरू करण्यापूर्वी मात्र ते ओंकारेश्वर शिवलिंगाचे दर्शन घेऊ शकतात . ओंकारेश्वरचे दर्शन घेऊन ओंकार मांधात पर्वताची एक छोटीशी परिक्रमा आहे ती पूर्ण करून नर्मदेच्या किनाऱ्यावर यायचे आणि मग परिक्रमा सुरू करायची असा परिपाठ आहे .
यानंतर मात्र बेटावर जाता येत नाही . याच नव्हे तर नर्मदेमध्ये असलेल्या असंख्य बेटांवर परिक्रमावासी जाऊ शकत नाहीत . मी देखील परिक्रमे मध्ये असल्यामुळे मांधात पर्वत नाही पाहू शकलो . इथे दक्षिण तटावर अजून एक पौराणिक शिवालय आहे ज्याचे नाव अमलेश्वर आहे . काही साधूंच्या मते हेच खरे ज्योतिर्लिंग आहे .
बारा ज्योतिर्लिंगांची नावे सांगणारा जो श्लोक आपल्याकडे म्हटला जातो त्यात ओंकारममलेश्वरम् असे म्हटलेले आहे . त्याची फोड ओंकारम् + अमलेश्वरम् अशी आहे . परंतु याच श्लोकांमुळे बहुतांश लोक या देवाला ममलेश्वर असे देखील म्हणतात . यातील ओंकार हे पर्वताचे नाव आणि अमलेश्वर हे महादेवाचे नाव आहे असे साधू लोक मानतात . सनातनी हिंदू लोक मध्यम मार्ग काढण्यात पटाईत आहेत त्यामुळे या ठिकाणी दर्शनासाठी येणारे सर्व लोक दोन्हीही तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेऊन मोकळे होतात ! त्यामुळे बारा ज्योतिर्लिंगातील एखादे ज्योतिर्लिंग राहिले असे होत नाही !
परिक्रमावासी ममलेश्वराचे किंवा अमलेश्वराचे दर्शन अवश्य घेऊ शकतात . फक्त इथे एका गोमुखातून नर्मदेची गुप्त धारा प्रकट झालेली आहे . तिचे उल्लंघन होऊ नये याची काळजी घ्यावी लागते . त्यामुळे काही परिक्रमावासी ज्यांना या परिसराची माहिती नाही ते अमलेश्वराचे दर्शन न घेताच पुढे जातात . या पर्वतावर जाण्यासाठी एक झुलता पूल आहे शेकडो नावा आहेत आणि आता एका नवीन गाडी पुलाची निर्मिती चालू आहे . वेगाने धावणाऱ्या नावा हे या भागाचे वैशिष्ट्य आहे .
ओंकारेश्वर तीर्थक्षेत्र एकदा पाहिले की लक्षात राहणारे आहे . या क्षेत्रामध्ये इतकी धामधूम असते परंतु आजूबाजूला चहुबाजूने अतिशय घनदाट जंगल असून येथे वाघ बिबट्या इत्यादी हिंस्र प्राण्यांचा अगदी मुक्त वावर आहे . केवळ हे तीर्थक्षेत्र सोडले तर आजूबाजूला मानवी वस्ती जवळपास शून्य आहे . वर्षभर इथे पर्यटकांची आणि भाविकांची प्रचंड गर्दी असते . लाखोंच्या संख्येने परिक्रमावासी इथे येऊन परिक्रमा सुरू करतात . नर्मदा मातेला या सर्वांची काळजी घ्यावी लागते . यातील तिच्या परीक्षेमध्ये जे उत्तीर्ण होतात त्यांची परिक्रमा ती पूर्ण करते . बाकीचे काही ना काही कारणाने घरी निघून जातात .ज्याला शुद्ध मराठीमध्ये 'ड्रॉप आउट ' म्हणतात अशा 'ड्रॉपआऊटस् ' ची संख्या परिक्रम मध्ये खूपच जास्त आहे ! मागे एका लेखात मी सांगितले आहे ती आकडेवारी पुन्हा सांगतो . ओंकारेश्वर मध्ये काही मोठे मोठे मठ आहेत जे तुम्हाला परिक्रमा सुरू करण्यासाठी प्रशस्तीपत्रक देतात . हे मठ समन्वयाने दरवर्षी किती लोकांनी परिक्रमा उचलली याचा आढावा मांडतात . मी ज्या २०२२ सालामध्ये नर्मदा परिक्रमा उचलली होती त्यावर्षी एकूण आठ लाख साठ हजार लोकांनी परिक्रमा उचलली .याच्यामध्ये बसने जाणारे ,गाडीने जाणारे , सायकलने जाणारे ,पायी जाणारे ,दंडवत घालत जाणारे असे सर्व प्रकारचे परिक्रमा वासी आले . यातील पायी चालणाऱ्या परिक्रमावासींची संख्या दोन लाख साठ हजार होती . यापैकी सुमारे १२ ,००० लोकांची परिक्रमा पूर्ण झाली असे चौकशी अंती मला कळाले .
या आकडेवारीवरून तुम्हाला नर्मदा परिक्रमेच्या काठिण्य पातळीची कल्पना येईल . परंतु मी हा ब्लॉग पेपर फोडण्यासाठीच लिहिलेला आहे असे समजा !
नर्मदा परिक्रमा आपल्याला वाटते तितकी अवघड अजिबातच नाही . संपूर्णपणे नर्मदा मातेवर भार घातल्यावर परिक्रमेसारखे सोपे काहीही नाही ! जोपर्यंत मूल स्वतः धडपडत जिना चढायचा प्रयत्न करते तोपर्यंत त्याचे हात पाय लटपटत असतात ! त्याने आईला फक्त एक हात मारावी की आई कुठून तरी धावत येते आणि त्याला कडेवर घेऊन धावतच जिना चढते ! तसे हे सर्व आहे . माकडाचे पिल्लू असते त्याचा स्वतःवर फार विश्वास असतो त्यामुळे ते स्वतः आईला धरून बसते . त्यामुळे त्याची आई त्याला सोडून निवांत उड्या मारत असते . आता आईला घट्ट धरून ठेवायचे काम त्या पिलाचे असते . त्याची ताकद कमी पडली की तो सटकला ! याउलट मांजरीचे पिल्लू आई पुढे अनन्य असते . त्यामुळे हातपाय सोडून दिलेल्या त्या पिलाला आईच मानेला धरून उचलते आणि इकडून तिकडे नेते . तिथे पिलाला काहीच करावे लागत नाही . नर्मदा परिक्रमा असे मांजरीचे पिल्लू बनून करावी . कारण माकडाचे पिल्लू बनायचे असेल तर नर्मदा मैया खूपच जास्ती आणि मोठ मोठ्या अवघड उड्या मारणारी आई आहे हे लक्षात ठेवावे ! असो .
डोंगराचा उतार उतरून मी एका कालव्यापाशी आलो . छोट्याश्या पुलावरून कालवा ओलांडला आणि गावामध्ये शिरलो . इथे कुठला आश्रम आहे किंवा कुठला आश्रम नर्मदेच्या काठावर आहे याबाबतीत मला काहीच माहिती नव्हते . गावामध्ये अक्षरशः शेकडो आश्रम आहेत . चालत चालत मी एका मुख्य रस्त्यावर आलो आणि एका मोठ्या स्वागत कमानीने माझे लक्ष वेधले . शेगावचे संत श्री गजानन महाराज यांच्या संस्थानतर्फे चालविला जाणारा एक अतिशय भव्य दिव्य आश्रम येथे आहे . नर्मदा परिक्रमेतील आश्रम कसा असावा ? तर तो गजानन महाराज आश्रमासारखा असावा ! हे तुम्हाला शंभर मधील ९५ परिक्रमा वासी सांगतील ! कुठल्याही प्रकारची असुविधा गैरसोय होऊ नये याची परिपूर्ण काळजी इथले सेवाभावी स्वयंसेवक घेतात . शेगाव संस्थान मध्ये ज्याप्रमाणे पांढरे शुभ्र स्वच्छ कपडे घातलेले सेवाधारी असतात अगदी तसेच सेवाधारी जे बहुतांश महाराष्ट्रातून आलेले असतात ते इथे सेवेसाठी असतात त्यामुळे आपल्याला खूप आपुलकीने सर्व सेवा दिली जाते . गेल्या गेल्या सुरक्षारक्षक आपले स्वागत करतात . आश्रमामध्ये मुक्काम करायचा असल्यास कार्यालयाच्या दिशेने आपल्याला पाठविले जाते आणि तुमच्या सोबत एक माणूस येतो . इथले व्यवस्थापक अतिशय आस्थेने तुमची चौकशी करतात आणि सर्व सामान खाली ठेवायला सांगतात . नोंदणी प्रक्रियेला वेळ लागणार असून तेवढा तुम्ही कृपा करून द्यावा अशी विनंती केली जाते . त्यानंतर तुमचे प्रमाणपत्र आणि आधार कार्ड तपासले जाते . प्रमाणपत्र आणि आधार कार्ड असेल तर आणि तरच या आश्रमामध्ये राहता येते अन्यथा राहता येत नाही ! संपूर्ण परिक्रमेमध्ये आधार कार्डाची सक्ती करणारा एवढा एकच आश्रम मी पाहिला . त्यानंतर तुम्हाला परिक्रमावासींसाठी बांधलेल्या मोठ्या सभागृहांमध्ये पाठविले जाते . कुठल्या क्रमांकाच्या सभागृहात तुम्ही उतरावे हे तुम्हाला आधीच सांगितले जाते आणि तिथपर्यंत सोडण्यासाठी एक सेवेकरी तुमच्या सोबत येतो . अशा पद्धतीने मी सभागृह क्रमांक दोन मध्ये शिरलो आणि आतून सर्व परिक्रमावासिनी एकच जल्लोष केला ! कारण गेल्या ५० दिवसांमध्ये मला जेवढे म्हणून परिक्रमावासी भेटले होते जवळपास ते सर्वजण आत मध्ये थांबलेले होते ! प्रत्येकाकडे फोन असल्यामुळे ते एकमेकांच्या संपर्कात राहायचे .परंतु माझा ठाव ठिकाणा एक नर्मदा मैया सोडली तर कोणालाच माहिती नव्हता ! त्यामुळे मी आलो आहे हे पाहिल्याबरोबर सर्वांनी एकच गलका केला ! मला उगाचच सेलिब्रिटी झाल्यासारखे वाटू लागले ! परंतु नंतर लक्षात आले की आत मध्ये येणाऱ्या प्रत्येक परिक्रमावासी चे स्वागत थोड्याफार फरकाने असेच होते आहे ! या सर्वांची परिक्रमा संपलेली होती त्यामुळे हा आनंद स्वाभाविक होता . परंतु माझा मात्र हा साधारण मध्यबिंदू आलेला होता . अजून इतकेच मला चालायचे होते . परंतु तरीदेखील या सर्वांच्या आनंदात मी तेवढ्याच किंबहुना दुपटीने ऊर्जा देत सहभागी झालो !
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर . या एका विरक्त व कर्तबगार साध्वी मुळे आज आपल्या देशातला धर्म टिकून आहे असे म्हणायला पुरेसा वाव आहे . आज आपण पाहतो की बहुतांश सर्व मंदिरे एकट्या अहिल्याबाईंनी जीर्णोद्धारित केलेली आहेत .
श्री गजानन महाराजांच्या पोथी मध्ये येणारा नौका बुडताना नर्मदा मातेने वाचवली ,असा प्रसंग याच ठिकाणी घडलेला आहे .
वाटेत बऱ्याच जणांचे संपर्क क्रमांक लिहून घ्यायचे राहिले होते . ते काम या मुक्कामामध्ये मी पूर्ण करून घेतले . प्रचंड दमलेला असल्यामुळे इथे दोन दिवस राहावे असे मी ठरविले . इथे तुम्हाला दोन दिवस मोफत राहता येते . त्यानंतर देवस्थानची परवानगी घेऊन तुमचा मुक्काम वाढविता येतो . इथली प्रत्येक बाबतीत असलेली शिस्त मला अतिशय भावली . इतके मोठे संस्थान असून जरा देखील गडबड गोंधळ कुठेही नाही ! काय जबरदस्त रचना आहे ! वा ! नर्मदे हर ! जय गजानन ! गणी गण गणात बोते !
इथे माझ्या आधीच दोन्ही बंगाली पोहोचले होते . आणि अजूनही काही बंगाली परिक्रमावासी परिक्रमा पूर्ण झाल्यामुळे तिथे पोहोचले होते त्यांच्यासोबत राहिले होते . याच्यामध्ये प्रामुख्याने मनोज दत्ता नावाचा आरामबाग हुगळी पश्चिम बंगाल येथे राहणारा एक परिक्रमा वासी होता .खूप हुशार होता .याने मला नको नको म्हणताना एक हॅट दिली . परिक्रमे मध्ये हॅट वगैरे घालायचे नसते असे मी त्याला सांगितल्यावर त्याने सांगितले की आता इथून पुढे कडक उन्हाळा चालू होणार आहे त्यामुळे कान झाकणे अतिशय आवश्यक आहे . थंडीमध्ये फेटा बांधला ते ठीक आहे परंतु आता तुला टोपी घालावीच लागेल . त्याच्याशी जास्ती चर्चा न करता मी ती टोपी सामानामध्ये ठेवून दिली . पुढे योग्य वेळी कुणाला तरी देऊन टाकू असे ठरविले . सारंग देव पोहोचला होता . रोकडे काका ,शेळके काका आणि त्यांची संपूर्ण गँग पोचली होती . जळगावचे पाटील साहेब आणि पाटील काकू पोहोचल्या होत्या . जिकडे नजर मारावी तिकडे सगळे ओळखीचे लोक भेटत होते ! आपल्या दररोजच्या जीवनातल्या नमस्कार चमत्कार वाल्या औपचारिक भेटी वेगळ्या . आणि नर्मदे काठी खडतर मार्गक्रमणा करताना झालेल्या हृद्य भेटी निराळ्या ! या भेटीमधली मजाच काही और आहे ! हे जिवाभावाचे लोक खरोखरीच आपले आत्मीय मित्र होतात असा अनुभव मी पुढे घेतला .
इथे प्रामुख्याने मला आलेला एक अनुभव तुम्हाला सांगावासा वाटतो . तुम्हाला मागे मी रामनगर महालापाशी मला भेटलेला साधू आणि नंदाताई पावशे या परिक्रमावस्यांची हकीकत सांगितली . नंदाताईंना एकटे सोडून सर्व लोक पुढे निघून गेल्यामुळे एकट्याच रडतखडत चाललेल्या या बाईंना सोबत म्हणून महात्यागी रामकरण दास जी नावाचा साधू त्यांच्यासोबत संपूर्ण परिक्रमा चालला . हे दोघेही इथे आत मध्ये आले ! मी साधना नमस्कार केला . व आता दोन दिवस मुक्काम करा असे सांगितले . साधू मला म्हणाले की माझ्याकडे आधार कार्ड नाही आणि इथे आधार कार्ड शिवाय ठेवून घेत नाहीत . माझे काम होते या माऊलीला इथपर्यंत सुरक्षित आणून पोहोचवणे . आता माझे काम संपले . असे म्हणून झप झप चालत तो साधू बाहेर पडला . मी देखील त्यांच्या मागे वेगाने बाहेर पडलो . परंतु एवढे मोठे आश्रमाचे आवार असून देखील तो साधू मला कुठेही दिसला नाही ! मी सुरक्षारक्षकांना देखील विचारले . सगळीकडे पाहून आलो परंतु ते साधू अदृश्य झाले हे मी स्वतः अनुभवले ! धावतच आत मध्ये येऊन मी नंदाताईंना हा प्रकार सांगितला . त्यांनी साधूंच्या मोबाईल क्रमांकावर फोन लावला . हा क्रमांक अस्तित्वात नाही असा संदेश त्यांना ऐकू येऊ लागला ! नंदाताई व मी दोघेही दिङमूढ झालो . कारण या साधू सोबत थोडा तरी वेळ घालवायचे भाग्य मला मिळाले होते . आणि नंदाताई तर अखंड या साधू सोबत सुमारे दोन महिने चालत होत्या . तो कोण होता ,काय होता काहीही कळायला मार्ग नाही . महा त्यागी होता खरा ! नर्मदा खंड अशा महापुरुषांनी भरलेला आहे ! इथे अजून एक चित्रपटातील हिरो शोभावा असा तरुण परिक्रमा वासी दिसला . प्रत्यक्षात परिक्रमा झाल्यावर लोक दाढी मिशा केस काढून टाकतात आणि ब्रह्मचर्याचे , तप:साधनेचे तेज चेहऱ्यावर आलेले असते . त्यामुळे असे लोक खूप तेजस्वी दिसू लागतात . सर्वत्र आता असे चमन गोटे दिसू लागले !
गजानन महाराज मठ ओंकारेश्वर येथे भेटलेले एक सह परिक्रमा वासी . असे दाढी मिशा काढलेले परिक्रमा वासी समोर आले , की दाढी मिशांमध्ये त्यांना बघायची सवय असल्यामुळे हे नक्की कोण आहेत ते ओळखूच यायचे नाही ! परंतु हे लोक मात्र मला लगेच ओळखायचे . अशी मजा खूप वेळा झाली .
हा तेजस्वी तरुण मुंबईला वकिली करत असे . विधीज्ञ चेतन बावकर दहिसर असे त्याचे नाव होते . याच्याशी देखील गप्पा मारल्या . त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयामध्ये वकिली करणारे विधीज्ञ धनंजय लोणकर म्हणून भांबुर्डा पुणे येथे राहणारे एक वकील भेटले . यांचे वैशिष्ट्य म्हणजे यांची देहबोली आवाज आणि बोलण्याची पद्धत तंतोतंत भिडे गुरुजीं सारखी होती . त्यांना मी त्यांच्या मोबाईलवर गुरुजींचे काही व्हिडिओ दाखवले आणि त्यांनी देखील मान्य केले की दोघांच्या बोलण्यामध्ये साम्य आहे खरे ! यांची परिक्रमा अर्ध्याच्या वर पायी पूर्ण झाली परंतु नंतर प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी गाडीने पूर्ण केली . इथे भेटलेले अजून एक परिक्रमावासी म्हणजे राजू सोनार किंवा राजू टेलर जे शूलपाणीश्वराच्या झाडीमध्ये असलेल्या धडगाव या महाराष्ट्राच्या गावामध्ये राहतात . त्यांनी त्यांचा क्रमांक दिला आणि शूल पाणी मधून जाताना नक्की संपर्क साधायची सूचना केली . सर्वच परिक्रमावासी मोठ्या आनंदामध्ये होते ! आणि माझी परिक्रमा संपल्यावर साधारण माझी अवस्था कशी होणार आहे त्याची झलक मला इथे पाहायला मिळत होती ! यानंतर देवेंद्र सारंग उर्फ सारंग देव याने मला सांगितले की आता मी तुला संपूर्ण ओंकारेश्वर तीर्थक्षेत्राचे दर्शन घडवून आणतो . आणि त्याप्रमाणे त्याने मला क्रमाक्रमाने एकेक मंदिरे फिरविली . आधीच सांगितल्याप्रमाणे इथे परिक्रमा खंडित होणारे काही क्षेत्र आहेत ती टाळून त्याने बरोबर मला अमलेश्वर आणि अन्य अनेक महत्त्वाची दर्शने घडविली . यानंतर आम्ही दोघे नर्मदा मैया च्या काठावर जाऊन बसलो . मी स्नान करून घेतले . अंधार पडला होता . प्रचंड मोठ्या प्रमाणात यात्रेकरूंची गर्दी होती कारण आज महाशिवरात्री होती . इथे धरणाचे भोंगे वाजले की थोड्या वेळाने जल विद्युत निर्मिती प्रकल्पातून पाणी सोडले जाते . त्यामुळे बघता बघता आपल्या डोळ्यासमोर नर्मदा जलाची पातळी पाच फूट ते दहा फुटापर्यंत वाढते . तीन वेळा भोंगा वाजला की पाणी येते . हा प्रकार मला पाहायचा होता परंतु ती इच्छा मैयाने नंतर पूर्ण केली . इथे बसून आम्ही बऱ्याच गप्पा मारल्या . सारंगला परिक्रमेचे पुस्तक हवे होते . ते जिथे मिळते त्या तिलकवाडा गावात गेल्यावर तुला तुझ्या पत्त्यावर पाठवायची व्यवस्था करतो असा शब्द मी त्याला दिला . प्रभादेवीला राहणारा हा तरुण अतिशय हुशार अभ्यासू आणि सात्विक होता .संपूर्ण परिक्रमेचे याने अतिशय सुरेख फोटो काढले आहेत . भविष्यात योग्य वेळ आली की सर्व फोटो तुला देतो असे त्याने मला सांगितले . हा देखील बऱ्यापैकी मी आलो त्याच मार्गाने आलेला असल्यामुळे याचे फोटो पाहिल्यावर मला ती सर्व ठिकाणे आठवू लागली . यापैकी ज्या ज्या लोकांचे संपर्क होऊ शकतील त्या सर्वांना संपर्क साधून त्यांची परिक्रमेतील छायाचित्रे येथे टाकण्याचा प्रयत्न मी अवश्य करेन . आश्रमामध्ये परिक्रमावासींना मोफत भोजन आहे . बाकीच्या यात्रेकरूंसाठी निवासव्यवस्था आणि भोजन व्यवस्था सशुल्क आहे . गजानन महाराज आश्रमामध्ये अतिशय सुंदर बगीचा केलेला आहे . अतिशय सुंदर असे बहुमजली स्वच्छ संडास बाथरूम असल्यामुळे मी माझे कपडे मस्तपैकी धुवून घेतले . इथे त्यांनी परिक्रमावासींना नवीन वस्त्र देण्याची प्रथा सुरू केलेली आहे . वस्त्र म्हणजे एक सुती तलम कापडाची अप्रतिम लुंगी आणि तितक्याच उत्कृष्ट दर्जाच्या खादीचा एक पांढरा हाफ शर्ट देतात .तसे एक जोडी वस्त्र मला देखील मिळाले .यातील कॉलर असलेला शर्ट काही मी घालणार नसल्यामुळे लगेच एका परिक्रमा वासीला देऊन टाकला . छाटी वस्त्र मात्र मी जपून ठेवले व पुढे योग्य वेळी एका साधूला देऊन टाकले . माझी सध्याची वस्त्रे अजून पुरेशी फाटलेली नव्हती . इथे माझी ओळख अजून एका महापुरुषाशी झाली . म्हणजे हे मला भेटू शकतील याचे सुतोवाच ब्रिजेश बिश्नोई याने आधीच करून ठेवले होते . कारण हे दरवर्षी महाशिवरात्रीच्या आसपास परिक्रमा संपवून येणाऱ्या परिक्रमावासींना काय काय शारीरिक त्रास होतो आहे हे पाहून त्यानुसार त्यांच्यावर मोफत उपचार करतात . यावेळेस ते स्वतः संपूर्ण पायी परिक्रमा करून आले होते हे विशेष .यांचे नाव होते डॉक्टर मोरे गुरुजी . हे नगरचे होते . हे स्वतः उत्कृष्ट हाडवैद्य असून तिथे उपस्थित प्रत्येक परिक्रमावासीला जागेवर जाऊन काय होते आहे ते पाहून परिक्रमेमुळे अवघडलेली त्यांची पाठ , पाय , हात , सांधे इत्यादी ते पूर्ववत करून द्यायचे . अलीकडे चिरोपाथी / कायरोप्रॅक्टी नावाचे एक नवीन शास्त्र लोकांना माहिती झाले आहे . आपल्याकडे हे अतिशय जुने असून हे जाणणाऱ्या लोकांना हाड वैद्य असे म्हणतात . घोड्यावरून पडल्यामुळे माझ्या उजव्या हाताचे फिफ्थ मेटाकार्पल हे हाड कामातून गेले होते . त्यात उजव्या हातामध्ये दंड कमंडलू पकडल्यामुळे ते अजूनच वाकडे झाले होते . यांनी मला ते बऱ्यापैकी जुळवून दिले . रात्री सुद्धा झोपून न जाता ते सर्व परिक्रमावस्यांच्या पायाला तेल लावून मालिश करून द्यायचे . मी उभ्या आयुष्यात कधीही कोणाकडूनही अंगाला मालिश वगैरे करून घेतलेली नसल्यामुळे मी त्यांना नम्रपणे नकार दिला . परंतु तरीदेखील मी झोपल्यावर त्यांनी पायाला तेल लावलेच असे मला शेजारच्या काही परिक्रमावासींनी सांगितले . त्या रात्री मी वेळेमध्ये जाऊन भोजन घेतले . अनेक नवीन नवीन परिक्रमावासींशी परिचय झाला . बऱ्याच लोकांना घेण्यासाठी त्यांचे घरातील मंडळी देखील आले होते . त्या सर्वांशी देखील गप्पा मारल्या . इथे भोजन सेवा देणारा सर्व कर्मचारी / सेवेकरी वृंद मराठी असल्यामुळे आम्हा मराठी परिक्रमावासींना विशेष आस्थेने आग्रहपूर्वक वाढायचा . तेथील सर्वांशी माझी चांगली गट्टी जमली . दुसऱ्या दिवशी बहुतेक परिक्रमावासी दर्शनासाठी उज्जैनला निघून गेले . परिक्रमावासींना उज्जैन किंवा ओंकारेश्वर या दोन्ही ठिकाणी रांगेमध्ये थांबावे लागत नाही तर थेट दर्शनाचा लाभ मिळतो . त्यामुळे मी थोडीशी पाठ टेकावी असा विचार करून जे सकाळी झोपलो , ते थेट रात्री साडेअकरा वाजता उठलो ! जेवणाची वेळ साडेदहा वाजता संपलेली होती . दुपारचे जेवण देखील बुडाले आणि रात्रीचे जेवण तरी मिळावे म्हणून मी धावतच गेलो . सर्व यंत्रणा बंद झाली होती व सेवेकरी आपापसात उरलेले अन्न जेवायला वाढून घेत होते . मी अतिश्रमामुळे दिवसभर झोपून राहिलो होतो आणि दुपारी सुद्धा जेवलो नाही हे सांगितल्यावर मात्र त्यांनी कुठल्याही नियमावर बोट न ठेवता त्यांच्यासोबत मला जेवायला घेतले आणि अतिशय आनंदाने शिरापुरी भात आमटी वगैरे पोटभर खाऊ घातले ! नर्मदा मैया परिक्रमा वाशीला उपाशी ठेवत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाले ! दिवसभर मिळालेली अप्रतिम विश्रांती आणि रात्री मिळालेला पोटभर भोजन प्रसाद यामुळे माझ्या शरीराची गेले तीन दिवस झालेली सर्व झीज भरून निघाली . दरम्यान नर्मदा परिक्रमेचे नियमामध्ये बसत नसूनही माझ्यासोबत काही काळ चाललेले दोघे बंगाली बंधू ओंकारेश्वर दर्शन आणि ओंकार मांधात पर्वताची परिक्रमा असे दोन्ही उपक्रम करून आले . बंगाली मध्ये मित्राला बंधू असे म्हणतात . मी यावर कुठल्याही प्रकारचे काहीही भाष्य केले नाही . दोघेही सुजाण होते आणि ते काय करत आहेत याची दोघांनाही चांगली जाणीव होती . ज्यांनी एखादी व्यवस्था उभी करण्यामध्ये कधीकाळी कार्य केलेले आहे त्यांना मी काय म्हणतो आहे ते लगेच लक्षात येईल . एखादी व्यवस्था उभी करण्यासाठी खूप कष्ट आणि खूप मेहनत लागलेली असते . त्यासाठी अनेक घटकांचा विचार करून अनेक त्वरित परिणामांचा , संभाव्य परिणामांचा धांडोळा घेऊन मगच प्रक्रिया निश्चित केलेल्या असतात . आपली समाजव्यवस्था देखील अशीच लाखो वर्षांच्या अभ्यासातून तयार झालेली आहे . या किंवा नर्मदा परिक्रमेसारख्या अन्य कुठल्याही व्यवस्थेला विपरीत ठरेल असे काही करायला विशेष बुद्धिमत्ता लागत नाही . परंतु आपण ते का करतो आहोत व त्यातून काय साध्य होणार आहे याची चांगली जाणीव कर्त्याला असली पाहिजे .इतकेच वाटते . प्रस्थापित उत्कृष्ट व्यवस्थेला सतत मिळेल त्या संधीचा फायदा घेऊन विरोध करणे हे काही फार बुद्धिमान असल्याचे लक्षण नसून व्यवस्थे कडून बहिष्कृत केले जाण्याचे अथवा प्रसंगी ठेचले जाण्याचे दृश्चिन्ह त्यामध्ये बीजभूत आहे हे अशा प्रकारच्या बंडाळ्यांचा इतिहास पाहता दुर्दैवाने नमूद करावेसे वाटते . असो .
इथे नर्मदा माता पूर्णपणे दगडी कडे कापत वाहत असल्यामुळे किनाऱ्याने चालण्यासाठी मार्ग नाही . तसेही नर्मदेच्या काही गुप्तधारा या दगडाखालून वाहत असल्यामुळे इथून जावयाचे नसते त्यामुळे मी पहाटे लवकर निघून ओंकारेश्वर बस स्थानकापर्यंत सडक मार्गाने गेलो आणि तिथून पुन्हा जंगलामध्ये शिरून नर्मदेचा काठ शोधायचा प्रयत्न सुरू केला . इथे माझ्याकडून पुन्हा एकदा थोडीशी गडबड झाली . परंतु जे होते ते चांगल्यासाठीच होते असे म्हणतात ! मार्ग भटकल्यामुळे ओंकारेश्वर च्या आसपासचे जंगल किती अप्रतिम आहे हे मला पाहता आले आणि सुमारे दोन-तीन तास मी त्या जंगलामध्ये वाट मिळेल तसा भटकत राहिलो ! अखेरीस एका सुंदर अशा ओढ्याने मला नर्मदा मातेकडे जाण्याचा मार्ग दाखविला . हा ओढा केवळ स्वर्गीय होता . माझ्या नशिबाने मला तो गुडघाभर पाण्यातून ओलांडता आला . परंतु ओंकारेश्वर धरणातून पाण्याचा विसर्ग झाल्यावर हाच ओढा पाच ते सहा फूट पातळी वाढवून वाहत असतो असे नंतर मला लक्षात आले . इथून पुढे मला अप्रतिम असा नर्मदेचा किनारा सापडला ! ९०% लोक ओंकारेश्वरला परिक्रमा उचलत असूनही दुर्दैवाने या काठावरील मार्गाने एक टक्का सुद्धा परिक्रमावासी जात नाहीत . इथून झालेले नर्मदा मातेचे दर्शन केवळ विलोभनीय होते ! परंतु इथे जंगलावर राज्य करणाऱ्या अन्यही काही श्वापदांनी सुंदर असे दर्शन दिले !
लेखांक अडुसष्ठ समाप्त ( क्रमशः )
मागील लेखांक
पुढील लेखांक
छान.
उत्तर द्याहटवाआता शूलपाणीच्या जंगलातले अनुभव वाचायला उत्सुक!
ओंकारेश्वर येथे गेलो आहे, त्याआधीच ही लेखमाला वाचायला सुरू केली असल्याने नर्मदा मैय्याचे इथले दर्शन, अतिशय स्वच्छ पाणी ही अनुभूती फारच छान. अतिशय positive energy आहे हे जाणवले होतेच. आमचे तर गर्दीमुळे ओंकारेश्वर दर्शन होते की नाही ही चिंता असताना मी दर्शन चिंता मैयाच्या मनात असेल तसे असे सोडून दिले. अक्षरशः 15 मिनिटात दर्शन झाले. जय नर्मदा मैया
उत्तर द्याहटवाआम्ही उभयतां वाहनाने प्रथमच जेव्हां ॐकारेश्वर दर्शनाला गेलो तेव्हां श्री गजानन महाराज भक्तनिवासमध्ये च उतरलो होतो. छान व्यवस्था व सेवा आहे. भोजनप्रसादही छान असतो. आम्हाला मैय्या स्नानाची खूप इच्छा होती, म्हणून पहाटेच स्नानाला निघालो. कांहीच माहीती नव्हती. मैय्याकृपेने एक प्रवासी बस चे गाईड अचानक मदतीला आले. त्यांनी थेट अमलेश्वर घाटापर्यंत सोबत येऊन स्नान करण्याची जागा दाखविली व परत गेले. आम्ही मैय्यामध्ये स्नान करून अमलेश्वर व ॐकारेश्वर दर्शन घेतले. ती आठवण आली. नर्मदे हर।
उत्तर द्याहटवापुढच्या भागावर जा
उत्तर द्याहटवा