लेखांक ६९ : बिबट्याने दिलेले दर्शन आणि अरण्यातील गूढरम्य मौनीबाबा गुफा आश्रम

नर्मदेचा किनारा असा नुसता शब्द मी वापरतो आहे . प्रत्यक्षात इथे विंध्य आणि सातपुडा असे दोन प्रचंड पर्वत कापत नर्मदा वाहते आहे . त्यामुळे पायाखाली फक्त धारदार कपचे असलेले खडक व ते देखील तीव्र उताराचे असा भूभाग होता . याच्यावरून चालताना अतिशय सावधपणे पावले टाकावी लागत होती कारण एक जरी पाऊल सटकले तर नर्मदेमध्ये पडण्याचा धोका होता .अर्थात नर्मदेमध्ये एक-दोन नावा दिसत होत्या . परंतु एकंदरीत पाणी खूप खोल होते एवढे नक्की .
या भागाचे त्याच वेळी अन्य परिक्रमावासीने काढलेले प्रकाशचित्र
 डाव्या हाताला जबरदस्त जंगल होते . नर्मदा मातेने माझा रस्ता चुकविला हे एकादृष्टीने बरेच झाले कारण हा ओढा जिथे नर्मदेला मिळतो तिथे पाणी प्रचंड खोल होते आणि पार करण्याची काहीच व्यवस्था नसल्यामुळे मला पुन्हा उलटे तरी जावे लागले किंवा सामानासकट पोहून ओढा पार करावा लागला असता . वाट चुकल्यामुळे मी तो उथळ पाण्यातून पार केला होता .
 हाच तो खोल ओढा
खाली गाळ असेल तर असे ओढे पार करता येणे अवघड असते .हे त्याच ओढ्याचे संग्रहित चित्र आहे .
हळूहळू जंगलातील मातीने दगडांवर जम बसवला . आणि एक छोटीशी पायवाट तयार झाली . या पायवाटेवर मला बिबट्याचे ठसे दिसले . अगदी ताजे ठसे होते याचा अर्थ तो नुकताच इथून गेला होता . कदाचित आजूबाजूला कुठेतरी लपून मला पाहतही असेल . मी आपला नर्मदेचा जप करत पुढे चालू लागलो . 
पुढे एक हनुमानाचे मंदिर दिसू लागले . मी एक पाऊल ठेवायला मिळेल असा दगडी रस्ता पकडून चालत होतो .आता खाली उतरून हनुमंताचे दर्शन घ्यावे असा विचार मी करेपर्यंत खाली नर्मदेचे पाणी पिणारा एक सुंदर नर बिबट्या अतिशय वेगाने वरच्या दिशेने जंगलाकडे पळाला . बघता बघता अदृश्य देखील झाला . याचा रंग अतिशय सुंदर पिवळा होता ! मी उघड्यावरती बिबट्या प्रथमच पाहिला !त्याचे माझ्यापासूनचे अंतर २० मीटर सुद्धा नसेल .
 संग्रहित चित्र
 हा त्याचा परिसर असल्यामुळे आणि त्याला पाणी प्यायचं असल्यामुळे मारुती मंदिराकडे न जाता मी पुढे चालत राहिलो .याला पाहून माझ्या छातीमध्ये धडधड सुद्धा वाढली नाही . आश्चर्यच आहे .
 हेच ते मारुती मंदिर . मंदिरावर बसलेली वानर सेना
मी अगदी याच मार्गाने आलो
समोरच्या जंगलामध्ये पट्टेरी वाघांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे
 वन्य श्वापदांचे रक्षण करणे म्हणजे पर्यायाने पर्यावरणाचे रक्षण करण्यासारखेच आहे .

गमतीचा भाग म्हणजे मी या भागातून चालत जात असताना माझ्या मागून काही अंतरावरून सात्यकी देखील येत होता . मला हे तेव्हा कळाले जेव्हा मी फेसबुक वर त्याने टाकलेले माझेच फोटो पाहिले ! मला एकटे चालायला आवडते हे माहिती असल्यामुळे बहुतेक त्याने मला आवाज दिला नसावा . परंतु त्याला बिबट्या दिसला नाही हे देखील बरे झाले . नाही तर तो पुन्हा कधीच किनाऱ्याच्या रस्त्याने चालला नसता ! अगदी ह्याच जागी सात्यकीने काढलेले फोटो आपल्या माहितीकरता देत आहे आणि गुगल नकाशा देखील सोबत जोडत आहे .
या चित्रामध्ये नर्मदा उजवीकडून डावीकडे वाहत आहे .डावीकडे डोंगरावर असलेला मौनी बाबा आश्रम दिसतो आहे आणि त्याच्या बरेच अलीकडे हनुमंताचे मंदिर दिसत आहे .याच ठिकाणी बिबट्याने दर्शन दिले . आता हेच मंदिर प्रत्यक्षात कसे दिसते पहा .
उजव्या हाताला नर्मदा माता आहे .डावीकडे जंगल आहे आणि उजवीकडे नर्मदेच्या काठावर छोटेसे पांढरे बांधकाम दिसते आहे तोच मारुती आहे . गंमत म्हणजे हा फोटो काढताना बिबट्या पाणी पीत होता परंतु तो डोंगराच्या सोंडे मागे लपला गेला आहे .अन्यथा खूप सुंदर फोटो आला असता . समोर चाललेला प्रस्तुत लेखक .मी मंदिराजवळ जातच बिबट्याने धूम ठोकली .
सातपुडा पर्वतावरून दिसणारी नर्मदा माता पलीकडे विन्ध्याचल . हे फोटो माझ्या परिक्रमेदरम्यानच आणि साधारण त्याच वेळी सात्यकीने काढलेले आहेत . धरणातून पाण्याचा विसर्ग झाला की इथे पाणी पातळी बघता बघता वाढते .
अखेर एके ठिकाणी उभे राहून नर्मदा मातेचे अवलोकन करीत असताना मला मागून येणारा सात्यकी दिसला .मनोज दत्ता या बंगाली बाबू ने दिलेली टोपी मी फक्त या टप्प्यामध्ये घातली आणि नंतर काही मला तो प्रकार पटला नाही त्यामुळे कायमची झोळीत ठेवून दिली . प्रस्तुत परिक्रमावासी दगडाच्या ज्या कपारीवर उभा आहे तिथून मागे किंवा पुढे गेले की तोल ढळणे निश्चित आहे . अशा हजारो कठीण टप्प्यातून काठावरची नर्मदा परिक्रमा जाते . परंतु प्रत्येक वेळेस नर्मदा तुम्हाला सावरून घेते . सुदैवाने येथे छायाचित्रकार मागेच असल्यामुळे हा सुंदर प्रसंग टिपला गेला .
हनुमान मंदिराच्या अगदी जवळ आलेला प्रस्तुत लेखक . बिबट्या अजूनही तिथेच पाणी पितो आहे .
तो इतक्या वेगाने पळाला की सात्यकीला देखील कळले नाही की इथून काहीतरी पळाले आहे .
इथून पुढे चालण्यायोग्य मार्ग नसल्यामुळे थांबून मी पाहणी करत होतो . तोपर्यंत सात्यकी मागून फोटो काढत होता . थोडेसे दगडाचा आधार घेत चालल्यावर एका पावलाचा मार्ग सापडला आणि समोर मानवी वावराच्या खुणा दिसल्या .
दुपारच्या सुमाराला जो आश्रम चुकवून तुम्हाला जाताच येणार नाही असा उभ्या खडकामध्ये बांधलेला एक आश्रम आला . याचे कारण आता नर्मदेचे दोन्ही तट उभे खडक अशा स्वरूपाचे होते . हा होता मुनी बाबा किंवा मौनी बाबा यांचा आश्रम . डावीकडे असलेल्या सातपुडा पर्वताच्या अभेद्य भिंतीमध्ये काही अति प्राचीन गुहा होत्या . या गुहांच्याच पुढे थोडेफार बांधकाम करून आश्रमाचे स्वरूप त्याला देण्यात आले होते . आश्रम अतिशय सुंदर होता . आश्रमाची व्यवस्था एक तरुण तेजस्वी साधू पाहत होता . या साधूचे नाव होते भागीरथ गिरी महाराज . गोरापान वर्ण डोक्यावर जटाभार आणि बहुतेक पूर्वाश्रमीचे उच्च विद्या विभूषित असावेत अशी भाषा . यांचे गुरु महंत आनंद गिरीजी महाराज आणि अशोक गिरीजी महाराज हे नर्मदा परिक्रमेसाठी गेले होते .
 हाच तो जुना आखाड्याचा डोंगर उतारावरील मौनी बाबा गुफा आश्रम .
आश्रमामध्ये येणारा तात्पुरता कच्चा वन रस्ता
आश्रमाच्या बाहेर केलेल्या वन उद्यानातून आत गेल्यावर हे प्रवेशद्वार लागले .
भगवान गुरुदेव दत्त हे जुन्या आखाड्याचे आराध्य दैवत आहेत त्यामुळे इथे सर्वत्र दत्ताचे फोटो दिसतात . याच आश्रमामध्ये अतिशय गूढरम्य अशा अप्रतिम गुफा आहेत . बाहेरून छोटा दिसणारा आश्रम प्रत्यक्षामध्ये आत मध्ये गेल्यावर अनेक गुफांचा समूह आहे असे लक्षात येते . इथे परिक्रमावासींना शक्यतो प्रवेश दिला जात नाही परंतु भागीरथगिरी महाराजांना विनंती केल्यामुळे त्यांनी आम्हाला संपूर्ण परिसर स्वतः फिरवून दाखवला . या भागातील दगड हा स्फटिका सारखा चौकोनी आकारामध्ये आपोआप कापला जातो . त्यामुळे गुहांच्या आकारात देखील गोलवा नसून चौरसाकृती आयताकृती असे गुहांचे आकार आहेत . 
आश्रमातून नर्मदे कडे जाण्याचा मार्ग असा धोकादायक व तीव्र उताराचा आहे . महापुरामध्ये आश्रमा पर्यंत पाणी येते . 
आश्रमामध्ये छोटीशी गोशाळा देखील आहे . इथले कुठलेही बांधकाम म्हणजे तीन बाजूने भिंती आणि एका बाजूने पहाड आहे . 
 आश्रमाच्या पुढील भागामध्ये हा स्लॅब टाकलेला असून वरती हवन कुंड आणि सज्जा आहे . तर या स्लॅबच्याच खाली परिक्रमा वासींची निवास व्यवस्था आहे .
दोन्ही बंगाली बाबूंचे नामकरण आम्ही छोटा बंगाली आणि मोठा बंगाली असे केले होते .छोटा बंगाली सोबत असल्यामुळे त्याने प्रस्तुत लेखकाचे भरपूर फोटो या भागात काढले ! भविष्यात त्याच्याकडून ते प्राप्त झाले . वरील चित्रामध्ये जी गच्ची दिसते आहे तिथेच हे फोटो काढलेले असून या गच्चीवरच भागीरथ गिरी महाराजांबरोबर खूप विषयांवर अगदी मनमोकळ्या गप्पा मारायची संधी मला मिळाली .
मुनी बाबा आश्रमाच्या सज्जावर उभा प्रस्तुत लेखक . अमरावतीचे संत शंकर महाराज यांचा सुती अंगरखा त्यांच्या एका शिष्यांनी मला दिला होता . तो इथून पुढे मी अंगावर चढवायला सुरुवात केली . कारण उकाडा वाढल्यामुळे थर्मल वेअरची एवढी गरज आता दिवसा तरी वाटत नव्हती . 
इथून नर्मदा मैया आणि समोरचे जंगल खूप सुंदर दिसत होते .
समोर असलेल्या पळसाच्या झाडावर असंख्य जातीचे पक्षी येऊन बसले होते . 
सात्यकी रॉय  याचे देखील काही फोटो त्याच्याच कॅमेऱ्यावर मी इथे उभे राहून काढले . 
 सात्यकी रॉय उर्फ छोटा बंगाली ! मौनी बाबा आश्रमात .
मला जंगलामध्ये एक भाला सापडला होता . तो या चित्रात दिसतो आहे . तो काठीला लावून चालायची माझी इच्छा होती . परंतु वजन वाढले असते म्हणून मी तो इथे आश्रमातच ठेवला .
 हाच तो भाला . आणि हाच प्रस्तुत लेखक . खांद्यावर घेतलेलं उपरणं दप्तराचा भार थोडासा वितरित करायचे . आणि अचानक एखाद्या हिवस्त्र प्राण्यांनी हल्ला केलाच तर आपली मान त्याच्या तोंडात सहजी सापडू नये म्हणून केलेले ते जुगाड होते . 
प्रस्तुत लेखक आणि छोटा बंगाली सात्यकी रॉय . त्याला देखील उपरण्याची युक्ती आवडली . आणि तो ती वापरू लागला . 

आमचे फोटो काढणे सुरू होते ,तोपर्यंत इकडे एक नवीन बनलेला साधू पटापट टिक्कड बनवत होता .त्याची गती पाहून मी अवाक झालो . त्यानंतर भागीरथी गिरी महाराजांशी गप्पा मारत बसलो . केसातील जटा कशा तयार होतात हे मी त्यांच्याकडून समजून घेतले . भोजन प्रसाद खूपच अप्रतिम होता . आम्ही दोघेच परिक्रमावासी इथे होतो . त्यातही सात्यकी भ्रमणा मध्ये होता . म्हणजे परिक्रमावासी मी एकटाच ! भागीरथी गिरी महाराज मला सांगू लागले . नशिबाने हा जंगलातला मार्ग फारसा कोणाला सापडत नाही . तरीदेखील देव दिवाळी झाल्यावर इथे दिवसाला शंभर दीडशे लोक जेऊन जातात . रस्त्यालगत असलेल्या आश्रमात मात्र दिवसाला हजार बाराशे लोक आरामात मुक्कामी असतात . यामार्गे फक्त नागा साधू जातात . आणि त्याचे कारण तुम्हाला मागील फोटो पाहिल्यावर लक्षात आले असेलच . परंतु या सर्व लोकांना भोजन प्रसाद देण्याची व्यवस्था इथले आश्रम विना तक्रार करतात . त्यांना माहिती असते की यातील निम्म्याहून अधिक लोक लवकरच गळणार आहेत आणि घरी परत जाणार आहेत . परंतु असा कुठलाही विचार किंवा भेदभाव न करता अन्नदान केले जाते . या आश्रमात मुक्काम करावा असे वाटत होते ! महाराज सुद्धा थांब म्हणले होते . या आश्रमातील महंत स्वतः परिक्रमेला निघालेले असल्यामुळे यांच्याकडे आश्रम सांभाळायला ठेवला होता . त्यांनी काही दिवस चालत परिक्रमा करून नंतर गाडीने ती पूर्ण केली असे पुढे ऐकायला मिळाले . परंतु एकंदरीत वेळेचे गणित पाहता फाल्गुन महिन्यात नावा बंद होणार होत्या . त्यामुळे अधिकाधिक चालणे हेच माझ्या हिताचे होते . इथून पुढचा मार्ग जंगलातून जाणारा आणि अतिशय खडतर असल्यामुळे शिवाय जंगलात हिंस्र प्राणी असल्याचे मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिल्यामुळे छोटा बंगाली , याला मी एकट्याला मागे ठेवले नाही . सोबत घेतले . छोटा बंगाली अखंड फोटो काढत होता . परंतु त्या बिचाऱ्याचे फोटो अजिबात निघत नव्हते .मला फोटोग्राफीची खूप आवड आहे . त्यामुळेच मी सोबत मोबाईल कॅमेरा वगैरे घेतला नव्हता . नाहीतर १००% माझी परिक्रमा पूर्ण झाली नसती . नर्मदा इतकी सुंदर आहे ,इतकी अद्भुत आहे , इतकी नयनरम्य आहे की तिची किती रुपे टिपावीत आणि किती नको असे फोटोग्राफरला होते . बंगाली बाबूला मी सांगितले की तुझे काही फोटो मी काढतो . आणि ती हौस भागवून घेतली . ते फोटो मुद्दाम येथे जोडत आहे त्यामुळे तुम्हाला आम्ही किती सुंदर , निर्मनुष्य , निसर्ग संपन्न व भयाण भागातून जात होतो हे लक्षात येईल . 
छोटा बंगाली आणि प्रस्तुत लेखक (अशी टोपी घालणे परिक्रमेमध्ये मान्य नाही याची कृपया नोंद घ्यावी . ही काही तासांपुरती घालण्यात आली होती )
उजव्या हाताला मैया पायाखाली खडक आणि डावीकडे जंगल असे अखंड कितीतरी किलोमीटर होते .
आता कॅमेरा प्रस्तुत लेखकाच्या हातामध्ये आहे आणि छोटा बंगाली पुढे निघाला आहे . माझा अगदी काठाकाठाने चालण्याचा नियम त्याला खूप आवडला होता . त्यामुळे सोबतच्या सर्वांना फाट्यावर मारून तो एकटा चालत होता . 
अतिशय शांत धीर गंभीर वातावरण . जंगलातली शांतता प्रसंगी खूप भयाण असू शकते . नर्मदा जल तर इतके स्थिर आहे की असे वाटावे की एखादे सरोवरच आहे . 
 सात्यकी रॉय याचा लेखकाने काढलेला फोटो
ढगांच्या आड गेलेल्या सूर्याच्या प्रकाशात पाय कुठे ठेवायचा याची जागा शोधत चालणारा प्रस्तुत लेखक . शेजारी रेवामाई . ही शेजारी असलीच पाहिजे ! सतत डोळ्यांना दिसलीच पाहिजे ! असा दुराग्रही हटनिग्रही परिक्रमावासी तुम्हाला दिसतो आहे ! 
दोन महिने चालून मळलेले वस्त्र आणि आजच नवीन घातलेले वस्त्र  यांच्या रंगातील फरक पहा ! फक्त मी प्रयत्नपूर्वक अशी धूळ शक्यतोवर तशीच ठेवत असे . कारण नर्मदे काठी असलेल्या विविध तीर्थक्षेत्रांची ही धूळ अंगावर घेण्यासाठी तर परिक्रमा करायची असते ! संत पाऊले साजिरी । गंगा आली आम्हावरी ।
जिथे उडे रज धुळी । तेथे करावी आंघोळी ॥
असे तुकाराम महाराज म्हणतात ! अर्थात संतांची चरण धूळ लागलेली जी तीर्थक्षेत्रे , इथली धूळ अंगावर घ्यावी ! अभिमानाने मिरवावी . त्या धुळीने स्नान करावे ! 
थोडेसे माझ्या मागून तुम्ही देखील कल्पनेने या मार्गाने चालून पहा ! खूप मजा येते ! विंध्य आणि सातपुडा पर्वतांमधली खचदरी किती स्पष्ट दिसते आहे पहा ! एमपीएससी यूपीएससी मधला हा ठरलेला प्रश्न आहे ! नर्मदा नदी उलटी का वाहते ? त्याचे कारण ती पठारावरून न वाहता खचदरीतून वाहते . This is that Rift valley students! सोडा ते पेपर आणि नर्मदा परिक्रमा करा ! बघा कसे उत्तम गुणाने आयएएस ऑफिसर होताय ! 
मगाशी मी सांगितले तसे इथले दगड कसे सरळ रेषेमध्ये खचतात पहा  .खडकांवरच्या रेषा पहा .
सह्याद्री मधला बेसाल्ट असा फुटत नाही . या गुणधर्मामुळे या दगडांना प्रचंड धार असते आणि तुम्हाला फार जपून पाऊल टाकावे लागते .
पण जपून पाऊल टाकणे आपल्या मुळातच नाही ! दे दणादण उड्या मारत परिक्रमा पूर्ण केली ! नर्मदा मातेच्या कृपेने आपल्या पायाला काहीही इजा होत नाही , खरचटत नाही ,मुरगळत नाही ,तूट फूट होत नाही हे कळल्यामुळे बिनधास्त अशा उड्या मारायचो ! जय हो माई की ! चिंता काहे की ! छोटा बंगाली बाबू फोटो चांगले घ्यायचा . तुम्हीच कल्पना करून पहा .इतके मोठे खडक आडवे आल्यावर ते जर जिन्यासारखे चढायला लागलो आणि उतरायला लागलो तर किती वेळ लागेल ! त्यापेक्षा एका उडीत तो उल्लंघून जायचा . ते सोपे पडायचे . 
कल्पना करून पहा अशा ठिकाणी जर बिबट्या तुमच्या मागे लागला तर ? हा हा हा ! या केवळ कल्पनाच ठरतात ! कारण नर्मदा माता शेजारी असल्यामुळे परिक्रमा वासींना कुठलाही प्राणी जरा सुद्धा त्रास देत नाही असा जाज्वल्य इतिहास आहे ! आणि इतके दिवस हे कदाचित माझे अनुमान होते परंतु आज पासून माझा अनुभव देखील असाच होता ! त्यामुळे अतिशय निर्धास्तपणे जंगलातली वाटचाल चालू ठेवली ! 


लेखांक एकोणसत्तर समाप्त ( क्रमशः )

मागील लेखांक

पुढील लेखांक

टिप्पण्या

  1. हे सर्व लेख सलग वाचून काढले. तुमची शैली अप्रतिम आहे. तुम्हाला आलेले अनुभव मलाही तितक्याच उत्कटतेने मलाही आले असे वाटत राहिले. फोटोंमुळे लज्जत आणखीनच वाढली आहे. पुढचे अनुभव वाचण्याची खूप उत्सुकता आहे. वाट बघत आहे !

    उत्तर द्याहटवा
  2. Hanuman mandiracha ani bibtyachya ullekh vachun lakkadkotchi zadi mhantat ti hich kay ase vatale. Narmade Har pustakatla kunteswamini lihilele athavale!
    baki tumhi chan lihit ahat.. tumacha you tube channel hi niyamit pahat asate ! aplya karyat narmada mai nehami yash devo hich prarthana! Narmade Har!!

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

जे आवडते सर्वांना ...

अनुक्रमणिका

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

लेखांक १ : नर्मदे हर !

लेखांक २ : भोपाळ जवळच्या जंगलातील अपघात

लेखांक ४ : झुठा कही का ! सबकुछ तो लाए हो !

लेखांक ३ : चोराची धन

लेखांक ५ : ग्वारीघाट जबलपुर मध्यप्रदेश

लेखांक ८३ : महाराष्ट्रात प्रवेश आणि भाबरीचे भेदक भिल्ल-महात्मा फोदला गारद्या पावरा

लेखांक ७४ : लेपा बांध , वेदा संगम , कठोरा अन् मांडव्य गुंफा

लेखांक ९० : गुजरात मधील कणजी चे सान्सुभाई तडवी आणि अरण्यव्याप्त माथासर