लेखांक ७० : धर्मवीर बलिदान मास आरंभ आणि रमणीय नजर निहाल आश्रम

आज फाल्गुन महिना सुरू झाला होता . गेली अनेक वर्षे महाराष्ट्रातील आणि काही प्रमाणात महाराष्ट्रा बाहेरचे देखील तरुण हा महिना श्री धर्मवीर बलिदान मास म्हणून पाळतात . 

स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर श्री संभाजी महाराज यांना औरंगजेबाने पकडून छळ छावणी मध्ये ठेवले होते . आणि धर्मांतरण करण्यासाठी विविध प्रकारे दबाव आणून सुमारे ४० दिवस अनन्वित मानसिक आणि शारीरिक यातना देत त्यांचा छळ केला होता . तरी देखील संभाजी महाराज बधले नाहीत आणि त्यांनी धर्म परिवर्तन केले नाही . त्यामुळेच आज आपला देश हिंदू बहूल राहिला आहे हे ऐतिहासिक सत्य आहे . अन्यथा सतराव्या शतकातच आपल्या देशाचा पाकिस्तान अफगाणिस्तान होऊ घातला होता . संभाजी महाराजांच्या या तेजस्वी बलिदानामुळे शिवछत्रपतींच्या महानिर्वाणानंतर विखुरलेले अठरापगड जातीचे मराठे भगव्या झेंड्या खाली एकत्र झाले आणि त्यांनी अहद तंजावर तहद पेशावर मराठी साम्राज्य उभे केले . कटक ते अटक भगव्या झेंड्याचे राज्य निर्माण झाले . संभाजी महाराजांच्या ओजस्वी बलिदानामुळेच आज आपण भारत नावाच्या देशामध्ये राहत आहोत याचे स्मरण पुढील पिढ्यांना राहावे म्हणून हा बलिदान मास पाळला जातो . मी गेली अनेक वर्षे बलिदान मास पाळतो . या काळामध्ये तरुण एकभुक्त राहणे ,गोडधोड न खाणे ,चहा न पिणे ,पायात चप्पल न घालणे , व्यसन असेल तर व्यसन न करणे , सामिष भोजन न खाणे ,आनंदाचे कौटुंबिक सोहळे आयोजित न करणे , भूमीशैय्या करणे हे सर्व किंवा यातील एखादा जमेल तो नियम धरून महिनाभर पाळतात . माझे हे व्रत पाहून तमिळनाडू मधील माझे मित्र देखील बलिदान मास पाळायचे . आता परिक्रमेमध्ये यातील सर्व नियम पाळणे खूप अवघड होते . परंतु तेच तर खरे तप होते . त्यामुळे यातील किमान गोडधोड न खाणे हा नियम मला पाळता येणे शक्य होते . ते ध्यानात ठेवून मी चालायला सुरुवात केली . नर्मदापुरम इथून भिडे गुरुजी यांच्याशी फोनवर बोललो होतो तेव्हा सुद्धा मी त्यांना हा शब्द दिला होता .
दिला एकदा शब्द , न पालटावा । 
पुढे टाकला पाय मागे न घ्यावा ॥
या गुरुजींच्याच उपदेशा प्रमाणे सर्व सुरू होते . आज काठाकाठाने चालून जो मिळेल तो आश्रम गाठायचा असे नियोजन होते . मौनी बाबा आश्रमातील महंतांनी त्यांनी अनवाणी पायाने केलेल्या परिक्रमेचे अनुभव सांगितले होते . परंतु या भागातील खडक पाहता ते किती कठीण तप आहे याचा अंदाज येत होता . पायात बुटाचा जाडसर तळवा असूनही पाय कापतील असले खडक इथे होते . अतिशय विषम परिस्थितीमध्ये अनवाणी परिक्रमा लोक करतात . मला बलिदान मासामध्ये अनवाणी चालण्याची सवय गेली अनेक वर्ष असून देखील परिक्रमेमध्ये अनवाणी चालताना खूप त्रास व्हायचा . हे तप खरोखरच खूप कठीण आहे . आज आश्रमामध्ये भरपूर पोट पूजा झाली असल्यामुळे भूक लागलेली नव्हती . सकाळी तिथे पोहोचल्या पोहोचल्या वडे आणि भजी यांचा बालभोग मिळाला होता . त्यानंतर पुन्हा भोजनाचा आग्रह झाल्यामुळे टिक्कड भाजी खाल्ली होती . त्यानंतर खालच्या नैसर्गिक एसी असलेल्या परिक्रमावासी विश्रामगृहामध्ये एक डुलकी मारून साडेतीन वाजता पुढे निघालो होतो . नर्मदा नदीच्या दक्षिण तटावरून चालताना सूर्य कायम दुपारनंतर तुमच्या डोळ्यासमोर चमकत असतो .त्यामुळे कधी कधी डोके सुद्धा दुखते इतका त्याचा उष्मा तीव्र असतो . त्यात बरेचदा नर्मदा जलामध्ये त्याचे प्रतिबिंब चमकत राहते . अशावेळी समोरून येणाऱ्या आपोज्योतीच्या तेजामुळे डोळ्यांची दृश्यमानता कमी होऊन जाते . उत्तर तटावर चालताना दिवसाच्या पूर्वार्धामध्ये ही परिस्थिती असते . असो . आज मैया पूर्णपणे खडक कापत निघाली होती रंगीबेरंगी हिरवे जांभळे राखाडी खडक कापत तिचा वेगाने प्रवास चालू होता रस्ता नव्हताच पण एकंदरीत चालायला मजा येत होती मध्ये शेकडो फूट खोल नरसिंह कुंड आणि एक साधू कुटी लागली . नरसिंह कुंडाच्या इथे खूप सकारात्मक ऊर्जा जाणवत होती . इथे नर्मदा माता प्रमाणाच्या बाहेर खोल आहे . तिच्या स्वच्छ पाण्याचा तळच दिसत नाही . साधू कुटीमध्ये साधारण नव्वदीचे वय असलेले एक साधू महाराज खाटेवर निवांत बसले होते .त्यांच्या पायाशी बसून त्यांच्याशी थोडावेळ सत्संग घडला . त्यांचे शरीर अतिशय कृृष झाले होते परंतु तरीदेखील हालचालींमध्ये कमालीची तत्परता आणि आवाजामध्ये जरब होती. परिक्रमा करण्याचा आमचा मार्ग अतिशय योग्य आहे असे त्यांनी मला सांगितले . या मार्गाने फारसे कोणी जात नाही हे देखील त्यांनी सांगितले . बंगाली बाबू ने महाराजांच्या चरणाशी बसलेला एक फोटो काढला . 
नरसिंह कुंडा जवळच्या साधू कुटीतील साधू महाराज आणि प्रस्तुत लेखक
नर्मदे काठी असे अनेक साधू तपस्वी संन्यासी आपापल्या मस्तीमध्ये मस्त आहेत ! हे लोक बाहेर कुठे जातच नाहीत . साधू म्हटल्यावर आपण टीव्ही , प्रसारमाध्यमे , सोशल मीडिया इत्यादीवर ज्या साधू लोकांना पाहतो ,  तीच प्रतिमा आपल्या मनामध्ये असते . परंतु हे सर्व बहिर्मुख कार्य करणारे संत आहेत . खरे अंतर्मुख संत पाहायचे असतील तर नर्मदा परिक्रमा करण्याशिवाय सोपा पर्याय नाही . स्वत्वाची पूर्णपणे राख केलेली ही अजब निस्पृहता आहे . तिची तुलना कुठल्याही चकाचक फाईव्ह स्टार तथाकथित साधूत्वाशी होऊ शकत नाही . जगामध्ये विशेषतः शहरी भागामध्ये अनेक स्वयंघोषित अध्यात्मिक गुरूंचे पेव सध्या फुटलेले आहे . आणि पाठांतर चांगले असल्यामुळे ते तुम्हाला काही संकल्पना ऐकवू देखील शकतात . परंतु समर्थ रामदास स्वामी म्हणतात त्याप्रमाणे "प्रचितीचा महंत " मिळणे खरंच खूप कठीण असते . तो तुम्हाला असा गिरी कंदरांमध्येच शोधावा लागतो . असो .
या भागातील प्रस्तर खचून तिरके झाले होते आणि त्याच्या मधून नर्मदामाता वेगाने वाहत होती . सातपुडा आणि विंध्य पर्वत यांची धडक झालेला हा भाग आहे . नर्मदा मातेची खोली शोधणे खरोखरच खूपच कठीण काम आहे . इथे आता नावांची वर्दळ दिसू लागली . एका नवाड्याने सांगितले की पुढे नजरनिहाल आश्रम नावाचा आश्रम आहे . तिथे मुक्काम करावा . नर्मदानंद स्वामी नावाच्या एका संन्यासी महाराजांनी हा आश्रम उभा केलेला आहे . 
 श्री नर्मदानंद स्वामी
तत्कालीन मुख्यमंत्री श्री शिवराज सिंह चौहान यांच्यासोबत नर्मदानंद स्वामी
अतिशय सुंदर असा घाट , वरती संगमरवरी हनुमान मंदिर ,अतिशय अप्रतिम जनावरे असलेली सुंदर गोशाळा आणि जिवाभावाने परिक्रमावासींची सेवा करणारे सेवक कुटुंब असा तो आश्रम होता . मी आश्रमामध्ये गेल्यावर तिथे एक सेवेकरी दोन बैलांच्या सहाय्याने आश्रमाची जमीन नांगरतो आहे असे मी पाहिले . एका वयस्कर आजोबांनी आसन लावण्याची सूचना केली .  आश्रमामध्ये पत्र्याची एक मोठी शेड होती तिथे उघड्यावरतीच मी आणि बंगाली बाबू ने आसन लावले . मला नांगरणी पाहायला खूप आवडते . परंतु प्रत्यक्षामध्ये बैलांची नांगरणी मी कधी केलेली नव्हती . माझे सर्व मामा उत्तम शेती करणारे होते आणि स्वतः मोट धरणे , नांगरट करणे , कुळव चालवणे ,ही सर्व कामे त्यांना जमायची . परंतु मला कळायला लागल्यापासून ट्रॅक्टरनेच शेतामध्ये प्रवेश केलेला होता . त्यामुळे माझ्या मनात झालेली इच्छा ओळखून त्या माणसाने थेट बैलांचे कासरे माझ्या हातात दिले आणि मी नांगरायला सुरुवात केली . आधी माझा नांगर सरळ रेषेत फिरत नव्हता . परंतु लवकरच नांगरटीचे सूत्र  माझ्या लक्षात आले आणि संपूर्ण क्षेत्र नांगरण्याचा आनंद मी घेतला ! त्या माणसाला देखील थोडीशी विश्रांती मिळाली . इथे प्रकाश पाटीदार आणि त्याची परिक्रमावासीकर्तव्यदक्ष पत्नी ज्योतीताई असे कुटुंब सगळी व्यवस्था पाहत होते . यांची दोन मुले अनुराधा आणि जीवन आई वडिलांना मदत करायचे . प्रकाशचे आजोबा गोविंदरावजी पाटीदार हा मनुष्य फारच अवलिया होता ! त्यांच्याकडे एक सुरेख गोफण होती . आश्रमामध्ये शक्य ती सर्व फळझाडे फुलझाडे महाराजांनी लावलेली होती . इथे माकडांचा उपद्रव खूप होता . त्यामुळे त्यांनी माकडांना पळवून लावण्यासाठी एक पाळीव माकड ठेवले होते . याचे नाव रँचो असे होते . परंतु त्याला कर्करोग झालेला असल्यामुळे त्याच्या हालचाली मंदावल्या होत्या . एका झाडावर एका विशिष्ट खोबणी मध्ये ते दिवसभर बसून राहायचे . त्यामुळे माकडांना पळवून लावण्यासाठी गोविंदराव पाटीदार या गोफणीचा वापर करायचे . गोफणीने दगड फेकून मारता येतो इतकेच मर्यादित ज्ञान मला होते . परंतु गोफण किती अचूकपणे वापरता येते हे मी आयुष्यात कधी पाहिलेले नव्हते . गोविंदराव मला म्हणाले की तुम्ही पाया थोडे अंतर घेऊन उभे रहा . माझ्यामागे एक लोखंडाचा खांब होता . मला काही कळायच्या आत त्यांनी गोफण फिरवली आणि माझ्या मागून खंण्णण असा जोरात आवाज झाला ! गोविंदरावांनी मारलेला खडा माझ्या दोन पायांच्या मधून जाऊन खांबावरती आपटून पुन्हा त्यांच्या पायापाशी येऊन पडला होता ! मला हा योगायोगाने बसलेला नेम आहे असे वाटले . परंतु त्यांनी पुन्हा एकदा तसाच खडा मारला आणि खांबावर आदळून बरोबर त्याच जागी तो पुन्हा येऊन पडला ! खांबाचा आकार दंडाकृती असल्यामुळे तो जर बरोबर सरळ रेषेत बसला तरच माझ्या पायांमधून परत येणे शक्य होते . जरा जरी बाजूला बसला तर दगड दुसऱ्या दिशेला निघून गेला असता ! 
गोविंदराव पाटीदार यांच्या गोफणीचा सात्यकीने काढलेला फोटो
मला आश्चर्य वाटत आहे हे पाहून गोविंदरावांना मौज वाटायला लागली आणि त्यांनी मला अनेक गोष्टी नेम धरून उडवून दाखवल्या ! गोफणीने इतका अचूक नेम साधता येतो हे मला खरोखरच माहिती नव्हते . अतिशय लहान वय असल्यापासून गोविंदराव गोफण खेळत होते त्यामुळे त्यांची ही साधना सिद्ध झाली होती ! आयुष्यामध्ये कुठलीही गोष्ट सातत्याने पुन्हा पुन्हा आणि नियमितपणे करत राहिले तर त्याच्यामध्ये अचूकता येत जाते . पाटीदार आजोबांनी मला गोफण फिरवायला शिकवले . आश्रमाचा परिसर अतिशय सुंदर होता तो एकदा नजरे खालून घालावा म्हणून मी चक्कर मारू लागलो . गो शाळेतील जनावरांनी माझे लक्ष वेधले . इथे अतिशय सुंदर जातिवंत अशा वीस गिरगायी होत्या दोन भव्य दिव्य नंदी होते आणि एक कामधेनु होती . कामधेनु म्हणजे अशी गाय जिला पाच थानं असतात व सर्व स्तनातून ती दूध देते ! इथे गाईंना खूप चांगल्या पद्धतीने ठेवले होते . गाई सारखा प्रेमळ पशू दुसरा नाही . मी ज्या ज्या आश्रमामध्ये राहिलो त्या त्या आश्रमातील गोसेवेचा पुरेपूर आनंद घेतला . गो सेवेसारखे पुण्यदायक आणि आरोग्यदायक दुसरे काही व्रत नाही !
नजर निहाल आश्रमातील एका सुंदर गोमाते सोबत प्रस्तुत लेखक
 इथे असलेला मुख्य वळू अतिशय मारका होता असे मला सांगण्यात आले होते . परंतु त्याने पहिल्या स्पर्शापासून मला खूप प्रेमाने आणि आदराने वागवले !
नजर निहाल आश्रमातील मारका म्हणून ओळखला जाणारा प्रेमळ वळू
याला कुरवाळून घेण्याची खूप आवड होती .याच्या तुलनेने पलीकडची गाय किती छोटी दिसते आहे पहा .
हे सर्व फोटो ज्योतीताई पाटीदार हीने प्रकाशच्या मोबाईलवर काढले आणि माझ्या मित्राकडे पाठवून दिले . हा वळू कोणाला तरी हात लावू देतो आहे याचे आश्चर्य वाटल्यामुळे तिने फोटो काढायला सुरुवात केली ! शक्यतो जनावरे जनावरांना त्रास देत नाहीत ! ;)
 त्यानंतर इथली सर्वाधिक दूध देणारी गाय देखील मी पाहिली . कामधेनु माता ही तर साक्षात परमेश्वरी अवतार वाटत होती इतकी ऊर्जा तिच्या आजूबाजूला जाणवत होती ! 
हीच ती कामधेनू .मागे स्वामीजींचा फोटो दिसत आहे .
मला ही गोशाळा फारच आवडली . कामधेनू अतिशय शांत होती . तिच्या कानाचा आकार किती मोठा आहे ते पाहताना प्रस्तुत लेखक .
गो वंशा  सोबत वेळ कसा जातो कळतही नाही .सर्व शुभ लक्षणांनी युक्त अशी ही गोमाता मला खूप आवडली .
इथे ज्योतीताई गोसेवा करण्यासाठी येत असत . अतिशय उंच अंगकाठी असलेली ही धडधाकट स्त्री भारतीय लष्करामध्ये मोठ्या अधिकारी पदावर गेली असती असे तिच्याकडे बघून मला वाटले . तिला मी तसे बोलून देखील दाखवले . तिने सांगितले की तिची पोलीस किंवा लष्करामध्ये जाण्याची खूप इच्छा होती . परंतु लवकर लग्न झाल्यामुळे ते स्वप्न अर्धवट राहिले असे ती म्हणाली .मला हे अजूनही न उघडलेले कोडे आहे की लग्नापूर्वीचे स्वप्न आणि लग्नानंतरचे स्वप्न हे वेगळे कसे काय असू शकते ! स्वप्न हे स्वप्न असते ! ध्येय लग्नानंतर बदलणार असेल तर ते काही चांगले नाही . मुक्त संवाद साधून आपल्या ध्येयधोरणांची कल्पना माता-भगिनींनी आपल्या पतींना आणि त्यांच्या कुटुंबीयांना दिली पाहिजे असे वाटते .  संवाद तुटला की प्रगती खुंटते . पुरुषांनी देखील आपले कर्तव्य समजून जोडीदाराच्या योग्य त्या स्वप्नांना उभारी देण्याचे कार्य आवर्जून केले पाहिजे . तिची दोन्ही मुले चांगली उंच होती . किमान त्यांना तरी सैन्य अथवा पोलीस भरतीच्या दृष्टीने प्रयत्न करायला मी सुचविले . मुलांची माझी चांगली गट्टी जमली . दोघेही माझ्या आसनापाशी येऊन बसले होते आणि त्यांच्या अभ्यासाच्या वह्या ,चित्रकलेच्या वह्या वगैरे मला दाखवीत राहिले . मी सर्वच मुलांना चांगले हस्ताक्षर कसे काढायचे याचे नमुने काढून देत असे . तो कित्ता गिरवत बसण्यासाठी त्यांना सांगायचो . या मुलांनी माझ्याकडून नर्मदा मैया , शंकराचे तांडव नृत्य , रंग अवधूत महाराज अशी विविध चित्रे काढून घेतली .बलिदान मास सुरू झाल्यामुळे आज रात्री जेवणार नव्हतोच . त्यामुळे केलेला स्वयंपाक सर्वांना मी वाढला आणि नैवेद्याचे दूध घेऊन झोपी गेलो . पाटीदार आजोबांना शस्त्रांची आवड असल्यामुळे इथे वंश परंपरागत घराण्यातील पुजेतील तलवार ,गोफण ,लगोर अशी सर्व शस्त्रे होती . एक अतिशय मोठा शाळीग्राम आणि स्फटिकाचे सुंदर शिवलिंग देखील पूजेमध्ये होते . आश्रम मला खूपच आवडला . पाटीदार काका काम झाले किती गोफण कंबरपट्ट्यासारखी कमरेला बांधून ठेवत . एखाद्या बंदुकीपेक्षा घातक असे हे शस्त्र होते ! मला वाटेत कुणीतरी भरपूर सुकामेवा दिला होता . तो मी रांचो माकडाला भरवावा म्हणून त्याच्यापुढे धरला . तर गंमत म्हणजे हा त्यातील फक्त काजू काजू निवडून खाऊ लागला ! बदाम , खारीक, मनुका , बेदाणे ,पिस्ते यातील काहीही तो खात नव्हता ! मला या प्रकाराची फारच मौज वाटली ! प्रकाश देखील अतिशय सुस्वभावी , सरळ आणि सज्जन मनुष्य होता . सतत काही ना काही काम करत राहायचा . इथे बाहेर गावच्या येणाऱ्या स्वामीजींच्या शिष्यांसाठी उत्तम अशी निवास व्यवस्था गोशाळेच्या वर केलेली होती . ती त्याने फिरवून मला दाखवली . ओंकारेश्वर वरून मोर टक्क्याकडे जाणारा एक डांबरी रस्ता आहे . या रस्त्यावरून या आश्रमाकडे येण्यासाठी रस्ता आहे असे त्यांनी मला सांगितले . स्वामीजी तीर्थयात्रेसाठी गेलेले होते . त्यांच्याबद्दल इथले सर्वच लोक अतिशय आदराने बोलत होते आणि भरभरून त्यांचे कौतुक सांगत होते . वरिष्ठांच्या माघारी त्यांच्या हाताखाली काम करणारे लोक त्यांच्याबद्दल चांगलं बोलत असेल तर ते वरिष्ठ खरोखरच खूप चांगले असतात ! कारण ते चांगले नसतील तर त्यांच्या अपरोक्ष उखाळ्या पाखाळ्या करण्याची संधी शक्यतो कोणीही दवडणार नाही ! 
  सुका मेवा दिल्यावर त्यातले फक्त काजू निवडून खाणारे कर्करग ग्रस्त 'रँचो ' माकड आणि प्रस्तुत लेखक . वरच्या खोबणीमध्ये ते बसून राहायचे . त्याने लघवी देखील तिथेच केलेली ओघळावरून दिसत आहे .
Rancho घे !
नजर निहाल आश्रमाचा सुंदर परिसर . नजर निहाल म्हणजे केवळ नजरेने सांभाळ करणारा ! नजर निहार असा मूळ शब्द असून हे विशेषण कासवी साठी वापरले जाते . अशी कवी कल्पना आहे की कासवी केवळ नजरेने आपल्या पिलांचे पोषण करते . त्याप्रमाणे परमेश्वर किंवा नर्मदा माता केवळ नजरेने आपल्या भक्तांचे कल्याण करते .
नजर निहाल आश्रमाचा नर्मदे वरील घाट
आश्रम अगदी नर्मदे काठी आहे
सुंदर असे छोटेखानी संगमरवरी हनुमानाचे मंदिर आपले स्वागत करते
नजर निहाल हनुमानजी
ओंकारेश्वर मोरटक्का महामार्गावरील आश्रमाच्या महाद्वाराचे बांधकाम सुरू असताना देखरेख करणारे स्वामीजी
आश्रमातील गुरु पादुका स्थान
आश्रमामध्ये अशी शेती केलेली आहे . मी हीच शेती नांगरली
ह्याच पत्र्याच्या शेडमध्ये उघड्यावरती आम्ही झोपलो होतो .
आश्रमातील सुंदर आणि आदर्श गोशाळा . आता याच्यावर दुमजली बांधकाम असून निवास व्यवस्था केलेली आहे .
आश्रमात स्वामीजींसाठी लावलेला एक झोपाळा असून त्याच्यावर अन्य कुणाला बसू दिले जात नाही
झोपाळ्यावर बसून भक्त मंडळींशी चर्चा करताना नर्मदानंद स्वामीजी
नजर निहाल आश्रमाचे श्री नर्मदानंद स्वामी नर्मदा दर्शनाचा आनंद घेताना
या आश्रमामध्ये तुम्ही पुन्हा कधी देखील या असे पाटीदार काकांनी मला सांगितले . त्यांचे नुसते हे शब्द देखील खूप आश्वासक आहेत . कारण आपण आता जाणताच की ९०% परिक्रमा वासी त्यांची परिक्रमा ओंकारेश्वर येथून सुरू करतात . आणि तिथून निघाल्यावर पहिल्या दिवशी माणसे कमी चालतात त्यामुळे जवळपास प्रत्येक परिक्रमावासी मुक्कामासाठी याच आश्रमामध्ये सर्वप्रथम येतो . त्यामुळे इथे एका वेळेला एक हजार दीड हजार असे परिक्रमावासी हंगामामध्ये येत असतात ! यातील बहुतांश लोक नंतर परिक्रमावासी राहत देखील नाहीत हे पण आपण पाहिले . परंतु पहिल्या काही दिवसांच्या उत्साहामध्ये या भागातील , पुढच्या महिन्याभरातल्या टाप्यातले आश्रम हे खरोखरीच प्रचंड तणाव सहन करतात . त्यांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे . असे असूनही एखाद दुसरा परिक्रमावासी आला तरी देखील त्याच्या अगत्यामध्ये कुठलीही कसर हे लोक सोडत नाहीत हे पाहून फार बरे वाटले ! कल्पना करून पहा हे वर्तन किती कठीण आहे . त्यात ज्या दिवशी सर्वांची परिक्रमा संपते अशा महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी आम्ही आलो होतो . म्हणजे खरंतर या लोकांसाठी सुट्टी चालू होण्याचा तो दिवस होता . मैया चा काठ अशा अद्भुत सेवाधारी लोकांनी गजबजलेला आहे . या सर्व लोकांमध्ये एकच समान धागा आहे . हे सर्वजण मैयाला आपली आई मानतात .  तिच्या पवित्र जलावरच त्यांचे देह पोसलेले आहेत . परिक्रमावासी तर किती प्रकारचे पहावेत ! माझ्यासारखा एखादा दुसरा अनुभव लिहून ठेवणारा परिक्रमावासी सोडला तर अनुभवांची खीजगणती देखील न ठेवणारे परिक्रमा वासी ९९ .९९% आहेत ! अर्थात मी देखील त्यातलाच एक होतो ! ज्या दुकानदाराने मला डायरी आणि पेन दिले आणि मोठ्या अज्ञार्थक शब्दात रोज रात्री दिवसाचे सर्व अनुभव लिहून ठेवायला सांगितले ,त्याच्या इच्छेचीच ही परिणती आहे . आणि नर्मदे काठी बसलेल्या कुठल्याही माणसाची इच्छा ही नर्मदेचीच इच्छा असते असा अनुभव हळूहळू प्रत्येकालाच येऊ लागतो ! असो .
सकाळी लवकर येथून प्रस्थान ठेवले . पुढे जाताना काठावरतीच श्री श्री रविशंकर यांच्या शिष्यांनी उभा केलेला एक आश्रम दिसला . सात्यकीला हा आश्रम पाहायचा होता . मलाही उत्कंठा होती . म्हणून आम्ही आत मध्ये जाऊन आश्रमामध्ये फेरफटका मारला .परंतु तिथे कोणीही नव्हते त्यामुळे पुढे निघून गेलो परंतु आश्रम अतिशय सुंदर होता . नर्मदे काठी जाऊन साधना करण्यासाठी अतिशय उत्तम असे ते ठिकाण मला वाटले . आर्ट ऑफ लिव्हिंग चे चे कुणी भक्त असतील त्यांनी आवश्य या आश्रमात जाता येते का ते पाहावे . 
आर्ट ऑफ लिविंग चा आश्रम
आश्रमाचे प्रवेशद्वार अतिशय आकर्षक आहे
श्री श्री आश्रम
हे शब्द खूप वास्तववादी आहेत
श्री श्री रविशंकर यांचा विषय निघालाच आहे म्हणून मला आलेला त्यांचा एक अनुभव नमूद करावासा वाटतो . फार वर्षांपूर्वी माझा एक मित्र माझ्या मागे लागला होता की तू आर्ट ऑफ लिविंग चा बेसिक कोर्स कर . माझे वैयक्तिक मत असे होते की जिथे अध्यात्म आहे तिथे पैसा नाही आणि जिथे पैसा आहे तिथे अध्यात्म नाही . त्यामुळे मी त्याला म्हणालो की कोर्स करायला माझी हरकत काही नाही परंतु त्यासाठी ते फी आकारतात ते मला आवडत नाही . तुझे गुरु जर खरे असेल तर ते मला मोफत सर्व विद्या देतील ! आणि मगच मी त्यांना मानेन . मित्राचा निरुपाय झाला . पुढे काही वर्षांनी माझा एक उच्चपदस्थ अधिकारी मित्र एके ठिकाणी पंधरा दिवसाच्या कोर्ससाठी दक्षिण भारतामध्ये आला होता .काही निवडक अधिकाऱ्यांसाठी हे खास शिबिर आयोजित करण्यात आले होते . त्याचा मला संदेश आला की मी दक्षिण भारतात आलो आहे तू देखील जवळच आहेस तर आपण भेटूया . त्याने मला आश्रमाचा गुगल पत्ता पाठवून दिला . हा श्री श्री रविशंकर यांचा बंगलोर येथील मुख्य आश्रम होता . मी नेमका आश्रमाच्या इथे पहाटे तीन वाजता पोहोचलो आणि धुवाधार पावसामुळे काहीच कळेनासे झाले . त्यात बस वाल्याने मला दोन किलोमीटर पुढे सोडले . पावसात भिजत मी आश्रमाचे महाद्वार सापडते का ते पाहत होतो . इतक्यात दुचाकीवरून एक मनुष्य जाताना दिसला म्हणून मी त्याला अडवले . या भागामध्ये सर्व जंगल होते . घनदाट जंगल ,आजूबाजूला पडणारा मुसळधार पाऊस आणि पहाटेची विचित्र वेळ त्यामुळे या माणसाला मी लुटारू वाटलो . तो गाडी पळवू लागला . नेमका एक गतिरोधक आला तिथे मी धावत जाऊन त्याला गाठले . आणि विचारले की अमुक अमुक शिबिर कुठे चालू आहे . त्या माणसाला काय वाटले कुणास ठाऊक मला म्हणाला गाडीवर बसा मी तुम्हाला दाखवतो . आणि आश्रमाच्या दारावर तो आला . द्वारपालाने त्याला आत सोडले . मी उतरू लागलो . तो मला म्हणाला उतरू नका बसून रहा . आणि सुमारे दोन किलोमीटर आत मध्ये गाडी चालवल्यावर एका इमारती पाशी थांबला आणि तो म्हणाला इथे तुमचे शिबिर चालू आहे . माझा फोन स्विच ऑफ झाल्यामुळे मित्र फोन करून थकला होता . मला थेट समोर पाहिल्यावर त्यांनी मला घट्ट मिठीच मारली ! इतक्यात कोर्स सुरू होणार अशी सूचना झाली . ते मला त्यांच्या खोलीची किल्ली देऊ लागले . इतक्यात त्यांचा मुख्य प्रशिक्षक तिथे आला , आणि मला म्हणाला की आज यांच्या शिबिराचा शेवटचा दिवस आहे . तुम्ही देखील हे शिबिर अटेंड करावे अशी माझी इच्छा आहे . मला प्रश्न पडला की असे कसे काय झाले ? हा प्रशिक्षकच मगाशी मला बाहेर भेटला होता !त्याने हेल्मेट घातल्यामुळे माझ्या लक्षात नाही आले ! तो मला म्हणाला की तुम्ही ज्या वेळी , ज्या परिस्थितीमध्ये आणि ज्या ठिकाणी मला भेटला आहात त्यावरून मला असे वाटते की तुम्ही आजचा दिवस शिबिराचा आनंद अवश्य घ्यावा . झाले !शिबिर सुरू झाले . तो मनुष्य म्हणाला की आज आपला शेवटचा दिवस आहे त्यामुळे गेले १४ दिवस आपण काय काय शिकलो याची उजळणी आपण आज करणार आहोत .  अशा रीतीने त्या संपूर्ण शिबिराचे सार मला त्या दिवशी शिकायला मिळाले . संध्याकाळी स्वतः श्री श्री रविशंकर यांचे प्रवचन सर्वांसाठी होणार होते . त्यांनी नेमके सांगितले की आज आपण काहीच करायला नको .फक्त ध्यान शिकूया ! आणि अशा रीतीने स्वतः श्री श्री यांच्या मुखातून मला ध्यान करण्याची प्रक्रिया शिकायला मिळाली ! ती देखील मोफत !  याच्यापुढे घडलेला प्रसंग तर केवळ अकल्पनीय होता . रविशंकर यांचे स्वतःचे हत्ती घोडे वगैरे आहेत . त्यांचे प्रवचन जेव्हा होते तेव्हा बाहेर हत्ती घोडा उभा करतात . त्या दिवशी नेमके घोडा उधळला होता आणि हत्तीला लाथा मारायला बघत होता . काही केल्या घोडा सांभाळणाऱ्या मुलाला घोडा आवरत नव्हता . चुकून मागून हत्तीला वर्मी लाथ लागली असती तर हत्ती चवताळला असता आणि आश्रमामध्ये त्या दिवशी कमीत कमी चार हजार लोक मुक्कामी होते .त्यातील दोन एक हजार लोक आजूबाजूलाच वावरत होते . मी धावतच जाऊन घोड्याचा ताबा घेतला . काही क्षणातच घोडा मला वश झाला . त्या मुलाला मी जरा झापलेच , की असे कसे काय करतो आहेस ? घोडा नीट सांभाळता येत नाही का तुला ? तो म्हणाला हा घोडा सांभाळणारा माणूस गावाला गेला आहे . मी त्याचा मदतनीस आहे . आता घोडा तबल्यामध्ये नेऊन लावायचा होता .परंतु हा मुलगा भीतीपोटी घोड्याला हातच लावायला तयार होईना . मला म्हणाला तुम्हीच घोडा नेऊन लावा . रविशंकर यांच्या आश्रमामध्ये तिहेरी सुरक्षा व्यवस्था असून त्यांना भेटायला कोणीही सहजासहजी जाऊ शकत नाही . हा घोडा स्वतः श्री श्री रविशंकर यांचा असल्यामुळे माझ्यासाठी पहिले गेट उघडले गेले . तिथून बरेच अंतर चालल्यावर दुसरे महाद्वार लागले ते देखील घोड्याला पाहून उघडले गेले . तिसरे महाद्वार देखील अशा पद्धतीने उघडले गेले . आणि घोडा कुठे लावायचा हा मी विचार करताना समोर एका कुटीमध्ये श्री श्री रविशंकर स्वतः उभे असलेले दिसले . मी त्यांनाच विचारले की स्वामीजी घोडा कुठे लावायचा ? ते माझ्याकडे पाहून अचंबित झाले ! तू कोण आहेस बाबा ! मी त्यांना घडलेला सर्व प्रसंग सांगितला . त्यांनी त्यांच्या कुटी बाहेर असलेला तबेला दाखवला आणि घोडा लावून कुटीमध्ये येण्यासाठी सांगितले . कुटीमध्ये जाऊन त्यांचे रितसर स्पर्श दर्शन घडले ! मग मी त्यांना माझा अनुभव सांगितला की तुमचा कोर्स पैसे देऊन शिकायची मला इच्छा नव्हती . परंतु आता मला तुमच्या अधिकाराबद्दल खात्री पटली कारण तुम्ही मला फुकट सर्व ज्ञान दिलेले आहे ! त्यावेळी त्यांनी मला मोठे मोठे आश्रम चालविण्यासाठी निधीची , पैशाची कशी काय गरज असते हे सर्व अर्थकारण समजावून सांगितले . त्यामुळे माझ्या मनातील ही शंका कायमची दूर झाली . त्यांनी अतिशय प्रेमाने मला आशीर्वाद आणि प्रसाद दिला . मी देखील तबेल्या मध्ये अजून काय काय सुविधा करता येतील याची सर्व माहिती त्यांना दिली व त्यांनीही ती योग्य प्रकारे योग्य ठिकाणी पोहोचवण्याची व्यवस्था केली . घोडेस्वारीच्या ज्ञानाने अशा पद्धतीने त्या दिवशी मला खूप मोठ्या संतांचे दुर्लभ दर्शन घडविले ! इथे आश्रमामध्ये कायमस्वरूपी राहणाऱ्या अनेक लोकांनी आश्चर्य व्यक्त केले कारण इतक्या सहज या संतांचे दर्शन तिथे घेता येत नाही . परंतु माझी अशी खात्री आहे की तुमचा भाव शुद्ध असेल आणि हेतू प्रामाणिक असेल तर जे योग्य आहे ते घडतेच !  त्या दिवसापासून श्री श्री रविशंकर यांच्या कार्याबद्दल माझ्या मनात असलेले शंकेचे मळभ दूर झाले आणि खात्री पटली की यांचे कार्य चांगलेच आहे ! अनुमानाची जागा अनुभवाने घेतली !
असो . सांगायचे तात्पर्य इतकेच की ही सर्व पार्श्वभूमी मनात असल्यामुळे हा आश्रम पहावा असे मला वाटले . परंतु तेथे कोणी नसल्यामुळे मी पुढचा मार्ग पकडला . आता पुढे नर्मदेवर काही पूल दूरवर दिसू लागले . हे मोरटक्का नावाचे गाव येणार होते . चालता चालता नर्मदेच्या पाण्यामध्ये काठी बुडवत चालण्याचा आनंद घेऊ लागलो . मी गमतीने नर्मदेला वेगळ्या वेगळ्या नावांनी हाक मारायचो ! त्यातील एक नाव होते नरेंद्र मोदी ! नरेंद्र मोदी या शब्दाचा उच्चार कोल्हापुरी पद्धतीने अति अति वेगाने केला तर "नर्मदे " असे ऐकू येते ! म्हणून पहा! अशा आमच्या गमतीजमती चालायच्या ! चला आता आपण नरेंद्रमोदी सोबत मोर टक्क्याला जाऊया !
नर्मदे हर !



लेखांक सत्तर समाप्त (क्रमशः )

मागील लेखांक

पुढील लेखांक

टिप्पण्या

  1. आता पर्यंतची परिक्रमा आपल्या सोबत झाली अजून पुढे जायची इच्छा आहे अजून किती भाग येतील व केव्हां येतील याची उत्कंठा लागली आहे आधीही बरीच पुस्तकं लेख u ट्युब यावर नर्मदा परिक्रमा अनुभवली पण श्री कुंटे व आता आपल्या सोबत केलेली परिक्रमा सफल होते असे वाटते फोटो मुळे ती वास्तव वाटली आम्हीही तुमच्या बरोबरीनेच आहोत असे वाटत होते पुढील भागाच्या प्रतिक्षेत आहे सर्व परिक्रमा वासिना साष्टांग प्रणाम 🙏❤️💐👍

    उत्तर द्याहटवा
  2. लेखकाने आजपावेतो अनेक गोष्टींबाबत उहापोह केला आहे व तपशीलासह बहारदार माहीती दिली आहे. बाबाजी इतक्या सर्व आयामांनी युक्त असून अतिव नम्रता हे आपले वैशिष्ट्य आहे. पेशाने तंत्रज्ञ, संगणकीय अद्ययावत ज्ञान, प्रवास व धाडसी मोहीमांची आवड, सोबत अध्यात्म व समर्थभक्ती, विविधांगी वाचन, संगीत तसेच तालज्ञान, सामाजिक कार्याची आवड, सेवाभाव, दंड व तमिळ दंड युद्ध प्रभूत्व, अश्वप्रेमी व अश्व प्रशिक्षक, संस्कृति व इतिहासावरचे प्रेम, राष्ट्रभक्ति व विरक्ती, चित्रकारी, पगडी किंवा फेटा बांधणीचे तसेच वेषभूषेचे ज्ञान, छायाचित्रकारी, अशा इतक्या व इतर अनेक बहूआयामी अनुभवांसह लेखक पुन्हा पुन्हा भेटत सोबत वाचकांनाही परिक्रमा अनूभव देतात यासाठी खूप कौतुक. हे सोपे नाहीच. असेच कलंदर जिप्सीपण जपत जगा. अशा सच्चा जगण्यासाठी मैय्याने व समर्थकृपेने आपण व आपल्या परिवारासह सूखनैव तसेच समृद्ध कालक्रमणा करावी यासाठी मनःपूर्वक प्रार्थना. नर्मदे हर। जय जय रघुवीर समर्थ।

    उत्तर द्याहटवा
  3. varati Ramdasi jini lihilelech lihayla ale hote.. Tyanchi comment vachlyavar fakta mama mhanate :) Tumhala maiche sundar anubhav yenarch ki babaji! Narmade Har!!

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. नर्मदे हर ! नर्मदे (वरील कमेंट्स वाचून मला चढलेले मुठभर मास ) हर !

      हटवा

टिप्पणी पोस्ट करा

जे आवडते सर्वांना ...

अनुक्रमणिका

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

लेखांक १ : नर्मदे हर !

लेखांक २ : भोपाळ जवळच्या जंगलातील अपघात

लेखांक ४ : झुठा कही का ! सबकुछ तो लाए हो !

लेखांक ३ : चोराची धन

लेखांक ५ : ग्वारीघाट जबलपुर मध्यप्रदेश

लेखांक ८३ : महाराष्ट्रात प्रवेश आणि भाबरीचे भेदक भिल्ल-महात्मा फोदला गारद्या पावरा

लेखांक ७४ : लेपा बांध , वेदा संगम , कठोरा अन् मांडव्य गुंफा

लेखांक ९० : गुजरात मधील कणजी चे सान्सुभाई तडवी आणि अरण्यव्याप्त माथासर