लेखांक ६७ : मैय्याने महाशिवरात्रीला गाठविला माझ्या नर्मदा परिक्रमेचा मध्य बिंदू , श्री क्षेत्र ओंकारेश्वर अमलेश्वर

आजची रात्र म्हणजे महाशिवरात्र होती ! पहाटेच्या अंधारातच मी झपाझप पावले टाकायला सुरुवात केली . कोणी सांगितले होते ओंकारेश्वर साठ किलोमीटर आहे . कोणी सांगितले होते ७० किलोमीटर आहे . तर कोणी सांगत होते आम्ही चालत आरामात ओंकारेश्वर ला पोहोचू शकतो .कोणी सांगितले कितीही चाललात तरी तुम्ही ओंकारेश्वरला पोहोचणे शक्यच नाही ! आदल्या रात्री ग्रामस्थांशी केलेल्या चर्चेतून मला अतिशय सुंदर मार्गदर्शन मिळाले ! ऐकावे जनाचे करावे मनाचे !
 श्री ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग
 मी एकच निश्चय केला . एक मिनिट थांबणे म्हणजे एक मिनिटाचे चालणे वाचवणे . अर्थात तेवढ्या अंतराने मागे पडणे . त्यामुळे काहीही झाले तरी आज कुठल्याही कामासाठी एक मिनिट सुद्धा थांबायचं नाही ! फक्त चालत राहायचं ! चालतच रहायचं ! चरैवेति । चरैवेति ।
माझ्या डोक्यात सतत गणिते सुरू होती . काल जेवढे अंतर चालायचे नियोजन मी केलेले होते तेवढे जरी अंतर मी सूर्योदयापूर्वी तोडू शकलो असतो तरी जणू काही कालचा दिवस माझ्या आयुष्यात आलाच नव्हता असे झाले असते ! आणि सूर्योदयापासून नवीन जोमाने मी चालणे सुरू केले असते . पहाटेची वेळ असल्यामुळे रस्त्यावरती कोणीच असणार नाही असा माझा अंदाज होता . परंतु माझ्या लक्षात आले की जसजशी पहाट होते आहे तस तशा रस्त्यावरून खूप सार्‍या गाड्या जाऊ लागल्या ! आसपासच्या खेड्यापाड्यातील लोक सहकुटुंब सहपरिवार ओंकारेश्वरला निघाले होते . ट्रॅक्टर करून , गाड्या भरून ,जीप भरून आणि सर्वात जास्त म्हणजे एकेका दुचाकी वर तीन तीन , चार चार ,प्रसंगी पाच पाच लोक बसून भरधाव वेगाने धावत होते ! त्यांचे ते धोकादायक वाहन चालवणे पाहून माझी पाचावरच धरण बसली ! इतका आत्मविश्वास कुठून आणतात लोक ? नाही माहिती ! देवावरचा विश्वास अधिक दृढ करणारा तो प्रकार होता . पाच जणांना घेऊन जाणारी हिरो होंडा केवळ महादेवच वाचवू शकतात . टाकीवर बसून ती गाडी दामटणारा वाहन चालक तर तिला वळवू सुद्धा शकत नाही !एक पुरुष गाडी चालवतो आहे आणि तीन स्त्रिया एका बाजूला पाय सोडून बसले आहेत कल्पना करून पहा ! हे सर्व आदिवासी लोक होते . अतिशय चिवट काटक आणि धाडसी ! इथल्या स्त्रिया डोक्यावरून पदर घेतात . पाठ संपूर्ण झाकून घेतात . आणि समोरून पदर नसतो .नऊवारी साडी सारखी दिसणारी नाटी नावाची साडी या नेसतात . यांच्या हाताच्या दंडामध्ये चांदीचे बाजूबंद किंवा वाक्या असतात . नागमोडी आकाराच्या या वाक्या अंधारात सुद्धा चमकतात . आदिवासी लोक याला बाट्या म्हणतात . ही बाट्या खाली सरकू नये म्हणून एक गोल चांदीची रिंग काही स्त्रिया घालतात ज्याला वावं असं म्हणतात . हातामध्ये चांदीच्या चपट्या बांगड्या असतात त्याला चिप्या म्हणतात . पायामध्ये चांदीचे मोठे मोठे तोडे असतात . गळ्यामध्ये चांदीची साखळी असते तिला साकळ म्हणतात . पुरुष शर्टाची वरची बटणे उघडे टाकतात आणि डोक्याला बारीक टापसे बांधलेले असते . अतिशय बेदरकारपणे गाडी चालवत असल्यामुळे आपल्याला सावधपणे चालावे लागते . 
प्रातिनिधिक चित्र
आज कधी नव्हे ते डांबरी रस्त्यावरून वेगाने धावण्याचा माझा विचार होता , तो या गाडीवान लोकांमुळे बारगळला आणि मी पुन्हा एकदा रस्त्याच्या कडेच्या खडकाळ पट्टीवरून चालायला सुरुवात केली . सुदैवाने कालच नवीन चप्पल मिळाली असल्यामुळे पायाला खडे फारसे टोचत नव्हते . मैय्या प्रत्येक गोष्टीचा किती बारकाईने विचार करून तुम्हाला वस्तू देते पहा !
हे लोक जवळून जाताना नर्मदे हर म्हणण्याऐवजी जोरात किंचाळत जायचे !
सुदैवाने मला मध्ये काही शॉर्टकट मिळत गेले . ह्या गाड्यांची वर्दळ पुढे कुठे जाते आहे ते दिसत असल्यामुळे आधीच कळायचे की रस्त्याने जाण्यापेक्षा दरीतून उतरून जावे ! गंमत म्हणजे एकही गाडी उलटी येत नव्हती सर्व गाड्या ओंकारेश्वर कडेच चालल्या होत्या . दुपारनंतर ऊन वाढणार असल्यामुळे पहाटेचे थंड वातावरणातच  ताशी पाच सहा सात आठ किलोमीटर गतीने चालत अंतर तोडायचे असे मी ठरवले होते . आणि त्यात बऱ्यापैकी यशस्वी झालो . वाटेत एकही परिक्रमावासी दिसला नाही . कारण सर्व परिक्रमावासी मिळेल त्या मार्गाने ,वाहनाने वगैरे ओंकारेश्वरला पोहोचले होते . गाडीवरून लिफ्ट मागून जाणारे देखील बरेच परिक्रमावासी मी पाहिले . बहुतांश परिक्रमावासी त्यांची परिक्रमा ओंकारेश्वरला महाशिवरात्रीच्या दिवशी समाप्त करतात . परंतु तरीदेखील रस्त्याने चालताना एकही परिक्रमावासी भेटू नये हे मोठे आश्चर्यकारक होते .आपण रस्ता तर चुकलो नाही ना असे देखील वाटायचे ! दिवस जसा उगवू लागला तसतशी रस्त्यावरची वर्दळ कैकपटीने वाढली ! इतके लोक ओंकारेश्वरला जात असतील याची मला कल्पनाच नव्हती ! जवळपास प्रत्येक गावातील प्रत्येक घरातील माणसे ओंकारेश्वरला निघाली होती ! मला खरे म्हणजे थोडीशी भूक लागली होती . परंतु सोबत खाण्याचे काहीच सामान नव्हते .इतक्यात मध्येच एक स्विफ्ट डिझायर गाडी माझ्या शेजारी थांबली . त्यामध्ये नगर जिल्ह्यातील गाडीने परिक्रमा करणारे परिक्रमा वासी होते . त्यांनी मला खजुराचे मोठे पाकीट दिले . त्यांचे आभार मानून चालता चालताच एक खजूर तोंडात टाकू लागलो . खजुरातून शरीराला जाळण्यासाठी तयार शर्करा मिळू लागली ! आणि त्याचा परिणाम वाढलेल्या गतीमध्ये दिसू लागला ! अटूट खास नावाचे गाव आले . इथे एकाने उसाचा रस पाजला . या संपूर्ण भागामध्ये मी प्रचंड शॉर्टकट घेतले . अतिशय निर्जन आणि निर्मनुष्य रस्त्यातून चाललो . इतका चाललो , इतका चाललो ,की थांबले तरी माझे पाय म्हणायचे चल चालू या ! कल्पना करून बघा लख्ख उजेड पडला होता तरी मी अजून एकदाही थांबलो नव्हतो . थांबले की काहीतरी गडबड झाल्यासारखे वाटायचे . आज मला कोणाला होकार नकार देण्याचा  विषयच नव्हता . सकाळी चहाला नाही म्हणालो म्हणून दुपारचे भोजन मिळाले नाही वगैरे भानगड आज नव्हती ! दिवसभर उपासच करायचा होता त्यामुळे न थांबता भराभर चालत राहिलो . वेगाने चालणे ही एक नशा आहे . ती एकदा लागली की थांबावेसे वाटत नाही . मध्ये अनेक लोक तुम्हाला सोडू का विचारत होते . परंतु मी काही त्यांच्या नादाला लागलो नाही . मध्ये अनेक कालवे , उपकालवे , शेते , जंगले लागली . सगळी तुडवत चालत राहिलो . माझा आजचा एकंदरीत मार्ग असा होता . भमोरी , जलवा बुजुर्ग , देवला , खुटला कला , डूडगांव ,अटूट खास , अटूट मोहना , नेमाचा , हरबंसपूर , गौईल , बकरगाव . बखरगाव पासून ओंकारेश्वर धरणातील पाणी उतरले असेल तर करोली , सातमात्रा , एखंड, भिलाया , ताराघाटी , बावडी या मार्गे ओंकारेश्वर ला पोहोचता येते . परंतु आजकाल पाणी उतरतच नसल्यामुळे बखर गाव पासून पुढील मार्ग असा होता नेतन गाव , मठेला , हथिया बाबा आश्रम , मासलाय , गुंजाली , लौंडी , पिपल्या , कपासी, अंजरुड , भोकारिया , धावडीया, गुंगरी , खिंड मार्गे ओंकारजी अशी गावे मध्ये लागणार होती . वरील गावांची यादी पाहून तुम्हाला मी न थांबता एकंदरीत किती चाललो असेन त्याचा अंदाज येईल . यापूर्वी तीन महिन्यांमध्ये परिक्रमा पूर्ण केलेले कोणी परिक्रमा वासी मला भेटले तर ते मला थोडेसे अतिशयोक्तीपूर्ण वाटायचे . परंतु आज मी जे काही चाललो त्याच्यावरून मला अंदाज आला की एखादा हलकाफुलका मनुष्य ज्याला अन्नमयकोशाची फारशी पर्वा नाही , तो सहज ९० दिवसांमध्ये नर्मदा परिक्रमा पूर्ण करू शकतो ! त्याची मधली सर्व दर्शने होतील का नाही हे सांगता येत नाही .परंतु परिक्रमा पूर्ण नक्की होईल . मध्ये हरबन्सपूर गावाजवळ मला एक तमिळ माणूस भेटला . त्याच्या एकंदरीत चेहरेपट्टीवरून माझ्या लक्षात आले की हा तमिळ आहे . आणि तमिळ देवर समाजाचा मनुष्य आहे . मी त्याला " वणक्कम अण्णा " म्हटल्यावर तो एकदम चमकलाच ! त्याने मला विचारले की तुम्हाला कसे कळले मी तामिळ आहे ? नर्मदा मैया ची कृपा दुसरे काय ! मला हळूहळू असे लक्षात आले की आपले मन जर निर्विचार असेल तर मैया आपल्याला समोर येणाऱ्या संकटाची चाहूल देत असते किंवा समोर येणारा मनुष्य कसा आहे ते सांगत असते किंवा समोर आता काय होणार याची पूर्वसूचना देत असते . अशा गमती जमती करत चालत होतो . अखेरीस हाथिया बाबा चा आश्रम आला . नेतनगाव नावाच्या गावाच्या हद्दीत हा आश्रम होता . इथून पुढे सडक मार्गाने सनावद मार्गे ओंकारेश्वरला बहुतांश लोक जातात . परंतु हा फारच लांबचा मार्ग होता आणि आजच्या आज पोहोचण्यासाठी कठीण होता .वाटेत सर्वच ग्रामस्थांनी मला सांगितले होते की मधून जाणारा एक शॉर्टकट आहे . रस्ता जंगलाचा आहे .परंतु फार कठीण नाही सापडू शकेल .
हाथिया बाबा आश्रमामध्ये हाथिया बाबाचे दर्शन घेतले . हत्तीच्या सोंडेसारखा आकार असलेला एक पाषाण येथे स्थापित केलेला आहे . गणपतीचेच हे रूप आहे . आश्रमामध्ये खूप गर्दी होती . मी दर्शन घेऊन पाण्याचा कमांडलू टाकीवर भरून घेतला . इतक्यात आश्रमातील बाबाने मला खिचडी खाऊन जायला सांगितले . देवच पावला ! सकाळपासून ते खजूर सोडून पोटात काहीच नव्हते ! आणि अखंड चालतच होतो ! अंगातून अक्षरशः वाफा निघत होत्या . आता थंडी कमी होत आहे हे माझ्या लक्षात आले . त्यामुळे मी माझ्याकडे असलेली दोन ब्लॅंकेटस जी मला माझियाखार आदर्श धर्मशाळेत मिळाली होती व जी मी अतिशय स्वच्छ ठेवली होती आणि नुकतीच एका कालव्यामध्ये धुतली सुद्धा होती , ती साधूकडे सोपवू लागलो . इतक्यात आश्रमात स्वयंपाकाची सेवा करणाऱ्या एक माताजी आल्या आणि त्यांनी ती ब्लँकेटस मागून घेतली . ती दोन्ही ब्लॅंकेट गेल्यामुळे माझ्या पाठीवरचा प्रचंड भाला हलका झाला आहे असे मला वाटले ! दानामध्ये आनंद आहे , परंतु नर्मदा परिक्रमेदरम्यान दान करण्यात परमानंद आहे !
 नेतनगावचा हाथिया बाबा आश्रम
बोल हाथिया बाबा भगवान की जय !
या नळावर मी यथेच्छ पाणी प्यायलो आणि कमण्डलु भरून घेतला
या माताराम ना दोन ब्लँकेट सोपवली
 खिचडी पटापट भरून पुढचा मार्ग समजून घेतला आणि हाथिया बाबा आश्रम सोडला . साधूने सांगितले की शंकराची इच्छा असेल तर तू आज पोहोचशील . परंतु जंगलात रात्र झाली तर मात्र पुढे जायचे धाडस करू नकोस . सर्वांना नर्मदे हर केले आणि आश्रमा शेजारून वाहणाऱ्या कालव्याचा रस्ता पकडला . 
कालवा दुथडी भरून वाहत होता . त्यामधून नर्मदा जल वाहते आहे हे वासावरून माझ्या लक्षात आले . याचा अर्थ हा कालवा ओंकारेश्वर धरणापासून निघालेला होता . आणि याचा काठ जर मी धरला तर ओंकारेश्वर धरणापाशी पर्यायाने ओंकारेश्वर तीर्थक्षेत्रापाशी पोहोचणार होतो . मार्ग अतिशय खडतर खडकाळ आणि काट्याकुट्यांचा होता . या मार्गावरून एकही परिक्रमावासी किंवा ग्रामस्थ कोणीही जात नव्हते . इथून पुढे गावे लहान व कमी आहेत त्यामुळे रस्त्यावर वर्दळ नव्हती . मुळात हा वहिवाटीचा रस्ताच नसून कालव्याच्या भोवती नैसर्गिकरित्या तयार झालेला पायवाट मार्ग होता . कालव्याच्या पाण्याला प्रचंड वेग होता . याचा अर्थ ओंकारेश्वर पर्यंत मला अखंड चढ चढत जायचे होते . बरेच अंतर चाललो तरी कोणीही दिसेना . सकाळपासून सलग आठ नऊ तास मी अखंड चालत होतो . सूर्य डोक्यावर आग ओकत होता . त्यामुळे अंगाचा थरकाप होऊ लागला . संपूर्ण अंग भाजून त्यातून वाफा निघत आहेत असे वाटत होते . कालवा शेजारीच होता परंतु आत मध्ये उतरायला जागाच नव्हती . अतिशय धोकादायक उताराचा कालवा होता . इतक्यात एके ठिकाणी मला पाण्याचा पाईप कालव्यामध्ये सोडलेला दिसला . आजूबाजूला सावलीसाठी एकही झाड नसलेला हा कालवा होता परंतु त्या पाईप पाशी एका झाडाची सावली पण होती . सावलीमध्ये मी सामान ठेवले आणि पाईपला धरून हळूहळू कालव्यामध्ये उतरलो ! नर्मदा जलच ते ! त्याच्या स्पर्शाने इतका आनंद झाला म्हणून सांगू ! त्या कालव्यामध्ये मी खूप वेळ पोहलो ! अंगातील सर्व उष्णता निघून गेली . कालव्याच्या पाण्याला वेग असल्यामुळे आत मध्ये टाकलेल्या पाईपला धरून मी एखाद्या बांधलेल्या फडक्यासारखा पाण्यामध्ये फडकत राहायचो . अखेरीस ओंकारेश्वरला पोहोचणे आवश्यक आहे हे लक्षात आल्यामुळे वरती आलो . पाण्याची मला भयंकर आवड आहे . परंतु वेळेचे गणित बसवणे आवश्यक होते . एक क्षणभर विचार आला की झाडाच्या सावलीत दोनच मिनिटे पडावे ! तत्क्षणी मी सामान उचलले आणि उघडाच चालायला लागलो !  कालच्या काळ झोपेच्या कुटुस्मृती चांगल्या लक्षात होत्या ! दोन मिनिट पडल्या पडल्या झोप लागणार आणि उद्या सकाळीच मी जागा होणार इतपत शरीर थकलेले होते ! पुढे उन्हातच ओले कपडे पिळून घातले आणि अंगावरच वाळले सुद्धा ! इथे एकही मनुष्य भेटत नसल्यामुळे मला पुढचा मार्ग कुठला आहे तेच कळेना . कालवा वळणे वळणे घेत चालला होता त्यामुळे याचा मार्ग शॉर्टकटचा नाही हे माझ्या लक्षात आले होते . परंतु असंख्य छोट्या मोठ्या पायवाटा असल्यामुळे नक्की कुठला मार्ग पकडावा कळत नव्हते . इतक्यात एका छोट्या मुलीची पावले धुळे मध्ये उठलेली मला दिसायला लागली . मी मनोमन असे ठरविले की ही नर्मदा मातेची पावले आहेत असे समजून चालूया . त्या पावलांचा मागोवा घेत घेत मी चालायला लागलो . ती इवलीशी पावले कालवा सोडून उजवीकडे वळली त्यामुळे मी देखील वळलो . पावले ताजी उठलेली होती . परंतु एवढ्या कडाक्याच्या उन्हामध्ये अनवाणी पायाने कुठली छोटी मुलगी चालली असेल बरे ? आणि सोबत मोठ्या माणसाची पावले नव्हती . दोन-तीन किलोमीटर त्या पावलांचा मागवा घेतल्यावर मला पुढचे गाव लागले . आणि मग आता सर्व रस्ते गावे , शेती ,ओढे , नाले असेच लागले . हा सर्व आदिवासी वनवासी परिसर होता . आता मला ओंकारेश्वर मधून परत येणाऱ्या भाविकांची गर्दी दिसायला लागली . या भागातील लोक चालतच ओंकारेश्वरला जातात . त्यामुळे मला मार्ग विचारायची गरज उरली नाही . लोक ज्या मार्गाने येत होते तोच माझा मार्ग होता . सूर्य हळूहळू मावळतीकडे झुकायला लागला होता . आणि अजूनही मला ओंकारेश्वर चा ॐ सुद्धा दिसला नव्हता . मी पायांची गती वाढवली आणि एक शेवटचे गाव लागले . गावातल्या मुलांनी मला जंगलातून कसे जायचे तो रस्ता सांगितला . ग्रामस्थ या रस्त्याने येत नसत . परंतु काही धाडसी तरुण मुले या रस्त्याचा वापर करायची . मुलांनी सांगितलेला खाणाखुणा बरोबर पहात मी जंगलातला मार्ग पकडला . परंतु जंगलामध्ये नेहमीच जे होते तेच झाले आणि माझा मार्ग भटकला . आता परत फिरावे की पुढे जावे या विचारांमध्ये मी असताना नर्मदा मातेचा जोरात पुकारा केला . दूरवरून कोणीतरी मला आवाज दिला . त्या आवाजाच्या दिशेने जंगलामध्ये घुसलो . एक तरुण मनुष्य उलटा परत येत होता . त्याने मला अजूनच जवळचा मार्ग दाखवला . वाटेतल्या खाणाखुणा , कुठली झाडे , कुठले दगड , तसेच ओढे नाले आडवे येथील हे सर्व सांगितले . हे सर्व करताना सूर्यदेव मावळतीकडे वेगाने चालले आहेत हे पाहून एका उंच टेकडावर जाऊन मी थांबलो .हात जोडून सूर्याची प्रार्थना केली . हे सूर्य देवा ही माझी पहिली परिक्रमा आहे . आज कुठल्याही परिस्थितीमध्ये ओंकारेश्वर ला पोहोचण्याचे माझे ध्येय आहे . तुझ्या सहकार्याशिवाय माझे ध्येय साध्य होणे अशक्य आहे . कृपा करून मी ओंकारेश्वरला पोहोचेपर्यंत गायब होऊ नकोस ! तुला नर्मदा मातेची शपथ आहे ! कारण पूर्वी अमरकंटकच्या जंगलात सूर्य मावळल्यावर जंगल कसे खायला उठते हे मी अनुभवलेले होते .तसाच अनुभव मला पुन्हा इथे घ्यायचा नव्हता . अतिशय वेगाने मी जंगलातील तीन चार टेकड्या पार केल्या . साधारण मावळतीला आलेला सूर्य खूप झपाझप खाली जातो असा माझा रोजचा अनुभव होता . शेजारी तुलनेसाठी एखादी वस्तू किंवा झाड असेल तर तुम्हाला त्याची गती सुद्धा पाहता येते इतकी ती वेगवान असते . परंतु आज मला एक चमत्कारिक अनुभव आला ! बराच वेळ सूर्यदेव एकाच उंची वरती तळपत आहेत की काय असे मला वाटत होते ! तीन टेकड्या पार करूनही पुन्हा चौथी मोठी टेकडी समोर पाहिल्यावर माझा संयम सुटला . सर्वत्र घनघोर जंगल . पाऊलवाटांचा पत्ता नाही . कुठे बाण किंवा खुणा केलेल्या नाहीत . आणि मुख्य म्हणजे परत येणारे ग्रामस्थ दिसत नाहीत . आपण नक्की रस्ता चुकलो आहोत असे मला वाटले . मला वाटेल त्या दिशेला मी वेगाने धावत सुटलो . एका दमात टेकडी चढू लागलो . हळूहळू टेकडीचे रूपांतर एका खिंडी वजा पायवाटेत झाले . मी सूर्य देवाकडे सतत लक्ष ठेवून होतो . बघता बघता अचानक त्याने गती घेतली आणि झरझर झर झर गतीने तो मावळला ! जंगलातील ती भयाण शांतता , मावळणारा सूर्य आणि समोरची ती खिंड पाहून मला वाटले की आता खेळ संपला ! सूर्य मावळला आणि मी ६० किलोमीटर चालून खिंडीच्या सर्वोच्च टोकावर पोहोचलो . अचानक समोरून प्रचंड कोलाहल , दंगा , आरडाओरडा , संगीत ऐकू येऊ लागले !प्रचंड झगमगाटात नटलेले सजलेले ओंकारेश्वर तीर्थक्षेत्र , हे काय इथे माझ्यासमोरच तर होते ! 
ती खिंड चढेपर्यंत ओंकारेश्वर चा मागमूस सुद्धा लागत नाही ! आणि ओंकारेश्वर तीर्थक्षेत्र अतिशय गजबजलेले असल्यामुळे अचानक तो झगमगाट दिसू लागतो आणि यात्रेच्या गोंगाटाचा आवाज ऐकू येऊ लागतो ! उजव्या हाताला प्रचंड ओंकारेश्वर बांध आणि त्याच्या पलीकडे चमकणारे नर्मदा जळ दिसले ! ओंकारेश्वरा चे आणि अमलेश्वराचे विद्युत रोषणाईने उजळलेले कळस दिसले ! दिवस मावळत होता . रात्र अजून व्हायची होती . ती रात्र साधी नव्हती ! ती होती महाशिवरात्री ! डोळयातून घळाघळा अश्रुधारा वाहू लागल्या ! मोठ्या आवाजात पुकारा केला नर्मदेsss हर ! ओम नमः पार्वती पते हर हर महादेव !  



लेखांक सदुसष्ठ समाप्त (क्रमशः )

मागील लेखांक

पुढील लेखांक

टिप्पण्या

  1. महाशिवरात्रीचे अद्भूत ॐकार जी दर्शन! दरुशने दोष जाती। अत्यंत सुंदर ओघवते परिक्रमा वर्णन , जे वाचकास मैय्या 'परिक्कम्मा' करीत असल्याचा आनंद देते। श्रीराम। नर्मदे हर।।

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

जे आवडते सर्वांना ...

अनुक्रमणिका

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

लेखांक १ : नर्मदे हर !

लेखांक २ : भोपाळ जवळच्या जंगलातील अपघात

लेखांक ४ : झुठा कही का ! सबकुछ तो लाए हो !

लेखांक ३ : चोराची धन

लेखांक ५ : ग्वारीघाट जबलपुर मध्यप्रदेश

लेखांक ८३ : महाराष्ट्रात प्रवेश आणि भाबरीचे भेदक भिल्ल-महात्मा फोदला गारद्या पावरा

लेखांक ७४ : लेपा बांध , वेदा संगम , कठोरा अन् मांडव्य गुंफा

लेखांक ९० : गुजरात मधील कणजी चे सान्सुभाई तडवी आणि अरण्यव्याप्त माथासर