लेखांक ५७ : भव्य भिलाडिया घाट , भयप्रद पोपवंती नदी आणि हमीदपूरचे मौनी सन्यासी

चांदगढ कुटी सोडल्यावर काठाने रस्ता नाही असे तुम्हाला ग्रामस्थ सांगतात . परंतु एक पाऊल ठेवता येईल असा रस्ता सर्वत्र आढळतो .  इथे सुमारे दहा किलोमीटर सरळ वाहून नर्मदा वेगवान घातक वळण घेत असल्यामुळे चालण्यासारखा मार्ग फारसा शिल्लक नाही हे खरे आहे . त्यातच नर्मदेला दोन मोठे ओढे आणि लहान मोठे नाले येऊन मिळतात जे तुमचे चालणे कठीण करतात . हे दोन्ही ओढे मोठ्या शिताफीने पार करत मी काठाने चालत राहिलो . 
हेच ते ओढे आणि हाच तो किनारा .

इथे समोरचा किनारा प्रचंड वाळू असलेला आहे . इथे उपग्रह चित्रांमध्ये देखील दिसतील इतक्या मोठ्या संख्येने वाळू उपसणारी यंत्रे आहेत .  वाळू उपसणारी यंत्रे , त्यांना वाहून आणणाऱ्या यांत्रिक नौका आणि त्यांची वाहतूक करणारी मोठाली अवजड वाहने या सर्वांच्या आवाजाने या भागातला किनारा दुमदुमून गेलेला असतो . त्यामुळे खालील उपग्रह नकाशा जितका सुंदर दिसतो आहे तितकेच येथील ध्वनी प्रदूषण कष्टदायक आहे . 
वरील नकाशातील प्रत्येक रेखा म्हणजे वाळू उपसणाऱ्या भूमिगतयंत्राने उपसून ठेवलेली वाळू असून या दांड्यावरून एकावेळी दोन डंपर जातील इतके ते रुंद आहेत . ( नकाशात उत्तर दिशा तिरकस केलेली आहे )

इथून पुढे एक डोह कूप लागले .  ( जॅकवेल ) इथे पाणी प्रचंड खोल असल्यामुळे जाण्याचा मार्ग बंद होता . परंतु या विहिरीच्या पलीकडे लपलेला भव्य आणि सुंदर घाट दिसताच कधी एकदा घाटावर पोहोचतो असे झाले !
 भिलाडिया घाटावरील डोहकूप
 वरती चढून गावातील एक रस्ता घाटावर येत होता . इथे एक छोटीशी चार फूट आकाराची टपरी होती . सुनील किराणा नावाच्या या दुकानदाराने मला बिस्किटे ,गुडदाणी , शेव वगैरे भरपूर खाऊ दिला .
लाल खुणेच्या मागे दिसणारी छोटीशी हिरवी टपरी म्हणजे सुनील किराणा
  त्याला मी पैसे देणार इतक्यात तिथे घाटावरील राम मंदिराचे पुजारी आले . यांचा चेहरा मला ओळखीचा वाटला . त्यांनी सर्व पैसे भरले . आम्ही तिघे काही काळ तिथे बोलत उभे राहिलो . यांचा मुलगा बरमान घाटावर शारदा संस्कृत पाठशाळेमध्ये शिकायला होता . अनुज व्यास असे त्याचे नाव होते . त्याची खुशाली मी वडिलांना सांगितल्यावर त्यांना खूप बरं वाटलं . कारण माझ्यासोबत जी दोन-तीन मुले शारदा पाठशाळेमध्ये फिरत होती त्यात अनुज देखील होता . त्याचा चेहरा हुबेहूब वडिलांसारखा असल्यामुळे मला मगाशी गुरुजींना कुठेतरी पाहिले आहे असे वाटत होते .पूर्वीच्या काळामध्ये आप्त स्वकीयांची ख्याली खुशाली अशीच कळत असायची . मुलाने आई-वडिलांना फोनवर "आय एम ओके " असे सांगणे आणि एखाद्या माहितगार माणसाने प्रत्यक्ष भेटून त्याची परिस्थिती आता खरोखर कशी आहे हे पालकांना सांगणे याच्यामध्ये किती फरक आहे हे आपण जाणताच . व्यास गुरुजींनी मुलाची व्यवस्थित चौकशी माझ्याकरवी करून घेतली . आणि स्वतः माझ्यासोबत येत संपूर्ण घाट मला दाखवला . .शारदा आश्रम संस्कृत पाठशाळा अतिशय चांगली आहे याबाबतीत आमच्या दोघांचे एकमत झाले.  इथे ऋषिकेश मधल्या कैलास आश्रमाची एक शाखा आहे . अतिशय स्वच्छ नीटनेटका टापटीप आश्रम असून येथे साधुसंत , संन्यासी , बैरागी , वितरागी , तडी ,तापसी , परिक्रमावासी या सर्वांच्या मुक्कामाची उत्तम सोय केलेली आहे . इथे चातुर्मास करण्याकरता बरेच लोक येतात . दुर्दैवाने मला व्यवस्थापकांचे दर्शन झाले नाही कारण आश्रमामध्ये कोणीच नव्हते . परंतु आश्रमातील छोट्या छोट्या देवालयांची दर्शनी घेऊन पुढे राम मंदिराकडे गेलो . 
भिलाडिया हे नर्मदापुरम जिल्ह्यातील शेवटचे गाव असून इथून पुढे हरदा जिल्हा चालू होतो .
कैलास आश्रमाचे प्रवेशद्वार
कैलास आश्रमातील सुंदर लघु मंदिरे .

मंडलोई नावाच्या राजांनी ही सर्व मंदिरे आणि घाट बांधलेला आहे . रामाचे मंदिर अतिशय सुंदर असून त्याची कलाकुसर लक्षात राहील अशी आहे . मंदिराचा परिसर आणि मंदिर अतिशय पवित्र आहे . 
 भिलाडीया घाटावरील भव्य आणि सुंदर श्रीराम मंदिर
समोरील शिव मंदिरातून दिसणारे राम मंदिर आणि डावीकडे छोटेसे केशरी हनुमंत रायाचे देऊळ .
श्री राम प्रभूंचा विग्रह
राम मंदिरामध्ये मंडलोई राजांचे फोटो लावलेले आहेत .हे राजघराणे आपल्या दानशूरतेसाठी आणि धार्मिकतेसाठी प्रसिद्ध होते .पूर्वी राजे रजवाडे आपल्या वैयक्तिक खर्चातून सार्वजनिक देवालये , घाट ,उद्याने इत्यादी बांधत असत .
समोर हनुमंताचे छोटेखानी मंदिर असून ते देखील खूप सुंदर आहे . माझ्या मनामध्ये पूर्वी एक संकल्पना होती . घर तिथे मंदिर . ज्यांना ज्यांना शक्य आहे अशा प्रत्येक मनुष्याने आपल्या आवडत्या जागेमध्ये एक छोटेसे मंदिर आपल्या आराध्य दैवताचे बांधून ठेवावे . ते शक्यतो दगडामध्ये असावे . कारण सिमेंट काँक्रीटचे आयुष्य सत्तर ऐंशी वर्षे असते आणि दगडाचे आयुष्य सहाशे ते हजार बाराशे वर्षांपर्यंत असते . त्यासाठी मी ज्या मंदिराची कल्पना केली होती अगदी हुबेहूब तसे हे हनुमंताचे मंदिर होते . इथून नर्मदा नदीचे उत्तम दर्शन होत होते . समोर शिवमंदिर होते . 
राम मंदिर
भिलाडिया घाटावरील महादेव
राम मंदिराचा परिसर स्वच्छ , सुंदर व  पवित्र आहे .
भिलाडीयाचा घाट अतिशय सुंदर , सुबक ,आखीव रेखीव आणि देखणा आहे . या घाटावर लोकांची सतत वर्दळ असते . शिव मंदिरामध्ये जाऊन शंकराचे दर्शन घेतले . आणि पुढे प्रस्थान ठेवले . तत्पूर्वी आपण देखील घाटाचा परिसर थोडा पाहून घ्यावा . 
भिलाडिया घाटावरील हनुमंताचे सुंदर रूप
 भिलाडिया घाटाची सर्व चित्रे गुगल नकाशा वरून साभार
घाट आखीव रेखीव सुबक आणि सुंदर आहे . महापुरामध्ये उतरण्याकरता वेगळ्या पायऱ्या केलेल्या आहेत .
भिलाडिया घाटावर भाविकांची नित्य वर्दळ असते
एकंदरीत हा एक सुंदर व लक्षात राहणारा घाट आहे .
इथून पुढे किनारा पकडल्यावर लगेचच गावाची स्मशानभूमी आहे . इथे कोणीतरी प्रतिष्ठित व्यक्ती वारली होती आणि अंत्येष्टी सुरू होती . अशाप्रसंगी कोणी परिक्रमा वासी तिथून गेला तर ते शुभ मानले जाते . त्यामुळे मी देखील कलेवराचे अंत्यदर्शन घेऊन मुखामध्ये नर्मदा जल टाकले आणि पुढे निघालो . जीवनाचे शाश्वत सत्य अनुभवायचे असेल तर स्मशानासारखी जागा नाही ! नर्मदे काठी प्रत्येक गावाचे स्मशान असल्यामुळे अनेक चिता अनेक अंत्ययात्रा अनेक दाहक अनुभूती येतात . या तुम्हाला निश्चितार्थाने अंतर्मुख करतात . तसेच चिंतन करत पुढे निघालो . हा उभा तट असलेला किनारा असल्यामुळे चालताना थोडेसे लक्षपूर्वक चालावे लागे . जरा दुर्लक्ष झाले की किमान पाच-सहा फूट ते कमाल पंधरा-वीस फूट खाली पडावे लागायचे . पडताना झाडेझुडपे असायची त्यामुळे फार गंभीर दुखापत व्हायची नाही परंतु खरचटणे , रक्त येणे वगैरे या भागात खूप किरकोळ आहे . विशेषतः काटेरी वनस्पती तुमच्या अंगावर चांगले नक्षीकाम करून ठेवतात . चालून येणारा घाम त्या जखमांवरून जाताना सुंदर पैकी देह बुद्धीची जाणीव करून देतो . इथे वाळू उपसणाऱ्या नावा समोरच्या बाजूला दिसतात . त्यांची संख्या अक्षरशः हजारामध्ये आहे . इतक्या वाळू उपसणाऱ्या नावा एकाच वेळी एकाच ठिकाणी नर्मदेमध्ये अन्यत्र कोठेही पाहिल्या नाहीत .  यातील बंद पडलेली एक नाव खोल बाजूला म्हणजे मी चाललो होतो त्या किनाऱ्याला आणून लावलेली होती . त्या नावेतील लोकांशी चर्चा केल्यावर मला कळाले की साधारण अडीच लाख रुपयांमध्ये एक नाव बनवून मिळते . पन्नास हजार ते एक लाख रुपयांचे इंजिन या नावेला जोडावे लागते . ही इंजिने खूप आवाज करतात . प्रत्येक वेळेस क्षमतेपेक्षा जास्त वाळू नावे मध्ये भरलेली असते त्यामुळे इंजिन अधिक आवाज करतात . या भागामध्ये मैय्या साधारण ओंकाराच्या आकारामध्ये वाहते असे लोक म्हणतात .  इथे नर्मदा इतकी प्रचंड वाळू आणून टाकते की रात्रंदिवस उपसून देखील इथली वाळू शिल्लकच आहे . वाळू उपसा करणाऱ्या लोकांच्या दंग्यामुळे इथले पक्षी जीवन आणि निसर्ग मात्र चांगलाच प्रभावित झालेला दिसतो .  समोरच्या तटावरील गावांमध्ये घरोघरी वाळू उपसणारे जेसीबी ,ट्रॅक्टर वगैरे उपकरणे आढळतात .
नर्मदेमध्ये वाळू उपसणारा जेसीबी एक्सकॅव्हेटर
 उपसलेली वाळू वाहून नेणारे ट्रॅक्टर
सर्व चित्रे गुगल नकाशा वरून साभार
वाळूचा उपसा आणि त्यामुळे गढुळलेले नर्मदा जल .
 नावाच नावा !
 वाळू गोळा करण्यासाठी इथे जमलेल्या काही लोकांशी मी बोललो . त्यातील बऱ्याच लोकांना ही नर्मदा नदी आहे हे देखील माहिती नव्हते . हे ऐकायला धक्कादायक वाटेल परंतु सत्य आहे . पोटाची खळगी भरण्याच्या नादात इतके घोर अज्ञान पाहून वाईट वाटले . ही नदी कुठली आहे तेच माहिती नसल्यावर पुढे जाण्याचा रस्ता आहे किंवा नाही हे या लोकांना विचारणे मूर्खपणाचे ठरले असते . शक्यतो केवट लोक पुढे एखादे संकट असेल किंवा एखादा ओढा , नाला , नदी येऊन मिळत असेल तर परिक्रमा वासी ना आधीच सावध करतात . कठीण रस्ता असेल तर ते देखील सांगतात . इथे देखील मला एक स्थानिक डोंगा वाला भेटला .त्याने मला सांगितले की पुढे पोपवंती नावाची खूप मोठी नदी आहे . तरी तुम्ही वरून पुलावरून पार करावी . 
तत्पूर्वी इथे एका निर्जनास्थळी पंचाग्नी साधन करत बसलेले एक साधू महाराज दिसले .चहू बाजूने जाळ करून ऐन उन्हामध्ये तीन तास बसून राहायचे आणि असे १८ वर्षे साधन करावे लागते ! साधनेची वेळ सकाळी नऊ ते बारा किंवा दुपारी बारा ते तीन अशी असते . याचा आरंभ वसंत पंचमीला केला जातो व पुढचे चार महिने ही साधना केली जाते . चांदगड कुटी मधले रामदास बाबा होते त्यांनी देखील ही साधना केली होती पूर्वी मला भेटलेले राधा रमण दास देखील ही साधना करत होते . साधू महाराजांना साष्टांग प्रणिपात केला आणि वरती चढलो .
वरती एका शेतामध्ये गेलो असता तिथे शेतकरी काम करत बसला होता . त्याला मी विचारले की नदी पार करण्यासाठी एखादा सोपा मार्ग आहे का . तो एक क्षणभर विचारात पडला आणि मला म्हणाला की नाही इथून दोन किलोमीटर पुढे पूल आहे .त्यानेच तुम्हाला जावे लागेल .
मी विचार करू लागलो . आता काठापासून दोन किलोमीटर लांब जायचे आणि पुन्हा दोन किलोमीटर उलटे नर्मदे कडे यायचे , यापेक्षा पोहत नदी पार केलेली परवडते . मी त्याला म्हणालो की दादा थोडासा कठीण रस्ता असला तरी चालेल . मी पार करेन परंतु मला नर्मदा मातेचा किनारा सोडायला लावू नका . शेतकरी क्षणभर विचारात पडला आणि मला म्हणाला ठीक आहे एक रस्ता तुम्हाला सांगतो . आणि त्याने मला त्याच्या शेतातून खाली उतरून एक छोटा ओढा ओलांडून पलीकडे जाऊन जंगलातून काही अंतर चालल्यावर पोपवंती नदी कशी पार करायची ते सांगायला सुरुवात केली . परंतु नंतर त्याने एक क्षणभर डोळे मिटले आणि तो मला म्हणाला की बाबाजी हा रस्ता अतिशय भयानक आहे आणि इथे जर तुम्ही घसरून पडलात तर तुमचे शरीर देखील सापडणार नाही इतकी भयंकर नदी आहे . त्यापेक्षा एक काम करूया . मी तुम्हाला नदी पार करून देतो . आता स्वतः स्थानिक मार्गदर्शकच आपल्यासोबत येत आहे म्हटल्यावर मला देखील खूप आनंद झाला ! 
मी आपला त्याच्या मागे मागे चालत निघालो . गुडघाभर पाण्यातून आधी एक ओढा आम्ही पार केला . सर्वत्र भरपूर चिखल होता . जाता जाता त्या शेतकऱ्याच्या आणि माझ्या गप्पा सुरू झाल्या . याचे नाव कमल होते . हळूहळू पोपवंती नदीचा आवाज येऊ लागला . एका झाडीतून आम्ही बाहेर आलो आणि समोर अतिशय नितांत सुंदर अशी काळ्या कभिन्न बेसाल्ट पाषाणाला भेदत खळाळत वाहणारी पोपवंती नदी आडवी आली ! तिचे रूप पाहताच बसावे असे होते ! जागोजागी छोटे-मोठे धबधबे तयार करत भयंकर खळखळाट करत ही नदी अतिशय वेगाने वाहत होती . या नदीच्या एकूण तीन मोठ्या धारा आम्हाला पार करायचे होत्या . आणि जसजसे आम्ही नदी पार करायला सुरुवात केली तेव्हा माझ्या लक्षात आले की खरोखरीच ही नदी एकट्याने पार करणे मला शक्यच नव्हते इतका तो रस्ता भयानक होता . कारण ज्या काळ्यापाषाणावर मी उभा असायचो तिथून पुढचा पाषाण उडीच्या अंतरावर असायचा . परंतु शेवाळलेला असायचा . आणि खाली १५ ते २० फूट खोल दरी होती ज्यात नदीचे पाणी गायब व्हायचे . आणि उजव्या हाताला सुमारे ५० ते ५५  फूट खोल दरीमध्ये पुन्हा प्रकट व्हायचे . इतकी भयानक नदी मी यापूर्वी पाहिली नव्हती . पाण्याला गती देखील प्रचंड होती . जो दगड पाय ठेवण्यासाठी सोपा वाटायचा त्यावर पाय ठेवल्याबरोबर तो गरकन फिरून वाहून जायचा . आणि ज्या प्रवाहामध्ये पाय ठेवणे शक्यच नाही असे आपल्याला वाटायचे तीच खरी पाऊल ठेवण्याची जागा असायची .  अशा पद्धतीचे भूल भुलैया असलेली ही नदी एकट्याने पार करता येणे अशक्य होते व अशक्यच आहे . कमल सांगू लागला , " खरे तर इथून दोन किलोमीटर पुढे शेतातून चालत गेले की सडक मार्ग लागतो तिथे या नदीवरचा पूल आहे . सगळे परिक्रमावासी तिकडूनच ही नदी पार करतात . या भागातून कोणी येतच नाही . म्हणून मी तुम्हाला तिकडेच पाठवणार होतो . परंतु आतून बाबांनी मला सांगितले की त्याला माझी गुफा दाखव आणि स्वतः नदी पार करून दे . " "कोणते बाबा ? " मी विचारले . हा कमल जेव्हा लहान होता तेव्हा गुरे वळायला या नदीच्या काठावर यायचा . अशीच गुरे वळताना एकदा त्याला कोणीतरी नदीकडे जाताना दिसले . हा पटकन तिकडे गेला असता एक मोठा जटाधारी साधू अदृश्य झालेला त्याला दिसला . तिथून पुढे तो रोज त्या भागामध्ये पाळत ठेवू लागला . काही दिवसांनी त्याला एक जटाधारी वृद्ध साधू महाराजांचे दर्शन झाले जे नदीच्या मध्ये असलेल्या गुहेतून बाहेर यायचे आणि सूर्याला नमस्कार करून पुन्हा आत मध्ये निघून जायचे . हळूहळू याला साधू महाराजांची वेळ माहिती झाली . अखेरीस एक दिवस याने महाराजांना गाठलेच ! हे थोर तपस्वी साधू पोपवंती नदीच्या पोटामध्ये असलेल्या एका गुहेत तपश्चर्या करत होते . हे इथे तपश्चर्या करत आहेत हे कोणालाच माहिती नव्हते . तसेच ते काही खात पीत देखील नसत . कमल ला माहिती झाल्यावर त्याने रोज त्यांच्यासाठी दूध फळे वगैरे आणायला सुरुवात केली . अशी अनेक वर्षे साधु महाराज त्या गुहेमध्ये तप करत होते . एकदा नर्मदेला महापूर आला त्याच्यामध्ये हा संपूर्ण परिसर जलमग्न झाला . त्यानंतर गुरुदेवांनी कमलला काही दर्शन दिले नाही . परंतु तिथून पुढे संकटकाळी त्याला ते प्रेरणा रूपाने मार्गदर्शन करायचे . त्यांचे नाव देखील कमलने कधी विचारले नव्हते . आज जेव्हा मी कमल ला रस्ता विचारला आणि कमलने जेव्हा माझी पुलाचा रस्ता सांगून बोळवण केली तेव्हा त्याला आतून मैय्याने प्रेरणा दिली की याला आपल्या नेहमीच्या मार्गाने नदी पार करव आणि आपली गुरु गुहा सुद्धा दाखव .
गुरुदेव गेल्यापासून कमल फारसा या रस्त्याने आलेला नव्हता . परंतु याच परिसरात लहानाचा मोठा झाल्यामुळे त्याला इथला दगड आणि दगड तोंडपाठ होता . त्याने मला सांगितले की रात्रीच्या काळ्याकुट्ट अंधारामध्ये देखील हा ही नदी पार करू शकत होता ! कमल च्या मागे एक एक पाऊल टाकत मी चालू लागलो . पाण्यामध्ये काठी टेकल्यावर लक्षात येतसे की काठी संपूर्ण आत गेली तरी देखील पाणीच वाहतेच आहे इतके खोल प्रवाह होते ! कमलला विचारले की तो सांगायचा इथे पाणी १२ फूट खोल आहे इथे पाणी पंधरा फूट खोल आहे . म्हणजे थोडक्यात दगडांच्या सुळक्यांच्या टोकावरून आम्ही चालत होतो आणि दगडांच्या फटीं मधून नदी वाहत होती ! आणि पाण्याला वेग इतका होता की विचारू नका ! कमल काय बोलतो आहे ते देखील मला धड ऐकू येत नव्हते इतका पाण्याचा आवाज होता ! दगड प्रचंड शेवाळलेले होते . त्यामुळे पटापट चालणे आवश्यक होते . अधिक वेळ पाय एकाच जागी ठेवल्यावर सटकायला लागायचा . असे खोल खड्डे मध्ये असताना कमल मात्र अचानक एखाद्या ठिकाणी पाण्यात पाय ठेवायचा . तिथे मात्र नेमका खाली दगड असायचा . त्याला या नदीचे किती जबरदस्त ज्ञान आहे हे पाहून मला फार आश्चर्य वाटले . नदीचे दोन प्रवाह ओलांडल्यावर उजवीकडे एका जागी तो मला घेऊन गेला . इथे थोडेसे मातीने सपाट केलेले अंगण असल्यासारखे वाटले . एक मोठा औदुंबराचा वृक्ष या अंगणावर सावली धरून होता . दरम्यान मी या नदीचे पाणी प्यायलो आणि मला आश्चर्य वाटले ! प्रत्येक नदीच्या पाण्याला एक स्वतंत्र चव असते . परंतु पोपवंती नदीचे पाणी अगदी नर्मदा मैया च्या पाण्याच्या चवीचेच लागत होते ! कमल मला सांगू लागला की आपण आत्ता खाली उतरू शकत नाही कारण पाण्याचा प्रवाह भयानक वाढलेला आहे . परंतु या अंगणासमोर ज्या दगडांच्या फटीतून आता पाणी बाहेर येत आहे तेच गुहेचे प्रवेशद्वार आहे ! याचा अर्थ आता आम्ही गुहेच्या टपावर उभे होतो . त्या भागामध्ये प्रचंड ऊर्जा मला जाणवत होत होती . मी त्याला विचारले की या नदीचे पाणी अगदी नर्मदेच्या चवीचे आहे ,ते कसे काय ! तेव्हा तो म्हणाला तीच तर गंमत आहे ! ही नदी सध्या कोरडी पडली असून हिच्यामध्ये बर्गी बांधाच्या कालव्याचे पाणी सोडल्यामुळे सध्या कमरे एवढे पाणी घेऊन वाहत आहे ! म्हणजे मी जे पाणी पिलो ते नर्मदेचेच पाणी होते तर ! आणि या अतिरिक्त पाण्यामुळेच ती गुहा दडली होती .  ते ठिकाण इतके दुर्गम होते की कोणालाही कधीही इथे कोणी राहत आहे याचा अंदाजच लागला नसता ! इथे राहणारे तपस्वी महाराज औदुंबराची फळे आणि नदीचे पाणी यावर जीवन कंठत असणार असा अंदाज मी लावला .  नर्मदा खंडामध्ये अशी अनेक ठिकाणी आहेत की जी अजूनही बऱ्याच लोकांना माहिती नाहीत . रस्त्याने किंवा गावागावातून चालणाऱ्या परिक्रमा वासींना अशी ठिकाणे बघायला मिळणे दुरापास्त आहे . त्यामुळे कितीही कष्ट होऊ देत किंवा कितीही त्रास भोगाव लागू दे , नर्मदा मातेचा किनारा सोडायचा नाही . असा सोपा नियम परिक्रमेमध्ये प्रत्येकाने पाळावा असे फार मनापासून वाटते . तिसरी धारा पार करण्यासाठी तुलनेने सर्वात कठीण होती . परंतु मार्ग दाखविणारा गुरू सोबत असेल तर त्याच्या मार्गाने जाणाऱ्या शिष्याला काहीही त्रास होत नाही याची अनुभूती घेत मी निघालो होतो . कमल शेतकरी तिथे माझ्यासोबत आला नसता तर मी लिहून देतो की ही नदी पार करण्याची हिंमत मी दाखवली नसती . किंवा आगाऊपणा करून जरी तसा प्रयत्न केला असता तर निश्चितपणे एखाद्या फटीमध्ये अडकून जलमग्न झालो असतो . नदी पार करे पर्यंत तिच्या तुषारां मुळे आणि फवाऱ्यांमुळे मी पूर्णपणे भिजलो होतो . मुळात ही नदी आहे साधीच . फक्त हा टापू ती प्रस्तर ओलांडत झेपावत वाहते . इथे तिचे पाणी तीन शाखांमध्ये विभागले गेल्यामुळे आणि दगडांच्या फटीमध्ये गायब होत असल्यामुळे तिला ओलांडणे शक्य होते . अन्यथा पाण्याच्या अतिरिक्त प्रमाणामुळे नदी सहजी ओलांडता येत नाही . कमलने आणि मी नदी पार गेल्यावर गुरुदेवांच्या पवित्र स्मृतीला साष्टांग नमस्कार केला . कमल ची गुरुभक्ती मला फार भावली . आपला गुरु खरा का खोटा याची परीक्षा घेत बसणाऱ्या आधुनिक विचारसरणी च्या शिष्याधमांपेक्षा गुरुचे नाव देखील न विचारता केवळ त्याच्या उपदेशाचे पालन करणारा कमल सारखा शिष्य विरळाच ! कमलला माझ्याकडे नुकताच मिळालेला खाऊ देऊन टाकला . आणि पुढचा मार्ग समजून घेऊन पुढे निघालो . जी नदी पार करायला आम्हाला पंधरा मिनिटे लागली ते अंतर दोन मिनिटांमध्ये पार करून कमाल निघून गेला ! तो परत जाताना डाव्या हाताला ५० फूट खोल दरी होती आणि उजव्या हाताला कमरे एवढ्या पाण्याचा वेगवान प्रवाह होता . टोकदार दगडांवर पटापट उड्या मारत कमलने पैलतीर गाठला ! त्याचे शेतपलीकडे असल्यामुळे ह्या मार्गाने अक्षरशः तो हजारो वेळा गेलेला होता त्याचाच हा परिणाम . साधू महाराजांची गुफा बघावी असे मला फार वाटत होते . त्यामुळे मी धाडस करून खाली उतरलो . कमल म्हणाला त्याप्रमाणे जिथून गुहेमध्ये शिरायला मार्ग होता तिथून भसाभस पाण्याचा प्रवाह बाहेर येत होता . परंतु आत मध्ये गुहा असण्याची दाट शक्यता होती असे एकंदरीत सर्व लक्षणे सांगत होती . त्या अंगणातून महाराजांना पुन्हा एकदा साष्टांग नमस्कार केला आणि पुढचा मार्ग धरला . 
हा आहे नर्मदा पोपवंती संगम .नर्मदा नदीचा मोठा प्रवाह तर दिसतोच आहे . परंतु त्याने चंद्राकृती वाळूचे जे बेट तयार केले आहे ,त्यामुळे डावीकडून वाहणाऱ्या नर्मदेच्या छोट्या शाखेला जी मातकट रंगाची नदी येऊन मिळते आहे तीच पोपवंती नदी .
 पोपवंती नदी आम्ही जिथे ओलांडली ती जागा . पुढे मी मुत्तुर स्वामी आश्रम लिहिले आहे तिथे गेलो .
समोर नर्मदा संगम दिसतो आहे पहा ! 
हा संपूर्ण परिसर किती भयानक आहे याची कल्पना कदाचित हे उपग्रह मानचित्र पाहून वाचकांना येणार नाही . परंतु नदीमध्ये बर्गी धरणातून नर्मदेचे पाणी सोडल्यावर हा प्रवाह फारच भयानक पद्धतीने वाहतो .
आजचा दिवस धन्य होता ! पावला पावलावर साधू दर्शनाचा योग आज माझ्या नशिबात आहे याची मला कल्पनाच नव्हती ! हमीदपूर गावामध्ये मारुती मंदिराचा एक छोटासा पार आहे .तिथे आलो . इथे सावली होती म्हणून क्षणभर थांबलो . इतक्यात तिथे एक वैष्णव साधू माझ्या दिशेने येताना मला दिसले .  त्यांना मी नर्मदे हर केले असता त्यांनी नुसते दोन्ही हात वर केले ! साधु महाराज माझ्यासमोर आले . मी त्यांना दंडवत प्रणाम केला . त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज झळकत होते . मी महाराजांना विचारले की महाराज इथून नर्मदे काठी जाण्याचा रस्ता कसा आहे ते कृपा करून मला सांगा . त्यांनी मला उत्तर द्यायचा प्रयत्न केला आणि पुन्हा शांत झाले . पुन्हा काहीतरी बोलण्यासाठी म्हणून तोंड उघडू लागले आणि परत शांत झाले . मला खुणेने त्यांनी विचारले की तू इकडून कुठून आलास ? मी सांगितले की इथे पोपवंती नावाची एक नदी आहे ती पार करून मी आलेलो आहे . मला साधारण लक्षात आले की साधु महाराज बहुतेक मौनामध्ये आहेत . मी त्यांना विचारले की महाराज आपण मौनामध्ये आहात काय ? त्यांनी हो असे म्हणत होकारार्थी मान हलवली परंतु इतक्यात पुन्हा नाही असे म्हणत नकारार्थी मान देखील हलवली ! मला काही कळेना ! याचा अर्थ काय ? मी आता मौनाची भाषांतरे करायला सुरुवात केली ! मी त्यांना म्हणालो अच्छा म्हणजे तुमचे एरवी मौन नसते परंतु आज मौन व्रत आहे असे काही आहे का ?त्यांनी पुन्हा नकारार्थी मान हलवली . अखेरीस ते मला खुणेनेच म्हणाले रुको . मला काय वाटले कोणास ठाऊक , मी कमंडलू काढला आणि नर्मदा जल त्यांच्यापुढे धरले ! त्याबरोबर त्यांचा चेहरा आनंदाने फुलला ! कमंडलू मधील नर्मदा जल प्राशन केल्याबरोबर ते म्हणाले , "श्रीहरी . . . श्रीहरी . . . . श्रीहरी . . . .! आज मेरा . . . . मौन व्रत . . . . समाप्त हो गया . . . . . ! "  दोन शब्दांच्या मध्ये ते आठ दहा सेकंद थांबत होते . अनेक दिवसांच्या मौनाच्या अभ्यासानंतर आज ते मौनव्रत सोडत होते . मला तत्काळ परिस्थिती लक्षात आली आणि मी त्यांना म्हणालो , " महाराज जी ! आप कृपया कुछ बोलिये नही । मै आपसे प्रश्न पूछता हु । हा या ना मे आप जवाब दिजीये ।आपके लिए आसान और सही रहेगा । " स्वामीजींनी होकारार्थी मान हलवली . मी त्यांना विचारले की आपले खूप दिवसांचे मौनव्रत संपल्यामुळे आज आपल्याला बोलायची इच्छाच होत नाही असे काही आहे का ? साधुनी होकारार्थी मान हलवली . मी त्यांना विचारले की तुम्हाला मौन व्रत सोडल्यानंतर भेटलेला पहिला मनुष्य मीच आहे काय ? स्वामीजी हसले आणि पुन्हा त्यांनी होकारार्थी मान हलवली !  मी पुन्हा त्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत घातला ! मी किती भाग्यवान होतो पहा ! नर्मदे काठी राहून तपस्या करणाऱ्या एका महान महात्म्याचे मौन व्रत संपल्यावरचे प्रथम शब्द ऐकण्याचे सद्भाग्य मला लाभले ! हळूहळू स्वामी बोलू लागले . त्यांचे नाव श्रीकृष्णदास होते आणि ते चित्रकुट मधील साधू होते . इथे पुढे लुचगाव नावाच्या गावामध्ये एक छोटीशी कुटी बांधून नर्मदे काठी हे वैष्णव साधू गेली अनेक वर्षे तपश्चर्या करत राहत होते . यांनी मला सांगितले की इथून पुढे ओळीने अनेक तपस्वी लोक राहत आहेत त्या सर्वांना भेटून तु पुढे जा . मी सर्वांची नावे आणि गावांची नावे वगैरे क्रमाने डायरीमध्ये लिहून घेतले . स्वामी महाराजांना अजूनही बोलायची इच्छा होत नव्हती ! हे खरे मौन ! नाहीतर मौन व्रत धारण करून हातवारे करून लोकांना भंडावून सोडणाऱ्या लोकांपेक्षा मौन व्रत संपलेले असून देखील बोलायची इच्छाच न होणे , हे मौन किती श्रेष्ठ दर्जाचे आहे याची अनुभूतीच मी जणु काही घेत होतो ! स्वामीजींकडे एक मोबाईल होता . ते मला म्हणाले की आपल्या दोघांचा एक फोटो काढ . असे स्वामीजी म्हणेपर्यंत तिथून एक शेतकरी निघाला होता त्याला मी आवाज दिला . त्यानेही लगेच आमचा फोटो काढला . पुढे स्वामींनी तो फोटो मी सांगितलेल्या मित्राच्या क्रमांकावर पाठवून दिला . वाचकांना या महात्म्याचे दर्शन व्हावे म्हणून तो फोटो सोबत जोडत आहे .
मौनव्रताचा त्याग केल्या केल्या श्रीकृष्णदास महाराजांचे दर्शन घेताना प्रस्तुत लेखक .
महाराज बाहेर निघाले असल्यामुळे त्यांची कुटी बंद होती अन्यथा कुटीमध्येच मला घेऊन गेलो असतो असे ते म्हणाले . परंतु त्यांच्या या कुटीचे दर्शन अलीकडेच मला ऑनलाईन झाले !
या श्रीकृष्णदास महाराजांविषयी युट्युब वर कोणीतरी एक व्हिडिओ बनवलेला आहे . तो योगायोगाने पाहाण्यात आल्यावर मला आठवले की यांचे दर्शन मला घडलेले आहे . त्या व्हिडिओमधील काही क्षणचित्रे आपल्यासाठी देत आहे . इथे आपल्याला त्यांची कुटी दिसत आहे . 
 लुचगाव आश्रमाचे चित्रकूट वाले बाबा अर्थात श्रीकृष्णदास महाराज
नर्मदा स्नान केल्यानंतरची महाराजांची प्रसन्न मुद्रा
आश्रमाच्या कट्ट्यावर बसून स्वयंपाक करताना चित्रकूट वाले बाबा . समोर वाहणारी नर्मदा मैया .
अशा महात्म्याच्या हातचे भोजन खायला मिळणे म्हणजे पर्वणीच !
चित्रकूट वाले बाबा नर्मदेची पूजा करताना
बाबांनी आपल्या कपाळावर लावलेले जे गंध आहे त्याला उर्ध्व पौण्ड्र असे म्हणतात . यातील पांढरा भाग म्हणजे आपल्या उपास्य देवतेच्या किंवा सद्गुरूंच्या पादुका आहेत अशी कल्पना केलेली असते . आणि त्यांना गंध लावलेले असते . दक्षिण भारतातील अय्यंगार लोक अशा प्रकारचे गंध सर्रास लावतात .  वैष्णव लोकांचा टिळा वेगळा असतो . शैवांचा वेगळा असतो . शाक्त , गाणपत्य , रामानंदी अशा प्रत्येक संप्रदायाचे टिळे लावण्याचे प्रकार वेगळे वेगळे असले तरी भावार्थ एकच आहे . विविधता मे एकता !
आपल्या आश्रमामध्ये हवन करत बसलेले चित्रकूट वाले बाबा . मागे अजून काही साधू .
साधूंना जे हवे ते सर्व जागेवर मिळते . कुठे जावे लागत नाही . 
 धुनीवर बसलेले चित्रकूट वाले बाबा
या श्रीकृष्णदास महाराजांनी मला सांगितले की इथून थोडेसे पुढे गेल्यावर एका कुटीमध्ये कर्नाटकातील एक संन्यासी राहतात त्यांचे दर्शन अवश्य घे . याच काठावर तप करणाऱ्या अजून काही साधकांची माहिती त्यांनी मला दिली आणि सर्वांचे दर्शन घेत पुढे जायला सांगितले . महाराजांना नर्मदे हर करून मी एका शेतातून मार्ग पकडला . अगदी जवळ जाईपर्यंत ही कुटी सापडत नाही . बागलकोट जवळ मुतुर नजिक गुळेतगुड नावाचे गाव आहे .इथले एक तरुण , कानडी भाषिक , तेजस्वी ,तरुण संन्यासी इथे साधना करण्यासाठी राहिलेले आहेत . अर्थात संन्यासी त्यांचे पूर्वाश्रमीचे मूळ स्थान कधी सांगत नाहीत . परंतु मीच आगाऊपणा करून ते शोधून काढले त्याबद्दल क्षमस्व ! यांचे नाव सिद्धारूढ स्वामी असे होते . अतिशय रम्य असा हा आश्रम होता . जागा जेमतेम दोन-तीन गुंठे असेल . परंतु घनदाट वनराजीने नटलेला आश्रम होता . अगदी मैय्याच्या काठावर होता . समोर मैया चे भव्य पात्र दर्शन देत होते . परिसरामध्ये भरपूर पक्षी किलबिलाट करत होते . एखाद्या ऋषीमुनींचा आश्रम कसा असावा याची माझ्या मनामध्ये एक कल्पना होती त्याच्या खूप जवळ जाणारा हा आश्रम होता . 'वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे । पक्षीही सुस्वरे आळविती ' या तुकोबारायांच्या ओळींची आठवण करून देणारे वातावरण होते ! शेजारी एक बंगलावजा कुटी होती . मी बाहेरून आवाज दिला नर्मदे हर ! आतल्या खोलीतून घंटा वाजवायचा आवाज आला . पुन्हा एकदा आवाज दिला . पुन्हा घंटा वाजली . मग माझ्या लक्षात आले की आपल्याला आत मध्ये कोणीतरी बोलवत आहे . आतल्या एका खोलीमध्ये स्वामीजी बसले होते आणि त्यांचा एका भक्तासोबत व्हिडिओ कॉल चालू होता . गंमत म्हणजे स्वामीजी पूर्णपणे मौनामध्ये होते . आणि पलीकडची माताराम त्यांच्याशी कानडी मध्ये बोलत होती . स्वामीजींनी कॅमेरा उलटा केला आणि त्या माताराम ला मी दिसू लागलो . तिने मोठ्या आनंदाने नर्मदे हर चा पुकारा केला ! मी देखील नर्मदे हर म्हणालो .त्या ताई कानडी मध्ये बोलत होत्या . मी तोडक्या मोडक्या कानडी मध्ये त्यांच्याशी संवाद साधला .पूर्वी कामानिमित्त वर्षभर म्हैसूर मध्ये मी राहिलो होतो . त्यामुळे जुजबी कानडी मला समजायचे .  त्यांनी मला सांगितले की महाराज मौनामध्ये आहेत . मी त्यांना महाराजांचे नाव विचारून घेतले . (आणि याच ठिकाणी गाव देखील विचारून घेतले ! ) तिने गाव सांगितल्यावर महाराज थोडेसे रागावल्यासारखे मोठे डोळे करून तिला गप्प बस अशी खूण करू लागले . मग मीच तिला सांगितले की साधूचे मूळ शोधायला जाऊ नये असे शास्त्र वचन आहे . किती हा आगाऊपणा माझा , परंतु माझ्या कडून घडला हे मात्र खरे ! मी महाराजांना सांगितले की मी बाहेर बसतो .आपले झाले की आपण बोलूया . महाराज खुणेनेच म्हणाले मी पण बाहेर आलो चला ! महाराजांची ती शिष्या त्यांना कानडी मध्ये काही शंका विचारत होती आणि महाराज मान हलवून हो किंवा नाही इतकीच उत्तरे तिला देत होते . लोक साधूला किती त्रास देतात याचे हे उत्तम उदाहरण मी पाहत होतो ! अर्थात त्यांना तो त्रास वाटत नाही .परंतु आपल्याला थोडेसे भान हवे की आपल्याला मनात आले की लगेच साधूला संपर्क साधून त्याच्या चाललेल्या साधनामध्ये व्यत्यय आपण शक्यतो आणू नये . महाराजांनी इथे एक सुंदर शिवलिंग स्थापन केले आहे . त्या कट्ट्यावर जाऊन मी निवांत बसलो . स्वामीजी देखील अतिशय निवांत होते .ते तिथेच पायऱ्यांवर येऊन खाली बसले . त्यांच्या त्या शिष्येने मला या परिसराची कानडी मध्ये माहिती दिली . मी आश्रमात आल्याचा स्वामींना खूप आनंद झालेला दिसत होता . स्वामिनी खुणेनेच मला सांगितले की तुला जेऊन जावे लागेल . मला थोडेफार कानडी बोलता येते हे पाहून स्वामींना आनंद वाटला . त्यांनी बाहेर कट्ट्यावर स्थापन केलेले शिवलिंग अतिशय सुंदर होते .  त्यावर शनीच्या कड्याप्रमाणे आडव्या रेषा होत्या . त्या रेषा आणि शिवलिंगाचा रंग हे अतिशय दुर्मिळ असतात असे स्वामींनी मला सांगितले . आणि मला देखील पुढे कुठेही असे शिवलिंग पुन्हा दिसले नाही .
हेच ते शिवलिंग
याच आसनावर मी बसून राहिलो होतो
इथे बसल्यावर आश्रम असा दिसायचा . हे स्वयंपाक घर होते जिथे स्वामींनी स्वयंपाक केला .
परिसरामध्ये गर्द झाडी होती
आश्रमातून नर्मदा मैया अशी दिसायची
संपूर्ण परिसरामध्ये त्यांनी तळ ।कोकण किंवा कारवार प्रांतामध्ये जशी झाडे लावलेली असतात तशी झाडे लावली होती .कढीपत्ता ,केळी ,मसाल्याची झाडे , नारळी , पोफळी , फुलझाडे , वेली सर्व काही लावले होते . कमीत कमी जागेत अतिशय सुंदर आश्रम उभा राहिला होता . नंतर त्यांनी गच्चीवर नेऊन देखील मला काही झाडे दाखवली . आधी मला काय खायला हवे असे त्यांनी मला विचारले व मी तुमच्या आवडीचे काहीही चालेल असे म्हटल्यावर ,त्यांनी उत्तम पद्धतीची दाक्षिणात्य खिचडी बनवायचा बेत आखला . स्वामीजी हुशार होते . त्यांनी मला कुकरमध्ये खिचडी लावताना किती प्रमाणात पाणी घालायचे वगैरे सर्व शिकवले . न बोलता खाणा खुणांनीच शिकवले . आणि त्यांनी सांगितले की कुकर उतरल्यावर तुला झाकण दाखवतो . झाकणाला फोडणी लागलेली नसेल ! आणि खरोखरीच झाकणाला फोडणी लागली नव्हती इतक्या योग्य प्रमाणात खिचडीला आत मध्ये उकळी आली होती ! गॅसची ज्योत किती असावी पाणी किती असावे मसाला किती घालावा या सर्वांचे ठरलेले प्रमाण त्यांच्या डोक्यात होते ! बरबटलेले प्रेशर कुकर बघायची सवय आपल्याला असते . मला आज लक्षात आले की थोडेफार अनुभव ज्ञान लावले की कुकर खराब न करता भात करता येतो . बाहेर अंगणात बसवून त्यांनी मला भरपेट खिचडी खाऊ घातली . त्यावर गाईच्या साजूक तुपाची अक्षरशः धार लावली . मी आजपर्यंत इतकी अप्रतिम खिचडी खाल्ली नव्हती ! मी खिचडी खाऊन तिचे घासाघासा ला कौतुक करत असताना त्यांच्या डोळ्यातून गंगायमुना वाहत होत्या ! एका भुकेल्या जीवाला अन्न देऊन तृप्त करणे म्हणजे साक्षात परमेश्वराला तृप्त करणे असा भाव त्यांच्या ठायी होता . शिवाय मैय्याला नैवेद्य दाखवून मी भोजन करायचो . त्यामुळे मैय्याचे देखील तृप्तपणे भोजन झाले ! स्वामीजी संध्याकाळी सात वाजेपर्यंत ध्यान करायचे व नंतर एक तास फोनवर किंवा जे कोणी भेटायला येईल त्याच्याशी बोलायचे . इथे टकाचोर पक्षी खूप जवळ येऊन खिचडी खाऊन गेला . स्वामींनी सांगितले की हा रोज माझ्या हातून काहीतरी खाऊन जातो . इतक्यात कुत्र्याची अतिशय छोटी आठ पिल्ले तिथे आले . यांना आई नसल्यामुळे स्वामीजींनी त्यांचा सांभाळ केला होता . त्यांनी या पिलांना दूध भात कालवून खायला घातला . काही काळ मी या पिलांशी खेळत राहिलो . नंतर स्वामीजी मला आत मध्ये घेऊन गेले . यांच्याकडे वेदांताची व अन्य अध्यात्मिक विषयावरील अनेक पुस्तके होती . यांच्याकडे एक मोठी सेल्फी स्टिक होती ती त्यांनी मला दिली आणि आपल्या दोघांचा सेल्फी काढ असे मला सांगितले . मी देखील काही फोटो काढले . मित्राचा क्रमांक त्यांना लिहून दिला . त्यावर त्यांनी कालांतराने फोटो पाठविले . 
हमीदपूर येथील तरुण संन्यासी श्री सिद्धारूढ स्वामी महाराज यांचे समवेत प्रस्तुत लेखक
सिद्धारूढ स्वामी अतिशय तेजस्वी , नम्र , हुशार , सात्विक , मनमिळावू आणि विद्वान होते . यांचे गुरु श्री भागवतपदाचार्य स्वामी म्हणून होते .

आज इथेच मुक्काम कर म्हणून सिद्धारूढ स्वामी मला आग्रह करत होते . परंतु साधारण वैशाख महिन्या च्या आरंभी समुद्र पार करणाऱ्या नावा बंद होतात . त्यामुळे मला थांबून जमणार नव्हते . इथून पुढचे कुठलेही जादाचे मुक्काम टाळत गेलो आणि शक्य तितके चालत राहिलो . स्वामीजींनी मला काहीतरी भेटवस्तू द्यायची म्हणून पायात घुसलेला काटा काढण्याची अतिशय सुंदर आणि बारीक नाचकण भेट दिली ! त्यांनी ते हत्यार दिल्यावर मला आठवले की आज पर्यंत माझ्या पायात नर्मदा मातेच्या कृपेने काटाच घुसलेला नव्हता ! संपूर्ण परिक्रमा मार्ग कंटकाकीर्ण असून देखील हे होणे म्हणजे चमत्कारच मानला पाहिजे . इथून पुढचा नर्मदेच्या काठावरचा मार्ग अति धोकादायक होता . सर्व वाळूचा पहाड व त्यात अरुंद वाहून गेलेली पायवाट .गवत नाही ! काही नाही ! जरा पाय सुटला की मैया मध्ये पडणार हे निश्चित . त्यातल्या त्यात समाधानाची बाब एवढीच होती की हजारो नौका वाळू उपसात होत्या त्यामुळे कोणी ना कोणी वाचवायला नक्की आले असते . माणसांचा वावर येथे नसल्यामुळे काटेरी झाडे खूप होती . परंतु गमतीचा भाग असा की प्रत्येक धोकादायक ठिकाणी एखादे औदुंबराचे झाड असायचे .आणि त्याला धरून किंवा त्याच्या उघड्या पडलेल्या मुळ्या पकडून पुढे जायला मार्ग मिळायचा . औदुंबर वृक्षाचे वैशिष्ट्य असे आहे की कितीही पाणी असते तरी तो सहसा मरत नाही . त्यामुळेच जिथे औदुंबर वृक्ष आहे तिथे जवळपास पाण्याचा स्त्रोत असण्याची शक्यता असते . जिथे भरपूर पाणी आहे अशाच ठिकाणी औदुंबराच्या बिया काही वर्षाने रुजतात . उभा कडा असल्यामुळे येऊन मिळणारे ओढे नाले हे खोल दरीतून यायचे . अशा खोल खड्ड्यांमध्ये उतरणे आणि पुन्हा चढणे अशक्य आहे . अशा ठिकाणी वेगाने पळत येऊन मोठी उडी मारून पलीकडे पोहोचणे हा एकमेव उपाय असायचा . अशा खूप उड्या या ठिकाणी मारल्या . उडी मारल्यामुळे दप्तराचा बंध ढीला पडण्याची शक्यता असायची . त्यामुळे आधी तो घट्ट पकडून मग उडी मारावी लागे . इथून पुढे एका टेकडावर छोटीशी कुटी बांधून एक तमिळ जोडपे राहत होते .त्याची माहिती मला श्रीकृष्णदास महाराजांनी दिली होती .परमज्योती अण्णा असे त्यांचे नाव होते . दिंडीगल हे त्यांचे गाव होते . याने आधी फारसे काही अगत्य दाखवले नाही . परंतु मी तमिळमध्ये बोलल्यावर घरातून बाहेर तरी आला . समोर एका मंदिरात पाच मिनिटे मी बसलो . फार काही बोलला नाही . निघताना मी त्याचा फोन क्रमांक डायरीमध्ये लिहून घेताना त्याचे नाव गाव तमिळमध्ये लिहून घेतले . ते पाहिल्यावर मात्र त्याला थोडासा पश्चाताप झाला . आणि काहीतरी खाऊन जा चहा पिऊन जा वगैरे सांगू लागला . परंतु मी एकदा आसन उचलले की शक्यतो काही घेत नसे . त्यामुळे नाव काढले आहेस तर एक ग्लासभर पाणी पाज असे त्याला म्हणालो . पाणी घेऊन पुढे निघालो . तमिळ लोकांमध्ये जाणीवपूर्वक केली काही दशके तिथल्या राजकारणी लोकांनी उर्वरित भारतातील लोकांच्या बद्दल अतिशय दूषित पूर्वग्रह करून ठेवलेला आहे . त्यामुळे त्यांच्याशी चालताना , वागताना , बोलताना वेगळ्या पद्धतीने सुरुवात करावी लागते , हे दुर्दैव आहे . पहिले वाक्य किमान तमिळमध्ये बोलावेच लागते . तरच ते तुम्हाला ऐकतात तरी . मी एक उत्तर भारतीय असून देखील (तमिळ लोक , तामिळनाडू प्रांत सोडून सर्वांना उत्तर भारतीय समजतात ) मला तमिळ लिहिता , वाचता , बोलता येते आहे याचे अप्रूप त्याला वाटले परंतु तोपर्यंत उशीर झाला होता .इथे मैया चे खूप सुंदर वळण आहे . अतिशय स्वच्छ वाळूचा किनारा आहे . इथून रामगड व ग्वाडी ( ग्वारी ) गाव लागते . पुन्हा एकदा ग्वारी ! एकाच नावाची किती गावे आहेत पहा ! लुचगाव च्या समोर जो नाव घाट आहे तो लक्षात राहिला . मैय्यामध्ये इतक्या प्रचंड संख्येने नावा यापूर्वी कधी ही कुठेही नव्हत्या पाहिल्या . ग्वाडी गावामध्ये लोकांनी बोलवून चहा पाजला . ग्वारी गावचे महंत बाहेर गेलेले होते .परंतु नेमके वाटेमध्ये ते मला भेटले . गाडीवरून परत निघाले होते . त्यांनी परत आश्रमामध्ये चालण्याचा खूप आग्रह केला परंतु मी उलटे चालायला नको ,असे सुचविल्यावर ठीक आहे म्हणाले . इथे मला ताडाची बरीच झाडे दिसली .  त्यांच्याविषयी मी महंतांना माहिती दिली आणि पुढे निघालो . इथे एका अतिशय अप्रिय घटनेला मला सामोरे जावे लागणार होते . मैय्याला कदाचित हे आधीच माहिती असावे .त्यामुळे ती इथे खळाळून हसताना भासत होती . 



लेखांक सत्तावन्न समाप्त (क्रमशः )

मागील लेखांक

पुढील लेखांक





टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

जे आवडते सर्वांना ...

अनुक्रमणिका

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

लेखांक १ : नर्मदे हर !

लेखांक २ : भोपाळ जवळच्या जंगलातील अपघात

लेखांक ४ : झुठा कही का ! सबकुछ तो लाए हो !

लेखांक ३ : चोराची धन

लेखांक ५ : ग्वारीघाट जबलपुर मध्यप्रदेश

लेखांक ८३ : महाराष्ट्रात प्रवेश आणि भाबरीचे भेदक भिल्ल-महात्मा फोदला गारद्या पावरा

लेखांक ७४ : लेपा बांध , वेदा संगम , कठोरा अन् मांडव्य गुंफा

लेखांक ९० : गुजरात मधील कणजी चे सान्सुभाई तडवी आणि अरण्यव्याप्त माथासर