लेखांक ५६ : पथाडा चा घातक पथ , बाबरी मध्ये भजन आणि चंद्राची तपोभूमि , चांदगढची चांदला कुटी

घोघरा सोडल्यावर आयपा घाट लागतो . अतिशय सुंदर असा हा घाट आहे . इथून पुढे पठाडा किंवा पठारा गाव लागते . सर्व लोक रस्त्याने जात होते परंतु मी मैय्याचा किनारा पकडून ठेवला . या भागामध्ये अतिशय सुंदर अशी शिवलिंगे नर्मदे किनारी सापडतात . दरवर्षीच्या महापुरामध्ये नवीन नवीन शिवलिंगे इथे येऊन साचत असतात . ही सर्व शिवलिंग पाहत जाताना पुढे इकडे काठावर चा रस्ता संपला आहे असे लक्षात आले . इथे नर्मदा दोन शाखांमध्ये विभागते आणि मधोमध प्रचंड वाळूचा साठा असलेले एक बेट तयार झालेले आहे . या बेटावर नावेने स्थानिक लोक आणि पर्यटक जातात .
 .आता हळूहळू प्रवासी नावा दिसू लागल्या होत्या . आकाराने मोठ्या असलेल्या आणि एक वेळी अनेक लोक व दुचाकी नेऊ शकणाऱ्या गोव्यातील फेरीबोट सारख्या छोट्या नावा या भागात दिसल्या . या भागातील छोट्या फेरी बोट
वीस रुपये आकारून प्रवाशांना एका काठावरून दुसऱ्या काठावर नेले जाते . (संग्रहित छायाचित्र )
 आयपा घाटावर नर्मदा उथळ आहे . स्नान देखील करता येत नाही इतकी उथळ आहे .
सर्वत्र दगड गोट्यांचा खच आढळतो . यात सुंदर शिवलिंगे सापडतात . समोर दिसणारा वाळूचा किनारा म्हणजे मध्ये तयार झालेले बेट आहे .
पाणी अतिशय शुद्ध व स्वच्छ आहे
हेच ते वाळूचे बेट ज्याच्यामुळे नर्मदा मैया दोन शाखांमध्ये विभागली जाते ( संग्रहित छायाचित्र )
बेटाचे विहंगम दृश्य (संग्रहित ड्रोन शॉट )
समोर उभा कडा दिसू लागला ,ज्याची नर्मदेमध्ये सावली पडली आहे पहा . त्याच्यामुळे मी किनारा सोडून ओढ्याच्या वाटेने वरती आलो आणि समोर असलेल्या नर्मदा सेवा आश्रमात पोहोचलो .
भरतसिंहजी आणि लीलाबाई या दाम्पत्याने पथाडा गावामध्ये हा आश्रम सुरू केलेला आहे .आळंदी मधील संत सेवा आश्रम देखील या आश्रमाशी संलग्न आहे .

इथे आधीच काही परिक्रमावासी येऊन बसले होते ज्याच्यामध्ये एकनाथराव रोकडे ,तानाजीराव गिरी गोसावी आणि शेळके काका वगैरे होते . ते सर्वजण सडक मार्गाने चालायचे आणि मी काठाने चालायचो . ते खूप अंतर चालून साधारण मला जितका वेळ लागेल तेवढ्याच वेळामध्ये आश्रमामध्ये पोहोचायचे . असे पुढे बरेच वेळा झाले . याच्यावरून माझ्या असे लक्षात आले की काठावरून चालले किंवा सडक रस्त्याने चालले तरी वेळ साधारण तेवढाच लागतो . फक्त काठावरून चालताना नर्मदा मातेचा अखंड सहवास मिळतो . आज चालताना मला बोटाच्या आकाराचे अतिशय सुंदर आणि सुबक असे शिवलिंग सापडले . त्या शिवलिंगाला तोडच नव्हती ! त्याचा रंग देखील कातडीसारखा होता . ते मी सर्वांना दाखवले असता शेळके आणि रोकडे यांच्यासोबत असलेले तिसरे एक मराठी काका परिक्रमावासी होते . जे खूप चांगले होते , परंतु त्यांचे नाव मी दुर्दैवाने विसरलो . ( ता .क. यांचे नाव तानाजीराव गिरी गोसावी असे होते ) तर त्यांनी ते मला मागितले आणि मी त्यांना ते देऊन टाकले . आता आमरण मी या शिवलिंगाची पूजा करेन असे त्यांनी मला सांगितले . हा आश्रम म्हणजे एक छोटीशी झोपडी होती . दुतर्फा शेती असलेल्या एका छोट्या डांबरी रस्त्याच्या कडेला ही झोपडी बांधण्यात आली होती .
 पथाडा आश्रम
इथून पुढे बाबरी नावाचे गाव लागते .या गावाचे नामकरण नर्मदापुरम सोबतच श्री रेवापुरम असे करण्यात आलेले आहे . या गावातील बाबरी या शब्दाचा बाबर या बादशाहशी काही संबंध नसून बोरुचे टाक पूर्वी मिळायचे , त्याचे जे गवत नर्मदे काठी उगवते ,त्या गवताला या भागामध्ये बाबरी असे म्हणतात . ते गवत इकडे विपुल उगवते म्हणून या गावाचे नाव बाबरी पडले असे मला गावात ग्रामस्थांनी सांगितले . ते काही का असेना श्रीरेवापुरम हे नाव कधीही अधिक चांगले आहे ! 
इथे मला काही केल्या किनाऱ्याने जायचे असे डोक्यात होते . त्यामुळे मी शेतामध्ये घुसलो . या भागामध्ये हरभरा खूप लावला होता . त्याला पाणी घालणारे तुषार सिंचन अखंडितपणे सुरू होते . 
पथारा मधील तुषार सिंचन करणारी  शेते

आज पठारा ते बाबरी हा अति कठीण मार्ग पार होणार होता याची मला देखील कल्पना नव्हती . मी शेतातून जाताना मला पुढे एक आश्रम दिसला म्हणून त्या आश्रमामध्ये गेलो . आळंदी येथील काही वारकरी संतांनी मोठ्या प्रेमाने , एक एकर जागा विकत घेऊन हा आश्रम उभा केला आहे . इथे असलेले महाराज निवृत्त शिक्षक होते आणि आता पूर्णवेळ आश्रम चालवण्याचे काम करत होते . यांनी मला उन्हामध्ये बसण्यासाठी चटई दिली आणि भरपूर हरभरा माझ्या पुढे आणून टाकला ! हरभरा खताखता आम्ही गप्पा मारू लागलो . मराठी बोलणारी माणसे भेटली की बरे वाटायचे . मी महाराजांना विचारले की इथून पुढे काठाने जाणारा रस्ता आहे का ? 
हाच तो मा नर्मदा संत सेवा आश्रम .
नर्मदे काठी आश्रम उभा करताना एक ठराविक पठडी दिसते . एखादा स्थानिक मनुष्य पकडला जातो .त्याच्या मदतीने आश्रमाचे संचालन होते  .त्यानंतर एखादा प्रेरक किंवा संस्थापक असतो आणि एखादा कार्यवाह असतो .शिवाय अशा संस्थापकांनी आपल्या भक्तमंडळींना आणि शिष्य संप्रदायांना प्रेरणा देऊन देणग्या गोळा केलेल्या असतात . त्याच्या साह्याने आश्रमाचे कामकाज चालते . काही स्वयंभू आश्रम देखील दिसतात . हा आश्रम स्वयंभू होता . म्हणजे निवृत्त शिक्षक असलेल्या कीर्तनकार महाराजांनी त्यांची सर्व जमापुंजी लावून आश्रम उभा केला होता . "तुम्हाला सडकेने गेलेले चालणार नाही का ? " महाराजांनी मला विचारले ? " खरं सांगायचं तर नाही चालणार . मला काठाने नव्हे नव्हे काठानेच चालायचे आहे !" माझा हा निश्चय ऐकून महाराज मला म्हणाले , " इथून आजवर एकच महात्मा गेल्याचे मी ऐकलेले आहे .याचा अर्थ मार्ग निश्चितपणे आहे .फक्त कोणी जात नाही त्यामुळे काळजी घ्या . मैय्या सोबत आहेच " असे शिक्षक आम्हाला हवे होते असे मी त्यांना बोलून दाखवले ! धडपडण्याची इच्छा असलेल्या मुलांना जे हवे ते करू देणे ,फक्त दुरून त्यांच्यावर लक्ष ठेवणे हे एका आदर्श शिक्षकाचे काम असते .
आश्रमातून दिसणारे भव्य वाळूचे बेट आणि नर्मदा मातेची डावी शाखा
 महाराजांनी होकार दिल्याबरोबर मी सामान उचलले . सरळ निघालो होतो परंतु त्यांनी मला एक जबरदस्त मार्ग बघून तेथूनच जाण्यास सांगितले . आश्रमाच्या अलीकडे एक ओढा होता .जो कोरडा पडलेला असे . परंतु त्या ओढ्याच्या वाहण्यामुळे तयार झालेले जे भुयार होते ते अक्षरशः पांडवांनी तयार केलेल्या लाक्षागृहातील भुयाराची आठवण करून देईल असे होते ! अतिशय लांब ,भीतीदायक ,भयानक परंतु तेवढेच गुढरम्य होते . त्यातून वेगाने चालताना कधी ती "सांदण दरी " तुम्हाला मैय्या पाशी आणून सोडते याचा अंदाजच येत नाही !इथे आलो आणि अक्षरशः मला एखाद्या भयपटामध्ये दाखवतात तशा भूभागामध्ये आल्यासारखे वाटू लागले ! प्रचंड वेगाने नर्मदा जल वाहत होते . डावीकडे अतिशय खडकाळ , उंच ,धोकादायक आणि असमान असा निसरडा कडा होता . लाखो करोडो विविधरंगी शिवलिंगे वाळूमध्ये मिसळून त्याचे खडकात रुपांतर झालेला हा भूगोल होता . इथून अनवाणी चालता येणे अशक्य होते इतके हे दगड टोकदार आणि कठीण होते . ९० अंशापेक्षा पेक्षा थोडासा अधिक कोन असावा इतका तो उतार धोकादायक होता .  इथून चालताना जरा जरी दुर्लक्ष झाले की तुम्ही खूप सार्‍या दगडांवर आपटत अखेरीस नर्मदार्पण होणार असा हा मार्ग होता . मठपती म्हणाले ते खरे होते इथून कोणी जाण्याची शक्यताच नाही कारण हा मार्ग खरोखरच खूप कठीण होता . मी या मार्गाचे काही फोटो कुठे मिळतात का ते गुगल नकाशावर शोधत होतो . सुदैवाने समोरील बेटावरून कोणीतरी एका मुलाचा या मार्गावरून जाताना चा फोटो काढलेला आहे तो इथे जोडतो ज्यामुळे तुम्हाला मार्गाची कल्पना येईल .
हाच तो पठाडा ते बाबरी कठीण , खडकाळ ,उभा सरळसोट कडा असलेला  परिक्रमा मार्ग ! कृपया या मार्गाचा अवलंब परिक्रमावासिनी करू नये अशी हात जोडून विनंती आहे ! मैय्याला त्रास सोसावा लागतो ! हा मुलगा ज्या पद्धतीने चालला आहे त्या पद्धतीने हा मार्ग साधारण अडीच तीन किलोमीटर आहे ! कल्पना करून पहा ! 
ही जी उभी भिंत आहे त्यामध्ये लाखो करोडो वर्षांपूर्वी गाळामध्ये रुतून बसलेली अतिशय सुंदर आणि दुर्मिळ अशी शिवलिंगे मिळतात . ती काढता येणे मात्र कठीण असते कारण ती काढण्यासाठी शक्ती लावायला जावे आणि तुमचा पाय सुटून तुम्ही थेट नर्मदार्पण व्हावे अशी शक्यता खूप असते ! या मार्गावर तरस कोल्हे घुबडे यांनी मला दर्शन दिले ! जो काही पाय मार्ग निर्माण झाला आहे तो याच प्राण्यांनी निर्माण केला आहे असे नंतर माझ्या लक्षात आले . मला पाहून एक तरस लांब वर पळून जाताना दिसले .  थोड्या वेळाने मागे दगड पडल्याचा आवाज आला म्हणून पाहिले असता कोल्ह्याची जोडी पळताना दिसली . याचा अर्थ मी त्यांच्या जवळून जाताना ते निस्तब्ध कुठेतरी उभे राहिले होते आणि सात्मीकरण अथवा कॅमाफ्लज झाल्यामुळे ते मला दिसलेच नाहीत !  अजून थोड्या वेळाने एक खूप मोठे घुबड माझ्या शेजारून उडत गेले ! त्याच्या पिवळ्या धमक पंखांचा विस्तार पाहून मी अचंबित झालो ! याचा रंग हुबेहूब तिथल्या दगड मातीशी जुळणारा होता त्यामुळे ते कुठे जाऊन बसले हे नंतर मला सापडले सुद्धा नाही ! या संपूर्ण मार्गावरती कोणी भेटण्याची शक्यता नव्हतीच . इतक्यात एक डोंगा घेऊन निघालेला मनुष्य मला आवाज देऊ लागला . मी त्याला नर्मदे हर केले . त्याने नावेतूनच माझ्या दिशेला साष्टांग दंडवत घातला . आणि म्हणाला या मार्गाने चाललेला पहिला परिक्रमावासी मी पाहत आहे . तुमचा एक फोटो काढतो असे म्हणून त्याने जिओच्या साध्या फोनवर माझे फोटो काढले . त्याला मी मित्राचा क्रमांक देऊन ठेवला . परंतु पुढे त्याने तो फोटो पाठविला की नाही हे कळायची काही सोय राहिली नाही . परंतु हा प्रवास अत्यंत अविस्मरणीय असा होता हे मात्र अगदी शंभर टक्के खरे आहे ! नर्मदेचा काठ असा देखील असू शकतो याची कोणी कल्पना देखील करू शकणार नाही ! संपूर्ण दोन अडीच किलोमीटर अंतरामध्ये एकही झाड किंवा गवताचे पाते देखील उगवलेले नाही . आणि पाऊल ठेवायला जागा नसल्यामुळे चालताना फार मोठी कसरत करावी लागते . या रस्त्याने चांगलाच घाम काढला ! परंतु प्रत्येक पावलाला नर्मदा मातीचे स्मरण करत चाललो होतो त्यामुळे प्रवास सुकर झाला ! याच्या विरुद्ध समोरचे बेट मात्र अतिशय विस्तीर्ण आणि निवांत अशा वाळूने भरलेले होते ! मध्ये वाहणारे नर्मदेचे पात्र हे मात्र तिला दोन्ही बाजूंची फिकीर नसल्यासारखे प्रचंड वेगाने पुढे झेपावत होते . हा मार्ग संपल्या बरोबर मोठे मोठे खडक दिसू लागले . इथे नर्मदा एक मोठे दक्षिणमुखी वळण घेते . या वळणावर वरच्या टेकड्यावरून एका शेतकऱ्याने मला पाहिले आणि तो वेडाच झाला ! इथून कुठून आला वगैरे त्याने मला विचारले . मी संपूर्ण रस्ता चालत आलो आहे यावर त्यांचा विश्वासच बसेना .त्याला असे वाटले की मी इथून मागे जाऊन रस्ता नाही असे बघून परत माघारी आलो आहे . इथे ग्रामस्थ देखील अजिबात जात नाहीत हे त्यांनी मला सांगितले . स्वाभाविक आहे वरील मुलाचे चित्र पहा त्यावरून तुम्हाला कल्पना येईल की इथे तुम्हाला वर किंवा खाली जायची सोयच नाही .केवळ पुढे पुढे जात राहायचे आहे !  कुठल्याही परिस्थितीमध्ये मागे सुद्धा वळता येत नाही . कारण एक पाय ठेवता येईल एवढीच जागा आहे .त्यात देखील पाठीवर मोठा बोजा असेल तर अजून कठीण होते . या भागामध्ये मी अतिशय दुर्मिळ आणि सुंदर अशी खूप शिवलिंगे गोळा केली ! परिक्रमेतून आल्या आल्या ती जो प्रथम भेटेल त्याला प्रथम या न्यायाने वाटून टाकली . पुढे मोठे मोठे खडक पार केल्यावर मैयाचा विस्तीर्ण वाळू किनारा लागला ! हा किनारा इतका भव्य इतका सुंदर आणि इतका लांबलचक होता की विचारूच नका ! माझ्या अंदाजाने नर्मदे किनारी सलग लांबीचा वाळूचा हा सर्वात मोठा पट्टा असावा ! मुळात मध्ये साठलेल्या बेटावरच किती सुंदर वाळू आहे हे देखील आपण उपग्रह नकाशाद्वारे पाहू शकतो . चंद्रकोरीचा किंवा पाण्यात विहार करणाऱ्या नौकेचा आकार असलेली बेटाची रचना आहे .
आश्रमातून निघाल्यावर मी ज्या लाक्षागृहमार्गाचे वर्णन केले तो मार्ग व पुढे काठावरचा कठीण मार्ग दाखविणारा बाण . समोर दिसणारा विस्तीर्ण वाळूचा किनारा . मध्ये तुफान गतीने वाहणारी अतिखोल नर्मदा ! जय हो माईकी ! चिंता काहेकी !
 नौकेच्या आकारातील वाळूचे बेट .डाव्या किनाऱ्यावरचा शेतांच्या खाली आणि मैया च्या शेजारी दिसणारा , गोलाकार अंधारा मार्ग म्हणजे पठाडाचा घातक पथ !
तोच मार्ग थोडा अजून जवळून पहा . कृपया लाल मार्कर कडे दुर्लक्ष करणे . आपला मार्ग जवळपास नर्मदेच्या पातळीवरून आहे .
या वळणानंतर सरळ रेषेत वाळूच वाळू !
या वाळू मार्गाने कोणीही परिक्रमावासी जात नाहीत कारण चालता येणे खूप अवघड असते . वाळूमुळे नर्मदेला येऊन मिळणाऱ्या नद्या देखील तिला किती उशिरा भेटतात ते तुम्हाला या नकाशातून लक्षात येईल . आणि ही नदी पार करणे किती कठीण आहे ते देखील चित्रावरून तुमच्या लक्षात येईल ! एखादे लांबलचक हाडूक ठेवल्याप्रमाणे हा आकार दिसतो .
या वाळूच्या काठावर मी पोहोचलो आणि माझे स्वागत केले ते दोन बंगाली मित्रांनी ! सात्यकी राय आणि सुमन मुजुमदार आधीच या गावांमध्ये पोहोचून नर्मदे काठी येऊन गाणी म्हणत बसले होते ! मला पाहताच दोघांना खूप आनंद झाला . या दोघांना पोहायला येत नव्हते त्यामुळे ते स्नान करताना थोडेसे जपून असायचे . परंतु इथे स्नान करण्यासाठी योग्य जागा आहे असे पाहून मी स्नान करू लागलो . सर्वत्र वाळूच वाळू होती आणि काही ठिकाणी वाळू उपसणाऱ्या नावा जाण्यासाठी खोल खड्डे तयार केले होते . अशा एका खोल खड्ड्यांमध्ये मी स्नान करू लागलो . नर्मदेमध्ये पोहायला परिक्रमा वासींना परवानगी नसते . त्याच्या मागचा भावार्थ असा आहे की पोहोताना आपण नदीला लाथा मारतो त्या तिला लागू नयेत म्हणून परिक्रमावासीने पोहायचे नसते . परंतु मला पाण्यामध्ये कुठलीही हालचाल न करता पद्मासन घालून तासंतास झोपता येते . त्यामुळे त्या प्रकारे मी बऱ्याच ठिकाणी स्नान करत असे .मी पाण्यावर झोपलो आहे हे या दोघांना पटत नव्हते .ते मला म्हणायचे की तुझ्या अंगाखाली वाळू आहे त्याच्यावर तू बूड टेकलेले आहेस ! मी सांगून देखील त्यांचा विश्वास बसत नव्हता .बर अशा पद्धतीने पाण्यावर पडलेले असताना श्वास देखील चालू राहतो आणि बोलता देखील येते त्यामुळे त्यांना अजूनच खोटे वाटत होते. त्यामुळे त्या दोघांचा विचार सोडून मी नर्मदाष्टक सुरू केले .
बाबरी घाटावर अर्थात श्रीरेवापुरम येथे सात्यकी रॉय याने घेतलेला प्रस्तुत लेखकाचा नर्मदा स्नान करतानाचा फोटो . इथे पाणी खोल आहे . 
 नर्मदाष्टक म्हणत असा मी निवांत झोपलेलो असताना माझ्या शेजारून वाळू उपसणाऱ्या लोकांना घेऊन जाणारी एक मोटर बोट गेली . किमान दहा पंधरा फूट खोल पाणी असल्याशिवाय अशा बोटी चालवता येत नाहीत . हे पाहिल्यावर मात्र या दोघांची खात्री पटली की पाणी खोल आहे . वाळू उपसणारे कामगार मात्र नर्मदे हर काही केल्या म्हणत नव्हते . केवळ पोट भरण्यासाठी परप्रांतातून आलेले हे लोक असतात .यांना नर्मदेचे फारसे काही देणे घेणे नसते . या सर्व प्रकाराचा व्हिडिओ सात्यकी रॉय घेत होता व नंतर त्याचे फेसबुक अकाउंट वर त्याने हे सर्व व्हीडीओ टाकले . आपल्या माहितीकरता तो व्हिडिओ सोबत जोडत आहे . 

यानंतर सुमन आणि मी चालत फिरत नावेवर बसून बंगाली गाणी म्हणू लागलो . त्याचे देखील व्हिडिओ सात्यकी ने बनवले . दोघा बंगाली मित्रांच्या आग्रहाखातर त्या व्हिडिओमध्ये मी सामील झालो .नाहीतर अशा पद्धतीचे व्हिडिओ घेण्याची माझी इच्छा नव्हती . परंतु एक अनमोल ठेवा म्हणून हे व्हिडिओ आपण घेऊन ठेऊ असे दोघे म्हणाले . ते व्हिडिओ देखील आपल्या माहिती करता सोबत जोडत आहे .




हे सर्व व्हिडिओ पाहून काही लोकांचा संताप होण्याची शक्यता आहे . कारण त्यांच्या मते परिक्रमेमध्ये नर्मदा मातेला पायाने स्पर्श देखील करायचा नसतो . परंतु या बाबतीत माझे मत थोडेसे वेगळे होते आणि आहे . आपण नर्मदेला माता मानले आहे म्हणजे ती आपली आई आहे . मी तिचे मूल आहे . एकदा ही भूमिका प्रस्थापित झाल्यावर मूल आईच्या मांडीवर खेळते बागडते तसे परिक्रमावासी ने करावयास हरकत नसावी असे माझे स्पष्ट मत आहे . याचा अर्थ अगदी उड्या मारून पोहावे असे नाही . तसे केल्यावर नर्मदा माता शासन करते हा देखील अनुभव प्रस्तुत लेखकाने परिक्रमा संपल्यावर गतवर्षीच घेतलेला आहे .  परंतु जिथे डुबकी मारता येईल अशा साधारण कमरे एवढ्या खोल नर्मदा जला मध्ये आवर्जून जावे आणि स्नान करावे , किंवा वरती व्हिडिओ टाकला आहे त्या पद्धतीने पडून राहणे जमत असेल तर नर्मदा जलावर शांत पडून राहावे . तिचा प्रत्यक्ष स्पर्श खूप काही देऊन जातो हा स्वानुभव आहे . काही साधूंनी देखील याला पुष्टी दिलेली आहे . असो . 
इथे अशा पद्धतीने अनेक गाणी म्हटल्यानंतर आम्हाला भुकेची जाणीव झाली आणि आम्ही गावांमध्ये असलेल्या एका आश्रमाच्या दिशेने चालू लागलो . हे दोघे बंगाली आधीच त्या आश्रमामध्ये उतरलेले होते . कारण आश्रम रस्त्यावरती होता आणि मला मात्र इथे थोडे लांबून जावे लागत होते .
हाच तो बाबरी गावातील आश्रम जिथे आम्ही भजन करत बसलो होतो .
 आश्रमामध्ये गेल्यावर अजून भोजन प्रसाद तयार झाला नाही असे लक्षात आल्यावर तिथे पडलेला ढोलक मी घेतला आणि पुन्हा एकदा आमचे भजन सुरू झाले ! एका भजनातून दुसऱ्या भजनामध्ये जाण्याची सुमनला सवय होती . तसेच बसल्या बसल्या तो काहीतरी शीघ्र काव्य करून जोडून टाकायचा . त्याचे युकेलेलो तंतुवाद्य आणि त्याच्या मुखातील स्वर यांच्या स्वरांचा तसा एकमेकांशी काही नाते संबंध नसायचा , हे संगीतातील जाणकार ताडतीलच .परंतु भावपूर्ण असल्यामुळे लोकांना ते गाणे आवडायचे .काल कोकसर येथे भेटलेला युपीचा भटका साधू मात्र संगीताचा त्रास होऊ लागल्यामुळे उठून निघून गेला !
या सर्व प्रकाराचा व्हिडिओ सात्यकी घेतच होता . तो आपल्यासाठी सोबत जोडत आहे .

भजन झाल्यावर मस्तपैकी पुरी डाळ भात असे भोजन घेतले . आणि आता विश्रांती घेण्यापेक्षा वाळूचा टाकू पार करावा असे ठरवून सर्वांना नर्मदेहर केले . सात्यकी आणि सुमन यांना माझ्यासोबत चालायची इच्छा होती . परंतु मला एकट्याने चालायचे होते त्यामुळे मी एक युक्ती केली . वाळूच्या किनाऱ्यापर्यंत तर आम्ही एकत्र गेलो परंतु नंतर मी कठीण अशा वाळूच्या ढिगाऱ्यांमधून चालायला सुरुवात केली व यांनी सोपा असा डाव्या हाताचा पायवाट मार्ग पकडला . तुलनेने त्यांची गती त्यामुळे आपोआपच माझ्यापेक्षा अधिक असायची . यांचे व्हिडिओ आणि रिल्स बनवणे अखंड सुरू होते . त्यामुळे ते अजून मधून काठाकडे यायचे तेव्हा आमची पुन्हा भेट व्हायची . शेवटी आता काही काळ यांच्यासोबत चालणे क्रमाप्राप्त आहे हे लक्षात आल्यावर मी त्यांची परिक्रमेचे मागची मानसिकता , भूमिका समजून घेत चालायला सुरुवात केली . बंगाली माणसांवर जन्मजात डाव्या विचारांचा प्रभाव असतोच असतो हे अगदी सहजपणे पाहायला मिळते . सलग पस्तीस वर्षे एकाच विचारसरणीच्या डाव्या मुख्यमंत्र्यांनी राज्य केल्यामुळे तेथील अनेक पिढ्या डाव्या झालेल्या आहेत . त्याचे प्रतिबिंब या दोघांशी बोलताना लगेच उमटायचे . परंतु त्यांना काही मनापासून पडलेल्य शंका होत्या . प्रश्न होते . त्याची उत्तरे आपल्याला बंगालमध्ये मिळणार नाहीत हे माहीत असल्यामुळे ते नर्मदे काठी आले होते . त्यांची हीच प्रामाणिकता मला भावली होती . हा वाळूचा किनारा संपता संपत नाही . आणि तो आयुष्यात कधी संपूच नये असे वाटावे इतका तो सुंदर आहे ! पांढरी शुभ्र वाळू आणि उजव्या हाताला वाहणारी शांत धांत धीरोदात्त नर्मदा मैया ! सर्वत्र पाण पक्षी ! इथे मला काही कोल्ह्यानी देखील दर्शन दिले . तहानलेला प्रत्येक जीव पाणी पिण्यासाठी नर्मदे कडेच येतो . आपल्या हृन्मंदिरातली जन्मानुजन्मीची तृषा क्षमविण्याचे सामर्थ्य असलेली ही रेवामाई आहे !
दुसरा बंगाली भेटल्यामुळे सात्यकी ने आता अवधूत चा गट सोडून दिला होता ! दोघांची चांगली मैत्री जमली होती . दोघे एकाच जिल्ह्यातील होते हा योगायोग . त्यांच्या दुर्दैवाने ते आपापसामध्ये काय बोलत आहेत ते सर्व मला कळायचे ! परंतु माझ्या दृष्टीने ते इथे आले हेच अधिक महत्त्वाचे होते . एकदा दरबारामध्ये हजेरी लावल्यावर पुढे त्यांचे काय करायचे हे ठरवायला माता राणी तिथे दिवस रात्र वाहतेच आहे ! 
दोघांनी या भागामध्ये भरपूर फोटोसेशन केले . त्यांच्या फेसबुक वर पुढे हे फोटो सापडले .ते आपल्या माहितीकरता सोबत जोडत आहे त्यामुळे आपल्याला हा परिसर कसा होता ते लक्षात येईल . यातील बहुतांश फोटो / व्हीडीओ काढताना मी त्यांच्या आजूबाजूला किंवा सोबतच होतो . काही फोटो तर त्यांचा कॅमेरा घेऊन मी देखील काढलेले आहेत .
सुमन मुजुमदार आणि प्रस्तुत लेखक बाबरी घाटावर
 सुमन मुजुमदार
 परिक्रमेमध्ये पिण्याचे पाणी फक्त नर्मदेचेच वापरावे असा संकेत आहे . परंतु वाळूचा किनारा असेल आणि तो उथळ असेल तर तिथे मोठ्या प्रमाणात शेवाळे आणि माती असल्यास गढूळपणा असतो . अशावेळी नावाडी तुम्हाला विचारत असतात की तुम्हाला कमंडलू भरून आणून देऊ का . मला अनेक वेळा अशा पद्धतीने कमंडल भरून केवट लोकांनी आणून दिला . मी चालताना पाहिले की सुमन मुजुमदारला देखील अशा पद्धतीने एक नावाडी कमंडलू भरून आणून देत आहे आणि सात्यकी त्याचा व्हिडिओ घेत होता . वाचकांकरता तो व्हिडिओ . नर्मदे वरचे वातावरण किती सुंदर असते ते तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्यावर लक्षात येईल .



असो . हे सर्व प्रकार पाहिल्यावर आपण एकटे चालत आहोत ते किती उत्तम आहे हे लक्षात आले आणि पुन्हा एकदा काठाकाठाने एकटा चालू लागलो . अतिशय तापलेली वाळू जरी असली तरी जिथे नर्मदा आणि वाळू एकत्र येतात तिथे थोडीशी थंड वाळू सापडते . हा पट्टा पकडून चालत राहायचे . याच्यामध्ये मात्र कधीतरी अचानक भस् करून पाय खड्ड्यात जातो . तिथे वाळूच्या खालून नर्मदेला मिळणारे पाण्याचे प्रवाह असतात . असे प्रवाह अक्षरशः शेकड्याने आहेत . गुगल नकाशा मध्ये आपल्याला असे प्रवाह दिसतात . 
 डेमावर किंवा डिमावर गावामध्ये नर्मदेला घेऊन मिळणारे असंख्य भूमीगत जल प्रवाह . वाळूतून चालताना हे दिसत नाहीत परंतु त्यावर पाय पडला की पाय गुडघ्यापर्यंत आत जातो ! त्यामुळे काठी खोचत खोचतच काठाने चालावे लागते .
अशा असंख्य नद्या आणि ओढे ,नाले नर्मदेला येऊन मिळत असतात . त्यांना घाबरून पार करण्यासारखा रस्ता शोधायला डावीकडे वळले तर तुमची पायपीट वाढते . त्यापेक्षा किती का खोल असेनात , त्याच्यामध्ये उतरून कमरे एवढ्या किंवा छाती एवढ्या पाण्यातून चालत हा जलप्रवाह पार करणे अधिक सोपे आणि हिताचे असते .मी वाटत आलेला जवळपास प्रत्येक जलप्रवाह असाच त्यात उतरून पार केला . आणि तिथले बॅक्टेरिया देखील माझ्या गट बॅग मध्ये अर्थात पोटाच्या पिशवीत भरून घेतले ! म्हणजे त्या प्रत्येक जलस्त्रोतांचे पाणी मी प्यायलो !
अशीच एक फार मोठी नदी मध्ये आडवी आली . त्या नदीने नर्मदेच्या काठी इतका मोठा दलदलीचा प्रदेश निर्माण केला आहे की पार करताना अक्षरशः वाट लागते ! परंतु मी ठरवले की आपल्याला कितीही भिजले तरी चालेल परंतु नदी पाण्यातूनच पार करायची ! आणि त्याप्रमाणे ती पार केली सुद्धा ! 
 हीच ती नदी जिने पार करता करता नाकी नऊ आणले
आता नर्मदा अचानक उजवीकडे वळत होती . समोर असलेली चांदगड कुटी आता दिसू लागली . परंतु काठाने चालता चालता वाळूच्या एका टोकावर आलो . आणि मग लक्षात आले की इथे अजून एक नदी नर्मदेला येऊन मिळते आहे ! 
हेच ते टोक आणि समोर दिसणारी चांदला कुटी
सूर्यास्त होत होता आणि समोर चांदगडच्या पायऱ्या दिसू लागल्या होत्या . परंतु आता अजून एक नदी आडवी आली त्यामुळे प्रश्न निर्माण झाला . ही नदी बऱ्यापैकी गतिमान आणि खोल होती . शिवाय इंद्रावती नदीचा ताजा अनुभव गाठीशी असल्यामुळे हिच्या मध्ये उतरायची मला इच्छा नव्हती .
डावीकडे वळून काठाने चालायला सुरुवात केली
ह्या नदीच्या काठाने मी ओलांडण्या योग्य जागा शोधत मागे मागे चालू लागलो . सूर्य वेगाने मावळतीला निघाला होता .
परंतु कितीही अंतर चालले तरी या नदीतले पाणी काही संपे ना ! नदीमध्ये चिखल देखील खूप होता . शेवटी नर्मदेचे नाव घेतले आणि मागे सरकून वेगाने धावत ही नदी पार केली . वाळू मध्ये पाय रुतणारच नाहीत अशा गतीने पाय उचलले ! पुरता भिजलो परंतु नदी पार झाली . पुन्हा उलटे चालत घाट गाठला

चांदगड कुटी चा घाट अरुंद व अतिशय खडा चढ असलेला असून चढताना दमविणारा आहे . समोर मी पोहोचलो होतो ते वाळूचे टोक दिसते आहे .
घाट सुंदर रंगवलेला असून वरती आल्या आल्या आश्रमाचे दर्शन होते . 
मागे वळून पाहिल्यावर केवढे मोठे अंतर वाळूतून चालत आलो ते स्पष्ट दिसते .
जिथवर नजर जाईल तिथवर वाळूच वाळू ! डोळ्याचे पारणे फेडणारे असे हे दृश्य आहे . हाच किनारा दगडमातीचा असता तर निम्म्याहून निम्म्या वेळामध्ये पार झाला असता .
हा थकविणारा जिना एका दमात चढून पळत वरती पोहोचलो
 .कितीही चढले तरी हा जिना संपतच नाही !
गेल्या गेल्या प्रशस्त अंगण आणि भव्य मंदिर दिसते . 
प्रांगणाच्या समोरच साधू कुटी आणि परिक्रमावासींची ही निवास व्यवस्था केलेली आहे .
चित्रामध्ये एक मनुष्य चालताना दिसतो आहे साधारण त्या जागी काँक्रीटच्या कोब्यावर नर्मदा मातेची पावले उठलेली आहेत असे मला तिथल्या एका पंडिताने दाखविले . एका सहा वर्षाच्या मुलीची दोनच पावले उठलेली असून पुढची मागची पावले दिसत नाहीत ! आश्चर्यच आहे ! त्या मुलीने उडी मारली असे समजावे , तर आजूबाजूला सर्वत्र भरपूर सिमेंट आहे .त्यात कुठेतरी तिची पावले उठली असती .तशी ती उठलेली नाहीत त्यामुळे ही पावले तिथे असणे आश्चर्यकारक आहे .
आश्रमातील या मंदिरामध्ये अनेक प्रकारची वाद्ये ठेवलेली होती .
माझ्यापाठोपाठ दोघे बंगाली देखील तिथे पोहोचले . त्यामुळे इथे बसून आम्ही पुन्हा भजन केले .रात्री उशिरापर्यंत आमचे भजन सुरू होते .
या आश्रमामध्ये मी प्रवेश केल्या केल्या एक पंडित माझ्याकडे आला आणि म्हणाला आप अगर असली परिक्रमा वासी है तो मेरे एक प्रश्न का उत्तर दीजिए . आता हे काय नवीन प्रकरण म्हणून मी बुचकळ्यात पडलो . तो मला म्हणाला , "बताईये सबसे कम समय में नर्मदा मैया की परिक्रमा कैसे की जाती है ! " मी विचारात पडलो . क्षणाचा ही विलंब न लावता पंडिताने माझ्या भोवती तीन प्रदक्षिणा घातल्या आणि म्हणाला , " हो गई मेरी परिक्रमा ! नर्मदा परिक्रमा वासी के साथ साक्षात नर्मदा मैया हमेशा वास करती है ! इसीलिए जब भी मुझे कोई परिक्रमा वासी मिलता है तो मै उसकी परिक्रमा कर लेता हु । इस प्रकार मेरी हजारो नर्मदा परिक्रमा हो चुकी है । " त्याच्या या श्रद्धायुक्त बुद्धी चातुर्या चे मला कौतुक वाटले . यावरून मला गणपती आणि कार्तिक स्वामींची गोष्ट आठवली . जेव्हा महादेवांनी संपूर्ण ब्रम्हांडाची परिक्रमा करून यायला सांगितले तेव्हा कार्तिक स्वामी खरोखरच संपूर्ण जगाची परिक्रमा करून आले . आणि गणपतीनी मात्र आई-वडिलांची परिक्रमा केली . कारण आई-वडील हेच साक्षात परब्रह्म आहेत . असा जरी या कथेचा भावार्थ असला तरी त्या घटनेचे आपल्यावर फार मोठे उपकार आहेत . कसे ते सांगतो . भगवान कार्तिकेय स्वामी जेव्हा विश्व परिक्रमा करून आले तेव्हा त्यांनी या परिक्रमेवर आधारित एक अनुभव ग्रंथ लिहिला . ज्याचे नाव स्कंदपुराण . या स्कंद पुराणातील रेवा खंड नावाचे प्रचंड मोठे प्रकरण म्हणजेच कार्तिक स्वामींनी नर्मदा खंडामध्ये विहार करून लिहिलेली , त्यांच्या प्रवासाची डायरी आहे , असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही . यालाच लोक नर्मदा पुराण असे सुद्धा म्हणतात . असो .
मी आसन लावले तिथे एका कोपऱ्यामध्ये आधीच एक तरुण जोडपे उतरलेले होते .दोघे मराठीमध्ये बोलत होते . यातला तरुण अखंड बिड्या पीत होता . त्याला दिवसाला दीडशे बिड्या लागायच्या . आणि या आश्रमातर्फे त्याला त्या दिल्या जात होत्या . मला एकंदर हा प्रकार काही आवडला नाही . या आश्रमामध्ये रामदास नावाचे एक त्यागी साधू राहत होते . इथे गावकऱ्यांनी कब्जा केलेला होता तो मोकळा करून त्यांनी मठ ताब्यात घेतला होता . काही ग्रामस्थ बाहेर मला भेटले होते त्यांचे साधू बद्दल मत फारसे चांगले नव्हते . परंतु मागे एकदा मी तुम्हाला सांगितले त्याप्रमाणे अशा प्रसंगांमध्ये गावकरी अधिक स्वार्थी असतात असे लक्षात आलेले आहे . साधू स्वार्थी असूच शकत नाही अशी त्याची जडणघडण झालेली असते . साधूला जितके भविष्याचे ज्ञान असते तितके ग्रामस्थांना नसते .त्यामुळे असे काही घडल्यावर ग्रामस्थांनी साधुला नावे ठेवणे स्वाभाविक आहे . साधू शक्यतो कोणाची फिकीर करत नाहीत . असो तर हे साधु महाराज अखंड धूम्रपान करत होते . त्यांना प्रचंड दम्याचा त्रास होतो आहे हे मला दिसत होते . त्यांना अखंड ढास लागलेली होती . तरीदेखील ते चिलीम काही सोडत नव्हते . या विषयावर त्यांच्याशी बोलावे असे मला वाटले तेव्हा त्यांनी मला त्यांची कर्मकहाणी सांगितली . त्यांचा दम्याचा विकार इतका बळावला होता की नर्मदा मातेचे दर्शन घेऊन तो खडा जिना देखील वर चढण्याची क्षमता त्यांच्यात राहिलेली नव्हती . यावर काही प्राणायाम माहिती असेल तर मला सांगा असे ते म्हणाले . मी त्यांना काही प्राणायाम शिकवले . इतक्यात सुमन तिथे आला . "ये बंगाल के बहुत बडे महाराज है। " मी चेष्टेमध्ये त्याची ओळख करून दिली !त्याचा एकंदरीत अवतार पाहून साधू महाराजांनी त्यांच्या आसनावर त्याला बसविले ! मी देखील मग गमतीने सांगू लागलो की हे फार मोठे तपस्वी आहेत ! बंगाल चे असल्यामुळे यांना बऱ्याच विद्या येतात वगैरे ! झाले ! मला बंगाली जादू शिकवा म्हणून तिथले काही लोक त्याच्या मागे लागले ! मी बंगालीमध्ये त्याला सांगितले की कोणालाही नाही म्हणू नकोस आणि मजा बघ ! खरोखरच आश्रमातील सर्वच लोक शेपटासारखे त्याच्या मागे फिरू लागले ! पुढे  काही ठिकाणी सुमन मला भेटला की हा प्रसंग आठवून आम्ही खूप वेळ हसायचो ! सुमन बाबा झाला होता आणि सात्यकी त्याचा चेला ! इकडे तरुण जोडप्याचे अखंड भांडण सुरू होते . त्याच्या अतिरिक्त धूम्रपानाच्या सवयीमुळे मृत्यू त्या युवकाला लवकर गाठणार हे स्पष्ट दिसत होते . त्याचा श्वास सतत फुललेला असायचा . मी त्यांना काही चांगल्या गोष्टी सांगायचा प्रयत्न केला . पण त्यांना ऐकण्यात रसच नाही असे पाहिल्यावर मौन राहिलो . संध्याकाळी स्नान आरती आटोपून सार्वजनिक आरती केली . भरपूर भोजन केल्यावर चिकार भजनही केले ! इथे आल्यापासून ते झोपेपर्यंत दोघे बंगाली ही चंद्र देवाची तपोभूमी आहे ही आहे या मुद्द्यावरून खूप थट्टा मस्करी करत होते . त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला . परंतु ऐकत नाहीत पाहिल्यावर अमावस्येचा चंद्र झालो . रात्री उशिरापर्यंत तो तरुण बिड्या फुकत होता . त्याच्यामुळे ती सगळी खोली धुराने भरलेली होती . त्याला इथे ठेवून घेण्यामध्ये कोणाचा काय स्वार्थ असू शकतो ? नुसत्या कल्पनेने देखील अंगावर काटा येत होता . पहाटे मी निघताना त्याची पत्नी बाहेर नळावर भेटली . मला जी शंका होती ती योग्य असू शकते असे तिने मला अप्रत्यक्षपणे सूचित केले . अशा परिस्थितीमध्ये एखाद्या पराधीन अबला स्त्रीने काय करावे ? साराच विषय अतिशय कठीण आणि नाजूक होता . परंतु तिने परिस्थितीशी जुळवून घेतले होते . आणि त्यात ती सुखी होती . ज्याचा त्याचा प्रश्न . त्या मातारामच्या पाया पडून आश्रमाला नर्मदे हर केले . नर्मदेला सर्वांच्या इच्छा आकांक्षांची काळजी आहे . नर्मदा कळणे खरेच कठीण आहे . कधी ती धुवाधार च्या खडकासारखी कठीण आहे . कधी ती इंद्रावतीच्या गाळासारखी मऊ आहे . कधी ती डिमावरच्या वाळू सारखी सटकून जाते . तर कधी ती जलहरी घाटासारखी खोल आहे . कधी ती सहस्रधारेसारखी अल्लड आहे . कधी ती घुघुआ घाटासारखी अवखळ आहे . कधी ती कपिलधारेसारखी बिनधास्त झेपावते . तर कधी ती नर्मदापुरमसारखी शांत धीर गंभीर भासते . कधी ती रत्नासागरासारखी विस्तारलेली आहे . तर कधी अमरकंटक सारखी एका फुटात मावली आहे . अशी ही नर्मदा आहे . हर हर नर्मदे ! नर्मदे हर हर !



लेखांक छपन्न समाप्त ( क्रमशः )

मागील लेखांक

पुढील लेखांक





टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

जे आवडते सर्वांना ...

अनुक्रमणिका

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

लेखांक १ : नर्मदे हर !

लेखांक २ : भोपाळ जवळच्या जंगलातील अपघात

लेखांक ४ : झुठा कही का ! सबकुछ तो लाए हो !

लेखांक ३ : चोराची धन

लेखांक ५ : ग्वारीघाट जबलपुर मध्यप्रदेश

लेखांक ८३ : महाराष्ट्रात प्रवेश आणि भाबरीचे भेदक भिल्ल-महात्मा फोदला गारद्या पावरा

लेखांक ७४ : लेपा बांध , वेदा संगम , कठोरा अन् मांडव्य गुंफा

लेखांक ९० : गुजरात मधील कणजी चे सान्सुभाई तडवी आणि अरण्यव्याप्त माथासर