लेखांक ५८ : गंजाल-गोमती-नर्मदा त्रिवेणी संगमावरील अत्युत्कृष्ट स्थापत्यशैलीचा गंगेसरी मठ

उमरिया गाव पार केले आणि इथून पुढे एक सलग शेतीचा पट्टा नर्मदा किनारी लागला . उजवीकडे शांतपणे वाहणारी नर्मदा होती . तिच्या समपातळीवर सलग शेती केली होती . हा पट्टा साधारण दोनशे फूट रुंदीचा असावा . त्यानंतर डाव्या हाताला वीस ते तीस फुटाचा मातीचा उंचवटा होता . आणि त्याच्यावर पुन्हा शेती चालू होत होती . यातील मी खालच्या शेतातून चालत होतो . प्रत्येक शेतामध्ये एक छोटीशी पायवाट असायची . खरे तर ही जमीन नदीपात्रातलीच असते . परंतु धरणातील पाण्याची पातळी कमी झाली की ही जमीन मोकळी पडून राहते .म्हणून वरती ज्यांची शेती आहे ते लोक त्यांच्या शेता समोर येणाऱ्या खालील भागात शेती करतात . कागदोपत्री बघायला गेले तर या जमिनीची मालकी कोणाकडेच नसते ,कारण हे प्रत्यक्ष नदीपात्रातले क्षेत्र आहे . परंतु त्यातून वादावादी भांडण नकोत म्हणून प्रत्येक ग्रामपंचायतीने असा अलिखित ठराव पास केलेला आहे की ज्याचे वर शेत आहे त्यानेच खालचे नदीपात्रातले शेत कसायचे . तो थोडेफार पैसे घेऊन दुसऱ्या कोणाला देखील हे शेत कसायला देतो असे सुद्धा पाहायला मिळते . शेतामध्ये हिरवीगार पिके होती त्यामुळे चालताना पायाला खूप आनंद वाटत होता . हिरव्यागार पिकातून वाहणारा वारा पायांना गारवा देतो . चालून पाय कायम गरम होत असतात . अशा पिकावर पडलेले दवाबिंदू मग पायातील उष्णता कमी करायला मदत करतात . या पातळीवरून चालण्याचा फायदा असा की उजवीकडे नर्मदा मैया सतत तुम्हाला दिसत राहते . असे बरेच अंतर चाललो आणि पापन नावाच्या गावाच्या हद्दीत पोहोचलो . या गावाचे नाव प्रेम नगर असे सुद्धा आहे . मी आज पर्यंत मोहन साधूने सांगितल्याप्रमाणे आणि स्वतःचा विवेक वापरून देखील अशी काळजी घेत आलो होतो की आपल्या पायाखाली शेतकऱ्याचे एकही रोप आले नाही पाहिजे . भले आपल्याला कितीही उशीर होऊ देत किंवा कितीही लांबचा वळसा पडू देत . त्याप्रमाणे काळजी घेत मी चालत होतो . पुढे गंजाल गोमती आणि नर्मदा या तिघींचा अतिशय विहंगम असा त्रिवेणी संगम आहे . आता लवकरच मी त्या संगमापाशी पोहोचणार होतो . सकाळपासून भरपूर चालणे झाले होते . या गावातील मशिदीतून दिली जाणारी बांग ऐकू आली . नर्मदेच्या पवित्र तटावर तो आवाज ऐकून थोडासा त्रास होत होता . कारण बांग देणारा मुल्ला ओरडून सांगत होता की अल्ला शिवाय दुसरा कुठला देव नाही . माझ्यासमोर तीन तीन जलदेवता साक्षात प्रकट असताना हे वाक्य पचणारे नव्हतेच ! परंतु मी मोठ्या आवाजात नर्मदेचे नामस्मरण करत चालत राहिलो . माझ्या मनात विचार आले कधीकाळी सिंधू नदीच्या काठावर देखील असेच आश्रम असतील ! असेच साधू , संत ,बैरागी , वितरागी ,तडी , तापसी , संन्यासी , साधक चालत असतील . तिथे देखील आश्रमामधून मंदिरांमधून मोठ्या प्रमाणात अन्नदान चालत असेल ! सहिष्णुतेचा भाव अंतःकरणात ठेवून त्या लोकांनी अरब देशांकडून आलेल्या काही टोळ्यांना आश्रय दिला .  आणि बघता बघता स्वतःचा भूभाग गमावून बसले . आज सिंधू नदीच्या काठावर कुठेही आरतीचा आवाज येत नाही . किंवा सिंधू नदीमध्ये कुठेही दिवा सोडला जात नाही . करोडो बकऱ्यांचे रक्त मात्र दर बकरी ईदला गटारांच्या माध्यमातून सिंधू नदीला प्राप्त होते . ती पवित्र नदी कायमची बाटली . तिचा अपराध एकच होता . ती स्वधर्माप्रती अत्यंत निष्क्रिय अशा हिंदू समाजाला पूज्य होती . जो समाज आपल्याला परम पवित्र असलेल्या मातेचे , देवतेचे , देवस्थानाचे , नदीचे , भूभागाचे , प्रांताचे ,व्यक्तीचे , आदर्शाचे ,संस्कृतीचे रक्षण करू शकत नाही तो समाज हळूहळू अस्तंगत होतो हा जगाचा इतिहास आहे . सहिष्णुता कोणाला दाखवावी , आणि कोणी दाखवावी हा विवेकाचा विषय आहे . अहिंसा हे अष्टांग योगातील एक तत्व असले तरी देखील सीमेवर उभा असलेला शस्त्रधारी सैनिक जर त्या तत्त्वाचे पालन करू लागला तर तो त्याच्या क्षात्र धर्माचा धर्म द्रोही नाही का ठरणार ? हातामध्ये शल्य कर्माचे हत्यार घेतलेला शल्य विशारद डॉक्टर जर म्हणाला की मी माझ्या हाताने रक्तपात करणार नाही तर रुग्णाचा जीव वाचवू शकेल काय ? तात्पर्य पुस्तकातली नितीतत्वे प्रत्यक्ष आचरणात आणताना त्याला विवेकाची जोड असावीच लागते . हे सर्व चिंतन करत चालताना माझे पायाखाली येणाऱ्या प्रत्येक रोपाकडे लक्ष होते .
पुढे एक असे शेत लागले की ज्याच्यामध्ये प्रचंड चिखल माजवला होता . पाण्याच्या मोटर दुथडी भरून नर्मदेचे पाणी उचलत होत्या आणि शेत भरून ते पाणी पुन्हा नर्मदेमध्ये चालले होते . इथे पायाखाली रस्ता कुठे आहे ते शोधत चालताना तारांबळ होत होती . इतक्यात माझ्या अंगावर पाणी पडले म्हणून मी वर पाहिले . वरून एक शेतकरी माझ्या अंगावर ओरडत होता . छातीपर्यंत वाढलेली दाढी ,मिशांचा पत्ता नाही आणि डोक्यावर गोल जाळीदार टोपी असा त्याचा वेश होता . त्याने खूप गलिच्छ आणि घाणेरड्या शिव्या देऊन माझ्या नावाने ओरडा सुरू केला . मला म्हणाला ताबडतोब उलटा फिर आणि इथून निघून जा ! ही माझी जमीन आहे ! मी अतिशय नम्रतेने हात जोडून त्याला म्हणालो की बाबा रे तुझ्या शेतातील एकाही रोपाला धक्का लागणार नाही याची काळजी घेत घेतच मी चालत आहे . त्यामुळे चिंता करू नकोस . त्याने वरून पुन्हा माझ्या दिशेने काही मातीची ढेकळे फेकली . आणि पुन्हा खूप घाणेरड्या शिव्या देऊ लागला . मी तिथून वरती जाण्यासाठी एखादा मार्ग आहे का ते पाहत होतो . परंतु तसा काही मार्ग दिसला नाही . मी त्याला खालून ओरडून सांगितले की बाबा रे मी नर्मदा परिक्रमा वासी आहे . तुझ्या शेतामध्ये मला शून्य रस आहे . मी माझ्या माझ्या मार्गाने चाललो आहे . मला शांतपणे जाऊ दे .मी नर्मदेचे नाव काढल्याबरोबर तो अजूनच चवताळला . आणि अतिशय अश्लाघ्य भाषेमध्ये नर्मदा माते विषयी बोलू लागला . क्षमा करावी परंतु त्याचे शब्द मी इथे उधृत ही करू शकत नाही इतके ते विकृत होते . तो जोपर्यंत मला बोलत होता तोपर्यंत मी ऐकून घेत होतो . परंतु आता त्याने माझ्या आराध्य दैवताचा अपमान केला होता त्यामुळे त्याला योग्य ती शिक्षा मिळणे आणि तत्काळ मिळणे आवश्यक होते . तो अजूनही मातीची ढेकळे माझ्या अंगावर फेकतच होता .  दुर्दैवाने माझ्या  जवळपास त्याला फेकून मारता येईल असे काहीही मला सापडेना . सर्वत्र चिखलच चिखल माजवून ठेवला होता . मी त्याला म्हणालो की अरे जिच्या पात्रामध्ये शेती करून पोट भरतोस तिलाच असे बोलतोस ? कुठे फेडशील ही पापे ?ताबडतोब तिची माफी माग ! परंतु तो मनुष्य अजूनच घाण घाण बोलायला लागला . मला म्हणाला तुला मी आता सोडणार नाही . तुला माझ्या शेतातच संपवून टाकतो . बघू तुझी कुठली आई तुला वाचवायला येते . आता मात्र माझ्या संयमाचा बांध संपला . मी नर्मदा मातेला दोन्ही हात जोडून नमस्कार केला . आणि सांगितले आता याच्यापुढे जे काही मी करेन त्याची जबाबदारी तुझ्याकडे लागली . त्याला आता मी जबाबदार नाही . तू जशी प्रेरणा देशील तसे आता होईल . आणि मी त्याच्या शेताच्या मधोमध येऊन उभा राहिलो . माझा दंड आडवा धरला आणि त्या नराधमाला ओरडून सांगितले . तुला शेवटची संधी आहे .तू नर्मदा मातेची माफी मागतोस की नाही तेवढे सांग . तो मग्रूरीने म्हणाला नाही मागणार माफी .  काय करशील ? माझ्यासमोर त्याचे काढणीला आलेले सुंदर असे गहू होते . गव्हाच्या लोंब्या अजून हिरव्या होत्या . अजून दोनच आठवड्यामध्ये नर्मदेचे पाणी पिऊन टपोरे झालेले त्याचे दाणे वाळायला सुरुवात होणार होती आणि मग त्या शेतकऱ्याला भरघोस उत्पन्न मिळणार होते . पुन्हा एकदा माझे हिंदू मन कचरले . मी त्याला म्हणालो अरे वेड्या माफी मागून मोकळा हो ! कशाला  स्वतःच्या डोक्याचा ताप वाढवतो आहेस ! त्याने पुन्हा अर्वाच्य भाषेमध्ये नर्मदा मातेला शिवीगाळ चालू केली . माझ्या उपास्य देवतेचा अपमान करून त्याला मूर्ती भंजनाचा आनंद मिळत होता . त्याने माझ्या श्रद्धास्थानावर विनाकारण आघात केलेला असल्यामुळे आता त्याला उत्तर देणे मला भाग होते . तमिळनाडूमध्ये वर्मक्कलै नावाची एक युद्ध कला आहे . हिला भारतातील सर्वात प्राचीन युद्ध कला मानतात आणि ती अन्य सर्व मार्शल आर्टस् ची जननी आहे . अगदी केरळचे कलरी पयट्टु देखील याच कलेतून निर्माण झाले आहे . याच्यातील एक उपप्रकार आहे सिलंबम् . यामध्ये दंड फिरविण्याचा विच नावाचा एक प्रकार आहे . याप्रकारे दंड फिरवताना साधारण तुमचे दोन्ही हात पसरल्यावर होणारी लांबी अधिक दोन दंड इतक्या व्यासाचे वर्तुळ तयार होते . म्हणजे सुमारे पंधरा फूट ! एवढ्या वर्तुळात कोणीही तुमच्या जवळ येऊ शकत नाही . आणि एवढ्या वर्तुळातील एकही गोष्ट तुमच्या तावडीतून सुटत नाही .
सिलंबम मधील विच हा प्रकार असा असतो . यामध्ये दंडाची गती इतकी अधिक असते की व्हिडिओच्या स्क्रीन शॉट मध्ये तो सापडत नाही . इतक्या वेगाने आघात झाल्यावर मध्ये येणारी प्रत्येक वनस्पती मानच टाकते . 

 त्याच्या दुर्दैवाने मी ही कला चांगली अवगत केलेली होती . अगदी तमिळनाडूमध्ये राहून "विच "  मी शिकलो होतो .
क्षणाचाही विचार न करता मी वेगाने माझा दंड फिरवायला सुरुवात केली आणि माझ्या आजूबाजूच्या पंधरा फूट परिसरातील गव्हाच्या हिरव्यागार लोंब्या कचाकच तुटून पडू लागल्या ! त्या माणसाने वरून आकांत चालू केला ! थांब !थांब ! नाहीतर तुझा जीव घेईन !अमुक करीन ! तमुक करीन ! परंतु मी काही त्याच्या फुसक्या धमक्यांना घाबरलो नाही आणि माझे काम चालूच ठेवले . काठी फिरवत फिरवत मी पुढे निघालो . आणि एखादा जेसीबी जशी जमीन साफ करतो तसे त्याचे उभे पीक आडवे होऊ लागले . मध्येच थांबून मी वरती बघायचो आणि ओरडायचो .बोल नर्मदे हर ! बोल नर्मदा माता की जय ! तो अजून शिव्या द्यायचा . मग मी पुन्हा माझा कार्यक्रम चालू करायचो . असे साधारण शंभर फूट चालू असेल . या पूर्ण पट्ट्यातील सगळे पीक मी आडवे झोपवले . वरती त्याने अक्षरशः अकांड तांडव चालवला . त्याला वरून खाली देखील येता येत नव्हते आणि काहीच करता येत नव्हते . खूप घाण घाण शिव्या तो देत होता . मी त्याला पुन्हा ओरडून सांगितले . जोपर्यंत तू नर्मदे हर म्हणत नाहीस आणि नर्मदा माता की जय म्हणत नाहीस तोपर्यंत तुझ्या पिकाचा एकही दाणा तुला मिळणार नाही याची खात्री मी देतो . तुझे सगळे पीक मी आज झोपवणार . तशी पण ही तुझ्या बापाची जागा नाही .ही माझ्या आईची जागा आहे . तो वरून गयावया करायला लागला . मी पुन्हा काठी फिरवयला चालू केली आणि म्हणालो बोल नर्मदे हर . अखेरीस आपले अतोनात नुकसान होत आहे आणि नर्मदे हर म्हटल्याशिवाय हा बाबा काही थांबत नाही हे पाहून वरून तो ओरडला . ठीक है । ठीक है । नर्मदे हर । मी म्हणालो सिर्फ नर्मदे हर नही चलेगा । नर्मदा मैया की जय बोल ! दोन्ही हात वर करून तो वरून ओरडला नर्मदा मैया की जय । 
थोडक्यात या जगामध्ये दुसरा देखील देव आहे हे त्याच्याकडून मान्य करून घेतले आणि मग मात्र मी माझा मार्ग धरून पुढे निघालो . मागे वळून माझ्यामुळे तुटलेल्या वनस्पतींची मी मनोमन क्षमा मागितली . परंतु माझ्यावर जळफळाट झालेला तो मनुष्य वरूनच माझ्या मागे मागे येतो आहे हे माझ्या लक्षात आले . आता पुढे जिथे कुठे हे दोन्ही रस्ते एकत्र येणार तिथे आमची चांगलीच जुंपणार होती . चालता चालता मी विचार करू लागलो की हे सर्व मी काय केले ? परंतु असे काही करणे माझ्या मूळ स्वभावातच नाही . त्यामुळे मला खात्री होती की हे नर्मदेने माझ्या हातून करून घेतले आहे . वेगाने चालत मी त्रिवेणी संगमाशी आलो . तोपर्यंत तो शेतकरी त्याच्या दोन तरुण मुलांना घेऊन खाली उतरताना मला दिसला . समोरची नदी खोल होती इतक्यात एक नाव माझ्या शेजारी येऊन थांबली आणि नावाडी मला म्हणाला , " जल्दी नैया मे कुद जाओ बाबा ! " जणू काही ती नाव माझ्यासाठीच तिथे येऊन थांबली होती अशा गतीने पुढे आम्ही मार्गस्थ झालो . माझी चालण्याची गती एक क्षणासाठी सुद्धा खंडित झाली नाही . नावेतून जाताना नावाडी मला सांगू लागला की तुमचा सर्व प्रकार मी पाण्यातून पाहत होतो . तुम्ही असे पहिले परक्रमावासी आहात की जे ह्या नालायक माणसाच्या शेतातून पार झालात . हा प्रत्येकाला त्याच्या शेतातून उलट परत पाठवतो .  वरून गोफणीने दगड फेकून मारतो . पाणी फेकून मारतो . मासे धरणाऱ्या लोकांना सुद्धा तो त्याच्या शेताला पाय लावू देत नाही . आता तुम्ही पटकन समोरची नदी चालत पार करा आणि गंगेसरी मठात जाऊन थांबा . तिथे याचे काही चालणार नाही . मी मनोमन म्हणालो याचे तसेही कुठेही चालणार नाही !  दुसरी नदी पार करत असताना मागून हे तिघे माझ्या नावाने खडे फोडत होते . मी मागे वळून पाहिले दोन्ही हात वर करून त्या तिघांना म्हणालो नर्मदे हर ! आज नर्मदेने त्याच्या अंगातील मस्तीचे हरण केले होते ! बहुतेक आयुष्यात पहिल्यांदाच तो नर्मदे हर आणि नर्मदा मैया की जय म्हणाला असावा . तो जोपर्यंत हे म्हणाला नसता तोपर्यंत त्याचे उभे पीक झोपवायचे ; मग माझे काहीही होऊ दे ,असे मी ठरवलेच होते . दोन्ही नद्यांचे पाणी प्यायला विसरलो नाही . गंजाल नदीचे पाणी खोल असले तरी अतिशय स्वच्छ असल्यामुळे तळाशी उगवलेली झाडे शेवाळे सर्व खूप सुंदर दिसत होते . गोमती नदी उथळ व गरम पाण्याची होती . वरती एका टेकाडावर आश्रम होतात तिथून एका भगवी लुंगी धारण केलेल्या तरुण साधूने मला आवाज दिला . धावतच मी तो आश्रम गाठला . आणि समोर जे काही पाहिले त्यामुळे थोड्या वेळापूर्वी घडलेला अप्रीय प्रसंग मी क्षणात विसरून गेलो ! 
नागा साधूंसाठी परम आराध्य दैवत असलेल्या दत्तात्रेय प्रभूंचे मंदिर असलेला हा बडा मठ होता . गंगेसरी आश्रम अथवा बडा मठ असे याचे नाव . मी जाता जाता त्या साधूला झालेला प्रकार सांगितला . तो म्हणाला काही काळजी करू नका . इथे कोणी येत नाही . मी म्हणालो मला काळजी करण्याचे काही कारण नाही कारण मी परिक्रमावासी आहे . परंतु तुम्हाला सांगितले कारण तुम्हाला या लोकांचा भविष्यात काही त्रास व्हायला नको . साधू मला म्हणाला मीच या आश्रमाचा महंत आहे . कोण काय करते ,तेच बघतो ! हा साधू स्वतः नागा साधू होता आणि नागा साधू अतिशय  निर्भय , निर्भीड आणि शूर असतात . त्यांना  कोणीही , कधीही , कुठेही अडवू शकत नाही . या महंतांचे नाव विष्णू भारती असे होते
इथे गंजाल नदी पापन गावाच्या हद्दी मध्ये आहे .गंजाल आणि गोमती नदीच्या मध्ये गोंदागाव नावाचे गाव आहे . आणि गोमती नदी नंतर अरिया बेदी गावचा गंगेसरी आश्रम आहे .समोर टिघाली नावाचा घाट आहे . त्या घाटावरून त्रिवेणी संगमांमध्ये स्नान करण्याकरता मोठ्या फेरीबोट मधून लोक बसून येतात .या बोटी इतक्या मोठ्या आहेत की त्यामध्ये चार ते पाच मोटार गाड्या देखील मावतात .
 टिघाली घाटावरून निघालेली फेरी बोट गंगेसरी कडे येताना
 हा अतिशय पवित्र त्रिवेणी संगम मानला जातो . बडा मठ अतिशय सुंदर आहे . वास्तु विशारद लोकांनी या गावाला अवश्य भेट दिली पाहिजे . कारण अतिशय सुंदर वास्तुशिल्प कलेचा नमुना असलेला बडा मठ आणि त्यासमोर असलेल्या अनेक साधुसंतांच्या शेकडो वर्ष जुन्या पाषाणातील समाधी इतक्या नितांत सुंदर आहेत की त्याचे वर्णन मी तुम्हाला शब्दांमध्ये करून सांगू शकत नाही . आपल्याला साधारण या परिसराची कल्पना यावी म्हणून गुगल नकाशावरून सापडलेले काही फोटो सोबत जोडणार आहे ते पाहून आपल्याला मी काय म्हणतो आहे याची थोडीफार कल्पना येऊ शकते . इथले सर्वात सुंदर वास्तुशिल्प म्हणजे भगवान प्रभू दत्तात्रयाचे मंदिर आणि मठ हे असून समोर ६०० वर्षे जुनी संजीवन समाधी आहे .  समाधी घेतलेले संत समाधी घेतल्यानंतर सहा महिने एका छिद्रातून दूध घेत होते असे इथे सांगतात .सर्व समाधी मंदिरे पुरातन व अप्रतिम मराठा शैलीची आहेत . दत्त मंदिर ही मला भेटलेले ते नागा साधू विष्णू भारती उत्तमपणे सांभाळत होते . त्यांच्या गुरुंचे नाव बाळकृष्ण जी भारती असे होते . त्यांनीच अलीकडच्या काळात हे सर्व पुन्हा मोठ्या वैभवाने उभे केले होते . या परिसरात काही ठिकाणी आढळणारे ग्रामस्थ ,गृहस्थ विरुद्ध साधू असे द्वंद्व इथे देखील आहे असे मला जाणवले . आपल्या धर्माला लागलेला हा शाप आहे .बहुसंख्या सज्जन लोक कधीच एकजुटीने राहत नाहीत , त्याचा फायदा मूठभर दुर्जन घेतात. अतिशय भव्य आणि सुंदर असे प्रवेशद्वार होते .प्रवेशद्वारातून आत गेल्या गेल्या ओसरीमध्येच उतरण्याची सोय होती इतकी ती मोठी होती .मध्ये एक ऐस पैस चौक होता आणि आजूबाजूला तसेच माडीवर केलेले लाकडाचे कोरीव काम इतके आकर्षक आणि इतके मनमोहक होते की त्यामुळे या वास्तू कडे पाहतच राहावे असे कोणालाही वाटायचे . समोर दत्त मंदिर होते आणि बाजूला गुरूंची गादी होती . इथे आत मध्ये फक्त साधू संत राहू शकायचे आणि बाकीचे परिक्रमावासी ओसरीमध्ये उतरायचे . ओसरी मध्ये माझे सामान ठेवून मी समोर समाधी मंदिराच्या दर्शनासाठी बाहेर पडलो . तोपर्यंत नागा साधूने मोठ्या आवाजात भजन कीर्तन लावून दिले जे समोरच्या बाजूला केलेल्या कर्ण्यामुळे उमरिया गावापर्यंत ऐकू जायचे ! मगाशी येताना देखील मी हेच तर कीर्तन ऐकत आलो हे मला आठवले ! याचा अर्थ मला त्रास देणाऱ्या शेतकऱ्याला देखील हे रोज ऐकावे लागत होते ! प्रवचनकार त्यामध्ये सांगत होते की अरे बाबांनो तुम्ही सगळे पूर्वी आमचेच होतात ! आपण सर्वजण एकच होतो . आमच्या पूर्वजांनी धाडस दाखवले आणि तुमच्या पूर्वजांनी कच खाल्ली म्हणून तुमच्यावर आज हे दिवस आलेले आहेत ! कल्पना करून पहा . हे दिवस-रात्र ऐकल्यावर ऐकणाऱ्या माणसाच्या मनस्थितीवर काय परिणाम होत असेल ! नागा साधूंची ही युक्ती मला भलतीच आवडली . इथे थोड्या वेळाने रस्ता मार्गाने चालत एकनाथराव रोकडे आणि शेळके महाराज , तानाजी राव गिरी गोसावी वगैरे सर्व परिक्रमा वासी येऊन दाखल झाले . त्या सर्वांनी देखील ओसरी मध्येच आसन लावले . दत्तप्रभू आणि गुरु गादीचे चे दर्शन घेऊन समाधी मंदिरामध्ये गेलो . इथे अनेक छोट्या मोठ्या समाधी होत्या . इतकी मंदिरे बांधलेली असून देखील कुठेही सौंदर्यदृष्टीमध्ये हलगर्जीपणा केलेला नव्हता . ही सर्व मंदिरे दरवर्षी पाण्यामध्ये बुडतात तरी देखील त्याचा दगड देखील हललेला नाही इतके सुंदर बांधकाम होते . दगडांना सुरेख रंग देऊन त्यांचे आयुष्य वाढविण्यात आले होते . संपूर्ण दगडाचे मंदिर असल्यामुळे आत मध्ये अतिशय सुंदर आणि सुखद गारवा होता . संजीवन समाधी असल्यामुळे अतिशय जागृत स्थान होते . वयस्कर गावकरी फारसे आश्रमाशी जोडले गेलेले नसले तरी गावातील सर्व तरुण मात्र आश्रमामध्ये यायचे .आणि आरती वगैरे सर्व कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हायचे . मी स्वतः इथे समाधीपुढे शंख फुंकला . इथे व्याघ्रासन ठेवलेले आहे . त्यावर ज्वारी फेकली की त्याच्या लाह्या व्हायच्या , इतकी ही जागा तपःपूत होती आहे असे मला सांगण्यात आले . अमृतानंद भारती महाराजांची ही ६०० वर्षे जुनी संजीवन समाधी होती . दत्त मंदिराचा वाडा देखील मराठी पद्धतीचाच होता . अप्रतिम कलाकुसरीने बनविलेले जोडी जोडीने एकत्र उभे केलेले लाकडी खांब ,भव्य तुळया ,सुंदर लिंपलेल्या भिंती  हे सर्व महाराजांनी अतिशय सुंदर पद्धतीने जपले होते . सर्वत्र रंगरंगोटी , टापटीप ठेवलेली होती . महाराज अतिशय मजबूत बांध्याचे होते . शक्यतो साधू थोडेसे कृष असतात परंतु हे महंत महाराज मात्र चांगले पैलवान होते .आपण या आश्रमाचे फोटो बघाच अशी आपल्याला विनंती आहे . 
गंगेसरी बडा मठ आश्रमाचे प्रवेशद्वार . इथे कट्ट्यावर देखील लोक झोपतात .
आश्रमाचा दरवाजा अतिशय सुंदर आहे . इथे जय विजय यांना उभे राहण्यासाठी जागा असून सुंदर दगडी महिरपी आपले स्वागत करतात . दरवाजासाठी आणि संपूर्ण बांधकामासाठी अतिशय उत्कृष्ट लाकडाचा वापर करण्यात आलेला आहे .
दारातील ओसरी आणि येथील पडवी मध्ये मुक्काम करता येतो
आत मधला चौक अतिशय सुंदर असून वरती शिसम लाकडापासून घडविलेली सुंदर कलाकुसर असलेली माडी चित्ताकर्षक आहे .
सुंदर रीतीने घडविलेला हा दरवाजा पहा . असे एकापेक्षा एक सुंदर कलाकुसर असलेले लाकूड काम इथे आहे . इथे प्रत्येक गोष्ट जोडीने घडविलेली दिसते . खांब जोडीने आहेत .तशाच तुळया देखील जोडीने आहेत . अगदी महादेवापुढे नंदी देखील जोडीने आहे ! 
दत्तप्रभू आणि इतर देवता .
गुरु गादीचे दर्शन घ्या . इथेच ज्वारीच्या लाह्या व्हायच्या .
नुसते जवळ गेले तरी या जागेतील तपोबल जाणवत होते . आश्रमाच्या लाकडावरील सुंदर कोरीव काम . पुन्हा सर्व काही जोडीने ! 
आश्रम परिसरातून त्रिवेणी संगम असा दिसतो .
आश्रमाच्या बाहेर एक भव्य वृक्ष असून याच्या सावलीत बसून मैय्या कडे पाहायला खूप मजा येते .
गंजाल गोमती नर्मदा त्रिवेणी संगम
आश्रमाच्या बरोबर समोर असलेली समाधी मंदिरे
मंदिरे संपूर्ण दगडात बांधलेली असून उंच दगडी कट्ट्यावर सुबक कोरीव नक्षीकामात घडवलेली आहेत .
हे समाधी स्थळ असल्यामुळे येथे दशक्रिया विधी करायला परवानगी नाही अशी पाटी लिहिलेली आहे
शेजारी शेजारी अनेक मंदिरे असल्यामुळे कुठले दर्शन घेऊ आणि कुठले नाही असे होते
मंदिरांचे चबुतरे देखील असे शेजारी शेजारी आहेत
मंदिरांचे घुमट आणि कळस पाहण्यासारखे आहेत . बहुतांश मराठा पद्धतीचे बांधकाम आहे
आकर्षक रंगकाम केल्यामुळे मंदिराचे आयुष्य वाढले आहे व दुरून छान दिसतात
अमृतानंद जी भारती महाराज यांची संजीवन समाधी या मंदिरामध्ये आहे . 
मघाशी आपण बडा मठ इथले जोड खांब आणि जोड तुळया पाहिल्या ! आता गंमत पहा !
हे आहेत समाधी मंदिरातील जोड नंदिकेश्वर महाराज ! असा जुळा नंदी अन्यत्र कुठे पाहिल्याचे स्मरणात नाही . 
मंदिराच्या बाह्य भिंतीवर सुंदर कलाकुसर असून पौराणिक प्रसंग दगडामध्ये चितारलेले आहेत
वास्तु विशारद ,स्थापत्य विशारद ,अभियंते , कलाकार ,चित्रकार या सर्वांना इथे भरपूर काही शिकायला मिळणार आहे असा हा संपूर्ण परिसर आहे . 
इथे अन्यही अनेक संतांच्या समाधी आहेत
मंदिराचे खांब आणि चबुतऱ्या वरील कलाकुसर देखील लक्षणीय आहे .
सहाशे वर्षे अनेक महापूर भूकंप आणि नैसर्गिक आपदांमध्ये टिकलेले हे बांधकाम असल्यामुळे याचे मी अगदी बारकाईने चहूबाजूने निरीक्षण करून घेतले . नर्मदा काठावरील माहेश्वर घाट सर्व वास्तू विशारदांमध्ये प्रसिद्ध आहे परंतु गंगेसरी घाटाबाबत फारसे कोणाला माहिती नाही ,म्हणून हा लेखन प्रपंच .
खांबांची संख्या भरपूर आहे . आणि आतला सुखद गारवा कोणालाही सहज आकर्षित करतो !
शेजारी वाहणारी नर्मदा माता .बांधकामाला धोका होईल म्हणून घराशेजारील महावृक्ष कापणाऱ्या महाभागांसाठी हे छायाचित्र मुद्दाम टाकले आहे . इतक्या जवळ महावृक्ष असून देखील मंदिराच्या बांधकामातील वीट देखील हललेली नाही याची कृपया नोंद घ्यावी . झाडांची मुळे पाण्याचा शोध घेत असतात त्यामुळे आपण निश्चिंत रहावे .
भारत हा मंदिरांचा देश आहे ! मंदिरे हे आपल्या संस्कृतीचे मानबिंदू आहेत ! त्यांचे जतन , संवर्धन आणि शास्त्रोक्त जीर्णोद्धार हे आपले जन्मदत्त कर्तव्य आहे !
मंदिर तुम्हाला एखाद्या घटनेचे किंवा एखाद्या व्यक्तीचे किंवा एखाद्या तत्त्वाचे सतत स्मरण करून देत राहते . विस्मरण होऊ देत नाही .
प्रत्येकाने आयुष्यात छोटेसे का होईना एखादे असे मंदिर उभे केले तरी ते पुढे हजारो वर्षे येणाऱ्या अनेक पिढ्यांना पथप्रदर्शक ठरलेल्या शंकाच नाही !
असो . रात्री इथे खूप सुंदर आरती व उपासना झाली . महंत महाराजांबरोबर अनेक विषयांवर चर्चा झाली . सध्या समाजातील परिस्थिती काय आहे हे जर कुठल्या महंतांनी विचारले तर अभ्यासू वृत्तीच्या परिक्रमावासिनी अवश्य त्यांना योग्य ती माहिती पुरवावी . कारण साधू समाज अनेक कारणांमुळे समाजाच्या प्रत्येक स्तरापर्यंत पोहोचू शकत नाही . तिथपर्यंत पोहोच असलेल्या भक्त मंडळींनी त्यामुळे योग्य ती माहिती मागितल्यावर त्यांना दिली पाहिजे . पहाटे लवकर उठून निघालो . काल संध्याकाळी मला दिनेश कुमार नावाचा एक मनुष्य भेटून गेला होता आणि जाताना माझ्या शेतात येऊन जा असे त्याने सांगितले होते . त्याला असे वाटले होते की मी वरून जाणार आहे . परंतु मी पुन्हा एकदा किनाऱ्याचा मार्ग पकडल्यामुळे आणि त्याचे शेत अगदी किनार्‍या वर असल्यामुळे नेमके त्याच्या शेतातील कुटीतूनच मला जावे लागले . याचे वडील मला भेटून खूप आनंदले आणि त्यांनी अतिशय सुंदर असा काळा चहा करून मला पाजला . यांनी पूर्वी एक परिक्रमा केली होती .
दिनेश कुमार याची शेतातील छोटीशी झोपडी . मी गेलो तेव्हा सर्व शेती हिरवीगार होती .
 इथून थोडेसे पुढे गेल्यावर दिनेश कुमारच्या गुरुदेवांचा आश्रम होता . मी त्यांचे दर्शन घ्यावे अशी इच्छा त्याने प्रकट केली . त्याला नाही म्हणणारा मी कोण होतो त्यामुळे ताबडतोब त्याच्या मागोमाग निघालो . नर्मदेच्या काठाकाठाने चालून चालण्याची एक विशिष्ट शैली माझी माझी आपोआप विकसित झालेली होती . मला असे लक्षात आले की दिनेश कुमार अगदी त्याच पद्धतीने चालतो  . याचा अर्थ माझी शैली योग्य होती याची मला खात्री पटली . शैली म्हणजे गती कमी जास्त कुठे करायची , कुठे सावकाश चालायचे ,कुठे उड्या मारायच्या वगैरे सर्व गोष्टी . 
छिपानेर नावाचा प्रसिद्ध घाट नर्मदे काठी आहे . त्याच्या अलीकडे ब्रिजाखेडी नावाच्या गावामध्ये जगतारणघाट आहे . तिथे हे प्रेमदास नावाचे महाराज राहत होते . मी गेल्यावर त्यांना फार आनंद झाला ! त्यांनी विनाकारणच माझा फार मोठा आदर सत्कार केला ! मला खाण्यासाठी त्यांनी  चांदीच्या वाटीत सुकामेवा दिला ! बसण्यासाठी चांगले आसन दिले ! माझ्या लक्षात आले की आता काहीतरी वेगळे घडणार आहे ! आणि तसेच झाले ! महाराज मला म्हणाले की मी आता पाच दिवसांसाठी दिल्लीला जात आहे . आता तुम्ही असेच इथे निश्चिंत रहा ! तुम्ही कुठेही जायचे नाही . फक्त या तखतावर पडून राहायचे ! हा दिनेश कुमार आहे .असे माझे अनेक भगत इथे येतील जातील . तुम्हाला करून खायला घालतील . हात पाय पण चेपून देतील . परिक्रमा वासींना करून खायला घालतील . तुम्ही फक्त इथे बसून आशीर्वाद द्यायचा ! कॉर्पोरेट जगामध्ये एच आर मॅनेजर तुम्हाला जशा कंपनी बद्दलच्या आणि कामाबद्दलच्या फसव्या परंतु आकर्षक ऑफर देत असतो तशातला हा प्रकार होता ! मुळात मला नाव बंद होण्यापूर्वी समुद्रकिनारा गाठणे आवश्यक होते . मी अतिशय नम्रपणे परंतु ठामपणे महाराजांना नकार दिला . साधूंचे एक चांगले असते . तो जितका मुरलेला असतो तितका विरक्त असतो . क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी मला मोकळे केले ! दिनेश कुमार थोडे अंतर माझ्याबरोबर चालला आणि मी सांगितल्यावर परत माघारी गेला . याने मला शेतातून खाली उतरायची वाट कशी शोधायची ते शिकवले . नर्मदे काठी भेटलेला प्रत्येक मनुष्य तुम्हाला काही ना काही शिकवत असतो. कधी कधी तर नर्मदा मैया देखील तुमची परीक्षा बघते की हा परिक्रमा करण्यासाठी निघाला आहे का महंती गाजवायला निघाला आहे ! माझा हेतू शुद्ध होता ! नर्मदा परिक्रमा ! नर्मदे हर !





 लेखांक अठ्ठावन्न समाप्त (क्रमशः )

मागील लेखांक

पुढील लेखांक

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

जे आवडते सर्वांना ...

अनुक्रमणिका

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

लेखांक १ : नर्मदे हर !

लेखांक २ : भोपाळ जवळच्या जंगलातील अपघात

लेखांक ४ : झुठा कही का ! सबकुछ तो लाए हो !

लेखांक ३ : चोराची धन

लेखांक ५ : ग्वारीघाट जबलपुर मध्यप्रदेश

लेखांक ८३ : महाराष्ट्रात प्रवेश आणि भाबरीचे भेदक भिल्ल-महात्मा फोदला गारद्या पावरा

लेखांक ७४ : लेपा बांध , वेदा संगम , कठोरा अन् मांडव्य गुंफा

लेखांक ९० : गुजरात मधील कणजी चे सान्सुभाई तडवी आणि अरण्यव्याप्त माथासर