लेखांक ५३ : नर्मदापुरम् चा मंदिरसंपन्न शेठाणी घाट

नर्मदा तवा संगमामध्ये स्नान केल्यानंतर खूप मोठा वाळूचा किनारा लागला . अतिशय विस्तृत आणि स्वच्छ वाळू चे पात्र येथे आढळते . मध्ये मध्ये काही लोकांनी शेती देखील केलेली आहे . प्रचंड वाळूचा किनारा पार करत बगवाडा पुलापाशी आलो . हा एक छोटा जोडपुल आहे . 
बगवाडा पूल आणि लक्षात राहणारे समोरचे डोंगर
पुलावरून होणारे नर्मदेच्या स्वच्छ पात्राचे विराट दर्शन . उजवीकडे दिसणारा वाळूचा किनारा आपण पार करत आहोत .
 इथे पाणी अतिशयच स्वच्छ आहे .
 स्वच्छ शुद्ध खळाळते नर्मदा जल
पुलापासून पुढे नर्मदा नदी उजवे वळण घेते त्यामुळे पुन्हा एकदा काठावर दाट झाडी सुरू होते . इथे समोरच्या किनाऱ्याच्या बाजूला मात्र वाळूच वाळू आहे . 
या भागात असे काही लहान मोठे घाट देखील लागतात .
अशा अनेक घाटांपैकी हा गोंदरी घाट नावाचा घाट आहे . इथे पाणी खूप स्वच्छ आहे . फरशी गर्दी देखील नसते . 
गोंदरी घाटावरून समोरील बगवाडा घाटाचे दर्शन .
इथून पुढे पुन्हा एकदा विस्तीर्ण वाळूचा किनारा लागला . नर्मदापुरम हे एक मोठे शहर असल्यामुळे येथे अनेक शैक्षणिक संस्था आहेत . तसेच आसपासच्या खेड्यापाड्यातली मुले शिक्षणासाठी म्हणून येथे येऊन राहतात . विशेषतः हा टापू निर्मनुष्य व निसर्गरम्य असल्यामुळे इथे अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी जोडीने "अभ्यास " करत असलेले पाहायला मिळाले . आपण नर्मदा मातेसमोर बसलेले आहोत , किंवा एखादा परिक्रमावासी आपल्या समोरून जातो आहे याचे कुठलेही भान नसलेली युवा पिढी पाहून वाईट वाटले .जगाच्या पाठीवर कुठेही जा मानवी भावभावना फारशा बदलत नाहीत . म्हणूनच संस्कारांना फार महत्त्व प्राप्त होते . पशुतुल्य जीवनच जगायचे असेल तर ते कुठेही जगता येते . थोडे अंतर गेल्यावर कॉलेजमधील युवकांचे टोळी युद्ध पाहायला मिळाले . बापाच्या पैशावर पेट्रोल भरून दुचाकी उडवत इथे येऊन , त्यांच्या मारामाऱ्या सुरू होत्या . मारामारीचा विषय काय असेल यासाठी विशेष संशोधन करण्याची गरज नव्हतीच . आपल्या देशातील तरुणांची संख्या पाहता आपण जगातील सर्वात तरुण देश म्हणून ओळखले जातो आहोत . परंतु तरुण किती आहेत , यापेक्षा तरुण कसे आहेत हे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे . आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये कार्यरत असा . परंतु शक्य होईल तितक्या कुमार , किशोर व युवा मुला मुलींना चांगले मार्गदर्शन अवश्य करीत जावे . कदाचित त्या क्षणी त्यांना त्याचे मोल कळले नाही तरी आयुष्यात कधी ना कधी त्यांना तुमचा चांगला सल्ला आठवू शकतो आणि कामालाही येऊ शकतो . असो . इथून पुढे एक विचित्र ओढा नर्मदेला येऊन मिळाला होता . विचित्र अशासाठी म्हणायचे कारण त्याची रुंदी सर्वत्र एकसारखीच होती . आणि ती अशी होती की उडी मारावी तरी पंचाईत नाही मारावी तरी पंचाईत . बर यातील पाणी काळ्य रंगाचे अतीव घाणेरडे सांडपाणी होते . त्यामुळे तो उतरून पार करण्याची मला इच्छा नव्हती . मग त्या ओढ्याच्या काठाने मी मागे मागे चालत निघालो . परंतु काही केल्या त्या ओढ्याची रुंदी कमी होईना . अखेरीस एके ठिकाणी हिम्मत करून मी माझी झोळी पलीकडे फेकून दिली . आणि वेगाने पळत येऊन लांब उडी मारून ओढा पार केला . हा पार करताना जिथे उडी मारण्यासाठी जोर लावायचा तो भाग ओल्या चिखलाचा असल्यामुळे पकड मिळत नव्हती . किमान दहा-बारा वेळा तरी मी उडी मारण्याचा अयशस्वी प्रयत्न करून पाहिला . परंतु यशस्वी झालेली उडी बहुतेक चुकीच्या ठिकाणी पडली . कारण इथून नर्मदे कडे जायला मार्गच नव्हता . तिथून रस्ता शोधत चालता चालता मी एका सुंदर बगीचा मध्ये येऊन पोहोचलो . सर्वत्र बांबूची झाडे लावलेली होती . मधून सुरेख रस्ता तयार केला होता . छोटे छोटे तलाव तयार करून तिथे कृत्रिम जंगल निर्माण केले होते आणि त्यात कमळाची , कमोदिनी ची झाडे लावली होती . खूप रम्य अशी ती बाग बघत मी चालू लागलो . नर्मदा हर्बल पार्क नावाने वन खात्याने महापालिकेच्या सहाय्याने तयार केलेले ते वन उद्यान होते . 
अचानक लागलेला बांबूचा मार्ग
ही पाटी वाचल्यावर मला कळले की हे नर्मदा हर्बल पार्क आहे . सर्व छायाचित्रे संग्रहित आहेत
बागेत तयार केलेल्या कृत्रिम तलावामुळे परिसराचे सौंदर्य वाढले होते परंतु माझा नर्मदे कडे जाण्याचा मार्ग अवरुद्ध झाला होता .
परिसर मात्र रम्य होता . मुख्य म्हणजे निर्मनुष्य होता .
मी या कमोदिनी पुष्पाचे अवलोकन करीत होतो . 
इतक्यात गोल जाळीदार टोपी घातलेला मोठी दाढी वाढवलेला बिनमिशांचा एक इसम माझ्या अंगावर धावून आला . "अय भिकारी !  चल निकल बाहर ! तू अंदर कैसे घुस गया ? " असे म्हणत दात ओठ खात तो ओरडू लागला . हा वनखत्याचा वॉचमन आहे हे माझ्या लक्षात आले . नर्मदापुरम मध्ये राहत असल्यामुळे परिक्रमावासी कसे दिसतात हे याला माहिती होते . तरी देखील तो मुद्दाम मला भिकारी म्हणत होता . त्याच्यामध्ये माझा अपमान करून त्यातील विकृत आनंद मिळवण्याचा त्याचा हेतू स्पष्ट पणे जाणवत होता . अशावेळी "ठकासी व्हावे महाठक । उद्धटासी उद्धट ।"  हेच योग्य आहे असे जाणून मी थेट काठी उगारली आणि त्याच्या दिशेला धावून गेलो . धावताना ओरडू लागलो , " तू अब गया ।अब देखते है तुझे कोन बचाता है । तेरे बाप की जागीर है क्या बे ? " . तो मनुष्य अक्षरशः पार्श्वभागाला पाय लावून पळून गेला . 
बांबूच्या या बनात तो कुठेतरी लपून बसला
सुदैवाने मला देखील बाहेर नर्मदे काठी पोहोचण्याचा मार्ग लगेच दिसला आणि मी बाहेर पडलो . 
मला राग अजिबात आला नव्हता . पण तसा अभिनय अवश्य केला . कुठलीही कृती केल्यावर ती चूक का बरोबर हे नर्मदा मातेला विचारून तपासून घ्यायची सवयच लागली होती . आपल्याला कुठल्या ना कुठल्या रूपात उत्तर मिळते . नक्की मिळते . इथून पुढे छोटे-मोठे अजून काही घाट आहेत . काँक्रीट मध्ये बांधलेला एक छोटा घाट होता . त्याच्यानंतर थोडा मार्ग चालल्यावर चिखलामध्येच सिमेंटचा बांधलेला विवेकानंद घाट होता . 
इथला मार्ग काहीसा असा होता .
स्वामी विवेकानंद घाट दिसू लागला
स्वामी विवेकानंद घाट नर्मदापुरम
या घाटावरून मला एक अद्भुत दृश्य दिसले . ट्रॉली जोडलेला एक ट्रॅक्टर अतिशय वेगाने नर्मदेच्या पाण्यावरून पळताना मला दिसू लागला ! मला काही कळेना की हा ट्रॅक्टर पाण्यावरून कसा काय पळतो आहे ? घाटाच्या पायऱ्या चढल्यावर समोरचे दृश्य दिसले . इथे वाळू माफीया लोकांनी अक्षरशः उच्छाद मांडून ठेवलेला दिसतो . फार मोठ्या प्रमाणात नर्मदेच्या पात्रातून वाळू उपसा केला जातो . ही वाळूचे ढिगारे जवळपास पाण्याच्या पातळीला असल्यामुळे लांबून बघताना गाड्या पाण्यावरून पळत आहेत असा भास होतो . 
नर्मदापुरम येथील समोरच्या घाटावर चालू असलेला वाळू उपसा उपग्रहातून काहीसा असा दिसतो !
यातील प्रत्येक रेष म्हणजे दोन डंपर आरामात जातील असा वाळूचा लांबच लांब उपसून ठेवलेला ढिगारा आहे . 
मोठे शहर आले की नदी घाण व्हायला सुरुवात होते . नर्मदापुरम देखील त्याला अपवाद नाही . परंतु इथला सेठानी घाट तुलनेने अतिशय स्वच्छ ठेवलेला आहे . नर्मदे वरील अत्यंत मोठ्या घाटांपैकी हा एक आहे . याचा विस्तारही  औरस चौरस आहे . आणि घाटाचा उतार देखील बऱ्यापैकी आहे . या घाटाचे सौंदर्य आणि विस्तार केवळ शब्दात व्यक्त करता येणे अवघड आहे . त्यामुळे संग्रहित छायाचित्रांच्या माध्यमातून घाटाचे दर्शन घेऊयात . या घाटावर बऱ्याच घडामोडी घडल्या त्या लेखाच्या शेवटी पाहू .
 नर्मदापुरम च्या सेठानी घाटाचे विहंगम दृश्य
 स्वच्छ , सुंदर , सुरक्षित अन् सुकुमार सेठानी घाट
 इथे नर्मदा पात्र खोल असल्यामुळे अशा आपत्कालीन नौका दिवसरात्र तैनात असतात .
 घाटावर साखळदंड लावून स्नानमर्यादा घालून दिलेली आहे . 
 डावीकडे वरती जे चार निळे खांब दिसताहेत तिथे उघड्यावर मी आसन लावले होते ! इथे घाट संपतो .
 इथून नर्मदेचे फार सुरेख दर्शन होते .
घाटापूर्वी नर्मदा दर्शन घडविणारी तारांकित हॉटल्स
 लागतात . 
 उजवीकडील छोट्या होड्या आता कमी होत जाऊन डावीकडील मोठ्या होड्यांची संख्या आता वाढतजाते . पात्र १ किमी रुंदीचे सहज आहे . प्रवाह स्थिर आहे . 
 दिवसाच्या प्रत्येक वेळी घाटाचे वेगळे सौंदर्य पहावयास मिळते . सायंकाळचे दृश्य
 भर दुपारचे दृश्य
 रात्रीचे सौंदर्य
घाट अतिशय स्वच्छ आहे .
 संधीकाळी दिसणारे रूप
 पावसाळ्यातील रौद्र रूप
 दिवेलागणी ला दिसणारे शांतरूप
 सजलेले रूप
 घाटावरील नर्मदा मंदिर
 सेठानी घाट सर्वांचा आहे !
 जलविहार करणारी बदके
 पहाटे निर्मनुष्य असणारा हाच घाट रात्री भाविकांच्या गर्दी ने ओसंडून वाहतो .
 गुलाबी लाल पिवळ्या हिरव्या पूरसंरक्षक
भिंती तर आहेतच . पण त्यातच खुबीने पायऱ्या गोवलेल्या आहेत ! 
  घाट परिसरात अगणित मंदिरे आहेत .
 सेठानी घाट म्हणजे मंदिरेच मंदिरे !
घाटासमोर पात्रामध्ये एक कारंजे अखंड चालू असते . सी गल पक्षी रात्रीच्या वेळी उडता उडता कौशल्याने या कारंजाचे पाणी पिताना मी पाहिले . 
 घाटावरील प्राचीन नर्मदा मंदिर .
 सुंदर असे काले महादेव मंदिर नर्मदापुरम
 श्री काले महादेव 
 श्री काले महादेव श्रृंगारोत्तर
 श्री गायत्री मंदिर
 श्री गायत्री माता
 सुंदर हनुमानजी
 हनुमंताचे रुपडे फारच गोड आहे . त्याच्या खांद्यावरील राम व लक्ष्मण पहा किती गोंडस आहेत ! 
 जगदीशाचे मंदिर तर फारच सुरेख आहे . इथे फक्त दशनामी साधू व सन्यासी राहू शकतात . त्यांची उत्तम व्यवस्था ठेवली जाते . 
 जगदीश मंदिराचे सुंदर व भव्य प्रवेशद्वार . समोर मैय्या
 नर्मदेकडून जगदीश मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्या
 जगदीश मंदिरातील अद्भुत विविधरंगी विग्रह . पुरी जगन्नाथ प्रमाणे लाकडी मूर्ती इथे दिसतात .
 नर्मदा माता मंदिरातील विग्रह
 श्री नागेश्वर नर्मदापुरम. इथेच अखेरीस मुक्काम घडला . 
 नागेश्वर मंदिर धर्म शाळेतून होणारे नर्मदेचे अद्भूत दर्शन
 नागेश्वर आश्रमातील भोजन शाळेतून नर्मदा दर्शन
 इथे किंवा खाली मुक्काम करता येतो . खाली नर्मदेमध्ये आणि तुमच्या मध्ये रेलिंग नाही म्हणून मी खाली आसन लावले . 
 आश्रमातील भंडारी साधू
मी शेठाणि घाटावरती पोहोचलो तोपर्यंत या गावाचे नाव होशंगाबाद आहे एवढेच मला माहिती होते . आबाद म्हणजे अमर राहो . इस्लामाबाद याचा अर्थ इस्लाम आबाद अर्थात इस्लाम अमर राहो . औरंगाबाद याचा अर्थ औरंगजेब अमर राहो . अहमदाबाद म्हणजे अहमदशहा अब्दाली अमर राहो . सिकंदराबाद म्हणजे सिकंदर अमर राहो . उस्मानाबाद म्हणजे उस्मान आदिलशहा अमर राहो . इलाहाबाद म्हणजे इलाहा अर्थात दीन अमर राहो .क्रूरकर्मा होशंग शाह अमर राहावा असे मला तरी अजिबात वाटत नव्हते . त्यामुळे वरील सर्व शहरांची नावे घेताना माझ्या वैयक्तिक पातळीवर मी अहमदाबादला कर्णावती असेच म्हणतो . उस्मानाबादला धाराशिव असेच म्हणतो . इलाहाबादला प्रयागराज असेच म्हणतो .औरंगाबादला देव खडकी हे त्याचे मूळ नाव किंवा आता छत्रपती संभाजीनगर ( जे अधिक योग्य नाव आहे ) असेच आपण म्हटले पाहिजे . कुणीतरी म्हटले आहे "नावात काय आहे ? " कुणीतरी काय म्हटले आहे याच्याशी मला देणे घेणे फारसे नसावे . आपल्या वडिलांनी , आजोबांनी किंवा आपल्या पूर्वजांनी काय म्हटले आहे ते अधिक महत्त्वाचे आहे . आणि माझे तरी असे स्पष्ट मत आहे की नावात बरेच काही असते . आपल्या घरी एखादे मूल झाले तर त्याचे नाव ठरविण्यासाठी किती दिवस खल चालतो आठवून पहा . नावात काहीतरी असल्याशिवाय आपण इतका विचार करतो का ? मुलांच्या नावावरून बरेचदा आई-वडिलांची मानसिकता कळत असते . सांगायचे तात्पर्य इतकेच की मी नेमका इथे पोहोचलो आणि मला कळले की या  २०२२ च्या नर्मदाजयंती पासून होशंगाबादचे नाव नर्मदापुरम असे करण्यात आलेले आहे ! तत्कालीन मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतला होता . अतिशय अभिनंदननीय असे हे काम होते . अजून त्याची कार्यवाही सुरू झाली नसली तरी काही काही ठिकाणी नर्मदापुरम अशा पाट्या आता दिसत होत्या . काही हिंदू लोक आपल्या स्वभावाप्रमाणे हे राजकारण आहे वगैरे म्हणून या नामांतराला विरोध करताना देखील मला दिसले . माझे असे म्हणणे आहे की राजकारण तर राजकारण , परंतु योग्य गोष्ट घडत आहे तर ती स्वीकारली पाहिजे . 
२०२१ मध्ये या गावाचे नाव होशंगाबाद होते ही दर्शविणारी भिंतीवरील पाटी वाचा . आता मात्र हे नर्मदापुरम झालेले आहे . आणि हे नर्मदापुरमच आहे ! 
नर्मदापुरम घाटाची काही जुनी चित्रे
शेठाणी घाट
होशंग शाह किल्ला
या घाटावर असलेल्या एका एका मंदिराचे दर्शन घेत मी फिरू लागलो . रंगीबेरंगी घाट आणि सर्वत्र जाणवण्या इतपत स्वच्छता होती . घाट मोठा आहे मंदिरे खूप आहेत वगैरे सर्व ठीक आहे परंतु परिक्रमावासींच्या दृष्टिकोनातून पाहायला गेले तर इथे धर्मशाळा किंवा राहण्याची व्यवस्था अशी कुठेच सापडत नाही ! जगदीश मंदिरामध्ये फक्त साधू संत संन्यासी राहू शकतात . सर्वसामान्य परिक्रमावासी मग बरेचदा या घाटावरतीच कुठेतरी मुक्काम करतात . शहर मोठे असल्यामुळे बाजारपेठ देखील मोठी आहे . तिथे जाऊन मग काहीतरी खरेदी करून खातात . ग्रामीण भागामध्ये जेवढे अगत्य बघायला मिळते तेवढे शहरी भागामध्ये बघायला मिळत नाही . शिक्षणाचे किंवा अधिक योग्य शब्द आधुनिक शिक्षण असा आहे त्या आधुनिक शिक्षणाचे काही दुष्परिणाम आहेत , त्यातला हा एक महत्त्वाचा दुष्परिणाम आहे . माणूस माणुसकी पासून थोडासा दूर जातो . आता सुद्धा माझ्यासमोरून अक्षरशः शेकडो लोक गेले .परंतु कोणीही नर्मदे हर म्हणत नाही . कोणीही भोजनप्रसादीसाठी वगैरे विचारणा करत नाही असा अनुभव मला आला . इथे मला असे सांगण्यात आले की एकाच मंदिरामध्ये अन्नछत्र चालविले जाते त्यामुळे मी आसन लावता येते का हे पाहण्यासाठी त्या मंदिरामध्ये गेलो .घाटावरील हे शेवटचे मंदिर होते . नागेश्वराचे तीन मजली मंदिर येथे आहे . हा पूर प्रवण परिसर आहे . त्यामुळे मंदिरे अशी उंच उंच बांधलेली दिसतात . नर्मदा मातेला जेव्हा महापूर येतो तेव्हा हा संपूर्ण घाट जलमग्न झालेला असतो . पुढे तर मला कळाले की काही महापूरांमध्ये अख्खे नर्मदापुरम शहर पाण्याखाली गेलेले होते . या मंदिरामध्ये परिक्रमावासींसाठी खोल्या किंवा हॉल बांधलेला नसून नर्मदेच्या काठावरतीच बिन भिंतींचा उघडा व्हरांडा आहे . इथे परिक्रमावासी मुक्काम करतात . आज पर्यंत जेव्हा जेव्हा मी मुक्काम केला ,तेव्हा तेव्हा थेट नर्मदेचे दर्शन होणारा किंवा उघड्यावरचा मुक्काम अधिक संस्मरणीय राहिला आहे हा माझा अनुभव असल्यामुळे मला अतिशय आनंद झाला . इथे नागेश्वर मंदिरामध्ये एका कुटुंबाची मोठी पूजा चालली होती . त्यांच्या जवळपास शंभर एक नातेवाईक जेवायला होते . मी आलेला पाहून त्यांनी मला देखील भोजन प्रसाद घेण्याची विनंती केली . सर्वात वरच्या मजल्यावर स्वयंपाक घर होते . तिथेच सज्जावर बसून भोजन केले . दाल भाटी मलिदा खाल्ला आणि खाली येऊन उघड्या व्हरांड्यात अगदी नर्मदेच्या काठावर आसन लावले ! इथे अजून काही परिक्रमावासी भेटले . एक मध्य प्रदेशचेच काका सायकलवर परिक्रमा करत आले होते . यांनी सुरुवात पायी केली होती . परंतु नंतर पायाला त्रास होऊ लागला म्हणून त्यांनी एक सायकल विकत घेतली . आणि पुढची परिक्रमा सायकलने पूर्ण करत होते .
धार मध्य प्रदेश इथले हेच ते सायकल वर निघालेले काका . 
एका यूट्यूब चैनल वर त्यांची लघु मुलाखत सापडली . त्यातील फोटो
हा घाट अतिशय सुंदर असल्यामुळे आज इथेच थांबावे असे वाटत होते . त्यामुळे मी आज पायांना विश्रांती द्यायची असे ठरविले . अधून मधून एखादा दिवस असा विश्रांतीचा घ्यावा . यामुळे पायाला खूप आराम मिळतो . तसे जर मी दुपारीच पुढे निघालो असतो तर अजून बरेच अंतर तोडू शकलो असतो . परंतु नर्मदेचे इतके सुंदर रूप ते ही निवांत बसल्या जागी पाहायला मिळते आहे , त्यामुळे थांबण्याचा निर्णय घेतला . तो योग्यच होता असे पुढे लक्षात आले . इथे दुपारी झोप काढण्यापेक्षा गावातील सर्व मंदिरे पाहून यावीत असा विचार मनात आला आणि बाहेर पडलो . एक एक करत सर्व मंदिरांमध्ये जाऊन दर्शने घेतली . मोठ्या शहरात आलोच आहे तर कुठे स्लीपिंग बॅग मिळते का ते पाहावे असा विचार करून मी नर्मदेच्या काठावर असलेल्या बाजारपेठेत एक चक्कर मारली . इथे एक मॉल होता . मी मॉलमध्ये स्लीपिंग बॅग मिळते का हे पहावे म्हणून आत मध्ये शिरलो . पाच-सहा दुकाने पाहिली असतील इतक्यात जोरजोरात शिट्ट्या वाजवत तिथला रखवालदार माझ्या अंगावर धावून आला . त्याने दंडाला धरून मला बाहेर ढकलले आणि म्हणाला , " भागो यहासे । यहा भीक मांगने का नही । " मला वाईट वाटले . मी परिक्रमावासी होतो . भिकारी नव्हतो . परंतु यामध्ये त्याचा दोष नव्हता . आपण स्वीकारलेल्या नवीन आधुनिक समाज व्यवस्थेमध्ये साधू संतांचे कपडे घालणारा मनुष्य , किंवा पारंपारिक भारतीय वस्त्रे घालणारा भिकारी असतो ,असेच लहानपणापासून शिकवले जाते . याउलट (बेरोजगार असूनही ) टाय शर्ट पँट बूट कोट घालून फिरणारा मनुष्य साहेब असतो ,असे आपण बालमनावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे बिंबवत असतो .  मी आपण होऊन पुढे जाणार होतो . इतक्यात हा सर्व प्रकार पाहणारे तिथले दुकानदार होते त्यातील एक जण म्हणाला , " नही जा रहा है , तो धक्के मारके बाहर करदो । " त्याचे हे शब्द कानावर पडले मात्र " आता माझी सटकली " अशी माझी अवस्था झाली . मी त्याला हाताने इकडे बोलावले . तो क्षणभर घाबरला . मी जोरात ओरडलो , " एक्सक्युज मी ! कॅन यू प्लीस कम हीअर फॉर अ मिनट ? " दुकानदार धावतच मॉलच्या दारापाशी आला . आता काहीतरी मोठे प्रकरण होणार असे वाटून अजून चार-पाच दुकानदार तिथे गोळा झाले . मी त्या दुकानदाराला विचारले , " डू यू नो हू आय ऍम ? " " नो सर " दुकानदार उत्तरला . " सर ? "  मी म्हणालो . "अभी एक मिनिट पहिले तो मुझे भिकारी बोल रहे थे । धक्के मारने की बात कर रहे थे । " " अरे वो तो मै उसे बोल रहा , था साहब को क्या चाहिये पूछ लेना । " आता या सर्वांचे सामुदायिक प्रबोधन होणार होते . कारण माझा 'बावळा वेश ' बघून मला भिकारी समजणारे हे लोक केवळ इंग्रजीतले एक दोन वाक्य काय बोललो ,लगेच सर म्हणून मान देऊ लागली होती . या दोन्हीही घातक गोष्टी आहेत . एखाद्याचा वेश बघून जसे त्याला जोखू नये , तसेच केवळ इंग्रजी भाषा येते आहे म्हणून फार मोठा विद्वान आहे असे देखील समजू नये ! मी त्या सर्वांना समजावून सांगायला सुरुवात केली . हे पहा मित्रांनो मी आता नर्मदा परिक्रमा करतो आहे . त्यामुळे मी हा साधू वेश धारण केलेला आहे . परंतु या वेशाची एक गरीमा आहे . प्रतिष्ठा आहे . पावित्र्य आहे. तुम्ही आज तिच्यावरती आघात केलात . तुम्ही एक सर्वसामान्य दुकानदार आहात .यातील बहुतांश दुकाने भाड्या ची आहेत , स्वतःची नाहीत हे मी न विचारता सांगू शकतो . मालकाला कोणी एक फोन लावावा आणि तुम्ही रस्त्यावर यावे ही तुमची खरी योग्यता आहे !  या पाट्या बघा . ३० टक्के ऑफ ! ५o टक्के ऑफ ! सेल सेल ! अशा पाट्या लावाव्या लागत आहेत कारण तुमच्या दुकानातला माल हालत नाही . साधी आपल्याजवळ असलेल्या मालाची विक्री कशी करावी याची देखील अक्कल तुम्हाला नाही . अशाप्रसंगी समोर एखादे गिऱ्हाईक आले असेल तर त्याचे स्वागत करायचे सोडून तुम्ही त्याला बाहेर घालवत आहात . केवळ त्याचा वेश बघून तुम्ही अंदाज लावत आहात की याच्याकडे किती पैसा असेल किंवा किती क्रयशक्ती असेल ! इतके तर तुम्ही मूर्ख आहात ! मी मुद्दाम बोलताना अधून मधून इंग्रजी मध्ये बोलत होतो . दुकानदार माना खाली घालून मुकाट्याने ऐकून घेत होते . आता माझा मोर्चा मी वॉचमनकडे वळवला . आता या म्हाताऱ्याचे वय पहा . ६५ ते ७० वय आहे .आणि अजून बिचारा वॉचमन ची नोकरी करतो आहे . याचा अर्थ तरुणपणी याने गोट्या खेळलेल्या आहेत . पराक्रमाचे वय वाया घालवल्यामुळे आणि आयुष्यात काहीच उभे न केल्यामुळे आता घरातल्या लोकांनी याला कामावरती हाकलला आहे . आज जर यानी ही नोकरी सोडली तर घरातले लोक याला दारात उभे करणार नाहीत . ही तर याची खरी योग्यता आहे . तरी देखील एखाद्या परिक्रमावासी वर याचा रुबाब पहा ! एक लक्षात ठेवा मित्रांनो , ही नर्मदा परिक्रमा आहे . हिची एक उदात्त परंपरा आहे . या परंपरेचा आदर झालाच पाहिजे ! तुम्ही २४ तास जिच्यासाठी जगताय त्या मोह मायेचा त्याग केलेला मनुष्यच या परिक्रमेमध्ये टिकत असतो . असा कोणी मनुष्य चुकून माकून तुमच्या दारात आलाच , तर किमान त्याला भिकारी तरी म्हणू नका . खरे भिकारी तुम्ही आहात . तुमच्या आयुष्यातला पैसा काढून घेतला तर तुमची किंमत शून्य आहे . कोणी गिऱ्हाईकाची भीक मागते आहे .तर कोणी नोकरीची भीक मागते आहे . सर्वजण खजील झाले होते . माझा स्वर मी बदलला आणि समजूतीच्या स्वरात सांगू लागलो . हे पहा मित्रांनो आपण सर्वजण भारतीय आहोत . आपण सर्वजण एकच आहोत . दिसण्यावरून कपड्यांवरून भाषेवरून कधी कोणाची पारख करायला जाऊ नका . आपली भारतीय संस्कृती परंपरा खूप उदात्त आहे . तिचे पतन करण्यासाठी इंग्रजांनी आपल्याला या चुकीच्या गोष्टी शिकवून ठेवलेल्या आहेत .आणि विविध माध्यमातून आजही शिकवत आहेत . अधिक शिकलेला तो अधिक विद्वान , अधिक चांगले ब्रॅण्डेड कपडे घालून फिरेल तो अधिक श्रीमंत , अधिक आधुनिक राहतो तो अधिक आधुनिक विचारांचा या सर्व अंधश्रद्धा आहेत ! कधीही अनुमानामध्ये अडकू नका . अनुभव हाच आपला श्रेष्ठ गुरु आहे !  मी बोललो ते वाक्य वॉचमनच्या जिव्हारी लागले होते . तो रडू लागला . मी मुद्दामहून टोचून बोललो होतो . मी त्याला मिठी मारली . तो माझ्या पाया पडू लागला . " मुझे माफ करना बाबा । गलती हो गई । " मी देखील त्याच्या पाया पडलो आणि म्हणालो , " आप बुजुर्ग है । मैने आपके पाव छूने चाहिये । और आप केवट लोग तो बडे पुण्यशाली है । मैया की कोक मे पले बढे हो । " आता मात्र वाचमन आ वासून माझ्याकडे बघू लागला . " मी केवट आहे हे तुम्हाला कसे कळले ? "
 मी हसू लागलो . ही नर्मदा मातेची कृपा होती . माणसे कशी दिसतात , कशी जगतात , कशी असतात हे गेले काही दिवस ती मला रोज दाखवत होती . त्यामुळे चेहरा पाहता क्षणी माझ्या लक्षात आले होते की हा केवट समाजाचा मनुष्य आहे . लहानपणी हा नर्मदेमध्ये भरपूर खेळलेला असणार आहे . परंतु पुढे वडिलोपार्जित व्यवसाय न केल्यामुळे , आणि जग जाते म्हणून आपणही शहराकडे गेल्यामुळे , त्याच्यावरती ही अवस्था आली होती . त्याला मात्र हा चमत्कार वाटून त्याने नमस्कार केला होता . पुन्हा एकदा सांगावेसे वाटते की या जगात चमत्कार नावाची गोष्ट अस्तित्वात नसते . आपल्याला ज्या घटनेचा कार्यकारणभाव कळत नाही तिला आपण चमत्कार म्हणतो . भारतामध्ये पहिली रेल्वे धावली तेव्हा लोकांना भूत आले असे वाटून ते पळत सुटले होते . पहिला वायरलेस मोबाईल कॉल जेव्हा मी पाहिला तेव्हा मला तो चमत्कार वाटला होता ! थोडक्यात चमत्कार म्हणजे आपले अज्ञान असते . प्रत्येक घटनेला स्वतःचा कार्यकारणभाव असतोच . तो एकदा समजला की मग तो चमत्कार राहत नाही . दुकानदाराने दबक्या आवाजात विचारले , " वैसे आपको क्या खरीदना था सर ? " मी म्हणालो , "मुझे स्लीपिंग बॅग चाहिये था । " "वो क्या होता है ? " एकाने विचारले . जाऊदे सोडा . मला आता स्लीपिंग बॅग घ्यायची नाही . तो विषय मी रहित केला आहे . असे सांगून मी सर्वांना नर्मदे हर केले आणि पुढे निघालो . हेच मी पाच मिनिटांपूर्वी सुद्धा करू शकलो असतो . परंतु त्यावेळी मी निघून गेलो असतो तर कदाचित या लोकांचा दृष्टिकोन पालटण्याचे कार्य राहून गेले असते . नर्मदा माता ,जी प्रेरणा आतून देत राहते तसे वागत राहायचे बास ! इथे खरे म्हणजे माझी चूक होती . माझ्याकडे सर्व काही झोपण्याची व्यवस्था असताना , उगाच स्लीपिंग बॅगची हव्यास हवीच कशाला ? परंतु त्या क्षणापूरती ती इच्छा मला झाली होती हे मात्र खरे . असो .
शहरामध्ये पुढे न फिरता शांतपणे घाटावर जायचे असे ठरवून मी घाटावर परतलो . मी परिक्रमेसाठी आलो होतो , पर्यटनासाठी नाही याची जाणीव माझ्या शहरी वातावरणात घडलेल्या मनाला मी करून दिली .घाटावरचे वातावरण खूपच सुंदर होते . इथे नर्मदेच्या मधोमध एक कारंजे लावले होते . हे दिवस रात्र चालू असायचे . मला ते मध्यभागी लावले आहे असे वाटले . परंतु जेव्हा मी समोरच्या तटावरून ते कारंजे पाहिले तेव्हा मला कळले होते की ते दहा टक्के अंतरावरच लावले होते ! इतके हे पात्र विस्तीर्ण आहे .शेकडो भाविक इथे येऊन नर्मदेची आरती पूजा करतात . घाटावर बसून स्नान करतात . संध्याकाळी इथे सुद्धा आरती असते . विनोद दुबे गुरुजी नावाचे एक अतिशय तेजस्वी रेवाभक्त अनेक तरुणांना सोबत घेऊन गेली ३३ वर्षे नित्यनेमाने इथे नर्मदेची सामूहिक सायं आरती करत आहेत . ही आरती पाहायला खूप लोक येतात . अतिशय संथ गतीने सावकाश स्पष्ट उच्चार करत छान अशी आरती आणि नर्मदाष्टक यांनी म्हटले . मी इथे शंख वाजवण्याची सेवा केली . नंतर मी आरतीचे साहित्य ठेवायला त्या तरुणांसोबत आणि गुरुजींसोबत जुन्या नर्मदा मंदिराच्या ओसरी मध्ये गेलो . इथले तरुणांचे संघटन पाहून बरे वाटले . मध्यंतरी या घाटावर काही धर्मांध लोकांनी ताबा मिळवायचा प्रयत्न केला होता .
 तेव्हापासून या घाटावर अशा पाट्या लावलेल्या आहेत .
आपले सांस्कृतिक वारसे जतन करणे ही आपली जबाबदारी आहे
दुबे गुरुजी म्हणजे नर्मदापुरमचे भूषण आहेत . घारे डोळे तेजस्वी चेहरा आणि करारी वागणे बोलणे ! गुरुजींनी मला सांगितले की एकदा तर महापुरामुळे नर्मदापुरम शहरांमध्ये पाचशे मीटर पाणी घुसले होते . तर त्यानंतर जी जमीन होती तिथे उभे राहून त्यांनी आरती केली होती . परंतु आरती मध्ये खंड पडला नव्हता ! हे दुबे गुरुजी रोज तरुणांना एकत्र करून व्यायाम सुद्धा घ्यायचे . नदीचा घाट ,तरुण कार्यकर्ते , व्यायाम आणि गुरुजी म्हटल्यावर कुठल्याही महाराष्ट्रीय माणसाला आठवण येते ती संभाजीराव विनायकराव भिडे गुरुजी यांची ! त्यात मी मूळचा सांगलीचा असल्यामुळे अगदी नकळत्या वयापासून गुरुजींसोबत कृष्णा नदीच्या विष्णू घाटावर व्यायामाला जात असे . नंतर माझा फारसा संपर्क त्यांच्याशी राहिला नाही .  केवळ पौष पौर्णिमेच्या आसपास असणाऱ्या त्यांच्या गडकोट मोहिमांना मी जायचो . परंतु नर्मदे काठी मात्र आज मला प्रकर्षाने भिडे गुरुजींची आठवण झाली .  यावर्षी पौष पौर्णिमा परिक्रमेदरम्यानच आली असल्यामुळे मोहीम देखील बुडली होती . मी आसनावरती पडून हा सर्व विचार करत होतो . इतक्यात एक तरुण परिक्रमावासी आला . नर्मदे हर ! सर्वांनी एकमेकांना पुकारा केला . आता या ओसरीमध्ये जवळपास पंधरा परिक्रमावासी उतरले होते . त्यामुळे त्याला आसन लावायला जागा शिल्लक राहिली नव्हती . मी माझे आसन थोडेसे एका बाजूला सरकवून त्याच्यासाठी जागा केली आणि म्हणालो , "बाबाजी आईये । यहा आसन लगाये । " "धन्यवाद ! " म्हणत त्या तरुणाने आसन लावले . "बहुत अंधेरा किया आपने आने मे । " मी त्याला म्हणालो . तो म्हणाला , "नही ।वैसे मै जल्दी आया था । लेकिन नीचे आरती के लिए रूका था । उसके बाद धर्मशाला ढूंढ रहा था । " " आज कहा से निकले हो ? " मी ठराविक प्रश्न विचारत होतो . अशा चर्चेमधून कोण किती चालते आहे याचा अंदाज येतो . " सुबह भटगाव से निकला था । " परिक्रमावासी ने सांगितले . बापरे म्हणजे माझ्या दुप्पट तिप्पट वेगाने हा तरुण चालत होता ! काळा सावळा वर्ण .शिडशिडीत देहयष्टी . व्यायामाचे पिळदार शरीर . आणि तेजस्वी चेहरा ! मला या परिक्रमावासी बद्दल खूप आदर वाटला !  "वैसे आप कहा से हो ? " मी विचारले . " सोलापूर " तो उत्तरला . "सोलापूर म्हणजे मराठी का तुम्ही ? " "होय मराठीच की ! " तरुण हसत सांगू लागला ! "सोलापुरात कुठं ? " "अहो मी पंढरपूरचा आहे " "अरे वा ! पंढरीचे जन । अवघे पावन ! " मी म्हणालो आणि बसल्या बसल्याच त्याच्या पाया पडलो . "राम कृष्ण हरी ! " तो देखील माझ्या पाया पडला . " एकमेका लागतील पायी रे । " दोघांनाही खूप आनंद झाला ! "म्हणजे तुम्ही वारकरी दिसताय " मी म्हणालो . तो म्हणाला "तसे आपण सर्व मराठी लोक वारकरीच असतो . पण मी धारकरी सुद्धा आहे . " माझे डोळे चमकले ! इतका वेळ ज्या भिडे गुरुजींचा मी विचार करत होतो त्यांच्या पाईकांना महाराष्ट्रात धारकरी म्हणून ओळखतात ! "मी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चा धारकरी आहे " तरुण सांगू लागला . "आपले नाव दादा ? " "मी महेश राजू निकम . मुक्काम पोस्ट पंढरपूर "  मी मघापासून भिडे गुरुजींचाच विचार करतो आहे हे मी त्याला सांगितले. तो म्हणाला "अहो मला इकडे यायला उशीर झाला कारण मी आता फोनवर गुरुजींशीच बोलत होतो . ते आज आमच्या गावामध्ये बैठकीसाठी आले होते .आता सांगलीला निघाले असतील . " असे म्हणत त्याने पुन्हा एकदा ज्या कार्यकर्त्याकडे गुरुजी थांबले होते त्याला फोन लावून चौकशी करून घेतली .गुरुजी सांगलीला जायला निघाले होते . "उद्या सकाळी गुरुजी कुठे असतील ते मला माहिती आहे .मी तुम्हाला सकाळी गुरुजींशी बोलायला देतो " महेश म्हणाला . "अरे पण मी गुरुजीं शी फोनवर कधीच बोललेलो नाही . " मी म्हणालो . "अहो दादा तुम्ही बोलून तर बघा ! त्यांना किती आनंद होईल माहिती आहे का ! मी परिक्रमा करतो आहे कळल्यावर त्यांना फार आनंद झाला ! " महेश सांगू लागला . ती रात्र आम्ही दोघेही अखंड गप्पा मारत राहिलो ! आमच्या दोघांची नाळ जुळली होती ! आजूबाजूचे परिक्रमा वासी वैतागून झोपा आता ! झोपा आता ! असे आम्हाला सांगत राहिले .  परंतु आमच्या गप्पा तेव्हाच थांबल्या जेव्हा अतिशय थकलेला महेश बोलता बोलता झोपी गेला ! तो फारच वेगाने चालत होता ! सरासरी ५० -६० किलोमीटर अंतर तो रोज कापत होता .हे वाटते तितके सोपे नाही . अतिशय थकविणारी ही प्रक्रिया आहे . माझी मात्र झोप उडून गेली होती . त्यामुळे मी घाटावर एक फेरफटका मारायला निघालो . नर्मदेच्या काठाकाठाने मी चाललो होतो . घाटावरती दिवे चालू असल्यामुळे उजेड चांगला होता .  पाण्यावरून सीगल पक्षी वेगाने उडत होते . उडता उडता चोच पाण्यामध्ये बुडवून ते पाणी पितात किंवा मासे पकडतात . एक पक्षी तर मध्ये असलेल्या कारंजातील पाणी पिताना मी पाहिला .  नर्मदेचे पाणी अंधारलेले होते . सर्वत्र निरव शांतता होती . दिवसभर लोकांनी वाहिलेल्या पूजा साहित्यामुळे घाण झालेले पाणी पुढे वाहून गेले होते . आता स्वच्छ पाणी होते ते थोडेसे प्यावे म्हणून खाली वाकलो आणि एकदम माझ्या काळजामध्ये धस्स झाले ! समोर काळेभोर केस असलेले एका महिलेचे पालथे डोके तरंगताना दिसले . गळ्यामध्ये सोन्याचे अलंकार होते . नीट पाहिल्यावर तिचे हात सुद्धा मला दिसले . बहुतेक कोणीतरी पाय घसरून पडले असावे . का आत्महत्या केली असावी ? पोलिसांना कळवावे असा विचार करून मी आजूबाजूला कोणी दिसते का ते पाहू लागलो . दूरवर एक बुटकासा मनुष्य नर्मदे काठी काहीतरी करत होता . मोठे चुंबक पाण्यामध्ये टाकून त्याला चिकटलेले पैसे गोळा करण्याचे काम तो करत होता . मी त्याला आवाज दिला . "भाईसाहब जल्दी इधर आइये । " "आया बाबाजी । क्या हुआ ? " "ये देखो पानी मे । " मी तरंगणारे ते धड त्याला दाखवले . तो मोठ्यांना हसायला लागला ! "यह ? अरे बाबा जी यह क्या है बताता हु । " त्याने आजूबाजूला बघत एक मोठी बांबूची काठी आणली आणि काठीने ते धूड अलीकडे ओढले . संरक्षणासाठी बांधलेल्या साखळीच्या कठड्यांच्या पलीकडे ते धूड होते . केसांना धरून त्यांनी ते बाहेर काढले . ही पाण्यामध्ये विसर्जित केलेली दुर्गा मातेची मूर्ती होती ! त्याने लगेच तिच्या कानातले गळ्यातले हातातले अलंकार काढले . "ये सब झूठे है । इसमे कुछ भी सोने का नाही । " असे म्हणत त्याने ते लांब पाण्यात फेकून दिले . मूर्तीचे केस अगदी खऱ्या केसांसारखे वाटत असल्यामुळे मला खरोखरीच स्त्रीचे कलेवर पडले आहे असा भास झाला होता . आभास आणि वास्तव यात नेहमीच मोठे अंतर असते . 'आप इतने रात गये यहा क्या कर रहे है ? क्या नाम है आपका ? " मी त्या माणसाला विचारले . अतिशय छोटी चण असलेला तो मनुष्य (हिंदी भाषेत )बोलू लागला . सांगतो सांगतो .  सगळं सांगतो . माझं नाव कृष्ण गोपाल यादव . माझे आई-वडील लहानपणीच गेले . एक भाऊ आहे . त्याचे लग्न झालेले आहे .त्याला मुलेबाळे आहेत . वडिलांचे घर जमीन सर्व भावाने लाटले . माझे लग्न झालेले नाही . म्हणजे मी अविवाहित आहे . पण ब्रह्मचारी नाही ! खोटे कशाला बोलू ! मैयाच्या समोर आहे . खोटे काही सांगणार नाही . खूप झाडांची फळे मी खाल्ली आहेत . आता फक्त मैया आणि मी असे दोघेच जगतो आहोत . म्हणजे मी मैयाच्या काठावर एक झोपडी बांधून राहतो . दिवसभर दारू पिऊन मी झोपून टाकतो . रात्र झाली की इकडे येतो . मला काय हवे काय नको त्याचा हिशोब करूनच मी इकडे येतो . समजा मला आज नवीन कपडे घ्यायचे आहेत , किंवा नवीन बूट घ्यायचे आहेत , तेल तूप आणायचे आहे , तर मी तसा हिशोब करून मैय्याला सांगतो , की आज मला साडेचारशे रुपये हवे आहेत . आणि हे पावरफुल चुंबक मला मैय्यामध्ये सापडले होते त्याला दोरी बांधून मैयामध्ये फेकून देतो . मैया ची कसम सांगतो तुम्हाला ! बरोबर मला जितके पैसे हवेत तितके पैसे मैय्या त्या दिवशी देतेच ! एका फेकण्यामध्ये नाही मिळत . पण रात्रभर बसल्यावर मिळून जातात . कधी कधी मला काहीच नको असते त्या दिवशी काहीच मिळत नाही . पण मला हिला भेटल्याशिवाय मला चैन पडत नाही म्हणून मी रोज येतो . दिवसा येत नाही कारण दिवसा येथे दुसरे लोक पैसे गोळा करतात . त्यांच्याशी भांडण नको म्हणून मी आपला रात्री येतो . दिवसभर भाविक लोक पैसे फेकत असतात . त्यातली ठराविक नाणी या चुंबकाला चिकटतात . ठरलेले दुकानदार माझ्याकडून सुट्टे पैसे घेतात . मग सकाळी घरी जाऊन मी मस्त स्वयंपाक करून जेवतो . दारू पितो आणि झोपून टाकतो ! भाड मे गयी दुनियादारी ! हमको हमरी मैया प्यारी ! 
त्याचे जगण्याचे ही तत्त्वज्ञान ऐकून मी हतबुद्ध झालो होतो . नर्मदा मैया कोणाकोणाला सांभाळते आहे हे पाहून अचंबा वाटत होता . मला तो पैसे कसे गोळा करतो हे पाहायचं होतं . त्याने देखील मला कुठलेही आढेवेढे न घेता पैसे कसे गोळा करतात ते डेमो करून दाखवले . चुंबक फेकतानाच तो मैय्याला म्हणाला , "मैया आज सिर्फ बीस रुपये दे दे । बाकी सब है आज ।" त्याच्याकडे स्वयंपाकाचे सर्व सामान शिल्लक होते .  फक्त वीस रुपयाची दारू त्याला प्यायची होती . त्याला खरोखरच किती पैसे मिळतात हे मला पहायचे होते . दोन-तीन फेकींमध्ये अठरा रुपये गोळा झाले . मला एकदा फेकून पहायचे होते ! त्याने मला दोरीची गुंडाळी कशी करायची इथपासून , चुंबक लांब कसे फेकायचे कसे ओढायचे सर्व शिकवले . मी चुंबक फेकले आणि ओढू लागलो . तो म्हणाला दोन रुपये निघतील .जास्त निघणार नाहीत . प्रत्यक्षात तीन नाणी चिकटलेली दिसली . त्यातले एक नाणे दोन रुपयाचे होते . आणि बाकीचे दोन लोखंडाचे साधे गोल होते ! ती नाणी नव्हतीच ! "ये अगरबत्ती का ढक्कन है । " त्याने सांगितले . वीस रुपये गोळा झाल्यावर यादव मोकळा झाला ! कधी कधी पाचशे रुपयाची नोट सुद्धा तरंगताना सापडल्याचे त्यानी मला सांगितले . यादव आता निवांत झाला . एका कट्ट्यावर आम्ही दोघे गप्पा मारत बसलो . तो मला सांगू लागला . त्याने सारी दुनियादारी केलेली होती . भाऊ भावजयी साठी घर यानेच उभे केले . भावाची मुले हीच आपली मुले असे समजून त्यांना सांभाळले . याचे वय साधारण पन्नास असले तरी छोटीशी उंची असल्यामुळे आणि चांगले टकाटक राहण्याची सवय असल्यामुळे अजूनही हा तरुण मुलासारखा हिरोगिरी करत फिरायचा ! तरी देखील त्याने स्वतःचे लग्न लांबणीवर टाकले . परंतु एवढे सर्व करून नातेवाईकांनी फसवल्यावर त्याचे डोळे उघडले . नर्मदेमध्ये जीव देण्यासाठी गेला . जीव देण्यासाठी त्याने उडी मारली असता नेमके पाणी उथळ निघाले आणि तिथे त्याला मोठे चुंबक सापडले ! त्याला काही नाणी चिकटलेली होती ! ते पाहून त्याला ही युक्ती सुचली ! साक्षात नर्मदेने आपल्याला ही युक्ती सुचवली असे त्याचे मत झाले . "जगामध्ये जगण्यासाठी फार काही लागत नाही ! तुमचा हेतू शुद्ध पाहिजे ! " यादव मला सांगू लागला . तिथून पुढे मी ठरवले . आता जगायचे फक्त नर्मदेसाठी .  आणि नर्मदेच्याच जीवावर ! मैया कसम तुम्हाला सांगतो बाबाजी ! मला जे हवे ते ती झोपडी मध्ये आणून देते ! अगदी जे हवे ते ! डोळा मारत त्याने विचित्र इशारा केला . त्याला वीस रुपये हवे होते आणि वीस च रुपये मिळाले हे मी स्वतः पाहिले होते . त्यामुळे हे देखील खरे असण्याची शक्यता होती . नर्मदा खंड अशा असंख्य अनाकलनीय घटनांनी भरलेला आणि भारलेला आहे .एखाद्या सर्वसंगपरित्यागी योगी पासून ते या यादव सारख्या भोगीपर्यंत सर्वांना जे हवे ते इथे सहज मिळते आहे अशी अनुभूती आहे . सारे अद्भुत आहे . यादव ने सांगितलेले काही अनुभव इथे सांगता येण्यासारखे नाहीत . परंतु त्यामुळे नर्मदा कुठल्या कुठल्या स्तरावर काम करते आहे हे मला निश्चितपणे कळले .
यादव ला नर्मदे हर केले आणि आश्रमामध्ये येऊन पाठ टेकली . पडल्या पडल्या डोळा लागला . सकाळी महेश निकमने हाक मारल्यामुळे जाग आली . याने काय पराक्रम केला होता याची मला कल्पनाच नव्हती ! मी झोपेत असताना एका हाताने मला हलवता हलवता दुसऱ्या हाताने याने एकांना फोन लावला होता . माझ्या हातात फोन देतो म्हणाला , " घ्या दादा . तुमच्यासाठी फोन आहे . " मी अर्धवट झोपेतून जागा झालेलो होतो . रोज वेगळ्या ठिकाणी झोपत असल्यामुळे झोपेतून उठल्यावर पहिली दोन-तीन मिनिटे आपण कुठे आहोत हे समजून घेण्यात जायची . अशा अवस्थेमध्ये हा फोन मी कानाला लावला आणि पलीकडून आवाज आला , " नमस्कार .मी संभाजी भिडे बोलतोय . आपण कोण ? " एका क्षणात माझी झोप खाड करून उडाली ! ताडकन उठून मी उभा राहिलो ! "गुरुजी नमस्कार ! मी अमुक अमुक ! तमुक गांवचा ! " "हां . . हां . . आलं लक्षात . दक्षिण भारतात राहिलेले तेच ना ! " "होय गुरुजी !बरोबर ! " महेश निकम असा अचानक " शॉट " करेल याची मला कल्पनाच नव्हती ! मी धावतच घाटावर पळालो . सुमारे पंधरा मिनिटे गुरुजी माझ्याशी बोलले . यावर्षी परिक्रमे मध्ये असल्यामुळे मी मोहिमेला येऊ शकत नाही असे त्यांना सांगितल्याबरोबर ते म्हणाले , " यंदा आपली मोहीम रद्द झालेली आहे . परंतु मोहीम होणार आहे . लवकरच करू . पण तुम्ही जी परिक्रमा करत आहात ती देखील एक मोठी मोहीमच आहे . फार उदात्त परंपरा आहे ती ! मला फार आनंद वाटला की तुम्ही नर्मदा परिक्रमा करत आहात ! " गुरुजी सर्वांशी आदरानेच बोलतात . सर्वांना अहो जाहो करून बोलण्याची उपजत सवय त्यांच्या ठायी आहे . संभाजी महाराजांच्या बलिदानाची आठवण म्हणून गुरुजींनी जो बलिदान मास पाळण्याची प्रथा सर्वत्र सुरू केलेले आहे ती मी देखील काही वर्षे पाळत आहे . यावर्षीचा बलिदान मास परिक्रमेदरम्यानच येणार होता . तो मी इथेच पाळेन , असे गुरुजींना सांगितले . मी प्रथमच गुरुजींची फोनवर बोलत होतो . मी परिक्रमा कुठून सुरू केली ?कुठे संपणार आहे ? रोज मी किती अंतर चालतो आहे ? अजून साधारण किती दिवसाची चाल बाकी आहे ?हे सर्व प्रश्न गुरुजींनी मला विचारले आणि मी यथाशक्ती ,यथामती त्यांची उत्तरे द्यायचा प्रयत्न केला . माझा स्वतःच्या कानांवर विश्वास बसत नव्हता ! माझ्या मनात गुरुजींचे स्मरण काय व्हावे आणि नर्मदा मातेने थेट गुरुजींचा संपर्क घडवून द्यावा ! हे किती अद्भुत आहे ! यापूर्वी मी गुरुजींना पत्र लिहीत असे . ते देखील नेहमी सर्वांना सांगतात की मला चार ओळी खरडत जा . अन नेमके परिक्रमा सुरू केल्याचे पत्र त्यांना पाठवायचे राहिले होते . परंतु तो निरोप अशा पद्धतीने नर्मदेच्या कृपेनेच गुरुजींपर्यंत पोहोचला ! गुरुजींच्या अंत:करणामध्ये नर्मदा माते विषयी किती उदात्त विचार आणि पूज्य भावना आहेत हे देखील मला त्या दिवशी त्यांच्याच मुखातून ऐकायला मिळाले , आणि साक्षात नर्मदेच्या साक्षीने ऐकायला मिळाले , हे मी माझे परम भाग्य समजतो ! 
  पू. संभाजीराव भिडे गुरुजी 
नव्वदीच्या उंबरठ्यावर असताना आजही भिडे गुरुजी भल्या पहाटे उठून स्वतः व्यायाम करतात व तरुणांनाही व्यायामाला लावतात . 
सांगली येथील विष्णू घाटावर भिडे गुरुजी रोज पहाटे व्यायाम करतात . मागे वाहणारी कृष्णामाई दिसते आहे . 
गुरुजींनी लिहिलेले हे सर्व प्रेरणादायी श्लोक , नुसते कोरडे शब्द नसून त्यांना अनुभवाची जोड व खोली आहे .त्यामुळे त्याचा प्रत्यक्ष फायदा मला माझ्या नर्मदा परिक्रमेमध्ये वेळोवेळी झालेला आहे . 
(सर्व चित्रे संग्रहित )

नर्मदा परिक्रमा नक्की पूर्ण होईल असा आशीर्वाद गुरुजींनी फोनवर दिला .  परिक्रमा पूर्ण होणे किती कठीण परंतु महत्त्वाचे आहे हे मध्ये अधे परिक्रमा सुटलेल्या लोकांचे अनुभव ऐकल्यावर लक्षात येत होते .
गुरुजींच्या आशीर्वचनामुळे आजचा दिवस अतिशय आनंदामध्ये उगवला ! महेश निकम याची गती माझ्यापेक्षा अधिक असल्यामुळे त्याला पुढे जाण्याची विनंती केली . दोघे एकत्रच निघालो . पुढे एक दोन छोटे घाट लागले . तिथून महेश वर गेला आणि मी काठाने थोड्या कठीण मार्गाने चालत राहिलो . 
 काठावरचा मार्ग
पुढे होशंगशहाचा किल्ला आडवा आला . 
नर्मदेकाठी बांधलेला होशंग शाह कोट
  पाण्यात बुडलेला बुरुज
इथे प्रचंड काटे कुठे घालून एक कुंपण केले होते . मी प्रयत्नपूर्वक त्या कुंपणावरून उडी मारली . पुढे जाऊन पाहतो तो किल्ल्याची उभी तटबंदी नर्मदेमध्ये बुडालेली होती म्हणजे रस्ताच नव्हता ! आता परत येता येणे अशक्य होते ! इतक्यात महेश निकम पुन्हा माघारी येताना दिसला . त्याला आवाज दिला व त्याने मोठ्या शिताफीने मला बाहेर काढले . या किल्ल्याची भिंत मावळ्यां प्रमाणे चढून दोघे मार्गस्थ झालो .
 पुढे घाट दिसताच त्याने डांबरी मार्ग धरला व मी नर्मदा मार्ग पकडला . याच  मार्गावरून चालता यावे म्हणून तर परिक्रमा करायची !



लेखांक त्रेपन्न समाप्त ( क्रमशः)

मागील लेखांक

पुढील लेखांक

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

जे आवडते सर्वांना ...

अनुक्रमणिका

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

लेखांक १ : नर्मदे हर !

लेखांक २ : भोपाळ जवळच्या जंगलातील अपघात

लेखांक ४ : झुठा कही का ! सबकुछ तो लाए हो !

लेखांक ३ : चोराची धन

लेखांक ५ : ग्वारीघाट जबलपुर मध्यप्रदेश

लेखांक ८३ : महाराष्ट्रात प्रवेश आणि भाबरीचे भेदक भिल्ल-महात्मा फोदला गारद्या पावरा

लेखांक ७४ : लेपा बांध , वेदा संगम , कठोरा अन् मांडव्य गुंफा

लेखांक ९० : गुजरात मधील कणजी चे सान्सुभाई तडवी आणि अरण्यव्याप्त माथासर