लेखांक ५४ : कोकसर ची गौरीशंकर महाराजांची संजीवन समाधी आणि आवली घाट
नर्मदापुरम् मधुन निघताना परमहंस परिव्राजकाचार्य श्री लोकनाथ तीर्थ स्वामी महाराज यांच्या फोटोचे दर्शन घेऊन निघालो होतो . टेंबे स्वामी परंपरेतील महाराजांचा संप्रदाय आध्यात्मिक क्षेत्रामध्ये अतिशय पूजनीय मानला जातो . गुळवणी महाराज ,दत्त महाराज कवीश्वर , ढेकणे महाराज असे अनेक साक्षात्कारी संत या परंपरेमध्ये होऊन गेले . या परंपरेतील एक मठ देखील इथे रस्त्याने गेल्यावर लागतो . परंतु मी किनारा पकडल्यामुळे या मठाचे दर्शन घेऊ नाही शकलो .
मागील लेखांक
पुढील लेखांक
प.प. श्री लोकनाथ तीर्थ स्वामी महाराज
होशंगशाह चा किल्ला ओलांडल्यावर राजघाट स्मशान भूमीपासून मी पुन्हा एकदा मैया चा काठ धरला .या मार्गे शक्यतो कोणी परिक्रमा वासी जात नाहीत.मध्ये स्मशाने लागतात . परिक्रमेमध्ये अशी शेकडो स्मशाने ओलांडली . परंतु त्याचे काहीच वाटत नाही . बैतूल भोपाळ प्रवासामध्ये ज्या पुलावरून मैया पाहिली होती ,आणि नर्मदा परिक्रमा करण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली होती तो पुल मी आता ओलांडत होतो ! या भागात बरेच पुल आहेत . रेल्वेचे दोन तीन पूल आहेत . एक सडक मार्ग पूल आहे आणि एका पुलाचे काम तिथे सुरू होते . पुलाच्या कामामुळे संपूर्ण किनारा मार्ग चालण्यासाठी बंद केला होता . इथे वाळूचे प्रचंड ढिगारे आहेत . मी इंजिनीयर लोकांना विनंती केली की मला इथून जाऊ द्या परंतु त्यांनी जाण्यास बंदी केली . मग मी थेट नर्मदेच्या पाण्यामध्ये उतरून कधी घोटाभर तर कधी गुडघाभर पाण्यातून चालत पुढे गेलो . यांनी सर्वत्र जाळ्या टाकून ठेवलेल्या आहेत .
बांधकाम सुरू असलेला पूल
उपग्रह नकाशातून पाचही पूल व्यवस्थित दिसत आहेत .निर्माणाधीन पुलाचे खांब दिसत आहेत .सर्वत्र प्रचंड वाळू आहे .
इथे काम करणाऱ्या कामगारांना मी ही कुठली नदी आहे विचारले तर त्यांना माहिती नव्हते . वाईट वाटले . आपण पोटासाठी मिळेल ते काम ,कष्ट अवश्य करावेत . परंतु हे काम कुठल्या नदीवर चालले आहे हे देखील आपल्याला माहिती नसेल तर त्यासारखे दुर्दैव ते दुसरे काय ? मी खालून गाडीचा पूल पाहू लागलो . केवळ दोनच महिन्यापूर्वी जयपुर वरून येणाऱ्या मूर्तींच्या ट्रकला अपघात झाल्यामुळे त्या मूर्ती दुसऱ्या ट्रक मध्ये भरून याच पुलावरून जाता जाता मी नर्मदा मातेचे डोळे भरून दर्शन घेतले होते ! आणि आज मी त्या मार्गावर चालत होतो ! आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना ! इथे दोन तरुण अंघोळ करत होते . त्यांनी पुला सोबत माझे फोटो काढून मित्राच्या क्रमांकावर पाठवले परंतु त्याच्याकडून ते डिलीट झाले . एकूण पाठविलेल्या फोटोंपैकी अर्ध्याहून अधिक त्यांच्या हातून डिलीट झाले . मित्राला आवडलेले फोटो त्यांनी इतरांना फॉरवर्ड केले . त्यातील एकाने संगतवार सेव केल्यामुळे काही फोटो परत आल्यावर मला मिळाले . तेच उरलेले फोटो आपण ब्लॉग मध्ये पाहत आहात . असो .
(ता. क . : वर उल्लेख केलेली छायाचित्रे नुकतीच मला माझ्या मावशीच्या मोबाईलवर सापडली ! आपल्या अवलोकनासाठी खाली देत आहे . नर्मदे हर ! )
हाच तो पूल ज्याच्या वरून प्रवास करताना खाली नर्मदा पात्रातून तीन परिक्रमावासींना जाताना पाहून प्रस्तुत लेखकाला नर्मदा परिक्रमा करण्याची तीव्रतम इच्छा उचंबळून आली होती ! त्या घटनेला तीन महिने पूर्ण होण्याच्या आत प्रस्तुत लेखक स्वतः त्याच मार्गावर नर्मदा मातेच्या कृपेने अग्रेसर झालेला होता ! परिक्रमेच्या सुरुवातीच्या लेखात या पुलावरून काढलेले चित्र आपल्याला दिसेल .
हाच तो तरुण आहे ज्याने माझ्यासोबत भरपूर फोटो काढून घेतले ! ती मुले नुकतेच स्नान करून कपडे घालत असताना मी इथे आलो ,आणि त्यांनी माझ्याशी भरपूर गप्पा मारल्या व फोटोसेशन सुरू केले ! हे सर्व फोटो सापडणे हा देखील मी एक चमत्कारच मानतो !
या पुलापर्यंत पोहोचल्यामुळे मला अतोनात आनंद झालेला होता ! नर्मदा मातेच्या काठी पूजन केल्यावर असे पांढरे आणि लाल झेंडे लावण्याची पद्धत इथे आहे !
इथे मागे उभ्या केलेल्या तात्पुरत्या तंबूमध्ये एका साधूचे अनुष्ठान सुरू होते . त्यांनी आत मध्ये बोलवून सुंदर असा चहा पाजला . तो तंबू आणि वरून जाणारा पूल या चित्रात दिसतो आहे . खाली दिनांक आणि वेळ दिसते आहे . मी दररोज रोजनिशी लिहीत असल्यामुळे प्रत्येक स्थानाचा दिनांक माझ्याकडे नोंदलेला आहे . इतिहासाचा विद्यार्थी असल्यामुळे घडून गेलेल्या घटनेच्या विश्वासार्हतेसाठी या लेखी नोंदी किती आवश्यक आहेत याची जाणीव मला आहे . मागे पाठीवर मी वाळत घातलेले धोतर दिसते आहे .
या भागातील नर्मदा मैया अतिशय उथळ , विस्तीर्ण , वालुकायुक्त आणि स्वच्छ , सुंदर आहे . हीच ती पवित्र नर्मदा मैय्या !
या मुलांनी भरपूरच फोटो काढले आहेत ! पायातील हे बूट आत मध्ये वाळू गेल्यामुळे सतत काही अंतराने काढून झटकून घ्यावे लागायचे ! समजा वाळू काढली नाही तर बुटाचे वजन वाढून चालताना पाय लवकर थकायचे !
नर्मदे काठी असे ध्वज जागोजागी खोचलेले दिसतात . पुरामध्ये हे सर्व वाहून जातात आणि एखाद्या धरणापाशी जाऊन थांबतात .
फडकणाऱ्या ध्वजावरून लक्षात येते की वारे सुटलेले आहे ! असे वारे चालताना फार सुखद असते ! तुम्हाला जणू काही मैया पाठीवरून प्रेमाने हात फिरवते आहे असा भास होतो !
वाळू मधून जाताना पायांचा कस लागतो . परंतु मी काही वाळूचा किनारा सोडला नाही . डोंगर वाडा गावात एकाने चहा पाजला . इथे अजून आठ-दहा परिक्रमावासी बसले होते . अतिशय सुंदर पद्धतीने सारवलेले अंगण होते . सर्वांना भरपूर चहा आणि पोटभर बिस्किटे खायला दिली गेली . यांच्यामध्ये काही मराठी परिक्रमा वासी देखील होते . ते सर्वजण गावागावातून निघाले आणि मी पुन्हा एकदा मैयाचा काठ पकडला . पुढे मैया काठाने चालत हसलपूर, रंढाल , बरंदुआ , तालनगरी ही गावे काठाकाठाने पार करत कोकसर अथवा खोखसर गाव गाठले .
एक ताल उपासक या नात्याने ताल नगरी हे गावाचे नाव मला खूप आवडले .
मी या मार्गाने चालायचो
गावातील रस्त्याने चालणाऱ्या लोकांना मात्र अशा पाट्या वाचायची नामुष्की येते .माझ्यावर मैय्याच्या कृपेने ती वेळ फारशी कधी आली नाही . दूरवर सिमेंटच्या पांढऱ्या खांबाच्या मागे पाहिल्यावर नर्मदा नदीचे अस्तित्व दिसते आहे पहा . अचानक लांब दिसणारी धुरकट झाडी म्हणजे तिथे नदी असल्याची खूण असते .
बरंदुआ गावात नर्मदा पात्र सात भागांमध्ये विभागलेले आहे म्हणून त्याला सप्त धारा किंवा स्थानिक भाषेत शतधारा म्हणतात .
बरंदुआ ची सतधारा
(ता .क. : या परिसरात घडलेली एक घटना नुकत्याच प्राप्त झालेल्या एकाप्रतिमेवरून आठवली . या भागात वेडा राघू या पक्षांची खूप घरटी आहेत . एक ओढा पार करताना मला नुकताच प्राणत्याग केलेला वेडा राघू जातीचा पक्षी सापडला . मी त्याला सोबत घेऊन सीपीआर देऊन जिवंत होतो का पाहिले . नर्मदामातेचे जल देखील त्याला पाजूने पाहिले . परंतु तो जीव मुक्त झाला होता . मी चालता चालता त्या पाखराचे खूप निरीक्षण केले . आणि त्याला नर्मदा जला मध्ये सोडणार इतक्यात गावातील एका केवटाने चहा पिण्यासाठी घरी बोलावले . त्याच्या दारात पोहोचलो आणि घरातील दोन मुले बाहेर आली . त्यांना मी तो पक्षी दाखवला . मुलांनी कौतुकाने त्या पक्षाचे फोटो काढले . मी त्यांना पक्षाचे निरीक्षण कसे करायचे ते शिकवले .पक्षी किडे खाऊन आपल्याला मदत कशी करतात ते देखील सांगितले. आणि हा पक्षी आजच शाळेमध्ये नेऊन वर्गातील सर्वांना दाखवून हा छोटासा पक्षी शेतकऱ्यांचा कसा मित्र आहे ते सर्व मुलांना समजावून सांगण्यास सांगितले .मुले आनंदाने तो पक्षी घेऊन गेली . त्या वेड्या राघूचे काही फोटो आजच प्राप्त झाले ते खाली जोडत आहे .
नुकताच प्राण त्याग झालेला वेडा राघू
इथे मैया खूप सुंदर वाहते . अति गतिमान पण उथळ पात्र आहे . त्यामुळे इथे मनसोक्त स्नान केले .
कोकसर च्या आश्रमात आलो . धुनीवाले दादाजी यांचे गुरु श्री गौरीशंकर महाराज ,ज्यांना या परिसरामध्ये जमात वाले बाबा म्हणून ओळखले जाते , त्यांची संजीवन समाधी या ठिकाणी आहे . आश्रम अतिशय सुंदर आहे व फार स्वच्छ ठेवलेला आहे . साक्षात जिवंत समाधी येथे असल्यामुळे एक वेगळेच पावित्र्य इथे जाणवते . गौरीशंकर महाराजांचे वैशिष्ट्य असे की त्यांनी आजन्म नर्मदा परिक्रमा केली . ते परिक्रमेला निघाले की त्यांच्याबरोबर दोनशे तीनशे माणसांचा जमाव परिक्रमेला निघत असे . आणि परिक्रमा संपेपर्यंत हा आकडा पाच सहा हजार पर्यंत जात असे . त्यामुळे ते ज्या गावात जातील त्या गावाला अक्षरशः जत्रेचे स्वरूप यायचे ! सगळीकडे उत्सवाचे वातावरण , आनंदी आनंद असायचा ! असे सांगतात की पूर्वी केवळ साधू संन्यासी जी नर्मदा परिक्रमा करायचे ती परिक्रमा सर्वसामान्य गृहस्थी मनुष्य देखील करू शकतो याची समाजाला जाणीव करून देणारे अलीकडच्या काळातील पहिले संत म्हणजे गौरीशंकर महाराज आणि त्यांचे गुरु कमल भारती महाराज होत . तसेच विविध गावांमध्ये परिक्रमावासींची जी सेवा केली जाते ती देखील गौरीशंकर महाराज यांच्या प्रेरणेमुळे सुरू झाली असे मानणारा मोठा वर्ग नर्मदा खंडामध्ये आहे . एकंदरीत आधुनिक नर्मदा परिक्रमेचे जनक म्हणजे गौरीशंकर महाराज उर्फ जमात वाले बाबा आहेत हे सर्वमान्य सत्य आहे .
ब्रह्मर्षी श्री स्वामी गौरीशंकर जी महाराज उर्फ जमात वाले बाबा
परंतु गौरीशंकर महाराज यांच्याकडे ही परंपरा आली कशी याची कहाणी मोठी रोचक आहे .
नर्मदा खंड ही नेहमीच तपोभूमी राहिलेली आहे . आपण आपल्या उभ्या आयुष्यामध्ये जितकी म्हणून साधू संतांची , तपस्वींची ,ऋषीमुनींची ,देवदेवतांची ,पौराणिक पात्रांची नावे ऐकलेली आहेत ,त्या सर्वांनी नर्मदे काठी कधी ना कधी येऊन घोर तपश्चर्या केलेली आहे . पिप्पलाद, माण्डव्य, महर्षि वाल्मीकि,मातंग, वेदव्यास,
भृगु,सम्राट मेकल, अस्त, सती अनसुईया ,स्वयंभू मनु, मार्कण्डेय,जमदग्नि, श्रृंगी, जाबालि, गौतम, दारूक, भार्गव अशा ऋषींसोबतच आदिगुरू
शंकराचार्य, श्री स्वामी वासुदेवानन्द सरस्वती, श्री गीताचार्य,विद्यानन्द जी, संत कबीर आदि अलीकडच्या काळातील सत्पुरुषांनी देखील नर्मदेचा आशीर्वाद आणि आश्रय घेतलेला आहे . दरम्यानच्या काळात मुसलमानी आक्रमणामुळे भारतातील धार्मिकता लोप पावली . मंदिरे आणि मूर्ती यांचा विध्वंस केल्यामुळे लोक धर्माला घाबरू लागले . जाळपोळ लुटालूट व्यभिचार यामुळे त्रस्त जनतेला धर्मकार्या करता वेळ देता येईना . इंग्रजांनी देखील धर्मकार्य बंद पाडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले होते . आपली आस्था ,आपला स्वाभिमान ,आपली अस्मिता , आपली गरिमा ,आपली शक्ती , आपले सर्वस्व धर्मामध्ये आहे हे ओळखून त्यांनी पहिला आघात धर्मावरच केला . त्यामुळे नर्मदा परिक्रमेची पवित्र परंपरा अस्तंगत झाल्याप्रमाणे झाली होती .
हिमालयातील तत्कालीन ज्योतिर्मठ पीठाधीश्वर शंकराचार्यांनी ही परिस्थिती ओळखली आणि हिमालयामध्ये बद्रीनाथ च्या पुढे वसुधारा गुफेमध्ये साधना करणारे ब्रह्मर्षी कमल भारती जी महाराज यांना लोकांना भयमुक्त करून नर्मदा परिक्रमेचे पुन्हा प्रवर्तन व संरक्षण करावे अशी आज्ञा केली .
हा साधारण १८३० चा काळ होता . त्यांनी परिक्रमा सुरू केली व लोकांना मोठ्या प्रमाणात त्यामध्ये सामील करून घेतले . यांचे वय तेव्हा १०० च्या पुढे होते असे म्हणतात . त्यांच्या एकूण तीन परिक्रमा झाल्या . तिसऱ्या परिक्रमे नंतर त्यांनी आपला देह ओंकारेश्वर येथे नर्मदा नदी मध्येच समर्पित केला . काही शेकड्यामध्ये सुरू झालेली परिक्रमा शेवटी शेवटी हजाराच्या संख्येमध्ये जात असे . त्यांचे पट्ट शिष्य श्री गौरीशंकर महाराज यांनी देखील आपल्या गुरूंची ही परंपरा आजन्म चालू ठेवली आणि तिला भव्य दिव्य स्वरूप दिले . पुढे दादाजी धुनिवाले यांच्यामुळे ही प्रथा अजूनच फोफावली .हरिहर भोले , धुनीवाले दादाजी , रंग अवधूत महाराज आदी संतांनी परिक्रमेला प्रतिष्ठा मिळवून देत नर्मदा खंडातील लोकांच्या मनात कायमचे स्थान मिळवले . लोक भयमुक्त झाले आणि परिक्रमावासींची सेवा करू लागले . देशाच्या विविध भागातून नर्मदा खंडामध्ये आलेल्या साधुसंत ,संन्यासी आणि गृहस्थींनी पुन्हा आपापल्या भागामध्ये जाऊन धर्माचा प्रचार प्रसार सुरू केला . अशाप्रकारे संपूर्ण भारत खंडाला नवसंजीवनी देण्याचे अतिशय मोलाचे कार्य गौरीशंकर महाराजांनी केलेले आहे . अशाच एका परिक्रमेदरम्यान कोकसर येथे त्यांनी नर्मदा मातेच्या काठावर संजीवन समाधी घेतली . त्या मठामध्ये आज मी आलो होतो ! त्यामुळे आज इथेच मुक्काम करावा असे ठरवले .
आश्रमामध्ये अतिशय सुंदर बगीचा केलेला होता . दरवर्षी इथे पुराचे पाणी येते तरी देखील हा बगीचा पुन्हा उभा केला जातो .
कोकसर आश्रमातील सुंदर बगीचा मधून होणारे नर्मदा दर्शन
आश्रमातील व्यवस्थापकांचे कार्यालय . पायऱ्यांवर टाकलेली हिरवळ पहावी ! खूपच सौंदर्य दृष्टीने आश्रम उभा केला आहे .
मी सुरुवातीला इथे एकटाच होतो . नंतर एक एक करून सहा परिक्रमा वासी आले . याच्यामध्ये गांव बेलापूर तालुका श्रीरामपूर जिल्हा नगर येथून आलेले एकनाथ गोविंदराव रोकडे म्हणून होते . त्यांच्यासोबत शंकर सुखदेव शेळके म्हणून ठाणगाव तालुका येवला जिल्हा नाशिक येथून आलेले एक परिक्रमा वासी होते .तानाजीराव गिरी गोसावी म्हणून जोंधळवाडी मनमाड इथले एक परिक्रमा वासी होते ..अजूनही काही लोक यांच्यासोबत होते. या सर्वांचा चालता चालता सहा जणांचा गट तयार झाला होता . ही सर्व मंडळी निवृत्त होती आणि अतिशय सात्विक होती . हे सर्वजण भरपूर चालायचे व नंतर अतिशय सुंदर पद्धतीने सर्व आरत्या म्हणत उपासना करायचे . इथे भोजन प्रसाद मिळत नाही परंतु तुम्ही स्वतः करून खाऊ शकता असे मला आश्रम व्यवस्थापकाने सांगितले . आश्रमाच्या मागच्या बाजूला चुली होत्या तिथे जाऊन स्वयंपाक करण्याची सूचना त्यांनी मला केली . सोबत असलेली सर्व मंडळी वयस्कर आणि बऱ्यापैकी थकलेली होती त्यामुळे मी सर्वांचा स्वयंपाक करतो असे जाहीर केले . मेनू फार सोपा होता ! खिचडी एके खिचडी ! अर्थात नंतर माझ्या मदतीला सर्वजण आले आणि अशा पद्धतीने सुंदर अशी खिचडी करून समाधीला नैवेद्य दाखवून आम्ही सर्वांनी ती आनंदाने भक्षण केली . परिक्रमे मध्ये मराठी बोलणारी माणसे खूप अधिक भेटतात हे वास्तव आहे . जगन्नाथ कुंटे यांचे पुस्तक असेल किंवा अन्य काही युट्युब व्हिडिओ असतील ,उदाहरणार्थ चितळे मैय्या यांचे व्हिडिओ , जे पाहून आजकाल मराठी परिक्रमावासी फार मोठ्या संख्येने येतात . अनिश व्यास नावाच्या परिक्रमावासी चे व्हिडिओ पाहून आलेले काही लोक मला पूर्वी भेटले होते . ज्याच्यामध्ये बनकर काका जे सहस्त्रधारा इथे मला भेटले त्यांचा समावेश होता . सांगायचे तात्पर्य इतकेच की गौरीशंकर महाराजांची परंपरा चालू ठेवणारे परिक्रमा वासी आजही आहेत व नवीन निर्माण होत आहेत .फक्त नर्मदा परिक्रमेची परंपरा आणि पारंपारिक नियम आपल्याकडून भंग होणार नाहीत याची काळजी प्रत्येकाने घ्यावी इतकेच वाटते . संध्याकाळी तिथे अजून एक भटका परिक्रमावासी आला .हा उत्तर प्रदेशचा आहे असे सांगत होता . याच्याकडे नर्मदा मैया नव्हती .हा नुसताच भटकत होता . सतत चिडचिड करून लोकांवर आरडाओरडा करत असे . पण आम्ही सर्व मराठी लोकांनी एकत्रित हिसका दाखवल्यामुळे तो आमच्या नादाला लागला नाही . मराठी माणूस मुळातच लढवय्या असतो हे खरे आहे . कुठेही काही प्रसंग झाला की तिथे सर्वप्रथम मिटवण्यासाठी किंवा पेटवण्यासाठी जाणारा मनुष्य मराठीच असायचा हे मी परिक्रमेमध्ये खूप वेळा पाहिले . त्यासाठी लागणारी निर्भीडता , निर्भयता आणि झुंजार मानसिकता मराठी माणसांमध्ये उपजत असते . काही इंग्रज प्रवाशांनी देखील मराठे अतिशय काटक , चपळ ,शूर आणि तापट डोक्याचे व भांडखोर असतात असे लिहून ठेवलेले आहे ! या सर्वांनी म्हटलेल्या मराठी आरत्या ऐकून छान वाटले . विशेषतः शेळके काका एकनाथ महाराजांची आरती म्हणायचे जी मला माझ्या आजीमुळे पाठ होती .पूर्वी वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानेश्वर माऊली , तुकाराम महाराज यांच्या सोबत एकनाथ महाराजांची आरती देखील केली जायची . परंतु अलीकडे ती परंपरा बंद पडली आहे असे दिसते .
आरती एकनाथा । महाराजा समर्था ।
त्रिभुवनी तु ची थोर । जगद्गुरु जगन्नाथा ।
आरती एकनाथा ।
अशी ती आरती आहे . रात्री गप्पा मारत सर्वजण झोपी गेलो . यूपीचा साधू आमच्यावर काहीतरी आरडाओरडा करायचा की आम्ही सर्वजण मिळून त्याच्यावर डाफरायचो की तो घाबरून पलीकडे तोंड करून झोपून जायचा ! मग आम्ही खूप हसायचो . असे हास्य विनोद करत झोपी गेलो . सकाळी लवकर उठून निघण्याची तयारी केली परंतु आकाशामध्ये ढग भरून आले होते . काय व्हायचे ते होऊ असा विचार करून आश्रमाच्या बाहेर पाऊल ठेवले आणि जोराचा वादळी पाऊस सुरू झाला . पावसामुळे पुन्हा माघारी फिरलो व दोन-तीन तास पाऊस थांबण्याची वाट पाहत बसलो . या दरम्यान आश्रम व्यवस्थापकांनी आश्रमाचा शिक्का वहीमध्ये दिला .
अखेर पाऊस कमी झाल्यावर बाहेर पडलो . नदीकडे जाण्याचा मार्ग चिखलाने माखला असल्यामुळे थोडे अंतर रस्त्याने गेलो . इथे एका पटेलाचा अतिशय सुंदर भव्य दिव्य वाडा होता. पावसामुळे सगळीकडे चिखल झाला होता पण तरीदेखील काठानेच जावे असे वाटून पुन्हा काठ पकडला . टिघरीया घाटावर गोकर्णेश्वर महादेवाचे मंदिर आहे त्याचे दर्शन घेतले .
गोकर्णेश्वर महादेव मंदिर प्रवेशद्वार
कोठिया गावात मला मिळालेला बूट आता पूर्णपणे फाटला होता .त्यामुळे तीघरीया इथे एका चपलेच्या दुकाना पुढून जाताना दुकानदाराने मला हाक मारली . आणि एक नवा कोरा गडद निळा पांढऱ्या सोलचा बूट दिला . तो काही केल्या पैसे घेत नव्हता . मी बळे पाचशे पन्नास रुपये त्याच्या हातावर टेकवले . कारण माझ्याकडे दक्षिणेचे तेवढेच पैसे जमा झाले होते . त्याने तीनशे रुपये मला परत दिले ते घेतले आणि पुढे निघालो .अशा रीतीने चौथा बूट साडेनऊ दिवस टिकला . आणि पाचवे पादत्राण परिक्रमेच्या ४८ व्या दिवशी मी स्वीकारले .
हाच तो पाचवा बूट . पुढे एकाने नवे कोरे व उंची असे मोजे देखील दिले .टिघरिया , कजलास , नानपा ,कुलेरा अथवा कुंतीपूर ,हथनापूर , आवरी घाट , ग्वाडी , भेला किंवा भोला ओलांडत मैयाच्या पूर्ण काठा काठा ने चालत घोघरा गाव गाठले .
दुपारी हा हथनापूर या गावातून जात असताना गावकऱ्यांनी गावातील हनुमान मंदिरामध्ये भोजन प्रसाद घेण्याची विनंती केली . पांडवानी यज्ञ केला तेव्हा ते सर्व या गावात उतरले होते .त्यामुळे या गावाचे नाव हस्तिनापूर पडले .याचा अपभ्रंश हाथनापूर झालेला आहे . इथे रस्त्याच्या कडेला एक छोटेसे हनुमान मंदिर होते . इथे ग्रामस्थ स्वखर्चाने सुंदर असे अन्नछत्र चालवीत होते . मला यापूर्वी भेटलेले सर्वच लोक इथे एकत्र भेटले .
याच संकट मोचन हनुमान मंदिरामध्ये दुपारचा प्रसाद घेतला . इथे सुमन मुजुमदार नावाचा एक बंगाली मुलगा भेटला . हा देखील परिभ्रमण करत होता . रंगीबेरंगी विविध प्रकारचे बंगाली कपडे घालणारा सुमन कलाकार होता . त्याने आपल्या सोबत छोटीशी बासरी आणि युकेलेलो नावाचे गिटार सारखे छोटे वाद्य आणलेले होते . तो जिथे जाईल तिथे या वाद्यावर गाणी म्हणायचा आणि लोकांचे मनोरंजन करायचा . त्याची आणि माझी भेट व्हावी अशी तीव्र इच्छा कालच्या मुक्कामामध्ये एकनाथराव रोकडे आणि शंकर शेळके या परिक्रमावासींनी व्यक्त केली होती ती बहुतेक मैयाने पूर्ण केली .
मी इथे उशिरा पोहोचलो होतो आणि बाकी सर्वजण जेऊन विश्रांती घेत होते . त्यामुळे मी एकटाच जेवायला बसलो . गावकरी मागे असलेल्या चुलीवरून एकेक पदार्थ आणून मला वाढू लागले . माझ्या स्वागतासाठी आणि मला खुश करण्यासाठी सुमन मुजुमदार याने एक सुंदर मराठी भजन म्हटले ! .
वरील व्हिडिओमध्ये सुमन भजन गातो आहे आणि प्रस्तुत लेखक भोजन करतो आहे .
आता सुमनने इतके भावपूर्ण मराठी भजन म्हटले आहे म्हटल्यावर त्याला एखादी बंगाली गाणी ऐकवावे असा विचार करून मी अमार सोनार बांगला हे रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेले प्रसिद्ध गाणे म्हटले . हे गाणे बांगलादेशाचे राष्ट्रगीत आहे . गाणे मला पूर्ण पाठ नव्हते परंतु तोडके मोडके जे काही जमले ते म्हणून दाखवले आणि सुमनला फार आनंद वाटला .
आपला दुसरा बंगाली म्हणजे सत्य की रॉय हे सर्व व्हिडिओ रेकॉर्ड करत होता . नंतर त्याच्या फेसबुक अकाउंट वर त्याने ते अपलोड केले .
मला बंगाली गाणी म्हणता येत आहेत हे ऐकल्यावर
अजून गाणी म्हणण्याचा आग्रह होऊ लागला .हिंदी चित्रपट सृष्टीतील काही गाणी मूळ बंगाली गाण्यांवरून बेतलेली आहेत . त्यातील छूकर मेरे मन को किया तूने क्या इशारा । हे गाणे ज्या मूळ बंगाली गाण्यावरून बेतलेले आहे ते अतिशय सुंदर अर्थाचे आध्यात्मिक गाणे आहे . तोमार होलो शुरू आमार होलो शारा असे त्या गाण्याचे शब्द आहेत . याचा अर्थ तुझे आताशी सुरू झाले आहे आणि माझे सर्व करून झालेले आहे . असे तुझ्या माझ्यासारखे सर्वजण मिळूनच जीवनाची गंगा वाहत असते .
तो दिवस होता १९ फेब्रुवारी म्हणजे इंग्रजी तारखेनुसार शिवजयंती होती . त्यामुळे शिवाजी महाराजांची गाणी देखील सुमनने मला म्हणून दाखवली . हे सर्व रेकॉर्ड करणाऱ्या सात्यकीने त्याच्या फेसबुक वर याबद्दल एक खास पोस्ट लिहिली .
सुमन मुजुमदार सोबत भजन व भोजन करताना प्रस्तुत लेखक
हाथनापुर संकट मोचन हनुमानजी मंदिरामध्ये भजन करीत उभे असलेले सुमन मुजुमदार ,प्रस्तुत लेखक आणि सात्यकी रॉय
एकनाथराव रोकडे या परिक्रमावासिनी काढलेले छायाचित्र . दोन्ही बंगाली युवकांनी घातलेला जो वेश आहे तसा वेश परिक्रमेमध्ये चालत नाही याची कृपया नोंद घ्यावी . हे दोघे परिभ्रमण करत होते . परिक्रमा करत नव्हते .त्यामुळे त्यांच्यासाठी तो क्षम्य आहे .
निघताना अजून काहीतरी म्हणा असा आग्रह झाल्यामुळे मी एकला चलो रे हे प्रसिद्ध बंगाली गाणे म्हटले . मला दोन्ही बंगाली लोकांनी साथ दिली . हा व्हिडिओ सात्यकी च्या फोनवरून मीच रेकॉर्ड केला .
सुमन माझ्यावर अतिशय खुश झाला ! आणि म्हणाला की चला आजपासून आपण दोघे एकत्र चालायचे ! मी त्याला म्हणालो की अरे आत्ता तर आपण गाणे म्हणालो की एकला चलो रे म्हणजे एकट्याने प्रवास कर ! आणि आता लगेच दोघे जाऊ कसे काय म्हणतोस ! तो म्हणाला की हे फक्त गाणे आहे .परंतु मी त्याला असे सांगितले की हे केवळ गाणे नसून रवींद्रनाथ ठाकूर यांनी सांगितलेले जीवनाचे महान तत्त्वज्ञान आहे ! त्यामुळे कृपा करून मला एकट्याला पुढे जाऊ दे ! आणि मी पाय उचलला !
मध्ये हत्याहरण नावाची नदी लागली जी फारच खोल होती त्यामुळे ती पुलावरून ओलांडली .
मध्ये प्रत्येक गावाला असे छोटे मोठे घाट आहेत
आता हळूहळू नावांचे आकार आणि प्रकार बदलू लागले . एका माणसाचे डोंगे दिसायचे बंद झाले आणि दोन पाच माणसे बसतील असे डोंगे आणि दहा-बारा लोकांना घेऊन जाणाऱ्या नौका दिसू लागल्या .
हे नावाडी दहा रुपये ते वीस रुपये घेऊन पलीकडच्या काठावर लोकांना सोडतात . मोटर सायकल नावेतून घ्यायची असेल तर अजून दहा रुपये द्यावे लागतात .
मी वाटेत येणाऱ्या सर्व लोकांचे आणि नौकांचे खूप बारकाईने निरीक्षण करायचो . प्रत्येक मनुष्य वेगळा असतो तशी प्रत्येक नौका स्वतःचे काहीतरी वेगळेपण जपत असते .
याच्यापुढे लागणारी नदी अतिशय भयानक आहे . संपूर्ण खडकांना कापत येणारी ही नदी हत्या हरण किंवा हथनी नावाने प्रसिद्ध आहे . या नदीमध्ये स्नान केल्यावर सर्व हत्यांपासून लागलेली पापे नष्ट होतात अशी श्रद्धा आहे . परंतु नदीमध्ये स्नान करणे इतके कठीण आहे की ज्याने खरोखर हत्या केली आहे तोच हिम्मत करेल ! आपले पूर्वसुरी किती हुशार होते पहा . मी ती नदी पार करण्याची हिम्मत न दाखवता बाजूला असलेल्या पुलावरून ती ओलांडली . वीस पंचवीस फूट खोल दगडी कडे होते . या रस्त्याने आपण आवली घाट या अतिशय विस्तीर्ण आणि प्रसिद्ध घाटावर येतो . हा घाट इतका औरस चौरस पसरलेला आहे की विचारू नका . जिथे जिथे नर्मदा नदीवर पूल आहे तिथे तिथे घाटावर गर्दी थोडी जास्त असते . इथे कायमच जत्रा भरल्यासारखी गर्दी असते . सरकारने येथे सुंदर अशी भव्य शिवमुर्ती नंदिकेश्वर आणि उद्यान विकसित केलेले आहे . हे पर्यटकांचे आकर्षण झालेले असून ते पाहण्यासाठी देखील लोक येतात . तसेच हा संगम अतिशय पवित्र मानला जातो . त्यामुळे इथे स्नान करण्याकरता कायम झुंबड उडालेली असते .
घाटावर आणि छोटी मोठी मंदिरे आहेत . दुकाने आहेत . हे सर्व वातावरण पाहायला मौज वाटते . पुढे मात्र अचानक नर्मदा वळण घेते आणि औरस चौरस पसरलेला घाट अचानक संपून काठावरून चालत जाण्याचा मार्गच नष्ट होतो . वाचकांच्या दर्शनाकरिता या घाटाची काही रूपे सोबत देत आहे . सर्वप्रथम आपल्याला हत्या हरण नदीचा संगम लागणार आहे .
आवली घाट पुलावरून काढलेला हत्या हरण आणि नर्मदा नदी संगमाचा फोटो . हत्याहरण नदीचे पाणी नर्मदेमध्ये लवकर मिसळत नाही हे तुम्हाला प्रवाहात दिसणारा जलौघ पाहून लक्षात आले असेल .
ग्रामपंचायतीने तशा पाट्या जागोजागी लावलेल्या आहेत परंतु गर्दी खूप असल्यामुळे दुर्घटना काही टळत नाहीत
इथला पूल त्याच्या मधल्या गोलाकार मोरीमुळे लक्षात राहतो . अन्य कुठल्या पुलाला असा गोलाकार मध्यभाग नाही .
घाटावर प्रशस्त पार्किंग असल्यामुळे आणि गाडी घाटापर्यंत येत असल्यामुळे बसद्वारे किंवा गाडी द्वारे परिक्रमा करणारे परिक्रमावासी येथे आवर्जून येतात
हा घाट इतका प्रशस्त आहे त्यामुळे पुढे देखील काठाने रस्ता असेल असे वाटून मी पुढे चालत राहिलो . परंतु अचानक नर्मदा वळण घेते आणि काठाने चालायला रस्ताच नाही असे लक्षात आले . तरी देखील धाडस करून मी साधारण ३० फूट पुढे गेलो परंतु महादेव पिपरिया गावामध्ये ज्या पद्धतीने पाण्यामध्ये पडलो होतो तसेच काहीसे दृश्य इथे असल्यामुळे शांतपणे पुन्हा माघारी आलो . आपल्या चुकीच्या वागण्यामुळे नर्मदा मातेला त्रास व्हायला नको असा भाव त्यामध्ये होता . इथे जरी माझा मृत्यूचा संपर्क टळला असला तरी फारच थोड्या वेळामध्ये तो पुन्हा एकदा येणार आहे याची मला पुसटशी देखील कल्पना नव्हती ! होय त्या दिवशी मी अक्षरशः माझा मृत्यू माझ्या डोळ्यांनी पाहिला ! त्याचे असे झाले . . .
मागील लेखांक
पुढील लेखांक
Parikrama is done clockwise ? Was yours anticlockwise? I am confused.
उत्तर द्याहटवाIt was done clockwise. I am posting photos taken by people from both the sides. But I was walking keeping Narmada ji on my right hand alone. I started at jabalpur, covered amarkantak and reached till here.
हटवाThank you. I re-read some of the earlier parts and realized that you had started on the north bank of Narmadaji. So it made sense that you reached Amarkantak first! Very interesting experience. I have been mesmerized about Narmada Parikrama ever since reading the book by Go. Nee. Dandekar (Kuna Ekachi Bhramangatha). Thank you again.
हटवाYes, it's a wonderful book in deed! Gonida is Gonida!
हटवापुढच्या भागावर जा
उत्तर द्याहटवाGuari Shankar maharaj aani Dhankavdiche Shankar maharaj each aahet !!!!!
उत्तर द्याहटवाekach aahet.
हटवा