लेखांक ५२ : वृद्ध नर्मदा , सांगाखेडा येथील लाल्या कीर आणि नर्मदेहून धष्टपुष्ट युवा तवा नदी

इथून पुढे काही अंतराने नर्मदेचा काठ एका अत्यंत विचित्र कारणामुळे सोडावा लागतो . नद्या आपला प्रवाह बदलत वाहत असतात . अर्थात हा बदल होण्यासाठी हजारो वर्षे जात असतात . परंतु एका बाजूने किनारा खात जाणाऱ्या नद्या दुसऱ्या बाजूला वाळू आणि गाळ मातीचा संचय करत वाहत असतात . हे वळण कधी कधी इतके गोलाकार होत जाते की कधीतरी अचानक मग मूळ प्रवाह सोडून नदी सरळ मार्ग धरते . सोबत महापुरामध्ये वाहून आणलेल्या अतिरिक्त वाळूमुळे असे होते . वाळूचा इतका साठा होतो की नदीला आपला मूळ प्रवाह सोडून वहावे लागते . परंतु वाळूच्या खालून जुना प्रवाह संथगतीने चालूच राहतो .  इथून पुढे काही अंतरावर नर्मदेने असाच आपला जुना प्रवाह सोडून नवीन मार्ग पकडलेला आहे . परंतु असे लक्षात आले आहे की जुना प्रवाह अजूनही जमिनीखाली जिवंत आहे . त्यामुळे हा जमिनीखालून वाहणारा जुना प्रवाह ओलांडला जात नाही .नाहीतर परिक्रमा खंडित झाली असे मानण्यात येते . आणि त्यासाठी तुम्हाला खूप लांबून नर्मदा-तवा संगम गाठावा लागतो .
 जमिनीखालचा प्रवाह जिवंत आहे हे कळण्यासाठी एक वृद्ध नर्मदा कुंड बांधण्यात आले असून येथे अक्षरशः नर्मदा जलच सापडते . आजही सापडते . परंतु हा भाग गाठण्यापूर्वी मी आधी रेवा मोहरी गाव ओलांडून रेवा बनखेडी या सुंदर गावामध्ये आलो . या गावांमध्ये नर्मदेच्या अगदी काठावर महंत मदनमोहनदास बाबांचे सुंदर असे राम मंदिर आहे . या राम मंदिरामध्ये अतिशय सुंदर अशा राममूर्ती आहेत . परंतु त्याहून सुंदर अशी एक पाण्याची टाकी इथे बाबांनी बांधलेली आहे . निषाद राज याने केवटाकरवी राम लक्ष्मण सीता यांना गंगा नदी पार करून दिली होती . त्याची आठवण करून देणारी नौका येथे टाकीच्या जागी बनवलेली आहे . मी रामाचे दर्शन घेतले . राम स्तुती पर काही स्तोत्रे म्हटली . इथे दर्शनासाठी एक तरुण भक्त आला होता . तो माझ्याशी गप्पा मारत बसला . त्याने आठवण म्हणून काही फोटो माझ्यासोबत काढून घेतले . त्यांनी संपूर्ण परिसर देखील मला फिरून दाखवला . समोर एक शाळा होती .त्याच्या पलीकडे ऋणमुक्तेश्वराचे मंदिर होते .  इथे मी ऋण मुक्ती अर्थात कर्जातून मुक्त करणारे महादेवाचे स्तोत्र म्हटले .अर्थात माझ्या डोक्यावर कुठले कर्ज नसले तरी परमेश्वराच्या उपकाराचे न फिटणारे कर्ज परिक्रमे ने माझ्या डोईवर जमा केले होते . यातील काही फोटो आपल्या माहिती करता देत आहे .  रेवा बनखेडी चे राम मंदिर 
मंदिर सुंदर रंगवलेले आहे
मंदिराच्या आत मध्ये कधीही न पाहिलेले वेगळेच कलात्मक खांब बघायला मिळतात . कलशामध्ये ठेवलेली झाडाची खोडे असे दोन खांब आहेत .

रेवा बनखेडी येथील तरुण रामभक्ता सोबत प्रस्तुत लेखक
येथील राम मूर्ती फार सुंदर आहेत
परंतु विशेष लक्षात राहते ती ही नौका स्वरूप पाण्याची टाकी
मी गेलो तेव्हा ही टाकी नुकतीच बांधलेली होती . आता छान रंगवलेली दिसत आहे .
 १५ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी दहाच्या सुमारास प्रस्तुत लेखक इथे होता असे फोटो वरून लक्षात येते .
राम जानकी चे दर्शन झाल्यावर आम्ही ऋणमुक्तेश्वराचे दर्शन घेण्यासाठी गेलो .
आणि अचानक मला शासकीय प्राथमिक शाळेच्या समोर काल भागवत सप्ताहामध्ये भक्तीरसामध्ये तल्लीन होऊन नाचणारे ते मिशीवाले काका भेटले !
तरुणाने आमच्या दोघांचा फोटो काढला . 
इथे ऋणमुक्तेश्वराचे शिवमंदिर आहे
राम भक्त तरुणासोबत ऋणमुक्तेश्वराच्या दारात प्रस्तुत लेखक 
 दारिद्रय दुःख दहनाय नमः शिवाय ...
जाताना श्री मदन मोहनदास महाराजांचे दर्शन घडले आणि त्यांच्या शिष्याने चहा पाजून वहीमध्ये हा शिक्का मारून दिला . शिक्यावरील शब्द खालील प्रमाणे
श्री राम जानकी मंदिर 
महंत श्री 108 श्री मदन मोहन दास 
श्री रेवा धाम बनखेडी
 तहसील सोहागपुर 
जिला होशंगाबाद
  इथून पुढे नर्मदेला अनेक नद्या येऊन मिळतात . त्यापैकी रायन ,पलकमती , मारू या तीन नद्या अनुक्रमे ईसरपूर ,पामली आणि रामनगर अथवा पाण्डुद्वीप या गावांमध्ये पार केल्या . या सर्वच नद्यांचे पाणी अतिशय स्वच्छ , नितळ आणि गोड आहे .
पैकी ईश्वरपूर किंवा इसरपूर या गावाच्या बाहेर एका संन्यासी महाराजांचा आश्रम आहे . स्वामी विवेकानंदांच्या नावाने या आश्रमाचे नाव ठेवलेले आहे . आश्रम छोटासाच परंतु अतिशय नीटनेटका व टापटीप होता . 
हाच तो शंकर विवेकानंद संन्यास आश्रम
आश्रमाच्या बाहेर बसलेले संन्यासी महाराज .मी इथे भर दुपारी गेलो होतो .संग्रहित छायाचित्र
संन्यासी महाराजांनी दोन खोल्या एका कोपऱ्यात बांधल्या होत्या . त्यांच्या भाषेवर बंगाली भाषेचा प्रभाव जाणवत होता . परंतु ते मूळचे लखनऊ भागातले होते . मी विचारल्यावर मला त्यांनी सांगितले की त्यांचे बहुतांश आयुष्य बंगालमध्ये गेलेले आहे . संन्यासी महाराज सुशिक्षित होते . इथे एक स्थानिक ग्रामस्थ आला आणि त्याने मला अतिशय उत्तम असे गक्कड ,भरता ,मलिदा  इत्यादी सर्व करून पोटभर खाऊ घातले .शेतातील ताजे मुळे देखील आम्ही खाल्ले . आता मला हे बनविण्यातील ज्ञान प्राप्त झालेले असल्यामुळे मी त्याला मदत देखील केली . आश्रमातील छोट्या मुलांशी गप्पा मारत काही काळ एका शेवग्याच्या झाडाखाली वामकुक्षी केली . तोपर्यंत संन्यासी महाराज बाहेर येऊन बसले . त्यांच्याशी पाया पाशी बसून गप्पा मारल्या . आणि मग त्यांच्यासोबत चहा घेऊन नर्मदे हर केले . इथून पुढे पामली , रामनगर ,पांडू द्वीप अशी गावे ओलांडत सांगाखेडा खुर्द हे गाव गाठले . यातले रामनगर हे गाव अतिशय अस्वच्छ आणि घाणेरडे म्हणून लक्षात राहिले . इथे प्रत्येक घरात उघडी गटारे होती . आणि ती रस्त्याच्या कडेने न वाहता रस्ता भर व्यापून वाहत होती . सर्व गावात दुर्गंधी , माशा व घाण पसरलेली होती . नाकाला उपरणे लावून हे गाव पार केले . इथे खूप सारे मोर दिसत होते . आता मोरांसोबतच सात भाई , तितर , चिमण्या , वेडे राघू , धनेश , हुप्पो , बदके ,बगळे तसेच कोल्हे , तरस , रानडुकरे हे सर्व प्राणी मुबलक प्रमाणात दिसत होते . आज तर एक पिसाळलेला कोल्हा माझ्या दिशेने धावू लागला . परंतु मी अजिबात हालचाल न करता शांत एका जागी उभा राहिलो तो आला . त्याने माझ्याकडे पाहिले आणि लांब पळून गेला .  याच्या खांद्याला जखम झाली होती . त्यामुळे तो पिसाळला होता . हे सर्व प्राणी दिसत होते , परंतु मला ज्या प्राण्याची अत्यंत आवड आहे असा प्राणी असून दिसला नव्हता . आणि आज अखेर तो समोर आलाच ! घोडा ! होय नर्मदे काठी चक्क घोडा भेटला ! एका अबलक घोड्याला घेऊन त्याचा मालक नर्मदेच्या काठी वाळवंटावर चकरा मारत होता . घोडा अवखळ होता . त्यामुळे त्याला दमवण्यासाठी वाळूमध्ये चालवले जात होते . मी घोडया जवळ गेलो आणि घोड्याबाबत मालकाशी बोलू लागलो . एक कॉलेजमधला मुलगा बाजूने जाता जाता थांबून आमचे फोटो काढू लागला . मग मी घोडा मालकाची परवानगी घेऊन घोड्यासोबत फोटो काढले . घोडा मालक आधी मला घोडा देण्यासाठी घाबरत होता . कारण असे घोडे हिसका मारून पळून जातात . हा मालक घोड्याला जोर जबरदस्तीने शांत ठेवायचा प्रयत्न करत होता . मी त्याला घोड्याला प्रेमाने कसे शांत करता येते हे शिकविले . त्याच्यासमोर प्रात्यक्षिक दाखवल्यामुळे तो खूप खुश झाला . त्या मुलाने काढलेले फोटो त्याने मित्राच्या क्रमांकावर पाठवून दिले . 
घोड्याला घाबरून घोड्यापासून लांब उभे राहून सेल्फी काढणारा मुलगा
घोडा मालक रजनीश बिश्नोई यांच्याशी अश्व संगोपनाबाबत चर्चा करताना प्रस्तुत लेखक
अत्यंत मजबूत गर्दन असलेल्या या देखण्या अश्वाचे अवलोकन करताना प्रस्तुत लेखक . चौकस वृत्तीने आमचा संवाद ऐकणारा ग्रामस्थ .
 लगामाला हिसके दिल्यावर घोड्याच्या तोंडाला कसा त्रास होतो , हे मालकाला समजावून सांगताना प्रस्तुत लेखक
अश्व शक्तीने जिंकता येतो की प्रेमाने ?
 उत्तर आहे प्रेमाने ! अतिशय खट्याळ आणि द्वाड अश्वाला शांत करून प्रेमाने कुरवाळताना प्रस्तुत लेखक .
नर्मदेला ज्याची त्याची आवड माहिती असते . त्यामुळे मला पुढे संपूर्ण परिक्रमेमध्ये जेवढे अश्व भेटले तेवढे अन्य कोणालाच दिसले नाहीत . हा घोडा म्हणजे तर फक्त सुरुवात होती .
जिथे मन रमू लागते तिथून पटकन पुढे निघावे हे परिक्रमेत उत्तम असते . बिश्नोई मला घोड्यावर बसता का वगैरे विचारू लागला . परंतु त्याला नम्रपणे नकार देत मी पुढे निघालो . परिक्रमेमध्ये वाहन घेण्यास मनाई आहे आणि घोडा हे देखील एक प्रकारचे वाहनच आहे .
या भागात वाळू वाहणारी गाढवे सुद्धा खूप दिसली . परंतु मनुष्य असून गाढवपणा करणारी तरुणाई इथे अधिक आढळली . स्त्री पुरुष सर्वच इथे राजश्री नावाचा गुटखा खातात . तो दोन वेगवेगळ्या पाकिटात मिळतो . दोन्ही एकत्र करून हे लोक खात असतात . दिवसाचे किमान शंभर ते कमाल अडीचशे तीनशे रुपये या व्यसनावर ते फुकट घालवतात . 
वैधानिक इशारा : तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ खाणे आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे व त्याचा प्रस्तुत लेखक तीव्र निषेध करतात .
गुटखा खाणारे लोक जाता येता कुठेही थुंकत असतात . मोठ्यांचे अनुकरण करणारी लहान मुले त्यामुळे जाता येता नाहकच थुंकताना दिसतात . मला सुरुवातीला या सवयीचा फार त्रास झाला . नंतर लक्षात आले की इथे प्रत्येकालाच ही सवय आहे . जाता येता उगाचच एखादी पिंक टाकली जाते . नवीन माणसाला हे अपमानास्पद वाटते . परंतु त्या लोकांच्या हे अंगवळणी पडलेले आहे . परिक्रमा वासींना त्रासदायक ठरणारी अजून एक गोष्ट म्हणजे शेतामध्ये लावलेले तुषार सिंचन अथवा स्प्रिंकलर .तुम्ही शेतातून जात असताना कधीही अचानक हे स्प्रिंकलर चालू होतात आणि तुम्हाला संपूर्ण भिजवून टाकतात ! तसेच हे चालू असतील ते शेत पूर्णपणे चिखलमय झालेले असते त्यामुळे चालताना अक्षरशः कसरत करत चालावे लागते . एक जरी पाऊल चुकीचे पडले तरी घसरून चिखलात मनुष्य आपटतो .असा मी खूप वेळा आपटलो . एकदा अंगाला लागणाऱ्या चिखलाचे वैषम्य निघून गेले की मग कितीही वेळा पडता येते ! परंतु या चिखलामध्ये रूतून बूट मात्र लवकर खराब होतात . मी एका शेतकऱ्याकडून या स्प्रिंकलर चे गणित समजून घेतले . २२ स्प्रिंकलर आठ तास लावले की एक एकर शेत भिजते . ही भीज पंधरा दिवसांसाठी पुरते . पुढे पुढे मला या तुषार सिंचन करणाऱ्या यंत्रांच्या फिरण्यातला एक ठराविक पॅटर्न लक्षात आला . त्याची एक मुख्य धार आणि एक छोटी धार असते . मुख्यधारेच्या जवळून चालले असता ती आपल्याला फार भिजवू शकत नाही . अशावेळी तिला चुकवून खाली वाकून वगैरे पुढे जायचे असते . छोटी धार मात्र तुम्हाला हमखास भिजवते . मोठ्या धारेच्या टोकाला तुम्ही सापडलात मग तर तुमची आंघोळच निश्चित होते ! तुषार सिंचन चालू असलेल्या क्षेत्रांमध्ये मी आधी थोडे थांबून निरीक्षण करायचो आणि मग माझा जाण्याचा मार्ग आणि कालावधी निश्चित करायचो .हे सर्व करताना चिखलामध्ये आपटून पडणार नाही याचे देखील गणित बांधावे लागायचे ! 
नर्मदे काठी सुरू असलेला एक तुषार सिंचन प्रकल्प
मध्ये असलेले पांडुद्वीप इथे पांडवांनी फार मोठा यज्ञ केला होता .असे म्हणतात की त्या यज्ञाची यज्ञवेदी इतकी मोठी होती की आजही त्या परिसरामध्ये जी माती आहे तिला भस्माचा रंग आहे . इथे पाचही पांडवांनी स्वतंत्रपणे स्थापन केलेली शिवलिंगे आहेत . वाचकांनी कृपया या सर्व शिवलिंगाचे दर्शन घ्यावे .
धर्मराज युधिष्ठिर ,अर्जुन , भीम , नकुल ,सहदेव या पांडवांनी स्वहस्ते यज्ञ पूर्वक स्थापन केलेली , पुजलेली नर्मदेश्वर शिवलिंगे
पांडू द्वीप येथील मंदिर समूह
इथे भस्माच्या रंगाची माती आजही मिळते
सांगाखेडा खुर्द गावामध्ये मी पोहोचलो तेव्हा तिथे सहा परिक्रमावासी खूप आनंदात आहेत असे दिसले . साठीच्या आसपास असलेले हे सर्वजण याच भागातील होते . आणि आनंदाची गोष्ट अशी की त्या सर्वांची परिक्रमा नुकतीच संपली होती ! ज्या घाटावर परिक्रमा आपण सुरू करतो तिथेच तिची समाप्ती होते .त्यानंतर प्रथेप्रमाणे भंडारा घालून कन्या भोजन करून आता सर्वजण ओंकारेश्वरला निघाले होते . असे परिक्रमापूर्तीचे भंडारा भोजन मिळणे अतिशय शुभ मानले जाते . नशिबाने मलाही त्यांच्या भंडाऱ्याचे भोजन मिळाले . तिथे मैयाचे पात्र इतके लांबरुंद झालेले आहे की जणू काही समुद्रकिनाराच भासतो .मी उतरलो होतो ती एक अत्यंत जुनी व उत्तम बांधकाम असलेली छोटीशी धर्मशाळा होती . एका छोट्याशा खोलीमध्ये आत एक समाधी मंदिर बांधलेले होते . बाहेर ओळीने पाच-सहा परिक्रमा वासी झोपतील एवढी जागा होती . त्याच्या पलीकडे व्यवस्था पाहणाऱ्या साधूची खोली होती . साधूने मला समाधी असलेल्या खोलीमध्ये आसन लावायला सांगितले . कारण रात्री काही परिक्रमा वासी येणार आहेत असे त्याला फोन करून त्यांनी कळविले होते . आत मध्ये एक तखत होता . तखत म्हणजे मोठी लाकडी चारपाई . साधूने मला त्यावरच आसन लावायला सांगितले . कारण खाली उंदीर खूप होते . समोर एक राम मंदिर होते आणि तिथे काही महिलांचे अखंड भजन सुरू होते . भजनाचा आवाज ऐकून मी देखील तिथे गेलो आणि ढोलक , पेटी इत्यादी वाद्ये आळीपाळीने वाजवत सुंदर असे रामाचे भजन केले . मी आल्यामुळे त्या वृद्ध माताराम उत्साहीत झाल्या . आणि नवीन नवीन ठेवणीतल्या चाली गाऊ लागल्या .  तिथून मी परत धर्म शाळेमध्ये आलो तेव्हा साधू माझ्यावर चिडला आहे असे माझ्या लक्षात आले . तो मला म्हणाला बायकांच्या मध्ये जाऊन साधूने कधी भजन करू नये . मी लगेच त्याला म्हणालो परंतु साधूने स्त्री-पुरुष असा भेदभावच करू नये . फार फार तर भजन करणारे आणि भजन न करणारे असा भेद पाळायला हरकत नाही . साधू म्हणाला तुझी परिक्रमा वाया गेली . मी म्हणालो ,  जया मनी जैसा भाव ।तया तैसा अनुभव ।
माझ्या डोक्यात फक्त भजन होते . त्यामुळे मला भजन दिसले . तुमच्या डोक्यात जे आहे ते तुम्हाला दिसते आहे . साधू काही ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत नव्हता . माझ्या आईच्या आणि त्याहून अधिक वयाच्या त्या सर्व माताराम होत्या . परंतु साधूच्या मनात असे विकृत विचार का येत होते हे मला काही कळाले नाही . जी गोष्ट माझ्या ध्यानी मनी देखील नव्हती तिच्यावरून हा मला झापत होता . मी तरीदेखील साधूची क्षमा मागितली .आणि दुपारी झालेल्या भंडाऱ्याचा उरलेला प्रसाद भक्षण करून झोपी गेलो . मी आत मध्ये गेल्या गेल्या साधूने त्या खोलीला बाहेरून कडी लावून घेतली .आता मात्र पंचायत झाली ! रात्री लघुशंका वगैरे आली तर बाहेर पडायचे कसे ? परंतु ती चिंता नर्मदेवर सोडून मी झोपी गेलो . रात्री उशिरा भांडण्याच्या आवाजामुळे मला जाग आली . काही स्थानिक ग्रामस्थ साधू पाशी येऊन मोठ्या आवाजात भांडत होते . साधू त्यांना हळू आवाजात बोलण्याची विनंती करत होता . अखेरीस साधूला धमकी देऊन ते लोक निघून गेले . इकडे याने मला कोंडलेले असल्यामुळे मी उठायचा प्रयत्न केलाच नाही . दार उघडे असते तर कदाचित मी मध्यस्ती केली असती .मध्यरात्री दंडवत घालत एक माताराम आल्या . याचा अर्थ आपल्या घरापासून ते नर्मदा नदीमध्ये स्नान करेपर्यंत प्रत्येक पाऊल हे साष्टांग नमस्कार घालून मगच टाकायचे ! किती कठीण तप आहे विचार करून पहा ! अक्षरशः लाखो साष्टांग नमस्कार घातले जातात . हे तरी वीस पंचवीस किलोमीटर अंतर होते . काही लोक तर संपूर्ण नर्मदा परिक्रमा दंडवत घालीत करतात . अशी परिक्रमा पूर्ण व्हायला किमान बारा वर्षे लागतात . काही लोक उभे राहून नर्मदा परिक्रमा करतात . म्हणजे ते कुठेही बसत किंवा झोपत नाहीत कायम उभेच . अशा लोकांना खडेश्वर बाबा म्हणतात . मला एक परिक्रमावासी भेटले ज्यांचे वय १०२ वर्षे होते ! आणि ते पायाला चिंध्या बांधून अनवाणी परिक्रमा करत होते .
सर्व प्रकारचे परिक्रमावासी नर्मदेने मला वाटेमध्ये भेटवले .
 अंध , अपंग , लुळे पांगळे ,बहिरे ,चकणे ,हेकणे , धडधाकट , अशक्त , रोगी , निरोगी , महारोगी , नोकरदार , व्यापारी ,मालक , सेवक ,डॉक्टर , इंजिनियर , वकील , न्यायाधीश , कलाकार ,नकलाकार , अभिनेते , अभिनेत्री ,कीर्तनकार ,लष्करी जवान ,पोलीस , अधिकारी ,सनदी अधिकारी , शेतकरी , कातकरी , कोळी , माळी , दलीत , पंडित ,उच्चवर्णीय , शहरी , निमशहरी , ग्रामीण , राजकारणी, शिक्षक , विद्यार्थी , खेळाडू , प्राध्यापक , उच्चविद्याविभूषित , चोर , डाकू , लुटेरे ,गुंड , मवाली , खुनी , परदेशी , NRI, सात्विक , तामसिक ,राजसिक ,उजवे , डावे , मध्यम मार्गी ,स्त्रिया , पुरुष , मुले , मुली ,तरुण-तरुणी , वृद्ध , त्यागी , महात्यागी, योगी , वितरागी ,तडी ,तापसी , संन्यासी , भवरोगी,भोगी असे सर्व प्रकारचे लोक नर्मदा परिक्रमा करतात .  आणि सर्वांना ती त्यांच्या त्यांच्या योग्यतेनुसार आणि समजेनुसार अनुभव देते आणि मूळ पदाला आणते . असो . दंडवत घालत आलेल्या माताराम सोबत त्यांचे कुटुंबीय होते . त्यांनी दार उघडल्यामुळे मला बाहेर येता आले . सकाळी देखील सेमली या गावातून अजून दोन-तीन लोक दंडवत घालत आले . कारण ती पौर्णिमा होती . आणि नर्मदा स्नानाचा महेंद्र योग नावाचा दुर्मिळ योग आज घडत होता . त्या योगावर स्नान करण्यासाठी नर्मदे काठी एकच गर्दी झाली होती . मी देखील त्या महेंद्र योगावर पवित्र असे नर्मदा स्नान केले . इतक्यात गावकऱ्यांनी लाठ्या काठ्या वापरून काल मला दिसलेला पिसाळलेला कोल्हा मारून टाकला . त्याचे ते असहाय कलेवर पाहून मला फार वाईट वाटले . समाधानाची एकच बाब होती की त्याला नर्मदे काठी मरण आले . आता मात्र  वृद्ध नर्मदा ओलांडली जाऊ नये म्हणून मला नर्मदेचा काठ माझ्या इच्छेविरुद्ध सोडावा लागला . जमिनीवरून चालताना तुमच्या लक्षात येत नाही की असा नियम का केला आहे . परंतु उपग्रहावरून तयार केलेला नकाशा पाहिल्यावर आपल्याला जुन्या नर्मदेचा मार्ग स्पष्टपणे दिसू लागतो . सुमारे हजार वर्षांपूर्वी नर्मदेचे मूळ पात्र ज्या मार्गाने वाहत होते तो मार्ग उपग्रह चित्रांमध्ये अगदी स्पष्टपणे दिसतो . आपल्या अभ्यासाकरता मी खाली दोन नकाशे जोडत आहे . आधी नुसता उपग्रह नकाशा जोडतो आहे जो पाहून तुम्हाला जुन्या नर्मदेचा मार्ग सापडतो आहे का पहा . तो सापडला तर ठीक नाही सापडला तर पुढील चित्रामध्ये मी तो मार्ग दाखवला आहे . तो पाहिल्यावर पुन्हा एकदा पहिले चित्र पहा म्हणजे तुम्हाला तो मार्ग दिसू लागेल . 
या नकाशामध्ये पिवळ्या वाळूने अंकित केलेले नर्मदेचे सध्याचे पात्र आहे . जुने पात्र तुम्हाला कुठे सापडते आहे का पहा !
नर्मदेचे सध्याचे वाहते पात्र हिरव्या रंगाने आणि वृद्ध नर्मदा पात्र निळ्या रंगाने अंकित केलेले आहे . याचा दृश्य जलप्रवाह जरी आता लुप्त झाला असला तरी भूमिगत प्रवाह अजून सुरू आहे . 
या निमित्ताने सर्वांनाच मला एक सांगावेसे वाटते . आपल्याला वाहणारी नदी जी दिसत असते ते केवळ हिमनगाचे एक टोक असते . नदीपात्र हे त्याखाली देखील जमिनीत कित्येक शे मीटर पर्यंत मोठा भूजल साठा घेऊन वाहत असते . त्यामुळे वरवर आटलेली दिसलेली नदी ही जर थोडेसे प्रयत्न केले तर पुन्हा पुनरुज्जीवित करता येते . असो . तर वरील नकाशा पाहिल्यावर आपल्या लक्षात आले असेल की या भागामध्ये नर्मदेचा किनारा का सोडावा लागतो . आता तरुण नर्मदा सोडून बुढी माय चा भूमिगत प्रवाह पकडून चालायला सुरुवात केली . अजूनही एका कुंडामध्ये ही वृद्ध नर्मदा प्रकट झालेल्या स्वरूपामध्ये आढळते . बछवाडा गणेरा नागवाडा मार्गे तवा नदीच्या कालव्याजवळून चालत चालत गौ घाट नावाचे तीर्थक्षेत्र गाठले जिथे ही वृद्ध नर्मदा प्रकट झालेली आहे . इथे जाण्यापूर्वी वाटेमध्ये रामदत्त पटेल नामक एका शेतकऱ्याचे शेत पार करावे लागते . यांनी शेतामध्ये पाणी सोडून इतका भयानक चिखल केला होता की गुडघ्यापर्यंत पाय रुतत होते . अतिरिक्त पाणी दिल्यामुळे पिके देखील मरून चालली होती . बरेचसे परिक्रमावासी इथून कुंड जवळ असले तरी देखील दोन किलोमीटरचा मोठा वळसा मारून पुढून फिरून कुंडावरती येतात . मी मात्र असे ठरवले की आपण या शेतातूनच जायचे . दोन-तीन एकराचे हे शेत पार करताना माझे बूट पुरते फाटून गेले . अखेरीस मी अनवाणी पायाने कसाबसा तो टापू पार केला . मला या घटनेमुळे फार वाईट वाटले . पुढे वाटेमध्ये एक घर लागले . त्या घरातील माताराम माझ्यासाठी पाणी घेऊन दारात उभीच होती ! तिने सांगितले की हा शेतकरी मुद्दाम शेतामध्ये पाणी सोडून ठेवतो . ज्यामुळे परिक्रमावासींना जाता येऊ नये आणि तरीदेखील कोणी शेतातून पार झालाच तर तो आमच्याकडे पाय धुण्यासाठी येतो . मी त्या शेतकऱ्याचे नाव पत्ता व्यवस्थित विचारून ठेवला आणि मनोमन काहीतरी ठरवले . इथून जवळच नर्मदा माता कुंड आहे . जे शर्मा नामक एका कुटुंबाचे खाजगी क्षेत्रामध्ये आहे . त्यांनी त्याचे रूपांतर एका छोट्या तीर्थक्षेत्रामध्ये केले असून एक सुंदर बैठे मंदिर बांधलेले आहे .याची व्यवस्था एक एकाक्ष महंत निगुतीने करत आहेत . आणि समोर खोल असे वृद्ध रेवा कुंड आहे .ज्याला उंच असा मनोरा बांधून प्रवेशद्वार केलेले आहे . 
शर्मा यांचा मुलगा माझ्याशी गप्पा मारायला आला . हा मुलगा अतिशय हुशार आणि चाणाक्ष होता . त्याच्याशी गप्पा मारल्या असता मला असे लक्षात आले की त्याला हे क्षेत्र चालविण्यामध्ये फारसा रस नव्हता . हा जर येथून निघून गेला असता तर या क्षेत्राची भविष्यामध्ये दैना होणार हे स्पष्ट होते . कारण हा खाजगी ट्रस्ट होता . मंदिरामध्ये बसून सुग्रास भोजनाप्रसादी घेता घेता शर्मा शी बोलत राहिलो .त्याला काहीतरी मोठे काहीतरी वेगळे करून दाखवायची इच्छा होती . त्याच्या ताब्यात एकूण चाळीस एकर क्षेत्र होते . आपल्या हातात काय नाही आणि आपल्या हातात काय आहे याचा हिशोब मांडून त्याला कमीत कमी वेळामध्ये अधिकाधिक मोठे काम कसे उभे करता येईल त्यावर सुमारे तास दीड तास मार्गदर्शन केले . कृषी पर्यटनाचा प्रयोग या भागामध्ये खूप चांगला चालला असता . तो देखील वही पेन घेऊन आला आणि त्याने सर्व मुद्दे व्यवस्थित लिहून घेतले .नेरळ येथे सगुणाबाग नावाने कृषी पर्यटन सुरू करणारे श्री चंद्रशेखर भडसावळे हे माझे अतिशय चांगले मित्र , मार्गदर्शक आणि या क्षेत्रातील गुरु आहेत .त्यांनी आजवर मला पटवून सांगितलेले आणि सिद्ध करून दाखविलेले मुद्देच मी शर्माला सांगितले . त्याला सर्व काही पटले आणि त्याने हे स्थान सोडून कायमचे निघून जाण्याचे रहित केले . मुख्य म्हणजे या क्षेत्रामध्ये राहून होणारा अध्यात्मिक लाभ हा त्याच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आणि एकमेवाद्वितीय असा होता .त्यानंतर तो मला वृद्ध रेवा कुंडाचे दर्शन करण्यासाठी स्वतः घेऊन गेला . कुंडातील पाण्याचा रंग पाहिला आणि वेडाच झालो ! हा तर साक्षात नर्मदा मातेच्या पाण्याचा रंग होता ! पाण्याचा वासही तसाच आणि चवही तीच ! खरोखरच हे नर्मदा जल होते ! तिथे स्नान करायला परवानगी नाही . परंतु बाजूला नळाला हेच पाणी येईल अशी व्यवस्था केलेली आहे . तिथेच स्नान करून नर्मदेचे पूजन केले .आज इथेच रहा असा आग्रह त्याने लावला होता . परंतु मला वेळेत परिक्रमा पूर्ण करायची होती . वेळेत म्हणजे चातुर्मास लागण्यापूर्वी चालणे संपवायचे होते . आता ४० -४२ दिवस झाल्यावर मला माझ्या चालण्याचा अंदाज आलेला होता .त्या हिशेबाने कुठेही न थांबता रोज जमेल तितके चालत राहणे माझ्यासाठी क्रमप्राप्त होते . माझे स्वतःचे वजन १२ - १५ किलो कमी झालेले असले तरी देखील पाठीवर तेवढ्याच वजनाची नर्मदेत सापडलेली शिवलिंगे स्थानापन्न झालेली होती ! त्यामुळे पायावरचा एकूण भार तेवढाच राहिला होता . हे सर्व गणित सतत माझ्या तार्किक डोक्यामध्ये चालत असे . नर्मदे काठी कुठलाही मानवी तर्क काम करत नाही हे माहीत असून देखील सवयीमुळे असे होत असावे . या परिसराची माहिती आपल्याला व्हावी म्हणून आपल्या दर्शनासाठी काही संग्रहित छायाचित्रे आणि काही शर्मा ने स्वतः काढलेली छायाचित्रे सोबत जोडत आहे .
 गौ घाट वृद्ध रेवा कुंड येथील मंदिर
 वृद्ध रेवा माता
 बुढी माय !
नर्मदा कुंडाचे प्रवेशद्वार .
मंदिरामध्ये प्रस्तुत लेखकाशी गप्पा मारत बसलेला वृद्ध रेवा मंदिराचा ' मालक ' शर्मा
तरुण मुलांना सेल्फी काढायची भारी हौस असते .
नर्मदा परिक्रमा देखील तुम्हाला असाच स्वतःच्या आत्मतत्त्वासोबत 'सेल्फी ' काढण्याची एक अमूल्य संधी देते !
मंदिरात खूप वेळ गप्पा मारून झाल्यावर शर्मा मला वृद्ध रेवा कुंडामध्ये घेऊन गेला . खाली दिसणारे रेवा कुंड पहा ! आता तर तुम्ही देखील नर्मदेचा रंग ओळखू लागला आहात ! सांगा पाहू आहे की नाही साक्षात नर्मदा ! 
या पाण्याचे अनेक लोकांनी शास्त्रीय संशोधन करून सिद्ध केलेले आहे की हे नर्मदा जलच आहे . नर्मदा परिक्रमा किती शास्त्रोक्त पद्धतीने चालते याचाच हा एक उत्तम पुरावा आहे . ती केवळ भक्ती भावाने घडत नाही तर त्यामागे भूगर्भशास्त्र , भूजलशास्त्र , भूगोल इत्यादी सर्वच शास्त्रांचा साकल्याने विचार केलेला आढळतो . ती पूर्णपणे शास्त्रीय आहे . 
इथून निघालो परंतु शर्माला करमेना . तो साधारण एक दीड किलोमीटर मला सोडायला चालत माझ्यासोबत आला . पुन्हा एका झाडाखाली आम्ही बोलत उभे राहिलो . आपल्या देशातील तरुणांना योग्य वेळी योग्य ते मार्गदर्शन केले तर त्यांच्या हातून खूप काही घडू शकते . आणि जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याकडून मार्गदर्शनाची अपेक्षा करत असते तेव्हा आपल्याला जितके ठाऊक आहे तितके ज्ञान अवश्य द्यावे . आम्ही उभे होतो ते नेमके त्याचेच शेत होते . मग थेट शेतामध्ये जाऊन त्याला काही उपाययोजना सुचवल्या . कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न कसे सुरू करता येईल याची त्याला कल्पना दिली . आणि नर्मदे हर केले . माझा मुख्य हेतू इतकाच होता की या पवित्र आणि पौराणिक तीर्थक्षेत्राची पुढे वाताहात होऊ नये . क्षेत्रपती सक्षम असेल तर क्षेत्ररक्षण अवश्य होते . पुढे गावामध्ये मी रामदत्त पटेल यांचे घर शोधत चालू लागलो . सर्व गावकरी मला सांगू लागले की त्याच्या घरी कशाला जाता ? त्यांना परिक्रमावासी आलेले आवडत नाहीत . त्यांचे मोठे राजकीय संबंध आहेत ! ते अमुक आहेत . ते तमुक आहेत ! अशा सर्व गाव गप्पा ऐकत अखेरीस त्यांच्या घरासमोर येऊन उभा राहिलो . अतिशय मोठ्या ऐसपेस वाड्याला तेवढेच भव्य दिव्य प्रवेशद्वार होते . दारामध्ये उभा राहून मी आवाज दिला रामदत्त पटेल यांचे दर्शन होईल काय ? तो म्हणाला ,काय काम आहे ? मीच रामदत्त पटेल . मी विचारले , मला आत मध्ये येण्याची आज्ञा आहे का ? या ना या .बसा .  असे म्हणत त्याने मला अंगणातच त्याच्यासमोर बसायला खुर्ची दिली . मी माझ्या येण्याचा हेतू त्याला खालील शब्दात सांगितला . माझे नाव अमुक अमुक . तमुक तमुक गावावरून आलोय . या या दिवसापासून नर्मदा परिक्रमा उचललेली आहे . नर्मदेचे जुने पात्र जे आहे त्याच्या काठावर कुठल्या कुठल्या भाग्यवंतांची शेती आहे हे पहावे म्हणून आपल्या दर्शनासाठी आलो ! आणि त्यात ती नर्मदा साक्षात आपल्या शेतामध्ये सर्वत्र खेळते आहे आपण किती भाग्यवान आहात ! फक्त मूळ शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे एक चिंता वाटली ती आपल्याला सांगायला आलो . अतिरिक्त पाण्यामुळे आपली पिके मरत आहेत तरी कृपया योग्य प्रमाणात पाणी दिले जावे . बहुतेक शेताची व्यवस्था राखण्यासाठी आपण ठेवलेला वाटेकरी नीट लक्ष देत नसावा त्यामुळे अतिरिक्त पाणी घातले जात आहे . पटेलला मला काय म्हणायचे आहे ते लक्षात आले .  हा अतिशय घरंदाज आणि जातिवंत मनुष्य होता . परंतु त्याने देखील त्याची बाजू मला सांगितली . शेतामध्ये शौच करणे , ते शेतातील पिके लुटणे ,तोडणे ,तुडविणे असे सर्व प्रकार या भागात येणारे परिक्रमावासी अनेक वर्षे करत असल्यामुळे वैतागून त्याने निरुपयाने हा अघोरी उपाय सुरू केला होता . यावर मी त्याला एक उपाय सुचवला . शेतातून एक कायमचा फुटभर रुंदीचा बांध जर त्याने केला तर त्याने सर्व समस्या कायमच्या सुटणार होत्या . मुख्य म्हणजे त्याच्या शेताला कायमची अंतरलेली नर्मदामाई या परिक्रमावासींच्या रूपाने त्याच्या शेतातून पुन्हा पुन्हा जाते आहे हे फार भाग्याचे लक्षण आहे हे मी त्याला समजावून सांगितले . परिक्रमावासी जेव्हा चिडतो तेव्हा नर्मदा मातेला देखील राग आलेला असतो हे त्याला सोदाहरण पटवून दिले . आणि त्याचे परिणाम कौटुंबिक जीवनावर देखील होऊ शकतात असे मी म्हणताच तो लहान मुलासारखा रडू लागला . त्यांच्या घरामध्ये खरोखरच काही महत्त्वाच्या समस्या सध्या सुरू होत्या . आणि सर्व काही सुरळीत असून असे का होत आहे याचे उत्तर त्यांना सापडत नव्हते . त्यांची धर्म पत्नी अतिशय धर्मपरायण होती आणि दुर्धर अशा कर्करोगाशी लढा देत होती . शिवराज सिंह चौहान हे मध्य प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री यांचे नातेवाईक होते व यांच्या घरी बरेचदा येत असतात . त्यामुळे हे मोठे घरंदाज घराणे होते . परंतु तरीदेखील केवळ परिक्रमावासींना सहकार्य करत नाही या एका गोष्टीमुळे ग्रामस्थ यांच्याशी थोडेसे फटकून वागत आहेत असे माझ्या लक्षात आले . मी तिथे सुमारे दीड दोन तास बसलो होतो . या सर्वच गोष्टींवर आम्ही खूप साकल्याने साधक-बाधक चर्चा केली . मुळात अमुक एक गोष्ट करणारा मनुष्य हा या परंपरेचा विरोधीच असेल असे सर्वसामान्यांचे अनुमान इथे खोटे पडले होते . उलट या घराण्यामध्ये खूप मोठी धर्मपरायण परंपरा आहे असे माझ्या लक्षात आले . काही कारणामुळे या परंपरेला अंतरलेले हे कुटुंबीय आता पुन्हा एकदा त्या मार्गावर चालणार होते .त्यांनी एक एक करत घरातील सर्वच सदस्यांना बाहेर बोलावून घेतले . अतिशय आदबीने प्रत्येकाचा परिचय माझ्याशी करून दिला . त्यांच्या चालण्या बोलण्या वागण्या बसण्यातील रुबाब , आदब आणि नेमस्तपणा मला खूप भावला . आज इथेच मुक्काम करा असा आग्रह त्यांनी केल्याबरोबर खुर्चीतून उठलो आणि नर्मदे हर केले ! इकडे बाहेर मला या घराचा रस्ता दाखवणारे दहा-बारा ग्रामस्थ मोठ्या उत्कंठेने दोन तास उभे होते ! त्यांनी असे अनुमान केले होते की बहुतेक पटेलांनी आसूड काढून या परिक्रमा वाशीला फोडून काढलेले दिसते . संवादाची कडी तुटली की किती मोठे भ्रम निर्माण होतात नाही का ! मी बाहेर आल्याबरोबर सर्वांनी मला खाणा खुणा करून विचारायला सुरुवात केली ! काय झाले ! ? मी सर्वांना नजरेने पुढच्या चौकात जमायची सूचना केली . पुढे एक मंदिर होते तिथे आम्ही सर्वजण जमलो . मी झालेला इति वृत्तांत गावकऱ्यांना सांगितला आणि इथून पुढे पटेल घराण्याशी संबंध न तोडता त्यांच्याशी पुन्हा एकदा सर्व व्यवहार सुरू करण्याची विनंती ग्रामस्थांना केली . ते काय , तुम्ही काय किंवा आम्ही काय , आपण सारी च या नर्मदा मातेची लेकरे आहोत , भारत मातेची संताने आहोत , हे कधीच विसरायचे नाही . याचे त्यांना पुनर्स्मरण करून दिले . जिभेवर साखर ठेवल्याचे परिणाम किती अद्भुत असतात पहा ! चिखलामध्ये रुतल्या रुतल्या माझ्या मुखातून त्या शेतकऱ्यासाठी शाप निघणार होता . परंतु विवेक प्रयत्नपूर्वक जागृत करून मी असा विचार केला की आपण आधी त्याची बाजू समजून घेऊया आणि मग काय ते ठरवूया ! परंतु दुर्दैवाने असा विवेक जागृत नसलेल्या काही परिक्रमावासींनी दिलेल्या शापामुळे त्याची कौटुंबिक वाताहात सुरू झाली होती . परंतु त्यांनी स्वतः दृढ संकल्प केल्यामुळे लवकरच त्यांची ही सर्व घडी नर्मदामाता सुरळीत करणार याची मला खात्री पटली . पुढे आरीमार्गे सांगा खेडा कला अर्थात मोठे सांगाखेडा गाव गाठले त्यासाठी सुमारे ३० -३५ किलोमीटर अतिशय वेगाने चालावे लागले . खूप दिवसांनी डांबरी रस्ता पाहत होतो . रस्ता इतका खराब होता की दोन तासाचे अंतर कापायला मला चार तास लागले . गावात एका राम मंदिरामध्ये शिरलो . मंदिरामध्ये अनेक लोक निवासाला होते . पुजारी महंत भाडेकरू असे लोक दिसत होते . परंतु एकंदरीतच शून्य अगत्य होते . मी पुजाऱ्याला जाऊन विचारले की इथे मुक्कामाची सोय होईल का ? तर त्याने काही उत्तर दिले नाही . एव्हाना अंधार पडला होता . त्यामुळे पुढे जाण्याचा प्रश्नच नव्हता . परंतु कोणीच काही उत्तर देत नाही असे पाहून मंदिर तरी सार्वजनिक असते या न्यायाने मंदिरामध्ये मी माझे आसन लावले . परंतु इथे देखील कोणीही माझ्याशी एक शब्द देखील बोलायला पुढे येईना . या गावांमध्ये भोजन प्रसादाची व्यवस्था कोठे होते का असे मी एका माईला विचारले .परंतु तिने देखील ऐकून न ऐकल्यासारखे केले. अत्यंत स्वाभिमानाने आयुष्य जगण्याची सवय असलेला मी हे सर्व प्रकार पाहून क्षणभर अचंबित झालो . आता माझ्यापुढे दोन उपाय होते . एक तर इथेच लाचारासारखे रात्रभर उपाशी पोटी पडून राहणे . किंवा इथून उठून सरळ नर्मदेचा काठ पकडणे . दुसरा मार्ग सर्वथैव श्रेयस्कर होता . मी शांतपणे माझे सामान उचलले आणि तिथून निघालो . मला कोणीही थांब देखील म्हटले नाही . उलट मी बाहेर पडल्या पडल्या आतून सर्वजण मिळून एकत्र हसल्याचा मोठा आवाज आला ! सांगा खेडा मोठे गाव होते . काल मी मुक्काम केला ते सांगा खेडा खुर्द होते . मध्ये पाच-सहा गावे ओलांडल्यावर पुन्हा त्याच नावाचे हे गाव आहे . गावातल्या बाजारपेठेतून मी पुढे चाललो होतो . इतक्यात एक माणूस माझ्याकडे आला आणि म्हणाला तुम्हाला मी सांगणारच होतो की त्या मंदिरात जाऊ नका . इतक्यात तुम्ही आत शिरलात . त्या मंदिरामध्ये परिक्रमावासींची सेवा अजिबात केली जात नाही . सेवा न केली जाण्याला विरोध नाही . माझे म्हणणे फक्त इतकेच होते की एक मनुष्य म्हणून विचारलेल्या प्रश्नाला हो किंवा नाही इतके उत्तर निश्चितपणे देता आले असते . मूर्तीमध्ये आपण पुजतो तो राम कधी कुठल्या रूपाने तुमच्यासमोर येऊन उभा राहील हे कोण जाणणार आहे ! आत्मारामाला दुखवून तुम्हाला दाशरथी श्रीराम कधीच प्रसन्न होणार नाहीत ! असेना . तर त्या गावकऱ्यांनी मला सांगितले की पुढे एक गरीब शेतमजूर परिक्रमा वासीना सेवा देतो . त्याला भेटा . इतक्यात छोटे गाव असल्यामुळे पुढे ती वार्ता पोहोचलीच आणि स्वतः तो मनुष्य मला घेण्याकरता आला . या माणसाला मी कधीच विसरू शकणार नाही ! या महान पुण्य पुरुषाचे नाव आहे लाल्या कीर ! 
दिसते तसे नसते ,म्हणून जग फसते ! या म्हणीचा प्रत्यय देणारा सांगाखेडा कला येथील महापुरुष लालचंद उर्फ लाल्या कीर
लाल्या कीर याची कथा अतिशय प्रेरणादायक आहे . सध्या याने ऐन बाजारपेठेत दोन गुंठे जागा विकत घेऊन घर ,गोठा ,दुकाने ,भव्य शिवमंदिर आणि परिक्रमा वाशींची निवास व्यवस्था असे सर्व बांधलेले आहे . समोर दोन दुकाने काढलेली असून ती भाड्याने दिलेली आहेत . त्यातील मेडिकल वाला परिक्रमावासींना मोफत औषधे देतो . त्याच्यावर एक खोली बांधली असून तिथे परिक्रमावासी उतरतात . 
हीच ती दोन दुकाने
वरच्या बाजूला धर्मशाळा दिसते आहे शेजारी स्वतः लाल्या कीर उभा आहे . मागील बाजूला मंदिराचे सुरू असलेले बांधकाम दिसते आहे .
लाल्या कीर स्वतः बांधत असलेले अतिशय कल्पक शिव मंदिर . याचे प्रवेशद्वार म्हणजे साक्षात एक भव्य दिव्य नंदी आहे . आणि कळस म्हणजे ध्यानस्थ बसलेला शंकर आहे . पायापासून वरपर्यंत या मंदिराची उंची ८० फूट आहे असे लाल्याने सांगितले .
एका परिक्रमावासींसोबत लाल्या कीर आपल्या धर्म शाळेमध्ये
मी आसन लावल्या लावल्या लाल्याच्या घरातील ओळीने सर्वजण येऊन माझ्या पाया पडून समोर बसले . बहुतेक तसा दंडकच त्याने घातलेला होता . स्वतः लालचंद उर्फ लाल्या कीर आणि त्याची गृह कर्तव्यदक्ष पत्नी सौ रक्षा .यांना एकूण पाच आपत्ये . पायल , पलक ,जयराज , राशी आणि साक्षी . सर्वच जण विविध गुणांनी संपन्न होते . यासोबत लाल्याने भरपूर कबुतरे ,गाई , म्हशी , बकऱ्या , कोंबड्या असे सर्वच पाळलेले होते .भव्य दिव्य मंदिराचे बांधकाम सुरू होते . केवळ दोन गुंठे अर्थात २००० चौरस फुटामध्ये इतका सारा संसार लाल्याने कसा काय बसवला हा एक मॅनेजमेंट प्रोजेक्टसाठी अभ्यासाचा विषय होऊ शकतो . लाल्याची कथा मोठी उद्बोधक आहे . विशेषतः आजच्या काळामध्ये भरपूर पगार असून देखील भविष्यात आमचे काय होणार असा नकारात्मक विचार करणाऱ्या सर्वच लोकांनी ही कथा मुळापासून वाचावी . लाल्या कीर हा अंगठा छाप आहे . त्याला थोडी सुद्धा अक्षर ओळख नाही . तो मोलमजुरी करून पोट भरणारा एक गरीब इसम . गरिबी सोबत येणारी सर्व व्यसने इत्यादी त्याला देखील होती . विशेषतः तो जे काम करायचा ते करण्याकरता फार मोठे काळीज लागते . आणि अंगात प्रचंड ताकद देखील लागते . हा भाग भारताची वाळू पंढरी आहे . इथे नर्मदा नदीमध्ये १५ , २० ,२५ तर कधी तीस फूट खोल जाऊन पाटीने वाळू उकरून ती पुन्हा पोहत वरती आणून नावे मध्ये भरायची असे काम दिवस रात्र करणारी मजूर मंडळी असतात . दिवसातील बारा ते अठरा तास हे पाण्यामध्ये असतात . दिवसाला किमान चार ते पाच नावा ते भरतात . ही नाव म्हणजे खूप मोठी नाव असते . त्यासाठी प्रचंड ताकद , हिम्मत ,मेहनत ,दमसास  लागतो . हे काम करून तो जेव्हा भाकरी खाण्यासाठी बसायचा तेव्हा प्रचंड भूक लागलेली असायची . खूप कष्ट सुरू होते परंतु त्याला त्यातून आनंद मात्र मिळत नव्हता . एके दिवशी तो असाच भाकरीचा तुकडा तोडणार इतक्यात एक भुकेला परिक्रमावासी आला आणि त्याने लाल्याला खायला भाकरी मागितली . लाल्याकडे दोन भाकरी होत्या . त्यातली एक भाकरी त्याने परिक्रमा वासीला दिली आणि एक भाकरी स्वतः खाल्ली . ती भाकरी खाणाऱ्या परिक्रमावासीच्या चेहऱ्यावरील भाव पाहून लाल्याला आयुष्यात यापूर्वी कधीही झाला नव्हता अशा एका अद्भुत आनंदाची अनुभूती आली ! आणि त्याला जणू काही त्याच्या जीवनाचे गमक सापडले ! दुसऱ्या दिवशी लाल्याने शिदोरी सोडली आणि मनोमन प्रार्थना केली की एखादा भुकेला परिक्रमावासी येऊ दे . गंमत म्हणजे त्याही दिवशी दोन परिक्रमावासी आले आणि लाल्या ने स्वतः उपाशी राहून त्याने दोघांना दोन भाकरी खायला दिल्या . त्या दोघांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून लाल्याला आज अजूनच जास्ती आनंद मिळाला ! इथून पुढे लाल्याला हा छंदच जडला ! तो रोज काठाने जाणाऱ्या परिक्रमावासींना भाकरी भाजी चटणी भरवू लागला . भाजी भाकरी साठी पैसा कमी पडू लागल्यावर त्याने दारू , तंबाखू ,नॉनव्हेज अशी व्यसने क्रमाक्रमाने कमी केली आणि त्या पैशातून तो परिक्रमावासींची भूक भागवू लागला . यापूर्वी कुठल्याही कामातून कधीही मिळाला नव्हता असा आनंद त्याला या अन्नदानातून मिळायला लागला . त्याचे अनुभव सांगताना लाल्या जणू काही पुन्हा एकदा तो काळ आठवत होता ! आम्ही सर्वच जण मोठ्या एकाग्रतेने त्याचे अनुभव ऐकत होतो . पुढे एका परिक्रमावासीने जाता जाता लाल्या ला सल्ला दिला की नर्मदे काठी भरपूर भाज्या उगवतात . तर तू भाज्या विकण्याचा व्यवसाय कर .त्यात तुला यश मिळेल . हा साक्षात नर्मदेचाच आदेश मानून लाल्याने भाजीचा व्यवसाय सुरू केला . आता डांबरी रस्त्याने जाणारे परिक्रमा वासी लाल्या कडे थांबू लागले . हा त्यांना टोमॅटो ,लिंबू ,काकडी ,बटाटे अशा भाज्या देत असे . एका परिक्रमावासीने त्याला फळे विकायचा सल्ला दिला . या व्यवसायामध्ये जम बसल्यावर त्याने पुढे फळे देखील विकायला सुरुवात केली .या व्यवसायामध्ये नफा अधिक मिळत असे . मग त्याने परिक्रमावासींना पपई , चिक्कू ,पेरू ,केळी अशी फळे देण्यास सुरुवात केली . एक काळ असा होता की लाल्या कीर दिवस-रात्र कष्ट करून नर्मदेच्या काठावर पिऊन पडलेला असायचा . कोणीही त्याला विचारत नव्हते . आणि आता मात्र लाल्या कीर याचे नाव गावातील प्रत्येकाला माहिती होते . लोक आवर्जून परिक्रमा वासींना सांगायचे की लाल्या कीर नावाचा मनुष्य तुम्हाला सेवा देतो . त्याचा लाभ घ्या . एक अतिशय सन्मान जनक आयुष्य आता तो नर्मदेच्या कृपेने जगत होता . याच कालावधीमध्ये लाल्याला पाच मुले झाली . पत्नीने त्याला या सर्व वाटचालीमध्ये खंबीर साथ दिली . अर्धांगिनी ची साथ खंबीर असेल तर मनुष्य कितीही मोठे कार्य लीलया पेलू शकतो .पुढे या व्यवसायातून मिळणाऱ्या पैशातून लाल्याने गावामध्ये दोन गुंठे जागा घेतली . पुढच्या बाजूला भाड्याने दिलेली दोन दुकाने आणि त्यातून येणारे संपूर्ण उत्पन्न तो केवळ परिक्रमावासींची सेवा याच कामाकरिता लावतो .त्याचा अनुभव असा सांगतो की जोपर्यंत तो स्वतःसाठी आयुष्य जगत होता तोपर्यंत त्याच्या आयुष्यामध्ये खूप दुःखे होती . परंतु जसा त्याने स्वार्थ त्यागला आणि परिक्रमावासींसाठी तो सेवा देऊ लागला ,त्या दिवसापासून त्याच्या घरामध्ये लक्ष्मीची कमतरता कधीच जाणवलेली नाही .आणि हा अनुभव नर्मदे काठी जवळपास प्रत्येक सेवादाराला आलेला आहे . विशेष म्हणजे त्याची छोटी मुलगी साक्षी हिचा एक अनुभव त्याने मला सांगितला .लाल्याने नुकतेच एक एकर शेत खरेदी केले आहे . आता त्याच्या घरातील सर्वजण सकाळी लवकर उठून शेतामध्ये जातात आणि काम करतात . पूर्वी दुसऱ्यांच्या शेतात मोलमजुरी करणारा लाल्या आता स्वतःचे शेत कसतो आहे . ही नर्मदेचीच कृपा आहे अशी त्याची ठाम श्रद्धा आहे . तर एक दिवस असेच सर्व जण शेतामध्ये कामासाठी गेले होते . आणि घरी सहा वर्षाची साक्षी एकटीच होती . इतक्यात १४ - १५ परिक्रमावासींचा एक जथ्था तिथे आला . परिक्रमा वासिनी साक्षीला नर्मदे हर केले . तिच्या जागी एखादी दुसरी सहा वर्षाची मुलगी असती तर कदाचित घाबरून गेली असती किंवा गोंधळून गेली असती किंवा तिने चक्क सर्वांना सांगितले असते की घरी कोणी नाही तरी कृपया पुढे जावे . परंतु साक्षीने सर्वांना वरती धर्म शाळेमध्ये बसविले . स्वतः खाली आली आणि कणिक मळून तिने सर्वांसाठी पुऱ्या लाटल्या . चुलीवरती तेलाचे आढण ठेवून त्या उत्तम पैकी तळल्या . एकीकडे बटाटे चिरून तिला जमेल तशी बटाट्याची भाजी केली . आणि सर्व परिक्रमावासींना वरच्या मजल्यावर ते अन्नपुरा पोटावर नेऊन पुरी भाजी खायला घातली . इतक्यात सर्वजण शेतावरून घरी आले . घरी येऊन लाल्या आणि रक्षा पाहतात तो काय ! सर्व परिक्रमावासी तृप्तीचा ढेकर देत आहेत ! जेव्हा लाल्याला साक्षीचा हा पराक्रम कळला तेव्हा त्याला लक्षात आले की नर्मदा मातेची कृपा असेल तर कोणीही काहीही करू शकते ! आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे लाल्याने आणि त्याच्या बायकोने या मुलांवर त्यांच्या नकळत जो सेवेचा संस्कार केला होता त्याची ही फलश्रुती होती . त्या मुलांकडे पाहिल्यावर खरोखरीच कोणालाही लक्षात आले नसते की ही काय दर्जाची मुले आहेत ! लाल्याची मोठी मुलगी पायल ही अतिशय उत्कृष्ट तब्येत असलेली आणि व्यायामाची आवड असलेली खेळाडू होती . तिला मी भारतीय लष्करामध्ये भरतीसाठी मुलींना कशा कशा व काय काय संधी आहेत याची विस्तृत माहिती लिहून दिली व सैन्यभरतीची प्रेरणा दिली . पुढे काही दिवसांनी तिने मला आवर्जून फोन करून ती लष्कर भरतीसाठी प्रयत्न करत आहे याची कल्पना दिली . राशीला ब्युटीशियन व्हायचे होते ! त्या क्षेत्रामध्ये कुठे , कशा ,किती व कोणत्या संधी आहेत याची देखील तिला माहिती दिली . घरी असलेल्या चार स्त्रिया ही तिच्यासाठी मोठीच प्रयोगशाळा आहे असे सांगताच सर्वच जणी हसू लागल्या ! एकंदरीत माझा लाल्या च्या धर्म शाळेतील मुक्काम अतिशय संस्मरणीय ठरला . लाल्या हा मनुष्य अनेक तरुणांसाठी प्रेरणास्त्रोत ठरणारा आहे . नियमित उत्पन्नाचे स्त्रोत असून ,व्यवसायातून किंवा नोकरीतून मिळणारे चांगले अर्थाजन असून देखील ,केवळ एखादे किंवा दोन मुले सांभाळता सांभाळता नाकी नऊ आल्याचे खोटे नखरे करणाऱ्या शहरवासीयांनो , लाल्याचा आदर्श घ्या ! याच्यामध्ये मी सुद्धा आलो बर का ! लाल्या कीर याने मला खरंच खूप दिले . त्याच्याकडून खूप काही शिकलो . त्याच्या पत्नीकडून देखील खूप काही शिकण्यासारखे आहे . कितीही परिक्रमावासी आले तरी देखील ती माऊली न कंटाळता , न थकता , शेतातील सर्व कामे करून ,गाईगुरे यांचे सर्व सोपस्कार करून , पाचही मुलांचे जेवण , नाश्तापाणी , शाळा , कॉलेज इत्यादी करून , धर्मशाळेत लागेल तशी सेवा करते . वृद्ध आजारी परिक्रमावासींची सेवा करते . इथे आलेले परिक्रमावासी पुन्हा कधी येत नसतात . त्यामुळे देणग्या वगैरे मिळण्याची शक्यताच नाही . तरी देखील लाल्या स्वखर्चाने हे सर्व कार्य चालवितो आहे .मी त्याला यूपीआय म्हणजे काय ते समजावून सांगितले . परंतु त्याने अशा पद्धतीने देणगी घेण्यास स्पष्ट नकार दिला . तो म्हणाला हा लाल्या कीर धड धाकट आहे तोपर्यंत स्वतःच्या बळावरच सेवा कार्य करेल ! साधू संतांचे ,परिक्रमावासींचे मिळणारे आशीर्वाद हीच त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी कमाई आहे असा दृढ विश्वास त्याने व्यक्त केला . मला असे आवर्जून सुचवावेसे वाटते की ज्यांना नर्मदे काठी काही सेवा कार्य करण्याची इच्छा आहे त्यांनी सांगाखेडा कला येथील लाल्या कीर याला अवश्य मदत करावी . त्याचा मोबाईल क्रमांक खालील प्रमाणे . श्री लालचंद कीर नऊ सात सात शून्य तीन एक शून्य चार सात दोन
९७७०३१०४७२ . 
हे सर्व बोलणे होईपर्यंत त्याच्या मुलींनी आणि पत्नीने अतिशय प्रेमाने तुपामध्ये अक्षरशः लडबडलेल्या रोट्या आणि भाजी मला पोटभर खाऊ घातली . सर्वात आश्चर्याची गोष्ट अशी होती की हे सर्व करणाऱ्या लाल्या कीर याने आता घराच्या जागेतच मंदिर बांधायला सुरुवात केली होती आणि या संपूर्ण पंचक्रोशीमध्ये ८० फूट कळसाची उंची असलेले दुसरे मंदिरच नव्हते ! गावातील आणि परिसरातील मोठ्या धनिकांना देखील कोडे पडले होते की लाल्या कीर याच्याकडे एवढा पैसा येतो कुठून ! त्याचे उत्तर फार सोपे होते ! मैया के नाम पे एक दे दो ,मैया चार वापस करती है ! दुसऱ्या दिवशी सकाळी लाल्याने मला त्याची कबुतरे जनावरे तसेच नवीन बांधकाम सुरू असलेले मंदिर धोकादायक शिडीवरून वरपर्यंत चढून दाखवले . वरती कळस म्हणून उभी केलेली महादेवाची ध्यानस्थ मूर्ती अतिशय सुंदर होती . हे मंदिर भविष्यामध्ये खूप प्रसिद्धीला येणार याची खात्री आहे . थोडक्यात लाल्या आणि रक्षा दोघे मिळून एक अतिशय आदर्श गृहस्थाश्रम जगत होते . यशस्वी गृहस्थाश्रमासाठी शिक्षण ,पैसा ,नोकरी किंवा पद प्रतिष्ठा यातील काहीच लागत नसून केवळ निष्ठा निष्ठा आणि निष्ठा या तीन गोष्टींची गरज असते . स्वतःच्या कर्तव्यावरील निष्ठा , स्वतःच्या ध्येयावरील निष्ठा आणि स्वतःच्या आराध्य दैवतावरील निष्ठा ,या तीन निष्ठा तुम्हाला गृहस्थाश्रमातून तारून नेतात हे मला लाल्याने शिकविले .  निघताना मी लाल्याला माझ्याकडे असलेली एक उंची पांढरी शाल आणि पोरांना खाऊ तसेच प्रत्येकाच्या हातात ५० - ५० रुपये दिले आणि तिथून निघालो . तुम्हाला एखाद्या ठिकाणी पैसे देण्याची इच्छा झाली तर जितके पैसे देण्याचा संकल्प तुम्ही केलेला असतो ,बरोबर तितकेच पैसे तुम्हाला त्या एक-दोन दिवसांमध्ये दक्षिणा स्वरूपात मिळालेले असतात असे मी खूप वेळा अनुभवले . 
(ता.क. : आपल्या ब्लॉगच्या एक नित्यवाचक आहेत . सौ . राधिका नितीन दिघे . यांनी मोठ्या प्रयत्नाने लालचंद कीर यांना बँकेमध्ये त्यांचे प्रथम अकाउंट उघडून दिले व क्यूआर कोड मिळवून दिला आहे . त्यामुळे त्यांना मदत करणे आता आपल्याला सोपे होणार आहे त्यांचा क्यूआर कोड खालील प्रमाणे आहे .
श्री लालचंद कीर यांचा क्यूआर कोड
 (कृपया या फोनवर रक्कम पाठवल्यावर कळवणे म्हणजे यादीमध्ये अपडेट करता येईल तसेच लालचंद यांना कळविता येईल )

मी जाताना पुढे तवा नदीचे फार मोठे पात्र लागणार होते . या पात्रामध्ये भरकटण्याची शक्यता असल्यामुळे लाल्याने त्याच्या पुतण्याला फोन करून बोलावून घेतले आणि मला तवा नदी पार करून सोडण्यास सांगितले . लाल्याचाच पुतण्या तो ! त्याने जाता जाता मला त्याच्या शेतातील ताज्या ताज्या दोन किलो काकड्या काढून दिल्या ! लाल्या चे त्याने स्वतः न सांगितलेले अनेक पैलू या पुतण्याने मला सांगितले . असे स्वतःबद्दल अधिक न बोलता केवळ सेवा कार्यातून व्यक्त होणारे अनेक महापुरुष ,हीच आपल्या देशाची खरी संपत्ती शतकानुशतके राहिलेली आहे . या संपत्तीचे जतन , संगोपन आणि संवर्धन करणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे . तवा नदीचे पात्र किती मोठे असावे ? आतापर्यंत नर्मदेला येऊन मिळणाऱ्या सर्व नद्या ह्या तिच्या उपनद्या असल्यामुळे आकाराने खूपच छोट्या असायच्या . परंतु तवा ही अशी एकमेव नदी आहे की जी उपग्रहा मधून सुद्धा स्पष्टपणे दिसते ! खोटे वाटते आहे का ? खालील प्रतिमा पहा !
या उपग्रह छायाचित्रांमध्ये तुम्हाला भारताचा गुजरात ,महाराष्ट्र ,मध्य प्रदेश दाखविणारा नकाशाचा काही भाग दिसतो आहे . नकाशामध्ये दाखविलेल्या गोलात जी पांढरी अळी वळवळताना दिसते आहे तीच तवा नदी आहे ! आणि हा पांढरा रंग म्हणजे तवा नदीमध्ये असलेली प्रचंड प्रचंड वाळू आहे ! 
या तवा नदीचे सारेच हटके आहे ! नर्मदेला सर्व नद्या सरळ येऊन मिळतात परंतु तवा मात्र उलटी येऊन नर्मदार्पण होते ! वरील नकाशा नीट पहा . यात वरून खाली नर्मदा नदी येथे आहे तर खालून वर जाणारा वाळूचा सागर म्हणजे तवा नदी आहे . ही तवा नदी एक गंधाकृती वळण घेऊन नर्मदेला जाऊन मिळते आणि अक्षरशः लुप्त होते .
या तवा नदीचे पात्र इतके लांबरुंद विस्तारलेले आहे की त्या कोरड्या पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात लोक शेती करताना दिसतात . इथे वाळू जरी दिसत असली तरी वाळूच्या खालून तवा नदी वाहते आहे . नदीच्या मुख्य धारा तीन चार छोट्या छोट्या शाखांमध्ये विभागून वाहतात .आणि या नदीतील पाणी अतिशय स्वच्छ ,निखळ ,नितळ आणि गरम आहे ! कदाचित या गरम पाण्यामुळे या नदीला तवा नाव पडले असावे .
लाल्या च्या पुतण्याने मला तवा नदी दाखवेपर्यंत ती इतकी भव्य असेल याचा अंदाज मला आलेला नव्हता . आतापर्यंत सर्वात भव्य नदी केवळ नर्मदाच पाहत आलो होतो . तवा नदीचे पात्र पाहून एक क्षणभर शंका आली की ही नर्मदा तर नसेल ना ! परंतु म्हणून सोबत असलेला मार्गदर्शक आवश्यक आहे ! तो मला पलीकडच्या काठावर नेऊन सोडणार होता परंतु मी त्याला सांगितले की तू इथून परत गेलास तरी चालेल .मला मार्ग सापडेल . इथे प्रत्येक शेतामध्ये झाडांना पाणी घालण्याकरता एक खोल खड्डा केला जातो व त्यामध्ये तवा नदी प्रकट होते . तिचे पाणी डबड्याने घेऊन एकेका रोपाला नेऊन घातले जाते . या शेतीला कोणीही मालक नसतो . केवळ पावसाळा नसताना नदीने कृपा केल्यामुळे तिथे कोणीही येऊन आपापली शेती करून उत्पन्न घेऊन निघून जातो . तरी देखील लोकांनी काटेरी कुंपण वगैरे घालून जाण्या येण्याचे मार्ग अडवलेले आहेतच ! आपली मालकी नक्की कशावर आहे हे ज्याला कळले त्याने सर्व जिंकले ! साक्षात ज्या देहामध्ये आपण राहतो आहोत त्या देहावर देखील आपले मालकी हक्क चालत नाहीत तर बाकीचे काय घेऊन बसलाय ! असो . एका शेतामध्ये अशाच पद्धतीने काढलेला खड्डा मी पाहत असताना लाल्याच्या पुतण्याने फोटो काढला . माझ्या मित्राच्या क्रमांकावर त्याने तो पाठवून दिला . तवा नदीच्या विस्तीर्ण पात्रामध्ये शेती करून झाडांना पाणी घालण्यासाठी तवा नदीचे पाणी उपसण्याची 'जुगाड ' व्यवस्था दाखविताना प्रस्तुत लेखक . मागे तवा नर्मदा संगमावरील बांद्राभान चा पुल दिसतो आहे .
तवा नदी पात्रातील एका काकडीच्या शेतामध्ये उभा असलेला प्रस्तुत लेखक . इथे काकडी ,भोपळा , दुधी भोपळा ,पडवळ ,घोसावळे ,कलिंगड , खरबूज अशा वेलवर्गीय वनस्पतींची हंगामी शेती केली जाते . दूरवर जिथे पर्यंत नजर जाते आहे तिथे पर्यंत तवा नदीचेच पात्र पसरलेले आहे .
तवा नदीचे पाणी जेव्हा लागले तेव्हा मला फारच गमतीशीर गोष्ट कळाली ! हे पाणी गरम आणि अतिशय गतिशील होते . याच्यामध्ये सरळ चालत जाता येतच नव्हते इतकी त्याला ओढ होती . पायाखाली देखील वाळूच वाळू होती . परंतु या पात्रातून पाणी वाहते आहे त्या दिशेला चालायला सुरुवात केली तर मात्र हे पाणी खूप जास्त गती देत होते . अशा पद्धतीने मी नदी पार करायच्या ऐवजी नदीपात्रातून चालायला सुरुवात केली ! पायाखाली वाळूचे लहान-मोठे ढीगारे तयार झाले होते . एकदा अचानक खोल खड्डा लागला आणि मी बऱ्यापैकी भिजलो . मग मी चक्क झोळी बाहेर ठेवून तवा नदीमध्ये स्नानाचा आनंद घेतला ! अशी दोन-तीन वाहणारी पात्रे आडवी आली . त्याचा मनसोक्त आनंद घेत समोरच्या तटावरील खडा चढ चढलो . थोडेसे चालून एक रस्ता ओलांडला की लगेच नर्मदेचे पात्र लागणार होते . इथे एका शेतामधील काकड्या ट्रॅक्टर मध्ये भरण्याचे काम सुरू होते . त्यांनी देखील मला सापासारख्या लांबलचक चार-पाच काकड्या दिल्या . या सर्व काकड्यांनी माझ्या पाठीवर प्रचंड ओझे टाकले होते . त्यामुळे पुढे रस्ता लागल्या लागल्या एका वस्तीतील लहान मुलांना सर्व काकड्या वाटून टाकल्या . तवा आणि नर्मदा यांचा संगम अद्भुत आहे . नर्मदा आणि तवा या दोन नद्यांच्या पाण्यातील रंगांमध्ये खूप फरक आहे . आणि संगम स्पष्टपणे दिसतो . नर्मदेच्या बाजूला पाणी खूप खोल असून तवा नदी उथळ आहे . संगमाच्या रेषेवर जाऊन उभे राहिले की नर्मदेचे पाणी बर्फासारखे गार तर तवा नदीचे पाणी अतिशय गरम लागते !पुढे थोडे अंतर गेल्यावर तवा नदीचे पाणी हळूहळू लुप्त होते आणि केवळ नर्मदा शिल्लक राहते . हे अद्भुत दृश्य तुम्हाला उघड्या डोळ्यांनी बघता येते . त्यासाठी थोडेसे धाडस करून या दोन नद्या मिळतात त्या बिंदूला जाऊन उभे राहावे लागते .नर्मदा नदीमध्ये आढळणारी अतिशय उत्कृष्ट दर्जाची बारीक वाळू मोठ्या प्रमाणामध्ये नर्मदेमध्ये आणून सोडण्याचे महत्त्वाचे कार्य तवा नदी अहोरात्र करत आहे .  इथे एक गंमतच झाली ! संगमावर स्नानाला जाण्यापूर्वी मी माझी झोळी खाली काढून ठेवली आणि अंगावरील कपडे एका झेंड्याच्या काठीवर लटकवून ठेवले . मी स्नान करत असताना अचानक मोठे वारे आले आणि ते कपडे उडून तवा - नर्मदा संयुक्त नदीमध्ये पडून वाहून गेले ! मैया कशाला गरीबाची चेष्टा करते राव असे म्हणत तसाच निर्वस्त्र बाहेर आलो .या दोन्ही नद्यांचा बांद्राभान इथे झालेला हा संगम साधारण दोन अडीच किलोमीटर रुंदीचा विस्तीर्ण वालुकामय परिसर निर्माण करतो .त्यामुळे इथे माझ्याशिवाय आणि या दोन मातांशिवाय अन्य कोणीही नव्हते . आता बाहेर आल्यावर मला घालण्याकरता एकच वस्त्र शिल्लक राहिले होते ते म्हणजे डोक्यावरचा फेटा! ते गुंडाळून पुढे चालायला लागलो . इतक्यात पुढे काही अंतरावर माझे कपडे काठाला लागलेले मला दिसले ! ते पिळून वाळूवर वाळत घातल्याबरोबर पाचच मिनिटात कडक वाळले ! इथली वाळू भयंकर तापते . परंतु तिच्यातून पाय ओढत चालण्यामध्ये एक वेगळाच आनंद आहे ! वाळूतून खूप काळ चालल्यावर जमीन लागली की तुमच्या पायाला दुप्पट तिप्पट ताकद आलेली आहे असे वाटते ! आणि ती आलेली असतेच ! इथून पुढे नर्मदा काठावरील एक अतिशय प्रसिद्ध असे शहर होशंगाबाद ज्याचे नाव नुकतेच (नर्मदाजयंती २०२२ रोजी ) नर्मदापुरम असे करण्यात आले होते , तिथे जाण्याचे अहोभाग्य मला लाभणार होते ! आज नर्मदापुरम गाठायचेच असा संकल्प मनाशी करून तलम व तप्त वाळूत रुतणाऱ्या पायांना अजून गती दिली . नर्मदा मातेचा सुखद सहवास सदैव सोबत होताच !



लेखांक बावन्न समाप्त ( क्रमशः )

मागील लेखांक

पुढील लेखांक



टिप्पण्या

  1. नर्मदे हर !
    श्री लालचंद किर यांना साष्टांग प्रणिपात
    त्यांच्या कार्यास हातभार लावण्याची मैय्या ने प्रेरणा दिली 🙏
    परंतु आज अकाऊंटला फक्त २ आकडी रक्कमच शिल्लक होती त्यातील ₹ ९.९१ बाकी ठेऊन सर्व पाठऊन दिली 🙏
    रक्कम खूपच छोटी आहे अगदीच क्षुल्लक पण जेव्हा ताकद (आर्थिक) येईल तेव्हा नक्कीच एक टार्गेटेड अमाऊंट मी नक्कीच पाठवेल 🙏
    मानस परिक्रमा सुरू आहे आपल्याद्वारे 🙏
    आपणास अनेकानेक धन्यवाद 🙏
    नर्मदे हर ! 🙏

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. विशाल सिंह जी , आपली रक्कम लहान नसून विशाल आहे ! मैयाच्या काठी एक रुपया दिला तर ती कित्येक पटीने परतावा देते असा सर्वांचा अनुभव आहे ! आपल्यालाही मैया भरभरून देईल आणि आपली इच्छा पूर्ण करेल ! आपले खूप खूप आभार ! नर्मदे हर !

      हटवा

टिप्पणी पोस्ट करा

जे आवडते सर्वांना ...

अनुक्रमणिका

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

लेखांक १ : नर्मदे हर !

लेखांक २ : भोपाळ जवळच्या जंगलातील अपघात

लेखांक ४ : झुठा कही का ! सबकुछ तो लाए हो !

लेखांक ३ : चोराची धन

लेखांक ५ : ग्वारीघाट जबलपुर मध्यप्रदेश

लेखांक ८३ : महाराष्ट्रात प्रवेश आणि भाबरीचे भेदक भिल्ल-महात्मा फोदला गारद्या पावरा

लेखांक ७४ : लेपा बांध , वेदा संगम , कठोरा अन् मांडव्य गुंफा

लेखांक ९० : गुजरात मधील कणजी चे सान्सुभाई तडवी आणि अरण्यव्याप्त माथासर