लेखांक ५१ : दुधी संगम पंचकोसी यात्रा , रामदासजींचा महायज्ञ , सिवनी आश्रम आणि भटगावचे भग्न मंदिर

शुक कुटी सोडली आणि निमावर गाव गाठले. नर्मदा नदीचे नाभी स्थान नेमावर म्हणून आहे ते वेगळे आणि हे वेगळे . अजून नाभी स्थानापर्यंत आपण पोहोचलेलो नाही . निमावर नंतर संदूक नावाचे गाव लागते .या गावातील खेडापती मंदिर आणि गावाच्या शेवटी लागणारे सिंहनाथ मंदिर तसेच या संपूर्ण परिसरामध्ये अनेक पुरातन मंदिरांचे भग्न अवशेष बघायला मिळतात .लोकांनी अज्ञानापोटी मंदिराचे विविध भाग देव देवताp म्हणून पुजलेले आढळून येतात . प्रत्यक्षामध्ये हे मंदिराचा आमलक , कळस ,खांब , महिरपी इत्यादींचे मूर्ती भंजकांनी फोडून केलेले तुकडे आहेत हे तज्ञ माणसाला लगेचच लक्षात येते . 
संदूक गावातल्या खेडापती मंदिरामध्ये देव समजून पुजलेले प्राचीन भग्न मंदिराचे अवशेष .
सिंहनाथ मंदिरातील पुरातन मंदिराचे अवशेष आणि उत्कृष्ट मूर्ती . अशा भ ग्न मंदिरांचे अवशेष नर्मदा खंडामध्ये अक्षरशः हजारो गावांमध्ये आहेत .
गत वैभव लोप पावून आजची आमची मंदिरे अशी उरलेली आहेत . हे खेडापती मंदिर आहे . 

इथून पुढे किनाऱ्याने चालताना एक फार मोठा वटवृक्ष दिसू लागला . या वृक्षाची छाया प्रचंड होती . कुतूहलाने वरती गेलो असता लक्षात आले की हा बरिया घाट असून ही धुनी वाले दादाजी यांची ही तपोभूमी होती .
हा संपूर्ण गोल गरगरीत विस्तार एकाच वटवृक्षाचा आहे .
निळा पत्रा म्हणजे साधू कुटी आहे . 
वट चा वड शब्द झाला . वडला बड म्हणू लागले . ड चा र स्वाभाविकपणे इथले लोक करतात .त्यामुळे बड शब्दाचा बर असा शब्द  झाला . त्या वडाचा / बडाचा घाट म्हणून बरिया घाट . शुद्ध मराठीमध्ये वड्या घाट . इति शब्द व्युत्पत्ती कथा .असो .
हे स्थान अतिशय पवित्र होते . पुरणकाळातील एखाद्या ऋषीमुनींचा आश्रम कसा असावा हे या स्थानाकडे पाहून कळत होते . तिथे बाजूला एक छोटीशी कुटी होती आणि तिथे शिवरामदास नावाचे साधू राहत होते . कुटी आणि संपूर्ण परिसर अत्यंत स्वच्छ ठेवला होता .
शिव रामदास बाबांची कुटी
 बाबा स्वभावाने थोडेसे विक्षिप्त होते ,परंतु साधूंच्या दृष्टीने हा स्वभाव सर्वसामान्य आहे . त्यांनी मला कालच्या एकादशी निमित्त केलेल्या भगर आणि भाजीचा बालभोग दिला . तो पोटात गेल्यावर थोडासा आधार आला . यांनीच मला सांगितले की झिकोली गावामध्ये असलेला दद्दा यांचा आश्रम त्यांच्या नावावर चालविला जातो आणि तो अधिकृत शिष्याचा किंवा शिष्य परंपरेतला नाही . हा वटवृक्ष इतका मोठा होता की त्याच्या पारंब्यांचा विस्तार कित्येक मीटर पसरलेला होता . यातील मूळ वृक्ष कुठला आहे ते ओळखता येणे कठीण होते . एखाद्या मोठ्या बंगल्यामध्ये जशी विविध दालने असतात तशा या पारंब्या पसरून जमिनीत रुजल्यामुळे मोठी मोठी दालने तयार झाली होती . एकाच वेळी किमान दोन तीनशे लोक आराम करतील इतकी सावली या झाडाला होती . इथे काही काळ ध्यानाला बसल्यावर खूप छान वाटले . साधु ने तो संपूर्ण परिसर अतिशय म्हणजे अतिशयच स्वच्छ ठेवला होता . अक्षरशः एवढा मोठा वृक्ष वरती असून खाली एक पान सुद्धा पडलेले नव्हते . पाने , काड्या , फळे , पक्ष्यांच विष्ठा ,पडल्या पडल्या तो झाडून टाकत असे . इतकी स्वच्छता राखत असल्यामुळे स्वाभाविकपणे आलेल्या भाविकांना देखील गैरशिस्त वर्तन करण्याची परवानगी बाबा देत नसे , आणि हे योग्यच आहे .
गुगल नकाशावर या वडाची काही छायाचित्रे मिळाली ती आपल्या दर्शनाकरता सोबत जोडत आहे .
खाली जमिनीवर किती स्वच्छता ठेवलेली आहे पहा . कुठेही एक पान सुद्धा पडलेले दिसणार नाही .ही शिव रामदास बाबांची कमाल आहे .
मूळ खोड इथे कुठेतरी असावे
प्रत्येक पारंबी सरळ जमिनीमध्ये घुसेल असे नियोजनपूर्वक पाहिले गेले आहे . 
इथे आत मध्ये आल्यावर मनुष्य हरवल्यासारखा होतो . 
खालची जमीन अतिशय स्वच्छ चोपलेली ,लिंपलेली आणि खडे -कचरा - काड्या - पाने विरहित आहे .
कुठेही जाऊन तुम्ही आरामात बसू शकता . अशी स्वच्छता कायम ठेवणे किती अवघड आहे विचार करून पहा .
या वटवृक्षाचा विस्तार दिवसेंदिवस वाढतच आहे
या वडाच्या शीतल छाये मध्ये सुंदर असे शिवमंदिर आहे . शिवलिंग अतिशय उभट आहे .
बढ़िया घाटाच्या इथे खाली उतरून वाळूचा मोठा किनारा पार केल्यावर दुधी नावाच्या नदीचा नर्मदे शी संगम होत होता . संगमाच्या सुरुवातीला एक सुरेख आणि भव्य दिव्य महादेव मंदिर होते .
महादेव मंदिर ,दुधी संगम
यात्रेकरूंनी आणून लावलेले गावोगावीचे ध्वज
मंदिरामध्ये असलेला घनदाट आम्रवृक्ष लक्ष वेधून घेतो .

या दोन्ही नद्यांनी इथे प्रचंड वाळू आणून टाकलेली आहे . त्यामुळे खूप मोठे वाळवंट तयार झालेले आहे . या वाळवंटावर शेकडो तंबू आणि हजारो लोकांची गर्दी दिसू लागली .ही नर्मदेचीच पंचकोशी किंवा पंचक्रोशी किंवा पंचकोसी परिक्रमा सुरू होती . याचा अर्थ साधारण पाच कोस अंतराची छोटी परिक्रमा .  जिकडे तिकडे लोकांची स्वयंपाकाची गडबड चालली होती . बहुतांश लोक गक्कड भाजत होते . जणूकाही एक मोठा मेळाच इथे भरला होता . स्नान करून लोकांनी वाळवंटामध्ये कपडे वाळत घातले होते . ते चुकवत चालताना कसरत करावी लागत होती . परिक्रमेमध्ये सर्व वयोगटातील स्त्री-पुरुष होते .इथे काही तरुण देखील होते . त्यातल्या एका उत्साही तरुणाने माझे फोटो काढले . आणि पाठवण्यासाठी नंबर मागू लागला . माझ्याकडे फोन नाही कळल्यावर त्याने ते फोटो ,मी सांगितलेल्या मित्राच्या क्रमांकावर पाठवून दिले .
दुधी नर्मदा संगम इथे पंचकोसी परिक्रमावासींनी रात्रीच्या मुक्कामासाठी टाकलेल्या तंबू - राहूट्यांसमवेत प्रस्तुत लेखक . 
परिक्रमावासींनी दूधी नर्मदा संगम वाळवंटामध्ये वाळत घातलेले कपडे चुकवत चालताना आणि स्वयंपाकासाठी चाललेली त्यांची लगबग पाहताना प्रस्तुत लेखक .
नर्मदे काठी अशा पंचकोसी यात्रा अनेक ठिकाणी होतात . अमरकंटकची पंचकोशी ,मी पाहिली ती आत्ताची पंचकोशी यात्रा , नेमावर ची पंचकोशी ,अलीकडे प्रसिद्धीला आलेली उत्तर वाहिनी परिक्रमा , विमलेश्वर ची रत्न सागर पंचक्रोशी , ओंकारेश्वर पंचक्रोशी या सर्व पंचकोशी यात्राच आहेत . इकडे याला पचकोशी किंवा पचकोसी असे सुद्धा म्हणतात .
या लोकांची गंमत काही काळ पाहत होतो . बहुतांश नरसिंहपूर जिल्ह्यातील स्थानिक लोक अधिक होते . आसपासच्या चार-पाच जिल्ह्यामधील लोक देखील सहभागी झाले होते . सर्वत्र प्रचंड कचरा घाण करणे सुरू होते . प्लास्टिकच्या पत्रावळ्या ,थर्माकोलच्या पत्रावळ्या प्लास्टिकचे ग्लास इतस्ततः फेकले जात होते . मला भेटलेल्या तरुणांना मी जमेल तितके प्रबोधित करायचा प्रयत्न केला .  नर्मदा दुधी संगम स्नानासाठी एकच झुंबड उडाली होती . दुधी नदी आटलेली होती . संगमावरती स्नान करून पुढे पांसी घाटावर गेलो .यालाच पांसी घाट , मौनी घाट  किंवा सिरीसिरी घाट असे देखील म्हणतात . इथे प्रभू रामचंद्रांचे पाय लागलेले आहेत .  त्यामुळे हे स्थान अतिशय पवित्र मानले जाते . तिथे शेकडो साधू जमून एक महायज्ञ सुरू होता . एकीकडे भक्त लोकांची गैरशिस्त पाहिल्यावर इकडे साधू समाजाची शिस्त पाहून जरा बरे वाटले . अक्षरशः शेकडो जटाधारी साधू येथे जमलेले होते . एका फार मोठ्या यज्ञाचे आयोजन येथे केलेले होते . हा सोहळा फक्त साधू लोकांसाठी होता त्यामुळे सर्वसामान्य लोकांना इथे फारशी संधी नव्हती . परंतु मी परिक्रमावासी असल्यामुळे सर्व साधूंनी माझे चांगले आगत स्वागत केले . विशेषतः भोजनाच्या दोन पंगती बसलेल्या होत्या . बाहेर अंगणात सर्वसामान्य ग्रामस्थ व भक्त लोक जेवत होते आणि आत मध्ये आश्रमात साधूंची पंगत चालली होती . मला तिथल्या व्यवस्थापक साधू ने आत मध्ये जेवायला बसवले . भोजन प्रसादी अतिशय उत्कृष्ट होती. हा देखील धुनीवाले दादा परंपरेतील आश्रम होता . इथे महंत रामदास म्हणून महाराज होते ते सर्व व्यवस्था पहात होते . माझ्याकडे असलेल्या दंडाची चौकशी इथे अनेक साधुसंत महंतांनी केली .कारण असा दंड कोणाकडेच नव्हता . तिथे अनेक साधू संतांशी चांगला सत्संग घडला .अनेक नवीन नवीन परंपरा आणि आखाडे रोज मला माहिती होत होते . 
तेजस्वी सत्पुरूष संत रामदास बाबा
आश्रमामध्ये पंचाग्नी साधना करत बसलेल्या साधू जनांवर पुष्पवर्षाव करणारा एक साधू . आपल्याला कर्माने श्रेष्ठ वाटणाऱ्या व्यक्तीवर पुष्पवर्षाव करणे ही साधू संप्रदायाची जुनी परंपरा आहे . 
अयोध्या श्री राम जन्मभूमी मंदिरातील रामललांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेनंतर मोदींनी बांधकाम कामगारांवर जो पुष्प वर्षाव केला तेव्हा मला सिरसिरी घाटावरील प्रसंगच आठवला . 
एकाच वेळी पंचाग्नी साधनेला बसलेले शेकडो साधू पहायला सुद्धा खूप जबरदस्त वाटत होते .त्यांना लागणाऱ्या लाकडांचा आणि  गोवऱ्यांचा मोठा ढिग मधोमध करून ठेवला होता . 
या आश्रमाचा परिसर खूप भव्य आहे . जिकडे बघावे तिकडे साधूच दिसत होते . वरील चित्रात रिकामा दिसणारा आश्रम त्यादिवशी प्रत्यक्षात साधूंनी खच्चून भरला होता .
नेहमीची यज्ञशाळा
महायज्ञासाठी अशी वेगळी यज्ञशाळा उभी केली होती .
आश्रमातील एक मंदिर .
मुळात परिक्रमेमध्ये यावे ते सत्संगासाठी . आणि इथे तो परिपूर्ण मिळत होता .त्यामुळे मी इथे बराच वेळ दिला . इथे बाहेर भरलेल्या बाजारामध्ये मी एक स्टीलचा कमंडलू विकत घेतला . ही एक लिटरची अशी किटली होती जी माझ्या दप्तराच्या बाहेरच्या कप्प्यामध्ये बरोबर बसायची . दुकानदाराने माझ्याकडून नाममात्र पैसे घेतले . खरी किंमत त्याने शेवटपर्यंत मला सांगितली नाही . त्याने माझ्या जवळची जुनी प्लास्टिकची बाटली देखील मागून घेतली . मी त्याला म्हणालो की बाबा रे हे प्लास्टिक आहे .इकडे घाटावर टाकून देऊ नकोस . घरी नेऊन त्याची विल्हेवाट लाव . त्यावर तो म्हणाला की अहो गेले ४० दिवस तुम्ही या बाटलीमध्ये वेगवेगळ्या तीर्थांवरचे नर्मदा जल भरत आहात . या बाटलीमध्ये नर्मदा जल भरून मी ती पूजेमध्ये ठेवणार आहे . परिक्रमा वासी म्हणून तुम्हाला मिळणारा हा मान खूप काही सांगून जातो . खूप काही शिकवून जातो . खूप काही देऊन जातो . आणि खूप सारे घेऊन देखील जातो ! आजचा दिवस एकंदरीतच माझ्यासाठी खूप भाग्याचा होता ! 
धन्य आज दिन संत दर्शनाचा ! अनंत जन्मांचा शीण गेला । आणि
धन्य आज दिन झाले संतांचे दर्शन !
झाली पापा तापा तुटी ।दैन्य गेले उठा उठी ।
 झाले समाधान ।पायी विसावले मन ।
 तुका म्हणे आले घरा । तोची दिवाळी दसरा ।
असे अभंग मनापासून गात पुढचा मार्ग पकडला . या ठिकाणी आपल्याला कोणता लाभ मिळाला आहे हे शब्दात व्यक्त करता येणे अवघड आहे . परंतु सर्वच साधूसंतांनी एकमुखाने सांगून ठेवलेले आहे की संत दर्शनी हा लाभ हे सतत सर्वांनी चित्तात ठेवावे इतकेच वाटते. पुनरुपी पायांना गती दिली पुढे खैरा ,बुधीया ओलांडत सांडिया येथे आलो .येथे शांडिल्य ऋषींनी तपश्चर्या केलेली आहे . या गावाच्या आधी नर्मदेच्या वाळवंटातून चाललेलो असताना एक अद्भुत अनुभव आला . मी मनामध्ये नर्मदा मातेचे स्मरण करत होतो . आणि तिला मनोमन म्हणत होतो की खूप दिवस झाले तू माझ्याशी प्रत्यक्ष संवाद साधलेला नाहीस . तू मुकी आहेस की काय ? नदी रूपाने दर्शन देतेस . परंतु मला कळेल , मला समजेल अशा माझ्यासारख्याच मानवी रूपामध्ये मला कधी दर्शन देशील ?असा विचार करत मी वाळूतून पाय ओढत ओढत चाललेला असताना दूर वाळूच्या किनाऱ्यावरच शेती करून राहणाऱ्या एका छोट्याशा झोपडीतून कोणीतरी मला हातवारे करून बोलवत आहे असे मला दिसले . नर्मदेच्या अगदी प्रवाहलगत ही झोपडी होती . चुकून नर्मदेचा प्रवाह एखाद फुटाने जरी वाढला असता की ती झोपडी जलमय होणार , इतकी जवळ होती . इथे एक अतिशय सुंदर मुलगी मला हात करत बोलावीत होती. हातानेच माझ्या झोपडी मध्ये या आणि चहा प्या अशा खाणाखुणा ती करत होती . अतिशय दारिद्र्य पूर्ण झोपडी होती , हे बघता क्षणी कळत होते . मुलीचे वय साधारण सोळा वर्षे असावे . तिथे अजून एक दहा-बारा वर्षाची चुणचुणीत मुलगी होती . दोघींच्या अंगावर परकर पोलके होते . दुर्दैवाने दोघींचे कपडे खूप फाटलेले होते . पुरेसे लज्जा रक्षण देखील करता येणार नाही इतपत त्यांचे कपडे फाटलेले होते . झोपडी मध्ये एक म्हातारी बसली होती . आणि बाहेर शेतामध्ये एक म्हातारा काम करत होता . मला पाहून तो आला आणि बसायला एक दगड दिला . सवयीप्रमाणे मी या सर्वांची नावे विचारून घेतली . म्हाताऱ्याने त्याचे नाव रेवाशंकर पंडा असे सांगितले . त्याच्या बायकोचे नाव हरीबाई होते . छोट्या मुलीचे नाव जान्हवी होते . आणि मोठ्या मुलीचे नाव विशाखा होते . त्याने माझी काहीही चौकशी न करता थेट आज्ञा केली की तुम्हाला चहा प्यावा लागेल . मी देखील हो म्हणालो . विशाखाचे कपडे फार अधिक फाटलेले होते . म्हणून मी तिला सांगू लागलो की बाळ असे फार फाटलेले कपडे घालू नयेत . काहीतरी अंगावर गुंडाळत जावे . परंतु ती काही बोलत नव्हती . छोटी जान्हवी अतिशय चुणचणीत मुलगी होती . तिने सांगितले "बाबाजी विशाखा गुंगी है । वह बोलती नही । सिर्फ करके दिखाती है । उसका इशारा जो समझ पाएगा , वही उसे बात कर सकता है । " मला महादेव पिपरिया येथे नवी कोरी शाल मिळालेली होती . ती मी हरीबाई जवळ दिली . आणि सांगितले की हिला ही शाल गुंडाळायला देत जा . तेवढेच लज्जा रक्षण होईल . हरी बाईने तीन दगडांच्या चुलीवर काड्या काटक्या पेटवून सुंदर काळा चहा केला . "या आमच्या नाती आहेत . " आजीबाई सांगू लागली . " धाकटी हुशार आहे . चंचल आहे . बोलायला देखील चतुर आहे . थोरली तिच्यापेक्षा हुशार आहे फक्त तिला बोलता येत नाही . थोडी शांत स्वभावाची आहे .पण तिला काय हवे काय नको ते सर्व ती सांगू शकते . इथून येणाऱ्या जाणाऱ्या परिक्रमावासींवर तिचे बारीक लक्ष असते . आत्तासुद्धा तुम्हाला येताना तीनेच आधी पाहिले . हा आमचा म्हातारा काही कामाचा नाही . याच्या शेजारून कोणी गेले तरी त्याच्या लक्षात येत नाही . त्याला ऐकायला सुद्धा कमी येते . खूप हाका मारल्या शिवाय तो ओ च देत नाही . " म्हातारीने चहा पदराने गाळला . आणि एका फुटक्या कपात मला दिला . त्या चहाला अमृताची चव लागत होती . माझ्या झोळीमध्ये लोकांनी दिलेले काही खाद्यपदार्थ होते . चिक्की ,राजगिरा लाडू ,फळे  ,गुळ -शेंगदाणे ,असे जे काही मिळाले ते सर्व मी त्या मुलींना खायला देऊन टाकले . खाऊन झाल्यावर प्लास्टिक नदीमध्ये टाकू नका हे सांगायला विसरलो नाही . दोघी मुली खदखदा हसायला लागल्या . मुकी असली तरी हसण्याचा आवाज येत होता याचे मला आश्चर्य वाटले ! चहा पिऊन झाला . रेवा शंकर पंडाचे डोळे निळसर होते . हिराबाई आणि दोन्ही मुली देखील घाऱ्या डोळ्यांच्या होत्या . जितक्या गरीबी मध्ये ते राहत होते , तितके गरीब विचार त्यांचे अजिबातच वाटत नव्हते . चौघांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच तेज मला जाणवले . विशाखाच्या अंगाला खूप माती लागली होती . मी तिला म्हणालो , " हे बघ बाळ . नेहमी स्वच्छ राहायचे . इथे शेजारीच मैय्या आहे ना ,तिथे आंघोळ करत जा . अशी अस्वच्छ राहत जाऊ नकोस . आणि केस देखील नीट विंचरत जा . नाहीतर दुधी संमावर जाऊन पहा . कसे जटाधारी साधू जमलेले आहेत .तशा जटा होतील कायमच्या केसांच्या . " विशाखा नुसती हसतच होती . तिच्या डोळ्यांमध्ये एवढे तेज होते की डोळ्यात डोळे घालून बोलता येत नव्हते . मला गंमत वाटत होती . इतके दारिद्र्य असून देखील या मुलींच्या चेहऱ्यावर एवढे तेज कसे काय आहे ! त्यांचे चेहरे अतिशय प्रसन्न आणि दैवी भासत होते . अखेरीस सर्वांना नर्मदे हर केले आणि पुढे निघालो . शक्यतो लहान मुले तुम्ही नजरे आड जाईपर्यंत तुम्हाला अच्छा टाटा करत राहतात . त्यामुळे दोन एकशे मिटर पुढे गेल्यावर मी अच्छा करण्याकरता मागे वळून पाहिले . तर मागे झोपडी किंवा शेती काहीच दिसेना ! मला असे वाटले की कदाचित मी वाळूच्या खालच्या उंचीवर आलो आहे आणि शेती माझ्या नजरेच्या पलीकडे खाली असेल . वाळूचे असे फुगवटे जागोजागी आढळतात . त्यामुळे मी चालताना हळूहळू वर चढू लागलो . पुरेशा उंचीवर गेल्यावर मी मागे पाहिले . वाळवंट पूर्णपणे रिकामे होते . ती जागा मी चांगली लक्षात ठेवली . झोपडी अगदी पाण्याजवळ होती . त्यामुळे समोरच्या ताटावरून मला ती झोपडी नक्की सापडली असती . परंतु समोरच्या तटावरून जाताना देखील मला तिथे काहीही आढळले नाही . नर्मदा मातेचा मनापासून जयजयकार केला आणि पुढे मार्गस्थ झालो . इथे माझा बराच भार हलका झाला होता . परंतु मी या सर्वांना अनावश्यक सल्ले देत बसलो याचे मला वाईट वाटले . कदाचित त्यांचे बोलणे ऐकत बसलो असतो तर काही लाभ झाला असता . असेना . नर्मदे काठी कधी काय होईल याचा नेम नाही .
विशाखाचा तो मातीने मळलेला गोरापान रापलेला हसरा चेहरा आजही डोळ्यासमोरून जात नाही . 
नर्मदे काठी केवट समाज खूप आहे . ह्या लोकांकडे एखादी नाव असते . त्या नावेतून लोकांना पलीकडे सोडणे किंवा त्यांच्या गाड्या पलीकडे पोहोचवणे किंवा मासेमारी करणे असे व्यवसाय प्रामुख्याने हे लोक करतात . वाळू गोळा करण्यासाठी देखील काही विशिष्ट पद्धतीच्या नावा वापरल्या जातात . नर्मदेच्या पात्राचा आकार जसा मोठा मोठा होत जातो तसतसे नावांचे प्रकार देखील बदलत जातात . मंडला जबलपूर नरसिंगपूर जिल्ह्यापेक्षा आता थोड्याशा मोठ्या नावा दिसू लागल्या होत्या . कारण आता मी नर्मदापुरम या जिल्ह्यामध्ये होतो . पूर्वीचे या जिल्ह्याचे नाव होशंगाबाद असे होते . सुदैवाने मी परिक्रमेमध्ये असतानाच या जिल्ह्याचे नाव बदलले आहे अशी बातमी कानावर पडली होती . या भागातील नावा काहीशा अशा होत्या .
नर्मदापुरम भागातील नौका . तळाशी साठलेली वाळू पहा . निळ्या केवटाची नाव प्रामुख्याने मालवाहतुकीसाठी आहे तर तांबड्या केवटाची नाव प्रवासी आहे .
नर्मदा काठची लहान मुले सुद्धा खूप छान नाव चालवतात .
बरेचदा अशा पद्धतीने नांगरलेली नाव घेऊन मध्ये येणारी नदी मी पार केली . फक्त पलीकडे गेल्यावर नाव पुन्हा नीट नांगरून ठेवावी लागते . तसे न केल्यास ती चुकून प्रवाहाला लागली तर थेट समुद्रात जाते .
नाव खूप दिवस लावून ठेवली की तिच्यामध्ये पाणी भरते  . ते अशा पद्धतीने सामूहिक प्रयत्नातून काढण्यात येते . पांसीघाट येथे नाव रिकामी करताना स्थानिक ग्रामस्थ . या नावेचा आकार खूप सुंदर आहे . 
असे डोंगे पुढे फारसे दिसत नाहीत .
मध्ये लागलेल्या काही छोट्या नद्या मी स्वतः डोंगा घेऊन पार केल्या . मला केवट लोकांनी सांगून ठेवले होते की नदीकाठी लावलेली नाव दिसली की ती  बिनधास्त पलीकडे घेऊन जायची . फक्त नीट बांधून ठेवायची . हेच महत्वाचे . 
केवट आल्यावर त्यांची नाव कुठे आहे ते पाहून गरज पडल्यास पोहत जाऊन नाव ताब्यात घेतात .
अशीच माहिती देणाऱ्या एका केवटाने खालीलपैकी एक नाव घेऊन मला पुढे जाण्यास सांगितले होते . आणि वल्हे नसल्यामुळे हातातील दंडाने सुरुवातीला जमीन ढकलत व नंतर दंड पाण्यात वल्हवत मी नाव पलीकडे नेत ती नदी पार केली.
तत्पूर्वी त्याने काढलेला फोटो . माझ्याकडे फोन नाही कळल्यावर त्याने मी सांगितलेल्या मित्राच्या क्रमांकावर हे फोटो पाठवून दिले . 
नौका हे कुठल्याही नदीवरील अथवा नदी जवळील जीवनाचे अविभाज्य अंग आहे हे मात्र खरे . नुकत्याच अयोध्येमध्ये बांधलेल्या राम मंदिरामध्ये निषाद राजाचे मंदिर त्याचसाठी बांधले आहे . निषाद समाजामध्ये काही उपजाती खालील प्रमाणे आहेत . निषाद,मल्लाह,साहनी,केवट,मांझी,कश्यप,कोळी,भील,बिंद,मझवार,रैकवार,बाथम,मछुआरा,कीर इ . हे सर्व लोक उत्तम पट्टीचे पोहणारे आणि अतिशय निर्भय असतात . नदी आणि पाण्यातील खाचाखोचा यांना चांगल्या ठाऊक असतात . मला संपूर्ण परिक्रमेमध्ये या समाजातील लोकांनी कधीही चुकीचा मार्ग सांगितला नाही किंवा कधीही फसवले नाही . जवळात जवळ पडेल असा योग्य आणि सुरक्षित मार्ग ते नेहमी सांगायचे . या उलट शेतकरी मात्र मार्ग भरकटवायचे असा अनुभव मी खूप वेळा घेतला . अर्थात त्यांना आपल्या शेताची काळजी असायची . उदाहरणार्थ खालील फोटो पहा . 
हे दुधी संगम इथले शिवमंदिर आहे . आणि शेतातला गहू काढणीला आलेला आहे . आता नेमकी याचवेळी तिथे हजारो लोकांची यात्रा भरली . तर या लोकांच्या येण्या-जाण्यामुळे उभे पीक आडवे होऊ शकते . वर्षभराची सारी मेहनत पाण्यात जाते . पावसाळ्यामध्ये नर्मदा नदी इतकी दुथडी भरून वाहते की हे पूर्ण मंदिर च पाण्याखाली असते . त्यामुळे त्यांच्यासाठी हा कालावधी महत्त्वाचा असतो . म्हणून शेतकरी तुम्हाला शेतातून मार्ग नाही असे सांगतात . परंतु तुम्ही जर नीट समजावून सांगितले की मी तुमच्या पिकाची काळजी घेत जाईन तर आवर्जून जायला सांगतात . नर्मदा परिक्रमा तुमचा विवेक जागृत करते . प्रत्येक गोष्टीचा कार्यकारणभाव शोधायला प्रवृत्त करते .मी म्हणेन तेच खरे . किंवा मी म्हणेन तसेच झाले पाहिजे , असे सृष्टीमध्ये नसते ,हे आपल्याला छान हसत खेळत शिकवते . निसर्गाशी सहजीवन कसे राखायचे हे आपण विसरून गेलेलो आहोत . ते देखील परिक्रमा तुम्हाला सहज शिकवते . इथून पुढे जाताना एक हरभऱ्याच्याचे शेत लागले . मी शक्यतो पाया पुढे बघून चालायचो . बरेचदा पायाखाली एखादा साप किंवा अन्य प्राणी येत असे . तसेच खड्डे खुड्डे बघून चालावे लागायचे . परिक्रमे दरम्यान माझा खूप वेळा पाय मुरगळला . परंतु एकदाही सुजला नाही किंवा दुखला नाही . पुन्हा सुरळीत व्हायचा . पायातील स्नायूं मध्ये परिक्रमेमुळे अतिरिक्त ताकद येते हे वास्तव आहे . अधिक चालल्यामुळे बोन डेन्सिटी देखील कमी होते ,असे मला काही डॉक्टरांनी सांगितले आणि तपासून पाहता ते खरे देखील निघाले .  या हरभऱ्याच्या शेतात माझे लक्ष नव्हते . अचानक ३० - ४० डोकी वर आली . बघतो तो संपूर्ण शेतात बसून वानरे हरभरे खात होती . एक क्षणभर मला असे वाटले की या सर्वांना हाकलून लावावे . परंतु तेव्हा मला मोहन साधूने सांगितलेला नियम आठवला . कुठेही काहीही चांगले किंवा वाईट दिसले तरी त्यात आपण डोके घालायचे नाही . कदाचित हा शेतकरी नर्मदेमध्ये घुसून शेती करत आहे . त्यामुळे त्याच्या शेतातील काही वाटा स्वतः नर्मदा माई या तिच्या लेकरांना देत असेल . वानरे मला बघून जरा देखील घाबरली नाहीत . त्यांचा कार्यक्रम त्यांनी चालूच ठेवला . आणि मी पुढे मार्गस्थ झालो . आज पुन्हा एकदा मला शंभर सव्वाशे पाण कावळे एकत्र शिकार करताना दिसले . त्या सर्वांनी मिळून शोधून काढलेला हा हुकमी उपाय आहे .असे केल्यामुळे त्यांना हमखास शिकार मिळते . तसे एकटे शिकारी पाणकावळे अधिक दिसतात . परंतु या त्यांच्या सामूहिक वर्तनावर संशोधन झाले आहे किंवा नाही हे तपासावे लागेल . आणि झाले नसल्यास आवश्यक करावे अशी विनंती पक्षी तज्ञांना आहे . आज मी २५ चित्र बलाक अर्थात पेंटेड स्टोर्क यांचा एक मोठा थवा देखील पाहिला .
 चित्रबलाक (painted stork)
चित्रबलाकांचा थवा
 व्हाईट आयबीस आणि ब्लॅक आयबीस देखील खूप दिसले . 
white Ibis
black Ibis
black headed white Ibis
काळा पांढरा खंड्या
कृष्णधवल खंडे या भागात खूप आहेत .  सिरीसिरी या गावांमध्ये एक विचित्र ओढा मध्ये आल्यामुळे एका गावकऱ्यांनी शॉर्टकट म्हणून एक रस्ता मला दाखवला . इथे एक सरकारी गोशाळा होती . या गोशाळेमध्ये मेलेल्या गाई ते बाहेर उघड्यावरती आणून फेकत होते . त्या गाई फाडून खाण्याचे काम वीस पंचवीस भटकी कुत्री करत होती .
संग्रहित छायाचित्र
 मी तिथून जाऊ लागताच ती सर्वजण माझ्यावर गुर गुरु लागली . आणि त्या मृतदेहांचा कुजलेला वास त्या संपूर्ण परिसरामध्ये इतक्या दूरवर पसरला होता की विचारू नका .कसाबसा मी तो टापू पार केला . पळत पुढे जावे तर कुत्री मागे लागली असती . त्यामुळे एका शांत मंद गतीने जात या नरकातून बाहेर पडलो .
 मेलेल्या गाई हा एक मोठा जटिल प्रश्न नर्मदे काठी आहे . संपूर्ण मध्य प्रदेश मध्ये प्रचंड गोधन आहे . गाईंचे अक्षरशः शेकड्यांनी कळप वाटेमध्ये दिसतात . परंतु ही पवित्र गोमाता आटोपल्यावर तिचे काय करायचे याबाबत समाज आणि अनभिज्ञ दिसतो . मग गुपचूप रात्री नर्मदेमध्ये या गाईंची कलेवरे प्रवाहित केली जातात . छोटी धुवाधार धबधब्यापाशी समोरच्या बाजूला अशा पद्धतीने मेलेल्या गाईंचा अक्षरशः खच पडलेला आहे . इथे पाण्याची गती एकदम मंदावते त्यामुळे गाईंची प्रेते इथे येऊन थांबतात . अशा गाईंचे कुत्र्यांनी तोडलेले पाय शिंगे ,डोके , शेपट्या , खुरे हे सारेदेखील परिक्रमेमध्ये खूप पाहायला मिळतात . नर्मदा या सर्वांना शुद्ध करते हे मात्र खरे आहे . मला स्वतःला आलेला एक अतिशय विकृत अनुभव तुम्हाला विषय निघाला आहे म्हणून आवर्जून सांगतो . नर्मदेच्या काठाने चालताना सूर्य जेव्हा डोक्यावर येतो तेव्हा शरीरातून प्रचंड घाम बाहेर पडत असतो . शरीरातील पाणीसाठा वेगाने कमी झाल्यामुळे खूप तहान लागत असते . अशावेळी सर्वात विश्वासार्ह आणि जवळचा जलस्त्रोत म्हणजे साक्षात नर्मदा माई हीच आहे . पटकन पात्रा जवळ जावे . ओंजळी भरभरून पाणी प्यावे . आणि कमंडलू भरून घ्यावा . असे मी दिवसातून खूप वेळा करत असे . अगदी स्नानाला उतरलेला असताना देखील मी पाणी पीत असे . महादेव पिपरिया गावाच्या पुढे आल्यावर एकदा असेच मी पाणी पिण्यासाठी पात्रात बसलो होतो . आकंठ पाणी पिऊन झाले . आणि एकदम हालचाल झाल्यामुळे माझे उजवीकडे लक्ष गेले . इथे एका मेलेल्या गाईचे प्रेत अर्धे नर्मदेमध्ये आणि अर्धे जमिनीवर असे पडलेले होते . त्यातील जमिनीवरच्या प्रेताच्या भागाचे लचके तोडून खाणारे कुत्रे मला बघून पळाले होते . जो भाग पाण्यामध्ये होता तो सडला होता आणि त्याला लागून वाहात येणारे पाणी माझ्या इथे येत होते . किती प्रचंड प्रमाणामध्ये जिवाणू या पाण्यामध्ये ते प्रेत सोडत असेल याची आपण फक्त कल्पना करून पहा . परंतु पाणी पिल्यानंतर मला तसे काही जाणवले नाही . आणि हे दृश्य पाहिल्यानंतर सुद्धा उलटी वगैरे होईल असे काही झाले नाही . नर्मदा जलाचा हा प्रताप आहे . हे पाणी वेगळे आहे . मी मागे एका प्रकरणात तुम्हाला सांगितले त्याप्रमाणे परिक्रमा वासी गेली लाखो वर्षे नर्मदेचे पाणी इकडून तिकडे तिकडून इकडे टाकत असल्यामुळे संपूर्ण नर्मदेमध्ये एकसारखे बॅक्टेरिया अर्थात विघटन करणारे जीवाणू आहेत . त्यामुळे याची चव देखील सर्वत्र एकसारखीच आहे . आणि यामध्ये आलेल्या प्रत्येक गोष्टीचे विघटन करण्याचे सामर्थ्य या पाण्यामध्ये जास्त आहे . 
नर्मदेच्या काठाने चालताना असे सांगाडे खूप दिसतात
यातील हाडे कुत्री ,लांडगे , कोल्हे इकडे तिकडे पळवतात
नर्मदे काठी सर्वत्र हे दृश्य पाहिले
कोल्हापूर मध्ये असलेल्या एका आश्रमाने याच्यावर उपाय शोधून काढलेला आहे .
मेलेल्या गाईच्या हाडाचा एक कणही शिल्लक राहणार नाही असे जीवामृत बनवण्याची पद्धत कोल्हापूर जवळील काडसिद्धेश्वर मठाच्या स्वामींनी शोधून काढलेली आहे . तिचा प्रसार इकडे होणे आवश्यक आहे .
आता समोर सिवनी गावचा पुल दिसू लागला . काठा काठाने जाताना एका टेकाडावरून साधूने आवाज दिला . मातीचा चढ चढून वर गेलो . इथे मोदकदास त्यागी नावाच्या एका साधूने नवीन कुटी निर्माण केली होती . त्याने मला बसायला पोते दिले . आणि अतिशय प्रेमाने पोळ्या ,भरीत ,मलिदा ,पपई पोटभर खायला दिले .याच्याकडे मुक्कामाची सोय नव्हती . परंतु पूल ओलांडल्यावर पुढे एका त्यागीजींचा आश्रम होता तिथे जायला त्याने मला सांगितले . कुठल्यातरी गोष्टीचा त्याग करणाऱ्या तपस्वी साधूला , साधूसमाजामध्ये त्यागीजी म्हणून महत्त्वाचे स्थान असते . मी तिथे जाणार इतक्यात पुलापाशी उभ्या असलेल्या राजू नोडिया नामक एका अपंग मुलाने मला हात केला . याचा एक पाय पोलिओग्रस्त होता . इथे पुलाखाली एक आश्रम बांधण्यात आला होता . पुलाखाली म्हणजे अक्षरशः पुलाखाली बांधकाम होते ! पुलाचा रस्ता हाच या आश्रमाचा स्लॅब होता . दोन्ही बाजूला भिंती बांधून वेगवेगळी दालने तयार करण्यात आली होती . तिथे गोसेवा चालत असे . नर्मदा मातेचे एक सुंदर मंदिर आणि चांगल्या पद्धतीने बांधलेला काँक्रीटचा घाट होता . इथे नर्मदा मातेची आरती केली जायची . या संपूर्ण आश्रमाची व्यवस्था बनारस वाले श्री श्री १००८ मुरारीदास जी महंत म्हणून एक खूप चांगले जटाधारी साधू होते ते पाहत होते . यांची एक अतिशय बारीक शिष्या देखील आरती वगैरे करत होती . पुलाच्या पलीकडे एक आश्रम होता त्याची व्यवस्था ही शिष्या बघत असे . केवळ आरती पुरती ती इकडे येत असे . मुळचा मांगरौल गावचा हा राजू नोडीया आश्रमाचा सर्व कार्यभार समर्थपणे सांभाळत होता . या घाटाचे नाव श्री रामानुनंदन घाट ठेवले आहे असे त्यांनी मला सांगितले . इथे पुलावरून जाणाऱ्या गाड्यांचा धडधड असा आवाज खाली ऐकू यायचा . एका कोपऱ्यामध्ये मी आसन लावले . इथे बहुतांश आश्रमामध्ये मेमरी फोम किंवा पॉलीयुरेथीन फोम पासून तयार केलेल्या आयत्या गाद्या आणि त्याच्यावर चेनकव्हर चढवलेले , अशा पद्धतीने तयार ठेवलेल्या असतात .याची घडी वगैरे होत नाही . तशाच उलगडलेल्या गाद्यां चा चवडवजा ढिगारा एका कोपऱ्यात लावलेला असतो . त्यातून परिक्रमावासी एखादी गादी घेतात . आणि जाताना परत ठेवतात . परंतु या गाद्यांवर कधीही कोणीही झोपत असल्यामुळे मी मात्र शक्यतो माझे स्वतःचे जे फोम मॅट्रेस होते तेच सर्वत्र वापरत असे . त्याला ऊब देखील चांगली होती . ते इतके ऊबदार होते की पुढे उन्हाळा सुरू झाल्यावर त्याचा मला त्रास होऊ लागला होता . असो . स्नान पूजा आटोपून झाल्यावर महा आरतीची वेळ झाली . मी इथे शंख वाजवण्याची सेवा केली . बहुतेक मी जितका वेळ शंख फुंकत होतो तितका प्रदीर्घ इथे कोणी फुंकत नव्हते .त्यामुळे लोकांना त्याचे कौतुक वाटले . इथे पुजारी बुवाने मला फुलवाती आणि तूप दिले . ग्वारी घाटावर झुलेलाल आश्रमात घेतलेल्या फुलवाती आणि तूप अशा पद्धतीने मला ४० - ४२ दिवस पुरले . रात्री स्वतः त्यागी जी महाराज आले . त्यांच्यासोबत मी थोडीशी गोसेवा केली . त्यांचा सत्संग लाभला . सडसडीत देहयष्टी आणि उंचापुरा देह होता .सावळा रंग आणि अतिशय मोहक हास्य चेहऱ्यावर होते . इतर साधूं सारखे हे भक्तांना 'टेन्शन ' देत नसत तर हसत खेळत गप्पा मारत असत . यांचा स्वभाव मला खूप आवडला . काय हवे नको वगैरे मला त्यांनी विचारले . इथे रात्री मुक्कामाला अजून काही परिक्रमावासी होते . राजू नोडिया सर्वांची अतिशय आस्थेने चौकशी करत होता .भोजन प्रसाद घेऊन थंडी अनुभवत निद्राधीन झालो . सकाळी लवकर उठून सर्व आन्हिके आटोपून पुढचा मार्ग धरला . पुलावरून एका पांडे नामक छोट्या दुकानदाराने आवाज दिला म्हणून वरती जाऊन चहा घेतला .
 पांडे चे दुकान . इथे मी चहा घेतला .(संग्रहित चित्र )
 पुन्हा खाली येऊन चालू लागलो . काठाने जाताना डावीकडे त्यागीजींचा आश्रम दिसू लागला . मोदकदास साधूने अवश्य जाऊन दर्शन घेण्यास सांगितले होते म्हणून आश्रमामध्ये गेलो . नर्मदे काठी काय पाहावे , काय पाहू नये , कोणाला भेटावे , कोणाकडे जाऊ नये ,इत्यादी सर्व माहिती तुम्हाला साधू ,संत ,सेवेकरी , ग्रामस्थ देत असतात .त्यांना न कंटाळता हे प्रश्न विचारावेत . पुलापासून जेमतेम एक किलोमीटर अंतरावर आश्रम आहे . वरती जाणाऱ्या छोट्या पायऱ्या आहेत . पायऱ्यांवर मोर होता . आश्रमातील दोन वृद्ध सेवेकरी माताजी नर्मदा स्नानार्थ खाली येत होत्या . त्यांनी मला पाणी किती दूर आहे विचारले याचा अर्थ त्या पहिल्यांदाच खाली उतरत होत्या . मी त्यांच्याकडे त्यागीजी महाराजां बद्दल चौकशी केली . त्यांनी मला सांगितलं की तुम्ही खूप भाग्यवान आहात तुम्हाला त्यांचे दर्शन होते आहे . आश्रमाचा परिसर अतिशय पवित्र भासत होता . इथे राहणाऱ्या त्यागी महाराजांनी खूप तप आचरण केलेले आहे हे जाणवत होते . आश्रम अंधारा होता परंतु सर्वत्र ऊर्जा जाणवत होती . छोटी छोटी मंदिरे , मोठे मोठे वृक्ष ,अंधारी कुटी आणि सगळीकडे मोरच मोर . झाडी इतकी होती की नर्मदा सुद्धा प्रयत्नपूर्वक बघावी लागायची . त्यागीजींनी मला एका आसनावर सन्मानपूर्वक बसवून स्वतः चहा बनवून पाजला .
 त्यागीजींच्या आश्रमातील एक देवस्थान
शिष्यां समवेत भजन करणारे त्यागी जी
 हे पूर्वाश्रमीचे मराठी असावेत असे त्यांच्याकडे पाहून मला वाटले . साधू आपल्या पूर्वाश्रमाची भनक समोरच्या माणसाला लागू देत नाहीत . परंतु प्रत्येक जनजातीच्या काही जन्मजात सवयी , लकबी असतात त्या जात नाहीत . महाराष्ट्रातही विशेषतः हे कोकणस्थ असावेत असे मला वाटले . अर्थात नदीचे मूळ आणि ऋषीचे कुळ शोधायला जाऊ नये हेच खरे .  यांचा रंग गोरापान आणि चेहऱ्यावर तेज होते . अंगावर फक्त एक लंगोटी आणि लज्जारक्षणा पुरते वस्त्र होते . सर्व अंगाला भस्म फासलेले होते . त्यागीजींना दंडवत करून मी पुढे निघालो . 
आता नर्मदा मैया ची वळणे मोठी मोठी होऊ लागली होती . अमरकंटकला शंभर शंभर फुटावर वळणारी मैया मंडला दिंडोरी मध्ये ५०० ते ८०० मीटर अंतरावर वळू लागली . जबलपूर जिल्ह्यामध्ये एक दोन किलोमीटरची वळणे होती , तर नरसिंगपूर जिल्ह्यामध्ये तीन तीन किलोमीटरची वळणे होती . नर्मदापुरमध्ये चार-पाच किलोमीटरचे वळसे होते . वाळूची पात्रेच एक एक किलोमीटर रुंदीची होती . त्यातून चालताना दमछाक व्हायची . आज थंडी अजिबात नव्हती .गव्हावर दव देखील पडले . नव्हते सूर्य आग ओकत होता . खाली तापलेली वाळू आणि वरती आग ओकणारा सूर्य ! चालणे कठीण होत होते .कसाबसा माछा नावाच्या गावात पोहोचलो . इथे एक पुरातन राम कृष्ण मंदिर होते . खूपच सुंदर शांत आश्रम होता . एक पुरातन राम मंदिर होते आणि कृष्णाचे नवीन मंदिर बांधलेले होते . इथे रामप्रभूंनी स्वतः मुक्काम केला होता अशी मान्यता आहे . एका यज्ञ शाळेमध्ये तरुण तेजस्वी ओडिया साधू मुक्कामी होता . ओडिया साधूने ग्लासभर गरमागरम दूध पाजले . बालभोग प्रसाद दिला . तो खाऊन पुढे निघालो . 
माछा गावातील नर्मदेचा किनारा
गाव नर्मदे काठी वसलेले आहे
नर्मदेच्या काठावरच गावातील मुलांनी क्रिकेटचे स्टेडियम केलेले असून येथे सतत सामने चालू असतात .
गावातील सुंदर आश्रम .हे जिर्णोद्धार केलेले नवीन मंदिर आहे .
जुने मंदिर काहीसे असे आहे .हे स्थान खूपच पवित्र आहे .साक्षात प्रभू रामचंद्र येथे राहून गेलेले आहेत .
आश्रमातील एक समाधी
मधोमध सुंदर अशी यज्ञशाळा होती .इथेच ओडिया साधूचा मुक्काम होता .
इथेच बसून मी दूध व बालभोग सेवन केला .
आश्रमातील एक साधू
रामाच्या वास्तव्यामुळे या घाटाचे नाव राम घाट ठेवले आहे
श्रीरामाच्या चरण पादुका येथे स्थापित करण्यात आलेल्या आहेत . 

गलछा नावाच्या गावामध्ये भोजन घेतले . येथे गालव ऋषींनी तपस्या केलेली होती . इथे खूपच सुंदर असा आश्रम आहे . आश्रमाचा परिसर मोठा विस्तीर्ण होता आणि सर्वत्र सुंदर शेणाने सारवून घेतलेले होते .
 आश्रमामध्ये साधूंच्या निवासासाठी काही तखत लावलेले होते . इथे काही वयोवृद्ध साधू विश्रांती घेत पडले होते .
 गलचा येथील नर्मदा काठ
गालव ऋषींची तपोभूमी असलेला आश्रम
येथील शिवमूर्ती
 एका सेवकाने माझ्यासाठी गरम गरम पोळी भाजी करून मला जेवायला वाढले . मी एकट्यानेच भोजन प्रसादी घेतली . साधू लोक शक्यतो ताजे अन्नच खातात . हे त्यांच्या निरोगी दीर्घायुष्याचे एक महत्त्वाचे रहस्य आहे . कुठल्याही परिस्थितीमध्ये शिळे अन्न ते टाळतात . शिळे अन्न खाण्यापेक्षा उपाशी राहिलेले परवडते हे नेहमी लक्षात ठेवावे . शिळे अन्न वाया जाईल म्हणून खाण्याची सवय माता-भगिनींना असते परंतु त्यामुळे शरीरामध्ये अनेक दोष उत्पन्न होतात .गाव देहात मध्ये उरलेले अन्न खाण्यासाठी अनेक तोंडे असतात . गाईगुरे , कुत्री ,मांजरे , कोंबड्या , शेळ्या- मेंढ्या इत्यादी उरलेले अन्न लगेच फस्त करून टाकतात . इथे क्षणभर विश्रांती घेतली . इतक्यात दूरवर कुठेतरी सुरू असलेल्या भागवत कथेचे स्वर कानावर पडले . आश्रमामध्ये चौकशी केली असता पुढे गलछा गावामध्ये पंडित भगवतीप्रसाद तिवारी यांची संगीतमय भागवत कथा सुरू आहे असे मला सांगण्यात आले .त्यामुळे त्या भागवत कथेला जाऊन भागवतकरांच्या विनंतीनुसार पहिल्या रांगेत बसलो . भागवतकरांनी मी आल्यावर थोडा वेळ नर्मदा परिक्रमा या विषयावर देखील भाष्य केले . आणि कथेमध्ये माझी उपस्थिती होणे हा शुभसंकेत असल्याचे सर्वांना सांगितले . माझी उपस्थिती म्हणजे माझ्या गळ्यामध्ये लटकवलेल्या नर्मदा मातेची उपस्थिती हे वाचकांनी लक्षात घ्यावे !त्या नर्मदा मातेच्या सान्निध्या शिवाय आपले बाजार मूल्य ० आहे . गाव संदलपुर तालुका खातेगाव जिल्हा देवास हे या तिवारींचे मूळ गाव होते .यांचे सांगितिक अंग देखील चांगले होते आणि कथा सांगण्याची पद्धत अतिशय शांत व सुंदर होती . खाजड नावाच्या एका ग्रामस्थांनी ही कथा आयोजित केलेली होती . या कथेमध्ये काही भक्त उत्कटपणे मध्येच उभे राहून नाचू लागत . त्यातील साधारण साठीचे एक काका माझ्या लक्षात राहिले . धिप्पाड देह , पिळदार मिशा असलेला हा मनुष्य प्रत्यक्षात मात्र भगवत् भक्तीने अगदी ओथंबलेला होता . दोन तीन तास उत्तम अशी ती कथा श्रवण केली आणि भागवतकरांची आज्ञा घेऊन पुढे निघालो . बाहेर काही अंतर पळत येऊन खाजड कुटुंबीयांनी माझा आदर सत्कार केला . नर्मदा परिक्रमेमध्ये तुम्हाला सत्कार आणि धिक्कार या दोन्हींचा सामना एकाच मनस्थितीतून करता आला पाहिजे म्हणजे तुम्ही परिक्रमावासी झालात ! आणि हेच आयुष्यभर करता आले म्हणजे तुम्ही जिंकलात !
भागवतकार पंडित भगवती प्रसाद तिवारी . हे अतिशय प्रसिद्ध कथाकार असून यांच्या वर्षभर सतत कथा चालू असतात
या भागातील सर्वच भागवत कथाकार मोठे व्युत्पन्न आणि व्यासंगी आहेत असे माझे निरीक्षण आहे . पोटभर जेवण झाल्यामुळे आणि डोक्यावर कडक ऊन असल्यामुळे हळूहळू चालत होतो . महामार्गावर धिम्या गतीने जाणाऱ्या एखाद्या ट्रकला एखादी सुपरकार जशी झोकामध्ये ओव्हरटेक करते ,तशा पद्धतीने मला मागे टाकून अतिशय वायू वेगाने एक नागा संन्यासी पुढे चालत गेला . त्याची चालण्याची गती पाहून मी अचंबित झालो . तसे चालण्याचा प्रयत्न केल्यावर मला अक्षरशः धावावे लागत होते . नागा साधू लोकांची बरोबरी भलेभले ॲथलीट सुद्धा करू शकत नाहीत हे अगदी सत्य आहे . याचे कारण या लोकांचे ओज किंवा शुक्र या धातूचे त्यांनी अनेक वर्षे संरक्षण केलेले असते . त्याची बरोबरी करण्यासाठी तेवढे तप करणे हा एकमेव उपाय आहे . या भागातील नर्मदेची काही सुंदर रूपे गुगल नकाशाच्या कृपेने वाचकांकरिता देत आहे . दर्शन घेऊन त्या रूपामध्ये रममाण व्हावे ! अशी कल्पना करावी की त्या काठाने नर्मदेच्या पाण्यामध्ये काठी बुडवत बुडवत तुम्ही पुढे चालत आहात ! मानस परिक्रमा ही खरोखरीच खूप श्रेष्ठ परिक्रमा आहे ! साधू लोक देखील बसल्या बसल्या डोळे मिटून मानस परिक्रमा करत असतात . 
माछा गावापाशी नर्मदेला येऊन मिळालेली कुब्जा किंवा अजीर नदी
नर्मदेचे झोकदार वळण आणि समोरचा वाळूचा किनारा
 गलछा मधील नर्मदा दर्शन . तुम्हाला नर्मदा अधून मधून अशी दिसत असेल तर याचा अर्थ तुम्ही परिक्रमेचा लांबचा मार्ग निवडला आहे . परिक्रमेच्या खऱ्या मार्गाने जाताना नर्मदा तुमच्या नजरेआड होतच नाही ! 
भव्य दिव्य वालुका वाहिनी नर्मदा ! नीट पाहिल्यावर तळाशी साठलेली वाळू दिसते .
असे कुठलेही बंधन परिक्रमावासीला अडवू शकत नाही
 ॐ आपोज्योति रसोsमृतम् ब्रह्मभूर्भुवः स्वरोम् ।
अशा किनाऱ्यावरून सायंकाळच्या वेळी अनवाणी चालताना पायाला मिळणारे सुख शब्दात वर्णन करण्याच्या पलीकडचे आहे !
चालताना अचानक असे एखादे शिवलिंग दर्शन देते आणि आपल्या हृदयांतर्यामी आत्मलिंग प्रकटते
वाटेमध्ये नर्मदेच्या अंगा खांद्यावर खेळणारे भाविक भक्त परिक्रमा वाशीला न बोलताच भक्ती कशी करावी हे शिकवून जातात .
अशा गर्दीने भरलेल्या किनाऱ्यावरून जाताना तुम्हाला किमान ५० वेळा तरी नर्मदे हर असा प्रति पुकारा द्यावाच लागतो ! ओळख पाळख नसलेला कोणीही तुम्हाला अगदी मनापासून नर्मदे हर असा आवाज देतो !
नर्मदेच्या काठावर असलेली काटेरी झुडपे देखील परिक्रमा वासीला फारसे ओरखडे मारत नाहीत असा अनुभव मी याची देही घेतलेला आहे . कदाचित देहभान हरपल्यामुळे देखील असे होत असावे . 
इथून पुढे काठाकाठाने गेल्यावर भटगाव नावाचे गाव लागले . येथील मंदिरांचा ग्रामस्थांनी जीर्णोद्धार केलेला होता आणि मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा महोत्सव मोठ्या प्रमाणात सुरू होता . एका छोट्या खोलीमध्ये दहा-बारा परिक्रमावासी राहिले होते . तिथेच अत्यंत गर्दीमध्ये आसन लावले . 
याच मंदिरामध्ये भटगावचा मुक्काम घडला
या नवीन राममूर्तींच्या प्राणप्रतिष्ठेला उपस्थित राहण्याचे सद्भाग्य मैयाच्या कृपेने लाभले .
हा नागा साधू देखील तिथे आलेला होता . त्याच्याकडून मी नागा साधूंची परंपरा आणि एकंदरीतच आखाडा परंपरा याविषयी खूप मूलभूत ज्ञान मिळविले . हा साधू अतिशय हुशार , तरुण आणि जिज्ञासू होता . त्याचे वय साधारण ३० वर्षे असावे असा माझा अंदाज होता .परंतु प्रत्यक्षात तो ५५ वर्षाचा निघाला . कारसेवेमध्ये त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता . या मंदिरासाठी एक मोठी यज्ञशाळा खाली उभारली होती . तिथे जाण्यासाठी मातीचा धोकादायक उतार बनविला होता . वरती एक मोठे व्यासपीठ बनवले होते . मी खाली जाऊन यज्ञाचे दर्शन घेऊन आलो . खाली मोठा जनसमुदाय जमला होता . किमान हजार लोक असावेत . इथे नर्मदेमध्ये मला एका भग्न मंदिराचे खूप सारे अवशेष दिसले . या बाजूला नर्मदा खोल आहे . स्नान करण्याकरता मी जागा शोधत होतो . परंतु या घाटावर प्रचंड गर्दी असल्यामुळे मी पुन्हा वर मंदिरात गेलो . गावातील तरुणांनी मला शेजारी असलेला एक छोटासा नाले वजा बोळ दाखवला . या पांदीतून चालत गेल्यावर नर्मदेचा एक अति धोकादायक घाट लागला . घाट म्हणजे बांधलेले नव्हते परंतु पाण्यात उतरता येईल अशी थोडी जागा तयार केली होती . उतार इतका तीव्र होता की काठी एक फूट पुढे नेली की चार फूट बुडत होती .  इथे स्नान करून काठावर बसूनच मैया चे पूजन केले .
 भटगाव येथील भग्न मंदिराचे नर्मदेमध्ये बुडालेले अवशेष . मंदिर इतके भव्य आहे की उपग्रहातून देखील दिसते . खाली छोटी नाव दिसते आहे तिथे मी स्नान केले .
 अशा ठिकाणी ज्या व्यक्तीला पोहायला येत नाही त्याने अजिबात जाऊ नये . या ठिकाणी अनेक ग्रामस्थ बुडाल्याचे मला सांगण्यात आले . आधीच बुडालेले मंदिराचे अवशेष , त्यात ही धक्कादायक माहिती या सर्वांमुळे तो परिसर अतिशय नकारात्मक वाटत होता . वरती गेल्यावर गावातील सरपंच आणि काही सन्माननीय गावकरी माझ्याभोवती गोळा झाले . त्या सर्वांना मी नर्मदेमध्ये बुडलेल्या मंदिराविषयी माहिती विचारली . त्यांनी सांगितले की ते मंदिर इतके भव्य होते की त्याचे अनेक कोरीव खांब आणि कोरीव काम केलेले भाग गावात जागोजागी आढळतात . हे संपूर्ण गावच त्या मंदिरांच्या अवशेषांवर उभे आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये ! त्यांनी मला संपूर्ण गाव पायी फिरवून दाखविले . अक्षरशः प्रत्येक घरामध्ये त्या मंदिराचे दगड लोकांनी वापरले होते . कोणी त्याच्या पायऱ्या केल्या होत्या तर कोणी ते भिंतीमध्ये चिणले होते . कोणी त्याचा वापर बसण्यासाठी करत होते तर कोणी देव म्हणून पिंपळाखाली पुजले होते . एका हुशार पठ्याने तर मंदिराचा मुख्य आमलक म्हशीला पाणी घालण्यासाठी ठेवला होता . बऱ्याच लोकांनी घराच्या पायामध्ये हे दगड मोठ्या प्रमाणात वापरले होते . एके ठिकाणी वडाच्या झाडाखाली ठेवलेले असंख्य अवशेष हळूहळू त्या वडाच्या झाडांमध्ये शिरू लागले होते . मी त्या सर्वांचे याबाबतीत प्रबोधन केले . मंदिराचे अवशेष घरामध्ये वापरले असता घरामध्ये सौख्य  नांदणे शक्य नाही ,अशा पद्धतीने मांडणी केल्यावर लोकांना ती पटू लागली . खरे म्हणजे असे काही नाही आहे .परंतु मंदिराचे अवशेष वाचवण्यासाठी या असत्याचा आधार घेण्याशिवाय पर्याय नव्हता . गावामध्ये फिरून सारे अवशेष पाहिल्यावर हे मंदिर किती भव्य दिव्य असेल याची कल्पना येत होती . नर्मदा मातेने आपला प्रवाह बदलल्यामुळे हे मंदिर खोल भागामध्ये गेले . आणि हळूहळू खचत जाऊन नर्मदार्पण झाले . पुढे मूर्ती भंजकांनी देखील हे मंदिर तोडले असावे . सर्वांना माझे विचार पटले आणि गाव पातळीवर लवकरात लवकर यावर काहीतरी कार्यवाही करून हे सर्व अवशेष एकत्र करून मध्य प्रदेश सरकारच्या पुरातत्व खात्याला त्याबाबत कळविण्याचे आश्वासन गावकऱ्यांनी मला दिले .  यामध्ये प्रामुख्याने धूलीचंद पूरवीय हे सरपंच होते . आणि त्यांच्यासोबत राजकुमार पूरवीय , उत्तम पुरवीय आणि रामजी पुरवीय असे त्यांचे भाई बंद होते . हे होण्याची शक्यता कमी होती कारण सर्वांना अशी भीती वाटत असे की चुकून सरकारने उत्खनन वगैरे सुरू केले तर आपली घरे त्यात जातील . मी जेव्हा त्यांचे प्रबोधन केले आणि असे काही होणार नाही हे त्यांना समजावून सांगितले तेव्हा सर्व ग्रामस्थ तयार झाले . हे मंदिर पुन्हा पूर्ण वैभवाने उभे राहिल्यास गावाचे अर्थकारण कसे बदलेल हे देखील सर्वांना समजावून सांगितले . तो मुद्दा सर्वांना भावला . या गावातील लोक थोडेसे साधू विरोधी होते . लखनदास त्यागी नामक एका साधूच्या ताब्यातून हा आश्रम सोडवून त्याचा जिर्णोद्धार आम्ही केलेला आहे असे सरपंचाने मला सांगितले . नर्मदे काठी एक पॅटर्न मला सापडला . विशेषतः ज्यांना नर्मदे काठी आश्रम उभा करायचा आहे त्या लोकांनी हे समजून घ्यावे . नर्मदे काठी राहणारे ग्रामस्थ अतिशय हुशार आणि इरसाल आहेत . वर्षानुवर्षे अनेक साधुसंतांना पाहिल्यामुळे त्यांना माणसाची चांगली पारख आहे . हे एखाद्या नवीन साधूला गावामध्ये आमंत्रित करतात . त्याच्याकडून एखादा मोठा आश्रम उभा करून घेतात . आणि तो आश्रम व्यवस्थित चालू लागला की काहीतरी आक्षेप घेऊन किंवा आरोप प्रत्यारोप करून साधूला गावाबाहेर हाकलून लावतात . साधूने आपल्या तपस्येमुळे अनेक भक्त भाविक गोळा केलेले असतात जे आश्रमाला जमीन व आर्थिक देणग्या देतात . साधूला हाकलून दिले की ही सर्व मठाची संपत्ती आयतीच ग्रामस्थांच्या मालकीची होते . याच पद्धतीने ताब्यात घेतलेले अनेक मठ मी पुढे पाहिले . आपल्याकडे मीडियावाले सुद्धा साधू जीवनाचा स्पर्श देखील नसताना किंवा साधू जीवन किती कठीण आहे याचा अंदाज नसताना ,  एखाद्या साधूची प्रचंड बदनामी करून लोकांची मानसिकता साधू विरोधी करण्यामध्ये मोठा हातभार लावतात . हे चुकीचे आहे असे माझे मत आहे . आपण स्वतः अनुभव घेतल्याखेरीज अनुमानाने काहीही बोलू नये , लिहू नये आणि प्रसृत करू नये .किमान इतके पथ्य कोणीही पाळूच शकतो . रात्रभर मंदिरामध्ये भजन चालले होते . त्यामध्ये मी सहभागी झालो . पहाटे चार वाजता उठून जमलेल्या ग्रामस्थांना पुन्हा एकदा मंदिरांच्या भग्न अवशेषांचे महत्त्व सांगितले आणि काहीतरी कृती करण्यासाठी वचनबद्धता घेतली . उजाडल्याबरोबर पुढे मार्गस्थ झालो . नर्मदेचा विस्तीर्ण किनारा साद घालत होता . लवकरच मी नर्मदेच्या नाभीस्थानापर्यंत पोहोचणार होतो . 



लेखांक ५१ समाप्त ( क्रमशः )

मागील लेखांक

पुढील लेखांक

टिप्पण्या

  1. > त्याच्याकडून एखादा मोठा आश्रम उभा करून घेतात . आणि तो आश्रम व्यवस्थित चालू लागला की काहीतरी आक्षेप घेऊन किंवा आरोप प्रत्यारोप करून साधूला गावाबाहेर हाकलून लावतात .
    Has same thing happened with shree Vishnugiri Maharaj of Tilakwada ?

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. I have no idea about this case at all. So it would not be good to comment specifically on that. But I have jotted down my general observation overall.

      हटवा

टिप्पणी पोस्ट करा

जे आवडते सर्वांना ...

अनुक्रमणिका

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

लेखांक १ : नर्मदे हर !

लेखांक २ : भोपाळ जवळच्या जंगलातील अपघात

लेखांक ४ : झुठा कही का ! सबकुछ तो लाए हो !

लेखांक ३ : चोराची धन

लेखांक ५ : ग्वारीघाट जबलपुर मध्यप्रदेश

लेखांक ८३ : महाराष्ट्रात प्रवेश आणि भाबरीचे भेदक भिल्ल-महात्मा फोदला गारद्या पावरा

लेखांक ७४ : लेपा बांध , वेदा संगम , कठोरा अन् मांडव्य गुंफा

लेखांक ९० : गुजरात मधील कणजी चे सान्सुभाई तडवी आणि अरण्यव्याप्त माथासर