लेखांक २२ : अचानकमार व्याघ्र महारण्यात प्रवेश
यह नर्मदाखण्ड है।
यहां कुछ भी देकर मत जाओ ।
जितना हो सके यहां से लेकर जाओ ।
साधूचे हे वाक्य माझ्या मनावर पक्के कोरले गेले. त्याला नर्मदे हर करून आम्ही दोघांनी (मोहन साधू व मी) . काढता पाय घेतला . पुन्हा एकदा नर्मदा मातेचा किनारा पकडला . आता मात्र माझ्या पायांना इतकी गती आली की मी त्या साधूला देखील मागे टाकत थेट दम्हेडी गाव गाठले . अखंड डांबरी रस्त्याने चालून विटलेल्या माझ्या सह्यभ्रमंतीमध्ये रमणाऱ्या पायांना चिखलाचा , मातीचा तो मऊशार स्पर्श खरोखरीच सुखावह भासत होता , त्याचाच हा परिणाम असावा .दम्हेडी पासून मात्र पुन्हा एकदा काँक्रीट चा एक मार्ग लागला आणि तिथून तो मोहन साधू जो सुसाट सुटला तो पुन्हा कधीही मला दिसला नाही .त्याने त्याचे कार्य अतिशय चोख बजावले . त्याने दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधायचा मी खूप वेळा प्रयत्न केला परंतु तो क्रमांक अस्तित्वात नाही असाच संदेश ऐकू येतो . असो . नर्मदा मातेचे आणि त्या साधूचे आभार मानावेत तितके कमीच आहेत . माझ्या कल्पनेतली स्वप्नातली परिक्रमा वास्तवामध्ये देखील करता येते हे त्या साधूने मला नर्मदा मातेच्या आदेशाने शिकविले ही खरोखरीच फार मोठी घटना आहे माझ्या परिक्रमा आयुष्यातील ! असो . मला काही तो काँक्रीटचा नवाकोरा कठोर मार्ग आवडला नाही त्यामुळे शेतातील छोटे-मोठे शॉर्टकट शोधून काढत मी घुईदादर , कुन्नुटोला , भंगीटोला , सस्वादी , कस्तुरी ही गावे पार करत बिलासपूर गाव गाठलेच . ( बिलासपुर नावाचे छत्तीसगड मधले मोठे गाव आहे ते वेगळे आणि हे वेगळे )एकादशीचा उपवास असल्यामुळे पाय चालायचे बंद होत आहेत असे उगाचच वाटू लागले . गावामध्ये मोठा बाजार भरलेला दिसत होता . वाटेमध्ये एक हॉटेलवाला होता त्याने आवाज दिला आणि हॉटेलच्या पडवीमध्ये मुक्काम करण्याची विनंती केली . हॉटेलच्या पडवीमध्ये सामान ठेवले आणि समोर पेटलेल्या चुलीजवळ जाऊन बसलो . थंडी प्रचंड जाणवत होती . हा हॉटेलवाला मोठा मजेशीर होता . याने माझ्यासमोर ५०-६० कप चहा विकला परंतु मला एक कप सुद्धा चहा त्याने विचारला नाही . माझ्यासमोर मोठी चूल पेटली होती त्याच्यावरती तो पटापट सामोसे बनवून तळत होता . सामोसे बनवून झाल्यावर त्याच चुलीवर त्याने सुंदर अशा गरमागरम जिलेब्या तळल्या . आलुबोंडे देखील तळले. दिवस बाजाराचा असल्यामुळे मोठीच गर्दी सर्वत्र होती . माझा उपवास असल्यामुळे नर्मदा माता माझी परीक्षा पाहते आहे असे मला वाटू लागले ! समोर तळले जाणारे गरमागरम पदार्थ आणि त्यावर ताव मारत , मिटक्या मारत खाणारे लोक पाहून तोंडाला पाणी न सुटेल तरच नवल ! परंतु इथेच आपल्या निग्रहाची परीक्षा असते !मुळात उपवास करायचा असतो तोच अशा एखाद्या प्रसंगासाठी ! एरवी त्या उपासाचा फायदा तरी काय ! असो . मी चुलीवर शेकत बसलो होतो आणि साधारण ९० ते १०० च्या दरम्यान वय असलेला एक म्हातारा जो त्या हॉटेलचा मालक वाटत होता तो चुलीमध्ये हळूहळू लाकडे सारत होता . एकही अनावश्यक लाकूड तो जाळत नव्हता . त्याच्याशी गप्पा मारता मारता मी त्या संपूर्ण भागाचा भूगोल समजावून घ्यायला सुरुवात केली . इतक्यात एक जटाधारी साधू तिथे येऊन बसला . उंची साधारण सव्वा सहा फुट असावी परंतु जटांमुळे तो चांगला सात फुटाचा वाटत होता ! साधू आला आणि चिलीम पेटवून मस्त झुरके घेत बसला . मला वाटले आता या साधूला तरी चहासाठी विचारणा होईल ! परंतु कुठले काय आणि कुठले काय ! भरपूर धंदा होत असून देखील त्या मालकाची देण्याची वृत्ती अजिबात नव्हती हे स्पष्टपणे जाणवत होते . मला प्रथमच असा एखादा नकारात्मक छटा असलेला दुकानदार परिक्रमेमध्ये भेटत होता . आता पुढे जो प्रसंग घडला त्यातून सर्वसामान्य मनुष्य आणि साधू यातील फरक तुमच्या लक्षात येईल ! साधूला एका क्षणात सर्व लक्षात आले असावे ! त्याने झोळीतून शंभर रुपयाची नोट काढली . आणि दुकानदाराला देत म्हणाला मला शंभर रुपयाचे सामोसे दे . दुकानदार खुश झाला . त्याने वीस सामोसे साधूला दिले . साधूने त्या सामोशांकडे पाहिले सुद्धा नाही . दुकानाच्या अलीकडे रस्त्यावरती एक गाय कोणीतरी बांधली होती . हा साधू गाईकडे हात करत त्या दुकानदाराला मोठ्या रुबाबात म्हणाला . जाव बेटा ! गोमाता को ये सारे समोसे खिलाके आओ ! दुकानदार म्हणाला गाईला कशाला पाहिजेत सामोसे ? आता मात्र साधू भडकला आणि त्याचा आवाज एका क्षणात चढला ! तुमको जितना बताया है उतना करो ! खुदकी अकल मत लगा, कमदिमाग आदमी ! मैने पैसा गिना है। मै जो चाहे करू , lमेरी मर्जी । दुकानदाराचा नाईलाज झाला . परंतु त्याचा जीव त्या सामोशांमध्ये अडकला होता हे मला स्पष्टपणे दिसत होते . माझ्या मनात क्षणभर विचार आला की आपल्याला जर त्या गाईला खायला घालायला मिळाले तर किती छान होईल ! इतक्यात साधू मला म्हणाला ,जाव चेला ! तुम जाओ ! और गौ माता को खिलाने का पुण्य पाओ । मी लगेच उठलो आणि ते वीस सामोसे घेऊन गायीच्या पुढे गेलो . गाय बऱ्याच दिवसांपासून उपाशी असावी इतकी तिची हाडे वर आली होती . हा दुकानदार स्वभावाने चांगलाच स्वार्थी होता . त्याचीच गाय असून त्याने तिला अतिशय वाईट अवस्थेमध्ये ठेवले होते . गाईने सर्व सामोसे अतिशय आवडीने आणि पटापट खाल्ले ! मी हात स्वच्छ धुऊन परत शेकायला येऊन बसलो . दुपारचे तीन साडेतीन वाजले होते परंतु थंडी प्रचंड जाणवत होती . साधू माझ्याशी बोलू लागला . तो मला म्हणाला तुला आता नक्की काय प्रकार झाला तो लक्षात आला का ? मै कब से देख रहा हू । तुम यहा पे बैठे हो । यह दुकानदार तुम्हे बैठने के लिए तक नही बोल रहा । आख बंद करके बताता हु की इसने तुम्हे कुछ खिलाया पिलाया भी नही होगा । मै इसको बहुत सालो से देख रहा हू । बडा स्वार्थी है । परिक्रमावासियो को बुलाता है ताकी वो कुछ खरीद के खाये । इसलिये मैने जान बुझके उसके समोसे गोमाता को खिलाये । साला खुद तो उसको कुछ खिलाता नही है । ऐसी जगह साधूने एक क्षण भी रुकना नही चाहिये । असे म्हणून साधू महाराज उठले आणि ताडताड चालू लागले . त्यांची ती पाठमोरी आकृती पाहताना माझ्या मनात विचार येऊ लागले की माझा निर्णय चुकला की काय ? आज बिलासपुर मध्ये मुक्काम करावा की न करावा ? इतक्यात माझ्या लक्षात आले की सूर्यास्ताची वेळ जवळ येत आहे त्यामुळे नर्मदा मातेची पूजा आरती करून घ्यावी . मी घाईगडबडीने ओसरीमध्येच बसून नर्मदा मातेची पूजा आरती केली . परंतु आज मला त्यात फारसा आनंद वाटत नव्हता . मला अजून एक काम करायचे होते ते म्हणजे माझ्या पाठीवरच्या पिशवीचा बंद तुटला होता तो शिवून घ्यायचा होता . गावात एक शिंपी असल्याचे कळले . त्याचे घरी ताबडतोब पिशवी घेऊन गेलो . परंतु तो म्हणाला माझ्या मशीनवर इतका जाड बंद शिवला जाणार नाही . तो तुटका बंद घेऊन चालता येणे माझ्यासाठी अशक्य होते . त्यामुळे मी त्याला विनंती केली की मला मशीन चालविता येते कृपया मला चालवण्याची परवानगी द्याल तर मी माझा मी तो बंद दुरुस्त करून घेतो . त्याने परवानगी दिल्या दिल्या मी दप्तराचे सर्व महत्त्वाचे भाग चार चार पाच पाच टाके टाकून पक्के करून घेतले . दप्तराचे बंध कमी अधिक लांबीचे करता येतात परंतु ती सोय माझ्यासाठी गैरसोय ठरत होती इतकी बकले खराब दर्जाची होती . त्यामुळे ती बकले काढून टाकून तिथे देखील मी एक सरासरी लांबी पकडून भगव्या रंगाची पक्की शिलाई मारून टाकली .
दप्तराच्या बंधांना मी स्वहस्ते मारलेली पक्की शिलाई . हिने पुढे संपूर्ण परिक्रमा साथ दिली .
दप्तराचे काम अतिशय मजबूत रीतीने पूर्ण झाले ! त्यामुळे माझे खुश झालेले मन समोर चाललेला प्रसंग पाहून क्षणात चिंताक्रांत झाले ! पोलिसांची एक गाडी मोठमोठ्याने सायरन वाजवत आणि पुकारा करत गावचा बाजार उठवत होती ! लॉकडाऊन सुरू झाला असून प्रत्येकाने आपापल्या घरीच रहावे असे पोलीस सर्वांना सांगत होते . मी धावतच हॉटेलच्या ओसरी मध्ये गेलो आणि शांत हालचाल न करता बसून राहिलो . मला अशी भीती वाटली की पोलीस मला पाहतील आणि परिक्रमा थांबवण्याची सूचना करतील . मला अयोध्येच्या साधूने दिलेले पुस्तक मी बसल्या बसल्या चाळू लागलो . पुस्तक चाळताना माझ्या असे लक्षात आले की बिझौली गावामध्ये माझ्यासोबत राहिलेल्या बंजारा समाजाच्या पवार कुटुंबीयांचे घर इथून फक्त दहा किलोमीटर अंतरावरती होते . नऊ किलोमीटर गेल्यावर खाटी नावाचे गाव होते आणि दहा किलोमीटरवर मोहंदी नावाचे गाव होते , जिथे पवार कुटुंबीय राहायचे . त्यांची परिक्रमा साधारण माझ्याबरोबरच सुरू होती . त्यामुळे ते त्यांच्या घरी पोहोचले असण्याची शक्यता होती . या हॉटेलमध्ये तसेही माझे मन रमत नव्हते . कारण त्या लोकांना शून्य अगत्य होते . त्यात पोलीस एकेकाला हाकलत आहेत हे पाहिल्यावर माझ्या असे लक्षात आले की कदाचित हे आपली उचल बांगडी करून आपली परिक्रमा थांबवू शकतील . बिलासपूर गाव संपल्यावर खाटी गावापर्यंत संपूर्ण जंगलाचा मार्ग आणि घाट रस्ताच होता त्यामुळे तिथे तुलनेने सुरक्षित वातावरण होते . त्यामुळे सूर्यास्त होतो आहे हे लक्षात येऊन देखील मी झटकन तिथून निघून जाण्याचा निर्णय घेतला . मी निघून जातो आहे हे पाहिल्यावर मात्र दुकानदार म्हातारा , त्याचा मुलगा , त्याची आई असे सर्वजण माझ्या मागे धावत येऊ लागले आणि महाराज जाऊ नका !महाराज कृपया मुक्काम करा ! अशी विनवणी करू लागले . परंतु एकदा उचललेले पाऊल परत फिरवायचे नसते हा परिक्रमेचा नियम पाळत मी तिथून अक्षरशः पोबारा केला . मी पोबारा केला खरा परंतु पुढे काय भयानक संकट वाढून ठेवले आहे त्याची मला जराशीही कल्पना नव्हती . झपाझप पावले उचलत बिलासपूर गाव मी सोडले पुढे एकच घर होते आणि मग अचानक घनघोर जंगल सुरू झाले . एका क्षणामध्ये सर्व उजेड नष्ट होऊन प्रचंड अंधार दाटून येऊ लागला . जंगली श्वापदांचे कर्णकर्कश आवाज कानात घुमू लागले . मला एक क्षणभर असे वाटू लागले की बहुतेक आपला हा निर्णय चुकलेला दिसतो . परंतु खरे पाहायला गेले तर एकादशीचे काही उपवासाचे खायला मिळावे आणि तुटलेले दप्तर शिवून घ्यावे या दोनच कामांसाठी मी बिलासपूर मध्ये थांबणार होतो . पैकी दप्तराचे काम झाले होते आणि पहिल्याच उपासामुळे पोटामध्ये प्रचंड कावळे कोकलत होते . मी अक्षरशः धावतच तो रस्ता तुडवू लागलो . आता मात्र खूपच घनदाट अंधार पडला होता . दुआरी घाट नावाचा एक जंगलातला घाट मी पार करत होतो . या भागामध्ये मुबलक प्रमाणामध्ये वाघ आहेत याची मला कल्पना होती . हॉटेलमधील म्हाताऱ्या माणसाने वाघाचे अनेक किस्से मला सांगितले होते . वाटेत एकही वाहन येत किंवा जात नव्हते . माझे एक मन मला सांगू लागले की आता जी गाडी येईल त्या गाडीला हात कर आणि बसून पुढचे गाव गाठ . तर दुसरे मन मला सांगत होते नर्मदा मातेचे नाव घे आणि चालत रहा . काही होणार नाही !परिक्रमेचे नियम तोडू नकोस !
आता खाटी गाव फक्त चार किलोमीटर उरले होते . अर्ध्या तासामध्ये वेगाने पळत मी बरेचसे अंतर कापले होते . याचा अर्थ एखादी गाडी मिळाली तर पाच मिनिटात मी पोहोचलो असतो . इतक्यात नर्मदा मातेने ठरविले की माझी परीक्षा बघावी . आणि मला समोरच्या वळणावर काही लोकांचे अस्तित्व जाणवू लागले . सुमारे दहा-बारा लोक असावेत .मोबाईलच्या मंद उजेडात त्यांचे काहीतरी चालू होते . एक मोठा ट्रक उभा होता .आणि ही सर्व मंडळी एकही शब्द न बोलता शांतपणे जंगलातील लाकडे जी आधीच कोणीतरी तोडून कापून ठेवली होती ती गुपचूप त्या ट्रक मध्ये भरण्याचे काम करत होती . माझ्या क्षणात लक्षात आले की ही जंगली लाकडाची तस्करी सुरू आहे . मला पाहताच सर्वांनी त्यांच्या मोबाईलचे फ्लॅश माझ्या दिशेला वळविले . मला त्या क्षणी तिकडे पाहणे बहुतेक त्यांना अपेक्षित नसावे . नर्मदे हर बाबाजी ! इतने अंधेरे मे कहा चले ? एकाने मला विचारले . मी त्यांना सांगितले की मला खाटी गावामध्ये जायचे आहे . दुसरा म्हणाला अरे बाबाजी इतने रात को इस जंगल से पैदल जाना अच्छी बात नही है । आप थोडा समय रुक जाइये । हमारी गाडी खाटी होके जायेगी ।उसमे बैठके चले जाना । परंतु मी वाहनात बसणार नाही हा माझा निश्चय मी त्यांना सांगितला . ते म्हणाले जैसी आपकी इच्छा । लेकिन इस जंगल से आप अकेले मत जाइये।
मला तिथे थांबणे परवडणारे नव्हते . त्यामुळे मी त्यांना नर्मदे हर केले आणि मोठ्या गतीने पुन्हा पावले उचलली. आता मात्र पुन्हा एकदा निर्जन रस्ता आणि मी एकटाच मार्गक्रमण करतो आहे .अंधार इतका भयंकर वाढला होता की मला रस्ता सुद्धा दिसेनासा झाला . आकाशामध्ये लख्ख चांदण्या दिसू लागल्या . संपूर्ण परिक्रमा मार्गामध्ये प्रकाश प्रदूषण काही मोजकी मोठी शहरे सोडली तर जवळपास नाहीच आहे . त्यामुळे प्रत्येक गावातून अतिशय सुंदर असे आकाशदर्शन होते . त्यात असा जंगलातील घाट रस्ता मिळाला मग तर काय विचारता ! मी आकाशातील ओळखीचे तारे पहात मार्गक्रमणा करू लागलो ! मृग नक्षत्र दिसत होते . अश्विनी भरणी कृत्तिका रोहिणी सर्वकाही सुंदर आणि ठळक दिसत होते !
सारथी चा पंचकोन दिसत होता . स्वर्गाचे द्वार दिसत होते . परिक्रमेत प्रथमच मी अंधारामध्ये मार्गक्रमण करत होतो . त्यामुळे उत्तर दिशा मी आधीच शोधून ठेवली होती . उत्तर ध्रुव तारा सापडला की उत्तर दिशा माहिती होते . शर्मिष्ठा किंवा सप्तर्षी या दोघांपैकी एक काहीतरी सापडले की उत्तर ध्रुव आणि पर्यायाने उत्तर दिशा सापडलीच म्हणून समजा ! अशा पद्धतीने मी चालत असताना अचानक मागून मोठ्या आवाजात पोलिसांचा सायरन ऐकू येऊ लागला ! त्या निरव शांततेचा भंग त्या सायरनने केला होता . माझ्या शेजारी पोलिसांची एक सफारी गाडी येऊन थांबली . आणि अतिशय करड्या आवाजात गाडीतील पोलिसाने मला दरडावले ! बाबाजी गाडी मे बैठ जाओ !
आता मात्र मला काही सूचेना ! मला वाटले संपली आपली परिक्रमा ! झाला सुरू लॉकडाऊन ! कोरोना रोगाच्या लॉकडाउन ने नुसता उच्छाद मांडला होता जगभर ! मला काय करावे कळेना ! वाहनामध्ये बसावे की जंगलामध्ये निघून जावे ? गाडीमध्ये दोन सशस्त्र पोलीस होते . मी वाहनामध्ये मागच्या आसनावर बसलो परंतु त्यांना सांगितले कृपया गाडी बंद करा . आपण थोडेसे बोलूयात . पोलिसांनी गाडी बंद केली . आता पुन्हा एकदा रातकिड्यांचे आवाज आणि जंगलातील प्राण्यांचे भयानक आवाज ऐकू येऊ लागले . गाडीचे दिवे बंद करता क्षणी पोलिस म्हणाले ,अरे बाबाजी इतक्या भयानक अंधारात तुम्ही कुठे निघाला आहात ? मी त्यांना सांगितले मला खाटीच्या पुढे मोहदी गावात जायचे आहे . तिथे बुधराम सिंह पवार आहेत ज्यांचे घरी मी मुक्काम करणार आहे . पोलिसांना बहुधा खात्री पटली की हा कोणी चोर डाकू नसून परिक्रमावासीच आहे . कारण बुधराम सिंह पवार नायक याचा पुतण्या मथुरा नायक त्या गावचा सरपंच होता आणि तो यांच्या ओळखीचा होता . धार मध्ये पवार घराण्याने राज्य केलेले आहे . त्यामुळे पवार किंवा पंवर किंवा पनवर हे आडनाव उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात आढळते . विशेषतः मोहदी गावात बंजारा समाजाची वस्ती होती आणि त्यांनी पवार हे आडनाव धारण केले होते , ते तसे दुर्मिळ उदाहरण आहे. पोलीस मला म्हणाले आम्ही रोजच या भागात गस्त घालत असतो . आमचे पोलीस ठाणे अमरकंटक आहे . आम्ही तुम्हाला थेट अमरकंटकला सोडतो आमच्या सोबत चला . म्हणजे परवा येणारी मकर संक्रांति तुम्ही अमरकंटक मध्ये साजरी कराल . परंतु मी गाडीने प्रवास न करण्याचा माझा निश्चय आहे हे त्यांना ठासून सांगितले . पोलिसांनी मला गाडीने चलण्याचा खूप जास्ती आग्रह केला . परंतु मी माझ्या निश्चयावर ठाम राहिलो . पोलीस म्हणाले तुम्हाला असे एकट्याला आम्ही जंगलामध्ये सोडून जाऊ शकत नाही काय करावे सांगा . इथे वन्य श्वापदे खूप आहेत. आता दोन किलोमीटर अंतर उरले होते . मी त्यांना म्हणालो तुम्ही माझ्यासोबत तेवढे अंतर गाडीने या आणि पुढे निघून जा . ही कल्पना त्यांना पटली आणि थोड्याच वेळात आम्ही मोहदी गावात येऊन पोहोचलो . एक परिक्रमावासी आपल्या गावामध्ये चालत आला आहे आणि त्याच्या मागे दिवे सायरन इत्यादी चालू असलेली पोलिसांची गाडी आलेली आहे हे पाहून एका क्षणात सारा गाव तिथे गोळा झाला . अशा छोट्या छोट्या गावांमध्ये विशेष काही घटना घडत नसतात . त्यांचे दैनंदिन दिनमान ठरलेले असते त्याप्रमाणेच घडत असते . त्यामुळे आता काहीतरी मसाला गोष्ट घडणार असे वाटून सर्व गावकरी पोलिसांच्या गाडीभोवती गोळा झाले ! इतक्यात सरपंच मथुरा नायक देखील तिथे आला ! मी जेव्हा त्याला त्याच्या काका काकूंचे नाव सांगितले तेव्हा तो अतिशय आनंदित झाला आणि तो म्हणाला आत्ताच काही वेळापूर्वी ते दोघे आपल्या घरी आलेले आहेत ! पोलीस देखील मथुरा नायकशी गप्पा मारू लागले . आणि लोकांना जी सनसनाटी घटना हवी होती ती घडली ! खाटी गावाकडून खन्नत माळमार्गे अमरकंटकला जाणारा घाट रस्ता होता . आणि मोहदी गावातून एक मार्ग वेगळ्या रस्त्याने अमरकंटकलाच जात असे .
मी एवढ्या अंधारात चालत कसा आलो ते मथुरा नायक ला पोलिसांच्या समक्ष सांगू लागलो . वाटेत मला काही लोक भेटले हे देखील मी सांगितले ! आता मात्र पोलीस सावध झाले ! लाकूड तस्करांची गाडी मी पाहिली आहे हे पाहिल्यावर पोलिसांना मोठाच आनंद झाला ! कारण पोलिसांची गाडी येत आहे याची चाहूल लागल्या लागल्या त्या लोकांनी ट्रकमध्ये मागे गवत वगैरे भरून जंगलामध्ये पलायन केले होते . त्यामुळे पोलिसांना ती लाकडाची गाडी आहे याचा संशय आला नसावा . थोड्याच वेळात ते मला खाटी गावापर्यंत सोडण्यास तयार होते हे देखील मी पोलिसांना सांगितले . याचा अर्थ त्यांची लाकडं भरून झाली आहेत हे पोलिसांनी ओळखले . आणि पोलीस खाटी मधून अमरकंटकच्या दिशेला निघून जाणार त्यामुळे हा ट्रक मोहदीच्या दिशेला येणार हे निश्चित होते . पोलिसांनी लगेच त्यांची गाडी एका रस्त्यावर लपवून लावली आणि सर्वजण सापळा लावून बसून राहिले . इतक्यात लाकडाची तस्करी करणारा तो ट्रक आलाच ! पोलिसांनी ताबडतोब त्या चालकाला गाडीतून खाली खेचले ! आणि पुढची कारवाई सुरू केली ! सफारी गाडीमध्ये जे दोन पोलीस हवालदार /अधिकारी होते त्यातील एकाचे गाव नर्मदे काठीच होते , त्यामुळे त्याला जन्मतः परिक्रमावासींविषयी आस्था होती . त्यांनी त्यांचा क्रमांक मला लिहून दिला आणि सांगितले की अमरकंटक मध्ये किंवा संपूर्ण परिक्रमेमध्ये कुठल्याही प्रकारची काही अडचण आली तर कधीही त्यांना फोन करा . त्यांनी जाता जाता माझे आभार देखील मानले कारण त्यांच्या मते माझ्यामुळे ही मोठी चोरी पकडली गेली होती . कदाचित मी त्या रस्त्याने त्यांना भेटलो नसतो तर ते त्यांच्या नेहमीच्या शिरस्त्यानुसार खाटी गावाहून अमरकंटकला वेगाने निघून गेले असते . आणि मग लाकूडतस्कर मोहदी मार्गे पुढच्या मार्गाला मार्गस्थ झाले असते . मला मात्र आता चांगलीच भूक लागली होती त्यामुळे आता पुढे लाकूड तस्करांचे गावकरी आणि पोलीस काय हाल करतात हे पाहण्यात मला काहीही रस उरला नव्हता . मथुरा नायक ने एका छोट्या मुलाला मला बुधराम सिंह पवार चे घर दाखवण्यासाठी पाठवले . बुधराम सिंह पवार आणि त्याची पत्नी तसेच सोबत गावातील अन्य काही दोन-तीन लोक यांनी प्रथमच परिक्रमा संपूर्ण केली होती . त्यामुळे गावातील सर्व लोक त्यांच्या घरी जमले होते आणि जणू काही एका उत्सवाचे वातावरण त्यांच्या घरामध्ये होते . ते सर्वजण परिक्रमेतील शेवटची आरती करण्याकरता तयारी करून बसले होते इतक्यात माझे तिथे आगमन झाले . मी आलेला पाहून त्या सर्वांना इतका आनंद झाला की काय सांगू ! रात्रीचे जवळपास आठ वाजले होते आणि माझे येणे त्यांच्यासाठी अत्यंत अनपेक्षित होते ! सर्वांनी मोठ्या आनंदाने माझे स्वागत केले आणि त्यांच्या रांगेमध्ये मला बसायला जागा दिली आणि माझी नर्मदा मैया बाहेर काढण्याची विनंती केली . मी देखील माझे पूजेचे समान पुन्हा एकदा काढले . मगाशी मी जी आरती केली त्यातून मला पुरेसे समाधान मिळाले नव्हते हे मी आधीच नमूद केले आहे . त्यामुळे आज नर्मदा मातेची पुन्हा एकदा आरती करावी असे मी ठरविले . त्यांच्या घरातील सर्व नातेवाईक तिथे दाटीवाटीने गोळा झाले होते . घरातीलच एक छोटा मुलगा मोबाईलवर या सर्व प्रसंगाचे फोटो काढत होता . ते मी माझ्या पिशवीवर लिहिलेल्या मित्राच्या क्रमांकावर पाठवायला सांगितले . त्यातील काही फोटो सोबत जोडत आहे .
मला भेटून पवार दांपत्याला झालेला आनंद
आम्ही सर्वांनी मिळून नर्मदा मातेची हृद्य आरती केली .त्यानंतर मला नायक लोकांनी गरमागरम साबुदाण्याची खिचडी बनवून पोटभर खायला दिली ! आणि नंतर आम्ही अंगणामध्ये एका लोखंडी पाटीमध्ये छोटीशी शेकोटी करून घरातील सर्व लोक गप्पा मारत बसलो . सर्वांनाच मी आल्याचा अतिशय आनंद झाला होता असे त्यांच्या बोलण्यातून जाणवत होते . सांगून येणाऱ्या माणसाला आपल्याकडे पाहुणा म्हणतात . हा वेळ पाहून आलेला असतो . परंतु काळ वेळ न सांगता अचानक उगवणाऱ्या पाहुण्याला आपल्या संस्कृतीमध्ये अतिथी म्हणतात . अर्थात जो तिथी न पाहता, न सांगता येतो तो अतिथी . "अतिथी देवो भव" अशी आपली संस्कृती सांगते . असा अचानक आलेला पाहुणा हा देव समजून त्याची सरबराई करावी अशी परंपरा संपूर्ण भारतात सर्वत्र आढळते . मी त्याच परंपरेचा अनुभव घेत होतो इतकेच ! नायक लोकांची २२ घरे या गावामध्ये आहेत . आणि त्यातील बहुतांश घरे परिक्रमावस्यांची मनोभावे सेवा करतात . आज सुद्धा त्या गावांमध्ये पंचवीस तीस परिक्रमावासी मुक्कामाला उतरले आहेत अशी माहिती मला मिळाली . आणि मी त्या सर्वांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली . शेजारच्या घरामध्ये एक परिक्रमावासी उतरला आहे असे मला सांगण्यात आले . घराच्या बाहेर ओळखीचे ते लाल सॅंडल दिसले आणि माझ्या लक्षात आले की हा तोच साधू आहे जो मला शेष घाटावर भेटला होता ! त्याला देखील पुन्हा मला भेटून आनंद वाटला . नाशिकचा तो चिडका बाबा सुद्धा मुक्कामी तिथेच होता ! ते देखील मला भेटून आनंदित झाले . हे गाडीने एक दिवस आधीच येऊन इकडे पोहोचले होते .जेव्हा मी मोहन साधूची चौकशी केली तेव्हा मला कळाले की मोहन साधू दुपारीच इथून पुढे गेला .आणि दोन दिवस अंतरावर असलेल्या अमरकंटकला तो उद्याच पोहोचणार होता . त्याची चाल किती चित्त्याच्या चपळाईची आहे हे मी पाहिले होते त्यामुळे त्याला ते सहज शक्य होते . अतिशय वेगाने परिक्रमा करणारे काही लोक आहेत आणि ते त्यांना सहज शक्य होते . कमी वजन ,लांब ढांगा आणि सलग न थांबता चालण्याची सवय असेल तर कुणीही खूप वेगाने परिक्रमा करू शकतो . असो .नेवाशावरून आलेली काही मराठी मंडळी भेटली जी अतिशय वेगवान चालायची .त्यामुळे सरासरी ५० किलोमीटर अंतर ती रोज तोडत होती . या सर्व परिक्रमा वाशींशी बराच वेळ मी गप्पा मारत बसलो . अखेर खूप उशीर झाला आहे असे पाहून सर्वांना नर्मदे हर केले व बुधराम पवार नायक च्या अंगणामध्ये अंग टाकून दिले . रात्रभर थंडी होतीच . पहाटे लवकर उठून नायक लोकांच्या विहिरीतील पाणी शेंदून मस्तपैकी आंघोळ केली ! माझी आंघोळ पूर्ण झाल्या झाल्या एकाने मला गरम पाणी आणून दिले ! परंतु माझी आंघोळ झालेली होती त्यामुळे मी ते एका छोट्या मुलाला देऊन टाकले . इथे लहान थोर सर्व लोक भल्या पहाटे उठतात .नायक लोकांची परिक्रमा पूर्ण झाली असली तरी संक्रांतीसाठी ते सर्वजण पुन्हा एकदा चालत अमरकंटकला जाणार होते . परंतु त्यांना वेळ होता त्यामुळे मी न थांबता पुढे जाण्याचा निर्णय घेतला . एका नायकने मला पुढील सर्व मार्ग नर्मदेच्या काठाने कसा आहे तो लिहून दिला .
परिक्रमावासींची सेवा येथे राहणारा एक मराठी साधू करतो आहे असे रात्री मला कळले होते परंतु रात्री त्यांची भेट होऊ शकली नव्हती . सकाळी तरी ते महाराज भेटतात का पहावे म्हणून जाता जाता मी मथुरा नायक च्या घरापाशी थांबलो . इतक्यात ते स्वतः खोलीतून बाहेर आले आणि मला अगत्याने आत घेऊन गेले . या अवलियाचे नाव नवनाथ आहेर असे होते . यांनी पायी , गाडीने अशा सर्व मिळून सुमारे १३ परिक्रमा केल्या होत्या असे ते म्हणाले . विशेषतः आपल्या पत्नीला व छोट्याशा राघव नावाच्या मुलाला घेऊन त्यांनी अनवाणी पायांनी केलेली परिक्रमा अधिक मोलाची होती . यांनी एक परिक्रमा तर केवळ ७२ दिवसांमध्ये पूर्ण केली होती ,इतकी त्यांची चालण्याची गती होती . मथुरा नायक याने त्याच्या राहत्या घरातील एक खोली परिक्रमावासींच्या सेवेकरिता यांना दिली होती व तिथून राघव परिक्रमावासी सेवा केंद्र नावाने नवनाथ भाऊ आहेर आपले सेवा कार्य चालवीत होते .
दोघा पती-पत्नींनी मला एकादशी सोडून द्वादशी चा भोजन प्रसाद घेऊन मगच पुढे जाण्याची विनंती केली .मला संक्रांतीच्या दिवशी अमरकंटक गाठायचे होते असा मानस मी त्यांना सांगितला परंतु नवनाथ आहेर यांनी ते अवघड असल्याचे सांगितले व सावकाश दुपारी जाण्याचा सल्ला दिला . माझ्या करिता त्यांनी पटपट स्वयंपाक करून नऊ वाजताच सर्व जेवण तयार ठेवले . तोपर्यंत नवनाथ आहेर यांच्याशी मी गप्पा मारत बसलो .एक अतिशय आदर्श गृहस्थ जीवन तो महापुरुष जगत होता .
माझ्याकडे खरे तर नवनाथ भाऊला देण्यासाठी काहीच नव्हते . परंतु नंतर माझ्या असे लक्षात आले की त्यांचे युट्युब चॅनेल आहे आणि ते मॉनिटाइज करता येते हे त्यांना माहिती नव्हते . मी लगेचच त्यांच्याच मोबाईलवरून त्याना ते चैनल मॉनेटाईज करून दिले .
त्या चॅनेल ची लिंक इथे पहा . त्यामुळे आता त्याना यूट्यूब चैनल मधून थोडेसे अर्थार्जन करता येणे शक्य होणार होते . दोघा पती-पत्नींनी एकत्रितपणे केलेल्या तीन परिक्रमा हा एक विक्रमच मानला पाहिजे ! विशेषतः आपल्या पतीला इतक्या कठीण मार्गांमध्ये साथ देणारी स्त्री ( सौ .सीमामैय्या आहेर ) ही खरोखरीच वंदनीय होय ! आपल्या घरातील चार माणसांचा स्वयंपाक करताना थकणारी शहरी स्त्री कुठे आणि अचानकपणे आलेल्या शंभर दीडशे अनोळखी परिक्रमावासींसाठी न कुरकुरता आनंदाने , निस्वार्थ पणे व प्रेमाने भोजन बनवणारी ही माऊली कुठे ! दोघेही उत्कृष्ट कीर्तनकार होते . नवनाथ आहेर यांनी त्यांचा क्रमांक मला लिहून दिला . त्यांचे अक्षर देखील त्यांच्या जीवनाप्रमाणेच अतिशय सुंदर होते !
ज्यांना शक्य आहे त्यांनी नवनाथ आहेर यांना अवश्य संपर्क साधावा व त्यांच्या कार्यामध्ये जरूर हातभार लावावा ! विशेष म्हणजे इथून नर्मदेचे मूळ पात्र सहा किलोमीटर दूर होते . परंतु तिथे देखील कोणी नवनाथ भाऊंना संपर्क साधला तर ते गाडीवरती जेवण घेऊन पोहोचवण्याची व्यवस्था करत असत . मला या काठावरील मार्गाने चालायचे आहे हे मी नवनाथ आहेर यांना सांगितले . त्यांनी मला पुढचा सर्व मार्ग समजावून सांगितला आणि त्याप्रमाणे मी साडेनऊ वाजताच नर्मदे हर करून पाऊल उचलले . मोहदी गावातून ९०% लोक सडक मार्ग निवडत असतात . कारण इथूनच पुढे अमरकंटकचे भयाण जंगल सुरू होते . हे जंगल इतके घनदाट आहे की इथे चुकून जरी वाट चुकली तरी पुन्हा मूळ रस्ता सापडणे केवळ अशक्य होते . या जंगलाच्या दुर्गमतेमुळे इथे वाघासह अन्य अनेक जंगली श्वापदे सुखाने वास करत आहेत . या जंगलाचे पुरातन नाव मैकल महारण्य असे आहे . परंतु स्थानिक आदिवासी त्या जंगलाला अचानक मार जंगल म्हणतात .त्याच नावाचे अभयारण्य आता भारत सरकारने स्थापन केलेले आहे .
या जंगलाला अचानकमार असे का म्हणतात ? . इथे कुठूनही येऊन अचानक वन्य श्वापदे मारा करतात , हल्ला करतात त्यावरून हे नाव पडले आहे असे स्थानिकांनी मला सांगितले . नर्मदा परिक्रमेच्या सर्व पुस्तकांमध्ये या जंगलातून जाऊ नये असे सुचविलेले आहे .
परंतु नर्मदा मातेचा किनारा अजिबात सोडायचा नाही असा मनोमन संकल्प केलेला असल्यामुळे माझी पावले आपोआप त्या घनदाट अरण्यातील पायवाटेने निघाली .
लेखांक बावीस समाप्त (क्रमश:)
पुढच्या भागावर जा
उत्तर द्याहटवाआगळी वेगळी अनुभूती
उत्तर द्याहटवा