लेखांक २३ :अविस्मरणीय संक्रांति

खाटी गावापासून तीन प्रकारचे मार्ग अमरकंटकच्या दिशेला निघतात . एक पक्का डांबरी सडक मार्ग आहे .या मार्गावरून सुमारे ९० टक्के परिक्रमावासी पुढे जातात . एक साधा पायवाटेचा मार्ग आहे ज्या मार्गे नऊ टक्के लोक जातात .आणि चंचल अवखळ छोट्याशा कन्ये प्रमाणे भासणाऱ्या रेवा राणीच्या काठाने जाणारा एक अति खडतर मार्ग आहे जो केवळ एक टक्का लोकच स्वीकारतात . माझी या अखेरच्या मार्गाने जाण्याची इच्छा होती .आणि नर्मदा मैयाने माझी या टप्प्यामध्ये चांगलीच खडतर परीक्षा देखील पाहिली .
इथे लोक नर्मदेच्या काठाने चालत नाहीत यात त्यांचा खरोखरीच दोष नाही कारण या संपूर्ण पठारावर अनेक छोटे ओढे नाले उगम पावतात आणि नर्मदेला येऊन मिळतात . परंतु मुळात नर्मदा माईच इथे इतकी छोटी आहे की तुम्हाला तुमच्या समोर आलेली नदी ही नर्मदाच आहे हे लक्षात देखील येत नाही . आणि सहज एका उडीमध्ये तुम्ही ती ओलांडून जाता आणि तुमची परिक्रमा खंडित होते . असे खूप परिक्रमावस्यांच्या बाबतीत अनेक वेळा झालेले आहे . त्यामुळे इथे स्थानिक लोक देखील तुम्हाला रस्त्याने जाण्याचा सल्ला देतात . परंतु या बाबतीत मी एक फार सोपे सूत्र लक्षात ठेवले होते . नर्मदा नदी सदैव माझ्या उजव्या हाताला राहणार होती . तसेच ती वरून खाली वाहणारी असणार होती . त्यामुळे मी जेव्हा जेव्हा नर्मदे कडे तोंड करीन त्यावेळी तिचा प्रवाह माझ्या डाव्या हाताने उजव्या हाताला जाणारा असणार होता कारण मी नर्मदेच्या उत्तर तटावर होतो . त्याचसोबत तिला येऊन मिळणारा कुठलाही ओढा नाला नदी यांचा प्रवाह देखील डावीकडून उजवीकडे वाहणाराच असणार होता . उजवीकडून डावीकडे वाहणारा प्रवाह दिसला तर ओळखायचे आपली परिक्रमा खंडित झाली ! परंतु माझे हे सर्व भ्रम होते हे लवकरच माझ्या लक्षात आले . जंगलातील ओढे नाले ओहोळ कुठूनही कुठल्याही दिशेला वाहत होते ! त्यामुळे नर्मदा मातेचा काठ गाठणे आणि तो न सोडणे हा एकमेव उपाय होता . परंतु काठाने इतकी घनदाट झाडी होती की एक पाऊल देखील ठेवायला जागा नव्हती . मला मधून अजून सारखे असे वाटायचे की परत उलटे फिरावे आणि रस्त्याने अमरकंटकला निघून जावे . परंतु एकदा पुढे टाकलेला पाय मागे घ्यायचा नाही असे ठरवून मी निग्रहाने नर्मदा मातेचे नामस्मरण करीत चालत राहिलो . हे अतिशय सुंदर आणि घनदाट आरण्य होते . अनेक पशु पक्षांचे आवाज इथे येत होते . मला आता नीलकंठ आश्रमात जायचे होते . वाटेमध्ये मनुष्यवस्ती जवळपास शून्य आहे . मध्ये काही छोटी-मोठी गावे लागली परंतु तेथील वस्ती देखील अगदी मोजकी चार-पाच घरे अशा स्वरूपाचीच होती . हर्रै टोला नावाच्या गावाच्या हद्दीतून मी वनक्षेत्रातून चालत होतो . मध्ये काही डोंगर चढावे उतरावे लागले आणि दोन-चार मोठे ओढेनाले आले पार केले . घनदाट अरण्याचा रस्ता लागला . मार्ग विचारण्यासाठी एकही मनुष्य उपलब्ध नव्हता . झाडांवर कुणीतरी नीलकंठ आश्रमाचे हाताने लिहिलेले फलक लावले होते . त्याचा माग घेत मी नीलकंठ आश्रमात पोचलो . हे मिरीया नावाचे गाव होते .इथे नर्मदेचे ब्रह्मकुंड आहे .आश्रमात पोहोचलो आणि त्या रम्य वातावरणामुळे तिथून हलूच नये असे वाटू लागले !
अतिशय घनदाट झाडीच्या मधोमध हा आश्रम होता ! आश्रम म्हणजे कच्चे बांधकामच . त्यामुळे झाडाची लाकडे बांबू पालापाचोळा इत्यादी वापरून केलेला मंडप . दूर कुठेतरी लाकडे तोडण्याचा आवाज येत होता . मी नर्मदे हर असा आवाज दिल्याबरोबर लाकूडतोड्या साधूने नर्मदे हर असा पुकारा केला ! कोणीतरी आहे असे पाहून हायसे वाटले . इतक्यात एक तरुण साधू धावतच माझ्यासमोर आला ! दुरून कोणी पाहिले तर एखादी महिला धावत येते आहे असा भास होत होता ! साधूचा आवाज देखील अतिशय हळुवार आणि मृदू होता . परमेश्वराची लीला अगाध आहे . त्याने स्त्री पुरुष हे जसे बनविले आहेत त्याचप्रमाणे त्याने पुरुषी स्त्रिया आणि स्त्रैण पुरुष देखील बनविले आहेत . हा साधू थोडासा स्त्रैण वाटत होता . या अतिशय सुस्वभावी निरलस निष्पाप प्रेमळ व  तपस्वी साधूचे नाव गौतम गिरी असे होते .
नीलकंठ आश्रमातील एक साधू

 आप पहले संक्रांति का मंगल स्नान करके आईये फिर चाय प्रशादी पाइये । असे साधूने अतिशय नाजूक आवाजात मला सांगितले . मध्यप्रदेशात प्रसादला प्रशाद म्हणतात . इथे सर्रास स चा श असा उच्चार केला जातो . मी उतारा वरून खाली निघालो . मागे वळून पाहिल्यावर आश्रम सुंदर दिसत होता . 
 नीलकंठ आश्रम
वाटेमध्ये एका साधूंची समाधी होती . 
थोडासा पुढे गेल्यावर एक मोठा गणपती प्रतिष्ठापित केला होता . 

तिथून पुढे गेल्यावर नर्मदा मातेकडे पाहिले आणि डोळ्यावर विश्वासच बसेना ! आतापर्यंत पाहिलेली औरस चौरस नर्मदा मैया केवळ एका छोट्याशा ओढ्या सारखी दिसत होती !
नदीने एक झोकदार वळण येथे घेतलेले दिसत होते . एक दोन अडीच वर्षाची छोटी मुलगी काठावरती खेळत बसली होती . तिचे विशी पंचशीतले आई वडील नुकतेच स्नान आटोपून काठावरती छोटी चूल बनवून त्यावर स्वयंपाक करत होते . मध्यप्रदेशमध्ये स्नान या शब्दाचा उच्चार "अस्नान " असा करतात . तसेच आपण पिछली बार मैने ये किया था असे म्हणतो . त्या ऐवजी मध्य प्रदेशातील लोक अगली बार मैने ऐसा किया था असे बोलतात . अगली बार हा शब्द महाराष्ट्रातील हिंदी भाषिक लोक पुढच्या वेळेसाठी वापरतात परंतु मध्य प्रदेशात हा शब्द सर्रास मागच्या वेळेसाठी वापरला जातो . अशी विविध भाषा वैशिष्ट्ये वेळोवेळी तुम्हाला सांगत राहणारच आहे .  भौगोलिक दृष्ट्या पाहायला गेले तर मी अनुपपूर जिल्हा सोडून शहडोल नावाच्या जिल्ह्यामध्ये प्रवेश केला होता .नर्मदा मातेला नमस्कार करून मी संक्रांतीचे मंगल स्नान करण्याचा संकल्प सोडला. त्या बर्फासारख्या थंडगार पाण्यामध्ये मी स्नान केले . कमरे एवढ्या खोल पाण्याचा डोह तिथे तयार झाला होता . तळाशी भरपूर वाळू होती . आणि पाणी इतके स्वच्छ सुंदर आणि नितळ होते की पाण्याचा तळ दिसत होता . पाण्यामध्ये मासे मला तरी दिसले नाहीत . का कोणास ठाऊक परंतु येथून पुढे देखील परिक्रमेतील निम्मे दिवस झाले तरी मला पाण्यामध्ये मत्स्यदेवतेचे दर्शन झालेले नव्हते ! 
आज खरे म्हणजे त्या आश्रमामध्ये मकर संक्रांतीचा मेळा आयोजित करण्यात आला होता .तसे पत्रक तिथे लावले होते परंतु आश्रमातील दोन साधू आणि ही तीन माणसे सोडता त्या संपूर्ण परिसरात कोणीही दिसत नव्हते . तिथले एक पत्रक मला प्राप्त झाले ते आपल्या माहितीसाठी सोबत जोडत आहे .
स्नान करून मी आश्रमामध्ये गेलो . आत मध्ये एक धुनी होती आणि छान नैसर्गिक झाडाझुडपांनी बनवलेला आणि शेणाने सारवलेला मंडप होता , जिथे बसण्याची व्यवस्था होती . तिथे मी बसलो आणि साधूने मला कोरा चहा आणून दिला .
नीलकंठ आश्रमातील धुनी (संग्रहित चित्र )
आश्रमामध्ये बारा ज्योतिर्लिंगे प्रतिष्ठापित केली होती त्यांचे देखील मी दर्शन घेतले .
नीलकंठ आश्रमातील द्वादश ज्योतिर्लिंगे

नर्मदेच्या काठी असलेल्या सर्वच गावांमध्ये पंचक्रोशी परिक्रमा अथवा पंचकोषी परिक्रमा याचे फार महत्त्व आहे . यातील मूळ शब्द पंचकोषी असा असला तरी देखील याच परिक्रमेला अनेक नावाने ओळखले जाते .आपल्या मानवी शरीराचे पाच अर्थात पंच कोष मानले जातात . या सर्वांची शुद्धी या परिक्रमेने होते अशी समजूत आहे . तसेच ही परिक्रमा मर्यादित अंतराचे अर्थात एखाद्या आश्रमापासून साधारण पाच कोस अंतर भरेल इतकीच असते त्यामुळे तिला पंचकोसी असे पण म्हणतात . उदाहरणार्थ अमरकंटक परिसराची पंचकोशी परिक्रमा खालील प्रमाणे असते . या परिक्रमेचा प्रारंभ नीलकंठ आश्रम मिरिया इथेच होतो आणि तिथून पुढे पोरकी /पोडकी , ज्वालेश्वर धाम , माई मढवा ,आमाडोब , जगतपूर , पकरी सोढा , दमगढ राम कुटी ,गणेश धुना , रुद्र गंगा ,पंचधारा आणि पुन्हा नीलकंठ आश्रम अशी यात्रा पूर्ण होते .ही यात्रा बऱ्यापैकी नर्मदेपासून दूर अंतरानेच होते आणि संपूर्ण घनघोर जंगलातून आहे . बहुतांश करून स्थानिक लोकच ही परिक्रमा करतात . दिंडोरी मधील गाडासई येथील अजय कुमार साहू नावाचे एक नर्मदा भक्त या परिक्रमेचे आयोजन करत असतात . सोबत या परिक्रमेची माहिती देखील जोडत आहे . मी नीलकंठ आश्रमात होतो तिथपासून दोनच दिवसांनी ही यात्रा सुरू होणार होती . 

आल्या आल्या मला भेटलेला तरुण साधू (गौतम गिरी) जेवून जा म्हणून आग्रह करू लागला . परंतु मी त्याला सांगितले की संक्रांतीच्या दिवशी अमरकंटकला पोहोचण्याची माझी इच्छा आहे तरी कृपया मला अडवू नये . मग मात्र त्याने मला शॉर्टकट मार्गानेच जाण्याचा सल्ला दिला .तत्पूर्वी त्याने माझ्या वहीमध्ये आश्रमाचा शिक्का मारून दिला आणि स्वतःची स्वाक्षरी देखील खाली केली . या नीलकंठ आश्रमाला अमरकंटक क्षेत्राचे प्रवेशद्वार मानले जाते . इथे जुहीला नदीचा संगम आहे आणि या तीर्थाला कुशावर्त तीर्थ किंवा ब्रह्मकुंड असे म्हणतात .
नीलकंठ आश्रमाचा शिक्का

त्याने सुचवलेला काठावरचा हा मार्ग पूर्णपणे नर्मदा मातेच्या काठाने जंगलातून जाणारा होता . तो धावतच पुढे पळाला आणि मला मार्ग दाखवायला सुरुवात केली . जंगलातील झाडांमध्ये ठराविक अंतराने काही चिंध्या व लाल रंगाच्या फिती बांधल्या होत्या . त्याने मला सांगितले की या फिती बघत बघत मला चालायचे आहे . मी त्याला म्हणालो तसेही मळलेली पायवाट लक्षात येतेच . परंतु त्याने पुन्हा एकदा त्याच्या विवक्षित शैलीमध्ये मला सांगितले ,"ना बाबाजी ना ! " मळलेल्या पायवाटा शोधायला जाल तर फसाल . कारण या मार्गाने खूप कमी परिक्रमावासी जातात .पालापाचोळा पडल्यामुळे पायवाटा अशा उरलेल्याच नाहीत . संपूर्ण जंगलातलाच मार्ग आहे फक्त चिंध्या बघत जाणे . चिंध्या चुकलात की तुम्ही संपलात ! मला वाटले त्यात काय एवढे सोपे तर आहे ! आणि साधूला नर्मदे हर करून मी पुढे मार्गक्रमणा सुरू केली !
मला खरोखरच माहिती नव्हते की इथून पुढे नर्मदा मैया माझी किती कठोर परीक्षा घेणार आहे ! थोडेसे अंतर जाईपर्यंत मला चिंध्या दिसत होत्या . एका ठिकाणी अचानक चिंध्या दिसायच्या बंद झाल्या . मला काही पायवाटा दिसल्या त्या पाहून मी पुढे गेलो परंतु चिंध्या दिसत नाहीत असे पाहून परत उलटा फिरलो . परंतु माघारी फिरल्यावर असे लक्षात आले की झेंडे, चिंध्या सर्व काही गायब झालेले आहे . इतक्यात चहू बाजूने अंधार दाटू लागला . खरे तर ही भर दुपारची वेळ होती . परंतु संध्याकाळी सहा-सातला पडतो तसा अंधार सर्वत्र पडू लागला . अतिशय कानठळ्या बसवणाऱ्या मोठ्या आवाजात घनगर्जना होऊ लागली ! आणि मला काही कळायच्या आत सगळे  जंगल धुक्याने भरून गेले ! मी माझ्या आजूबाजूला पाहू लागलो तर मला पाच-सहा फुटाच्या पुढचे दिसायचे बंद झाले ! सोसाट्याचा वारा सुटला सर्व झाडे जोरजोरात हलू लागली . जंगलातील धूळ माती आणि पालापाचोळा सर्वत्र उडू लागला ! एक वीज तर इतक्या मोठ्या आवाजात कडकडली की मला वाटले की बहुतेक आपल्या डोक्यावर पडणार ! आणि न भूतो न भविष्यती असा मुसळधार पाऊस सुरू झाला ! मला कुठे जावे काय करावे काहीच कळेना ! चिंध्या दिसायच्या तर पूर्णपणे बंद झाल्या होत्या . आणि आता तर पाऊस इतका मोठा होता की मला चिंध्या झाडे पाने सगळे एकसारखेच दिसू लागले . माझ्या लक्षात आले की माझी वाट लागली आहे ! अगदी थोड्याच वेळात माझे संपूर्ण दप्तर ओले चिंब भिजले ! अंगावरचे कपडे डोक्यावरचे पागोटे आणि पाठीवरची झोळी पूर्णपणे भिजली ! मी अक्षरशः वाट फुटेल तिकडे धाऊ लागलो ! मला काही केल्या रस्ता सापडेना ! मुखाने जोर जोरात नर्मदा मातेचा धावा सुरू केला ! 
(संग्रहित चित्र )
पाऊस असा कोसळत होता की जणू काही त्याचे या सर्व झाडाझुडपांशी काहीतरी वैर असावे . त्यांच्यासोबत विनाकारण मी देखील जोरदार थेंबांचा मार खात होतो . हाताला तोंडाला पाण्याचे थंडगार थेंब खूप जोरात लागत होते . मी पूर्णतः दिशाभान हरपलो होतो. माझे सर्व प्रयत्न आता संपले होते . आणि माझ्या सर्व आशा मावळल्या होत्या . मला शंभर टक्के खात्री झाली होती की आता फक्त आणि फक्त नर्मदा मैय्याच आपल्याला या परिस्थितीतून बाहेर काढू शकते ! त्यामुळे मी नर्मदा मातेचा धावा करत जोरजोरात रस्ता सापडेल तिकडे धावू लागलो . हे जंगल किती मोठे आणि किती भयानक आहे याची मला त्यावेळी कल्पना नव्हती . परिक्रमा संपल्यावर जेव्हा मी गुगल नकाशावर ते जंगल पाहिले तेव्हा मला कळले की मला नर्मदा मातेने किती मोठ्या आणि कठीण प्रसंगातून मला तारले होते . वाचकांच्या माहितीकरता त्या जंगलाचा गुगल फोटो सोबत जोडत आहे . कल्पना करून पहा जर माझी वाट चुकली असती तर मी कुठे जाऊन पोहोचलो असतो !निळकंठ आश्रम ते दूध धारा याच्या दरम्यान लागणारे अरण्य आणि त्यातून वाहणारी छोटीशी नर्मदा माई

मी या वनाचा अगदी थोडासा भाग इथे दाखविला आहे . इच्छुकांनी गुगलवर जाऊन अचानकमार फॉरेस्ट किती मोठे आहे ते पाहावे . माझ्यावर अचानक हल्ला केलेल्या या पावसामुळे मला अचानक मार हे या वनाचे नाव किती सार्थक आहे ते लक्षात आले . मी मनोमन अशी प्रार्थना केली होती की आता जर तुला मला वाचवायचे असेल तर एखादी मनुष्यवस्ती किंवा आश्रम वगैरे भेटव नाहीतर मला असेच या जंगलामध्ये मारून टाक . इतक्या टोकाचा विचार करत मी धावत होतो . जंगलामध्ये सर्वत्र चिखल झाल्यामुळे मी खूप वेळा आपटलो , पडलो , धडपडलो . माझे सर्व कपडे चिखलाने माखले होते . दोन्ही गुडघे हात पाय सर्व चिखलाने बरबटले होते . या पद्धतीने मी सुमारे पाचच मिनिटे धावलो असेन . अचानक मला पावसाचा जोरदार मारा लागू लागला . आणि मग माझ्या लक्षात आले की इतका वेळ मला लागणारा पाऊस काहीच नव्हता कारण तो संपूर्ण पाऊस सर्वप्रथम उंचच उंच झाडे झेलत होती . आता मात्र मी एका मोकळ्या मैदानात आलो होतो . ते मैदान नसून एक छोटेसे खळे होते . शेतकरी आपल्या धान्याची मळणी करण्यासाठी शेतातील एक भाग सपाट करून त्याला कुंपण घालतात त्याला खळे असे म्हणतात . खळे दिसले तसे माझ्या लक्षात आले की आता इथून मनुष्यवस्ती जवळ आहे ! मला खूप आनंद झाला ! मी अतिशय मनापासून नर्मदा मातेचा जयजयकार केला ! एका क्षणापूर्वी आता आपण जगणार की मरणार ही माझ्या मनामध्ये असलेली सार्थ भीती आता आशेच्या नव्या अंकुरांमध्ये रूपांतरित झाली होती ! समोर मला एक शेळ्यांचा गोठा दिसला . मी धावतच जाऊन हाका मारायला सुरुवात केली . परंतु तिथे कोणीच नव्हते . मी तसाच पुढे पळत सुटलो . आणि काही अंतर गेल्यावर एका घराचे दार मला दिसू लागले . मी पळतच दारापाशी गेलो . इतक्यात दारातून एक म्हातारा मनुष्य बाहेर आला ! त्याने मला नर्मदे हर केले आणि पटकन आत येण्याची सूचना केली .मी धावतच त्याच्या घरामध्ये शिरलो . 

 हेच ते जंगला जवळचे पहिले घर ज्याने मला भर पावसात आश्रय दिला

ज्या दारातून त्याने मला आत बोलाविले ते त्याच्या छोट्याशा वाड्याचे मुख्य प्रवेशद्वार होते . आत एक छोटासा चौक होता . चौकाच्या दोन्ही बाजूला दोन दोन दरवाजे आणि काही खोल्या होत्या . सर्व बांधकाम दगड मातीचे शेणाने सरवलेले आणि लाकडाने बांधून पक्क्या कौलांनी शाकारलेले होते . त्याने मला डावीकडच्या एका खोलीमध्ये आत नेले . हा त्याच्या शेळ्या बांधण्याचा गोठा होता . आत मध्ये शेळ्या नव्हत्या परंतु शेळ्यांच्या लेंड्या सर्वत्र पसरल्या होत्या . तिथे शेजारीच एका खाटेवर बाबा झोपत असे . समोर त्याने एक सुंदर शेकोटी पेटवली होती . मी थंडीने अक्षरशः गारठून गेलो होतो . लहान मुले पाण्यातून बाहेर आल्यावर जशी थडथड उडतात अगदी तशीच माझी अवस्था झाली होती .त्यामुळे त्या क्षणी मला तो गोठा स्वर्गासारखा भासला !म्हातारा मुका होता . त्याचे नाव राजाराम होते . नंतर आलेल्या त्याच्या नातीने मला त्याचे नाव सांगितले . म्हातारा त्याच खोलीमध्ये राहत असे . त्याने मला कपडे बदलायला सांगितले . शेकोटीच्या वर उष्णता लागून ते वाळतील अशा पद्धतीने त्याने ते वाळत घातले . अंगावर घातलेल्या छाटीचाच एक भाग फाडून मी त्याची नाडी आणि लंगोटी बनवत असे , त्यामुळे ती वाळायला फार सोपी ठरत असे. खोली शेणाने सारवलेली असल्यामुळे अतिशय गरम होती . समोर असलेली शेकोटी अतिशय मंद होती . त्याने माझ्याकरता ती थोडीशी अधिक प्रज्वलित केली . या माणसाने मला कमीत कमी लाकडा मध्ये मोठ्यात मोठी शेकोटी कशी पेटवावी हे त्या रात्री शिकवले . तो मुका असला तरी खुणा करून जे काही बोलायचा ते सर्व मला समजत होते .पुढील बराच काळ त्याच्या मौनाची भाषांतरे करत आम्ही गप्पा मारत राहिलो .होय ,पावसाचा जोर इतका वाढत गेला की मला त्या रात्री तिथेच मुक्काम करावा लागला . आणि अशा पद्धतीने संक्रांतीच्या दिवशी अमरकंटकला पोहोचण्याच्या माझ्या डावावर नर्मदा मातेने धुवाधार पाऊस पडला ! पावसाचा जोर शेवटपर्यंत ओसरला नाही . आताशी संध्याकाळ होत होती परंतु बाहेर रात्री सारखा अंधार पडला होता . राजाराम ची नात अतिशय चुणचुणीत होती . तिने मध्ये येऊन मला तिची पुस्तके वगैरे वाचून दाखवली . ती चौथी पाचवी मध्ये शिकत होती . गावात शाळा नव्हती . तिथून खूप मोठे अंतर जंगलातून चालत गेल्यावर शाळेला पोहोचता येई .राजारामने केवळ खाणाखुणा करून मला सांगितले की मी किती नशीबवान आहे आणि पुढे गेलो असतो तर माझी काय अवस्था झाली असती ! विशेषतः जंगलात वाघ आहेत आणि ते हल्ला कसा करतात हे त्यांनी त्याच्या मूक भाषेतच मला सांगितले आणि मला कळले सुद्धा . रात्री त्यांनी मला गरम गरम भात आणि हरभऱ्याच्या पातीची आंबटसर भाजी खायला दिली . भुकेने कासावीस झालेल्या जीवाला ते भोजन अक्षरशः पंचपक्वान्नांच्या तोडीचे भासले ! एकदा नर्मदा परिक्रमा पूर्णपणे पायी चालून आलेला मनुष्य कधीच त्याच्या ताटामध्ये एक कण सुद्धा अन्न वाया घालवू शकत नाही असे माझे स्पष्ट मत आहे !कारण या संपूर्ण परिक्रमेदरम्यान तुम्हाला अन्नाचे महत्त्व नर्मदामाता इतक्या सुंदर पद्धतीने समजावून सांगते की तुम्ही ते आयुष्यभर विसरू शकत नाही ! वाफाळलेला तो गरमागरम भात खाल्ल्यानंतर आपोआपच डोळ्यांवर सुस्ती येऊ लागली . नर्मदा मातेची आरती व उपासना मी संध्याकाळी करून घेतलीच होती . आता मी पाठ टेकणार इतक्यात अचानक आत मध्ये २५ -३० शेळ्या शिरल्या ! इतक्या शेळ्या अचानक आलेल्या पाहून मला मौज वाटली ! सर्व शेळ्या पूर्णपणे भिजल्या होत्या आणि थंडीने गारठल्या होत्या . आत आल्या आल्या सर्वांच्या लक्षात आले की इथे कुठलातरी नवीन प्राणी बसलेला आहे ! त्यामुळे त्या सर्वच शेळ्या त्यांची पारडे ,बोकड माझ्याकडे मजेशीर नजरेने पाहू लागली ! त्यांच्या त्या नजरा पाहून मला खूप हसू आले ! शेळी हा प्राणी किती वेगवेगळे आवाज करतो हे मला त्या रात्री कळले . सर्व शेळ्या आत मध्ये आल्यावर अंग झटकण्याचा , चारा खाण्याचा , रवंथ करण्याचा , शेपूट हलवण्याचा , कान हलवण्याचा , अंग खाजवण्याचा , लघवी करण्याचा आणि टपाटप लेंड्या टाकण्याचा असे विविध आवाज येऊ लागले ! याखेरीज पारडे आपल्या आईला हाक मारतात तो आवाज आणि त्याला प्रत्युतर देणाऱ्या आया तसेच बोकड विविध कारणासाठी करतात ते विविध आवाज ऐकून मला फारच मजा वाटत होती ! सर्व शेळ्या शेक घेण्याचा प्रयत्न करत होत्या . बाबाने वरती कुठेतरी कोंबड्यांना अंडी घालण्यासाठी जागा करून दिली होती . रात्री अचानक त्यातील कोंबड्या देखील इकडे तिकडे उडू लागल्या . एकंदरीत राजाराम बाबाच्या मुकेपणामुळे त्या खोलीमध्ये असलेली एक भेसूर शांतता या सर्व जीवांनी आपल्या अस्तित्वाने संपवून टाकली ! रात्री मला खूप छान झोप लागली . दोन-तीन वेळा काही शेळ्यांनी अंगावरच लेंड्या टाकल्यामुळे मला जाग आली . त्या लेंड्या अतिशय गरम गरम होत्या ! मला या सर्व प्रकारामुळे खूपच हसू येत होते स्वतःचे ! अमरकंटकला पोहोचण्याचे स्वप्न पाहणारा मी त्या शेळ्यांच्या मध्ये अशा पद्धतीने झोपलो होतो की जणू काही त्यांच्यातीलच एक प्राणी असावा ! शेकोटीचा सिंहाचा वाटा मात्र मी स्वतःला घेत होतो . त्या घनघोर पावसाळी रात्री आम्हाला केवळ त्या शेकोटीचाच आधार होता . पहाटे निघण्यापूर्वी राजारामच्या सुनेने मला गरमागरम कोरा चहा आणून दिला . इथून पुढे फर्रीसेमल नावाचे एक गाव पार करून मला दमगढ गावाच्या हद्दीतील रामकुटी आश्रम गाठायचा होता . पाऊस अजूनही पूर्णपणे थांबला आहे असे म्हणता येत नव्हते . अधून मधून काही टपोरे थेंब पडतच होते . मुख्य म्हणजे रात्रभर झालेल्या पावसामुळे झाडांवर साठलेल्या पाण्याचा क्षणिक पाऊस सर्वत्र पडत होता . गावातून जाणारा रस्ता कच्चा मातीचा होता . त्याचे रूपांतर आता चांगल्या घोटाभर ते गुडघाभर चिखलामध्ये झाले होते . एखादा ट्रॅक्टर देखील ज्यातून जाणे अवघड आहे असा चिखल सर्वत्र माजला होता .एकतर सर्वत्र घनदाट जंगल , त्यात त्या मार्गावर अजिबात वर्दळ नाही , काळीभोर सुपीक माती आणि झाडांचा पालापाचोळा वगैरे कुजून ती अधिकच सुपीक बनलेली ,त्यात अनेक नद्यांचा उगम स्थान असलेला हा मैकल पर्वत प्रदेश असल्यामुळे जमीन मुळातच पाण्याने अतिशय संपृक्त अशी होती .  त्यामुळे इथे क्षणात चिखल होत असावा. पाय रुतत होते ,सटकत होते , घसरत होते ! मज्जाच मज्जा ! माझ्या डाव्या हाताने वाहत येत उजवीकडे नर्मदे कडे झेपावणाऱ्या ओढ्या नाल्यांना पावसामुळे बऱ्यापैकी पूर आले होते . त्याचे पाणी देखील बर्फासारखे गार होते .नाही म्हणायला सुंदर अशा जंगलाची मात्र अप्रतिम साथ होती . हे जंगल इतके सुंदर होते की मी त्याचे वर्णनच करू शकत नाही . मुळात हा सर्व डोंगराळ प्रदेश . त्यात रात्रभर पडलेल्या पावसामुळे सर्वत्र ढगाळ आणि धुकेयुक्त वातावरण होते . आपण जणू काही एखाद्या स्वर्गातून चालले आहोत असा भास व्हावा इतके सुंदर वातावरण चहू बाजूला पसरले होते . असे वाटे की आयुष्यभर इथेच राहावे ! आजूबाजूला कोणीच नाही ! कुठली माणसे नाहीत ,त्यांची स्वप्ने नाहीत ,त्यांचे अजेंडे नाहीत , त्यांचे झेंडे नाहीत, शुद्ध स्वरूपात भरून उरलेला निसर्ग एके निसर्ग ! पावसामुळे गारठले होते की काय माहिती नाही परंतु पशु पक्षांचे आवाज देखील कमीच होते . त्या निरव शांततेमध्ये त्यामुळे एखाद्या पक्षाचा आवाज आला तर तो खूप मोठा वाटे . शांतता इतकी अप्रतिम होती की फक्त माझ्या पावलांचा चिखलामुळे येणारा आवाज तितकाच कानावर पडत होता . अशा विशुद्ध शांततेमध्ये जर आपण शांतपणे उभे राहिले तर अगदी आपल्या हृदयाची धडधड देखील आपल्याला ऐकू येते . मी अध्ये मध्ये थांबून असा स्वतःचाच आवाज देखील ऐकत होतो .या जंगलातून मी दहा किलोमीटर चाललो परंतु तरीदेखील मला एकही मनुष्य भेटला नाही त्यामुळे मला अतिशय आनंद झाला होता ! एकदा आपल्याला स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव झाली आणि त्या स्व सोबत राहण्याची सवय झाली की दुसरे काहीही नसले तरी चालते ! आयुष्यभर आपण प्रत्येक गोष्ट इतरांसाठीच करत असतो . नर्मदा परिक्रमा धकाधकीच्या आयुष्यात पहिल्यांदाच तुम्हाला स्वतःसाठी जगण्याची अधिकृत संधी देते , ती तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये दवडली नाही पाहिजे ! रात्री त्या चिखलातून बरेच प्राणी गेले असावेत . मला काही लांडग्यांची पावले उठत गेलेली दिसली . त्याच सोबत एका रानमांजराची पावले सुद्धा उठली होती . 
रान मांजराची पावले (संग्रहित चित्र )
रान मांजराची अशासाठी म्हणायचे कारण ती बिबट्याची म्हणावीत तर थोडी छोटी वाटत होती परंतु मांजराची म्हणावीत तर बरीच मोठी होती . मला असे लक्षात आले की लांडग्यांना पायाखाली किती चिखल आहे याचा अंदाज येत नाही ,परंतु रानमांजर मात्र बरोबर कमीत कमी चिखल असलेल्या भागातून चालत होते . जस जसा मी त्या रान मांजराच्या पावलांचा मागोवा घेत चालायला सुरुवात केली तसतसे माझे चालणे एकदमच सोपे आणि सुकर होऊन गेले . त्यानंतर एकदाही माझा पाय चिखलामध्ये फसला नाही . त्या मांजराला बरोबर अंदाज होता कुठून कसे चालायचे .त्यामुळे माझा चिखलाचा त्रास कायमचा संपला . विशेष म्हणजे ते मांजर किमान पाच किलोमीटर सरळ रेषेत त्याच रस्त्याने चालले होते . त्यामुळे मी पुढच्या गावात येऊन कधी पोहोचलो माझे मलाच कळले नाही .गाव कसले छोटीशी वस्तीच ती . 
 फर्री सेमल व दमगढच्या मध्ये छोटी वस्ती

पण अतिशय सुंदर ,नीटनेटकी ,आखीव रेखीव , स्वच्छ , निर्मळ ! वनक्षेत्रातली गावे जितकी सुंदर आहेत तितकी सुंदर शहरालगची गावे अजिबात नसतात . फेरीसेमल गाव आणि दमगड गाव ओलांडून रामघाट येथील रामकुटी गाठून तिथे सदाव्रत घ्यायचे आणि मैयाच्या तटाने पुढे जात अमरकंटकला पोहोचायचे असे माझे असे नियोजन होते परंतु मैयाच्या मनामध्ये काहीतरी वेगळेच नियोजन होते . 

लेखांक तेवीस समाप्त (क्रमश:)

टिप्पण्या

  1. एकदा आपल्याला स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव झाली आणि त्या स्व सोबत राहण्याची सवय झाली की दुसरे काहीही नसले तरी चालते!

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

जे आवडते सर्वांना ...

अनुक्रमणिका

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

लेखांक १ : नर्मदे हर !

लेखांक २ : भोपाळ जवळच्या जंगलातील अपघात

लेखांक ३ : चोराची धन

लेखांक ४ : झुठा कही का ! सबकुछ तो लाए हो !

लेखांक ५ : ग्वारीघाट जबलपुर मध्यप्रदेश

लेखांक ८३ : महाराष्ट्रात प्रवेश आणि भाबरीचे भेदक भिल्ल-महात्मा फोदला गारद्या पावरा

लेखांक ७४ : लेपा बांध , वेदा संगम , कठोरा अन् मांडव्य गुंफा

लेखांक ९० : गुजरात मधील कणजी चे सान्सुभाई तडवी आणि अरण्यव्याप्त माथासर