लेखांक १४ : सकरी गावचा लम्मू लाल विश्वकर्मा
डॉक्टर प्रल्हाद पटेल यांनी सांगितलेला पाच ते दहा किलोमीटर चालण्याचा नियम माझ्याकडून पाळला जात नाही याची थोडीशी खंत मनात होती .परंतु पायांना त्रास देखील होत नव्हता .तसेही महाराष्ट्रातील परिक्रमावासी इतर राज्यातील लोकांपेक्षा जास्त अंतर चालतात असा इथल्या स्थानिक लोकांचा अनुभव आहे .महाराष्ट्रामध्ये असलेल्या दऱ्याखोऱ्या हे त्याचे कारण असावे .या दऱ्याखोऱ्या किल्ल्यांवर भटकणाऱ्या पायांना लांब अंतर तोडण्याची सवय असते .सक्री / सकरी गावापर्यंत मी न थांबता चालत राहिलो .इथे उजव्या हाताला एक विहीर आणि खूप मोठा वृक्ष होता . तिथे छोटीशी झोपडी होती .
हे झोपडीवजा घर म्हणजेच लम्मूलाल विश्वकर्मा यांनी स्वतःच्या कष्टातून उभे केलेले परिक्रमावासींचे सेवा क्षेत्र आहे .
अतिशय सुंदर छोटेखानी असा हा आश्रम आहे . संपूर्ण मातीने आणि शेणाने सरविलेला आश्रम अतिशय आरामदायक आणि सुखद असा आहे .दुपारी थंडगार वाटणारा हा परिसर रात्री तितकाच उबदार होऊन जातो ! छोटे दगडी जाते आपले लक्ष वेधून घेते .
मला बराच काळ नर्मदा मातेचे दर्शन झालेले नव्हते . त्याची खंत मनामध्ये होती .आता देखील जोगी टिकरिया या गावांमध्ये नर्मदा मातेचे दर्शन होणार होते व ते इथून सुमारे शंभर किलोमीटर होते . नर्मदा मातेचे उगमस्थान अमरकंटक या आश्रमापासून मात्र दोनशे किलोमीटर राहिले होते . हा संपूर्ण वन परिसर होता व इथे बहुतांश आदिवासी / वनवासी समाजातील लोक राहत होते .
त्यातल्या त्यात आनंदाची बाब अशी की लम्मू विश्वकर्मा यांनी मला झोपण्यासाठी जी खोली दिली तिथे त्यांनी नर्मदा मातेची एक मूर्ती स्थापन केली होती .आत गेल्या गेल्या शेणाने सरवलेल्या सुंदर व थंडगार ओसरीमध्ये मी आधी बुड टेकले .माझे वजन तसे खूप जास्ती होते आणि मी क्षमतेपेक्षा थोडा जास्तीच चाललो होतो . त्यामुळे बसल्या क्षणी लक्षात आले की आपण दमलो आहोत ! तिथेच लुडकावे अशी इच्छा होऊ लागली !इतक्यात एक परिक्रमावासी आला आणि त्याने माझा फोटो काढला .मित्राच्या क्रमांकावर पाठवून द्यायला त्याला सांगितला .
सकरी आश्रमामध्ये बसलेलो असताना एका परिक्रमावासिनी काढलेले प्रकाशचित्र
परंतु इतक्यात तिथे बरेच परिक्रमावासी गोळा झाले .किमान दहा-बारा !आणि विश्वकर्मा माझ्याकडे आला आणि म्हणाला बाबाजी चलो खाना बनाते है !आता आली का पंचाईत !मला तसा घरी स्वयंपाक करता येतो . परंतु इथे खेडेगावामध्ये चुलीवर किंवा विस्तवावर स्वयंपाक करण्याची सवय मला नव्हती !त्यात भरीत भर म्हणून माझ्या असे लक्षात आले की याच्याकडे चूल सुद्धा नव्हती ! तर बाहेर साधूंसाठी त्याने एक वेगळी कुटी निर्माण केली होती . व त्या कुटीमध्ये अखंड धुनी चालू असायची . त्या धुनीवर त्याने एक लोखंडाची छोटी सदा सहा इंची तीवई ठेवली होती व त्याच्यावरती सर्व स्वयंपाक , चहा वगैरे तो करत असे . एक वयोवृद्ध साधू तेथे आधीच बसला होता .तो सतत गांजा पीत होता .तेव्हा मला त्याचे अप्रूप वाटले . परंतु नंतर माझ्या असे लक्षात आले की गांजा पिणे ही गोष्ट नर्मदा खंडामध्ये अतिशय सर्वसामान्य आहे . तो मला म्हणाला , चेला आटा लगाओ । मी मला येते तशी कणिक मिळायला सुरुवात केली परंतु ते पाहून त्याला थोडासा राग आला .आणि लाव इधर । असे म्हणत त्याने माझ्या हातातून परात काढून घेतली आणि दणादण कणिक मळली !
जणूकाही एखादा शत्रू हातात सापडला आहे अशा पद्धतीने तो त्या कणकीला मळत होता आणि बुक्क्या टाकत होता ! त्यानंतर त्याने मला विचारले टिक्कड बनाना आता है ? मी विचारले , यह टिक्कड क्य होता है ? आपल्या महाराष्ट्रामध्ये जसे हातावर थापून ज्वारीच्या भाकरी केल्या जातात , तशाच पद्धतीने किंवा त्याहून थोडीशी जाड कणिक हातावर थापून ,त्याची पोळी करून ,ती विस्तवामध्ये भाजली जाते .ज्याला इकडे टिक्कड असे म्हणतात . याहून थोडी जाड कड ठेवली तर त्याला रोट असे म्हणतात .माझा हा प्रश्न ऐकून साधू अजूनच भडकला .विश्वकर्मा मला म्हणाला तुम्ही विश्रांती घ्या . जा !परंतु मला काही ते बरोबर वाटेना त्यामुळे मी त्यांना भाजी चिरायला वगैरे मदत चालू केली .त्याच्या घरामध्ये गरिबी होती हे स्पष्टपणे दिसत होते .
कारण त्याने एक बटाटा , एक कांदा ,एक टोमॅटो, एक वांगे , एक गाजर , एक कच्चे केळे अशा गोष्टी गोळा करून त्याची भाजी बनवायला घेतली होती . एवढी भाजी सर्वांना कशी पुरणार असा मला प्रश्न पडला होता .बहुतेक त्याचसाठी तो सर्वांना स्वयंपाक करण्यासाठी बोलवत होता असे मला वाटले .अंधार पडू लागला आणि जेवण तयार झाले .प्रत्येकाला एक टिक्कड आणि थोडीशी भाजी , भरपूर पाणी घातलेली ,अशी त्याने वाढली .मी स्वतः स्वयंपाक करताना उपस्थित असल्यामुळे मला माहिती होते की भोजन मर्यादित आहे . त्यामुळे मी थोडेच खाल्ले .बाकीचे लोक मात्र यह लाव । वह लाव । करीत होते . विश्वकर्मा हिरमुसल्या तोंडाने आतून रिकामे पातेले घेऊन आला आणि सर्वांसमक्ष भाजी संपल्याचे त्याने जाहीर केले . एक दोन खवट म्हातारे काहीतरी बडबड करत रागाने ताटावरून उठले . मला मात्र खूप वाईट वाटले .एक तर काहीही गरज नसताना हा मनुष्य येणाऱ्या जाणाऱ्या परिक्रमावस्यांची सेवा करत होता .आणि त्यात त्याच्यावरती असा रुबाब करणारे परिक्रमावासी !किती वाईट वाटत असेल त्याला ! रात्रीच्या अंधारामध्ये बाहेर जाऊन विहिरीतून पाणी शेंदून मी ताट धुतले . आपले ताट आणि भांडे आपणच सोबत ठेवायचे असते . विम बार वगैरे तिथे काही नसते तर माती किंवा राखुंडीने अतिशय सुंदर भांडी स्वच्छ निघतात ! आपण आपल्या पारंपारिक गोष्टी भांडवलशाहीच्या नादात पूर्णपणे विसरून गेलेलो आहोत . रात्री मी माझे आसन नर्मदा मातेची जी खोली होती तिथे लावले .विश्वकर्मा रात्री आला व आम्ही दोघांनी मातेची आरती केली .रात्री त्याचे गुरुदेव येणार आहेत असे मला त्याच्या बोलण्यातून लक्षात आले .सुमारे बाराच्या सुमाराला एक मोठ्या जटा असलेला नागा साधू तिथे उपस्थित झाला .त्याच्या अंगावर एकही वस्त्र नव्हते .आल्या आल्या तो धुनीपुढे शेकत बसला . हा साधू देखील अखंड गांजा ओढत होता .त्याची चिलीम रिकामी झाली की लम्मू विश्वकर्मा अतिशय आदबीने पुढची चिलीम त्याला भरून देत होता . मी ज्या खोलीमध्ये झोपलो होतो त्याच्या शेजारीच हा प्रकार चालला होता त्यामुळे त्यांचा सर्व संवाद मला ऐकू येत होता . आणि खोपटाच्या फटीतून सर्व दिसत देखील होते .एवढ्या कडाक्याच्या थंडीमध्ये अंगावर एकही वस्त्र न घालता हा साधू कुठून आला माहिती नाही ! रात्रभर त्याचा व चेल्यांचा गांजा प्राशन कार्यक्रम चालू होता .त्यांच्या धुरामुळे संपूर्ण परिसर कोंदट झाला होता . मी डोक्यावरून शाल पांघरून घेऊन झोपून टाकले . माझ्याकडे दोनच शाली होत्या .एक वाल्हेकरांनी दिलेली आणि एक अश्विनी पटेल ने जबलपूरला दिलेली .
हा दिवस होता पौष शुद्ध चतुर्थी शके १९४३ गुरुवार ६ जानेवारी २२ .
नेहमीप्रमाणे भल्या पहाटे जाग आली . आणि पुढे जंगलातील एका रस्त्याच्या कडेला डोलडाल आटोपून मी विहिरीकडे आलो . या विहिरीला या भागात बावडी असे म्हणतात .बावडीतील पाणी अतिशय स्वच्छ परंतु चांगलेच थंडगार होते . त्याने भडाभडा आंघोळ केली . अंधारातच कपडे धुवून नर्मदा मातेची पूजा व आरती करून घेतली . परिक्रमेच्या नियमानुसार सूर्योदय झाल्याशिवाय स्थान सोडायचे नसते .याला अनेक कारणे आहेत .परंतु महत्त्वाचे कारण असे आहे की सूर्योदयाच्या आधीची वेळ ही वन्य श्वापदांची फिरण्याची वेळ असते .रात्रभर शिकार शोधणारे निशाचर प्राणी यावेळी आपापल्या घरी परतत असतात .ते तुम्हाला सामोरे जाऊ नयेत म्हणून सूर्योदय होण्याची वाट पाहावी . सूर्योदय होता क्षणीच मी निघालो . विश्वकर्म्याने त्याच्या मुलाचा अर्थात कैलास विश्वकर्मा याचा क्रमांक मला दिला .आणि याला जरा चांगले काहीतरी शिकवा असे म्हणाला . निघताना वहीमध्ये शिक्का मारून घेतला .
माझ्याकडे पन्नास रुपयाची एक नोट होती . ती मी त्याला दिली . हा घेत नव्हता परंतु मी बळे खिशात कोंबली आणि पुढे निघालो .एका गरीब वनवासी मनुष्याला नर्मदा माता प्रेरणा देते आहे आणि इतक्या दूर सेवा कार्य घडवते आहे हा एक मोठा चमत्कारच आहे .इथल्या सर्व सेवाधारी लोकांचे एकच म्हणणे होते की जसजसे आम्ही नर्मदा मातेची सेवा करू लागलो तसतसे आमच्या घरातील दुर्भिक्ष्य , दारिद्र्य निघून गेले ! असो पुढे बऱ्यापैकी घाट रस्ता लागला .
या घाटामध्ये चालताना अचानक एक कार माझ्यासमोर येऊन थांबली . गाडीचा क्रमांक पाहून मी खुश झालो कारण गाडी नाशिक मधील होती . हे येवला नाशिक येथील उंदीरवाडे नावाचे परिक्रमावासी होते . म्हणजे पूर्वी यांची पायी परिक्रमा झाली होती व आता ते अधून मधून गाडी घेऊन येतात व दुर्गम आदिवासी भागातील सेवा कार्य करणाऱ्या लोकांना धान्य , पैसा इत्यादी भरून देतात .मला त्यांनी पारले जी चा पुडा दिला आणि पाच रुपये दक्षिणा दिली .त्यावेळी मला खरोखरीच माहिती नव्हते की इथून पुढच्या येणाऱ्या काळामध्ये पारले-जी हा एक फार मोठा आधारस्तंभ असणार आहे माझ्यासाठी !
चार किलोमीटर घाट चढल्यावर घाटामध्येच डाव्या हाताला एक लक्ष्मी मंदिर लागले.
स्थानिक भाषेमध्ये हिला बंजारी माता म्हणतात . बंजारी , बंजारा किंवा बंजार या शब्दाची उत्पत्ती खालील प्रमाणे आहे .
आपल्या भारतीय भाषांमध्ये संस्कृत मधील वन या शब्दासाठी बन असा प्रतिशब्द वापरला जातो . वनचर याचा अपभ्रंश बन चर , बन जर अथवा बंजारा . आपल्या महाराष्ट्रामध्ये याच शब्दाला वंजारी असे म्हणतात . हे सर्व शब्द एक प्रकारे या समाजाचे वनाशी असलेले नाते व्यक्त करतात . बंजारी माता म्हणजे वनामध्ये राहणारी माता .
इथे छोटेखानीच परंतु आश्रम आणि निवासाची सर्व व्यवस्था होती . शनी , बंजारी माता मंदिर आणि एक खोली होती .एक वयोवृद्ध बाबाजी येथे राहतात .इथे १९८८ पासून अखंड दीप सेवा चालू आहे .
बाबाजींनी कोरा चहा आणून दिला व रात्री इथे आला असता तरी चालले असते म्हणाले . परंतु घाट रस्ता आणि जंगल पाहूनच मी सक्री गावामध्ये थांबलो होतो . कडाक्याच्या थंडीमध्ये रस्त्याच्या कडेला बसून तो चहा पिताना स्वर्गीय सुखाचा अनुभव येत होता ! प्रत्येक उछ्वासातून मस्त वाफा निघत होत्या ! यापूर्वीचे जंगल इतके घनदाट होते की पुढे असे काही खायला प्यायला मिळेल याची शक्यताच वाटत नव्हती ! साधूने वहीमध्ये शिक्का मारून दिला .
जय मा बंजारी सिद्ध पीठ , सकरी घाट , तहसील निवास , ग्राम हरदुली , जिल्हा मंडला , बाबा रामप्रसाद चौहान
९ ६ ४ ४ ७ ४ ६ ८ ० ४
साधू म्हणाला थोडा थांबून जेवण करून जा .परंतु मला असे वाटले की इतक्या सकाळी कशाला थांबायचे ?अजून थोडे चालू या . नर्मदा परिक्रमे मध्ये एक नियम असा आहे की कोणी काही दिले तर घ्यायचे आणि कोणी काही मागितले तर द्यायचे . तिथे आपले डोके लावायचे नसते .इथे मी जेवण नको म्हणण्याची चूक केली होती ! पुढे काय वाढून ठेवले आहे याची मला कल्पनाच नव्हती !
लेखांक चौदा समाप्त (क्रमशः)
पुढच्या भागावर जा
उत्तर द्याहटवा