लेखांक १३ : दत्तप्रभूंची इच्छा
दुपारी मोकळा वेळ मिळाल्यावर मी प्रल्हाद पटेल यांच्या २२ एकर शेताला वळसा मारून , मागे असलेल्या वीटभट्टीच्या शेजारून वाहणाऱ्या एका छोट्याशा परंतु सुंदर अशा रानवे नामक नदीमध्ये कपडे धुऊन घेतले .
तिथल्याच खडकावरती पाच दहा मिनिटात कपडे वाळले सुद्धा . संध्याकाळी प्रल्हाद पटेल आले आणि माझ्या शेजारी येऊन बसले . त्यांच्याविषयी ते सांगू लागले .गेली २१ वर्षे अव्याहतपणे न चुकता , २७ किलोमीटर दूर जाऊन ग्वारी घाटावरील नर्मदा दर्शनाची वारी ते करत होते . ते मला म्हणाले , मला काय वाटले माहिती नाही .परंतु तुम्ही आज इथे मुक्काम करावा अशी दत्तप्रभूंची इच्छा आहे , असा संकेत मला झाला .म्हणून मी तुम्हाला थांबवले . नाही तर शक्यतो मी कोणालाच थांबवत नाही . भारतीय जनता पक्षाच्या कार्याविषयी ते अतिशय तळमळीने बोलत होते . या पक्षाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षांची नुकतीच पुण्यामध्ये काही कामा निमित्त माझी भेट झाली होती व ते त्यांच्या सोबत जावडेकरांच्या मुलाच्या पुस्तक प्रकाशनाच्या एका कार्यक्रमाला देखील मला घेऊन गेले होते .हे सांगितल्यावर तर डॉक्टर प्रल्हाद पटेल माझ्या इथून हलेचनात ! कारण हे राष्ट्रीय उपाध्यक्ष सध्या मध्य प्रदेशचे प्रभारी होते ! आणि पटेल साहेबांना पुन्हा एकदा तिकीटाची आस लागली होती ! मग मात्र मी अतिशय नम्रपणे परंतु स्पष्टपणे त्यांना सांगितले की आध्यात्मिक जीवन आणि राजकीय जीवन याची सरमिसळ करणे कसे धोक्याचे आहे ! आपल्या जीवनात जे काही होते आहे ती परमेश्वरी इच्छा आहे असे मानून जर आपण कार्य करत राहिलो तर आपले वैयक्तिक जीवन देखील सामाजिक होऊन जाते . मी सांगतो आहे ते सर्व त्यांना पटत होते परंतु वळत नव्हते . मी त्यांना स्पष्टपणे सांगितले की तुम्ही आता राजकीय महत्त्वाकांक्षा थोडी कमी करून आध्यात्मिक मार्गाकडेच लक्ष द्यावे . कारण त्यांचा मूळचा पिंड राजकीय नव्हता हे मला स्पष्टपणे कळत होते .त्यांच्यातील सज्जन पणाचा वापर राजकारणी करून घेत असणार हे मी सांगितल्यावर त्यांनी लगेच होकार दिला . आमची अशा पद्धतीने बरीच चर्चा झाली . मला अशी चर्चा करायला फारसे आवडत नाही .परंतु समोरचा मनुष्य जर पोट तिडकीने विचारत असेल आणि आपल्याकडे त्याचे उत्तर असेल तर मात्र ते दिलेच पाहिजे . या शुद्ध भावनेतून मी त्यांच्याशी बोलत होतो . सरते शेवटी ते म्हणाले आता मला कळाले दत्तप्रभूंनी तुम्हाला का थांबवायला सांगितले . कारण त्यांनी दत्तप्रभूंना साकडे घातले होते की या निवडणुकीला मी उभे राहू की नको हे मला तू सांग . मला जी प्रेरणा झाली ती मी त्यांना सांगितली .आता ऐकणे न ऐकणे त्यांच्या हातात . आमची चर्चा थांबते न थांबते तोच होशंगाबाद ( तत्कालीन नाव ) आणि बैतूल या भागातील चार परिक्रमावासी मुक्कामी आले .यामध्ये गुज्जर समाजाचे एक काका पुतणे होते .
ओम प्रकाश पटेल गुज्जर हे काका चे नाव आणि सुरज सिंग पटेल गुज्जर हा पुतण्या होता .माधव सिंग ओम प्रकाश गुजर पटेल हा त्याचा मुलगा त्या भागातील सक्रिय कार्यकर्ता होता .
अजून दोन परिक्रमावासी होते . त्यातील एकाचे नाव रुस्तमसिंग गुज्जर उर्फ जग्गू आणि दुसरा यशवंत सिंग गुज्जर . हा सरपंच होता . तत्कालीन होशंगाबाद जिल्ह्यातील पाटणी , साईखेडा ,बाबै ,मारेगाव ही त्यांची गावे होती .त्यांचे अनुभव ऐकत ऐकत हळूहळू पाठ टेकली . इथली बहुतांश आडनावे जातीवरूनच आहेत . आणि जातीच्या बाहेर शक्यतो कोणीही विवाह करत नसल्यामुळे तुम्हाला चेहरेपट्टी पाहता क्षणी मनुष्य कुठल्या समाजाचा आहे हे बऱ्यापैकी सहज ओळखता येते .
या भागातील खूप स्थानिक लोक परिक्रमा करतात . त्यांच्या पायांना गती देखील चांगली असते .सोबत एखादी गाठोडे किंवा बोचके घेऊन ते डोक्यावर ठेवून ते चालतात . महिलांचा देखील लक्षणीय सहभाग यामध्ये असतो .
मध्य प्रदेश आणि गुजरात मधील ग्रामीण भागातील परिक्रमावासींचा सर्वसाधारण पेहराव
या उलट पुण्या मुंबईकडच्या परिक्रमावासींचा टक्का अलीकडे वाढलेला आहे . ते मात्र अतिशय भारी भारी ट्रेकिंग सॅक्स , शूज , स्लीपींग बॅग्ज वगैरे घेऊन येतात .
दोघांना येणारे अनुभव थोड्याफार फरकाने सारखेच असतात .जितके तप अधिक तितका अनुभव अधिक .जितक्या सुविधा अधिक तितकी नर्मदा मैया दुर्लभ ! असा सोपा फंडा आहे !
रात्री छान झोप लागली . पहाटे ब्राह्म मुहूर्तावर जाग आली . रानवे नदीकडे जाण्याचा रस्ता दिवसा पाहून ठेवला होता त्यामुळे पहाटेच्या अंधारात देखील त्याच रस्त्याने नदी गाठली . तिथे मस्त थंडगार पाण्याने स्नान केले .तत्पूर्वी शौच आटोपून घेतले . याला इकडच्या भाषेमध्ये डोलडाल जाना असे म्हणतात . परिक्रमेशी संबंधित असे अनेक शब्द पुढे तुम्हाला वेळोवेळी सांगेनच ! आता विषय निघालाच आहे तर या दुर्गंधीपूर्ण विषयाबद्दल थोडेसे बोलूयात .
रामदास स्वामींनी सांगितले आहे ,
उदकी सांडी गुरळी । तो एक मूर्ख ।
गुरळी म्हणजे विष्ठा किंवा लेंडी .विष्ठा ही जर मातीमध्ये गेली तर तिचे सोने होते . मातीमध्ये पुरेसे जिवाणू आहेत आणि अशी व्यवस्था आहे की जी कमीत कमी वेळामध्ये तिचे विघटन करून माती बनविते . परंतु तीच जर पाण्यामध्ये मिसळली तर मात्र पाण्याचे रूपांतर विषामध्ये करते .सांडपाण्याला काळा रंग येतो तो या विष्ठेतील जीवाणू विषाणूंमुळेच ! अगदी मांजरा सारखे छोटे प्राणी सुद्धा व्यवस्थित मातीमध्ये खड्डा करून त्यामध्ये शौच संमार्जन करून तो खड्डा पुन्हा झाकून टाकतात .परंतु माणसांना आजही विष्ठा कुठे टाकावी याचा विवेक नाही हे दुर्दैवी सत्य आहे . माझे असे स्पष्ट मत आहे की मानवी विष्ठा जोपर्यंत पाण्यामध्ये मिसळते आहे तोपर्यंत जलशुद्धीकरण हा विषय शक्य नाही .शक्य होईल तितक्या लोकांनी शोष खड्डे किंवा अन्य मार्गाने आपली विष्ठा मातीच्या आत कशी राहील याचा प्रयत्न करावा .
या विषयातील चिंतन फार पूर्वीपासून मी केलेले असल्यामुळे मी असा निश्चय केला होता की संपूर्ण परिक्रमेदरम्यान माझ्या डोलडालचा मागमूस कोणालाही लागला नाही पाहिजे . त्यामुळे भरपूर वेळ घेऊन मी अतिशय लांबची निर्मनुष्य जागा शोधत असे . आणि व्यवस्थित खड्डा करून किंवा झाकण्यासाठी आधीच वाळू किंवा माती गोळा करून मगच कार्यक्रम उरकत असे .या पद्धतीने विघटन देखील त्वरित होते आणि निसर्गाचा समतोल राखला जातो .पाण्यामध्ये विसर्जन झाल्यावर मात्र सगळेच अवघड होते . दुर्दैवाने बहुतांश परिक्रमावासीयांकडे हा विवेक नसल्याचे मला आढळून आले . असो .आपण उद्या सकाळी देखील बोलणार आहोत असे मला डॉक्टर प्रल्हाद पाटील यांनी आधी सांगून ठेवले होते आणि तसेही आज वीस पंचवीस किलोमीटर चालण्याचा विषय नव्हता . त्यामुळे मी पूजा आरती वगैरे आटोपून शांत बसून राहिलो . प्रल्हाद पटेल शेजारी येऊन बसले आणि आम्ही पुन्हा छान गप्पा मारल्या . आदल्या रात्री त्यांच्या मुलीने मंदिरातील सर्व पूजा अर्चा स्वतः केली होती व आताही तीच करत होती .माझे विवाह या विषयातील चिंतन मी त्यांना सांगितले आणि मुलांचा लवकरात लवकर विवाह करण्यास सुचविले . त्यांना देखील माझे विचार पटत होते व तुम्हाला लवकरच चांगली बातमी कळवितो असे त्यांनी मला सांगितले .खरोखरीच माझी परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर काही काळात त्यांच्या मुलीचा विवाह त्यांनी इंदोरला करून दिला .व मला आवर्जून कळविले देखील होते . मी माझा फोन स्विच ऑफ करून आलेला होतो . व कदाचित तो बंदच करून टाकावा असा माझा मानस होता . त्यामुळे एका मित्रांचा पाठ असलेला क्रमांक मी सर्वांना माझ्याशी संपर्काचे माध्यम म्हणून सांगायचो . बऱ्याच लोकांनी माझे काढलेले फोटो याच क्रमांकावर पाठवून दिले . अर्थात माझ्या त्या मित्राला फारसे तांत्रिक ज्ञान नसल्यामुळे त्यातील बरेचसे फोटो त्यांच्या हातून डिलीट झाले परंतु तरी देखील जे काही फोटो शिल्लक राहिले त्यांची संख्या शेकड्यामध्ये आहे ! आणि तीच चित्रे मी या लेखमालेमध्ये टाकत आहे ! प्रल्हाद पटेल यांची आज्ञा घेऊन पुढे निघालो परंतु त्यांनी मला सांगितले की पुढे मनेरी नावाचे गाव आहे तिथे देखील त्यांचा दवाखाना असून तिथे ते दर बुधवारी दिवसभर थांबतात . त्यामुळे कदाचित नर्मदा मातेचे दर्शन घेऊन ते तिथे येतील तेव्हा माझी व त्यांची भेट होऊ शकते .
वहीमध्ये शिक्का मारून घेतला .
मध्ये एका बंगले वजा घरातील माणसाने नर्मदे हर असा आवाज दिला आणि कोरा चहा पाजला .उभ्या उभ्याच मी चहा घेतला तोपर्यंत त्याच्या मुलाने मोबाईलवर माझे फोटो काढले .
मी फोममॅटवर वाळत टाकलेला गमछा , लंगोट आणि पोटाच्या कप्प्यामध्ये ठेवलेली छोटीशी डायरी आपल्याला दिसेल . इतक्या छोट्या गावामध्ये ब्युटी पार्लर देखील होते हे एक आश्चर्य !
धनपुरी गावासोबत जबलपूर जिल्हा संपला आणि मंडला या आदिवासी जिल्ह्यामध्ये आपले स्वागत आहे अशी पाटी लागली .पाटीवर लिहिलेली अंतरे किलोमीटर मध्ये अशी होती . मंडला ९५ ,निवास ३० , कुंडम ४५ , दिंडोरी ११२ , शहापुरा ६६ , घुघुवा पार्क ५२ .
चालताना मध्ये पहाडी खेडा नावाचे एक गाव लागले . इथे एक भव्य दिव्य वटवृक्ष होता व त्याच्या खाली एका अतिशय प्राचीन आणि सुंदर मंदिराचे भग्न अवशेष अस्ताव्यस्त पडलेले होते . तिथे खूप भव्य असे तळे होते आणि त्या तळ्यामध्ये शिंगाड्याची शेती कशी करतात ते मी पाहिले . शिंगाडे साधारण दसऱ्याच्या आसपास येतात आणि पौष महिन्यामध्ये संपून जातात .याची लागवड करावी लागते .त्यासाठी गवताचे भारे बांधून त्याच्यामध्ये बिजारोपण केले जाते व ते भारे तलावामध्ये फेकून दिले जातात . गवत सडले की रोपे उगवू लागतात .
शिंगाडे हा प्रकार आपल्या इथे फारसा पाहायला मिळत नाही . काळ्या रंगाचा भाजलेला कंद ढिगाने विक्रीला आपण कधीतरी बाजारात पाहिला असेल .तेच हे शिंगाडे. हे शिंगाडे वाळवून , त्याचे पीठ करून ते उपवासाला खाण्याच्या पदार्थांमध्ये वापरले जाते .
मुळात हे कंद काळे नसतात .हिरवट जांभळ्या रंगाची गाठ या वेलीसारख्या पसरणाऱ्या पान वनस्पतीच्या मुळाला येत असते .
याचे कमल वृक्षांसोबत अक्षरशः जंजाळ तलावात पसरलेले असते .ते इतके भयानक असते की त्यामध्ये अडकलेला माणूस बाहेर निघणे अवघड असते .
तरी देखील एक माणूस बसेल अशा एकाच लाकडाच्या ओंडक्यामध्ये कोरलेल्या 'डोंगा' नावाच्या नावे मध्ये बसून लोक शिंगाडे गोळा करत असतात . काही लोक ट्रकच्या टायरची इनर हवा भरून घेतात . व त्याच्या मधोमध दोरीने बांधून मुडपून त्याच्यावर घोड्याप्रमाणे बसतात .आणि शिंगाडे गोळा करतात .या प्रकारामध्ये संपूर्ण शरीर दिवसभर ओले राहते .
हे काम अतिशय संयमाचे आहे .वेचलेल्या शिंगाड्यांना माशांचा अतिशय घाणेरडा वास येत असतो . शिंगाडे गोळा केल्या केल्या काठावर आणून दिले जातात . जिथे घरातील एखादी स्त्री ते निखार्यावर चांगले भाजून काढते किंवा बांबूच्या टोपलीमध्ये चांगली वाफ देते.इथे त्यांचा वास बऱ्यापैकी जातो आणि काळा रंग त्यांना प्राप्त होतो .त्यानंतर एका विळी वर पटापट कापून टरफले काढली जातात .व जागेवर शिंगाडे विकले जातात .मला एका माईने पिशवी भर शिंगाडे दिले !हे कसे खातात मला माहिती नव्हते ते मी समजावून घेतले आणि थोडेफार खाल्ले .परंतु त्याला येणारा माशांचा वास काही जात नव्हता .त्यामुळे मी पुढे लहान मुलांना ते वाटून टाकले !इथले लोक आवडीने शिंगाडे खातात . पिष्टमय पदार्थ ,प्रथिनं आणि विटामिन चा मोठा साठा यातून मिळतो . शिंगाड्याचे पीठ उपासाला देखील चालतं . पुढे एक मोठी औद्योगिक वसाहत लागली . इस्पात बनवणारी एक खूप मोठी कंपनी उजव्या हाताला होती .रेल्वे मध्ये मिळणारे रेल नीर बनवणारी फॅक्टरी , पीव्हीसी पाईप बनवणारी फॅक्टरी आणि एक भव्य एलपीजी गॅस प्लांट देखील या औद्योगिक वसाहतीमध्ये होता .
या महामार्गावरून मोठ्या मालगाड्या अर्थात ट्रकची खूप वर्दळ होती .अतिशय वेगाने ट्रक जात असत .त्यामुळे मी एकदाही रस्त्यावरून चाललो नाही तर कडेच्या पट्टीवरून चालत राहिलो .परंतु या बाजू पट्ट्या अतिशय खडबडीत आणि खड्यांनी भरलेल्या होत्या .त्यामुळे चालताना पायाला खूप त्रास होत होता .बहुतांश परिक्रमावासी हे रस्त्याच्या मधोमध चालत आहेत असे माझ्या लक्षात आले जे अतिशय धोकादायक होते .त्या परिक्रमावासींना चुकविण्यासाठी गाड्यांना मोठी कसरत करावी लागे . आणि चुकून माकून एखाद्या चालकाचे दुर्लक्ष झालेच तर अपघात निश्चित होता .मी स्वतः बऱ्यापैकी चांगला चालक असल्यामुळे मी विरुद्ध दिशेने अर्थात रस्त्याच्या उजव्या बाजूने चालत राहिलो .त्यामुळे मला समोरून येणारे वाहन दिसत राहायचे ,चालकाला देखील मी दिसायचो.आणि मागून येणारे अर्थात मला न दिसणारे वाहन माझ्यापासून थोडे लांब राहायचे . डूँडी ,मेनधी (मेढी ), ताकवेली ही गावे ओलांडत मनेरी गाव गाठले .इथे डॉक्टर प्रल्हाद पटेल यांचा दवाखाना कुठे आहे विचारल्याबरोबर लोकांनी दवाखाना दाखवला .शेजारीच एका शिंप्याचे दुकान होते .इकडे शिंपी लोकांना नामदेव असे म्हणतात .संतश्रेष्ठ नामदेव महाराजांनी त्यांच्या काळात केलेल्या भारतभ्रमणाचे हे पुण्य फळ आहे ! त्यांनी अतिशय अगत्याने मला दुकानात बसवून घेतले .आजूबाजूचे दुकानदार देखील लगेच गोळा झाले .यांना एक तरुण मुलगा होता .लहान मुले आणि युवक म्हणजे माझ्या साठी जीव की प्राण !कारण नवीन काहीतरी शिकण्याची जिद्द उमेद आणि गरज यांनाच अधिक असते !मग ते चांगले असो वा वाईट ! त्यामुळे अधिकाधिक चांगले कोणाला द्यायचे असेल तर ते या पिढीलाच द्यावे !हे दुकान श्री विजय नामदेव जी यांचे होते .डॉक्टर प्रल्हाद पटेल हे त्यांचे पोट भाडेकरू होते .
मनेरी गावातील डॉक्टर प्रल्हाद पटेल यांचा दवाखाना , श्री विजय नामदेव जी , सत्यम आणि त्यांच्या शेजारील दुकानदार
डॉक्टर साहेब अजून यायचे होते परंतु त्यांचा कंपाउंडर आला होता व त्याने दवाखाना उघडून औषधे वाटायला सुरुवात सुद्धा केली होती ! नामदेव यांनी आत घरामध्ये भोजनासाठी बोलविले व अतिशय सुग्रास जेवण वाढले .त्यांचा मुलगा सत्यम आदबीने सर्व पदार्थ वाढत होता .याला लष्करामध्ये भरती होण्याची प्रेरणा मी दिली कारण त्याची तब्येत चांगली होती .त्याला बऱ्याच परीक्षांबाबत माहितीच नव्हती .ती सांगितल्यामुळे आणि कुठे माहिती शोधायची ते शिकविल्यामुळे तो खूप खुश झाला .विजय नामदेव यांनी मला एक सुई दोरा दिला , जो मला पुढे अनेक वेळा खूप कामाला आला .या सर्वांचा निरोप घेऊन मी तिथून पाय उचलला आणि अथक चालत कोहानी , भादरी गावे मागे टाकत सकरी गाव गाठले .
नाही नाही म्हणता दुसर्याच दिवशी बावीस किलोमीटर अंतर माझ्याकडून सहज तोडले गेले होते !
लेखांक तेरा समाप्त (क्रमशः)
पुढच्या भागावर जा
उत्तर द्याहटवाउदकामधे सांडी गुरळी |.....|.....|तो एक मूर्ख||दासबोध.द2-1-64
उत्तर द्याहटवा