लेखांक १५ : अखंड भारताचे नाभीस्थान !
शिक्का मारून घेतला आणि बंजारा मातेचे मंदिर सोडले .मुसरा नदी ओलांडून हरदौली , ग्वारा , भलवारा , हाथीतारा , गुंदलई अशी अनेक गावे सोडली . परंतु गावातील एकही गोंड आदिवासी व्यक्ती नर्मदे हर म्हणत नव्हती ! चहा पाण्यासाठी किंवा भोजनासाठी बोलवणे तर फार लांबची गोष्ट . भुकेने जीव कासावीस झाला . हा संपूर्ण परिसर म्हणजे डोंगर उतारावरील जंगल संपून , डोंगराच्या माथ्यावरील एक मोठा औरस चैरस पसरलेला माळ होता . याला सात पहाडी माळ असे सुद्धा म्हणतात . या संपूर्ण भागामध्ये पाण्याची पातळी आश्चर्यकारक रित्या अधिक होती . रस्त्याच्या कडेला असलेल्या छोट्याशा खड्ड्यांमध्ये देखील पाणी साठलेले दिसायचे . या भागातून भारतातील बऱ्याच नद्यांचा उगम होतो .चालता चालता अनेक छोटे छोटे ओढे , नाले ,नद्या , जलस्रोत मी ओलांडत होतो . सर्वत्र ओसाड माळरान होते . पाणी मुबलक होते परंतु मोठी झाडे नव्हती असे विचित्र वातावरण पाहिले . इथे शेती फक्त निलगिरीच्या झाडांची केली जायची . इथले काही ग्रामस्थ मोठे मजेशीर असतात . पुढे कुठले गाव आहे असे विचारल्यावर एक खेडूत मला म्हणाला आगे एलिफंट स्टार व्हिलेज है ! नंतर कळाले की पुढील गावाचे नाव हाथी तारा होते . कदाचित हस्त नक्षत्रावरून हे नाव पडले असावे . हस्त नक्षत्रात पडणाऱ्या पावसाला ग्रामीण भाषेत हत्तीचा पाऊस म्हणतात . हाथी तारा गावाच्या पुढे दोन मार्ग वेगळे वेगळे होत होते . एक होता निवास -मंडला मार्ग .निवास हे तिथल्या एका तालुक्याचे नाव आहे . या नावामुळे पुढे बरेच मजेशीर गोंधळ झाले . मी विचारायचो आगे निवास की व्यवस्था कहा है आणि लोक मला निवास गावाकडे जाणारा रस्ता सांगायचे ! असो . दुसरा मार्ग होता शहापुरा -जोगी टिकरिया मार्ग .यातील मंडला मार्गाने गेले तर ९० किलोमीटर अंतर वाढायचे . सुमारे आठवड्याभराचे चालणे वाढायचे .परंतु हा मार्ग नर्मदा मातेच्या काठाच्या जवळून होता . इथे नर्मदा नदीने मोठे वळण घेतलेले असल्यामुळे बऱ्यापैकी परिक्रमावासी ते वळण टाळून सरळ योगी टेकडी अथवा जोगी टिकरिया या गावांमध्ये उतरतात . मला त्या क्षणी याबाबत काहीच माहिती नव्हते . दिग्मूढ होऊन मी गुंदलई च्या माळावरील त्या तिठ्यावर उभा राहिलो . जबलपूर सोडल्यापासून नर्मदा मातेचे काही मला दर्शन झालेले नव्हते .आणि मला हा प्रकार फारसा आवडला नव्हता . मला असे वाटायचे की नर्मदा परिक्रमा ही संपूर्ण नर्मदा मातेच्या काठाने होत असते . परंतु इथे काहीतरी वेगळेच चित्र मला पाहायला मिळत होते .मी डोक्याशी ठरविले आणि मंडला मार्गावर चालायला लागलो इतक्यात एक चार-पाच वर्षाची छोटीशी काळी सावळी चुणचुणीत मुलगी पळत माझ्या दिशेने आली .आणि मला म्हणाली , बाबाजी उधर मत जाना । आप इधर से जाना । मला काही कळेना . एक क्षणभर माझे मन बावचळले .उजव्या हाताला नर्मदा माता असते असे सोपे गणित परिक्रमेमध्ये लक्षात ठेवायचे . आणि ही मुलगी तर मला डाव्या हाताने जायला सांगत होती .म्हणजे नर्मदा मातेपासून दूर पाठवत होती . अर्थात माझे दिवस वाचणार होते , पण नर्मदा मातेचे दर्शन लांबणार होते . परंतु सुरुवातीलाच सांगितले त्याप्रमाणे आपण आपले डोके लावायचे नाही असा निर्धार पक्का केला होता .हा सर्व विचार करून मी त्या मुलीला काहीतरी विचारणार , म्हणून पाहिले तर समोर कोणीच नव्हते ! आजूबाजूला पाहिले . त्या सुनसान माळावरती अक्षरशः कोणीही नव्हते . ती मुलगी कुठून आली , कुठे गेली ,कशी गेली काही कळायला मार्ग नव्हता . मग मात्र माझा निरुपाय झाला आणि मला डाव्या हाताने अर्थात शाहपुरा मार्गाने वाटचाल सुरु करावी लागली .पोटात अन्नाचा कण नव्हता त्यामुळे कळवळून भूक लागली होती . पुढे जाण्यापूर्वी या भागाच्या वैशिष्ट्या विषयी थोडेसे सांगणे क्रमप्राप्त आहे . हा मंडल अथवा मंडला नावाचा जिल्हा आहे . मला कुठलेही गावाचे नाव ऐकले की त्यामागे काय इतिहास असेल हे जाणून घ्यायला अतिशय आवडते . या गावाच्या नावाविषयी मात्र मला कोणीच काही माहिती देऊ शकले नाही .मी नर्मदा मातेचे ध्यान केले ,आणि तिला हाच प्रश्न विचारला . त्यानंतर माझ्या बुद्धीला जे उत्तर स्फुरले ते खालील प्रमाणे .
मी ज्या भागात पोहोचलो होतो ते भिकमपुर नावाचे पठारावरील एक गाव होते .
पुढील लेखांक
मंडल या संस्कृत शब्दाचा अर्थ आहे वर्तुळ किंवा गोल .मंडला जिल्हा केंद्रबिंदू धरून जर आपण वर्तुळ काढले तर त्यात संपूर्ण अखंड भारत मावतो .याचाच अर्थ हा प्रदेश अखंड भारताचा मध्यबिंदू आहे .अखंड भारत म्हणजे अगदी गांधार देश अर्थात इराण कंधार पासून ते जगातील सर्वात मोठे हिंदू मंदिर असलेल्या कंबुज प्रदेश अर्थात कंबोडिया पर्यंतचा भारत .तिबेट नेपाळ भूतान बांगलादेश ब्रह्मदेश अफगाणिस्तान पाकिस्तान हा सर्व भाग आलाच .
गेल्या काही शे वर्षांमध्ये आपण यातील बहुतांश भूभाग गमावला असल्यामुळे आता भारताचा केंद्रबिंदू नागपूर नजीक आहे .
नागपूर मध्ये असलेल्या शून्य दगडाची अर्थात झिरो स्टोन ची बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर लावलेली प्रतिकृती
परंतु मूळ भारतीय भू-मंडल हे मंडला जिल्ह्या वरूनच समजते आणि तोच भारताचा केंद्रबिंदू आहे असे माझे स्पष्ट मत आहे .
मी ज्या भागात पोहोचलो होतो ते भिकमपुर नावाचे पठारावरील एक गाव होते .
या भागातून अनेक नद्या उगम पावतात .आणि गमतीचा भाग असा की त्यातील काही नद्या नर्मदेला येऊन मिळतात तर काही नद्या गंगेला जाऊन मिळतात . गंगा आणि नर्मदा अशा पद्धतीने या भागाद्वारे जोडल्या गेलेल्या आहेत असे म्हणायला हरकत नाही ! भारताचे नाभी स्थान जणु ! इथे उगम पावणारी गौर नदी नर्मदा मातेला मिळते . झामूल नदी देखील नर्मदा नदीला मिळते . मुसरा नदी नर्मदार्पण होते परंतु नगरार नावाची नदी मात्र थेट गंगेला जाऊन मिळते .भारतीय उपखंडाला उत्तरेकडून दक्षिणेकडे उतार आहे आणि पश्चिमेकडून पूर्वेकडे उतार आहे . त्यामुळे भारतातील सर्व नद्या उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहतात आणि पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात . त्याला अपवाद आहे तो केवळ नर्मदा नदीचा ! तापीदेखील पश्चिम वाहिनी आहे परंतु तिची लांबी नर्मदेच्या तुलनेने फारच कमी आहे .तसेच कोकणात देखील हजारो छोट्या मोठ्या अल्पजीवी नद्या पश्चिम वाहिनी आहेत परंतु त्यांची तुलना नर्मदे शी होऊच शकत नाही .मोठी नदी असून उताराच्या विरुद्ध दिशेला वाहत गेलेली नर्मदा म्हणूनच गमतीशीर आहे ! बरं ती काही सरळ सोप्या मार्गाने गेलेली नाही ! मेकल पर्वतरांग , सातपुडा पर्वत शृंखला ,विंध्य गिरी आणि सह्याद्री या सर्व पर्वतांना अक्षरशः करवतीने चिरल्यासारखे उभे चिरत ती वाहते आहे . मंडलामधील या पठाराला दक्षिणेकडे आणि उत्तरेकडे असा दोन्हीकडे उतार होता असा याचा अर्थ . हे संपूर्ण पठार पाण्याने संपृक्त आहे आणि जागोजागी तुम्हाला पाणी साठलेले आढळते . मोठे वृक्ष अजिबात नाहीत व झुडपे देखील आढळत नाहीत . सर्वत्र फक्त खुरटे गवत दिसते .पठारावर गवतावरती काही मुले पहुडली होती .त्यांनी माझा एक फोटो काढला आणि मित्राच्या क्रमांकावर पाठवून दिला .
आता मी एका छोट्याशा रस्त्यावरून चाललो होतो आणि माझ्या दोन्ही बाजूला ओसाड माळरान पसरले होते . इतक्यात माझ्या मागून एक बजाज एम एटी गाडी येते आहे असे पाहून मी बाजूला झालो . MH 15 AF 7325 क्रमांक असलेली ही गाडी येवल्याची होती . गाडीवर हरिभाऊ सावळेराम चौतमाळ नावाचे माळी समाजाचे एक अवलिया गृहस्थ होते ( मी कधी कुणाला जात वगैरे विचारत नाही . नर्मदा खंडामध्ये कोणाला जात विचारावी लागत नाही .बरेचदा लोक आपण होऊन त्यांची जात सांगतात.बरेचदा तुम्हाला तुमची जात सुद्धा विचारतात .जाती असा शब्द इथे वापरतात आणि तो संस्कृत मधल्या याती वरून आलेला आहे . याती म्हणजे प्रकार . ज्यांनी आपण होऊन जात सांगितली त्याची नोंद मी डायरीमध्ये करून ठेवायचो व तीच नोंद तुम्हाला येथे वाचायला मिळेल . असो) . तर त्याच M 80 गाडीवर त्यांची ही पाचवी परिक्रमा चालली होती !हे गृहस्थ स्वतः अपंग होते परंतु ही गाडी मात्र चालवू शकत .स्वतःच्या पायांनी चालता येणे त्यांच्यासाठी अशक्य होते .गंमत म्हणजे गेल्या परिक्रमेमध्ये त्यांनी गाडीमध्ये हवा भरल्यानंतर पुन्हा हवा कधीच तपासली नव्हती तरी देखील दोन्ही चाकांमध्ये योग्य दाबांमध्ये हवा होती . त्यांनी अजून एक चमत्कार मला सांगितला .अजून शूलपाणीची झाडी मला लागली नव्हती .परंतु तिच्या भयानकते बद्दल मी फक्त ऐकून होतो .यांनी मात्र याच गाडीवरून शुलपाणीची झाडी यावर्षी पार केली होती . खरे तर ही झाडी ज्यांना नको असेल त्यांच्याकरिता पक्का डांबरी मार्ग आहे .तो थोडासा लांबचा पडतो . परंतु यांनी थेट डोंगररांगांमधला मार्ग निवडला होता हे विशेषत्वाने लक्षात घ्यावे .केवळ दोन पर्वत वगळता ९०% मार्ग ते या च M 80 गाडीने चढून गेले आणि उतरून देखील गेले ! हरिभाऊ म्हणाले , " कदाचित माझी ही शेवटची परिक्रमा आहे .आता शरीर खरोखरीच साथ देत नाही .म्हणून मी नर्मदा मातेची प्रार्थना केली की माते मला एकदा तरी तुझी शूलपाणीश्वराची झाडी दाखव . " गाडीची अवस्था पाहता हा खरोखरीच चमत्कार होता . चुकून माकून जर हरिभाऊ या गाडीवरून पडले असते तर त्यांना कोणीही वाचवू शकले नसते . कारण ते स्वतःच्या पायावर उभेच राहू शकत नव्हते .परमेश्वराची कृपा असेल तर मूकं करोति वाचालं । पंगुं लंघयते गिरीम् । हे खरोखरीच सत्य आहे . त्यामुळेच हरिभाऊ सारखा अपंग मनुष्य डोंगर चढून जाऊ शकतो आणि माझ्यासारखा मुखदुर्बळ आज आपल्यासमोर ही वाचाळ बडबड करू शकतो ! आपणा सर्व वाचकांची कृपा असेल तर संपूर्ण प्रवास नर्मदा माई या मुर्खाकडून लिहून घेईल . . . सध्या इत्यलम् ।
लेखांक १५ समाप्त (क्रमशः )
मागील लेखांक पुढील लेखांक
पुढच्या भागावर जा
उत्तर द्याहटवा