लेखांक १७१ : सर्रा घाट त्रिवेणी संगमाच्या गंगा यमुना अखेरपर्यंत अखंड सोबत

उमाचरणदासजी महाराजांची परवानगी घेऊन कुडाकला हनुमान मंदिर सोडले आणि सुंदर अशा काठाने चालायला सुरुवात केली . जबलपूर जिल्ह्याला नर्मदा मातेचा जो वैविध्यपूर्ण भूगोल लाभलेला आहे तसा फार कमी ठिकाणी आढळतो !पुढे झलोन गावामध्ये रामजानकी मंदिर आहे . तिथे दुपारचे भोजन मी घेतले . परंतु तत्पूर्वी एका टेकाडावरून कुणीतरी मला हात करते आहे असे वाटले . एक परिक्रमावासी मला तिकडून बोलवत होता . त्यामुळे डोंगर चढून वर गेलो . वरती सर्व शेती होती . आणि एक छोटीशी झोपडी बांधून सावरिया नावाचा हा परिक्रमावासी चातुर्मासासाठी इथे राहिलेला होता . शेतकऱ्याने त्याला जे हवे ते देतो असे सांगितले होते . मैयाचे सुंदर दर्शन त्याच्या झोपडीतून होत होते . सावरिया ने मला रंगा चहा पाजला ! या भागातील मैया चा प्रवाह वैशिष्ट्यपूर्ण होता . कधी सुलटा कधी उलटा असा प्रवाह होता . आपण मागच्या एका प्रकरणात प्रवाहाचे प्रकार पाहिले होते . त्यातला हा विचलित प्रवाह किंवा टरब्युलेंट फ्लो होता . याचे चित्र मी वहीत काढले आहे . 

मैय्याचा विचलित प्रवाह किंवा turbulent flow 

प्रत्यक्षामध्ये वाळूचे विविध उंचीचे ढिगारे असल्यामुळे असे प्रवाह तयार होतात हे उपग्रह चित्र पाहिल्यावर लक्षात येते . हे याच भागातले उपग्रह चित्र आहे

माझ्याकडचे काही सामान सावरिया सेठना चातुर्मासामध्ये कामाला आले असते . ते सर्व देऊन टाकले . दंतमंजन ,फुटाणे , (वाटेमध्ये न मागता मिळालेली ) औषधे , सुईदोरा ,आणि सातूचे पीठ सावरियाला दिले आणि पुढे निघालो .गंमत म्हणजे यातील एकही गोष्ट त्याच्याकडे नव्हती ! मैया चे नियोजन कसे असते पहा ! त्या जंगलात बसलेल्या माणसाला कुठेही दूर जावे लागले नाही ! सुई सुद्धा जागेवर चालत आली ! मी दिलेल्या सुईने त्याने माझ्याच टाचेमध्ये असलेला एक काटा खूप छान पद्धतीने काढून दिला . लोक असे अधून मधून आपले पाय तपासायचे . मी तसे कधीच केले नाही . पायांची संवेदनाच गेली होती जणू . त्याने माझा पाय तपासला आणि त्याला काटा सापडला . परिक्रमेच्या अखेरीस माझ्या तळ पायाचे कातडे इतके जाड झाले होते की त्यातून दाभण आरपार जात असे तरी रक्त येत नसे ! बाभळीचे काटे आरामात आरपार जायचे ! पुढे झलून गावामध्ये साधारण अर्धा किलोमीटर आत मध्ये चालत गेल्यावर रामाचे सुंदर असे मंदिर आहे . मंदिराची रचना छान आहे .ब्रिजभूषण गोटिया नामक तेजस्वी ब्राह्मण पूजा पाठ पाहतात .त्रिकाळ संध्या करतात . त्यांचा छान सत्संग घडला . त्यांनी घरात येऊन जेऊ घातले . यांचा एक अतिशय हुशार नातू तिथे आलेला होता  . जयपूरला असायचा .त्याला भरपूर चित्रे काढून दिली ! आणि मंदिराच्या ओवरीत क्षणभर पडलो . मी असा भोजनानंतर कधी झोपत नसे . परंतु परिक्रमा पूर्तीचा क्षण जवळ येऊ लागला तसे कुणीतरी थांब असे म्हणावे असे वाटायचे ! परंतु बऱ्याच लोकांना मी जबलपूर वरून परिक्रमा उचलली आहे हे माहिती नसे .स्वाभाविक आहे . असे मधूनच परिक्रमा उचलण्याचे प्रमाण फार कमी आहे . सर्वांना वाटायचे की मला ओंकारेश्वर पर्यंत जाता येणे शक्य नाही त्यामुळे मी कुठेतरी चातुर्मासासाठी जागा शोधतो आहे .

मंदिर अतिशय देखणं आहे . फार सुंदर पद्धतीने सांभाळले आहे
विद्युत रोषणाई केल्यावर मंदिर असे दिसते
रामरायाचे ध्यान फारच सुंदर आहे .
घनश्याम हा राम लावण्यरूपी । महाधीर गंभीर पूर्ण प्रतापी ।
करी संकटी सेवकांचा कुढावा । प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥
या मंदिराची रचना मला फार आवडली . महादजी शिंदे यांची वानवडी येथील छत्री आठवली .

झलोन घाट साधाच आहे . बांधलेला नाही . अशा ठिकाणी स्नानाचा अधिक आनंद मिळतो .

श्रीराम जानकी मंदिर 

लोक न्यास झलौन 

तहसील शहपुरा जिल्हा जबलपूर

 मैय्या चा विचार करता करता कधी डोळा लागला कळलं नाही . थेट ४ वाजता जाग आली ! तत्काळ निघालो . चार वाजले असले तरी कडक ऊन पडलेले होते . ताडताड चालत मोठा टप्पा पार करत सुनाचर गाव ओलांडले . एका दमात १२-१४  किलोमीटर चाललो ! सुनाचर देखील पार केले आणि सर्रा घाट अथवा छरौवा या घाटावर आलो . या ठिकाणी गंगा यमुना आणि नर्मदा माई यांचा त्रिवेणी संगम आहे अशी मान्यता आहे . गंगा आणि यमुना यांचे अगदी छोटे छोटे स्त्रोत येथे आहेत . तिथे स्नान केले . साध्या संगमावरचे स्नान प्रत्येक वेळेस नाही जमले तरी त्रिवेणी संगमातले स्नान  परिक्रमा वासीने कधीच चुकवू नये .  घाटाच्या डाव्या बाजूला वरती छान असे राधा कृष्णाचे मंदिर आहे .हनुमान जी तर नर्मदा खंडातील जवळपास प्रत्येक मंदिरात असतातच .तसेच इथे देखील आहेत . आश्रमामध्ये खूप साधू होते . यांनी मला त्यांच्या पद्धतीनुसार स्वतंत्र खोली आणि तखत वगैरे दिला . सकाळी बांधून दिलेले बटाटेवडे मी वाटेमध्ये भूक लागल्यावर खाल्ले होते . काही वाटून टाकले होते . इथे काही परिक्रमावासी स्नानासाठी खाली निघाले होते .त्यांच्या आग्रहामुळे पुन्हा स्नानाला गेलो ! थोडक्यात स्नान आटोपून बाहेर आलो . इथे काही तरुण मंडळी केवळ त्रिवेणी संगमाच्या दर्शनासाठी म्हणून आली होती .बैलखेडा या गावातील हे लोक होते . त्यांनी मला एका पायरीवर बसविले . हातामध्ये १५१ रुपये दक्षिणा दिली . पेढ्याचा पुडा टेकवला आणि अचानक आठवल्यासारखे करून पिशवीतून एक पुडा काढला . आणि सांगितले की हे आमच्यासमोर खा ! उघडून पाहिले तर दोन मोठे मोठे बटाटेवडे होते ! मी वेड्यासारखा हसायला लागलो ! त्यांना काय झाले कळेना ! मग मी त्यांना बटाटे वडा पुराण सांगितले ! तेही माझ्या हसण्यामध्ये सामील झाले !हसत खेळत त्यांनी दोन्ही वडे मला खायला लावले ! माईची कृपा अपरंपार आहे ! पेढे मी घाटावरच्या लोकांना वाटून टाकले . आणि रिकामे खोके वरती घेऊन गेलो ! हे मुद्दाम सांगतो आहे . कारण बरेचदा परिक्रमावासी सुद्धा मैयाच्या काठावर कचरा करतात . मला तर असे वाटते की आपल्या हातून प्लास्टिकचा एक कपटा जरी मैयाच्या काठावर पडला तरी त्या क्षणी आपण परिक्रमा खंडित करून घरी परत गेले पाहिजे , इतका हा जघन्य अपराध आहे ! हे मंदिर खूपच छान होते आणि चातुर्मासासाठी प्रसिद्ध होते . इथे चातुर्मास करा असा आग्रह मला खूप झाला . परंतु मी तो नम्रपणे नाकारला . परंतु मंदिर मात्र खूपच अप्रतिम होते . अक्षरशः चहा सुद्धा हातात आणून देत ! क्या बात है ! परिक्रमावासींची इतकी सेवा कुठेही होत नसेल ! अशा प्रत्येक ठिकाणी सेवेची परिक्रमा वासी म्हणून मला भावणारी एखादी चांगली गोष्ट मी लक्षात ठेवत होतो आणि वहीमध्ये टिपून ठेवत होतो . भविष्यात कधी कुठे सेवा करायची पाळी आलीच तर त्याचा वापर व्हावा हा त्यामागचा उद्देश .

सर्रा / छरौवा घाट
त्रिवेणी संगमाची जागा . जबलपूर जिल्हा चालू झाल्यामुळे सगळीकडे संगमरवराच्या मूर्ती दिसत आहेत .
इथले पाणी खूप स्वच्छ आहे
परंतु आपण आपली भक्ती मग मैयामध्ये कचरा टाकून व्यक्त करतो
रस्त्यावरून येणाऱ्या परिक्रमा वासींना अशी पाटी दिसते
मंदिर खूपच सुंदर आहे . साधूंचा आवडता आश्रम आहे हा !
आश्रमातील सिद्ध धुना
ब्रह्मलीन श्री श्री ११०८ प्रेमानंद ब्रह्मचारी महाराज यांची समाधी

आजच्या प्रवासामध्ये पक्षी जीवन खूप दिसले . परंतु महत्त्वाची नोंद म्हणजे मला आजच्या प्रवासामध्ये देखील सारस पक्षी दिसले . बाबरी गावाजवळ तीन सारस पक्षी दिसले . विशेष म्हणजे वाळू उपसणाऱ्या जेसीबीच्या आवाजाला न घाबरता ते उभे होते . त्यांच्यामध्ये झालेला हा बदल लक्षणीय आहे . काय करतात बिचारे !आपण त्यांना पर्यायच ठेवलेला नाही . दरम्यान आपण काल ओलांडलेले डोंगरगाव म्हणून जे गाव होते तिथे मालसरच्या आधी ज्यांची गोशाळा होती त्याच रवींद्र पटेल जी यांचा भव्य आश्रम आकार घेत होता .मी आश्रमाचे काम पाहायला गेलो परंतु व्यवस्थापक व्यवस्थित बोलत नसल्यामुळे मी पुढे निघालो . माझ्या कुठल्याही प्रश्नाला तो उत्तरच देईना . जणु काही मी समोरच नाही असे वागत होता . इथे वरती येण्याचा माझा मुख्य हेतू होता समोर ज्या धारेत मी मरता मरता वाचलो होतो ती धार पहायची ! आपल्याला आठवत असेल तर दक्षिण तटावर महाप्रचंड जबरेश्वर शिवलिंग असलेल्या महादेव पिपरिया नामक गावाच्या आधी मी मैयामध्ये वाहून जाणार होतो , परंतु झाडाचे मूळ हाताला लागल्यामुळे वाचलो होतो ! ती जागा इथून खूप छान दिसत होती ! अगदी समोरच होती ! पत्राला किती भयानक गती आहे ते इथून कळत होते !आश्चर्य म्हणजे तिथे मला रस्ता दाखवलेली वेडसर द्रौपदी नावाची मुलगी मला पुन्हा एकदा दिसली ! मी तिला द्रौपदी ! असा आवाज दिल्याबरोबर तिने ओ दिली ! आणि नर्मदेहर देखील म्हणाली ! हे पाहून व्यवस्थापक अचंबीत झाला . तो म्हणाला तुम्हाला तिचे नाव कसे काय माहिती ? या प्रश्नावर त्याने ज्या पद्धतीने माझ्या पहिल्या प्रश्नांना उत्तर दिले नव्हते तशीच मूक प्रतिक्रिया मी दिली आणि निघून गेलो . बिचारा खजील झाला .

कसे आहे , मी असे वागलो तर चालू शकते . कारण मला त्या व्यवस्थापकाला कुठे आसरा द्यायचा नाही . परंतु ज्याच्याकडे अश्रित येतात त्याने असे वागले तर ते धोकादायक आहे . कारण रात्री अपरात्री येणाऱ्या परिक्रमावासीला जर तुम्ही ठेवून घेतले नाही तर त्याने जायचे कुठे ?

डावीकडे पटेल यांचा आश्रम दाखवला आहे . बाणाने दाखवलेली जागा तीच आहे जिथे मी मैय्या मध्ये पडलो होतो आणि वाहून चाललो होतो .त्याच्या थोडेसे वर लाल ठिपका आहे तिथे द्रौपदी होती !त्याही दिवशी आणि याही दिवशी !

इकडे रात्री सर्रा घाटावर मनोभावे रामायण वाचले .हा घाट साधूं मध्ये भलताच प्रिय होता . चिखलद्यापाशी सिद्धाश्रमामध्ये मला भेटलेला अप्रतिम परिक्रमावासी व त्याला आम्ही शिवून दिलेली खताच्या पोत्याची पाठ पिशवी दोघेही भेटले ! पिशवीने त्याला चांगली साथ दिली होती ! हे पाहून मला बरे वाटले . तोही इथे चातुर्मास करत होता . एकंदरीत या आश्रमामध्ये वेळ खूप चांगला गेला . इथे पुन्हा यायला आवडेल अशी जागा आहे ! यापूर्वीच्या तीन चार दिवसातल्या सर्वच स्थानांना माझ्या पुस्तकात मी चांदणी केलेली आहे ! पहाटे सर्रा घाट सोडला आणि मैयाचा काठ धरला . चरगवा घाट ,गोरा घाट ,झांसी घाट पार करीत बेलपठारला आलो .

गोरा घाट झाशी घाट बेलपठार हे सर्व किनारे या नकाशात दिसत आहेत .

 इथे दोन लोहमार्गाचे पूल आहेत ते खालून ओलांडले समोर भिकमपूर गाव आहे आणि सीनियर नदीचा संगम आहे .माझ्यासोबत पूर्वी काही काळ राहिलेला चेतराम भगत उर्फ चंदन याचे हे गाव ! चंदनचे नक्की काय झाले की उत्कंठा मला लागलेली होती .कारण तो झगडिया मढी नंतर अचानक गायब झाला होता ! इथे मला समोरच्या तटावर नर्मदा पुराण केलेला बर्मन लाकडे तोडताना भेटला .साहिल बर्मनचा हा बाप ! मी त्याला चंदनची माहिती विचारली . त्याने सांगितले की चंदन परिक्रमा अर्धवट सोडून गावी परत आला कारण त्याला सरपंच पदाची निवडणूक लढवायची होती . मला मजाच वाटली . मी त्याला सांगितले की तू लाकडे घेऊन घरी गेलास आणि तुला तो भेटला तर त्याला नावेने इकडे पाठव . मी पुढच्या आश्रमामध्ये त्याची वाट पाहत थांबतो आहे . परंतु हा पठ्ठया काही आला नाही . इथून जवळ नीलकंठ महादेवाचे मंदिर होते . या गावाचे नाव बेल पठार पडले कारण इथे बेलाची खूप झाडे पूर्वी होती . अजूनही नर्मदा मातेच्या काठावर बेलाची झाडे दिसत होती . 

झाशी घाटावर एक पूल आहे . याच पुलाच्या अलीकडे असलेल्या शेतकऱ्याचे कुंपण मी दक्षिण तटावर तोडले होते ! 

बेल पठार गावातील निळकंठ महादेवाचे मंदिर डाव्या हाताला दिसते आहे . समोर सीनियर नदीचा संगम आहे . अलीकडे दोन पूल दिसत आहेत ते रेल्वेचे आहेत . एक लोखंडाचा आणि एक दगडाचा आहे .

आश्रमामध्ये गेलो . एक मोठी खोली आणि एक मोठे अंगण होते बास ! एक निळ्या डोळ्याचे बाबाजी आणि दोन परिक्रमा वासी इथे थांबले होते . या बाबाजींचे नाव बहुतेक नेपाळी बाबा असावे . मुन्ना महाराज नावाची अजून कोणीतरी महंत इथे होते असे आश्रमाची पाटी पाहिल्यावर लक्षात आले .इथे मी चंदन ची खूप वेळ वाट पाहिली .परंतु तो येत नाही असे लक्षात आल्यावर बाबाजींचा निरोप घेतला . बाबाजी खूप तेजस्वी होते .

हाच तो बेलपठारचा आश्रम आणि कट्ट्यावर निवांत बसलेले नेपाळी बाबा. इथून पुढे मैयाच्या काठाने खूप बेलाची झाडे दिसली .
आश्रमातील नीलकंठ महादेव ! क्षमा करा,नीलकंठ महादेवांचा आश्रम !
आश्रमाची पाटी
परम तेजस्वी आणि तपस्वी निळ्या डोळ्यांचे नेपाळी बाबा

मोठ्या गर्दीमध्ये बसलेले असले तरी बाबा त्यांच्या तेजामुळे उठून दिसतात पहा !

वही मधला शिक्का पाहिल्यावर लक्षात आले की बळीराजाने दान केलेली त्रिपाद भूमी , त्यातली पहिली जागा हीच होती !

नीलकंठ महादेव आश्रम

राजाबली की दानभूमी

बिलपठार शहपुरा (भिटौनी )

जिल्हा जबलपूर (मप्र)

मोबा : ७९७०२१५१५९

 इथे थांबलेले दोन्ही परिक्रमा वासी चातुर्मास करणार होते . चातुर्मास हा अजून एक गहन विषय आहे . विषय निघालाच आहे म्हणून त्यावर थोडेसे सविस्तर सांगतो . चातुर्मास ही आपल्या हिंदू धर्मातील एक अतिशय अद्भुत परंपरा आहे . तिचे महत्व भारत वर्षा पुरते ,भरत खंडापुरते अधिक आहे . कारण या भागामध्ये चार महिने पावसाळा चार महिने उन्हाळा आणि चार महिने हिवाळा असे सुस्पष्ट तीन ऋतु दिसतात . तसे जगात सर्वत्र दिसत नाहीत . यातील मान्सून अर्थात पावसाळ्याचा जो कालावधी आहे त्याला जोडून चातुर्मासाची कल्पना आपल्या पूर्वजांनी मांडली . हे चार महिने तुफान पावसाच्या असल्यामुळे प्रवासासाठी वर्ज्य असतात . गृहस्थ ही लोकांचा चातुर्मास हा आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी असा चार महिने असतो .या दोन्ही तिथींना अनुक्रमे देवशयनी एकादशी आणि देवोत्थान एकादशी असे म्हणतात . देव शयन म्हणजे देव झोपतात ती तिथी .आणि देव उत्थान म्हणजे देव उठतात ती तिथी . या काळात विष्णू भगवान योगनिद्रेमध्ये असतात अशी संकल्पना आहे . परंतु प्रत्यक्षामध्ये या काळात पावसाळा असल्यामुळे आणि पूर्वी भारतातील शेती पावसावर अवलंबून असल्यामुळे लोकांनी देवदेव करणे सोडून शेतातली कामे करावीत हा त्याचा मुख्य हेतू होता . या चार महिन्यात जो राबेल तो वर्षभर निवांत बसून खाईल असे चित्र होते . तसेच साधू संतांना देखील पावसामुळे प्रवास करणे कठीण होऊन जाते म्हणून हे चार महिने एका जागी थांबण्याची परंपरा पाडण्यात आली . त्याचे लाभ दोघांना होतात . साधू संन्यासी एका जागी राहिल्यामुळे ग्रामस्थांना सत्संगाचा लाभ होतो . प्रत्यक्षा मध्ये संन्यासी लोकांचा चातुर्मास हा दोन महिन्याचाच असतो .हे बरेचदा आपल्याला माहिती नसते . आषाढ शुद्ध पौर्णिमा ते भाद्रपद शुद्ध पौर्णिमा या कालावधीमध्ये संन्यासी तीन दिवसापेक्षा जास्त एका ठिकाणी न राहण्याचा नियम सोडून देतात . आणि एकाच ठिकाणी जप तप अनुष्ठान करत राहतात . आपण परिक्रमे मध्ये असताना आपल्याला जर चातुर्मास करावा लागला तर सर्वात प्रथम जिथे आपण राहणार आहात त्या आश्रमाची परवानगी आहे का किंवा त्यांची आपल्याला ठेवून घेण्याची इच्छा आहे का , आणि त्यांना ते आर्थिक दृष्ट्या शक्य आहे का हे पाहणे अत्यंत आवश्यक आहे . नाहीतर पूर्ण चार महिने त्रास होऊ शकतो . एकदा एखाद्या आश्रमाने आपल्याला चातुर्मास करण्याची परवानगी दिली की आपण चार महिने रिसॉर्टमध्ये राहिल्या सारखे राहू नये ! तर पहाटे लवकर उठून आपली सर्व आन्हिके व साधना आटोपून त्या आश्रमाच्या पुढील त्या कामांमध्ये हातभार लावावा . लाकूड तोडणे असेल ,लाकूड गोळा करणे असेल , झाडू मारणे असेल , परिसराची साफसफाई असेल , रंगरंगोटी असेल , मंदिरातील नित्य पूजा असेल , भांडारगृहातील सेवा असेल ,भजन कीर्तन प्रवचनादि सेवा असेल किंबहुना अलीकडच्या काळातील काही आधुनिक सेवा असेल जसे की मंदिराचे अकाउंट सांभाळणे मंदिराची वेबसाईट करून देणे मंदिराला सोशल मीडियावर आणणे मंदिराची फोटोग्राफी करणे मंदिराची माहिती गुगल मॅप वर टाकणे अशी कुठल्याही स्वरूपाची शारीरिक मानसिक बौद्धिक तांत्रिक अध्यात्मिक सेवा आपण तिथे देऊ शकता .थोडक्यात काय तर आपल्या तिथे राहण्यामुळे मंदिराला भार वाटू नये तर आभार वाटावेत असे राहावे ! बरेचदा वयस्कर मंडळी घरात कोणी सांभाळत नाही मुलेबाळे सुना विचारत नाहीत म्हणून परिक्रमेला मुद्दाम उशिरा बाहेर पडतात आणि एखाद्या आश्रमावर ओझे बनून राहतात . अशाही परिस्थितीमध्ये तुम्हाला कोणीही जा म्हणत नाही . परंतु असे करणे आपल्यालाच योग्य वाटते का याचा विचार करावा ! आपल्याला शारीरिक कष्ट झेपणार नसतील तर तशी कल्पना व्यवस्थापनाला आधीच द्यावी . तरुणांना तर शारीरिक कष्ट करण्याशिवाय पर्यायच नाही ! चातुर्मासाच्या ठिकाणी राहून आपण त्या स्थानावर उपकार करत आहोत असा भाव ठेवू नये ! अनेक गृहस्थी आपल्या कष्टाने मिळवलेल्या उत्पन्नातील वाटा चातुर्मास चालविण्यासाठी आश्रमांना दान करत असतात . त्याचा अपलाभ अथवा फुकट फायदा तुम्ही उठवलात तर तुम्ही स्वतःचे कार्मिक कर्ज वाढवतात हे सोपे गणित लक्षात ठेवावे . विशेषतः परिसरातील लहान मुलांवर लक्ष देऊन त्यांना चांगले संस्कार देण्याचे काम चातुर्मासामध्ये नक्कीच करता येते .पावसाळ्यामध्ये तसेही लहान मुलांना बाहेर खेळायला जाता येत नाही . अशावेळी त्यांच्या ऊर्जेचा सकारात्मक विनियोग तुम्ही संस्कार वर्ग घेऊन , किंवा त्यांचे खेळ घेऊन करू शकता .आपल्यामुळे परिसरातील नागरिक त्या मंदिराशी किंवा आश्रमाशी कायमचे बांधले जातील असे राहावे . चातुर्मास ही संकल्पना किती उदात्त आहे पहा ! अशा काळात मोठे मोठे बैरागी वितरागी साधू संत संन्यासी आणि उर्वरित समाज एका छत्राखाली आणून त्यांच्यामधील देवाण-घेवाण आणि सत्संग वाढवून दोघांचे जीवन सुखी करण्याचा हा एक महान मार्ग आहे .मला जिथे जाईल तिथे चातुर्मासासाठी राहा असा आग्रह सुरू होता ! कारण अलीकडे तरुण लोक चातुर्मासाला थांबण्याचे प्रमाण फार कमी झाले आहे . आणि वयोवृद्ध चातुर्मास करणारे फार वाढले आहेत . त्यामुळे असा एखादा तरुण हाताशी असेल तर आश्रमाची व्यवस्था हाकायला त्याची मदत होईल या प्रामाणिकेतूने आश्रमधारी तरुणांना थांबण्याची विनंती करत असतात . ज्यांना शक्य आहे अशा तरुणांनी वरील सर्व गोष्टी लक्षात ठेवून अवश्य चातुर्मास करावा ! तुमचा चातुर्मास अजरामर झाला पाहिजे ! उदाहरणार्थ वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांचे सर्व चातुर्मास आजही लोकांच्या लक्षात आहेत ! किंबहुना टेंबे स्वामी आपल्याला जे कळले ते त्यांच्या चातुर्मासांमुळेच ! बाकीच्या काळामध्ये ते कुठल्या गिरीकंदरांमध्ये जंगलामध्ये गुहांमध्ये तीर्थस्थानांमध्ये परिव्राजन , भ्रमण करत होते याची कल्पना कोणालाच नसायची ! गृहस्थी माणूस चातुर्मासासाठी राहा म्हणून मागे लागला असेल तरी कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याला होकार देऊ नये . कारण कितीही काहीही म्हटले तरी गृहस्थी तो गृहस्थी ! त्याला संन्याशाची किंवा महंतांची सर येऊ शकत नाही . शिवाय घरामध्ये संसारी लोकांचे येणे जाणे असते .मुली बाळी असतात . लहान पोरे सोरे असतात . हे वातावरण साधनेसाठी काही फार पोषक नाही . मी नाव घेत नाही परंतु अशी उदाहरणे पाहिली आहेत .की जिथे तरुण मुलगा संन्यास घेण्याच्या दृष्टीने घरा बाहेर पडला . गृहस्था कडे चातुर्मास केला आणि त्याच्याच मुलीला घेऊन पळून गेला ! अशा तरुणाला आसरा देणाऱ्या गृहस्थाची अवस्था कशी झाली असेल विचार करा! काहीतरी सत्संग घडावा म्हणून घरी बाबाजी बोलावला !  संन्यासही राहिला ! आणि वैराग्यही राहिले ! हातातली एकुलती एक मुलगी देखील गमवावी लागली ! आणि समाजामध्ये पत गेली ती निराळीच ! त्यामुळे असे अजिबात करू नये . आपल्या भाबरीच्या आश्रमामध्ये चातुर्मास करण्याची विनंती अनेक तरुण करतात . त्यांना आम्ही नम्रपणे नकार कळवितो .कारण हा गृहस्थ आश्रम आहे . गृहस्थाश्रमाच्या मर्यादा असतात .त्यात राहूनच सेवा द्यावी लागते . याबाबतीत ओंकारेश्वर येथील मार्कंडेय संन्यास आश्रमासारखे काही आश्रम आहेत जिथे नियम अत्यंत कठोर आहेत . चातुर्मास करण्यासाठी येणाऱ्या परिक्रमा वाशींची तिथे अक्षरशः मुलाखत घेतली जाते . आणि त्यांनी दिवसभर काय करायचे काय नाही करायचे याची मोठी नियमावली असते . आणि ते तसे करत आहेत का नाहीत हे पाहिले जाते ! नवीन लोकांसाठी हे सर्व जाचक वाटू शकते परंतु अत्यंत आवश्यक आहे . असो . 

आम्हास चातुर्मास कर्तव्य नाही । असे नेपाळी बाबांना सांगत पुढे निघालो . आजचा दिवस चालायचा दिवस होता ! परिक्रमे मध्ये तुमच्या तो दिवस लक्षात येतो ज्या दिवशी कितीही चालले तरी तुम्हाला थकवा येत नाही !बहुतेक हा एकादशीच्या उपवासाचा परिणाम असतो ! पचनामध्ये शक्ती कमी कारणी लागते त्यामुळे चालायला हुरूप येतो ! पुढे झोझी घाट नावाचा घाट आहे . अगदी काठावर आहे . एक छोटेसे हनुमान मंदिर आहे . शेजारी एका साधूची कुटी होती . गोठ्यामध्ये एक सुंदर पांढरी गाय आणि तिचे अतिशय गोड वासरू बांधलेले होते . 

झोझी घाटावरील छोटेखानी हनुमान मंदिर .
शेजारी शिवालय देखील आहे .
हनुमंताचा विग्रह !

साधू मस्तपैकी गांजा पीत बसला होता . साधूने माझ्यासाठी गाय गोठ्यातून सोडली आणि उन्हात नेऊन बांधली . मी तसे करू नका असे म्हटल्यावर त्याने मला सांगितले की गायींना थोडेसे ऊन दाखवणे आवश्यक असते . मग मी निश्चिंत झालो .एक चटई त्याने टाकून दिली . त्यावर मी पडलो . वासरू सारखे माझ्याकडे येऊ पाहत होते . त्याच्या जवळ जाऊन त्याच्याशी खेळत बसलो . इथे मी एका वेगळ्याच अवस्थेत पोहोचलेला होतो .आपण कुठे आहोत काय आहोत कसलेही भान नसायचे . देह बुद्धी पूर्णपणे नष्ट झाली होती . परिक्रमेच्या कुठल्या टप्प्यावर आपण आहोत हे देखील कळत नव्हते . फक्त अविरत परिक्रमा चालू आहे आणि राहावी असे वाटायचे ! नजर शून्य असायची . आजूबाजूला काय चालू आहे काही कळायचं नाही . फक्त अस्तित्वाची जाणीव असायची . इथे काही मुले साधू सोबत गांजा प्यायला आली होती . त्यांच्यातला एक मुलगा माझी चित्रे काढतो आहे हे मला माहिती नव्हते . मी ज्या शून्य अवस्थेमध्ये बसलेला असताना वासरू ढुशा मारून मला भानावर आणायचे ! की माझ्याशी खेळ ! मग जरा त्याच्याशी खेळलो की पुन्हा ती अवस्था यायची . असा खेळ चालला होता . नंतर मी चटईवर येऊन बसलो . झोळीला टेकून बसलो . गर्मी खूप होती .छाटीचा एक फायदा असायचा . तिची मानेवरची गाठ काढून टाकली की काम व्हायचे ! एका तरुण  मुलाने मला हाक मारली . मी त्याच्याकडे बघितले आणि त्याने पुन्हा फोटो काढले . काढलेले सर्व फोटो मला त्याने दाखवले . मला ते आवडले . मी मित्राच्या क्रमांकावर ते पाठवण्याची विनंती केली . आणि त्याने पाठवून दिले .आपणही बघा .

हीच ती अनुर्वाच्य अवस्था ! देही असुनी विदेही ! ही प्राप्त होण्यासाठी परिक्रमा करावी !याच्यामध्ये तुमच्या अस्तित्वाचा लय झालेला असतो . आणि तुम्ही पूर्णपणे नर्मदामय झालेले असता ! निराकार निर्विकार परब्रह्माचा साक्षात्कार या सगुण देहामध्ये करून घ्यायचा असेल तर नर्मदा परिक्रमेसारखा सोपा उपाय नाही ! मी असा बसलो होतो आणि वासरू ढुशा मारून मला देहावर आणत होते . आता तुम्हाला दिसताना मी कॅमेऱ्यामध्ये बघतो आहे असे वाटेल . परंतु माझ्यासमोर कोणी मुलगा उभा आहे आणि तो माझे फोटो काढत आहे हे देखील मला तेव्हा कळत नव्हते . ना अंगावरच्या कपड्यांची शुद्ध होती . सुध बुध हरपना अशी काहीशी ती अवस्था होती .मी मुद्दामहून या स्थितीचे शाब्दिक वर्णन करून तुम्हाला सांगतो आहे . ही अनुभूती प्रत्येकाला यावी असे वाटते ! म्हणून हा लेखन प्रपंच .

वासरू सारखे ढुशा मारून त्याच्याशी खेळायला सुचवत होते . मग मी त्याच्या अंगावरील गोचीड काढले . त्याला देखील ते आवडले .

मला ते वासरू म्हणजे साक्षात परब्रह्म आहे ,आणि ते आणि मी एकच आहे असे वाटू लागले ! त्यामुळे अतिशय प्रेमाने मी त्याला आलिंगन दिले . ते देखील माझ्या मिठी मध्ये कुठलीही गडबड न करता बराच वेळ पडून राहिले . या पृथ्वीवरील प्रत्येक जीव शांततेच्या शोधात आहे ! धडपड धावपळ करून शिकार जरी करताना , किंवा चरताना जरी प्राणी दिसला तरी शेवटी ते सर्व करतो ते शांत एका जागी बसण्यासाठीच ! शांतता हा प्रत्येक जीवाचा अधिकार आहे ! शांतता . . . प्रशांतता . . .
ही एक-दोन चित्रे मला फार आवडतात . कमीत कमी शब्दांमध्ये ती माझी नर्मदा परिक्रमा काय आहे हे तुम्हाला सांगतात ! शब्दा वाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले असे होऊ लागले की मजा येते !
अखेरीस मी भानावर आलो आणि मुलगा फोटो काढतो आहे हे माझ्या लक्षात आले ! मग मात्र मी वासराला शांतपणे झोपवले आणि जागेवर येऊन आसन लावू लागलो

साधूने मला तेवढ्यात आसन लावण्यासाठी गोठ्यामध्ये चटई लावून दिली . मुलगा फोटो काढत च राहिला. नंतर त्याने पाठवलेले फोटो पाहिल्यावर मला ते कळाले .इथे आपल्याला निवांत झोपलेले वासरू दिसेल . बाहेर गोमाता उभी आहे परंतु प्रकाशामुळे दिसत नाही . नर्मदा माता देखील समोरच आहे परंतु फोटोत दिसणार नाही

त्या साधूने माझ्यासाठी गाईला बाहेर उन्हात नेऊन बांधले . मला त्याचे खरंच वाईट वाटले . परंतु नंतर त्याचे कारण कळाल्यावर बरे वाटले . गाईच्या अंगावरील परजीवी कीटक उन्हामुळे कमी होतात .मुलाला फोटोग्राफीचा फारसा अंदाज नव्हता . त्यामुळे कधी अति तीव्र तर कधी अति कृष्ण फोटो आले आहेत . परंतु कसेही असले तरी ते माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या प्रवासाचे साक्षीदार असल्यामुळे मी ते जीवापाड जपले आहेत इतकेच ! हा फोटो पाहिल्यावर तुम्हाला त्यातील प्राणी माणसे पक्षी नद्या दिसत असतील . परंतु मला मात्र हा फोटो पहिल्या क्षणी त्यावेळी होती तशी अवस्था प्राप्त होते म्हणून ते महत्त्वाचे आहेत ! ध्यान ध्याने तदृपता ! गोमाता किती सुंदर आहे पहा ! काळे डोळे आणि पांढरी शुभ्र !

वर टाकलेल्या हिरव्या चटईवर ही मुले बसली होती .

मी आसन लावेपर्यंत तो तरुण फोटो काढतच होता . वासरू देखील पडल्या पडल्या बाबाजीचे काय चालू आहे ते पाहते आहे !

अखेर त्या तरुणाकडे माझे लक्ष गेले . त्या मुलाचे खूप आभार मी मानतो . कारण परिक्रमेमध्ये मी निवांत बसायचो म्हणजे कसा बसायचो ? तर ती ही अवस्था आहे !

 रेवा माईका तट हो । गौ संत निकट हो । प्रेम निष्कपट हो । तो मोक्ष झटपट हो ।

रेवातटीची शांतता अनुभवताना

अखेरीस मी त्या मुलाचा मोबाईल मागून घेतला . सर्व फोटो पाहिले . आणि एक सेल्फी काढला !

 हाच त सेल्फी ! रेवा नावाचा गुजराती चित्रपट आहे .त्यात सेल्फी या शब्दाचा खूप सुंदर वापर करण्यात आलेला आहे ! नर्मदा मातेचे स्वरूप आणि आपली स्वरूप ओळखणे म्हणजे सेल्फी ! पहावे आपणासी आपण या नाव-ज्ञान । असे रामदास स्वामी म्हणतात . 
दर्पणी पाहता रूप न दिसे हो आपुले । बाप रखुमादेवीवरे मज ऐसे केले ॥ असे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात . 
तुका म्हणे होय मनाशी संवाद । आपलाची वाद आपणासी ॥ असे तुकोबाराया म्हणतात !
आताच्या भाषेत आपण त्याला सेल्फी म्हणूया ! इथून पुढे सेल्फी हा शब्द ऐकला की हे सर्व आठवू दे ! मजा येईल ! मी माझ्या घरातल्या आरशावर लिहून ठेवले होते "स्वरूप पहा " .त्यामुळे महाविद्यालयीन जीवनामध्ये जेव्हा जेव्हा आरशा पुढे जायचो तेव्हा तेव्हा उन्मनी स्थिती प्राप्त व्हायची ! केसाचा भांग पाडणे वगैरे बाजूलाच राहायचे ! परंतु देह बुद्धीच हरपून जायची . घर संसार व्हावा मूल जन्माला यावे म्हणून गुरूंनी ऐन तारुण्यात ही अवस्था काढून घेतली . मला मोक्ष द्या . त्यासाठी तुम्हाला गुरु केलेले आहे !असे लेखी पत्र मी गुरूंना अजाणत्या वयात पोटतिडकीने लिहिले होते . सध्या घरदार मुले होऊ सारे दे . योग्य वेळी तुला ती अवस्था परत देऊ असे माझ्या गुरूंनी मला एका लेखी पत्राद्वारे कळवले होते .संभाजीनगर येथे ते आप्पा देसाई यांच्या घरी मुक्कामी होते .स्वामींनी सांगितलेला मजकूर आप्पांनी त्यांच्या हस्ताक्षरात लिहिला होता .आणि खाली जनार्दन स्वामींची सही होती .. गुरुकृपा ही केवलम् ।
आज नर्मदा परिक्रमा करताना मला ते हरवलेले भंडार पुन्हा गवसले होते ! ती अवस्था पुन्हा एकदा प्राप्त झाली होती ! मी स्वतःलाच हरपून बसलो होतो . तरी देखील स्वतःच स्वतःला सापडलो होतो ! स्वतःच स्वतःला स्वतःमध्येच पाहत होतो ! आणि सगळीकडे स्वतःलाच पाहत होतो ! नर्मदा माता समोर शांतपणे वाहत होती . आणि माझी तिच्याभोवती चालू होती अविरत परिक्रमा ! 
परिक्रमा . . . . . जी कधीच संपू शकत नाही ! नर्मदे हर !




लेखांक एकशे एक्काहत्तर समाप्त (क्रमशः )

टिप्पण्या

  1. नर्मदे हर 🙏🙏🙏🙏🙏💐

    उत्तर द्याहटवा
  2. Tumcha vaasra barobar cha pahila photo, ekdam Shri gajanan maharaj yanchi aathvan aali.
    Pudhe tumhi selfie baddal lihile, Shri ni dilela pahila updesh hach hota.

    हें अवघें चरचर । ब्रह्में व्याप्त साचार ।
    तेथें गढुळ,निर्मळ वासित नीर । हे न भेद राहिले ॥३९॥

    पाणी तरी तोच आहे । निर्मळ गढुळ तोच पाहे ।
    सुवास कुवास दोन्ही हें । रुप त्याचें निःसंशय ॥१४०॥

    पिणाराही वेगळा । त्यापासून ना निराळा ।
    ईश्वराची अगाध लीला । ती कळे या नरजन्मीं ॥४१॥

    तें दिलें टाकून । व्यवहारीं गोविलें मन ।
    यांचेंच करा सदा मनन । कशापासून जग झालें ॥४२॥

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

जे आवडते सर्वांना ...

अनुक्रमणिका (Index)

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

लेखांक १ : नर्मदे हर !

लेखांक २ : भोपाळ जवळच्या जंगलातील अपघात

लेखांक ३ : चोराची धन

लेखांक ४ : झुठा कही का ! सबकुछ तो लाए हो !

लेखांक ५ : ग्वारीघाट जबलपुर मध्यप्रदेश

लेखांक ६ः झुलेलाल आश्रम , ग्वारी घाट

लेखांक ७ : नाभिकाने केलेला जाहीर __मान !

लेखांक ९ : इंदौरी पोहा आणि गरमा गरम जलेबी !