लेखांक १७० : बरबटीची गुप्तकुटी , पावसाचा हल्ला आणि उमाचरणदास जी महाराजांचे कुँडाकला
गुरु गुफा आश्रमामध्ये सन्यासी महाराजांनी मला सातूचे पीठ दिले आणि आता जा म्हणून सांगितले . त्यांना दंडवत प्रणाम केला आणि काठाने चालत चालत हिरापूर या गावी आलो . आता वाळू काढणारे नगण्य होत चालले होते . नावांचा आकारही बदलत चालला होता . त्याची रेखाचित्र काढून ठेवली आहेत .
इथे हिरन नावाची नदी पार करावी लागते .ही नदी खूप मोठी आहे . आणि महत्त्वाची मानली जाते .समोरच्या तटावर इथेच एक परिक्रमावासी परिक्रमा उचलत होता त्याचे भोजन मिळाले होते . हिरन हथनी शेर अशी प्राण्यांवरून दिलेली नद्यांची मजेशीर नावे नर्मदा खंडामध्ये पाहायला मिळतात!
वाटेमध्ये अनेक तीर्थक्षेत्रे आहेत . संगमेश्वर महादेवाचे मंदिर . कृष्णाचे मंदिर आहे .हरणेश्वर महादेवाचे मंदिर आहे. इथले वैशिष्ट्य असे की इथला नंदी उभा आहे . बसलेला नाही . एक राधा कृष्णाचे मंदिर देखील जोगीपुरा गावात आहे .पुढे पावला गाव लागते .
इथून पुढे नरसिंहपूर जिल्हा संपून जबलपूर जिल्हा सुरू होतो . जबलपूर जिल्ह्यामध्ये पाऊल ठेवल्याबरोबर माझ्या काळजामध्ये चर्र झाले . जबलपूर जिल्ह्यात आल्याबरोबर समोर ब्रह्मकुंड दिसू लागले . इथे काठा काठाने खूप चाललो .माझे कुठे लक्षच लागत नव्हते .कुठल्याही मंदिराचे दर्शन घ्यायची इच्छा होत नव्हती .फक्त वेड्यासारखा चालत सुटलो होतो. सुमारे २० किलोमीटर चालत बरबटी गावामध्ये आलो . प्रचंड भूक लागली होती . आजूबाजूला कुठलेही मठ मंदिर काही दिसेना . वरच्या बाजूला टेकाडावर एक झोपडी दिसली . वरती झेंडा लावला होता . याचा अर्थ कुणीतरी धार्मिक मनुष्य राहत असणार असा विचार करून मी वर गेलो . कुटी ला दार नव्हते . आत मध्ये काहीच नव्हते . एक छोटीशी चूल होती . थोडाफार लाकूडफाटा होता . भगव्या रंगाचे कपडे वाळत घातले होते . याच्यावरून मला कळले की ही एखाद्या साधूची कुटी आहे . कोपऱ्यामध्ये अधिष्ठान मांडलेले होते . जपाची माळ ,शंख , घंटा वगैरे सर्व होते .त्या साधू कुटी मध्ये मी बराच वेळ बसलो .आता साधू येईल मग साधू येईल अशी वाट पाहत बराच वेळ निघून गेला . पोटातली भूक अजूनच खवळू लागली . आज इंग्रजी तारीख देखील अकरा जून होती आणि तिथी देखील एकादशी होती . अकरा अकरा बहु अकरा ! कडक उपवास घडल्यामुळे त्यामुळे आज अजूनच भूक लागली होती . समोर खिचडी बनवण्याचे सर्वसामान काढून ठेवलेले होते . भिजवलेला साबुदाणा होता . दाण्याचे कुट होते . लंका म्हणजे मिरची होती .जिरे होते .तूप होते आणि मीठ होते . एक पातेले देखील होते . एका माठामध्ये पाणी भरून ठेवले होते . मी अखेरीस नर्मदा मातेला नमस्कार केला आणि खिचडी बनवायला घेतली ! सामान भरपूर होते त्यातली मी फक्त थोडीशीच सामग्री घेतली आणि खिचडी बनवली . पोटभर खाल्ली ! तरी देखील कोणी येईना . अखेरीस माझ्याजवळ जेवढे पैसे शिल्लक होते ते एका ताटाखाली झाकून ठेवून त्यावर दगड ठेवला आणि नर्मदे हर असा पुकारा करून पुढे चालू लागलो ! साधू महाराजांना जी काही सामग्री लागेल ती त्यातून त्यांनी आणावी असा हेतू . उतार उतरलो आणि नर्मदा मातेला म्हणालो , "वा माई ! छान सोय केलीस माझी ! अगदी वेळेला फराळ उपलब्ध करून दिलास ! " तिथे एका झाडाची वाळलेली फांदी पडलेली होती . मी असा विचार केला की या फांदीची लाकडे तोडून झोपडी मध्ये नेऊन ठेवावीत . कारण मी काही लाकडे वापरली होती . म्हणून लाकडे तोडली आणि मागे पाहिले तर जिथे मला झोपडी दिसली होती तिथे काहीच नव्हते . फक्त खाली उतरणारा रस्ता होता . मी पुन्हा पुन्हा डोळे चोळून पाहिले .परंतु त्या ठिकाणी झोपडी नव्हतीच ! नर्मदा मातेला साष्टांग नमस्कार केला . तिचा जयजयकार केला आणि पुढे चालू लागलो .आज हे असे अनुभव सांगताना मला काय बोलावे तेच कळत नाही . कारण भौतिकशास्त्राच्या कुठल्याही नियमांमध्ये मितीमध्ये बसणारी ही अनुभूती नाही .परंतु अनुभव आला आहे हे मात्र खरे . त्यामुळे नर्मदा मातेचे स्मरण करून हे सर्व अनुभव आपल्याला सांगतो आहे . असाच अनुभव मला यावा असा दुराग्रह कृपया कोणी धरू नये . इतकेच वाटते . मी या संपूर्ण लिखाणामध्ये प्रत्यक्षात आलेले अनुभव सांगणे नेहमीच टाळले आहे . त्याचे कारण स्पष्ट आहे . अनुभूती ही अत्यंत सापेक्ष असते .व्यक्तीसापेक्ष असते ,भक्तीसापेक्ष असते , भावसापेक्ष असते ,ज्ञानसापेक्ष असते , आकलनसापेक्ष असते . आज परिक्रमा शेवटच्या टप्प्यावर आली आहे तेव्हा मी तुम्हाला खात्रीशीरपणे एक गोष्ट सांगू शकतो . संपूर्ण परिक्रमेदरम्यान एकदाही मला नर्मदा माई ही केवळ एक नदी आहे किंवा केवळ पाण्याचा एक मोठा जलप्रवाह आहे असा भाव एकदाही चुकूनही आला नाही . मला सदैव , ती एक भगवती आहे , शक्ती आहे , देवी आहे ,परब्रह्मस्वरूपिणी आहे , आई आहे असेच वाटत राहायचे . माझे हे भान एकदाही सुटले नाही . चुकूनही नाही .वाटेत कितीही मोठे संकट आले तरी मी नर्मदा मातेवर किंवा तिच्या अस्तित्वावरच कधी शंका घेतली नाही . उलट नर्मदा माता आपली या प्रसंगाद्वारे परीक्षा बघते आहे असा माझा भाव असायचा . कुठे प्रमाणाबाहेर कोड कौतुक झाले तरीदेखील नर्मदा माता आपली अजूनच कठीण परीक्षा घेते आहे असे मी स्वतःला समजावून सांगायचो . व्यवस्था असो गैरव्यवस्था असो अपमान असो सन्मान असो किंवा उपवास घडणे असो किंवा पडून जखमी होणे असो मी कधीच असा विचार केला नाही की खरोखरीच ही नर्मदा माता अस्तित्वात आहे का ? अ हं ! अजिबात नाही ! असलं पाप कधी डोक्यात सुद्धा आलं नाही . त्यामुळे जे अनुभव आले ते मला चमत्कार वाटतच नाहीत . कारण तीच आहे जी सर्वप्रकारे आपल्याला तावून सुलाखून काढते आहे .आई आहे ती . तिला मुलाच्या भुकेची काळजी नसणार तर कोणाला असणार ? आणि त्यात मुलगा इतका नालायक असेल की पुढचे मागचे कुठलेही नियोजन न करता चालतो आहे ,मग तर तिची जबाबदारी अजून वाढणार ना ! तसेच काहीसे या ठिकाणी झाले . मी आत्ता आपणा सर्वांसाठी या घटनेचा इतका उहापोह करतो आहे परंतु त्या क्षणी मी कुठलाही विचार न करता पुढे चालू लागलो होतो . परिक्रमेची हीच मोठी देणगी आहे . कुठल्याही गोष्टीचा फारसा विचार करू नये . पुढे चालत राहावे . चरैवेति चरैवेति । चालताना खूप ऊन लागत होते . उन्हाचा दाह असह्य झाला . म्हणून मी अजूनच काठाने चालू लागलो . इथे एक सुंदर वाळूचा किनारा मला दिसला . रामेश्वरम येथे धनुष्कोडी नावाचा समुद्रकिनारा आहे . त्याची मला आठवण आली . तिथे बंगालच्या उपसागराला होता त्याच प्रकारचा वाळूचा उतार होता . तीव्र उतार ! त्यामुळे स्नान करण्यासाठी उत्तम जागा ! वाळूमध्ये बसून मी मैयाचे जल अंगावर घेऊ लागलो . बसल्यावर बुडाला वाळूतले खेकडे हळूच चाऊन पळू लागले ! गंमत म्हणजे रामेश्वरम इथे देखील मला हाच अनुभव आला होता ! तिथे तर खेकड्याने चावून रक्त काढले होते ! इथले खेकडे आकाराने लहान होते . इथे शेजारीच एका केवटरामाची कुटी होती . तिच्यामध्ये जाऊन शांतपणे पडलो . मोजे कुटीच्या बांबूला वाळत घातले . बूट आल्या आल्या अस्ताव्यस्त काढलेले होतेच . कुटीमध्ये मस्तपैकी पडून नर्मदा मातेचे दर्शन घेत राहिलो . असा आनंद परिक्रमे मध्ये खूप वेळा लुटला . परंतु यावेळी एक वेगळी घटना घडली . ज्या केवटाची कुटी होती तो मला पाहून नाव घेऊन काठावर आला . आणि येता येता त्याने पाण्यातूनच माझे फोटो काढले . काठावर आल्यावर माझ्याशी गप्पा मारत बसला . तरुण होता . त्याच्या मोबाईलवर अजून काही फोटो काढले . आणि त्याला मित्राच्या क्रमांकावर पाठवायला मी सांगितले . थोडा वेळ गप्पा मारल्या आणि तो मला म्हणाला की बाबाजी आज मोठा वादळी पाऊस येणार आहे तुम्ही लवकरात लवकर पुढच्या आश्रमात पोहोचा .उन्हाने अंगाची काहीली होत होती . आणि आकाशामध्ये एक सुद्धा ढग नव्हता . अशावेळी पाऊस पडणे कसे शक्य आहे ? मी माझी स्वाभाविक शंका त्याला विचारली . तो म्हणाला कसे काय ते सांगता येणार नाही . आम्ही केवट आहोत . नाव घेऊन मैयाच्या पोटात जातो तेव्हा मैय्या आम्हाला प्रेरणा देत असते .आज मैयाने सांगितले आहे की जोरात पाऊस पडणार आहे घरी जा . म्हणून तर मी दुपारीच घरी निघालो आहे . तुम्ही पण जा . मला असे वाटले की केवटाला मी त्याच्या कुटीमध्ये झोपलो आहे हे आवडले नसावे . म्हणून मी ठीक आहे असे म्हणालो आणि पुढे चालू लागलो . त्या केवटाच्या कुटीमध्ये काढलेले काही फोटो आपल्या माहितीसाठी देत आहे .
वाघ सिंह इत्यादी हे हिंस्र प्राणी कितीही भयानक असले तरी ते इतरांसाठी !त्यांची पिले मात्र बिनधास्त त्यांच्यापुढे खेळत असतात ! तसेच आपले आहे ! नर्मदा मातेची आपल्याला कसली भीती ! तिची भीती जगाला ! आपल्यावर तिची फक्त प्रीती ! पोटच्या मुलाची प्रीती ! आणि ती मुळात शरणागत वत्सल आहे ! त्यामुळे थेट तिच्या उदरात शिरूनच तिला शरण गेलो ! तो अनुभव केवळ अविस्मरणीय होता ! आयुष्यभर लक्षात राहील असा ! असो . नर्मदे हर आवाजाच्या दिशेने गेलो आणि एक घर दिसले . अक्षरशः पाच दहा फुटाच्या पलीकडचे दिसणार नाही इतका पाऊस चालू होता .या लोकांनी मला कुठून पाहिले काय माहिती . हा दिवस होता ११ जून २०२२ ! मान्सूनचे भारतातील जोरदार आगमनाचा दिवस ! चार पावले चालताना सुद्धा होणारे कष्ट पाहून मला असे वाटू लागले की आता बहुतेक आपली परिक्रमा अर्धवट राहते !आणि याचे दुःख वाटण्या ऐवजी आनंद वाटू लागला !कारण शेवटचे काही दिवस माझ्या मनामध्ये प्रामाणिकपणे अशी इच्छा प्रबळ होत चालली होती की काय वाटेल ते झाले तरी परिक्रमा पूर्ण करायची नाही ! म्हणजे पुन्हा तिच्या काठावर फिरायला मिळेल ! पुन्हा एकदा तिचा सहवास लाभेल ! एक प्रकारे मी खुश झालो ! या घरामध्ये मला बाहेर ओसरी मध्ये बसायला जागा दिली गेली . मालकाने आत मध्ये जाऊन रंगा आणला . रंगा म्हणजे कोरा चहा ! या भागात त्याला रंगा म्हणतात ! हा मनुष्य पुण्याला लोहगावला साजिद पुनावाला कडे कामाला होता असे त्याने मला सांगितले . पुण्यामध्ये त्याने वडापावच्या दुकानात देखील काम केले आहे असे तो मला म्हणाला ! आणि पुन्हा एकदा माझ्या वडापावच्या इच्छे वर मगाशीच मी झाकलेला कल्पनेचा कागद बाजूला उडाला ! आणि मनातल्या मनात गरमागरम बटाटे वडे तळू लागले ! जणू काही मैया मला चिडवत होती ! घे वडापाव ! कल्पनेचे वडापाव खा !थोड्याच वेळात पाऊस कमी झाला . जवळपास उघडलेच . तसाही मी पूर्ण भिजलो होतो . त्यामुळे या कुटुंबाची रजा घेतली आणि पुढे चालू लागलो . प्रचंड चिखल तुडवत थेट मुआर घाटासमोरचे कुडाकलाँ गाव गाठले . वाटेत सुंदर लिंगे सापडतच होती . पावसामुळे स्वच्छ धुऊन निघालेली ! धुळीमध्ये दगड इतके चांगले दिसत नाहीत जितके पावसामध्ये दिसतात ! शिवलिंग विकणारे व्यापारी सुद्धा कोरडे शिवलिंग न दाखवता पाणी लावून दाखवतात याचे कारण तेच आहे ! पाणी लावलेले शिवलिंग अधिक आकर्षक दिसते . त्यातील रंग आणि आकार अधिक उठून दिसतात .कुडाकला गावामध्ये एक हनुमान मंदिर होते असे कळले . झाडीतून जंगलातून रस्ता शोधत हनुमान मंदिरात प्रकट झालो ! या आश्रमाचे महंत उमाचरणदासजी महाराज म्हणून उडिया बंगाली साधू होते . त्यांनी मला झाडीतून वर येताना पाहिले . आणि त्यांना खूप आनंद झाला ! या मार्गाने येणारा परिक्रमा वासी हा शंभर टक्के काठावरचाच असणार ! कारण हा आश्रम रस्त्यापासून खूपच आत होता . आणि इथे कोणीच परिक्रमा वासी फारसे यायचे नाहीत असे महाराजांनी नंतर मला सांगितले . महाराजांना बिडी गांजाची खूप सवय होती . ते म्हणायचे .
"धुआँ और धूप । साधू का रूप । "
यांचे प्रयागराज इथे राहणारे एक गुरुबंधू इथे आलेले होते .वयस्कर साधू होते . त्यांना मात्र साधूंचे हे म्हणणे पटत नसे . दोघांची या विषयावरून सतत भांडणे होत . म्हणजे उमा चरणदास काही बोलत नसत परंतु हे वयस्कर गुरुबंधू यांची सतत कान उघाडणी करत . उमा चरणदास महाराज एखादाच नो बॉल बघून षटकार मारायचे आणि पुन्हा शांत बसायचे ! त्यांचा स्वभाव थोडासा विनोदी होता . आणि वयोवृद्ध साधू मात्र अतिशय तळमळीचे ,सात्विक आणि तत्ववादी होते .स्पष्ट वक्ते होते .त्यांच्या शेजारी आसन लावण्याची सूचना त्यांनी मला केली .महाराजांनी तखत धारण केला होता . मलाही तखत घे म्हणत होते . परंतु मी जमिनीवर आसन लावले .आपण साधूं समोर आपली पायरी ओळखूनच वागले पाहिजे . मला त्या प्रयागराजच्या महाराजांचा खूप सत्संग लाभला .ते माझ्यावर भलतेच खुश झाले . खूप मनापासून त्यांनी माझ्याशी संवाद साधला . एकादशी असल्यामुळे रात्री आश्रमात काही नव्हते . पातेलंभर दूध तेवढं प्यायलो ! रात्री बाहेर उघड्यावर सर्व कर्मचारी झोपायचे त्यांच्यासोबत मी देखील बाहेर झोपलो . एक मोठी सिमेंटची पाण्याची टाकी होती त्यावर मी झोपलो . रात्री तुफान पाऊस आला ! सगळेजण आत मध्ये आले ! आणि झोपले . त्यांच्यापैकी कोणाच्यातरी लक्षात आले की एक माणूस कमी वाटतो आहे . म्हणून ते बाहेर बघायला आले तर त्या भर पावसात मी निवांत झोपलो होतो ! मला पाऊस चालू आहे हेच कळत नव्हते !इतका प्रचंड थकलो होतो किंबहुना कालपासून अर्थात मैया मध्ये डुबकी मारल्यापासून पाण्याचा स्पर्शच हवाहवासा वाटत होता ! स्वप्नातही मैय्याच दिसे , जागृतीतही तीच ! सेवेकऱ्याने मला उठवले आणि आत नेले ! सर्वजण मला हसू लागले ! काय बाबाजी ! ही कुठली पद्धत ! एवढा पाऊस आला तरी तुम्हाला जाग कशी येत नाही ! आता माझी झोप आहेच तशी खोल तर काय करू मी ! नाही येत मला जाग ! मला लाभलेली ती सगळ्यात सुंदर अशी परमेश्वरी देणगी आहे ! पाठ टेकताक्षणी झोप लागते! आणि झोप पूर्ण होईपर्यंत ब्रह्मदेव उठवायला आला तरी जाग येत नाही ! असो . आज खूप उशिरा उठलो . म्हणजे साधारण पाच वाजता ! पाऊस चालूच होता . पावसातच डोलडाल ला जावे लागले .
आश्रमातील मारुतीरायाआश्रम मोठा असून लोकांची सतत ये जा असते . बाबांना भेटायला खूप लोक येतात .
वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्टर वाले आणि डंपरवाले देखील आश्रमाशी जोडले गेलेले आहेत .
उमा चरणदास महाराज विरक्त होते त्यामुळे त्यांचा फोटो कुठे सापडला नाही . जाण्यापूर्वी उमाचरणदास महाराजांनी माझी झोळी किती जड आहे ते उचलून पाहिले होते . तसेच माझी परिक्रमा ग्वारी घाटावर पूर्ण होणार आहे हे त्यांना कळले होते . त्यांनी माझ्यापुढे एक प्रस्ताव ठेवला . ते म्हणाले . तुझ्या झोळीतली शिवलिंगे तू इथे काढून ठेव .त्याला कोणीही हात लावणार नाही ही माझी जबाबदारी ! तू पुढे निघून जा . आमच्या गावातून रोज वाळू घेऊन हैवा ट्रक जबलपूरला जातात . त्यांच्यापैकी एखाद्या ड्रायव्हरच्या हाती मी तुझी शिवलिंगांची पिशवी पाठवून देतो . बाकी तुझे नेहमीचे सामान सोबत राहू दे . मला हा विचार पटला . अतिशय सूज्ञपणाचा हा विचार होता . आणि नसता तरी मी हेच केले असते कारण माझ्या पाठीची क्षमता आता संपत चालली होती ! पाठीचा मणका मोडतो की काय अशा अवस्थेपर्यंत आला होता ! ज्यांना ज्यांना मी शिवलिंगे दिलेली आहेत त्यांनी कृपया त्याची रोज पूजा करावी ! कारण ती मी किती कष्टाने आणि कशा परिस्थितीमध्ये वागवली आहेत हे फक्त मला आणि नर्मदा मातेला माहिती आहे ! आता ती वाटून संपली आहेत बरं का ! पहिल्या महिन्यातच सर्व वाटून झाली ! असो . माझा फार मोठा भार महंतांनी हलका केला ! या आश्रमामध्ये सुंदर गायी होत्या . परंतु त्यात काही जर्सी गायी सुद्धा होत्या .त्याबद्दल महाराजांना सांगितले . ते म्हणाले की सर्व माहिती आहे परंतु लोक दान देतात त्याला काय करावे ! "लोकांचे प्रबोधन हाच त्यावर उपाय आहे महाराज " मी म्हणालो . महाराजांनी मला जाताना अतिशय नियोजनपूर्वक काही गोष्टी दिल्या . सर्वप्रथम त्यांनी दिनेश सिंह राजपूत नावाच्या डंपर चालकाचा संपर्क मला दिला . आणि जबलपूर शहरातल्या अंधामुख बायपास इथे तो रेतीचा ट्रक घेऊन रोज उभा राहतो तिथपर्यंत मला यावे लागेल असे सांगितले . महाराजांनी त्यांचा देखील क्रमांक मला दिला . आपणापैकी कोणाला नर्मदा मातेची सेवा करायची असेल तर आपण महाराजां शी संपर्क करू शकता .
महंत श्री उमाचरणदासजी महाराज . कुँडाकला . तहसील पाटण जिल्हा जबलपूर . ९३० १५६ ११३८
दिवसाची सुरुवात चमत्काराने न करेल ती नर्मदा माई कसली ! आता मी निघणार तेवढ्यात महाराजांनी मला आवाज दिला . म्हणाले बाबाजी काल तू उपाशी झोपलास . आता आज द्वादशी आहे . बालभोग करून पुढे जा . तयार आहे बालभोग . असे म्हणून महाराजांनी अजस्त्र मोठे चार गरमागरम बटाटेवडे आणले ! आणि मला बळजबरीपूर्वक खायला लावले ! मी त्यांना म्हणालो की तुम्ही बटाटे वडे कसे काय केले ?महाराज म्हणाले बऱ्याच वर्षांमध्ये आम्ही वडे तळले नव्हते . माझे गुरु भाई आलेले आहेत त्यांना आलुबोंडा कसा असतो ते मला दाखवायचे होते म्हणून आज केले .मग मी महाराजांना केवळ १२ तासापूर्वी मी कच्चा बटाटा खाताना मैयाला काय म्हणालो होतो ते सांगितले ! ते ऐकल्यावर महाराजांनी अजून चार बटाटे वडे सोबत बांधून दिले ! मैया म्हणाली , " खा लेकाच्या बटाटेवडे ! " ते वडे इतके मोठे होते की एकाच वड्यात पोट भरावे ! महाराज मला म्हणाले आता रस्त्याने जा . जबलपूर जवळ आहे . मी काहीच बोललो नाही .महाराजांचा निरोप घेतला आणि पुन्हा जंगलामध्ये घुसलो . महाराज जोरजोरात हसू लागले ! त्यांच्या लक्षात आले असेल की हा आपल्याच पट्टीतला दिसतोय ! मैया चा किनारा पकडला . समोर सुंदर असा मुआर घाट दिसत होता .या भागात मैय्या खूप सुंदर आहे हे आपण त्या प्रकरणात पाहिलेच आहे . परंतु का कुणास ठाऊक माझी पावले आता फारच जड झाली होती . एक एक पाऊल टाकताना प्रचंड कष्ट होत होते . खरंतर पाठीवरचे वजन जवळपास संपलं होतं . पंख आलेत पाठीला असं वाटायचं ! पण पावलं मात्र जड झाली होती . आज पाऊस थांबला होता . परंतु बहुतेक मैयाला माझा पाय कोरड्या जमिनीवर पडणं मंजूर नव्हतं . त्यामुळे प्रत्येक पावलाला ती माझ्या डोळ्यातून अश्रू ढाळवू लागली . एकही पाऊल असे पडले नसेल जेव्हा माझ्या डोळ्यातले पाणी खाली पडत नसेल . आयुष्यामध्ये इतका अश्रुपात मी कधीच केला नाही ! अखंड अश्रूधारा ! ती भावना शब्दात व्यक्त करता येणे अवघड आहे . कारण ती शब्दांच्या पलीकडची जाणीव आहे . तिथे पोहोचले की शब्द संपतात . आणि सुरू होतात ,अश्रूधारा ! श्रावण सरींसारख्या अश्रू धारा ! एकटं चालण्याचा एक फायदा असतो . तुम्हाला कोणीच बघत नाही .तुम्ही सर्वजण इतके दिवस माझ्यासोबत चालताय . तुम्हाला सांगायला काय हरकत आहे ! शेवटचे काही दिवस चालताना अक्षरशः ओक्सा बोक्षी रडायचो . वेड्यासारखा धावत जाऊन मैयामध्ये शिरायचो . तिला बिलगायचो . तळाशी जाऊन बसायचो . तिच्यामध्ये बुडलेल्या खडकांना मिठी मारायचो ! ठार वेडा झाल्याची लक्षणे ! म्हणेनात का लोक वेडा ! मला शेवटपर्यंत हे लोक थोडी सांभाळणार आहेत ? मला सांभाळणार आहे माझी आई ! नर्मदा माई ! आई ! सांभाळशील ना गं आई!
नर्मदे हर !
लेखांक एकशे सत्तर समाप्त (क्रमशः )
😥😢
उत्तर द्याहटवानर्मदे हर 🙏🏽🌹
उत्तर द्याहटवावाचताना डोळे कधी वाहू लागले ते कळलं सुद्धा नाही.. आणि विचार आला सच्चा परिक्रमावासी.... तुमच्या सेवा कार्याने सिद्ध झाले आहे बाबाजी... तुम्हांला सा.दंडवत.
मैय्याने तुमच्या खूप परिक्षा घेतल्या आणि तुम्ही १००% ने उत्तीर्ण झालात.मैय्याला तुमचा खूप खूप अभिमान वाटतो बाबाजी.
नर्मदे हर 🙏
उत्तर द्याहटवाभक्तीचिये बळे जिंकले देवाला
उत्तर द्याहटवाप्रताप हा केला थोर जगी ॥
तयाच्या पायाची धूळ लाभो माथा
आणि त्याच वाटा मिळो जीवा ॥