दुधाचा चहा व बालभोग घेऊन निरंजन बाबांचा आश्रम सोडला आणि काठाने चालत केरपानी गावात आलो . गावात फारसे काही नव्हतेच त्यामुळे काठाने चालत चालत पुढे निघालो .इथे एक छोटासा पुल लागतो तो खालून ओलांडला .
आनंद मठाची टेकडी पार केल्यावर मैया पुन्हा सरळ होते . केरपानी गावाच्या पुढे मैया काही काळासाठी वायव्य वाहिनी होते .
केरपानी गावाच्या जवळचा पूल .
या भागात सर्वत्र संगमरवर असल्यामुळे महादेवाच्या पिंडी देखील संगमरवराच्या दिसतात
पहाटेचे या भागातील मैयाचे दृश्य खूप सुंदर असते
इथून पुढे काही किलोमीटर मैयाच्या काठी खूप चांगली शेती आहे .
पिठेरा गाव ओलांडून डोंगर गावात पोहोचलो .या भागातील गावांची नावे मोठी विचारपूर्वक ठेवण्यात आलेली आहेत असे माझे लक्षात आले . आता हेच पहा ना या संपूर्ण भागात एकच डोंगर आहे म्हणून या गावाचे नाव डोंगरगाव ठेवले असावे . काल मी थांबलो ते हथिया गाव ,इथले दगड हत्तीच्या कातडी सारखे दिसतात . केरपाणी गावामध्ये वळण असल्यामुळे एका बाजूला मैयाच्या पाण्यातून वाहून आलेला केरकचरा साठतो . सकाळचा बालभोग पोटात असल्यामुळे आज भरपूर चालता आले . याबाबत सर्वत्र खूप छान शिवलिंगे सापडतात . विशेषतः दुर्मिळ अशी पांढऱ्या रंगाची संगमरवराची शिवलिंगे इकडे अधिक सापडतात . अंतिम टप्प्यामध्ये असल्यामुळे दिसेल ते शिवलिंग घेत होतो .आणि पाठीवरचा भार त्यामुळे काहीच्या काही वाढत चालला होता . पिठेरा गावामध्ये एक रामाचे किंवा गोपाळ कृष्णाचे मंदिर होते . (मी वहीत राम मंदिर लिहीले आहे .नकाशामध्ये गोपाळ कृष्ण मंदिर दाखवले आहे . ) मंदिर अतिशय सुंदर होते . उत्तम कोरीवकाम असलेले लाकडी खांब होते . मंदिर छोटेसेच परंतु आवर्जून पाहण्यासारखे होते . या गावाच्या समोर गरारू घाट होता . गरारू घाटावरील प्रसिद्ध ऐतिहासिक मंदिरांच्या गच्चीवरून मी पीठेरा गावातील किल्ला पाहिला होता . आणि समोरच्या ताटावर गेले की तो आपण पाहायचा असे डोक्यात ठेवले होते . आता ती वेळ आली होती . मी राममंदिरामध्ये सर्व सामान ठेवले आणि किल्ला बघण्यासाठी गेलो . गोंड राजा बळवंत सिंह यांनी बांधलेला हा भव्य दिव्य किल्ला होता . महाद्वार सुस्थितीमध्ये होते परंतु आत मध्ये खूप पडझड झालेली होती . तीन मजले होते आणि सर्वच ढासळलेले होते . जुन्या पद्धतीचे चुन्यातील बांधकाम होते . आत मध्ये खूप सारी दालने आणि जिने वगैरे होते . सोळाव्या सतराव्या शतकातले हे बांधकाम होते . हा राजा आसपासची १८२ खेडी सांभाळीत असे

याच मंदिरात मी सामान ठेवले . अतिशय सुंदर मंदिर होते .
पारंपारिक बांधकाम असल्यामुळे कडक उन्हामध्ये देखील गारवा होता . इथले कोरीव काम , दरवाजे , खांब ,तुळया पाहण्यासारखे होते .
विशेषतः प्रत्येक खांबावर केलेले वेगळेवेगळे नक्षीकाम लक्षात राहणारे होते ! असे काम पूर्वी कुठेच नाही पाहिले !
एक एक खांब म्हणजे उत्कृष्ट वास्तुकलेचा सुंदर नमुना होता ! विशेषतः खालच्या बाजूला त्यांचा व्यास फारच लहान होता .
खांबाच्या सर्वात वरच्या भागात असलेल्या बोधिका किंवा पुष्पबंधीका निखिल वैशिष्ट्यपूर्ण आणि पाहण्यासारख्या होत्या .
एकंदरीत या मंदिरातले खांब लक्षात राहिले !
जवळच राजमहाल देखील होता .
साधारण १७ व्या शतकातली ही वास्तू आता बऱ्यापैकी मोडकळीला आलेली आहे .
गच्चीवरून समोरच्या गरारू घाटावरील गरुडाचे मंदिर व शिवमंदिर खूप छान दिसते ! हा महाल देखील मी त्या बाजूने बघितला होता !
महालाची पुढची बाजू मात्र सुरक्षित आहे .
इथे येणारे पर्यटक वास्तूचे खूप नुकसान करतात असे माझ्या लक्षात आले . आपली नावे भिंतीवर लिहिणे आणि नको नको ती कामे इथे लोक करून जातात . चोऱ्या माऱ्या तर नित्याच्या आहेत .
सर्व चुने गच्ची बांधकाम आहे .
एकातून दुसरे दुसऱ्यातून तिसरे अशी अनेक दालने बांधलेली आहेत
काही दालने सुस्थितीत आहेत परंतु स्वच्छतेचा अभाव आहे .एकंदरीत पुरातत्त्व खात्याचे या वास्तूकडे दुर्लक्ष आहे असे जाणवते .
त्याचा अपलाभ घेत वास्तूच्या मागे एक दर्गा अलीकडे बांधण्यात आलेला आहे .
इथून समोर दिसणाऱ्या गरुड मंदिराची व गरुड पुरी अथवा गरारू गावाची थोडक्यात माहिती .
इथे एका दुकानदाराने मला बोलावले आणि कल्याणी खायला दिली . कल्याणी म्हणजे दाणे आणि चिरंजी . चिरंजी म्हणजे साखर फुटाणे ! ती घेऊन मंदिरामध्ये आलो . मंदिराचे पुजारी खूप चांगले होते परंतु त्यांना सुतक लागले होते . त्यामुळे त्यांनी सदावर्त देण्यास असमर्थता दर्शवली . मंदिरामध्ये माझ्या खेरीज कोणीच नव्हते . मी कल्याणी आणि पाणी असे अप्रतिम भोजन केले आणि मंदिरामध्ये काही काळ पडून राहिलो! शिवलिंगांच्या वजनामुळे पाठीची वाट लागली होती . पाठीवरचे वजन उतरवले की आपल्याला पाठीला पंख आले आहेत आणि आता उडून जावे असे वाटायचे ! इतका तो भार जबरदस्त होता . बैलगाडीला जुंपलेल्या बैलाला गाडीतून सोडवल्यावर कसे वाटत असेल याचा अनुभव मी घेत होतो . परंतु पाठ टेकली की पुन्हा डोक्यात विचार चक्र सुरू व्हायचे . आता आपली परिक्रमा आरंभबिंदूला पोहोचणार याची जाणीव व्हायची . आणि काहीतरी वेगळेच वाटायचे . त्या भावनेचे मी शब्दांमध्ये वर्णन करू शकत नाही . शृंगार वीर करुणा अद्भुत हास्य भयानक बिभत्स रौद्र शांत असे नऊ रस काव्यामध्ये मानले जातात . परंतु हा कुठला तरी दहावाच रस होता . त्यामुळे मला तो शब्दात मांडता येत नाही . क्षमा असावी . इथून उठलो आणि किनारा पकडून पुढे चालू लागलो .साधारण दुपारी अडीच च्या सुमाराला मी राम मंदिरातून निघालो होतो. थेट डोंगरगाव गाठले .पुढे रोहिणी गाव पार करून कुरेला गावामध्ये आलो .इथून थोडेसे पुढे गेल्यावर धूमगड - निमखेडा -हिरापूर - अमोदा अशी चार गावे जवळजवळ होती . व या चारही गावांच्या नावाने ओळखले जाणारे प्रसिद्ध स्थान होते ते म्हणजे भगवान श्री आद्य शंकराचार्यांची दीक्षाभूमी . याच ठिकाणी श्री गोविंद भागवत्पादाचार्यांची गुफा होती .परंतु कुरेला गावामध्ये मी पोहोचलो असतानाच प्रचंड मोठे वादळ सोडले आणि ढग भरून आले . तुफान वारा होता . इतका तुफान की झाडे उन्मळून पडू लागली ! इथे एक शेतकरी काठावर उभा होता तो मला आग्रहाने घरी घेऊन गेला . त्याचे नाव कल्याण मल्हार होते .तो मला म्हणाला की तुम्ही काहीही केले तरी गुरुगुफे पर्यंत आता पोहोचू शकत नाही . आजचा पाऊस भयानक असणार आहे . तरी कृपा करून आमच्या घरी थांबा. या गावांमध्ये खूप साऱ्या म्हशी होत्या . त्या देखील आमच्यासोबत परत निघाल्या . नेहमीप्रमाणे मला घाबरलेल्या म्हशींना पळवत पळवत हसत खेळत आम्ही कल्याणच्या घरी आलो .या गावांमध्ये नेहमी वादळं यायची असं कल्याण मला सांगू लागला . ते स्वाभाविकच होते . गावाची रचनाच अशी होती की गावाच्या जवळ एकमेव डोंगर होता . जो ढगांना घेऊन जाणाऱ्या वाऱ्यांना अडवायचा . आणि अचानक शेजारी मैया च्या पात्राचा भव्य खड्डा ती हवा शोषून घ्यायचा . त्यामुळे ढग तिथे खेचले जायचे . आणि नेमके इथेच त्यांचे गाव ! दर पावसाळ्यात मार खाणारे ! दरवर्षी मोठा मोठाले वृक्ष इथे उन्मळून पडायचे . आता देखील एक अति भव्य तीनशे वर्ष जुना वटवृक्ष आमच्यासमोर उन्मळून पडला होता .मी थोडक्यात त्या वादळातून वाचलो होतो ! आजच्या वादळामध्ये अनेकांची कौले छपरे पत्र वगैरे उडून गेले होते . या डोंगरामुळेच गावाचे नाव डोंगरगाव पडले होते .

इथे नर्मदा मैया सर्पिलाकार परंतु तुलनेने कमी वळणे घेत वाहते .लाल बाणाने दाखवलेल्या डोंगरामुळे गावाचे नाव डोंगरगाव पडले आहे. इथल्या वैशिष्ट्यपूर्ण भूगोलामुळे येथे कायम वादळी पाऊस पडतो .
मल्हार कुटुंबीयांचे घर मोठे होते . आणि पक्के होते . एकत्र कुटुंब होते . यशवंत तथा पप्पू मल्हार , पवन मल्हार अशी मुले होती . सर्वांनाच घरी परिक्रमावासी आला आहे याचा आनंद झाला . असे आगत स्वागत आयुष्यात परत कधीच कुठेच होणार नाही ! कारण नर्मदा खंडातील लोकांचा जो भाव आहे तसा भाव बाहेर कुठे मिळणे कठीण आहे !आणि त्यांचा असा शुद्ध भाव असतो की परिक्रमावासीच्या रूपाने साक्षात नर्मदा मैया त्यांच्या घरात आली आहे ! काय करू आणि काय नको असे त्यांना होते . गेल्या गेल्या मला गरमागरम चहा पाजला गेला . म्हशीच्या घट्ट दुधाचा अप्रतिम गोड गट्ट चहा ! नर्मदा खंडातील लोक चहा मध्ये साखर फार घालतात ! फार म्हणजे फार ! अर्थात तीच साखर चालताना ऊर्जा म्हणून जाळण्याच्या कामाला येते म्हणा ! रात्री भोजनही उत्तम झाले . असा कोणी परिक्रमावासी घरी मुक्कामाला आला की घरातील सर्व लोक त्याचा सन्मान म्हणून त्याच्याशी काही तास एकत्र बसून गप्पा मारतात अशी पद्धत मला नर्मदा खंडामध्ये सर्वत्र आढळली .त्याप्रमाणे आम्ही देखील बराच काळ गप्पा मारत बसलो .अशी संधी मिळाली की मी ती संधी स्वतः बोलून वाया घालवत नसे . तर आपल्या समाजातील लोक कसा विचार करतात ,विविध स्तरातील आणि विविध वयोगटातील स्त्री पुरुष मुले मुली तरुण-तरुणी नक्की कसा विचार करतात , हे तुम्हाला अशा कुटुंब संमेलनातून एकाच ठिकाणी कमीत कमी वेळात जाणून घेता येते ! ते अवश्य करावे ! त्याचा उपयोग तुम्हाला तुमच्या पुढील जीवनामध्ये शंभर टक्के झाल्याशिवाय राहणार नाही . रात्री पाऊस थांबला होता परंतु जोरात वारे चालू होते . तरी देखील आम्ही सर्वजण गच्चीत जाऊन झोपलो ! कारण गच्चीतून नर्मदा माई दिसायची ! पहाटे लवकर उठून हातपंपावरती स्नान करून आलो . मला वाटले होते इतक्या पहाटे तिथे कोणी नसेल . परंतु पहाटेपासूनच गावातील माता-भगिनी पाणी घेण्यासाठी आलेल्या होत्या . त्यांनीच हातपंप चालवत मला स्नान करायला सांगितले . त्यांचे आभार मानून पुन्हा घरी आलो आणि पुन्हा म्हशीच्या घट्ट दुधाचा गट्टगोड चहा गट्टम करून पुढे प्रस्थान ठेवले . डोंगर ओलांडून अमोदा गावातून शंकराचार्य आश्रमात गेलो . स्वरूपानंद शंकराचार्यांनी इथे मोठे मंदिर उभे केलेले आहे . हे तेच शंकराचार्याचे सतत आपल्या राजकीय वक्तव्यांमुळे चर्चेमध्ये असायचे .बरेचसे लोक यांना काँग्रेसचे शंकराचार्य असे देखील म्हणायचे . सध्या त्यांच्या गादीवर अविमुक्तेश्वरानंद नावाचे एक संन्यासी बसलेले आहेत . परंतु मी परिक्रमे मध्ये असताना स्वरूपानंद सरस्वती महाराज देहामध्ये होते . त्यांनी ११ सप्टेंबर २०२२ रोजी आपला देह ठेवला . या ठिकाणी नर्मदा मातेच्या काठावर शंकराचार्यांनी फार मोठे मंदिर उभे केले आहे . इथे काही लोक राहत देखील होते . परंतु परिक्रमावासींच्या बाबतीत इथे शून्य अगत्य आहे असा अनुभव मला आला .परंतु मंदिर मात्र सुंदर होते . मंदिरातील मूर्ती विशेष सुंदर होत्या . मी संपूर्ण परिसर फिरून पाहिला .

गोविंद भगवत्पदाचार्य आणि आद्य शंकराचार्य यांच्या भेटीचे हे एक पवित्र आणि अद्भुत स्मारक आहे .
स्वामी स्वरूपानंद शंकराचार्य हयात असेपर्यंत इथे मोठा उत्सव करायचे .मध्यप्रदेशचे काँग्रेसचे मुख्यमंत्री कमलनाथ देखील त्याला उपस्थित राहायचे .
स्वामींनी इथे असे भव्य दक्षिणात्य पद्धतीचे मंदिर बांधले आहे .
मंदिर भव्य दिव्य सुंदर असून नर्मदा मातेच्या अगदी काठावर आहे !
काठावरून चालताना असे ते लगेचच लक्ष वेधून घेते !
मंदिराची दारे लाकडाची असून सुंदर कलाकुसर केलेली आहे .
आश्रम मोठा असून वातानुकूलित खोल्या वगैरे इथे खूप आहेत .
मंदिरातील सर्व शिलाफलक संस्कृत भाषेत आहेत हे पाहून बरे वाटले !
शंकराचार्य हयात असताना या खुर्चीवर बसायचे .
इथली सर्वात लक्षात राहणारी गोष्ट म्हणजे सुंदर अशी ही गुरु शिष्य जोडीची मूर्ती आहे ! दोघांचेही डोळे अत्यंत बोलके आहेत !
कोणीही मला तू कोण आहेस आणि कुठे चालला आहेस वगैरे काही विचारले नाही .त्याचा अपलाभ घेत मी सर्व वास्तू फिरून पाहिली . आणि शांतपणे झोळी उचलून पुढे निघालो . याच्या अगदी उलट अनुभव मला याच संस्थेच्या द्वारे चालविल्या जाणाऱ्या शेजारील आश्रमामध्ये आला . हा गुरू गुफा आश्रम आहे तिथे खूप चांगले ब्रह्मचारी किंवा संन्यासी महाराज स्थानधारी होते .मला राहा म्हणून त्यांनी खूप आग्रह केला .गुफेची किल्ली त्यांच्याकडे असायची . ती घेऊन जंगलातून चालत मी गुरुगुफेमध्ये गेलो . अतिशय अप्रतिम अशी प्राकृतिक गुफा इथे तयार झालेली होती . काही गुफा समतल असतात परंतु ही खाली उतरणारी गुफा होती . दोन भल्या मोठ्या दगडांच्या किंवा पाषाण खंडांच्या मध्ये तयार झालेली फटच समजा ना ! आत मध्ये सुखद गारवा होता . वटवाघळे होती . चित्रविचित्र दिसणारे किडे होते .या किड्यांची मी रेखाचित्रे काढून ठेवली आहेत .
लांब मिशा असलेला काळ्या रंगाचा एक कोळी वजा किडा येथे खूप दिसायचा . तो साधारण जुन्या दोन रुपयांच्या नाण्याच्या आकाराचा होता . गोमीसारखे शतपाद किडे पण खूप होते .सर्वजण कुट्टकाळे होते .
तुमच्याकडे उजेडाचे साधन असल्याशिवाय तुम्ही गुहा पाहू शकत नाही . सर्वत्र काळाकुट्ट अंधार होता . त्यामुळे इथले सर्व किडे देखील काळेभोर होते . असे किडे मी पूर्वी कधी पाहिले नव्हते . या किड्यांची संख्या आणि हालचाल जास्त असल्यामुळे मला आत मध्ये फार काळ बसता आले नाही . परंतु तिथे कायमचे बसायला आवडले असते इतके ते स्थान भारी होते ! सुरुवातीला एक जीना उतरून खाली गेल्यावर हळूहळू गुफा उतरत उतरत जाते . प्रत्येक पातळीवर एक दालन नैसर्गिक रित्या तयार झालेले आहे . शेवटच्या पातळीपर्यंत गेलो . तीच दोघांची भेट झालेली जागा म्हणून दाखवली जाते . इथे मोठ्या संख्येने लवण स्तंभ तयार झालेले आहेत .विविध आकाराचे आणि प्रकारचे लवणस्तंभ दिसतात . छतालाही दिसतात आणि जमिनीवरही दिसतात . जमिनीवरच्या लवण स्तंभांची शिवलिंग मानून पूजा केली जाते .शंकराचार्यांना जो अनुग्रह मिळाला त्या गुरुपरंपरेचा श्लोक इथे लिहिलेला आहे .
नारायणं पद्मभवं वशिष्ठं, शक्तिं च तत्पुत्र पराशरं च।
व्यासं शुकं गौडपदं महान्तं, गोविन्दयोगीन्द्र मथास्यशिष्यम् ॥ श्रीशंकराचार्य मथास्य पद्मपादं च हस्तामलकम् च शिष्यान्।
तं त्रोटकं वार्तिककारमन्यान्, अस्मद् गुरून्सन्तत मानतोस्मि।
इथून जवळच असलेला गुरुगुंफा आश्रम मोठा रम्य आहे .
इथून नर्मदा मातेचे खूप सुंदर दर्शन होते .
या चित्रामध्ये स्वरूपानंद स्वामींच्या पलीकडे बसलेले स्वामीजी तिथे होते ! त्यांचे नाव निजानंद ब्रह्मचारी . त्यांनी मला खूप प्रेमाने बसवून घेतले .आणि सातूचे पीठ खाऊ घातले . गुहेची किल्ले दिली आणि बघून ये म्हणून सांगितले .
११ जून २०२२ चा हा माझ्या वहीतला शिक्का आहे .
आश्रमाचा माझ्या वहीतील शिक्का : त्यातील शब्द असे आहेत .
श्री जगद्गुरु शंकराचार्य स्वामी श्री स्वरूपानंद सरस्वती नर्मदा परिक्रमा सदावृत्त गुरुतीर्थ गोविंदनाथ वन गुरु गुफा आश्रम धुमगढ
प्रभारी श्री निजानंद ब्रह्मचारी जिल्हा नरसिंहपुर मध्य प्रदेश
गुरु गुफा जंगलामध्ये आहे .
अशा पद्धतीचे बांधकाम दिसू लागते . परंतु गुहा कुठे आहे याचा अंदाज येत नाही
अचानक ही फट सामोरी येते ! आणि मग लक्षात येते की हीच ती गुरु गुफा ! आज शिरताना अंगावर शहारे येतात !
गुहेचे प्रवेशद्वार ! त्याला कुलूप असते व किल्ली स्वामींच्या कडे असते .
आत मध्ये प्रचंड अंधार आहे . त्यामुळे प्रथम जाताना भीती वाटते .
एका वेळी एक बारीक माणूस कसा बसा मावेल एवढीच जागा आहे
काही ठिकाणी फटी सोबत आपल्यालाही तिरक व्हावे लागते .
खाली पडणाऱ्या क्षारयुक्त पाण्यातून तयार झालेले लवणस्तंभ पुजलेले इथे आपल्याला पाहायला मिळतात .
इथे प्रतिकात्मक गुरु पादुका ठेवलेल्या आहेत .
गुहेमध्ये सर्वत्र ओलावा आहे आणि असे लवणस्तंभ आहेत
काही काही लवणस्तंभ तर फार मोठे आणि चित्र विचित्र आकाराचे आहेत !
मोठ्या संख्येने छताला लवणस्तंभ लटकलेले दिसतात .
गुरु शिष्यांच्या भेटीचे स्मारक असलेली ही गुहा अतिशय गूढरम्य आणि लक्षात राहणारी आहे .
या स्थानाचे महात्म्य या पाटीवर लिहिलेले आढळते .
आत मध्ये अशी अनेक दालने आहेत .त्यातील हे शेवटचे दालन आहे . इथे गुरु शिष्यांच्या पादुका आहेत .
याचा ठिकाणी दीक्षा किंवा संन्यास दीक्षा त्यांना प्राप्त झाली अशी मान्यता आहे . मी क्षणभर तिथे तो सोहळा चालू आहे आणि मी तो पाहतो आहे अशी कल्पना केली आणि अंगावर शहारे आले ! भगवान आद्य शंकराचार्यांचे जे काम आहे त्याला अखिल अखंड भारतवर्षाच्या इतिहासामध्ये जोड नाही , तोड नाही ,उपमा नाही ,बरोबरी नाही . आणि त्या सगळ्या प्रवासाची सुरुवात जिथून झाली त्याजागी मला नर्मदा मातेने आणून उभे केले होते ! काय लायकी आहे आपली ? या शंकराचार्यांच्या समोर ? परंतु त्यांच्या तेजाचा एखादा अंश आपल्याला प्राप्त व्हावा , त्यांच्या शरीरातील तिथे पडून राहिलेला एखादा रज कण ,तो आपल्या देहाला लागून आपल्या या नश्वरदेहाचे सोने व्हावे अशी नर्मदा मातेची इच्छा असावी ! याच ठिकाणी मला " नर्मदाष्टका चा मराठी अनुवाद व्हावा " अशी तीव्र इच्छा अचानक उत्पन्न झाली . आणि पुढे ती पूर्णत्वाला गेली . भगवान आद्य शंकराचार्यांचे प्रत्येकच स्तोत्र म्हणजे अत्युत्तम साहित्याचा लालित्याचा अर्थगर्भतेचा पदलालित्याचा भावपूर्णतेचा प्रकांड विद्वत्तेचा परिपोष आहे ! परिपाठ आहे ! वस्तुपाठ आहे ! आणि या सर्व स्तोत्रांचे शिरोमणी शोभणारे स्तोत्र म्हणजे नर्मदाष्टक स्तोत्र आहे ! यातील एखाद्या शब्दाचा अनुवाद करण्याची देखील योग्यता या पामराच्या ठिकाणी नव्हती . मी त्या जागेला साष्टांग दंडवत घातला आणि मनोमन प्रार्थना केली , "भगवान आदि शंकराचार्या , गुरु गोविंद भगवत्पादाचार्या ! हा देह तुझा असे ! तुम्हाला जे योग्य वाटेल ते कार्य या पामाराकडून करून घ्यावे ! माझी तेवढी क्षमता नाही ,शक्ती नाही ,युक्ती नाही ,बुद्धी नाही , प्रेरणा नाही ,भक्ती नाही ,भाव नाही , ग्रहबल नाही , प्रतिभा नाही ,प्रज्ञा नाही ,मेधा नाही , सिद्धता नाही ,साधना नाही , बैठक नाही , धोरण नाही ,धारणा नाही ,योग्यता नाही , पात्रता नाही , कृपा नाही , कृतीशूरता नाही , सातत्य नाही ... मतिमंद मी काहीच नेणे । तुम्हाला जे जसे वाटेल ते तसे करावे ! हा देह मन बुद्धी चित्त अहंकार तुम्हाला समर्पित आहे . त्वदीयपादपंकजम् नमामि आदिशंकरं । " या जागेमध्ये बाहेरची हवा कधीच येत नसल्यामुळे आणि वायुविजन अजिबात नसल्यामुळे शंकराचार्यांच्या काळातील वायू तिथे असावा असे मला जाणवले . तो मी अधिकाधिक ग्रहण केला . पुन्हा पुन्हा तिथे नतमस्तक झालो . प्रत्येक दगडाला प्रत्येक भिंतीला प्रत्येक दालनाला डोके टेकून नमस्कार केला . तिथले थोडे तरी रज कण या पामरदेहाला लागावेत आणि त्यांच्या स्पर्शाने या देहाचे सोने व्हावे ,कल्याण व्हावे !असा विशुद्ध भाव मनामध्ये होता . परमेश्वराने हा देह सांभाळण्यासाठी जन्मापासून सोबत दिलेला आहे तो देखील धड सांभाळण्याचे सामर्थ्य माझ्यामध्ये नाही ! त्यामुळे अशा महान तपस्वीना शरण जाण्या वाचून आम्हास काही गत्यंतर देखील नाही ! त्या पवित्र गुहेमध्ये किती वेळ गेला हे लक्षातच आले नाही . अखेरीस किड्यांचा वावर वाढला आहे असे पाहून बाहेर पडलो . किड्यांना बऱ्याच दिवसांनी माणसाचा वास आलेला असावा . त्यामुळे सर्वजण माझ्याकडे येऊ पाहत होते . मी कॉलेजला असताना ममी नावाचा एक गेम कॉम्प्युटरवर यायचा .त्यात गुहेतून जाताना किडे हल्ला करायचे. त्याची आठवण मला झाली ! आणि हळूहळू त्या गुहेतून मी बाहेर पडलो . त्या गुहेचे स्थान अशा जागी आहे की जोपर्यंत तुम्ही गुहेच्या तोंडापर्यंत जात नाही तोवर तुम्हाला तिथे गुहा आहे हेच कळत नाही ! अतिशय रमणीय स्थान आहे ! इथे वन्य श्वापदे देखील येतात . मुक्त वावर आहे वन्यजीवांचा ! आजही ती जागा इतकी अस्पर्शीत असेल तर शंकराचार्य आले तेव्हा ती जागा कशी असेल ? आणि केरळ मधून पायी पायी येणारा एखादा छोटासा मुलगा ही जागा शोधू कशी शकतो ? आणि गुरूंना प्रार्थना करून माझा उद्धार करा हे त्यांना संस्कृत मध्ये श्लोकबद्ध कसे सांगू शकतो ! विचार करून पहा आपली परंपरा किती महान होती ! माझ्या डोळ्यासमोर ते सारे चित्र उभे राहत होते . आणि डोळ्यातून अखंड अश्रूधारा वाहत होत्या . आपल्या महान भारतीय परंपरे पुढे पुन्हा पुन्हा नतमस्तक व्हावे तरी कमी आहे ! पुन्हा जन्म आलाच तर तो या भरत वर्षातच यावा ! तुका म्हणे गर्भवासी । सुखे घालावे आम्हासी !या परंपरेच्या रक्षणासाठी काहीही करायला आपण सिद्ध असले पाहिजे . कारण हीच परंपरा जगाला मार्ग दाखवणार आहे . हीच परंपरा जगाला तारणार आहे .हीच परंपरा मानव जातीचा उद्धार करणार आहे . दुसरा मार्ग असूच शकत नाही .
नान्यत् पंथा: विद्यते अयनाय !
लेखांक एकशे एकोणसत्तर समाप्त (क्रमशः)
तो दहावा रस , ' मैय्या विरह वेदना ' रस😢
उत्तर द्याहटवानर्मदे हर बाबाजी 🙏
नर्मदे हर 🙏🙏🙏
उत्तर द्याहटवानर्मदे हर 🙏🙏
उत्तर द्याहटवानर्मदे हर 🙏
उत्तर द्याहटवा