लेखांक १६५ : हीरापूरचा थाट माट आणि ब्रह्मदेवांची तपोभूमी बर्मान घाट

रिंछावर पार करून झपाझप पावले टाकत सुरेख वळणावळणाचा रस्ता पार करत रमपुरा नवाखेडा किंवा नया खेडा , टिमरावन , सिद्धावती किंवा सिनोर नदी पार करत हिरापूरला आलो .सिन्नर नदीच्या काठावर एका साधूं ची छोटीशी कुटिया आहे . त्यांनी चहा पाजला .सीनोर नदी कमरे एवढ्या पाण्यातून चालतच पार केली . 

टिमरावन आणि हिरापूरच्या मध्ये झालेला सिद्धावती किंवा सिन्नर नदीचा रेवासंगम .
कुटिया मधून दिसणारे संगमाचे सुंदर दृश्य .
या भागात मैया थोडीशी लहान वाटते . कारण वाळू खूप आहे .


पुढे हिरापूर गाव लागले . पूर्णपणे काठाने चालत घाटावर आलो . मागे सेमलदा या गावांमध्ये मी नर्मदा मंदिरामध्ये राहिलो होतो त्या मंदिराचे संस्थापक हिरापूर वाले बाबाजी म्हणून होते त्यांचेच हे गाव ! त्यांचे खरं नाव षण्मुखानंद स्वामी . मुळ चे तमिळनाडूचे . परंतु गेली अनेक दशके नर्मदा खंडामध्ये राहत आहेत . यांनी फार मोठी मोठी कामे इथे उभी केलेली आहेत . हिरापूर गावामध्ये त्यांनी अतिशय भव्य दिव्य दुमजली दक्षिणात्यशैलीचे राजे राजेश्वरी मातेचे मंदिर बांधलेले आहे .मंदिरामध्ये श्रीयंत्र देखील आहे . मंदिरामध्ये संस्कृत पाठशाळा असून ३०० गायींची गोशाळा पण आहे . गोसेवकाला बिचाऱ्याला सारे सरपंच म्हणायचे ! इथे पोहे बालभोग घेतला . काही मुले कष्टाळू होती . पण काही फारच उद्दाम व उर्मट वाटली.त्यातल्या एकाचा मी चांगलाच पाणउतारा घेतला .योग्य वयातच मुलांना झापून संस्कार करता येतात .एकदा शिंगे फुटली की अवघड असते. आमचे काय चालले आहे बघायला आचार्य आले . आचार्य मुलाची बाजू घेऊ लागले . मग त्यांना देखील मी चांगले झाडले . दोघेही गुटखा खात होते . आश्रमाचे व्यवस्थापक आले आणि त्यांनी माझे अभिनंदन केले . स्वामीजींच्या अनुपस्थितीमध्ये असे यांना बोलणारे कोणीतरी लागते . त्याशिवाय ते सुता सारखे सरळ वागत नाहीत असे मला त्यांनी सांगितले .

 मंदिराचे संपूर्ण बांधकाम दाक्षिणात्य पद्धतीने केलेले होते . सिमेंट मध्ये अशा मूर्ती बनवणे खरोखरच खूप अवघड असते . परंतु दक्षिणेचे कारागीर ते सहज करतात .

महाराजांनी मंदिर चांगले उंच बांधलेले असून पुरापासून संरक्षक बांध बांधण्यात आलेला आहे .

राजे राजेश्वरी मातेची मूर्ती खूप सुंदर आहे .
वरच्या मजल्यावर असलेले श्रीयंत्र ! याच्याबरोबर खाली राज राजेश्वरी मातेची मूर्ती आहे
मंदिराचे गोपूर आणि अन्य रचना पाहून दक्षिणेत गेल्यासारखे वाटते
हे आहेत परमपूज्य श्री श्री १००८ षण्मुखानंद महाराज किंवा हिरापूर वाले बाबाजी . हे नेहमी हिरव्या रंगाचे वस्त्र नेसतात . मोठे तपस्वी असून सतत काही ना काही उपक्रम सुरू असतात . यांचा शिष्य परिवार मोठा आहे .
या मंदिरातील सुंदर शिवलिंग . चतुर्मुख महादेव आहेत .
सिमेंट मध्ये बनवलेल्य मूर्ती फार सुंदर आहेत . दक्षिणेतल्या कलाकारांना मानले पाहिजे !
घाटावरती मोठे यज्ञकुंड बनवलेले आहे . इथेच विविध कार्यक्रम देखील होतात . औरत चौरस पसरलेला किनारा आहे .आणि खूप स्वच्छ आहे .
मंदिरातील हनुमंताची मूर्ती देखील सुन्दर आहे
या जागेमध्ये हिरापूर वाल्या महाराजांनी तप केले होते .त्याला ते कैलाश कुटी असे म्हणतात . पूरसंरक्षक भिंती बांधून गाव सुरक्षित करण्यात आलेले आहे .

मंदिर सर्वांग सुंदर असून प्रत्येक मूर्ती पाहण्यासारखी आहे !


मुलांचे आचार्यच व्यसन करत आहेत हे पाहिल्यामुळे इथे पाणी वगैरे अन्य काहीच न घेता पुढे निघालो . आणि त्यांना तसे तोंडावर सांगितले सुद्धा . हिरापूर गावापासून नरसिंहपूर जिल्ह्याला सुरुवात झाली . काठाने चालतच ककरा घाटाजवळ आलो . इथे एक पूल आहे . पुलाखाली पाठक नावाचा एक गांजाडा इसम साधू वेषामध्ये बसला होता . त्याने आधी चहा पाजला . ऊन खूप कडक होते . त्यामुळे पुलाच्या सावलीत थोडा पडलो . आणि उपाशीपोटी माझा डोळा लागला .साडेतीन वाजता उठलो . पाठक बाबा ने पुरी भाजी कुठून तरी आणून दिली . गुळ खोबरे देखील खाल्ले .

हाच तो ककरा घाटाचा पूल . इथे कायम असा मेळा लागलेला असतो . 

इथे याच पुलाखाली मी विश्रांती घेतली  भोजन प्रसादी देखील

पाठक बाबाला मनापासून आशीर्वाद देत चालत चालत करौंदी गावात आलो . मैयाने अखेरीस व्यसनाधीन माणसाच्या हातूनच भोजन सेवा करवली !  पुढे बेलथडीला जावे असे नियोजन होते परंतु अंतर सात किलोमीटर होते व अंधार पडू लागला होता . मार्गदेखील खराब होता .त्यामुळे त्वरित निर्णय बदलला . वर एक शिव ,गायत्री व दुर्गामाता मंदिर होते . खूप मोठे आवार होते . ऐसपैस जागा होती . परंतु तिथे राहणारा पंडित गृहस्थ सेवा देण्यास इच्छुक नव्हता . त्यामुळे शेजारीच असलेल्या पंचमुखी हनुमान मंदिरात गेलो . हा दुर्वादास त्यागीजींचा आश्रम होता .बन्सी दास नामक एक उडिया बंगाली साधू होते . म्हणजे यांचे गाव बंगाल व उडीसाच्या सीमेवर होते . त्यामुळे दोन्ही भाषा बोलायचे . साधू खूपच प्रेमळ होते ! शेजारी एक मोठे डोह कूप होते .इथे खूप छान स्नान केले . इथे एक छोटीशी नाव होती ज्या नावेने लोक इकडून तिकडे जायचे . त्या नावेतून एक कुटुंब आले . मी पाण्यात असल्यामुळे नाव ओढायला मदत केली . पाणी खूप खोल होते . या आश्रमामध्ये अजून एक कष्टाळू सेवक होता . मंदिरातच आसन लावले . हनुमंताचा विग्रह खूप सुंदर होता . अनेक छोट्या-मोठ्या कुटी आश्रमामध्ये बांधलेल्या होत्या .रात्री आमटी भात टिक्कड खाऊन झोपलो . पहाटे लवकर उठून पुन्हा स्नान केले . पूजा वगैरे आटपून निघालो . बाबांनी माझ्यासोबत अर्धा किलो फुटाणे व शंभर रुपये दक्षिणा दिली ! पुढे ते फुटाणे वेळोवेळी माझ्या कामाला आले ! या परिसराचे थोडेसे अवलोकन करूया चला !

करौंदी गावातील मंदिरामध्ये याच स्लॅबवर आसन लावण्याची तयारी मी चालवली होती परंतु मंदिर सांभाळणाऱ्या कुटुंबाने असमर्थता दाखवल्यामुळे मी पुढे निघालो .
मंदिर मात्र आधुनिक पद्धतीने खूप सुंदर बांधले होते . मंदिरातील दुर्गा मातेची मूर्ती
मंदिरातील गायत्री मातेची मूर्ती .
समोर दिसते आहे ते शिव दुर्गा गायत्री मंदिर आहे आणि बाहेर पडल्यावर लगेच केशरी दरवाजा आहे ते पंचमुखी हनुमान मंदिर आणि आश्रम आहे ! त्यामुळे चालण्याचे कष्ट वाचले !
याच मंदिरातील अन्य देवता
मंदिराचा परिसर मोठा होता . इथे श्री गुरुचरण समाधी स्थल देखील होते

मंदिराचा मोठाच परिसर होता . पंडिताईन शिवणयंत्रावर काहीतरी शिवत बसली होती . त्यांनी जाता जाता थोडा चहा तेवढा मला पाजला . आणि मग मी पंचमुखी हनुमान मंदिरात गेलो .

या आश्रमामध्ये लिहिलेल्या वरील ओळीच आश्रमाचे तत्वज्ञान आपल्याला सांगतात !
अतिशय सुंदर अशा कुटी या आश्रमामध्ये होत्या . साधू महाराजांनी माझे प्रेमाने स्वागत केले .
इथे साधूंची राहण्याची व्यवस्था होती .
आश्रमामध्ये मोठमोठे वृक्ष होते
हनुमान जी चा विग्रह अतिशय सुंदर होता . त्यांची पूजा पण खूप सुंदर पद्धतीने केली जायची .
इथे मंदिराचे नाव लिहिलेले दिसते आहे . शेजारी पांढरी वास्तू दिसते आहे ते गायत्री मंदिर आहे .
भव्य दिव्य वृक्ष पाहून मन एकदम पुराणकाळात जात असे
आश्रमाच्या दारामध्ये अशा रीतीने खूप झेंडे लावलेले होते .
दोन्ही गुरूंच्या प्रतिमांना सुंदर पद्धतीने शाल वगैरे घातली जायची .
या भागात गोंडवाना आदिवासींचे प्रमाण आहे . पिवळ्या रंगाचे कपडे गळ्यात अडकवून ते आपली वेगळी ओळख दाखवितात . 
या आदिवासी लोकांच्या पुढच्या पिढीतील लहान मुलांना , तरुणांना आपल्या मूळ राष्ट्रीय प्रवाहापासून तोडण्याचे प्रयत्न चालू आहेत असे लगेच जाणवते .  या चित्रामध्ये मी स्नान केले ती जागा दिसते आहे .
अशा कठीण परिस्थितीमध्ये सेवा देणाऱ्या बन्सीदासजी महाराजांना आपण मदत करू शकतो . त्यांचा क्रमांक ९३९९ ३२१ ३७९ असा आहे .
हळूहळू वाळू कमी होऊन असे मोठे दगड दिसायला सुरुवात झाली होती . त्यातच काही शिवलिंगे सापडायची .
.

 इथून पुढे बेलथारी किंवा बेलथडी नावाचे गाव होते . बेलथाडी खूपच पवित्र स्थान होते .बली स्थान या शब्दाचा हा अपभ्रंश  असावा कारण इथे बळीराजाने यज्ञ केला होता अशी पुराणा मध्ये नोंद आहे . 

हा बिलथारी घाट आहे . परिक्रमेच्या चाळीसाव्या दिवशी मी समोर मुक्कामाला होतो ! आज माझा १५५ वा दिवस चालू होता !

इथे एका ग्रामस्थाने मला चहा पाजला . त्याच्या मुलाच्या मोबाईलवर त्याने आमचा फोटो काढून घेतला . मी तो मित्राच्या क्रमांकावर पाठवायला सांगितले .
हेच ते छायाचित्र ! दुर्दैवाने मला यांचे नाव लक्षात राहिले नाही .आणि मी ते लिहूनही ठेवले नाही .परंतु त्यांच्या विषयी कृतज्ञता आहेच !


पुढे झिरी आश्रम लागला .छोटेखानी घाट व पिंपळा खाली शेड होती . इथे एक बाबा राहिलेला होता . परंतु स्वभावाने जरा विक्षिप्त होता .मी सुमारे वीस मिनिटे येऊन बसलो तरी मला चहापाणी सोडा ख्याली खुशाली देखील काही विचारेना ! जाऊ का म्हटलं तर जाऊ पण देईना . अखेरीस गावातील एका पटेलाने येऊन बाबाला झापल्यावर मग त्याने मला चहा पाजला .इथे खाली घाटावर स्नान करताना एक मुलगा मला भेटला होता . तो आणि अजून काही मुले चुंबकासारखी माझ्या भोवती गोळा झाली . त्या मुलाकडे मोबाईल होता त्यावर त्याने फोटो काढला . व माझ्या मित्राच्या क्रमांकावर पाठवून दिला .

जरी आश्रमामध्ये अशी मोठी पत्राची शेड होती आणि समोर धर्मशाळा म्हणून वापरता येईल असे छोटेसे व्यासपीठ बांधण्यात आले होते
महादेवांची एक सुंदर मूर्ती इथे होती .
झिरी म्हणजे झरा . हाच तो झरा असावा कारण इथूनच वर जायला मार्ग होता .
आश्रमाचे बांधकाम .
क्षत्रिय किरार समाजाची ही धर्मशाळा होती . मला येऊन भेटलेले पटेल याच समाजाचे होते .
झिरी आश्रमाच्या घाटावर मला भेटलेला युवक
हा मुलगा खूप हुशार होता . आणि शिकत होता .

मला बघायला म्हणून गोळा झालेली बच्चे कंपनी ! त्याच मुलाने या बालकांबरोबर देखील फोटो काढला ! त्यामुळे हा झिरी आश्रम लक्षात राहिला !

झिरी आश्रमामध्ये काढलेला अजून एक फोटो 

बाबांनी दिलेला चहा घेऊन पुढे निघालो .पटेलाने माझी क्षमा मागितली .आणि मी त्यांना सांगितले की क्षमा मागण्याचा विषयच नाही ! जे काही चालू आहे ती नर्मदा मातेची इच्छा आहे ! पुढे अनेक गावांचे किनारे ओलांडले . कऱ्हैय्या गांव ओलांडून छत्तरपूर ला आलो .ऊन फारच कडक होते . मैया मध्ये इतक्या दिवसांनी प्रथमच खडक दिसू लागले . भूगोल बदलल्याचे हे संकेत होते . इथे एक दिगंबर नागा साधू होता . अजिबात बोलत नसे . अतिशय उत्तम साधू वृत्तीने राहत होता . त्याने मला अतिशय अगत्याने तीन टिक्कड व भाजी माझ्यासमोर ताजी ताजी बनवून खायला दिली . इथे तासभर पडलो . साधूला रेडिओ ऐकायची सवय होती . थोड्यावेळाने त्यांची आज्ञा घेऊन निघालो . इथून बर्मान घाट १६ किलोमीटर रस्त्याने व काठाने वीस किलोमीटर होता . काठाने निघालो .अतिशय कठीण मार्ग होता . चढउतार वळणे खूप होते . पायवाट जवळपास नव्हतीच . छत्तरपूर ला हत्ती सारखे दगड होते . जयंती माता जंगलात जसे होते अगदी तसे ! शिवलिंगे देखील आता सापडू लागली होती ! आज जीव तोडून चाललो ! मध्ये सुंदर जंगले होती . शेती देखील चांगली होती .हळूहळू पिके बदलू लागली. मिरच्या , ऊस ,मका ,राजगिरा दिसू लागले !इथे एक पक्षी खूप दिसायचा . त्याचे नाव मला माहिती नव्हते म्हणून मी त्याचे कच्चे रेखा चित्र काढून ठेवले . सर्वत्र हा पक्षी दिसायचा . 

हाच तो पक्षी . वाचकांपैकी कोणाला माहिती असेल तर कृपया सांगावे .

(ता क : आपल्या ब्लॉगचे एक वाचक नितीन जोशी जळगाव हे स्वतः पक्षी अभ्यासक आहेत . त्यांनी दिलेली माहिती खालील प्रमाणे . हा पक्षी म्हणजे चातक आहे . आफ्रिकेतून स्थलांतर करून पावसाळ्यापूर्वी हा पक्षी भारतामध्ये येतो . इथल्या अन्य पक्षांच्या घरट्यात अंडी घालून निघून जातो . ककू फॅमिली अर्थात कोकीळ वर्गातला हा पक्षी आहे .या वर्गातील काही प्रसिद्ध पक्षी खालील प्रमाणे .


१) चातक / pied crested cuckoo (वरील )

२) पावशा / common hawk cuckoo


३) राखी पोटाचा पावशा / gray bellied cuckoo


वरील सर्व पक्षी कोकिळेप्रमाणेच परपोषित अर्थात दुसऱ्या पक्षांच्या घरट्यामध्ये अंडी घालून पळून जाणारे असतात . )

मोर होतेच . भटकणारी कुत्री सुद्धा भेटू लागली . मैयामध्ये पुन्हा एकदा वाहत आलेल्या मेलेल्या गाई दिसू  लागल्या . नेनवारा , पदमघाट , केसली , रामघाट पार केल्यावर बर्मान घाट आला . पदम घाटावर मुंबईचा तरुण नागा साधू भेटला . तो इथे चातुर्मास करणार होता . तिथे फारसे न थांबता पुढे निघालो .

मुंबईचा तरुण नागा साधू . याचे नाव रामदास होते .

या पदम घाटावर संतोष दास नामक एक अतिशय प्रसन्न महात्मा होते . मला ते खूपच आवडले . साधू कसा असावा याचे आदर्श उदाहरण होते .
पदम घाटावरील शिवालयाचा वैशिष्ट्यपूर्ण कळस लक्षात राहील असा होता .
खूप लांबून देखील हा कळस दिसायचा . शिवलिंगाचा आकार असल्यामुळे दुरूनच दर्शन घेतल्याचा आनंद मिळायचा .
या भागामध्ये नर्मदा जल खूप शांत आणि स्वच्छ आहे . हळूहळू खडकांना सुरुवात झालेली आहे . खडकावर पडलेले पांढरे डाग हे पाणकावळ्यांच्या विष्ठेचे आहेत .
इथे नर्मदा मातेची मूर्ती झोपाळ्यावर बसवलेली आहे ! 
या आश्रमामध्ये साधूंचा खूप राबता असतो . साधूंचा आवडता आश्रम आहे .शक्यतो आश्रम संचालक साधू असेल तिथेच अन्य साधू राहतात .
मंदिरातून होणारे नर्मदा मातेचे विलोभनीय दर्शन लक्षात राहील असे आहे !
स्वच्छ नितळ निर्मळ पाण्यामुळे तळाशी असलेले दगड देखील स्पष्ट दिसतात ! इथे समोर बढीया घाट आहे . जो अतिशय भयानक पद्धतीने मी गाठला होता .

पुढे राम घाट लागला .रामघाटावर एक पाय लुळा व एक डोळा मिटणाऱ्या साधूने भावपूर्ण नमस्कार केला .  तो लक्षात राहिला . या भागामध्ये खूप शिवलिंगे मिळाली कारण ती इथून जवळच असलेल्या सात धारेमध्ये बनतात . 
इथून पुढे नर्मदा मातेमध्ये एक मोठे बेट आढळते . इथे काठाचा रस्ता अत्यंत कठीण आहे कारण प्रचंड झाडी आणि चिखल आहे . पायवाट नावाला सुद्धा नाही . परंतु मी नेटाने तिथूनच गेलो . नर्मदा मातीला तशी विनंतीच केली होती . 
इथे नर्मदा मैया अचानक उजवीकडे वळते . दिशाच पाहायला गेली तर इथे उत्तर वाहिनी नर्मदा मैया आहे ! लक्षात नाही येत का ? थांबा आपण नकाशा फिरवूयात ! 
आता उत्तर दिशा वर आहे .आपल्या लक्षात येईल की नर्मदा मैया स्पष्टपणे उत्तर वाहिनी झालेली आहे ! 
इथे पुढे देखील काही वाळूची बेटे तयार झालेली आहेत .

बरमान घाटावर आलो . स्नान केले .याचे खरे नाव ब्रह्मांड घाट आहे . ब्रह्मदेवाची तपोभूमी .त्याने तप केलेले बेट मैय्या मध्ये आहे . आपण दक्षिण तटावर या घाटाची माहिती व महती पाहिली होतीच . इथे बडे राम मंदिर आहे तिथे गेलो आणि गच्चीवर आसन लावले . समोर दीपेश्वर अथवा द्वीपेश्वर महादेवाचे उत्कृष्ट रोषणाईने प्रदीप्त शिवालय दिसत होते . बेटावर लिहिलेली "नमामि मात नर्मदे " अक्षरे सोन्यासारखी झळाळत होती . ब्रह्मदेवांची ही तपोभूमी . ते तिथे बसले आहेत अशी कल्पना केली आणि अंगावर शहारा आला . मारुतीरायाची सुंदर मूर्ती दिसत होती . समोर शारदा संस्कृत पाठशाळा दिसत होती . भोजन घेतले . अप्रतिम अशी आरती केली . या मंदिरामध्ये एक अतिशय भव्य दिव्य नगारा होता . हा नगारा फारच सुंदर होता . उंटाच्या कातडीचा होता . चार-पाच फूट व्यास होता . आणि धीर गंभीर आवाज होता .या मंदिरांमधील आरती ऐकण्यासारखी असते . मोठमोठ्या घंटा आणि टोल एका तालात वाजवले जातात . आश्रमाच्या समोरच मोठी गोशाळा आहे . इथे गाईंवर पुत्रवत प्रेम करणारे एक बाबाजी राहतात . ते सतत उघडे असतात . शरीर वज्रासारखे कठोर आहे . परंतु मन तेवढेच निर्मळ आहे .पुण्यामध्ये गोरक्षणाचे काम करणारे मिलिंद भाऊ एकबोटे म्हणून आहेत त्यांची हुबेहूब प्रतिकृती ! इथे अजून दोन-तीन परिक्रमावासी उतरले होते . काही गाडीने परिक्रमा करणारे होते . काही पायी वाले होते परंतु अधून मधून गाडीमध्ये बसत असत . इथल्या पुजाऱ्यांचा मुलगा खूप गोड होता . नुकताच मी पुन्हा एकदा तिकडे जाऊन आलो तर तो खूप मोठा झाला आहे असे वाटले ! मी परिक्रमेत असताना छोटा होता . त्याने मला लगेच ओळखले ! या राम मंदिराला अजून काही पंडित लोक जोडले गेलेले आहेत . त्यातील एकांची कन्या कथा वाचक असून तिची माहिती मंदिरात लावलेली होती . मंदिर पांढरे शुभ्र आहे . आणि इथे साधू संतांची राहण्याची स्वतंत्र सोय आहे . मंदिरामध्ये स्वच्छ संडास बाथरूम आहेत . सेवक अतिशय विनम्र आहेत . मंदिराचे सर्व कार्यक्रम शिस्तबद्ध आहेत . मंदिरामध्ये स्वामींची एक खोली आहे जिथून नर्मदा मातेचे सुंदर दर्शन होते ! संपूर्ण भिंत काचेची आहे ! शेजारी देखील एक खोली आहे जिथून बर्मानघाट सुंदर दिसतो ! मंदिरातील गोवंश फारच सुंदर आहे ! त्याची काळजी घेणारे काका अतिशय सात्विक आणि नेमस्त आहेत . एकंदरीत हे मंदिर अप्रतिम आहे . 
आपण समोरच्या तटावरून चालत आलो आहोत . आपण बघू शकता की बर्मानकला कला बेट कसे नर्मदा मातेला द्विभाजित करते . उत्तर तटावर बर्मान गाव आहे . इथेच बडा राम मंदिर आहे .
बडा राम मंदिर आणि द्वीपेश्वर महादेव समोरासमोर आहेत
आपण डाव्या बाजूला आहोत . बेड खूप भव्य आहे परंतु इथे आपल्याला परिक्रमे मध्ये असल्यामुळे जाता येत नाही .
पुढे नवा जुना पूल लागतात आणि मग सातधारा आहे .
राम मंदिरामध्ये सुंदर मूर्ती आहेत . 
बरमान घाटाचे प्रवेशद्वार . जर तुमची परिक्रमा योग्य मार्गाने चालली असेल तर तुम्ही या दारातून आत न जाता बाहेर येता !
या घाटावर कायमच गर्दी असते . वर्षभर सर्वाधिक गर्दी असणाऱ्या घाटांपैकी हा एक घाट आहे .
इथे बारा महिने असा मेळा लागलेला असतो .
घाटाच्या दोन्हीही तटांवर तेवढीच गर्दी असते .


इथे अन्य अनेक मंदिरे आहेत . जसे मराठ्यांनी बांधलेले सोमेश्वराचे मंदिर आहे .
या घाटावरची आरती भव्य दिव्य आणि बघण्यासारखी असते
गोपाळ कृष्णा चे मंदिर देखील प्रसिद्ध आहे
बडा राम मंदिर मात्र खूपच सुंदर आहे
या मंदिराचा स्वच्छ पांढरा रंग आणि काळा कळस खूप दुरून लक्ष वेधून घेतो


रामरायाच्या मूर्ती सोबतच अन्य अनेक देव असून सर्वांची छान पूजा केली जाते .
जिथे रामराया आहे तिथे हनुमानजी असणारच !ते देखील भव्य दिव्य आणि सुंदर आहेत !
या चित्रामध्ये तुळशी वृंदावनाच्या पुढे जी गोलाकार कमान दिसते आहे ते रस्त्याच्या बाजूने मंदिराचे प्रवेशद्वार असून उजवीकडे केशरी भिंतीच्या इथे परिक्रमावासी उतरलेले दिसत आहेत पहा !
या घाटाचे रात्रीचे सौंदर्य तर वर्णनातीत असते
समोरच्या बेटावर असलेले मंदिर आणि त्यावरील नमामि देवी नर्मदे । नमामि मात नर्मदे । ही अक्षरे रात्रभर झळकत असतात !
मंदिराचा कळस खूप दुरून दिसतो !
दीपेश्वर किंवा द्वीपेश्वर महादेवाचे अप्रतिम शिवालय
गावातील काली मातेचे मंदिर देखील प्रसिद्ध आहे .
एका मूर्तिकाराने बनवलेले अर्धनारी नटेश्वराचे ध्यान घाटावर आपले स्वागत करते .
द्वीपेश्वराचे मंदिर दुरून खूप सुंदर दिसते .
या मंदिरासमोर असलेले भव्य दिव्य हनुमानजी देखील छान दर्शन देतात !
समोरच्या तटावरून देखील बडा राम मंदिर दिसते .

दीपेश्वर महादेवाच्या बेटावर महापूर आला की मंदिरांचा विध्वंस होतो इतके ते ऐन प्रवाहाच्या मधोमध आहे . अशाच एका मंदिराचा वाहून आलेला कळस ।

आतापर्यंत नर्मदा मातेमध्ये मी अनेक ठिकाणी स्नान केले . परंतु बर्मान घाटावरती स्नान केल्यावर जो काही आनंद मिळतो त्याची बरोबरी कुठेच होऊ शकत नाही ! या घाटावर सर्व देवांनी मिळून तप आणि स्नान केलेले आहे . त्यामुळेच या घाटाचे महत्त्व फार मोठे आहे . ही तपोभूमी किती जागृत आहे याचा अनुभव तुम्हाला गेल्या क्षणी यायला सुरुवात होते . तुम्ही पूर्णपणे निर्विचार होऊन जाता . आपण कोण आहोत , कुठले आहोत ,कशासाठी निघालो आहोत , काय करतो आहोत , कुठे जाणार आहोत यातल्या कुठल्याही प्रश्नाचे उत्तर तुमच्याकडे शिल्लक राहत नाही अशी अवस्था तुम्हाला इथे आल्यावर प्राप्त होते ! ब्रह्मांड घाट हे या घाटाचे दुसरे नाव आहे . ते नाव सार्थ करणारा अनुभव तुम्हाला इथे येतो . अति पवित्र नर्मदा जलामध्ये जेव्हा तुम्ही डुबकी मारता तेव्हा तुमची जन्म जन्मानंतरीची पातके ती समूळ नष्ट करते . सर्व इच्छा आकांक्षा वांछ्या ईषणा कल्पना कामना धुवून टाकते . बाहेर येणारा मनुष्य हा पूर्णपणे नितळ निर्मळ स्वच्छ निर्मोही निर्लोभी निरोगी झालेला असतो . त्याला आपल्या भूतकाळाची स्मृति नसते . आणि भविष्यकाळाची क्षिती नसते . केवळ आणि केवळ वर्तमानाची स्थिती तो जगत असतो !  आणि वर्तमानात त्याच्यासमोर वाहत असणाऱ्या सर्व-अभयप्रदायिनी नर्मदा मातेकडे पाहून आपसूकच त्याच्या तोंडातून शब्द बाहेर पडतात , नर्मदे sss हर !





लेखांक एकशे पासष्ठ समाप्त (क्रमशः )

 


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

जे आवडते सर्वांना ...

अनुक्रमणिका (Index)

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

लेखांक १ : नर्मदे हर !

लेखांक २ : भोपाळ जवळच्या जंगलातील अपघात

लेखांक ३ : चोराची धन

लेखांक ४ : झुठा कही का ! सबकुछ तो लाए हो !

लेखांक ५ : ग्वारीघाट जबलपुर मध्यप्रदेश

लेखांक ६ः झुलेलाल आश्रम , ग्वारी घाट

लेखांक ७ : नाभिकाने केलेला जाहीर __मान !

लेखांक ९ : इंदौरी पोहा आणि गरमा गरम जलेबी !