लेखांक १६४ : पुत्रदायी दाऊजी महाराज समाधी , शुक्लपूर आणि रिछावरच्या शिवालया चा चक्काचूर
आंडिया मढीतील मुक्कामामध्ये माझी जराही विश्रांती होऊ शकली नाही . कारण इथे माझ्यासोबत एक परिक्रमावासी रात्री मुक्कामाला होता . पुनमदास मौनी असे त्याचे नाव होते . हा जलहरी परिक्रमा करत होता . हा रात्री ९:०० वाजेपर्यंत मौन बाळगायचा .परंतु नऊच्या पुढे कोणी निमुटपणे ऐकणारा सापडला की त्याला किती बोलू आणि किती नाही असे होऊन जायचे ! याला गेले चार दिवस बोलायला कोणी सापडले नव्हते . आज नेमका मी त्याच्यात तावडीत सापडलो ! मी शक्यतो समोरच्या व्यक्तीला बोलताना तोडत नाही . ऐकत राहतो . त्याचा इथे गैरफायदा घेतला गेला ! आणि रात्री उशिरापर्यंत डोळे तारवटून याच्या रटाळ गप्पा ऐकत बसलो !मौनाची ही दुसरी बाजू फारच भयानक आहे !मी मौना मध्ये फोन उचलणारी माणसे पाहिलेली आहेत ! मौनाची केवढी क्रूर चेष्टा ! असो . ज्याला मौनाचा खरा अर्थ कळला तो या विषयावर मौन पाळेल हेच खरे !त्यामुळे रात्री उशिरा झोपून देखील मी पहाटे लवकर उठून स्नान वगैरे आटोपून घेतले . नेपाळी बाबांनी अजून राहण्याचा आग्रह करण्याआधी तिथून सटकलो .इथून निघालो आणि अनघोरा गाव गाठले . पूर्ण काठानेच चाललो . इथून लोक रस्त्याने लवकर जातात . परंतु मी आठ ते नऊ किलोमीटर लांब पडणाऱ्या काठावरच्या मार्गाचीच निवड केली . केलकछ , अनघोरा पार करत पतय घाटावर आलो . अनघोरा गावाच्या हद्दी मध्ये मला जनवासावाले बाबाजी नावाचे एक संत भेटले . इथे पूर्वी पतय वाले बाबाजी सेवा द्यायचे . दरम्यानच्या काळात अनघोरा गावामध्ये कोल्हापूर मधून एक तरुण युवक साधनेसाठी येऊन राहिला होता . मैया काठी गुहा करून हा तरुण राहत असे . स्वामी समर्थांची साधना करत असे . गावकरी त्याला काय हवे नको ते आणून देत असत . पुढे पतय वाले महाराज स्थान सोडून गेल्यामुळे गावकऱ्यांनी त्याला अशी विनंती केली की आपण आपल्या गावामध्ये सेवा चालू करूया . या गावांमध्ये गौ घाट नावाचा घाट असून येथे महादेवाचे पांडवकालीन शिवलिंग आहे . शिवलिंगावर गाईचा आकार उठलेला असल्यामुळे याला गौ घाट म्हणतात . त्या तरुणाने मग इथे स्थान विकसित केले आणि सेवा द्यायला सुरुवात केली . यांचे नाव उन्मेषानंद असे आहे . गेली बारा वर्षे ते इथे सेवा देत आहेत असे कळाले .मी परिक्रमेमध्ये या स्थानावर गेलो नाही त्यामुळे महाराजांना प्रत्यक्ष भेटलो नाही परंतु दुरून हे स्थान पाहिले . अतिशय रम्य जागा आहे . इथे परिक्रमावासींची सेवा चालते . सेवेसाठी आपण थेट उन्मेषानंद महाराजांना संपर्क करू शकता . त्यांचा क्रमांक खालील प्रमाणे ७८ ९८ ९७ १२ ४० / 78989 71240.
काठाने चालताना एक भयानक अनुभव इथून पुढे सारखाच येऊ लागला .काठाने चालणाऱ्या माणसावर इथल्या टिटव्या फार जोरदार हल्ला चढवायच्या . विशेषतः इतके दिवस काळ्या पायाची टिटवी आणि लाल चोचीची टिटवी दिसत होती . परंतु आता मात्र पिवळ्या पायाच्या व पिवळया चोचीच्या टिटव्या दिसू लागल्या . ह्या अधिक आक्रमक होत्या . लाल चोचीची टिटवी देखील हल्ला करायची परंतु ती लांबून उडायची . परंतु पिवळ्या चोचीची टिटवी मात्र थेट आपल्या डोळ्याच्या दिशेने बघत खूप जवळ उडत यायची आणि फुटभर अंतरावरनं अचानक बाजूला उडून जायची ! हा प्रकार आता सांगायला मजा वाटते परंतु तेव्हा फार भीतीदायक वाटायचा ! बर मी दंड देखील फिरवू शकत नव्हतो . कारण चुकून जरी धक्का लागला तरी तो नाजूक जीव मरून जाणार ! त्यापेक्षा तोंडासमोर हात धरून मी या टिटव्यांचा सामना करायचो .आपल्या अंड्यांना आणि पिलांना वाचवण्यासाठी त्यांचा हा आटापिटा असायचा हे मला माहिती होते . परंतु त्यांच्या पंखांचे वारे जाणवेपर्यंत त्या जवळ यायच्या ! ऑस्ट्रेलियामध्ये आढळणारा ऑस्ट्रेलियन मॅगपाय या नावाचा एक काक वर्गीय पक्षी आहे . तो देखील असाच टेरिटोरियल पक्षी आहे . अर्थात हद्द आखून जगणारा ! त्याच्या हद्दीत आले की तो हल्ला करतो ! सायकलवर दोन वेळा विश्वपरीक्रमा करणारी वेदांगी विवेक कुलकर्णी हिने मला या पक्ष्याचा भयानक अनुभव सांगितला होता .या पक्षाने काही काळ तिला अक्षरशः रडकुंडीला आणले होते . तोच प्रकार टिटवीच्या बाबतीत देखील आहे . मला देखील चालताना या टिटव्यांनी फार त्रास दिला !बरे तुम्ही प्रतिकार केला तर त्या अजून त्वेषाने आणि संख्येने हल्ला करतात ! त्यापेक्षा मान खाली घालून चालत राहणे हाच एकमेव उपाय आहे . सुरुवातीला मला याचा त्रास होत होता नंतर मी याचा आनंद घ्यायला सुरुवात केली ! कारण मला खात्री पटली की ही काही हल्ला करत नाही तर फक्त घाबरवते आहे ! वाघ सुद्धा असा खोटा हल्ला करतो ! त्याला मॉक चार्ज असे म्हणतात ! आपण नाही का ला मुलांना खोटा खोटा हात उगारत !त्यातलाच हा प्रकार !
टिटवी चा हल्ला किती भयानक असतो हे आपल्याला हे चित्र पाहिल्यावर लक्षात येईल .
या भागामध्ये पाणकावळे देखील खूप होते . एके ठिकाणी त्यांच्या कळपामध्ये एक साधा कावळा घुसायला बघत होता . ते पाहून मला खूप मौज वाटली व त्याची पाण कावळ्यांनी केलेली अवस्था पाहून हसू आले !
पाणकावळा आणि कावळा यांचे संग्रहित छायाचित्र .
सर्वच प्राण्यांचे विणीचे हंगाम सुरू झाले होते .गाई म्हशी देखील त्यात मागे नव्हत्या. त्यामुळे मी सावधपणे चालत होतो . या हंगामात प्राणी पक्षी अधिक आक्रमक असतात . असोत .आपल्याकडे मराठीमध्ये एक शब्द आहे पहा . वैशाख वणवा ! वैशाख वद्य दशमी ते ज्येष्ठ शुद्ध द्वादशी पर्यंतच्या दिवसांना वैशाख वणवा असे म्हणतात . कारण या दिवसांमध्ये प्रचंड प्रमाणात उष्णता भरतखंडामध्ये निर्माण होते .माझी आजी मला हे नेहमी सांगायची . वैशाख वणव्यामध्ये बाहेर जाऊ नको वगैरे .परंतु आपला जन्मच वैशाख वणव्यात झालेला ( वैशाख कृ १२ ) !त्याला मी तरी काय करणार ! या भागामध्ये सर्वाधिक उष्णता असणाऱ्या नऊ दिवसांना नौतापा असे म्हणायचे . नर्मदा मातेच्या कृपेने माझा नऊतापा व्यवस्थित सुखरूप निर्विघ्नपणे पार पडला ! आंग्ल दिनांक २५ मे ते दोन जून हा तो कालावधी होता .हा तो काळ असतो ज्या काळात सूर्य रोहिणी नक्षत्रातून मृग नक्षत्रामध्ये प्रवेश करतो. या काळात तो सर्वाधिक आग ओकतो .असो .चालत चालत पतई / पतय घाट गाठला .मोठा बांधीव घाट होता . आज रविवार असल्यामुळे घाटावर खूप गर्दी होती . वरच्या बाजूला एक सर्व देवांचे एकत्र असे मंदिर होते ! मराठी कारागिरांनी मंदिर बांधले होते त्यामुळे नामदेव महाराज ज्ञानेश्वर महाराज आणि भावंडे तसेच गोरोबाकाका आदि संतांच्या प्रतिमा देखील होत्या ! भरीत भर म्हणून जीजस मेरी आणि फकीर सुद्धा अजरामर केले होते ! हे असले धंदे शुद्ध हिंदूच करू जाणोत !हत्तीच्या पायातून जिना निघे व सिंहाच्या पायातून वर पोहोचले की पुन्हा वरती काही देव होते ! मध्ये मोठे काँक्रीटचे शिवलिंग होते .
हत्तीच्या पायातून वर जाणारा जीना हाच !
इथे रामकृष्णदास नामक एक फक्कड बालब्रह्मचारी साधू स्थिरावला होता .तरुण होता .याने मला सुंदरसा चहा पाजला . आश्रमाचा परिसर छान होता . त्याच्याशी थोडा गप्पा मारून पुढे निघालो . मध्ये सिद्ध घाट येतो . म्हणजे दिसत काहीच नव्हते परंतु वरच्या बाजूला जावेसे वाटले म्हणून गेलो तर ती नेमकी दुर्वास ऋषींची समाधी निघाली !अति प्रदीप्त ऊर्जा केंद्र ! पावर हाऊसच ! मंदिर ही भव्य व वेगळेच बनत होते . चित्रविचित्र आकार व मजले होते .उंचच उंच कळस होता . हे सर्व सिमेंट मध्ये करण्यात आले होते .
चित्रविचित्र मजले आणि आकार असलेले मंदीर
हा कळस सर्वार्थाने अतिउंच आणि चित्रविचित्र रचनांनी युक्त आहे .
इथे पुन्हा एकदा चहा घेऊन शोकलपूर अथवा शुक्लपुरला पोहोचलो . समोर नील कुंड होते . इथले पाणी खरोखरीच निळे दिसते .कदाचित इथल्या वाळूमुळे तसा भास होत असावा . इथे वाळू अशा उंचीवर आहे की ज्यामुळे पाण्यामध्ये आकाशाचे प्रतिबिंब चांगले उमटते . आणि पाण्याला निळा रंग प्राप्त होतो . समोरच्या घाटाचे काम अजून रखडलेलेच होते . एक जरी महापुर आला तरी हा सगळा घाट वाहून जाऊ शकला असता कारण अजून तो पूर्ण झालेला नव्हता . इथे शुक्लेश्वर महादेवाचे मंदीर असल्यामुळे हे तीर्थक्षेत्र शुक्ल तीर्थ म्हणून देखील ओळखले जाते . इथे दाऊजी बाबा अथवा दाऊजी गुरु महाराज नामक एका लोकांना फारशा ज्ञात नसलेल्या संतांची संजीवन समाधी आहे . या समाधीवर पुत्र मागण्यासाठी जोडपी येतात . समाधीच्या कठड्यावर एकूण नऊ गुरु पादुका आहेत . इथे लोक नारळ वाहतात आणि सपत्नीक नर्मदा परिक्रमा करतात . अशा नारळांचा इथे ढीग लागलेला होता .इथे अप्रतिम अशी भोजन प्रसादी मला मिळाली .गरमागरम टिक्कड ,कढी ,नुक्ती किंवा बुंदी ,बर्फी आणि गरमागरम भजी ! जय हो माई की !
इथल्या गुरुजींशी काही काळ विचारविनिमय केला . मी परिक्रमेमध्ये असतानाच या घाटावर कोणीतरी परिक्रमावासी कैलासवासी झाल्याचे मला कळले होते . त्याबाबत विचारले असता गुरुजींनी सांगितले की तुमच्या महाराष्ट्रातीलच फडतरे नावाचे खंडाळ्याचे परिक्रमावासी हृदय क्रिया बंद पडल्यामुळे इथे शांत झाले होते .याचा अर्थ परिक्रमे मध्ये कानावर पडलेली बातमी खरी होती .
या घटनेबाबत गुगल जेमिनीवर वरील माहिती मिळाली .
इथून निघालो आणि पुन्हा एकदा नर्मदा मातेच्या किनाऱ्याचा मार्ग पकडला . प्रचंड ऊन होते व एकही सावली देणारे झाड नव्हते . बरेच अंतर चालल्यावर एक छोटेसे सावली देणारे झाड दिसले . त्यामुळे दमून त्याच्याखाली बसलो .दोनच मिनिटे बसला असेन इतक्यात एक तेजस्वी उंच गोरापन युवक म्हशींच्या मागे पळत पळत तिथे आला . मला पाहून थांबला . याचे नाव होते नरेंद्र लोधी . कोणीही स्थानिक भेटले की मी त्या परिसराची इथ्यंभूत माहिती विचारून घ्यायचो .तसे यालाही विचारू लागलो . याने सांगितले की हे रिंछावर नावाचे गाव आहे . या गावांमध्ये एका अति प्राचीन शिव मंदिराचे अवशेष आहेत असे त्याने मला सांगितले ! मला ते अवशेष बघण्याची उत्सुकता निर्माण झाली . तो मोठ्या आनंदाने मला तिकडे घेऊन निघाला . मातीचा खडा कडा चढून आम्ही गावात आलो .भग्न मंदिरात आलो . मी सुमारे दोन तास सर्व अवशेष बारकाईने पाहिले . त्या मंदिराची तोडफोड पाहून मन व्यथित झाले . यातील अर्धे अधिक अवशेष आसपासच्या लोकांनी पळवलेले होते . तरी देखील हे मंदिर किती भव्य असेल याची कल्पना उरलेले अवशेष पाहून येत होती ! पवित्र शिवलिंगे , देवीदेवतांच्या पूजेतल्या मूर्ती तसेच अप्रतिम कलाकुसर असलेले मूर्तीकलेचे आणि शिल्पकलेचे नमुने निर्दयपणे तोडण्यात आले होते .
गावातील तरुण आणि काही ग्रामस्थ
हे सर्व उघड्या डोळ्यांनी पाहत असून देखील ज्यांना सर्व धर्म समान आहेत असे वाटते त्यांनी माजी सनदी अधिकारी संजय दीक्षित यांचे ऑल रिलीजन्स आर नॉट द सेम हे पुस्तक नक्की वाचावे !
बाहेरचा कोणीतरी बाबाजी आपल्या गावातील मंदिराचे तासंतास निरीक्षण करतो आहे हे कळल्यावर हळूहळू गावातील काही तरुण देखील तिथे जमले होते .त्या सर्वांचे जागेवरच प्रबोधन केले . ग्रामस्थांना मी सांगितले की पीएमओला जर त्यांनी लिहिले तर यावर काहीतरी कारवाई होऊ शकते . कसे लिहायचे त्याची कल्पना दिली . माझ्या बोलण्यामुळे नरेंद्र प्रभावी झाला असावा कारण तो दोन मिनिटे तरी माझ्या घरी चला म्हणून मागे लागला . मग मी तिच्यासोबत त्याच्या घरी गेलो . दोन जुलै रोजी पंचायतचे चुनाव होते . नरेंद्र चे वडील " सरपंची की परपंची " लढत होते ! सरपंच पदाच्या निवडणुकीला त्यांनीच वापरलेला हा सुंदर शब्द होता ! नरेंद्र चा मोठा भाऊ धर्मेंद्र गुंड प्रवृत्तीचा होता . सव्वा सहा फूट उंची , गोरापान तेजस्वी धिप्पाड देह व बिनधास्त वृत्ती त्यामुळे आमची लगेचच मैत्री जमली !चहा पिऊन निघावे असा माझा बेत होता . परंतु धर्मेंद्र काही मला सोडेना . त्याने आधी चहा पाजला . मग थोडे थांबा म्हणत लस्सी पाजली . मग म्हणाला आता इथेच स्नान संध्या करून घ्या ! घरामध्ये लहान मुले बरीच होती . अखेरीस अंधार पडतो आहे असे पाहून मी इथे थांबण्याचा निर्णय घेतला . माणसे चांगली होती व त्यांना अनेक शंका होत्या . कुटुंबीय राजकारणामध्ये होते त्यामुळे त्यांच्या माध्यमातून मंदिराचे काही कल्याण झाले तर व्हावे असे मनात आले . आणि मुळात मला देखील मुलांचे , तरुणांचे प्रबोधन करायला आवडायचेच ! सर्व योग जुळून आल्यामुळे थांबलो .
हेच ते सावली देणारे एकमेव झाड ! ज्याच्यामुळे मी इथे थांबलो . आणि वरती माँ नर्मदा लिहीले आहे ते लोधींचे घर आहे .
अंगणामध्ये एका झाडाखाली त्यांनी मस्तपैकी तखत लावून दिला . खाली झोपलो असतो .परंतु शेतातले घर असले की साप विंचू काटा असतो म्हणून बाहेर तखत घ्यावाच लागतो . यांच्या घरातून मैयाचे इतके सुंदर दर्शन होते ते की काय सांगावे !
चित्रांमध्ये महादेवाचे मंदिर दिसते आहे . लाल खुणे ने दाखवलेले लोधींचे घर आहे . तिथून लांबवरपर्यंतची मैया किती सुंदर दिसते आहे पहा !
हे तिघे भाऊ आणि दोन बहिणी होत्या . एक बहीण आणि एक भाऊ लग्नाचे राहिले होते . मधला भाऊ अरविंद म्हणून होता त्याला सर्वजण टावील म्हणायचे ! टाविल म्हणजे टॉवेल ! लहानपणी हा टॉवेल लावून फिरायचा त्यावरून हे नाव पडले ! टॉवेलची मुले देखील खूप गोड होती . यांची वृद्ध आत्या आणि आतोबा आले होते . लोधी समाज या पट्ट्यामध्ये खूप आहे . ओबीसी प्रवर्गामध्ये मोडणारा हा समाज मुळामध्ये राजपूत क्षत्रिय आहे असे त्यांनी मला सांगितले . धर्मेंद्रचा मोठा मुलगा मोठाच कारभारी होता ! केवळ दहा वर्षाचा असून देखील हा मोटरसायकल ट्रॅक्टर सर्व चालवायचा !पक्का बापावर गेला होता . मैयामध्ये उत्तम पोहायचा ! केवळ दहा वर्षाचा असून देखील त्याला आठवी मध्ये घातले होते ! या भागामध्ये उंची पाहून इयत्ता ठरवतात असे मला सांगण्यात आले ! तसेही शिकायचे कुणाला आहे ! शेतीच तर करायची आहे ! धर्मेंद्र अभिमानाने सांगायचा ! यांच्या घरात मुस्कान नावाची एक छोटीशी मुलगी होती . माझे मित्र बाळासाहेब वाल्हेकर यांची कन्या छकुली लहानपणी अगदी अशी दिसायची ! कोणाच्यातरी फोनवरून मी बाळासाहेबांना व्हिडिओ कॉल लावला आणि छकुलीला मुस्कान दाखवली ! दोघींनाही पटले ! मुस्कान म्हणाली बडे होकर मे ऐसी ही दिखूंगी ! आणि सगळे हसायला लागले !
अरविंद तथा टॉवेल हा अतिशय उपद्व्यापी होता . इथे पूर्वी खूप सारस पक्षी यायचे . एकदा याने पाण्याखालून आवाज न करता पोहत जात एका सारस पक्ष्याचा पाय पकडला ! तेव्हापासून या भागात सारस यायचे जे बंद झाले ते आजतागायत आलेच नाहीत ! असे एक एक किस्से घरातील सगळे लोक सांगत होते ! खूप वर्षांनी त्यांच्याकडे कोणीतरी परिक्रमा वासी आला होता . त्यामुळे सर्वांनाच झालेला आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता . संध्याकाळी मैया मध्ये सुंदर असे स्नान केले . धोकादायक उतार होता . परंतु पाण्याला गती होती . पाणी खूप स्वच्छ होते ! यांच्या भाषेतले शब्द मला फार आवडले ! मजेशीर भाषा आहे . आजीला इकडे बाई म्हणतात . पायवाटेला गेल म्हणतात . काठा काठाने जाण्याला तटै तटै किंवा तरै तरै जाणे म्हणतात .पोहोचणे या शब्दाला हिट जाना असं म्हणतात !यह ला जह म्हणतात ! 'ये बाजू ' ला 'जा बाजू ' म्हणतात . यह देदो ला जे देदो म्हणतात !थोडेसे ला तन्नक म्हणतात ! थे ला हते म्हणतात !अशी मजेदार भाषा आहे ! असो . रात्री मस्तपैकी पुरी , भाजी ,खीर ,पापड असा बेत करण्यात आला! वाचकांना असे वाटू शकते की याला एवढे पदार्थ लक्षात कसे राहिले ? मुळात मला खवय्येगिरीची इतकी ही काही आवड नाही परंतु वहीमध्ये रोज मी नोंद करत असल्यामुळे हे पदार्थ लक्षात राहिले इतकेच .सर्वांशी पुन्हा एकदा गप्पा मारल्या . मुलांना चित्रे काढून दिली . आणि तखतावर झोपलो . पहाटे ब्राह्म मुहूर्तावर साडेतीन वाजता उठून मैया मध्ये स्नान करून पूजा आटोपून चहा घेऊन पुढे निघालो .इतक्या पहाटे सुद्धा माझ्यासाठी घरातील एक माताराम उठून आंघोळ करून तयार होती .नर्मदा खंडातील लोक परिक्रमावासीला पारोशाने काहीही बनवून देत नाहीत . काठाने पावले टाकायला सुरुवात केली . परंतु प्रत्येक पावलाला मला भग्न झालेल्या एक एक मूर्ती आठवू लागल्या .मी स्वतः काही मंदिरांच्या उभारणीमध्ये सहभागी झालेलो असल्यामुळे त्यासाठी लागणारे कष्ट मला माहिती आहेत .
अमरावती व वर्धा दरम्यान बांधलेल्या लहानुजी महाराज जन्म मंदिराच्या एका कमानीचे काम स्वतः करताना प्रस्तुत लेखक .
अशा न जाणो किती मूर्ती माझ्या पावलाखाली आता देखील दबलेल्या असतील असा विचार करून माझ्या डोळ्यातून अश्रूधारा वाहू लागल्या . आपल्याकडे अनेक कथा ऐकायला मिळतात की शेतात नांगरताना अमुक देवाची मूर्ती सापडली . विहिरीमध्ये तमुक देवाची मूर्ती सापडली . डोहामध्ये उडी मारल्यावर अशी मूर्ती मिळाली . नदीच्या काठावर तशी मूर्ती मिळाली .हे फारसे भूषणावह नसून आपल्या रक्तरंजित इतिहासाची ती साक्ष आहे ! यातून जोपर्यंत आपण बोध घेत नाही आणि त्यावर कृती करत नाही तोपर्यंत आपण उभे केलेले सर्व इमले व्यर्थ आहेत .अस्थिर आहेत . निरर्थक आहेत . कुचकामी आहेत . पटतंय का बघा .
वरील लेख दृक्श्राव्य स्वरूपात ऐकण्यासाठी येथे क्लिक करा
लेखांक समाप्त क्रमशः
" वैशाख वणवा ! वैशाख वद्य दशमी ते ज्येष्ठ शुद्ध द्वादशी पर्यंतच्या नऊ दिवसांना ..." खरं तर हे अठरा दिवस होतात . कांही चुकतंय का ?
उत्तर द्याहटवादुरुस्ती केली आहे . हे नऊ दिवस नाहीत जास्त असतात . उत्तर भारतात नऊ दिवसांचा ताप मानतात
हटवाफडके फक्त चुका काढू नका... बोध घ्या
हटवाबोध घेतोच आहे . तुम्ही प्रचंड प्रयास करून परिक्रमा केलीत आणि नंतरही अधिकाधिक माहिती जमवून वाचकाना उत्तम मार्गदर्शन कसे होईल ते पहात आहात त्याबद्दल धन्यवाद !
हटवाती प्रतिक्रिया माझी नाही बरं का मुकुंदराव ! आपले म्हणणे योग्यच आहे - प्रस्तुत लेखक
हटवानर्मदे हर 🙏
उत्तर द्याहटवारिछावरच्या मंदिराचे अवशेष बघताना असं वाटलं की इतकं सुंदर कोरीव काम असलेलं आणि भव्य मंदिर भारताच्या सुवर्ण काळातलं म्हणजे किमान एक हजार वर्षांपूर्वीचं तरी असावं . तुम्ही या अवशेषांची माहिती छायाचित्रांह पुरातत्व खात्याला पाठवावी अशी विनंती करतो .
उत्तर द्याहटवाकोणीतरी हे शिवधनुष्य उचलावे असे वाटते . मी निरोप्याचे काम केले आहे .
हटवा