लेखांक १६३ : चोरासचा सुंदर आश्रम आणि आंडिया च्या नेपाळी बाबांची सौंदर्यदृष्टी

बोरासचा किनारा सोडला आणि चोरासच्या दिशेने चालू लागलो . झिकोलीच्या पुलाखालून पुढे निघालो .  काठाने चालताना शेती व चिखलाचे किनारे तुडवत चालत होतो . अचानक माझे लक्ष नर्मदा मातेच्या अगदी काठावर असलेल्या एका अतिसुंदर कुटीने वेधले ! जणू काही एखाद्या ऋषीमुनींचा आश्रम असावा अशा कुटी होत्या ! अतिशय नीटनेटकेपणाने कुटींचे बांधकाम केलेले होते . आत मध्ये कोणीही नव्हते . मी सर्व परिसर न्याहाळला . कुटीमध्ये काही काळ बसलो देखील . खूप छान वाटले . हा जवळच असलेल्या चोरास गावातील चंद्रपाल सिंह पटेल यांनी बांधलेला आश्रम होता . अर्थात ही माहिती मला पुढे गेल्यावर एका केवटाने दिली . परंतु तिथे असताना मात्र मला हा आश्रम कोणाचा आहे वगैरे काहीही कल्पना नव्हती .फक्त एवढेच जाणवत होते की हा अतिशय सुंदर आश्रम आहे ! आश्रमातील प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक बनवली होती .

नर्मदा मातेच्या अगदी काठावर असलेला चोरासचा आश्रम
आश्रम अतिशय सुंदर असून संपूर्णपणे नैसर्गिक वस्तूंचा वापर करून बनवला आहे . 
आश्रमामध्ये नर्मदा मातेचे वेगळे मंदिर बनवलेले असून ते देखील झोपडी सारखेच बनवले आहे .
आश्रम अगदी नर्मदा मातेच्या काठावर आहे . त्यामुळे दरवर्षी हा पावसाळ्यामध्ये हलवावा लागतो . आणि पुन्हा पुढच्या वर्षी उभा केला जातो .
आश्रमाचे कुंपण देखील बांबूपासून बनवलेले आहे . 
पटेल यांच्या स्वतःच्या शेतामध्ये हा आश्रम त्यांनी उभा केलेला आहे . इथे राहणे म्हणजे साक्षात पौराणिक काळामध्ये गेल्यासारखे वाटते .
आश्रमाचा परिसर असे सुंदर पद्धतीने सपाट करण्यात आलेला आहे .
आत मध्ये परिक्रमावासींसाठी मुबलक जागा आहे . इतका सुंदर आश्रम उभ्या नर्मदा खंडात शोधून सापडणे कठीण आहे .
विशेषतः कुठेही बसल्याबसल्या होणारे नर्मदा मातेचे दर्शन हे या आश्रमाचे वैशिष्ट्य आहे
या भागातील नर्मदा माई देखील अतिशय शांत धीर गंभीर आणि सुंदर आहे
आश्रमाची व्यवस्था सध्या हे साधू महाराज पाहत आहेत असे दिसते .
आश्रमामध्ये सर्व सुविधा ठेवलेल्या असून अगदी ऊसाचा रस काढण्याचे पारंपारिक यंत्र देखील ठेवलेले आहे .
शेतातून चालत जाताना अशा रीतीने हा आश्रम मला दिसला . आधी मला कोणाचं तरी घर आहे असं वाटलं . परंतु आत मध्ये गेल्यावर कळाले की हा परिक्रमावासींची सेवा करण्यासाठी बांधलेला आश्रम आहे .
प्रतिवर्षी अतिशय चिकाटीने हा आश्रम शून्यापासून उभा केला जातो .हा आश्रम कशाचा बनलेला आहे ते जाणून घेण्याची उत्कंठा माझ्या मनामध्ये होती .
पुढे थोडे अंतर गेल्यावर एक केवट भेटला ज्याने मला आश्रमाचे निर्माण कर्ते कोण आहेत ते सांगितले .
चंद्रपाल सिंह पटेल , यशपाल सिंह पटेल ,सौरभ परमार आणि या सर्वांचे कुटुंबीय मिळून हा आश्रम चालवीत होते . (यातील ६०१४ ने संपणारा क्रमांक चंद्रपाल पटेल यांचा आहे )
चंद्रपाल सिंह यांची भेट घ्यावी असे मनात आले आणि गावामध्ये त्यांचे घर शोधत शिरलो .चंद्रपाल सिंह या गावातले पुढारी होते . आणि कुठल्यातरी निवडणुकीच्या तयारीमध्ये होते . त्यांच्या हातामध्ये गावातील सर्व मतदारांच्या याद्या होत्या .मी घरामध्ये गेल्यावर त्यांना मोठा आनंद झाला . एक परिक्रमावासी आला आहे असे त्यांनी घरातील सर्वांना सांगताच घरातील सर्व मंडळी बाहेर आली . त्यांच्या आईने मला सुंदर चहा आणून दिला .सोबत पारले जी चा एक पुडा दिला . पटेल साहेबांनी मतदारांच्या याद्या माझ्या हातात दिल्या आणि म्हणाले की या निवडणुकीचा निकाल आमच्यासारखा लागू दे असे म्हणा . मी म्हणालो नर्मदा मैयाची जशी इच्छा असेल तसे होईल ! तुम्ही तिची सेवा करतच आहात . जशी सेवा तसा मेवा ! बरेचदा आपल्याला जे चांगले वाटेल ते आपल्यासाठी चांगले असेलच असे नसते . त्यामुळे आपल्या आयुष्याचे महत्वाचे निर्णय अत्यंत विश्वासपूर्वक नियतीवर सोडता आले पाहिजेत ! पटेल यांना माझे हे म्हणणे पटले . त्यांनी उभा केलेला आश्रम मला खरोखरच खूप आवडला आहे आणि मी आवर्जून त्यांना भेटायला आलो आहे ही गोष्टच त्यांना खूप सुखद वाटली . त्यांनी मला आश्रम कसा बनवला आहे ते सर्व सांगितले . कास नावाच्या गवतापासून हा आश्रम बनवला होता .दर्भ म्हणून जे गवत असते त्याला संस्कृतमध्ये कुश किंवा हिंदी व मराठीमध्ये कुस असे देखील म्हणतात .आणि हे त्याच जातीतले कास नावाचे गवत असते .कास , बास ,घास ,खिळे , आणि बांधणीच्या तारा ( बाईंडिंग वायर ) याच्या साह्याने  हा आश्रम प्रतिवर्षी बांधला जातो  . कास गवताचे भारे विकत आणून ते बांबूच्या जाळ्यांमध्ये बसवून भिंती तयार केल्या जातात . या आश्रमामध्ये अजिबात उष्णता किंवा थंडी दोन्ही जाणवत नाही . पावसापासून देखील संरक्षण मिळेल अशी याची रचना  ताडपत्री वापरून केलेली आहे . सुमारे १५ लाख रुपये खर्च करून दर वर्षी हा आश्रम पटेल उभा करतात . आणि परिक्रमावासींची सेवा करतात . चौरास हे गाव रायसेन जिल्ह्यातल्या उदयपुरा तालुक्यामध्ये येते . 
इथून पुन्हा एकदा काठाने चालायला सुरुवात केली . आज नर्मदा मातेने बहुतेक मला तिच्या काठावर सर्वात सुंदर सुंदर जे काही आहे ते सर्व दाखवायचे असे ठरवले होते ! कारण थोड्याच वेळामध्ये अंडीया नावाच्या गावामध्ये अगदी नर्मदा मातेच्या काठावर असलेल्या एका आश्रमात जाण्याचा योग आला . म्हणजे आश्रम तसा थोडा उंचावर होता आणि मी वाळूच्या किनाऱ्यातून पुढे पुढे निघालो होतो . इथे एक साधू स्नान करत होता . त्याने मला सांगितले की वरती आश्रमामध्ये सेवा घेतल्याशिवाय पुढे जाऊ नये . नर्मदा मातेमध्ये उभ्या असलेल्या माणसाने सांगितलेले ऐकायचे असा माझा नियम होता . त्यामुळे मी निमुटपणे वरती गेलो . एका नेपाळी बाबांनी या ठिकाणी नितांत सुंदर आश्रम उभा केला होता ! बाबा अतिशय कल्पक मनमोकळा आणि हसतमुख होता ! तुलनेने तरुण होता . पन्नाशीचा असावा . या आश्रमामध्ये मी सकाळीच पोहोचलो असलो तरीदेखील दिवसभर इथे राहिलो कारण इथून माझा पायच हलेना ! संपूर्ण आश्रमामध्ये अतिशय सुंदर बागबगीचे तयार केलेले होते !अतिशय विचारपूर्वक आणि अभ्यासपूर्वक विविध देशी-विदेशी झाडे लावण्यात आलेली होती . नेपाळी बाबा खरोखर नेपाळचे होते . संपूर्ण भारतभर फिरून त्यांनी विविध प्रकारच्या दुर्मिळ वनस्पती गोळा केल्या होत्या आणि त्या इथे लावल्या होत्या . आश्रमामध्ये गेल्या गेल्या एक फरश्यांची पायवाट केली होती . ती लांबलचक होती . तिच्या एका बाजूने विविध प्रकारच्या कुटी होत्या .एका बाजूने सुंदर बगीचा होता . नर्मदा मातेच्या बाजूला एक शेड होती . तिथे स्वयंपाक आणि भोजन व्यवस्था होती . नर्मदा मातेकडे पाहत बसता येईल असा सज्जा तयार केलेला होता .त्याला बांबूचे कुंपण होते . मध्ये एक बांधकाम होते . तिथे बाबा खुर्ची टाकून बसायचे . त्या इमारतीवरून देखील सुंदर वेली सोडलेल्या होत्या . संपूर्ण आश्रम सौंदर्यदृष्टी डोक्यात ठेवून बांधलेला होता . 
बाबांनी मला आज इथे राहा असा आदेश दिला . मला देखील स्थान आवडले त्यामुळे मी आपसुकच थांबलो . बाबांनी मला खूप वेळ दिला . या बाबांना व्हिडिओ घेण्याची खूप आवड होती परंतु कसे घ्यावेत याचे ज्ञान नव्हते . मी त्यांना त्यांच्या मोबाईलवर काही व्हिडिओ घेऊन दिले आणि सर्वसामान्य व्हिडिओ आणि चांगला व्हिडिओ याच्यात कसा फरक असतो हे त्यांना समजावून सांगितले . बाबांना हा खेळ खूप आवडला . त्यांनी माझ्याकडून त्यांचे स्वतःचे भरपूर व्हिडिओ बनवून घेतले ! बागेत फिरताना ! खुर्चीवर बसलेले ! मैय्याकडे पाहत बसलेले असे अनेक व्हिडिओ आम्ही शूट केले .या बाबांची कलादृष्टी इतकी प्रसिद्ध आहे की अयोध्येमध्ये राम मंदिराच्या स्थापनेच्या वेळी झालेल्या संपूर्ण रामनामजपयज्ञ मंडपाची रचना बाबांकडून साधूंनी करून घेतली होती . तटावरती प्रचंड वारा सुटलेला होता . मान्सूनच्या आगमनाची ही तयारी होती . त्या वाऱ्यामध्ये दुपारी पडून राहिलो . खूप छान वाटले . सर्व श्रमांचा परिहार झाला . इथे दुपारी भोजनामध्ये बर्रा नामक एक गव्हाचा प्रकार आहे तो गहू आणि चण्याच्या पिठाची खापरावर भाजलेली पोळी खाल्ली . खूपच अप्रतिम चव होती . इथे असलेल्या सेवेकऱ्यांना मी गुळ फोडण्याची सेवा दिली . बाबांचा समोरच्या तटावर महुआखेडा गावात एक आश्रम होता .त्याची माहिती आपण दक्षिण तटावर असताना घेतलेली आहेच . त्याचबरोबर याच गावामध्ये महेश आश्रम म्हणून त्यांनी आधी एक आश्रम उभा केला होता तो देखील बघून ये असे बाबांनी मला सांगितले .या आश्रमामध्ये काही अत्यंत दुर्मिळ झाडे लावलेली होती . दाट वनराई बाबांनी उभी केलेली होती . इथे रुद्राक्ष , शेंदूर ,कापूर , मधुकामिनी , मोह , कदंब, गुलबकावली अशी नानाविध झाडे होती .काही बिया बाबांनी सोबत दिल्या . मर्यादा वेल नामक वेलीचा खूप छान वापर करून त्यांनी आपली कुटी गार ठेवली होती . हा प्रयोग मी तमिळनाडूमध्ये असताना केला होता . कृष्ण कमळाच्या वेलीच्या साह्याने बंगला गार ठेवण्याची व्यवस्था मी केली होती . तीच पद्धत बाबांनी वापरली होती . संध्याकाळी मैया मध्ये मनसोक्त स्नान केले . इथे पाणी सुरुवातीला एकदम उथळ आणि नंतर अचानक खोल झालेले आहे . त्यामुळे धोकादायक किनारा आहे . समोरच्या महुआ खेडा गावातील याच नेपाळी बाबांचा आश्रम इथून दिसायचा . तिथे देखील सुंदर बाग बगीचा केलेला आहे . उंचच उंच पांढरी लाल ध्वजा ही त्याची खूण . आश्रमात सर्वत्र झेंडे लावलेले होते .बाबांनी बांधलेल्या सर्व मंदिरांचे कळस यावनी पद्धतीचे होते . मी त्याचे रेखाचित्र वहीमध्ये काढलेले आहे . आश्रमाच्या बाहेर एक जुना भव्यदिव्य पिंपळ होता .मागे असलेल्या बासखेडा गावामध्ये ज्याप्रमाणे पुरातन मंदिराचे घुमट वगैरे वाहून त्यांचा मलबा नर्मदा मातीमध्ये पडलेला होता तसेच इथेही पुरातन मूर्ती खांब आदि आवशेष इकडे तिकडे विखुरलेले होते .इथे मला एक आश्चर्यकारक गोष्ट दिसली ! इथे असलेल्या विविध मूर्तींमध्ये एका नेपाळी साधूवजा देवाची मूर्ती होती . दाढीची जटा करून गाठ मारलेली होती . परंतु दाढी फक्त मंगोलियन पद्धतीने हनुवटीच्याच पुरती होती . एकंदर चेहरेपट्टी मंगोलियन पद्धतीची आहे हे लगेच कळत होते . डोळे आणि नाकही नेपाळी पद्धतीचे होते . गावात चौकशी केली असता असे सांगण्यात आले की हा या गावचा राजा होता . मला असे वाटले की हाच राजा पुन्हा एकदा नेपाळी बाबाच्या रूपाने जन्माला येऊन इथे पुन्हा एकदा राज्य करतो आहे ! मी ही मूर्ती नेपाळी बाबांना दाखवली आणि माझे मत सांगितले . बाबांना देखील आश्चर्य वाटले . त्यांनी आजपर्यंत ही मूर्ती पाहिली नव्हती . ते म्हणाले का कोणास ठाऊक परंतु अख्खा भारत फिरलो तरी देखील मला पुन्हा पुन्हा इथे येऊन राहावेसे वाटते हे मात्र खरे आहे . इथे काही नित्यसेवक होते त्याच्यामध्ये एक पंडितजी होते ज्यांनी तीन वर्षाची परिक्रमा पूर्ण केलेली होती . हरी नावाचा अजून एक सेवक होता जो पूर्वी वाळू माफिया होता परंतु नंतर सर्व काही सोडून नेपाळी बाबांचा भगत झाला . त्याची गुरुभक्ती एवढी श्रेष्ठ होती की तो रोज गुरुउच्छिष्ट खात असे ! अर्थात नेपाळी बाबांचे जेवण झाले की ताटातील उरलेले पदार्थ संपवत असे . या गावातील ग्रामस्थ बाबांना खूप मानतात असे माझ्या लक्षात आले . रात्री त्यांना भेटायला ग्रामस्थ आवर्जून यायचे . आजूबाजूला काय चालू आहे याची चर्चा गप्पा व्हायच्या . बाबा लोकांचे प्रश्न सोडवायचे . हे करताना लोक बाबांना तेल लावून द्यायचे आणि पाय वगैरे दाबायचे .मी देखील थोडीशी पाय दाबण्याची आणि डोक्याला तेल लावण्याची सेवा करून घेतली . साधूंचे डोके किंवा पाय याची सेवा करताना आधी डोक्याची सेवा करून मग पायाची सेवा करावी . उलटे करू नये असा संकेत आहे . आणि तो शास्त्रीय आहे हे थोडासा विचार केला तर तुमच्या लक्षात येईल . कारण साधू हे भ्रमणशील  असतात . त्यांच्या पायाचे जंतू डोक्यापर्यंत जाऊ नयेत म्हणून हे नियम कोणीतरी काढले असतील . नुकत्याच सुरू झालेल्या मधुमेहाच्या त्रासामुळे बाबा त्रस्त होते . मधुमेहाच्या बाबतीत मला जेवढे ज्ञान आहे तेवढे मी बाबांना सांगितले . मुळात मधुमेह हा एकच एक आजार नसून त्याच्या अनेक छटा आहेत असे आयुर्वेद मानतो . तसेच साखरेचे रक्तातील योग्य प्रमाण किती असावे याचे आकडे डब्ल्यूएचओ ही संस्था सतत बदलत राहते असा इतिहास आहे . त्यामुळे जोपर्यंत प्रत्यक्ष काही त्रास जाणवत नाही तोपर्यंत केवळ नित्य व्यायाम करत राहणे आणि आहार नियंत्रण हा मधुमेह टाळण्याचा सर्वात उत्तम उपाय आहे .अर्थात वैद्यकीय सल्ला घेतला तर चांगलेच आहे . परंतु Hba1c अमुक अमुक इतके आहे म्हणजे आता मला डायबिटीस झालाच हे विधान थोडेसे धाडसाचे आहे . या क्षेत्रामध्ये माझे एक मित्र डॉ. मंदार गद्रे (पीएचडी ) यांनी खूप संशोधन केलेले आहे . आणि अनेकांची मधुमेहाची औषधे त्यांनी सोडवली आहेत.
सावधानी ही साधना है । हा बाबांचा महामंत्र होता . तोच मधुमेहावर देखील काम करतो हे मी त्यांना पटवून दिले . बाबांच्या आश्रमामध्ये जरा फेरफटका मारुयात चला !
नेपाळी बाबांच्या श्री माँ नर्मदा मढीया आश्रमाचे प्रवेशद्वार
आश्रमातील सुंदर बगीचा
आश्रमाचे अजून एक वैशिष्ठयपूर्ण प्रवेशद्वार
आश्रमामध्ये अशा अनेक कुटी आहेत .
काठावरून आश्रम असा दिसतो . 
आश्रमातील एक अन्य कुटी
नेपाळी बाबांची कुटीया "साधक कुटीर " . याचा अर्थ बाबा स्वतःला साधक म्हणवतात ,सिद्ध नाही . ही किती मोठी गोष्ट आहे पहा ! कुटीवर लिहिलेले आहे . लेना न देना । मनन करना ।
बाबांची सौंदर्यदृष्टी त्यांच्या नित्य पूजेमध्ये देखील दिसते . आश्रमातील फुलांपासून त्यांनी साकारलेली सुंदर रांगोळी पहा !
आश्रमात अशी अनेक पुष्पद्वारे आहेत .
मधोमध चालण्यासाठी ठेवलेला पट्टा वगळता सर्वत्र झाडेच झाडे आहेत .
आश्रमातर्फे त्यांनी सुंदर असे प्रवेशद्वार घाटावर बांधलेले आहे .
आश्रमातील प्रत्येक बांधकामांमध्ये त्यांची सौंदर्यदृष्टी दिसते .
ही कुटी देखील खूप सुंदर पद्धतीने बांधलेली आहे .
आश्रमाच्या बाहेर असलेला हाच तो भव्य पिंपळ वृक्ष . ज्याच्याखाली एका नेपाळी साधूची मूर्ती आहे .
बाबांची कुटी विशेष उठून दिसते .आतमध्ये अतिशय थंड असते .
शेजारीच बांधलेली गोपाळ कृष्णाची कुटी देखील गारवेलीने झाकलेली असते .
बाबांच्या कुटीवर वाढलेली मर्यादा वेल खरोखरीच खूप छान आहे आणि तिची फुले कुटीला वेगळे सौंदर्य प्रदान करतात .
ह्याच ठिकाणी नेपाळी बाबा बसले होते आणि वेलांच्या मधून वगैरे मी त्यांचे शूटिंग घेऊन त्यांनां दिले . तेव्हा ह्या वेली जमिनीला टेकलेल्या होत्या .जणू काही वेलींचा एक पडदा अंथरलेला होता .
संपूर्ण लाकडाच्या पट्ट्यांचा वापर करून एक यात्री नीडम् अर्थात घरटे बाबांनी परिक्रमावासींच्या मुक्कामासाठी बांधलेले आहे .
बाबांनी जे केले तेच सर्वत्र लिहून ठेवलेले आहे ! कठोर परिश्रम केल्याशिवाय इतकी सुंदर निर्मिती होऊ शकत नाही !
नर्मदा मातेचे दर्शन आश्रमातून खूप छान होते . समोरच्या ताटावर बाबांचाच आश्रम दिसतो आहे . असे फार कमी ठिकाणी पाहायला मिळते . 
या नकाशामध्ये आपल्याला बाबांचे तीनही आश्रम पाहायला मिळतील . वर गावामध्ये महेश आश्रम आहे . त्यानंतर काठावर ची मढिया आहे . समोरचा आश्रम आपण महुआ खेडा गावाच्या प्रकरणात पाहिला आहेच .
हेच ते सौंदर्यदृष्टी सम्राट नेपाळी बाबा !
बाबा स्वभावाने अतिशय मोकळे मनमिळावू प्रामाणिक आणि प्रेमळ आहेत .
आधुनिक तंत्रज्ञानाची बाबांना आवड आहे त्यामुळे ते मोबाईलवर नवीन नवीन गोष्टी शिकत असतात .
बाबांचे फोटो शोधत असताना नर्मदा खंडातील माझ्या आवडीचे दोन संत एकाच फ्रेम मध्ये सापडले !एक म्हणजे नर्मदानंदगिरी महाराज अमरकंटक आणि दुसरे नेपाळी बाबा ! स्वामी महाराजांची या आश्रमाला भेट झालेली आहे असे दिसते .
नर्मदानंद गिरी स्वामींचा अधिकार मोठा आहे ! हे आपल्याला नेपाळी बाबांची नमस्कार मुद्रा पाहिल्यावर लक्षात येईल .
अमरकंटक येथील गुलबकावली ही दुर्मिळ वनस्पती दाखवताना नेपाळी बाबा .
बाबा आजही स्वतःच्या हाताने पान आणि पान उचलून सर्व कचरा साफ करतात . प्रत्येक झाडाशी त्यांचा वैयक्तिक संवाद आणि संपर्क असतो असे मला जाणवले ! त्याशिवाय एवढी मोठी बाग फुलणार नाही !
आश्रमामध्ये स्वयंपाकाची उत्तम सोय आहे .
विशेषतः विविध प्रकारच्या पौष्टिक रोट्या हे या आश्रमाचे वैशिष्ट्य आहे . काकडीची पोळी , बीटाची पोळी ,हळदीची पोळी , भोपळ्याची पोळी , चण्याची पोळी वगैरे विविध प्रकारच्या पौष्टिक पोळ्या बाबा परिक्रमा वासींना खाऊ घालतात .
हे यात्री नीडम् आहे

परिक्रमावासांची उत्तम सोय इथे केली जाते . 
एकंदरीत नर्मदा खंडामध्ये जे अनेक आश्रम आहेत त्यातील एक अत्यंत सुंदर असा आश्रम नेपाळी बाबांनी उभा करून दाखवलेला आहे ! विशेष म्हणजे पुरामध्ये या आश्रमाचे आणि बागेचे खूप नुकसान होते . तरीही नाउमेद न होता बाबा पुन्हा नव्याने सर्व उभे करतात ! या नेपाळी बाबांकडून मी खूप शिकलो ! जीवन सुंदरतेने कसे जगता येते हे बाबांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलेले आहे .एकच एक गोष्ट करण्याची दोन माणसांची पद्धत वेगळी असते . परंतु जीवनाचा आनंद घेण्याच्या दृष्टीने त्यातील अधिक सुंदर पद्धत आपण निवडावी हे उत्तम नव्हे काय ! विशेषतः साधू झाला म्हणजे त्याला वैराग्य आले असे सर्वजण गृहीत धरतात . आणि वैराग्य म्हणजे कसेही राहणे असा एक अर्थ अनुस्युत असतो . त्याला छेद देण्याचे महत्त्वाचे कार्य नेपाळी बाबा करत आहेत . साधू जीवन आणि साधे जीवन देखील सुंदरतेने जगता येते हे त्यांनी दाखवून दिले आहे . त्यासाठी त्यांनी वेगळे काहीच केलेले नसून जे काही आहे ते फक्त नीटनेटकेपणाने नेमस्तपणे आणि सुंदरतेने केलेले आहे . यात वैराग्य आहेच . कारण हे सर्व उध्वस्त झाले तरी बाबांना काही फरक पडत नाही . ते पुन्हा सर्व उभे करतात . आणि अतिशय सौंदर्यदृष्टीने उभे करतात .नेपाळी बाबांकडून मी ही सौंदर्यदृष्टी कितपत घेऊ शकलो माहिती नाही परंतु असेही काही असू शकते हे बाबांनी किंबहुना बाबांच्या रूपातून मैयाने मला दाखवून दिले ! विशेषतः बाबांनी मला सोबत दिलेल्या बिया त्यांचा खरा स्वभाव दर्शवतात . ते मला म्हणाले जिथे कुठे जाशील तिथे या बिया लावत जा ! या वनस्पती दुर्मिळ मानल्या जातात कारण त्या कोणी लावत नाही . आपण त्या लावत राहूयात म्हणजे त्या दुर्मिळ राहणार नाहीत . आज भाबरी मध्ये झाडे लावताना मला प्रत्येक क्षणाला नेपाळी बाबांची आठवण येते . आणि मी विचार करतो की जर इथे नेपाळी बाबा असते तर त्यांनी कशी झाडे लावली असती ? ही सौंदर्यदृष्टी मला नेपाळी बाबांनी निर्विवादपणे दिलेली आहे . नर्मदा परिक्रमा आपल्याला हेच तर देत असते ! नाही का ?





लेखांक एकशे त्रेसष्ठ समाप्त (क्रमशः)

टिप्पण्या

  1. या लेखात गुगल व्हाॅइस रेकाॅर्डिंगने ब-याच चुका केल्या आहेत .

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. (अपूर्ण ) कृपया "अपूर्ण " असे लिहिलेले लेख वाचू नयेत कारण ते सर्वार्थाने अपूर्ण असतात .पूर्ण झाल्यावर मगच वाचावे ही विनंती

      हटवा
    2. सर्वार्थाने अपूर्ण मध्ये गूगल व्हॉइस टायपिंग ने केलेल्या चुका पण येतात .नंतर पुन्हा पुन्हा वाचून त्या सुधारल्या जातात . तरी कृपया लेख पूर्ण झाल्याशिवाय वाचू नये ही विनंती !

      हटवा
  2. गुलबकावली ही वनस्पती तशी दुर्मिळ नाही . गुलबकावली म्हणजे सोनटक्का . तो अमरकंटक येथे माईका बगियामधे आहे .

    उत्तर द्याहटवा
  3. किती गोड गोड
    ऐसें मिठाई ला
    काय सांगायला
    हवे पुन्हा .

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

जे आवडते सर्वांना ...

अनुक्रमणिका (Index)

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

लेखांक १ : नर्मदे हर !

लेखांक २ : भोपाळ जवळच्या जंगलातील अपघात

लेखांक ३ : चोराची धन

लेखांक ४ : झुठा कही का ! सबकुछ तो लाए हो !

लेखांक ५ : ग्वारीघाट जबलपुर मध्यप्रदेश

लेखांक ६ः झुलेलाल आश्रम , ग्वारी घाट

लेखांक ७ : नाभिकाने केलेला जाहीर __मान !

लेखांक ९ : इंदौरी पोहा आणि गरमा गरम जलेबी !