लेखांक १६१ : देवर्षी नारद मुनींची तपोभूमी मोतलसर , पांडवांच्या यज्ञाचे भस्म आणि डुमरचा मुक्काम
बिसेर गावातल्या अवंतिका धाम आश्रमातून निघालो आणि पुन्हा एकदा नर्मदा माईमध्ये स्नान केले . इतके अद्भुत स्नान घडले की काल काय घडले त्याचा विसर पडला . बिसेरचा विसर ! सनखेडा बामना वाडा ही गावे मागे टाकली आणि काठाने चालत चालत मोतलसरला आलो .इथे नारद मुनींनी तप केलेले आहे . देवर्षी नारद या व्यक्तिमत्त्वाचे मला कायम आकर्षण वाटलेले आहे . अगदी लहान असताना माझ्या दोन मावश्या दोन आत्या आणि दोन काका एकाच गल्लीमध्ये राहायचे ! ती होती नारद मंदिराची गल्ली ! त्यामुळे यांपैकी कोणाकडेही गेले तरी नारद मुनींचे दर्शन घ्यायचेच असा माझा परिपाठ होता ! पुण्यातील सदाशिव पेठेमध्ये असलेल्या माडीवाले कॉलनी भागातील नारद मंदिराची परंपरा फार मोठी आहे .पुढे इथे नारदीय कीर्तनाचे वर्ग देखील करण्याचे भाग्य मला बालवयातच लाभले . संगीताचे प्राथमिक धडे इथेच मिळाले . नंतरही नारदीय किर्तनाच्या परीक्षा दरवर्षी देत गेलो . महाविद्यालयीन जीवनामध्ये तर नारद मंदिराच्या समोर असलेल्या व्यास मंदिर गुरुकुलामध्ये काही वर्षे वास्तव्य घडले . दोन्हीही मंदिरे एकाच संस्थेची आहेत . श्रीहरिकीर्तनोत्तेजक सभा पुणे .
पुण्याच्या श्री नारद मंदिरातील नारद मुनींची मोहक मूर्तीव्यास मंदिरातील व्यास मूर्ती . ही मूर्ती माझ्या खोलीतून दिसायची . त्यामुळे मी तिथे एक स्वतः रचलेला श्लोक भिंतीवर लावून ठेवलेला होता .
उच्छिष्टुनी जग ओष्ठद्वयांनी
उपवासी ठेवीसी विषयां ।
ज्ञानारोग्ये सक्षम करी तू
आम्हाला हे गुरुराया ॥
व्यासमुनींनी स्पर्श केला नाही असा कुठला विषय नाही असे म्हणतात . व्यासोच्छिष्टं जगत्सर्वं । त्यामुळे कवी कल्पना अशी आहे की जणूकाही व्यासमुनींनी आपल्या वाणी द्वारे अर्थात ओठाद्वारे स्पर्श करून जगातील सर्व विषय उष्टे करून टाकले आहेत ! त्यामुळे मनुष्याला त्रास देणारे विषय हे उपाशी राहिले आहेत कारण त्यांना उष्टे अन्न चालत नाही ! असे हे व्यास महर्षी आद्य गुरुदेव असून त्यांनी आपल्याला ज्ञान आणि आरोग्य देऊन सक्षम करावे !अशी ही प्रार्थना आहे .
इथेच बबनराव नावडीकर हे ज्येष्ठ भावगीत गायक राहायचे.ते मला नातू मानायचे . त्यांनी देखील नारदांची काही गाणी शिकवली होती .नारदा मुनीवरा तुझे रे गाता गौरव गीत । रंगले हरी भजनी संगीत । हे त्यांनी शिकवलेले गाणे आजही मला जसे आहे तसे आठवते !
ज्येष्ठ भावगीत गायक संगीतकार लेखक व कीर्तनकार बबनराव नावडीकर
तात्पर्य नारदमुनी इतरांना जितके नवीन असतात तितके नवीन मला नव्हते .परिचयाचे होते . आद्य पत्रकार ! कळीचे नव्हे कळकळीचे नारद मुनी! अशा नारदांची तपोभूमी असल्यामुळे या भागाला मोठे पौराणिक महत्त्व आहे . इथे एक साधू लंगोटीवर बसलेला होता . त्याने मला बालभोग दिला . अतिशय अप्रतिम असा गोड भात खाऊ घातला . नारदी गंगा नावाची नदी येथे नर्मदा मातेला येऊन मिळते . त्या नारदी संगमावर गेलो . स्नान केले . इथे एक जण आला आणि पाया पडू लागला . त्याने पाणी पाजले आणि गंध फुलवाती दिल्या . त्याच्याशी काही काळ बोलल्यावर त्याच्या समस्या लक्षात आल्या . याने लवकरात लवकर लग्न करावे असा सल्ला मैयाने त्याला देवविला आणि पुढे निघालो .
नारदी गंगा नदीया भागातील नर्मदा मातेचा किनारा
उपग्रहातून दिसणारे नारदी गंगा नर्मदा माता संगमाचे दृश्य आणि बामणवाडा येथील देवर्षी नारद मुनि आश्रम
कठीण काठाने शिबली व सेमली गावे ओलांडली . वरुणा नावाच्या नदीच्या काठावर आलो . इथे दूरवर एक छोटासा आणि धोकादायक लोखंडी शिडी वजा पूल लावलेला होता व त्यावरून जाता येणे सहज शक्य होते परंतु मी विनाकारण कमरे इतक्या पाण्यातून आणि गुडघाभर चिखलातून नदी पार केली .अगदी फुटभर चिखलामध्ये जरी पाय रुतला तरी निघत नाही इतका नर्मदा मातेच्या काठावरचा चिखल घट्ट आहे . परंतु इथे मात्र मांडीपर्यंत पाय रुतला तरी देखील सहज निघून आला ! चिखलाचा रंगही वेगळा वाटला . आणि त्याला थोडासा सुगंध देखील येत होता . हा काहीतरी वेगळा प्रकार आहे हे माझ्या लक्षात आले . बाहेर येऊन वाऱ्यावर उभा राहिलो . बघता बघता चिखल वाळला आणि पाय पांढरे फटक पडले ! चिखलाने पाय काळे पडतात . हा काहीतरी वेगळाच प्रकार घडला !
इथे जवळच बगलवाडा गावांमध्ये एक सुंदर आश्रम होता .एक वृद्ध साधू आणि तरुण साध्वी पितृकन्यावत राहत होते . त्यांच्या आश्रमात गेल्यावर माझे पांढरे पडलेले पाय त्यांनी पाहिले आणि सांगितले की माझ्या पायाला लागलेला चिखल नसून भस्म आहे ! पांडवांनी या नदीच्या काठावर केलेल्या अनेक यज्ञांचे जे भस्म इथे होते त्याच्यापासून अक्षरशः भस्माचा डोंगर तयार झाला होता . आजही या नदीच्या गाळामध्ये मातीच्या ऐवजी भस्म वाहते अशी मान्यता आहे .पांडवांचा स्पर्श झालेल्या आहुतींचे भस्म अंगाला लागले याची मनोमन धन्यता वाटली ! अणु शास्त्रज्ञांना याचे महत्त्व कळेल ! साधू महाराजांचा सत्संग घडला . साधू महाराजांनी उपदेश केला , जहा जैसा , तहा तैसा । नहीं तो साधू कैसा ? भोजन घेतले आणि थोडावेळ गर्मीमध्ये पडून राहिलो .
मंदिराचे प्रवेशद्वारया सुंदर आणि भव्य मंदिरातील शेषशायी विष्णूचे हे शिल्प लक्षात राहिले .
मंदिरातील राधा कृष्णाचा विग्रह
इथून निघावे अशी प्रेरणा झाल्यावर कुलूप बंद फाटकातून शिताफीने सटकलो .पुन्हा किनारा पकडला . सतरावन पार केले . मुआर ओलांडले .
या भागात चालू असलेले वाळूचे उत्खनन अवकाशातून असे दिसते . हे खड्डे दिसायला लहान असले तरी प्रत्यक्षात खूप मोठे असतात .चालताना प्रचंड त्रास होतोमोतलसर गावातील नर्मदा मातेवरचा पूल
वारुणी नदीलाच बारी नदी असे देखील नाव आहे
या भागामध्ये खेळणारी लहान मुले
वाळू उपसणारा एक स्थानिक ग्रामस्थ
या भागातील नर्मदा मातेचे संध्याकाळचे रूप अतिशय अद्भुत असते ! दीपालंकार ल्यालेली नर्मदा माता केवळ अप्रतिम दिसते !
इथे पासीघाटावर अखंड रामायण सेवा सुरू आहे . जवळ एक डोह कूप आहे . इथे बालभोग प्राप्त झाला . खूप साधू असलेला आश्रम होता . अनेक साधूंनी चौकशी केली . परिक्रमावासी ची दाढी किती वाढली आहे आणि अवतार कसा झाला आहे यावरून साधूंनाही साधारण किती जुना परिक्रमा वासी आहे याचा अंदाज येत असतो . सुरुवातीच्या काळामध्ये माझ्याशी साधू फारसे बोलत नसत . किंवा बोलले तरी त्यांची बोलण्याची पद्धत वेगळी असे . आता परिक्रमा संपत असताना मात्र साधू फार प्रेमाने बोलत आहेत असे मला जाणवत होते ! जणू काही हा मनुष्य आपल्या साधू संप्रदायामध्ये यावा अशी इच्छा त्यामागे आहे की काय असे स्पष्टपणे जाणवायचे ! काही साधू तर उघडपणे तसे सुचवायचे !की आता परत जायची गरज नाही ! जे काही व्हयचे आहे ते मैया किनारीच होऊन जाऊ दे !इथे काही काळ रामायण सेवा केली . कर्ण्यावरून रामायणाचा आवाज दूरवर ऐकू जायचा .दुर्दैवाने जिथे जिथे अखंड रामायण सेवा सुरू आहे तिथे तिथे वाचणारे सर्व लोक म्हातारेच दिसत होते . रामायण ही काही उतारवयात वाचायची गोष्ट नाही . काही गोष्टी ज्या त्या वयात केलेल्या चांगल्या असतात . भागवत रामायण महाभारत दासबोध ज्ञानेश्वरी भगवद्गीता तुकाराम गाथा एकनाथी भागवत गुरुचरित्र हे सर्व ग्रंथ , तरुणपणी वाचायचे ग्रंथ आहेत . म्हातारपणी ते वाचून तुमचा वेळ चांगला जाईल . परंतु आयुष्यात काय करायचं आहे हे कळण्याऐवजी आपण आयुष्यात काय करायला पाहिजे होते हेच अधिक कळेल . आणि ते काही फारसे सुखावह नसेल !
या भागातील नर्मदा मातीवरचे डोह कूप (जॅक वेल )या रामानंदी आश्रमाचे महंत स्वतः देखील साधना मग्न असतात .आश्रमातील वातावरण साधनेसाठी अत्यंत पोषक आहे . आश्रमाला मी पुस्तकामध्ये चांदणी करून ठेवली आहे .
जिथे अखंड रामायण सुरू आहे तिथे हनुमानजी असणारच !
रामायण सेवा ऐकली , घडली आणि पुढे निघालो . डुमर गाव समोर दिसू लागले परंतु अतिशय भयानक काठ होता .चिखलापासून तयार झालेले अर्धे कच्चे खडक सर्वत्र होते . ते दिसायला खडकासारखे दिसायचे . परंतु पाय ठेवल्याबरोबर फुटून जायचे . आणि माणूस हमखास आपटायचा . असा खूप वेळा पडलो !मी ठरवले की काहीही झाले तरी हा किनारा काठानेच पार करायचा . त्यामुळे अतिशय कठीण मार्गाने वेळप्रसंगी थोडेसे पाण्यामध्ये उतरावे लागले तरी तसे करत काठाने चालत राहिलो . अंधार होता होता डुमर गाव गाठले . एक मंदिर होते तिथे भजन सुरू होते .मंदिरामध्ये गेलो दर्शन घेतले आणि भजन केले . या ठिकाणी खाली असलेला घाट अति धोकादायक होता . म्हणजे एक तर तो अरुंद होता . आणि सिमेंटचा एक तुटलेला भाग पाण्यामध्ये होता जो तिरका होता आणि शेवाळलेला होता . त्याचबरोबर मैयाला इथे प्रचंड वेगाने वळण घ्यावे लागत होते . संपूर्ण परिक्रमेत याहून अधिक धोकादायक मला कुठलाच घाट वाटला नाही ! आश्रमामध्ये आलो .अच्युतानंद स्वामी नावाचे महंत येथे होते . आश्रमातील सेवक जन मला थोडेसे उदासीन वाटले किंवा कदाचित नर्मदा मातेला माझी परीक्षा घ्यायची असेल . आश्रमामध्ये सर्व सुविधा असताना , परिक्रमावासींसाठी बांधलेली आणि उभी केलेली सर्व व्यवस्था असताना आणि मी एकटाच परिक्रमावासी तिथे मुक्कामाला असून देखील त्यांनी मला धूळ खात पडलेल्या एका अंधाऱ्या यज्ञ शाळेमध्ये झोपायला सांगितले . नेहमीप्रमाणे मी हातात झाडू घेतला आणि सर्व यज्ञशाळा चकाचक करून टाकली !झाडू मारायची काही आवश्यकता नाही हे मला अनेक जण सांगून गेले . परंतु मी कशा परिस्थितीमध्ये राहायचे हे ठरण्याचा मला पूर्ण अधिकार आहे आणि असलाच पाहिजे ! मला जर माझ्या आजूबाजूचे वातावरण आवडले नाही किंवा योग्य वाटले नाही तर ते मला हवे तसे करण्याचा मी आटोकाट प्रयत्न केला पाहिजे ! किंवा त्या वातावरणातून निघून गेले पाहिजे ! याला इंग्रजीमध्ये फ्लाय ऑर फाईट असे म्हणतात . तुमची " मी " या तत्त्वाची जाणीव किती व्यापक आहे त्यावर तुमच्या आजूबाजूचा परिसर किती असावा याची व्याख्या ठरते . कुणाला आपल्या थेट शरीराची देखील काळजी घ्यायला जमत नाही . कारण मनोमन त्यांनी हे स्विकारलेले असते की हे आपले नाही आपल्याला काही काळ वापरायला मिळालेले आहे ! या उलट काही लोक फक्त आपल्या वैयक्तिक स्वच्छतेची काळजी घेतात .बाकीचा परिसर तसाच ठेवून देतात . याहून श्रेष्ठ लोक स्वतःच्या खोलीपुरता विचार करतात आणि तेवढी स्वच्छ राखतात . याच्या पुढचा प्रकार म्हणजे अशी माणसे जी आपले घर तेवढे स्वच्छ ठेवून बाकीच्या परिसराचा फारसा विचार करत नाहीत . भारतातील बहुतांश लोक याच वर्गामध्ये मोडतात त्यामुळे आपल्याला सार्वजनिक ठिकाणी कचरा घाण सांडपाणी पान तंबाखूच्या पिचकाऱ्या यांचे साम्राज्य आढळते .काही लोक आपल्या घरासोबतच त्यांचे अंगण व परिसर देखील स्वच्छ ठेवतात . काही लोक आपला परिसर किंवा रहिवासी विभाग चांगला राहील याची काळजी घेतात . तर एखादा असाही जन्माला येतो जो उभा देश स्वच्छ करण्याचा विडा उचलतो . थोडक्यात काय तर तुमची सामाजिक जाणीव जेवढी व्यापक आहे आणि मी चे अस्तित्व जेवढे व्यापक आहे तेवढा परिसर तुम्ही स्वच्छ राखत असता . मी एका राष्ट्राचा नागरिक आहे अशी भावना मनामध्ये सतत असेल तर तो मनुष्य आपला देश विस्कटलेला , घाणेरडा ठेवूच शकत नाही .लष्करी आस्थापने एवढी स्वच्छ का असतात याचे कारण तेच आहे ! हे आपले आहे जी जाणीव त्यांच्या मनामध्ये दृढ असते .
या यज्ञ शाळेमध्ये भरपूर आडगळ ठेवलेली होती . डास खूप होते . डासांनी रात्रभर फोडून काढले ! तत्पूर्वी मैयाची आरती केल्यावर भोजन की हरिहर अर्थात भोजनासाठी बोलावणे येत नाही असे पाहून मी झोपून गेलो होतो . रात्री दहा वाजता एक सेवक उठवायला आला आणि त्याने मला दुपारी केलेले सामोसे आणि पुरी भाजी खायला घातली . पोटाला थोडासा आधार आला . असा अनुभव परिक्रमेमध्ये येणे हे अतिशय सर्वसामान्य असून त्याचा कोणीही कधीही बाऊ करू नये . आपण घरी नाही का अपवादाने का होईना परंतु दुपारचे जेवण जेवत ? अर्थात ते योग्य का अयोग्य हा वेगळा विषय आहे परंतु आपण असे अन्न विना तक्रार खातो हे मात्र खरे .इथे देखील असा प्रसंग आल्यावर मैय्या आपली परीक्षा पाहते आहे असा भाव ठेवावा . उपाशीपोटी उपासना खूप चांगली होते ! उपाशीपोटी केलेली आरती ही अधिक आर्त असते . पोटपूजा करण्याआधी केलेली पूजा देवाला आवडते ! रात्री तसेही डासांनी जागवले होतेच . त्यामुळे पहाटे लवकर तिथून निघालो . धोकादायक घाटावर पुन्हा एकदा स्नान केले . पहाटेच्या अंधारात त्या घाटावर स्नान करणे म्हणजे केवळ आणि केवळ नर्मदा मातेवर असलेल्या दृढविश्वासाची कठीण जलपरीक्षा होती ! झोकदार वळण घेत असल्यामुळे नर्मदा मातेच्या पाण्याची गती त्या कोपऱ्यावर काहीच्या काही वाढलेली होती ! आधीच तुटून रसातळाला जाऊ पाहणाऱ्या त्या घाटावर तुमचा पाय सटकला की तुम्ही कामातूनच गेलात ! क्षणात तुम्हाला मैया पन्नास शंभर फूट दूर घेऊन जाणार ! परंतु तिच्यावरती दृढ विश्वास होता की असे काहीही ती करणार नाही . अक्षरशः डुबकी मारता येणे देखील कठीण होते इतकी पाण्याला गती होती . अशा ठिकाणी देखील गावातील स्त्रिया स्नानाला येत होत्या . काल संध्याकाळी मी इथे पोहोचलो तेव्हा बऱ्याच मताराम स्नान करत होत्या . अर्थात त्या काठावर बसून स्नान करायच्या . परंतु ज्यांना पोहता येत नाही त्यांच्यासाठी हा सर्व प्रकार घातकच होता . इथे मला दंड खूप कामाला आला . तुटलेल्या घाटाच्या स्लॅबमध्ये मी तो फसवला आणि हाताने घट्ट पकडला . त्यामुळे मला नीट आणि निर्भयपणे स्नान करता आले .
नर्मदा मातेला येऊन मिळणारी तेंदोनी नदीचिखलापासून बनलेल्या ठिसूळ दगडांचा नर्मदा माते मधला भाग
प्रचंड वेगाने नर्मदा मातेचे पाणी वाहते तेव्हा त्यावर असे भोवरे तयार होतात
त्या तुटलेल्या घाटाचे हे एक चित्र मला गुगल नकाशावर मिळाले .
हीच ती यज्ञशाळा जिथे मी झोपलो होतो .आता आत मध्ये समान हलवलेले दिसते आहे
डूमरच्या आश्रमाचे प्रवेशद्वार
आश्रमातील स्वयंभू गणेश
आश्रमाचे महंत देवाची पूजा करताना
पुढे निघाल्यावर कठीण किनारा चालूच राहिला . काठावर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी कुंपणांची हद्द केलेली होती . अक्षरशः काय करावे ते कळत नव्हते अशा पद्धतीने कुंपणे घातली होती . मैयाच्या आत मध्ये फूटभर कुंपण असायचे . असाच काठाकाठाने चालत असताना एका शेताचे कुंपण एके ठिकाणी आडवे आले . कुंपणाचे बांबू नर्मदा मातीमध्ये ठोकलेले होते . आणि प्रचंड काटे असल्यामुळे ओलांडता येणे अशक्य होते . वरती जाण्याची मला इच्छाच नव्हती कारण परिक्रमेचा मार्ग हाच होता .त्यामुळे मी थोडेसे मैया मध्ये उतरून ते बांबू पकडत चालू लागलो . बांबू मैयाच्या दिशेला झुकलेले होते . त्यामुळे मला देखील झुकावे लागे . माझ्या झोळीचे वजन भयंकर होते ! सुमारे २५ किलो वजनाचे शेकडो नर्मदेश्वर महादेव त्यात विराजमान होते !कसरत करत जात असताना मध्ये एके ठिकाणी घात झाला ! मैयामध्ये रोवलेला बांबू अचानक तुटला आणि काही कळण्याच्या आत मी मैयामध्ये पडलो ! माझ्या अंगावर काटे कुटे बांबू सर्व काही पडले . माझी संपूर्ण झोळी पाण्यात भिजली .आणि हात फाटला . इथे पाणी असे नव्हते परंतु दलदल होती . त्यामुळे संपूर्ण शरीर चिखलाने माखले !माझे मलाच हसू यायला लागले ! माझी ही फजिती पाहायला तिथे मैया शिवाय अजून कोणीही नव्हते ! दोघेही हसू लागलो ! आपल्या घरामध्ये एखादे लहान मुल असते . जे अत्यंत विक्षिप्त वाटणारे प्रकार करत असते .परंतु आपण त्याला आपले स्वतःचे मूल म्हणून स्वीकारलेले असल्यामुळे त्याचे हजार गुन्हे आपण माफ करत असतो .तशी मैय्या मला जागोजागी क्षमा करत होती .पुढे थोडेच अंतर चालल्यावर घाट पिपलिया नावाचे गाव आले . इथे विश्वास सारंग नावाचे एक मंत्री होते त्यांनी मोठा आश्रम बांधलेला होता .आश्रम भव्य दिव्य होता . विशेषतः वरच्या बाजूला त्यांची स्वतःची खोली होती ज्यातून नर्मदा मातेचे खूप विहंगम दृश्य दिसायचे .खाली परिक्रमा वासीयांची सोय आणि स्वयंपाक घर वगैरे केले होते .समोर एक मोठा पार होता जो अतिशय सुंदर पद्धतीने बांधला होता . पारावर मुक्काम करायला मजा येईल असा तो परिसर होता . आश्रमामध्ये काही सेवक होते .काही माताराम सेवक होत्या . गावातील निवडक लोकांना मंत्री महोदयांनी सेवेमध्ये ठेवले होते . परंतु इथे बालभोग मिळणार नाही असे मला सांगण्यात आले . कपडे धुतले तर चालतील का असे विचारल्यावर परवानगी दिली गेली . मग चिखलाने माखलेले सर्व कपडे पाण्यातून काढले . इथे बालभोग नाही असे कळल्यावर मी त्यांना विचारले की त्यांनी काही खाल्ले आहे का ? परंतु सेवक देखील उपाशी होते . मग अचानक मला असे आठवले की मागे भटगाव नावाच्या गावामध्ये एका शेतकऱ्याने मला काकड्या दिल्या होत्या . मी त्यांना रामरस आणायला सांगितला आणि आम्ही सर्वांनी मिळून त्या काकड्या चिरून खाल्ल्या . तोपर्यंत माझे कपडे देखील वाळले .मंत्री महोदय विश्रांतीसाठी इथे येतात असे मला सांगण्यात आले .सर्व कर्मचाऱ्यांना मी आल्याचा आनंद झाला असे जाणवले . जाताना सर्वांनी एकत्र येत निरोप दिला .
मध्यप्रदेशचे मंत्री विश्वास सारंगत्यांनी बांधलेला अप्रतिम आश्रम . वरच्या मजल्यावर त्यांची काचेची खोली असून इथून नर्मदा मातेचे खूप सुंदर दर्शन होते .
आपल्या आई वडिलांच्या नावे स्थापन केलेल्या न्यासाद्वारे हे काम त्यांनी उभे केले आहे .
आश्रमातील पार अतिशय भव्य दिव्य आणि सुंदर आहे
डूमरच्या पुढचा किनारा असा आहे .
हा मंत्री विश्वास सारंग यांचा आश्रम आहे . महाराष्ट्रातील एखाद्या मंत्र्याचा असा नर्मदेकाठी आश्रम आहे अशी कल्पना तरी आपण करू शकता का ? कल्पना करून पहा कुठले मंत्री महोदय असा आश्रम उभा करू शकतात ? असो .
आश्रमामध्ये कलात्मकपणे वठलेल्या झाडांना देखील देवत्व बहाल करण्यात आलेले आहे
जागोजागी लिहिलेले संदेश पाहता महाराजांचे गोसेवा प्रेम लक्षात येते
आश्रमाचा परिसर भव्य व सुंदर आहे
मांगरोलच्या काठावरील ही झाडे पक्की लक्षात राहिलेली आहेत !
इथला घाट सुंदर आहे .
काठदेखील सुंदर आहे .
मुळात नर्मदा मैयाच सुंदर आहे ! त्यामुळे तुम्हाला सुंदर हा शब्द माझ्या लेखनात जागोजागी आढळेल !
मांगरोल इथून नर्मदा मातेचे सुंदर दर्शन होते .
भव्य दिव्य नर्मदा पात्र खूपच सुंदर दिसते
दिवसाच्या प्रत्येक वेळेचे नर्मदा मातेचे एक वेगळे सौंदर्य आहे .
तिच्या काठावरील सूर्योदय आणि सूर्यास्त विशेष लक्षात राहणारे असतात
तिच्या भव्यतेपुढे मनुष्य किती खुजा आहे हे आपल्याला लगेच जाणवते .
तिच्या भरवशावर आपली आयुष्याची नौका भव सागरात झोकून द्यावी आणि निर्धास्त रहावे हे उत्तम ! कारण आपल्याला तारायचे का नाही , कसे तारायचे ,कुठवर तारायचे , आणि कशासाठी तारायचे हे सर्व ठरवणे तिच्या हातात आहे ! आणि ती तिचे काम चोख बजावते !
वरील लेख दृक्श्राव्य स्वरूपात ऐकण्यासाठी येथे क्लिक करा
लेखांक एकशे एकसष्ठ समाप्त (क्रमशः )
नर्मदे हर !
उत्तर द्याहटवानर्मदे हर 🙏
उत्तर द्याहटवा