छिपानेर , सातदेव सोडल्यावर पुढे तिगली ,सीलकंठ , मंडी ,नीलकंठ , छिंदगाव काछी , बडगांव , अंबा जदीद , डीमावर ,बाबरी घाट , जजना , मठ्ठा गाव ,नेहलाई , रेऊ गाव , मर्दान पुरा अशी गावे पार करत आंवरी घाट किंवा आंवली घाट लागणार होता .मध्ये अनेक छोटी मोठी गावे होतीच . इथून थोडेसे पुढे गेल्यावर गोंदागाव नावाचे गाव होते . हे नाव मी समोरच्या तटावर असताना ऐकले होते . गंजाल गोमती नर्मदा मातेच्या त्रिवेणी संगमावर जेव्हा मी पोहोचलो होतो तेव्हा समोर गोंदागाव नावाचा घाट असून तिथून फेरीबोट इकडे येते असे ऐकले होते ,आणि त्या नौका पाहिल्या सुद्धा होत्या . आयताकृती आकाराच्या एका ठोकळ्यावर अक्षरशः चार चाकी गाड्या सुद्धा चढवून आणल्या जायच्या . ती जेटी इथूनच सुटायची .इथे नर्मदा मातेचे पात्र खूप भव्य आणि सुंदर होते .
डाव्या हाताला गोंदा गावचा घाट दिसतो आहे . समोर गंजाल गोमती नर्मदा माता त्रिवेणी संगम आहे . आपल्याला आठवत असेल तर समोरच्या तीरावर पापन नावाचे गाव दिसते आहे तिथे काठाने चालताना माझ्या माध्यमातून नर्मदा मातेने यवनला धडा शिकवला होता !
गोंदागावातून त्रिवेणी संगमावर निघालेली बोट किंवा जेटी .
मध्ये वाळू गोळा करणाऱ्या बऱ्याच नावा दिसल्या . सीलकंठ गावातील घाटावर आलो तेव्हा तिथे एक नावाडी भेटला . त्याने मला पुढे रस्ता नसल्याचे सांगितले . मी त्याला आपण नेहमी काठानेच जात असल्याचे व प्रत्येक ठिकाणी मार्ग सापडत असल्याचे सांगितले .मग मात्र त्याने निर्धास्त जा मार्ग आहे असे सांगितले . काही काळ त्याच्यासोबत वाळूमध्ये गप्पा मारत बसलो . त्याने घरून काहीतरी मागवले होते . थोडा वेळ थांबा असा सारखा आग्रह करत होता . थोड्या वेळाने एक मुलगा खाण्याचे काही पदार्थ व चहा घेऊन आला . मी हातावर थोडासा प्रसाद म्हणून घेतला आणि चहा प्रसादी घेऊन पुढे चालू लागलो . "यहासे कोई जाता नही बाबाजी । आप पहले हो बहुत दिनों मे । " केवटरामने जाताना मला सवयीचे झालेले वाक्य ऐकवले . इथे एक अनुभव नर्मदा मातेने दिला . नीलकंठ क्षेत्र येण्यापूर्वी एक मोठे शेत आडवे आले . या संपूर्ण शेताला मालकिणीने कुंपण घातले होते . तिने तिच्या शेतातून मला जाऊ दिले नाही . मी तिला सांगितले की मी काठानेच जाणार आहे . परंतु ती म्हणाली माझ्या शेतातून तुम्ही जाऊ शकत नाही . ती मला पिण्यासाठी पाणी देऊ लागली . परंतु मी पाणी घेण्यास नकार दिला . ती म्हणाली खाण्यापिण्याचे लाड करू . परंतु माझ्या जमिनीतून जाऊ देणार नाही .या उलट मी म्हणालो ,मला बाकी काही नको आहे परंतु मी इथूनच जाणार आहे . वातावरण थोडेसे तप्त झाले . अखेरीस मी नर्मदा मातेमध्ये असलेल्या गवतामध्ये उतरलो .आणि गुडघाभर चिखल गाळ तुडवत काठाकाठाने पुढे गेलो . ती माई मला हाका मारू लागली . बाबाजी पानी तो पीके जाओ । पण मी काही परत फिरलो नाही . एकुणच या लोकांचे गणितच मला कळत नसे . एकीकडे तुम्हाला विरोध देखील करतात परंतु त्यावेळी तुम्हाला खायला प्यायला देखील विचारतात . माणुसकीच्या नात्याने खाणेपाणी विचारले जाते . परंतु मालकी हक्काच्या नात्याने रीतसर अधिकार गाजवला जातो . मी बाईला पाणी नाकारले होते याचा अर्थ पुढे मला जेवणाचे हाल होणार आहेत हे पक्के ठाऊक होते . त्यामुळे तशी मनाची तयारी ठेवून पुढे चालू लागलो . आणि झाले ही तसेच . नीलकंठ येथे आल्यावर माझ्या असे लक्षात आले की महामंडलेश्वर पपू १००८ स्वामी विद्या गिरी यांनी हा मठ नुकताच सांभाळायला घेतला होता . महानिर्वाणी आखाड्यातील त्या संत होत्या . इथे एका भागवत कथेची तयारी जोरात सुरू होती . विद्या गिरी माताजी दिल्लीच्या होत्या . अतिशय तेजस्वी आणि करारी स्वभावाच्या होत्या . त्यांचे अनेक शिष्य साधू इकडे तिकडे कामांमध्ये मग्न होते . मी त्यांना मदत करू लागलो . थोड्यावेळाने माताजी बाहेर अंगणामध्ये आसन लावून बसल्या . मी त्यांच्या पायाशी बसून काही काळ सत्संग केला . त्यांनी माझ्या परिक्रमेची सर्व माहिती विचारून घेतली .त्यांना भेटायला अनेक संत मंडळी आली होती . इथे मी तयारी मध्ये मदत करत असल्यामुळे अखंड चाललेले जेवणामुळे कोणी मला जेव म्हणाले नाही ! मी सर्वांना वाढले परंतु मला कोणी जेव म्हणत नव्हते !आणि जेवा असे म्हटल्याशिवाय अन्नग्रहण करायचे नाही हा तर परिक्रमेचा मुख्य नियम !खूप भूक लागली परंतु कोणी जेवणाचे नावच काढेना . गावातून भागवत ग्रंथाची मिरवणूक काढणार होते .नंतर सर्वजण भागवताच्या मिरवणुकीसाठी साठी निघून गेले .
इथे मूळचा अमृतसरचा असलेला एक तरुण तेजस्वी साधू भेटला ज्याचे नाव हरिनारायण गिरी असे होते .महानिर्वाण आखाड्याचा हा दिगंबर नागा साधू होता . याच्याशी खूप चांगला सत्संग झाला . साधू तरुण आणि अतिशय तेजस्वी होता . अखेरीस मी माताजींची परवानगी घेऊन पुढे जाण्यासाठी निघालो . दुपारचे तीन वाजून गेले होते . जाता जाता माताजीं नी विचारले भोजन प्रसादी घेतली ना ? मी नाही म्हटल्याबरोबर त्या सर्व शिष्यांवर भडकल्या ! ताबडतोब त्यांनी आसन सोडले आणि स्वतः स्वयंपाक घरात जाऊन माझे ताट वाढून आणले ! ही साधूंची मूळ प्रवृत्ती असते ! ते कधीच कोणाला भोजन दिल्याशिवाय पुढे पाठवत नाहीत . किमान विचारतात . आपल्यालाही हे करणे सहज शक्य आहे . घरी आलेल्या कुठल्याही माणसाला आवर्जून विचारावे की त्याचे भोजन झाले आहे का .दुपारचे अमुक अमुक वाजले आहेत म्हणजे जेवण झालेच असेल असे डोक्यात ठेवू नये !विचारायला थोडीच पैसे लागतात ! परंतु चुकून माकून तो जीव उपाशी असेल तर मात्र त्याला भोजनप्रसादी खायला घालण्याचे पुण्य आपल्याला लाभते ! माझं जेवण होईपर्यंत माताजी समोर उभ्या होत्या .एवढ्या मोठ्या महामंडलेश्वर . आणि एका परिक्रमावासी साठी अशा उभ्या असलेल्या पाहून मी ओशाळलो . परंतु यातून मी शिकत देखील होतो . साधू आपल्या कृतीतून समोरच्याला शिकवतात . फक्त समोरचा शिकण्यास सिद्ध असला पाहिजे !

स्वामी हरि नारायण गिरी महाराज महानिर्वाण आखाडा
हिमालयामध्ये पदभ्रमण करताना स्वामी हरि नारायण गिरी महाराज
नर्मदा मातेच्या काठावर उभे असलेले स्वामी हरि नारायण गिरी महाराज
नीलकंठ घाटावर उभे स्वामीजी . हे स्वामीजी आणि यांच्यासोबत असलेले अजून एक तरुण साधू यांच्याशी माझ्या खूप चांगल्या गप्पा झाल्या . इथे राम मंदिर नर्मदा मंदिर शिव मंदिर अशी दोन-तीन मंदिरं होती ती सर्व मंदिरे झाडून पुसून स्वच्छ करायला मी त्यांना खूप मदत केली . त्यामुळे दोघे माझ्यावर खुश होते .
नर्मदा मातेचे दर्शन घेताना महामंडलेश्वर स्वामी विद्या गिरी .
श्री नीलकंठेश्वर महादेव . .
नीलकंठ आश्रमामध्ये सत्संग सुरू असताना दंग झालेले श्रोते आणि प्रवचन देणाऱ्या स्वामी विद्या गिरी महाराज .भोजन प्रसाद घेतल्यावर पुन्हा हरि नारायण गिरी यांच्या आज्ञेमुळे तासभर तिथे विश्रांती घेतली . पडल्या पडल्या महाराजांशी पुन्हा गप्पा मारल्या . त्यांनी मला खूप मौलिक मार्गदर्शन केले .

कोलार किंवा कौसल्या नदी नीलकंठ गावानंतर आपले स्वागत करते . मी पुढे जाण्यासाठी निघालो तोपर्यंत भागवत ग्रंथाची मिरवणूक वाजत गाजत मंदिरापर्यंत पोहोचली . नटून थटून आलेले ग्रामस्थ या मिरवणुकीचा आनंद घेत होते . त्या गोंधळ मी हळूच काढता पाय घेतला . आता कोलार नदी ओलांडायची कशी असा प्रश्न माझ्यापुढे उभा होता . मी संगमावर आलो . इथे बऱ्याच नावा होत्या परंतु एकही नावाडी नव्हता . सर्व केवट लोक भागवत ग्रंथाच्या मिरवणुकीमध्ये सहभागी होण्यासाठी गेले होते . मी मनातल्या मनात नर्मदा मातेचे स्मरण केले आणि नेहमीप्रमाणे तिला विनंती केली की मैया मला तुझा किनारा सोडायचा नाही तरी मला पलीकडे सोडण्याची व्यवस्था कर . इतक्यात गावाकडून संगमाकडे येणाऱ्या उतारावरून चालत येणारी एक म्हातारी मला दिसली . ती हाताने मला थांब अशी खूण करत होती . मी थांबलो . या म्हातारीचा एक छोटासा डोंगा इथे नांगरलेला होता . त्यात साठलेले पाणी काढण्यासाठी आले आहे असे तिने मला सांगितले . मी तिला डोंग्यामध्ये साठलेले पाणी काढायला मदत केली . प्लास्टिकच्या बाटल्या कापून पेल्यासारखा आकार देऊन त्याने हे पाणी काढले जाते . तिने मला डोंग्यामध्ये बसवून कोलार किंवा कौसल्या नदी पार करून दिली . मी तिला पैसे देऊ लागलो तर तिने घेतले नाहीत . उतरताना मात्र न विसरता मी तिच्या पाया पडलो . संपूर्ण परिक्रमेमध्ये पहिल्यांदाच एका वयोवृद्ध महिलेने नाव चालवत मला नदी पार करवली होती . साक्षात नर्मदा मातेचे स्वरूप मानून मी तिला नमस्कार केला . चार पावले पुढे गेलो आणि मागे वळून पाहिले . माझ्या अपेक्षेप्रमाणे नदीमध्ये एकही नाव नव्हती . सर्वत्र शांतता होती . ढसाढसा रडलो . तसेही परिक्रमेचे दिवस संपत चालले होते त्यामुळे प्रत्येक पाऊल जड अंतःकरणाने टाकत होतो . आपल्यामुळे नर्मदा मातेला किती त्रास होतो आहे ही भावना मनाला सतत टोचायची . परंतु परिक्रमावासीला त्रास झाला नाही पाहिजे हेच नर्मदा मातेचे मुख्य तत्व होते . त्यामुळे जे होते आहे ते पाहत राहण्यापलीकडे माझ्या हातात काहीच नव्हते .
इथे नदीमध्ये बरीच माणसे मासे धरत आहेत असे माझ्या लक्षात आले . मी त्यांच्याशी बोलू लागलो तेव्हा असे लक्षात आले की या सर्वांना शिवराज सिंह सरकारने मासे पकडण्याची जाळी मोफत वाटली होती . प्रत्येक माणसाला चार किलो जाळी देण्यात आली होती जी साधारण बाराशे मीटर लांब असायची . जाळीचा दर्जा उत्तम होता . त्यामुळे सर्वच जण आनंदाने मासे पकडण्यासाठी आले होते ! इथून पुढे वाळू उपसा करणारा भाग सुरू झाला . मोठ्या प्रमाणात वाळू उपसली जात होती . इथे एका शेतामध्ये वाळू उपसली जात होती . तिथून मी जात असताना एका तरुणाने मला आवाज दिला . "नर्मदे हर बाबाजी ! आगे मत जाना । आज हमारे घर रुक जाना । " मी त्या तरुणाकडे गेलो . त्याने मला घरापर्यंत आणून सोडले . हे छिंदगाव काछी नावाचे गाव होते .इथून डीमावर पाच किलोमीटर दूर होते . ढगांनी आकाशामध्ये प्रचंड दाटी केलेली होती त्यामुळे कुठल्याही क्षणी जोरात पाऊस पडण्याची शक्यता दिसत होती . त्यामुळे मी अमन उदयराम कुशवाहा नामक या मुलाच्या घरी गेलो . अतिशय मोठे घर होते . घर कसले ! गृहस्थ आश्रमच तो ! रामनारायण कुशवाहा नामक एका सधन शेतकऱ्याचे हे घर होते . माझे स्वागत रामनारायण कुशवाह यांनीच केले . यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांना कॅथेटर वगैरे लावलेली होती . तरीदेखील ते स्वागताला पुढे आले . हे घर म्हणजे साक्षात गोकुळ होते . समोर अति भव्य अंगण होते . चार-पाच घरं ओळीने जोडली होती आणि समोर एकच एक मोठा वरांडा होता . एकत्र कुटुंब पद्धतीचा विजय असो ! राम नारायण कुशवाहा वॉकर घेऊन चालत होते . परंतु परिक्रमा वासी आल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर चा आनंद ओसंडून वाहत होता .यांची ५२ एकर शेती होती .पहिले स्नान कर लीजिए असे त्यांनी सांगितले . पाण्याची भरपूर व्यवस्था होती . मस्त स्नान केले आणि पूजा वगैरे करून घेतली . मोठा गोठा होता . ट्रॅक्टर डंपर वगैरे भरपूर गाड्या होत्या . इथून फारसे परिक्रमा वासी जात नाहीत परंतु जे जातात त्यांना मी आवर्जून थांबवतो असे रामनारायण कुशवाह यांनी सांगितले . इथे अगदी चातुर्मासासाठी सुद्धा परिक्रमा वासींना ते थांबवून घ्यायचे .सुखी परिवार होता . यांना सात मुली आणि दोन मुले होती . भावजयीला तीन मुले होती . आणि या सर्व मुलांना भरपूर मुले होती ! त्यामुळे नातवंडे पतवंडे नुसता धुमाकूळ चालला होता ! त्यात मी आल्यावर सगळी मुले माझ्या भोवती गोळा झाली ! काय गंमत आहे कळत नाही परंतु जिकडे मी जातो ना तिथे सर्वप्रथम मुले माझ्या भोवती गोळा होतात ! गुळाला मुंगळे चिकटतात ना तशी मुले मला चिकटतात ! कदाचित मी फारसा विचार करत नाही हे त्याचे कारण असावे . कारण सतत विचार करणाऱ्या माणसाच्या डोक्याभोवती प्रचंड फ्रिक्वेन्सी घोंगावत असतात . त्याचा लहान मुलांच्या कोवळ्या मनाला त्रास होतो . आपले तसे नसते . त्यामुळे मुलांना आनंद मिळतो ! सौम्या , रिमझिम , राधिका , श्वेता ,अमन ,रणजीत आणि अजून बरीच मुले होती . विशेषतः छोटी सौम्या फारच स्मार्ट होती . सौम्या सांकला असे तिचे नाव होते .आई अपंग होते आणि वडील देखील मूकबधिर .परंतु ही मुलगी मात्र खूपच हुशार जन्माला आली होती !नर्मदा मातेचा प्रसाद होता तो !

हेच ते पुण्यक्षेत्र ! श्री राम नारायण कुशवाहा यांचा गृहस्थ आश्रम !
घरासमोर मोठे पटांगण होते .
सहा खणांचे सणसणीत घर आणि मोठे अंगण होते .
परिक्रमावासींची सेवा करण्यात या कुटुंबाला धन्यता वाटते .
आता या आश्रमाचे नाव रामस्नेही अन्नक्षेत्र असे करण्यात आले आहे .
समोर मोकळे पटांगण होते आणि त्यानंतर भरपूर झाडे होती .
रात्री मी सर्व मुलांना विविध प्राणी , पक्षी , माणसे , गाड्या ,व्यंगचित्रे ,नर्मदा मैया , गणपती बाप्पा ,हनुमान जी , श्रीराम अशी भरपूर चित्रे काढून दिली . मुले मला येऊन जी चिकटली ती हालेचनात ! रात्री खूप जोराचा पाऊस झाला . मुले रात्री बराच वेळ माझ्याजवळ बसली होती . शेवटी घरातल्या मोठ्यांनी दटावल्यावर झोपायला गेली . "बाबाजी को सोने दो । वे दिनभर चलके थके रहेंगे । चलो भागो ! " असा ओरडा पडल्यावर बिचारी मुले पळाली . मोठ्या लोकांना काय माहिती की माझी ऊर्जा किंवा माझ्या ऊर्जेचा स्त्रोत ही मुलेच होती ! लहान निरागस मुलांच्या ठाई असलेले शुद्ध परब्रह्म तत्व आपल्याला पुन्हा ताजेतवाने करते . थकवा घालवून टाकते ! रात्री छान झोप लागली . पहाटे लवकर उठून आन्हिके आटोपली . आणि डीमावरचा रस्ता धरला . मध्ये सुदामा आश्रम नावाचा एक आश्रम होता .सुदामा गिरी .नामक एक अतिशय तरुण साधू इथे छोटीशी खोली बांधून परिक्रमावासीयांची सेवा करत असे .त्याने सुंदर चहा पाजला.
सुदामगिरी महाराजांचा रानीतलाई भागातील छोटासा आश्रम . सुदामा आश्रम ! मुठभर पोहे खाऊन सुद्धा पोट भरेल असा !
पुढे डिमावर गावात आलो . पंचनाथ महादेवांचे खूप सुंदर मंदिर होते .मंदिराला पायऱ्या आणि घसरगुंड्या होत्या .
हे आहे डीमावर येथील पंचनाथ महादेवांचे मंदिर .
आत मध्ये सर्व देवांची दर्शनं घेतली . पुजारी महाराज भेटायला आले . आणि त्यांनी सांगितले की इथे जे महाराज आहेत ते फक्त दहा ते सव्वा दहा अशी पंधरा मिनिटे लोकांना भेटतात . आता सकाळचे आठ वाजले होते त्यामुळे महाराजांना न भेटताच केवळ चहा प्रसादी घेऊन पुढे निघालो आणि काठाचा रस्ता धरला . आता मात्र समोर भरपूर वाळूचा किनारा सुरू होत होता . इथून मागे सुद्धा वाळूचा बेसुमार उपसा चालू होता .
तवा नदीने वाहून आणलेली उत्कृष्ट दर्जाची वाळू इथे मिळायची .डिमावर गावचा घाट पक्का होता . परंतु तिथून पुढे मार्ग जवळपास नव्हताच पण चालताना खूप मजा आली . कठीण मार्गाने चालताना एक लोकेश केवट नावाचा मनुष्य भेटला जो नर्मदा मातेच्या काठावर झोपडी लावून बसला होता . पाणडुबीवर कामाला होता .वाळू काढायची पाणबुडी .तिला हे लोक पणडुब्बी म्हणतात . त्याने सिद्ध घाट दाखवला . सिद्ध घाटावर मला त्याने बसवले आणि ताजी ताजी पुरी भाजी मला खायला दिली ! क्षणभर विश्रांती घेऊन बरोबर अकरा वाजून अकरा मिनिटांनी निघालो आणि कठीण वाटेने बावरी किंवा बाबरी घाट गाठला .इथे टीमरनी नावाची मोठी नदी नर्मदा मातेला येऊन मिळत होती .वाळू उपसणाऱ्या लोकांनी या संगमाची वाट लावून ठेवली होती . आज नकाशा चित्र पाहिल्यावर लक्षात येते की मार्ग कसा आहे परंतु प्रत्यक्ष जमिनीवर उभे राहिल्यावर नक्की कुठून कुठे गेल्यावर संगम पार करता येईल तेच लक्षात येत नव्हते !
या चित्रामध्ये आपल्याला नर्मदे काठी सर्वत्र भरपूर आढळणारे देशी गोधन दिसते आहे .
या चित्रात उजवीकडच्या वरच्या कोपऱ्यातून जी नदी नर्मदा मातेला मिळते आहे ती टीमरनी नदी आहे आणि तिचा संगम पार करणे किती कठीण झालेले आहे हे आपल्याला सहज लक्षात येईल .
झूम करून पाहिल्यावर आपल्याला लक्षात येईल की वाळू माफियांनी तयार केलेले वाळूचे तात्पुरते रस्ते अत्यंत फसवणारे असून शेवटपर्यंत जाऊन माणूस परत माघारी येतो . इथे कोणीही परिक्रमा वासींना मार्गदर्शन करत नाही . वाळू उपसणाऱ्या बऱ्याच लोकांना परिक्रमेची माहितीच नाही असे माझ्या वेळोवेळी लक्षात आले .त्यांना फक्त समोर दिसणारी फुकटची वाळू अधाशा सारखी उपसून जास्तीत जास्त पैसे उभे करणे एवढीच अक्कल आहे .
या भागामध्ये अशा नौका आहेत ज्या प्रवासासाठी आणि वाळू उपसण्यासाठी वापरल्या जातात .
वाळू उपसणाऱ्या लोकांची लगबग इथे आपल्याला दिसेल . अशा वाळूवरून चालताना चालण्याची गती अर्थातच कमी होते . किंबहुना निम्मी होते .
मोठ्या प्रमाणात साठलेल्या वाळूमुळे मैया इथे खूप उथळ झाली होती . मैयामध्ये एक मोठे बेट तयार झाले होते . .इथे बाबरी घाटावर एक फार तेजस्वी व आनंदी राजपूत व एक साधू होते . दोघांनाही खूप आनंद झाला . दोन-चार पोळ्या ,भाजी , शिरा खाऊन साधूंच्या आज्ञेनुसार खाटेवरती वारे खात पडलो . साधू महाराज फारच चांगले होते . अतिशय प्रेमळ स्वभाव होता . मला त्यांचा काही काळ सत्संग लाभला . साधारण दुपारी तीन वाजता मी इथून पुढे निघालो आणि पुन्हा एकदा काठ पकडला .वाळू माफी यांचा धुमाकूळ पहात जाजना गाव पार केले आणि मठ्ठा गाव आले इथे समोर फार मोठे वाळूचे बेट आपोआप तयार झालेले आहे .जिकडे पहावे तिकडे वाळूच वाळू ! पलीकडे तोच कठीण टप्पा दिसत होता जो मी कसा बसा पार केला होता .समोर पथराड नावाचे गाव होते . याला स्थानिक लोक मिनी गोवा असे म्हणतात . अक्षरशः समुद्रा सारखा वाळूचा किनारा येथे मध्यभागी तयार झालेला आहे . आणि त्या पलीकडे बाबरी नावाच्याच गावापर्यंत जाणारा खडकाळ किनारा आहे . बोरुच्या गवताला इथे बाबर असे म्हणतात . त्यावरून हे नाव पडले आहे .

हेच ते वाळूचे भव्य दिव्य बेट . या बेटावर तुम्हाला एकही झाड आढळणार नाही जिकडे पहावे तिकडे स्वच्छ सुंदर वाळूच वाळू !

बेट
खूप मोठे आहे . सुदैवाने येथे अजून पर्यटन स्थळ विकसित झालेले नाही नाहीतर या बेटाची वाट लागेल .समोर आपल्याला पथाडा गावातील घातक पथ दिसतो आहे .
मठ्ठा गावाच्या आधी चार भव्य झाडांखाली सुंदर असे हनुमंताचे मंदिर होते .इथे थोडा वेळ बसलो .मोठमोठी वडाची झाडे होती आणि त्याच्या पारंब्या लटकलेल्या होत्या .एका मातारामने शेतातून पिण्याचे पाणी आणून दिले . खूप आनंद वाटला .पुन्हा शेता शेतातून , काठावरून मठ्ठा गाव गाठले . साधूने थंडे स्वागत केले . अशा वेळी पुढच्या आश्रमाची माहिती विचारताच ती मात्र हिरीरीने सांगतात तेव्हा आपण ओळखावे की आपण पुढे निघून जाणे श्रेयस्कर आहे .
या भागामध्ये नर्मदा मातेजवळ विजेचा मोठा मनोरा किंवा टॉवर आहे . त्यावरून काढलेली काही चित्रे पाहायला मिळाली .
मठ्ठा गावातील आश्रम आपल्याला या नकाशात दिसतो आहे .
विजेच्या मनोऱ्यावरून हा आश्रम परिसर असा दिसतो !
इथे एक छोटासा घाट बांधलेला आहे .
पुढे नेहलाई गावात आलो .स्वर्गीय पूज्य रामप्रसादजी व माता केसरबाई व पुनियाबाई नानी के पवित्र स्मृती मे पुत्री शत्रुघ्न दासजी तथा सिद्धीबाई यांनी २०१९ साली निर्माण केलेल्या शिवमंदिर व राम मंदिरात राहिलो .या साध्वी स्वभावाने कठोर परंतु तितक्याच प्रेमळ देखील होत्या . इथे एक हार्मोनियम पडली होती . त्या पेटी वरती मी खूप भजने गायली . सकाळ संध्याकाळ मैय्या मध्ये स्नान केले .इथे बांधबंधिस्तीची कामे सुरू होती . समोरच मोठा पिंपळ होता . आश्रमामध्ये सीसीटीव्ही वगैरे लावलेले होते . माझी सजवलेली मैया सिद्दी बाईंना खूपच आवडली . त्या मला म्हणाल्या की आज पर्यंत मी लाखो परिक्रमावासी पाहिले आहेत परंतु असले डोके लावणारा तू पहिलाच भेटला आहेस ! हे त्यांचे शब्द जसेच्या तसे आहेत बर का ! मी लागलीच वहीमध्ये लिहून ठेवले होते . असो . मैयाची इच्छा . इथे अजून एक साधू सेवेसाठी राहिलेला होता . बाईंचा स्वभाव कठोर असल्यामुळे लोक त्यांच्याशी अंतर ठेवून वागायचे . मी देखील मंदिरामध्ये न झोपता बाहेर आसन लावले आणि बाहेरच झोपलो . परिसर खूप रम्य होता .

नेहलई गावातील मंदिरामध्ये येण्यापूर्वी हा एक सुंदर आश्रम लागतो . इथे वाळू मुबलक असल्यामुळे त्याचा सर्वत्र वापर केलेला दिसतो .
एका पारावरती मारुती आणि गणपतीच्या मूर्ती आहेत .
नेहलई गावामध्ये सुंदर घाट बांधलेला आहे .
घाट मोठा आणि पक्का आहे .
कितीही पूर आला तरी हा घाट सुरक्षित राहील याची काळजी घेतलेली आहे .
इथे स्नान करण्यात खूप आनंद मिळतो .
या भागातही छोट्या फेरीबोट चालतात .
पारावर ठेवलेली गणपतीची मूर्ती खूप सुंदर आहे .
सकाळी मी चहा घेतला आणि पुढे निघालो . काठा काठाचा रस्ता पकडला .
इथे नहलई व रेऊ गावाच्या मध्ये एके ठिकाणी सुरक्षित पद्धतीने कयाकिंग करण्यासारखी जागा नर्मदा मातीमध्ये नैसर्गिकरित्या तयार झालेली आहे . इथे खूप लोक कयाकिंग करताना दिसतात .
हीच ती जागा जिथे कयाकिंग केले जाते . आपल्याला पाण्यामध्ये नौका दिसतील .
सुंदर अशा कयक नौका आणि कयाकिंग करणारे साहसवीर आपल्याला या चित्रामध्ये दिसत आहेत .
इथे कयाकिंग करण्यासाठी विदेशी पाहुणे देखील येतात . आपण या पाहुण्यांचा गोरा रंग जरूर पहावा परंतु त्याचबरोबर त्यांनी डोक्यावर राखलेली शिखा किंवा शेंडी देखील पहावी .
प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला कयाक नौका चालविण्याचा सराव करणारे लोक .
इथून पुढे मात्र नर्मदामाता एकदम शांत आणि धीर गंभीर होते
अतिशय अप्रतिम आणि शांत असे हे पात्र आहे . अशा ठिकाणी नौका विहार करणाऱ्या माणसाला पुढे अचानक खळबळ युक्त कयाकक्षेत्र आहे याचा अंदाज देखील येत नाही !

आणि हेच तर नर्मदा मातेचे वैशिष्ट्य आहे . इथे आपल्याला शांत प्रवाह अचानक कयाक क्षेत्रामध्ये बदललेला दिसेल पहा .हे कयाकक्षेत्र मागे पडले आणि रेऊ गाव आले . इथून अप्रतिम काठाच्या रस्त्याने मर्दानपुरा पर्यंत आलो . नर्मदा माई इथे वळण घेत असल्यामुळे जवळपास उभा कडा होता .खाली पाण गवत ,वर काटे , मध्ये नावाला पायवाट . समोर भेळा / भेला गाव , चतुर्भुज महादेव व इंद्रावती नदी .ही तीच नदी जिथे माझे प्राण वाचले होते . आणि ममता गिरी यांचे दर्शन घडले होते . समोर खरोखरीच दाट जंगल होते . इथे एका लक्ष्मी नारायण केवट नामक माणसाने मला पाणी पाजले व काकडी खायला दिली . त्याच्या मुली रितिका व विनिता खूपच गोड होत्या .त्यांनी मला ते तेंदू पत्त्याचे फळ खायला दिले .याला आपण टेमरु किंवा टेम्बरू म्हणतो . पण या दोघी त्याचा उच्चार टॅमरू असा करत होत्या . मला खूप हसू आले ! कौ प्रजातीच्या झाडाखाली बसून टॅमरू खाल्ले !या दोघींनाही माझी मैय्या खूप आवडली .पुढे मर्दानपुरामध्ये ममलेश्वराचे दर्शन घेतले . इथे एक वृद्ध साधू होते त्यांनी प्रेमाने मला खाऊ घातले . आज एकादशीचा उपवास होत आहे हे साधूने सांगितल्यावर मला कळाले .

डांबरी सडकेने चालणाऱ्या परिक्रमावशींना अशी पाटी दिसते . परंतु काठाने चालणाऱ्या परिक्रमा वाशींना स्थानांची माहिती कळत नाही . नर्मदा खंडामध्ये कोणाला काही सेवा करायची इच्छा असेल तर काठाने चालणाऱ्या परिक्रमावासींना कळावे म्हणून वरती असलेल्या तीर्थस्थानाच्या पाट्या लावाव्यात असे वाटते !
हे ममलेश्वर महादेवांचे मंदिर आहे .
मंदिर छान आहे . पवित्र स्थान आहे .
महापुराच्या पाण्यामध्ये ममलेश्वराचे मंदिर असे दिसते .
या भागामध्ये अनेक पुरातन मंदिरांचे अवशेष आपल्याला सापडतात .
इथून दहा-पंधरा मिनिटात आवरी घाटाचा रस्ता असताना पंडित कमलकिशोर नामक कथा वाचकाने नर्मदा मातेच्या काठी जागा विकत घेऊन त्याच्यावर घातलेले भयानक कुंपण आडवे आले . या कथा वाचकाने परिक्रमेचा मार्ग पूर्णपणे बंद केला होता आणि त्यामुळे चार ते पाच किलोमीटर फिरून आवरी घाटावर यावे लागले . खूप वाईट वाटले . किमान कथा वाचकाने तरी असा प्रमाद करू नये असे वाटले . इथे समोरच महादेवांची भव्य मूर्ती दिसते . वैशिष्ट्यपूर्ण पूल देखील दिसतो . या घाटावर कायम गर्दी असते . मी आवरी घाटावरील सर्व दर्शने घेतली .पुरातन मंदिरे आहेत .राम मंदिरामध्ये राम सीता शेजारी आणि लक्ष्मण खाली आहेत अनेक शिवलिंगे कोरलेले नक्षीदार दगड सर्वत्र पडले आहेत . धडाधडी आश्रमामध्ये उतरलो परंतु तिथल्या साधूची भाषा ऐकून हळूच निघालो आणि पुढे बडा आश्रम गाठला . इथे समोर कपचा सारखे दगड असून एका बाजूने दाबून तिरके केल्यासारखे ते सर्व तिरके दिसतात . हा परिसरा अतिशय गूढ भासतो . इथे प्रवाहामध्ये गुप्त सुवर्ण मंदिर आहे असे मला कळाले . समोर आश्रम दिसत होता .तिथे गेलो . निळ्या डोळ्याच्या महन्ताने एक खोली मला दिली . खोलीची अवस्था अत्यंत वाईट होती . धूळ जळमटे कचरा यांचे साम्राज्य होते .मी सर्व खोली स्वच्छ केली . मठ मोडकळीस आलेला आहे .आश्रमामध्ये कामासाठी काही स्त्रिया आल्या होत्या . या बाबाशी चढ्या आवाजात बोलत आहेत असे मला जाणवले . हे महंत गृहस्थ होते . यांना तीन मुले होती . आज एकादशीचा उपवास आहे त्यामुळे तुला बटाट्याची भाजी करून देतो असे महंत मला म्हणाले आणि पलंगावर जाऊन झोपून गेले ! यांच्याकडे एक निकॉन कंपनीची दुर्बिण होती .बायनाक्यूलर .ही एक चांगला ऑप्टिकल झूम असलेली दुर्बिण होती . मी त्या दुर्बिणीतून पाहिले .थेट घाटावरील माणसे दिसत होती ! ती दुर्बीण इतकी चांगली होती की समोरच्या ताटावरील महादेवाची मूर्ती त्याच्या समोरचे उद्यान देखील त्यात दिसत होते . हत्याहरण नदी दिसत होती . आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ज्या ठिकाणी कठीण रस्ता लागल्यामुळे माझी वाट लागली होती तो समोरच्या ताटावरील भाग देखील त्या दुर्बणी ने मी नीट पाहून घेतला ! बराच वेळ झाला तरी महंत काही उठेनात . शेवटी मी हळूच तिथून काढता पाय घेतला . इथून पुढे दोन मार्ग होते . काठाने पुढे जावे किंवा ५२ शक्तिपीठांपैकी एक असलेल्या सलकनपूर च्या बीजासनी माता देवीचे दर्शन घेऊन पुढे जावे .हे स्थान इथून फक्त दहा किलोमीटर आहे असे मला कळाले होते . त्यामुळे मी देवीचे दर्शन घेऊन पुढे जावे असे ठरवले . या स्थानाचा तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी खूप चांगला विकास केला आहे असे लोक सांगत होते .

या चित्रामध्ये आपल्याला आवली घाटाचा पूल दिसतो आहे .या ठिकाणी मोठे मोठे खडक असल्यामुळे खोल पाण्याच्या भागातून फेरीबोट सुद्धा चालते . खडकांचा जो भाग आहे तिथेच बडा आश्रम आहे .
हाच तो जीर्ण जर्जर झालेला बडा आश्रम .
या भागात चालणाऱ्या फेरीबोट खूप मोठया आहेत .
समोर महादेवाची मूर्ती दिसते आहे तिथपर्यंत नेऊन या बोटी सोडतात .
घाटावरती कायमच भाविकांची गर्दी असते .
इथून पुढे नर्मदा मातीमध्ये असे पत्थर सुरू होतात ! खूप कठीण असे हे नदीपात्र आहे . त्यामुळे इथे कोणी नावा घेऊन जात नाही .
अगदी मोठे मोठे ट्रक सुद्धा फेरी बोटनेच नेले जातात .
मी निघालो . पोटामध्ये भुकेचा आगडोंब उसळला होता .परंतु त्याची काळजी मैयाला ! जिथे कुठलाही आश्रम नाही किंवा साधू नाही अशा अवस्थेमध्ये रस्त्यावरून चाललेल्या या परिक्रमा वासीला एका दुकानदाराने आवाज दिला ! दुकान म्हणजे रस्त्याच्या कडेला लावलेला साधा तंबू . उभे राहून वस्तू विकणारा . त्याचे नाव होते रामबगस हलवाई ! त्याने मला आसन टाकून खाली बसवले .आणि माझी एकादशी आहे का विचारले . एकादशीचे व्रत सुरू आहे असे कळल्यावर पाचच मिनिटे बसा मी आलो असे सांगून तो निघून गेला . मला दुकानामध्ये बसून घरी जाऊन हा महामानव एक लिटर म्हशीचे घट्ट ताक घेऊन आला ! ते ताक इतके अप्रतिम होते की विचारू नका !या भागामध्ये वैशाख कृष्ण एकादशी ते अमावस्या अशी पंचकोशी परिक्रमा चालते . यातील बहुतांश लोक सलकनपूर वरून परिक्रमा उचलतात . त्या परिक्रमावासी लोकांची घाटावर प्रचंड गडबड होती . अनेक तथाकथित साधू फार ज्ञानी असल्याचा आव आणत या अंतराने तुलनेने किरकोळ परिक्रमेमध्ये सहभागी झाले होते .आपल्याला अध्यात्मातले खूप काही कळते असा आव आणत मोठ्या मोठ्या बाता मारत होते . भोळेभाबळे आणि या क्षेत्रातले अनभिज्ञ लोक त्यांच्या गळाला लागत होते .अमुक यज्ञ केला पाहिजे , तमुक शांती केली पाहिजे वगैरे उपाय यादृच्छिकपणे सांगत त्यांना अडकवण्याचा प्रयत्न करताना लोक दिसत होते . आपल्या धर्माची हानी होण्याचे हे महत्त्वाचे कारण आहे . ज्यांना धर्माचे ज्ञान आहे किंवा मी असे म्हणेन की अर्धवट ज्ञान आहे त्यांनी अतिशय काळजीपूर्वक आपल्या धर्माचे रक्षण केले पाहिजे . आपण केलेल्या चुकीच्या गोष्टीमुळे धर्माची हानी होते आणि काही लोक धर्मापासून कायमचे दूर जाऊ शकतात याचे भान त्यांनी बाळगणे आवश्यक आहे . जे आपल्याला माहिती नाही त्यावर अजिबात भाष्य करू नये . कारण त्या कृतीचे फळ मिळाले नाही तर लोक दोष तुम्हाला नाही धर्माला देतात . इथून भर उन्हामध्ये निघालो . आणि तापलेला डांबरी मार्ग पकडला . नर्मदा मातेच्या सुखदायी काठाने जाणाऱ्या पायांना डांबरी रस्ता आला की अक्षरशः नरकातून चालल्यासारखे वाटू लागते . सर्वांना हात जोडून विनंती आहे . नर्मदा परिक्रमे मध्ये चालायचेच असेल तर काठाने चालावे . जितके अधिक परिक्रमावासी काठाने चालतील तितका काठाचा मार्ग अधिक सुकर होत जाईल . जितके अधिक परिक्रमा वासी डांबरी रस्त्याने चालतील तितका परिक्रमेचा पारंपारिक मार्ग नष्ट होत जाईल आणि परिक्रमावासींना चालण्याचा त्रास होतच राहील तो निराळाच . आपल्याला वाटते की मी एकटा डांबरी रस्त्याने गेल्याने काय होणार आहे . परंतु असा विचार सगळ्यांनीच केल्यामुळे परिक्रमेचा पारंपारिक मार्ग आज लुप्त होत चाललेला आहे . परिक्रमेत काठाने न चालण्याचे महत्त्वाचे कारण भीती हेच आहे . पुढे काय होईल याची शाश्वती नाही आणि कदाचित आपण पडू धडपडू अशी भीती ,अनामिक भय सर्वांच्या मनामध्ये असते . आणि हेच भय हीच भीती नष्ट करायला आपण परिक्रमेला आलेलो आहोत ! जीवनामध्ये उद्या काय होणार या अज्ञात गोष्टीची भीती प्रत्येक जीवाला असते . आणि त्या भीतीपोटीस मनुष्य सर्व कर्मे करत असतो . नोकरी असो शिक्षण असो धंदा असो किंवा संसार असो . नीट विचार केल्यास असे लक्षात येते की या सर्वांचे मूळ अनामिक भीती हेच आहे . त्यामुळे मला असे फार वाटते की किमान नर्मदा परिक्रमेसाठी आल्यावर तरी या भीतीचा आपण त्याग केला पाहिजे त्याशिवाय आपल्याला नर्मदा मातीची अनुभूती येणार नाही . बरे ही नर्मदा माता खरोखरीच तशी आहे का तर याचे उत्तर शंकराचार्यांनी आपल्याला आधीच देऊन ठेवलेले आहे .नर्मदाष्टकामध्ये ते तिला "भीतीहारी वर्मदे " असे म्हणतात !
"गतम् तदेव मे भयं । त्वदम्बू वीक्षितं यदा । " असे देखील म्हणतात .याचा अर्थ तुझे पाणी पाहिल्याबरोबर माझे सर्व भय निघून गेले !आता इतकी मोठी खात्री आपल्याला पूर्वजांनी दिलेली असताना आपण घाबरायचे कारणच काय ? नर्मदा मातेचे नाव घ्यायचे आणि काठाने चालू लागायचे !जय हो माईकी ! तो चिंता काहे की ?
ना चिंता , ना भय ! मेरे नर्मदा माई की जय !
नर्मदे हर !
लेखांक एकशे छप्पन्न समाप्त (क्रमशः )
🙏🙏नर्मदे हर।।
उत्तर द्याहटवानर्मदे हर 🙏
उत्तर द्याहटवानर्मदे हर 🙏
उत्तर द्याहटवानर्मदे हर . खूप सुंदर.
उत्तर द्याहटवा