मिर्झापूर , तमखाना ,सिरालिया , राजीरगाव , डावठा मंडलेश्वर , बजवाडा , गजनपूर अशी गावे पार केल्यावर नेमावर अथवा नाभीपुर हे नर्मदा मातेचे नाभी स्थान येते . इथे नर्मदा मातेच्या एकूण लांबीचा साधारणपणे मध्यभाग आहे . नर्मदा मातेच्या पात्राच्या मधोमध इथे एक नाभीकुंड आहे . अर्थात परिक्रमावासींना येथे जाता येत नाही . परंतु दुरून दर्शन होते . योगेश्वरानंद स्वामींचे दर्शन घेऊन निघालो आणि किनारा पकडला परंतु मला वाटले होते त्यापेक्षा हे नेमावर पर्यंतचे अंतर थोडेसे अधिक निघाले . काठाने प्रचंड शेती होती . गव्हाची मोठ मोठी शेते होती .आणि नर्मदा मातेच्या काठाला थोडीफार दाट झाडी शिल्लक राहिलेली होती . त्यामुळे या भागातील वन्य जीवन नर्मदा मातेच्या काठावरती एकवटले होते . शेतातील मोठे उंदीर ससे वगैरे प्राणी खाऊन जगणारे कोल्हे लांडगे तरस यांची या भागात वस्ती होती . मला वाटेमध्ये जाताना काही कोल्हे आणि एका तरसाने दर्शन दिले . वन्य पशु हे शेतकऱ्यांचे मित्र आहेत हे त्यांनी नेहमी लक्षात ठेवावे . उंदराची एक जोडी वर्षाला जितके प्रजनन करते ते पाहता एखादा उंदीर खाणारा प्राणी सुद्धा शेतकऱ्यांचा मित्रच मानला पाहिजे . मग तो साप असो किंवा कोल्हा .

या भागातील शेताचे पट्टे किती मोठे आहेत हे आपल्याला कळावे म्हणून हा नकाशा सोबत जोडत आहे . मोठमोठे जमीनदार इथे शेती करतात . मी शेतातील हा रस्ता न निवडता नर्मदा मातेचा स्पर्श होईल असा संपूर्ण काठावरील रस्ता निवडला होता .
या भागामध्ये मोठ्या प्रमाणात गव्हाचे उत्पन्न घेतले जाते . गव्हाची मोठमोठी शेते हे इथले वैशिष्ट्य आहे . पाणी घातलेल्या शेतातून येणारे गार वारे खूप सुखद असते . या सर्व वनस्पती दिवसभर सोडत असलेला प्राणवायू आपल्याला भरपूर मिळतो आणि शरीरशुद्धी होते .
मध्ये नावडा गावामध्ये मनकामेश्वर महादेवाचे मंदिर लागते .
इथे नर्मदा मातेचा घाट असून लोक नर्मदा मातेमध्ये प्लास्टिक कचरा पिशव्या अशी घाण टाकून पाण्याचे प्रदूषण करतात . आपण सोबत आणलेली पिशवी घरी परत न्यायला काय हरकत आहे ? ही कुठली भक्ती ? नर्मदा मातेचे आपण खरोखर भक्त आहोत की शत्रू त्याचा एकदा विचार करावा .माझे स्पष्ट निरीक्षण सांगतो . नर्मदा मातेची भक्ती वगैरे काही नाही स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी तिला नवस बोलण्यासाठी लोक येतात . बहुतांश लोक नर्मदा मातेवर प्रेम करत नाहीत तर नर्मदामातेला घाबरतात . ती देखील मग पावसाळ्याचे चार महिने असा काही वचपा काढते की लोकं तिला शरणच येतात ! नका असे करू ! नर्मदा मातेचा आशीर्वाद हवा असेल तर तिला घाण करू नका .
या भागातून नर्मदा मातेचे सुंदर दर्शन होते .
नर्मदा मातेचे पात्र इथे उथळ आहे .
सकाळी तर हे दृश्य स्वर्गीय असते .
पुढे नेमावर जवळ या पात्राचा विस्तार होत जातो .
नेमावरच्या अलीकडे नर्मदा मातेचा किनारा असा आहे .
नेमावर शहर सुरू झाले की एक जैन मंदिरांचा समूह लागतो
हे नवीनच बांधलेले तीर्थक्षेत्र असून जैन धर्मियांसाठी मोठेच धार्मिक स्थान निर्माण झालेले आहे .
मी गेलो तेव्हा या मंदिराचे असे बांधकाम सुरू होते परंतु आता ते पूर्णत्वाला गेले असावे .
हा मंदिर समूह अतिशय मोठा असून समोर हारदा येथील किनारा आहे तिथून छान दिसतो .
छोटे मोठे ओढे पार करत नेमावर गाठले . इथे घाटावर कायम गर्दी असते . एक डोक्यावरून गेलेला आहे तो खालून पार केला . समोरच्या हंडीया गावाला हा जोडतो . पुढे लांबवर अजून एक पूल दिसत होता . नेमावर हे नर्मदा मातेचे नाभी स्थान असल्यामुळे इथे स्नानासाठी कायम गर्दी असते . मी घाटाचे शेवटचे टोक गाठले . इथला घाट धोकादायक घसरगुंडीसारखा आहे .शेवाळलेला असतो . तिथे स्नान केले .आणि नर्मदा मातेच्या कुपीतले अर्धे जल अर्पण करून अर्धे भरून घेतले . जिवाणूंचे आदान प्रदान झाले ! जला मध्ये धारण केलेल्या शक्तीचे देखील अदान प्रदान झाले ! प्रकाशानंद महाराज सांगतात त्याप्रमाणे आपल्या मेंदू मधील स्मृति जलस्वरूपामध्ये साठवलेल्या असतात . आणि नर्मदे काठी अनेक साधुसंत ऋषीमुनी यांनी केलेले मंत्रोच्चारण त्या जलामध्ये स्मृती रूपाने साठलेले आहे . त्यामुळे त्याचे सेवन करणे पूजन करणे म्हणजे त्या सर्व मंत्रांची शक्ती प्राप्त होण्यासारखे आहे . त्याचे मला यावेळी स्मरण झाले . नेमावर मध्ये अनेक मंदिरे आणि आश्रम आहेत . सर्वात उंचावर दिसतो तो जंभेश्वर महाराजांचा आश्रम व मंदिर . हा बिश्नोई समाजाचा आश्रम आहे . त्याच्या खालोखाल ब्रह्मचारी महाराजांचा आश्रम आहे . याचे नाव चिन्मयधाम ब्रह्मचारी आश्रम असे आहे . परंतु सर्वात लक्ष वेधून घेणारी वास्तू म्हणजे सिद्धनाथाचे किंवा सिद्धेश्वराचे मंदिर आहे . अतिशय पुरातन असे हे मंदिर आहे . मुस्लिम राजवट येण्यापूर्वी परमारा राजांचे येथे राज्य होते . त्या काळातील हे बांधकाम आहे . नंतर मुसलमान शासकाने या मंदिराची यथेच्छ तोडफोड केली आहे . तरी देखील ते वाचलेले आहे . पुढे मराठा साम्राज्यामध्ये हे मंदिर पुन्हा एकदा नावारुपाला आले . परमार राजांनी अकराव्या शतकामध्ये बांधलेले हे मंदिर भूमीज नागर शैलीतले आहे . या भागात सर्वत्र संगमरवर सदृश खडक असूनही या मंदिराचा दगड मात्र वेगळा आहे . काळा पाषाण आणि अन्य रंगाचे पाषाण मंदिराच्या कामासाठी वापरले आहेत . मंदिर पाहण्यासारखे आहे .

हा आहे नेमावरचा घाट . किमान एवढी गर्दी इथे कायम असते .मागे सिद्धनाथाचे मंदिर दिसते आहे .
याच्या बरोबर समोर हरदा जिल्ह्यातला हंडीया घाट आहे .
हा घाट म्हणजे एक मजबूत तटबंदी असलेला किल्लाच आहे . असे बुरुज या किल्ल्याला आहेत . अहिल्याबाई होळकरांनी या घाटाचे मजबुतीकरण केलेले आहे . हा घाट ग्वाल्हेरच्या शिंद्यांच्या अधिपत्याखाली देखील होता .
सिद्धनाथ मंदिराच्या आवारामध्ये नर्मदा मातेचे छोटेसे मंदिर आहे . परंतु मुख्य मंदीर मात्र नाभी कुंडाचे आहे जिथे नावेनेच जावे लागते .
घाटावरून सिद्धेश्वर मंदिराचा किल्ला दिसतो . हा किल्ला का बांधावा लागला हे आपल्याला मंदिरात गेल्यावर कळते .
मंदिरामध्ये खूप बारीक कलाकुसर आहे . परंतु सर्वत्र मूर्ती भंजकांनी केलेला हैदोस डोळ्यात भरतो .
इथे सप्त मातृकांच्या मूर्ती आहेत . सर्व मूर्ती मुसलमानांनी तोडलेल्या आहेत . या चित्रामध्ये वैष्णवी देवीची भग्न मूर्ती दिसते आहे .
गर्भगृह सप्त शाखा पद्धतीचे आहे . अर्थात नक्षीकामाच्या सात पट्ट्या वापरलेल्या आहेत . प्रत्येक पट्टीवर एक कथा दाखवली जाते .
साता पैकी तिसऱ्या पट्टीवर शैव द्वारपालाची मूर्ती आहे .
ही सप्त मातृकांपैकी चामुंडा नावाची देवी आहे .
इंद्राणी
विनायकी
माहेश्वरी
कौमारी
अप्रतिम असा सभा मंडप !
मंदिराचे खांब खूप सुंदर आहेत .
त्रिपुरांतक शिवाचे शिल्प मुसलमानांनी तोडलेले आहे . सर्वधर्म समान असतात असे म्हणणाऱ्यांनी या मूर्ती भंजनाचे स्पष्टीकरण द्यावे .
सप्तरथ पद्धतीचे मंदिर असून सात सात उभे स्तंभ आणि त्यातील छोटी मंदिरे मंदिराला शोभा आणतात .
नटराजाचे उत्कृष्ठ शिल्प भग्न करण्यात आलेले आहे .
इथे मंदिराचे सात सात स्तंभ स्पष्ट दिसतात पहा .
चामुंडा मातेची भग्नमूर्ती .
मंदिराचा दगड राजस्थान मधील आहे .
अनेक महापुरांमध्ये देखील हे मंदिर सुरक्षित राहिलेले आहे . इतका याचा पाया भक्कम आहे .
मंदिर दुरून अत्यंत आकर्षक भासते .
तटबंदी वरून मंदिराचे मनोहारी दर्शन होते . कळसा मध्ये देखील महादेवाची मंदिरे आहेत .
एकंदरीत आवर्जून पहावे असे हे स्थान आहे .
आपल्या घरातील लहान मुलांना आपला हा वारसा आपली ही परंपरा आवर्जून दाखवावी .
मंदिराच्या तटबंदीचे प्रवेशद्वार .
घाटावरून दिसणारी मंदिराची तटबंदी आणि मंदिर .
सिद्धेश्वर मंदिराचे दर्शन घेतल्यावर मी वरती कुठली कुठली मंदिरे आणि आश्रम आहेत ते पाहू लागलो . इथे एका ग्रामस्थाने मला सांगितले की तुम्ही ब्रह्मचारी बुवांच्या आश्रमात जा . त्याप्रमाणे आश्रमाच्या मागच्या बाजूने मी प्रवेश केला . सुंदर अशी गोशाळा होती . आत मध्ये डाव्या बाजूला भक्त निवास आणि भांडारगृह होते . उजव्या बाजूला आश्रमाचे सभागृह होते .समोर अन्नपूर्णा मातेचे मंदिर होते . मी आश्रमामध्ये प्रवेश केला . आत मध्ये एक खोली होती . तिथे गेलो मात्र गोंदवलेकर महाराज ,ब्रह्मानंद महाराज ,समर्थ रामदास स्वामी अशा महाराष्ट्रातील संतांच्या प्रतिमा पाहून मन अत्यंत सुखावले ! इतक्यात आश्रमाचे महंत तिथे आले .त्यांना पाहताक्षणीच मी यांना आधी कुठेतरी पाहिले आहे असे मला वाटू लागले . मी महाराजांना नमस्कार केला . आणि बोलून दाखवले की आपल्याला आधी कुठेतरी पाहिले आहे . महाराज हसू लागले . आणि म्हणाले तुम्ही कदाचित माझ्या बंधूंना पाहिले असेल . कोण आपले भाऊ ? मी विचारले . कर्नाटकातील हेब्बळ्ळी चे दत्तावधूत महाराज किंवा दत्ताण्णा यांचा मी धाकटा भाऊ ! महाराजांनी असे म्हटल्याबरोबर माझ्या डोक्यात प्रकाश पडला ! खरंच की ! हे महाराज थेट दत्ताण्णां सारखे दिसत होते ! हे महाराष्ट्रातील आणि कर्नाटकातील एक प्रसिद्ध संत आहेत . यांनी प्रति गोंदवले उभे केले आहे . गोंदवलेकर महाराजांचे अधिष्ठान ठेवून महाराजांनी अध्यात्माचा प्रचार उत्तर कर्नाटक आणि दक्षिण महाराष्ट्रात चालवला आहे . यांचा मोठा शिष्यवर्ग आहे .

परमपूज्य दत्ताण्णा यांच्या विविध भावमुद्रा
यांनाच दत्तावधूत गुरुजी असे देखील म्हणतात .
पूज्य दत्ताण्णा यांचा तरुणपणीचा फोटो . विठ्ठलदास महाराज असेच दिसतात !
विठ्ठलदास महाराजांचे दर्शन घेताना भक्त .
आश्रमातील दत्ताचे स्थान .
जंभेश्वर मंदिराचे प्रवेशद्वार .
टेंबे स्वामींच्या वास्तव्याने पुनीत झालेली ही जागा आहे . त्यामुळे त्यांच्या वापरातल्या काही वस्तू इथे आहेत .
आश्रमामध्ये लावलेल्या विविध संतांच्या तसबीरी . यातील बरेचसे संत आपल्याला माहिती असतील !
परमपूज्य ब्रह्मचारी बुवा
जंभेश्वर मठाचे महंत आणि मागे डोंगराच्या वर दिसतो तो जम्भेश्वर आश्रम .
ब्रह्मचारी आश्रम इथे असणारे महंत म्हणजे या दत्ताण्णांचे धाकटे भाऊ विठ्ठलदास महाराज होते . महाराज मला म्हणाले तुम्ही अगदी योग्य वेळ आलात ! आता पंधरा दिवस मी रामेश्वर आणि दक्षिण भारताचे यात्रेवर निघालो आहे . तुम्ही इथे निवांत रहा आणि आश्रम सांभाळा ! आता आली का पंचाईत ! माझी परिक्रमा आधीच काटेकोरपणे चालली होती . थोडेसे मागे पुढे झाले तर मला चातुर्मास लागणार होता . मग परिक्रमात थांबवावी लागली असती . मी नम्रपणे महाराजांना माझी अडचण सांगितली आणि पुढे जाण्याची अनुज्ञा मागितली . महाराज म्हणाले किमान आजचा दिवस तरी रहा ! त्यांच्या आज्ञेला मान देऊन आश्रमामध्ये थांबलो . इथे माझ्यासारखीच छाटी घातलेले अजून एक सद्गृहस्थ दिसले म्हणून मी त्यांच्याशी बोलायला गेलो . हे गोडबोले नावाचे एक परिक्रमा करून आलेले साधक होते . मूळचे नागपूरचे असलेले गोडबोले पत्रकार होते . इथे राहून ते हनुमान चालीसेचे पाठ करत होते . रोज १२१ वेळा हनुमान चालीसा म्हणायचे .
जो शतबार पाठ कर कोई । छूट ही बंदी महा सुख होई । याची प्रचिती घेण्यासाठी हा उपक्रम सुरू असावा ! या आश्रमातील सर्व उपासना रामदासी पद्धतीने होत होती . कारण हा मठच मुळी गोंदवलेकर महाराज परंपरेतला होता . आणि गोंदवलेकर महाराज रामदासी होते . ते आपली स्वाक्षरी देखील ब्रह्मचैतन्य बुवा रामदासी कशी करायचे . सायंकाळी रामदासी पद्धतीची उपासना तिथे सर्वांसोबत मी केली . मला उपासना पाठ आहे हे पाहून सर्वांना आश्चर्य वाटले. रात्री मस्तपैकी शिरापुरीचे भोजन घेतले . इथे रात्री झोपण्यासाठी काही मंडळी आली . महाराज माझ्याशी बोलत होते . आश्रमातील कोणालातरी त्यांनी फोटो काढायला सांगितला . इतक्यात एक वयोवृद्ध मनुष्य तिथे येऊन महाराजांच्या पाया पडू लागला . त्याची पाया पडण्याची पद्धत फारच वेगळी आणि लाचारीची होते असे मला वाटले . म्हणून मी त्या माणसाला धरून उठवू लागलो . महाराज मला म्हणाले त्याला तिथेच राहू दे .त्याची कथा तुला नंतर सांगतो . फोटो काढले गेले . मी महाराजांना विनंती केली की हे फोटो माझ्या मित्राच्या क्रमांकावर पाठवावेत . त्याप्रमाणे त्यांनी ते पाठवले देखील . परंतु या म्हाताऱ्याची कथा काही कळेना .महाराज सांगू लागले . इथे पूर्वी ब्रह्मचारी महाराज तपस्या करायचे .तेव्हा हाच मनुष्य तरुण होता आणि गावगुंड होता . तो जाता येता महाराजांना छळायचा .महाराजांनी इथून निघून जावे म्हणून प्रयत्न करायचा . गावातील सर्वांनाच त्याचा त्रास होता . घरचे देखील त्याला वैतागले होते . परंतु याच्या अंगातली मस्ती आणि रग इतकी भयंकर होती की कोणी त्याच्या नादाला लागायचं नाही . महाराज मात्र त्याला प्रेमाने बोलावून घ्यायचे आणि सांगायचे की असे वागू नकोस . तो हे सर्व ऐकून देखील अजूनच अधिक त्रास महाराजांना द्यायचा . सर्व लोक महाराजांना विचारायचे की तुम्ही याला सहन का करता ? ते म्हणायचे शेवटी त्याला इकडेच यायचे आहे ! आणि तसेच झाले ! कालांतराने हा मनुष्य म्हातारा झाला आणि अंगातील बळ कमी झाले .त्याबरोबर घरातल्या लोकांनी याला सांभाळण्यास नकार दिला . गावातील लोकांनी देखील नकार दिला . अखेरीस महाराजांनी सांगितले की तू झोपायला आणि जेवायला आमच्या आश्रमात येऊ शकतोस . त्यामुळे दिवसभर हा मनुष्य घाटावरती भिक्षा मागतो आणि रात्री झोपायला इकडे येतो . आता अंगातील सर्व बळ निघून गेल्यावर तो शरण आलेला आहे . त्याला अशी भीती वाटते की आपल्याला मठातून हाकलून लावतील . म्हणून तो पुन्हा पुन्हा असे माझे पाय धरतो . त्याने केलेल्या कर्मांची फळे तो भोगतो आहे . म्हणून मी तुला म्हणालो की त्याला जे काय करायचे ते करू दे . विनाकारण दयाभाव दाखवू नकोस ! ही कथा त्या माणसाची म्हणून मी ऐकली . परंतु मला त्याच्या जागी मीच दिसू लागलो ! तरुणपणी मस्ती केली नाही असा मनुष्य सापडणे दुर्मिळ ! प्रत्येकाला असे वाटते की आपण आयुष्यभर तरुण राहणार आहोत ! परंतु म्हातारपणी अशी काही अवस्था होते की विचारू नका ! आणि मग सगळे जग अशा लोकांना खायला उठते . खूप नकारात्मकता आयुष्यामध्ये व्यापून जाते . आपल्या आजूबाजूला आपण असे अनेक लोक बघतो . आयुष्यभर ज्यांच्यासाठी सर्व काही कमावले ते शेवटच्या क्षणी पाठ फिरवतात . अशावेळी करायचे काय असा प्रश्न उभा राहतो . तो प्रश्न तरुणपणीच सोडवून टाकावा या मताचा मी आहे . नर्मदा मातेने मला या मनुष्याचे रूपाने जणू काही सावध केले की तरुणपणी मस्ती करू नकोस . म्हातारपण कठीण होईल ! मध्यंतरी मी पुन्हा एकदा नेमावरला गेलो होतो तेव्हा हे आजोबा मला पुन्हा एकदा भेटले ! त्यांचा इरसाल चेहरा आणि डोळ्यातले चमक नजरेत भरणारी आहे . तरुण पणी हा मनुष्य कसा असेल याची कल्पना आपण सहज करू शकतो !

हेच आहेत परमपूज्य विठ्ठलदास महाराज . त्यांच्या डाव्या हाताला नागपूरचे परिक्रमावासी श्रीकांत गोडबोले आहेत . हे प पू श्री नाना महाराज तराणेकर इंदोर यांच्या परंपरेत अनुगृहीत आहेत . यांनी तीन वर्ष तीन महिने तेरा दिवसांची विधिवत परिक्रमा केलेली आहे . उजवीकडे प्रस्तुत लेखक आणि महाराजांच्या चरणावर पडलेला तो मनुष्य आहे !याही अवस्थेमध्ये त्याच्या डोळ्यातील चमक गेलेली नाही !कुठल्याही क्षणी एखादे कांड करण्यास तो सिद्ध आहे असे वाटते !
श्रीकांत जी गोडबोले नागपूर यांचा परिक्रमेदरम्यान चा हा फोटो आहे . परिक्रमा माणसाला किती अमुलाग्र बदलून टाकते याचे हे उत्कृष्ट उदाहरण आहे !
विठ्ठलदास महाराजांच्या मागे डोक्यापाशी जो दाढीवाल्या बुवांचा फोटो आहे तेच ब्रह्मचारी बुवा . यांनीच या माणसाची भविष्यवाणी वर्तवली होती . या आश्रमाचे आज दिसणारे वैभव यांनीच उभे केले आहे .विठ्ठलदास महाराज देखील या वैभवामध्ये भर घालत आहेत आणि आश्रम खूप चांगल्या पद्धतीने चालवला जात आहे . स्वाभाविकच मराठी माणसांचा इथे जास्त राबता असतो . इथे आश्रमा पर्यंत येण्यासाठी गावातून एक कठीण रस्ता आहे . मोठी गाडी कशीबशी आश्रमा पर्यंत पोहोचते .
विठ्ठलदास महाराजांच्या मागे जी खोली दिसते आहे तिथे आम्ही उपासना केली आणि रात्री शेजारती देखील म्हटली .
हे सर्व फोटो वेगळेवेगळे आहेत म्हणून इकडे टाकून ठेवत आहे इतकेच .
परिक्रमेच्या शेवटच्या टप्प्यात प्रस्तुत लेखकाचे वजन किती कमी झाले होते हे तुम्हाला या चित्रात लगेच लक्षात येईल .
महाराज अत्यंत साधे निगर्वी निस्पृह आणि ज्ञानी आहेत . त्यांना मराठी कानडी हिंदी अशा सर्व भाषा उत्तम येतात . स्वतः गाडी देखील चालवतात . महाराजांच्या अज्ञानुसार तिथे पंधरा दिवस राहायला मिळाले असते तर फार बरे झाले असते परंतु आतून आज्ञा नव्हती त्यामुळे पुढे जाण्याचा निर्णय घेतला . त्या एकाच वास्तव्यामध्ये महाराजांचे वागणे बोलणे पाहून मला त्यांचा स्वभाव आवडला .
त्या रात्री महाराजांनी मस्तपैकी शिरापुरीचा बेत केला ! रात्री त्याच म्हाताऱ्या बरोबर सभागृहामध्ये झोपलो .इथून नर्मदा मातेचे खूप सुंदर दर्शन व्हायचे . मागच्या बाजूला असलेले अन्नपूर्णा मंदिर देखील सुंदर आहे . इथून नर्मदा मातेचे भव्य दिव्य पात्र खूप छान दिसते . मी अलीकडेच पुन्हा तिथे गेलो तेव्हा या भागाची काही चित्रे काढली ती आपल्यासाठी जोडत आहे .
सिद्धनाथ किंवा सिद्धेश्वर मंदिराचे प्रस्तुत लेखकाने काढलेले छायाचित्र
हेच ते इरसाल आजोबा ! त्यांच्या डोळ्यांमध्ये अजूनही खट्याळपणा आहे पहा !
आम्ही रात्रभर खूप गप्पा मारल्या होत्या . त्याची आठवण झाल्यावर त्यांनी मला आशीर्वाद दिला !
आश्रमात जाताना स्वागत करणारा गोवंश !
अन्नपूर्णा माता की जय ! तुझ्याशिवाय परिक्रमा अशक्यच !
अन्नपूर्णा मातेच्या मंदिरातून दिसणारी नर्मदा माई .
इथून काठाचा मार्ग किती कठीण आहे ते लक्षात येईल .कठीण आहे परंतु अशक्य नाही .
हे आहे पिंगलेश्वर महादेवाचे प्राचीन मंदिर . मठाच्या पूर्वेच्या बाजूला हे मंदिर आहे .
श्री पिंगलेश्वर महादेव
मंदिराच्या मागे जो सज्जा दिसतो आहे तिथूनच वरील फोटो प्रस्तुत लेखकाने काढला होता .
सकाळी लवकर उठून सर्व आटोपले . नर्मदा मातेमध्येच स्नान करून आलो . संपूर्ण घाट पळत उतरलो आणि पळत चढलो . परिक्रमेमध्ये तुम्हाला एक वेगळी शक्ती नर्मदा माता प्रदान करते असे पुन्हा पुन्हा जाणवते . महाराज निघाले . त्यांना निरोप दिला . रामेश्वरम हे तीर्थक्षेत्र माझे खूप वेळा बघून झाले आहे . हा लेख लिहिताना माझी १९ वेळा रामेश्वर यात्रा झाली आहे. त्यामुळे इथे कुठून आत जायचे , काय काय बघायचे ,कोणाला भेटायचे तसेच रामेश्वरम इथे देखील रामदासी मठ आहे त्याचा पत्ता व माहिती महाराजांना दिली . रामेश्वरम पर्यंत गाडी कुठल्या मार्गे न्यायची तो मार्ग देखील सांगितला . महाराजांना आनंद वाटला . नर्मदे हर करून महाराज निघून गेले . मी देखील झोळी उचलली आणि पुढचा मार्ग धरला . नर्मदा मातेचा किनारा एकदा प्राप्त झाला की अजून काही नको असे वाटते . कारण जे काही मोठे तपस्वी संन्यासी सत्पुरुष हिच्या काठावर तप करतात त्या सर्वांची भेट झाल्याचा आनंद किंवा पुण्य केवळ नर्मदा मातेच्या स्पर्शाने प्राप्त होते . जणू काही नर्मदा मातेचा हा प्रवाह म्हणजे या सर्व साधुसंतांचा जीवन प्रवाह आहे ! ज्याप्रमाणे विजेच्या प्रवाहामुळे विविध प्रकारची उपकरणे चालतात अगदी त्याचप्रमाणे नर्मदा मातेच्या खळखळ वाहणाऱ्या निखळ पाण्याच्या प्रवाहा सोबतच धावणारा , चर्मचक्षूंनी न दिसणारा , जो अविरल ऊर्जेचा अखंड प्रवाह आहे तो सर्व रेवा भक्तांना अखंडित जीवन ऊर्जा देत असतो . ज्ञानाची जागृती करत असतो . अंतर्यामी प्रशांत , उदात्त ,निवांत करत असतो . एकदा मातेचा स्पर्श झाला की अजून कुणाला भेटणे नको असे वाटते . एकदा तिचे दर्शन झाले की अजून कोणी दिसायलाच नको असे होते. एकदा तिच्या काठावर पोहोचलो की अजूनही कुठे जायला नको अशी खात्री पटते . एकदा तिचा मंगल मधुर खळखळाट कानावर पडला अजून काही ऐकायला नको असे होते . तिच्या सानिध्यात येणारा प्रत्येक जण नर्मदामय होऊन जातो . तिच्या विचारांमध्ये वाहून जातो . तिच्या कृपेमध्ये भिजून जातो . तिच्याकडे पाहता पाहता तिचाच होऊन जातो . तिच्यामध्ये विरघळून जातो . मिसळून जातो . नष्ट होतो . संपून जातो . मागे उरत नाही . शिल्लकच रहात नाही . तदाकार होतो . तद्रूप होतो . तन्मय होतो .
देव पहावया गेलो । तेथे देवचि होऊनि ठेलो ॥
राम आणि दास दोघे पहुडले रामी ।
हे ही बोलावया दुजा नुरेच ते धामी ।।
नर्मदे हर ! जय जय रघुवीर समर्थ ! नर्मदे हर !
लेखांक एकशे चोपन्न समाप्त (क्रमशः )
नर्मदे हर 🙏
उत्तर द्याहटवा🙏
उत्तर द्याहटवाह्या आठवड्यात वाचण्याची चंगळ झाली आहे, आनंदाच्या डोही आनंद तरंग!!! धन्यवाद!
उत्तर द्याहटवाखूपच छान . आनंददायक . स्वप्नवत . अप्रतिम . मंगलमय ! नर्मदे हर !!
उत्तर द्याहटवानर्मदे हर🙏🙏🙏🙏🙏🙏
उत्तर द्याहटवाजलबपूर जवळ येत चालले आहे तशी हुरहुर वाटत आहे.
उत्तर द्याहटवा