लेखांक १५३ : बागदी संगमावर भेटलेले महातपस्वी गायत्री उपासक सन्यासी श्री योगेश्वरानंद स्वामी महाराज
नौकांचा पुल ही संकल्पनाच मला फार आवडली ! एकापुढे एक नावा नांगरत नावाडी पुलावरून चालत परत यायचे . त्यामुळे ग्रामस्थांना आणि शेतकऱ्यांना देखील जाणे येणे सोयीचे व्हायचे . अर्थात हे स्थिर जलप्रवाह आहे तिथेच शक्य आहे . आणि इथे तशी स्थिरता होती . दातुनी नदी पार केली मात्र पुन्हा एकदा कठीण किनारा सुरू झाला . म्हणजे इथे जंगल अजिबात नव्हते . परंतु प्रचंड शेती सुरू झाली . मुगाची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी काटेरी कुंपणे आणि मासे पकडण्याच्या जाळ्यांची कुंपणे जागोजागी लावली होती . ती ओलांडून जाताना तारांबळ उडायची . अखेरीस मी अशी काटेरी कुंपणे ओलांडण्याची एक युक्ती शोधून काढली . त्यातील चक्क मुख्य फांदीवर पाय देऊन मी एकाच उडीत पलीकडे जायचो . थोडेफार काटे टोचायचे परंतु त्याकडे दुर्लक्ष करायचे . पायातून रक्त आले तर येऊ द्यायचे . चालता चालता ते वाळून जायचे . एकेक काडी काढून कुंपण वेगळे करण्यापेक्षा हे सोपे होते . कधी कधी तर कुंपण लहान असेल तर धावत येऊन उडी मारून ते पार करायचो . यात धोका एकच असायचा . तो म्हणजे झोळीचा बंद तुटण्याचा . परंतु पर्याय नसेल तर हे देखील करायचो . मध्ये मेलपिपलिया गावात एक छोटासा ओढा लागला . तो कमरे एवढ्या पाण्यातून पार केला . गाळ खूप होता . पुढे शेतातून चालताना एका जमीनदाराची भात शेती लागली . तो नेमका शेतामध्ये काम करत होता . मला काठाने येताना पाहून त्याला आनंद वाटला . त्याने मला जवळच असलेल्या मिर्झापूर गावातील मंदिरामध्ये जाऊन बाल भोग घेण्यास सांगितले .हातावर पाचशे रुपये दक्षिणा टेकवली .ती मी पोटातल्या कप्प्यात ठेवून दिली . त्याने सांगितल्याप्रमाणे शेता शेतातून चालत मंदिर गाठले . अतिशय सुंदर दुमजली नवीन मंदिर बांधलेले होते . इथे वरती एक माताजी बसल्या होत्या . त्या सर्वांना आशीर्वाद देत होत्या . मी देखील त्यांना नमस्कार केला . आणि त्यांच्या चरणाशी बसलो . शक्यतो तरुण साध्वी कमी असतात . परंतु ज्या असतात त्या खूप तेजस्वी आणि कर्मठ असतात . या साध्वींनी माझी सर्व चौकशी केली . मी देखील त्यांना कसा आलो वगैरे सर्व सांगितले .खाली एक सेवादार आहेत ते तुला बाल भोग देतील असे त्यांनी मला सांगितले .
या नकाशा चित्रामध्ये आपल्याला मी पार केलेला ओढा इमली घाट आणि नर्मदा मंदिर दिसते आहे .या भागातील नर्मदा मातेचा किनारा खूपच सुंदर आहे
उत्तम दर्जाचे दुमजली मंदिर बांधण्यात आलेले आहे .खाली परिक्रमावासी उतरतात .
माताजींनी सांगितले त्याप्रमाणे मी खाली आलो . इथे लाडवी या गावातील भिलट बाबा मंदिरातील साधू सेवेसाठी म्हणून राहिला होता . लाडवी म्हणजे परशुरामाने परशु धुतला ती जागा . तिथे असलेले अग्निहोत्राचे केंद्र आणि तत्कालेश्वर महादेव आपण पाहिले होते पहा ! मी लाडवी ला जाऊन आलो आहे हे कळल्यावर त्याला खूप आनंद वाटला . त्याने मोठ्या प्रेमाने चहा आणि बालभोग दिला . रहा म्हणून आग्रह सुरू झाला होता परंतु पुढे जायची इच्छा व्यक्त केल्यावर त्याने अनुमती दिली . खरे म्हणजे इथे भोजन प्रसादी घेऊन पुढे जाणे शक्य होते . परंतु पायांना परिक्रमेमध्ये अशी काही गती प्राप्त होते की शांत बसल्यावर पाय दुखू लागतात आणि चालायला लागले की बरे वाटते . याचे महत्त्वाचे कारण रक्तदाब आहे . आपण गतीने चालत असतो तेव्हा पायाच्या स्नायूंची गरज पुरवण्यासाठी रक्तपुरवठा वाढलेला असतो . आपण अचानक एका जागी बसलो की हा वाढलेला रक्तपुरवठा पायातील स्नायूंना पुरेसा रक्तपुरवठा करून देखील शिल्लक राहतो . त्यामुळे पाय दुखतात . त्यामुळे चालत राहणे कधीही चांगले . हळूहळू थांबावे . अचानक थांबू नये . चहा पिऊन मी पुढे निघालो आणि मिर्झापुरच्या इमली घाटावर आलो .इथून पुन्हा किनारा पकडला . आता मात्र उन्हाचा वाढलेला तडाखा जाणवू लागला . सर्वत्र काटे कुटे पसरलेले आणि त्यात भर म्हणून गोखरू आणि बोरीचे काटे या सर्वांनी सर्वांग ओरबाडून टाकले . देहे दुःख ते । सुख मानीत जावे । विवेके सदा । सस्वरूपी भरावे ॥ याप्रमाणे सर्व चालू होते . मेलपिपल्या , रवलास , मिर्जापुर , तमखन , सिरालिया रेवातीर , भांजाखेडी , राजोरे अशी गावी आज मला पार करायची होती . तमखन पाशी पुन्हा एकदा एक मोठा ओढा आडवा आला . यामध्ये प्रचंड चिखल होता . गुडघाभर चिखलातून कसा बसा ओढा पार केला . ऊन वाढत चालले होते . माध्यान्ह टळून गेली होती . पोटात आगीचा डोंब उसळला होता . परंतु कुठेही मंदिर आश्रम काही दिसत नव्हते . फक्त शेती आणि रेती . दोन्हीच्या मधून कसा बसा चालत होतो . तापलेल्या जमिनीतून येणाऱ्या वाफा शरीराला भाजून काढत होत्या . नर्मदा मंदिरामध्ये थांबलो असतो तर बरे झाले असते असे वाटू लागले . परंतु नर्मदा मातेवर विश्वास ठेवण्याची हीच तर वेळ असते ! अखेरीस एक मोठे झाड दिसले . त्याच्याखाली खूप सुंदर सावली होती . आता इथे बसावे असा विचार करून मी पाठ टेकली . समोर काही नावा वाळू उपसत होत्या . पाचच मिनिटात तिथे एक तरुण आला . तो कुठून तरी माझ्यासाठी खाट घेऊन आला . आणि त्याने आग्रह केला की मी खाटेवर पडावे . मी त्याला सांगितले की मी परिक्रमे मध्ये आहे . परंतु तो काही ऐकेना . शेवटी मी त्या काठावर पाठ टेकली . क्षणात माझा डोळा लागला . थोड्यावेळाने मला कोणीतरी उठवत आहे असा भास झाला म्हणून पाहिले तर हा तरुण मला उठवत होता ! बाबाजी ! बाबाजी ? भोजन पा लिजिए । भोजन हा शब्द ऐकल्याबरोबर मला जाग आली ! भोजन ? इथे एवढ्या आडरानात ? जी बाबाजी ! मी घरी जाऊन खास तुमच्यासाठी जेवण बनवून आणले ! त्याचे हे उत्तर ऐकून मी अवाक झालो !बर जेवण म्हणजे काय ? अक्षरशः साजूक तुपामध्ये बुडवून काढलेल्या गरम गरम पोळ्या ! गीर गाईचे ताजे ताजे दूध , गीर गायीचेच वाटीभर तूप ! आंब्याची भाजी आणि सुंदर खुसखुशीत शेव ! होय चक्क आंब्याची भाजी ! त्या जेवणाची मजा केवळ अवर्णनीय ! पोटामध्ये खड्डा पडलेला असताना दगड देखील रुचकर लागतो ! आणि इथे तर इतके सारे पदार्थ या महामानवाने आणले ! याचे नाव होते लक्ष्मीनारायण अथवा लच्छू भैया !
याच झाडाखाली लच्छूभैय्याने मला जेवण आणून दिले . हे तमखान गाव होते . गावात यावनी घरे होती . समोर चिराखान गाव होते .या भागामध्ये वाळू उपसणाऱ्या अशा अनेक नावा दिसतात .
लच्छू भैय्या (नाव बदलले आहे ) हा या भागातील वाळू उपसणाऱ्या लोकांचा ठेकेदार होता .अर्थात हा सर्व अवैध वाळू उपसा सुरू होता . याचे शेत असल्यामुळे वाळू उपसणारे लोक याला पैसे द्यायचे आणि याच्या शेतातून गाडी घेऊन जायचे . याला बसल्या जागेवर कमाईचे हे साधन होते . बसल्या बसल्या त्याच्याकडून मी हा संपूर्ण व्यवसाय समजून घेतला . खरे म्हणजे याला अवैध म्हणायचे एकमेव कारण असे की सरकारने नेमून दिलेला ठेकेदार हा नाही . पूर्वी प्रत्येक जण आपापल्या भागातून वाळू उपसायचा . परंतु आता सरकारने ठेकेदार नेमले आहेत . ते सरकारला पैसे देतात म्हणजे तसे त्यांनी देणे अपेक्षित आहे . परंतु उपसलेली वाळू आणि भरलेला कर याच्यात काही ताळमेळ नसतो . त्यामुळे असे अवैध वाळू उपसे सुरू होतात . वाळू उपसण्यासाठी छोट्या मोठ्या नावा होत्या . छोट्या नावेला डोंगा म्हणतात हे आता आपण जाणतोच . असे सहा डोंगे भरले की एक ट्रॉली वाळू होते . एक ट्रॉली वाळू पंधराशे रुपयाला विकली जाते . अधिक तीनशे रुपये जमीन मालक शेतकऱ्याला द्यावे लागतात . आणि हा सर्व व्यवहार रोख असतो . ज्याला वाळू हवी आहे त्याच्या मालकीचा किंवा त्याने भाड्याने आणलेला ट्रॅक्टर असतो . इथे किती वाळूचा उपसा होतो याचे गणित दिवसाच्या अखेरीस शेतकऱ्यांनी किती रुपये कमावले यावरून काढता येते . कधीकधी शेतकऱ्याला दिवसाला ८० हजार ते दीड लाख रुपये रोजचे मिळतात ! यावरून आपण किती वाळू उपसली जाते याचा अंदाज लावू शकतो ! वाळू उपसणारे जे कामगार आहेत त्यांना मात्र दिवसभर वाळू उपसल्यावर शंभर ते दीडशे रुपये मिळतात . ते अखंड १० - १२ ते १५ फूट खाली पाण्यामध्ये डुबकी मारून प्रचंड वजनाचे वाळूच घमेले घेऊन वर येत असतात . उन्हाळा जवळ येईल तशी पाण्याची पातळी कमी होत जाते . त्यामुळे डुबकी कमी मारावी लागते त्यामुळे या काळात वाळू उपसणाऱ्या लोकांची लगबग असते . या वाळू उपसणाऱ्या लोकांच्या तब्येती पाहिल्या तर लाखो रुपयांचे प्रोटीन शेक खाऊन , डोपिंग करून जिम करणाऱ्या माझ्या मित्रांची बोटे तोंडात जातील ! विशेष म्हणजे या कामांमध्ये महिला देखील मागे नसतात . आपल्या लहान बाळांना वाळूमध्ये खेळायला सोडून यादेखील कंबर कसून पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात . उपस्थिती वाळू नावे मध्ये भरणे , प्रसंगी नाव चालवणे अशी कामे देखील महिला करतात . नर्मदा खंडातील महिला किती कष्ट करतात याचा एक अभ्यास दौरा खरोखरीच शहरातील महिलांसाठी काढावा असे फार वाटते . अर्थात आपल्या इथे देखील दोन-तीन पिढ्यांपूर्वी असेच चित्र होते . आपली आजी किंवा पणजी अगदी याच पद्धतीने कष्ट करताना आपण पाहिले असतील . परंतु अलीकडच्या काळात जाहिरातबाजीच्या मदतीने भांडवलदारांनी असे काही वातावरण उभे केले त्याला आपला उभा देश बळी पडला . त्यामुळे आज शहरातील स्त्रिया व पुरुष कष्टाच्या कामाला हातच लावत नाहीत . धुणे धुण्यापासून ते भांडी घासण्यापर्यंत आणि स्वयंपाक करण्यापासून ते झाडू मारण्यापर्यंत प्रत्येक कामासाठी माणसे तरी लावली जातात किंवा यंत्रे तरी वापरली जातात . या यंत्रांच्या आहारी गेलेल्या जीवनशैलीला मग काही काळाने बंद पडलेली शारीरिक यंत्रणा सांभाळावी लागते ! किमान जिने चढणे उतरणे ,जवळच्या ठिकाणी चालत किंवा धावत जाणे , खाली वाकून करायची कामे करणे , उठ बस करणे ,जमिनीवर मांडी घालून बसून जेवणे इत्यादी गोष्टी तरी आपण सहज करू शकतो . त्यासाठी कुठल्या जिम ट्रेनर ची गरज नाही ! अर्थात मी हे सर्व बोलतो आहे त्याला सन्माननीय अपवाद आहेतच . त्यांच्यासाठी हे नक्कीच नाही . किंबहुना हे मी माझे मलाच सांगतो आहे असे समजावे ! त्या खाटेवर पडल्या पडल्या मी वाळू उपसणाऱ्या लोकांचा खूप अभ्यास केला . ज्याचे शिक्षण नाही अशा अशिक्षित माणसाला दिवसभर वाळू उपसून मिळालेले शंभर रुपये भरपूर होते . हातामध्ये नगद १०० रुपये पडणे हाच त्याचा आनंदाचा परमोच्च क्षण होता . त्या नोटेमध्ये मिळणारा आनंद हा दिवस संपताना पैशाच्या पिशव्या घरी भरून नेणाऱ्या शेतकऱ्याला मिळत नव्हता !कारण तो तुलनेने काहीच कष्टच करत नव्हता ! फक्त एका झाडाखाली बसून पैसे गोळा करत होता ! त्याला मिळालेली जमीन ही त्याच्या पूर्वजांवर नर्मदा मातेने केलेल्या कृपेचा भाग होता हे त्याला मान्य होते . त्यामुळे येता-जाता परिक्रमा वासींची सेवा करावी असे त्याला फार वाटायचे . परंतु दुर्दैवाने तिथून कोणी परिक्रमाची जातच नसत . त्यात मी गेल्यामुळे त्याला खूप आनंद झाला ! आणि माझ्यासाठी काय करू आणि काय नको असेल त्याला झाले ! नर्मदा मातेच्या काठावरील बहुतांश शेतकऱ्यांची अवस्था अशी आहे . ज्यांच्या ज्यांच्या शेतापुढे दैवयोगाने नर्मदा माता वाळू साठवते त्यांनी शेती बंद केली आहे . आणि हाच व्यवसाय चालवला आहे . नर्मदा माता वाळू साठवते आहे हीच त्यांच्यावर तिची कृपा आहे असा त्यांचा दृढ विश्वास आहे . आणि मी हे पाहतच होतो . लच्छु भैय्याच्या पुढच्या शेतामध्ये वाळूच्या ऐवजी मोठे मोठे खडक होते . त्यामुळे तिथे कोणी वाळू गोळा करायला येत नव्हते . असो . इथे संध्याकाळच्या वेळी जोरात वारे सुटायला सुरुवात झाली होती . कारण मान्सून जवळ येत असल्याची ती लक्षणे होती . त्याप्रमाणे इथे देखील जोराचा वारा सुटला . मी झोपल्यामुळे मला मिळालेले पाचशे रुपये पोटातल्या कप्प्यातून खाली पडले होते . ते जोराच्या वाऱ्याने माझ्यासमोर उडून झाडीत जंगलात गेले ! मला खात्री पटली की पुढे कोणालातरी पाचशे रुपयांची गरज असणार आहे म्हणून नर्मदा मातेने त्या शेतकऱ्याला मला पाचशे रुपये द्यायची बुद्धी दिली होती ! तो वारा ती रक्कम योग्य त्या व्यक्तीकडे किंवा केवटाकडे पोहोचवणार याची मला खात्री होती ! वारे सुटले आहे त्याच्या मदतीने चालावे असा विचार करून मी उठलो . लच्छू भैया आणि त्याच्या मित्रांची रजा घेतली आणि पुढे निघालो . इतका पैसा हातात येऊन देखील हा मनुष्य अजिबात व्यसनाधीन झालेला नव्हता किंवा अन्य कुठले नाद त्याला नव्हते हे पाहून खूप बरे वाटले . असेच राहा असे सांगून पुढे निघालो . काठाकाठाने चालत मी राजोरे नावाच्या गावात आलो . इथे समोर नर्मदा मातेमध्ये एक अति भव्य वड होता ! इतका मोठा वड पाहिला नव्हता . तत्पूर्वी काही किलोमीटर मागे नर्मदा मातेच्या पात्रामध्येच एकुलते एक "कौ " चे झाड होते ! पात्राच्या मधोमध अशी झाडे क्वचित पाहायला मिळतात ! अति पाण्यामुळे मुळे कुजून अशी झाडे मरतात . ही झाडे इथे जिवंत होती याचा अर्थ खाली खडक असणार होता .
राजोरे गावाच्या अलीकडे भांजा खेडी गावांमध्ये महादेवाचे हे एक स्थान होते .एका पिंपळाच्या झाडाखाली अनेक नर्मदेश्वर पुजले होते .
राजोरे गावातील नर्मदामाई अशी होती
गावकऱ्यांनी सुंदर आणि मोठा असा घाट बांधलेला आहे
घाट खूप मोठा आणि अप्रतिम आहे !
इथे एक अनुभव आला . सर्व ग्रामस्थ एक मुखाने मला सांगत होते की इथून पुढे बागदी नावाची नदी आडवी आलेली आहे .त्यामुळे पुढे जाऊ नका .तिथे रस्ता नाही .परंतु मला मात्र किनारा सोडायचा नव्हता . त्यामुळे पुढे रस्ता नाहीच हे दिसत असून देखील मी चालत राहिलो .माझी मनोदेवता मला सांगत होती की जा पुढे रस्ता आहे .आणि तसेच झाले ! एक मोठे वडाचे झाड दिसू लागले . तिथे बसलेल्या आदिवासीने मला थंडगार पाणी पाजले ! नर्मदा मातेच्या पाण्याची चवच न्यारी ! तो म्हणाला तुम्ही अगदी योग्य वेळेला आलेले आहात .दिवसभर मासे धरून घरी परत येणारा एक केवट आणि त्याची पत्नी नावेतून नुकतेच काठाला लागत होते . मला बघताक्षणी दोघांच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागला ! बाबाजी नैया मे बैठो ! हम आपको बागदी मैया पार कराएंगे ! त्याचे हे शब्द ऐकले आणि डोळ्यात पाणी आले . पायातील पादत्राणे काढून नावेत बसलो . होय . नाव ही केवट लोकांची लक्ष्मी आहे . तिला आपली पादत्राणे लावू नयेत . म्हणजे तसे तुम्हाला कोणी सांगणार नाही . परंतु आपणच काळजी घ्यायला काय हरकत आहे ! दोघांनीही मला नमस्कार केला आणि नाव पाण्यात घातली . मला वाटले त्यापेक्षाही नदी फार खोल निघाली . पाणीदेखील भरपूर होते . नर्मदा मातेचे विस्तीर्ण पात्र समोर आहे . त्याचे पाणी नदीमध्ये उलटे शिरले आहे . यह भैरवटेकडी हे महाराज । केवट सांगू लागला . कालभैरव महाराज ने यहा ब्रह्म हत्या के पातक से मुक्ती पाने के लिए तप किया है । उसके बाद शिवजी उन्हे प्रसन्न हो गये । यहा सेवे काशी गये ।वहा उनके हाथ को चिपकी हुई ब्रह्मदेव की खोपडी निकल गई ।तबसे उन्हे काशी के कोतवाल का नाम पडा ।अब काशी विश्वेश्वर के दर्शन करने से पहिले कालभैरवनाथ का दर्शन करना पडता है । बडा अद्भुत स्थान है । केवट सांगत राहिला . केवटाने सांगितले की या मार्गाने एकही परिक्रमा वासी जात नाही . अर्थात याला कारण ग्रामस्थ आहेत . ते इथून कोणाला जाऊ देत नाहीत . परंतु साधु मात्र याच मार्गे जातात हे देखील त्याने सांगितले . संसारी माणसाला मरणाची गडबड असते . एखाद्या संगमवरती निवांत तीन-चार तास बसावे हे संसारी माणसाच्या गणितात बसतच नाही ! साधूसाठी ती सहजवृत्ती आहे . त्यामुळे खरे साधू किनारा सोडत नाहीत . किमान परिक्रमेला आल्यावर आपल्या आयुष्यातली गडबड त्यागावी हे प्रत्येकाने पक्के लक्षात ठेवावे . आपण परिक्रमेला आलो आहोत म्हणजे सेवा देणाऱ्या लोकांवर सेवा करण्याची संधी उपलब्ध करून उपकार करतो आहोत असा भाव ठेवू नये ! सेवादारांना तुम्ही या अथवा नका येऊ काही फरक पडत नाही ! आयुष्यामध्ये आपण जे काही करत असतो किंवा करू शकतो ते नर्मदे काठी करू नये . इथे विद्यार्थी म्हणून यावे आणि रोज दप्तरामध्ये नवे नवे ज्ञान भरत रहावे ! आता देखील केवटाने मला भैरव टेकडीचा सगळा इतिहास सांगितला . माझ्या ज्ञानात भर पडली . प्रत्येक गावामध्ये भैरवाची मंदिरे असतात . विशेषतः पुणे परिसरामध्ये प्रत्येक गावामध्ये भैरवनाथाचे मंदिर आहेच ! ते दैवत इथे येऊन तपाचरण करीत होते ही किती मोठी गोष्ट आहे ! ती जागा किती पवित्र असेल ! त्या जागेतील स्पंदने काय असतील ! आणि अशी जागा आपण केवळ जाण्यास वेळ लागतो म्हणून टाळत असू तर फार चुकीचे आहे असे मला वाटते . हे मंडलेश्वर नावाचे गाव होते . आपण मागे पाहिले ते मंडलेश्वर वेगळे . नर्मदा मातेच्या काठावर एका नावाची अनेक गावे आहेत हे आपण पाहिलेच ! त्यातलेच हे एक ! इथे बागेश्वरी नावाच्या देवीचे प्रचंड असे मंदिर होते . आता ते मंदिर गाडले जाऊन त्याच्यावरती भैरव टेकडी तयार झालेली आहे . उत्खननामध्ये इथे मंदिराचे अवशेष अजूनही सापडतात . बागेश्वरी देवी वरून या नदीला बागदी नाव पडले आहे . बागदी नदीचे दोन्ही किनारे अस्पर्शीत होते . त्यामुळे इथे पायवाट वगैरे काही नव्हती . घाट तर मुळीच नव्हता . प्रचंड झाडी उगवलेल्या एका मातीच्या डोंगर उतारावर त्याने मला उतरवले . पैसे देऊ लागलो परंतु त्यांना घेतले नाहीत . आपसे पैसे नही देंगे महाराज । पाप लगेगा । दोघांनाही मनापासून धन्यवाद देऊन आणि मुलाबाळांना आशीर्वाद देऊन पुढे निघालो . मुला बाळांना आशीर्वाद या जोडप्याने मागून घेतला बर का ! असे लोक करतात . ते परिक्रमावासीला म्हणतात की आमच्या मुलांना आशीर्वाद द्या ! मग आपले काय जाते !नमस्कार फुकाचा आशीर्वाद लाखाचा ! विषय निघाला आहे म्हणून सांगतो . बरेच लोक असे तुम्हाला सांगताना भेटतील की कोणाला आशीर्वाद देऊ नका किंवा कोणाच्या पाया पडू नका तुमचे पुण्य कमी होते वगैरे . परंतु नर्मदा माता पुण्याने इतकी ओतप्रोत भरलेली आहे की जोपर्यंत नियमाने परिक्रमे मध्ये आहात तोपर्यंत तुमचे एक थेंब सुद्धा पुण्य कमी होणार नाही याची लेखी खात्री मी तुम्हाला देतो ! एखाद्याने आपल्याला मदत केली तर त्याचे आभार व्यक्त करणे ही सहज प्रवृत्ती आहे . इथे कुठल्याही प्रकारची कार्मिक देवाण-घेवाण होत नाही . केवळ प्रेम आदर सद्भावना दिली घेतली जाते . त्यामुळे असल्या सूक्ष्म गोष्टींमध्ये फार डोक्याचा आटापिटा करू नये . म्हणजे तसे होत नाही असे मला म्हणायचे नाही . परंतु जे काही होते आहे किंवा होत नाही त्याचा विचार करून आपण त्याची तीव्रता कैक पटीने वाढवतो . तसे करू नये . जे काही होते आहे ती भगवंताची इच्छा असा भाव ठेवला की सर्व सुरळीत होते . दृष्ट काढणाऱ्या बायकांचा मला लहानपणापासून याच कारणासाठी राग यायचा . त्यांच्या सतत दृष्ट काढण्यामुळेच दृष्ट होते आहे की काय असे मला वाटायचे ! मला कोणाचीही दृष्ट होत नाही . कोणाची नजर लागत नाही . असे सतत मनात ठेवले की काही दृष्ट वगैरे लागत नाही .अगदी त्याचप्रमाणे माझे अमुक पुण्य कमी झाले वगैरे डोक्यात ठेवूच नये .जे झाले ते नर्मदा मातेच्या इच्छेने झाले असा भाव बाळगावा म्हणजे काहीही कमी जास्ती होत नाही. सूक्ष्माच्या जगामध्ये जास्त खोल डुबक्या मारू नयेत . सूक्ष्माचे डाचणारे विचार स्थूलातील शक्तिशाली विचारांनी दाबून टाकावेत ! अन्यथपा पाय गाळात फसण्याची शक्यता असते . असो .
मी त्या झाडीतून वर चढू लागलो तसतशी त्या आश्रमाची स्पंदने मला जाणवू लागली .ती इतकी तीव्र होती की इथे थांबावेच लागणार हे मला लगेचच जाणवले ! अजून आश्रम दिसायला सुरुवात देखील झाली नव्हती तोपर्यंतच त्या भागाचे महात्म्य लक्षात येऊ लागले ! थोडे पुढे आल्यावर सिमेंटने बांधलेला एक पक्का घाट लागला . वरती प्रचंड झाडी होती . आणि एक अतिशय सुंदर आश्रम तिथे होता !जुन्या काळामध्ये ऋषीमुनींचे आश्रम कसे असावेत तसा तो आश्रम आजही होता ! या आश्रमाचे नाव होते श्री सद्गुरू सच्चिदानंद अन्नक्षेत्र बागदी संगम . भैरव टेकडी . इथे प्रकाशानंद महाराज नावाचे साधू राहत असत . साधु महाराज समोरच खुर्ची मध्ये बसले होते . मी खालून वर आलेला पाहून ते आश्चर्यचकित झाले . कारण इथे परिक्रमावासी आले तर रस्त्याकडून येतात .आप नीचे कब गये ? असे महाराजांनी विचारल्यावर मी त्यांना कसे आलो ते सांगितले . मी काठाने आलो आहे कळल्यावर त्यांना आनंद वाटला . आज यहा विश्राम करना । स्वामीजींनी मला सांगितले . एका मोठ्या पिंपळाच्या झाडाखाली मी आसन लावले . नर्मदा परिक्रमे मध्ये तुम्हाला तुम्ही आसन कुठे लावायचे याचे संपूर्ण स्वातंत्र्य असते . गर्दीमध्ये परिक्रमा करत असताना थोडासा विवेक बाळगावा इतकेच . परंतु एकटा परिक्रमावासी मात्र कुठेही आसन लावू शकतो त्याला कोणीही काहीही म्हणत नाही . मी मारुतीच्या पारावर आसन लावले आणि सर्व मंदिरांची दर्शने घेतली .काळभैरव , गणपती , मारुती , दत्त , नर्मदेश्वर , नर्मदा मैया , राधाकृष्ण अशी सर्वांची मंदिरे होती . परंतु इतकी सरी दर्शनी घेतल्यानंतर सुद्धा काहीतरी शिल्लक राहते आहे असे मला वाटत होते . मी प्रकाशानंद महाराजांच्या पायाशी जाऊन बसलो आणि सत्संग सुरू झाला . ज्याप्रमाणे आंबे खरेदी करायला गेल्यावर आपण सर्वप्रथम आंबा कुठल्या जातीचा आहे ते विचारतो , हापूस आहे पायरी आहे का केशर आहे अगदी त्याचप्रमाणे साधूला जात तर विचारत नाहीत . जाती न पूछो साधु की । पूछ लीजीए ज्ञान । मोल करो तलवार का । पडी रहन दो म्यान । या दोह्याप्रमाणे साधूचे ज्ञान अवश्य पदरात पाडून घ्यावे ! आणि साधूची जातच जाणून घ्यायची तर त्याचे गुरु कोण आहेत ते विचारावे ! अगदी हाच प्रश्न मी प्रकाशानंद महाराजांना केला . आपले सद्गुरु कोण आहेत असे विचारल्याबरोबर महाराज गंभीर झाले . आणि सांगू लागले . संपूर्ण नर्मदा खंडामध्ये आताच्या घडीला त्यांच्या इतके तप कोणीच केलेले नसेल . एखाद्या मंत्रामध्ये जितकी अक्षरे असतात तितक्या कोटी वेळा त्याचा जप करणे याला पुर:श्चरण असे म्हणतात . गायत्री मंत्राची अशी चार पुर:श्चरणे माझ्या गुरुदेवांनी नर्मदा खंडामध्ये केलेली आहेत ! हे आयताक्षणी माझ्या डोक्यामध्ये प्रकाश पडला ! भालोद येथे गायत्री मंदिर आहे तिथल्या महाराजांनी देखील ४ गायत्री पुर:श्चरणे केलेली होती . आणि या महामानवाची आयुष्यात कधीतरी नर्मदा मातेने भेट घडवावी अशी तीव्र इच्छा माझ्या मनामध्ये जागृत झालेली होती . मी स्वामींना भालोदची आठवण करून दिली . बरोबर ! तेच माझे गुरु !त्यांचे नाव योगेश्वरानंद आहे . कानांना स्पर्श करत महाराजांनी सांगितले . पत्नीने पतीचे नाव चारचौघात उच्चारू नये . अशी परंपरा आपल्या धर्मात आहे . शुलपाणीच्या आदिवासी स्त्रिया तर आपल्या पती पेक्षा मोठ्या दिरांची नावे देखील तोंडाने घेत नाहीत . गुजराथी मारवाडी व उत्तर प्रदेश मधील लोकांमध्ये देखील ही प्रथा सर्रास आढळते .समोरच्या व्यक्तीला आदराने हाक मारण्यात कसला आलाय कमीपणा ?परंतु अलीकडे महाराष्ट्रातील ही परंपरा मागे पडत चालली आहे असे जाणवते .जसे पत्नीने पतीचे व पतीने पत्नीचे नाव चार चौघांमध्ये एकेरी मध्ये घेऊ नये त्याच पद्धतीने शिष्या ने गुरुंचे नाव उच्चारू नये .आणि काही कारणाने उच्चारावे लागलेच तर कानांना स्पर्श करून प्रायश्चित्त घ्यावे अशी पद्धत आहे . शास्त्रीय संगीतामध्ये गुरूंची चौकशी केल्यावर शिष्य गुरुचे नाव घेताना कानाला हात लावून घेतो हे तुम्ही पाहिले असेल . ही आपली उदात्त परंपरा आहे . सध्या महाराज कुठे असतात ? डोळ्यामध्ये पाणी आणून मी विचारले . कारण या महाराजांबद्दल पुन्हा काहीतरी ऐकायला मिळेल अशी अपेक्षाच नव्हती . महाराज खूप गंभीर झाले . आणि म्हणाले ते कुठे असतात हे कोणालाच माहिती नसते . माझ्या डोळ्यातल्या अश्रूंचा बांध फुटला . आणि मी म्हणालो आयुष्यात अशा महान तपस्वींचे कधीतरी दर्शन व्हावे अशी तीव्र इच्छा अंतर्यामी होती . नर्मदा मैय्या ती कधी पूर्ण करेल काय माहिती ! बहुतेक आपलाच पुण्यसंचय पुरेसा नाही त्यामुळे अशा महापुरुषांचे दर्शन होत नाही . मी असे म्हटल्यावर महाराजांनी मला जवळ बोलावले . आणि सांगितले , मागे काळभैरवाचे मंदिर आहे त्याच्या समोरच्या कुटीमध्ये जा . आणि महाराजांचे दर्शन घे ! मात्र कोणाला सांगू नकोस ! कारण गुरुदेवांचे तिथे गुप्त अनुष्ठान चालू आहे . तिथे कोणाला पाठवू नको अशी त्यांची आज्ञा आहे . जा ! काय ? गुरुदेव इथेच उपस्थित आहेत ? माझ्या आनंदाला पारावर उरला नाही ! किती दिवसांपासून ज्यांच्या दर्शनाची आस मनाला लागली होती ती गुरुमूर्ती इथे सदेह होती ! मी धावतच बागदी संगमाच्या दिशेला गेलो ! तिथे एक छोटीशी कुटी बांधलेली होती . आणि कुटीच्या बाहेर साक्षात गायत्री मातेने दर्शन दिलेली महान विभूती ,महातपस्वी ,तेज:पुंज स्वामी योगेश्वरानंद तपाचरणामध्ये लीन होते ! मी जाऊन त्यांना साष्टांग लोटांगण घातले ! मला पाहता क्षणी महाराजांनी फिरून नमस्कार केला आणि म्हणाले तुमच्या ठायी असलेल्या परमात्मतत्वाला माझा नमस्कार ! माझ्या डोळ्यातून घळा घळा अश्रू धारा सुरू झाल्या . कधी एकदा यांचे दर्शन होते अशी आस माझ्या मनाला खूप दिवसांपासून लागलेली होती . नर्मदा मातेच्या काठावर तुम्ही जी काही इच्छा करता ती नर्मदा मैया पूर्ण करतेच करते ! प्रकाशानंद स्वामींनी जरी गुरुदेवांच्या साधने बद्दल आणि अस्तित्वाबद्दल गुप्तता पाळली होती तरी प्रत्यक्ष गुरुदेवांना त्याचे काहीच पडलेले नव्हते असे मला जाणवले !त्यांना मी आल्यावर आनंदच झाला ! तुला इथे कोणी पाठवले वगैरे त्यांनी काहीही विचारले नाही ! जणु काही त्यांना सगळे माहितीच होते ! खरा साधू कसा ओळखायचा ? तो केवळ ब्रह्मज्ञान बोलतो . आणि महाराजांचे तसेच होते . मी तिथे गेल्यापासून त्यांनी मला एकदाही माझे नाव काय गाव कुठले वगैरे काहीही विचारले नाही . मी कोण आहे माझी पार्श्वभूमी काय याचे त्यांना काहीही पडलेले नव्हते . सुमारे दोन तास सलग महाराज शुद्ध ब्रह्मज्ञान बोलले . नर्मदा मातेच्या काठावर बसून अशा महा तपस्वी माणसाच्या छत्रछायेमध्ये एकट्याने बसून कर्णसम्पुटे तृप्त होईपर्यंत ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी ऐकणे हीच नर्मदा मातेची परिक्रमा करण्याची फलश्रुती ! महाराज आत्मभावामध्ये स्थिर होते ! आपण जी काही महावाक्ये ऐकतो ती ते जगत होते .महाराज मूळ तिरुपतीचे . एका ब्राह्मण कुटुंबात त्यांचा जन्म झाला . घरातील सर्व लोक विद्वान होते . व्युत्पन्न होते .संपन्न होते . परंतु परमेश्वर प्राप्तीची ओढ ज्या जीवाला लागली आहे तो योग्य वेळी बरोबर घरादाराचा त्याग करतो तसेच झाले . घरातून बाहेर पडल्यावर महाराजांनी गिरनार पर्वतावरील १२० वर्षे वय असलेल्या आपल्या गुरुदेवांच्या आदेशावरून नर्मदा मातेच्या काठावरती येऊन एक कोटी गायत्री मंत्राचा जप केला . यातून त्यांना गायत्री मंत्राची आवड लागली . पुढे गुरुदेवांच्या आदेशावरून त्यांनी नर्मदा मातेच्या काठावरच चार ठिकाणी गायत्री मंत्राची पुरश्चरणे केली . ओंकारेश्वर येथे एक अमरकंटक येथे एक आणि भालोद येथे दोन अशी चार पुरश्चरणे झाली . महाराजांच्या तपाचा प्रभाव इतका प्रखर की या प्रत्येक ठिकाणी गायत्री मातेचे मंदिर आपोआपच उभे राहिले . इतके सर्व करून देखील या महापुरुषाला जरा देखील अभिनवेश नव्हता. एखाद्या नुकत्याच जन्माला आलेल्या बालकाप्रमाणे यांची वृत्ती सहज होती आणि बाल सुलभ भावामध्ये ते सतत राहत होते . भालोद येथील एका शिष्याला त्यांनी ओंकारेश्वर चा आश्रम सांभाळायला दिला होता . भालोद येथे आश्रम सांभाळणारा त्यांचा एक शिष्य कसा आश्रम चालवितो आहे हे आपण त्या प्रकरणामध्ये पाहिलेच . आणि हा आश्रम प्रकाशानंद महाराज बघत होते .आश्रमामध्ये पशुपक्षी झाडे वेली फळे फुले आणि शंभर पेक्षा जास्त गायी होत्या ! वासरांशी खूप खेळलो ! चला या परिसराचे दर्शन करूया .
या स्थानावर ते गेली ३६ वर्षे राहत आहेत .
त्यांचे गुरुदेव मला भेटले की छोटीशी कुटी या चित्रात गोलाने दाखवली आहे .अंथरुण नाही पांघरून नाही पंखा नाही वीज नाही फक्त कठोर साधना तीही कडक उन्हात ! आणि ती देखील चार गायत्री पुरश्चरणे झाल्यानंतर ! कुठलाही अहंकार नाही अभिनवेश नाही आढ्यता नाही गर्व नाही ! खरा साधू ! नर्मदा खंडामध्ये जे फार मोजके लोक दर्शन घेण्याच्या योग्यतेचे उरलेले आहेत त्यात श्री योगेश्वरानंद महाराजांचा क्रमांक फारच वरचा लागतो .
काळभैरवाच्या स्थानाची पूजा करताना प्रकाशानंद ब्रह्मचारी महाराज आणि अन्य साधू .
यातील काळभैरवांची काळ्या पाषाणाची मूर्ती अलीकडे बसवलेली असून खाली शेंदूर लावलेले पाषाण आहेत ते मूळ स्थान आहे .
हे मूळ बागेश्वरी देवीचे मंदिर असल्यामुळे ही बागेश्वरी देवी आहे असे मानले जाते .
प्रकाशानंद महाराजांच्या चेहऱ्यावर खूप तेज आहे .
एखादी छोटी कुमारिका दिसली की चटकन तिला नर्मदा माता मानून ते नमस्कार करतात !
याच ठिकाणी बसवून मला महाराजांचा सत्संग लाभला !
गेली तीनशे वर्ष अखंड प्रज्वलित असलेला हा आश्रमातील धुना आहे .
अलीकडे बागदी नदी पार करण्यासाठी पूल झाला आहे असे नकाशातील चित्रे पाहिल्यावर लक्षात आले . हे चांगले झाले त्यामुळे परिक्रमेचा मार्ग काठाकडे वळला !
नर्मदा माता बागदी संगम अवकाशातून खूप छान दिसतो !
काळभैरव ! काशीचे कोतवाल !
औदुंबर वृक्षाच्या खाली स्थापित दत्तप्रभू .
आश्रमामध्ये घनदाट झाडी आहे . घाट चढताना ती विशेषत्वाने जाणवते .
आश्रमातून नर्मदा मातेचे नितांत सुंदर दर्शन होते .पुढे पुनासा धरण असल्यामुळे इथल्या जलप्रवाहाला गती नाही .त्यामुळे शांत पसरलेल्या नर्मदा माईचा जलाशय मनाला देखील शांत करतो !
मारुतीच्या याच पारावर मी मुक्काम केला .
गोपाळ कृष्णाचा विग्रह .
इथे आता नवीन मंदिर प्रस्तावित आहे असे नकाशातील चित्रे पाहिल्यावर लक्षात आले .
आश्रमामध्ये असलेल्या अनेक गाईंपैकी एक छोटीशी गोशाळा किंवा गोठा .
योगेश्वरानंद महाराज तपाला बसलेले होते ती कुटी या संपूर्ण क्षेत्रामध्ये किती छोटी आहे हे आपल्याला या चित्रांमध्ये गोलात दाखविले आहे . महाराज इतके टोकाचे विरक्त आहेत की त्यांचा एकही फोटो कुठेच उपलब्ध नाही ! खूप शोधल्यावर हे एक चित्र मिळाले . परंतु क्षौर केल्यावर महाराज असे दिसत नाहीत .
महाराजांकडून गायत्री मंत्राची संथा घेण्याची इच्छा आहे असे सांगितल्यावर सकाळी देतो म्हणाले ! अशी संधी पुन्हा कधी मिळणार ! पहाटे लवकर उठून नर्मदा मातेमध्ये अप्रतिम असे स्नान केले . पाणी खूप खाली उतरले होते . खोल आणि स्वच्छ पाणी होते . स्नान करून महाराजांच्या पुढे जाऊन बसलो . महाराजांनी गायत्री मंत्र शिकवला . मुंजी मध्ये गायत्री मंत्राचा उच्चार कसा करायचा हे मला सांगण्यात आले नव्हते हे आपल्याला आता माहितीच आहे . ती कसर नर्मदा मातेने इथे भरून काढली ! आयुष्यभर ज्याने केवळ गायत्री मंत्राचाच जप केला आहे आणि रामदास स्वामींनी बारा वर्षांमध्ये गायत्री मंत्राचे एक पुरश्चरण नंदिनी नदीच्या काठावर टाकळी येथे केले होते तशी चार पुरश्चचरणे झालेल्या महान तपस्वी संन्याशाकडून गायत्री मंत्राची दीक्षा मिळाली ! एखादा मंत्र किंवा मंत्राचा उपदेश त्याच माणसाकडून घ्यावा ज्याने तो मंत्र सिद्ध केलेला आहे . अगदी सोप्या भाषेत सांगायचे तर एखाद्या माणसाकडून मोबाईल घेतला परंतु त्याचा पॅटर्न किंवा पासवर्ड नाही मिळाला तर त्या मोबाईलचा आपल्याला काही उपयोग होत नाही ! त्याच पद्धतीने मंत्र सिद्ध झालेला नसेल तर तो आयुष्यभर उच्चारूनही काही उपयोग होत नाही . सिद्ध मंत्राचा महिमा अपरंपार आहे . आणि आपल्याला कधी ,कुठे , काय ,कसे व किती द्यायचे हे नर्मदा माते शिवाय अधिक चांगले कोणाला माहिती असणार ! मी सकाळी पुढे निघणार होतो . परंतु दोघेही गुरु शिष्य मला थांब म्हणाले म्हणून पुन्हा एकदा थांबलो . या दोघांचा सत्संग मला हवाच होता ! प्रकाशानंद महाराजांनी देखील एखादा मोठा आश्रम साधुववृत्तीने चालवताना काय काय सांभाळावे लागते हे मला व्यवस्थित समजावून सांगितले . त्यांनी तो आश्रम उत्तम पद्धतीने सांभाळलेला होता ! तिथले पावित्र्य जरा देखील कमी न होऊ देता सर्व आधुनिक सुख सुविधा तिथे उपलब्ध केलेल्या होत्या . आश्रमाची स्वच्छता पावित्र्य आणि शांतता अबाधित राहील यासाठी ते विशेष काळजी घेत होते . आश्रमासाठी लागणारा निधी गोळा करण्याची स्वतंत्र व्यवस्था त्यांनी उभी केली होती . त्यासाठी सर्व आधुनिक साधनांचा वापर करणे काही गैर नाही हे त्यांचे विचार मला पटले . त्यामुळेच भक्तमंडळींकडून ऑनलाईन दान देखील गोळा करण्याची पद्धत त्यांनी सुरू केली होती .
(टीप : हा आश्रम पूर्णपणे दानधर्मावर चालतो . आश्रमाची ३० एकर शेती आहे . त्याखेरीस कोणाला दान करायचे असेल तर वरील क्यूआर कोड आहे असे मला एका व्हिडिओमध्ये आढळले . त्या चा मी स्क्रीनशॉट घेतलेला आहे त्यामुळे आधी खात्री करून मगच पैसे पाठवावेत . मी स्वतः यूपीआय कधीच वापरले नसल्यामुळे या क्यूआर कोडची खात्री करून घेतलेली नाही याची कृपया नोंद घ्यावी . )
प्रकाशानंद महाराज पारंपारिक व आधुनिक असले तरी अर्थातच बालसुलभवृत्तीने भिक्षा मागून राहणाऱ्या त्यांच्या गुरुदेवांना यातील कशाचेच काहीही सोयर सुतक नव्हते . ते फक्त अखंड तपाचरणामध्ये लीन होते . इतकी साधना झाल्यावर जरी ते एखाद्या सुखासनावर बसले असते तरी कोणीही त्यांना काहीही म्हणाले नसते . परंतु साधूने शेवटच्या श्वासापर्यंत साधन करावे आणि साधनाला प्रतिष्ठा मिळवून द्यावी हे त्यांचे विचार त्यांची महानता सांगत होते . रामदास स्वामींनी देखील दासबोधा मध्ये हेच सांगितले आहे . सिद्ध झाल्यावर साधूने साधन सोडू नये . कारण साधूकडे लोक आदर्श म्हणून पाहत असतात . तोच लोळत पडला तर लोकही तसे होतील . त्यामुळे शेवटच्या श्वासापर्यंत साधनामध्ये राहणे हे साधूचे कर्तव्य आहे असे समर्थ म्हणतात . याला अध्यात्मामध्ये ज्ञानोत्तर भक्ती असे म्हटले आहे . मुळात साधू किंवा सत्पुरुषांकडे पाहून आपण कसे वागायचे हे ठरवूच नये . कारण या लोकांनी केलेली साधना गुप्त ठिकाणी केलेली असते . त्या काळातले त्यांचे तपाचरण कसे होते हे आपल्याला माहिती नसते . आता देखील मी महाराजांचे गुप्त साधन चालू असताना तिथे गेलेलो होतो . महाराज इथे साधनेला बसलेले आहेत हे एक प्रकाशानंद महाराज सोडले तर त्यांच्या अन्य कुठल्याही शिष्याला माहिती नव्हते . त्यांच्या दर्शनाची मला लागलेली अनिवार ओढ आणि माझा भाव बघून त्यांनी मला दर्शनाची परवानगी दिली होती .किंबहुना नर्मदा मातेनेच त्यांना तशी प्रेरणा दिली होती . सोपे उदाहरण सांगतो . सध्या अनेक लोक आयपीएलचे सामने बघत असतात किंवा क्रिकेट बघतात . या क्रिकेटमधील खेळाडू जसे चौकार षटकार मारतात तसे आपण मारायला गेलो तर हाडे मोडून घेऊ ! या लोकांचे कठोर साधन झालेले असते तपश्चर्या झालेली असते तेव्हा ते असे फटके मारू शकतात . आपण त्यांचे बघून तसा फटका मारायला गेलो तर गोत्यात येऊ ! कुठलेही क्षेत्रामध्ये साधनेला फार महत्त्व आहे . क्रीडा असो साहित्य असो कला असो विज्ञान असो संगीत असो शिक्षण क्षेत्र असो . तुम्ही एकांतामध्ये केलेले कठोर तपाचरण तुम्हाला फळ देतेच देते . आयुष्यामध्ये कोणालाही कधीही काहीही फुकट मिळत नाही . त्यासाठी एकांतवासामध्ये घोर किंमत मोजावी लागलेली असते . लोकांना सचिन तेंडुलकरचे आताचे वैभव दिसते . परंतु शाळेमध्ये असताना रात्र रात्र जागून त्याने मोज्यामध्ये चेंडू टाकून केलेली फटकेबाजी ची तयारी कोणी पाहिलेली नसते . नरेंद्र मोदींचे आजचे यश सर्व जग पाहते आहे . परंतु त्यासाठी त्यांनी आपल्या तरुण वयामध्ये केलेली वणवण कोणालाच ठाऊक नसते . उस्ताद झाकीर हुसेन यांचे द्रुतगतीतले तबलावादन लोकांच्या टाळ्या घेऊन जाते . परंतु लहानपणी त्यासाठी त्यांनी पहाटे तीन वाजता उठून तासन्तास केलेला रियाज कोणाला माहिती नसतो . भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचा अभंग ऐकल्यावर कोणाचीही सहजच ब्रह्मानंदी टाळी लागते . परंतु त्यांचे गुरु सवाई गंधर्व यांच्याकडे बारा वर्षे संगीताचा एकही धडा न गिरवता केवळ पाणी भरण्याचे आणि पडेल ते काम करण्याचे त्यांनी आचारलेले व्रत कोणाला माहिती नसते . यश हे कधी आपसूक मिळत नसते . त्यासाठी कठोर परिश्रम प्रचंड मेहनत आणि एकांतवासातील साधना आवश्यक असते . या सर्वांच्या उपर जर परमेश्वरी कृपा असेल तर यश पायाशी लोळण घेते . थोडक्यात काय तर कुठलीही गोष्ट सिद्ध करणे फार महत्त्वाचे आहे . साध्य साधना सिद्धी ही त्रिपुट कुठल्याही क्षेत्रामध्ये फार आवश्यक आहे . असो .
सकाळी पुन्हा एकदा महाराजांच्या कुटी बाहेर जाऊन बसलो . महाराज बाहेर आले . कुटीमध्ये काहीच नव्हते . बसण्यासाठी आसन सुद्धा नव्हते . इतकी कठोर साधना महाराज याही वयात करत होते . अजूनही महाराजांनी मला नाव गाव पत्ता काही विचारले नव्हते . केवळ आत्मबोधावर आमचे ऐक्य झाले होते .महाराजांनी मला भालोदचा आश्रम सांभाळण्यासाठी आमंत्रित केले . परंतु मी महाराजांना नम्रपणे आणि स्पष्टपणे सांगितले की असे काही करण्याची आपली पात्रताच नाही . नर्मदा माता अशा पद्धतीने तुमची परीक्षा बघते . किमान सात ते आठ ठिकाणी मला अशा पद्धतीने आश्रम सांभाळण्यासाठी आमंत्रण आले होते . परंतु नर्मदा माता तुमची परीक्षा घेत आहे हे पक्के ध्यानात ठेवावे . ती बघते की हा प्रलोभनांमुळे घसरणारा आहे का ! आपण त्याला बळी पडू नये . भालोदच्या गायत्री मंदिरामध्ये सव्वानऊ फूट उंचीची गायत्री मातेची मूर्ती आहे . चार एकराचा हा परिसर आहे .
(भैरव टेकडी )या ठिकाणी असलेला काळभैरव हा गवळ्यांचा देव आहे . त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणामध्ये गवळी समाज दर्शनासाठी येतो . आश्रम संपन्न असल्यामुळे ट्रॅक्टर गाईगुरे सर्व आहे . गवळी समाजाच्या लोकांशी गप्पा मारल्या .काळभैरव हा देवीचा गण मानला जातो . त्यामुळे देवीची उपासना करणारे किंवा कुठल्याही मंत्राची उपासना करणारे किंवा कुठल्याही तंत्राची उपासना करणारे या सर्वांना भैरवाचे स्मरण केल्याशिवाय गत्यंतरच नसते असे प्रकाशानंद ब्रह्मचारी महाराजांनी सांगितले . अगदी गायत्री उपासनेच्या आधी देखील भैरवाचे स्मरण करावे लागते . ते न केल्यास साधनेमध्ये विघ्न येऊ शकते . आपल्या प्रत्येकाला एक कुल देवता आणि कुलदैवत असते . यातील कुलदैवत म्हणजे भैरवाचेच कुठले तरी रूप असते . तंत्रपीठ असलेल्या या स्थानाचे अजून एक महात्म्य आहे .ब्रह्मदत्त नावाच्या एका राजाने येथे तपश्चर्या केली होती . नर्मदा मातेने प्रसन्न होऊन त्याला वर मागितला तेव्हा त्याने स्वर्गामध्ये असलेली गंगा पृथ्वीवर अवतरित झाली पाहिजे अशी इच्छा व्यक्त केली . तेव्हा नर्मदा मातेने तुझ्याच कुळातील एक सुपुत्र हे कार्य करेल असा वर राजाला दिला आणि पुढे या राजाच्या कुळात भगीरथाचा जन्म झाला ज्याने गंगा पृथ्वीवर अवतरित केली. या आश्रमामध्ये मोठी संत परंपरा होऊन गेलेली आहे . स्वामी भैरवानंद , स्वामी रामानंद अशा अनेकांनी आपल्या तपाचरणाने ही भूमी पावन केलेली आहे . तीनशे वर्षांपासून येथे सलग अखंडित धुना प्रज्वलित आहे .
दुपारी भोजन प्रसादी घेतली . या ठिकाणी खूप रहावे असे वाटू लागले . असे वाटू लागता क्षणी तिथून शांतपणे काढता पाय घेतला . नर्मदा परिक्रमे मध्ये असताना कुठल्याही एका स्थानाशी असे आप पर भावाने राहू नये . स्मशानामध्ये मुक्काम पडो किंवा अशा महान आश्रमामध्ये सर्वत्र आपला समभाव असला पाहिजे . आश्रमातील शंभर गाई चरण्यासाठी निघाल्या होत्या . त्यांच्या कळपामध्ये शिरून गेलो . गाईंनी काठाकाठाने चालण्याचा मार्ग दाखवला ! प्रत्येक पावलाला योगेश्वरानंद महाराजांची आठवण येऊ लागली ! असे देखील महा तपस्वी साधू आजच्या ही युगामध्ये अस्तित्वात आहेत हेच नर्मदा मातेने दाखवून दिले ! फक्त त्यांचे दर्शना दुर्लभ असते . कारण त्यांचे स्थानच गुप्त असते . आणि अशा साधू संतांचा सहवास लाभावा अशी इच्छा नर्मदा परिक्रमे मध्ये केली तर तो लाभतोच लाभतो ! कारण नर्मदा माता ही साक्षात कामधेनू आहे ! कल्पतरू आहे ! तिच्या काठावर तुम्ही जे काही चिंताल ते तुम्हाला ती देते ! देतेच देते ! तुम्ही फक्त तिला आवाज द्यायचा असतो .तिचे स्मरण करायचे असते . मनापासून आर्ततेने हाक द्यायची असते . नर्मदे हर !
लेखांक एकशे त्रेपन्न समाप्त (क्रमशः )
नर्मदे हर 🙏
उत्तर द्याहटवानर्मदे हर /\
उत्तर द्याहटवा