लेखांक १५२ : लक्कडकोटच्या झाडीच्या अखेरीस भेटलेले वन्यजीवन आणि फतेहगडचा मौनीबाबा आश्रम
बिबट्याशी दोन हात करणारे किटीगाव चे शूरवीर प्रकाशनाथ जी यांनी दाखवलेला जंगलातील रस्ता खरोखरच खूप सुंदर निघाला ! इथे पावला पावलावर वन्यजीवन भेटू लागले ! बिबट्याने जर तुमच्यावर आपण होऊन हल्ला केला नसता तर तुम्ही काय केले असते असे मी त्यांना विचारल्यावर त्यांनी दिलेलं उत्तर खूप विचार करायला लावणारे होते . ते म्हणाले की हा मुळात त्यांचाच अधिवास आहे . आपण इथे पाहुणे आहोत . त्यामुळे आपण त्यांना मारण्याचा प्रश्न येतच नाही . परंतु आपल्या पिलांसाठी जीवघेणा हल्ला केल्यामुळे मला नाईलाजाने ते पाऊल उचलावे लागले होते . आजही मी जंगलामध्ये जातो आणि भरपूर प्राणी मला दर्शन देतात . त्यापूर्वीही आणि त्यानंतरही मी कधीच कुठले जनावर मारलेले नाही . मला वन्य जीवन आवडते हे लक्षात आल्यामुळे त्यांनी मला एक जबरदस्त रस्ता दाखवला होता .जराही इकडे तिकडे शिरू नको असा सल्ला देखील दिला होता . पाणी पिण्यासाठी येणारे अनेक प्राणी इथे दिसतात असा त्यांचा अनुभव होता .असंख्य मोर अनेक प्रकारचे पक्षी , पाणपक्षी दर्शन देऊ लागले . मी नर्मदा मातेच्या अगदी काठाने चालायचा प्रयत्न नेहमीप्रमाणे करू लागलो . उजवीकडे एक चार फूट खोल खड्डा होता जिथून नर्मदा माता खूप जवळ होती . मी वरून खाली उडी मारली आणि अचानक माझे लक्ष समोर असलेल्या प्राण्याकडे गेले !हा प्राणी म्हणजे एक जंगली कुत्रा होता ! तो माझ्यापासून अगदी जवळ होता . मी मारलेल्या उडीमुळे तो गडबडला ! आणि एक क्षणभर आमची दोघांची नजरा नजर झाली . मी डोळे मिटून त्याला मनोमन सांगितले की बाबारे तुला त्रास देण्याचा माझा हेतू नव्हता . क्षणातच त्याने जंगलाकडे धूम ठोकली . तो बिचारा पाणी पिण्यासाठी खाली उतरला होता . अशावेळी डोळ्याला डोळे भिडवले की प्राण्यांना भीती वाटू शकते किंवा राग देखील येऊ शकतो .त्यामुळे ते टाळावे . भारतामध्ये श्वान वंशाच्या अनेक प्रजाती आढळतात . अज्ञानाने आपण त्यांना फक्त लांडगा कोल्हा कुत्रा अशा तीनच प्रजातीमध्ये वाटून टाकले आहे . या खेरीजही अनेक प्रजातीचे श्वान आपल्याला आढळतात . मला दिसलेला जंगली कुत्रा हा आफ्रिकन वाइल्ड डॉग सारखा होता . असे कुत्रे भारतामध्ये फारसे आढळत नाहीत . परंतु मला मात्र अतिशय जवळून पाहिल्यामुळे हा तोच कुत्रा आहे हे लगेच लक्षात आले . शक्यतो हा कुत्रा तरसासारखा दिसतो . परंतु तरस मी अनेक वेळा पाहिलेला असल्यामुळे हा तरच नाही हे माझ्या चटकन लक्षात आले . हा मुद्दा मला सर्व वन्यजीव अभ्यासकांच्या निदर्शनाला आणून द्यायचा आहे की या भागामध्ये किटी गावच्या पुढे मी आफ्रिकन वाईल्ड डॉग किंवा पेंटेड डॉग सारखा दिसणारा भारतीय रान कुत्रा पाहिलेला आहे . भारतामध्ये ज्याला रानकुत्रा म्हणतात ती कोळसुंद नावाची जात आहे .इंग्रजीमध्ये याला ढोल म्हणतात . dhole. सध्या यांचा अभ्यास करण्यासाठी द डोल प्रोजेक्ट नावाचा प्रकल्प देखील सुरू आहे . वाचकांना मी काय म्हणतो आहे हे लक्षात यावे म्हणून सर्व श्वानवंशीय प्राण्यांची एकदा ओळख करून देतो .काठाने नर्मदा परिक्रमा करताना आपल्याला हे सर्व भेटणारच आहेत त्यामुळे त्यांची आधीच ओळख झालेली काय वाईट आहे ! चला तर मग ,
हे आहे तरस . याला हिंदीमध्ये लकडबघ्घा म्हणतात . इंग्रजी नाव hyena. शुलपाणीच्या झाडीमध्ये याला खुसखडो म्हणतात .त्या भागात यांचा भरपूर वावर आहे .हा तसा मुळात श्वानवंशीय प्राणी नाही . परंतु दिसायला कुत्र्यासारखा असल्यामुळे याला श्वान गटामध्ये पकडायची चूक भले भले करतात . हा अतिशय निर्भय मांसाहारी प्राणी असून वाघ ही याच्यापासून अंतर ठेवून असतात . पकडलेल्या जीवाला जिवंत खाण्याची वृत्ती याच्यामध्ये दिसते . शिकार करण्याच्या भानगडीत न पडता सापडलेले हरण पायाकडून जिवंत खायला हा सुरुवात करतो . याची आयुष्यभर एकच मादी असते . पुढचे पाय उंच असल्यामुळे मागचे पाय ओढत चालल्यासारखा भास होतो . याच्या जबड्यामध्ये फार ताकद असते . इतर प्राण्यांनी शिकार केलेले प्राणी व सांगाडे हा मुख्यत्वे करून खातो .हा आहे लाल कोल्हा . नर्मदे काठी फारसा आढळत नाही . हिमालय परिसरात जास्त आहे .इंग्रजीमध्ये याला रेड फॉक्स म्हणतात . मध्यम आकाराचा असतो . माणसासाठी निरुपद्रवी आहे .
मी जो कुत्रा पाहिला तो अगदी असा होता . वन्यजीव अभ्यास करणे याची कृपया नोंद घ्यावी . भारतामध्ये हा रान कुत्रा आढळल्याची नोंद कोठे दिसत नाही . किटीगावामध्ये गाव संपल्यावर लागणाऱ्या जंगलात हा कुत्रा मला दिसला . खात्रीशीरपणे हाच दिसलेला आहे . एक वन्यजीव अभ्यासक म्हणून मी इथे त्याची नोंद करून ठेवत आहे .
असो . इथून पुढे काही अंतर गेल्यावर मला असे लक्षात आले की माझ्यामागे कोणीतरी चालत आहे . मागे वळून पाहिल्यावर लक्षात आले की चार रान कुत्री (dhole) फॉर्मेशन करून माझ्यामागे चालत आहेत ! हा प्रकार पाहिला आणि माझ्या तोंडचे पाणीच पळाले ! मला असे वाटले की कदाचित अजूनही काही कुत्री जंगलातून माझ्या शेजारून चालत असू शकतील .घाबरले की आपल्या शरीरामध्ये तयार होणाऱ्या एका संप्रेरकाचा एक वेगळा वास वन्य प्राण्यांना येतो त्यामुळे घाबरायचे नाही असे ठरवले . मी पाच सहा वेळा मागे वळून पाहिले आणि प्रत्येक वेळेस त्यांची व्यूह रचना बदलत आहे असे माझ्या लक्षात आले . मी थांबलो की ते चौघे देखील थांबायचे . असे बरेचदा झाले . अखेरीस मी नर्मदा मातेमध्ये उतरलो .नर्मदे हर असा पुकारा मनातल्या मनात सुरू केला . आणि मग क्षणाचाही विलंब न लावता ते चौघे पुढे निघून गेले . तरी देखील दहा-पंधरा मिनिटे मी तिथेच थांबलो . आणि मगच पुढे निघालो . ती सुंदर रान कुत्री पाहून खूप आनंद झाला . जंगल घनदाट होत गेले .काही काळाने एका तरसाने देखील दर्शन दिले . ही बहुदा वयस्कर मादी असावी . पुढे गेल्यावर एक मोठी नदी आडवी आली . आता पलीकडे जायचे कसे असा प्रश्न पडला . इतक्यात दोन कोल्हे डाव्या हाताला जाताना दिसले . ते जणू काही मागे वळून मला बोलवत आहेत असे वाटायचे . त्यांच्या मागोमाग गेलो . त्यांनी अक्षरशः मला ती नदी पार करण्याचा सुंदर असा रस्ता दाखवून दिला . मी नदी पार केल्यावर दोघेही जंगलामध्ये गायब झाले . हा प्रसंग अतिशय अविस्मरणीय आणि लक्षात राहणारा होता .आता कदाचित वाचकांना असे वाटू शकते की इतकी सारे वन्यजीव एकदम कसे काय दिसले ? तर असे होऊ शकते .सूर्यास्तानंतर वन्य प्राण्यांची शिकारीसाठी बाहेर पडण्याची वेळ असते . त्यापूर्वी पाणी वगैरे पिण्यासाठी ते नदीवर येत असतात . आणि त्याचबरोबर अजून एक महत्त्वाचा मुद्दा इथे लक्षात घेणे आवश्यक आहे तो म्हणजे नर्मदा मातेच्या काठावर अनेक व्याघ्र प्रकल्प आणि अभयारण्ये आहेत . जेव्हा मी काठावर असे म्हणतो आहे तेव्हा आपण नर्मदा मातेपासून दोन्ही बाजूला शंभरदीडशे किलोमीटरचे अंतर असा पट्टा लक्षात घ्यावा . साधारण शंभर दीडशे किलोमीटर अंतर हे वन्य प्राण्यांसाठी किरकोळ अंतर असते . एवढ्या अंतरावर येणे जाणे ते सहज करतात . त्यामुळे नर्मदा माते काठच्या अशा पट्टया मधील जंगलांची संख्या जर आपण पाहिली तर आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही ! आपल्या वाचकांसाठी मी खास नर्मदा खंडातील किंवा नर्मदा खंडाला खेटून असलेल्या सर्व वनांची अभयारण्यांची व्याघ्र प्रकल्पांची चित्रे तयार केलेली आहेत . ती आपण पाहूयात . या चित्रामध्ये नर्मदा माता बाणाने दाखवली आहे . आणि अभयारण्य गोलात दाखवले आहे . ही सर्व सरकार मान्य आणि सरकार चालवत असलेली मान्यता प्राप्त अभयारण्य आहेत याची कृपया नोंद घ्यावी . या खेरीज देखील अनेक छोटी मोठी जंगले आहेत ज्यांना अभयारण्य म्हणून घोषित करणे आवश्यक आहे त्यांचा इथे समावेश केलेला नाही . त्यामुळे आपल्याला सहज लक्षात येईल की नर्मदे काठी इतके वन्य पशू जीवन कशामुळे आहे . या विषयामध्ये यापूर्वी कोणी संकलन केलेले मला आढळले नाही म्हणून मी करून ठेवतो आहे . कृपया नर्मदा परिक्रमा करू इच्छिणाऱ्या प्रत्येकाने हा मुद्दा गांभीर्याने लक्षात घेणे आवश्यक आहे . कारण वन्य जीवन कसे असते व त्यांच्याशी कसे वागावे हे माहिती असल्याशिवाय परिक्रमेला निघूच नये असे प्रस्तुत लेखकाचे स्पष्ट मत आहे . आपल्या अस्तित्वामुळे त्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण होणे नर्मदा मातेला देखील आवडणार नाही .चला तर मग ! नर्मदा खंडातील सर्व वनांची एक छोटीशी सफर करूया .
इथून पुढच्या प्रत्येक चित्रामध्ये पांढऱ्या बाणाने दाखवलेली नर्मदा माता आहे . आणि गोला मध्ये जंगलाचे नाव आहे .ही आहे भोपाळ जवळचे करवा जंगल / कर्वा जंगल .वाघांच्या मोठ्या संख्येसाठी प्रसिद्ध असलेले पेंच चे राष्ट्रीय अभयारण्य नर्मदा मातेच्या पासून फारसे लांब नाही . प्रशासनाच्या सोयीच्या दृष्टीने वेगवेगळी अभयारण्ये केलेली असली तरी वन प्रदेश एकच आहे .
अमरकंटकच्या ईशान्य दिशेला बैकुंठपूर वन्यजीव अभयारण्य आहे .
अमरकंटक हे स्थानच मुळात जंगलामध्ये वसलेले आहे . इथे प्रशासनाच्या दृष्टीने काही जंगले केलेली आहेत . पैकी अचानकमार वन्यजीव अभयारण्य ,अमरकंटक पर्वताश्रृंखला अभयारण्य आणि कानन पेंडारी जंगल प्रसिद्ध आहेत . हा संपूर्ण वाघांचा वावर असलेला परिसर आहे .
अमरकंटकच्या नैऋत्येला भरमदेव वन्यजीव अभयारण्य आहे .हे खूप घनदाट अरण्य आहे .
महाराष्ट्राच्या नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यांच्या मध्ये येणारी नागझिरा अभयारण्य आणि पवनी कऱ्हांडला अभयारण्ये वाघांसाठी प्रसिद्ध आहेत आणि इथले वाघ बालाघाट मार्गे नर्मदा खंडामध्ये येत असतात .
महाराष्ट्रातील नवापूर जवळचे पूर्णा वन्यजीव अभयारण्य जरी तापीच्या काठावर असले तरी नर्मदा खंडापासून खूप जवळ आहे . इथे सध्या मोठ्या प्रमाणात निर्वनीकरण सुरू आहे .
अमरकंटकच्याच ईशान्य दिशेला बगदरा वन्यजीव अभयारण्य आहे .हा वाघ दरा या शब्दाचा स्थानिक भाषेतील अपभ्रंश आहे असे वाटते.
नरसिंह पूर च्या उत्तरेला बिला अभयारण्य आहे . या भागात बेलाचे हे नाव आहे . ही एक पर्वतरांग असून या रांगेत अनेक अभयारण्ये आहेत .
जबलपूर जवळचं वीरांगना दुर्गावती अभयारण्य आपण मगाशी पाहिलेच . हा संपूर्ण वन प्रदेशच आहे . इथे देखील मोठ्या प्रमाणात निर्वनीकरण सुरू झालेले आहे .
नरसिंहपूर जिल्ह्याच्या उत्तरेला नौरादेही अभयारण्य आहे ज्याचा विस्तार बऱ्यापैकी मोठा आहे .
नर्मदा नदीच्या उत्तर दिशेला इंदोर शहराजवळ रालामंडल वन्यजीव अभयारण्य नावाचे एक पिटुकले वन वाचवले गेले आहे .याला इंदूर शहराचे फुफ्फुस मानले जाते .
नर्मदे काठी असलेल्या कुक्षी मनावरच्या उत्तर दिशेला सरदारपुर वन्यजीव अभयारण्य आहे .
ओंकारेश्वर धरणाच्या लगतचे सर्व क्षेत्र अरण्य असून येथे ओंकारेश्वर राष्ट्रीय अभयारण्य आणि नर्मदा वन्यजीव अभयारण्य आहे . परिक्रमेदरम्यान हे जंगल पार करावेच लागते ! आणि आपण गेले दोन-तीन दिवस याच जंगलात होतो !अतिशय वन्यजीव संपृक्त असा हा प्रदेश आहे .
नर्मदा नदीपासून थोडीशी लांब असलेली दोन जुळी जंगले रणथंबोर व्याघ्र प्रकल्प आणि चित्त्यांच्या पुनर्वासासाठी प्रसिद्ध झालेले कुनो नॅशनल पार्क हे नकाशा मधील लांब दिसत असले तरी नर्मदा खंडामध्ये येण्यासाठी इथल्या प्राण्यांना फारशी अडचण येत नाही . त्यामुळे उद्या कोणाला नर्मदा खंडामध्ये चित्ता दिसला तर आश्चर्य वाटू नये ! दक्षिणेला असलेले सातपुडा अभयारण्य देखील वाघांसाठी प्रसिद्ध आहे .
जबलपूरच्या उत्तरेला असलेले पन्ना राष्ट्रीय अभयारण्य देखील वाघांसाठी ओळखले जाते . आणि इथल्या वाघाला जर नर्मदेच्या दक्षिणा असलेल्या कान्हा व्याघ्र प्रकल्पात जायचे असेल तर कोण अडवणार आहे ?
संजय दुबरी राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्प देखील नर्मदेपासून फारसा लांब नाही हे आपल्याला या चित्रात लक्षात येईल .
अचानकमार अभयारण्य तर आपल्या वाचकांना चांगले माहिती आहेच !
बांधवगड व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेले पनपता अभयारण्य देखील उत्तम आहे .
भारतातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये दबदबा असलेले बांधवगड अभयारण्य नर्मदा खंडाच्या नजीकच आहे .
नर्मदा मातेच्या मंडला येथील वळणाच्या खालच्या बाजूला केवढे मोठे सलग अरण्य आहे हे आपल्याला या चित्रात लक्षात येईल . मैनपुर अभयारण्य ड्राय डेसीडोज फॉरेस्ट कान्हा व्याघ्र प्रकल्प बैहर अभयारण्य चिल्पी अभयारण्य सुखपार राखीव अभयारण्य ही सर्व कान्हा अभयारण्याचीच भावंडे आहेत . आणि बालाघाट मार्गे महाराष्ट्रातील वनप्रदेशाला जोडलेली आहेत . या व्याघ्र पट्ट्यामुळे किंवा टायगर कॉरिडॉरमुळे च भारतातील वाघांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे . कारण या वनप्रदेशामुळे नर्मदा खंडाच्या दक्षिणेतील वाघ उत्तरेला सहजपणे जाऊ शकतात . आणि आपली नवीन हद्द आखू शकतात .
नयनपूर चे जंगल घनदाट आहे . आणि गवताची मैदाने चहूबाजूंनी असल्यामुळे वाघांना आहार चांगला आहे . अभयारण्याच्या बाबतीमध्ये आपण बफर झोन आणि कोअर झोन असे शब्द नेहमी ऐकत असतो . उपवन आणि घनवन असा त्याचा अर्थ असावा असे आपल्याला वाटते . परंतु प्रत्यक्षामध्ये कोअरझोन म्हणजे गवताची मोकळी मैदानी असतात जिथे भरपूर शाकाहारी प्राणी उपलब्ध असतात . याउलट बफर झोन मध्ये वन प्रदेश अधिक असतो म्हणजे झाडी अधिक असते .
कान्हा व्याघ्र प्रकल्प नर्मदा मातेच्या अगदी जवळ आहे हे आपण आपल्या पूर्वीच्या लेखनामध्ये देखील पाहिले होते .
सातपुडा व्याघ्र प्रकल्प देखील असाच नर्मदा मातेच्या जवळजवळ काठावर आहे .
नर्मदापुरम जिल्ह्याच्या आग्नेय दिशेला बोरी वन्यजीव अभयारण्य आहे .
सातपुडा अभयारण्याच्या आजूबाजूला किती घनघाट वनराई आहे ते आपल्याला या चित्रातून लक्षात येईल .
मेळघाटचे वाघ देखील मनात आणले तर एक दोन रात्रीं मध्येच नर्मदा खंडामध्ये प्रकट होऊ शकतात !
मेळघाटाला लागून असलेले गुगामाळ अभयारण्य असेच नर्मदा खंडाशी संबंधित अभयारण्य आहे . कारण पुनासा धरणाचे पाणी इथे खूप दक्षिण दिशेला पसरलेले आहे . आणि ते या अभयारण्यापासून जवळ आहे .
रतन महल येथील अभयारण्य दुर्मिळ होत चाललेल्या अस्वलांसाठी प्रसिद्ध आहे .
शूलपाणेश्वर अभयारण्य आपण मगाशी पाहिलेच . हे खरे तर एकच मोठे वनक्षेत्र आहे . गुजरात राज्यामध्ये गेल्यामुळे त्याचे वेगळे अभयारण्य केले आहे .
याच अभयारण्याच्या महाराष्ट्रातील भाग तोरणमाळ वन्यजीव अभयारण्य म्हणून ओळखला जातो जिथे आपला भाबरीचा आश्रम आहे . इथे तरस लांडगा कोल्हा खोकड इत्यादी प्राणी मी माझ्या डोळ्यांनी स्वतः पाहिलेले असून बिबट्याचा आणि वाघाचा वावर देखील इथे असतो तो अनुभवला आहे . सध्या सर्वात जास्त निर्वनीकरण झालेले हे जंगल आहे . आणि इथे सुरू असलेल्या वनसंवर्धनाच्या कुठल्याही कार्यामध्ये सरकारला लागेल ती मदत करण्याची आपली तयारी आहे .
महाराष्ट्रातील यावल वन्यजीव अभयारण्य हे खरगोन जिल्ह्याला खेटून असल्यामुळे नर्मदा खंडामध्येच मोडते .
इथे दक्षिणेला तापी मातेच्या काठावर देखील खूप सुंदर वन प्रदेश आहे याची महाराष्ट्रातील बऱ्याच लोकांना कल्पनाच नसते .
सध्या आपण जे प्रकरण लिहीत आहोत ते खिवनी अभयारण्याला लागून असलेले जंगल आहे . साधारणपणे नेमावरच्या उत्तरेला हे अभयारण्य आहे .
नर्मदापुरमच्या उत्तरेला असलेले रातापाणी अभयारण्य हा एक व्याघ्र संवर्धन प्रकल्पच आहे .
देहगाव बमोरी वन्यजीव अभयारण्य हे नर्मदा माते पासून खूप जवळ आहे . सांडिया गावाच्या उत्तरेला हा वनप्रदेश येतो .
सातपुडा अभयारण्यातील काही भाग हा सातपुडा टायगर रिझर्व अर्थात संरक्षित व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आलेला आहे .अशा वनप्रदेशांना विशेष अनुदान केंद्र सरकारकडून प्राप्त होते ज्यामुळे व्याघ्र संवर्धनाची कार्ये हातामध्ये घेता येतात .
नर्मदापुरम नजीक तवा नदीच्या परिसरामध्ये असलेले बोरी अभयारण्य देखील किती घनदाट वन प्रदेशाने व्याप्त आहे हे आपल्याला या चित्रातून लक्षात येईल . सांगायचे तात्पर्य इतकेच के नर्मदाखंड हा वनसंपृक्त प्रदेश राहिला आहे आणि आजही त्याच्या खुणा आपल्याला दिसतात . इतके भयानक निर्वनीकरण होऊन देखील नर्मदा खंडामध्ये इतकी जंगले अजूनही शिल्लक आहेत यावरून आपण अंदाज लावू शकतो की नर्मदा खंड पूर्वी कसा असेल . नर्मदा परिक्रमा अधिक सुखदायी सुखकर आणि आनंददायी करायची असेल तर नर्मदा खंडातील वने वाढवणे हा त्यावर एकमात्र उपाय आहे हे सर्वांनी ध्यानात घेणे अत्यंत अत्यावश्यक आहे असो .
चालता चालता मी नारायणपुरा ,चोर-पिपल्या , ढाली आणि गोलपुरा अशा गावांच्या हद्दी पार केल्या होत्या . समोर आडवी आलेली नदी पाहून थांबावे लागले होते . या नदीच्या आसपासचे पर्यावरण अतिशय सुंदर होते इथे एल अँड टी चा एक प्रकल्प चालू होता .
मी ज्या मार्गाने चाललो तो भाग हिरव्या रंगाने वरील नकाशा मध्ये दाखवला आहे . या भागातून कोणीही परिक्रमा वासी जात नाहीत . परंतु एकट्याने वनप्रदेश पार करणे आणि वन्यजीवन पाहणे या माझ्या अपूर्ण इच्छा नर्मदा मातेने येथे पूर्ण करून टाकल्या ! समोर आडवी आलेली नदी म्हणजे नर्मदा मातेचे ओढ्यामध्ये उलटे घुसलेले पाणी होते . परंतु कोल्ह्यांनी मला तिथून व्यवस्थित पलीकडे पार करविले . नदी पार केल्या केल्या एल अँड टी कंपनीचा मोठा प्रकल्प सुरू असलेला दिसतो आहे पहा .
ही प्रत्यक्षामध्ये एक मोठी उपसा जलसिंचन योजना सुरू होती . भविष्यामध्ये अशा अनेक योजना आपल्याला नर्मदा मातेच्या काठावर दिसणार आहेत कारण या हटकून यशस्वी होतात असा अनुभव आता सरकारला आलेला आहे . अनेक नवीन योजनांची पायाभरणी आधीच झालेली आहे . फक्त या योजना राबवताना वन्य जीवनाला देखील विचारात घेऊन त्या राबवणे आवश्यक आहे इतकेच सुचवावेसे वाटते . वन्यजीवांना महामार्ग ओलांडण्यासाठी रस्ता शिल्लक न ठेवल्यामुळे दरवर्षी हजारो वन्य प्राणी रस्ता अपघातामध्ये बळी पडतात . अगदी त्याच पद्धतीने या उपसा जलसिंचन योजनांमुळे आणि त्याच्या भव्य दिव्य नळ्यांमुळे दोन वनप्रदेश तोडले तर जात नाहीत ना याची खात्री बाळगणे आवश्यक आहे . असो .
इतके सारे वन्य जीव दिसल्यामुळे अक्षरशः पोट भरल्यासारखे झाले होते ! आता अजून काहीच नको अशी अवस्था आली होती ! त्यातच वाटेमध्ये एक नर्मदा मंदिर दिसले . मग इथेच थांबावे असा विचार केला . तसाही दिवस मावळतीला लागला होता . हा परिसरा अतिशय रम्य होता . दतोनी किंवा दातुनी नावाची एक नदी नर्मदा मातेला येथे येऊन मिळते . त्यांच्या रम्य अशा संगमावर नर्मदा मातेचे मंदिर आहे . समोरच एक भव्य दिव्य किल्ला आपले लक्षवेधून घेतो . यालाच फत्तेगडचा किल्ला असे म्हणतात . याचे खरे नाव जोगा दुर्ग आहे . काठावर अनेक मोठ्या मोठ्या नावा होत्या . वाळू भरण्याचे काम जोरात सुरू होते . इथे एक नाव अधिक वाळू भरली गेल्यामुळे काठावर अडकली होती . त्या नावेला जेसीबी च्या साह्याने पाण्यामध्ये ढकलण्याचे काम चालू होते . जेसीबी पाशी उभ्या असलेल्या एका मुलाने मला आवाज दिला . नर्मदे हर बाबाजी ! उपर हमारा आश्रम है उधर रुकना । एक त्यागी जी बहुत बढीया आश्रम चलाते है । मी त्याला होकार दिला आणि नर्मदा मातेचे दर्शन घेऊन आलो . याला फतेहगड म्हणत असले तरी हे टिघरीया नावाचे गाव होते . नर्मदा मंदिरामध्ये आठ परिक्रमा केलेले एक जोडपे आश्रमाची व्यवस्था पाहत होते . तिथे दर्शन घेऊन मौनी बाबा त्यागीजी यांच्या आश्रमामध्ये आलो . आश्रम म्हणजे एक मोठा कट्टा होता . त्यावर एक मोठी खोली बांधलेली होती . आणि समोर मोकळा परिसर होता . परंतु या आश्रमाचे वैभव होते त्यागीजी ! अतिशय समर्पित साधू ! आदर्श साधू कसा असावा याचा एक वस्तू पाठच नर्मदा मातेने मला या मौनी बाबांच्या रूपाने दाखवून दिला . मी काठाने चालत आलो आहे कळल्यावर बाबांना फारच आनंद झाला ! तो काठ किती कठीण आहे याची त्यांना कल्पना होती ! तिथे थोड्यावेळाने सडक मार्गाने अजून एक साधू आला . हा साधू बोगस आहे असे मला मौनी बाबांनी सांगितले . बोगस साधू याचा अर्थ साधूची वस्त्रे आणि अवतार धारण केलेले काही लोक असतात ज्यांना आखाड्यांची मान्यताच नसते . ती स्वतःच साधू म्हणून घोषित करून राहू लागतात . अशा साधूंनी काही गडबड गोंधळ केला तर त्यावर कोणाचेच नियंत्रण राहत नाही . म्हणून आखाड्याचे साधू अशा साधुंशी फटकून वागतात . थोड्यावेळाने सागर जिल्ह्यातील एक तरुण परिक्रमा वासी आला . हा तरुण थोडासा वेडसर होता . आणि अत्यंत चिकट गुंडा होता . मला चिकटण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्या तरुणाला मी दुसऱ्या साधू बरोबर जोडून दिले . मुळात अपूर्ण असल्यामुळे साधू त्याला ज्ञान शिकवू लागला . दोघांची चांगली गट्टी जमली . जशास तसा शिष्य मिळाला ! हा आश्रम प्रत्यक्षामध्ये त्या गावातील सरपंचांचा आश्रम होता . सरपंच जाट समाजाचा होता . या संपूर्ण भागात जाट आणि गुजर लोकांची खूप वस्ती आहे . सरपंच काय हवे नको ते मौनी बाबांना आणून द्यायचा . मौनी बाबांनी पूर्वी कधीतरी मौनाचे व्रत केल्यामुळे त्यांना ते नाव पडलेले होते . बऱ्याच वेळेला लोकांना प्रश्न पडतो की नाव मौनीबाबा मग बोलतात कसे काय ? म्हणून सांगितले . बाबांचा खूप चांगला सत्संग घडला . त्यांना स्वयंपाकामध्ये मदत केली . स्वयंपाक करताना साधू अत्यंत एकाग्र झालेले असतात . त्यावेळी ते जे काही बोलतात ते ऐकण्यासारखे असते . साधू महाराजांनी मला खूप चांगला उपदेश केला . साधू जीवन कसे कठीण आहे याची कल्पना दिली . थोड्यावेळाने सरपंच आणि त्याचा मुलगा आमच्याशी गप्पा मारायला येऊन बसले . मगाशी मला खाली भेटलेला जेसीबी वाला तरुण ज्याचे नाव ओम होते तो सरपंचांचा मुलगाच होता . परंतु त्याने मला आमचा आश्रम आहे असे सांगितले नाही यातच सर्व आले ! या परिसराची माहिती मी दोघांकडून घेतली . समोर असलेला जोगा किल्ला हा चांडेल वंशातील जोगा नावाच्या जाट राजाने बांधला होता .त्याचा भोगा नावाचा भाऊ होता . तो मारला गेल्यावर जोगा राजा संपूर्ण निमाड प्रांताचा राजा झाला . पुढे मुघलांचे व नंतर मराठ्यांचे राज्य येईपर्यंत हा किल्ला जाटांच्या ताब्यात होता . हा किल्ला खूप उंच होता . परंतु इंदिरा सागर जलाशयामुळे आता याचा थेट वरचा भाग दिसू लागला होता . बराचसा किल्ला बुडून गेला आहे . हा किल्ला कागदोपत्री हरदा जिल्ह्यामध्ये येतो . परंतु नर्मदा माता याच्या दोन्ही बाजूने वाहते आहे . देवासच्या बाजूला अर्थात उत्तर तटावर नर्मदा मातेचे मुख्य पात्र आहे . आणि दक्षिणेला छोटीशी शाखा आहे . त्यामुळे हा किल्ला दुर्गम आहे . जोगा राजाने एका गुजर महिलेशी लग्न केल्यामुळे या भागात जाट आणि गुजर समाजाची संख्या जास्त आहे .साधारण ८oo वर्ष जुना किल्ला आहे . बेटावर असल्यामुळे अर्थातच परिक्रमावासी इथे जाऊ शकत नाहीत . परंतु अलीकडे या दुर्गाच्या दुर्गमतेचा फायदा घेत अनेक लोक तिथे असलेला गुप्त खजिना शोधण्याच्या नावाखाली तिथे तुरुंगांचे स्फोट करत आहेत . त्यामुळे हा ऐतिहासिक किल्ला पुरातत्त्व विभागाने लवकरात लवकर ताब्यात घेणे आवश्यक आहे . या किल्ल्यावर काही मंदिरे समाधी आणि गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत . किल्ल्याची तटबंदी आणि दरवाजे आजही मजबूत आहेत . होशंग शहाने हा किल्ला ताब्यात घेऊन याचे बरेच नुकसान केले होते . गेल्या काही दशकातील सरकारने तर हा किल्ला जलमग्नच करून टाकला . आता उरला सुरला किल्ल्याचा भाग तरी वाचवला पाहिजे असे वाटते . असा एखादा किल्ला युरोप किंवा अमेरिकेमध्ये असता तर तो किती सुंदर पद्धतीने जपला गेला असता ! आपल्या मानसिकतेमध्ये अमुलाग्र बदल होणे खरोखरीच आवश्यक आहे . त्याशिवाय आपण या जगामध्ये एक महासत्ता म्हणून उदयाला येऊ शकत नाही . असो . आपल्या प्रथेप्रमाणे या भागाचे थोडेसे चित्ररूप दर्शन घेऊयात .
हा परिसर अतिशय रम्य असा आहे . दातुनी नदीचा संगम आणि नर्मदा मातेचा विस्तीर्ण जलाशय मन मोहून टाकतो .आपण पूर्वी पाहिले त्याप्रमाणे याच्या आधी सर्व वनप्रदेश असल्यामुळे नर्मदा मातेचे दर्शन घेण्यासाठी बरेच अंतर गेल्यावर चा हा पहिलाच घाट आहे . त्यामुळे इथे पर्व काळामध्ये मोठी गर्दी असते .
परंतु या घाटावरील मला सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे श्री मौनीजी त्यागी महाराज ! हे स्वतः विषयी काहीही बोलत नाहीत . केवळ परिक्रमा वासींची मनोभावे सेवा करतात . अत्यंत मृदू आणि प्रेमळ स्वभाव आहे .स्वतःच्या बाबतीत मात्र अत्यंत कर्मठ आणि कठोर आहेत .
यांनी चालविलेला सिताराम आश्रम त्यामुळेच वेगळा ठरतो आणि लक्षात राहतो .
इथे काठावर असे सटकलेले मोठे दगड असून त्यातीलच एका दगडाला देव करून पूजा केली जाते .
प्राचीन नर्मदा मंदिर बघण्यासारखे आहे .
समोर असलेला जोग गड किंवा किल्ला लक्ष वेधून घेतो .
हा प्राचीन किल्ला असून याची तटबंदी अजून सुरक्षित आहे .
नर्मदा मंदिर आणि संगम परिसर देखील उंचावर आहे .
अतिशय सुंदर अशी भोजन प्रसादी घेतल्यावर रात्री झोपी गेलो . पहाटे लवकर उठून हा संगम पार करण्यासाठी काठावर आलो . तेव्हा माझ्या असे लक्षात आले की ओम जाटने रात्री जाताना नावांचा पुल करून ठेवलेला होता ! सर्व नाव वाले त्याच्या शब्दावर चालतात असे मी काल पाहिले होतेच . त्याने नावांचा पुल करून ठेवलेला असल्यामुळे अतिशय सहजपणे मी हा संगम पार केला ! एका नावेतून दुसऱ्या नावे उडी मारताना भीती वाटत नव्हती . या भागातील नावादेखील मोठ्या आणि मजबूत आहेत . प्रचंड रेती उचलावी लागत असल्यामुळे त्यांची बांधणी मजबूत असते . मौनी बाबांना जेव्हा मी कोल्ह्यांनी मला रस्ता दाखवण्याचा प्रसंग सांगितला तेव्हा त्यांनी मला तत्काळ सहमती दर्शवली . कारण त्यांना देखील इथे येताना दोन कोल्ह्यांनीच मार्ग दाखवला होता . बाबांनी त्यामुळेच मला अतिशय पोट तिडकीने आणि मनापासून उपदेश केला . साधू दिसती वेगळाले । परि ते स्वरूपी मिळाले । असे रामदास स्वामी म्हणतात . अर्थात साधू जरी वरून वेगळे वेगळे वाटले तरी सर्वांचा आत्माराम एकच असल्यामुळे आणि सर्वांना एकच बोध झालेला असल्यामुळे त्यांच्या उपदेशांमध्ये कमालीचे साम्य असते . बाबांनी सांगितलेली एक एक गोष्ट मनामध्ये घटवत एकेक पाऊल टाकू लागलो . नर्मदा परिक्रमेमध्ये मिळणारी सर्वात अनमोल गोष्ट कुठली असेल तर तो हा दुर्मिळ सत्संग आहे . नर्मदा मातेच्या काठावर राहून तप करीत सहजवृत्तीने साधूंनी केलेला बोध हा केवळ एकमेवाद्वितीय असतो ! कुठल्यातरी एका हिंदी चित्रपटातला संवाद मला नेहमी आठवतो .
नर्मदे हर 🙏🙏🙏
उत्तर द्याहटवानर्मदे हर🙏🙏🙏🙏🙏🙏
उत्तर द्याहटवा