लेखांक १४७ : कश्यप ऋषी आश्रम व च्यवन ऋषी आश्रमादरम्यान आलेला पट्टेरी वाघाचा थरारक अनुभव

च्यवन ऋषींचा आश्रम सोडला आणि घनघोर अरण्य सुरू झाले . या अरण्यातून जाणारी एक छोटीशी पायवाट होती . म्हणजे तशी एखादी जीप गाडी जाऊ शकेल असा कच्चा मातीचा रस्ता होता परंतु पालापाचोळा पडल्यामुळे आणि गवत उगवल्यामुळे रस्ता जणूकाही लपलेला होता . आजूबाजूचे जंगल अतिशय हिरवेगार आणि घनदाट होते . मला अशा जंगलातून एकट्याने चालायला फार आनंद मिळतो ! आपण स्वतः निसर्गाचा एक भाग आहोत याची जाणीव अशा ठिकाणी आल्यावर आपोआप होते . एरव्ही आपण आपल्या भोवती उभ्या केलेल्या सुख सुविधा आपल्याला निसर्गापासून वेगळे तोडून काढत असतात ! फ्रिजमध्ये चांगल्या दर्जाच्या आंतरराष्ट्रीय पॅकिंग मध्ये ठेवून दिलेला हापूस आंबा आणि झाडावर लटकलेला पाड आलेला हापूस आंबा यात जो फरक आहे तोच फरक एसीच्या झोतामध्ये सिमेंट काँक्रीटच्या जंजाळात अडकलेला सुखासीन  मनुष्य आणि जंगलात भटकणारा मनुष्य यांच्यामध्ये आहे असे मला वाटते .वरील उदाहरणातील सुखे उपभोगणारे दोन्ही जीव एक ना एक दिवस कोणाच्यातरी आनंदासाठी कापले जाणार हे निश्चित असते . उलट जंगलामध्ये असणारे जीव यथेच्छ आनंद उपभोगत त्यांच्या इच्छेने कधीतरी गळून पडतात आणि पुन्हा मातीतूनच मोठ्या जोमाने उगवतात ! तीन किलोमीटर अंतर कापायचे म्हणजे माझ्या सरासरी गतीनुसार मला एक तास लागणार होता . सूर्याने आज बहुतेक त्याची गती दुप्पट केली आहे की काय असे वाटत होते ! इतक्या वेगाने अंधार वाढू लागला होता . शहाण्या माणसाने काय वाटेल ते करावे परंतु संधीकाळामध्ये जंगलामध्ये भटकू नये हे मी अनेक अनुभवांती शिकलेलो होतो . निसर्गाचे स्वतःचे कायदे असतात .तुमची फिरण्याची जी वेळ आहे त्या वेळेमध्ये तुम्हाला निशाचर प्राणी कधीही त्रास देणार नाहीत . उलट समोर आलेच तर घाबरून पळून जातील . परंतु एकदा का त्यांची फिरण्याची वेळ सुरू झाली की मात्र तुमची काही गय नसते ! त्यामुळे अंधार पडायच्या आत मला काहीही करून आश्रम गाठणे आवश्यक होते .त्यामुळे मी माझी चालण्याची गती दुप्पट केली . इथे एक गमतीशीर किस्सा घडला ! एका ओढ्यामध्ये एक मनुष्य मासे धरत बसला होता . मी चालत आलोय आणि त्याच्या मागे उभा राहिलोय हे त्याच्या लक्षातच आले नाही .माझा रस्ता नक्की बरोबर आहे ना हेच मला त्याला विचारायचे होते . मला अचानक पाहून तो मनुष्य इतका घाबरला की जोरात ओरडून दचकून त्याचा तोल गेला ! माझ्यासाठी हे अनपेक्षित होते . परंतु या एका घटनेवरून मला लक्षात आले की इथे कोणीच येत नाही . माझे तिथे असे अचानक संध्याकाळच्या वेळी येणे त्याला अपेक्षित नसावे . नंतर तो सावरला आणि त्याने मला मार्ग सांगितला .परंतु तो खरोखरच खूप घाबरला होता हे मात्र निश्चित ! पुन्हा मी पुढे चालू लागलो . मी निम्मे अंतर गेलो असेन आणि अचानक मागून मोठमोठ्या गाड्या जाऊ लागल्या . इनोवा , स्कॉर्पिओ , एंडेवर , लँडरोव्हर , थार अशा गाड्यांचा जवळ एक ताफाच आश्रमाकडे निघाला होता . गाडीमध्ये सर्व तरुण बसलेले होते . आणि अतिशय बेदरकारपणे जंगलातून गाडी चालवली जात होती . असे गाडी चालवणे चालकासाठी सुखदायक असू शकते परंतु जंगलातील वन्य श्वापदांसाठी हे खूप धोकादायक असते . एखादे जनावर अचानक मध्ये आले तर त्याला मरण्याशिवाय दुसरा पर्याय शिल्लक राहत नाही . अशा प्रकारचे प्राणी या जंगलातून धावत आहेत असे पाहिल्यावर प्राणी जंगलाचा तो भाग सोडून जाण्याची शक्यता फार असते .त्यामुळे असे कधीच करू नये .मी आपला बाजूला एका झाडाच्या मुळावर बसून राहिलो . गाड्या इतक्या वेगात होत्या की त्यांना बाजूला एखादा परिक्रमा वासी बसला आहे हे देखील लक्षात आले नाही . मी बसलो होतो ते झाडाचे मूळ मात्र लक्षात राहिले ! गोलाकार खुर्चीचा आकार त्या मुळामध्ये नैसर्गिक रित्या तयार झाला होता !

योगायोगाने गुगल नकाशावर त्या झाडाचा फोटो कोणीतरी टाकलेला सापडला ! पाठीवर असलेल्या सामानासकट आराम खुर्ची प्रमाणे मी या मुळांवर काही काळ बसलो होतो .


 कश्यप ऋषींचा आश्रम कुठावाँ अथवा कोठावा नावाच्या गावात आहे . च्यवन ऋषी आश्रमामध्ये केरळी संन्यासी आणि बंगाली बाबा सुद्धा मला भेटले होते . या दोघांच्या सोबत राहण्यापेक्षा एकट्याने कश्यप आश्रम गाठलेला उत्तम ,असा विचार देखील मी केलेला होताच . परंतु कश्यप ऋषींच्या आश्रमात पोहोचल्यावर मला कळले की माझ्या आधीच बंगाली बाबा इथे येऊन बसलेला आहे ! हा एक अर्ध संसारी बंगाली साधू होता ! अर्ध संसारी म्हणायचे कारण म्हणजे वेश साधूचा होता परंतु चर्चा संसारी माणसासारख्या असायच्या ! गांजाची प्रचंड आवड होती . आणि दम्याचा त्रास विकोपाला गेला असूनही धूम्रपान काही सुटत नव्हते . बोलताना सुद्धा त्या माणसाला दम लागायचा . परंतु चेहरा मात्र सतत हसतमुख असायचा . तेवढीच एक जमेची बाजू होती ! आश्रम अतिशय रमणीय होता . बांधकाम कमी होते आणि मोकळी जागा जास्त होती . मी धावतच मैयाच्या दर्शनाला गेलो . कारण अंधार पडला असता तर अवघड झाले असते . नर्मदा मातेचे ते धीर गंभीर रूप पाहून भान हरपले . समोरच ओंकार मांधात पर्वत दिसत होता .मुख्य म्हणजे ओंकारेश्वराचे मंदिर थेट समोर दिसत होते ! सर्वात उजवीकडे सातपुडा पर्वत , त्याच्यानंतर येणारा नर्मदा मातेचा प्रवाह , डावी कडे विंध्य पर्वत त्यानंतर येणारा कावेरी मातेचा प्रवाह  , या दोन्ही नद्यांचा संगम आणि त्याचा साक्षीदार असलेला , मध्ये च दिमाखात उभा असलेला ओंकार मांधात पर्वत , असे रम्य दृश्य जिथून दिसते अशी नर्मदा खंडातील एकमेव जागा म्हणजे कश्यप ऋषींचा आश्रम होय ! त्यामुळे इथे प्रत्येक परिक्रमा वासीने गेलेच पाहिजे असे मला मनापासून वाटते .माझ्याकडे कॅमेरा नव्हता त्यामुळे मी या चित्राचे एक साधे सुधे रेखाटन माझ्या वहीमध्ये काढून ठेवले . अर्थात या पवित्र ठिकाणी जाण्यापूर्वी निसर्गामध्ये वावरतानाचे नियम समजून घेऊन मगच गेले पाहिजे हे ही खरे . कारण इथला निसर्ग अजूनही जिवंत आहे . त्याला धक्का लावण्याचे पाप आपल्या हातून घडू नये इतकेच वाटते . कावेरी मातेचा मूळ प्रवाह ओंकारेश्वर धरणामध्ये पाच किलोमीटर मागे आहे परंतु तिथे सोडलेला नारळ इथेच वाहत येतो यावरून तिचे पाणी इथपर्यंत आले आहे याचा शोध लोकांना लागलेला आहे . इथे आजही अनेक लोक स्नानासाठी येत असतात .ओंकार पर्वता वर दिसणारे पुरातन मंदिर , एकीकडे ओंकारेश्वराचे मंदिर , अलीकडे दिसणारा तुटका पूल , मग ओंकारेश्वर ला घेऊन जाणारा झुलता पूल असे सर्व इथून दिसते .आता इथून शंकराचार्यांची जी नवीन मोठी मूर्ती मांधात पर्वतावर उभी करण्यात आली आहे ती देखील दिसत असणार . इथे आजही धरणाचे पाणी सोडण्यापूर्वी भोंगे वाजतात आणि त्यानंतर अचानक पाण्याची पातळी वाढू लागते . मी संध्याकाळी स्नानासाठी पाण्यात उतरलो तेव्हा जी पातळी होती ती सर्वात उतरलेली पाण्याची पातळी होती . इथे माझ्या आधीच एक संन्यासी महाराज येऊन बसले होते .त्यांचे नाव ब्रह्मनिष्ठ गिरी स्वामीजी असे होते आणि हे हरिद्वारचे होते . नावाप्रमाणेच अतिशय ब्रह्मनिष्ठ असा हा साधू होता . एक गमछा गुंडाळून ते निवांत नर्मदा मैय्याकडे पाहत बसले होते .मीच त्यांच्याशी आपण होऊन बोललो म्हणून ते बोलले नाही तर त्यांना कोणाशी बोलायची इच्छा देखील नव्हती व गरजही नव्हती अशा सुंदर अवस्थेमध्ये ते पोहोचलेले होते . इथे समोरच असलेल्या मौनी आश्रमानाजीक मला बिबट्याने दर्शन दिले होते हे मला तो किनारा पाहिल्या क्षणी आठवले . 

गुगल नकाशावर कोणीतरी कश्यप ऋषी आश्रमाच्या जागी ह्याच काठावरून काढलेला एक सुंदर फोटो टाकलेला आहे . ज्यामध्ये समोरच्या काठावर येऊन पाणी पिणारा बिबट्या दिसतो आहे . कदाचित मला भेटलेला बिबट्या हाच असेल .

साधूंना मी तो प्रसंग सांगितला . ते माझ्या आधी काही दिवस इथे येऊन राहिलेले होते त्यामुळे त्यांना त्याचे काहीच विशेष वाटलेले मला दिसले नाही . मी त्यांना म्हणालो की तुम्हाला बिबट्या वगैरे काही दिसला का ? ते म्हणाले बिबट्या इथे कशाला फिरणार आहे ? सध्या इथे पट्टेरी वाघाचा वावर आहे . मला त्यांचे बोलणे अतिशयोक्तीचे वाटले . परंतु वाघाचा विषय निघाल्यावर ते मला म्हणाले की आता आपण आश्रमामध्ये गेले पाहिजे कारण वाघाला पाणी पिण्यासाठी खाली यावे लागेल . आमच्या मागेच मोठा डोंगर होता आणि त्यावर प्रचंड झाडी होती . त्यामुळे मी साधुशी बोलत बोलत पुन्हा आश्रमामध्ये आलो आणि अजून काही वेळ एका कट्ट्यावर बसून त्यांचा सत्संग प्राप्त केला .  या संपूर्ण आश्रमामध्ये प्रचंड कष्ट करणारा एक कष्टाळू साधू होता जो पंडितांसारखा दिसायचा . तोच इथे गोसेवा करायचा आणि पुजारी देखील तोच होता . बाकी महंत आणि बाकीचे सेवेकरी लोक निवांत आणि आनंदी होते . हा साधू मात्र प्रचंड कष्टाळू होता . त्याची  माझी नाळ लगेचच जुळली .काही काळ त्याच्यासोबत राहून मी गोसेवा केली . 



कश्यप ऋषी आश्रमाचा परिसर
आश्रमाच्या बाहेर चरणाऱ्या गाई
आश्रमातून होणारे ओंकार पर्वताचे मनोहर दर्शन . 

आश्रमामध्ये स्वयंपाक करणारे परिक्रमा वासी

इथे मघाशी ज्या गाड्या माझ्या पुढे गेल्या ते सनावद वरून आलेले काही लोक होते . जे इथे कसली तरी पूजा करण्यासाठी म्हणून आलेले होते .त्यांनी खूप छान पूजा केली .तिथे मी काही काळ बसलो . यांच्यातला एक पुढारी असल्यासारखा तरुण होता व बाकी सर्व त्याचे मित्र होते . या सर्वांशी काही काळ मी गप्पा मारल्या . या सर्वांनी मला नारळ ,एक आंबा आणि दक्षिणा दिली . याच लोकांनी रात्रीचा स्वयंपाक केला व भोजन प्रसादी दिली . रात्री उशिरा सर्वजण निघून गेले .रात्री मी बाहेरच उघड्यावरती झोपलो .इथे माकडे खूप आहेत . ती देखील आश्रमाच्या जवळपास येऊन झोपतात . त्या रात्री एक भयंकर घटना घडली . आश्रमातील गोशाळेमध्ये शिरून वाघाने दावणीला बांधलेली एक गाय तोडून नेली . ही घटना माझ्यापासून काही फूट अंतरावर घडली आणि मला पत्ता देखील लागला नाही . इतका वाघ त्याच्या कामामध्ये अचूक असतो . मला त्या रात्री फारच गाढ झोप लागली होती .सकाळी मी उठलो तेव्हा आश्रमातील कर्मचाऱ्यांची गडबड उडालेली माझ्या लक्षात आली. मी स्वतः जाऊन तो सर्व भाग बघून आलो . वाघाने गाईला ओढून नेतानाच्या खुणा तिथे उठल्या होत्या . शेण चाऱ्यातून गाय फरफटत नेलेली दिसत होती . काही अंतरावर रक्त देखील पडले होते असे लोकांनी सांगितले . परंतु प्रसंग ताजा असल्यामुळे मी तिकडे जाण्याची हिंमत केली नाही . मी स्नानासाठी नर्मदा मातेवर गेलो आणि तिथले दृश्य पाहून हबकलोच ! काल मी ज्या घाटावर ज्या दगडावर बसून स्नान केले होते तो सर्व भाग पाण्यामध्ये जलमग्न होऊन गेला होता सुमारे दहा-बारा फूट पाण्याची पातळी वाढली असावी असा माझा अंदाज आहे . पाणी अतिशय स्वच्छ होते काचेपेक्षाही स्वच्छ म्हणले तरी चालेल ! अक्षरशः तळ दिसत होता ! त्यात मी कालच स्नान केलेले असल्यामुळे खालचे दगड कसे आहेत ते मला माहिती होते त्यामुळे मी एकदा पाण्याखाली जाऊन ते सर्व दगड पाहून देखील आलो . परंतु पाण्याला चांगली ओढ असल्यामुळे पुन्हा वर आलो . मनसोक्त स्नान केले . साधु महाराज पुन्हा एकदा काठावर येऊन त्यांच्या नेहमीच्या जागी बसले . इतक्यात इथे तीन-चार ग्रामस्थ आले व त्यांनी साधू महाराजांना नमस्कार केला व दक्षिणा दिली . मला देखील पाण्यातून बाहेर बोलवले . मी त्यांना म्हणालो की मला दक्षिणा देऊ नका साधू महाराजांना द्या . मग त्यांनी माझ्या वाटची दक्षिणा पुन्हा एकदा साधू महाराजांनाच दिली .त्यांचे या सर्व प्रकारकडे अजिबात लक्ष नव्हते .अतिशय निर्विकार पणे ते नर्मदा मातेच्या प्रवाहाकडे पाहत बसले होते . गावाकडून आलेल्या लोकांनी माझ्यासोबत भरपूर फोटो काढून घेतले . मी देखील त्यांचे काही फोटो काढले. मी त्यांना ते माझ्या मित्राच्या क्रमांकावर पाठवावे अशी विनंती केली . हे फोटो पाहिल्यावर तुम्हाला तो परिसर कसा होता याचा थोडासा अंदाज येईल .


या चित्रांमध्ये आपल्याला नर्मदा मातेचे स्वच्छ नितळ निर्मळ पाणी दिसते आहे पहा ! प्रस्तुत लेखकाच्या शेजारी बसलेले साधू म्हणजे ब्रह्मनिष्ठ गिरी महाराज आहेत . मालसर येथील कनकेश्वरी आश्रमामध्ये मला मिळालेला गमछा मी गुंडाळलेला आहे .
प्रस्तुत लेखकाच्या मागे दिसतो आहे तो ओंकार मांधात पर्वत आहे आणि त्याला जोडणारा पूल देखील आपल्याला दिसतो आहे .
डावीकडे विंध्य पर्वत आहे तर उजवीकडे सातपुडा पर्वत आहे . डावीकडून कावेरी माता येथे आहे तर उजवीकडून नर्मदा माता  येते आहे . 


याच दृश्याचे मी रात्री वहीमध्ये काढलेले रेखा चित्र देखील सोबत जोडतो आहे . बाणाने दाखवलेली जागा म्हणजे नारळ वाहत येतो ती जागा आहे .

इतका वेळ छायाचित्रणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या ब्रह्मनिष्ठ गिरी स्वामींचा चेहरा या चित्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल . ब्रह्मनिष्ठ संतांचे दर्शन आवर्जून घ्यावे .
वरवर एकसारखी दिसणारी ही चित्रे प्रत्यक्षामध्ये वेगवेगळे फोटो आहेत आणि ते संग्रही राहावेत म्हणून मी सर्व इथे टाकत आहे . तरी कृपया क्षमा करावी .प्रत्येक फोटोमध्ये काहीतरी वेगळे आपल्याला नक्की पाहायला मिळेल असा विश्वास वाटतो .
फोटो काढणाऱ्या तरुणांनी अतिशय अल्प काळामध्ये अनेक प्रकारची सेटिंग बदलून बरेच फोटो काढले हे मला नंतर घरी आल्यावर ही चित्रे पाहताना लक्षात आले .
याच ठिकाणी मी खाली उतरून काल स्नान केले होते . 
माझे फोटो काढणारी हीच ती चार ग्रामस्थ मंडळी . हे जवळपासच्या भागातून कुठून तरी नर्मदा मातेच्या दर्शनासाठी या आश्रमामध्ये नेहमी येतात .
यांच्या मागच्या बाजूला जो डोंगर दिसतो आहे त्याच ठिकाणी दक्षिण तटावर मी काही काळ मार्ग भटकलो होतो व नंतर मला बिबट्याने दर्शन दिले होते .
उजव्या बाजूचा डोंगर म्हणजे विंध्य पर्वत असून इथेच घनदाट अरण्य आहे .
सर्वात डावीकडे उभा असलेला मनुष्य म्हणजे बंगाली साधू आहे . मला बंगाली भाषा येते आहे हे कळल्यामुळे तो माझ्याशी अतिशय प्रेमाने वागायचा . 
नर्मदा माता कावेरी माता संगमाचे अतिशय विहंगम दृश्य या चित्रात आपल्याला पाहायला मिळते
हा बंगाली साधू अधून मधून मला भेटत असे . आताही मी इथे येणार हे त्याला माहिती असल्यामुळेच तो माझ्या आधी इथे येऊन थांबला होता .माझ्या डोक्याच्या मागे तुम्हाला ओंकारेश्वर चा पूल आणि मंदिर दिसेल तसेच सतत झोळी खांद्यावर लटकवून चालल्यामुळे झोळीच्या बंधांचे खांद्यावर उठलेले वळ आपल्याला स्पष्टपणे दिसतील .
या चित्रामध्ये आपल्याला काठाने येण्याचा मार्ग दिसतो आहे पाणी उतरल्यामुळे मार्ग निर्माण झालेला आहे परंतु पाण्याची पातळी वाढल्यावर मात्र जंगलातून चालावे लागते व मार्ग बंद होऊन जातो . तसेच हिंस्र श्वापदे असल्यामुळे हे जंगल फारच भयानक आहे .

इथे येईपर्यंत माझे दहा पंधरा किलो वजन सहज कमी झालेले होते . माझा दंड देखील तुम्हाला या चित्रात पाहायला मिळेल जो सर्व साधुसंतांना आवडायचा .
या चित्रामध्ये आपल्याला पाण्याची वाढून कमी झालेली पातळी लक्षात येईल तसेच मागचे जंगल देखील कसे आहे लक्षात येईल . इथूनच पुढे परिक्रमेचा मार्ग बंद झालेला आहे कारण ओंकारेश्वर धरणामुळे मोठा जलसाठा निर्माण झालेला आहे . 
या चारही ग्रामस्थांच्या मागे जो ओंकार मान्धात पर्वत दिसतो आहे त्याला लागूनच ओंकारेश्वर चा बांध आहे .
ब्रह्मनिष्ठ गिरी महाराज फोटोसेशन चालू झाल्याबरोबर निघून गेलेले आपल्या लक्षात येतील . हे वैराग्याचे मुख्य लक्षण आहे .
संसारी माणसांना मात्र फोटो काढायची भारी हौस असते . ती आम्ही सर्वांनी भागवून घेतली .
शेवटी कंटाळून मी त्यांना सांगितले की आता बास करा . मला पुढे मार्गस्थ व्हायचे आहे . वाघाने आश्रमाची गाय खाल्ल्याचे कळल्यामुळे मी थोडासा अस्वस्थ झालो होतो . काल जंगलातून चालताना मला कोणीतरी आपल्या सोबत झाडीतून चालते आहे असा भास एक दोनदा झाला होता तो हाच वाघ होता की काय असा प्रश्न मला पडला ! चारपाचशे किलो वजनाची गाय जर त्याने मारली असेल तर तिला घेऊन तो काही फार लांब जाणार नाही . जवळच बसून खात असणार .असा अंदाज मी लावला . आता अधिक वेळ न दवडता इथून पुढे मार्गस्थ व्हावे असे मी ठरवले आणि आश्रमातून निघालो . डोक्यात सतत वाघाचेच चिंतन होते . वाघाची दहशत कशी असते पहा . जोपर्यंत जंगलामध्ये एक वाघ आहे तोपर्यंत आजूबाजूचे लोक शक्यतो विनाकारण भटकायला जंगलात जात नाहीत . हे मी स्वतः अनुभवले आहे . भाबरीच्या आश्रमामध्ये सेवेसाठी थांबलेला असताना तिथे समोरच एकदा मोसडा पावरा याला वाघाचे दर्शन झाले होते . त्यानंतर पंधरा दिवस कोणीही त्या डोंगरावर गुरे घेऊन चारायला जात नव्हते . एक वाघ असला की एक जंगल सुरक्षित राहते . एक मगर असली तर नदी सुरक्षित राहते . एक कर्तव्यनिष्ठ अधिकारी असला की शहर सुरक्षित राहतो . एक कडक शिस्तीचे गुरुजी असले की शाळा सुरक्षित राहते . मी स्वतः अनुभवले आहे . आमच्या मूळ गावी आमचे घराणे पिढीजात शिक्षकांचे होते . जोपर्यंत माझे आजोबा हयात होते , जे स्वतः गावातील सर्व इयत्तांच्या सर्व मुलांची शाळा घ्यायचे , तोपर्यंत गावातील मुले अतिशय सदाचारी ,निर्व्यसनी आणि कर्तबगार होती . गांधी हत्येनंतर आपल्याच विद्यार्थ्यांनी आपला वाडा जाळला याचे दुःख सहन न होऊन आजोबांनी जेव्हा गावाच्या कल्याणातला रस काढून घेतला , तिथून पुढे मात्र गावातील विद्यार्थ्यांवर कोणाचा वचकच राहिला नाही .वाटेकऱ्यांना कसायला दिलेल्या शेकडो एकर जमिनी त्यांच्याच नावावर करून आजोबांनी गाव कायमचे सोडले . त्यानंतर त्या गावाची अवस्था वाघ नसलेल्या जंगलासारखी झाली . आपल्यावर लक्ष ठेवणारे ,आपल्यावर वचक ठेवणारे , अचानक कुठूनही समोर प्रकट होऊन जाब विचारणारे कोणी आहे ही भावनाच माणसाला शिस्तीने आणि संस्काराने वागायला भाग पाडत असते . आताही माझे तेच झालेले होते . कालपर्यंत ज्या जंगलाचा मी आनंद घेत होतो आज मला ते जंगल भयावह वाटू लागले होते . जणु काही प्रत्येक झाड मला खायला उठलंय की काय असा भास होत होता ! वाघ अचानक समोर आलाच तर मी काय काय करेन याची मी मनात तयारी करून ठेवत होतो . दंड उगारीन ,हात वर करून उभा राहीन , झाडावर चढून जाईन ,पळून जाईन , असे अनेक उपाय मी मनातल्या मनात करून पाहिले आणि मग माझ्या लक्षात आले की यातला कुठलाच उपाय फारसा कामाचा नाही ! कारण प्रत्येक बाबतीमध्ये वाघ माझ्यापेक्षा श्रेष्ठ असणार होता . त्यापेक्षा अधिकाधीक वेगाने हे जंगल पार करणे हीच सोपी आणि माझ्या हातात असलेली एकमात्र गोष्ट होती . अधिक वेगाने चालले तर पायाचा आवाज वाढायचा तो देखील धोकादायक होता त्यामुळे एक मर्यादित गती पकडून मी चालू लागलो . साधारण दीड एक किलोमीटर अंतर मी चाललो असेन . एका सुकलेल्या ओढ्या वरचा छोटासा पूल लागला .आणि जे होऊ नये ते झालेच ! एका गगनभेदी डरकाळीने सारे जंगल हादरवून सोडले ! क्षणात पशुपक्षी आणि माकडे वगैरे वाघ आल्याचे इशारे देऊ लागले . परेड मध्ये सावधान म्हटल्यावर पलटण जशी एका जागीच स्तब्ध उभी राहते तसा त्या डरकाळी मुळे मी क्षणात एका जागी स्तब्ध उभा राहिलो .वाघ आपल्या अंगावर चालून आला तर आपली काय अवस्था होते याचा एकदा मी लहानपणी अनुभव घेतलेला होता . पूर्वी पुण्यामध्ये असलेल्या पेशवे पार्क या उद्यानामध्ये प्राणी ठेवलेले असायचे .पुढे जागा कमी पडू लागल्यामुळे त्यांना कात्रजच्या सर्पोद्यानात हलविण्यात आले. तिथे एक अतिशय मोठा पांढरा वाघ ठेवलेला होता . अकरावी बारावी मध्ये असताना कॉलेजमधून वेळ काढून कधीतरी मी ते प्राणी पाहायला म्हणून सहज जायचो . तसा एकदा मी त्या पिंजऱ्यापुढे उभा होतो . आणि अचानक तो वाघ माझ्या दिशेने धावत येतो आहे असे मला दिसले ! वाघाच्या आणि माझ्या मध्ये चांगली लोखंडी जाळी व पिंजरा होता परंतु वाघाने माझ्या दिशेने जी काही झेप मारली ती पाहून माझ्या दोन्ही पायातले बळ गेले आणि मी मटकन मांडी घालून खाली बसलो .हे सर्व अचानक झाले . नंतर असे लक्षात आले की माझ्यामागे त्या वाघाला रोज डिवचणारा एक कर्मचारी उभा होता त्याला पाहून वाघ झेपावला होता .आणि मी नेमका त्या दोघांच्या मध्ये असल्यामुळे माझी अशी अवस्था झाली होती . परंतु त्यामुळे वाघ समोर आल्यावर आपल्या पायातले बळ कसे निघून जाते हे मी स्वतः अनुभवलेले आहे . अक्षरशः तुम्हाला तुमचा पाय देखील उचलता येत नाही अशी पायांची अवस्था होऊन जाते . अर्धांग वायूचा झटका आल्यावर मनुष्याची एक बाजू कशी लुळी पडते तसे काही काळापुरते तुमचे शरीर लुळे पडते . बहुतेक तुमच्या शरीराच्या हालचाली करण्यासाठी आवश्यक असलेला वातच स्तंभित होऊन जातो .असे काहीतरी हे असणार आहे . तेव्हा मध्ये जाळी तरी होती ! आता मी जाऊन जाऊन जाणार कुठे ? वाघाच्या पहिल्या डरकाळी मुळे मी जागेवर उभा राहिलो . आणि क्षणात एका मागोमाग एक अशा मोठ मोठ्या डरकाळ्या फोडायला त्याने सुरुवात केली ! बहुतेक रात्रभर त्याने गाय खाल्ली असेल आणि आता पोट भरल्यावर जंगलामध्ये दहशत माजवून मीच या क्षेत्राचा राजा आहे असे सांगण्याचा प्रयत्न ते मुके जनावर करीत असावे .परंतु या प्रकाराचा परिणाम माझ्यावरती असा झाला की काही कळायच्या आत माझ्या सर्वांगाला दरदरुन घाम फुटला !इतका घाम मला आयुष्यात कधीच आलेला नव्हता ! फेटा असूनही घामाच्या धारा कपाळावर येऊ लागल्या ! कपाळावरून आयुष्यात पहिल्यांदा तो घाम भुवया पार करून डोळ्यांच्या पापण्या पार करून डोळ्यांमध्ये शिरला ! त्यामुळे डोळे चुरचुरु लागले ! सर्वांगाला घाम फुटला . पायातून इतका घाम वाहू लागला की क्षणात माझे दोन्ही बूट घामाने भरून गेले . दोन्ही कान घामाने भरून गेले . दोन्ही हातातून घाम गळू लागला . मी हात समोर धरून पाहिला तर माझ्या पाचही बोटातून स्वतंत्रपणे घाम टप टप गळत होता ! इतका घाम हाताला आला ! ही सर्व प्रतिक्षिप्त प्रतिक्रिया होती . वाघाच्या केवळ आवाजाने माझी ही अवस्था झाली होती . बर आवाज कुठल्या दिशेने येतो आहे हे देखील कळत नव्हते कारण सर्वत्र आवाज घुमत होता . वाघ माझ्यापासून साधारण तीनशे ते पाचशे फूट अंतरावर असावा असा कयास मी बांधला . मागे वळून बघायची देखील माझी हिम्मत होत नव्हती . मी जणू काही एखादी मूर्ती उभी केली असावी असा त्या पुलाच्या मधोमध उभा राहिलो . क्षणभर वाटले की पुलाच्या खाली जो पाईप आहे त्यात जाऊन लपावे . परंतु वाघाला आपला वास खूप लांबून देखील येत असतो . आणि समजा वाघ पाईप मध्ये आलाच मग तर खेळच खलास ! त्यापेक्षा आहे तिथे उभे राहणे श्रेयस्कर ,असे वाटून मी तसाच स्तब्ध उभा राहिलो . याच जंगलाची काही छायाचित्रे खाली जोडत आहे .ती पाहिल्यावर तुम्हाला परिस्थिती किती गंभीर होती याचा अंदाज येईल .


लाल गोलामध्ये जे दाखवले आहे , साधारण तेच हे ठिकाण आहे जिथे मला वाघोबांनी चांगलाच अनुभव दिला !
धन्य ते जंगल आणि धन्य त्या जंगलाचा राजा !

आता मला या सगळ्या प्रकारचे हसू येते आणि शास्त्रीय ज्ञान देखील सुचते परंतु तेव्हा मात्र पुरती तंतरली होती ! घाम येण्याचे मुख्य कारण असे असते की आपल्या शरीराचा वास वाघाला जातो तो शरीराचे ,त्वचेचे बारीक कण हवेत उडाल्यामुळे . ते उडू नयेत म्हणून शरीर घाम आणून ओले होते . हा अचानक आलेला घाम असल्यामुळे शुद्ध असतो व त्याचा वास येत नाही . शरीरातील अशुद्धी बाहेर फेकणारा घाम वेगळा आणि हा घाम वेगळा . मला आयुष्यात एकदाच या प्रकारचा घाम आला परंतु तो चांगलाच लक्षात राहिला ! सुमारे दहा मिनिटे वाघोबा डरकाळ्या फोडत होते . थोड्यावेळाने माझ्या मनातील भय हळूहळू नष्ट झाले आणि मला त्या वाघा बद्दल आदर भाव उत्पन्न झाला . त्या वाघाला मी दिसत होतो हे निश्चित ! परंतु त्याने कुठल्याही प्रकारे माझ्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला नाही तर फक्त मी या जंगलाचा राजा आहे . तू नाही ! इतकेच मला सूचित केले असावे . मला मात्र तो वाघ कुठे आहे याचा काही अंदाज शेवटपर्यंत आला नाही . एक मात्र निश्चित की तो एकाच जागी उभा राहून ओरडत होता . सांगलीला प्रतापसिंह उद्यानामध्ये एकेकाळी ४० सिंह होते . ते असेच पहाटे पहाटे डरकाळ्या फोडून अख्खी सांगली दणाणून सोडायचे ! तो प्रसंग मला इथे आठवला .साधारण दहा मिनिटे झाली आणि माझ्या लक्षात आले की आपण नर्मदा मातेला हाकच मारलेली नाही ! त्यामुळे मी मनातल्या मनात नर्मदे हर नर्मदे हर असा जप चालू केला आणि वाघाच्या डरकाळ्या बंद झाल्या . मी तरी देखील दोन-तीन मिनिटे जागेवरतीच उभा होतो . मी सर परशुरामभाऊ महाविद्यालयामध्ये असताना रोज सकाळी एसपी कॉलेजच्या जिम मध्ये व्यायामाला जायचो . तिथे एक ९० वर्षाचे डॉक्टर आजोबा व्यायामाला यायचे . ते रोज किमान ५०० जोर एका दमात मारायचे . तर त्यांचा व्यायाम चालू असताना अक्षरशः घामाचा पाट वहायचा . हे मी स्वतः रोज याची देही याची डोळा पाहिलेले आहे . अगदी तसेच घामाचे थारोळे त्या दहा-पंधरा मिनिटात माझ्या पायाखाली तयार झाले होते ! आता आवाज थांबलेला आहे हे पाहिल्यावर मी पुन्हा एकदा पावलांना गती दिली . आजूबाजूला कुठेही वळून बघायचा प्रयत्न केला नाही . माझ्या कुठल्याही कृतीमुळे वाघाला असे वाटू नये की मी त्याला शोधतो आहे किंवा त्याच्यावरती हल्ला करतो आहे असे माझे वर्तन मी ठेवले . यापूर्वी अनेक वेळा जंगलातून भ्रमंती केलेली आहे व अनेक जंगल सफारी देखील केलेल्या आहेत . परंतु एकट्याने , भर जंगलामध्ये , तेही जवळ वाघ असताना आणि लपण्याचे कुठलेही साधन नसताना  असहायपणे उभे राहिल्यावर , मनामध्ये या देखण्या जनावराची कशी दहशत उत्पन्न होऊ शकते हे मी स्वतः त्या दिवशी अनुभवले आणि धन्य झालो ! अशा वाघांना घातक शस्त्रांनी मारणारे लोक किती दुष्ट आणि नीच प्रवृत्तीचे असतील !लहानपणापासून जिम कॉर्बेटच्या कथा , सर्कशींच्या कथा व अन्य अनेक निसर्ग वाचन विषयक पुस्तके वाचून मला वाघाबद्दल मोठेच प्रेम राहिलेले आहे . वाघासारखे सुंदर आणि देखणे जनावर या जगामध्ये दुसरे नाही असे माझे पूर्वीपासूनचे स्पष्ट मत आहे . परंतु त्या प्रेमाचे रूपांतर त्या दिवशी आदरामध्ये झाले .वाघाचा मोठेपणा यातच दडलेला आहे . त्याला त्यादिवशी मला लोळवणे सहज शक्य होते परंतु तशी गरज नसल्यामुळे आणि मी देखील हल्ला करण्याचा कोणताही पवित्रा न दाखवल्यामुळे , वाघाने मला काहीही न करता सुखरूपपणे त्याच्या हद्दीतून बाहेर जाऊ दिले , हे त्याचे माझ्यावरती किती मोठे उपकार आहेत ! असेच प्रसंग आयुष्यात अनेक वेळा आलेले असल्यामुळेच कदाचित आदिवासी समाजामध्ये वाघाला देवाची उपमा दिली जाते आणि त्यांच्यामध्ये बाघदेव नावाचा चक्क देव पुजला जातो .आणि वाघाची शिकार करणे पाप मानले जाते . इकडे
दुर्गा देवीचे वाहन होण्याचा मान वाघाला देऊन त्याला देवत्व बहाल करण्यात येते . हे सर्व सूचक आहे . शोचनीय आहे . आणि उत्तम आहे ! आपण आपल्या मुलांना लहानपणापासून हा संस्कार दिला पाहिजे की पर्यावरणाचा समतोल राखणारा सर्वोच्च आणि सर्वोत्तम घटक म्हणजे वाघ आहे आणि म्हणून तो जंगलाचा राजा आहे आपला शत्रू नाही ! फार पूर्वी कधीतरी एका छायाचित्र प्रदर्शनाचे आमंत्रण मला मिळाले होते त्याच्या मुखपृष्ठावरील वाघाचे चित्र बघून मी त्याच लिफाफ्यावर स्केचपेनने वाघाचे चित्र काढले होते ते मला नुकतेच सहज सापडले .ते सोबत जोडत आहे .
प्रस्तुत लेखकाने स्वहस्ते काढलेले वाघाचे चित्र . २००३ साली देखील वाघालाच मी जंगलचा राजा मानत होतो हे तुम्हाला चित्राला दिलेल्या नावावरून लक्षात येईल ! माणसाला शक्यतो ज्या गोष्टी आवडतात त्याचेच तो चित्र काढतो .

मुलावर देखील मी लहानपणापासून हाच संस्कार केलेला आहे . वाघ हा आपला शत्रू नसून मित्र आहे . त्यामुळे नेम धरलाच तर देशाच्या , मानवतेच्या शत्रूवर धरावा , वाघावरती नाही असेच नेहमी त्याला शिकवले आहे . व सध्या शूलपाणीच्या झाडीमध्ये सुरू असलेल्या शाळेतल्या मुलांना देखील हेच शिकवतो आहे . त्यांना वाघ पाहिल्यावर आदर वाटला पाहिजे , भीती नाही .
अशा संस्कारामुळे वाघ कधी मुलांचा मित्र होऊन जातो हे त्यांनाच कळत नाही !

आमच्या चिरंजीवांना त्यामुळेच लहानपणापासून वाघाची मोठी आवड आहे ! तशी ती प्रत्येक भारतीय मुलाला असावी .आणि हे सर्वस्वी पालकांच्या हातात आहे . मुद्दा छोटासा आहे परंतु त्यामुळे पुढे मोठा पर्यावरणीय बदल घडू शकतो हे आपण लक्षात घ्यावे . कारण यांच्यातलाच एखादा मुलगा पुढे मोठा वन अधिकारी किंवा राजकारणी होऊ शकतो किंवा निर्णयक्षम पदावर बसू शकतो . त्यावेळी हा संस्कार निश्चितपणे त्याला मदत करेल असा विश्वास वाटतो . अगदी काहीच झाला नाही तरी वन पर्यटक  म्हणून फिरताना एक आदर्श वनपर्यटक तो बनू शकतो .
विषय निघालाच आहे म्हणून या अतिशय संवेदनशील आणि माझ्या हृदयाला अत्यंत जवळच्या असलेल्या विषयाबद्दल थोडेसे चिंतन मांडतो . जगातील एकूण वाघांपैकी ७५ टक्के वाघ आजच्या भारतामध्ये आहेत .परंतु उरलेले वाघ देखील पूर्वी ज्याला भारत म्हणून ओळखले जायचे व आता जे वेगळे झालेले देश आहेत अशा भूभागातच बहुतांशपणे आहेत . त्यामुळे एकंदरीत बोलायचे झाले तर आपला भारत देश हा वाघांचा देश राहिलेला आहे हे आपण नेहमी लक्षात ठेवले पाहिजे . जगात कुठेही भारतासारखे वाघ नाहीत . परंतु भारतातील वाघांचा सर्वात मोठा शत्रू म्हणून कोणाचे नाव घ्यायचे असेल तर मुसलमान शासकांचे आणि इंग्रजांचे नाव घ्यावे लागेल . जहांगीर राजाने एकट्याने ३६ वर्षात १७१६७ शिकारी केल्याची नोंद मोठ्या अहंकाराने त्याने करून ठेवली असून त्यात शेकडो वाघ आहेत . इंग्रज भारतामध्ये आले तेव्हा भारतामध्ये साधारण चार लाख वाघ होते असे म्हणतात . सतराव्या शतकामध्ये चार लाखांवर असलेली वाघाची संख्या ही एकविसाव्या शतकामध्ये अक्षरशः हजार बाराशे वर येऊन ठेपली होती . अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये वाघांच्या शिकारी चालू होत्या . ब्रिटिशांच्या काळामध्ये तर कोणी किती वाघ मारले यावरून त्याचा पुरुषार्थ ठरविला जायचा .स्वतः मारलेल्या दोनशे वाघांच्या कातड्यांच्या ढिगार्‍यावर बसलेला इंग्रज शिकारी असे एक चित्र मी लहानपणी एका पुस्तकात पाहिले होते . कोण होते हे लोक ? हे इंग्लंड मधील अशिक्षित अडाणी लोक होते जे इथे येऊन दिसेल तो वाघ मारत सुटले होते .कारण एकच ! यांच्याकडे बंदूका होत्या आणि हिंदू समाज मानसिक गुलामगिरी मध्ये होता . भारतातल्या संस्थानिकांना देखील त्यांनी शिकारी करण्याचे वेड लावले . मी हे खात्रीपूर्वक सांगू शकतो कारण भारताच्या कुठल्याही भागात जर आपण गेलात तरी आजही वाघाला देव म्हणून पुजण्याची प्रथा असल्याचे आपल्याला पाहायला मिळते . अगदी पुण्यासारख्या आधुनिक शहरांमध्ये देखील वाघजाईच्या डोंगरावर वाघाची मूर्ती पूजले जाणारे मंदिर आहे . आपल्यालाही अशी अनेक मंदिरे माहिती असतील . त्यामुळे वाघ हा भारतीय लोकांसाठी सदैव पूज्य राहिलेला आहे आणि त्यामुळेच जगातील सर्वाधिक वाघांची संख्या आपल्या देशामध्ये कायमच राहिलेली आहे . याउलट इंग्रजांनी मात्र भारतामध्ये वाघांची शिकार करून त्याचे कातडे नखे वगैरे इंग्लंडला जहाजेच्या जहाजे भरून नेले . आणि तिथे राहणाऱ्या आपल्या एकट्या पत्नीला बक्षीस म्हणून ते वाघाचे कातडे द्यायचे अशी प्रथाच तिकडे पडली होती . अन्यथा ज्या भागामध्ये वाघच नाहीत , तिथे वाघाची एवढी कातडी आणि त्यावर आपल्या पतीच्या विरहामध्ये विलाप करीत बसलेल्या  स्त्रिया अशी हजारो पेंटिंग्स येतातच कुठून ? विषय निघालाच आहे तर ही सर्व चित्रे आपल्याला दाखवणे मी माझे कर्तव्य समजतो . सुदैवाने गेल्या दोन दशकांमध्ये भारत सरकार शहाणे झाले आणि सुमारे ५४ व्याघ्र प्रकल्प पूर्ण ताकतीने चालवायला सुरुवात केल्यामुळे आता वाघांची संख्या थोडीशी वाढलेली आहे . परंतु तरी देखील ती पुरेशी नाही . भारतातील सर्व व्याघ्र प्रकल्प एकमेकांना जंगल कॉरिडॉर करून जोडणे हा एकमेव उपाय वाघांची संख्या वाढण्यासाठी आणि गुणवत्ता वाढण्यासाठी देखील आवश्यक आहे असे प्रस्तुत लेखकाचे स्पष्ट मत आहे . गेल्या दोनशे वर्षांमध्ये अतिशय उत्तम दर्जाचे आणि महा भयंकर वाघ इंग्रजांनी आपल्या देशातून संपवले . आता शिल्लक राहिलेले वाघ हे तुलनेने अतिशय दुबळे आणि दुर्बल असेच आहेत . अजूनही वेळ गेलेली नाही . आपण सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न केले तर वाघांची संख्या पुन्हा एकदा वाढू शकते . व्याघ्र प्रकल्प बाधित गावातील लोकांचे सहकार्य यासाठी लाखमोलाचे ठरते . चळवळीच्या लोकांनी देखील आमचा आणि आमच्या विचारधारेचा पर्यावरणाशी काही संबंध नाही असा मूर्ख युक्तिवाद  करत ,स्थानिक लोकांना भडकवून , व्याघ्र प्रकल्प संवर्धनासाठी चालू असलेल्या सरकारी प्रयत्नांना खीळ घालण्याचे पाप करू नये . कारण वाघ वाचला तर जंगल वाचेल आणि जंगल वाचले तरच आंदोलन करण्यासाठी ऑक्सिजन मिळेल ! एकदा चित्रांच्या माध्यमातून हे प्रकरण नीट समजून घेऊयात .
भारतातील ट्रकच्या मागे झाडाखाली रडत बसलेल्या एका स्त्रीचे चित्र लावलेले असते आणि खाली लिहिलेले असते 
सजन घर कब आवोगे ? तशाच प्रकारच्या चित्रांची फॅशन त्या काळामध्ये इंग्लंडमध्ये आलेली होती . यामध्ये भारतात ईस्ट इंडिया कंपनीची नोकरी करण्यासाठी गेलेल्या इंग्रजांच्या स्त्रिया तिकडे इंग्लंडमध्ये आपल्या घरी आपल्या पतीने पराक्रमाने (?) मारलेल्या वाघाचे कातडे अंथरून , त्यावर बसून , पतीची वाट पाहत आहेत अशी चित्रे लावण्याची प्रथा पडली होती .एखादी गोष्ट चित्रकारापर्यंत ,शिल्पकारपर्यंत किंवा लेखकापर्यंत पोहोचते याचा अर्थ ती सामाजिक परंपरा झालेली असते हे नेहमी लक्षात ठेवावे . 







या प्रत्येक चित्रांमध्ये आपल्याला विरहिणीच्या खाली नाहक बळी पडलेला एक भारतीय वाघ दिसतो आहे .इंग्रजांनी आपल्या देशाचे जे काही अपरिमित नुकसान केले आहे त्याच्यामध्ये पर्यावरणाचे नुकसान हा विषय कोणी ध्यानातच घेत नाही . इंग्रजांनी प्रयत्नपूर्वक आणि अभ्यासपूर्वक प्रत्येक महत्त्वाच्या परिसंस्थेतील टोकाचा घटक संपवला . मग ती पाण्यातील मगर असो , जंगलातील वाघ असो , गुरुकुलातील प्रधान आचार्य असोत नाहीतर आश्रमशाळेतील गुरुजी! आणि ही परिसंस्था पुन्हा उभी करायची असेल तर पुन्हा तोच उपाय आहे ! जंगलात वाघ हवेत पाण्यात मगरी हव्यात आणि शाळेत चांगले निस्पृह निर्व्यसनी आणि सुसंस्कृत मास्तर ! 


वाघांची ही कत्तल शेकडो वर्षे चालू राहिली . त्यातून भारताचे पर्यावरण बिघडत होते आणि इंग्रजांच्या बापाचे काही जात नव्हते .
परंतु आजही वाघांच्या शिकारी करणारी मानसिकता आपल्या समाजामध्ये शिल्लक आहे . अशा लोकांना थेट गोळ्या घालून ठार करावे असा कायदा सरकारने केला पाहिजे . कारण एखादा मनुष्य जेव्हा एक वाघ मारतो तेव्हा तो हजारो चौरस किलोमीटर परिसरातील विकसित झालेली एक संपूर्ण परिसंस्थाच तो कोलमडून टाकत असतो .
आजही कातड्यासाठी आणि नखांसाठी तसेच हाडांसाठी चिनी लोकांच्या सहकार्याने वाघांच्या शिकारी करणाऱ्या टोळ्या कार्यरत आहेत . कारण चीनमध्ये वाघांच्या विविध अवयवांपासून औषधे बनवणारी माणसे व ती खाणारी गिऱ्हाईकं आहेत . आजही वाघाचे औषध खाल्ल्यावर मर्दाना जोश येतो वगैरे अति अति भ्रामक कल्पनांमध्ये चिनी समाज गुंतलेला आहे . त्यांना हेच कळत नाही की हे सर्व पूर्वजांच्या रक्तातून यावे लागते !
भारतामध्ये इंग्रजांनी मारलेले वाघ किती सुंदर आणि बलवान होते हे आपल्याला खालील चित्रे पाहिल्यावर लक्षात येईल .
अनेक वाघांना यम सदनी धाडून इंग्रजांना आपण मोठे भूषणास्पद कार्य केले असे वाटायचे . 
मृत वाघाचे अपमानास्पद फोटो काढण्याची त्यांना मोठी आवड होती
एकापेक्षा एक खूंखार वाघ इंग्रजांनी भारतातून कायमचे संपवले
ही सर्व चित्रे अत्यंत दुःखदायक आहेत . परंतु ती आपण आपल्या मुलांना आवर्जून दाखवली पाहिजेत .
आज आपल्याला पर्यावरणाचे धडे शिकवणारे पाश्चात्य किती दांभिक आहेत आणि त्यांनी भारतातील पर्यावरण बिघडवण्यासाठी किती मोलाची कामगिरी बजावली आहे हे सगळ्या जगाला आपण ओरडून सांगितले पाहिजे .
याबाबतीत इंग्रज बरे की काय असे म्हणायचे पाळी आपल्याला मुघल शासकांनी मारलेल्या वाघांची चित्रे पाहिल्यावर  येते



आता आपल्याला पाश्चात्य विद्वान असे देखील शिकवतात की तुमचेच हिंदु राजे राण्या वाघांच्या शिकारी करायचे . मृगया करायचे . वगैरे वगैरे . परंतु प्रजेच्या रक्षणासाठी एखादा नरभक्षक वाघ अपरिहार्यता म्हणून मारावा लागणे ,असे उदाहरण वगळता जुनी चित्रे पाहिल्यावर देखील आपल्याला असे लक्षात येते , की आपल्याकडे वाघांना नेहमी प्रेमच दिले गेले आहे . ते दर्शवणारी काही समकालीन चित्रे आपण पाहिलीत तर मी काय म्हणतो आहे ते आपल्या लक्षात येईल .
हिंदू राजांनी पाळलेले वाघ


पाळीव वाघासोबत बसलेला हिंदू राजा
पाळलेल्या वाघांशी प्रेमाने खेळताना राणी
या चित्रांमधला फरक सूज्ञ लोकांना सहज कळण्यासारखा आहे . चित्रकारांची आणि कलाकारांची देखील ही जबाबदारी आहे की त्यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून व्याघ्र संवर्धन आणि पर्यावरणाचे रक्षण करण्याचे मोलाचे कार्य करावे .


सुदैवाने भारत सरकारने आता व्याघ्र प्रकल्पांवर लक्ष केंद्रित करून वाघांची संख्या वाढविण्याचा निर्धार केलेला आहे ही आनंदाची गोष्ट आहे .
या यादीतील रशिया सोडला तर बाकी सर्व देश हे कधी ना कधी अखंड भारत वर्षाचा भाग राहिलेले आहेत त्यामुळे भारत हीच वाघांची भूमी आहे आणि भारत ही वाघांचीच भूमी आहे . चीनचा जो भाग वाघांसाठी प्रसिद्ध आहे तो तिबेट भारताचाच हिस्सा होता . 
त्यामुळे वाघांचे संवर्धन ही जगाची जबाबदारी नसून आपली भारतीयांची ही जबाबदारी आहे . गळ्यामध्ये वाघाचे नख घालून फिरणे हे काही भूषणाचे लक्षण नसून आपणच आपल्या पर्यावरणाची कशी हानी केली आहे याचाच तो पुरावा आहे .
भारतामध्ये सध्या ५४ व्याघ्र प्रकल्प आहेत .
त्यातील बरेचसे व्याघ्र प्रकल्प नर्मदा खंडामध्ये आहेत . त्यामुळे परिक्रमावासींनी जर मनात आणले तर ग्रामस्थांचे याविषयी प्रबोधन करत ते पुढे जाऊ शकतात हे नेहमी लक्षात ठेवावे आणि याला यश येते असा प्रस्तुत लेखकाचा अनुभव आहे .
आपण वेळीच हे उपाय केले नाहीत तर वाघांची संख्या अशाच गतीने घटत जाईल .
आत्ता दिसणारी वाघांची संख्या ही निश्चितपणे पुरेशी नाही .ती किती तरी पटीने वाढली पाहिजे तरच जंगलांचा आकार आणि गुणवत्ता वाढत जाईल .ज्या जंगलामध्ये वाघ असतो तिथे आपोआप चराई बंदी होते .त्याचा थेट परिणाम जंगलाच्या वाढीवर होतो .
आपल्या पूर्वजांनी ज्या वाघाला देव मानले आहे आणि सदैव पुजलेले आहे त्याच पूज्य भावाने आपण देखील वाघाची भक्ती करावी आणि पुन्हा एकदा वाघांची भारतातील संख्या वाढवावी असे मनापासून वाटते .
भारतातल्या विविध भागातील वाघांच्या मूर्ती आपण पाहूयात 







 वाघाला इतके पूज्य मानणारा हिंदू समाज वाघाची कधी शिकार करू शकेल काय ?  विचार करून पहा .आणि जर तशी इच्छा कोणाच्या मनात येत असेल तर नक्कीच त्याच्या पूर्वजांमध्ये इंग्रज किंवा मुसलमानी परकीय आक्रमक यांचे रक्त शिरलेले आहे असे समजायला पुरेसा वाव आहे . असो . आता ठोस  निष्कर्ष काढून हे व्याघ्र पुराण इथेच थांबवूयात . एकंदरीत या सर्व कथनाचे सार असे आहे की ज्यांनी नर्मदा परिक्रमा केली आहे त्या सर्वांनी व्याघ्र संवर्धनासाठी आणि पर्यावरण रक्षणासाठी सक्रिय सहभाग नोंदवला पाहिजे असे प्रस्तुत लेखकाचे स्पष्ट मत आहे . कारण वाघ वाचला तर नर्मदामाते काठचे पर्यावरण वाचेल . वाघाच्या या अनुभवानंतर मी पुन्हा एकदा च्यवन आश्रमामध्ये आलो आणि तिथे आसन लावले . इथे सध्या तीन वाघ फिरत आहेत असे मला तिथल्या साधूंनी सांगितले . असे एकापेक्षा अधिक संख्येने वाघ दिसतात तेव्हा शक्यतो ते आई आणि तिचे बछडे असतात .अशी वाघीण जास्त आक्रमक असते . नर शक्यतो एकांडा फिरतो . विणीच्या हंगामामध्ये वाघ जोडीने फिरतात . एकंदरीत वाघांचे श्रेष्ठत्व मान्य करत मी च्यवन आश्रमाचा निरोप घेतला .मला असे वाटले होते की आता जंगल संपेल परंतु थोड्याच वेळात असे लक्षात आले की ही तर जंगलाची केवळ सुरुवात होती . बफर झोन होता . कोअर झोन अजून यायचाच होता ! नर्मदा माता अजून काय काय दाखवणार आहे काय माहित असा विचार करत मी पुन्हा एकदा जंगलातून चालायला सुरुवात केली . वाघाच्या आलेल्या अनुभवामुळे जणू काही माझी भीतीच निघून गेली आणि मी अतिशय सहजपणे त्या जंगलातून वावरू लागलो . ज्यांना ज्यांना अरण्य वाचनाची आवड आहे त्यांच्यासाठी नर्मदा परिक्रमा अपरिहार्य आहे ! नर्मदा मातेने भारताचे पर्यावरण रक्षण मोठ्या प्रमाणात केलेले आहे व अनेक युगे ती हेच कार्य करत आहे . नर्मदा मातेचे आपल्यावर असेही थेट उपकार आहेत . ज्याप्रमाणे ॲमेझॉनच्या जंगलाला पृथ्वीचे फुफ्फुस म्हटले जाते त्याप्रमाणे नर्मदा खंड हा भारत मातेचे फुफ्फुस आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही !
नर्मदा परिक्रमा अशा रीतीने तुमच्या पर्यावरण विषयक जाणीवा प्रगल्भ करत नेते .आणि तुम्हाला तुमची स्वतःची नव्याने ओळख होते ! गरज आहे ती आपले डोळे ,कान आणि मन उघडे असण्याची ! नर्मदे हर !





लेखांक एकशे सत्तेचाळीस समाप्त (क्रमशः)





टिप्पण्या

  1. पुढचे भाग लवकर लिहा हो प्रस्तुत लेखक जी

    उत्तर द्याहटवा
  2. अप्रतिम लिखाण..एकदम बरोबर लिहिले आहे वाघांबद्दल

    उत्तर द्याहटवा
  3. far bhari lihile ahe tummhi. Rajeshahi that asato vaghacha. sinh dekhil rubabdar. aani purn fana kadhlela nag. he tinhi janvare ayuant mohini takanare ahet. dhokadayak pan te saundary baghat basave ashi mohini.

    sangli chya udyanat sinh far lahanpani pahile ahet shalechya sahlimadhye. tyanchi nusati gurgur aikun bhiti vatleli

    tumhi mhantay tya katraj chya pandharya vaghacha foto ahe majhyakade. ithe deta yetoy ka baghto.

    उत्तर द्याहटवा
  4. ha mi kadhlela 2009 madhil katraj madhil photo det hoto pan embedd karun deta yet nahiye photo. anumati nahi code vaparayala ase aale lihun.



    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

जे आवडते सर्वांना ...

अनुक्रमणिका (Index)

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

लेखांक १ : नर्मदे हर !

लेखांक २ : भोपाळ जवळच्या जंगलातील अपघात

लेखांक ३ : चोराची धन

लेखांक ४ : झुठा कही का ! सबकुछ तो लाए हो !

लेखांक ५ : ग्वारीघाट जबलपुर मध्यप्रदेश

लेखांक ७ : नाभिकाने केलेला जाहीर __मान !

लेखांक ६ः झुलेलाल आश्रम , ग्वारी घाट

लेखांक ९ : इंदौरी पोहा आणि गरमा गरम जलेबी !