लेखांक १४० : कारम-बुटी-रेवा त्रिवेणी संगमावरील उचावदचा बडा महादेव आणि जलकोटीच्या सहस्रधारेजवळील एकमुखी दत्त

मांडवगडचा उतार चांगलाच तीव्र होता . रस्ता बऱ्यापैकी ओसाड होता . वाटेमध्ये झाडे किंवा सावली असे काही नव्हते . आजूबाजूला तसे बरे जंगल आहे . परंतु उतरण्याचा रस्ता प्रशस्त असल्यामुळे ओसाड झालेला होता . प्रचंड खड्डे मुरूम दगड यांनी भरलेला धुळीचा अन् उताराचा रस्ता होता . प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक टाकावे लागे .जरा दुर्लक्ष झाले की खर्रकरून पाय घसरायचे . वयस्कर माणसांसाठी आणि पाचवारी लुगडे नेसून परिक्रमा करणाऱ्या मध्यप्रदेश मधील ग्रामीण स्त्रियांसाठी हा उतार थोडासा घातकच होता .

रूपमती राणीच्या महालापासून शबरी आश्रमा पर्यंत येणारी पायवाट या नकाशात दिसत आहे .
परिक्रमेमध्ये किंवा एरवी सुद्धा लक्षात ठेवण्याचे सोपे सूत्र म्हणजे चढणे हे उतरण्यापेक्षा नेहमी सोपे असते हे कायम ध्यानात ठेवावे . उतरताना गुडघ्यांची आणि पायांच्या सांध्यांची जी काही वाट लागते ती अभूतपूर्व असते . अशी पायांची वाट लागलेली असताना भर तापलेल्या वाळवंटात एखाद्याला अचानक समोर मोठे सरोवर दिसावे तसे मला एक छोटीशी कुटी बांधून केलेला आश्रम पाहून झाले ! मूळचे शिरपूर येथील असलेले कुणाल पाटील नामक एक तरुण तडफदार वारकरी महाराज इथे अतिशय उत्तम पद्धतीने शबरी आश्रम नामक एक छोटासा आश्रम चालवत होते . त्यांनी अतिशय आग्रहाने आणि प्रेमाने उत्तम अशी शेव भाजी वगैरे जेवण आम्हाला जेऊ घातले आणि एका छोट्याशा गोलाकार झोपडीमध्ये काही काळ पडायची विनंती केली जिथे एक छोटासा कुलर पंखा देखील लावलेला होता ! त्यांच्या या सेवेमुळे मन अतिशय प्रसन्न झाले !
आता या आश्रमाचा जीर्णोद्धार सुरू झालेला आहे असे दिसते . या आश्रमाची काही छायाचित्रे खालील प्रमाणे .
मांडवगडाच्या पायथ्याशी वसलेला हिरापूर गावातला शबरी आश्रम
आश्रमाची पाटी . कुणाल पाटील महाराजांना मदत करण्याची इच्छा असल्यास त्यांचा क्रमांक नोंदवून घेणे . मदत पाठवल्यावर कृपया आपल्या खालील ईमेल आयडीवर कळवणे म्हणजे त्याची नोंद ठेवली जाते . mazinarmadaparikrama@gmail.com 

 मोठ्या जोमाने पुढची वाटचाल चालू केली कारण आता लवकरच नर्मदा मातेचे दर्शन होणार होते ! तिच्या दर्शनाची ओढ लागल्यामुळे वेगाने पावले टाकायला सुरुवात केली . वाटेमध्ये हिरापूर , बणझारी , बगवान्या अशी सर्व गावे पार करत कुंडी धामणोदच्या दिशेने निघालो . बगवानिया या गावामध्ये अतिशय सुंदर असे रामाचे मंदिर होते आणि तिथे आरशांची मोठी सुंदर आरास केलेली होती .
बगवान्या गावातील राम मंदिराचा रस्ता दर्शवणारी पाटी
बगवान्या चे श्रीराम प्रभू
 वाटेमध्ये आजूबाजूला शेती असलेल्या छोट्याशा परंतु वाहतूक असणाऱ्या रस्त्यावरून चालणे होत होते . नर्मदा परिक्रमेमध्ये रस्त्याने चालायला लागणे यासारखे दुर्दैव नाही असे माझे ठाम मत झालेले होते . डांबरी सडकेने चालणे हा अतिशय वाईट अनुभव असतो . कारण मुळात डांबरी सडक ही वल्कनाईज्ड रबरने बनलेल्या टायर साठी बनलेली असते .रबराच्या तुलनेने नाजूक चामडी असलेल्या पायांसाठी ती अतिशय निरुपयोगी , नालायक आणि घातक आहे . मऊशार मातीच्या पायवाटांसारखा सुखाचा मार्ग पायांना प्राप्त होणे नाही ! बहुतेक नर्मदा परिक्रमा करणाऱ्या मूर्तींना पायांचा त्रास होतो याचे महत्त्वाचे कारण ते जास्तीत जास्त सडकेने चालतात हेच आहे . किनाऱ्याने आणि काठावरील मऊशार पायवाटांतून चालणाऱ्या परिक्रमावासींच्या पायाला कुठलाही त्रास होत नाही . इथे माझ्या पुढे मागे तुकाराम बुवा आणि गुरुत्तम पाटील होते . परंतु इथे पुढे कारम आणि बुटी या दोन नद्यांचा नर्मदा माते सोबत त्रिवेणी संगम झाला आहे असे मला कळालेले होते . आणि त्रिवेणी संगमांमध्ये स्नान करण्याची पर्वणी मी एकदाही सोडलेली नव्हती . त्यामुळे मी काठाकडे घेऊन जाणारा मार्ग पकडला आणि बाकीचे लोक धामणोद शहरापासून मोठ्या रस्त्याने निघून गेले . माझा मार्ग म्हणजे एका शासकीय तंत्रनिकेतनला वळसा मारून जाणाऱ्या एका भल्या मोठ्या मैदानातून जाणारी पायवाट होती . हे संपूर्ण मैदान म्हणजे धामणोद शहरातील लोकांचे खुले शौचालय होते . प्रत्येक पाऊल जपून टाकावे लागत होते . कधी एकदा हे मैदान संपते असे मला झाले होते .


धामनोद जवळचे हेच ते मैदान
 मैदान संपल्यावर शेतातून आणि जंगलातून जाणारे रस्ते लागले . इथे एकही मनुष्य नव्हता . परंतु बडा महादेव किंवा कारम बुटी संगमावरील महादेवाची यात्रा नुकतीच संपन्न झालेली असल्यामुळे यात्रे करुंनी केलेला कचरा रस्त्यावर दिसत होता .तसेच यात्रेसाठी वाटेवर लावलेल्या ध्वजा दिसत होत्या . त्याचा माग घेत मंदिर गाठले . वाटेमध्ये एका शेतकऱ्याने नको नको म्हणत असताना देखील भरपूर काकड्या दिल्या .शेतातल्या ताज्या ताज्या काकड्या खायला आवडत नाहीत असे काही नाही परंतु वजन कोण बाळगणार हा कळीचा प्रश्न असतो ! शेवटी संध्याकाळच्या थोडेसे अगोदरच्या वेळी मंदिर गाठले . मंदिराचा कळस उंचावर असतो परंतु इथे मात्र जमिनीच्या पातळीवर मंदिराचा कळस आहे ! कारण हे मंदिर म्हणजे एक भूमिगत गुफा आहे ! या गुहेमध्ये दोन शिवलिंगे असून त्यांच्या वरती अखंड जलाभिषेक निसर्गातूनच आपोआप होतो आहे ! टपकणाऱ्या पाण्यामुळे इथे लवणस्तंभ तयार झालेले आहेत . त्यांना देखील शेंदूर फासून त्यांची पूजा केलेली दिसते ! एकंदरीत हे स्थान अतिशय गूढरम्य आणि शांत होते . इथे एकही परिक्रमावासी कधी येत नाही असे तिथे सेवा देणाऱ्या एका युवकाने मला सांगितले . याचे नाव पन्नालाल असे होते . मी सर्व काकड्या त्याला देऊन टाकल्या . मंदिराच्या समोरच एक अतिशय भव्य दिव्य अश्वत्थ अर्थात पिंपळाचा वृक्ष होता . समोरच कारम आणि बुटी या नद्यांचा संगम झालेला होता . नर्मदा मातेचे पाणीदेखील आत उलटे शिरले की हा त्रिवेणी संगम होतो . इथून नर्मदा मैया खूपच जवळ होती .
पूर्वी या मंदिरामध्ये महादेवांच्या वरती दुधाची धार लागत असे पन्नालाल ने मला सांगितले . परंतु एक रजास्वला स्त्री अनवधानाने रजस्नात असताना तिथे गेल्यामुळे ही धार थांबून आता फक्त पाणी पडते आहे असे लोक मानतात .इथे जवळ बैगन नावाचे गाव आहे . 


उचावद या गावामध्ये असल्यामुळे या महादेवाला बडा महादेव तसेच उचावदेश्वर असे देखील नाव आहे

कारम बूटी नर्मदा त्रिवेणी संगमावर हे मंदिर वसलेले आहे .

हाच तो भव्य अश्वत्थ वृक्ष ज्याच्या समोर बडा महादेव आहेत . मागे आपल्याला त्रिवेणी संगम दिसतो आहे . आणि मी पुढे जलकोटीच्या दिशेने चालत गेलो ते जंगल देखील दिसत आहे .
महादेवांच्या याच दोन शिवलिंगांवर अखंड जलधारा चालू असते . नैसर्गिकरित्या इथे पाषाणातून थेंब थेंब पाणी वर्षभर शिवपिंडीवर पडत राहते . 
मंदिर अशा पद्धतीने भूमिगत आहे

 महादेवाच्या मंदिरात काही काळ बसलो आणि महादेवांचे स्तवन केले . त्यानंतर त्रिवेणी संगमामध्ये स्नान केले . हे सर्व करेपर्यंत अंधार पडू लागला . पुढचा मार्ग पूर्णपणे जंगलातून जाणार होता . संगम क्षेत्र अतिशय विस्तीर्ण होते आणि मोठ्या मोठ्या दगडांनी भरलेले होते . ते कसेबसे पार करत जंगलातील मार्ग पकडला . माझ्यासमोरून एक लांडगा चालताना इथे मी पाहिला . गंमत म्हणजे संध्याकाळची वेळ झालेली असल्यामुळे तो मला अजिबात न घाबरता माझ्या पुढे चालत राहिला . दिवसाढवळ्या असे शिकारी प्राणी आपल्यासमोर शक्यतो घाबरून राहतात . रात्री मात्र त्यांचेच राज्य असते . तो मार्ग सोडत नाही हे पाहिल्यावर मीच काही काळ थांबलो आणि त्याला जाऊ दिले . जंगल हळूहळू दाट होत गेले . वाळू देखील मोठ्या प्रमाणात होती . एक क्षणभर मला असे वाटले की आता मी वाट हरवणार आहे . परंतु नर्मदा माता आपल्या उजव्या हाताला आहे याची जाणीव मनाला सुखावत होती . बरेच अंतर चाललो तरी जलकोटी काही येईना . परंतु सुदैवाने थोड्याच वेळामध्ये एक रामाचे मंदिर लागले . रामेश्वर असे या मंदिराचे नाव होते . इथून पुढे मात्र दूरवर असलेले दत्त मंदिर दिसू लागले ! नर्मदा खंडामधील सर्वात उंच कळस असलेले हे मंदिर आहे . नील कुंडा पाशी जितका भव्य कळस आहे त्याच्या साधारण दीडपट उंचीचा हा कळस असावा ! पुण्याजवळच्या नारायणपूर गावातील श्री नारायण महाराज यांनी नारायणपूर सारखीच एकमुखी दत्ताची अतिशय सुंदर आणि प्रचंड मूर्ती इथे स्थापन केलेली आहे . मंदिराचा परिसर इतका भव्य आहे की त्याचे वर्णन करता येणे देखील अवघड वाटते आहे ! इतके भव्य दिव्य मंदिर बांधण्याची संकल्पना सुचणे हेच मी मुळात एक मोठे आश्चर्य मानतो ! त्याचे प्रत्यक्ष कार्यान्वयन करणारे तर प्रातःस्मरणीयच आहेत ! मी या मंदिरामध्ये गेलो तेव्हा तिथे पायगुडे काका नावाचे एक अतिशय शिस्तबद्ध आणि नेमस्त सेवादार सेवा देत होते . त्यांच्यासोबत तासगाव जवळच्या हातनूर हे मूळ गाव असलेले परंतु सध्या मुंबईमध्ये राहणारे पाटील काका होते .तसेच अंबोली आणि वाई येथील दोन भक्त देखील सेवेसाठी इथे येऊन राहिलेले होते . मंदिराचा परिसर इतका भव्य आहे की त्याचे व्यवस्थापन सांभाळणारा मनुष्य देखील तितक्याच ताकतीचा हवा आणि सुदैवाने तसे व्यवस्थापन या मंदिराला लाभलेले होते . मंदिराच्या आजूबाजूने उत्तम पैकी बागबगीच्या उभा करण्यात आलेला होता . अतिशय भव्य दिव्य प्रवेशद्वार होते तिथून आत गेल्याबरोबर उजव्या हाताला एक छोटेसे दुकान आणि छोटेसे उपाहारगृह देखील उभे करण्यात आलेले होते .  समोर गाडीतळ होता आणि त्यानंतर मंदिराची प्रचंड तटबंदी बांधण्यात आलेली होती , ज्याच्यावरून चालता यायचे ! मी हा सर्व परिसर फिरून पाहून घेतला . त्यानंतर मी मंदिरामध्ये आरतीला गेलो . इथे आरतीच्य वेळी नगारा वाजवण्याची सेवा मला मिळाली . मंदिरातील दत्ताची मूर्ती अतिशय भव्य दिव्य आणि सुंदर आहे . मंदिराचा परिसर लक्षात राहील इतका स्वच्छ सुंदर आणि नीटनेटका आहे . अशी किंवा याहून मोठी अनेक मंदिरे परमपूज्य नारायण महाराजांनी संपूर्ण भारतामध्ये जागोजागी उभे केलेली आहेत . कोयना धरणाच्या धरण साठ्यामध्ये जलमग्न झालेल्या एका शिव मंदिराचा जिर्णोद्धार करताना नारायण महाराजांनी शेंबडी वाघळी नावाच्या गावा बाहेर घनघोर जंगलामध्ये एक असेच भूमिगत भव्य शिवमंदिर स्थापन केलेले असून तिथे देखील मोठा आश्रम बांधलेला आहे , जिथे मी पुणे ते सज्जनगड पायी चालत जाताना मुक्काम केलेला होता . पुण्यात देखील मी नारायणपूरची गुरुवारची वारी बऱ्याच वेळा मित्रांसोबत केलेली आहे . त्यामुळे या मंदिरात आल्यावर मला घरी आल्यासारखे वाटू लागले ! मला महाराजांचे अतिशय दुर्मिळ असे आश्रम माहिती आहे ते कळल्यावर सर्व सेवादार माझ्याशी अतिशय आपुलकीने आणि प्रेमाने वागू लागले तसेच त्यांनी मला एक स्वतंत्र खोली देखील देऊ केली . माझ्यासोबत रात्री मुक्कामाला तुकाराम बुवा सुरवसे देखील आलेले होते .तसेच दिंडोरी जवळच्या बंजर टोला गावचा आदिवासी सिरोलाल म्हणून जो भेटला होता तो देखील इथे मुक्कामाला होता . इथे सिरोलाल गांजा पीत बसलेला असताना तुकाराम बुवा सुरवसे यांनी देखील आयुष्यात पहिल्यांदाच गांजाचा एक झुरका मारला आणि नेमका तो क्षण त्यांच्याच साध्या मोबाईल फोनवर मी टिपला ! सुदैवाने ते पुण्याला आले होते तेव्हा तो फोटो मला मिळाला ! तो देखील सोबत टाकत आहे .
आयुष्यात कधी साधी कधी बिडी किंवा तंबाखू देखील न खाणारे तुकाराम महाराज यांनी आयुष्यात गांजाचा एकच झुरका मारावा आणि नेमका त्याच क्षणाचा फोटो घेऊन मी तो प्रकाशित करावा यासारखा दैवदुर्विलास तो कोणता !
या वास्तूमध्ये काढलेला एवढा एकच आठवणीचा क्षण असल्यामुळे तो प्रकाशित केला इतकेच ! बाकी आमचे तुकाराम बुवा निर्व्यसनी बर का ! या चित्रामध्ये जी खोली दिसते आहे तिथेच आम्ही मुक्काम केला होता . परंतु मला रात्री गरम होऊ लागले म्हणून मी ती खोली सोडून तटबंदी म्हणून बांधलेल्या असलेल्या भिंतीच्या वर गेलो आणि त्या सज्जावर मस्तपैकी गार हवेत झोपलो ! अशी भव्य मंदिरे दक्षिण भारतामध्ये असतात . या मंदिराच्या भव्यतेचा अंदाज यावा आणि ते मंदिर ज्या सहस्रधारा या नर्मदा मातेतील तीर्थक्षेत्राच्या नजीक बांधले आहे त्या सहस्रधारेच्या भव्यतेचा देखील अंदाज यावा म्हणून काही चित्रे सोबत जोडत आहे .
याच जंगलातून मी चालत आलो
या नकाशामध्ये आपल्याला सहस्त्रधारा आणि दत्तधाम यांचे ठिकाण लक्षात येईल
दत्तधाम इतके मोठे आहे की अवकाशातून सुद्धा असे दिसते
दत्तधाम आश्रमाचा परिसर सहस्त्रधाराच्या अगदी समोर आहे त्यामुळे नर्मदा मातेकडून येणारी ऊर्जा इथे लगेच जाणवते कारण सहस्त्रधारेमध्ये नर्मदा मैया डावीकडे वळून जाते .
अति भव्य सभा मंडप हे या मंदिराचे वैशिष्ट्य आहे
या मंदिराचा प्रचंड कळस लक्षात राहिला

मंदिराचे प्रवेशद्वार अत्यंत आकर्षक आहे
नर्मदा मातेची सहस्त्रधारा
अन्य ठिकाणी उभी केलेली दत्तधामे 
उत्तम बागबगीचे परिसराला सुंदर बनवतात
एक मुखी दत्ताची मूर्ती अतिशय सुंदर आहे
सभा मंडप इतका भव्य दिव्य आहे की त्याच्या स्वच्छतेसाठी अशा मोठ्या मोठ्या शिड्या तिथे ठेवलेल्या आहेत .
अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त
नारायण महाराजांनी दिलेला हा संदेश अतिशय महत्त्वाचा अनुभवजन्य आणि लगेच पटण्यासारखा आहे
मंदिरासमोरील उपाहारगृह आणि गाडीतळ
गणपतीचे आणि नर्मदा मातेचे सुंदर मंदिर परिसरामध्ये आहे
गोमातेची आणि वेदरुपी चार श्वानांची मूर्ती मजेशीर आहे
अन्यधामांची माहिती देताना दिलेल्या नकाशा मधला खंडित भरत पाहून अतिशय दुःख होते
हा मध्य प्रदेश मधील खरगोन जिल्हा आहे

ज्यांच्या प्रेरणेमुळे हे सर्व भव्य दिव्य कार्य उभे राहिले ते परमपूज्य श्री नारायण महाराज

मंदिराच्या कळसाच्या भव्यतेची कल्पना देणारे हे चित्र आहे
विहंगम दृश्य पाहिल्याशिवाय मंदिराच्या आकाराची कल्पनाच येऊ शकत नाही .
रात्री सर्व सेवादारांसोबत भोजन प्रसाद घेतला . अप्रतिम असे मराठी भोजन मिळाले . त्यानंतर सर्व भांडी घासली आणि रात्री मंदिराच्या सीमा भिंतीवर असलेल्या सज्जावर झोपी गेलो . सकाळी लवकर उठून नर्मदा मैया च्या थंड गार पाण्यामध्ये स्नान केले . सर्व आटोपून दत्तधामातून प्रस्थान ठेवले आणि सहस्रधारेच्या दर्शनासाठी निघालो . याच्या समोरच असलेल्या रहिमतपूर जालानपूर डोंगरगाव भागामध्ये मला आतापर्यंतचे सर्वात मोठे शिवलिंग सापडलेले होते . तेच शिवलिंग ज्याची मी रोज पूजा करत होतो आणि यावर कैलास पर्वताचे चित्र नैसर्गिकरीत्या चित्रांकित होते . परंतु सहस्रधारा या उत्तर तटावर असल्यामुळे तिचे दर्शन मनापासून झालेले नव्हते . पहाटेच्या रम्य वातावरणात हजारो शाखांमध्ये विभाजित होऊन प्रवाहित होणाऱ्या नर्मदा मैयाचा तो अद्भुत रम्य सोहळा डोळे भरून पाहू लागलो ! इथे नर्मदा मैया च्या वाटेमध्ये अचानक खडकाळ भूभाग आलेला असल्यामुळे हजारो शाखांमध्ये तिचे शांतपणे होणारे जल विभाजित होते आणि अचानक असलेल्या उतारामुळे वेगाने आवाज करत फेसाळत खाली कोसळते . हे दृश्य इतके अप्रतिम आहे की त्याचे शब्दात वर्णन करता येणे अवघड आहे . अनेक दिशांनी वाहणारे नर्मदा मातेचे पाणी पाहून आश्चर्य मुग्ध व्हायला होते . अतिशय आगळा असा हा नैसर्गिक चमत्कार आहे . प्रत्येकाने आवर्जून पहावा असा आहे . या भागाची काही ड्रोन अर्थात विहंगम चित्र सापडली ती आपल्यासाठी जोडत आहे .
सहस्रधारेचे विहंगम दर्शन !
 
रम्य सहस्रधारा

सरकारने लावलेली पाटी .विषय निघालाच आहे म्हणून सांगून ठेवतो संस्कृत व्याकरणाच्या दृष्टीने सहस्त्र धारा हा शब्द चुकीचा असून तो शब्द खालील प्रमाणे लिहीतात . सहस्रधारा 
अचानक खाली येणारे रेवाजल मोठा आवाज करते

नर्मदा मैयाची पातळी कमी जास्त होईल त्याप्रमाणे सहस्रधारेचा आकार व प्रकार बदलत राहतो .
एका चित्रामध्ये सहस्रधारा सामावणे केवळ अशक्य आहे ! समोरच्या तटावर दिसणारे जंगल पहावे ! या अरण्य आणि नंतर आमची परीक्षा घेतली ! 
इथून आम्ही सर्वजण पुढे निघालो . आम्ही सर्वजण म्हणजे प्रस्तुत लेखक , गुरुत्तम पाटील ,तुकाराम बुवा सुरवसे आणि सिरोलाल बाबाजी . माझ्या प्रमाणे त्या सर्वांनी एकदा तरी काठाने चालून पहावे असा मी आग्रह धरला . सर्वांच्या मनामध्ये ती सूप्त इच्छा होतीच त्यामुळे सर्वजण तयार झाले !  
आणि नेमका हाच निर्णय फसला ! कारण अतिशय काठाकाठाने चालताना असे लक्षात आले की इथे प्रचंड झाडी आणि काटे कुटे आहेत . त्यांची दाटी पुढे इतकी वाढत गेली की एक पाऊल देखील टाकता येईना ! सर्वच जण माझ्यावर वैतागले ! अखेर एक क्षण असा आला की आता एक मिलीमीटर सुद्धा पुढे जात येणार नाही ! त्यात माझ्या हातामध्ये असलेल्या नक्षीदार धनुष्यामुळे सतत अडका अडकी होत होती . शेवटी डावीकडे घुसायचे ठरले ! ते त्याहून घातक निघाले ! एक मोठी जाळी आडवी आली . आता या जाळीवरून उडी मारून जायचे असे ठरले . गुरु पाटील म्हणाला की जाण्यापूर्वी आपण एक फोटो काढूया ! म्हणून त्या ठिकाणी उभा राहून आम्ही एक फोटो काढला ! सहस्रधारेपाशी देखील काही फोटो काढले होते . गुरु नुकताच भेटला तेव्हा ते फोटो प्राप्त झाले ! आपल्या माहितीकरता सोबत जोडत आहे . 
डावीकडून सिरोलाल बंजर टोला ,दिंडोरी ,तदनंतर तुकाराम बुवा सुरवसे चिंचणी वडाळा ,तदनंतर गुरुत्तम दत्ताराम पाटील पेण आणि प्रस्तुत लेखक
मागे नर्मदा मातेची पवित्रतम सहस्रधारा
ही सगळी चित्रं एक सारखीच दिसत असली तरी त्यात थोडे थोडे फरक आहेत आणि ती वेगळी वेगळी आहेत .

अतिशय बेकार झाडी आणि काटे कुटे यांच्यामध्ये आम्ही अडकलेलो असताना वैतागलेले तुकाराम बुवा आणि सिरोलाल मागे दिसत आहेत .सहस्रधारा देखील शांतपणे वाहत आहे . मी आणि गुरू या क्षणाचा आनंद घेत आहोत !
इथून पुढे आम्ही एका झाडाच्या मदतीने जाळीवर चढून पलीकडे उडी मारली आणि नेमका हाच निर्णय फसला की काय असे आम्हाला वाटू लागले ! कारण इथून पुढे इतके बेकार आणि काटेरी जंगल लागले की विचारू नका ! पदोपदी वन्य श्वापदांच्या वावराच्या खुणा येथे दिसत होत्या .तुम्ही जोपर्यंत तुमच्या मर्यादां मध्ये असतात तोपर्यंत वन्य प्राणी तुम्हाला त्रास देत नाहीत . परंतु नेमके तुम्ही त्यांची बिळे किंवा गुहा किंवा पिले ठेवलेली असतात त्या जागी भटकताना सापडला तर मात्र तुमच्यावर हल्ला होणे निश्चित असते . इथे तसेच काहीसे आहे असे मला जाणवत होते . इथे पायवाटच नव्हता त्यामुळे कुठून कुठे जायचे तेच कळत नव्हते . चौघेही जण चारही दिशांना भटकत राहिलो आणि एकमेकांपासून वेगळे झालो . अजून आम्ही सर्वजण आवाजाच्या टप्प्यामध्ये होतो तोपर्यंत मी यातला धोका ओळखला आणि चौघांना पुन्हा एकदा एकत्र केले . अशा प्रसंगी एकत्र चालणे आवश्यक होते नाहीतर वन्य श्वापदे निश्चितपणे हल्ला करतील अशी अवस्था होती . 


सहस्रधारे नजिक आम्ही बेकार भटकलो ते भयानक जंगल ! 
या जंगलाचा अंतच लागत नसल्यामुळे त्याची व्याप्ती किती आहे याचा अंदाज येत नव्हता . अखेरीस मी चौघांना शांत राहून सहस्रधारेचा आवाज ऐकायला सुचविले .कारण नर्मदा मैया दिसत नव्हती आणि तिची दिशा देखील कळत नव्हती . अखेरीस आवाज आला आणि त्याच्या विरुद्ध दिशेला चालत रस्ता शोधायचा असे आम्ही ठरवले . लवकरच मला एक छोटी पायवाट सापडली जी आम्हाला एका मोठ्या कच्च्या रस्त्यापर्यंत घेऊन आली . हा रस्ता पुढे डांबरी सडकेला मिळाला आणि सर्वांनीच हुश्श केले . गुरु वगळता सर्वजण माझ्यावर खूप चिडले . आणि त्यांनी असा निश्चय केला की पुन्हा कधीही याच्यासोबत चालायचे नाही . अशा रीतीने जंगलामध्ये भटकण्याचा मला अनुभव होता आणि त्याची सवय झालेली होती त्यामुळे मला त्यात काही चुकीचे किंवा वावगे वाटत नव्हते . काठाकाठाने चालताना अशा प्रकारे जंगलामध्ये भटकण्याची वेळ अनेक वेळा परिक्रमेमध्ये येतेच येते . आज जेव्हा गुगल नकाशावर मी ते जंगल पाहतो तेव्हा लक्षात येते की सरळ गेले असते तरी चालले असते परंतु केवळ सोबत हे तीन लोक असल्यामुळे मला काठाचा रस्ता सोडावा लागला होता . आणि केवळ याच कारणासाठी मी सोबत कोणालाही घेत नसे . मी इथे मनोमन निश्चय केला की पुन्हा कधीही कोणाच्या सोबत काठाने चालणार नाही . एकटाच चालत राहीन . वाटेमध्ये एका शेतकऱ्याने आम्हा चौघांना थांबवले आणि त्याच्या शेतातली ताजी खरबुजे कापून खायला दिली . ती खरबुजे पोटात गेल्यामुळे थोडीशी हुशारी सर्वांनाच आली आणि एकमेकांची चेष्टा मस्करी सुरू झाली ! विशेषतः तुकाराम बुवांचा संताप अनावर झाल्यामुळे मी आणि गुरु त्यांची खूप खेचू लागलो ! हसत खेळत आम्ही सर्वजण महेश्वर गावातल्या पंढरीनाथ आश्रमामध्ये आलो . महेश्वर चा जगप्रसिद्ध घाट कधी एकदा पाहतो असे मला झाले होते ! भारतातील बहुतांश तीर्थक्षेत्रे वाचवणाऱ्या पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर यांच्या समाधीवर कधी एकदा नतमस्तक होतो असे मला झालेले होते . हा दिवस चांगला लक्षात राहिला .




लेखांक एकशे चाळीस समाप्त ( क्रमशः )

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

जे आवडते सर्वांना ...

अनुक्रमणिका

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

लेखांक १ : नर्मदे हर !

लेखांक २ : भोपाळ जवळच्या जंगलातील अपघात

लेखांक ३ : चोराची धन

लेखांक ४ : झुठा कही का ! सबकुछ तो लाए हो !

लेखांक ५ : ग्वारीघाट जबलपुर मध्यप्रदेश

लेखांक ८३ : महाराष्ट्रात प्रवेश आणि भाबरीचे भेदक भिल्ल-महात्मा फोदला गारद्या पावरा

लेखांक ७४ : लेपा बांध , वेदा संगम , कठोरा अन् मांडव्य गुंफा

लेखांक ९० : गुजरात मधील कणजी चे सान्सुभाई तडवी आणि अरण्यव्याप्त माथासर