लेखांक १२६ : जीवणपुऱ्याची नानी अंबाजी माता आणि वगाच चा वाघेश्वर महादेव
नर्मदा मातेवर बांधलेला .जगातील सगळ्यात मोठा शेतीला पाणीपुरवठा करणारा कालवा ओलांडण्यापूर्वी मी बरीच गावे पार केली . केवडिया , भूमालिया , देकी , झरिया , उंडवा ही सर्व गावे पार केली . रस्त्याने भरपूर झाडी होती . त्यामुळे उन्हाचा त्रास होत नव्हता . परंतु दुपार झाली आणि पोटात कावळे ओरडू लागले . वाटेतल्या झरिया गावामध्ये एक मोठा झरा किंवा ओढा गेलेला होता . त्यामुळे याचे नाव झरिया पडले असावे . इथे डाव्या हाताला हनुमंताचे एक सुंदर मंदिर दिसले . बाहेर नळ होता त्यावर आधी भरपूर पाणी पिऊन घेतले . समोरच हनुमंताचे उंचच उंच देऊळ होते . म्हणजे मंदिर पहिल्या मजल्यावर होते आणि खालून वरपर्यंत जायला पायऱ्या केल्या होत्या . मंदिराच्या मागे साधूची बंगले वजा राहण्याची दुमजली इमारत होती . समोर मोकळे मैदान होते आणि उजव्या हाताला एक पत्र्याची शेड केली होती जिथे चूल वगैरे होती . मला आनंद झाला ! की चला आता काहीतरी पोटात ढकलायला मिळणार ! भूक तर लागलेली होतीच . प्रथे प्रमाणे आधी हनुमंत रायाचे दर्शन घेतले आणि साधूंना भेटायला गेलो . महंत गोरेपान आणि अतिशय तेजस्वी होते . त्यांचे केस आणि दाढी शुभ्र पांढरी होती . अक्षरशः टीव्हीवर महाभारत रामायण वगैरे मालिकांमध्ये जसे साधू दाखवायचे तसे ते वाटत होते ! त्यांचा तेजःपुंज चेहरा मी पाहतच राहिलो . त्यांना नम्रपणे विचारले की इथे भोजन प्रसादी कुठे मिळते ? माझ्या सगळ्या अपेक्षांचा भंग करत अतिशय तुसड्या शब्दात त्यांनी सांगितले की इथे काही मिळणार नाही . सदाव्रत मिळू शकेल . मी चालून खूप थकलो होतो . मी त्यांना म्हणालो की खाली शेडमध्ये थोडी विश्रांती घेऊन पुढे गेले तर चालेल का ? ते म्हणाले , "ज्यादा देर नही रुक सकते । " याचा अर्थ थोडा वेळ थांबता येईल ! पडत्या फळाची आज्ञा घेऊन मी खाली आलो . तिथे एक जाडजुड सिताराम साधू आधीच बसलेला होता . मी आसन लावून पडणार इतक्यात तो मला म्हणाला , "क्या बोला महंत तुझे बच्चा ? " मी म्हणालो , " कुछ नही ।थोडी देर विश्राम कर लो बोले महंतजी । " झूठ ! सफेद झूठ ! " साधू ओरडला ! "बडा हरामी है वह । तुझे रुक बोल ही नही सकता । " साधू चवताळलेला वाटला . " मुझे भी आगे बढो बोल रहा था । मै फिर भी कल से यहा पर रुका हुआ हु । " साधू मला सांगू लागला . "भोजन पाया के नहीं ? " पिवळे कपडे घातलेल्या सिताराम साधूने मला विचारले . "नही भगवन । जैसी मैया की इच्छा । " मी उत्तरलो . साधूने स्वतःसाठी काही टिक्कड आणि मटारची भाजी केली होती . त्यातले चार टिक्कड आणि थोडी भाजी उरली होती . ती खा असे तो मला म्हणाला . भाजी कमी होती आणि टिक्कड जास्त होते . परंतु मी आनंदाने ते ग्रहण केले ! हा साधू अन्नाला सतत नावे ठेवत होता . इथे दिलेल्या मटारच्या दर्जाबद्दल तो खूप खालच्या पातळीला जाऊन बोलत होता . पिठालाही नावे ठेवत होता . एकंदरीत त्याला अखंड बोलण्याची सवय होती असे माझ्या लक्षात आले . बरं तिथे मी एकटाच असल्यामुळे त्याला किमान हो नाही किंवा हं हं एवढे तरी म्हणावे लागत होते . मला अक्षरशः त्याच्या रटाळ बोलण्याचा कंटाळा आला . त्याचे प्रत्येक वाक्य पहिल्या वाक्या पेक्षा अधिक नकारात्मक असायचे . मी शांतपणे भोजन आटोपले . माझ्यावर तो जोरात ओरडला भांडी घासून ठेव ! दारात असलेल्या नळावर जाऊन मी मातीने स्वच्छ भांडी घासली . राखुंडीने आणि मातीने भांडी खरंच खूप छान निघतात . आमच्या लहानपणी सर्रास हे वापरले जायचे . गेल्या वीस वर्षात डिटर्जंट आणि साबण यांचे प्रस्थ फारच वाढले . त्याच्या मागे शुद्ध व्यवसायिक गणित आहे .डिटर्जंट किंवा साबण वापरल्यामुळे सांडपाण्याला काळा रंग प्राप्त होतो . माती व राखुंडीच्या सांडपाण्याचा रंग कधी काळा होत नाही . विशेषतः तेलाचे डाग या दोन्हींनी खूप छान निघतात . भांड्याला एक वेगळी चमक येते . त्यात नारळाची शेंडी मिळाली तर मग काय विचारता ! अजून काही दिवसांनी याच सर्व गोष्टी ॲमेझॉन वर मिळू लागल्या की आपल्या लोकांना परत त्याचे महत्त्व पटेल ! तोपर्यंत पटणार नाही ! असो .
भांडी घासून मी पुन्हा आत मध्ये आलो आणि आता एक क्षणभर पाठ टेकावी असा मी विचार केला . इतक्यात सिताराम साधूचे नवीनच नाटक चालू झाले . मला म्हणाला कोणत्या आखाड्याचा आहेस ? मी नम्रपणे साधूला म्हणालो , " महाराज मी गृहस्थी आहे .साधू नाही " . मी असे म्हणायचा अवकाश की अक्षरशः आभाळ कोसळल्यासारखे तो साधू चवताळला आणि माझ्या अंगावर धावून आला ! "गृहस्थी होकर साधू के कपडे पहनते हो ? शरम नही आती तुम्हे ? नालायक ? " त्याच्या या अचानक हल्ल्याने मी गांगरून गेलो पण क्षणभरच . आता याचे अति झाले होते . म्हणून एकदाचा याचा सोक्षमोक्ष लावायचा असे मी ठरवले . आणि साधूला विचारले तुझा आखाडा कुठला आहे ? आखाड्याचा क्रमांक सांग . तुझ्या गुरूंचे नाव सांग . तुझी गुरु परंपरा सांग . पिवळे वस्त्र का नेसलेस ते सांग . या अनपेक्षित प्रश्नांमुळे साधू बावचळला . खरे म्हणजे याला साधू म्हटले नाही पाहिजे . हा साधू बनण्याचा प्रयत्न करणारा एक गृहस्थ होता . गृहस्थ म्हणजे अविवाहितच परंतु घरात राहणारा ! कोणाशीच पटत नाही म्हणून घराबाहेर पडून साधू व्हायला निघाला होता . समोरच्या माणसावर दादागिरी धाकदपटशा करून साधू होता येईल असे त्याला वाटले होते . त्याने शिजवलेल्या अन्नात देखील त्याचे हे नकारात्मक विचार उतरले होते . कदाचित त्या अन्नामुळेच माझी देखील बुद्धी फिरली . आणि मी त्याला चांगलाच झाडला . त्याला म्हणालो तुला साधा तुझ्या आखाड्याचा नंबर माहित नाही . आखाड्याचे नाव जरी असले तरी त्याला एक क्रमांक सुद्धा असतो . हे मला पक्क्या साधूंकडून माहिती झालेले होते . साधू गडबडला . शांत हो शांत हो म्हणू लागला . पण मी कुठला शांत होणार आहे ! तो माझ्या वस्त्रावर उतरला होता ! त्यामुळे शाब्दिक बाण मारून त्याच्या वस्त्रांच्या पुरत्या चिंधड्या केल्याशिवाय मी शांत बसणार नव्हतो ! साधुत्वाचा त्याने धारण केलेला खोटा मुखवटा मी टराटरा फाडला . अन्नाचा प्रभाव कसा असतो बघा ! मी त्याला म्हणालो , " राहिला प्रश्न वस्त्राचा तर हे वस्त्र मला माझ्या वडिलांनी उपनयन प्रसंगी परंपरेने नेसवलेले आहे . त्यासोबत गायत्री मंत्राचा उपदेश केलेला आहे ! " अर्थात हे अर्धसत्य होते ! कारण माझे वडील त्यांच्या तरुणपणी अत्यंत नास्तिक होते . केवळ घरातल्या सर्वांच्या आग्रहाखातर ते मुंजीला उभे राहिले होते . पुण्यातल्या नारद मंदिरामध्ये सामुदायिक मुंजी मध्ये माझी मुंज आटोपली होती . त्यावेळी एक मोठा मजेशीर प्रसंग घडला होता . गुरुजींनी सांगितले की आता वडिलांनी मुलाच्या कानामध्ये गायत्री मंत्र सांगावा . वडिलांनी डोक्यावर उपरणे घेतले आणि माझ्या कानात हळूच म्हणाले , " हा गायत्री मंत्र काय भानगड आहे रे बाळा ? " मी त्यांना म्हणालो कान इकडे करा आणि त्यांच्या कानात चौकस पणे आजीकडून आधीच शिकून घेतलेल्या गायत्री मंत्राचा उपदेश केला ! असली सगळी तऱ्हा ! परंतु वस्त्र मात्र परंपरेने नेसवण्यात आले होते . त्यामुळे ते घालण्याचा मला पूर्ण अधिकार होता .
माझ्यामध्ये अध्यात्मिकतेचे संस्कार रुजवणारी आणि गायत्री मंत्र शिकवणारी माझी आजी . सोबत अर्थातच प्रस्तुत लेखक !
पारंपारिक छाटी वस्त्र नेसून भिक्षा मागताना प्रस्तुत लेखक
माझे फेट्या वरचे बालपणापासून असलेले प्रेम तर आपण आता जाणताच !
महाविद्यालयीन जीवनात देखील जेव्हा इतर मुलांना झकपक कपडे घालायची आवड असते तेव्हा प्रस्तुत लेखक हेच छाटी व उपरणे वस्त्र घालून लांबच्या घळी खनाळांच्या तीर्थ यात्रा करतसे .
माझ्या मुलाला देखील जन्माला आल्याबरोबर मी परंपरा म्हणून हेच वस्त्र नेसवले होते !
पुढेही अनेक वेळा त्याने स्वेच्छेने ते नेसले
पारंपारिक छाटी वस्त्र नेसून भिक्षा मागताना प्रस्तुत लेखक
सोबत वडील , भिक्षा घालताना आई आणि मातृतुल्य काकू
प्रस्तुत लेखकाला घास भरवताना राजा गोसावी . माझे फेट्या वरचे बालपणापासून असलेले प्रेम तर आपण आता जाणताच !
महाविद्यालयीन जीवनात देखील जेव्हा इतर मुलांना झकपक कपडे घालायची आवड असते तेव्हा प्रस्तुत लेखक हेच छाटी व उपरणे वस्त्र घालून लांबच्या घळी खनाळांच्या तीर्थ यात्रा करतसे .
माझ्या मुलाला देखील जन्माला आल्याबरोबर मी परंपरा म्हणून हेच वस्त्र नेसवले होते !
पुढेही अनेक वेळा त्याने स्वेच्छेने ते नेसले
अगदी सहज घरात वावरताना सुद्धा हे वस्त्र नेसण्याची सवय आम्हाला लहानपणापासून आहे व ती सवय पुढच्या पिढीत उतरलेली आहे .
मुलाच्या उपनयन संस्कार प्रसंगी देखील परंपरेनुसार गायत्री मंत्रासोबतच त्याला हेच वस्त्र मी प्रदान केले होते .
नानी माताजी मंदिर
हे आहे कॉम्प्युटर वाले बाबा अर्थात अंबा गिरी महाराज . परिक्रमावासीयांशी हे फारसे बोलत नाहीत असे मला जाणवले
मंदिराचा मंडप विस्तीर्ण व सुंदर आहे . भरपूर खांब असल्यामुळे मुलांसाठी खेळण्याची पर्वणी आहे
इथे अनेक देवी आहेत
मंदिराच्या मागे सर्व जंगल आहे
परिक्रमा मार्गावरील पुढील गावांची इथे लिहिलेले अंतरे प्रत्यक्षात वेगळी आहेत असे मला जाणवले
ही आहे नानी अंबाजी माता . गुजराती भाषेमध्ये नानी म्हणजे छोटी
अन्य एका देवीची मूर्ती
मंदिराकडे येताना जे मुख्य प्रवेशद्वार किंवा कमान लागते त्यात झोपाळ्यावर बसलेली देवी वाऱ्याने हलताना मी स्वतः पाहिली आहे ! ही कल्पना खूपच छान आहे .
इथे अंतरे वाचावीत व स्वतः ठरवावीत . अन्यथा खूप पायपीट होते . इथे रोज वेगळे अंतर लावतात !
मंदिराच्या मागे असलेली गुहा किंवा घळ
गुहेशेजारी देखील अनेक देवीच्या मूर्ती आहेत
बाहेर छोटीशी बाजारपेठ असून छोटी मोठी अनेक दुकाने आहेत
डावीकडे दिसणारे याच स्लॅब खाली रात्री मुक्काम केला होता
गुहेमध्ये बहुतांश काळ पाणी साठलेले असते
मंदिरामध्ये उभे असलेले कॉम्प्युटर वाले बाबा
या मंदिराचा कळस विशेष लक्षात राहिला
देवीच्या लाल झेंड्यासोबतच रंगीबेरंगी आदिवासी झेंडा देखील फडकतो आहे
आश्रमात निवांत गप्पा मारत बसलेले प्रस्तुत लेखक आणि अभय चौहान . अभय भाई ने नंतर हे फोटो माझ्या मित्राच्या क्रमांकावर पाठवून दिले होते .
तात्पर्य हे वस्त्र आमचे परंपरागत वस्त्र होते . गृहस्थी माणसाला ते नेसायचा अधिकार नाही वगैरे शब्द मी खपवूनच घेऊ शकत नव्हतो . विशेषतः कोणी अकारण परंपरेवर आघात केला तर त्याला सुट्टी देऊच नये ! जागेवर निवाडा करावा ! माझा रुद्रावतार पाहून सीताराम साधू एकदमच नरमला . इतका मवाळ बोलू लागला की आता तर तो माझ्या पुढे पुढे करू लागला ! गोड गोड बोलू लागला ! मला एकीकडे त्याचा रागही आला होता तर दुसरीकडे त्याची मजाच वाटू लागली ! अतिशय हलका मनुष्य होता . कुठल्याही क्षेत्रात गेला असता तरी तळ गाठलाच असता असा होता ! साधूचा नाद मी सोडून दिला . झोळी उचलली आणि पुढे चालू लागलो . इकडे वर राहणाऱ्या साधूच्या खोलीमध्ये कोणीतरी त्याच्याशी भांडत आहे असा आवाज मला आला . आवाज तरुणीचा होता . मी निघताना एक तरुण साध्वी बाहेर आली . मी जागेवरूनच तिला नमस्कार केला नर्मदे हर म्हणालो आणि पुढचा मार्ग पकडला . सिताराम साधू मला थांब थांब म्हणून मागे लागला . तो देखील माझ्यासोबत येण्यासाठी आवरावर करू लागला . परंतु बिचारा घोर संसारी होता त्यामुळे त्याचा संसार गोळा करेपर्यंत मला बराच वेळ मिळाला ! मी पाय गाडीचा "टॉप गिअर " टाकला ! परिक्रमेचे इतके दिवस झाल्यावर तुम्हाला पायाची गती कमी किंवा जास्त करण्याची कला साध्य होऊन जाते ! वायु वेगाने मी तिथून अदृश्य झालो .
ओघाने विषय निघाला आहे म्हणून पुन्हा एकदा सांगतो . परिक्रमेच्या नियमानुसार शिवलेले वस्त्र घालायला परवानगी नसते . मी एकच शिवलेला सदरा घातला होता कारण तो मला एका संतांनी दिलेला होता आणि त्याला परिक्रमा करून आणायला सांगितले होते . मला नंतर मिळालेले शिवलेले सर्व सदरे मी देऊन टाकले .पायजमा किंवा पॅन्ट घातली तर परिक्रमे मध्ये चालताना वजन कमी होत जाते त्यामुळे ती सैल पडत जाते . पायात लुंगी घालण्याची पद्धत अलीकडे रूढ झालेली आहे परंतु ती प्रत्येक पावलाला अडथळा करते . नेहमी करून वर घ्यावी तर फार वर येते आणि गुडघ्याला इजा होऊ शकते . त्यापेक्षा छाटी हे असे वस्त्र आहे की एकाच वस्त्रामध्ये वरचे शरीर आणि निम्मे पाय झाकले जातात . तसेच वजन कमी होते आणि पाय मोकळे होतात . पायाची हालचाल सुलभ होते . शिवाय छातीला संरक्षण राहते . छातीत कफ वगैरे होत नाही . थंडी वाजत नाही . पोटापाशी सामान ठेवायला एक कप्पा मिळतो .मानेवर असलेली गाठ तुम्हाला तुमच्या परिक्रमावासी म्हणून असलेल्या जबाबदारीची जाणीव करून देत राहते.त्यामुळे कोणी तुम्हाला म्हणाले की हे वस्त्र साधूचे आहे वगैरे तर ऐकू नका ! हे आपले पारंपारिक भारतीय वस्त्र आहे ! कोणीही ते नेसू शकतो . शिवण असलेली वस्त्रे टाळावीत उदाहरणार्थ बटणाचे सदरे ,टोपी , कॅप ,पनामा हॅट ,तयार अंतर्वस्त्रे इत्यादी . गॉगल घड्याळ अंगठ्या दागिने इयरबडस व अन्य गॅजेट देखील टाळावीत .अर्थात हे नर्मदा पुराणात सांगितलेले नसले तरी समजण्यासारखे आहे ! मी संपूर्ण परिक्रमेमध्ये एकदाच एका बंगाली परिक्रमावासीने दिलेली टोपी काही तास घातली होती व नंतर लगेचच एका गुराखी मुलाला देऊन टाकली होती . माझी लंगोट मी स्वतः धोतराची एक बाजू फाडून तयार करायचो . या पाठीमागचा मूळ हेतू इतकाच आहे की आपले परिक्रमा काळातील जीवन अतिशय सोपे सुलभ आणि सुटसुटीत असावे .मी देखील सुरुवातीचे काही दिवस थंडीसाठी घातलेले थर्मल वेअर वगळता शिवलेले कपडे फारसे घातले नाहीत . धाबळी मिळाली असती तर ते देखील मी घातले नसते आणि केवळ धाबळी गुंडाळली असती . आपणही परिक्रमेमध्ये लुंगीच्या ऐवजी एकदा छाटी घालून पहावी . वावरण्यास ती अत्यंत सुलभ आहे . तसेच परिक्रमेसाठी अत्यंत आदर्श आहे . छाटी कशी नेसावी याचे सविस्तर व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनल वर उपलब्ध आहेत ते अवश्य पहावेत .असो . आवड आपली आपली ! इथून पुढे नानी अंबाजी अर्थात छोटी अंबाजी नावाचे स्थान होते . तिथे पोहोचण्यासाठी बरेच चालावे लागले . मिश्र वस्ती होती . म्हणजे म्हटले तर मनुष्य वस्ती नव्हती . व जंगलही फार काही दाट नव्हते . जीवणपुरा नावाचे हे गाव होते . तसे हे आदिवासी क्षेत्र आहे . मंदिर फार सुंदर होते . उंच सखल भाग होता . मधोमध मंदिर . मोठ्या प्रवेशद्वारातून गेल्यावर डाव्या हाताला परिक्रमावासी उतरण्याची सोय केलेली होती . मध्ये मंदिर होते आणि मागच्या बाजूला एक ओढा होता .त्याच्या पलीकडे पुरातन घळी होत्या .भरपूर माकडे होती. घळी मध्ये जाण्यासाठी पाण्यातून जावे लागे . बऱ्यापैकी पाणी होते . घळीतून पाण्याचा स्त्रोत होता . वरून एक छोटासा जलप्रपात देखील पडत होता . जिकडे बघावे तिकडे देवीची स्थाने होती . इथे अंबागिरी नावाचे एक साधू राहत होते . मी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी शून्य आगत्य दाखवले . इथे एक उत्तर प्रदेशचा साधू सेवा करत होता तो मात्र खूपच कष्टाळू होता आणि अतिशय मनमिळाऊ होता . परिक्रमावासींची मनोभावे सेवा करत होता . त्यानेच मला आसन लावण्यासाठी जागा दिली . जागा अतिशय अस्वच्छ होती. माशा घोंघावत होत्या . स्वच्छतेसाठी झाडू पण नव्हता . मी एका फडक्याने सगळी खोली झाडून घेतली . खोली म्हणजे दोन बाजूंनी उघडी होती . खूप घाण वास येत होता .इथे माझ्या आधी काही साधू आलेले होते . एक हरियाणवी नागा बाबा होता . अतिशय उत्तम प्रकृती होती . खरा साधू होता . बोलण्यामध्ये ऋजुता होती . जी सहसा हरियाणवी लोकांमध्ये सापडत नाही . थोड्याच वेळामध्ये रड्या साधू तिथे आला ! माझ्यावर आरडाओरडा करू लागला . मला एकट्याला टाकून पुढे का गेलास वगैरे भांडू लागला . मी नागा बाबाला खुणेनेच इशारा केला ! आम्ही दोघेही हसू लागलो . हे पाहिल्यावर तो अजूनच चिडला . मी संपूर्ण परिसराचे दर्शन घेतले . इथे आदिवासी मुले खेळत होती . त्यांचा धांगडधिंगा पाहून मला मजा वाटली . बाहेर बरीच दुकाने होती . तिथे देखील एक फेरफटका मारून आलो . मुले माझ्यासमोर येऊन दंगा करायचा प्रयत्न करत होती . मग मीच त्यांच्या खेळामध्ये सामील झालो ! रडा साधू पुन्हा एकदा चिडला ! मला म्हणाला परिक्रमा करण्यासाठी आला आहेस का मुलांशी खेळण्यासाठी ? मी उत्तर दिले मुलांशी खेळण्यासाठी ! नागा बाबा जोरजोरात हसू लागला ! या साधूचा पारा अजूनच चढला ! छोट्या छोट्या गोष्टींमधला आनंद घ्यायचे सोडून छोट्या छोट्या गोष्टींमधून दुःख शोधून काढण्याची काही लोकांना सवय असते . सुख देखील तुम्हालाच आणि दुःख देखील तुम्हालाच ! काय निवडायचे तुम्हीच ठरवा ! नागा बाबाची आणि माझी वेव लेंग्थ जुळली . त्याच्याशी मी बराच वेळ गप्पा मारल्या . त्याच्याकडून नागा साधूंची बरीच माहिती मिळाली . नागा साधूंची एक विशिष्ट उपासना असते . तसेच नमस्कार करण्याची एक विशिष्ट पद्धत असते . ते सर्व मी पाहून घेतले . रात्री भोजनाच्या वेळी रड्या साधू पुन्हा एकदा भांडू लागला . त्याच्या बोलण्यामध्ये ९०% वेळा खाद्यपदार्थांचाच विषय असायचा . साधूला अजिबात शोभणार नाही असे त्याचे वर्तन होते . मुळात तो साधू नव्हताच . साधू बनण्याचा प्रयत्न करणारा परंतु मध्येच प्रयत्न सोडून दिलेला एक साधक होता . आव मात्र साधू बनल्याचा होता . केवळ भात पाहून तो चिडला . जोरजोरात भांडू लागला . इथे रोटी का नाही या विषयावर त्याने वितंडवाद घालण्यास सुरुवात केली . हरियाणवी साधू माझ्याकडे पाहून हसू लागला . मी हसू दाबण्याचा खूप प्रयत्न केला परंतु तरीदेखील रड्या साधूला ते लक्षात आले . त्यामुळे तो अजूनच चवताळला . त्याचा तमोगुण इतका विकोपाला गेलेला होता की तो सांगून ऐकण्याच्या मनस्थितीमध्येच नव्हता . त्या संपूर्ण आनंदमय परिसरातील अध्यात्मिक आनंद घालविण्याचे काम तो त्याच्या वाईट सवयीमुळे करत होता . माझ्या मनात विचार आला की या साधूला रामेश्वरच्या यात्रेवर पाठविले पाहिजे ! हा लेख लिहीत आहे तोपर्यंत माझी रामेश्वर ची यात्रा १९ वेळा झालेली आहे ! कदाचित कुठल्यातरी जन्मी रामेश्वराला नवस बोललो असेन की अमुक अमुक वेळा येईन आणि तो फेडायचा राहिला असेल म्हणून हा जन्म मिळाला असावा असे मी गमतीने म्हणतो ! परंतु सांगायचे तात्पर्य हे की दक्षिण भारतातल्या माझ्या वास्तव्यामध्ये मी फक्त आणि फक्त भातच खाल्लेला आहे ! तिथे नावाला सुद्धा रोटी चपाती पोळी बघायला मिळत नाही . आणि मुळात अन्न हे पूर्णब्रह्म आहे हे तुम्हाला नर्मदा मैया शिकवते . अन्नाचे महत्त्व नर्मदा परिक्रमे मध्ये जेवढे पटते तेवढे आयुष्यात अन्यत्र कुठे पटेल असे वाटत नाही . त्यामुळे निमुटपणे विना तक्रार जे पानात पडेल ते प्रसाद म्हणून सेवन करणे यासारखा उत्तम उपाय नाही ! मी आणि नागा साधू पटापट जेवून ताटावरून उठलो . आणि गुहांच्या बाजूला गप्पा मारण्यासाठी निघून गेलो . या साधूच्या जवळपास राहिले तरी त्याची नकारात्मकता आम्हाला डाचत होती . आपल्या आयुष्यामध्ये अशी नकारात्मक माणसे येत राहतात . आपण त्यांना काहीही ज्ञान न देता शांतपणे त्या चित्रातून स्वतःला वजा करावे हेच उत्तम असते . तुम्हाला त्रास होईल असे वर्तन करणारी व्यक्ती तुमच्या संपर्कात येऊच नये याचा अधिकाधिक प्रयत्न करावा . आणि तरीदेखील दुर्दैवाने ती व्यक्ती समोर आलीच तर एकही शब्द न बोलता तिच्याकडे दुर्लक्ष करत राहावे . कारण अशा लोकांना चांगुलपणाचा किंवा सुज्ञपणाचा उपदेश करणे म्हणजे गाढवापुढे वाचली गीता असेच आहे ! नागा साधूच्या आणि माझ्या अनेक विषयांवर गप्पा झाल्या . झोपायला जाण्यापूर्वी माझ्या लक्षात आले की आश्रम चालविणारे बाबा जागे आहेत व काहीतरी करत आहेत . नीट पाहिल्यावर माझ्या लक्षात आले की ते कॉम्प्युटरवर बसून काम करत आहेत . अजून थोडे खिडकीच्या जवळ गेल्यावर माझ्या लक्षात आले की बाबाजी लिनक्स मध्ये कोडींग करत आहेत ! आश्रमातील सेवकांकडे चौकशी केल्यावर लक्षात आले की बाबाजी रात्री बराच वेळ काम करत बसतात .त्यांनाच जाऊन विचारावे असे मला वाटले होते परंतु त्यांना काही विचारले तर ते उत्तर देत नाहीत असा माझा अनुभव असल्यामुळे मी तो विषय तिथेच सोडून दिला . जो मनुष्य भगवी वस्त्रे घातल्यावर आयटी क्षेत्रातील कामे करतो तोच मनुष्य IT क्षेत्रामध्ये कार्यरत असताना नक्की संन्यास जीवनाच्या गप्पा मारत असणार असे उगाचच मला वाटून गेले ! ना अरत्र !ना परत्र ! ना कलत्र !या बाबांना परिसरातील सर्व लोक कॉम्प्युटर वाले बाबा म्हणून ओळखत असल्यामुळे मला त्या कॉम्प्युटर वाल्या बाबांची मनापासून कीव वाटली. मुळात आपण ज्याला इन्फॉर्मशन किंवा डेटा असे म्हणतो त्याची साठवणूक विद्युत करंट द्वारे चार्ज च्या स्वरूपात अर्थात विद्युत प्रभारात केलेली असते . आणि अशाप्रकारे साठवलेला डेटा किंवा माहितीचा साठा हा इतका व्होलटाईल किंवा सहज उडून जाणारा आहे की आपण कल्पना देखील करू शकणार नाही ! म्हणजे सर्व संत उच्चरवाने जिच्यापासून सावध आणि अलिप्त रहा असे सांगतात त्या मायेचे हे जणू काही प्रकट स्वरूपच आहे ! आणि संन्यस्त जीवनाचा स्वीकार केल्यावर सुद्धा त्याची आसक्ती असणे हे मला थोडेसे मजेशीरच वाटले . काही लोक भारतात राहताना परदेशातील विकासाची तोंड फाटेपर्यंत स्तुती करतात . आणि त्याच देशात गेल्यावर मात्र भारतीय संस्कृती कशी महान आहे वगैरे गोडवे गातात . हे करण्याच्या नादात आहे त्या ठिकाणाचा स्थळाचा काळाचा व परिस्थितीचा आनंद घेणे ते विसरूनच जातात ! असो . ज्याचे त्याचे आयुष्य अन् ज्याचा त्याचा आनंद ! आपण झोपण्यापूर्वी थोडेसे परिसराचे दर्शन घेऊयात .
हे आहे तनखला जीवणपुरा गावातील नानीअंबाजी माता मंदिराचे प्रवेशद्वारनानी माताजी मंदिर
हे आहे कॉम्प्युटर वाले बाबा अर्थात अंबा गिरी महाराज . परिक्रमावासीयांशी हे फारसे बोलत नाहीत असे मला जाणवले
मंदिराचा मंडप विस्तीर्ण व सुंदर आहे . भरपूर खांब असल्यामुळे मुलांसाठी खेळण्याची पर्वणी आहे
इथे अनेक देवी आहेत
मंदिराच्या मागे सर्व जंगल आहे
परिक्रमा मार्गावरील पुढील गावांची इथे लिहिलेले अंतरे प्रत्यक्षात वेगळी आहेत असे मला जाणवले
ही आहे नानी अंबाजी माता . गुजराती भाषेमध्ये नानी म्हणजे छोटी
अन्य एका देवीची मूर्ती
मंदिराकडे येताना जे मुख्य प्रवेशद्वार किंवा कमान लागते त्यात झोपाळ्यावर बसलेली देवी वाऱ्याने हलताना मी स्वतः पाहिली आहे ! ही कल्पना खूपच छान आहे .
इथे अंतरे वाचावीत व स्वतः ठरवावीत . अन्यथा खूप पायपीट होते . इथे रोज वेगळे अंतर लावतात !
मंदिराच्या मागे असलेली गुहा किंवा घळ
गुहेशेजारी देखील अनेक देवीच्या मूर्ती आहेत
बाहेर छोटीशी बाजारपेठ असून छोटी मोठी अनेक दुकाने आहेत
डावीकडे दिसणारे याच स्लॅब खाली रात्री मुक्काम केला होता
गुहेमध्ये बहुतांश काळ पाणी साठलेले असते
मंदिरामध्ये उभे असलेले कॉम्प्युटर वाले बाबा
या मंदिराचा कळस विशेष लक्षात राहिला
व त्याहून लक्षात राहिली ती म्हणजे गुहा आणि तिथली गूढरम्यता
तो दिनांक होता १८ एप्रिल २०२२ . रात्री त्या भयानक खोलीमध्ये आम्ही झोपायचा प्रयत्न करू लागलो. हरियाणवी साधू पडल्या पडल्या माझ्याशी गप्पा मारू लागला . "हमे किसी ने नर्मदा परिक्रमा करने का आमंत्रण थोडी ना दिया है ? हमारा खुदका किडा है । इसलिये आते है नर्मदा खंड मे । और वाट लगा देते है हर चीज की । क्या बोलते हो । " "जी ठीक बात कही महाराज । " मी म्हणालो . " एक दिन नही रोटी मिली तो क्या फरक पडता है ? जिस दिन दस रोटी मिली वो दिन याद नही आता ! बिना कुछ किये खाना खिला रही है मैया । जो चाहे देती है । फिर भी रोने की क्या जरुरत है ? " साधू बोलत होता त्यात तथ्य होते . पडल्या पडल्या मी त्याच्यावर विचार करू लागलो . जे आपल्या नशिबात आहे ते मिळाल्याशिवाय राहत नाही . आणि जे आपल्या नशिबात नाही ते कितीही धडपड केली तरी प्राप्त होत नाही हे साधे गणित कळायला माणसाला उभे आयुष्य का बरे वाया घालवावे लागते ? किती सहजपणे प्राप्त होणार हा बोध आहे ! याला दैववाद म्हणून कमी लेखण्याचे कारण नाही , हा परिक्रमेतला धगधगीत अनुभव आहे . विचार करता करता डोळा लागला . पहाटे उठून सर्व आन्हिके आटोपली .आणि चालायला सुरुवात केली . पुढे १२ किलोमीटर अंतरावर बोरियाद नावाचे गाव आहे असे आदल्या दिवशी कळाले होते .परंतु प्रत्यक्षात ते २७ किमी लांब होते . अगदी चटकट घेतला तरी १८ किलोमीटर होतेच ! नर्मदा परिक्रमेमध्ये काही ठराविक ठिकाणे आहेत जिथे तुम्हाला नर्मदा मातेचा काठ सोडून लांब जावे लागते . त्यातील हे एक ठिकाण आहे . सरदार सरोवर धरणाच्या फुगवट्यामुळे असे होते . दक्षिण तटावर सरदार सरोवराचा फुगवटा शूलपाणीची झाडी व्यापून उरलेला आहे . इथे थोड्या कमी नद्या येऊन मिळतात . परंतु उत्तर तटावर शूलपाणी ची जी झाडी आहे तिथे मात्र भरपूर नद्या नर्मदा मातेला येऊन मिळताना दिसतात . त्यांच्यामध्ये नर्मदा मातेचे पाणी उलटे शिरलेले आहे . या धरणाची उंची खूप जास्त असल्यामुळे कित्येक किलोमीटर पाणी आत मध्ये शिरते . त्यामुळे काठाने चालण्याचा मार्ग नष्ट होऊन गेलेला आहे . व अतिशय लांबचा फेरफटका मारूनच हे अंतर पार करावे लागते . कोणी चुकून माकून काठाने जाण्याचा प्रयत्न केला तर त्याला काहीच मिळणार नाही . इथे ना पायवाटा आहेत ,ना रस्ते आहेत , ना मोठी गावे आहेत ,ना आश्रम आहेत ,ना सेवा आहे . त्यामुळे पुस्तकात दिलेला जो मार्ग आहे तोच सोयीचा आहे .
पिवळ्या रंगाने दाखवलेला मार्ग काठावरचा मार्ग आहे परंतु तो बंद असल्यामुळे लाल रंगाने दाखवलेल्या मार्गावरून चालावे लागते .
सर्वच पुस्तकांमध्ये या मार्गाने जाऊ नये असे देखील लिहिलेले आहेत . अर्थात तरी देखील कोणी अट्टाहासाने गेलाच तर त्याला नर्मदा माता उपाशी झोपायला लावणार नाही याची देखील खात्री आम्हाला आहे ! परंतु मैयाला त्रास होऊ नये म्हणून हा मार्ग टाळलेला बरा ! कारण इथे वन्य श्वापदे देखील खूप आहेत . त्या सर्वांनाच आपल्या जाण्याचा त्रास होतो . तो टाळलेला अतिउत्तम .
आत्मकृष्ण महाराजांच्या पुस्तकांमध्ये देखील असाच सल्ला दिलेला आपल्याला दिसतो
हे संपूर्ण आदिवासी क्षेत्र आहे . दुर्दैवाने या भागातील आदिवासी समाजामध्ये विष कालविण्याचे काम चळवळीच्या नावाखाली काही लोकांनी गेली अनेक वर्ष केलेले आहे . देशातील समाज जीवन कायम अस्थिर रहावे ,तसेच त्यांचा या देशातील सरकारे , पोलीस , प्रशासन व बहुजन समाज यांच्यावरील विश्वास नष्ट व्हावा ,उडून जावा , यासाठी अखंड प्रयत्न करणारी काही मंडळी या देशामध्ये आहेत . त्यांच्या प्रयत्नाला इथे यश आल्यासारखे वाटते . कारण बोरीयाद पर्यंत संपूर्ण अंतर जाताना मध्ये एकाही व्यक्तीने मला नर्मदे हर केले नाही ! कोणी तुम्हाला काय हवे काय नको विचारत देखील नाही . किंबहुना तुमच्याकडे पाहून न पाहिल्यासारखे केले जाते असा अनुभव मला या भागात आला . वाईट वाटले . आपलीच माणसे . परंतु आपल्याला पारखी झाली तर त्या सारखे दुःख ते काय ! आपल्या देशातील मानवी वस्तीच्या मूळ स्त्रोतावर भरपूर संशोधन झालेले आहे . तसेच इंग्रजांनी मुद्दामहून प्रसारित केलेला आर्य द्रविड वाद देखील खोटा सिद्ध झालेला आहे . तरी देखील या भागातील लोकांना तुम्ही मूळनिवासी आहात वगैरे शिकवून मूळ समाजापासून तोडण्याचे महापातक काही समाजकंटक अखंड करीत आहेत . त्यातून आदिवासी समाजाचेच नुकसान होणार आहे हे त्यांच्या लक्षात येत नाही का ?! तर येते परंतु आदिवासी समाजाशी देखील त्यांना काही देणे घेणे नाही . तर केवळ समाजामध्ये फूट पाडली की त्यांचा कार्यभाग साधलेला असतो हे आपण सूज्ञ लोकांनी कायम लक्षात ठेवले पाहिजे . इथे गढ बोरीयाद नावाचे गाव आहे . त्या गावात आल्यावर देखील कोणी मला आश्रमाचा पत्ता सांगेना . उलट अगदी आश्रमा शेजारी आल्यावर देखील एक म्हातारा मला आश्रमात पाठवण्याऐवजी पुढच्या गावात पाठविण्याचा प्रयत्न करत होता असे माझ्या लक्षात आले . अखेरीस एका शिवमंदिरामध्ये आलो . शेजारीच थंडगार पाण्याचा झरा होता . ते पाणी पिल्यावर क्षणभर मंदिरात शांतपणे बसावे असे वाटले . सुमारे तासभर डोळे मिटून शांत बसलो होतो . त्याला झोप म्हणावी तर मी जागा होतो आणि जागृती म्हणावी तर मी झोपलेला दिसत होतो . समाधी आणि जागृती याच्या मधील अनेक अवस्था शास्त्रकारांनी वर्णन करून ठेवलेल्या आहेत . त्यातली सर्वसाक्षीणी तुर्या नावाची एक अवस्था आहे . एक स्वप्न अवस्था आहे , एक सुषुप्ति नावाची अवस्था आहे . ही नक्की कुठली अवस्था होती सांगता येणार नाही . पण झोप नक्की नसावी . आज पूर्ण मार्ग शेता शेतातून होता . मध्ये थोडी खुरटी झाडी होती . अशी झाडी कोल्हे लांडगे यांना आवडते . मोठी श्वापदे अशा ठिकाणी फरशी नसतात . अनेक गावांच्या हद्दी पार करत नाही चालत होतो . मध्ये कुठेही परिक्रमेचा मार्ग आखलेला नव्हता किंवा झेंडे लावले नव्हते किंवा बाण काढले नव्हते किंवा कोणी भेटतही नव्हते . सुदैवाने शेतांचे बांध चांगले होते . त्यावरून चालत होतो . परिक्रमावासींनी फेकलेले पारले जी बिस्किट पुड्याचे कागद रस्ता दाखवत होते ! बोरियाद या गावाचे अनेक छोटे छोटे भाग होते . कोळी बोरियाद , भिल बोरीयाद , गढ बोरियाद असे भाग होते .अनेक फाले होते . इथे वाडी किंवा वस्तीला फाल्या किंवा फल्या म्हणतात . मी बरीच गावे पार केली होती .मूलनिवासी चळवळीच्या घरांवर रंगीबेरंगी झेंडे दिसतात.
साध्या एकावर एक विटा रचत बांधलेले आदिवासी घरदेवीच्या लाल झेंड्यासोबतच रंगीबेरंगी आदिवासी झेंडा देखील फडकतो आहे
इथेच मी चालता चालता तिलकवाड्याचा किनारा खाणारी मेण नदी देखील पार केली होती . आजचा दिवस चालण्याचा होता . चंद्रमौलेश्वर महादेवाचे दर्शन घ्यावे म्हणून मंदिरात आलो . क्षणभर बसलो . इथे राजेश भाई नामक एका सदृहस्थाने प्रेमपूर्वक नर्मदे हर केले . मंदिराला लागूनच त्याची छोटीशी झोपडी होती . समोर एक शाळा होती . राजेश भाई आणि त्याची विनम्र पत्नी दोघे मिळून परिक्रमावासीयांची मनोभावे सेवा करत . दोघे अत्यंत विनम्र आणि कष्टाळू होते . परंतु दुर्दैवाने दोघांच्या संसार वेलीला अजून फुल लागलेले नव्हते . दोघांनी त्यांची व्यथा माझ्यापुढे व्यक्त केली . समोर असलेली शाळा व हे मंदिर अशी सर्व जागा राजेश भाई यांची होती . त्यांनी मोठ्या उदार अंतःकरणाने आपली शेत जमीन शाळेसाठी म्हणून मोफत वापरण्यास दिली परंतु शाळेने संपूर्ण जागेवर कब्जा करून त्यालाच जागेतून हाकलून लावले असे त्याने मला सांगितले . मला फार वाईट वाटले . तुला तसेही कोणी मूलबाळ नाही तर तुला ही जमीन काय कामाची असा अजब युक्तिवाद करून शाळा व्यवस्थापनाने जमीन बळकावलेली होती . राजेश भाई याच्या आयुष्यातील समस्यांवर सुमारे तासभर त्याच्या घरी बसून विस्तृत चर्चा केली . तोपर्यंत त्याच्या पत्नीने सुंदर असा स्वयंपाक करून जेवायला वाढले . आज आपल्या घरातील एसी चे तापमान थोडेसे वाढवून सुखासनावर पडल्या पडल्या हा लेख वाचताना आपल्याला पत्र्याच्या तापलेल्या झोपडीतील पंखा नसताना आणि पोटचे मूलबाळ नसताना होणारी घालमेल समजून घेता येणे खरोखरीच कठीण काम आहे . मी ती तगमग अनुभवली . नर्मदा मातेकडे मनोमन प्रार्थना करून राजेश भाईच्या खिशामध्ये बळेच शंभर रुपयाची एक नोट कोंबून मी पुढे निघालो . निघताना वहीमध्ये त्याने शिक्का दिला .
हेच ते चंद्रमौलेश्वर अथवा नीलकंठ महादेवाचे मंदिर .आता या मंदिराचा जिर्णोद्धार झालेला दिसतो आहे . हा फोटो जीर्णोद्धार करताना काढलेला आहे .शेजारी शाळा दिसते आहे .
मला राहून राहून राजेश भाई च्या जागेवर कब्जा करणाऱ्या शाळेबद्दल आश्चर्य वाटत राहिले . पुढे चालत चालत गावातील मुख्य बाजारात आलो इथे उमरेश भाई पांचोली नामक एक स्मार्ट दुकानदार भेटला . याच्याकडे सर्व ब्रॅण्डेड वस्तू ठेवलेल्या होत्या . याने चैत्री परिक्रमा आजच पूर्ण केली होती . आपल्या फ्रीजमधील एक थंडगार बिसलेरी पाण्याची बाटली काढून त्याने माझ्या कमण्डलूमध्ये ती भरून दिली . ही खरोखरी बिसलेरी ब्रँडची बाटली होती . "आपल्याला सर्व गोष्टी ब्रँडेड लागतात " जाता जाता उमरेश भाई मला म्हणाला . एका छोट्या खेड्यातील तरुणाची विचार करण्याची ही पद्धत पाहून मला मौज वाटली . मी त्याच्याकडे राजेश च्या जमीन व्यवहाराबद्दल खातरजमा करून घेतली .आणि त्याला जमेल तितकी मदत करण्याचे आवाहन केले . भारतीय ग्रामसंस्थेचे बलस्थान जर काही असेल तर ते म्हणजे इथे प्रत्येकाला प्रत्येकाबद्दल सर्व काही माहिती असते ! आणि शहरी नागरीकरणाचा जर काही मोठा तोटा असेल तर तो म्हणजे एकाच घरातील लोकांना आपल्या घरातील सदस्यांबद्दल देखील पुरेशी माहिती नसते ! असो . भरपूर चालत अखेरीस वघाच नावाचे गाव गाठले . इथे रस्त्याच्या उजव्या हाताला एक मंदिर आणि आश्रम दिसत होता . एक पाण्याची मोठी टाकी होती जिथे गावातील सर्व महिला पाणी भरत होत्या . एका म्हाताऱ्या माणसाने नर्मदे हर असा आवाज देऊन आत मध्ये बोलावले . हे होते राम भगत . अतिशय विनम्रपणे ते परिक्रमावासींची उत्कृष्ट सेवा करत आणि या कामांमध्ये गावातील सर्व तरुणांची त्यांना चांगली भक्कम साथ होती . दुबई मध्ये राहणाऱ्या संत नावाच्या एका नर्मदा भक्तांनी सुमारे सहा-सात लक्ष रुपये खर्च करून येथे आश्रम उभा केला होता . व तो चालविण्याचे काम राम भगत करत असे . इथे मला अजून काही तरुण भेटले . अभय भाई चौहान नावाचा या आश्रमाचा एक सेवक होता जो एरव्ही चालक ( ड्रायव्हर ) म्हणून काम करायचा . याने माझ्याशी बराच वेळ गप्पा मारल्या . त्याच्याकडून मला या परिसराची आणि जनजीवनाची भरपूर माहिती मिळाली . इथे अजून काही तरुण गप्पा मारायला आले होते . त्याच्यामध्ये गावातील शाळेचा शिक्षक असलेला जो तरुण होता त्याचे मूळ गाव गोध्रा होते . त्याच्याकडून गोध्रा कांड नक्की कसे होते व प्रत्यक्षात काय काय झालेले होते हे सर्व मी समजून घेतले .माझे बरेच गैरसमज त्या दिवशी दूर झाले . आपल्याला वाटते त्यापेक्षा अधिक दुःख गोध्रावासियांनी भोगलेले आहे व काही जण तर अजूनही भोगत आहेत . असो . या आश्रमामध्ये अतिशय सुंदर व्यवस्था करण्यात आलेली होती . तीन पंखे , कुलर , गार पाणी बांधलेले स्नानगृह आणि शौचालय इत्यादी सर्व सुविधा अतिशय अल्प जागेमध्ये उभ्या करण्यात आल्या होत्या . इथे जमिनीमध्ये अतिशय गोड पाण्याचा मोठा झरा लागलेला होता . त्यामुळे उभा गाव इथे पाणी भरण्यासाठी येत असे .तसे पाहायला गेले तर इथून सरदार सरोवराचे साठलेले पाणी खूप जवळ होते परंतु तरी देखील या भागांमध्ये सातशे फुटावर पाणी लागायचे इतके जलदुर्भिक्ष्य होते . कारण हा सर्व खडकाळ प्रदेश आहे . नर्मदा मातेचे पाणी हे दोन डोंगररांगांच्या मध्ये साठलेले आहे . ते झिरपत इकडे येत नाही .
डाव्या हाताला दिसणाऱ्या याच खोलीमध्ये मी मुक्काम केला होता . समोर दिसणाऱ्या खोलीत राम भगत राहत होते .
वाघेश्वर महादेव मंदिर आश्रमामध्ये मिळालेला शिक्का . हा माझा परिक्रमेतला १०८ वा मुक्काम होता ! वरचा क्रमांक अभय चौहान यांच आहे .
मैयाचा किनारा सोडून लांब आल्यामुळे मला कसेतरीच वाटत होते .इथून कधी एकदा मैयाचा काठ गाठतो असे मला झाले होते .तरुणांशी गप्पा मारताना अभय भाईला मी हा विचार बोलून दाखवला .
अभय भाई चौहान याने त्याच्या मोबाईलवर घेतलेला प्रस्तुत लेखकासोबतचा सेल्फीआश्रमात निवांत गप्पा मारत बसलेले प्रस्तुत लेखक आणि अभय चौहान . अभय भाई ने नंतर हे फोटो माझ्या मित्राच्या क्रमांकावर पाठवून दिले होते .
अभय भाई ने वघाच वरूनच शांती नामक हाफेश्वर मंदिरातील पुजाऱ्याला फोन लावला आणि पुढचा मार्ग कसा आहे याची चौकशी करून घेतली . म्हणजे पाण्याची पातळी किती आहे हे जाणून घेतले . शुलपाणीच्या झाडी मधून तुम्ही जितके उन्हाळ्यातून चालत जाल तेवढे तुम्हाला काठाने चालायला सोपे जाते हे काय लक्षात ठेवावे . शांती भाईने सर्व मार्ग सांगितला .आणि हाफेश्वर मार्गेच जावे असे सुचवले . मी आता जुन्या बडोदा जिल्ह्यामध्ये होतो आता या भागाचे नाव नर्मदा जिल्हा केले होते . आणि इथून जुना बनैदा जिल्हा किंवा सध्याचा छोटा उदयपूर जिल्हा आता चालू होणार होता . याचा अर्थ मी मध्यप्रदेशातील गावांमध्ये जाणार होतो . हाफेश्वर मार्गे सध्या कोणीही जात नाही कारण हे मंदिर आता जलमग्न झालेले आहे असे मला सर्वांनी सांगितले होते . परंतु मला नर्मदा मातेचा किनारा पुन्हा पकडायचा होता . त्यामुळे मी कोणाचेही ऐकले नाही . आणि सकाळी उठून चालायला लागलो . पहाटे लवकर निघाले की चाल मजबूत होते त्याप्रमाणे भरपूर चालत एका दमात भाखा गाव गाठले . अजून दुपार व्हायला फार वेळ होता . परंतु भाखा येथील साधूने प्रचंड आग्रह केल्यामुळे जेवणासाठी थांबावे लागले .खरे पाहायला गेले तर आज एप्रिल महिना असून देखील ढगाळ वातावरण होते .अर्थात हा चालण्याचा दिवस होता . परंतु जे काही होते ते मैय्याच्या इच्छेने होते हे पक्के माहिती असल्यामुळे साधूचा आग्रह न मोडता थांबलो . इथे हरियाणा चा नागा साधू माझ्या आधीच पोहोचलेला होता . थोड्या वेळात रड्या बाबा देखील आला . अजूनही काही साधू जमले . कानडी भाषक रामकृष्ण मठाचा साधक विजयकुमार देखील तिथे आला . हा मला दक्षिण तटावर शूल पाणीच्या झाडीमध्ये भेटला होता पहा ! अतिशय शांत आणि सज्जन मनुष्य होता . मला फार आवडला होता . आदर्श परिक्रमावासी होता . सर्वांनी मिळून स्वयंपाक सिद्ध केला . आता भोजनाला बसणार इतक्यात दुचाकीवरून चाललेला एक मनुष्य आणि त्याच्या मागे बसलेला नागा साधू मला दिसले आणि मी त्यांना नर्मदे हर असा आवाज दिला ! पुढे गेलेली गाडी वळून परत आश्रमामध्ये आली आणि नागा साधू आमच्याशी बोलायला आले . त्यांच्यासोबत असलेले दुचाकी चालक जळगावचे एक सद्गृहस्थ होते . साधू महाराज माझ्याशी हिंदी भाषेमध्ये बोलू लागले . मला त्यांच्या हिंदीला मराठीचा वास येऊ लागला ! त्यात सुद्धा आमच्या गावाकडची भाषा असते तिची फोडणी मला जाणवली ! आणि मी थेट साधू महाराजांना मराठीत प्रश्न केला तुम्ही सांगलीचे काय ? साधू महाराज अवाक् झाले ! तुम्हाला कसे कळाले ? मी त्यांना म्हणालो तुमच्या हिंदीला मराठीचा आणि मराठीला सांगलीच्या भाषेचा स्पर्श आहे ! साधू हसायला लागले ! ते म्हणाले खरं तर साधूचे मूळ विचारायचे नसते परंतु तुम्ही मुळावरच घाव घातला मग सांगायला काय हरकत नाही ! साधु महाराज शुद्ध सांगलीच्या भाषेत गप्पा मारू लागले ! "काय सांगायलायस मर्दा ! " वगैरे सुरू झाले ! त्यांच्या बोलण्यातले अजून दोन-तीन शब्द मी योग्य रीतीने पकडले आणि त्यांना विचारले की तुम्ही भिडे गुरुजींचे धारकरी आहात का ? आता मात्र साधु महाराज खरोखर चाट पडले ! ते म्हणाले आता हे कसे काय ओळखले ? त्यासाठी त्यांनी वापरलेले शब्द इथे सांगता येण्यासारखे नाहीत परंतु महाराजांना ते शब्द सांगितल्यावर ते जोर जोरात हसायला लागले ! महाराजांनी मला सांगितले , "तुझे म्हणणे बरोबर आहे . मी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचा धारकरी होतो आणि अनेक मोहिमा केलेल्या आहेत . आणि गुरुजींना सांगून त्यांची परवानगी घेऊन आशीर्वाद घेऊन मगच मी संन्यास आश्रमामध्ये प्रवेश केलेला आहे . त्या घटनेला आता वीस वर्षे उलटून गेली ! गुरुजींनी मला जे काही सांगितले त्याप्रमाणेच माझी वाटचाल सुरू आहे ! " नागा साधू सांगत होते आणि मी ऐकत होतो . एक तपस्वी मनुष्य किती लोकांना प्रेरित करू शकतो हे पाहून मला मोठे आश्चर्य वाटले ! आणि मी सांगलीचा आहे आणि गुरुजींचा आहे हे सांगायला अभिमान देखील वाटला ! शिव्या घालण्यासाठी का होईना परंतु गुरुजींनी आमचे नाव लक्षात ठेवले होते , हा किती मोठा पुरस्कार आहे हे केवळ गुरुजींना ओळखणारे धारकरीच तुम्हाला सांगू शकतील ! नर्मदापुरमच्या सेठानी घाटावर गुरुजींची मला आठवण आली आणि त्यांच्याशी संभाषण कसे झाले हा अनुभव मी नागा साधूला सांगितला . महाराजांचे नाव होते संतोष पुरी आणि हे शाजापूरला राहत असत . अतिशय पक्के साधू . यांच्या भेटीकरताच जणू काही मैय्याने मला इथे लवकर थांबवले होते .
श्री संतोष पुरी महाराज शाजापुर यांच्यासमवेत भाखा आश्रमामध्ये प्रस्तुत लेखक . ( हा फोटो त्यांच्याच मोबाईल वरून काढलेला आहे . नंतर त्यांनी तो मी सांगितलेल्या मित्राच्या क्रमांकावर पाठवला . ) महाराजांना बालभोग देण्यात आला होता .
माझ्या देखील दहा पेक्षा जास्त मोहिमा झाल्या आहेत हे कळल्यावर महाराजांना खूप आनंद झाला . मोहीम म्हणजे भिडे गुरुजींनी सुरू केलेला आहे अप्रतिम उपक्रम आहे . दरवर्षी नवरात्रा मध्ये नऊ दिवस श्री दुर्गामाता दौड असते . ती संपल्यावर दसऱ्याच्या दिवशी गुरुजी शिवछत्रपतींच्या प्रेरणेने एका किल्ल्यापासून दुसऱ्या किल्ल्यापर्यंत जाण्याची मोहीम जाहीर करतात . ही मोहीम साधारणपणे पौष पौर्णिमेच्या आसपास असते . या मोहिमेची कुठेही जाहिरात केली जात नाही . तरीदेखील लाखो धारकरी ही मोहीम करतात .
वैराटगड ते सप्तर्षीगड मोहिमेमध्ये गुरुजींचे विचार ऐकत बसलेला प्रस्तुत लेखक . ज्यांनी मोहीम केली आहे त्यांच्यासाठी परिक्रमा खूप सोपी जाते . कारण मोहीम म्हणजे छोटी परिक्रमा आहे आणि परिक्रमा ही मोठी मोहीम आहे .
मोहिमेतील प्रस्तुत लेखकाचा मित्रांनी काढलेला फोटो . मोहिमेत सुद्धा मी कधी फोन नेत नव्हतो . किंबहुना परिक्रमेमध्ये फोन न्यायचा नाही हे मोहिमेतील अनुभवामुळेच माझ्या पक्के लक्षात आले होते .
प्रस्तुत लेखकाच्या मनामध्ये प्लास्टिक कचऱ्याविषयी असलेली तिडीक व तळमळ याचे मूळ उगमस्थान म्हणजे पूज्य महाजन गुरुजी ! ही फार मोठी आभाळाएवढी माणसं केवळ त्यांच्या साध्या राहणीमुळे आणि प्रसिद्धी पराङ्मुखतेमुळे आपल्याला माहिती देखील नसतात ! परंतु तेच आपले पथदर्शक मार्गदर्शक प्रकाशस्त्रोत आहेत !
या मोहिमेचे टेहळणी अलीकडे पर्यंत स्वतः गुरुजी करत होते . टेहळणी म्हणजे मोहिमेच्या मार्गावर स्वतः जाऊन खाणाखुणा करून ठेवणे व सर्व व्यवस्था निश्चित करणे . मोहीम एकपट असेल तर टेहळणी तिप्पट अंतराची असते ! परंतु तरी देखील गुरुजी ती स्वतः चालून पूर्ण करतात . नरेंद्र मोदी आयुष्यात प्रथमच रायगडावर आले होते त्या २०१४ सालच्या मोहिमेची टेहळणी करताना गुरुजींसोबत राहण्याचे भाग्य मला लाभले होते . या टेहळणी साठी ठरलेली सहा जणांची एक समिती गुरुजीं सोबत कायम असते . कल्लाप्पाण्णा हुग्गे , संजयबापू जढर , प्रशांत दादा धुळासावंत , सुनीलबापु लाड , सुनील बापू सांगळे ,अशोकराव विरकर अशी ठरलेली माणसे मोहिमेच्या टेहळणी ला गुरुजीं सोबत असतात .परंतु एक वर्ष प्रशांत दादा धुळा सावंत नसल्यामुळे माझी अचानक वर्णी लागली ! तो माझ्यासाठी सर्वात संस्मरणीय असा प्रवास ठरला ! हे सर्व मी संतोष पुरी महाराजांना सांगत होतो आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रूधारा वाहत होत्या . आपल्या पूर्वाश्रमीची गुरुमाऊली त्यांना आठवत होती .
संतोष पुरी महाराज यांचे पूर्वाश्रमीचे , प्रस्तुत लेखकाचे , तसेच देव देश धर्म यांच्याप्रति अक्षुण्ण निष्ठा पित्याच्या रक्तातून व मातृस्तन्यातून आलेल्या प्रत्येक हिंदू बांधवांचे गुरुवर्य , पूज्य संभाजीराव विनायकराव भिडे गुरुजी सांगली .
आम्ही दोघांनी बराच वेळ हृद्य संवाद साधला . क्षणापूर्वी ओळख पाळख नसताना आम्ही दोघे इतके कसे काय बोलत आहोत याचे कोडे बाकीच्या सर्व साधूंच्या चेहऱ्यावर मला दिसत होते ! आणि त्याचे उत्तर होते संघटन ! एकदा आपण एका ध्येयाने प्रेरित आहोत हे दोन जीवांच्या लक्षात आले की त्यांच्यातला दुरावा क्षणात मिटतो ! हे सर्वच क्षेत्रामध्ये लागू होते . अगदी मित्रांच्या किंवा पती-पत्नीच्या नात्यांमध्ये देखील दोघांचे ध्येय एक असेल तर मतभेद कधीच होऊ शकत नाहीत ! आणि मतभेद होत असतील तर याचा अर्थ दोघांची ध्येयं एक नाहीत असे साधे गणित आहे ! विचार करून पहा ! मला आश्रमामध्ये येण्याचे आमंत्रण देऊन नागा बाबांनी रजा घेतली . त्यांनी व्यवस्थित पंचदशनामी आखाड्याचा संन्यास घेतलेला होता . त्यांनी त्यांच्या आखाड्याचे नाव सांगितल्यावर मी त्यांच्या आखाड्याचा क्रमांक सांगितला आणि संतोष पुरी महाराजांना खूप आनंद वाटला ! ते म्हणाले आता खरा धारकरी शोभलास भावा ! महाराज तर निघून गेले परंतु माझ्या मनामध्ये गुरुमाऊलीची आठवण जागृत करून गेले ! जाता जाता ते एक वाक्य बोलून गेले जे माझ्या हृदयावर खोल कोरले गेले . संतोष पुरी नागा साधू जाता जाता मला म्हणाले , " आयुष्यात खूप साधू पाहिले . कुणी विरक्त आहे , कुणी संन्यस्त आहे , कुणी तपस्वी आहे ,कोणी विद्वान आहे ,कुणी पंडित आहे ,कुणी व्युत्पन्न आहे , कुणी बलवंत आहे , कुणी परीव्राजक आहे , कुणी कायाक्लेशी आहे , कुणी हलक्याफुलक्या आनंदी स्वभावाचे आहे ,कुणी अत्यंत गंभीर आहे ,कोणी एकटेच फिरते , कोणी प्रचंड संघटन उभे केलेले आहे , कोणी खूप शिकलेले आहे , कोणी म्हणते मी अडाणी आहे , कोणा कोणाचे मोठमोठे पदधारी शिष्य आहेत , तर कोणी त्यांचे कार्य हाच उत्तराधिकारी नेमलेला आहे , कोणी प्रचंड संपत्ती नाकारून सन्यस्तवृत्ती पत्करली आहे , पुणे जन्मतःच विरक्त आहे , कुणी बालब्रह्मचारी आहे , कोणी अत्यंत हळवे आहे , कोणी अत्यंत कर्तव्य कठोर आणि निष्ठूर आहे , कोणी प्रचंड शिस्तबद्ध आहे तर कोणी मिळेल त्या परिस्थितीतून मार्ग काढणारे आहे ! परंतु हे सर्वच गुण एका व्यक्तीमध्ये आहेत अशी भिडे गुरुजीं सारखी दुसरी व्यक्ती मी अजून तरी दुसरी पाहिलेली नाही ! "
नर्मदे हर !
लेखांक एकशे सव्वीस समाप्त ( क्रमशः )
नर्मदे हर🙏🙏🙏🙏🙏
उत्तर द्याहटवासंपूच नये असे वाटते, भान हरपून जाते, तंद्री लागते. नर्मदे हर🙏🙏🙏🙏🙏
उत्तर द्याहटवातुम्ही या जगात येताना आणलेलं आध्यात्मिक बळाचं गाठोडं खूप संपन्न आहे . लहानपणापासूनच मोठ्या मोठ्या विभूतींशी झालेला संपर्क आणि परिक्रमेमधेही तुम्हाला आलेले आध्यात्मिक अनुभव वाचल्यावर सहज लक्षात येतं हे . .
उत्तर द्याहटवास्वतःच्या बापालाच मुंजीत गायत्री मंत्राचा उपदेश करणारे सुद्धा पहिलेच असाल तुम्ही ! 😆