लेखांक ९२ : उलुकेश्वर महादेव आणि गोरा कॉलनीचे नूतन शूलपाणेश्वर मंदिर व हरिधाम आश्रम
संध्याकाळ झाली होती आणि धरणाच्या भिंतीपासून गोरा कॉलनी ठीक सात किलोमीटर लांब होती . माझ्या चालण्याच्या गतीनुसार हे दोन तासाचे अंतर होते . तोपर्यंत अंधार पडला असता . त्यामुळे धरणाची भिंत पाहायला उलटे येण्याचा निर्णय चुकला असे मला वाटू लागले . परंतु इतक्या भव्य भिंतीचे दर्शन पुन्हा आपल्याला कधी होणार हे ही मनात होतेच .कारण तिथे उपस्थित असलेले सीआयएसएफ चे जवान पर्यटकांना जवळपास सुद्धा फिरकू देत नाहीत . मी परिक्रमावासी असल्यामुळे अतिशय आदरपूर्वक माझ्याशी सर्वजण बोलले आणि मला हवे ते सर्व पाहू दिले होते . यांनी देखील मला सांगितले की इथे परिक्रमावासी फारसे येत नाहीत . याचे महत्त्वाचे कारण त्यांची येण्याची इच्छा नसते असे नसून त्यांना इथे येऊच दिले जात नाही हे खरे कारण आहे . प्रत्येक गावातील लोक त्यांना सडक मार्गाने पुढे जाण्याचा सल्ला देतात . आणि स्थानिक भूगोलाचे ज्ञान नसल्यामुळे शक्यतो स्थानिक ग्रामस्थांचे म्हणणे ऐकण्या पलीकडे परिक्रमा वासींच्या पुढे पर्याय राहत नाही . आता मी परत फिरलो मात्र सर्व डांबरी रस्ता सामसूम झाला . अतिशय सुंदर काळाभोर स्वच्छ असा तो डांबरी रस्ता होता . अतिशय नेटके पट्टे त्यावर मारलेले होते . डाव्या हाताला मोठे मोठे डोंगर होते आणि त्याच्यावरती प्रचंड प्रमाणात झाडी होती . उजव्या हाताला नर्मदा मैया होती परंतु खाली जाता येऊ नये म्हणून अखंड तारेचे कुंपण केलेले होते . या भागामध्ये नर्मदा मातेचे पात्र पूर्णपणे खडकाळ होते . इथून पुढे गरुडेश्वर नावाच्या गावामध्ये चेक डॅम अर्थात एक लघुबंधारा बांधलेला आहे ज्याच्या मधील पाणी अडवले की सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याभोवतीच्या संपूर्ण बारा चौरस किलोमीटर आकाराच्या तलावामध्ये पाणी भरते . त्यानंतर या जलाशयामध्ये क्रूज , नौकानयन वगैरे चालविले जाते .
आता देखील बऱ्यापैकी पाणी साठलेले होते . डावीकडचे जंगल हळूहळू गडद होत चालले होते . त्यातून येणारा रातकिड्यांचा आवाज इतका भयानक होता की बाकीचा कुठला आवाज येतच नव्हता . त्या संपूर्ण टापू मध्ये एकही मनुष्य नव्हता . आता सात किलोमीटर चालावे लागणार या विचाराने मी पायांना गती दिली . अखंड तीव्र उतार उतरून आल्यामुळे पाय थोडेसे कुरबुर करू लागले होते . परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये अंधार पडायच्या आत गोरा कॉलनी गाठणे मला आवश्यक होते . हळूहळू सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा पुन्हा एकदा जवळ येऊ लागला . या पुतळ्याचे निरीक्षण करत क्षणभर उभा राहिलो . इतकी भव्य दिव्य कृती आपण करूयात अशी केवळ इच्छा निर्माण होणे हे देखील किती भाग्याचे लक्षण आहे ! मग तशी प्रत्यक्षात उतरविणे आणि त्यासाठी आवश्यक असलेले ज्ञान संपादन करणे आणि त्यासाठी लागेल ते कष्ट करणे , निधी उभा करणे हा सर्व एक प्रकारे भीम पराक्रमच आहे .आम्ही शाळेमध्ये एक गीत शिकलो होतो .
राष्ट्रार्थ भव्य कृती काही । पराक्रमाची ॥
ईर्ष्या निजांतरी धरून । करावयाची ॥
ही हिंदू भू परम श्रेष्ठ । पदास न्याया ॥
आम्ही कृती नित करू । झिजवोनी काया ॥
या ओळी इथे मूर्ती रूपाने उभे असलेल्या पाहत होतो ! मूर्तीच्या भव्यतेबद्दल शब्दांमध्ये वर्णन करता येणे खरोखरच कठीण आहे ते प्रत्यक्ष तिथे जाऊन अनुभवणे हेच श्रेयस्कर आहे ! इतके भव्य दिव्य काहीतरी उभे करता येणे शक्य आहे असा आत्मविश्वास ज्या व्यक्तीच्या अंतर्यामी आहेत ही व्यक्ती खरोखरच अलौकिक मानली पाहिजे ! युगपुरुष एका कृतीतून ठरविता येत नसतो . असे अनेक कंगोरे जुळले की आपोआप ते पद एखाद्या व्यक्तीला बहाल होत असते .आपल्या घराशेजारील चौकामध्ये एखादा अर्ध पुतळा देखील कधी बसवू किंवा उभा करून न शकलेले लोक जेव्हा इतकी भव्य कलाकृती उभी करणाऱ्या माणसाविषयी मतप्रदर्शन करतात तेव्हा खरोखरीच त्या सर्वांची कीव येते . माझ्या बोलण्याचा काही लोकांना कदाचित राग येईल परंतु पुन्हा एकदा सांगतो मी केवळ माझा अनुभव सांगतो आहे . यात अनुमानाला कुठेही थारा नाही .जे मी स्वतः पाहिले अनुभवले तेच इतके भव्य दिव्य होते की आपोआप आपले डोके नतमस्तक होऊन जाते .सरदार वल्लभभाई पटेल यांची मूर्ती उपग्रहातून कशी दिसते याचे एकच चित्र पुरेसे बोलके आहे .
उपग्रहातून दिसणाऱ्या या मूर्तीच्या पायाजवळ ज्या मुंग्या दिसत आहेत , ते वास्तवामध्ये ती मूर्ती पाहण्यासाठी आलेले पर्यटक आहेत ! यावरून तुम्ही या मूर्तीच्या आकाराची कल्पना करून घ्यावी !आणि आता मी तुम्हाला काय म्हणतो आहे ते अधिक चांगले लक्षात येईल .
२०१८ मध्ये या पुतळ्याचे उद्घाटन झाले तेव्हा मी तमिळनाडूमध्ये राहायचो परंतु या पुतळ्याविषयी विविध बातम्या ज्या कानावर पडत होत्या केवळ त्या ऐकूनच मी अतिशय प्रभावीत झालो होतो ! इतके भव्य कोणीतरी उभे केलेले आहे आणि तेही आपल्या देशात उभे केलेले आहे की बाबच अतिशय अभिमानास्पद वाटायची !
त्यावेळी उत्स्फूर्तपणे काही व्यंगचित्रे मी काढली होती .
ती आपल्या अवलोकनासाठी खाली देत आहे .प्रत्येक व्यंगचित्राखाली त्याचे थोडक्यात रसग्रहण देत आहे .
नरेंद्र मोदी सांगत आहेत की मी सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा बनविला . आणि सोनिया गांधी सांगत आहेत की मी सरदार मनमोहन सिंग यांना चालता बोलता पुतळा बनविला ! अर्थात त्यांच्या हातात निर्णय प्रक्रिया फारशी ठेवलेली नाही !
या चित्राचा भावार्थ असा होता की मोदींनी सरदार वल्लभभाई पटेल यांचा भव्य दिव्य पुतळा उभा करून त्यांच्या या एकाच कृतीद्वारे अनेक लोकांच्या अनेक वर्षांच्या कष्टांवर पाणी फिरवले आहे. ज्यामध्ये बॅरिस्टर महंमद अली जिना ,महात्मा गांधी , पंडित जवाहरलाल नेहरू , इंदिरा गांधी , राजीव गांधी , सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या व्यंगचित्रांचा समावेश आहे .
(वाचकांना एक नम्र विनंती आहे की ही व्यंगचित्रे पाहून प्रस्तुत लेखकाच्या राजकीय भूमिकेबद्दल कुठलेही आडाखे बांधावयास जाऊ नये . आपले गणित फार सोपे आहे . आपल्या उदात्त भारतीय परंपरांचा अभिमान असलेला आणि त्यासाठी कुठल्याही थराला जाऊन कष्ट करण्याची तयारी असलेला कुठल्याही पक्षाचा नेता हाच आपला पुढारी असावा असे सांप्रत आमचे मत आहे . सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यापाशी आल्यावर मला प्रकर्षाने ही चित्रे आठवली होती म्हणून इथे टाकली आहेत . कारण ती चित्रे काढताना माझ्या डोक्यामध्ये या पुतळ्याचा जो आकार होता त्यापेक्षा हा कैकपटीने मोठा निघाला . मी एक परिक्रमावासी आहे आणि त्याचबरोबर मी एक भारतीय नागरिक देखील आहे ज्याला आपली मते मुक्तपणे मांडण्याचा अधिकार या लोकशाहीने दिलेला आहे त्याचा कृपया सन्मान व्हावा इतकीच माफक अपेक्षा आहे .)
समर्थ रामदास स्वामी म्हणतात
उत्कट भव्य तेचि घ्यावे ।
मिळमिळीत अवघेची त्यागावे ॥
जिथे भव्यता देखील आहे आणि उत्कटता देखील आहे अशा ठिकाणीच रुची ठेवावी . केवळ उत्कट भाव कामाचा नाही . आणि केवळ भव्यता देखील उपयोगाची नाही . या दोघांचा संगम जिथे झाला आहे तेच योग्य ठिकाण होय . या संपूर्ण परिसरामध्ये लवकरच लाईट अँड साऊंड शो सुरु होणार होता असे मला मगाशीच कळाले होते . तो देखील पाहण्याची उत्सुकता मनामध्ये होती . परंतु लवकरात लवकर हा परिसर सोडून गोरा कॉलनी मध्ये पोहोचणे आवश्यक होते नाहीतर राहण्याचे वांदे झाले असते . म्हणून वेगाने चालू लागलो . मगाशी मी ज्या पुलावरून आलो तो पूल ओलांडला . सरदार सरोवर धरणाच्या भिंतीनंतर नर्मदा मातेला येऊन मिळालेली थवडिया ही पहिलीच नदी आहे तिला नमस्कार करून पुढे चालू लागलो . हे अंतर अतिशय कंटाळवाणे झाले होते कारण कितीही चालले तरी पायाखालचा रस्ता संपत नव्हता आणि डाव्या हाताचे जंगल काही कमी होत नव्हते . शिवाय नर्मदा माता उजव्या हाताला वाहत होती परंतु मध्ये घातलेल्या बंधनामुळे तिचा स्पर्श देखील अजून झालेला नव्हता . हा दिसायला विकास होता परंतु प्रत्यक्षामध्ये अतिशय भकास आहे असे मला वाटू लागले ! जिथे माणसे दिसत नाहीत तो विकास काय कामाचा ! जिथे आपल्या आराध्य दैवताचे पूजन करता येत नाही तो विकास , विकास म्हणायचा की अजून काही ? ते काही नाही . नर्मदा मातेचे दर्शन झाल्याशिवाय आपण शांत बसायचे नाही असा विचार मी केला आणि इतक्यात उजव्या हाताला असलेले तार कंपाउंड एके ठिकाणी तोडले आहे असे मला दिसले ! मग काय विचारता ! माझ्या आनंदाला पारावार उरला नाही ! धावतच आत मध्ये गेलो . इथे पुन्हा थोडेसे जंगल होते . ते कसेबसे पार करत खडकाळ जमीन उतरत झोळी काठी पटकन खाली ठेवली आणि मैया ला जाऊन बिलगलो ! इतका काळ आई मुलाने दूर राहणे चांगले नव्हे गं ! चांगली अंधारलेली संध्याकाळ झाली होती . अशा वेळी नर्मदे वरचे वातावरण अतिशय गूढ रम्य असते ! संधी प्रकाशामध्ये नर्मदा माता एका वेगळ्याच तेजाने झळाळून उठलेली असते . इथे पाणी इतके स्वच्छ होते की त्याचे शब्दात वर्णन करता येणार नाही . सरदार सरोवर धरणामुळे नर्मदा मातेच्या पाण्यातील सर्व गाळ खाली बसतो आणि केवळ शुद्ध पाणी खाली सोडले जाते . इतका अंधार पडलेला असून देखील मला नर्मदा मातेचा तळ दिसत होता इतके ते पाणी स्वच्छ होते ! या पाण्यामध्ये मनसोक्त स्नान केले ! दिवसभराचा सर्व थकवा क्षणात पळून गेला ! मी नर्मदा मातेच्या पाण्यामध्ये खाली सपाट जागा मिळाली की आत जाऊन मांडी घालून बसण्याचा प्रयोग करायचो . खूप शांत आणि भारी वाटायचे .त्यासाठी आधी पोटातली सगळी हवा सोडून द्यावी लागते .आणि बराच काळ बहिर्कुंभक करून बसावे लागते . तसा इथे बसून राहिलो . मला असे वाटले की नर्मदा माता मला सांगते आहे की बाहेर ये आणि काठाकडे बघ .मी त्याप्रमाणे उठलो आणि काठाकडे पाहिले . बराच वेळ पाण्याखाली राहिले की बाहेरचे दृश्य पुसट दिसू लागते . मला असे दृश्य दिसले की मी ज्या जंगलातून इकडे आलो तिथून दोन-तीन लोक मला पाहत आहेत . आणि आपापसात काहीतरी चर्चा करत आहेत . मी बाहेर आल्याबरोबर ते सर्व निघून गेले . मला आतून काहीतरी संकेत जाणवला आणि मी पाण्यातून बाहेर पडलो . अंग पुसले आणि पुन्हा रस्त्यावर आलो . अखेरीस थोडेसेच अंतर चालल्यावर उजव्या हाताला एक अंगणवाडी आणि दुर्गामातेचे एक मंदिर दिसले . आत मध्ये एक माताजी बसल्या होत्या त्यांनी मला नर्मदे हर असा आवाज दिला . मी आत मध्ये गेलो आणि माताजींना नमस्कार केला . इतक्यात एक पुजारी देखील तिथे आले . त्यांना देखील मी नमस्कार केला . हे या आश्रमाचे महंत होते . "इतक्या उशिरा इकडून कुठून आलात ? " त्याने मला विचारले . मी त्यांना झरवाणी पासून घेतलेल्या चटकट ची माहिती दिली . आणि धरणाची भिंत पाहून आल्याचे सांगितले . माताजी आणि गुरुजी गंभीर झाले . ते म्हणाले मुक्कामाचे काय ठरवले आहे ? मी त्यांना म्हणालो की गोरा कॉलनीमध्ये मुक्कामाची सोय आहे असे कळले आहे . गुरुजी मला म्हणाले की आता अंधार पडला आहे . त्यामुळे पुढे न जाता इथेच मुक्काम करावा . हा देखील आश्रमच आहे . फक्त इथे मुक्कामाची व्यवस्था नसल्यामुळे उघड्यावर झोपावे लागेल . भोजन प्रसादीची व्यवस्था मात्र होईल . मला अतिशय आनंद झाला ! आता आजच्या दिवसाचे चालणे संपले असे ज्या क्षणी लक्षात येते त्या क्षणी फार आनंद वाटतो ! ज्याप्रमाणे कंपनीचा मालक आणि कंपनीचे कामगार या दोन वेगळ्या प्रकृती असतात तसेच आपल्या देहाचे आहे . अविरत कठीण मार्गाने चालणारे पाय , प्रमाणाबाहेर वजन उचलून घेणारी पाठ आणि भुकेने कळवळणारे पोट हे तीन कामगार हाकत हाकत मी इथवर आणले होते ! हे काय इथेच तर जायचे आहे असे त्यांना सांगत सांगत मी इथवर आणले होते ! आपले शरीर म्हणजे आपण नसतोच मुळी ! तो तर आपला कामगार आहे ! खरं पाहायला गेलं तर पाच लोक असा दावा करत असतात की मीच अमुक अमुक आहे . इथे या व्यक्तीचे नाव अमुक अमुक आहे असे आपण लक्षात घेऊया .
कोण आहे ते पाच लोक ? मन , बुद्धी ,चित्त ,अहंकार आणि शरीर ! या पाचही जणांचा दावा असतो की मीच अमुक अमुक नावाचा व्यक्ती आहे ! आपण अमुक अमुक या ठिकाणी आपले स्वतःचे नाव घालून वाचू शकता ! तरी ते चपखलपणे तुम्हाला लागू होणार कारण हे वैश्विक सत्य आहे ! या प्रत्येकाचे स्वतःचे एक वेगळे तर्कट असते . मन हे अतिशय चंचल असते . ते सांगत असते की मीच तू आहे . आणि मी म्हणेन तेच खरे ! परंतु मुळातच वायु तत्वाचा आधार घेऊन उभे असलेले हे मन वायूप्रमाणेच चंचळ असते . त्यामुळे त्याची एक ठाम भूमिका कधी नसते . बुद्धी ही पूर्णपणे तर्कवादी असते . अमुक झाले आहे म्हणजे असेच असणार आणि तमुक झाले आहे म्हणजे तसेच असणार अशा प्रकारचे आडाखे ती बांधत असते . चित्ताला मात्र स्वतःचा असा काही विचार नसतो परंतु ते लिटमस पेपर प्रमाणे असते . पेपर जसा प्रयोग शाळेमध्ये हे अमुक आहे आणि हे तमुक आहे असा निर्णय देतो त्याप्रमाणे चित्त केवळ आनंदी होते किंवा दुःखी होते किंवा विचलित होते किंवा काळवंडते . अहंकार म्हणजे मी आहे याची जाणीव . लोभ गर्व अशा अर्थी हा अहंकार शब्द वापरलेला नाही . सकाळी झोपेतून उठल्यावर मी जिवंत आहे असे आपल्याला ज्या जाणिवेमुळे कळते ती जाणीव म्हणजे अहंकार . हिचाही असा दावा असतो की मीच अमुक अमुक आहे . राहिला प्रश्न शरीराचा तर ते म्हणजे आपण आहोत असे आपल्याला स्वतःलाच वाटत राहते ! गणित फार सोपे आहे ! आपण जन्माला आलो तेव्हा देखील आपले नाव अमुक अमुक होते . शाळेमध्ये देखील तेच नाव होते . आता देखील तेच नाव आहे . आणि म्हातारपणी देखील तेच नाव असणार आहे . या काळातील सर्व छायाचित्र एकत्र करून पहा . एकही शरीर दुसऱ्या शरीरासारखे दिसत नाही . याचाच अर्थ अमुक अमुक नावाची व्यक्ती शरीर असू शकत नाही ! कारण शरीर सतत बदलणारे आहे ! आणि अमुक अमुक हे एकच तत्व त्यामध्ये सातत्याने अस्तित्व टिकवून आहे !
मी अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना असे एक कोलाज बनवून ठेवले होते . ज्यामध्ये माझ्या बालपणीपासूनच्या प्रतिमा मी चिकटवल्या होत्या .
आणि त्यातील होणारा बदल पाहून मी स्वतःला सांगायचो की हे शरीर म्हणजे तू असू शकत नाहीस !
अयं न इदं शरीरम् ।
कारण शरीर म्हणजे तू असतास तर सर्व चित्रे एकसारखी दिसली पाहिजेत ! ज्या अर्थी हे शरीर बदलते आहे त्या अर्थी शरीर म्हणजे तू नाहीस . शीर्यते इति शरीरम् । अशी शरीराची व्याख्या आहे . जे सतत शीर्यमाण होते आहे अर्थात झिजते आहे तेच शरीर . मग जर हे पाचही कामगार म्हणजे मालक नव्हे तर मग मालक कोण आहे ? तर तो वेगळ्याच ठिकाणी बसलेला असून या पाचही जणांना राबवितो आहे . परंतु जर कामगार वरचढ झाले तर मात्र ते मालकाला संकटामध्ये नाचवितात तसेच बहुतांश वेळा आपले होते . ज्याप्रमाणे हाताबाहेर गेलेले कामगार काम बंद पडतात तसे मग अशा व्यक्तीचे होते . मी संपूर्ण परिक्रमेदरम्यान याची काळजी घ्यायचो की माझे अवयव , माझे शरीर , मन , बुद्धी ,चित्त आणि अहंकार हे माझे कामगार कधीही माझ्या आज्ञेबाहेर किंवा हाताबाहेर जाणार नाहीत . त्यासाठी मी एक अजून मोठा मालक नेमला होता ! किंवा मालकीण म्हणा फार तर ! या मालकिणीला सर्व फॅक्टरी चालवायला दिली होती ! ती म्हणेल , ती सांगेल , ती दाखवेल त्या वाटेने जायचे . ती सांगेल तिथे उतरायचे आणि ती देईल ते खायचे ! ती कोणाच्या रूपाने येऊन मार्गदर्शन करेल हे सांगता येत नसे . अलीकडे एक खूप सुंदर भजन ऐकले .
पता नही किस रूप मे आके नारायण मिल जायेगा । निर्मळ मनके दर्पण मे वह राम के दर्शन पायेगा ।
याची पदोपदी प्रचिती नर्मदा खंडामध्ये येत राही . अन्यत्र ती येतेच परंतु इथे मात्र विशेषत्वाने येते . कारण आपला अन्य ठिकाणी किंचितसा न्यूज असलेला भाव आणि नर्मदा खंडामध्ये आल्यावर आपला बदललेला भाव याचा तो प्रभाव असतो . असो .
पंडित जी मला आश्रमाचे नियम सांगू लागले . त्यांचा स्वभाव थोडासा कडक होता . ते म्हणाले की या आश्रमामध्ये राहायचे असेल तर मी सांगतो ते नियम पाळावेच लागतील . आश्रमात इकडे तिकडे अजिबात फिरायचे नाही . दुर्गा माता मंदिराशेजारी अंगणामध्ये पडून राहायचे . डाव्या हाताला माताजींच्या खोल्या होत्या तिकडे जायचं नाही .आश्रमामध्ये गोशाळा होती तिथे देखील जायचे नाही . आश्रमाच्या बाहेर देखील जायचे नाही . सकाळी उठल्यावर नर्मदेमध्येच स्नानाला मुळीच जायचे नाही ! हे असे नियम असलेला आश्रम मी प्रथमच पाहत होतो . बाकी सर्व नियम ठीक होते . परंतु नर्मदा स्नानाला का जायचे नाही ते काही मला कळाले नाही . परंतु मोहन साधूने सांगितल्याप्रमाणे मी एकही अवाक्षर काढले नाही . हात जोडून नम्रपणे या सर्व सूचनांचा स्वीकार केला . माझ्या अगदी तोंडावर आले होते की पंडितजींना सांगावे की मी नुकतेच नर्मदेमध्ये स्नान करून आलेलो आहे . परंतु मी काही बोललो नाही . दुर्गा माता मंदिराशेजारी आसन लावले . आणि खरे सांगतो ! उघड्यावर आसन लावणे माझ्या पथ्यावर पडले ! कारण समोरच नर्मदा मैया वहात होती आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पाठमोऱ्या मूर्तीच्या समोर दिसणारे अप्रतिम असे सरदार सरोवर धरण रात्रीच्या झगमगाटाने उजळून निघालेले दिसू लागले ! लवकरच साऊंड अँड लाईट शो सुरु होणार आहे असे मला माताजींनी सांगितले . मी दुर्गामाता आणि नर्मदा पुराणांमध्ये उल्लेख असलेल्या उलूकेश्वर अथवा उल्केश्वर महादेवाचे दर्शन घेतले . माझी सायंउपासना आटोपली . माताजींनी मला सांगितले की त्यांच्या खोल्यांच्या वर गच्ची आहे . तिथून साउंड अँड लाईट शो छान दिसतो . त्यामुळे त्यांच्या सूचनेनुसार मी गच्चीवर गेलो . डोळ्याचे पारणे फेडणारा लेझर शो पाहिला !
इतके भारी काहीतरी आपल्या देशामध्ये झालेले आहे हेच बहुतांश लोकांना माहिती नसावे ! अतिशय भव्य दिव्य आणि सुंदर असा लाईट शो नर्मदा मैया च्या पात्रामध्ये दररोज संध्याकाळी केला जातो !
या प्रकाश प्रदूषणाचा त्रास निश्चितपणे इथल्या जंगलातील प्राण्यांना होत असणार आहे .परंतु हा सर्व खटाटोप मनुष्य प्राण्याला छान वाटावे म्हणून आहे असे एकंदरीत चित्र आहे .
दिवसा या धरणाच्या भिंतीकडे पाहिल्यावर इथे असे काही होत असेल यावर विश्वासच बसला नसता .
नर्मदा मातेच्या काठावरील उलूकेश्वर महादेवाचे मंदिर लाल खुणे ने दाखवलेले आहे . मी स्नान केले तो डोह शेजारीच दिसतो आहे . पुढे गरुडेश्वर लघु धरणामध्ये पाणी अडवले की हे सर्व पात्र पाण्याने भरून जाते .
घुबडाला संस्कृतमध्ये उलुक असे म्हणतात . एका घुबडाने इथे तपस्या केली होती म्हणून या महादेवाचे नाव उलूकेश्वर पडले असे मला पंडितजींनी सांगितले .
गुरुजींच्या सोबत मी देवीची आणि महादेवाची सुंदर अशी आरती केली . मी घंटा वाजवत होतो . परंतु त्यांनी घंटा वाजवायला बंदी केली . शंख फुंकू लागल्यावर तो देखील थांबवायला लावला . एकंदरीत या मंदिराचे नियम काय आहेत आणि इथे काय काय करावे यापेक्षा काय काय करू नये हेच माझ्या लक्षात येत नव्हते . परंतु इतके बंधनकारक नियम अन्य कुठल्याही आश्रमात नसल्यामुळे काहीतरी वेगळे आहे इतके मात्र मला नक्की जाणवत होते . अधिक विचार न करता मी गुरुजींनी वाढलेला भोजन प्रसाद ग्रहण केला .हे गृहस्थ मध्य प्रदेश मधले होते . अतिशय सुंदर चविष्ट असे गरमागरम भोजन त्यांनी वाढले .
सहा-सात टिक्कड , काळा गुळ आणि भरपूर भाजी होती . गुजरात मध्ये प्रवेश केल्यापासून भोजनाची लज्जत जी काही वाढली ती अक्षरशः लक्षात येण्यासारखी होती ! बदललेले पदार्थ आणि पदार्थांची संख्या , शिवाय तयार पदार्थ जेवणासाठी मिळण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले . सदाव्रत जवळपास बंद झाले . असो .
भोजन प्रसाद घेतल्यावर मी थोडेसे चालावे म्हणून दुर्गा देवी मंदिराच्या मागे जाऊ लागलो . इतक्यात मला समोर झाडीमध्ये काहीतरी हालचाल जाणवली . म्हणून मी पाहिले असता समोर एक खूंखार कुत्रा मला दिसला . सावधपणे मी मागे सरकलो . तो माझ्यावर गुरगुरत होता . अंधारामध्ये डोळे विस्फारून पाहिल्यावर माझ्या लक्षात आले की इथे एक जाळी लावली होती . आणि तिच्या पलीकडे १२ - १५ भली दांडगी कुत्री होती ! थोडक्यात मी वाचलो होतो ! आता माझ्या लक्षात आले की गुरुजींनी मला इकडे तिकडे फिरू नको का सांगितलं होतं ! शिवाय गोशाळेकडे जाताना देखील मध्ये कुत्र्यांची ही जाळी लागत होती . म्हणूनच त्यांनी गोशाळेमध्ये सुद्धा जाऊ नको असे मला सांगितले होते . मी मनोमन त्या गुरुजींचे आभार मानले आणि पांघरूणामध्ये शिरलो . शेजारीच नर्मदा मैया वाहत असल्यामुळे आणि उघड्यावर झोपल्यामुळे तसेच आजूबाजूला झाडी प्रचंड असल्यामुळे चांगला गारवा होता . आकाशामध्ये फिरणारे लेझर बीम पाहता पाहता डोळा लागला . गाढ झोप लागली . रात्री अचानक दचकून जाग आली . पाहिले तर माझ्या दोन्ही बाजूला दोन माणसे झोपली होती . मला काही कळेना की हे परिक्रमावासी कुठून आले . डोळे चोळून पाहिल्यावर लक्षात आले की हे लोक परिक्रमावासी नव्हते . पुन्हा एकदा झोपलो . डाव्या कुशीवर वळलो आणि पडल्या पडल्या समोर झोपलेल्या त्या माणसाकडे पाहू लागलो . त्याने हाताचीच उशी केली होती . आणि माझ्याकडे पाठ करून झोपला होता . त्याच्या उशाशी काहीतरी ठेवले होते . कुतूहलाने मी पाहिले तर ते पिस्तूल होते ! माझ्या काळजात धस्स झाले ! सशस्त्र मनुष्य माझ्या शेजारी झोपून काय करत आहे ? असा मी विचार करत होतो इतक्यात त्याने कूस बदलली . माझे डोळे उघडे आहेत हे पाहून तो मनुष्य चटकन सावध झाला आणि त्याने पिस्तूल हातात घेतले . नर्मदे हर ! मी म्हणालो . आणि उठून बसलो . तो देखील गडबडीने उठला . आणि नर्मदे हर म्हणाला . मी त्याला विचारले तुम्ही कोण आहात ? आणि इथे का झोपले आहात ? परिक्रमेमध्ये आहात का ?
तो मनुष्य सांगू लागला .
सांगतो बाबाजी . सगळं सांगतो . आम्ही दोघे पोलीस आहोत . आणि रोज रात्री इथे झोपायला असतो .
माझा प्रश्नार्थक चेहरा पाहून पोलीस पुढे बोलू लागला . आम्ही साध्या वेशातले पोलीस आहोत . या आश्रमाला पोलीस संरक्षण दिले पाहिजे असा गुजरात शासनाचा आदेश आहे .
ते का ?
मी उपजत चौकसपणातून विचारले .
कारण इथे राहणाऱ्या महंतांचा खून झालेला आहे .
काय ?महंतांचा खून ?
होय बाबाजी . अज्ञात मारेकऱ्यांनी इथल्या महंतांना जीवानिशी मारलेले आहे . त्यामुळेच इथे पोलिसांचा कायम पहारा असतो . तुम्ही इथे कसे काय राहायला आले ? गोरा कॉलनी मध्ये परिक्रमा वासींची चांगली व्यवस्था आहे . तिथे जायला हवे होते . इथे कोणीही परिक्रमा वासी राहत नाहीत . उद्या सकाळी उठल्याबरोबर तुम्ही गोरा कॉलनी कडे मार्गस्थ व्हा .
पोलीस सांगत होता आणि मी ऐकत होतो .
आणि हो सर्वात महत्त्वाचे म्हणजे सकाळी उठल्यावर आंघोळ करायच्या भानगडीत पडू नका . कारण इथे कोणीही आंघोळ केली नाही पाहिजे असा ठराव ग्रामस्थांनी केलेला आहे . चुकून माकून आंघोळ करताना कोणी सापडला तर त्याची देखील गत महतांसारखी होऊ शकते .
आता मला एक एक धागे जुळू लागले ! काल मी आंघोळ करताना मैयाने मला बाहेर कोण आहे ते पाहायला सांगणे आणि त्यानंतर तीन माणसे माझ्यावर देखरेख करत आहेत असे माझ्या लक्षात येणे आणि त्यांचे पळून जाणे . त्यानंतर पंडितजींनी मला दिलेल्या अतिशय नकारात्मक सूचना मी ऐकणे , या सर्वांचा अर्थ आता मला कळू लागला . याचा अर्थ काल मोठ्याच प्रसंगातून नर्मदा मैयाने मला वाचवले होते !
मी पोलिसाला सांगून टाकले . की काल संध्याकाळी मी स्नान केलेले आहे . पोलिसाने कपाळावर हात मारून घेतला . इतक्यात आमच्या आवाजाने दुसरा पोलीस देखील जागा झाला . पहिला पोलीस त्याला सांगू लागला . दोघे गुजराती भाषेमध्ये बोलत होते परंतु मला कळत होते .
ऐकलस का मित्रा ! हा परिक्रमावासी पहा काल संध्याकाळी नर्मदा मैया मध्ये स्नान करून आला आहे म्हणे ! आणि याला तीन माणसे त्याच्या मागावर असलेली पण दिसली .
माझ्याकडे मोर्चा वळवत पोलीस म्हणाला , तुझ्यावर खरोखरीच नर्मदा मातेची कृपा आहे . हा भाग इतका निर्मनुष्य आहे आणि इथे गेल्या काही काळात इतक्या घडामोडी झालेल्या आहेत की आमच्यासाठी हे सर्व नित्याचे झालेले आहे . परंतु तुझं नशीब थोर आहे की तुला ग्रामस्थांनी चोप दिला नाही . आणि काही त्रास सुद्धा दिला नाही . उद्या मात्र पहाटे पहाटे तू निघून जा . जास्त उजाडण्याची वाट पाहू नकोस .
परंतु ग्रामस्थांनी चोप द्यायला मी असा कुठला गुन्हा केलेला आहे ? मी निरागसपणे पोलिसांना विचारले .
पोलीस सांगू लागले . ते आम्हाला सुद्धा माहिती नाही . परंतु इथल्या बऱ्याच लोकांच्या मनामध्ये धर्माविषयी आणि धार्मिक कृत्यांविषयी कोणीतरी विष कालवलेले आहे . त्यामुळे धर्म हा विषय मध्ये आला की हे लोक फार आक्रमक होत आहेत . मला हे ऐकून आतोनात दुःख झाले . आपल्याच देशातील आपल्याच मातीतील आपल्याच संस्कृतीतील लोक आपल्याच लोकांशी असे कसे काय वागू शकतात ! त्यांना असे कार्य करण्यासाठी प्रवृत्त करणारे लोक किती महापातकी असतील !
हेच ते दुर्गा माता मंदिर . मागे नर्मदा मैया चे पात्र दिसते आहे . डावीकडे खाली हवन कुंड दिसते आहे तिथेच मी आसन लावले होते .
दुर्दैवाने गुगल फोटोमध्ये सुद्धा बंदोबस्तासाठी उभा असलेला पोलीस दिसतो आहे . पोलिसाच्या मागे जी गच्ची आहे तिथूनच मी लाईट अँड साऊंड शो पाहिला . उजव्या हाताला उलुकेश्वर महादेव आहेत .
शेजारीच प्राथमिक शाळा आहे . नाना थवडीया असे या गावाचे नाव आहे . नाना म्हणजे छोटे . डोंगरात मोटी थवडीया लागले होते .
सकाळी उठून अधिक काही न बोलता मी हा आश्रम सोडला . आणि भल्या पहाटे भरपूर चालत गोरा कॉलनी गाव गाठले . गोरा कॉलनी हे नवीन वसविलेले आधुनिक पद्धतीचे गाव आहे . त्यामुळे इथली घरे रस्ते गल्ल्या सर्व आधुनिक पद्धतीचे आहे . एखाद्या गावाचे पुनर्वसन कसे करावे याचे हे एक आंतरराष्ट्रीय मापदंड ठरू शकेल असे उदाहरण आहे .
एखाद्या गावाचे किती शिस्तबद्ध पुनर्वसन करता येऊ शकते याचे आदर्श उदाहरण म्हणजे गोरा कॉलनी . इथली घरे कशी एका रांगेत बांधलेली आहेत पहा .
हे गाव अगदी नर्मदा मातेच्या काठावरच बांधलेले आहे . पलीकडे जाण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचा पूल बांधलेला आहे . शिवाय शूलपाणेश्वराचे नवीन मंदिर देखील इथेच आहे .
या गावाचे अवलोकन करत करत पुढे चालत होतो . एका दुकानदाराने चहा पाजला . तिथून पुढे आल्यावर डाव्या हाताला उंच टेकडावर शूलपाणीश्वराचे मोदींनी नवीन बांधलेले मंदिर दिसले . सुमारे २०० एकसारख्या पायऱ्या होत्या. प्रत्येक काही फुटावर उत्कृष्ट दर्जाची रोषणाई केलेली होती . त्यामुळे रात्री हे फार आकर्षक दिसते . पायऱ्या चढून गेल्यावर भव्य दिव्य मंदिर उभे केलेले आहे . मूळ शिवलिंग जागचे हलवता आले नाही त्यामुळे दुसरे शिवलिंग स्थापन केलेले आहे . मी एकाच दमा मध्ये या २०० पायऱ्या चढून वरती गेलो ! गंमत म्हणजे मला जरा देखील दम लागला नाही ! महादेवांचे शांततेमध्ये दर्शन घेतले .
मंदिरामध्ये स्थापन केलेले शिवलिंग नवीन असले तरी जुन्या शिवलिंगाचा फोटो मागील भिंतीवर लावलेला आहे त्याचे देखील दर्शन होते .
पायऱ्यांवर केलेली रोषणाई रात्री खूप छान दिसते . अशीच विद्युत रोषणाई संपूर्ण सरदार सरोवर प्रकल्प परिसरामध्ये केलेले असून हे सर्व सौर विद्युत उर्जेवर चालते .
इथे खाली नर्मदा मातेवर पक्का घाट बांधलेला असून आजूबाजूचा परिसर पूल आणि किनारा यावर लावलेल्या दिव्यांमुळे नर्मदामाता फार सुंदर दिसते . इथे रोज संध्याकाळी नर्मदा मातेची आरती होते .
आरतीच्या वेळी , नर्मदा मातेच्या आरती मध्ये उल्लेख असलेल्या कोटी रतन ज्योती खरोखरीच नर्मदेमध्ये उतरल्यासारखे वाटते !
या मंदिराचे आवार अति भव्य आणि औरस चौरस पसरलेले आहे .जागोजागी बसण्याची उत्तम व्यवस्था केलेली आहे .परंतु आमच्या शिवाय ( मी , मैय्या व महादेव )
तिथे अन्य कोणीच नव्हते . थोड्यावेळाने एक आई आणि तिचा तरुण मुलगा असे दोघे परिक्रमावासी आले . त्यांच्याशी थोड्या गप्पा मारल्या आणि पुन्हा एकाच धावेमध्ये सगळ्या पायऱ्या उतरलो ! हे करायला दोन्ही वेळेस खूप मजा आली ! परिक्रमेमध्ये एका नव्या उर्जेचा संचार आपल्यामध्ये होतो हे खरे आहे . खाली उतरल्या उतरल्या मला कोणीतरी सांगितले की इथे हरिधाम आश्रम आहे तिथे जावे . त्याप्रमाणे तो आश्रम शोधू लागलो . तत्पूर्वी नर्मदा मैया ची आरती होते तो घाट पाहून घेतला . खूपच आधुनिक पद्धतीने घाट बांधलेला आहे .
समोरच्या उत्तर तटावरून पाहिले असता नर्मदा आरती घाट आणि शूलपाणेश्वर महादेवाचे मंदिर असे दिसते .
हरिधाम आश्रमाचा शोध मला लगेचच लागला . इथे श्री गुरु हरिचरणदासजी संस्कृत पाठशाळा नावाची शाळा असून त्या शाळेच्या समोरच हरि धाम आश्रम आणि श्रीराम मंदिर बांधलेले आहे . या आश्रमामध्ये साधू लोक अधिक मुक्कामाला आहेत असे माझ्या लक्षात आले . आश्रमाचे कामकाज अतिशय सुरेख आणि शिस्तबद्ध पद्धतीने चाललेले होते . संस्कृत वेदपाठ शाळेची मुले संपूर्ण आश्रम सांभाळत होती त्यामुळे त्याच्यामध्ये एक प्रकारची शिस्त आणि चैतन्य होते . मी गेल्याबरोबर मला बालभोग घेण्यासाठी सर्वांनी बसविले . बालभोग खाऊन झाल्याबरोबर रामाची उपासना आणि आरती वगैरे होती . त्यासाठी देखील सर्व साधू मंडळी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने बसलेले होते . आश्रमातून आत गेल्याबरोबर डावीकडे राम मंदिर होते आणि समोर साधूंच्या विश्रामासाठी एक मोठा कक्ष बांधलेला होता . तिथे आसन लावण्याची सूचना मला आश्रमातील मुलांनी केली . मी त्या खोलीमध्ये गेल्याबरोबर अनेक जुने परिक्रमावासी मित्र भेटले आणि सर्वांनी पुन्हा एकदा जल्लोष केला ! ते पाहून आधीच तिथे बसलेले काही साधू वैतागले . कर्नाटकातील मंगलोर चा अशोक कुमार ,अमरकंटक इथे भेटलेला भूषण स्वामी , वडवणीचे तुकाराम बुवा सुरवसे , मी १३० पोळ्या लाटल्या तेव्हा मदतीला आलेला साधू असे अनेक जुने परिक्रमावासी मित्र मला या ठिकाणी भेटले ! सर्वांच्या गप्पा सुरू झाल्या ! हे सर्वजण सडक मार्गाने येथे आले होते . सर्वांनी माझ्याकडून शूलपाणी ची झाडी कशी आहे ते जाणून घ्यायला सुरुवात केली . अजूनही काही साधूंची इथे नव्याने ओळख झाली . काही साधू भ्रमणामध्ये येथे आलेले होते . इथे मला एक भोपळ्याचा तुंबा किंवा कमंडलू सापडला . भूषण स्वामी आणि मी दोघांना तो आवडला आणि आम्ही दोघांनी तो स्वच्छ धुऊन घेतला . भोपळ्याच्या कमंडलूचे तंत्र असे असते की त्याचे आतील गर माऊ असल्यामुळे सतत निघत राहतो व तो रोज घासावा लागतो . हा कमंडलु सुंदर फिकट पिवळ्या रंगाचा होता . त्यावर छान पेंटिंग काढावे असे भूषणने मला सुचवले . कारण तो स्वतः एक कमर्शियल आर्टिस्ट होता . मला देखील ती कल्पना आवडली . इथून खाली गेल्यावर नर्मदा मातेचा सुंदर असा घाट होता . तिथे जाऊन मी स्नान आदि सर्व आटोपून घेतले . छोट्याशा पायऱ्या होत्या परंतु पाणी खूप स्वच्छ होते . त्यामुळे जागेवर स्नान करता आले . आश्रम सांभाळणाऱ्या स्वामींची सुंदर अशी आधुनिक कुटी इथे उभी केलेली होती .
हरिधाम आश्रमाचे प्रवेशद्वार . डावीकडे राम मंदिर असून समोर लाल गाडीच्या मागे जी खोली आहे तिथे आम्ही उतरलो होतो .
उजव्या बाजूला ज्या स्वामींचा फोटो लावला आहे त्यांचे अप्रतिम असे दर्शन आणि सत्संग मला लाभला . दुर्दैवाने पुढे लवकरच त्यांनी देह ठेवला असे परिक्रमेत च कळाले .
रामाचा विग्रह सुंदर असून याची पूजा अर्चा देखील उत्तम प्रकारे केली जाते व स्वच्छता चांगली ठेवली जाते .
आपण आता या मूर्तीला बरेच मागे टाकलेले आहे .
स्नान करून परत येताना आश्रमातील प्रमुख स्वामीजींचा चांगला सत्संग लाभला . त्यांची कुटी खूप छान होती .
नर्मदा मातेकडे तोंड करून असलेली सद्गुरु हरिचरणदास स्वामीजींची कुटी
पुन्हा एकदा साधूनिवासामध्ये आलो . या वास्तूला सत्संग हॉल असे नाव दिले होते . आणि नावाप्रमाणे इथे खरोखरीच सत्संग घडत होता . या आश्रमाचे दोन मुख्य अध्वर्यू जे संत होते त्यांचे फोटो दारात लावलेले होते .
यातील दैव दुर्विलासाचा भाग असा की सद्गुरु हरिचरणदासजी महाराज यांचे दर्शन आणि सत्संग मला लाभला . तो दिनांक होता २४ मार्च २०२२ . आणि यानंतर तीनच दिवसांनी महाराजांनी आपला देह पंचतत्वात विलीन केला . ही बातमी पुढे परिक्रमेमध्ये मला कळाली . माझे भाग्य थोर की अशा संतांचे सदेह दर्शन मला लाभले .
या महाराजांना नरेंद्र मोदी देखील मानत असत .
दुपारी एक क्षणभर मला डोळा लागला . आणि एक स्वप्न पडले त्याच्यामध्ये मला तो कमंडलू दिसू लागला जो मी सकाळी मिळवला होता . मनी वसे ते स्वप्नी दिसे असे म्हणतात . ज्या कमांडोरीचा माझा परिचय होऊन काही तास सुद्धा झाले नाहीत तो थेट स्वप्नामध्ये यायला लागला याचा अर्थ तो माझ्या मनामध्ये फारच खोल शिरला आहे हे लक्षात आल्यामुळे पुढे त्याचा त्रास वाढण्यापूर्वी आत्ताच तो नष्ट करावा असा विचार करून मी तो कमंडलू एका साधूला जागेवर देऊन टाकला! सुंठी वाचून खोकला गेला ! मला हलके हलके वाटू लागले .
आश्रमाची शिस्त अतिशय कडक होती . सर्व वेळा काटेकोरपणे पाळल्या जात .
एकंदरीत या आश्रमातील मुलांची आणि साधूंची स्वयंशिस्त आणि नीटनेटकेपणा तसेच टापटीप मला खूप आवडली . मुख्य महंत चांगला असला की आश्रम अतिशय सुव्यवस्थेत राहतो असा माझा अनुभव आहे .
इथे अधिक काळ थांबलो असतो तर सर्वांशी गप्पा झाल्या असत्या म्हणून मी पुढे निघण्याचा निर्णय घेतला . शूल पाणीची झाडी संपली तरी अजून अश्वत्थामा काही भेटला नाही ! असे वाटावयास नको म्हणून मैयाने एक मजेशीर ठिकाण मला दाखविले ! या ठिकाणी गेलो ते फार बरे झाले असे नक्की वाटते ! हे ठिकाण संस्मरणीय असेच होते!
लेखांक ब्याण्णव समाप्त ( क्रमशः )
नर्मदे हर🙏🙏🙏🙏🙏
उत्तर द्याहटवानर्मदे हर🙏🙏🙏🙏🙏
उत्तर द्याहटवानर्मदे हर. या लेखांक ९२ च्या शेवटी "पुढील लेखांक" ही लिंक चालू नाहीये. वेळ मिळेल तेव्हा ते लिंक कराल का? नाहीतर अनुक्रमणिकेत परत जाऊन पुढचा लेख शोधावा लागतो आहे. तुमच्या सुंदर लेखांमुळे वाचकांच्या होणाऱ्या या मानस परिक्रमेसाठी खूप खूप धन्यवाद. मला वेध लागलेत नर्मदा आईच्या दर्शनाचे. नमामी देवी नर्मदे!
उत्तर द्याहटवालिंक जोडली आहे कळविल्याबद्दल आभार ! नर्मदे हर !
हटवा