लेखांक ८९ : पिंपळखुट्याच्या हनुमंताची करवली भक्ती आणि वडफळीच्या गावगुंडाची जिरवली मस्ती


त्या रात्री खूपच उकाडा होता . त्यामुळे आश्रमाच्या गच्चीमध्ये जाऊन उघड्यावर झोपलो . पहाटे सर्व आन्हिके आटोपून पुढे मार्गस्थ झालो . आन्हिके आटोपली असे मी जेव्हा जेव्हा म्हणतो आहे तेव्हा तेव्हा त्या प्रत्येक दिवसाची एक वेगळी कथा आहे ! अगदी आंघोळ कुठे व कशी केली इथपासून शौचासाठी कुठे व कसे जावे लागले या प्रत्येक गोष्टीचे एकापेक्षा एक मजेशीर किस्से आहेत . शिवाय यानंतर जो परिक्रमेतील सर्वात महत्त्वाचा विधी आहे त्या नर्मदा पूजनाचे अनुभव देखील अनीर्वचनीय असेच आहेत . विस्तारभयास्तव अनुल्लेखाने पुढे जातो आहोत . असो . 
कालचा दिवस फारसे चालणे झाले नव्हते . त्यामुळे आज भरपूर चालावे असे मनात आले . फक्त चालण्यासाठी जेव्हा आपण चालतो तेव्हा चालण्याची चाल ढकलच अधिक करतो . कारण त्यावेळी चालणे हेच आपले ध्येय असते . परंतु इथे मात्र अधिक चालण्याचा संकल्प मन करू शकते कारण कमी किंवा अधिक चालणे हे ध्येय नसून कुठेतरी पोहोचणे किंवा एखादे धाम गाठणे हे ध्येय असते . चालणे ही फक्त त्यासाठी लागणारी मधली एक प्रक्रिया असते . त्यामुळेच आयुष्यातील एखादे काम व्यवसाय किंवा नोकरी करताना आनंद मिळत नसेल तर नोकरीसाठी नोकरी , किंवा कामासाठी काम न करता , आपण ते कुठल्या ध्येयासाठी करत आहोत ते लक्षात घेऊन काम करावे म्हणजे आनंद मिळायला सुरुवात होईल ! आणि एक गोष्ट सदैव डोक्यात ठेवावी . आपण अर्थार्जनासाठी जे काही करत आहोत ती आपली उपजीविका असते . उपजीविका हा शब्दच सर्व काही सांगून जातो ! ही आपली मुख्य जीविका नव्हे ! उप जीविका आहे ! जगातील प्रत्येकाने आजवर प्रचंड पैसा कमावून ठेवला . खूप मोठ्या मोठ्या प्रॉपर्टी उभ्या केल्या . परंतु त्याचा उपभोग घेण्याची पुरेशी संधी त्यांना मिळालीच असेल याची खात्री देता येत नाही . या उलट ज्यांनी या सर्व ऐशो आरामाचा उपभोग घेतला त्यांच्याकडून काहीतरी विधायक समाज उपयोगी कार्य झाले आहे अशी उदाहरणे अपवादानेच आढळतात . हे एक चक्र आहे . एक पिढी कमावत असते . एक पिढी उपभोग घेते . आणि एक पिढी उधळून मोकळी होते ! कारण त्यांना हे वैभव उभे करण्यासाठी कणभर सुद्धा कष्ट पडलेले नसतात . त्यामुळे साम्राज्य उभे करताना त्याचा विस्तार नक्की किती असावा आणि त्याचे वारस कोण , किती व कसे आहेत , किंबहुना आहेत तरी का याचा विचार जरूर व्हावा . न पेक्षा स्वतः कमविलेल्या वैभवचा उपभोग स्वतः घेणे व आपल्या दृष्टीपथात येणाऱ्या गरजूंना आणि याचकांना करून देणे हे अधिक आनंददायी असते . 'सेटलमेंट ' नावाचा एक भ्रमक शब्द सध्या मार्केटिंग वाल्या लोकांनी बाजारात सोडला आहे ! भारतातील सर्वात श्रीमंत मनुष्य अंबानी हा देखील अजून 'सेटल' झालेला नाही . झाला असता तर दर नवीन दिवशी एखादा नवीन उद्योग धंदा त्यांनी चालू केला नसता ! "तो अनेकांची घरे चालवतो आहे आणि अनेकांची पोटे भरतो आहे " वगैरे 'टिपिकल' उत्तरे यावर काही लोक देतील .  परंतु एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे की जगातील कुठलाही जीव दुसरा जीवाचे पोट भरण्याचे सामर्थ्य बाळगत नाही . 
आम्ही काय कुणाचे खातो ।श्रीराम आम्हाला देतो ॥ हे रामदास स्वामींनी म्हटले आहे ते योग्यच आहे . विशेषतः आपल्या 'कम्फर्ट झोन ' मधून बाहेर पडल्यावर तुम्हाला याची अनुभूती नक्की येते !  ज्याने चोच दिली आहे तो चारा देतोच देतो . परिक्रमेमध्ये पदोपदी क्षणोक्षणी याची जाणीव आपल्याला होत राहते . 
आजवर या देशामध्ये अनेक मोठे मोठे राजे होऊन गेले ! अगदी छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक प्रसंगावेळी रायगडावर वातावरण कसे असेल आठवून पहा आणि आज त्या गडाची काय अवस्था झालेली आहे ते देखील पहा . आपण उभ्या केलेल्या राजमहालांची अवस्था थोड्याच वर्षात थोडीफार अशीच होणार आहे हे दुर्दैवी सत्य स्वीकारण्याची तयारी ठेवा ! मोठ्या मोठ्या धनिकांची पुढे झालेली अवस्था पाहून देखील इथे प्रत्येकाला 'सेटल' व्हायचे आहे ! स्थिरस्थावर व्हायचे आहे ! स्थावर मालमत्ता याचा अर्थ ज्याला तुम्ही स्पर्श करू शकता अशी तुमची मालमत्ता . अशा मालमत्तेवर तुम्ही स्थिरपणे बसू शकलात की ती स्थिरस्थावर अवस्था असते . स्थिर बसण्यासाठी माणसाला किती जागा लागते ? तुम्ही मुळात जागाच इतकी वाढवून ठेवली की ती आवरण्यासाठी आणि सावरण्यासाठी तुमची स्थिरता निघून जात असेल तर त्याचा काय उपयोग आहे ? तुकाराम महाराज सांगून ठेवतात ! 
औट हात तुझी जागा ! 
औट म्हणजे साडेतीन हात ! खरे तर इतकीच जागा पुरेशी आहे परंतु तरी देखील थोडेफार इकडे तिकडे करणे सोयीचे जावे म्हणून अजून थोडी जागा फार फार तर त्यात जोडावी . परंतु उभे आयुष्य प्रपंच विस्तार करण्यात घालविणे म्हणजे अन्नाचा अतिरिक्त संचय करणाऱ्या मुंग्या किंवा मधाचा भारंभार संचय करणाऱ्या मधमाशा यांच्यासारखी गत होऊन जाते ! तुम्ही आयुष्यात कधी एखाद्या मुंगीला शांतपणे बसून साखरेचा दाणा खाताना पाहिले आहे काय ? एखाद्या मधमाशीला फुलपाखराप्रमाणे फुलातील मध चाखताना पाहिले आहे काय ? त्यांच्या अल्प बुद्धीमध्ये एकच प्रोग्राम लिहिलेला असतो ! संचय ! त्याचा लाभ त्यांना भविष्यामध्ये होतही असेल ! परंतु बहुतांश वेळा असे पाहण्यात येते की अशा जीवांनी केलेल्या संचयाचा फायदा दुसराच एखादा जीव सहज जाता येता उठवितो ! सध्या सेकंड होम नावाची एक संकल्पना चांगलीच दृढमूल झालेली आहे ! याने घेतले म्हणून मी घेतले , त्याने बांधले म्हणून मी देखील बांधले अशी अनेक उदाहरणे पाहायला मिळतात . अशा सेकंड होम चा उपभोग त्या घराची निगा राखण्यासाठी ठेवलेले रखवालदार अधिक घेतात ! 'केअर टेकर ' हा प्रत्यक्षामध्ये 'उपभोग टेकर ' होऊन जातो ! म्हणजे दुसरे घर असूच नये असे माझे म्हणणे नाही . परंतु एका मर्यादेच्या पुढे आपल्या संपत्तीचा विस्तार करणे म्हणजे भविष्यातील डोकेदुखी वाढवून ठेवणे आहे हे थोडासा विचार केल्यावर एखादा लहान शाळकरी मुलगा देखील सांगू शकेल इतके धादांत सत्य आहे ! त्यापेक्षा दोन-चार अशा गरजू लोकांना साधीच झोपडी वजा घरे उभी करून दिली तर ते आयुष्यभर आपले स्मरण ठेवतील ! तुम्ही बांधलेले दुसरे घर आणि त्याच्या वार्षिक डागडुजी साठी येणारा खर्च , राखणदारांचा खर्च , याची बेरीज केली तर त्याच्या व्याजावर त्याहीपेक्षा उत्तम अशा वेगवेगळ्या जागा सहज उपलब्ध होऊ शकतात जिथे आपण मनसोक्त वेळ घालवू शकता ! त्याही पेक्षा कमी खर्चात जर आनंद मिळवायचा असेल तर नर्मदा खंडातील एखाद्या आश्रमामध्ये जावे आणि मस्तपैकी पडेल ती सेवा करावी ! नर्मदेतला प्रत्येक आश्रम ज्याला शुद्ध मराठी भाषेत 'प्राईम लोकेशन ' असे म्हणतात त्या ठिकाणी आहे ! त्यामुळे तुम्हाला जगावेगळा आनंद मिळाल्याशिवाय राहणार नाही ! उपभोग घेण्यामध्ये जितका आनंद आहे त्याहीपेक्षा अधिक आनंद सेवा देण्यामध्ये आहे ! कधीतरी देऊन पहा किंवा सेवा दिल्याचा प्रसंग आठवून पहा ! कोविड महामारीच्या काळामध्ये अनेक लोकांनी समाज उपयोगी उपक्रमामध्ये आणि सेवा कार्यामध्ये सहभाग नोंदवला . त्यावेळी आपल्याला मिळालेला आनंद आठवून पहा ! या महामारीने जगाला अनेक उपकारक गोष्टी दिल्या आहेत ! जगण्याचा अर्थ आणि जिवंत असण्याचे महत्त्व कोविडने अलीकडच्या काळातील उरलेल्या पिढ्यांना शिकविले ! गेलेली वेळ आणि गेलेले आयुष्य पुन्हा मिळत नाही . त्यामुळे आपल्याला असे वाटत असेल की आपण आपल्या इष्ट जनांसाठी पुरेसे करून ठेवले आहे तर नक्कीच परिक्रमेचा विचार करायला हरकत नाही . कारण परिक्रमा करून देखील तुम्ही त्यांच्यासाठी एक प्रकारे सर्वोत्तम असे काहीतरी परत आणत असता ! तुमचे परिक्रमे नंतर बदललेले स्वरूप समाजासाठी उपकारकच असते . असो . 
पायांना गती दिली . बिजरीगव्हाण नावाचे गाव लागले . त्यानंतर सुरगस , बर्डी अशी आश्रम असलेली गावे लागली परंतु कुठल्याही आश्रमामध्ये न थांबता थेट पिंपळखुटा गावाच्या मारुती मंदिरामध्ये पोहोचलो . पिंपळखुटा या नावाचे मला फार आश्चर्य वाटते . या नावाची किमान पाच गावे मला माहिती आहेत . पिंपळाच्या झाडाचा खुंट असा या नावाचा साधा अर्थ आहे . खुंटामोडी गावात जशी पूर्वी कधीतरी अनिर्बंध वृक्षतोड झालेली असणार आहे त्याचप्रमाणे या गावात पिंपळाचा एखादा भव्य वृक्ष असणार आहे . गावांची नावे नेहमीच खूप मजेशीर इतिहास सांगतात . अमरावती जिल्ह्यामध्ये देखील पिंपळखुटा नावाची गावे आहेत . इथले मारुतीचे मंदिर एका खोल ओढ्याच्या उतारा वर होते . मी मंदिरामध्ये ओढ्यातूनच चढून वर आलो . छोटेसेच मंदिर होते आणि एक आदिवासी भिल्ल साधू इथे राहून सेवा करत होता . साधूने भगवा रंग विकत आणून फडक्याने भिंतींना मारला होता . त्याने भिंती चोपडल्यामुळे त्या मोठ्या मजेशीर दिसत होत्या . त्यावर अतिशय फताड्या अक्षरांमध्ये कोणीतरी परिक्रमावासी साधूने काही अक्षरे लिहून तो निघून गेला होता . साधूचा एक भगत तिथे आला होता . त्याने मला बसायला सांगितले व कोरा चहा करायला तीन दगडाच्या चुलीवर ठेवला . मला ती फताडी अक्षरे बघून काही बरे वाटेना . मंदिराची भिंत कशी सात्विक पाहिजे . मी साधूला विचारले की अजून थोडा रंग शिल्लक आहे का ? त्याने सांगितले चांगला डबाभर रंग शिल्लक आहे परंतु आपल्याकडे ब्रश नाही . तिथे जवळच बांबूची एक कामठी पडली होती . इंचभर जाडीची ती पट्टी चांगली चपटी होती . दाताने कचाकचा चावून मी त्याच्या एका टोकाचा ब्रश तयार केला . आणि त्या डब्यातल्या रंगाने भिंतीवर काही अक्षरे आणि द्रोणागिरी घेऊन उडणारा हनुमान वगैरे चित्रे काढली . भगतराम खुश झाला आणि त्याने आमचे फोटो काढले . माझ्याकडे मोबाईल नाही सांगितल्यावर मित्राच्या क्रमांकावर त्याने फोटो पाठवून दिले . आपणही त्या साधूचे दर्शन घ्यावे . अक्षरे जेमतेमच आलेली आहेत परंतु उपलब्ध संसाधनामध्ये याहून चांगले काही करता आले असते असे वाटत नाही .
पिंपळखुटा हनुमान मंदिरातील भिल्ल साधू आणि प्रस्तुत परिक्रमावासी
रंगवून झालेली अक्षरे ! आणि हनुमान जी !
साधूची राहणी किती साधी आहे पहा !
फताडी अक्षरे माझ्या डाव्या बाजूच्या भिंतीवर होती.
 तसे पाट्या रंगवणे अथवा सुलेखन माझ्यासाठी अगदीच नवीन आहे असे नाही .
माझ्या एका डॉक्टर बहिणीच्या दुकानावरील पाटी हौसे खातर रंगवताना ..
सुलेखन करायला मजा येते ! 
तसाच काहीसा प्रयत्न इथे केला !
गरमागरम काळा चहा घेतला आणि साधु महाराजांची आज्ञा घेतली . जेमतेम दहा पंधराचच मिनिटे या आश्रमामध्ये होतो . परंतु रिकामे बसून राहण्यापेक्षा वेळेचा काहीतरी सदुपयोग झाला याचा आनंद वाटला .
मी काही व्यावसायिक चित्रकार वगैरे नाही . परंतु हौसेला कुठे मोल असते ! अशा रीतीने संधी मिळेल तिथे संधी मिळेल ती कला नर्मदा मातेच्या चरणी अर्पण करण्याची हौस मी भागवून घ्यायचो ! किंबहुना मैय्याच तुम्हाला तुमची क्षमता बघून विविध संधी उपलब्ध करून देत असते असे म्हटले पाहिजे . 
इथून पुढे मोकस आश्रमापासून पुढे जाण्याचे दोन मार्ग होते . इथे एक नवीन शब्द मला कळाला . एक आदिवासी मनुष्य मला म्हणाला रोडी रोड जायचं तर उजव्या हाताला जा . आणि चटकट जायचं असेल तर डावीकडून जा . चटकट ? हा काय नवीन प्रकार आहे ? त्याने सांगितले ज्या मार्गाने चटकन् कटता येते तो चटकट ! अर्थात शॉर्टकट ! शॉर्टकट या शब्दाला गेले बरेच दिवस मी पर्यायवाचक शब्द शोधत होतो ! तो इथे सहज चटकन मिळून गेला ! चट कट ! कुठल्याही इंग्रजी शब्दासाठी स्वभाषेत पर्यायवाचक शब्द शोधताना उच्चार साधर्म्याचा जरूर विचार केला पाहिजे . तरच त्यात यश मिळू शकते . हे माझे मत नसून भाषा प्रभू असलेले माझे मित्र अनंत भालचंद्र तथा रमणजी चितळे यांचे मत आहे . आणि त्यांची भाषाविषयक मते मला शिरोधार्यच आहेत ! आज आपण देवनागरी लिपी मध्ये जे काही फॉन्ट वापरतो त्यातील बरेचसे फॉन्ट त्यांनी स्वतः डिझाईन केलेले आहेत . वयाची पंचाहत्तरी ओलांडूनही अजूनही ते नवनवीन फॉन्ट तयार करतच आहेत ! असो .
मोकस मार्गे अतिशय सुंदर असा तीव्र उताराचा चट कट घेऊन पांढरी माती नावाच्या गावाची हद्द पार करून एका नदीपात्रातून चालत चालत वडफळी गाव गाठले . हे महाराष्ट्राच्या हद्दीतील शेवटचे गाव आहे . या नदीचे नाव देव नदी असून हिच्या ऐल तीरावर महाराष्ट्र तर पैल तीरावर गुजरात आहे . नदीचा रस्ता सुनसान आणि अरण्यमय होता . ही नदी थेट नर्मदा मातेला जाऊन मिळते . आणि जिथे ती नर्मदा मातेला मिळते तो संगम पूर्वी अतिशय पवित्र मानला जायचा परंतु आता तो जलमग्न झालेला आहे .  
मोलगी गाव सोडल्या सोडल्या बिजरी गव्हाण गावात  एक आश्रम लागला होता . मी इथे थांबलो नाही . परंतु आपल्याला माहिती असावे म्हणून या आश्रमाची काही चित्रं सोबत जोडत आहे . इथल्या घरांची रचना लक्षात येण्यासाठी ही चित्रे उपयुक्त आहेत .
बिजरी गव्हाण गावातील अन्नक्षेत्र आणि ते चालविणारा आदिवासी तरुण . संग्रहित छायाचित्र
इथे बांबूच्या अतिशय सुंदर तट्ट्या बनवून त्याच्या भिंती करण्याची पद्धत आहे . या लिंपायला सोप्या जातात व हवेशीर असतात .
राष्ट्रीय संत श्रद्धेय विवेक जी  नामक कोणी संत या आश्रमाचे संस्थापक आहेत . संत हा शब्द उत्तर भारतामध्ये अतिशय सर्वसामान्य रीतीने वापरला जातो . महाराष्ट्रामध्ये संत हा शब्द फार जपून वापरला जातो . हा फरक कृपया वाचकांनी कायम ध्यानामध्ये ठेवावा . छपराची रचना कशी आहे ते इथे वास्तुविशारदांनी पाहून घ्यावे .
अतिशय सुंदर रीतीने सारविलेली जमीन आणि लिंपलेल्या हवेशीर भिंती अतिशय सुखद असतात ! या परते सुख अन्य कुठल्याही लॅविष फ्लॅटमध्ये किंवा बांधकामांमध्ये मिळणे शक्य नाही !
सांगा बरं या स्वयंपाक घरामध्ये दिव्याची , पंख्याची गरज आहे काय ? आणि पाश्चिमात्य देश आम्हाला शिकवतात ? गो ग्रीन ? 
 सुरगस गावाच्या जवळ आल्यावर हळूहळू शिंदीची झाडे आंब्याची झाडे वगैरे दिसू लागली .
हा महाराष्ट्रीय ताड आहे
आपण निरा याच झाडाची पितो
पावसाळ्यामध्ये हा परिसर स्वर्गीय दिसतो
सर्व डोंगर हिरवाईने नटतात
दर्या खोऱ्यातून जलप्रपात नर्मदा मातेच्या भेटीसाठी झेपावू लागतात
या भागातील दहेलचा धबधबा प्रसिद्ध आहे
या दहेल च्या धबधब्यावर जमलेली आदिवासी मुले . इथली आदिवासी मुले शूर आहेत .
इथली आदिवासी मुले धाडसी सुद्धा आहेत
फक्त त्यांच्या अंगातील ऊर्जेचा गैरवापर करून कोणी विद्रोही किंवा फुटीरतावादी विचार त्यांच्यात भिनवून त्यांच्या वैयक्तिक आयुष्याची व भारतीय सामाजिक सौहार्दाची होळी कोणी करू नये इतकेच वाटते . त्यामुळेच या संपूर्ण समाजाला विना विलंब मूळ राष्ट्रीय प्रवाहात आणणे अगत्याचे आहे .
अखंड वृक्षतोड ही या भागातली एक प्रमुख समस्या आहे .त्याची पदचिन्हे तुम्हाला जागोजागी दिसतात .
पांढर माती गावाजवळ केवडीचा धबधबा प्रसिद्ध आहे .
पावसाळ्यामध्ये हा संपूर्ण परिसर पर्यटकांसाठी स्वर्ग आहे
चटकटने उतरताना अशा प्रकारची घनदाट अरण्ये पार करावी लागतात
आपल्याला दुर्दैवाने इंग्रजांनी विकसित केलेली गिरिभ्रमण क्षेत्रे तेवढीच माहिती आहेत . महाबळेश्वर आणि माथेरान सोडून महाराष्ट्रात अजूनही अतिसुंदर गिरी माथे आहेत हे प्रत्यक्ष फिरल्याशिवाय कसे कळणार ! 
या भागात अशी असंख्य रान फुले आहेत की जी फक्त  पावसाळ्यामध्येच दर्शन देतात !
इथले आदिवासी लोक कमळाची लागवड सुद्धा करताना दिसतात . या आदिवासी तरुणीच्या हातामध्ये आहे ते खरे कमळ असून आपल्या बाजारात गणपती मध्ये जी फुले मिळतात ती कमळाचीच कमोदिनी नावाची जात आहे . 
ज्वारी हे या भागातले मुख्य धान्य आहे .
हीच ती देवनदी जी महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांची सीमा आखते .खालच्या बाजूला डुमखल नावाचे गाव दिसते आहे ते गुजरात राज्यामध्ये असून वडफळी हे गाव महाराष्ट्रामध्ये आहे . वडफळी आणि चापडी याच्या मधोमध श्री कुलदीप कुलकर्णी यांचा चैतन्य आश्रम आहे . जिथे प्रत्येक परिक्रमावासी थांबतोच थांबतो .
अतिशय सुंदर अशा निसर्गसंपन्न मार्गाने चालत मी वडफळी आणि चापडी गावाच्या सीमा हद्दीवर असलेल्या श्री कुलदीप कुलकर्णी यांच्या चैतन्य आश्रमामध्ये पोहोचलो . या आश्रमाचे वैशिष्ट्य असे आहे की इथे परिक्रमावासींना अतिशय सुग्रास भोजन दररोज दिले जाते . इथे सतत पदार्थ बदलले जातात . आणि ताटामध्ये किमान सहा ते सात पदार्थ असतातच असतात ! कुलदीप स्वतः स्वयंपाक करतात तसेच काही स्थानिक आदिवासी तरुण देखील गर्दी वाढल्यावर त्यांना मदतीसाठी येतात . इंदोर येथील दत्त संप्रदायातील थोर संत श्री नाना महाराज तराणेकर यांच्या गुरुपरंपरेचा अनुग्रह कुलदीप कुलकर्णी यांच्यावर आहे . नानांच्या परंपरेतील सर्व उपासना कुलदीप कुलकर्णी यथासांग करतात . परिक्रमा वासी इथे मोठ्या संख्येने मुक्काम करतात कारण इथून पुढे गुजरात राज्याची हद्द लागते आणि पुन्हा एकदा मोठे मोठे डोंगर चढावे लागतात . हा आश्रम नदीच्या काठावर असल्यामुळे खड्ड्यामध्ये आहे . छोटीशीच वास्तू असली तरी ती कायम परिक्रमावसींनी गजबजलेली असते . मी जेव्हा आश्रमामध्ये पोहोचलो तेव्हा माझ्या खेरीज अन्य कोणी परिक्रमा वासी तिथे नव्हते . कुलदीप कुलकर्णी यांनी अतिशय प्रेमाने माझे स्वागत केले . आश्रमामध्ये गेला गेला एक व्हरांडा आहे तिथे मी काही काळ शांतपणे विसावलो . आपल्या माहितीकरता आश्रमातील काही संग्रहित छायाचित्रे जी स्वतः कुलदीप कुलकर्णी यांनीच काढलेली आहेत ती सोबत जोडत आहे . सौजन्य गुगल नकाशा .
श्री कुलदीप कुलकर्णी यांचा चैतन्य आश्रम . वडफळी ,महाराष्ट्र
आश्रमाच्या ठीक समोरून वाहणारी देव नदी
पावसाळ्यामध्ये ही नदी पार करणे थोडेसे कठीण होते
महापूर आल्यावर तर हिला पार करणे केवळ अशक्य !
आश्रम संचालक श्री कुलदीप कुलकर्णी डावीकडे
उभे
चैतन्यआश्रमामध्ये भोजन प्रसाद घेणारे परिक्रमावासी
चैतन्यआश्रमामध्ये भोजन प्रसाद घेणारे साधू परिक्रमावासी
चैतन्य आश्रमामध्ये भोजन प्रसाद घेणाऱ्या माताराम परिक्रमावासी
परमपूज्य नाना महाराज तराणेकर आणि नर्मदा मैया यांचे अधिष्ठान

पू . नाना महाराजांची सुरेख मूर्ती आणि पादुका
श्री कुलदीप कुलकर्णी यांचा फोन क्रमांक आपल्या माहितीकरता सोबत जोडत आहे . इच्छुकांनी त्यांना संपर्क करावा . ९६३७५७१५४२


आश्रमामध्ये भरपूर परिक्रमावासी आले की कधीकधी अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणावर स्वयंपाक करावा लागतो . त्यावेळी स्थानिक आदिवासी तरुण कुलदीप यांना मदत करतात .
परिक्रमावासींना उत्कृष्ट दर्जाचे आणि साग्रसंगीत भोजन दिले जाते
 रोज काहीतरी नाविन्यपूर्ण पदार्थ बनवले जातात
पावभाजी आणि गाजर हलवा वगैरे अन्य कुठल्या आश्रमात मिळताना पाहिले नाही .
उपवासाचे पदार्थ देखील भरभरून दिले जातात .
सांगायचे तात्पर्य इतकेच आहे की मूळचे धुळ्याचे असलेले श्री कुलदीप कुलकर्णी हे अतिशय प्रेमाने आणि निष्ठेने आश्रम चालवीत आहेत . परंतु इथे येताना एका अप्रिय घटनेचा सामना मला करावा लागला . नर्मदा मातेने माझी चांगलीच परीक्षा पाहिली असे म्हणा हवे तर ! त्याचे असे झाले . 
त्या जंगलातील चटकट घेऊन मी वडफळी गावामध्ये पोहोचलो . गावातील मुख्य रस्त्यावर बऱ्यापैकी बाजार भरला होता . माणसांची गर्दी चांगली होती . शक्यतोवर परिक्रमावासी गावातून जाताना त्याला लोक नर्मदे हर असा आवाज देतात ! आपणही फिरून त्या लोकांना हर हर नर्मदे किंवा नर्मदे हर असा आवाज देतो ! इथे मात्र साधारण पंचवीशीचा एक आदिवासी तरुण मोटरसायकलवर बसून आरशातून मला येताना पाहत होता . मी चालताना बऱ्यापैकी सावध असतो त्यामुळे हा माझ्याकडे पाहतो आहे हे मी आधीच हेरले होते . मी त्याच्या जवळ गेल्यावर तो माझ्या वाटेत थुंकू लागला . म्हणून मी थोडासा बाजूला झालो तरी तो थुंकलाच . त्याच्या तोंडामध्ये गुटखा भरलेला होता . त्यामुळे त्याची पिंक मोठी होती . अतिशय किळसवाणा असा तो प्रकार होता . क्षणभर त्याला तत्काळ प्रत्युत्तर द्यावे असे माझ्या मनात आले . परंतु मी विचार केला की हे बरोबर नाही . त्याने त्याचे काम केले . मी माझे काम केले पाहिजे .मी त्याला एवढेच म्हणालो , " माणसे दिसत नाहीत का रे तुला बाळा ? "  आणि मी पुढे चालत राहिलो . तो थुंकल्याबरोबर आजूबाजूला जमलेली त्याची मित्रमंडळी कुत्सितपणे हसल्याचे देखील मी पाहिले . परंतु तो एवढ्यावर थांबला नाही . मी थोडासाच पुढे गेलो असेन . हा गाडीवरती पुन्हा पुढे आला आणि यावेळी नेम धरून तो माझ्या पायावर थुंकला . अतिशय गलिच्छ घाणेरडी अशी त्याची गुटखा मिश्रित थुंकी माझ्या पायावर सगळीकडे पसरली . माझ्या डोक्यात क्रोधाग्नी भरून मी काहीतरी विपरीत कृती करणार इतक्यात त्याची जागा विवेकाने घेतली आणि मी स्वतःला समजावून सांगितले , की मी काहीतरी भडक प्रतिक्रिया द्यावी म्हणूनच हा तरुण असे वागतो आहे .तशी प्रतिक्रिया जर मी दिली तर त्याचा कायमचा त्रास अत्यंत सेवाभावी वृत्तीने इथे आश्रम चालविणाऱ्या कुलदीप कुलकर्णी यांना होणार आहे . त्यामुळे मी हे सर्व अन्याय सहन करून पुढे निघून गेले पाहिजे . कारण मी इथे एका दिवसासाठी आलेला पाहुणा आहे . परंतु कुलदीप कुलकर्णी यांना कायमचे येथे राहायचे आहे आणि इथल्या लोकांना तोंड द्यायचे आहे . तरी देखील मी एक काम असे केले की त्या बाजारामध्ये दुकान लावलेल्या तीन-चार वयस्कर लोकांना मी ती घाण दाखवली आणि त्यांना विचारले की हे तुम्हाला मान्य आहे काय ? बहुतेक त्या गुंडाची आणि त्याच्यासोबत फिरणाऱ्या चेल्या चपाट्यांची सर्वत्र खूप दहशत होती . कारण सर्वजण मान खाली घालून उभे राहिले कोणीही काहीही बोलले नाही . त्यांना हा प्रकार आवडलेला नाही हे त्यांच्या चर्येवरून लक्षात येत होते परंतु बोलण्याची हिंमत होत नाही हे देखील स्पष्टपणे कळत होते . मला अजूनही मनोमन असे वाटत होते की याला सर्व गावासमोरच धडा शिकवावा . परंतु पुन्हा एकदा मी कुलदीप कुलकर्णी यांचा विचार केला . अजून मी त्यांना भेटलेलो नव्हतो बर का . परंतु माझ्या लक्षात आले की आश्रमाच्या अगदी जवळ मी पोहोचलेलो असताना जर कोणी असे वागत असेल तर त्याचा निश्चित अर्थ असा आहे की ह्या माणसांना आश्रमाला त्रास देण्याची इच्छा दिसते आहे . त्यामुळे मी माझ्या मार्गाने चालत राहिलो . तो माथेफिरू तरुण पुन्हा एकदा माझ्या दिशेने वेगाने गाडीने येऊ लागला . यावेळी मात्र मी बाजाराच्या थोडासा पुढे आलेला होतो . आजूबाजूला फारशी माणसे नव्हती . त्यामुळे मी माझी काठी आडवी- तिडवी हलवून जरा हात मोकळे करतो आहे असे दाखवले . त्या काठीच्या परिघाजवळ काही त्याला गाडी आणता आली नाही . आणि तो फिरून निघून गेला . मी मागे वळून पाहिले तेव्हा तो देखील गाडीवरून जाताना मागे वळून पाहत होता . आणि नजरेने मला सुचवत होता की अजून माझी मस्ती जिरलेली नाही . मी शांतपणे चैतन्य आश्रमामध्ये पोहचलो . कुलदीप कुलकर्णी यांनी माझे प्रेमाने स्वागत केले . मी त्यांना झालेला प्रसंग सांगितला . सांगणे आवश्यक नव्हते परंतु त्यांना माहिती असावे म्हणून सांगितले . त्यांना खूप वाईट वाटले आणि त्यांनी मला पाय धुण्यासाठी पाणी आणून दिले . त्यांना हा प्रकार कोणी केला आहे ते लक्षात आले . या संपूर्ण परिसरामध्ये हा एकच असा गावगुंड होता की जो परिक्रमावासींना त्रास देण्यासाठी प्रसिद्ध होता . विद्रोही विचारांच्या नादाला लागल्यामुळे त्याच्या मनामध्ये हिंदू धर्माविषयी आणि त्या धर्मातील परंपरांविषयी प्रचंड आकस होता . शिवाय अतिशय बेमुवर्तखोर वर्तन असल्यामुळे गावातील देखील कोणीही त्याच्या नादाला लागायचे नाही . त्यामुळे त्याची हिंमत वाढली होती . मी कुलदीप यांना हे देखील सांगितले की मी त्याला जरा देखील प्रतिकार केला नाही कारण तुम्हाला त्रास व्हायला नको हा माझा शुद्ध भाव होता . कुलदीप यांना फार वाईट वाटले . त्यांनी मला नुकताच होळीच्या वेळी झालेला एक प्रकार सांगितला . याच गावगुंडाने एका परिक्रमावासीला होळीची "फुई " मागितली . इकडे वर्गणीला हा शब्द वापरतात . परिक्रमावासी कडे अर्थातच काहीच नव्हते . त्या तुलनेने वयस्कर परिक्रमा वासीयाने होळीची फुई देण्यास असमर्थता दर्शविल्याबरोबर या गावगुंडाने आपल्या साथीदारांच्या मदतीने त्या परिक्रमावाशीला भर चौकात बेदम चोप दिला ! उभा गाव बघत होता परंतु कोणी मध्ये पडले नाही . हे ऐकल्यावर मात्र माझ्या मेंदूचे तापमान थोडेसे अधिक वाढले . आणि अतिशय विचित्र भावना मनामध्ये दाटल्या . आपलीच माणसे आपल्याच मातीमध्ये राहून आपल्याच माणसांशी असे कसे काय वागू शकतात ? आपण आपल्याच मातीतल्या माणसांना इतके पारखे व्हावे ? आपल्या आई-वडिलांनी दिलेले संस्कार आणि आपल्या समाजाचे ऋण यांची इतक्या सहजतेने प्रतारणा करावी ? ही कुठल्या प्रकारची शिकवण आहे ? आणि अशी परंपरा धारण करणारी पिढी पुढे वाढवून या देशाचे , समाजाचे ,धर्माचे किंबहुना स्वतःच्या कुटुंबाचे देखील काय कल्याण करणार आहे ? कुलदीप त्याचे किस्से मला सांगत राहिले . तो गावगुंड सर्वांच्याच डोक्याला ताप झाला होता . भंगुरै दरम्यानच आसपासच्या गावातील मुलांनी ठरवून येऊन याला भर जत्रेमध्ये बेदम चोपला होता . त्यामुळे हा अजूनच चवताळला होता आणि स्वतःला गावासमोर सिद्ध करू पाहत होता . हे सर्व कुलदीप सांगत असतानाच अचानक दोन-चार मोटरसायकल मोठमोठा आवाज करत आश्रमासमोर येऊन थांबल्या . गाडीवरून हा गाव गुंडा उतरला . याला बघताच कुलदीप काहीतरी आणायचे निमित्त करून आत मध्ये केले . माझ्या लक्षात आले . की हीच संधी आहे ! मी त्याला प्रत्युत्तर दिले नव्हते कारण त्याने आश्रमा पर्यंत येऊ नये अशी माझी इच्छा होती . परंतु आता तो आश्रमा पर्यंत आला होता .शेवटची चूक त्याने केलेली होती ! त्यामुळे त्याची मस्ती जिरवणे भाग होते . मी आश्रमाच्या दारापाशी त्याला सामोरा गेलो . तो अतिशय तोऱ्यामध्ये चालत आत मध्ये येत होता . मी प्रतिकार करत नाही हे त्याला चांगले कळल्यामुळे तो माझ्याकडे न बघता कुलदीप भाऊला अतिशय हिडीस स्वरा मध्ये हाका मारू लागला . त्याला काही कळायच्या आत मी माझ्या हाताने जमेल तितका मोठा परीघ हवेत काढत फाड करून त्याच्या कानाखाली मुस्कटात भडकवली ! या प्रकाराने ५५ - ६० किलो वजनाचा तो खत्रुड जीव चांगलाच हेलपाडला .  वीर्य नाशाची नशा लागलेले ते पाप्याचे पितर नैष्ठिक ब्रह्मचर्याच्या तप्त तव्यावर तावून सुलाखून निघालेल्या नर्मदा भक्ताच्या हाताच्या एकाच आघाताने क्षणात वठणीवर आले ! मी त्याच्या श्रीमुखात भडकवली आहे हे पाहिल्याबरोबर त्याच्यासोबत आलेले गाडीवरचे सर्व मित्र उलट्या पावलाने निघून गेले आणि चक्क पळून गेले . जाताना गाड्या ही घेऊन गेले . तो एकटा पडला ! मी त्याला म्हणालो आता बोल . माझ्याशी बोल . विषय तुझ्या आणि माझ्यामध्ये होता . तू कुलदीप भाऊ ला भेटायला का आलास ! माझ्या एका हातामध्ये दंड होता . तो गावगुंड गाल चोळत थरथर कापत माझ्यासमोर उभा होता . इतक्यात कुलदीप कुलकर्णी बाहेर आले . तो काही बोलणार इतक्यात मी त्याला सांगितले भाऊंच्या पाया पड . त्याच्या डोळ्यात पाणी आले होते . असा अपमान यापूर्वी कधीच त्याचा कोणी केला नसावा . तो रडक्या स्वरामध्ये कुलदीप भाऊला सांगू लागला . या परिक्रमावासीने चौकामध्ये मला मारहाण केली . मला उलट बोलला . मी डाव्या हातातली काठी उजव्या हातात घेतली त्याबरोबर घाबरून तो दोन पावले मागे सरकला . मी त्याला म्हणालो . तुला मी मराठी भाषेमध्ये काय सांगितले ते लक्षात आले का ? कुलदीप भाऊ ला नमस्कार करायचा आणि माफी मागून म्हणायचं मी पुन्हा असं करणार नाही . मी पुन्हा तुम्हाला त्रास द्यायला येणार नाही . मी कोण आहे तुला माहिती नाही . तुझा असा बाजार उठवीन की तुला आयुष्यात परत कुठे स्थिरस्थावर होता येणार नाही . त्याने मागे वळून पाहिले . मी म्हणालो अरे बाळा तुझ्यासारखे मरतुकडे सरळ करण्यासाठी मला फार वेळ लागत नाही . आणि राहिला प्रश्न तुझ्या मित्रांचा तर ते कधीच xxला पाय लावून पळून गेलेले आहेत . पटकन माफी मागून मोकळा हो नाहीतर तुला मी कोण आहे ते दुर्दैवाने दाखवावे लागेल . सगळे परिक्रमावासी एक सारखे दिसतात म्हणून असे समजू नकोस की सगळेच तुझा मार खातील . मी काठी उचलल्या बरोबर तो चटकन खाली वाकला आणि कुलदीप भाऊ च्या पाया पडला . " सॉरी " एवढेच म्हणाला . आणि शर्टाच्या बाहीने डोळे पुसत ताड ताड ताड निघून गेला . जाताना मी त्याला मोठ्या आवाजात ऐकवले की पुन्हा जर त्याने कुलदीप कुलकर्णी यांच्या आश्रमाकडे डोळे वर करून पाहिले तर त्याची खैर नाही. त्याच्या मित्रांनी त्याची गाडी सुद्धा नेली होती इतके ते सर्व पळपुटे निघाले . तो गेल्यावर मी कुलदीप कुलकर्णी यांची क्षमा मागितली . त्यांना मात्र या प्रकाराचे फारच टेन्शन आले ! ते मला म्हणाले की तुम्ही आता पटकन जेऊन घ्या आणि पुढे मार्गस्थ व्हा . कारण हा मुलगा काही तुम्हाला आता सोडणार नाही . मी कुलदीप ला म्हणालो मला हात लावायला याचा बाप आला तरी बेहद्द ! माझ्या केसाला सुद्धा धक्का लावायची हिम्मत याच्या कोणामध्येच नाही .अर्थात हा माझा स्वतःवरील अति आत्मविश्वास नव्हता तर नर्मदा मातेच्या सामर्थ्यावरील श्रद्धा होती . "तुझी परिक्रमा निर्विघ्नपणे पार पडेल " असा अनेक संतांनी दिलेला जो आशीर्वाद होता त्या आशीर्वादावरील तो विश्वास होता . परंतु कुलदीप मात्र खरोखरीच खूप चिंतित आहेत असे मला दिसले . नशीब मी त्याच्या कानाखाली काढलेली नक्षी त्यांनी पाहिली नव्हती ! त्यांनी लगेचच मला गरमागरम जेवण वाढले . सकाळी कधीतरी टाकरखेडा आश्रमाची आठवण झाली आणि दुसरे काही नाही आठवले तरी गुलाबजाम खाण्याची इच्छा मात्र झाली होती ती देखील कुलदीप ने पूर्ण केली ! पोटभर जेवून नाना महाराजांना साष्टांग नमस्कार करून पुढे निघालो ! कुलदीप ने वही मध्ये माझे नाव लिहून घेताना पुन्हा एकदा मला गतीने मार्गस्थ होण्याची विनंती केली . त्यांचे असे म्हणणे होते की एकदा मी देव नदी ओलांडली की या मुलाचे काही चालणार नाही ! पुन्हा एकवार कुलदीप ची क्षमा मागून मी मार्गस्थ झालो . कुलदीप चा आश्रम नदीच्या काठावर एका रस्त्यावरच होता . समोर गुडघाभर पाण्याची नदी ओलांडली की लगेच डुमखल गावातला गुजराती आश्रम होता . 
नदिया के पार असे लिहिलेली आश्रमाची पाटी लावलेली होतीच . 
माझ्यासाठी हे फार सोपे होते . कुलदीपच्या आश्रमातून धावतच बाहेर जायचे आणि नदी ओलांडून पलीकडे गेले की या गाव गुंडाची हद्य संपली ! पण मी मूळ ज्या गावचा आहे ते गाव संपूर्ण पंचक्रोशी मध्ये गुंडागर्दी साठी प्रसिद्ध आहे ! म्हणजे असली फालतू गाव गुंडगिरी तिकडे कोणी करत नाही . परंतु आमच्या गावाला कुस्तीची महान परंपरा आहे . हिंदकेसरी मारुती माने यांची कर्मभूमी अर्थात सांगली जिल्ह्यातील सप्तर्षी कवठे किंवा कवठेपिरान हे माझे मूळ गाव आहे .या गावात घरटी एक पैलवान तरी आहेच .माझे थोरले चुलते देखील तालीम करायचे .वडिलांना देखील कुस्तीचा कोण नाद !त्यांच्या कुस्तीच्या वेडापायी मी आयुष्यात कधी क्रिकेट खेळू शकलो नाही ! इतका त्यांचा या त्यांच्या मते 'फालतू ' खेळांवर रोष होता ! आमच्या या गावातील लोकांचा एक वाईट गुण आहे . हे लोक अन्याय सहन करत नाहीत . आणि विनाकारण वाकड्यात गेलेल्या माणसाला हाणून , मारून ,ठोकून ,बडवून सरळ केल्याशिवाय राहत नाहीत ! त्यामुळे मी देव नदी पार न करता महाराष्ट्राच्या हद्दीतूनच अजून काही किलोमीटर चालत जाण्याचे ठरवले ! देव तारी त्याला कोण मारी ! ही नुसती म्हणू नसून माझा धगधगीत अनुभव आहे ! मी जसा त्या कच्च्या रस्त्याने चालायला निघालो तसे माझ्या लक्षात आले की माझ्यावर पाळत ठेवली जात आहे . एका दुचाकीवर तीन मुले , अशा रीतीने फिरणाऱ्या सहा सात मोटरसायकल माझ्या शेजारून पुढे गेल्या . जाताना सर्व मुले माझ्याकडे वळून वळून पाहत होती . हळूहळू नदी खाली जाऊ लागली आणि डोंगर सुरू झाला . रस्ता मोकळा असल्यामुळे मी जाताना मुक्त हाताने माझी काठी फिरवत होतो ! विशेषतः या मुलांच्या गाड्या जवळून जाताना मी काठीचा आवाज येईल अशा रीतीने ती फिरवायचो ! किंवा रस्त्यावरचा एखादा खडा नेम धरून काठीने उडवायचो . चालता चालता हे प्रकार करण्याची मला चांगली सवय झाली होती . आणि क्वचितच मी काठीचा केलेला वार खडा चुकवू शकायचा असे महारथ मला परिक्रमा कृपेने प्राप्त झाले होते . त्या खड्यावर माझ्या काठीचा ॲल्युमिनियम चा ठोकळा जेव्हा आपटायचा तेव्हा अक्षरशः बंदुकीच्या गोळी सारखा आवाज निघायचा ! त्यामुळे ती मुले मनोमन दचकायची ! त्यांचे असे नियोजन होते की पुढे असलेल्या एका खिंडीमध्ये मला गाठायचे आणि बेदम मारहाण करायची . माझे असे नियोजन होते की यांच्यातल्या निम्म्या लोकांना घाबरवून सोडायचे म्हणजे त्यांची लढण्याची इच्छाच मारून टाकायची ! आधीच त्यांच्यासमोर त्यांच्या म्होरक्याला कानफाडून मी अर्धी लढाई जिंकली होती !  एकदा तर फार मजा झाली ! समोरच्या उतारावरून वेगाने माझ्या दिशेने एक दुचाकी येत होती ! माझ्या अंगावर गाडी घालून मला घाबरवायचे असे त्यांचे नियोजन होते . परंतु तो बाईक स्वार जवळ येतानाच मी चटकन खाली वाकलो आणि बुटाची लेस बांधू लागलो . परंतु या प्रकारामुळे गडबडलेला गाडीवान फापलला ! आणि ती तीन मुले पडता पडता वाचली ! मी धावतच त्यांच्याजवळ गेलो . ती घाबरून पळून जाण्याच्या बेतात होती . पण मी त्यांना आडवा गेलो आणि थांबवले . आणि मी त्यांना विचारले की तुमचे नक्की काय चालू आहे ? मला सांगा . ती मुले म्हणाली काही नाही आम्ही असेच फिरत आहोत . आतापर्यंत त्या गावगुंडाचे नाव मला कळालेले होते .  मी त्यांना विचारले खरे सांगा तुम्हाला त्यानेच पाठवले ना ? तुम्हाला नर्मदा मैया ची शपथ आहे . मुलांनी माना खाली घातल्या . आणि म्हणाले , " दादा आम्हाला त्याचे विचार पटत नाहीत . परंतु त्याचे ऐकावेच लागते . त्याच्या घरातले नातेवाईक मोठे राजकीय पुढारी आहेत . त्यांच्या हातात सगळी सत्ता आहे . त्यामुळे आम्ही त्यांच्या विरोधात जाऊ शकत नाही . " मुलांनी तो गावगुंड माझ्या अंगावर थुंकलेले पाहिले होते . त्यानंतर मी काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही हे देखील पाहिले होते . आणि कुलदीपच्या मुळावर उठल्यावर मात्र त्याची काय गत केली ते देखील पाहिले होते . त्यांची मनोदेवता त्यांना सांगत होती की मी निष्पाप आहे . परंतु गावगुंडा च्या दबावामुळे ते मला घाबरवण्याचा प्रयत्न करत होते . मी त्या मुलांचे अतिशय प्रेमळ शब्दात प्रबोधन केले . या वयोगटातील मुले हाताळण्याचा मला बऱ्यापैकी सराव आहे . मुलांना माझी भूमिका समजावून सांगितली . त्यांना मी त्यांची ऊर्जा योग्य त्या शत्रूच्या विरोधात वापरण्यासाठी सुचवले ! भारतीय लष्करामध्ये भरती होऊन तिथे आपली मस्ती जिरवावी असा सल्ला दिला . आपल्याच गावात येणाऱ्या आपल्याच संस्कृतीच्या आपल्या धर्माच्या अभ्यागताला त्रास देण्यात कुठला मोठा पुरुषार्थ आहे ? या माझ्या प्रश्नाने मुले अंतर्मुख झाली . त्यांना संगतीचे महत्त्व देखील पटवून सांगितले . आणि योग्य ती संगत धरण्याची कळकळीची विनंती केली . कुलदीप कुलकर्णी यांना आश्रमामध्ये जाऊन मदत करत जावी असे देखील सुचवले . या मुलांनी सदर गाव गुंडाच्या मार्फत कोणी कोणी या आश्रमाला कसा त्रास दिला याची जंत्रीच मला ऐकवली . हा आश्रम ज्या जागेवर होता ती जमीन याच गुंडाच्या लांबच्या नातेवाईकांची होती . नातेवाईक जरी चांगले असले तरी हा गावगुंड अलीकडे फारच शेफारला होता . मी त्याचा अहंकार जिरवून खूप चांगले काम केले असे त्याच्याच साथीदारांनी मला सांगितले ! मी त्या मुलांना सांगितले की तुमच्या गुंड मित्राला माझा निरोप द्या की कुलदीप कुलकर्णी यांच्या आश्रमाला केस भर जरी धक्का लागल्याचे मला कळले तरी त्याला मी आयुष्यातून उठवीन ! अर्थात वाईट आयुष्यातून उठवून , चांगल्या आयुष्यामध्ये बसवीन असा त्याचा अर्थ होता ! परंतु तो कळण्याइतपत या मुलांची वैचारिक प्रगल्भता नव्हती ! ती मुले मला नर्मदे हर करून निघून गेली .
पुढे जाण्याचा चटकट देखील त्यांनी मला सांगितला . एक लक्षात ठेवा मित्रांनो . दुर्जन हे नेहमी अल्पसंख्यच आहेत . सज्जन हे नेहमी बहुसंख्यच राहणार आहेत . निसर्गाची रचनाच अशी आहे की सज्जनांची संख्या वाढविण्यावर त्याचा भर असतो . परंतु बहुसंख्य असूनही सज्जन निष्क्रिय असल्यामुळे मूठभर दुर्जन शक्तिमान झाल्याचा भ्रम उभा राहतो . सज्जन दुर्बळ नाहीत हे दुर्जनांना योग्य वेळी योग्य प्रकारे सिद्ध करून दाखवावे लागते . अन्यथा त्याचा त्रास पुढील सज्जनांना होऊ शकतो . त्या गावगुंडाला नर्मदा मैया ने माझ्या माध्यमातून असा धडा शिकवला होता की पुन्हा पुढच्या एखाद्या परिक्रमा वाशीला त्रास देताना तो हजार वेळा विचार करेल . शिवाय जाता जाता त्याचे साथीदार देखील मी फोडले होते ! शिवाजी महाराज ज्याप्रमाणे शत्रूच्या सैन्यातील चांगली माणसे हेरून त्यांना आपल्या विचारांचे बनवत तसेच हे काहीसे आपोआप घडले होते . नर्मदा मैया चा जयजयकार करत मी पुन्हा एकदा शूलपाणेश्वर राष्ट्रीय अभयारण्याचा आनंद घेत चालू लागलो ! 
भये व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे ।
भयातीत ते संत आनंत पाहे । 
असे रामदास स्वामी म्हणतात .
भवाच्या भये काय भीतोसि लंडी ।
धरी रे मना धीर धाकासी सांडी ।
रघुनायका सारिखा स्वामी शिरी ।
नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी ॥
हे देखील माझे आवडते समर्थ वचन आहे .
शिवाजी महाराज म्हणायचे 
भ्यावे तो एक रघुनाथासी !तुम्हासी काये म्हणोनि भ्यावे ?
महाराष्ट्राच्या भूमीमध्ये थोडेसे अधिक भय आणि गुजरातच्या भूमीमध्ये गेल्यावर थोडे कमी भय हे काहीच माझ्यासाठी लागू होणार नव्हते ! कारण मी नर्मदा मातेचा , शिवछत्रपतींच्या विचारांचा असा गुंडा आहे की ज्याची हद्दच फार मोठी आहे ! 
समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे !
थोडक्यात जगात कुठेही असो , भयमुक्त राहणे हाच साधकाचा खरा अंतरीचा भाव असला पाहिजे . जगातील सर्वात पचविण्यास कठीण गोष्ट आणि भयप्रद गोष्ट म्हणजे मृत्यू आहे . परंतु एकदा मृत्यूचेच भय निघून गेले की माणूस कशालाच घाबरत नाही ! नर्मदा माता तुमचे मृत्यूचे भयच काढून घेते ! तुम्हाला निर्भय बनवते ! आत्मनिर्भर बनवते ! आत्म मग्न बनवते ! आत्म स्वरूपाचा साक्षात्कार निश्चितपणे करवते ! 
जय मा रेवा । पळविसी भेवा ।
उकलसी ठेवा । अंतरीचा ॥
अबल करिसी भय । सबल दिधसी जय ।
सकलभुवनत्रय । हर रेवा ॥ 
महादेव हर हर देवा ॥
हर रेवा । हर हर रेवा ॥
नर्मदे हर !





लेखांक एकोणनव्वद समाप्त ( क्रमशः )

टिप्पण्या

  1. प्रत्युत्तरे
    1. नमस्कार,अतिशय सुंदर ओघवत्या भाषेत लिहिलेले वर्णन वाचल्यानंतर पुन्हा एकदा परिक्रमेला जावेसे वाटते. मैया कधी बोलावते बघूया.
      कृपा वाठारे,पुणे.

      हटवा
  2. खूप छान मार्मिक वर्णन. वाचुन खूपच आनंद झाला.

    उत्तर द्याहटवा
  3. प्रत्युत्तरे
    1. कृपया त्याची थोडक्यात माहिती मला खालील इमेल वर पाठवावी म्हणजे आपण बनविलेल्या यादीवर अपडेट करता येईल . यादी केवळ संदर्भासाठी आहे .

      mazinarmadaparikrama@gmail.com

      हटवा
  4. बरं झालं हाणला,नाहीतर माजतात असे लोक

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

जे आवडते सर्वांना ...

अनुक्रमणिका

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

लेखांक १ : नर्मदे हर !

लेखांक २ : भोपाळ जवळच्या जंगलातील अपघात

लेखांक ४ : झुठा कही का ! सबकुछ तो लाए हो !

लेखांक ३ : चोराची धन

लेखांक ५ : ग्वारीघाट जबलपुर मध्यप्रदेश

लेखांक ८३ : महाराष्ट्रात प्रवेश आणि भाबरीचे भेदक भिल्ल-महात्मा फोदला गारद्या पावरा

लेखांक ७४ : लेपा बांध , वेदा संगम , कठोरा अन् मांडव्य गुंफा

लेखांक ९० : गुजरात मधील कणजी चे सान्सुभाई तडवी आणि अरण्यव्याप्त माथासर